चिरंजीव हनुमंत

आपल्या भारतीय संस्कृतीत सप्त चिरंजीव मानले गेले आहेत. 

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।

कृप: परशुरामश्चैव सप्तैते चिरंजीविनः।।

अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत. प्रत्येकामध्ये एकेका गुणाचा प्रकर्ष असल्याने त्यांना चिरंजीवित्व प्राप्त झालेले आहे. अश्वत्थाम्याला मात्र हे चिरंजीवित्व शापरुपात मिळालेले आहे.

हनुमंत हा प्रभू श्रीरामचंद्रांचा श्रेष्ठ भक्त आहे. अनेकानेक गुणांचा समुच्चय त्याच्यात आहे. श्रीरामप्रभू त्याच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. म्ह‌णूनच आपल्या अवतार कार्य समाप्तीचे वेळी त्याला, “मृत्युलोकातच अखंड वास्तव्य करून सर्व रामभक्तांचे रक्षण करावे”, असा आदेश दिला. हनुमंतानेही तो आदेश शिरोधार्य मानला. त्यामुळे जेथे जेथे रामकथा चालू असते तेथे तेथे हनुमंत सूक्ष्म रुपाने उपस्थित असतात. या श्रद्धा विश्वासाने त्यांचे आसन व्यासपीठाजवळ ठेवलेले असते.

श्रीरामांचा अवतार त्रेतायुगातला. पुढे द्वापार युगातही अर्जुनाचे सारथ्य भगवान श्रीकृष्णांनी केले तेव्हा रथावर मारुतीराय आरूढ झाले होतेच. त्यानंतरही त्यांच्या अस्तित्वाची प्रचीति रामभक्तांना आलेली आहे. गोंदवलेकर महाराज तर सांगत, “तुम्हाला रामाला जे मागायचे आहे ते हनुमंताजवळ सांगा, ते रामापर्यंत नक्की पोहोचेल.” श्रीसमर्थांच्या संपूर्ण जीवनात हनुमंताने त्यांच्यावर छत्र-छाया धरली होती. जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा ते तेथे धावून आले आहेत. श्रीसमर्थ चरित्रात असे खूप दाखले आहेत. मारुतीरायांना अर्थात हनुमंताला या सर्वश्रेष्ठ दास्यभक्तीमुळे चिरंजीवित्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या दास्यभक्तीचे तेरा पैलू आपण पाहू‌यात.

१) सेवेची आत्यंतिक गरज असताना सेवाकार्य – सीतेचा शोध लावण्यासाठी सुग्रीवाने आपल्या वानरसेनेचे चार गट करून चार दिशांना त्यांना पाठवले. दक्षिण दिशेला निघालेल्या वानरसेनेला जटायूचा बंधू संपाती यांच्याकडून, सीतामाई सागराच्या पलीकडे असलेल्या रावणाच्या लंकेत अशोकवनात रावणाच्या सैंनिकांच्या पहाऱ्यात असल्याची माहिती कळली. पण मधला समुद्र ओलांडायचा कसा ? मोठाच प्रश्न होता. अशावेळी शांत बसलेल्या हनुमंतास जांबुवंताने त्याच्यापाशी असलेल्या प्रचंड सामर्थ्याची व योगज्ञानाची आठवण करून दिली आणि हनुमंत रामकार्य सिद्ध झाला आणि त्याने ते उत्तम प्रकारे पार पाडलेही. 

२) मोहापासून अलिप्तता – रामकार्य करताना मध्ये काही मोहाची स्थाने येतीलही, त्यावर मात करता आली पाहिजे. हनु‌मंताने उंच झेप घेतली व तो गगनमार्गे निघाला. वाटेत सोन्याचा मैनाक पर्वत आडवा आला. चकाकणारं सोनं, पण हनुमंतांना सोन्याचा मोह झाला नाही. त्याने मैनाकाला आपल्या पावलांचा जोर देऊन समुद्राच्या आत ढकलले व तो पुढे निघाला.

३) अनेक संकटावर मात करण्याची निर्भयता – पुढे राहू-केतूंची माता सिहिंका ही हनुमंतांना मार्गात येऊन उताणी पडली. तिने बारा योजने मुख पसरले. हनुमंत तिच्या पोटात शिरला व तिचे पोट फाडून बाहेर आला. भक्ताने देखील वाटेत असे काही भयप्रद अडथळे आले तरी निर्भयपणे त्यातून बाहेर पड‌ले पाहिजे.

४) दुष्टांना नामोहरम करण्याची क्षमता – हनुमंत लंकेच्या प्रवेश द्वारापाशी आला तेथे लंकिनी ही राक्षसी त्याला मारायला टपूनच बसली होती. हनुमंताने उग्ररुप धारण करून तिला मारले. भक्तिमार्गात भक्ताला त्रास देणारे दुष्टप्रवृत्तीचे लोक असतातच. पण त्यांना नामोहरम केले पाहिजे.

५) सेवा कार्यात बुद्धिमत्ता हवी – हनुमंत लंकेत शिरला. सीतामाईचा शोध घेऊ लागला. अखेरीस अशोकवनात एक वृक्षाखाली बसलेली सीता त्यांना दिसली. तिचे मुख म्लान दिसत असले तरी पण अविरत रामाचे स्मरण चालू होते. हनुमंताने मोठ्या चातुर्याने तिला रामकथा ऐकवली. नंतर तिला प्रभू रामचंद्रांची मुद्रिका दाखवून, तिला आपण रामदूत असल्याची खात्री पटवून दिली. नंतर तिने रामासाठी दिलेला निरोप व तिची खूण म्हणून दिलेला चूडामणी त्याने घेतला. तसेच प्रभु लवकरच येतील व आपली सुटका करतील असे सांगून सीमामाईला त्यांनी आश्वस्त केले.

६) नम्रता शालिनता – सीतेला भेटून हनुमंत परत‌ला, पण स्वत:च्या तोंडाने आपली कामगिरी यशस्वी झाली हे त्याने सांगितले नाही. त्याने ब्रह्मदेवांना ते सारे वर्णन लिहिण्याची विनंती केली. भक्ताने असेच आपल्या आराध्यापुढे नम्र व शालीन असावे.

७) तत्परता – मेघनाथाने टाकलेले ‘शक्ती’ नावाचे अस्त्र लक्ष्मणाच्या मर्म स्थानावर बस‌ले व तो खाली पडला. पहात‌ा पहाता त्याचे शरीर काळे निळे दिसू लागले. राम अत्यंत दु:खित झाले. सुषेणवैद्याने हिमालयातील संजीवनी औषधीबद्दल सांगताच मारुतीराय त्वरेने उत्तरेकडे झेपावला. तो मनोवेगाने गेला व संजीवनी औषधी घेऊन मनोवेगानेच परतला. त्वरित केलेल्या संजिवनी उपचारांनी लक्ष्मणाचे प्राण वाचले. भक्त आपला आराध्याच्या सेवेला तत्पर हवा. 

८) चातुर्य व युक्तीचा वापर – अहिरावण व महिरावणांनी राम व लक्ष्मणांना पाताळात नेले. तेव्हा हनुमंत योगबळाने तेथे पोहोचले. देवी मंदिरात तो देवीच्या मूर्तीमागे लपून बसला. अहिरावण महिरावण राम-लक्ष्मणांना बळी देण्यासाठी देवी मंदिरात आले तेव्हा मारुतीराय प्रकट झाले व त्याने त्या दोघांचा समाचार घेत त्यांना मारले व राम-लक्ष्मणांची सुटका केली. 

९) सेवाकार्यात लौकिक गोष्टींना फाटा – हनुमंत द्रोणागिरी पर्वत घेऊन येत होता तेव्हा कालनेमी नावाच्या राक्षसाने त्याचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा खूप प्रयत्न केला. पण हनुमंत त्याला फसला नाही व मध्ये थांबला नाही. भक्ताने असेच लौकिकाला न भुलता निष्ठेने भक्ती करायला हवी. 

१०) आरामाची सवय नको – द्रोणागिरी घेऊन येताना वाटेत अयोध्या लागली. भरताने आपली ओळख देत थोडी विश्रांती घेण्याचा आग्रह केला, पण ‘आराम हराम आहे’ हे मनाशी पक्के असल्याने हनुमंताने नम्रपणे नकार दिला व तो पुढे निघाला. 

११ ते १३) भक्त निस्वार्थ असावा, निर्मत्सरी असावा, नम्र असावा, निर्लोभी असावा, निरपेक्ष असावा – अयोध्येला परतल्यावर बक्षिसादाखल दिलेला मोत्याचा हार हनुमंताने गळ्यात मिरवला नाही. तर प्रत्येक मोती फोडून तो तेथे आपल्या आराध्याचा शोध घेत राहिला. परंतु एकाही मोत्यामध्ये श्रीरामांचे दर्शन न घडल्यामुळे, अंतिमतः आपल्या छातीला छेद देऊन, त्याने तेथे विराजलेल्या श्रीराम-सीतेचं दर्शन घडवले ! असा होता सर्वश्रेष्ठ भक्त हनुमान ! याच भक्तीमुळे त्याला चिरंजीवित्व प्राप्त झाले होते. 

 

जय हनुमान ! जय चिरंजीव हनुमान !

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

गुणवंत हनुमंत

श्रीप्रभूराम व मारुतीराय अर्थात् हनुमंत यांच्यात एक फार सुंदर संवाद आहे. प्रभूश्रीरामांनाना आपला परीचय देताना हनुमंत म्हणतात, 

देहबुद्ध्या तु दासोऽस्मि जीवबुद्ध्या त्वदंशकः।

आत्मबुद्ध्या त्वमेवाहं इति मे निश्चिता मतिः।।”

देहबुद्धीने विचार केला तर मी आपला दासानुदास आहे. जीव (मी) या दृष्टीने विचार केला तर, आपण परमात्मा असल्याने मी आपला (एक) अंश आहे. (ममै वांशो जीवलोके जीवभूतः सनातन:।) आणि आत्मदृष्ट्या विचार केला तर (आपल्याशी सायुज्य प्राप्त झाले असल्याने) प्रभु, तुम्ही व मी एकच आहोत, अशी माझी दृढ धारणा आहे. हनुमंताच्या या स्व ओळखीतून त्याच्या बुद्धीमत्तेची चुणूक दिसतेच पण, त्याचा भक्तीयोगातला अधिकार देखील अधोरेखित होतो !

वाल्मिकी रामायणातून हनुमंताचे व्याक्तिचित्रण अति उत्तम झालेले आहे. अनेक गुणांचा समुच्चय त्याच्यात आहे. तो ‘बुध्दीमतां वरिष्ठ’ तर आहेच पण ‘ज्ञानीनां अग्रगण्य’ ही आहे. भक्ती, शक्ती, सेवा, नम्रता, वाक्पटुता, चापल्य, दूतकौशल्य, ब्रह्मचर्य, दास्य, रणपटुत्व अशा अनेकानेक गुणांचा समुच्चय त्याच्यात असल्याने प्रभूरामचंद्रांची व त्याची जेव्हा भेट होते, तेव्हा प्रभूरामचंद्रांच्या ते गुण लक्षात येतात व ते मुक्त कंठाने लक्ष्मणाजवळ त्याची प्रशंसा करतात. हा ‘दूत’ म्हणून उत्तम कामगिरी करू शकतो हे त्यांनी प्रथम भेटीतच हेरले.

