राम मंत्र श्लोक १६-१७-१८

नको फार मंत्राग्निच्या मंत्रदीक्षा ।

नको जारणा-मारणादी अपेक्षा ।

कळायुक्त चातुर्य तें विकळा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १६ ।।

सरळ अर्थ – भगवंताला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध अंतःकरण, शुद्ध भाव, शुद्ध कर्म याचे फार महत्व आहे. यांशिवाय केलेल्या कर्मकांडात यांत्रिकता येते. भाव-भक्ती शिवाय केलेले यज्ञयागादी उपचार असोत की, सदगुरूंकडून मिळालेल्या मंत्रदीक्षेचा जप यासारखी सात्त्विक उपासना सुद्धा असो; भावा अभावी  तितकीशी प्रभावी ठरत नाही. तसेच जारणमारणादी, जादूटोणा किंवा मंत्र-तंत्र साधना यांसारख्या तामसी पूजा-साधनाही यशस्वी ठरत नाहीत. तेव्हा ‘हरे राम’ हा सोपा मंत्र जपावा हेच उत्तम होय.

श्रीसमर्थांचा बोध – ईश्वराची पूजा हे अध्यात्माचे एक प्रधान अंग आहे. सर्वच शास्त्र-पुराणात सांगितलेल्या यज्ञयागादी सकाम  व्रताचरणात, मंत्रोच्चार; पूजासाहित्य इत्यादि अचूक कर्मकांडाला फार महत्व असते. ते एक महत्त्व पूर्ण शास्त्र आहे. आज वैज्ञानिक ज्या निष्ठेने, अथक प्रयत्नाने संशोधन करतात तसेच इथेसुद्धा शास्त्र ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शास्त्र शुद्ध विधीविधान केले तरच कामना सिद्धी होते. या क्रियेला श्रीसमर्थ  ‘कळायुक्तचातुर्य’ असा शब्द वापरतात. असफल प्रयोग म्हणजे ‘विकळा’. काही  सूक्ष्मातिसूक्ष्म त्रुटी सुद्धा असफलतेचे कारण बनतात व मनी धरलेली कामना/हेतु पूर्ण होऊ शकत नाही आणि हाती काही लागत नाही. मग नैराश्य येते, कामना पूर्ण झाली नाही म्हणून देवावरचा विश्वास उडतो.  या  उलट नामसाधना माणसाला निष्काम  बनवते. प्रपंचात सतत काही तरी हवेच असते, ते हवेपण; अपेक्षा सदासर्वदा नाम घेतल्याने कमी कमी होत जाऊन विरून जाते. मन रामचरणी हळूहळू स्थिर होऊ लागते, शांत होते. कामनाच नाही म्हणून सकाम साधना करावीशी वाटतच नाही. ही मनाची स्थिती कायम राहावी, समाधान लाभावे या साठी सतत अभ्यास करणे गरजेचे असते. तेव्हा श्रीसमर्थ  नाममहात्म्य पटवूवुन देताना म्हणतात,  “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

 

“नको योग अष्टांग तो रोध प्राणा ।

नको कृच्छचांद्रायणी हट्ट जाणा ।

अपभ्रष्ट हा मार्ग की वोखटा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १७ ।।”

सरळ अर्थ – अष्टांगयोगातील कठीण असा प्राणनिरोध किंवा हटयोगातील कठोर अशा व्रतांचे आचरण केल्यानेच फक्त पापनाश होतो व परमेश्वराजवळ जाता येते ही समजुत मिथ्या आहे. हा मार्ग  चुकीचा आहे. श्रीरामाचे पवित्र , सोपे, सरळ नाम श्रद्धेने, निष्ठापु पुर्वक,शुद्ध अंतःकरणाने, भावभक्तीने सतत घेतले तर आणखी काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही.

श्रीसमर्थांचा बोध – भगवंत प्राप्तीचे ज्ञान, योग, कर्म, भक्ती असे अनेक मार्ग आहेत. आपापल्या स्वभावधर्मानुसार, वृत्तीनुसार, आवडीनुसार मार्ग निवडून माणूस साधना करत परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतो. यातील सगळेच मार्ग खडतर आहेत. या श्लोकात श्रीसमर्थ हटयोग व त्यातील कठोर व्रताचरणाचा उल्लेख करतात. या मार्गात शारीरिक आणि मानसिक दोन्ही शक्तीची कसोटी लागते. अष्टांग योगातील प्राणनिरोध करणे सर्वसामान्यांना सहजसाध्य नक्कीच नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी आठ अंगे त्यांच्या क्लिष्ट  नियमासह आचरण करणे तेवढेच कठीण असते. हातून कळत नकळत घडलेल्या पापाच्या क्षालनार्थ स्कंदपुराणात अनेक खडतर व्रते सांगितलेली आहेत, त्यातीलच चांद्रायणी व्रताचा उल्लेख श्रीसमर्थ येथे वानगीदाखल करतात. यात कृच्छचांद्रायणी व मृदचांद्रायणी असे प्रकार आहेत. हे व्रत चंद्राच्या साक्षीने केले जाते. चंद्रकलेप्रमाणे आहार घ्यायचा. संध्येची एक पळी किंवा एक घास जो संकल्प केला असेल तसे पहिल्या दिवशी अन्न प्राशन करायचे वाढवत जाऊन पौर्णिमेला पंधरा पळी/घास अन्न घ्यायचे तर कृष्ण प्रतिपदेपासून एकेक पळी/घास अन्न कमी करत अआमावस्येला निराहार रहायचे. अशाप्रकारे सहनशक्तीची, संयमाची, निश्चयाची कसोटी पहाणारी कठोर व्रते करणे सामान्य जनांना साध्य होत नाही. तेव्हा हा मिथ्या/वोखटा मार्ग धरण्यापेक्षा सहज, सुलभ अशा नामसाधनेने तीच सारी फळे कष्ट न करता मिळत असताना तोच मार्ग अनुसरावा हे योग्य नव्हे का ? म्हणूनच “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे” असे श्रीसमर्थ काकुळतीतेने सांगतात. 

 

“कदापी घडेंना व्रतें यज्ञदाने ।

नसे द्रव्य गांठी करावें जयाने ।

घडे ना घडे  यद्यपी कां फुका रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १८ ।।”

सरळ अर्थ – व्रते, उद्यापने, दान-धर्म, यज्ञ-याग इ. करण्यासाठी मुबलक द्रव्य गाठीशी असणे आवश्यक आहे. प्रत्येकालाच  ते जमणे शक्य होत नाही. म्हणून त्याने उपासना करू नये का? श्रीसमर्थ  म्हणतात श्रीराम नाम अखंड घेणे हा सोपा उपाय आहे ना ! रामनामाच्या उच्चाराने सगळ्याच साधनाचे फळ अनायासे मिळते म्हणू म्हणूनच “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

श्रीसमर्थांचा बोध – नामसाधना हा भगवंताच्या प्राप्तीचा सहज-सोपा-सुलभ मार्ग आहे. त्यामध्ये कष्ट नाहीत,  अव्यवहारीपणा नाही, प्रपंच सोडावा लागत नाही, पैसा खर्च करावा लागत नाही, नीतीमत्ता उल्लंघन नाही, लौकिक ज्ञान आवश्यक आहे असेही नाही, स्थळ-काळाचे बंधन नाही; कुठलेही भौतिक बंधन किंवा अटी नाहीत. एवढी मुभा असताना लोक मात्र देवभेटीसाठी नाही तर आपल्या इच्छापूर्तीसाठी खडतर व्रते, उद्यापने, तीर्थयात्रा, यज्ञ-याग अशा सकाम उपासना यांच्याच पाठी लागतात, अट्टाहास करतात. सर्वच संत नामाचे महत्त्व आग्रहाने प्रतिपादन करतात, तरीही आम्हाला आमचे खरे हित कळत नाही. याचे कारण जे सहजतेने उपलब्ध आहे त्याचे महत्त्व वाटत नाही. शिवाय आम्हाला परमार्थाचा सुद्धा इव्हेंट/समारंभ करायचा असतो. महापूजा-अभिषेक करताना त्यात मन नसतेच फक्त देखावा करायचा असतो. आम्ही धार्मिक आहोत, आम्ही देवाचे किती करतो, हे जगाला दाखवायचे असते. अंतःकरणात परमेश्वर प्राप्तीची तळमळ नसते. देव भावाचा भुकेला आहे. त्याला मी भक्ती करतो असे गर्जना करून सांगण्याची गरजच नसते. अंतःकरणात रामाचे नित्य स्मरण असेल तर केलेले प्रत्येक सत्कर्म रामकार्य होते. म्हणूनच श्रीसमर्थ आग्रहाने प्रतिपादन करतात की, असे समारंभ साजरे करून पैसा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्री समर्थ रामदासस्वामी रचित आरत्या भाग ३

समर्थ रामदास स्वामींचे आराध्य दैवत आहे श्रीराम! श्रीरामांवर त्यांनी नऊ आरत्या रचल्या आहेत. त्या प्रत्येक आरतीमधील आशय वेगळा आहे. त्या व्यतिरीक्त सद्‌गुरु श्रीरामांवर एक आरती आहे. त्याचप्रमाणे श्रीदेव म्हणून श्रीरामांवर आरती आहे. तसेच दासभक्तीचे आदर्श प्रतिक श्री हनुमंतरायांवर एक आरती आहे.

 

हनुमंतांच्या आरतीची सुरवात द्रोणाचल उचलून आणला त्या कथेने केली आहे. यातुन त्यांना हनुमंत हा शक्तीमान, दिलेले काम काहिही करून, जीवाचा आटापीटा करून पूर्ण करणारा होता, हे दाखवून त्याचा आदर्श सर्वांनी ठेवावा हे सांगीतले आहे. तसेच आला गेला कामाला बहुताला भधून आपण सर्वांच्या त्याच्यासारखे उपयोगी पड‌ले पाहिले हे ते सुचवू इच्छितात. म्हणजे यष्टी, समष्टी यांचा विचार केला पाहिजे हाही उपदेश यातून ते देताता. यष्टी = व्यक्ती तर समष्टी मध्ये कुटुंब, समाज, राष्ट्र, वसुधा व संपूर्ण ब्रह्मांड यांचा समावेश आहे. रामकथा सांगून आली. मग श्रीरामांची आरती. रामदास स्वामींनी ती रचुन अगदी स्वत:चा आनंद प्रगट केला आहे. आपल्या डोळयासमोर त्यांनी त्यांचे निकटवर्तिय कुटुंब उभे केले आहे. ते आपल्या या दैवताचे वर्णन करताना पूर्ण तल्लीन झाल्याचे भासते. श्रीराम सुध्दा कुटुंबवत्सल होते. त्या कुटुंबात भक्तगणांचा समावेश होता हे या आरतीतून दृष्टीपथात येते. त्या शामसुंदर श्रीरामांविषयी ते म्हणातात, शामसुंदर शोभे त्रिदश कैवारी । त्यांच्या दक्षिणेकडे शेषनागाचा अवतार लक्ष्मण तर वामांगी सीता सुंदरी आहे. भरत, शत्रूघ्न, माता कौसल्या हे डोळे भरून पहात आहेत. पुढे मारूतीराया हात जोडून बसला आहे. सर्व भक्तगण, टाळ, मृदंग, नगारा व इतर अनेक वाद्ये घेऊन नामघोष करीत आहेत. टाळ्यांचा सुध्दा सुमधुर ध्वनी दुंजन करीत आहे. आणी हे सर्व ऐकून पाहून रामदास अगदी आनंदी झाले आहेत. अशीही शांतरसात वाहून जाणारी ही आरती आहे. 

