समर्थ रामदासांच्या करुणाष्टकांची वैशिष्ट्ये

परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी केलेला धावा म्हणजे करुणाष्टके. ‘धावा’ या शब्दावरून गजेंद्राचा, द्रौपदीचा, संकटमुक्त करण्यासाठी केलेला धावा आठवतो. आद्य शंकराचार्यांची अष्टके आठ श्लोकांचीच आहेत, पण समर्थांची काही अष्टके आठ श्लोकांची आहेत, तर काही नाहीत. समर्थांची करुणाष्टके म्हणजे भगवंताची करुणा भाकण्याकरिता रचलेली आर्त गीते आहेत. समर्थांच्या काही करुणाष्टकांत चौथ्या चरणाची पुनरावृत्ती आहे. ही चरणे मनावर आघात करतात व तो विचार मनावर कायमचा कोरला जातो. ‘बुद्धी दे रघुनायका’ हा चरण एक नाद, लय, निर्माण करतो. समर्थांच्या करुणाष्टकातील भाव, भावना, निराशा, अगतिकता व्यक्तीनिष्ठ नाहीत तर त्या व्यापक समाजमनाच्या आहेत. ‘प्रपंचसंगे आयुष्य गेले’, ‘सदृढ जाली देहेबुधि देहीं’ हा समर्थांचा वैयक्तिक प्रश्न नाही, तर तो जनमानसाचा प्रश्न आहे. तो त्यावेळी होता व आजही आपण तो अनुभवतो आहे.

समर्थांच्या करुणाष्टकांची निर्मिती दु:खातून झाली. जन्म हाच दु:खमूळ. मीपणाच्या जाणिवेचे दु:ख, त्रिविध तापांचे दु:ख, देहाच्या व्याधींचे दु:ख, साधकावस्थेतील दु:ख, अज्ञानाचे दु:ख, विरहाचे दु:ख, समर्थांनी पाहिले होते.  भिक्षेसाठी गेले असताना घराघरांतील दु:ख, व्यक्तींचे दु:ख, समाजातील भयग्रस्त परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. 

दु:खाचे मूळ कारण अज्ञान. ज्ञान नाही म्हणून भरकटलेले लोक समर्थांनी पाहिले. अंध:श्रद्धा, साधनेचे अघोरी प्रकार, गैरसमजुती यामुळे लोक गांजलेले होते. ‘सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकोनी आले’ अशी त्यांची स्थिती समर्थांनी पाहिली होती. दु:खावर उपाय योजण्याची क्षमता नाही. दु:खाचे मूळ कारण ईश्वराचा वियोग व अज्ञान हे होय. “तुझिया वियोगे जीवित्व आले” असे समर्थ याचसाठी म्हणतात. समर्थांच्या काळात योग्य मार्ग दाखवणारा अध्यात्मिक नेता नव्हता, पारतंत्र्यामुळे लोक भयग्रस्त होते. सगुण निर्गुण श्रीरामाची उपासना कशी करावी ? याचे ज्ञान लोकांना नव्हते. समर्थांना, केवळ श्रीराम कृपा; हे दु:ख कमी करेल हा विश्वास होता. त्याच्या जवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. त्याच्याशी दास, सखा, मित्र, स्वामी असे नाते जोडावे. काया, वाचा, मनाने त्याचे व्हावे असे त्यांना वाटे व तशी प्रार्थना ते करुणाष्टकांतून करतात. 

अनन्यता – समर्थांना ‘एका रामाशिवाय माझे कोणी नाही’ अशी अनन्य भक्ती करणे आवडत असे. तोच तारणारा, तोच माझे सर्वस्व, म्हणून “तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही”, “तुजवीण रामा मज कंठवेना” असं ते म्हणतात. सामान्य जन मात्र प्रपंचात इतके गुंततात की त्यांना ईश्वराची आठवण येत नाही, त्यांचा परमार्थ सवडीचा असतो.

संवाद – समर्थ सर्वस्वी श्रीरामाचे झाले म्हणून ते त्याच्याशी संवाद साधत. अशी एकाग्रता, तळमळ सामान्य माणसांमध्ये नसते. या संवादात “दुष्ट संव्हारिलें मागें । ऐसें उदंड ऐकतों । परंतु रोकडें कांहीं । मूळ सामर्थ्य दाखवी ।” हा हट्ट आहे. काया वाचा मनाने तुझा झालो म्हणून ‘हे लाज तुजला माझी’ यात सख्यत्व आहे. संवादात एका रामाशिवाय ही कृपा कोणीही करू शकत नाही ही प्रांजळ कबुली आहे, माझ्या साधनेत काही कमतरता आहे का ? हा प्रश्नही ते विचारतात. ‘नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों’ अशी व्यथा ते मांडतात. हा संवाद आतील मनाचा होता, ते हितगुज होते, देवा-भक्ताचा एकांतात घडलेला तो संवाद होता. एका असामान्य, निष्ठावान, श्रद्धाळू, अनन्य भक्ताचे ते हितगुज होते.

भाषा – ईश्वराशी संवाद साधायला समर्थांसारखे संत योग्य शब्द योजना करतात. प्रभूचे अंत:करण वितळावे, करुण रसातून, प्रेमातून त्याचे लक्ष आपण वेधावे, आर्तता प्रगट व्हावी म्हणून शब्दाचे सामर्थ्य समर्थ प्रगट करतात. ‘तुजवीण करुणा हे कोण जाणेल माझी ? तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता’ यातील शब्द योजना पाहिली की, त्यातील सामर्थ्य जाणवते. त्यातील एकही शब्द इकडचा तिकडे करता येत नाही. कारण त्यांची मांडणी नेमकी, नेटकी व प्रत्ययाची आहे.

भावावस्था – ‘श्रीराम आहेच’ या मनाच्या अवस्थेला भाव म्हणतात. समर्थांमध्ये तो परिपूर्ण होता. पश्चात्ताप, कमतरतेची प्रांजळ कबुली, लोकांचे दु:ख कमी होण्याची तळमळ असलेला, हे लोक तुझेच, म्हणून स्मरण करुन देणारी तळमळ त्यात आहे.

अद्वैताची अवस्था – करुणाष्टकांत श्रीराम समर्थ यांची एकरूपता दिसते. ‘जेथे शब्दच निमाला, तेथे रामदास रामचि झाला’ अशी अवस्था शब्दांतून प्रगट होते. 

मागणे – ‘रघूनायका मागणे हेची आता’. कोमळ वाचा, विमळ करणी, प्रसंग ओळखी, धूर्तकळा, हितकारक ते, विद्यावैभव, शब्दमनोहर, अर्थारोहण, अलाप गोडी अशा शब्दात समर्थ रामाकडे मागणे मागतात. त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. ‘मजविण तू मज दे रे राम’ यात अद्वैताची परमोच्च अवस्था आहे.

आपण सज्जनगडावर जातो तेव्हा मनातले ताण तणाव, प्रापंचिक दु:ख विसरतो. ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ या विचारात उठतो, समर्थ समाधी व श्रीरामाचा अभिषेक पहातो, सायंकाळी करुणाष्टके म्हणतो तेव्हा आपली व्यथा, दु:ख श्रीरामासमोर मांडले म्हणून मन हलकं व शांत होते. उत्साह वाढतो, एकाकीपणा, नाहीसा होतो, रात्री दासबोध वाचन, शेजारती होते. मनाला विश्रांती व समाधान मिळते; प्रसन्न वाटते. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

परि मी आहे जगज्जीवनी निरंतर

असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले ।

जे स्वरूपाकार जाले । आत्मज्ञानी ।।३-९-५९।।

जन्माच्या वेळी जितक्या सहजपणे जीव देह धारण करतो, तितक्याच सहजपणे तो देहातून बाहेर पडतो; यालाच मृत्यू म्हणतात.  व्यक्तातून अव्यक्तात जाणे व अव्यक्तातून व्यक्तात येणे ही क्रिया अविरत अखंड चालू असते. माणसाला मृत्यूचा काळ माहीत नसतो, मृत्यू नंतर काय होते हे पण माहीत नसते. “लोक मरमरों जाती । वडिलें गेलीं हे प्रचिती” असे समर्थ म्हणतात. मृत्यू ही नेहमी घडणारी घटना पण प्रत्येकाला त्याचे भय वाटते. भारतीय तत्त्वज्ञानात, कठोपनिषदात, छांदोग्य उपनिषदात, प्रश्नोपनिषदात मृत्यूविषयी सखोल चिंतन आहे. भगवद्गीतेच्या ८ व्या अध्यायात, ज्ञानेश्वरीच्या ६ व्या व ८ व्या अध्यायातही हा विचार आहे.  मृत्यू सर्वभक्षक, सर्वनाशक, सर्वंकष आहे. विद्वान संत, पराक्रमी राजे, कलावंत, योगी सर्वांना मृत्यू आहे. म्हणून समर्थ सकळही गेले असे म्हणतात. महाथोर ते मृत्यूपंथेचि गेले या समर्थ वचनात हे रहस्य आहे. 

निसर्गाचा, जीवनाचा समतोल राखण्यासाठी मृत्यू अनिवार्य आहे. उत्पत्ती, स्थिती, विनाश हे चक्र चालूच असते. मृत्यूचा विचार म्हणजे, मर्यादा; दुर्लभ शरीर व दुर्लभ आयुष्य यात प्रत्येक क्षण सत्कर्मात घालविण्याचा विचार. स्वार्थ, हवेपणा, दुष्टपणा, स्पर्धा, वैर भावना, तिरस्कार यालाही मर्यादा येतात. जाते घडी आपुली साधा, काळ मागे लागला, थांबला तो संपला या वचनांप्रमाणे मृत्यूचा विचार सत्कर्माची प्रेरणा देतो. देह थकल्यानंतर, तो कार्य करू शकत नाही, तेव्हा देहाला मृत्यूमुळे चिरविश्रांती मिळते. देहबुद्धी, देहाचा अहंकार नष्ट झाला, ‘आहे तितुके देवाचे’ हा विचार पक्का झाला तर मृत्यूचे भय कमी होते. आपणास आहे मरण । म्हणौन राखावें बरेंपण ।” या समर्थ वचनात दुसर्‍यांना सुखी केल्यानेच आपण सुखी होतो हे सत्य सांगितलेले आहे. 

