महाकारणदेह

आता आपण महाकारण देह बघूया. जेव्हा मनुष्य देहातच माणसाला आत्मज्ञान होते, ते जागृत असे आत्मज्ञान त्याला महाकारणदेह असे म्हणतात. आत्मज्ञान होण्यासाठी समर्थ चार पायऱ्या सांगतात. श्रवण, मनन, निधीध्यासन आणि रोकडा आत्मसाक्षात्कार. आपण बघितले की, ज्ञानाचा विचार फार सूक्ष्म आहे. आणि तो जितका सूक्ष्म आहे, तितकाच त्यावर मनन करण्यासाठी सूक्ष्म विचार करावा लागतो. आपण परमार्थात आत्मस्वरूपावर विचार करतो, तेव्हा असे लक्षात येते की, अंतरात्मा हा युगानयुगे विश्व चालवत असतो. त्यासाठीच जगातील मोठे-मोठे पुरुष, संतमहात्मे जगले. अंतरात्मा जर नसेल तर सारे व्यर्थ जाते. म्हणूनच तर सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. जो अत्यंत मननशील आहे, विवेकसंपन्न आहे, त्याला पंचभूतांच्या पलीकडे स्वतःपाशीच तो आत्मा सापडतो. त्यासाठी सूक्ष्मात शिरणे फार गरजेचे आहे. पण या मायेच्या गुंत्यामुळे सूक्ष्मामध्ये लक्ष गुंतवणारी माणसे फार कमी असतात. कारण हा अंतरात्मा फार सूक्ष्म आहे आणि आपला देह तर अत्यंत जड आहे. अंतरात्मा हा खरा देव आहे. माणसाला दृश्याचे आकर्षण असते, पण दृश्य हे नाश पावणारे आहे. त्यामुळे हा लोक आणि परलोक दोन्हीही मिळत नाही. सगळ्या कल्पना बाजूला सारून स्वच्छ ब्रह्माचाच शोध घ्यावा. आपण सारखे बघत आहोत की, तत्त्वज्ञानापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आत्मज्ञान झाले की मूळमायेपर्यंत जाता येते. प्रथम स्फुरण आढळते. त्या संकल्पाला उपासनेच्या सहाय्याने मिठी मारावी.

“उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो ।

उदंड केलें तरी तो जयो । प्राप्त नाहीं ।। १६-१०-२९ ।।”

उपासनेत मी उपासक असतो आणि अंतरात्मा उपास्य असतो. मी अंतरात्म्याशी तदाकार झालो की, उपासना फळास आली असे समजावे. आता अंतरात्म्याच्या पलीकडे अगदी एकरस निर्गुण, निर्मळ व निश्चळ परब्रह्म आहे. येथून तेथ पर्यंत ते ब्रह्म सगळीकडे दाट भरलेले आहे. समर्थ म्हणतात, ते नाही अशी जागाच नाही. सर्व प्राण्यांना ते सर्वकाळ भेटते. सर्व पदार्थांना ते आतबाहेर व्यापून आहे, लागून आहे, सर्व ठिकाणी व्याप्त आहे. ब्रह्म सर्वत्र आहे आणि श्रेष्ठ पण आहे. पण ते कसे आहे ? तर ते सूक्ष्मातिसूक्ष्म असे आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला बघितले, तसा सूक्ष्म विचारच करावा लागतो. याठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, जेव्हा साधक आत्मनिवेदन करतो तेव्हा, त्याचा “मी” नष्ट होतो आणि त्याला खऱ्या मी चे दर्शन होते. यासाठी फार सुंदर ओवी आहे.

“आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती ।

तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ।। ८-८-१० ।।”

यावरून आपल्या असे लक्षात येते की, “मी” चे विसर्जन फार गरजेचे आहे. अनेकजण भक्ती करताना नकळत स्वतःच्या अहंकाराची जोपासना करीत असतात. त्यातून देहबुद्धीच घट्ट होत जाते. समर्थांनी आपल्याला पुन्हा पुन्हा “देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी” असे सांगितले आहे. पण असे आहे की, फारच थोडे साधक अहंकाराचे विसर्जन करून उपासना करतात. अशांनाच आत्मदर्शन घडते. म्हणून भगवंताने लक्षावधी लोकांमध्ये एखाद्यालाच मी प्राप्त होतो असे म्हटले आहे.

“मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।। भ. गीता ७-३ ।।”

आत्मदर्शन म्हणजे काही शाब्दिक संकल्पना नाही. ती प्रत्यक्ष अनुभूती आहे. त्यासाठी बुद्धी संपूर्ण नाहीशी झाली पाहिजे आणि मी स्वतःच भगवत्स्वरूप आहे अशी ठाम धारणा झाली पाहिजे. नदी समुद्राला मिळाल्यावर वेगळी दाखवता येत नाही. तसेच साधक एकदा भगवत्स्वरूप झाला की, भगवंतापेक्षा वेगळा रहात नाही. असे अद्वैत साधल्या शिवाय खरे आत्मनिवेदन घडत नाही. यासाठी समर्थांनी एक फार सुंदर दृष्टांत दिला आहे. सगळे सैन्य मेल्यावर राजेपद प्राप्त झाले तर यात काय अर्थ आहे ? सैन्य असतानाच राजेपद असणे महत्त्वाचे. कारण सैन्याच्या सहाय्याने सत्ता गाजवून राज्य करावयाचे असते. तसेच माया अस्तित्वात असताना मायेवर मात करून मुक्ती मिळवायची असते. अज्ञानामुळे आपल्याला मायेचा धाक वाटतो. जोपर्यंत दोरी वरती सापाचा भास होत असतो, तोपर्यंत सापाची भीती वाटते. परंतु एकदा साप नसून दोरीच आहे, हे लक्षात आल्यावर दोरीची अडचण दूर होते. त्याचप्रमाणे आत्मदर्शन झाले की, मायेचा पडदा दूर सारला जातो. ग्रंथराज दासबोधात दशक आठ समास आठ ओवी क्रमांक ६१ ते ७० मध्ये आत्मदर्शनाचे फार सुंदर वर्णन समर्थ करतात. आत्मस्वरूप मुळात देहातीत आहे. देहबुद्धीमुळे आत्मा स्वतःला देह समजतो. आत्मदर्शन होते तेव्हा, हे वाटणे बंद होते. अशी आत्मस्वरूपाची जाणीव म्हणजेच महाकारण देह होय.

याच सूत्रानुसार परब्रह्माला मी एकमेव “परब्रह्म” आहे हे स्फुरण होते. असेच स्फुरण होते असे मानल्यास, त्या जाणीवेला ब्रह्मांडाचा महाकारणदेह म्हणावे लागते. या स्फुरणालाच मूळमाया म्हणतात. परब्रह्म स्वरूपाशी संत तदाकार झालेले असतात. त्यामुळे त्यांना जेथे तेथे एकचएक घनदाट, निर्मळ, निष्चळ, निर्गुण आणि गगनासारखी वाड अशी चिन्मय वस्तू प्रचितीस येते. कारण त्यांनी ईश्वराची कृपा प्राप्त करून घेऊन शुद्ध परब्रह्म प्राप्त केलेले असते. महाकारणदेहाच्या पलीकडे केवळ ब्रह्म असते. ईश्वराला त्याच्या स्वरूपाचे स्फुुरण सुद्धा नसून ते त्यांच्या अनादी निर्गुण मूळ स्वरुपात असतात.

अशा अवस्थेत ब्रह्मांडाच्या चारही देहाचा निरास झालेला असतो आणि यालाच परमात्मा म्हणतात. आणि याच अवस्थेला पिंडाच्या संदर्भाने अंतरात्मा म्हणतात. माणसाचे सर्वश्रेष्ठ जीवनध्येय काय आहे ? तर अनात्म्यास विन्मुख होऊन आत्मस्वरूपास सन्मुख होणे हे आहे. समर्थ सांगतात, मानव शरीर म्हणजे ब्रह्मांडवृक्षाचे उत्तम फळ आहे. आपल्याला आत्मस्वरूप जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण साधकाची भूमिका कशी असावी ते बघूया. तर ती भूमिका विश्वस्तांची असावी. त्याला वस्तूचा वापर योग्य प्रकारे करता येतो, पण दुरूपयोग करता येत नाही. आपल्याला मिळालेल्या सर्वच वस्तू आपण भगवंताचे विश्वस्त म्हणून सांभाळायला हव्यात. स्वामी विवेकानंद कर्मयोगात छान सांगतात. ते म्हणतात, “मुलगा असू द्या पण माझा मुलगा म्हणू नका, रामरायाचा  म्हणा. घर असू द्या पण माझे घर म्हणू नका, रामरायाचे म्हणा. पावसचे स्वामी स्वरूपानंद एका अभंगात म्हणतात,