 

पुढे समर्थ श्रीरामांना आता उठण्याची वेळ झाली आहे. आपल्या उठण्याची वाट पहात आहेत. सर्वजणन तुमच्या दर्शनासाठी उत्सुक आहेत. हे सांगत आहेत ते वर्णन करतात की, जनकराजांची कन्या म्हणले सीता सोन्याच्या थाळीत दिवा ठेऊन आरती घेऊन सज्ज आहे. उठ रे बाळा असे कौसल्या‌माता सांगत आहे. तुझे मुखकमल पाहण्यासाठी, दर्शनासाठी कोण कोण आले आहेत ते पहा. विवेक संपन्न वशिष्ठ सद्गुरू आले आहेत. साधुसंत, मुनी, यती, ब्रह्मवृंद, योगी तिष्टत आहेत.  ते प्रेमादराने तुझा जयजयकार करत आहेत. जीवाशिवाचे ऐक्य असते तसे तुमचे ऐक्य असणारे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे उम्मन होऊन आपल्या दर्शनाची प्रतिक्षा करत आहेत. त्याच रांगेत सात्विक गुणसंपन्नअसा सुमंत प्रधानही ऊभा आहे. नगरगण जमा झाले आहेत. वायुपुत्र हनुमान चरणाची धुळ मस्तकी लावण्यासाठी तिष्टत ऊभा आहे. आणि मग ते श्रीरामांचे वर्णन करतात, ते म्हणतात तू दीनबंधू आहेस, दयाळू कृपाळू, भक्तवत्सल आहेस, तेव्हा आता दर्शन दे. तुझे ते कमलनयन माझ्याकडे स्थिर कर. तू जगजीवन आहेस, तू आनंदरूप होऊन भक्तांना दर्शन दिले तसे मला दे. 

 

शेवटच्या पांचव्या व सहाव्या कडव्यात खूप मोठे तत्वज्ञान दडले आहे. तू माझ्या जीवाचा जिव्हाळा आहेस तू दिनांचा कैवारी आहेस, दयाळू आहेस मग माझ्यावर कृपा कर. कारण तू भक्त वत्सल आहेस. तू आनंदरूप होऊन दर्शन दिले आहेस. स्वये आनंदरूप होऊनी । भक्ता दर्शन दिधले ।। रामा तू जगजीवन आहेस. यातून ते सांगू इच्छितात की, त्यामुळे आमची श्रध्दा वाढते. आमच्या अंत:करण प्रेमभावना जागृत होते आणि हाच भक्तीचा प्रारंभ होण्याचा क्षण आहे. ऋग्वेदात सांगितले आहे की, मानवाला अंत‌:करणात प्रेम भावना निर्माण होतात, त्याच्या मधे ध्यानप्रधानता येते. या सृष्टीची निर्मिती, पालन पोषण भरण व नियमन, संहार करणारा तो परमात्माच आहे. म्हणून त्या परमात्म्याच्या अवतारात श्रीरामांना सद्‌गुरु रामदासांनी राम तू जगज्जीवन म्हटले आहे. 

 

पुढे ते जेव्हा स्वयं आनंदरूप होऊन भक्तांना दर्शन देतोस असे म्हणतात. तेव्हा तैतिरीय उपनिषदातील ब्रह्मानंदवल्ली मध्ये मानवी आनंदाचे स्वरूप स्पष्टपणे विशद करून सांगितले आहे, त्याची आठवण होते. दासबोधात पहिल्या दशकातील पहिल्या समासात त्यांनी अभ्यासलेल्या ग्रंथांची यादी आहे. त्यात एकोणिसाव्या ओवीत उपनिषदे अभ्यासिली याचा उल्लेख आहे. तैतिरीय उपनिषदातील आनंदवल्ली या विभागातील आठव्या अनुवाकातील (अध्यायातील) दुसरा मंत्र तर जणू मानवी आनंदाची व्याख्या, गाभा प्रकट करणारा आहे. उन्नतीसाठी लागणारी पात्रता, अधिकार या मध्ये स्पष्टपणे सांगितला आहे. उत्कट व भव्य महत्वाकांक्षा हा पहिला गुण, या गुणावरच आयुष्याची सर्व इमारत उभारली जाते. या गुणात काही कमीजास्त झाले तर मानवी जीवनक्रम निस्तेज होतो. दूसरा गुण मनाचा खंबीरपणा नसेल तर महत्वाकाक्षेचा व्हावा तसा उपयोग होत नाही. पुढचा गुण शशिरबळ. हे तर सर्वात महत्वाचे आहे. महत्वाकांक्षा, दृढता, बलसंपन्नता या अनुक्रमे बुध्दी, मन आणि शरीर यांच्या शक्ती असून त्यांची पूर्तता करणे हे या साधकाचे पहिले कर्तव्य आहे. यास जर तेजस्वी विद्या व ओजस्वी शील यांची जोड मिळाली की, खरे मनुष्यत्व प्रकट होते. हीच उन्नतीची पहिली पायरी म्हणून यास मानुष आनंद म्हणतात. 

अशा चढत्या क्रमाने पुढील ८ पायऱ्या ओलांडत्या की, ब्रह्मानंद प्राप्त होतो. ब्रह्मानंद म्हणजे त्या परमात्म्याचे दर्शन घडणे होय. इतका खोल अर्थ राम जगजिवन । स्वये आनंदरूप होऊन । भक्ता दर्शन दिधले ।। असा आहे. म्हणजे श्रीरामांच्या नामाने, शक्तीने, दर्शन घेण्याने आनंद प्राप्त होतो. हे या ठिकाणी भक्तांना सांगू इच्खितात. 

 

या सगळ्या वरून आपल्या हे लक्षांत येते की, समर्थच्या आरत्यांमधून तत्वज्ञान / सृष्टीची उत्पत्ती, स्थिती लय, ब्रहमाचे स्वरूप, ईश्वराचे गुण विशेष, आढळते. तसेच नीति, विवेचन, भक्तीमार्ग, उपासना मार्ग, इत्यादिचा ही मार्ग आढळतो. त्यांच्या आरत्यांमध्ये काव्यसौंदर्य आहे. कल्पनासौष्ठव आहे. तसेच त्यांचे स्वतःचे कणखर, कधी कोमल व्यक्तीमत्व प्रकट झाले आहे. यात सामाजिकतेचे भान सुध्दा आढळते.

 

प्रसन्न आणि पवित्र वातावरणात देवताची प्रफुल्ल मूर्ति, दीप ओवाळून त्या प्रकाशात पाहताना आणि त्याच वेळी आरतीचे पद्य तोंडाने म्हणताना तादाम्य साधता येते. भक्तात एकाग्रता उत्पन्न होते. असा प्रभाव या आरत्यांचा आहे.

 

समर्थांच्या आरत्यांच्या रचना ही स्फुट रचना असल्याने आणि ती पद्यरूपात उत्तम छंदात बांधलेल्या असल्याने त्या पाठांतरास सुलभ आहेत. हेच त्यांच्या आरत्यांचे वैशीष्ठ आहे.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सदा संगती सज्जनांची धरावी

नरदेह परम दुल्लभ । येणे घडे अलभ्य लाभ ।

दुल्लभ तें सुलभ । होत आहे ।। दासबोध २०-६-२५ ।।”

मानवी शरीराचा लाभ होणे अतिशय दुर्लभ आहे, पण त्यातच मोक्षाचा लाभ होतो. तो फार दुर्लभ असला तरी या शरीरातच सहजसाध्य आहे. मनुष्य शरीरातच आत्मा अधिक स्पष्ट झाला आहे. कळलेले बोलणे, कालची गोष्ट आज आठवणे, प्रकाश व अंधार यांचे ज्ञान, मर्त्य शरीराच्या सहाय्याने अमृत आत्म्याच्या प्राप्तीची इच्छा करणे, इत्यादी योग्यता असलेले हे शरीर आहे. भगवान शंकराचार्यांनी तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहेत. 

१) मनुष्य जन्म, २) मुमुक्षुत्व (मोक्षाची इच्छा), ३) सज्जन संगती. 

मनुष्य शरीर ईश्वराच्या अनुग्रहानेच प्राप्त होते. अनेक योनीतून फिरता फिरता पाप-पुण्याची समानता झाल्यावर नरदेह प्राप्त होतो. मनुष्यशरीर निर्माण केल्यावर ईश्वरालाही आनंद झाला कारण या शरीरातच आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य आहे.

“या नरदेहाचेनी कारणे । सच्चिदानंद पदवी घेणे ।

एवढा अधिकार नारायणे । कृपावलोकने दिधला ।।”

या ध्येयसिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे क्रियमाण स्वातंत्र्य माणसाला आहे. जीवनाला सुंदर घाट देण्याचे सामर्थ्य सर्व जीवात आहे, पण अज्ञानाने ते कसे सुंदर करावे हेच कळत  नाही. कोणीही मनुष्य उपजत शहाणा असणे दुर्मिळच असते. कारण मनुष्याचा जन्मच अज्ञानावस्थेत होत असतो. मनुष्य पुढे स्वप्रयत्नांनी, संत संगतीने व सद्गुरुकृपेने शहाणपण शिकत जातो. शहाणपण नित्य अभ्यासानेच प्राप्त होते, म्हणून सत्संगतीला जीवनात फार महत्व आहे. सत्संग हा परमार्थाचा पायाच आहे. सत्संगतीशिवाय जीवनात खरी प्रगती होऊ शकत नाही. 

“अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।”

अवगुण सोडायचे म्हटले तर सोडता येतात व उत्तम गुण अभ्यासाने प्राप्त करून घेता येतात. जो माणूस प्रयत्न करीत नाही, कष्ट करीत नाही, शहाणपण शिकत नाही, उत्तम गुणांकडे दुर्लक्ष करतो, कळूनही त्यांचा स्वीकार करत नाही, तो नेहमी दुर्मुखलेला, चिडचिडलेलाच रहातो. परंतु यातून बाहेर पडायला केवळ आणि केवळ सज्जन संगतीच कामी येते. त्यांच्या सहवासातून, विचारातून मनाचा पालट होण्याचे सामर्थ्य असते. 

“संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ।

मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे |।।”

कोणत्याही जीवाचा सत्संगामुळे उद्धार होतो. संत हे परमेश्वराचे अवतार आहेत. संत म्हणजे सत्पुरुष, दोष नसलेले.  

“अहंकार नाहीं दुराशा अंतरीं । ममता हे दुरी मोकलीली ।।१।।

मोकलिली भ्रांती शरीरसंपत्ती ।  वैभव संतती लोलंगता ।।२।।

लोलंगता नसे ज्ञानें धालेपणें । ऐसीं हीं लक्षणें सज्जनाचीं ।।३।।”

जे संत सज्जन असतात ते अहंकार विरहित, आसक्ती विरहित, ममतेपासून दूर, वैभव, संपत्ती यापासून दूर, अनासक्त, अपेक्षा विरहित असतात. संत हे समाजाचे भूषण व वैभव आहे. ते भोगवादापासून समाजाला दूर ठेवून, ईश्वरनिष्ठ करून मोक्षाची सोपी वाट दाखविण्याचे महत् कार्य करतात. 

“संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।

नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ।।”

संतांचे जीवन आनंदमय असते. सुखच जणू त्यांच्या रूपाने आकाराला येते. त्रिविध ताप नष्ट करून सर्व प्रकारे संतुष्ट जीवन जगण्याची विद्या, कला संतांकडूनच शिकावी. संत श्रीमंत व उदार असतात म्हणून अतिशय दानशूर असतात. यांनी कितीही दिली तरी त्यांची ज्ञानरूप संपत्ती कधीच संपत नाही. सज्जन संगतीत सर्व गोष्टींचे मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था आहे.

संत सज्जनांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी वेद, उपनिषदे, गीता, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला. संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी प्राकृत भाषेत सांगून ज्ञानाचे भांडारच सर्वांसाठी खुले केले. याशिवाय अभंग, ओव्या, भारुड, श्लोक, भजने, गवळणी, स्फुटकाव्ये, गोंधळ, जागर, पोवाडे, आरत्या, भूपाळ्या अशा विविध रचनांच्या माध्यमातून समाजावर उत्तम संस्कार व्हावेत या दृष्टीने ते अखंड कार्यरत राहिले. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा इत्यादी ग्रंथातून ज्ञानाची गंगा लोकांना उपलब्ध करून दिली.

आता खरा प्रश्न असा आहे की, या संत साहित्याची, सज्जन संगतीची समाजाला गरज आहे का ? तर याचे उत्तर नक्कीच होय असे आहे. कारण आम्ही फारच भोगसंस्कृतीकडे वळलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट मला मिळायलाच हवी. मी, माझे, माझा प्रपंच, माझे घर, माझी मुले, माझा पैसा अशी लालसा वाढत चालली आहे. प्रसंगी गैरमार्ग जरी अवलंबावा लागला तरी चालेल, पण मला सर्व सोयी मिळायलाच हव्यात. हक्कासाठी माणूस जागृत असतो पण कर्तव्य मात्र विसरतो किंवा त्याला त्याचे महत्त्वही वाटत नाही. ही समाजाची बिघडत चाललेली घडी संत सज्जनांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांच्या विचारांशिवाय बदलणे फार कठीण आहे. श्रीसमर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात सांगतात – 

“नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।

अतिस्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे ।”

अनैतिक मार्गाने मिळवलेले धन शेवटी पापास कारणीभूत होते. संत तुकाराम महाराजही म्हणतात, “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ।।” संतांचे विचार फार मोलाचे असतात पण ज्ञानी जीवांना मात्र पटत नाहीत. त्याला काय होते ? असे सगळे वागतात, असे म्हणून ते आपलेच खरे करतात व आपलेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात.

वास्तविक नरदेह हा देहधारी जीवांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण ईश्वराने मानवाला दोन अलौकिक शक्ती दिल्या आहेत. १) परमेश्वराने माणसाला विवेक करण्याची शक्ती दिली, २) त्याला वैखरी वाणीची देणगी प्राप्त आहे. भगवंताचे नाव घेण्याची व्यवस्था या देहातच आहे. नरदेह मोठे घबाड आहे. ही एक मनुष्यदेहातील महान देणगी आपल्याला लाभली आहे पण विषयात व वासनेत अडकलेल्या जीवाला नरदेहाचे महत्त्व कळत नाही, त्यामुळे चांगला देह (अव्यंग) मिळूनही तो सत्कारणी लागतोच असे नाही. जीवनातील अस्थिरता, चंचलता, भोगलालसा, आसक्ती, स्वार्थीपणा, अहंकार, हव्यास, द्वेष, मत्सर, हेवेदावे, गर्व, मीपणा इत्यादी अनेक दुर्गुण दूर करून आनंदी जीवन कसे जगावे ? प्रपंच करता करता परमार्थही कसा साध्य करावा ? देवाची भक्ती कशी करावी ? खरा देव कोठे आहे ? त्याला कसे ओळखावे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, मनातील शंका, संशय दूर करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त सज्जनसंगतीतच आहे.

“जगाच्या कल्याणा संताच्या विभूती । देह कष्टविती उपकारें ।” जीवाचे अज्ञान दूर करून त्याचा उद्धार करणे ही तळमळ त्यांना लागलेली असते, पण संतांची थोरवी, महती कळायला पुण्याई लागते हे मात्र खरे ! म्हणूनच मानवी जीवनात सज्जन संगतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

हा देह ईश्वर भक्तीसाठी, परमार्थ साधनेसाठी वापरायचा आहे. साधना नसेल तर या देहाला किंमत नाही. या नरदेहाला साधनधाम म्हटले आहे. या देहाच्या आधारानेच शुद्ध जाणीवरूप असणाऱ्या अंतरात्म्याचा शोध घेण्यात खरे समाधान आहे. सगुणाच्या आधाराने भक्ती करत करत निर्गुण तत्त्व जाणायचे आहे व यासाठी सज्जन संगतीची फार आवश्यकता आहे. 

संतांच्या, सद्गुरूंच्या सांगण्यानुसार वाटचाल केली, संतांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवून त्यांच्या बोधानुसार वागत राहिलो तर निश्चितच खऱ्या देवाचे दर्शन घडते. “भाग्य आले संतजन । तेही देवाचे दर्शन ।।” असे श्रीसमर्थांनी अभंगात सांगितले आहे.

“देहादी सृष्टी असू दे खुशाल । हाती असू दे विवेकी मशाल ।

पुढे वाकडे कोण करील कैसे । तनु रोमरोमी आनंद पैसे ।।”

प. पू. डॉक्टर देशमुख काका यांच्या या काव्यातून माणसाने आनंदी जीवन कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन मिळते. या सौंदर्यशाली सृष्टीच्या झळकणाऱ्या पडद्यामागे दडलेला ईश्वरच आहे. ही सृष्टी त्याची वस्तूप्रभा आहे, म्हणून विवेकरूपी मशाल हाती घेऊन सृष्टीमध्ये वावरावे. सगळ्याचा आनंद घ्यावा पण मनाने मात्र कशातच गुंतू नये. ही भगवंताची लीला आनंदाने पहावी. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेली नित्यकर्मे प्रामाणिकपणे, कौशल्यपूर्ण व आनंदाने करावी. प्रपंचही अगदी मनापासून करावा पण मनात मात्र भगवंताशी अनुसंधान असावे. ज्याने हे शरीर दिले, बुद्धी दिली, कार्य करण्यास लागणारी शक्ती दिली, उत्साह दिला, प्रेरणा दिली, त्याचे अनुसंधान अखंड असावे. भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवून प्रेमाने, भावपूर्णतेने केलेली सेवा भगवंतापर्यंत पोहोचते. 

“शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ।।”

सर्वसामान्य जनांना संतांच्या संगतीतच खऱ्या देवाचे सामर्थ्य कळू शकते/लागते. संत या चराचरात व्यापून असलेल्या ईश्वराला पाहण्याची दृष्टी देतात. सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना त्रिवार वंदन करूया.

जय जय रघुवीर समर्थ

श्रीभीमरूपी स्तोत्र १ – भाग १

मारुती व श्रीसमर्थ भेट “मारुतीचा गुण गौरव”

त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा तेरा कोटी जप श्रीसमर्थ टाकळी येथे संगमावर करीत असताना मारुतीराय वानर रूपात येत असत. जप पूर्ण झाल्यावर अतिशय आनंदित होउन मारुतीरायांनी श्रीसमर्थांना आपल्या भीम रूपात म्हणजे विशाल स्वरूपात दर्शन दिले व आनंदाने उचलून घेतले, मिठी मारली. मारुतीचे भव्य दिव्य रूप पाहून श्रीसमर्थांना जी काव्य स्फ़ूर्ती झाली ती या स्तोत्रात आली आहे. पहिले चार श्लोक हे मारुतीचे गुण वर्णन करणारे आहेत. 

“भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।

वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना ।। १ ।।”

मारुतीचे रूप अत्यंत विशाल व भव्य आहे. प्रत्यक्ष श्रीमहादेवाचा अवतार म्हणून महारुद्र व त्यातही एकादश रुद्राचा अवतार आहे. यात भव्यते बरोबरच भय उत्पन्न करणारे अचाट सामर्थ्य सुद्धा आहे. या अवतारात शक्तीरूपाने सहाय्य करण्यासाठी देवी पार्वती ज्याच्या शेपटीत शक्तीरूपाने राहिली असा हा अवतार. इंद्राच्या वज्राघाताने हनुवटी भंगलेला पण त्या वज्रासमान कठोर देह असणारा असा हा अवतार आहे. रावणाच्या वनाचा नाश करणारा म्हणून वनारी आणि अंजनी मातेचा पुत्र म्हणून अंजनीसुत असा हनुमान हा श्रीरामाच्या महान कार्यात सहाय्यक होणारा आहे. त्याचा दूत म्हणून कार्य अत्यंत चोख बजावणारा असा वायुपुत्र हनुमान आहे व तुफान वाऱ्यात जो वेग आवेग आणि बल असते तद्वत हा अत्यंत वेगवान हालचाल करणारा आहे. दूताला अत्यंत चतुर असावे लागते. कार्य करताना बंदी होण्याची शक्यता असते. दूताला पकडू नये असा संकेत आहे आणि तो सज्जन पाळतात. म्हणूनच युद्ध सुरु करण्यापूर्वी आपल्या देशातील दूतावासातील सर्वांना सुखरूप माय देशात पाठवले जाते. पण रावणासारखे दुरात्मे असले संकेत थोडेच मानतात ? ते दूताला बंदी बनवून त्याचे प्राण हरण करणे अथवा त्याला शारीर कष्ट देणे असे विकृत मार्ग अवलंबतात. दूताकडे आपली सुटका करून व शत्रूला संदेश पोहोचवून परत येण्याचे सामर्थ्य हवे. ते मारुतीराय व अंगद दोघांकडे होते. सुग्रीव व अंगद बलशाली होते पण मारुतीराय विवेकी होते आणि कुठलेही वेडे धाडस त्यांनी कधीही केले नाही. राजनीती, कुटील नीती जाणत असल्याने ते रावण, अहिरावण व महिरावण यांचे मनसुबे निष्प्रभ करू शकले आणि इंद्रजीताच्या मायेवर उपाय शोधू शकले . वनात अरण्यात दाट झाडी असते, सूर्य प्रकाश सुद्धा उतरत नाही व अंधार असतो. आपल्या मनात सुद्धा भाव भावना व विकार यांची दाटी जणू काही वासना विकारांचे जंगल असते. मारुतीला विनंती आहे की जसे रावणाचे अशोक वन उध्वस्त  केले तसे मनातील हे जंगल सुद्धा तू जाळून टाक.

“महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळे ।

सौख्यकारी शोकहर्ता  धूर्त वैष्णव गायका ।। २ ।।”

प्राण हरण करण्याच्या उद्देशाने प्रयोग केलेल्या इंद्रजीताच्या शक्ती प्रभावाने सर्व वानर सैन्य व राम लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडले असताना म्हणजे मृत्यू समीप पोहोचले असताना हनुमान हे एकच असे महाबली होते की ज्यांच्यावर त्या शक्तीचा प्रभाव पडला नव्हता. जांबुवंताच्या आदेशानुसार द्रोणागिरी पर्वतावरील औषधी वनस्पती अतिशय त्वरेने आणून तो परत मूळ जागी नेऊन पोहोचवणे हे अशक्य कोटीतले काम करून स्वामी राम व लक्ष्मण तसेच समस्त वानर सेनेला त्यांचे प्राण मिळवून देणारा, संजीवन देणारा असा हा हनुमान लोकांची संकटे दु:खे निवारून सुख देणारा आहे. हनुमानाने कोणाकोणाचे दु:ख निवारण केले ? 

