श्री समर्थांच्या कार्यातील केंद्रबिंदू म्हणजे चाफळ. महाराष्ट्राची अयोध्या म्हटले जाते ते चाफळ. इथे वीर मारुती आणि दास मारुती दोन्ही आहेत. श्री समर्थांनी दास मारुतीचे वर्णन प्रस्तुत स्तोत्रात केले आहे
हनुमंता रामदूता। वायुपुत्रा महाबला।
ब्रह्मचारी कपीनाथा। विश्वंभरा जगत्पते ॥ १ ॥
इंद्राच्या वज्राने हनुवटी भंगली व त्यानंतर त्याच्याच वराने वज्रदेही झालेले मारुतीराय हे राम रायाचे परम भक्त होते, जन्मत: कटीला सुवर्ण कासोटी लेउन जन्मलेले प्रखर ब्रह्मचारी वानरकुलाला ललामभूत होते जगाचे नियामक, संरक्षक होते असा गौरव समर्थांनी केला आहे
कामांतका दानवारी। शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्यप्राणा। मूळमूर्ति पुरातना ॥ २ ॥
वज्रदेही सौख्यकारी। भीमरूपा प्रभंजना।
पंचभूतां मूळमाया। तूंचि कर्ता सकळही ॥ ३॥
मारुती रायांची उपासना ही, निरास करायला कठीण अशा वासनांचा निरास करायला, सद्भक्तांना मदत करते. सर्व प्रकारचे दु:ख व वियोगाच्या सुद्धा दु:खातून बाहेर पडायला हनुमंत उपासना मदत करते. ते अशी कृपा भक्तांवर करतात.वासना निर्मूळ करून ते हे साध्य करतात. शंकराचा रुद्रावतार आहे त्यातील अकराव्या रुद्राचा अंश म्हणून मारुती रायांचा अवतार झाला असून ते श्री रामांचा बहिस्थ प्राण आहेत. मारुतीराय चिरंजीव आहेत आदिपुरुष स्वरूपच आहेत.भक्ती कशी करावी याचे मूर्तीमंत उदाहरण त्यांनी घालून दिले असून उपासकांना सर्वतोपरी सहाय्य करून उपासना फलद्रूप होण्यासाठी मारुतीरायांची मोठी मदत होत असते. वायुरूप असून मनाच्या गती पेक्षाही वेगात कार्य करतात.मारुती राय हे अंतरात्म्याचे स्वरूप असल्याने समर्थ त्याना मूळ पुरुष, आदिमाया असेही संबोधतात.
स्थितिरूपें तूंचि विष्णु। संहारक पशुपती।
परात्पर स्वयंज्योती। नामरूपा गुणातिता ॥ ४॥
सांगता वर्णितां ये ना। वेदशास्त्रां पडे ठका।
शेष तो सीणला भारी। नेति नेति पराश्रुती ॥ ५ ॥
उत्पत्ती स्थिती व लय म्हणजे सृष्टी उभारणी व संहारिणी या दोन्ही मारुतीरायांच्या लीला आहेत. परावाणी स्फुरण रूप असते. तिच्याही पलीकडे असलेले स्वयंप्रकाशित असे जे परमात्म तत्व आहे ते गुण व नामाच्या अतीत आहे म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपच आहे. त्याचे वर्णन करता येत नाही, ते अनुर्वाच्य आहे.हजार फणी असलेला शेष पण तोही वर्णन करताना थकतो व मौन होतो व वेद इथे पांगुळे होतात असे हे वर्णनातीत आनंद स्वरूप आहे.
धन्य अवतार कैसा हा। भक्तालागिं परोपरी।
रामकार्य उतावेळा । भक्तरक्षक सारथी ॥ ६ ॥
वारितो दुर्घटं मोठीं। संकटीं धांवतो त्वरें।
दयाळा हा पूर्णदाता। नाम घेतांचि पावतो ॥ ७॥
भक्तांवर उपकार करणे म्हणजे त्याना भक्ती प्रवण करणे व त्यांचा निश्चय दृढ व्हावा म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे हा मारुती रायांच्या अवताराचा हेतू आहे आणि त्या कार्यासाठी राम रायांनी निजधामास जाताना मारुती रायांना चिरंजीव केले. मारुती राय संकट मोचक आहेत. मोठ मोठी संकटे ते लीलया दूर करतात. रावणाच्या बरोबर संघर्ष झाला त्यात कितीतरी अवघड प्रसंग आले पण ते निवारण्यात मारुती रायांचे योगदान मोठे आहे. तसेच जो कोणी पवित्र अंत:करणाने भक्ती करतो त्याच्याही सहाय्या साठी तत्पर असतात. नामसाधनेने मनोरथे पूर्ण करतो. पूर्ण दाता म्हणजे त्यांची कृपा झाली की काहीही मागायची इच्छा उरत नाही. वासनेचे मूळ किंवा बीज जाळून जाते मग त्यातून पुढे काहीही उगवून येत नाही.