आत्मज्ञानी संत व योगी, अलौकिक जीवन जगतात व त्यांचे प्रयाणही अलौकीक असते. ज्ञानदेवांनी अल्पायुष्यात ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव व अभंग लिहीले. स्वत:चे कार्य संपल्याच्या जाणिवेत त्यांनी संजीवन समाधीचा निर्णय घेतला. ज्ञानदेवांनी पृथ्वीतत्त्वाला, एकनाथांनी जलतत्त्वाला, मुक्ताईने तेजतत्त्वाला, संत तुकारामांनी आकाशतत्त्वाला, आद्य शंकराचार्यांनी वायूतत्त्वाला देह अर्पण केला.

उत्तम मरण येण्यासाठी जन्मभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास करावा लागतो. कृतकृत्य होऊन भगवंताच्या स्मरणात शांतपणे देह सोडण्यासाठी जी साधना करावयाची त्यालाच परमार्थ म्हणतात. दासबोधात दशक ३ समास ९ मध्ये समर्थ रामदास मृत्यूचा विचार प्रभावीपणे, ओघवत्या भाषेत मांडतात. त्यांचे चिंतन सर्वांनी करणे गरजेचे आहे. भगवंत भक्ताचे स्मरण अखंड करतो. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी ८-१३१ मध्ये हा विचार मांडतात. भगवंत मृत्यू समयी भक्ताची परीचर्या करतो. त्याला आत्मबोधाच्या पिंजर्‍यात ठेवतो, स्वस्वरूपाची थंडगार सावली त्याच्या वेदनेचा दाह कमी करते. त्याचा प्राणसमुदाय सोsहं साधनेने टवटवीत असतो. मन प्रफुल्लित असते. ब्रह्म स्वरुपात एकरूप होण्यासाठी तो आतुर असतो. स्थूल शरीर, पंचमहाभूते आपापल्या वाटेने नेतात. इंद्रिये परमात्मस्वरूपा पुढे नतमस्तक होतात व अहंकार नष्ट होतो. पूर्ण आयुष्यभराच्या साधनेचे हे फळ असते. भगवंत अनाहत नादाचे अंगाई गीत गातो. देहाला उन्मनीच्या प्रकाशात आत्मदर्शन होते. भक्त, भगवंत व भक्तीचे ऐक्य होते. हा आनंददायक क्षण असतो. सोलीव सुख ओवी ३० मध्ये कल्याणस्वामी म्हणतात,

“ऐसे सुख योगिया लाधले । तेव्हा देहाचे मरण गेले ।

सांगणे ऐकणे मुराले । एकत्वपणे एकचि ।।

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थ रामदास उदास झाले. १६०३ चैत्र वद्यात ते सज्जनगडावर आले. 

माघ वद्य नवमी । जाणे आहे परंधामी ।

केला निश्‍चय अंतर्यामी । ऐसा असे ।।

असे त्यांच्या मनात होते. या दहा महिन्यात दासबोध ७ दशक व उरलेले १३ दशक जोडून पूर्ण केला. समर्थ उद्धवस्वामींना म्हणाले, रघुकुळटिळकाचा वेध सन्निध आला. उद्धव स्वामी म्हणाले अनुदिन नवमी हे मानसी धरावी. समर्थ, तंजावर येथून घडवून येणाऱ्या पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंताच्या मूर्तींची वाट पहात होते. त्या गडावर माघ वद्य पंचमीला आल्या. समर्थांनी मूर्ती पाहिल्या, श्रींचे मुखावलोकन केले; प्राणप्रतिष्ठा केली; यथासांग पूजन केले. समर्थांचे सगुण भक्तीचे प्रेम या प्रसंगात दिसते. 

समर्थांनी अभंगातून श्रीरामाशी हितगुज केले. रामा माझे तू इतके दिवस पालन पोषण केलेस. बालपणापासून मी तुझ्या कृपेसाठी वेडा झालो आहे. तू मला आधार दिलास, सनाथ केलेस. आता माझे चित्त तुझ्या भेटीसाठी उतावीळ झाले आहे. प्राण त्यागाच्या वेळेस तू मला सांभाळ. तुझ्या स्वरूपदर्शनात माझा देह पडावा. माझ्या मागे तुझ्या भक्तांना तू सांभाळ, जे कोणी १३ कोटी श्रीराम नामाचा जप करतील त्यांना दर्शन दे.

माघ वद्य नवमी दुपारी २ वाजता त्यांनी तीन वेळा  रामनामाचा घोष केला, जो सर्व गडाच्या आसमंतात निनादला व समर्थ राम स्वरुपात एकरूप झाले. माघ वद्य नवमी म्हणजेच दासनवमी. या दिवशी सज्जनगडावर उत्सव असतो. श्रीसमर्थ म्हणजे मारूतीचा अवतार ते चिरंजीव आहेत. 

समर्थांचा पांचभौतिक देह पंचमहाभूतात विलीन झाला तरी दासबोध, आत्माराम, मनोबोध, स्फुट काव्य व अभंगांच्या रूपात ते आजही आपल्यात आहेत. प्रपंचरूपी मातीतून पारमार्थिक अत्तर काढायला त्यांनी शिकवले. माझा दाता राम आहे या निश्चयातून ते राहिले. समर्थांच्या काळी उपासना धर्माचरण याचे स्वातंत्र्य नव्हते. आज स्वातंत्र्य आहे, पण मन व बुद्धी बाह्य विषयात रमण्याचा धोका जास्त आहे. दूरदर्शन, बाहेरील आकर्षण वाढवतो; म्हणून मनाचा समतोल, स्थिरता, सूक्ष्मात जाण्याची वृत्ती  वाढविण्यासाठी समर्थांच्या ग्रंथांचा अभ्यास गरजेचा आहे. जो श्रीरामाचा दास होतो त्यालाच हे ग्रंथ आवडतात. श्रीरामाचा दास व्हायला त्याच्या नामाची गोडी, नामावर विश्वास व नामावर प्रेम असावे. समर्थ म्हणतात,

“श्रीराम देवार्चन सिद्धचि आहे ।

ग्रंथराज दासबोध सामर्थ्य सिद्धचि आहे ।

जो जो महंत येथे निश्चये राहे ।

तो तो लाहे साक्षात्कारु ।।”


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

दुसरे ते राजकारण

कोणत्याही समाजाचे संघटन, संरक्षण, संवर्धन,भौतिक व अध्यात्मिक वैभवाचे जतन हे शासनाद्वारे पूर्ण होत असते. शासनकर्त्यांनी देशाची सर्वांगीण प्रगती साधणे व देशाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणे हे कार्य करावे ही लोकांची अपेक्षा असते. देशाटनात समर्थांनी लोकस्थिती, भयग्रस्त समाज, पारतंत्र्याचे परिणाम पाहिले व अनुभवले, म्हणून “पहिले ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण । तिसरे ते सावधपण व चौथा साक्षेप” या खांबांवर त्यांनी आपला संप्रदाय उभा केला. अध्यात्मिक साधनेमुळे, मूळ मायेपासून निर्माण झालेल्या या चराचर विश्वात पशुपक्षी, वनस्पती, प्राणी, माणसे यात चैतन्यरूप अंतरात्मा आहे व तो शुद्ध जाणिवेच्या रूपात प्रगट होतो हे ज्ञान होते. समर्थांमध्ये ही जाणीव विशाल होती म्हणून त्यांना चराचरात राम रूप दिसले व सामाजिक जगदोद्धाराची चळवळ प्राणीमात्रांच्या सुखासाठी त्यांनी ‘राजकारण’ या शब्दातून उभी केली. तिला भगवंताचे अधिष्ठान होते म्हणून सामर्थ्य होते.

समर्थांच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत जनतेचे आरोग्य व आर्थिक स्थिती चांगली रहावी, त्यांना शिक्षण मिळावे, विद्या, शास्त्र, कला यांची समाजात वाढ व्हावी; जनतेला न्याय मिळावा व दंड करण्याची वेळच येऊ नये; आश्रमात राहून साधना, तपश्चर्या, अभ्यास करणारे संत; ऋषीमुनी यांना संरक्षण मिळावे या गोष्टींचा समावेश होता. “ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी.” राजा राज्यसंस्थेचा प्रतिनिधी असावा. तो, जनतेचा सेवक; नि:स्वार्थी; पराक्रमी व अलिप्त असावा. प्रजाहित दक्षता, राज्य स्थापना व धर्मस्थापना हे त्याचे ध्येय असावे. प्रजेच्या सुखासाठी व राज्याच्या विकासासाठी त्याने अखंड प्रयत्न करावे. दुष्टांचा संहार, बंड पाखंडे मोडून काढणे, शत्रूला नामोहरम करणे, देशातील सीमा व समुद्र यांचे रक्षण सैन्यामार्फत करणे हे राजाचे कर्तव्य आहे. राजाने धर्मसत्ता व भक्तिमार्गाची प्रतिष्ठा वाढवावी, प्रजेला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवावा. ईश्वराचे अनुसंधान सांभाळावे. ‘हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा’ या भावनेत अनासक्त वृत्तीने राज्य कारभार पाहावा.

शक्तीची उपासना – समर्थांच्या काळात त्यांना शरीर सामर्थ्याला फार महत्त्व द्यावे असे वाटले. शक्तीमुळे स्वसंरक्षण व राष्ट्र संरक्षण होते. सत्तेला शक्ती व युक्ती दोन्हीही आवश्यक आहेत.