सुग्रीव राज्य हीन झाला होता. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सुग्रीव व रामराया यांची गाठ घालून दिली, पत्नी हरणाच्या शोकातून सीतेचा शोध घेऊन प्रत्यक्ष रामांचा शोक कमी केला. शक्ती लागून मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान देऊन श्रीरामांना मोठ्या संकटातून  सोडवले. रामांची अंगठी देऊन राम सुटकेसाठी येत आहेत हे सांगून सीतामाईचा शोक कमी केला. गांजलेल्या देवांना लंका दहन करून दिलासा दिला. तो वैष्णव म्हणजे राम भक्त असून सतत वाणीने राम भक्तीचे मधुर गायन करणारा चतुर व अतिशय बुद्धिमान असा गायक आहे असे श्रीसमर्थ म्हणत आहेत. तसेच जिथे भक्तीने राम कथा सांगितली जाते तिथे मारुतीराय येतात अशी श्रद्धा आहे.  

“दिनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।

पाताळ देवताहंता भव्य सिंदूर लेपना ।। ३ ।।

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।

पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।। ४ ।।

हनुमंत हा अनाथांचा रक्षक आहे. जेव्हा देवांना रावणाने बंदी बनवले होते तेव्हा त्यांना कोणी वाली राहिला नव्हता व ते अतिशय दयनीय परिस्थितीत होते. हनुमंताने जाऊन लंका दहन केले तेव्हा देवांच्या सुद्धा सुटकेच्या आशा पालवल्या. रामाशी, विष्णूच्या अवताराशी एकरूप असा हनुमान समर्थांच्या मनाला प्रसन्न करणारा असा आहे. तो जगताच्या अंतरी स्थित आहे म्हणजे सकल जगाचा आत्मा आहे. अहिरावण व महिरावण या पाताळ स्थित राक्षसांचा संहार करून हनुमानाने राम व लक्ष्मण यांची सुटका केली. तो भव्य असून त्याने सर्वांगाला शेंदूर लेपन केले आहे. हा रंग वैराग्याचा रंग आहे. हनुमान हे अत्यंत विरक्त आहेत. जनरक्षक अखिल जगाचा कैवार घेणारा आणि वायुरूप असल्याने जणू सकल जगाचा प्राण असलेला हनुमान. त्याने वायू रोधून धरला तर सर्व त्रिलोक कासावीस होतात. तो सर्वांच्या प्राणाचे रक्षण करतो. त्याचे पुण्य थोर असून तो काया वाचा मनाने अत्यंत पवित्र पावन आहे. जे भक्त त्याची मनोभावे पूजा करतात त्यांना इच्छापूर्तीचे समाधान प्रसाद हनुमान देतात असे समर्थ सांगत आहेत.

“ध्वजांगे उचले बाहो आवेशे लोटिला पुढे ।

काळाग्नि काळरुद्राग्नी देखता कापती भये ।। ५ ।।

ब्रह्मांड माईले नेणो आवळे दंत पंगती ।

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळे ।। ६ ।।”

हनुमानाचा रण आवेश समर्थ सांगत आहेत. सैन्याच्या पुढे विजयी ध्वज घेऊन मारुती आवेशाने आक्रमण करीत आहे. काळाग्नि काळरुद्राग्नी हे यमाचे दूत, त्यांनाही भयाने धडकी भरावी असा हा आवेश आहे. विश्वरूप दर्शन आठवावे असे वर्णन समर्थ करतात. ब्रह्मांडाचा घास घ्यायला सरसावलेला काल पुरुष विनाशासाठी दाढा करकरा वाजवीत पुढे येत आहे व क्रोधाने डोळ्यातून अग्नी ज्वाळा बाहेर पडत आहेत असे हे भयावह दृश्य आहे. अत्यंत क्रोध आल्यामुळे भुवया वक्र झाल्या आहेत. श्रीसमर्थ इथे हनुमानाच्या रौद्र रूपाचे वर्णन करीत आहेत. रावण व त्याची सेना जशी अत्याचारी झाली होती तशीच वेळ महाभारत काळी आली होती व समर्थ-शिवराय यांच्या काळात सुद्धा अत्याचारी अतिशय वाढले होते. रामदास स्वामी पुरश्चरण करीत होते तो काळ लक्षात घेतला तर श्रीसमर्थांनी श्रीरामाचे रौद्र रूप व हनुमानाचे रौद्र रूप समाजापुढे का ठेवले असावे हे ध्यानात येते. ते श्रीसमर्थांना स्वत:ला किती भावले होते व असा काही तरी अवतार व्हावा ही त्यांची किती तीव्र इच्छा होती ते या वर्णनातून लक्षात येते.

।। जय जय रघुविर समर्थ ।।

संदर्भ : सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे) 

ज्येष्ठ बंधूंना लिहिलेले पत्र

आपण समर्थांची कौटुंबिक पत्रे पहात आहोत. यातील हे पत्र समर्थांनी परत आपल्या ज्येष्ठ बंधूंना लिहिले आहे. या पत्राकरिता मी आ. समर्थव्रती सुनीलदादा चिंचोळकर यांच्या छोट्याशा पुस्तिकेचा आधार घेतला आहे.

सकळ तीर्थाचे सार । सत्यस्वरूप निर्विकार ।

तुमचे चित्त तदाकार । निरंतर ।। १ ।।

विमळ ब्रह्मपरायण । सगुण भक्ती संरक्षण ।

विशेष वैराग्य लक्षण । तुमचे ठायी ।। २ ।।

मुक्त क्रियेचा अनादरू । स्वधर्मकर्मी अत्यादरू ।

आग्रहनिग्रहाचा विचारू । तोहि नसे ।। ३ ।।

नसे कामनेचा लेश । जयंत्या पर्वांचा हव्यास ।

अंतरी आवडे विशेष । हरिकथा निरूपण ।। ४ ।।

तुमचे देह सार्थकाचे । सर्वदा परोपकाराचे ।

भगवंते निर्मिले बहुतांचे । समाधान ।। ५ ।।

तुमचेनी वाग्विलासे । बहु पाखंड नासे ।

संशयातील प्रकाशे । विमल वस्तू  ।। ६ ।।

सन्मार्गींचा कैपक्षी । अनमार्ग करणे अलक्षी ।

लोक पावती प्रत्यक्षी । समाधान ।। ७ ।।

दक्षता आणि चातुर्यता । वित्पन्नता आणि लीनता ।

उत्तम गुण सर्वज्ञता । तुमचे ठायी ।। ८ ।।

तुमचे स्वरूप वर्णवेना । म्हणोनि देहाचि वर्णना ।

युक्त आयुक्त मित्रजना । क्षमा केली पाहिजे ।। ९ ।।

समर्थांनी या पत्रात परत आपल्या ज्येष्ठ बंधूंचे गुणगान केले आहे. ते निर्गुणी उपासनेत कसे रत आहेत व आत्मबोधाच्या सर्वोच्च पायरीवर पोहोचले आहेत, याचेच वर्णन या पत्रात केले आहे. सकळ तीर्थांचे सार.. ही पहिली ओवी. यात समर्थ म्हणतात, सगळ्या तीर्थांचं सार किंवा सगळ्या देवांचे भजन हे जसं एकाच सद्गुरूच्या चरणाशी पोहोचतं, तसंच तुम्ही सद्गुरु पदापर्यंत पोहोचलेले आहात. म्हणूनच तुमचं चित्त, मन, बुद्धी सदैव त्या रामरायाशी तदाकार असते. पुढच्या ओवीत त्याचं लक्षण सांगताना विमल ब्रह्म म्हणजेच निर्गुण निराकार आणि शुद्ध असणाऱ्या परब्रह्माशी आपण तदाकार झाले आहात, तरीही आपण सगुण भक्ती नित्य नियमाने करता. यातही वैराग्य, विरक्तता, अलिप्तता हे गुण विशेष आहेत.

स्वधर्मकर्मी अत्यादरु.. म्हणजेच आपल्या स्वधर्माबद्दल आणि स्वकर्मांबद्दल आपण जागरूक आहात. या ठिकाणी स्वधर्म म्हणजे मनुष्य जन्मात आलो आहोत, म्हणून अंतरात्म्याला जाणून घेणे हे आपले स्वकर्म व स्वधर्म आहे. तसेच प्रपंचात आहोत म्हणून प्रपंचाची जबाबदारी, समाजाची जबाबदारी, लोकांना जागरूक करणे ही सगळी जबाबदारी म्हणजेच स्वधर्म. या दोन्ही अर्थाने त्यांचे जेष्ठ बंधू त्या धर्माचे पालन उत्तम रीतीने करत होते, म्हणून समर्थ त्यांना अत्यादरू म्हणतात. नसे कामनेचा लेश.. म्हणजेच वैराग्य एवढे प्रखर आहे की, कोणतीच कामना, इच्छा, वासना निर्माण होत नाही. सगुण अभ्यास, निर्गुणाची उपासना याव्यतिरिक्त कोणतीच भावना मनामध्ये येत नाही. सतत अंतरात्म्याशी जुळलेले रहाणे हेच त्यांना आवडते, हेच या ओवीतून लक्षात येते. 

हरीकथा निरूपण.. सगुण अभ्यासाबरोबर, जमलेल्या लोकांना हरीकथा सांगणे; आचरणाचा योग्य मार्ग दाखवणे; मार्गदर्शन करणे; नामस्मरणाला लावणे; उपदेश करणे हेच त्यांना आवडते. बहुत पाखंड नासे.. या ओवीत समर्थ सांगतात, पाखंड म्हणजे त्या काळच्या ब्राह्मणांनी धर्माच्या नावावर उभा केलेला बागुलबुवा, ज्याला उल्लंघून जाण्याचा समाजाला धीर नव्हता. ब्राह्मण सांगतील ती पूर्व दिशा हाच समाजाचा न्याय होता. आपण ज्ञानेश्वर माऊलींबद्दल या गोष्टी बघितल्या आहेत. त्यांच्या मातापित्यांना देहांताचे प्रायश्चित्त त्याच कारणाने दिले गेले होते, तरीही या चार भावंडांची शुद्धी करून घेतली नाही; याला पाखंड म्हणतात. तर, तुम्ही प्रवचनाद्वारे; कीर्तनाद्वारे लोकांना या पाखंडापासून दूर करता, सत्य धर्म काय आहे; योग्य आचार काय आहे हे स्पष्टपणे सांगून अंधश्रद्धा बाजूस करता, असेच समर्थांना यातून सुचवायचे आहे.