धीर वीर कपि मोठा। मागें न होय सर्वथा।
उड्डाण अद्भूत ज्याचें। लंघिलें समुद्राजळें ॥ ८॥
देउनी लिखिता हातीं। नमस्कारी सीतावरा।
वाचितो सौमित्र अंगें। रामसुखें सुखावला ॥ ९॥
गर्जतो स्वानंदमेळीं। ब्रह्मानंदे सकळही।
अपार महिमा मोठा। ब्रह्मादिकांसी ना कळे ॥ १०॥
कोणतेही आव्हान असो-सीतामाईचा शोध असो की पाच जलधी ओलांडून औषधी संजीवनी असो, मारुतीराय कधीही मागे हटले नाहीत. आवेशे लोटून त्यांनी ते कार्य सिद्ध केले. कार्य स्वीकारले आणि त्यात झोकून दिले की अंतरीची शक्ती कशी सहाय्यक होते याचे हनुमंत उत्तम उदाहरण होते.स्वयं प्रकाशी म्हणजे स्व-प्रज्ञेने मार्ग शोधणारे होते. समुद्र ओलांडून जाण्यासाठी उड्डाण हे विलक्षण होते. सीता माईचा शोध घेउन लंका दहन केल्यावर मारुती रायांनी रामराया कडे यायला प्रस्थान केले तेव्हा त्यांच्या हाती ब्रह्माने एक पत्र दिले. त्यात मारुती रायांच्या कार्याचे वर्णन गौरव होता. स्वत: हनुमान ते सांगणार नाहीत म्हणून ब्रह्मदेवाने हे दिलेले पत्र रामारायांना दिले व नमस्कार करून मारुतीराय हात जोडून पुढील आज्ञा घेण्यासाठी उभे राहिले. ते पत्र वाचून राम राया व लक्ष्मण दोघाना आनंद झाला. आधीचा मोठा काळ राम राय मोठ्या चिंतेत होते. पण त्यांची मुद्रा ते पत्र पाहून सुखावली हे पाहून त्यांचा भाउ सुखावला. मारुती राय आणि लक्ष्मण दोघेही रामाशी अतिशय एकरूप झाले होते.
मारुती रायांनी सीतामाईचे स्थान शोधून काढले आणि रावणाला धडा शिकवून मारुती राय परतले, देवाना आणि सीतेला दिलासा देउन ते आले ह्या बातमीने सारे वानरकूळ किती आनंदले असेल व त्यांनी केवढा जल्लोष केला त्याचे वर्णन समर्थ करीत आहेत.मारुती अवताराचा हा महिमा ब्रह्मादिकांना देखील अनाकलनीय असा आहे असे समर्थ म्हणतात. ज्या शत्रू विरुद्ध दंड मारुती रायांनी थोपटले तो सामान्य नव्हता. देवाना आपल्या इशा-यावर फिरवणारा, बंदी बनवणारा होता. त्याला असा धडा कोणी शिकवू शकेल,असे काही घडू शकते हेच मुळी देवांनाही अनपेक्षित व अतर्क्य होते.
याच पार्श्व भूमीवर आपण समर्थ काल बघितला तर तीनशे वर्षांच्या अंधारात शिव समर्थ असा तेजाचा किरण दिसू शकेल असे कोणाला स्वप्नात तरी वाटले असेल का? पण असा सूर्य उगवला आणि श्री समर्थ आणि शिवाजी राजे दोघेही शिवांश होते व राम रायांसारखे योजना करून कार्य सिद्ध करणारे होते हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. जे काही अद्भुत अतर्क्य असे काम मारुतीराय करून आले होते त्यामागे त्यांच्या अद्भुत शेपटी चे योगदान खूप मोठे होते. ते मंडलाकार फिरवले की नभात पोकळी उत्पन्न होते. दास मारुतीचे वर्णन करून झाल्यावर समर्थ आता ‘समर्थ मारुतीचे ‘ वर्णन करीत आहेत…
अद्भुत पुच्छ तें कैसें। भोवंडी नभपोकळी।
फांकडें तेज तें भारी। झांकिलें सूर्यमंडळ ॥ ११ ॥
हनुमानाचे दर्शन हे तेजाचे प्रगटन आहे. सूर्य मंडल झाकून टाकण्या इतके म्हणजे ते फिके वाटावे असे अति विशाल व महातेजस्वी आहे.
देखतां रूप पैं ज्याचें। उड्डाण अद्भूत शोभलें।
ध्वजांग ऊर्ध्व तो बाहो। वाम हस्त कटावरी ॥ १२ ॥
कसिली हेमकासोटी। घंटा किंकिणि भोंवत्या।
मेखळे जडिलीं मुक्ते। दिव्य रत्नें परोपरी ॥ १३॥
मारुतीचे रूप त्याचे उड्डाण विलक्षण असे आहे. उजव्या हातात श्री रामांची ध्वजा असून डावा हात कटी वर म्हणजे कमरेवर आहे. सुवर्णाची कासोटी, किणकिण करणा-या घंटा मंजुळ नाद करीत आहेत. नाना रत्ने मोती जडवले आहेत.
(क्रमश: भाग दुसरा….)
संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)