महाराष्ट्रधर्म – समर्थांच्या राजकारणात राष्ट्रधर्म व महाराष्ट्र धर्माला प्राधान्य होते. “अवघे जन मिळवावे । धर्मकार्यासी लावावे । महाराष्ट्र धर्म स्थापावे । प्रतिष्ठा स्वराज्य ।।” हा त्यांचा विचार होता. स्वराज्य व सुराज्य निर्मितीसाठी त्यांनी अठरा पगड जातींना एकत्र केले. अभक्तांचा क्षय व्हावा, नष्ट; चांडाळ व पापींना शासन व्हावे, अन्याय व अत्याचाराला प्रत्युत्तर मिळावे यासाठी सर्वांनी हातभार लावणे महत्त्वाचे होते. मंदिरे सुरक्षित रहावी, धार्मिक आचाराचे स्वातंत्र्य असावे, विद्या व कला यांची वाढ व्हावी, वैभव संपन्न जीवनाकडे लोकांची वाटचाल व्हावी, म्हणून त्यांनी द्रष्टेपणाने अविरत आनंदवन भुवनाचे स्वप्न पाहिले. या एका ध्येयपूर्तीसाठी जे सामूहिक प्रयत्न त्यांनी केले तेच त्यांचे राजकारण होय. लोकांना राजी राखावे, त्यांचे अंत:करण सांभाळावे. नष्टाला नष्ट योजावे, सशक्ताला नाना बुद्धी शिकवाव्या, महंताने महंत करावे व देशभर मठ व महंत कार्यरत असावे या पद्धतीने समर्थांनी सामूहिक शक्ती उभी केली. “बुडाले सर्वही पापी हिंदुस्तान बळावले” या त्यांच्या वचनात संघर्षाचा तीक्ष्णपणा व विजयाचा आत्मविश्वास जाणवतो.


सावधपणा – समर्थांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी सावधपणा व गुप्तपणा याला महत्त्व दिले. इशारतीचें बोलतां नये । बोलायाचें लिहूं नये, संकेतें लोक वेधावा, कांटीनें कांटी झाडावी, मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें या पद्धतीने त्यांनी कार्य केले. शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परतीचा प्रवास, अफजलखानाचा वध या सर्व प्रसंगात गुप्तता होती. समर्थांच्या कार्याचा पुरावा या गुप्ततेमुळे मिळत नाही.


श्रीराम व हनुमान यांचा आदर्श – राष्ट्रधर्म जागवण्यासाठी समर्थांनी श्रीराम व हनुमंत ही आराध्य दैवते लोकांसमोर ठेवली. श्रीराम चरित्रातून मानवता, संघटित प्रयत्न, नीती न्यायाचे राज्य, कर्तव्यनिष्ठा, निस्वार्थी प्रेम व सर्वांना आपलेसे करण्याची कला शिकता येते. हनुमंताच्या जीवनातून ब्रह्मचर्य, अचाट शरीरबळ, निर्भयता, बुद्धिचातुर्य व सेवेचे समर्पित जीवन दिसते. समर्थांच्या मठातून श्रीराम व हनुमंताच्या उपासनेमुळे लोकांच्या मनावर बळाचे व निर्भयतेचे संस्कार झाले व कल्याणकारी राज्याची संकल्पना लोकांमध्ये रुचली. समर्थांचे महंत स्वतःच्या चारित्र्याने, कर्तुत्वाने व उपासनेच्या प्रभावाने प्रभावी लोकनेता म्हणून कार्यरत होते.


समर्थांच्या ’राजकारण’ शब्दाभोवती आदर्श समाज रचनेचा वेध घेणारा तत्ववेत्ता आपल्याला दिसतो. त्यांचे स्वतंत्र रामराज्याचे स्वप्न म्हणजे एका मंत्रदृष्ट्या ऋषीचे भावरम्य चित्र म्हणून डोळ्यापुढे येते. आज आपण भक्तीची मांदियाळी व अयोध्या येथे साकार झालेले राम मंदिर पहात आहोत. याची अव्यक्त बीजे त्या स्वप्नात दडलेली असावीत.

राज्य जालें रघुनाथाचें । भाग्य उदेले भक्तांचे ।।१।।

कल्पतरू चिंतामणी । कामधेनूची दुभणी ।।धृ।।

परीस झाले पाषाण । अंगीकार करी कोण ।।२।।

नाना रत्नांचे डोंगर । अमृताचे सरोवर ।।३।।

पृथ्वी आघवी सुवर्णमय । कोणीकडे न्यावे काय ।।४।।

ब्रह्मादिकांचा कैवारी । रामदासाचा अंतरी ।।५।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

आजच्या काळातही समर्थ विचारांची आवश्यकता

वैदिक परंपरा, संत विचार, संत चरित्र, रामायण, महाभारत व भागवतासारखे ग्रंथ कधीच कालबाह्य होत नाहीत. बदलत्या काळातले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, आव्हाने पेलण्यासाठी ते साहित्य शक्ती पुरवतात, मार्ग दाखवतात. समर्थ रामदासांचा दासबोध, आत्माराम व मनोबोध हे ग्रंथ काळाची ही गरज पुरवतात.

समर्थांच्या काळात परकीय सत्ता, आक्रमण, विखुरलेला समाज होता. आजही कलियुग आहे. जग जवळ आले आहे पण मने दुरावलेली आहेत. अधर्म, धर्मकार्यात अडचणी आणत आहे. असत्य, सत्याचा बुरखा पांघरून सत्याचा पराभव करत आहे. भ्रष्टाचार, शिष्टाचार झाला आहे. व्यसनाधीनता, महागाई, बेफिकीर वृत्ती, बेशिस्त, विषय वासना, तृप्तीची धडपड वाढत आहे. परकीय आक्रमणे, फंदफितुरी, देशातील स्वकीयांकडून होणाऱ्या देशविघातक कृती अशांती पसरवत आहेत. दूरदर्शन सारखे माध्यम सकारात्मक विचार वाढवण्याऐवजी, विषयवासना, स्वार्थ, ढोंगीपणा वाढवत आहेत. सात्विक अन्नाचा विचार फास्टफुड मुळे लोप पावत आहे. अर्थ, काम, धर्म व मोक्ष यांची चौकट मोडून स्वैराचाराकडे वळत आहे. जाती-जातीतील तेढ, लोकनेते स्वार्थासाठी वाढवत आहेत. “कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी” हे समर्थ वचन आजही प्रकर्षाने आठवत आहे.

समर्थांनी दुर्लभ शरीर, दुर्लभ आयुष्य याची महती सांगितली. “या शरीरासारखे यंत्र आणिक नाही” म्हणून बलोपासना, सात्विक आहार, विहार, चांगल्या सवयी, आजही महत्त्वाच्या आहेत. आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे याची जाणीव महत्त्वाची आहे. जेव्हा शरीरात शक्ती असते, तेव्हा ग्रंथ अभ्यास; उपासना; पाठांतर; ध्यानाची सवय महत्त्वाची असते नाहीतर, ‘नंतर करेन’ या सवयीने पश्चात्ताप होतो. 

व्यवसाय व संसारात अलिप्तपण व अनासक्त वृत्ती महत्त्वाची असे समर्थ म्हणतात. २० दशक व २०० समासाच्या दासबोधाच्या लेखनाचे श्रेय समर्थ घेत नाहीत. मठ करून एके ठिकाणी ते राहिले नाहीत. संसारात व व्यवसायात निवृत्तीचा शांत मनाने स्वीकार करून, आपण वाचन; लेखन; उपासना; ध्यान; अभ्यास; लोकोपयोगी एखादे काम यात वेळ घालवला, तर निवृत्तीनंतरचे जीवन आनंदात जाते. निवृत्ती स्वेच्छेने स्वीकारली तर ताण-तणाव वाढत नाही.

शरीराबरोबरच मनाच्या मशागतीचा विचार समर्थ मनाचे श्लोकांमधून मांडतात. सदाचाराचे नैतिक जीवन, शांती व समाधान देते. देहसुखाच्या मर्यादा ओळखून देहबुद्धीच्या पायावरचे जीवन अपूर्ण, दुःखव्याप्त आहे. भगवंताच्या स्मरणात अखंड कार्य केल्यामुळे निर्भयता व सुरक्षितपणा वाढतो. आजचे जीवन धकाधकीचे, आव्हानाचे आहे. या स्थितीत बाहेर पडताना भगवंत माझ्याजवळ आहे, तो रक्षण करतो हा स्थिर भाव आत्मविश्वास वाढवतो. मन, संकल्प-विकल्प; भीती; स्पर्धा; ईर्ष्या; द्वेष यांनी अशांत होते. एखाद्या ईश्वरी शक्तीच्या, संतांच्या, देवाच्या ठिकाणी मन स्थिर ठेवले तर ते एकाग्र होते. विवेक-वैराग्याने मनाची हाव, धडपड शांत होते, वृत्ती स्थिर होते. सर्व ठिकाणी एकच आत्मचैतन्य आहे या भावनेने मानवी मन विश्व मनाचा विचार करते व माणूस स्वतःशी व इतरांशी सुखसंवाद करण्याच्या प्रयत्नात रहातो.

दासबोधाच्या अभ्यासाने शाश्वताचा मार्ग स्वीकारला जातो. नित्य-अनित्याचा विचार दृढ होतो. देहाला, बालपण; तारुण्य; वृद्धपण आहे. तो पंचभौतिक आहे, त्याला मृत्यू आहे या सत्याचे भान रहाते. देह साधन म्हणून वापरावयाचा आहे. आपले जीवन, पृथ्वी; आप; तेज; वायू; आकाशाशी निगडित आहे. त्यामुळे निसर्गात समतोल आहे. आपल्या देहाला पंचभौतिक शक्तीची देणगी ईश्वराने दिली आहे. तेव्हा मी, माझा देह व निसर्ग याचा सखोल विचार आपण दासबोधामुळे करतो. मुक्त अवस्था व मृत्यू याबद्दलचे गैरसमज व भीती नष्ट होते. व्यवस्थापनाचे अमूल्य असे भरपूर विचार दासबोधात आढळतात. व्यक्ती म्हणून आपला सर्वांगीण विकास दासबोधातून साधता येतो. विवेक, विचार सावधानता, एकाग्रता, एकांताची आवड कशी जोपासावी हे दासबोधातून कळते. प्रपंच-परमार्थ, व्यक्तिगत जीवन, सामूहिक जीवन, कुटुंब व व्यावसायिक क्षेत्र या दोन्ही क्षेत्रात समतोल राखायला मदत होते. अखंड चाळणा हा समर्थांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. त्यांच्या जीवनात असहायता, निराशा, थकवा, अगतिकता यांना थारा नव्हता. निरंतर ध्यास, उत्कट ध्येय, मनन, चिंतन, निरीक्षण, परीक्षण, प्रचिती, प्रबोध व तेजस्वी वाणी हे त्यांचे गुण आपल्याला आत्मसात करता येतात. दासबोधात धर्म, उपासना, पिंड व ब्रह्मांडाचे रहस्य, व्यवहार, समाजशास्त्र, मानसशास्त्र याचे एकत्र रसायन सापडते. व्यक्ति बरोबरच समाजाचे कल्याण, समाजाची बांधिलकी, समाजाविषयी प्रेम हे विचारही आपल्याला कळतात. समर्थांचे विचार हे ब्रह्मांडाला गवसणी घालण्याइतके व्यापक आहेत. 