 

“धन सूतसुत  दारा । असू दे पसारा ।

चित्ती त्यासी थारा ।देऊ नको ।।”

हेच जड आत्मनिवेदनाचे रहस्य आहे. माझ्या अंतर्यामी  परमात्मा आहे. त्याप्रमाणे तो सर्वांच्या अंतर्यामी आहे. आणि तोच खरा परमात्मा आहे. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती स्थूल देहाच्या जागृती मध्येच सर्व क्रिया घडत असतात. सूक्ष्मदेहाच्या स्वप्नावस्थेत मनाचे चलनवलन होत असते. कारणदेहाच्या सुषुप्तीमध्येच अज्ञानात वासना रहात असते. महाकारणदेहाच्या तुर्यावस्थेत शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होत असते. या सर्व अभ्यासातून आपल्या लक्षात येते की, स्वयंप्रकाश, आनंद स्वरूप अंतरात्मा आपणच आहोत. हे सारे लक्षात घेऊनच आपल्या दृष्टीसमोर, आपल्या प्रयत्नांमध्ये मोक्ष प्राप्तीचेच ध्येय असावे.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

कारणदेह

स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण ।

जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तुर्या जाणावी ।।

स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे चार देह आहेत. कारणदेह म्हणजेच अज्ञान होय.  

आत्मानात्मविवेक करावा । करून बरा विवरावा ।

विवरोन सदृढ धरावा । जीवामध्यें ।। १३-१-१ ।।

साधकाने आत्मानात्म विवेक करावा. आपण जगात अनंत शरीरधारी प्राणी बघतो. विवेकाने हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या असे लक्षात येते, की प्राणी म्हणजे देह व आत्मा यांचा संयोग होय. देह हा दृश्य, जड व अनित्य आहे. म्हणजे हा स्थूल  देह, जो आपण पहात असतो. आत्मा मात्र सूक्ष्म व नित्य असतो. कारणदेह हा अज्ञानाचा आहे. आपण जगामध्ये दोन प्रकारची माणसे पहातो. ज्ञानी माणसे आणि अज्ञानी माणसे. अज्ञानी माणसे ही आत्मविन्मुख असतात. मुमुक्षु, साधक हे आत्मसन्मुख असतात. भोगवादी विचारवंत जगाला संपूर्ण सत्य समजतात. भोगवादामध्ये माणसाच्या देहाला अति महत्त्व असते. हाच कारणदेह होय. कारण देहाच्या द्वारेच जगामधील सारे भोग भोगणे शक्य होते. देहासारखे दुसरे विलक्षण यंत्र नाही.

आपल्या देहाचा नीट उपयोग करून माणूस आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. पण कारणदेह समजणारी माणसे अज्ञानी असतात. ग्रंथराज दासबोधातील पहिल्या दशकातील दहावा समास ‘नरदेह स्तवन’ हा आहे. ‘देह म्हणजे मी’ असे तो समजत असतो. कारणदेहाचा माणूस कसे वर्तन करतो ? हे आपण ‘दुश्चित निरूपण’ समासातून जाणून घेण्याचा प्रयत्न पुढे करणार आहोत.