दूत हनुमान : प्रभूरामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, “लक्ष्मणा ! बघ तरी, हा किती समर्पक बोलतो आहे. याच्या बोलण्यात चुकीचा शब्दप्रयोग अजिबात नाही. याचे बोलणे फार पाल्हाळाचे नाही, फार त्रोटकही नाही. फार घाईघाईचे नाही, फार संथही नाही. हा तोंडातल्या तोंडात पुटपुटत नाही व मोठ्या कर्कश आवाजात देखील हा बोलत नाही. अकारण अंगविक्षेप करीत, वेडे वाकडे हावभाव करीत हा बोलत नाही. याचा भाषीक डौल सुंदर व मोहक आहे. हा सुग्रीवाचा दूत म्हणून आला आहे. ज्याचे कार्य साधणारे ‘दूत’ अशा उत्तम गुणांनी युक्त असतील, त्या राजाचे सर्व मनोरथ दूताच्या संभाषण चतुराईने सिद्धीस जाऊ शकतात.” 

म्हणूनच सीता माईचा शोध घेण्याचे व दूत म्हणून शत्रूराज्यात (लंकेत) पाठविण्याची वेळ आली तेव्हा प्रभूरामचंद्रांनी हनुमंताकडेच ती जबाबदारी सोप‌विली. दक्षिण दिशेकडे निघालेल्या वानरचमूंपैकी त्यांनी हनुमंताला जवळ बोलावून त्याच्या जवळ सीतामाईला दाखविण्यासाठी आपल्या हातातील मुद्रिका (अंगठी) काढून दिली व तिच्यासाठी निरोप पाठविला. 


अंतर्मुख विवेकी हनुमंत: सागर उल्लंघून जाताना, वाटेतील अडथळे पार करीत हनुमंताने लंकेत प्रवेश केला. सीतामाईंना शोधत शोधत तो रावणाच्या राजवाड्यात गेला. रावणाच्या अन्त:पुरातील सुंदर स्त्रिया त्याने पाहिल्या. क्षणभर तो बिचकला पण त्याने विचार केला, मी ब्रह्मचारी ! आजपर्यंत मी कोणत्याही स्त्रीकडे पाहिले नाही. आज अचानक अनेक सुंदर स्त्रिया पाहिल्या, हे दूषण मला लागेलच. पण, प्रभूंचे कार्य करीत असताना हे अनवधानाने घडले.’ या विचाराने विवेकारूढ होत त्याने स्वत:ला सावरले, स्थिर केले साऱ्या स्त्रियांमध्ये मातृ‌भाव ठेवीत तो शांत होत पुढे निघाला.

निर्भय हनुमान : हनुमंताने आपले सर्वस्व, आपले कर्तृत्व, भोक्तृत्व  प्रभूरामचंद्रांच्या चरणी अर्पण केले होते. रावणापुढे आल्यावर तो स्पष्टपणे रावणाला सांगतो, सीताहरणाचे पाप व अधर्माची कृती तू केली आहेस. हे सर्वथा अयोग्य आहे. वाली वध, सुग्रीव व प्रभूरामचंद्राची भेट, राक्षस संहार या झालेल्या घटना लक्षात घे. अजूनही पुनर्विचार कर. सीतामाईंची मुक्तता कर. उदार मनाचे श्रीराम तुला क्षमा करतील. तेव्हा तू तुझे कल्याण करुन घे. शत्रूराज्यात प्रवेश करून, त्यांच्या प्रमुखाला असं निर्भयपणे सांगणे हे प्रचंड धाडसाचंच काम ! तसेच धोक्याचेही !!  पण हनुमंत ते निर्भयतेने उत्तम प्रकारे  पार पाडतो.

स्वामीनिष्ठ व प्रसंगावधानी हनुमंत : सेतूबंधनाचे वेळी वानर मोठमोठ्या शिळांवर रामनाम लिहित व त्या शिळा समुद्रात टाकीत. त्या तरंगत होत्या. ते पाहून रामानेही एक शिला रामनाम लिहून समुद्रात टाकली, तर ती न तरंगता खाली बुडाली. हनुमंत पटकन म्हणाला, प्रभो ! ज्यांनी आपला व आपल्या नामाचा आधार घेतला त्या शिला तरल्या. पण जिला साक्षात प्रभूंनीच टाकून दिले ती तरेल कशी ? ” हनुमंताच्या या उत्तरातून त्यांची स्वामीनिष्ठा तर दिसतेच पण त्यांचे प्रसंगावधान पण नजरेत भरते.

संघटन कौशल्यधारी हनुमान : हनुमंत हा ‘वानरयूथपती’ आहे. वानरांचा अग्रणी आहे. लंकेत असताना बिभीषणाच्या घराची पहाणी करून, तो धार्मिक, सत्यप्रिय, संस्कारशील आहे हे त्याने ओळखले होते. व जेव्हा बिभीषण प्रभूरामचंद्रांना शरण आला तेव्हा त्याच्या साधू वृत्तीची ग्वाही देत त्याला आपला पक्षात घेण्याबद्दल हनुमंताने आपली अनुकुलता दर्शवली. यामधून त्याच्या बुद्धीची सूक्ष्मता, सत्यासत्याचा विवेक, राजनीती व व्यवहारचातुर्याचे दर्शन होते. प्रभूंनीही ते ओळखून बिभीषणाला जवळ केले.

गुणपारखी हनुमंत : प्रभूरामचंद्रांची व भरताची चित्रकूटावर भेट झाली तेव्हा भरताने श्रीरामांना अयोध्येला येण्याविषयी खूप आग्रह करूनही त्यांनी त्याची समजून काढली. शेवटी भरत प्रभूरामचंद्रांच्या पादुका मस्तकी धारण करून अयोध्येला परतला. मध्ये चौदा वर्षे गेली तेवढ्यात भरताचे मन पालटले असेल का ? याची शहानिशा करण्याच्या नाजूक कामगिरीसाठी त्यांनी हनुमंतालाच पाठविले. हनुमंताने भरताचे तपस्वी जीवन पाहिले, तो प्रभू रामचंद्रांच्या आगमनाची अंतःकरणपूर्वक वाट पहातो आहे, हे हेरून त्याने प्रभूंना त्याच्या प्रेमाची नि:संदिग्ध ग्वाही दिली! असा तो गुणपारखी आहे.

भक्त श्रेष्ठ हनुमंत : हनुमंत रामरायांचे भक्तश्रेष्ठ आहेत प्रभूरामचंद्र त्यांच्यावर अतिशय प्रसन्न होते. हनुमंता, तुझ्याखेरीज रावण वधाचे कार्य मी करूच शकलो नसतो असे ते हनुमंताला प्रेमभराने म्हणतात, त्याला बहिश्चर प्राण म्हणून गौरवतात. म्हणून आपल्या अवतार कार्याच्या समाप्ती प्रसंगी त्यांनी आपल्या या भक्तश्रेष्ठाला चिरंजीवपद देत त्याच्यावर सर्व रामभक्तांचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली. आणि ते, ही जबाबदारी उत्तम निभावीत आहेत. जेथे जेथे राम कथा असते तेथे तेथे ते सूक्ष्मरुपाने उपस्थित असतात. श्रीसमर्थांनी हे आग्रहाने सांगितले आहे की, 

पावावया रघुनाथ।जया मनी वाटे आर्त।

तेणे ध्यावा हनुमंत।घडवील रामभेट।।


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मारुती उपासना नेमस्त

आपला संप्रदाय, स्वरूप संप्रदाय; आपले दैवत श्रीरघुनाथ आणि आपली उपासना मारूतीची, हे श्रीसमर्थांनी सुस्पष्टपणे सांगितले आहे. कोदंडधारी रामरायांचा आद‌र्श श्रीसमर्थांनी सर्व समाजापुढे ठेवला. श्रीरामरायांच्या चरणी, ज्यांनी आपल्या कृतीने भक्तीमार्गातील दास्य भक्तीचा मापदंड सर्वांसमोर प्रस्थापित केला, त्या श्रीमारुतीरायांची उपासना श्रीसमर्थांनी नेमस्तपणे केली. श्रीसमर्थ आणि मारुतीराय या दोघांची युगायुगांची परंपरा भविष्योत्तर पुराणात सांगितली आहे. 

कृते तु मारुताख्याश्च त्रेतायां पवनात्मजः।

द्वापरे भीमसंज्ञश्च रामदासः कलौयुगे।।

कृतयुगात जो मारूती या नावाने, त्रेतायुगात जो पवनात्मज नावाने, द्वापारयुगात ज्याला भीम असे संबोधले गेले, तेच कलीयुगात रामदास झाले. श्रीसमर्थ व मारूतीराय यांच्यात असे अद्वैत होते. अंतरीचे तत्त्व उभयतात एकच होते.

श्रीसमर्थांच्या जीवनकाळात त्यांनी मारूतीरायाची निस्सीम भक्ती केली व मारूतीरायांनीही त्यांना उदंड साथ दिली, मार्गदर्शन केलं. श्रीसमर्थ, अर्थात तेव्हाचा छोटा नारायण जेव्हा तीन दिवस; तीन रात्री उपाशीपोटी; तहानभूक विसरून रामरायांचा दर्शनासाठी अविचल बसलेला पाहून, मारूती मंदिरातील मारूतीरायांनीच मग प्रभूश्रीरामचंद्रांना दर्शन देण्याची विनंती केली. त्यानंतर प्रभूश्रीरामचंद्र प्रकट झाले. बाल नारायणास अनुग्रह देऊन, त्याला रामदासहे नाव देऊन, प्रभूंनी त्याला रामनामी शाल पांघरली. कानांत मंत्र सांगितला व त्याला मारूतीरायांकडे सोपवले. त्याला सांभाळा असा आदेश देत ते अंतर्धान पावले. तेव्हापासून मारूतीराय नारायणाच्या पाठीशी सदैव सज्ज होते. पुढे नारायणाला समाजात सन्मान मिळू लागला. श्रीसमर्थ अशी बिरुदावली प्राप्त झाली. शेवटपर्यंत त्या दोघांमधील अनुबंध अत्यंत मधुर राहिले. माझा सखा सहोदरही त्यांची उत्कट भावना होती, ते सतत मारुतीरायांना आळवीत राहिले.

तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे।

म्हणउनि मन माझें रे तुझी वाट पाहे।।

मज तुज निरवीलें पाहिजे आठवीलें।

सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें।।

(कफनाशक हनुमान स्तोत्र)

बलभीमाच्या, मारुतीरायांच्या ठायी शक्ती; बुद्धी; युक्ती यांचा एकत्र संगम आहे. ते बुद्धिमतां वरिष्ठम्आहे तसेच ज्ञानीनां अग्रगण्यआहेत. कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारे आहे. अशा मारूतीरायांचा आदर्श श्रीसमर्थांनी मनी मान‌सी जपला, समाजापुढे ठेवला व मारूती उपासना नेमस्त करण्याचा आग्रह धरला. ही उपासना त्रिविध प्रकारांनी सांगितलेली आहे.