“आपल्या पुरुषार्थ वैभवें | बहुतांस सुखी करावें |”

हा विचार आजच्या जागतिक अशांतीच्या परिस्थितीत महत्त्वाचा आहे. आजच्या काळात आपण युद्धामुळे होणारी मनुष्यहानी, स्त्रिया व मुलांचे उध्वस्त जीवन, कष्टाने उभ्या केलेल्या इमारती नष्ट होणे हा संहार; विश्वव्यापक उपासनेने टाळता येऊ शकतो. “पृथ्वीमध्ये जितुके शरीरे | तितुकी भगवंताची घरे” हा विचार फक्त भारतात रुजू शकतो व इतरांना तो देता येतो.

समर्थ विचार Specific व Time Bound आहेत. आत्मकल्याण हे ध्येय व त्यासाठी प्रयत्न व त्याचे मूल्यमापन आपणच करायचे आहे. समर्थ विचारांच्या श्रवणाने आपल्यात बदल व्हावा. “जगदीश्वरे अनुक्रमे | सकळ केले |” हे आश्वासन समर्थ देतात. त्यात कर्तुत्वाचा हुंकार, भक्तीचा आग्रह, उपासनेचे सातत्य आहे कारण समर्थांचे जीवन तेजोमय, सूर्य बिंबासारखे निर्मळ व प्रेरक, जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर करणारे आहे.

“देश काळ वर्तमान | हा तो अवघाचि अनुमान ||१||

भक्ति करावी देवाची | घडी जाते सोनयाचि || धृ ||

काळ वेळचि पाहतो | सदा सन्निध राहातो ||२||

रामी रामदास म्हणे | देह आहे जाईजणें ||३||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थ रामदासांचे लोकशिक्षण

श्रीसमर्थ दासबोध दशक १ समास १ मध्ये म्हणतात, “आतां श्रवण केलियाचें फळ | क्रिया पालटे तत्काळ |” याचा अर्थ, शिक्षण म्हणजे विचारात व वर्तनात झालेला बदल होय. अध्यात्म ग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधना करणे याला श्रीसमर्थ ‘अभ्यास’ म्हणतात. महंताने अभ्यास करून, स्वत: अनुभव घेऊन, तसे वर्तन करून मग लोकांना शिकवावे हा त्यांचा आग्रह होता. दासबोध दशक १४ समास ४ मध्ये बावन्न मातृकांचा विषय आहे. ५२ मातृकांचे अधिष्ठान पंचभूते व षट्चक्रे आहेत. मातृकांमधून शब्द तयार होतो. विचारांनी भरलेले शब्द दृश्य स्वरुपात असतात व शब्दात अर्थ दडलेला असतो. शब्दाचा संबंध शरीराशी असतो. परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी वाणीतून शब्द बाहेर पडतो. श्रीसमर्थांच्या शब्दात जोश, सामर्थ्य, वीररस, भक्ति याचे दर्शन घडते. अस्मानी सुलतानीच्या अत्याचाराने गांजलेल्या भयग्रस्त समाजाला “धीर्धरा धीर्धरा तकवा | हडबडूं गडबडू नका”, “उत्कट भव्य तेंचि घ्यावें | मळमळीत अवघेंचि टाकावें |” या शब्दांनी धीर दिला व महत्त्वाकांक्षी जीवनाची प्रेरणा मिळाली. शब्दानंतर अर्थ कळतो, तो शब्दाच्या उच्चारातच दडलेला असतो. अर्थाचा शब्द मनाशी असतो. शब्द व अर्थाचे रूपांतर, अनुभवात व प्रत्यक्ष वर्तनात होते. आध्यात्मिक अनुभव शब्दाने सांगतात पण अनुभव आल्यावर शब्द व अर्थ मागे पडून मौनाची स्थिती प्राप्त होते. 

ज्ञानदेवांप्रमाणे श्रीसमर्थांचे वाङ्मय मराठी भाषेत आहे. देशाटनात श्रीसमर्थ १६ भाषा शिकले, म्हणून उर्दू; हिन्दी भाषेतही त्यांनी लिखाण केले. लोकांना शिकवताना प्रथम अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा याबाबत त्यांच्या अडचणी श्रीसमर्थ प्रथम जाणून घेत व त्यावर उपाय सांगत. “मानत मानत शिकवावे” ही त्यांची पद्धत होती. नेमके बोलावे व तात्काळ उत्तर द्यावे यासाठी स्वत: ज्ञानी होणे व अनुभव घेणे याला त्यांनी प्राधान्य दिले. त्या काळात “लेकुरें उदंड जालीं | तों ते लक्ष्मी निघोन गेली” हा कुटुंब नियोजनाचा तसेच “मेळविती तितुकें भक्षिती | ते कठीण काळीं मरोन जाती” हा बचतीचा विचार त्यांनी लोकांना सांगितला. बलोपासनेचे महत्त्व, सदा दात घासोनी तोंडा धुवावे ही शारीरिक स्वच्छतेची सूचना श्रीसमर्थांनी केली, त्याचा उपयोग आजही आपण करत आहोत.

श्रीसमर्थ साक्षरता प्रसाराचे ‘आद्य प्रवर्तक’ होते. लेखन, वाचन, अर्थांतर सांगणे ही त्यांची लोक शिक्षणाची पद्धत होती. “दिसामाजी कांहि तरी ते ल्याहावे | प्रसंगी अखंडित वाचीत जावे” हा नियम त्यांचे महंत काटेकोर पाळत. श्रीसमर्थांच्या शिष्यांच्या दासबोधाच्या हस्तलिखित प्रती आजही पाहायला मिळतात. अक्षर कसे असावे, लेखन क्रिया कशी करावी याविषयी दासबोधात एक समासच आहे. श्रीसमर्थांच्या लेखनात शब्द, भाषा मांडणी याची साखळी दिसते. 

श्रीसमर्थांनी लोक शिक्षणात स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या काळात स्त्रियांना पळवून नेणे, भ्रष्ट करणे, अशा प्रकारांमुळे स्त्रिया असुरक्षित होत्या. अशा भीषण काळात श्रीसमर्थांनी वेणाबाई, अंबिकाबाई, आक्काबाई, यांच्यासारख्या मोठी परमार्थिक योग्यता असणाऱ्या उत्तमोत्तम शिष्या तयार केल्या. यांत  वेणाबाईंच्या शिष्या बयाबाई यांचाही समावेश होतो. वेणास्वामी मिरज मठाच्या मठाधिपती होत्या तर श्रीसमर्थांच्या निर्याणानंतर ४० वर्षे आक्कास्वामींनी चाफळ व सज्जनगड ही संस्थाने समर्थपणे चालवली. श्रीसमर्थांनी त्या काळात ही स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली.

श्रीसमर्थांनी उदासीन, आळशी, विवेकहीन, असहाय जनतेला आशावादी; प्रयत्नशील; विवेकी बनवले. लोकांना शरीर व मनाने बलवान बनविण्यासाठी श्रीसमर्थांनी लोकशिक्षणाची चळवळ उभी केली. श्रीसमर्थांचे ११०० मठ म्हणजे अध्यात्मिक विद्यापीठे होती. श्रीसमर्थांचे महंत नाना मते, घातक रूढी, परंपरा, पाखंडे, हा मतमतांचा गलबला मोडून नीतीची; धर्माची; उपासनेची; कर्मयोगाची शुद्ध कल्पना जनतेला समजाऊन देत. शिक्षण देताना लोकांची अंत:करणे सांभाळत, त्यांच्यातील दुरावा नष्ट करत. महंताचे लिहिणे, वाचणे, अर्थ सांगणे, वक्तृत्व, माणसांची पारख आणि नि:स्वार्थीपणा याकडे श्रीसमर्थ लक्ष ठेवत. तीक्ष्ण बुद्धीच्या मुलांना युक्ती-बुद्धीने सक्षम करून नवे महंत तयार करत. महंतांनी अशी शिस्त लावावी की, तो नसताना सुद्धा हे कार्य चालू राहील. अशा कार्यामुळेच समर्थ संप्रदायाचा विस्तार झाला. 

श्रीसमर्थांची शिक्षण पद्धती औपचारीक व अनौपचारीक होती. भिक्षेच्या वेळी व्यक्तीला भेटणे, त्याच्याशी संवाद साधणे, कुटुंबाचे निरीक्षण करणे या गोष्टी होत असत. प्रवचन कीर्तनाच्या वेळी समूहाचे शिक्षण होत असे. संवादाचे माध्यमही श्रीसमर्थ वापरत. दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. पूर्वारंभ गाथेत संवादच आहे. संवादामुळे व्यक्तीमध्ये  चांगल्या प्रकारे परिवर्तन होते. बहूजन समाजाला “मुलाचे चालीनें चालावें” या पद्धतीने श्रीसमर्थ शिकवत. सामान्य माणसांसाठी बाराखडी शिक्षण पद्धतीने त्यांनी लोकांच्या मनात शिक्षणाविषयी प्रेम निर्माण केले. श्रीसमर्थांच्या लोकशिक्षणामुळे, समाज  यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे लागला. एकमेकांवर प्रेम करू लागला. लोकांना स्वधर्म व स्वातंत्र्याचा विचार कळला. वाचन, लेखनामुळे विचार व विवेक शक्ती वाढली. खरा कर्ता राम या भावनेत लोक व्याप व वैभव वाढवून भक्तीच्या समाधानाचा आनंद भोगू लागले. 