लोक पावती प्रत्यक्षी समाधान.. हा तुमचा स्पष्ट, सहज, सोपा, आचरणास सहज असणारा भक्तिमार्ग पाहून लोकांना समाधान प्राप्त होते. अतिशय सोपे असणारे नामस्मरण आपण सगळ्यांना सांगता. समर्थांनीही त्यांच्या दासबोधात नामस्मरणालाच महत्त्व दिले आहे. तेच त्यांचे बंधूपण करतात, असेच समर्थांना सुचवायचे आहे. दक्षता आणि चातुर्यता.. प्रपंचात रहाताना सर्व प्रकारची कर्मे करावी लागतात. ती करताना त्यात चूक होणार नाही, कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यासाठीच तत्परता, चातुर्य आवश्यक असते. तुमचा लोकसंग्रह उत्तम असल्याने तुम्ही ही दक्षता नेहमीच घेता. असे सगळे उत्तम गुण तुमच्यात आहेत. 

तुमचे स्वरूप वर्णवेना.. या शेवटच्या ओवीत समर्थ म्हणतात, तुमचं मूळ रूप जे आहे म्हणजेच आत्मरूप जे आहे त्याचं वर्णन करता येत नाही. तुमच्यातल्या विविध उत्तम गुणातून ते सांगण्याचा मी प्रयत्न केला, परंतु अंतरात्मक त्याहीपेक्षा मोठे आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून शेवटी देहाच्या माध्यमातून व देहाच्या कृतीतून तुमचं वर्णन करावं लागलं. अधिक काही कमी जास्त सांगितलं असेल तर क्षमा करावी. यातून श्रेष्ठींची पारमार्थिक उंची लक्षात येते. समर्थही तसेच आहेत, असे या दोन बंधूंचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जरी फार काळ ते एकत्र राहिले नाहीत, तरी मनापासून ते एकमेकांशी जुळलेले आहेत. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

हे सप्तही येकरूप

नवविद्याभक्तींपैकी पादसेवनभक्ती श्रीसमर्थ स्पष्ट करीत आहेत. अध्यात्मशास्त्र हे अत्यंत गूढ आहे. परब्रह्म ही कल्पना अत्यंत सूक्ष्म आहे. ही कल्पना केवळ सद्‌गुरूच समजावून देतात. पूर्वसुकृतामुळे सद्‌गुरू प्राप्ती झाली की, काया, वाचा, मनाने सद्‌गुरूंची अनन्य भावाने सेवा करावी. पाद‌सेवन भक्तीत सेवा व शरणागती हे दोन भाव अनुस्यूत आहेत. ह्या भक्तीने खरे समाधान प्राप्त होते. या समाधानाच्या सात अवस्था वा सात संकेत श्रीसमर्थांनी येथे स्पष्ट केले आहेत. 

संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सह‌जस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरूप ।। ४-४-८ ।।

यांची नावे भिन्नभिन्न असली तरी वास्तवात या सातही अवस्था एकच आहेत असे श्रीसमर्थ समजावितात. 

१. संगत्याग – परमात्मवस्तू अत्यंत सूक्ष्म आहे. बुद्धी, मन आणि इंद्रिये दृश्यात वावरत असल्यामुळे आणि यांच्या द्वारा जीव या दृश्य जगाला चिकटत असल्यामुळे, ते संपूर्ण सुटल्याखेरीज म्हणजेच संगत्यागाखेरीज आत्म स्वरूपाचा अनुभव येत नाही. एक संगत्याग साधला की, पुढचे सहा आपोआप येऊ लागतात.

२. निवेदन – माणसाचा अहंकार किंवा मीपणा म्हणजे बुद्धी, मन आणि इंद्रिये यांचे जणू गाठोडेच आहे. या गाठोड्यात आत-बाहेर सारे अनात्म दृश्य भरलेले आहे. तो ‘मी’ नाहीसा केला की, दृश्याचा नायनाट होतो. त्या ‘मी’ ला भगवंताच्या चरणी अर्पण करणे म्हणजे निवेदन. या दृष्टीनेच संगत्याग व निवेदन एकच आहे.

३. विदेहस्थिती – सामान्य माणसाची सदेहस्थिती किंवा देहबुध्दी फार प्रबळ असते. मी म्हणजे माझा देह, ही त्याची ठाम समजूत असते. सर्व जगातील दृश्यांचे केंद्र असलेला आपला देह त्याला अत्यंत खरा वाटतो व तो आपल्या देहावर खूप प्रेम करतो. ही देहासक्ती पादसेवन भक्ती करताना, प्रेमभक्तीत रंगून जाताना कमी होऊ लागते. एकवेळ अशी येते की, देहभान पूर्णच हरपते, देहाचा विसर पडू लागतो. अशावेळी स्वाभाविकच देहाचे प्रेम कमी होते, आणि हळूहळू नाहीसे होते. ही अवस्था अशी की, देह असून नसल्यासारखाच. देहबंधशून्य अवस्था ! हीच विदेहस्थिती ! येथे संगत्याग नसतोच. म्हणजेच संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती एकच आहेत.

४. अलिप्तपणा – लिप्त म्हणजे लिंपणे, लेप देणे, माखणे किंवा व्यापणे. आपली मूळ अवस्था शुद्ध, पवित्र, पूर्ण आहे. मात्र अविद्येच्या प्रभावाने आपण ती मूळ स्थिती विसरतो. दृश्य विश्वाला खरे मानू लागतो. आपला जीव आत बाहेर दृश्याने व्यापला, माखला, दूषित झाला. दृश्य विश्वातच आपले सुख आहे, या भ्रमाने दृश्य वस्तू हव्याशा वाटू लागल्या. हे हवेसे वाटणे म्हणजेच वासना. खरं तर आपल्याला दृश्य वस्तू बाधक नसते, तर तिच्याबद्दलची वासनाच मन‌ाला बंधनात टाकते. पण भगवंताच्या भक्तीने रंगलेल्या भक्ताच्या मनात, भगवंताचे प्रेम एवढे ओथंबलेले असते की; तेथे वासनांना जागाच रहात नाही; त्या लटक्या पड‌तात. त्यांचा लेप जीवनाला होतच नाही. हेच अलिप्तपण. संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपणा ‌ह्या सर्व एकच स्थिती होत.

५. सहजस्थिती – ‘सह जात सहजम् ।’ आपल्या बरोबरच जन्मलेले किंवा जन्मजात प्राप्त झालेले. नुकतेच जन्मलेले मूल मला हे हवे ते हवे असे काहीही म्हणत नाही. किंवा सुख मिळविण्याचा किंवा दु:ख टाळण्याच्या प्रयत्न करीत नाही. त्या स्थितीला ते सहजतेने स्वीकारते. ही सहजस्थिती. हे दृश जगत् मूलत:च भ्रमरूप असल्याने ते सुखरूप नाही वा दु:खरूप नाही. त्याला, मन जाऊन चिकटते व ते सुखाची किंवा दु:खाची कल्पना करते. पण ते मन जेव्हा भगवंताकडे लागते, तेव्हा ते दृश्य विश्वापासून दूर होते व सुख-दु:खाची कल्पना सोडूनच देते. दृश्यात गुंतलेले मन दूर होणे म्हणजेच संगत्याग, निवेदन, अलिप्तपण, विदेहस्थिती व सहजस्थती होय.

६. उन्मनी अवस्था – उद् + मनस = उन्मन. उद = उर्ध्वगती, श्रेष्ठत्व, पूर्णता, विकासणे, मुक्त होणे. मनस् = मन. सामान्य माणसाचे मन जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थातच वावरते. पण तीन अवस्थांमध्ये ते दृश्याने भरलेलेच असते. जागेपणी इंद्रियांच्या माध्य‌मातून जे जग आत घेतलेले असते तेच जग स्वप्नात अवतरते. तेच गाढ निद्रेत तात्पुरते लीन होऊन रहाते. जेव्हा मन भक्तीरसात डुंबू लागते, तेव्हा बाहेरच्या दृश्य जगाचा भाव कमी होऊ लागतो. मन सूक्ष्म होऊ लागते. ही सूक्ष्मता वाढत जाऊन, एका विशिष्ठ स्थितीत; मी देह नसून आत्मा आहे अशी प्रचिती येते. मनाची ही जी अवस्था तिला तुर्या (चौथी) अवस्था म्हणतात. ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती पलीकडची अवस्था असते. यात एकीकडे स्वस्वरूपाचे भान असते, तर दुसरीकडे दृश्य जगाचे भान असते. मनाचा आणखी विकास झाल्यावर स्व-स्वरूपाला मीपणाने अनुभवणारा शुध्द मी सुद्धा लीन होऊन जातो. केवळ परमात्म स्वरूप उरते. येथे मनाचे ‘मीपण’ संपते. हीच उन्मनी अवस्था. या स्थितीत संपूर्ण विश्वच ईश्वररूप दिसू लागल्यामुळे, दृश्य विश्वाचा विलय होतो. म्हणून संगत्याग व सहजस्थिती ह्या एकच अवस्था.

७. विज्ञान – वि = विशेष आणि ज्ञा = जाणणे. विज्ञान = विशेष ज्ञान. परमात्म स्वरूपाचे अनुभवसिद्ध ज्ञान म्हणजेच विज्ञान. परमात्म स्वरूप अत्यंत सूक्ष्म असते. याला स्थूळ वा दृश्य स्पर्श करू शकत नाही. जोपर्यंत  जीव दृश्य जगताला चिकटलेला असतो तोपर्यंत तो परमात्मतत्त्वाला स्पर्श करु शकत नाही. दृश्याचा संपूर्ण त्याग = संगत्याग. संगत्याग व विज्ञान एकदमच प्रकट होतात. संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती, सहजस्थिती, अलिप्तपण, उन्मनी अवस्था, विज्ञान या सातही अवस्था नावांनी भिन्न असल्या तरी आंतरिक अनुभूतीने त्या एकच आहेत. “सद्‌गुरू वाचोनी सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।” हा विचार पादसे‌वन भक्तीचा आत्मा आहे.