स्थूलदेह प्रत्यक्ष कार्य करीत असतो. मनोमय असणारा सूक्ष्मदेह सतत संकल्प विकल्प करीत असतो. वासनात्मक असणारा लिंगदेह अज्ञान आवरणामध्ये असतो. आता अज्ञान कोणते आहे ? तर मी देह आहे हेच अज्ञान, म्हणजेच कारणदेह.  तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्धसत्व गुण आपण बघितले. स्थूल देहामध्ये तमोगूण असतो, तर मनोमय असणाऱ्या सूक्ष्म देहामध्ये रजोगुण असतो. आता शबलसत्व गुण हा कारण रूप असणाऱ्या अज्ञानात असतो. शुद्धसत्व गुण मात्र आत्मज्ञानाने अनुभवास येतो. कारण देहाच्या सुषुप्ती मध्ये अज्ञानात वासना रहात असते. आपल्या जन्म-मरणाच्या फेऱ्यात अडकण्याला, कारणदेह कारण आहे. वासनाच सगळ्या सुख-दुःखाला कारण आहे. ‘देह म्हणजेच मी’ असे समजण्याबरोबर आपण मनालाही ‘मन म्हणजे मी’ आणि बुद्धीलाही मी असे समजतो. प्रत्येक दिसणारी गोष्ट मला हवी असते, मला पैसा हवा असतो, तो कशासाठी तर उपभोगासाठी. पण मी तर यापैकी मन-बुद्धी काहीच नाही. पण ते अज्ञानामुळे कळत नाही. त्यासाठी त्यागमय जीवन जगणे खरे तर क्रमप्राप्त आहे. 

प्रत्येकाजवळ व्यवहारी बुद्धी, कुशल बुद्धी, तैलबुद्धी असते. जो तो त्यांच्या त्यांच्या व्यवसायामध्ये पारंगत असतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात सुखाचा काळ प्राप्त व्हावा, असे वाटत असते. मानवी जीवनात सत्शील  व्यवहार करणे फार कठीण गोष्ट आहे. त्याचे कारण असे आहे की, मानवी जीवनात व्यवहार करताना, तो भेद बुद्धीनेच करावा लागतो. आणि जीवनात तसे प्रसंगही येत असतात. सुखी प्रपंच आणि समाधानी परमार्थ याची कधीतरी सांगड घालता येते. पण सुखी प्रपंच आणि समाधानी परमार्थ या दोन्ही गोष्टींची योग्य अशी तुलना करता येत नाही. कारण मनुष्याने स्वखुशीने प्रपंचाची बांधिलकी स्वीकारलेली असते. 

“या संसारी सुख देखिले । ऐसे पाहिले ना ऐकले”

सर्वसामान्य मनुष्य प्रापंचिक बंधनामध्ये सापडला म्हणजे त्याला पारमार्थिक सुख दुर्गम ठरते. कारण माणसाच्या ठिकाणी दुश्चितपणा असतो. समर्थ म्हणतात, “दुश्चितपणामुळे मानवाच्या जीवनाची नासाडी होते.” कशी ? तर, त्यामुळे कार्याचा नाश होतो. माणूस सतत चिंता करीत असतो. सदैव काळजी लागते आणि कोणत्याही गोष्टीचे धाडस, स्मरण राहत नाही. मनाचा निश्चय नाही. कुठल्याच कार्यात यश नाही. त्यामुळे आत्महिताचाही क्षय होतो. ही सारी लक्षणे आपण बघितली की, कारणदेह म्हणजेच देहबुद्धी. थोडक्यात काय ? तर अंत:करणात भरून असणारे ईशनिर्मित असे एक अज्ञान किंवा अविद्येचे आवरण आहे असे मानतात. त्यामुळे आत्मस्वरूप आपल्या आत असूनही अज्ञानी माणसाला जाणवत नसते. ते जाणून घेण्याची त्याची इच्छा पण नसते. 

“तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी” या अज्ञानालाच कारणदेह असे नाव आहे. गाढ झोपेत सर्वांना अनुभवास येणारे अज्ञान हाच शास्त्रात म्हटलेला कारणदेह. काही साधकांना एकांतात मन निर्विचार किंवा कोरे करताना मनातील सर्व संकल्प गेल्यावर, पोकळीचा म्हणजे काहीच नाही असा अनुभव येतो. तिला ‘शून्य अवस्था’ म्हणतात. हा अज्ञानाचा म्हणजेच कारणदेहाचा प्रत्यय असतो. अज्ञानामुळेच सृष्टी खरी वाटून त्यातून विक्षेप रूप म्हणजेच भेदरुपी विश्व, जागृती, स्वप्न या अवस्था भासू लागतात. त्यामुळेच त्याचे नाव ‘कारणदेह’ असे आहे. मूळ अज्ञान किंवा माया हेच कारणदेहाचे स्वरूप आहे. या देहाला अव्याकृत किंवा ईश्वर म्हणतात. ही ईश्वराच्या झोपेची म्हणजेच प्रलयाची अवस्था आहे. वासनांची अनंत बीजे कारणदेहाच्या आधाराने टिकून असतात. जाग येताच आपण त्या वासनांनुसार हालचाली करतो. विश्वाचा प्रलय होतो, तेव्हा सर्व जीव बीज रुपाने म्हणजेच ‘संस्कार’ रूपाने या कारणात दडलेले असतात. विश्व पुन्हा निर्माण होते, तेव्हा ते या बीजापासूनच निर्माण होते. शास्त्र सांगते की, जेव्हा सर्व जीवांच्या वासना फल देण्यास पक्व होतात, म्हणजे तयार होतात, तेव्हा परत विश्वाची उत्पत्ती होते. ‘ग्रंथराज दासबोधा’ तील कारणदेहाचा विचार आपण पहात आहोत. अज्ञानाला कारणदेह असे म्हणतात. मूळ अज्ञान किंवा माया हेच याचे स्वरूप आहे. 

जेव्हां सद्गुरूंचा उपदेश या कारण जीवाला होतो तेव्हां,  त्याचे अस्तित्व काय आहे ? आणि ते किती क्षणभंगुर आहे ? याचे आकलन जीवाला होते. ते झाले की जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. आपण बघितले की, हा कारणजीव मायेच्या जाळ्यात पूर्ण अडकतो. त्याचा देह हाच त्याला खरा वाटू लागतो. समर्थ म्हणतात, “देह मी वाटे ज्या नरा ।  तो जाणावा आत्महत्यारा ।।” हा कारणदेह अज्ञानामुळे वासना नदीच्या महापुरात उडी घेतो. तो बुडण्याच्या स्थितीत येईपर्यंत भान येत नाही. कारण तो स्वतः अज्ञानी असल्याने, गर्वाने फुगलेला असतो हेच खरे !  नश्वर देहाची किंमतच काय आहे ? हा अज्ञानी जीव जेव्हा ज्ञानाचा फाजील अभिमान बाळगतो, तेव्हा समर्थ त्याला विचारतात,

“थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।

शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ।। १५-८-३५ ।।”

असंख्य योनींमध्ये हा जिवात्मा देह धारण करून रहात असतो. जसे लहान-सहान जीव-जंतू चिखलामध्ये, घाणीमध्ये जन्माला येतात; देह रुपाने त्या घाणीमध्येच वावरतात; आणि एक दिवस त्या घाणीमध्येच मरून जातात. अशा या बुद्धिहीन गलिच्छ जीवाला कोणते जीवन म्हणावे ? मनुष्याने या साऱ्या गोष्टी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या असतात. तरीही मनुष्य सावध होत नाही, ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे ! परमेश्वराने मनुष्याला विचारशक्तीचे सामर्थ्य दिले आहे. त्या विचारशक्तीचा विवेकाने उपयोग करून, आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सूक्ष्मदेह निरूपण

आपण प्रथम स्थूल देहाचा विचार केला. आपण बघितले की आपला देह हे ब्याऐंशी तत्त्वांचे गाठोडे आहे. त्याला चेतना देणारा कोणीतरी आहे.

तो कोण ? तर आत्मा होय. 

आत्मा देहामध्यें असतो । नाना सुखदुखें भोगितो ।

सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ।। दा. १७ -६-१ ।।

या जीवात्म्याने सर्वप्रथम देहाचा आधार घेऊन या विश्वामध्ये उघड प्रवेश केला आहे. आता हा आत्मा कुठे असतो ? तर तो देहात असतो. तो सूक्ष्म आहे, दिसत नाही; पण असतो हे निश्चित. देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर । आता आपण सूक्ष्मदेहाचा विचार करणार आहोत. सूक्ष्म देहात अंत:करण, मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांचा समावेश होतो. सूक्ष्मदेह समजण्यासाठी मन पण सूक्ष्मात शिरले पाहिजे. त्यासाठी श्रीसमर्थांनी मनाचे श्लोक म्हणजे मनोपनिषद रचले. आपल्याला या संसारात राहूनच आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे. श्रीसमर्थ दासबोधाच्या सहाव्या दशकात सांगतात की,