“प्रथम लिहिणें दुसरें वाचणें | तिसरें सांगणें अर्थांतर |

आशंकानिवृत्ती ऐसी चौथी स्थिति | पांचवी प्रचीति अनुभवें |

साहावें तें गाणें सातवें नाचणें | ताळी वाजवणें आठवें तें |

नवां अर्थभेद दाहावा प्रबंद | आक्रावां प्रबोध प्रचीतीसीं ||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थांचे देशाटन

“येके ठाईं बैसोन राहिला | तरी मग व्यापचि बुडाला |

सावधपणें ज्याला त्याला | भेटि द्यावी ||१५–१–३४||”

समर्थांनी गृहत्याग केल्यावर बारा वर्षे स्वतः साधना केली. साधनेने एक तेजस्वी, विवेकी, तीक्ष्ण नजरेचा, बलदंड शरीराचा, हनुमंताचा भक्त समर्थ रामदास असे परिवर्तन त्यांच्यात घडले. नाशिकमध्ये पूर्ण देशातून यात्रेकरू येत असत. त्यांच्याकडून उत्तरेकडे चाललेला विध्वंस, मूर्तींची विटंबना, देवालय नष्ट करणे, स्त्रियांना पळवणे, सक्तीचे धर्मांतर या गोष्टी कळल्या. स्वतः पहावे, काही उपाय करावा, लोकजागर करावा यासाठी पायी देशाटन करण्याचे समर्थांनी ठरविले.

एक तप:पूत, विरक्त, मुक्त, रामभक्तित रंगलेला, करुणेनी व्यथित झालेला महंत रामदास, त्र्यंबकेश्वराला पोहोचला. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना तो एकनाथ व  निवृत्तीनाथांची शिकवण आठवत होता. सप्तशृंगीचे दर्शन घेताना, उग्र रूपाच्या; हातात आयुधे असणाऱ्या त्या अष्टभुजाधारिणीकडे त्यांनी सामर्थ्य मागितले. प्रवास करत त्यांनी पोहून तापी नदी ओलांडली. नाझीर साहेब बळजबरीने यात्रेकरूंची तपासणी करत होते. समर्थांनी त्याला विरोध केला. त्यांच्या दृष्टीत थोडा क्रोध, निर्धार, प्रतिकाराची सिद्धता होती. सर्व यात्रेकरू निर्भय झाले. नंतर समर्थ नर्मदा तीरी आले. ओंकारेश्वराचे दर्शन घेतले. आद्य शंकराचार्यांचे स्मरण केले. तेथे मठ स्थापला. चरणदास याला मठपती नेमले. उज्जैनी, ग्वाल्हेरला गेले, महांकालेश्वराचे आशीर्वाद घेतले. सर्व ठिकाणी सत्ता, स्वार्थ, यवन सत्तेचा अत्याचाराचा वरवंटा अमानुषपणे फिरताना समर्थांनी पाहिला. समर्थ चित्रकुटावर, त्यांच्या प्रभूच्या वनवासभूमीत पोहोचले. तेथे श्रीराम वास्तव्याच्या अनुभवाने शक्ती मिळाली. मथुरेला मठ स्थापला. रुद्र प्रयागला स्नान करून, बद्रीनारायण; गंगोत्री; यमुनोत्री; केदारनाथाचा प्रवास केला. परतीच्या प्रवासात वाराणसी, अयोध्या पाहिली. काशीक्षेत्री मंदिरात चिरेबंदी मशिद पाहून ते व्यथीत झाले. अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मंदिराशेजारी तेच होते. त्यांना वाटलं माझा देश, माझा धर्म काहीच राहिला नाही. लोकांना साधं, शांत, स्थिर, निर्भय जीवन कष्ट करून जगता येत नाही. “आश्रयो पाहता नाही” असं झालं आहे. वाराणसीत मठ स्थापला. माझा स्वरूप संप्रदाय, अयोध्या मठ; “जानकी देवी श्री रघुनाथ दैवत | मारुती उपासना नेमस्त” असा असेल असे हितगुज त्यांनी श्रीरामाशी केले. 

समर्थांनी कर्नाटकातील विजयनगर येथील संपन्न बाजारपेठा, प्रशस्त शहर, नामघोषाने दुमदुमलेली मंदिरे पाहिली. बेंगळूरला न्यायी व शूर शहाजीराजांची नगरी पाहून त्यांना आनंद वाटला. शहाजीराजांच्या  भेटीत समर्थांनी स्वतः पाहिलेले क्रौर्य, दुष्काळ, कल्पान्त, धाडी, ओस पडलेली गावे, जीवघेणे आकांत त्यांना कथन केले. शहाजीराजांनी, समर्थांना मांसाहेब जिजाबाई; पुत्र शिवबा व त्यांचे पुणे येथील जहागिरीची माहिती दिली. त्या स्वराज्याचे व सुराज्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना आशीर्वाद द्यावेत असे समर्थांना सांगितले. 

देशाटनामुळे समर्थांचे अनुभव विश्व वाढले, अस्मिता वाढली, शक्ती वाढली. कुरुक्षेत्री संघर्षाचे स्फुल्लिंग चेतवले गेले. “हे राज्य व्हावे  हे तो श्रींची इच्छा” हे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले. समर्थ महाराष्ट्रात आले. जांबेला मातोश्रींना भेटले. चाफळचे मंदिर व ११ मारुतींची स्थापना वेगाने झाली. ११०० मठांची उभारणी व महंतांची साखळी उभी राहिली. चिपळूणला परशुरामांचे आशीर्वाद घेतले. महाडला शिवथरघळीत दासबोध लेखन केले. अफजलखानाच्या वधाने  शिवाजीराजांच्या पराक्रमाने “स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेचि होतसे” असा प्रत्यय समर्थांना आला. या देशाटनातून संघटना, लोकशिक्षण व भक्तीमार्गाचा प्रसार, लोकजागर झाला. समाजात स्वातंत्र्याचा वन्ही चेतवला गेला. परकीय सत्तेविरुद्ध संघर्षाला लोकांची मने, मेंदू, मनगटे तयार झाली. “बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्तान बळावले | अभक्तांचा क्षयो झाला | आनंदवन भुवनी ||” हे स्वप्न सत्यात उतरले. 

एक डोळस दृष्टीने केलेले देशाटन म्हणून समर्थांच्या या प्रवासाची इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल. या देशाटनामुळे स्वातंत्र्यसंग्रामाचे बीज रोवले गेले, व त्यातूनच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांना प्रेरणा मिळाली. इतिहासाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य या देशाटनाने दिले.

“जेथे जावे तेथे राम समागमी | आता कासयां मी खंती करू ||१||

खंती करू ज्याची तो समागमेची | वाहाता सुखाची घडी होये ||२||

होये देव खरा भूमंडळवासी | जातां दिगंतासी सारीखाची ||३||

सारीखाची तो जनी वनी वनांतरी | गिरिकंदरी तो सारीखाची ||४||

सारीखाची तो कडांकपारी पाहाता | राम आठवितां दास म्हणे ||५||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थ रामदासांची साधना व तपश्चर्या

चिंता करितो विश्वाचीया आंतरिक स्फुरणातून समर्थांनी घर, स्वजन, जन, सर्वांचा अगदी नावाचाही त्याग केला. त्यांना रामभक्तीचे वेड लागले होते. पायी प्रवास करत त्यांनी नाशिकच्या काळारामाचे दर्शन घेतले. सगुणमूर्ती चर्मचक्षुंनी पाहिली पण आपल्या अंत:करणात त्याचे आस्तित्व जाणवले नाही. मनातले दुःख हनुमंताला सांगितले. अंतर्मनात अप्राप्य ते प्राप्य करण्याची मनीषा जागी झाली. विद्याभ्यास, ज्ञानसाधनेची प्रेरणा मिळाली. जे तरुन जाण्यास कठीण, मिळण्यास कठीण, जाणायला कठीण, ते तपाने साध्य होते, हे सत्य कळले त्यासाठी नाशिक जवळ टाकळी येथे समर्थ पोहोचले. शांत जागा, नंदिनीगोदावरीचा संगम, तेथे एक जुनी मठी, भोवताली निंब, उंबर, वड या वृक्षवल्लींची साथ. असे स्थान तपश्चर्या साधनेसाठी मिळाले

अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणें कांहीं |

तुजविण मज या जगीं पाहतां कोणीच नाही || ||

ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा |

विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वील ठेवा || ||

युक्ति असेना बुद्धि असेना शांतिवसेना अंगी |

रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी || ||”

असे स्वतःचे आत्मपरीक्षण त्यांनी श्रीरामासमोर ठेवले त्याच्याशिवाय कोणी नाही याचे स्मरणही करून दिले.

समर्थांनी शके १५४२, रथसप्तमीच्या दिवशी पुरश्चरण साधना सुरू केली. पंचपंच उष:काली, पहाटे चार वाजता उठून शौचमुखमार्जन; स्नान; मानसपूजा करून ते १२०० सूर्यनमस्कार घालत. नियमित सूर्यनमस्कार घालत असल्यामुळे, शरीर स्वस्थ; बळकट झाले तर मन एकाग्र; प्रभावी प्रतिकारक्षम झाले. शरीराच्या अंगउपांगाचे सामर्थ्य वाढले. सूर्योदयाला सूर्याकडे तोंड करून नंदिनीगोदावरीच्या संगमात उभे राहून त्यांनी गायत्री पुरश्चरण सुरू केले

गायत्री या वैदिक मंत्राचा यज्ञाशी निकटचा संबंध असल्यामुळे हा पवित्र मंत्र विश्वातल्या शुभ दैवी शक्तीचे प्रतीक आहे. या गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाने समर्थांचे मन अतिंद्रीय शक्तीचा अनुभव घेत होतेवाक् सिद्धी, संकल्प सिद्धी, भविष्य ज्ञान या शक्ती समर्थांना प्राप्त झाल्या. अंतरंग सूक्ष्म, संवेदनशील झाले.