आधिदैविक उपासना : त्रेतायुगात रावणाने पृथ्वीवर उत्पात माजविला होता. नवग्रहांना पालथे घालून त्यावर त्याने स्वत:चा मंचक ठेवला होता. देवांना पराभूत करून त्यांना बंदी बनविले होते. तेव्हा भयभीत पृथ्वीला अभय देत भगवान नारायणांनी एक योजना ठरविली. त्यासाठी महादेवांना मदतीचे आवाहन करीत म्हटले, “,देवाधिदेवा महा‌देवा ! मी अयोध्येचा राजपुत्र म्हणून राजा दशरथांच्या पोटी जन्म घेतो. आपण आपल्या अकराव्या अंशापासून अंजनी व केसरी यांचा पुत्र म्हणून वानर जमातीत अवतार घ्यावा.” अयोध्येला रामचंद्रांचा व अंजनीपुत्र हनुमंताचा वानर जमातीत जन्म झाला. हा रूद्रावतार, अधिदैवत मारुतीराय शंकरांचा अकरावा अंश; म्हणून श्रीसमर्थ संप्रदायात अकरा या संख्येला महत्व आहे.

आध्यात्मिक उपासना : श्रीराम हा भगवान विष्णूंचा अवतार तर मारूतीराय शिवशंकरांचा अवतार. श्रीरामांना जर आत्मा म्हटले तर मारूतीराय हा त्यांचा बहिश्चर प्राण ! येथे ज्ञानदेवांनी केलेला उल्लेख महत्वाचा आहे. त्यांनी देहातील कुंडलिनी शक्तीला मारूती म्हटले आहे. योगाच्या सहाय्याने मूलाधार चक्रापाशी असलेली कुंडलीनी शक्ती जागृत करून तिला उर्ध्वमुखी केले की, तिचा उलट दिशेकडे प्रवास सुरु होतो, तो सहस्त्रधार चक्रापर्यंत ! चैतन्याला आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलीनी केवळ प्राणवायूरूप होते. देह वायुरूप होतो, देह इतका हलका होतो की, आकाशातही संचार करू शकतो. मारुतीरायाचे हे आध्यात्मिकरूप आहे. याच रुपात त्याची उपासना करतात.

आधिभौतिक उपासना : यामध्ये मारुतीरायाची १) दास मारूती २) वीर मारूती ही दोन रूपे येतात. पैकी दासमारुती श्रीरामांसमोर दास होऊन हात जोडून उभा असतो. नवविधा भक्तीतील दास्य भक्तीचा तो आदर्श आहे. वीर मारूती म्हणजे दुष्ट विचार व दुष्ट शक्ती यांना चिरडून टाकणारा. वीर, पराक्रमी, साहसी, निर्भय असे हे मारूतीरायाचे रूप आहे. श्रीसमर्थांनी तत्कालीन समाजाची हरवलेली वा लोप पावलेली अस्मिता पुन्हा जागृत करण्यासाठी मारूतीरायाच्या ह्या रूपाची खूप भलावण केली आहे. धर्म संस्थापना करणे हेच श्रीसमर्थांचे मुख्य उद्दीष्ट होते. त्यासाठी रुद्रावतारी मारूतीरायाची उपासना त्यांनी नेमस्तपणे केली व समाजालाही सांगितली.


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अंजनीसूत हनुमान – बाललीला व वैज्ञानिक अर्थ

हनुमंताची जन्मकथा फार अद्भूत आहे. इंद्राच्या दरबारात पुंजिकास्थला नावाची सुंदर अप्सरा होती.  होती गुणी पण मनाने मात्र चंचल! एकदा दरबारात एका मुनींकडे पाहून ती अकारणच हसली. आता तपस्वी मुनीच ते! त्यांना तिचा थिल्लरपणा काही आवडला नाही. त्यांनी तिला रागाने शाप दिला. चंचळ स्वभावाची आहेस, तर आता वानरीच होशील. शाप ऐकल्यावर पुंजिकास्थला नरमली. तिने मुनींकडे क्षमेची याचना केली. तेव्हा मुनी म्हणा‌ले, “माझ्या शापानुसार तुला वानरी तर व्हावेच लागेल, पण तू क्षमा मागते आहेस म्हणून, तुला सांगतो की, तू चिरंजीव पुत्राची माता होशील व त्याची माता म्ह‌णूनच जग तुला ओळखेल.” 

पुंजिकास्थला वानरी बनली, त्या वानरीचे नाव अंजनी. तिचा विवाह केसरी नावाच्या वानराशी झाला. केसरी हा सुमेरू पर्वताचा राजा होता. अतिशय पराक्रमी. दोघांच्या विवाहानंतर बराच काळ झाला तरी त्या दंपतीला संतान प्राप्ती झाली नाही. मग अंजनीने मतंग ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे वायूदेवता व भगवान शंकरांची आराधना सुरु केली. तिच्या तपस्येचा प्रसाद म्हणून “रूद्राच्या अकराव्या अंशापासून वायूची गती प्राप्त असलेला तेजस्वी पुत्र तुला मिळेल”, असा शिवशंकरांचा वर तिला मिळाला. योग असा विलक्षण आला की, त्याच वेळी राजा दशरथाने केलेला पुत्रकामेष्टी यज्ञात प्रत्यक्ष प्रकट झालेल्या अग्नीने राजाला पायसाचे दान केले. ते तीन राण्यांना वाटून द्यायचा होते. तसे पायसाचे दान कौसल्याराणी व सुमित्राराणी ह्यांना मिळालेही. कैकयीराणी तिचा वाटा घेणार तेवढ्यात सुर्कला नावाची शापीत अप्सरा घारीच्या रूपात घिरट्या घालीत होती, तिने पायसावर झडप घातली व त्या पायसाचा काही भाग घेऊन ती उडाली आणि अंजनीच्या ओंजळीत तिने तो भाग टाकला व ती शापमुक्त झाली!

इकडे वायुदेवतेने सांगितल्यावर अंजनीने तो पायसाचा भाग भक्षण केला. चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला अगदी सूर्योदयालाच्या वेळी तिने एका सुंदर बाळाला जन्म दिला. हा महादेवाचा (रूद्राचा) अकरावा अंश मारूती. ह्या बाळाला जन्मजात कटीला सुवर्ण कासोटी होती. मस्तकावर मुकूट होता व हातात सुरेख काकणे होती. बाळाला भूक लागली होती. तेवढ्यात बाळाला उगवणारा सूर्य दिसला. त्याला ते लालचुटूक फळ वाटले. मग काय ? बाळाने उंच उड्डाणच केले व तो सूर्याच्या दिशेने झेपावला. त्याच वेळी ग्रहणकाळ असल्याने सूर्याला ग्रासायला राहूही आला होता. राहू व जन्मलेल्या बाळाचे भांडण जुंपले. राहूचे बाळापुढे काही चालेना. त्याने इंद्रदेवाची प्रार्थना केली. इंद्राने आपले वज्र मारूतीवर फेकले, ते मारुतीच्या हनुवटीवर आदळले व हनुवटी भंग पावली व मारूतीला नाव मिळाले हनुमंत !(हनुवटी भंग पावलेला)

बाल मारूतीच्या लीला अपूर्वच ! तो ह्या पर्वतावरून त्या पर्वतावर सहज उड्या मारी. इतरांनी शोधावा म्हणून झाडांच्या डेरेदार फांद्यामध्ये लपून बसे. सर्वजण शोधून दमत. मग हा एकदम मोठ्याने हसत “मी इथे आहे” म्हणत बाहेर येई. त्याला कुणी धरायला जाई, तर हा परत आकाशात झेप घेई. एका ठिकाणी स्थिर बसेल तर शपथ ! सारखी धावाधाव, पळापळ चाले. मोठमोठी झाडे तो सहज उपटून् टाकी. त्यांच्या मोडण्याचा कडाड आवाज येई. मग हा मोठ्याने हसे. त्याच्या गतीला तर सीमाच नव्हती. वाऱ्याच्या वेगाने  धावत सुटे. कुठे कुठे विवरात लपून बसे. असा हा हूड, धावणारा, पळणारा, लपणारा, सर्वांना दमवणारा खोडकर बाल मारुती!

मारूतीच्या बाललीलेत, नुकत्याच जन्म घेतलेल्या मारूतीला सूर्यबिंब जणू फळच आहे असे वाटून ते खावेसे वाटते. तो लालचुटूक सूर्यबिंबाच्या दिशेने झेपावला असे वर्णन आहे. हे वर्णन मानवी बुद्धीला न पटणारे आणि शारीरिक क्षमतेला न झेपणारे असेच आहे. पण वैज्ञानिक सत्याचा आधार घेऊन या कथेचा उलगडा करता येईल. कसा ? तो पाहूया. मारूती म्हणजे मरूत, म्हणजेच वारा. क्षणात कुठेही आणि कसेही उडणे हे केवळ वाऱ्यालाच शक्य आहे. वाऱ्याचीही अफाट शक्ती मारूतीच्या रूपात आपल्यापुढे आली. सुर्याच्या जवळ जाताजाता तो बेशुध्द पडतो ? वातावरणाच्या बाहेरील निर्वात पोकळीत वारा पोहचू शकत नाही; परिणामी बेशुद्धी येते. हा त्या कथेमागचा वैज्ञानिक अर्थ आहे! 

आपल्या पूर्वजांना निसर्गाची अफाट ताकद म्हणजे एक चमत्कार वाटला असावा. म्हणूनच निसर्गातील अग्नि, वारा, पर्जन्य आदि शक्तींना देवता स्वरूप देऊन त्यांच्या पराक्रमाच्या कथा गुंफल्या गेल्या असाव्यात. आजच्या विचारवंतांच्या मते आपल्या प्राचिन परंपरा, आप‌ली दैवत यामागे निश्चित असा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे, कार्यकारण भाव आहे. मात्र पूर्वजांनी त्याकाळच्या जनमानसाला झेपेल अशा भाषेत तो सांगितला आहे.

एक खरं की, या देवतांच्या सामर्थ्याचा उपयोग समाजाच्या उत्थानासाठी, प्रबोधनासाठी मोठ्या चातुर्याने करणारे श्रीसमर्थांसार‌खे आपले पूर्वज तेवढेच कल्पक व प्रगतीशील म्हणायला हवेत. श्रीसमर्थांचा तेरा मारुती स्तोत्रातून याचीच प्रचिती आपल्यासा सतत येत रहाते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्रीसमर्थांचे शब्द‌सामर्थ्य

श्रीसमर्थ रामदास स्वामी हे साक्षात्कारी संत वा स्वानुभवसंपन्न ब्रहज्ञानी होते. वय वर्षे बारा ते चोवीस या प्रारंभीच्या बारा वर्षांच्या काळात नाशिक जवळच्या टाकळी येथे कठोर तप साधना करून त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले. पुढील बारा वर्षे त्यांनी आसेतु हिमालय प्रदभ्रमण केले. समाजाचे सूक्ष्म अवलोकन केले. अस्मानी, सुलतानी संकटांनी भरडून निघालेली, हीनदीन, लाचार, आपाप‌सातील कलहाने ग्रासलेली, फंदफितुरीने पोखरलेली, परवशतेची खंत नसलेली, मतामतांच्या गलबल्यात भ्रमलेली समाजस्थिती पाहून श्रीसमर्थ अत्यंत व्यथित झाले, अस्वस्थ झाले. अशा विपरित स्थितीत स्वत:च्याच आनंदात, ब्रह्मानादात मग्न न रहाता, समाजाचे पुनरुत्थान करण्याचे असिधारा व्रत त्यांनी मनोमन स्वीकारले. समाजाच्या स्वधर्म व संस्कृतीचे जागरण ही काळाची गरज ओळखूत त्यांनी आपले विचार मांडण्यास सुरुवात केली.