सद्गुरू सेवाच साधकाला अंतर्बाह्य बदलवीत असते. सद्गुरू शिष्याकडून योग्य ते कार्य करवून घेतात. त्याला निरहंकारी बनवितात. सद्‌गुरूंचा सहवास शिष्याला त्याच्या नकळत घडवीत असतो. त्याला आत्मचिंतनाची सवय लावुन, शिष्य नम्रतेकडे, विनयाकडे, लीनतेकडे  झुकू लागतो. मुख्य म्हणजे त्याच्या अहंकाराच्या नाशाला सुरुवात होते. उपरम, उपरति, चुकांची कबुली देण्याचे धाडस त्याच्यात येते. माझेच बरोबर ही वृत्ती नाहीशी होते. अर्थात त्यासाठी गुरूनिष्ठा, सत्यवचन, गुरूप्रीती वा गुरूबद्दलचा अनन्य भाव यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. सद्‌गुरूचा प्रसाद (कृपा) लाभला की, मग मात्र सद्गुरू त्याला परब्रह्मच बनवितात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अलिप्तपण

अलिप्तपण म्हणजे संगात राहूनही निर्विकार असणे. अलिप्तपण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पाण्यातील कमलपत्र येते. जे पाण्यात राहूनही भिजत नाही. आपल्या मूळ स्थितीत तसेच राहते. लिप धातूपासून लिप्त शब्द बनलेला आहे. लिप म्हणजे दूषित करणे, व्यापणे, माखणे. लिप्त म्हणजे माखलेला, बरबटलेला. आणि अ + लिप्त = अलिप्त म्हणजे कशाचाही संसर्ग न झालेला. जन्माला आल्यापासून मनुष्य काही ना काही कर्म करीत असतो. या कर्मा मागची प्रेरणा मन असते. शरीराला केवळ भौतिक सुखे हवी असतात. त्यासाठी मन विषयांकडे सैरभैर धावते. जशी वासना असेल त्याप्रमाणे मनुष्याला व्यक्ती, वस्तू व पदार्थ हवेहवेसे वाटू लागतात. त्यांच्यापासून सुख मिळते या भ्रमाने त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. ही आसक्तीच सर्व दुःखाचे मूळ आहे. आसक्तीने लिप्त झाल्यामुळे जीव, व्यक्ती; वस्तूच्या ममत्वाच्या बंधनात अडकतो व दुःख भोगतो. वास्तविक आपले मूळ स्वरूप शुद्ध,पवित्र व आनंदरूप आहे परंतु अज्ञानामुळे मनुष्य हे विसरून मायेच्या पसाऱ्यात गुरफटून जातो व वासनांनी दूषित होतो. यावर उपाय सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात –

ना तरी ते नाना रसी । रिघोनी दर्वी जैसी ।

परी रस स्वादासी । चाखून येणे ।। ज्ञा. १६-२४८ ।।

ज्याप्रमाणे स्वयंपाकघरातील पळी ही प्रत्येक रसात जाते. उदा. कढी, आमटी, श्रीखंड, आमरस, खीर. पण ती कशाचाच स्वाद घेत नाही. ती सर्व रसांपासून अलिप्त असते. त्याप्रमाणे कुठल्याही चांगल्या किंवा वाईट कर्माचे कर्तेपण स्वतःकडे घेऊ नये. सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून कर्म व फळांचा संग सोडला की अलिप्तपणाची स्थिती प्राप्त होते. म्हणूनच श्रीसमर्थ रामरायाजवळ ‘अलिप्तपण मज देरे राम’ असे मागणे मागतात.

ऐहीक जीवनात आपली कर्तव्यकर्मे अलिप्तपणे करून काया, वाचा व मनाने ईश्वरभक्ती करता येते हे संत सावतामाळी यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची धारणा होती. ते कधीही ‘मी कर्ता’ या कर्तुत्व भावनेत अडकले नाहीत.

“न लगे सायास न पडे संकट । नामे सोपी वाट, वैकुंठाची ।।”  असा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव होता. कर्माद्वारेच त्यांनी मोक्ष प्राप्त केला. यावरून हेच सिद्ध होते की अलिप्तपण म्हणजे कर्माचा त्याग नसून त्यामागचा ‘मी कर्ता’ हा अहंकार बाधक असतो. ‘मी करून अकर्ता’  ही भावना जर दृढ असेल तर निंदा-स्तुती, मद-मत्सर इत्यादी विकारांनी मन दूषित होत नाही. प.पू. गोंदवलेकर महाराज अलिप्तपणा कसा राखावा याची सोपी युक्ती सांगताना म्हणतात… 

“नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।

हाची सुबोध गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे ।”

परक्या घरी एखादा पाहुणा आला. तेथे वावरत असताना तेथील सर्व व्यवहार जरी त्याला दिसत असले, तरी आपण वेगळे आहोत या जाणिवेमुळे तो कशातही गुंतून न राहता मोकळ्या वृत्तीने आनंदात राहतो, तसे आपण संसारात निर्लेपवृत्तीने राहिले पाहिजे. शरीर म्हणजे ‘मी’ नाही हा निश्चय एकदा पक्का झाला की, शरीराबद्दल असलेले ममत्त्व संपते. ज्ञानी पुरुषाला शरीर मिथ्यापणाने भासते. म्हणून त्याचे विकार त्यास यत्किंचित बाधत नाहीत. उदा. रामकृष्ण परमहंस यांना कर्करोग झाला होता. त्यांनी त्या व्याधीची पर्वा केली नाही. उलट ‘देहे दुःख ते सुख मानित जावे’ हा भाव ठेवून ते दुःख त्यांनी शांतपणे सहन केले. संत, सज्जन जरी जगात इतरांसारखे वावरत असले तरी त्यांची अंतरस्थिती फार वेगळी असते. त्यांच्या देहाला कष्ट, व्याधी किंवा दुःख झाले तरी त्यांना त्याची तमा नसते. ते आपल्या स्वानंदामध्ये मग्न असतात कारण त्यांना अलिप्तपणाची कला साधलेली असते.

संगत्याग म्हणजेच अलिप्तपण साधले की मन एका भगवंता वाचून कोणालाही चिकटत नाही. सगळ्या बंधनातून जीव मुक्त होतो व सर्वत्र समत्वाने लिप्त असलेल्या परब्रम्हाशी एकरूप होतो. म्हणून संगत्याग व अलिप्तपण एकच होय असे श्रीसमर्थ म्हणतात. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

पंचमहाभूतांची पंचोपासना पूर्वार्ध

तत्त्वज्ञान हा कोणत्याही संप्रदायाचा आत्मा असतो. स्वरूप संप्रदाय हा समर्थ संप्रदाय आहे. समर्थांनी जाणीवपूर्वक, नियोजन आखून प्रयत्नपूर्वक हे शास्त्रीय नाव दिले. जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म, यांचे संबंध काय आहेत ? शरीरातील व सृष्टीतील सूक्ष्म घटक कोणता ? अनेकत्व दिसणार्‍या सृष्टीत एकत्व कशात आहे ? सतत परिवर्तन होणार्‍या देहात; सृष्टीत; संसारात अपरिवर्तनीय तत्व कोणते आहे ? जगत माणसात भिन्नत्व का आढळते ? पिंडी ते ब्रह्मांडी याचा नेमका अर्थ काय ? असे प्रश्न “चिंता करितो विश्वाची” यातील स्फुरण असलेल्या नारायण ठोसर किंवा समर्थ रामदासांना पडले. घरच्या चार भिंतीत उत्तर मिळणार नाही, या निश्चयाने ते घराबाहेर पडले. १२ वर्षे तपाचरण, १२ वर्षे देशाटन-निरीक्षण- अभ्यास, गुरु-शिष्य संवाद चर्चा यातून समर्थ वाङ्मयात या प्रश्नांची उत्तरे व विवेचन अभ्यासता येते. 

जीव सृष्टी निर्माण का झाली ? बृहदारण्यक उपनिषद १-४-३ म्हणते “स वै नैव रेमे तस्मादेकाकी न रमते स द्वितीयमैच्छत् ।” एक आहे अनेक व्हावे हे पहिले स्फुरण आहे. समर्थ दासबोधात म्हणतात, “मूळमाया जाणीवेची । मुळींच्या मूळ संकल्पाची ।।१५-७-२।।” ब्रह्म अधिष्ठानरूप असते. निर्मिती पूर्वी अनंत ब्रह्मांडे बीजरूपाने अव्यक्त किंवा सुप्तावस्थेत असतात. ब्रह्मत्वाच्या चैतन्याच्या आश्रयाने राहून माया शक्तिरूपाने जगत निर्माण करते. “ऐशा अनंत शक्ति होती । अनंत रचना होति  जाती । तरी अखंड खंडेना स्थिती । परब्रह्माची ।।६-४-५।।” अनंत शक्तिच्या सहाय्याने पंचमहाभुते आणि सत्व-रज-तमोगुणाने माणसाचे व्यक्तिमत्त्व आकार घेते. ही सृष्टी ईश्वराच्या योजनेनुसार चालते. समर्थ म्हणतात, “त्या तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि  पाहतां ।।१८-८-८।।” ब्रह्म-आकाश-वायु तेज-आप-पृथ्वी वनस्पती-जीव अशा क्रमाने सृष्टी निर्माण झाली. हे आवाहन किंवा उभारणी आहे. मूळ मायेपासून विश्वाचा पसारा आरंभ होतो. तिच्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव व साम्यावस्था हेच भगवंताचे स्वरूप होय. दशक १६ मध्ये समर्थ पंचमहाभूतांचा विचार मांडतात तो आपण पाहू या.

 

पृथ्वी – ‘पृथ्वी’ शब्द ‘प्रथ’ धातूपासून तयार होतो. ‘प्रथ’ म्हणजे वाढणे; मोठे होणे; पसरणे. जी सर्व दिशांना पसरलेली आहे ती “पृथ्वी”. पृथू राजाने गोरूपधारी भूमीचे दोहन करून अनेक बीजे उत्पन्न केली. जमीन सारखी करून नगरांची रचना केली. सर्व सचेतन, अचेतन, स्थावर व जंगम पदार्थांना पृथ्वीचा आधार आहे. शुभ्र बर्फाने आच्छादलेले पर्वत, अनेकांना जीवन देणार्‍या नद्या, पाण्याच्या प्रचंड साठयाने भरलेले समुद्र, नाना रंगाची व सुवासाची फुले, नाना स्वादांची फळे, उत्तुंग वृक्ष, रंगीबेरंगी सुस्वर असलेले पक्षी असे अलौकिक सौंदर्य पृथ्वीवर आढळते. समर्थ रामदास तिला “बहुरत्ना वसुंधरा” म्हणतात. पृथ्वी मातेची क्षमा व सहनशीलता अजोड आहे. आपण तिला खोदतो, नांगरतो, घाणेरडे पदार्थ टाकतो; त्याच्या बदल्यात ती आपल्याला अन्नधान्य, वनस्पती, औषधे, खनिज द्रव्ये, फुले, फळे देते. धरणी माता जल देऊन आपले जीवन समृद्ध करते. ही पृथ्वी देव-दानव, मानव, प्राणी, संत व दुष्ट सर्वांना आश्रय देते. रत्ने, हिरे , परिस पृथ्वीत मिळतात. काही लोक जमीन माझी म्हणतात, पण ते गेल्यावर ती रहाते म्हणून ती खरी भगवंताची आहे. पृथ्वीच्या शक्ती व सामर्थ्याचा वापर करून सुद्धा काही तत्त्वचिंतक जगाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतात. किंवा काही अज्ञानी; सत्ता, पैसा यांच्या बेसुमार तृष्णेमुळे पृथ्वीवर अत्याचार करतात व त्यामुळे जीव सृष्टीचा समतोल बिघडतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविध गुण पृथ्वीचे आहेत. स्थूल देहात हाडे, मांस, त्वचा, नाडी, आणि रोम ही पृथ्वी तत्वे आहेत. देहाच्या कर्मेंद्रियांद्वारे कर्म अवलंबले जाते व गृहस्थाश्रमात वंश परंपरा चालत रहाते.