गायत्री मंत्राच्या जपानंतर समर्थश्रीराम जय राम जय जय रामया त्रयोदशाक्षरी  मंत्राचा जप करत. १२ वर्षे, १३ कोटी जपाचा त्यांचा संकल्प होता. परावाणीतून सहज स्फुरलेला हा तारक मंत्र समर्थांना अखंड श्रीरामाच्या अनुसंधानात रहायला सहाय्यभूत ठरला. श्रीरामाचे गुण त्यांच्या अंगी प्रगट होऊ लागले. ‘नामत्यांच्या मनाच्या सूक्ष्म स्तरात पोहोचले. नामस्मरणाने हामहायोग’ ‘अखंड अनुसंधानहा ज्ञानयोग श्रीराम चरित्राचे मननहा भक्तीयोग समर्थांनी अनुभवला श्रीराम भक्तांचे लालन, पालन, पोषण रक्षण या कर्मयोगाचा त्यांनी निश्चय केला. नामस्मरणाने त्यांना अनाहत नादाचा अनुभव आला आणि श्रीरामाशी दासपणाचे नाते दृढ झाले. कायावाचामनाने ते श्रीरामाचे झाले.

समर्थ हनुमंताचे सगुण निर्गुण उपासक होते. टाकळीला त्यांनी गोमयाच्या मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. दोघांनी शक्ती, युक्ती, बुद्धी रामरायाकडून घेतली. बालपणापासून मारुतीने त्यांना पदरात घेतले रक्षण केले. क्रियाशीलता, गतिमानता, शत्रुभयकारक, ईश्वरकेंद्रित वृत्ती हे गुण त्यांनी आत्मसात केले

)नि:स्सीम ब्रह्मचर्य अचाट शरीर बळ

)संकटाने विचलित होणारी निर्भयता,

)दुष्टाची कपटनीती ओळखून त्याला प्रतिकार करण्याचे बुद्धीचातुर्य

)श्रीराम सेवेला समर्पित जीवन 

हे चार पैलू हनुमंत समर्थांच्या जीवनात आढळतात.

समर्थ रोज पाच घरी भिक्षा मागत. प्रत्येकाकडून मूठ पीठ असे पाच मुठींच्या पिठाचे ते पानगे करत. श्रीरामाला नैवेद्य दाखवून ग्रहण करत. भिक्षेत शिजवलेले अन्न मिळाले तर झोळी पाण्यात बुडवून पिळून ते अन्न भक्षण करत. चवीवर बोलण्यावर नियंत्रण असे. समर्थांनी भिक्षेच्या  माध्यमातून व्यक्ती, कुटुंब समाज यांचे निरीक्षण, लोकजागर संघटन उभे केले. अनेक महंत त्यांना मिळाले. मठ मंदिरे उभी राहिली, राष्ट्रप्रेम, धर्म प्रेम जागृत केले. रामदासी संप्रदायाचे भिक्षा हे प्रमुख अंग आजपर्यंत चालू आहे. देशाटनात भिक्षेमुळे अवघा देश स्वदेश वाटला. समर्थ रोज शास्त्री बुवांच्या वेदपाठ शाळेत पुराण श्रवण करायला जात. तेथील अनेक ग्रंथ समर्थ आणत दुपारच्या वेळी या ग्रंथांचा अभ्यास करत असत

भगवद्गीता तसेच इतर अनेक गीता, वेद, भागवत, उपनिषदे, वेदांत, श्रुती या ग्रंथांच्या अभ्यासाचा उल्लेख त्यानी दासबोध दशक समास मध्ये केला आहे. समर्थ रात्रीवाल्मिकी रामायणग्रंथाचे लेखन करत. शके १५४४ च्या माघ महिन्यापासून शके १५४६ च्या वैशाखापर्यंत रामायणाची कांडे तीर्थाटनानंतर १५६७ मध्ये उत्तरकांड १५७१ मध्ये अयोध्या कांडाचे लेखन समर्थांनी केले. रामायणाची पोथी आजही धुळे येथीलवाग्देवतामंदिरात पाहायला मिळते. त्यातील वळणदार अक्षर पाहून मन थक्क होते. रात्री समईच्या प्रकाशात टोकदार बोरू शाईच्या साह्याने समर्थ लेखन करतप्रत्येक अक्षर घडसून, वळवून काढलेले, वाटोळे, सरळ, मोकळे जणू मोतीच एकापुढे एक ठेवले आहेत असे वाटे. काना, मात्रा, वेलांटी अतिशय घोटीव प्रत्येक ओळ सुटी. हे अपूर्व लेखन पाहून आनंद वाटतो आणि दिसामाजी कांहि तरी ते ल्याहावे | प्रसंगी अखंडित वाचीत जावे |” यातील मर्म कळते.

समर्थांच्या साधनेची फलश्रुती –  “हृदयस्थ नारायण मला प्रेरणा देतो, सांभाळतो, रस्ता दाखवतोहा अनुभव समर्थांना आला. हृदयस्थ ईश्वर माझ्या बुद्धीचा प्रेरक, मनाचा चालक देहाची जीवन ज्योत आहे हा त्यांचा दृढनिश्चय पक्का झालातपश्चर्येनंतर समर्थ अध्यात्मिक नेतेपदावर आरूढ झाले. ईश्वराचे अस्तित्व त्यांना सतत जाणवत असल्यामुळे निस्वार्थी प्रेम, निर्भयता, निर्दोष साधुत्व, अखंड आनंद यांनी त्यांचे जीवन काठोकाठ भरले. रात्रंदिवस आपल्या हृदय मंदिरात तो आहे, हा विश्वास निर्माण झाला.

उत्तरेकडून येणारे यात्रेकरू समर्थांना उत्तरेकडे चाललेला विध्वंस सांगत असत. तलवारीच्या धाकाने धर्मांतरण होत आहे, धार्मिक प्राचीन ग्रंथांची होळी केली जात आहे, स्नान संध्या उपासना करण्याचे स्वातंत्र्य नाही, अन्न वस्त्र निवारा नाही, कोणाचा आश्रय नाही, लोकांना कसे जगावे किंवा मरावे हेही कळत नाही; हे ऐकून समर्थांनी देशाटन करण्याचा निर्णय घेतला. बारा वर्षांच्या तपश्चर्येमुळे त्यांचा रक्षणकर्ता प्रभू रामचंद्र आहे, त्याच्या या सेवकाकडे वक्रदृष्टीने पाहणारा अजून कोणी जन्मला नाही हा विश्वास त्यांच्या  मनात होता.

१२ वर्षांनंतर, शके १५५४ च्या फाल्गुन शुक्ल पक्षात एक तपस्वी, मुक्त, निग्रही, रामरंगी रंगलेला, जनांविषयी प्रेम कळवळ असणारा स्वच्छंद बैरागी, रामराज्याच्या निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून बाहेर पडला, तो समर्थ रामदास स्वामी होता.

ध्यान करूं जातां मन हारपलें सगुण तें झालें गुणातीत ॥१॥

जेथें पाहे तेथें राघवाचें ठाण करीं चापबाण शोभतसे ॥२॥

राम माझे मनीं राम माझे ध्यानीं शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥

रामदास ह्मणे विश्रांति मागणें जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थ रामदासांचा स्वरूप संप्रदाय

“रघुनायका सारिखा देव नाहीं |

क्रिया पाहतां चोखडी सर्व कांहीं ||”

धर्माचे आचरण, वेदोक्त ज्ञान, विज्ञानाचा अभ्यास, सगुण–निर्गुण रामोपासना या गोष्टींचा जिथे साकल्याने विचार होतो त्याला संप्रदाय म्हणतात. संप्रदाय म्हणजे ‘सम्यक प्रदान’. यात सर्व विचार करून नियम, रीती नक्की करून गुरुकडून शिष्याला ज्ञान दिले जाते. संप्रदायात निश्चितपणे आखलेला मार्ग, चाकोरी, नियम, व्रते, साधना यांचा समावेश असतो.

समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या संप्रदायाला समर्थ संप्रदाय, श्री संप्रदाय, राम संप्रदाय, महाराष्ट्र धर्म, स्वरूप संप्रदाय अशीही नावे आहेत. आपल्या देशात आठव्या शतकापासून सुरू झालेली आक्रमणे, अत्याचार, १६ व्या शतकापर्यंत बरीच स्थिर झाली होती व वाढली होती. समर्थांनी हे देशाटनात अनुभवले, व मूळापासून त्याच्या उच्चाटनासाठी; हरवलेल्या धर्माची स्थापना; उद्ध्वस्त समाज कार्यरत करणे; गमावलेले स्वत्व लोकांच्या मनात निर्माण करणे या सगळ्यासाठी समर्थ रामदासांनी “स्वरूप संप्रदाय” स्थापन केला. 

स्वरूप संप्रदायाची परंपरा – आदिनारायण- महाविष्णू-हंस-ब्रह्मदेव- वसिष्ठ-श्रीराम- रामदास अशी आहे. केंद्रस्थान – अयोध्या मठ, दैवते – जानकीदेवी; श्रीरघुनाथ; मारुती आणि तुळजा भवानी ही असून श्रीराम भक्ती व हनुमंताची उपासना या संप्रदायात सातत्याने होते. मठ – ११०० असून, ११०० मठपती व अनेक शिष्य या संप्रदायात होऊन गेले. या संप्रदायाची तीर्थस्थाने जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ व सज्जनगड ही होत. 

संप्रदायाचे चार स्तंभ – १. हरीकथा निरूपण, २. राजकारण, ३. सावधपण , ४.साक्षेप व आक्षेप फेडणे, हे आहेत.  उत्सव – रामनवमी, हनुमान जयंती हे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. 