श्रीसमर्थांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती. ती सदासर्वदा जागृत असे. स्वधर्म व संस्कृतीचा जणू विसरच पडलेल्या समाजाची मनोभूमी निकोप होणे गरजेचे होते. त्यासाठी भक्तीची शिकवण देताना “भक्तिचेन योगे देव । निश्चयें पावती मानव ।।” अशी त्यांची भूमिका होती. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, व आत्मनिवेदन या नवविध भक्ती प्रकारांचा विस्तृत परीचय त्यांनी करून दिला आहे. त्यांचा भक्तीमार्ग विलक्षण बुद्धीप्रधान असल्याने, त्यांनी प्रपंच व परमार्थ यांची उत्तम सांगड घातली आहे. 

आधीं प्रपंच करवा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।

येथें आळस करूं नका । विवेकी हो ।।

प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।।

हे खरंच, पण त्याच बरोबर “परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगीसी । अंतीं परम कष्टी होसी ।।” हे ही खरेच आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणे हाच खरा विवेक हे ते स्पष्ट करतात.

श्रीसमर्थांचे सर्वच प्रतिपादन सरळ अन रोखठोक आहे. भाषा ओघवती, गतिमान आहे. मराठी बरोबरच हिंदी, उर्दू, फारसी, अरबी, संस्कृत शब्दांचा ते सहज उपयोग करताना दिसतात. त्यांना शब्दांची कधीच अडचण भासत नाही. जणू शब्द हात जोडून त्यांच्या पुढे उभे आहेत असे वाटते. मोजक्या शब्दात अगदी नेमका अर्थ अगदी निःसंदिग्धपणे सांगण्याची त्यांची हातोटी, त्यांचे शब्दसामर्थ्य विलक्षण होते.

तत्कालीन समाजातील देवत्वाबद्दलच्या व साधुत्वाबद्दलच्या रूढ आणि भोंगळ कल्पना विवेकाच्या शस्त्रानेच कापून काढीत खरा देव कोणता ते त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या अंतरंगात वास करणारा अंतरात्मा अर्थात् आत्माराम हाच खरा देव आहे हे त्यांनी ठासून सांगितले. संत व साधुत्वा बद्दलचे त्यांचे विचार असेच सुस्पष्ट होते. संत साधू कोणास म्हणावे?

जो जाणेल भगवंत । तया नाव बोलिजे संत ।

जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ।।६-१-१६।।

चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव ।

तोचि जाणिजे माहानुभाव । संत साधु ।।६-१-१७ ।।

नरदेह दुर्लभ आहे याची त्यांना जाणीव होती, म्हणून “वरकड देहे हें काबाड । नरदेह मोठें घबाड ।” असे ते सांगतात, नरदेहाला रत्नपेटी म्हणून त्याचा गौरव करतात आणि त्याचवेळी या दुर्लभ नरदेहाचे सामर्थ्य जाणा; त्याचे सार्थक करा असेही अगदी कळकळीने सांगतात. कोणताही माणूस सर्वगुण संपन्न नसतो. त्यात काही गुण व काही अवगुण यांचे मिश्रण असते,  हे त्यांना मान्य आहे. पण त्याच वेळी, “अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।” हा त्यांचा विश्वास आहे. बाह्य शृंगारापेक्षा अंतरंग  सत्त्वगुणांनी शोभिवंत करण्याचा ते आग्रह धरतात.

नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंघारणें ।

विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंघारिजे।

त्यासाठी हवा प्रयत्न. प्रयत्न, प्रबोधन व प्रचिती यांवर त्यांचा विशेष भर होता.  केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे । यत्न तो देव जाणावा । अंतरी धरिता बरे । क्रियेवीण वाचाळतां व्यर्थ आहे । प्रयत्नांच्या आड येतो तो आळस. निद्रा, आळस व दुश्चितपणा यांना दूर ठेवलेच पाहिजे. श्रीसमर्थांनी स्वत:चे आचरण तसेच ठेवले. “स्वये करून करवावे” हेच सूत्र त्यांनी स्वतः सांभाळले व समाजाला सांभाळण्यास उद्युक्त केले.

समाज मनाला चेतना आणण्यासाठी त्यांनी विचारपूर्वक श्रीराम, श्रीहनुमान, व तुळजाभवानी ही उपासना दैवते निवडली. सर्व शस्त्रधारी दैवते ! बुद्धी व शक्तीचा संगम असलेली ! नारी शक्ती बरोबरच नम्रता व समर्पण वृत्तीही हवी. त्यासाठी हनुमानाचा आदर्श पुढे ठेवला. वीरमारूती व दासमारूती ही मारूतीरायाची दोन्ही रूपे त्यांना फार प्रिय होती. गावोगावी त्यांनी हनुमान मंदिरे व जोडीला व्यायाम शाळा उभारल्या. अकराशे मठांची स्थापना केली. हे मठ म्हणजे ज्ञानोपासनेची विद्यापीठेच होती. त्यांचे मठपती अर्थात महंत समाजाचे नेतृत्व करणारे नेतेच होते. त्यांच्या मार्फत समाजात चेतनेची स्फुल्लिंगे फुलू लागली. श्रीसमर्थ सांगू लागले, “वन्ही तो चेतवावा रे । चेतविताची चेततो ।”, “धीर्धरा धीर्धरा तकवा । हडबडूं गडबडू नका ।”, “सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।”, “मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।” श्रीसमर्थाचे हे संदेश समाजात दूर दूर पसरू लागले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही गर्जना समाजात चैतन्य आणू लागली.

अवघ्या महाराष्ट्राचे सुदैव म्हणून श्रीसमर्थ व शिवाजी राजांची भेट झाली. राजांनी श्रीसमर्थांचा अनुग्रह प्राप्त केला. स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा या श्रध्देने व निष्ठेने मावळ्यांचे संघटन करून निजामशहा, आदिलशहा आणि दिल्लीच्या बादशहा यांच्याशी मोठ्या शर्थीने झुंझणाऱ्या राजाला श्रीसमर्थांनी अध्यात्मिक बळ दिले. दैवी आधिष्ठान प्राप्त करून दिले.  “राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच नेदावें ।” या सूत्रानुसार श्रीसमर्थ व शिवाजीराजे यांच्यामध्ये गुप्तपणे सल्लामसलती होत आणि त्यातून अचुक मार्गदर्शन होई. श्रीसमर्थांचे सर्वदूर फिरणारे शिष्य म्हणजे जणू गुप्तहेरांचे नेटवर्कच होतं ! याचं उत्तम उदाहरण अफजलखानच्या स्वारीचे वेळचं. श्रीसमर्थांचे पत्र राजांना रवाना झाले. वरवर पहाता काव्यातून अध्यात्मिक उपदेश, पण त्या काव्याची आद्याक्षर होती – “विजापूरचा सरदार निघाला आहे.”  केवळ आद्याक्षर एवढ्या सांकेतिक शब्दाने राजांना अचूकपणे माहिती मि‌ळाली. राजांनी भेटीसाठी कोणती खबरदारी घ्यावी, हेही असेच चातुर्याने सांगित‌ले गेले. “नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंघारणें”, “अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे ।” (बीज म्हणजे चिलखत.) राजे, आपण चिलखत घालून भेटीस जावे. अफजलखानाचा स्वभाव विशेष असाच सांगितला. श्रीसमर्थाच्या शब्दांच्या सामर्थ्याचा हा निखळ पुरावाच !

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

चिंतामणी

चिंतामणीची विशेषता ही की, तो ज्याच्या जवळ असेल तो चिंतामणीच्या सहाय्याने इच्छिलेली प्रत्येक गोष्ट प्राप्त  करू शकतो. श्रीसमर्थांच्या दासबोधातील पाचवा दशक हा मुमुक्षुसाठी जणू चिंतामणीच आहे. मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा. पाचव्या दशकाची रचना मुमुक्षुला परिपूर्णता यावी या उद्दे‌शानेच केली आहे. पहिल्या दोन समासात गुरू व सद्‌गुरू यातील फरक सांगितला आहे. जीवनातील विविध शास्त्रांचे, तंत्रांचे, यंत्रांचे ज्ञान देणारे ते गुरु ! मात्र जे भगवंताचे ज्ञान करून देतात ते सद्‌गुरू. सद्गुरूंवाचून परमार्थ साधन नाही. 

सद्‌गुरू वाचून सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।

सद्‌गुरूंना शरण जाणे, हाच मुमुक्षुसाठी तरणोपाय आहे. सद्‌गुरू समजण्यासाठी त्यांची लक्षणे सांगतात, 

“मुख्य सद्‌गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।

निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ।। ५-२-४५ ।।

याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।

विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषई ।। ५-२-४६ ।।”

हे गुणविशेष ज्याच्यात आहेत तेच सद्गुरू असे मुमुक्षुने लक्षात घ्यावे व उत्तम शिष्य बनून सद्‌गुरूंच्या आदेशाप्रमाणे आचरण करावे. परमार्थ मार्गात सद्‌गुरू व सत्शिष्य या खरंतर  परस्परावलंबी जोड्या आहेत. जसे जमीन सुपीक असेल आणि पेरलेले बी देखील उत्तम असेल तरच उत्तम पीक येते. तसे गुरू मुखातून अध्यात्म शास्त्रातील विविध संकल्पना नीट समजाउन घेणारा मुमुक्षुच त्यांच्या उपदेशाप्रमाणे उत्तम साधना करील. त्यासाठी मुमुक्षुने नित्य सावध असलेच पाहिजे. त्याने आळसाला जराही थारा देता कामा नये. 

अनंत जन्मांचे सुकृत पाठीशी असेल तर सद्‌गुरू-सत्शिष्याची जोडी जमण्याचा सुयोग जुळून  येतो. सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने सत्शिष्य आत्मज्ञानाचा अधिकारी होतो. एकदा का आत्मानुभुती व त्याने मिळणाऱ्या आत्मसुखाची गोडी त्याला लागली की, त्या अवीट सुखापासून दूर होण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवणार नाही. सदगुरूंनी सत्शिष्याला समजाविले आहे,

“ऐक शिष्या येथीचे वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म ।। ५-६-४५ ।।

पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ।। ५-६-१ ।।”

आपल्या मधील जो ‘खरा मी’ आहे ते आपले खरे स्वस्वरूप. तो खरा मी आत्मरूपच आहे, ब्रह्मरूपच आहे. ते स्वरूप कायम टिकणारे आहे. श्रीसमर्थ समजावितात, 

“आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ ।

जें आदिअंतीं स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ।। ५-६-१५ ।।

जेथून हें सर्व ही प्रगटे । आणी सकळ ही जेथें आटे ।

तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ।। ५-६-१६ ।।”

खरा ‘मी’ आत्मस्वरूप आहे. म्हणून स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या चार देहाहून मी वेगळा आहे, हे एकदा कळले की सारा देहाभिमान गळून जातो. हे मनात बिंबविण्यासाठी मुमुक्षुने एकांतात बसावे. श्रवण, मनन व चिंतनाच्या अभ्यासातून हा परम अर्थ दृढ होतो. मग ज्ञानाचा प्रकाश अंतर्यामी फांकतो व अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. हे आत्मबुद्धीचे ज्ञान मायेच्या पलीकडील असल्याने ते निश्चित व संशयरहित असते. त्याने संपूर्ण समाधान मिळते. एकदा हे समाधान लाभले की, काही भोगायची इच्छा बाकी रहात नाही आणि काही मागायचेही मनात येत नाही. अर्थात आत्मज्ञान झाल्यावर ही साधना चालूच रहायला हवी. अखंड आत्मानुसंधानाचा अभ्यास चालूच राहिला पाहिजे. ज्ञानप्राप्तीचे टप्पे श्रीसमर्थांनी फार छान समजाविले आहेत. मी खरा म्हणजे देहबुद्धी बळकट. देव खरा म्हणजे आत्मबुद्धीचा विचार. असा हा प्रवास असतो. हा प्रवास यशस्वी व्हायचा असेल तर तो शिष्य मुमुक्षु तसाच योग्य पहिजे.

“शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष । ५-३-२२ ।।”

तो अति धीर, अति तत्पर असलाच पाहिजे. श्रीसमर्थांनी बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध हे चार टप्पे सांगितले आहेत. आपण येथे बद्धाचा विचार करत नाही  आहोत. पण या बद्धाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग येतात की, त्याची प्रपंचाची झिंग एकदम नाहीशी होते. संसाराचा हव्यास त्याला नकोसा वाटू लागतो. अन मग त्या मनस्थितीला बद्धाचा मुमुक्षु बनतो. मुमुक्षुत्व येणे म्हणजे  बद्धाच्या जीवनात आलेला टर्निंग पॉइंटच असतो. आतापर्यंत केलेल्या सर्व गोष्टींचा त्याला पश्चाताप वाटू लागतो. अनुताप वाटू लागतो. उपरती निर्माण होते. जी वाल्या कोळ्याला झाली होती. आता काही पुण्य पदरी घ्यावे, सत्संग करावा, संतांना शरण जावे, असे त्याला मनापासून वाटू लागते. मोक्षाची इच्छा मनात बळावते. हीच मुमुक्षु अवस्था. परमार्थात टाकलेले पाऊल पुढेच पडते. भगवंताच्या  दिशेने तुम्ही एक पाऊल टाका, तो दहा पावलं तुमच्यासाठी पुढे चालत येईल असे संतसज्जन सांगतात. एकदा मुमुक्षत्व प्राप्त झाले की, हळूहळू त्याचा प्रवास साधकत्वा कडे होऊ लागतो. या दशकात हा पुढचा प्रवासही श्रीसमर्थ वर्णन करतात, 

“अवगुणाचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग ।

तयासी बोलिजे मग । साधक ऐसा ।। ५-९-२ ।।”

या साधकावस्थेतील साधनेने, हाच साधक पुढे  सिद्ध बनतो. परमार्थ मार्गातील हा अखेरचा टप्पा आहे.

“साधु वस्तु होऊन ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला ।

निश्चये चळेना ऐसा जाला । या नाव सिद्ध ।। ५-१०-१० ।।”

अत्यंत संशयरहित असे निश्चयात्मक आत्मज्ञान होणे, वासना संपूर्णपणे नाहीशा होणे व अत्यंत निर्भय होऊन स्वानंदात जगणे ही सिद्धाची लक्षणे त्याच्यात प्रकर्षाने दिसतात. ह्या दशकात  बद्ध ते सिद्ध हा अध्यात्म प्रवास फार सुलभतेने उलगडत जातो. त्या प्रवासाचे प्रत्ययकारी वर्णन करणारा हा दशक “चिंतामणी” म्हणून वाखाणला जातो. “मुक्तीचे सोहळे” हे प्राप्तव्य प्राप्त करून देणारा म्हणून तो  “चिंतामणी” आहे.

।। जय जय रघवीर समर्थ ।।

हे सप्तही येकरूप

नवविद्याभक्तींपैकी पादसेवनभक्ती श्रीसमर्थ स्पष्ट करीत आहेत. अध्यात्मशास्त्र हे अत्यंत गूढ आहे. परब्रह्म ही कल्पना अत्यंत सूक्ष्म आहे. ही कल्पना केवळ सद्‌गुरूच समजावून देतात. पूर्वसुकृतामुळे सद्‌गुरू प्राप्ती झाली की, काया, वाचा, मनाने सद्‌गुरूंची अनन्य भावाने सेवा करावी. पाद‌सेवन भक्तीत सेवा व शरणागती हे दोन भाव अनुस्यूत आहेत. ह्या भक्तीने खरे समाधान प्राप्त होते. या समाधानाच्या सात अवस्था वा सात संकेत श्रीसमर्थांनी येथे स्पष्ट केले आहेत. 

संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सह‌जस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरूप ।। ४-४-८ ।।

यांची नावे भिन्नभिन्न असली तरी वास्तवात या सातही अवस्था एकच आहेत असे श्रीसमर्थ समजावितात. 

१. संगत्याग – परमात्मवस्तू अत्यंत सूक्ष्म आहे. बुद्धी, मन आणि इंद्रिये दृश्यात वावरत असल्यामुळे आणि यांच्या द्वारा जीव या दृश्य जगाला चिकटत असल्यामुळे, ते संपूर्ण सुटल्याखेरीज म्हणजेच संगत्यागाखेरीज आत्म स्वरूपाचा अनुभव येत नाही. एक संगत्याग साधला की, पुढचे सहा आपोआप येऊ लागतात.

२. निवेदन – माणसाचा अहंकार किंवा मीपणा म्हणजे बुद्धी, मन आणि इंद्रिये यांचे जणू गाठोडेच आहे. या गाठोड्यात आत-बाहेर सारे अनात्म दृश्य भरलेले आहे. तो ‘मी’ नाहीसा केला की, दृश्याचा नायनाट होतो. त्या ‘मी’ ला भगवंताच्या चरणी अर्पण करणे म्हणजे निवेदन. या दृष्टीनेच संगत्याग व निवेदन एकच आहे.

३. विदेहस्थिती – सामान्य माणसाची सदेहस्थिती किंवा देहबुध्दी फार प्रबळ असते. मी म्हणजे माझा देह, ही त्याची ठाम समजूत असते. सर्व जगातील दृश्यांचे केंद्र असलेला आपला देह त्याला अत्यंत खरा वाटतो व तो आपल्या देहावर खूप प्रेम करतो. ही देहासक्ती पादसेवन भक्ती करताना, प्रेमभक्तीत रंगून जाताना कमी होऊ लागते. एकवेळ अशी येते की, देहभान पूर्णच हरपते, देहाचा विसर पडू लागतो. अशावेळी स्वाभाविकच देहाचे प्रेम कमी होते, आणि हळूहळू नाहीसे होते. ही अवस्था अशी की, देह असून नसल्यासारखाच. देहबंधशून्य अवस्था ! हीच विदेहस्थिती ! येथे संगत्याग नसतोच. म्हणजेच संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती एकच आहेत.

४. अलिप्तपणा – लिप्त म्हणजे लिंपणे, लेप देणे, माखणे किंवा व्यापणे. आपली मूळ अवस्था शुद्ध, पवित्र, पूर्ण आहे. मात्र अविद्येच्या प्रभावाने आपण ती मूळ स्थिती विसरतो. दृश्य विश्वाला खरे मानू लागतो. आपला जीव आत बाहेर दृश्याने व्यापला, माखला, दूषित झाला. दृश्य विश्वातच आपले सुख आहे, या भ्रमाने दृश्य वस्तू हव्याशा वाटू लागल्या. हे हवेसे वाटणे म्हणजेच वासना. खरं तर आपल्याला दृश्य वस्तू बाधक नसते, तर तिच्याबद्दलची वासनाच मन‌ाला बंधनात टाकते. पण भगवंताच्या भक्तीने रंगलेल्या भक्ताच्या मनात, भगवंताचे प्रेम एवढे ओथंबलेले असते की; तेथे वासनांना जागाच रहात नाही; त्या लटक्या पड‌तात. त्यांचा लेप जीवनाला होतच नाही. हेच अलिप्तपण. संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती, अलिप्तपणा ‌ह्या सर्व एकच स्थिती होत.

५. सहजस्थिती – ‘सह जात सहजम् ।’ आपल्या बरोबरच जन्मलेले किंवा जन्मजात प्राप्त झालेले. नुकतेच जन्मलेले मूल मला हे हवे ते हवे असे काहीही म्हणत नाही. किंवा सुख मिळविण्याचा किंवा दु:ख टाळण्याच्या प्रयत्न करीत नाही. त्या स्थितीला ते सहजतेने स्वीकारते. ही सहजस्थिती. हे दृश जगत् मूलत:च भ्रमरूप असल्याने ते सुखरूप नाही वा दु:खरूप नाही. त्याला, मन जाऊन चिकटते व ते सुखाची किंवा दु:खाची कल्पना करते. पण ते मन जेव्हा भगवंताकडे लागते, तेव्हा ते दृश्य विश्वापासून दूर होते व सुख-दु:खाची कल्पना सोडूनच देते. दृश्यात गुंतलेले मन दूर होणे म्हणजेच संगत्याग, निवेदन, अलिप्तपण, विदेहस्थिती व सहजस्थती होय.

६. उन्मनी अवस्था – उद् + मनस = उन्मन. उद = उर्ध्वगती, श्रेष्ठत्व, पूर्णता, विकासणे, मुक्त होणे. मनस् = मन. सामान्य माणसाचे मन जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थातच वावरते. पण तीन अवस्थांमध्ये ते दृश्याने भरलेलेच असते. जागेपणी इंद्रियांच्या माध्य‌मातून जे जग आत घेतलेले असते तेच जग स्वप्नात अवतरते. तेच गाढ निद्रेत तात्पुरते लीन होऊन रहाते. जेव्हा मन भक्तीरसात डुंबू लागते, तेव्हा बाहेरच्या दृश्य जगाचा भाव कमी होऊ लागतो. मन सूक्ष्म होऊ लागते. ही सूक्ष्मता वाढत जाऊन, एका विशिष्ठ स्थितीत; मी देह नसून आत्मा आहे अशी प्रचिती येते. मनाची ही जी अवस्था तिला तुर्या (चौथी) अवस्था म्हणतात. ही जागृती, स्वप्न, सुषुप्ती पलीकडची अवस्था असते. यात एकीकडे स्वस्वरूपाचे भान असते, तर दुसरीकडे दृश्य जगाचे भान असते. मनाचा आणखी विकास झाल्यावर स्व-स्वरूपाला मीपणाने अनुभवणारा शुध्द मी सुद्धा लीन होऊन जातो. केवळ परमात्म स्वरूप उरते. येथे मनाचे ‘मीपण’ संपते. हीच उन्मनी अवस्था. या स्थितीत संपूर्ण विश्वच ईश्वररूप दिसू लागल्यामुळे, दृश्य विश्वाचा विलय होतो. म्हणून संगत्याग व सहजस्थिती ह्या एकच अवस्था.

७. विज्ञान – वि = विशेष आणि ज्ञा = जाणणे. विज्ञान = विशेष ज्ञान. परमात्म स्वरूपाचे अनुभवसिद्ध ज्ञान म्हणजेच विज्ञान. परमात्म स्वरूप अत्यंत सूक्ष्म असते. याला स्थूळ वा दृश्य स्पर्श करू शकत नाही. जोपर्यंत  जीव दृश्य जगताला चिकटलेला असतो तोपर्यंत तो परमात्मतत्त्वाला स्पर्श करु शकत नाही. दृश्याचा संपूर्ण त्याग = संगत्याग. संगत्याग व विज्ञान एकदमच प्रकट होतात. संगत्याग, निवेदन, विदेहस्थिती, सहजस्थिती, अलिप्तपण, उन्मनी अवस्था, विज्ञान या सातही अवस्था नावांनी भिन्न असल्या तरी आंतरिक अनुभूतीने त्या एकच आहेत. “सद्‌गुरू वाचोनी सापडेना सोय । धरावे ते पाय आधी आधी ।।” हा विचार पादसे‌वन भक्तीचा आत्मा आहे.