आपतत्त्व – पाणी, नद्या, नाले, ओढे, डोह यातून मिळते. पाण्याचे थंड, उष्ण झरे असतात. ऊसाचा रस, फळाचा रस, गोरस यात पाणी असते. देह व पृथ्वी आपापासूनच बनते. शरीरात पाणी असते, पाण्याजवळ पवित्र तीर्थे असतात. आप तत्त्वात तेज, वायु, पृथ्वी व आकाश तत्त्वही असते. वैदिक ऋषींनी पाण्याचे महत्त्व जाणले होते. वरुण या पाण्याच्या देवतेचे ते पूजन करीत.  पाणी शुद्ध, निर्दोष, मधुर, दोष नाशक, बलदायक व रोग निवारक असते. पृथ्वीचा ३/४ भाग पाण्याने व्यापला आहे. पाणी, उष्णता; वाफ; बर्फ व पुन्हा पाणी हे जलचक्र अव्याहत चालते. सोडीयम, आयोडीन हे क्षार पाण्यातून मिळतात. पाण्याचा गैरवापर, पाण्याचे प्रदूषण व पाणी वाया घालवणे हे प्रकार आजही आपण पाहतो. समर्थांच्या काळात त्यांनी पाण्याच्या  नियोजनाचा विचार सांगितला. समर्थ म्हणतात, 

नदीचे उदक वाहत गेले । ते निरर्थकचि चालिलें ।

ते जरी बांधोन काढिलें । नाना तळी कालवें ।।

उदक निघेने वर्तविले । नाना जिनसी पीक काढिले ।

पुढें उदकचि जाले । पीके सुवर्ण ।।

गोंमुखें पाट कालवे । साधूनि बांधूनि आणावे ।

स्थळोस्थळीं खेळवावे । नळ टाकीं कारंजीं ।।”

या ओव्यांवरून समर्थांचा पाण्याच्या नियोजनाचा विचार कळतो.

तेज किंवा अग्नि – ‘अज’ या धातूपासून हा शब्द तयार होतो.अङ्ग नि ऊर्ध्व, म्हणजे वर जातो तो अग्नि. अग्नि ही इंद्रिय गोचर घटना आहे. दहन व ज्वलन हे तिचे स्वरूप आहे. उष्णता व प्रकाश अग्निमधून मिळतात. अग्नीचा प्रवास असतो. थंड वस्तूमध्ये गरम वस्तूतून उष्णता जाते. गॅसवर भांड्याच्या तळाशी असलेला पदार्थ प्रथम उष्ण होतो, तो वर येतो व वरचा खाली, अशाप्रकारे पदार्थ गरम होतो. अवकाशातूनही उष्णता मिळते. शरीर जिवंत रहाण्यासाठी उष्णता लागते, त्याला शरीराचे स्वाभाविक तापमान म्हणतो. वैदिकऋषींनी अग्नीचे महत्त्व जाणले. म्हणून ऋग्वेदाचा आरंभच अग्निस्तवनाने होतो. यज्ञातील अग्नीला ‘ग्रहपती’ म्हणतात. अग्नि प्रकाश देतो. ईश्वरी ज्ञानात अग्नि आहे तो देहबुद्धी नष्ट करतो. सूर्य व अग्नि ही मोठी दैवते आहेत. अग्नीमुळे अन्नाला चव येते. सागरात वडवानल, भूगोलाबाहेर आवरणानल असतो. आग्या सापाच्या तोंडतील अग्नि डोंगर जाळून टाकतो. अग्नीचे घर्षण करून तयार केलेली वीज, जलावर निर्माण केलेली वीज व अंतरिक्षातील वीज ही अग्नीची तीन रुपे आहेत. तीन लोक, वायु, आदित्य, आप, औषधी, वनस्पति, लाकूड, शरीर ही अग्नीची निवास स्थाने आहेत. काळी, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुचीदेवी या अग्नीच्या सात जिव्हा आहेत. समर्थ दासबोधामध्ये (१६-५-२९) चार शिंगे, तीन पाय, दोन डोकी, आणि सात हात  आहेत असे अग्नीचे वर्णन करतात. अग्नि, ज्ञानी लोकांचा परमेश्वर; गृहस्थाचा पालक; मानवाचा अतिथि आणि पृथ्वीचा रक्षणकर्ता आहे. वास्तूशांतीमध्ये अग्निची पुजा करतात. रामायणात दशरथाच्या यज्ञातून पायस मिळाले आणि श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचा जन्म झाला. कौसल्या अग्नीत समंत्र हवन करत असे. अग्निला साक्षी ठेवून श्रीराम व सुग्रीव मैत्री झाली. सीतेने अग्निदिव्य केले. अग्निहोत्र व वैश्वदेव या द्वारे अग्नीचे रोज पूजन करण्याची पद्धत होती. महाभारतात खांडव वनाचा दाह करण्यासाठी श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र व अर्जुनाने अक्षय भाता धनुष्य दिले. होलिकेचे पूजन करून, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची पद्धत आजही आहे. पृथ्वी, आप, वायु व आकाश यात अग्नितत्त्व आहे व त्यामुळे सृष्टीत समतोल आहे. अग्नि भक्षकही आहे व त्यामुळे सावधपणे त्याचा वापर आपण करणे गरजेचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात “सर्वभक्षकु त्याची थोरी । काये म्हणोनी सांगावी ।” 

वायू व आकाश या तत्त्वांचा विचार उत्तरार्धात करूया.

जय जय रघवीर समर्थ

कारणदेह

स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण ।

जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तुर्या जाणावी ।।

स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे चार देह आहेत. कारणदेह म्हणजेच अज्ञान होय.  

आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा ।

विवरोन सदृढ धरावा । जीवामध्यें ।। १३-१-१ ।।

साधकाने आत्मानात्म विवेक करावा. आपण जगात अनंत शरीरधारी प्राणी बघतो. विवेकाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या असे लक्षात येते, की प्राणी म्हणजे देह व आत्मा यांचा संयोग होय. देह हा दृश्य, जड व अनित्य आहे. म्हणजे हा स्थूल  देह, जो आपण पहात असतो. आत्मा मात्र सूक्ष्म व नित्य असतो. कारणदेह हा अज्ञानाचा आहे. आपण जगामध्ये दोन प्रकारची माणसे पहातो. ज्ञानी माणसे आणि अज्ञानी माणसे. अज्ञानी माणसे ही आत्मविन्मुख असतात. मुमुक्षु, साधक हे आत्मसन्मुख असतात. भोगवादी विचारवंत जगाला संपूर्ण सत्य समजतात. भोगवादामध्ये माणसाच्या देहाला अति महत्त्व असते. हाच कारणदेह होय. कारण देहाच्या द्वारेच जगामधील सारे भोग भोगणे शक्य होते. देहासारखे दुसरे विलक्षण यंत्र नाही.

आपल्या देहाचा नीट उपयोग करून माणूस आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. पण कारणदेह समजणारी माणसे अज्ञानी असतात. ग्रंथराज दासबोधातील पहिल्या दशकातील दहावा समास ‘नरदेह स्तवन’ हा आहे. ‘देह म्हणजे मी’ असे तो समजत असतो. कारणदेहाचा माणूस कसे वर्तन करतो ? हे आपण ‘दुश्चित निरूपण’ समासातून जाणून घेण्याचा प्रयत्न पुढे करणार आहोत.

स्थूलदेह प्रत्यक्ष कार्य करीत असतो. मनोमय असणारा सूक्ष्मदेह सतत संकल्प विकल्प करीत असतो. वासनात्मक असणारा लिंगदेह अज्ञान आवरणामध्ये असतो. आता अज्ञान कोणते आहे ? तर मी देह आहे हेच अज्ञान, म्हणजेच कारणदेह.  तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्धसत्व गुण आपण बघितले. स्थूल देहामध्ये तमोगूण असतो, तर मनोमय असणाऱ्या सूक्ष्म देहामध्ये रजोगुण असतो. आता शबलसत्व गुण हा कारण रूप असणाऱ्या अज्ञानात असतो. शुद्धसत्व गुण मात्र आत्मज्ञानाने अनुभवास येतो. कारण देहाच्या सुषुप्ती मध्ये अज्ञानात वासना रहात असते. आपल्या जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकण्याला, कारणदेह कारण आहे. वासनाच सगळ्या सुख-दुःखाला कारण आहे. ‘देह म्हणजेच मी’ असे समजण्याबरोबर आपण मनालाही ‘मन म्हणजे मी’ आणि बुद्धीलाही मी असे समजतो. प्रत्येक दिसणारी गोष्ट मला हवी असते, मला पैसा हवा असतो, तो कशासाठी तर उपभोगासाठी. पण मी तर यापैकी मन-बुद्धी काहीच नाही. पण ते अज्ञानामुळे कळत नाही. त्यासाठी त्यागमय जीवन जगणे खरे तर क्रमप्राप्त आहे. 

प्रत्येकाजवळ व्यवहारी बुद्धी, कुशल बुद्धी, तैलबुद्धी असते. जो तो त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये पारंगत असतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात सुखाचा काळ प्राप्त व्हावा, असे वाटत असते. मानवी जीवनात सत्शील  व्यवहार करणे फार कठीण गोष्ट आहे. त्याचे कारण असे आहे की, मानवी जीवनात व्यवहार करताना, तो भेद बुद्धीनेच करावा लागतो. आणि जीवनात तसे प्रसंगही येत असतात. सुखी प्रपंच आणि समाधानी परमार्थ याची कधीतरी सांगड घालता येते. पण सुखी प्रपंच आणि समाधानी परमार्थ या दोन्ही गोष्टींची योग्य अशी तुलना करता येत नाही. कारण मनुष्याने स्वखुशीने प्रपंचाची बांधिलकी स्वीकारलेली असते. 

“या संसारी सुख देखिले । ऐसे पाहिले ना ऐकले”

सर्वसामान्य मनुष्य प्रापंचिक बंधनामध्ये सापडला म्हणजे त्याला पारमार्थिक सुख दुर्गम ठरते. कारण माणसाच्या ठिकाणी दुश्चितपणा असतो. समर्थ म्हणतात, “दुश्चितपणामुळे मानवाच्या जीवनाची नासाडी होते.” कशी ? तर, त्यामुळे कार्याचा नाश होतो. माणूस सतत चिंता करीत असतो. सदैव काळजी लागते आणि कोणत्याही गोष्टीचे धाडस, स्मरण राहत नाही. मनाचा निश्चय नाही. कुठल्याच कार्यात यश नाही. त्यामुळे आत्महिताचाही क्षय होतो. ही सारी लक्षणे आपण बघितली की, कारणदेह म्हणजेच देहबुद्धी. थोडक्यात काय ? तर अंत:करणात भरून असणारे ईशनिर्मित असे एक अज्ञान किंवा अविद्येचे आवरण आहे असे मानतात. त्यामुळे आत्मस्वरूप आपल्या आत असूनही अज्ञानी माणसाला जाणवत नसते. ते जाणून घेण्याची त्याची इच्छा पण नसते. 

“तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी” या अज्ञानालाच कारणदेह असे नाव आहे. गाढ झोपेत सर्वांना अनुभवास येणारे अज्ञान हाच शास्त्रात म्हटलेला कारणदेह. काही साधकांना एकांतात मन निर्विचार किंवा कोरे करताना मनातील सर्व संकल्प गेल्यावर, पोकळीचा म्हणजे काहीच नाही असा अनुभव येतो. तिला ‘शून्य अवस्था’ म्हणतात. हा अज्ञानाचा म्हणजेच कारणदेहाचा प्रत्यय असतो. अज्ञानामुळेच सृष्टी खरी वाटून त्यातून विक्षेप रूप म्हणजेच भेदरुपी विश्व, जागृती, स्वप्न या अवस्था भासू लागतात. त्यामुळेच त्याचे नाव ‘कारणदेह’ असे आहे. मूळ अज्ञान किंवा माया हेच कारणदेहाचे स्वरूप आहे. या देहाला अव्याकृत किंवा ईश्वर म्हणतात. ही ईश्वराच्या झोपेची म्हणजेच प्रलयाची अवस्था आहे. वासनांची अनंत बीजे कारणदेहाच्या आधाराने टिकून असतात. जाग येताच आपण त्या वासनांनुसार हालचाली करतो. विश्वाचा प्रलय होतो, तेव्हा सर्व जीव बीज रुपाने म्हणजेच ‘संस्कार’ रूपाने या कारणात दडलेले असतात. विश्व पुन्हा निर्माण होते, तेव्हा ते या बीजापासूनच निर्माण होते. शास्त्र सांगते की, जेव्हा सर्व जीवांच्या वासना फल देण्यास पक्व होतात, म्हणजे तयार होतात, तेव्हा परत विश्वाची उत्पत्ती होते. ‘ग्रंथराज दासबोधा’ तील कारणदेहाचा विचार आपण पहात आहोत. अज्ञानाला कारणदेह असे म्हणतात. मूळ अज्ञान किंवा माया हेच याचे स्वरूप आहे. 