संप्रदायाची पाच वैशिष्ट्ये – १. शुद्धउपासना, २. विमलज्ञान, ३. वैराग्य, ४. गुरु परंपरा, ५. संत परंपरा. 

संप्रदायाची वीस लक्षणे – १. लेखन, २. वाचन, ३. अर्थांतर, ४. शंकानिरसन, ५. प्रचिती, ६. अर्थभेद, ७. गाणे व कीर्तन, ८. टाळी वाजवणे, ९. नृत्य, १०. प्रबंध, ११. प्रबोध प्रचिती, १२. वैराग्य, १३. विवेक, १४. लोक राजी राखणे, १५. राजकारण, १६. एकाग्रता, १७. प्रसंग जाणणे, १८. उदासीनता, १९. सर्वांशी समानता, २०. रामोपासना

स्वरूप संप्रदाय – स्वरूप म्हणजे सत्य, ज्ञान व आनंद याचे एकत्व. ब्रह्मबोध, ब्रह्मस्थिती किंवा आत्म्याची सत्ता होय. स्वरूपानुभव हे ज्ञानी पुरुषाचे प्रधान लक्षण आहे. परमार्थात त्याला सर्वोच्च स्थान आहे. मनाचा श्लोक ७७ मध्ये “करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे” यात जीवाचे मन सूक्ष्मात गेले की ते भगवत् रूप होते व ते त्याला सर्व प्राणी मात्रात दिसते यालाच “निर्गुण रूप दर्शन” म्हणतात. स्वरूपानुभव आलेला साधक अनासक्त, देहातीत, व्यापक, अलक्षब्रह्मा – ब्रह्माशी लक्ष लावलेला, परब्रह्माशी अनन्य असतो. सकळ धर्मामध्ये स्व-स्वरूपी रहाणे हा उत्तम धर्म आहे.  आठव्या दशकात स्वरूप स्थितीचे चांगले विवेचन आहे. स्वरुपात रहाताना साधक स्वरूपच होऊन जातो. घळीतल्या काकड आरतीत “उठी रे गोपाळा उघडी स्वरूप लोचना” असा चरण आहे. हे ज्ञानचक्षु आहेत. २१ समासीत समर्थ शिष्याला म्हणतात “तू, नि:संग; निर्मळ; आत्मस्वरूप आहेस.” यातील “मी” ची जाणीवही निर्विकल्प समाधीत नाहीशी होते. प.पू. गोंदवलेकर महाराज त्यांच्या ११ डिसेंबरच्या प्रवचनात म्हणतात “भगवंताला सर्व देण्यापेक्षा ‘स्व’ द्यायला शिका. एकदा ‘स्व’ दिल्यावर आपल्या मालकीचे काहीच रहात नाही व मी भगवंताचा आहे ही जाणीव मात्र मनामध्ये कायम राहाते”. प. पू. स्वरूपानंद स्वामी (पावस) म्हणतात “उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर” स्वस्वरूपाचा विचार समर्थ अद्वैत तत्वज्ञानामुळे करतात. या विचाराचे अधिक चिंतन दासबोध ९–२–९, ७–६–४७, ७–१०–२९, ९–८–१६, दशक ८, मनाचे श्लोक १४५, ७७, १७३, व आत्माराम १-४, २-३४, ३-७, ३४, ३५, ५-१६ या समासांमध्ये आढळून येते. 

समर्थ संप्रदायाची माहिती, त्याची वीस लक्षणे, सर्व रामदासी; दासबोध अभ्यासार्थी व सांप्रदायीकांनी अभ्यास करून आचरणात आणायला हवी. संप्रदायाच्या उभारणीसाठी व समर्थ रामदासांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्न करायला हवेत, कारण हे कार्य व विचार कालातीत आहेत. आजही त्यांची गरज आहे. समर्थ रामदासांचे चरित्र असामान्य व अलौकिक आहे. त्यांनी निर्माण केलेला संप्रदाय हिंदू धर्म संस्कृतीचा मानबिंदू आहे. त्याचे भवितव्य उज्वल करणे आपल्या हातात आहे. कल्याण स्वामी म्हणतात, 

“धर्मस्थापना स्थापियेली | न्याय नीतीने भक्ती वाढविली |

संत मंडळी ते निवाली | बहू दास ज्याचे भूमंडळी |

जन्मजन्मांतरी पुण्य कोटी | बहु संचित होते गाठी |

योगीरायाची झाली ज्यास भेटी | त्यास कल्याण होय सृष्टी ||”

|| जय जय रघुवीर समर्थ ||

पंचमहाभूतांची पंचोपासना उत्तरार्ध

पृथ्वी, आप, तेज या तत्त्वांचा विचार आपण पूर्वार्धात केला, आता उर्वरित तत्त्वांचा विचार करूया.

वायूतत्त्व – ‘वा म्हणजे वाहणे. या धातुपासून ‘वात’ शब्द तयार होतो. वैदिक ऋषींनी वायूदेवतेची स्तुती केली. आध्यात्मिक दृष्टीने ‘वायू’ म्हणजे ‘शरीर संचारी प्राण होय’. शब्दाच्या उच्चारात वायू हवा. बोलण्याची इच्छा, मज्जातंतूची चालना, प्राणाची शक्ति, सूक्ष्म नाद व वैखरीतील शब्द असा शब्दाचा प्रवास आहे. वायू किंवा हवेत धुळीचे कण, कोळशाचे कण, बाष्प असते. हवेला वास किंवा चव नसते. ती सुगंध, दुर्गंध पसरवते. परमार्थ दृष्ट्या वायू, शरीर; प्राण व मन या त्रयीत जिवंत ठेवणारी चित्कला आहे. श्रीसमर्थांची मारुती उपासना ही वायू शक्तीची उपासना आहे. वायू मोठा व्यापक कारभारी आहे. वायूच्या योगानेच पंचभूते एकमेकात मिसळतात. वायू प्रथम ब्रह्मांडात प्रगट होतो. नंतर देवदेवतांमध्ये व पिंडात उतरतो. शेष, वायूमुळे पृथ्वी डोक्यावर तोलतो. हनुमान हा वायूचा मुलगा.  दशक ९ समास ८ मध्ये समर्थ ‘वायू’ शब्द शक्ति या अर्थाने वापरतात. विश्वात वायू शक्तीचा खेळ दिसतो. तिच्या स्थिर रूपाने विश्व अनंत काळ टिकते व गतिमान रूपाने विश्वात घडामोडी होतात. शक्ति जाणीव संपन्न आहे. मूळमाया, स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव रूप आहे. वायू मंत्राना सामर्थ्य देतो. ज्ञानेश्वरांनी अचेतन भिंत वायू शक्तीवर चालवली. सच्चिदानंद बाबांच्या कानात वायू फुंकून त्यांना जिवंत केले. आद्य शंकराचार्य व श्रीसमर्थ रामदास वायू वेगाने संचार करत. 

आकाशतत्त्व – आकाशाचे वर्णन करतांना श्रीसमर्थ त्याला ‘महत् भूत’ म्हणतात. ‘महत्’ म्हणजे ‘सर्वांहून मोठे’ आणि ‘भूत’ म्हणजे अनादि, नित्य, सिद्ध वस्तू होय. ब्रह्म ही वस्तू आत्मारूपाने आपल्यात असते व ती स्वत: सिद्ध म्हणून ती सिद्ध करायला कोणत्या प्रमाणाची गरज भासत नाही. सर्व भूतांमध्ये ‘आकाश’ अतिशय सूक्ष्म, विशाल, निराकार व अमर्याद आहे. म्हणून आत्म्याला आकाशाची उपमा देतात व त्याचा अनुभव यायला आपले मन देखील सूक्ष्म, विशाल निराकार व रिकामे बनले पाहिजे. मनाला आत्म्याच्या निकट स्थिर व्हायला मदत करणे, हीच खरी परमार्थ साधना आहे. आकाश, पिंड व ब्रह्मांडात व्यापून आहे. इंद्रियांचे व्यापार त्याच्यामुळे होतात. शरीररूपी आकाशात काम, क्रोध, शोक, मोह व भय ही तत्त्वे असतात. मानवी शरीरातील आकाशाला जीवात्मा म्हणतात. घटाकाश, मठाकाश व महदाकाश या तीन शब्दांनी आकाशाचे वर्णन करतात. 

सूर्य – ‘सूर्य’ शब्दात ‘सृ’ हा मूळ धातू आहे. त्याचा अर्थ ‘गती’. ‘गती’ म्हणजे चालणे, गमन, ज्ञान, मोक्ष, स्थिति अथवा प्राप्ती होय. जो आकाशात गतिशील आहे. बुद्धीला प्रेरणा देणारा अंधार नष्ट करणारा स्थावर जंगमाला जीवन देणारा, सत्याचे व नियमांचे पालन करणारा, तो ‘सूर्य’. भव्यपणा, प्रचंडपणा, चिरंतन प्रकाश, निष्काम कर्म, निस्वार्थी त्याग, समत्व याची साकार प्रतिमा म्हणजे ‘सूर्य’. वैदिक ऋषी सूर्योपासना करत व त्याला जगाचा आत्मा म्हणत. सूर्यापासून ऊर्जा लहरी पृथ्वी पर्यन्त पोहचतात. रोज सूर्य दर्शनाने निरंतर स्फूर्ति वाढते. माणसाच्या शरीरात हृदय, नाडीचक्र व डोळा यावर सूर्याची सत्ता चालते. कौसल्या सूर्याची उपासना करत असे. सूर्यवंशातील सर्व राजे पराक्रमी व सत्वशील होते. श्रीसमर्थ म्हणतात, 

“ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा ।

अगाध महिमा मानवी वाचा । काय म्हणोनि वर्णावी ।।१६-२-१९ ।।”