सद्गुरू सेवाच साधकाला अंतर्बाह्य बदलवीत असते. सद्गुरू शिष्याकडून योग्य ते कार्य करवून घेतात. त्याला निरहंकारी बनवितात. सद्‌गुरूंचा सहवास शिष्याला त्याच्या नकळत घडवीत असतो. त्याला आत्मचिंतनाची सवय लावुन, शिष्य नम्रतेकडे, विनयाकडे, लीनतेकडे  झुकू लागतो. मुख्य म्हणजे त्याच्या अहंकाराच्या नाशाला सुरुवात होते. उपरम, उपरति, चुकांची कबुली देण्याचे धाडस त्याच्यात येते. माझेच बरोबर ही वृत्ती नाहीशी होते. अर्थात त्यासाठी गुरूनिष्ठा, सत्यवचन, गुरूप्रीती वा गुरूबद्दलचा अनन्य भाव यासाठी अथक प्रयत्न करावे लागतात. सद्‌गुरूचा प्रसाद (कृपा) लाभला की, मग मात्र सद्गुरू त्याला परब्रह्मच बनवितात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायातील पुरुषोत्तम आणि श्रीसमर्थांचा उत्तमपुरुष

गीता सुगीता कर्तव्या किमन्यै: शास्त्रविस्तरै: ‌|

या स्वयं पद्मनाभस्य मुख्यपद्मादि्वनि:सृता |‌| ४‌ ||

पुण्यपावनी भगवद्गीतेची महानता यथार्थतेने व्यक्त करणारा हा श्लोक आहे. भगवद्गीता हे वेदांचं सार. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून हे सार बाहेर पडलेलं आहे. त्यातही पंधरावा अध्याय हे “गुह्यतम्” शास्त्र असल्याची ग्वाही भगवंत स्वत:च देत आहेत. हे जाणणारा बुध्दिमंत “कृतार्थ, कृतकृत्य” व्हावा ही अपेक्षाही व्यक्त झाली आहे. हा पंधरावा अध्याय “पुरुषोत्तम योगा”चा आहे.

“पुरुषोत्तम योग” हा अत्यंत व्यापक विचार आहे. “पुरुषोत्तम” म्हणजे सच्चिदानंदरुप, सर्वव्यापक, अनादि, अनंत, शाश्वत परमतत्व/परब्रम्ह/सद्वस्तू. “योग” म्हणजे जोडणे. मीलन, एकरुपत्व. (युज् – युज्यते = जोडला जाणे). म्हणून “पुरुषोत्तम योग” म्हणजे त्या परब्रम्हाशी मीलन, जीव-शिव ऐक्य, एकरुपता ! जीव हा मुळात शिवरूपच आहे, पण अज्ञानाचे आवरण आल्याने तो “स्वरुप” विसरला आहे. हया स्वरुपाची जाण होण्यासाठी कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे “रहस्य” भगवंतांनी विशद केले आहे, म्हणून हे रहस्य जाणून घ्यायला हवेच.

“ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।

छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ।। १५-१ ।।”

पहिल्या तीन श्लोकांत संसारवृक्षाचे सुंदर रुपक मांडून, जन्ममृत्यूच्या चक्रात जीव कसा गुरफटतो तो विचार सांगितला आहे. हया दृश्य विश्वरुप अश्वत्थ वृक्षाचे मूळ वर (दृश्याच्या पल्याड) अन् फांद्या खाली पसरलेल्या आहेत. रसमय वेद ही त्याची पाने अन् त्रिगुणात्मक विषयरुप ही त्याची कोवळी पालवी ! हया संसाररुप अश्वत्थाच्या रमणीयतेला भुललेले जीव तेथेच रममाण होतात आणि आपल्या कर्मांनी कर्मबंधनात पुन्हा पुन्हा अडकत जातात. ज्यांना ह्यातून स्वत:ची सुटका करुन घ्यायची आहे, मुक्त व्हायचं आहे त्यांना भगवंतांनी सुटकेचा उपायही सांगितला आहे. “असंगरुप शस्त्राने दृढतापूर्वक हा वृक्ष तोडून टाका!” 

असंगता (निरासक्तता) :- संग दोन प्रकारचा असतो. (१) बाहेरचा, (२) आतला. सारे जीव पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने शब्द, स्पर्श, रुप, रस गंधादिंचे सेवन करीत असतात. सर्व जीवांची ओढ सुखाकडे असते. जोपर्यंत देहबुध्दी आहे तोपर्यंत हया बाहयसुखांना तो खरी सुखे मानतो व त्यातच रममाण होतो. पण परमभाग्याने सदगुरुंची भेट झाली तर हया साऱ्या सुखांचे क्षणिकत्व त्याला समजते. त्याचे देहभान गुरुंनी दिलेल्या ज्ञानाने संपते व आत्मभान जागे होते आणि “अर्थ व कामा”तच गढलेला तो बाहयसंग सोडून अंतर्मुख होतो.

बाहयसंगाप्रमाणेच जीवाला बांधून ठेवणारा आतला संग असतो आसक्तींचा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्ररिपू सारखे त्याच्या अंत:करणावर आघात करत  रहातात. “रात्रंदिन हा युध्दाचा प्रसंग” चालूच असतो. विविध ईषणा त्याच्या चित्ताचा ताबा घेत असतात. वित्तेषणा, कामेषणा… कनक, कांता व कीर्ती, हया “क”कारांच्या संगाच्या मगरमिठीमधून सुटका होते, तीही गुरुपदेशातूनच. बाहय अंत:संगातून मुक्त झालेला जीव मग नि:संग होतो, निर्मोही होतो. त्याच्या साऱ्या कामभावना निवृत्त होतात. त्याचे अंत:करण निर्मळ बनते व ते आत्मतत्वाला सन्मुख होते.

निर्द्वंद्वत्व :- जीवाचं ओढाळ मन सतत इंद्रियसुखांकडे त्याला खेचत रहातं. त्यामुळे अनुकूल संवेदनेने ते सुखावतं अन् प्रतिकूल संवेदनेने ते दुखावतं. सुख-दु:ख, आशा-निराशा, मान-अपमान, लाभ-हानी, जय-पराजय हया परस्परविरोधी भावनांच्या हिंदोळयावर हिंदोळत रहातं. हया द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी चित्ताला स्थिर करणारी बुध्दी, व्यावसायात्मिका बुध्दी, ऋतंभरा प्रज्ञा वाढीस लावावी लागते. येथेही सद्गुरुंनी दाखविलेली भक्तीची शक्तीच उपयोगी पडते. कर्माला भक्तीची जोड देऊन समर्पणवृत्तीने प्रज्ञा “स्थिर”, “प्रतिष्ठित” केली की इंद्रियांची धाव संपते, भावनांचे आंदोलन थंडावते व वृत्तीला स्थिरता येते. सद्गुरुकृपेने अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. ज्ञानचक्षू उन्मिलीत होतात.

“अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांञ्जजनशलाकया |

चक्षुरुन्मीलितं येनतस्मै श्रीगुरवे नम: ||”

सद्गुरुकृपेने कर्माला भक्तीची, उपासनेची जोड मिळाली की त्या भक्तियुक्त कर्मातूनच आत्मज्ञान प्राप्त हाते. 

“आधी तें करावें कर्म | कर्मामार्गें उपासना |

उपासकां सांपडे ज्ञान | ज्ञानें मोक्षचि पावणें  ||”

असा ज्ञानी उपासक ज्या “अव्ययपदाकडे” जाऊ पाहतो त्या अव्ययपदाचे वर्णन भगवंतांनी खालील श्लोकातून प्रत्ययकारकतेने वर्णिले आहे.

“न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।

यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।। १५-६ ।।”

ज्ञानी भक्ताला जी अनुभूती येते ती भगवंतांनी पुढे विशद केली आहे. 

“सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।

वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५-१५ ॥”

“जें जें भेटिजे भूत | तें तें मानिजे भगवंत” हाच भगवंतांच्या सांगण्याचा भावार्थ ! असा “विश्वात्मक देव” पाहणारा ज्ञानी भक्त क्षर व अक्षर यांना यथार्थतेने जाणतो.

“द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च |

क्षर: सर्वाणि भूतानि कूटस्थोsक्षर उच्यते || १५-१६ ||”

भगवान स्पष्ट करतात की, या जगात दोन प्रकारचे पुरुष आहेत. नाशवंत (क्षर) व अविनाशी (अक्षर). सर्व नाशवंत जगत् म्हणजे क्षर आणि नाशवंत देहातील जीवात्मे हे अक्षर होत. हया क्षर-अक्षराच्या पलीकडे आहे तो उत्तम पुरुष अर्थात् “पुरुषोत्तम”! अनादी, अनंत, अविनाशी, शाश्वत, सच्चिदानंदरुप पुरुषोत्तम!

असंगत्व निर्द्वंद्वत्व प्राप्त केलेला असा ज्ञानी भक्तच जीवनाचे कर्म पार पाडतच “पुरुषोत्तमाशी” “योग” साधतो, एकरुप होतो. हया एकरुपत्वामुळे ‘पुरुषोत्तमाचे दिव्यत्व’ त्याच्यात संक्रमित होते. तो स्वत:च पुरुषोत्तम होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देव पहाया गेलो | तो देवचि होऊनि ठेलो ||”

भगवदगीतेतला पुरुषोत्तम सर्वव्यापक आहे, सत्‍चिदानंदरुप; अविनाशी; अनादी; अनंत आहे. तो दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे. तो निर्गुण निराकारी आहे. तो दृश्य विश्वाचा उत्पत्तीकर्ता, स्थितीकर्ता व लयकर्ताही आहे. तो चक्षुगोचर नाही. चर्मचक्षूंना दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी ज्ञानचक्षूंचीच गरज असते.

पुरुषोत्तमातील दिव्यत्व प्राप्त केलेला समर्थांचा उत्तमपुरुष मात्र चक्षुगोचर आहे. तो भूलोकावरच राहतो. सर्वांमधलाच एक असतो. सर्व पुरुषांतलाच एक असतो. पण आपल्यातल्या गुणांनी तो “उत्तम पुरुष” म्हणून मान्यता पावलेला असतो.

थोडक्यात सांगायचे तर, विश्वव्यापक ईश्वराचे – परब्रम्हाचे निर्गुण निराकार रुप म्हणजे “पुरुषोत्तम”, तर त्याचे सगुण साकार मानवी रुप म्हणजे “उत्तम पुरुष”. विश्वातील कोणत्याही पुरुषाला “उत्तम पुरुष” होणे शक्य आहे. ते कष्टसाध्य जरुर आहे, पण असाध्य मात्र नाही. पुरुषाचा “उत्तम पुरुष” कसा होऊ शकतो हयाचे प्रत्ययकारी वर्णन श्रीसमर्थांनी दासबोधात केले आहे.