जेव्हां सद्गुरूंचा उपदेश या कारण जीवाला होतो तेव्हां,  त्याचे अस्तित्व काय आहे ? आणि ते किती क्षणभंगुर आहे ? याचे आकलन जीवाला होते. ते झाले की जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. आपण बघितले की, हा कारणजीव मायेच्या जाळ्यात पूर्ण अडकतो. त्याचा देह हाच त्याला खरा वाटू लागतो. समर्थ म्हणतात, “देह मी वाटे ज्या नरा ।  तो जाणावा आत्महत्यारा ।।” हा कारणदेह अज्ञानामुळे वासना नदीच्या महापुरात उडी घेतो. तो बुडण्याच्या स्थितीत येईपर्यंत भान येत नाही. कारण तो स्वतः अज्ञानी असल्याने, गर्वाने फुगलेला असतो हेच खरे !  नश्वर देहाची किंमतच काय आहे ? हा अज्ञानी जीव जेव्हा ज्ञानाचा फाजील अभिमान बाळगतो, तेव्हा समर्थ त्याला विचारतात,

“थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।

शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ।। १५-८-३५ ।।”

असंख्य योनींमध्ये हा जिवात्मा देह धारण करून रहात असतो. जसे लहान-सहान जीव-जंतू चिखलामध्ये, घाणीमध्ये जन्माला येतात; देह रुपाने त्या घाणीमध्येच वावरतात; आणि एक दिवस त्या घाणीमध्येच मरून जातात. अशा या बुद्धिहीन गलिच्छ जीवाला कोणते जीवन म्हणावे ? मनुष्याने या साऱ्या गोष्टी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या असतात. तरीही मनुष्य सावध होत नाही, ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे ! परमेश्वराने मनुष्याला विचारशक्तीचे सामर्थ्य दिले आहे. त्या विचारशक्तीचा विवेकाने उपयोग करून, आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

राम मंत्र श्लोक १०-११-१२

बहू व्याप संताप तो मूळ पापा ।

गतायुष्य द्रव्यें न ये कोटि बापा ।

कळेना तुला कोणता तो नफा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १० ।।

सरळ अर्थ  – सामान्य माणूस आपली प्रगती ‘किती पैसा कमावतो?’ या वरून ठरवतो आणि मग पैसा मिळवण्यासाठी धावाधाव, प्रचंड व्याप, उलाढाली करत रहातो. येन-केन-प्रकारेन पैसा मिळवणे हेच उद्दीष्ट समोर असल्याने नीती-अनीती, भल्या-बुऱ्याचा फारसा विचार केला जात नाही. इथेच त्याच्या पापाचे मूळ  सापडते. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सहजा-सहजी सापडत नाही. आतापर्यंत केलेले उद्योग व त्यापासून नेमका काय लाभ झाला हेही समजत नाही. गोंधळून जातो बिचारा. तेव्हा श्रीसमर्थ म्हणतात, वेळ हातात असतानाच ‘हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे’.

श्रीसमर्थांचा बोध – श्रीसमर्थ या श्लोकातून प्रापंचिकांना आहे त्या परिस्थितीत भगवंताचे अनुसंधान ठेऊन आनंदाने कसे जगावे, याचेच जणू धडे देत आहेत. सामान्यपणे व्यवहार करताना  नफा-तोट्याचा विचार केला जातो. परमार्थात मात्र “हाट भरला प्रपंचाचा । नफा पहावा देवाचा ।” असे श्रीसमर्थ म्हणतात.

जन्माला आलेल्या प्रत्येकालाच कर्म करणे अनिवार्य आहे. मृत्यूनेच कर्माचा अंत होतो. ही मृत्युभूमी आहे तशीच कर्मभूमीही आहे. भगवंताच्या विस्मरणात केलेले प्रत्येक कर्म हे पाप समजावे. प्रपंच/व्यवहार करताना भगवंताच्या अनुसंधानात राहून केलेले कर्म अकर्म होते. या उलट  विषय-विकारात वहावत जाऊन, पैशाला महत्त्व देत केलेले प्रत्येक कर्म पापाचे मूळ ठरते. भौतिक सुख हे मृगजळ आहे. त्याच्या पाठी धावणे सर्वनाशाला आमंत्रण देणे होय. चौऱ्यांशी लक्ष योनींचा फेरा पूर्ण करून पाप-पुण्य समसमान झाल्यानंतर हा दुर्लभ असा नरदेह मिळाला आहे. श्रीसमर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘घबाड’ हाती आले आहे. तेव्हा नरजन्माचे हित/फायदा कशातआहे हे ओळखता आलेच पाहिजे, नाहीतर पुनरपि जन्म-मरणाचे चक्रात अडकणे आलेच. असे होऊ नये हे वाटणे आणि त्यासाठी अंतःकरणपूर्वक प्रयत्न करणे यालाच ‘उपासना’ म्हणतात. नित्य उपासनेतून भगवंताच्या निकट पोहोचणे हाच नरदेहात येऊन केलेल्या व्यवहाराचा फायदा/ नफा होय. या साठीची जवळची वाट (शॉर्टकट) आहे ‘अखंड नामस्मरण’. म्हणूनच श्रीसमर्थ या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात.. “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”.

तुझे आप्त द्रव्यार्थि नुस्तेचि होती ।

तनू हे चितेमाजी कीं बोळविती ।

असें जाणूनी हित काहीं करा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। ११ ।।

सरळ अर्थ  –  माणसाला देवापेक्षा जास्त भरवसा आपल्या आप्तस्वकियांचा असतो. श्रीसमर्थ येथे स्पष्टपणे वस्तुस्थितीची जाणीव करून देतात. नातलग सगळे ‘द्रव्यार्थी’ असतात. पैशासाठी स्वार्थापुरते जवळ येतात. मरणानंतर देह चितेत जाळून मोकळे होतात आणि लगेच विसरूनही जातात. हे लक्षात घेऊन आपण आपल्या हितासाठी ‘हरे राम हा मंत्र सोपा’ जपावा हेच उत्तम.

श्रीसमर्थांचा बोध  –  माझे-माझे म्हणवणाऱ्या आप्त स्वकीयांवर कितीही प्रेम केले, त्यांना आपले मानले तरी ते सोडून जाणार आहेत. सर्व सुखाचे सोबती असतात.  प्रतिकूल काळ आला की सगळे दूर जातात. श्रीसमर्थ म्हणतात, “आवघी सोइरी सुखाची । हे तुझ्या सुखदुःखाची । सांगाती नव्हेती ।।” जे आपले समजुन आयुष्यभर त्यांच्यासाठी काबाड-कष्ट केले, भल्या-बुऱ्या मार्गाने पैसा मिळवला; ते जीवलग म्हणवणारे, पैसा-धन असेतोवर जवळ राहतात, प्रतिकुल काळात मात्र ‘वाल्याच्या’ नातलगांप्रमाणे सहजपणे दूर निघून जातात. हीच जगाची रीत आहे. तोपर्यंत अर्ध्याच्या वर आयुष्य कुटूंबासाठी खर्ची पडलेले असते. अशाप्रकारे जीवनातील अमुल्य वेळ रामभजनावीण माणूस वाया घालवतो. प्रत्येक माणसाने हे ओळखून आपला खरा स्वार्थ साधणे गरजेचे आहे. नरदेहाचे जे प्रमुख उद्दीष्ट, जे परमेश्वर प्राप्ती, त्यासाठी साधना-उपासना करणे गरजेचे असते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, या दुर्लभ नरजन्माचे सार्थक करून घ्यायचे तर ‘हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे’.

कुटुंबीं स्त्रिया पुत्र ते दासदासी ।

बहु पोषिसी सोसूनी दुःखरासी ।

त्यजीं भार काबाड ओझें किती रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १२ ।।

सरळ अर्थ  –  कुटुंब म्हणजे आईवडील, पती-पत्नी, एक किंवा दोन मुले, शक्य असेल तिथे एखादी घरकाम करणारी बाई. हे झाले आजचे, त्यातही शहरातील कुटुंबाचे चित्र. श्रीसमर्थांच्या काळात याच्या उलट परिस्थिती होती. गृहस्थाश्रमात, एकत्र कुटुंब पद्धती होती. तेव्हा कुटुंबात घरोघरी नोकरचाकरासह किमान दहा-पंधरा तरी माणसे असायची. त्या सगळ्यांचा पालनकर्ता कुटुंबातील कर्ता पुरूष असायचा. सगळ्यांचा चरितार्थ चालवणे त्या एकट्याची जबाबदारी मानली जात असे. अत्यंत कष्ट, दुःख,सोसून हे करावेच लागत असे. श्रीसमर्थ म्हणतात, ‘हरे राम’ हा साधा सोपा मंत्र अखंड जपला, तर करावे लागणारे काबाडकष्ट नक्कीच सुसह्य होतील.व अंतरी समाधान लाभेल.

श्रीसमर्थांचा बोध  – आपला प्रपंच/संसार ही माझी जबाबदारी म्हणून त्यासाठी माणूस प्रचंड कष्ट करतो. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. फार चैनीची साधने नसली तरी घरातील माणसांव्यतिरिक्त,  नोकरचाकर, गोधन, कुत्री-मांजरे अशी खाणारी तोंडे भरपूर होती आणि कमावणारा एकमेव कुटुंब प्रमुख होता. आज काळ बदलला, परिस्थितीत बदल झाला. नवरा-बायको दोघेही कमवत असले तरी गरजा वाढल्याने कितीही मिळवले तरी पैसा पुरेनासा झाला. रात्रंदिवस राबणे काही थांबले नाही. त्याबरोबर सोसावे लागणारे दुःखही कमी झालेले नाही. श्रीसमर्थ म्हणतात तसे, माणूस कुटुंबाचा ‘काबाडी’ तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. जोपर्यंत हे संसाराचे ओझे स्वतःहून झटकत नाही, उतरवून ठेवत नाही तोपर्यंत ते मानगुटीवर असतेच. त्यातूनच प्रयत्नपुर्वक थोडा वेळ भगवंता साठी काढायचा असतो. प्रपंचात रिकामा वेळ कधीच मिळणार नाही. ‘समुद्रातील लाटा थांबल्या की मी पाण्यात उतरेन’ असे ते म्हणण्यासारखे आहे. म्हणूनच श्रीसमर्थ या श्लोकातून सांगतात की, ते काल्पनिक ओझे थोडे बाजुला ठेऊन आत्महितासाठी “हरे राम” हा साधा सोपा मंत्र नित्य जपावा व आपले कल्याण करून घ्यावे. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language