पंचिकरण – विश्वाची रचना व रहस्य याचा विचार पंचिकरणात आहे. पंचमहाभूतांपैकी एक महाभूत एक जिनसीपणाने सांभाळून त्यात बाकीच्या चार भूतांचा समावेश बरोबरीने सांभाळण्याची कला ईश्वर करतो. जगा व जगू द्या हे तत्व त्यामागे आहे. पिंड व ब्रह्मांडात सर्वत्र व्यपून असलेला स्वयंप्रकाश आत्मा पूर्णतत्व म्हणून ओळखला जातो. दशक १७ स. ८ व ९ मध्ये ८२ तत्त्वांचा विचार आहे. मुळात ही पंचमहाभूते अत्यंत सूक्ष्म, अव्यक्त होती, ती परस्परात मिसळली गेली व व्यक्त झाली. या पाच तत्त्वांचा विकास हाच मायेचा विकास ईश्वरी इच्छेनुसार घडून आला. विवेकसिंधू (डॉ. हरिश्चंद्र बोरकर पृष्ठ ५६) 

तत्त्वझाडा – ‘तत्त्व’ म्हणजे पिंड-ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे कारण होय. ‘तत्त्वनिरास’ म्हणजे माया व अज्ञानाचा अंत व सत्याचा स्वीकार व तत्त्वझाडा स्वरुपाच्या शोधासाठी करतात. शरीर हे तत्त्वांचे गाठोडे आहे, पंचमहाभूतांचे आहे. त्यांना नाश आहे व एक आत्माच अविनाशी आहे. या ज्ञानाने व साधनेच्या अनुभवाने “निर्गुण आत्मा तोचि आपण ।। ६-३-३० ।।” हे सत्य कळते. हे कळल्यावर “तेथें निमाली देहअहंता ।। ६-३-२१ ।।” हा अनुभव येतो व मी म्हणजे देह, श्रीसमर्थ म्हणतात,

“सकळ देहाचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला ।

तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ।। २०-१०-३६ ।।”

व्यापक विचाराने, नारायण असे विश्वी हा विचार पक्का होतो. आनंदाची देवाण घेवाण होते श्रीसमर्थांची रामोपासना व पंचभौतिक उपासना ‘व्यापक व विश्वपाळीती’ होती. श्रीसमर्थ म्हणतात,

“ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना ।

नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ।। १५-९-२९ ।।”

विकल्पाचिया मंदिरी दीप नाही । सदा शुद्ध संकल्प दे आत्मदेही ।

यशस्वी दयानंद कल्याणमस्तु । तथास्तु तथास्तु तथास्तु ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

बुद्धी दे रघुनायका

समर्थांच्या करुणाष्टकातील या करुणाष्टकात “बुद्धी दे रघुनायका” हा चरण २० वेळा आला आहे व यावरून बुद्धी शब्दाच्या अंतरंगात शिरण्याचा मी प्रयत्न केला. समर्थ घर सोडून टाकळीला लहान वयात आले. त्या काळात लग्न, संसार, व्यवसाय ही चाकोरी सोडून जनप्रवाहाच्या विरुद्ध दिशेला त्यांचा प्रवास होता. लोक निंदा करत, हसत त्यांच्या संसार व्यथा सांगत, त्यांचे दारिद्र्य पाहून समर्थांना वाईट वाटत असे. स्वत: वैयक्तिकदृष्ट्या समर्थांना युक्ती, बुद्धी, विद्या नाही, नेटके लिहिता, वाचता येत नाही, उदास वाटते. मन व चित्त एकाग्र होत नाही याबद्दल दु:ख होत होते. स्वतःची व्यथा एका रामाशिवाय कोणाला सांगावी ? त्यामुळे, “मी काया, वाचा व मनाने तुझा झालो आहे. तू अनेक देवांना आपत्तीतून सोडवलेस, मला ही सोडवशील; तू दयाळू; कीर्तिमान आहेस; मी तूझाच आहे या बद्दल संशय वाटत आहे का ?” असा समर्थांनी आत्मारामाशी संबंध साधला व ‘बुद्धी दे’ असा प्रेमळ आग्रह केला.

अंत:करण पंचकात अंत:करण जेव्हा संकल्प विकल्प करते त्याला मन म्हणतात. संकल्प पक्का झाला की निश्चय होतो ती बुद्धी, निश्चयाचे चिंतनात रूपांतर होते ते चित्त, हा संकल्प पूर्ण करण्यासाठी ‘मी करेन’ हा अहंकार ठरवतो. दासबोध किंवा आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास सुरू करण्याअगोदर अनेक विकल्प येतात. त्यात मैत्रिणी, नातेवाईक भर टाकतात. इतक्या वर्षानी लिहिणे जमेल का ? सातत्य राहील का ? एक नाही अनेक विकल्प येतात. ‘बरा निश्चयो शाश्वताचा करावा’ असा निश्चय असेल तर ‘ऐकावे जनाचे’ या न्यायाने आपण स्वत:च निश्चय करतो. विकल्प जातात मन संकल्प करते, बुद्धी निश्चय करते, चित्त चिंतन करते व आपला अहंकार ‘मी करेन’ असा आतून निर्णय देतो. बुद्धीने निश्चय नाही केला तर मन बुद्धीला कुठेही फरफटत नेते व आयुष्य वाया जाते पदरी काहीच पडत नाही. 

भगवत्गीतेत ‘सांख्य बुद्धी’ चा विचार आहे. सांख्य म्हणजे ‘ब्रह्म’. ते जाणणारी बुद्धी म्हणजे ‘सांख्य बुद्धी’ सत् म्हणजेही ब्रह्म, ते जाणणारी बुद्धी म्हणजे सद्बुद्धी. ती दुर्लभ असते. व्यवसायात्मिका बुद्धी ‘ईश्वर निष्ठच’ असते. तिला ईश्वरावाचून दुसरे आधिष्ठानच नसते. सत्वगुणी बुद्धीने आत्म्याचे शुद्ध स्वरूप जाणता येते. ज्ञानेश्वरी २-२७३ मध्ये ज्ञानदेव मन व बुद्धीच्या ऐक्याचा विचार मांडतात. या ऐक्याने निष्काम कर्म होते. त्यातील अहंकार ‘मी केले’ न म्हणता ‘राम कर्ता’ या भावनेत कर्म करतो. निश्चयात्मक बुद्धी, मी म्हणजे देह; देहसुख हे खरे सुख; मी कर्ता; मी भोक्ता; जग सत्य आहे; हे भ्रम नष्ट करते आणि साधकाला मी म्हणजे आत्मा, आत्मसुख हे खरे सुख, राम कर्ता, राम भोक्ता, जग नष्ट होणारे व अनित्य आहे अशा निश्चयाचा विचार करायला शिकवते. बुद्धीचे भ्रम नाहीसे करून अहंकाराचा लय करण्याची कला आत्मसात करण्याच्या प्रयत्नांनाच साधना म्हणतात. शुद्ध मन व शुद्ध बुद्धी अंगी बाणली की सोsहं साधना सोपी होते आणि जागेपणीच मन, बुद्धी, चित्त, अहंकाराचा लय होतो.

दासबोधात द.१ स. १ मध्ये १५ बुद्धी निश्चय करते. निश्चय म्हणजे ‘संशयरहित ज्ञान’. १५ विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धी कार्यरत रहाते. त्यासाठी आपण ‘बरा निश्चयो शाश्वतचा करावा’ हे समर्थ वचन लक्षात ठेवावे लागते. १५ विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी मायोद्भव उपासना, पंचभूतांचे लक्षण अशी ६ लक्षणे मदत करतात. आत्मानात्म विचाराने बुद्धी स्थिर, निश्चळ व शांतपणे विचार करते. समर्थ १५-१०-२९ मध्ये म्हणतात, 

“विचारे निश्चळ झाली बुद्धी । बुद्धीपाशी कार्यसिद्धी ।

पाहातां वडिलांची बुद्धी । निश्चली गेली ।।”

अशी निश्चयात्मक ‘बुद्धी हे देणे भगवंताचे’ असेही समर्थ म्हणतात. 

बुद्धी जेव्हा अहंकाराचा लय करून कर्म करण्याचा निश्चय करते तेव्हा फलाशारहित निष्काम कर्म होते. निष्काम कर्मामुळे कर्माचे कष्ट वाटत नाहीत व चांगलेच कर्म होते. सर्वांच्या हृदयात अंतरात्मा आहे या भावनेत कर्म केले तर ते समत्वबुद्धीने होते व अशा समत्व बुद्धियोगाने सर्वत्र ईश्वरी सत्ता अनुभवता येते. भगवत्गीतेच्या दुसर्‍या अध्यायात हा विचार सविस्तरपणे मांडला आहे. आसक्ती, काम, क्रोध, मत्सर, अविवेक, स्मरणनाश व अखेर बुद्धी नाश असे अध:पतन एका आसक्तीमुळे होते. म्हणून साधकाने या बाबत फार सावध असावे. 

समर्थ रामदासांनी लोक संघटन व लोकसंग्रह केला. अज्ञानी लोकांच्या श्रद्धांना त्यांनी कधीच धक्का लावला नाही. स्थानिक देवतांनाही योग्य स्थान उपासनेत दिले. त्यांची खंडोबाची सवाई व आरती प्रसिद्धच आहे. त्यांनी बुद्धीचे वैभव संपादन केले पण नि:स्पृह वृत्तीने अनुभवाचे ब्रह्मज्ञान सामान्यांना दिले. आत्मज्ञान, पाठांतर, देहातील तत्वांचे विवरण याची तर्कसंगत मांडणी करून लोकांच्या मनातील वैचारिक गोंधळ नष्ट केला. त्यासाठी ‘बुद्धी दे रघुनायका’ असे मागणे मागितले. 

दृढ होता अनुसंधान । मन झाले उन्मन ।

पाहो जाता माया नासे । द्वैत गेले अनायासे ।

होता बोधाचा प्रबोध । झाला शब्दाचा नि:शब्द ।

ज्ञान विज्ञान झाले । वृत्ती निवृत्ती पाहिले ।

ध्यान धारणेची बुद्धी । झाली सहज समाधी ।

रामी रामदास वाच्य । पुढे झाले अनिर्वाच्य ।। उन्मत पंचक  ४ ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language