“पुनरपि जननं पुनरपि मरणं” हया जन्ममरणाच्या अखंड चक्रात जीव गरगरत असतो. अशा चक्रगतीत नरदेहप्राप्ती हा अद्भूत टप्पा आहे. नरदेहप्राप्ती दुर्लभ खरीच, पण या नरदेहात आल्यावर जीवापुढे दोन वाटा असतात. १) ईशमार्ग व २) असुरमार्ग. ईश मार्गाने गेल्यास तो नराचा “नारायण” होतो. पण दुसऱ्या मार्गाने गेल्यास तो नराचा “नराधम” होतो. कोणत्या मार्गाने जायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य नराला आहे. जो ईशमार्गाने जातो तो उत्तम पुरुष होय. उत्तम पुरुषात पुरुषोत्तमाचे सर्व गुण दिसून येतात.

श्रीसमर्थ व श्रीहनुमंत ह्यांच्यातील भावबंध भाग दुसरा

आपल्या देशाटणाच्या काळात श्रीसमर्थांनी तत्कालीन समाजस्थितीचे सूक्ष्म अवलोकन केले होते. अस्मानी सुलतानी संकटाने पिचलेली, मदांध सत्तेच्या अन्यायाखाली भरडली जाणारी मराठी जनता पहाताना त्यांचं काळीज पिळवटून गेलं होतं. हया समाजाला धीर देऊन संघटित करण्याची नितांत गरज होती. म्हणूनच “धीर्धरा धीर्धरा तकवा | हडबडूं गडबडू नका” असे समजावीत “वन्ही तो चेतवावा रे | चेतविताचि चेततो” हया धारणेने श्रीसमर्थांनी लोक जागरणाची मशाल हाती घेतली. श्रीसमर्थांनी संघटनेचे कौशल्य आपल्या आराध्याच्या अर्थात श्रीरामचंद्रांच्या चरित्रातून घेतले व तेच पराक्रमाचे, आत्मविश्वासाचे स्फुलिंग समाजात जागविण्यासाठी त्या कोदंडधारी श्रीरामांचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला. चळवळीचे सामर्थ्य पटवून दिले. 

“सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें ||

परंतु येथें भगवंतांचे | अधिष्ठान पाहिजे ||”

हया दृढ धारणेनेच त्यांनी रामकथा “ब्रम्हांड भेदून पैल” नेण्याचा अखंड प्रयास केला. हया साऱ्या प्रयासात त्यांचा “कैवारी” होता श्रीहनुमंत. श्रीरामांचा अनन्य दूत.

“मनोजवं मारुततुल्यवेगं | जितेंद्रियं बुध्दिमतां वरिष्ठम् |

वातात्मजं वानरयूथमुख्यं | श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ||”

शक्ती, बुध्दी, युक्ति, त्याग, सेवा, श्रध्दा, साहस व निष्काम कर्मयोग अशा  अपूर्व गुणसमुच्चय असलेल्या श्रीहनुमंताचा आदर्श समोर ठेवून श्रीसमर्थ कार्य करीत होते. श्रीहनुमंतासारखेच सर्वांनी बलसंपन्न व्हावे म्हणून त्यांनी ठिकठिकाणी मारुती मंदिरे उभारली. अकराशे मठ व त्यावर अकराशे मठपतींची नियुक्ती केली. श्रीहनुमंताचाच धूर्तपणा व मुत्सददीपणा दाखवीत त्यांनी शिवाजीराजांना मदत केली. आपल्या शिष्यांच्या माध्यमांतून त्यांनी मोगल सत्ताधीशांच्या हालचालींच्या बित्तंबातम्या काढल्या, त्या गुप्त राखून शिवाजीराजांपर्यंत पोहोचविल्या. योग्य ती सल्लामसलतही केली. “राजकारण बहुत करावें | परंतु कळोंच नेदावें ||” इतक्या सावधपणे वागून त्यांनी संपूर्ण देशभर आपलं “नेटवर्क” उभारलं होतं.

परमप्रतापी, महाबली असूनही आपल्या बळाचा अहंकार श्रीहनुमंतांनी कधी केली नाही. तसेच सर्व सिध्दी प्राप्त असूनही त्या शक्तींचा उपयोग श्रीसमर्थांनी लोक कल्याणासाठीच केला. श्रीहनुमंताचा पराक्रम व दास्यभावाचं प्रतिक म्हणून श्रीसमर्थांनी “दासमारुती” व “वीरमारुती” अशा दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे. गुरुपदाधिष्ठित होऊनही मारुतरायांसारखंच आपलं दास्यत्व श्रीसमर्थांनी कधीही सोडलं नाही. ते स्वत:ला “रामदास” म्हणवत व श्रीरामचंद्रांना “समर्थ” म्हणत.

आमचे कुळीं रघुनाथ | रघुनाथें आमुचा परमार्थ ||

जो समर्थांचाहि समर्थ  |  देवां सोडविता || दा. ६-७-२१||

  रघुनाथभजनें ज्ञान जालें  | रघुनाथभजनें  महत्व वाढलें | ६-७-३१||” 

हे रामभक्तीचे बळ  श्रीहनुमंतांनी दिले. म्हणून श्रीसमर्थ कृतज्ञतेने  म्हणतात, –

“हनुमंत आमुची कुळवल्ली | राममंडपा वेला गेली |

श्रीराम भक्तीने फळली  |  रामदास बोले या नांवे ||

आमुचे कुळीं  हनुमंत | हनुमंत आमुचे मुख्य दैवत |

तयावीण आमुचा परमार्थ | सिध्दीतें  न पवे सर्वथा ||

साहय आम्हांसी हनुमंत | आराध्य दैवत श्रीरघुनाथ |”

श्रीसमर्थांना, श्रीहनुमंताचे अनेक प्रसंगी साहय झाल्याचे दाखले मिळतात. कोणताही कठीण प्रसंग येवो, श्रीहनुमंत तेथे तत्परतेने हजर होत. बेदरला श्रीसमर्थ शिष्यांचे संरक्षण करण्यासाठी ते लगेच आले. पाडळी गावच्या मुस्लिम अंमलदाराला अददल घडविण्यासाठी त्यांनी गावालाच आग लावली. नंतर श्रीसमर्थांच्या विनंतीवरुन ती विझवलीही.

मसूरच्या पश्चिमेस चार मैलांवर उंब्रज गाव आहे. इथे श्रीसमर्थ चाफळ मुक्कामी असले की स्नानास जात. एकदा स्नान करतांना ते “बुडालो बुडालो” असे ओरडले. शिष्य मदतीला येण्यापूर्वीच मारुतीरायांनी खडकावरुन नदीपात्रात उडी मारली व श्रीसमर्थांना बाहेर काढले. एवढी त्यांची तत्परता असे. श्रीसमर्थ म्हणत,

बलभीम माझा सखा सहोदर | निवारी दुस्तर  तापत्रय |

ठेवा संचिताचा मम उघडला | कैवारी जोडला हनुमंत |

हनुमंत माझे अंगीचें कवच | मग भय कैचें दास म्हणे |

रामरायाला नैवेद्य अर्पण केल्या खेरीज श्रीसमर्थ अन्नग्रहण करीत नसत. कधी कधी त्यांचा सखा सहोदर श्रीहनुमंत त्यांच्या समवेत प्रसाद भोजन घ्यायला हजर असे. श्हापूरच्या सतीबाईंना हयाची प्रचिती आली होती. वामन पंडितांना देखील श्रीसमर्थांच्या जागीच श्रीहनुमंताचे दर्शन घडले होते.

श्रीहनुमंत हे अकरावे रुद्र आहेत. म्हणून अकरा हा आकडा श्रीसमर्थांचाही आवडता आहे. श्रीसमर्थांनी स्वत:चे शिक्षण फारच झटपट उरकले याबददल गिरीधरस्वामी म्हणत,

“समर्थें अकरा घडयात केले धूळाक्षर |

अकरा प्रहरात वळिले अक्षर |

अकरा दिवसे केला जमाखर्च सुंदर |

ब्रम्हांड कुलकर्ण चालवावया ||”

श्रीसमर्थांनी देशभरात अकराशे मठांची स्थापना करुन त्यानंतर अकराशे महंतांची निवड केली होती. त्यांनी ठिकठिकाणी मारुतरायाची मंदिरे स्थापन केली पण त्यातील अकरा मारुती विशेष प्रसिध्द आहेत. मिरजच्या मठपती श्रीसमर्थ शिष्या वेणास्वामी हयांनी अकरा मारुतींना एका अभंगात गुंफून त्यांना शब्दमाला अर्पण केली आहे त्या म्हणतात,

“चाफळामाजी दोन उंब्रजेसी एक |

पारगांवी देख चौथा तो हा ||१||

पांचवा मसुरी, शहापुरी सहावा |

जाण तो सातवा शिराळयांत ||२||

सिंगणवाडी आठवा मनपाडळे नववा |

दहावा जाणावा माजगावी ||३||

बाहयांत अकरावा येणे रीती गावा |

सर्व मनोरथा पुरवील ||४||

वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास |

कीर्ती गगनात न समावे ||५||” 

श्रीसमर्थांनी श्रीहनुमंताची जी स्तुती स्तोत्रे रचली आहेत ती जवळजवळ पंचवीस आहेत पण त्यातील अकरा स्तोत्रे विशेष प्रसिध्द आहेत.

त्यातील “फणिवर उठविला” हया स्तोत्रात श्रीसमर्थ श्रीहनुमंतास आर्ततेने म्हणतात –

“तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे |

म्हणउनि मन माझें रे तुझी वा पाहे |

मज तुज निरविलें पाहिजे आठवीलें |

सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें ||”

श्रीसमर्थ आणि श्रीहनुमंत हयांच्यातील भावबंध असे गहिरे आहेत. दृढ भावभक्तीने भारावलेले आहेत.

नुकतीच एक लौकिक कथा ऐकायला मिळाली. श्रीसमर्थांनी भीमरुपी महारुद्रा हे सुप्रसिध्द स्तोत्र रचण्यास सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष श्रीहनुमंत समोर प्रकट झाले. जसजशी स्तोत्ररचना होत होती तसतसे श्रीहनुमंत श्रीसमर्थांच्या निकट येत होते व स्तोत्र समाप्त होते वेळी ते श्रीसमर्थांच्या देहात लुप्त झाले.

हया लौकिक कथेत सत्यांश किती हा मत मतांतराचा भाग असू शकतो पण श्रीहनुमंत व श्रीसमर्थ हयांच्यात किती अद्वैत होतं किंवा उत्कट भावबंध होता हे मात्र हया कथेतून अधोरेखित होतेच होते!

|| जय जय रघुवीर समर्थ ||

श्रीसमर्थ व श्रीहनुमंत ह्यांच्यातील भावबंध भाग पहिला

 धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार |

जाले आहेत पुढें होणार | देणें ईश्वराचें ||

श्रीसमर्थांच्या जीवनात ह्या उक्तीची सत्यता शतप्रतिशत पटते. मराठवाड्यातील जांब ह्या छोट्याशा खेड्यात रहाणाऱ्या, गावच्या कुलकर्णीपणाचे वेतन सांभाळणाऱ्या, अतिशय भाविक वृत्तीच्या सूर्याजीपंत ठोसर व त्यांच्या पत्नी राणूबाई यांचे दुसरे अपत्य ‘नारायण’ म्हणजेच आपले सदगुरु श्रीसमर्थ रामदासस्वामी होत. त्यांच्या घराण्यात २४ पिढयांपासुन सूर्योपासना व श्रीरामोपासना केली जात होती. अशा पवित्र, तपस्वी घराण्यातच असे थोर महात्मे जन्माला येतात. म्हणूनच म्हणतात “शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी”!

चैत्र शुध्दनवमी, श्रीरामजन्मोत्सवाच्या वेळेचा मुहूर्त साधून श्रीरामरायाच्या या शिष्योत्तमाने भूतलावर जन्म घेतला. सूर्याजीपंतांना त्याच्या जन्माचा संकेत आधीच मिळाला होता. सूर्याजीपंतांच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेल्या सूर्यनारायणाने त्यांना वर दिला होता, मदंशे करुन व मारुति अंशेकरुन असे दोन महान भगवत्भक्त पुत्र होतील. प्रथम पुत्र गंगाधर तीन वर्षापूर्वी लाभला होता आणि आता मारुतीचा अवतार असलेल्या ‍व्दितीय पुत्राने श्रीरामजन्माचाच मुहूर्त साधला होता. सूर्याजीपंतांचं जीवन सुफळ झालं होतं. कृतार्थ बनलं होतं. श्रीसमर्थ मारुतीचेच अवतार आहेत असे म्हणायला सबळ पुरावे आहेत. मारुतीरायांची युगायुगांची परंपरा सांगणारा एक सुंदर श्लोक भविष्योत्तर पुराणात आहे.

कृतेतु मारुताख्यश्च त्रेतायां पवनात्मज |

द्वापारे भीमसंज्ञश्च रामदासे कलौयुगे ||

समर्थप्रताप, दासविश्रामधाम व बखरीत हीच विचारधारा दृढतेने मांडली गेली आहे. बालपणीचा चंचल व हूड स्वभाव, फळफळावळीची विशेष आवड, अंगी वैराग्यचिन्हे ही सारी मारुतीची लक्षणे त्यांच्या ठायी एकवटली होती. दोघांचं आराध्यदैवत एकच श्रीरामचंद्र!

श्रीहनुमंत व श्रीसमर्थ यांच्यातील हा भावबंध. श्रीसमर्थांना अगदी लहानपणीच एका अदभुत प्रसंगातून तो  जाणवला. एकदा सूर्याजीपंत श्रीसमर्थांना म्हणजेच नारायणाला घेऊन नदीवर स्नानासाठी गेले होते, तेव्हा एक वानर दूत वेषाने तेथे आले व नारायणास घेऊन गावाबाहेर गेले. तेथे श्रीरामचंद्र व सीतामाई एका पालखीत बसले होते. श्रीरामांनी नारायणाला जवळ बोलाविले. त्याला “अहं ब्रम्हास्मि” हया महावाक्याचा उपदेश केला. श्रीहनुमंताकडे वळून श्रीरामचंद्र म्हणाले, “हनुमंता, यापुढे याला व याच्या परंपरेला सर्वस्वी सांभाळावे” अशी आज्ञा करुन नारायणाला श्रीहनुमंताच्या स्वाधीन करुन श्रीरामचंद्र व माता सीता अंतर्धान पावले. त्या क्षणापासून श्रीहनुमंतांनी नारायणावर आपले कृपाछत्र धरले. ह्याचे सुंदर वर्णन करतांना दिनकरस्वामी म्हणतात, महावाक्य उपदेशूनि त्वरित | हनुमंतासि निरविले || निरवणे म्हणजे एखाद्यावर जबाबदारी सोपविणे.

श्रीसमर्थ व श्रीहनुमंत हयांच्यातील भावबंध स्पष्ट करणारी दुसरी कथाही  सांगितली जाते –

नारायणाचा उपनयन संस्कार झाल्यावर त्याला श्रीरामाचा अनुग्रह घ्यायची ओढ लागली. त्याने वडिल बंधूंना अनुग्रह देण्याबद्दल विनवले पण त्यांनी “तू अजून लहान आहेस, अंमळ धीर धरावा” असा सबुरीचा सल्ला दिला. परंतु नारायणाच्या मनातील रामदर्शनाची उत्कट इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. अखेरीस गांवाबाहेरच्या मारुती मंदिरात त्याने आसन मांडले. तीन दिवस तीन रात्री त्याने श्रीहनुमंताचा धावा केला. अखेर श्रीहनुमंत प्रकट झाले. त्यांनी “काय हवे?” विचारल्यावर श्रीरामप्रभूंच्या दर्शनाची उत्कट इच्छा असल्याचे त्याने सांगितले. श्रीहनुमंतांनी श्रीरामचंद्रांची प्रार्थना केली श्रीरामचंद्र प्रकट झाले व “कशास ध्यान केले?’’ असे श्रीहनुमंतांना विचारल्यावर श्रीहनुमंत म्हणाले, “मदंशेकरुन धर्मस्थापनेसाठी ह्या नारायणास आपण निर्माण केले आहे. तरी आता यास अनुग्रह द्यावा.” श्रीरामचंद्रांनी नारायणास मंत्रोपदेश दिला. पूजेसाठी बाण, जपासाठी माळ, हुर्मुजी रंगाचे वस्त्र, व त्रयोदशाक्षरी मंत्र दिला, व “कलिच्या प्रथम चरणात म्लेच्छांचे वर्चस्व सुरु होईल तेव्हा कृष्णातीरी राहून सांब अंशेकरुन उत्पन्न झालेल्या शिवनाम राजास मंत्रोपदेश द्यावा व धर्मस्थापनेसाठी सहाय्य करावे”, अशी कार्याची रुपरेषाही सांगितली. नारायणास “रामदास” हे नाव देऊन त्याला श्रीहनुमंताच्या स्वाधीन करुन श्रीरामचंद्र अंतर्धान पावले.  त्याक्षणापासून श्रीहनुमंत व श्रीसमर्थ ह्यांच्यात अतूट भावबंध निर्माण झाले.

स्वधामासी जाता महारामराजा |

हनुमंत तो ठेविला याची काजा |

सदा सर्वदा रामदासासी पावे |

खळी गांजिता ध्यान सांडुनी धावे ||

याचा प्रत्यय श्रीसमर्थचरित्रात पुन:पुन्हा आलेला आहे. “आई, चिंता करितो विश्वाची” असे उद्गार बालपणीच आईसमोर काढलेल्या लहान नारायणाला संसार- प्रपंच ह्याबद्दल ओढ नव्हतीच. केवळ आईच्या आग्रहाखातर “बोहोल्यावर चढेन” असे अभिवचन त्याने आईस दिले आणि ते पाळलेही! भटजींचा “शुभ मंगल  साsवधान” हा उच्चारवाने म्हटलेला मंत्र नारायणाच्या कानांत शिरला मात्र, त्याने लग्नमंडपाबाहेर धांव घेतली. कुणाच्या हाती पडू नये म्हणून एका उंच वृक्षावर चढून तीन दिवस तीन रात्री तो तिथेच बसून होता. चौथ्या दिवशी रामरायाने आपल्या वास्तव्याने पावन केलेल्या पंचवटी क्षेत्राकडे जाण्यास  तो निघाला. छोटा जीव दमायचा. त्यावेळी वेष पालटून मारुतीरायाने खायला आणून द्यावे. धीर द्यावा. नारायण नाशिकला पोहोचला. रामरायाचे दर्शन घेतले अन गावापासून थोडे दूर गोदावरी-नंदिनीच्या संगमाजवळ असलेल्या टाकळीतील एक गुंफा त्याला पसंत पडली. गोदावरी-नंदिनीच्या संगमात उभे राहून तेरा कोटी रामनामजप व गायत्री पुरश्चरण करायचे त्याने निश्चित केले.

उपासनेचा मोठा आश्रयो | उपासनेविण निराश्रयो |

उदंड केलें तरी जयो | प्राप्त नाहीं ||

टाकळीला राहून नारायणाने बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. ह्या संपूर्ण काळात वानररुपात उपस्थित राहून मारुतीरायाने त्याची सर्वतोपरी काळजी घेतली असे उल्लेख आहेत.

दशकपंचकच्या कुलकर्ण्यांचे प्रेत उठवून, त्यांना रामरायाच्या कृपेने जे नवजीवन नारायणाने मिळवून दिले, या चमत्कारानंतर लोक त्यांना कमालीच्या आदराने वागवीत. ते त्यांना “समर्थ” म्हणू लागले. कुलकर्णी दाम्पत्याने आपला पहिला पुत्र श्रीसमर्थांच्या चरणावर ठेवला.  श्रीसमर्थांना लाभलेला हा पहिला शिष्य उध्दव आणि त्याच्यासाठीच स्वहस्ते गोमयाने बनविलेला “प्रताप मारुती” हा श्रीसमर्थांनी स्थापन केलेला पहिला मारुती. इथे स्थापलेला मठ हा पहिला मठ व पहिला मठपती उध्दव. “टाकळी” ही श्रीसमर्थांची तपोभूमी तर आहेच पण त्यांच्या कार्याची मुहूर्तमेढही इथल्या पहिल्या मठाने झाली. म्हणून टाकळी हे साऱ्या समर्थभक्तांचं पावन स्थान!

बारा वर्षांचे तप, पुरश्चरण पूर्ण करुन उध्दवास टाकळीला ठेवून श्रीसमर्थ भारत भ्रमणास निघाले. हृदयस्थ श्रीहनुमंत होतेच, मनात उदंड श्रध्दा होती.

नांव मारुतीचे घ्यावे | पुढे पाऊल टाकावे ||१||

अवघा मुहूर्त शकून | हृदयी मारुतीचे ध्यान ||२||

जिकडे तिकडे भक्त | पाठी जाय हनुमंत ||३||

राम उपासना करी | मारुती नांदे त्याचे घरी ||४||

दास म्हणे ऐसे करा | सदा मारुती हृदयी धरा ||५||

भारत भ्रमण करीत श्रीसमर्थ काशीस विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेले. पुजाऱ्याने आत जाण्यास मज्जाव केला. श्रीसमर्थ परत फिरले. इकडे पुजाऱ्याला महादेवाची पिंडीच दिसेना. महादेवांचा आदेश झाला, “तू ज्याला परत पाठविलेस तो मारुतीचा अवतार आहे. त्यास शरण जा”.  पुजारी धांवत आला त्याने श्रीसमर्थांचे पाय धरले. त्यांना आदराने मंदिरात आणले. त्यांचा अनुग्रह घेतला. काशीच्या हनुमंत घाटावर श्रीसमर्थांनी श्रीहनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली. श्रीसमर्थ हिमालयात आले. ब्रदीनारायण, बद्रिकेदार दर्शनानंतर ते तेथील श्वेत-मारुतीच्या दर्शनाला गेले. श्रीसमर्थांना हिमालयातल्या थंडीवाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून श्रीहनुमंतांनी त्यांना वल्कले, टोप, मेखला, कुबडी, जपमाळ इ. वस्तू दिल्या. ते दक्षिणेकडे रामेश्वराच्या दर्शनाला गेले तेव्हा चिरंजीव मारुतीराय त्यांना घेऊन लंकेस चिरंजीव बिभीषणाच्या भेटीला घेऊन गेले. आपल्याकडे सप्त चिरंजीव प्रसिध्द आहेत. 

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः |

कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीविन: ||

चिरंजीव बिभीषणाने दोघांचे उत्तम स्वागत केले. रामभक्तांचे असे त्रिकुट जमले अन त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तीर्थाटन पूर्ण झाले. श्रीसमर्थांनी तीर्थाटनाचा सर्व वृत्तांन्त श्रीरामरायांना सादर केला. तीर्थाटनाचे पुण्य श्रीरामचरणी अर्पण केले आणि श्रीरामरायाच्या आज्ञेनुसार ते कृष्णातीरी अर्थात आपल्या कर्मभूमीकडे निघाले.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language