जो जनामधें वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे ।

ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधु ।। दा. ६-१-१८ ।।

आपण पहातो की माणसाला जेव्हा आत्मज्ञान होते, तेव्हा स्थूल देहातील त्याच्या साऱ्या वासना, अहंकार नष्ट होतात. असे घडले की, असा माणूस काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, स्वार्थ, मोह,भय, चिंता, प्रपंचाची आसक्ती या दोषापासून मुक्त होतो. त्याला मनन-चिंतनाने, साधनेने सूक्ष्मदेह कळलेला असतो. या सूक्ष्म देहाची पंचवीस तत्त्वे आता आपण बघूया. त्यांना अंत:करण पंचक असे म्हणतात. हे अंत:करण पंचक समजून घेण्यासाठी आपण ग्रंथराज दासबोधातील ओव्यांचा आधार घेऊ या.

निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण ।

तें जाणावें अंत:कर्ण । जाणती कळा ।। दा. १७-८-४ ।।

आपण उगीच बसलो असता सहज एखादी आठवण व्हावी/स्फुरण व्हावे. अंत:करणात स्फुरण झाले पण काम होईल की नाही, अशी स्थिती असणारे मन. कारण, मन हे कायम संकल्प-विकल्प करीत असते. या मनाला योग्य निर्णय करून देणारी बुद्धी विवेकाने निर्णय योग्य प्रकारे देते. अंत:करण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या पाच तत्त्वांचा संबंध सतत अंतरात्म्याशी असतो. यांना मिळून सूक्ष्मदेह म्हणतात. हा सूक्ष्मदेह मुळात शुद्ध स्वरूप आहे. त्याला कशाचाही लेप नाही. तो निर्लेप, निर्गुण, निराकार असा आहे. 

आत्मा आत्मपणें असतो । देहसंगें विकारतो ।

साभिमानें भरीं भरतो । भलतिकडे ।। दा.१७-७-२ ।।

मुळामध्ये पाणी हे स्वच्छ, शुद्ध, पारदर्शी असेच असते. पाण्याला रंग नाही किंवा चवही नाही. ज्या योनीतील जीवाशी त्या पाण्याचा घनिष्ठ संबंध येतो, त्याप्रमाणे त्या पाण्याचा गुणधर्म बदलत असतो. ज्या वनस्पतींमध्ये ते पाणी असते, त्याप्रमाणे ते पाणी आम्ल, तिखट, खारट, कडू अथवा गोड असते. स्वच्छ असणाऱ्या पाण्यावर संगतीचा परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक देहात असणाऱ्या जीवात्म्यावर देहादी संगतीचा परिणाम होतो, पंचभूतांचा परिणाम होतो तसाच तो निसर्गाचाही होतो. स्वकर्माचा, आहार-विहाराचाही परिणाम होतच असतो. आपण बघतो की पृथ्वीच्या पाठीवर असणारे स्वच्छ पाणी उसामध्ये रस स्वरूपात वाहू लागले, की त्या रसामध्ये अमृतासारखी मधुर गोडी असते. त्या गोडीपासून समाधान प्राप्त होते. याउलट तेच पाणी डोंगरातील विषारी वनस्पतीमध्ये, वृक्ष-वेलींमध्ये विष म्हणून वाढते. केरळमध्ये एका झुडपाला अगदी आंब्याच्या कैरीप्रमाणे फळे लागलेली पाहिली. विचारल्यावर कळले की ही फळे सुंदर दिसत असली तरी भयंकर विषारी आहेत. विष अनेकांच्या जीवनाचा घात करीत असते. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व जीवन पाणी म्हणूनच आहे. पण त्या पाण्यावर संगतीचा परिणाम होत असतो. 

उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दुःख ।

आनंद सांडुनियां शोक । कैसा घ्यावा ।। दा.१७-७-१७ ।।

मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जाणत्याची संगती धरून, सुखाच्या प्राप्तीचा प्रयत्न करावा. संगतीचा परिणाम एखाद्या जड वस्तूवर होतो, त्याचप्रमाणे चैतन्यावरही होत असतो. जड वस्तूला सुख अथवा दुःख, बरे अथवा वाईट हे काही कळत नाही. तसेच ते सांगताही येत नाही. पण जीवात्म्याला मात्र या सुखदुःखाचा अनुभव नेहमी येत असतो. हे सारे कशाच्या आधारे घडते ? तर मनामुळे घडते. आणि गंमत अशी आहे की मनाचे अस्तित्व भासमान आहे. श्रीसमर्थांनी तर आत्माराम या ग्रंथांमध्ये मनालाच माया म्हटले आहे. संत ज्ञानेश्वर तर मनाचे अस्तित्वच नाकारतात. ते म्हणतात,

वायां मन हें नांव । एऱ्हवीं कल्पनाचि सावेव ।

जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ।। ज्ञा. १३-११० ।।

सतत कल्पना करीत राहिल्यामुळे शरीर तयार झाले व त्यात आत्म्याचे प्रतिबिंब पडून जीवदशा प्राप्त झाली. वासनेमुळे शरीर निर्माण होत रहाते. स्वामी विवेकानंद म्हणतात, “मन, विचाराच्या द्वारे शरीर तयार करते.” मन आणि विचार सारखे बदलत असतील, तर मग त्यातील कशाला आपले खरे अस्तित्व मानायचे ? मनाचे अस्तित्व सगळेच संत नाकारतात आणि अंत:करण पंचक केवळ मानसिक आहे. अंत:करण पंचक म्हणजे काही खरे अस्तित्व नाही. जाणिवेला अंत:करण असे म्हणतात. संतांच्या जीवनात अंतःकरणाचा सर्वात जास्त विकास आपण बघतो. आपण सूक्ष्म देहाचा विचार बघत आहोत. त्यासाठी आपण एक दृष्टांत बघूया. मुळात जल आहे म्हणून तरंग आहे. मुळात धातू आहे म्हणून सोने व अलंकार हे दोन्ही आहेत. तसा, अघटित घटना पण सर्व कर्ता जो ईश्वर आहे, म्हणून ही सृष्टी आहे. अद्वैत व द्वैत दोन्ही भेद शब्दच आहेत. पण अनंत शक्तिमान भगवंत आहे म्हणूनच सर्व भेद कल्पना उपजल्या. कार्य त्याचे साधन व कर्तुत्व यास त्या मूळ पुरुषाचीच अनंत, अचिंत्य प्रकृती मूळ माया आहे. या मूळ मायेची ही सर्व निर्मिती आणि हा सारा तिचाच खेळ आहे. मूळ माया आणि मूळ पुरुष एकच आहेत. व्यासादिक सर्वच ऋषींनी आपल्याला सांगून ठेवले आहे की, आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मुख्य अविनाशी आत्मा ओळखणे महत्त्वाचे आहे. आत्मा हा साक्षी आणि वेगळाच आहे. आकाश जसे एकच तसा आत्माही एकच आहे. उपाधी भेदाने वेगळेपण भासते. संतांच्या मुखाने असे निरूपण ऐकून हे ज्ञान ज्या क्षणी होते, त्या क्षणीच मोक्ष होतो. ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थ म्हणतात,

ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।

पाहावें आपणासि आपण । या नांव ज्ञान ।। दा.५-६-१ ।।

परमात्मभाव अखंड असतो, संलग्न असतो. सूक्ष्मदेह हा चिरंतन आहे. त्यासाठी आपण विवेकाने हे सर्व जाणून घेत आहोत. सूक्ष्म देहाचे चिंतन करीत असताना, एक गोष्ट आपल्या लक्षात आली की, आत्मा हा कृष्णाचा शाश्वत अंश आहे. तसा गीतेतील पंधराव्या अध्यायात श्लोक आहे –

ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन: ।

मन:षष्ठानीन्द्रियाणि प्रक्रृतिस्थानि कर्षति ।। १५-७ ।।

माझा शाश्वत अंश जीव म्हणून या मर्त्य जगात जन्म घेतो. त्याला पाच इंद्रिये मिळतात. आणि सहावे इंद्रिय म्हणजे मन. हे सर्व भौतिक प्रकृतीत वास करतात. याच अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात भगवंत स्पष्टपणे म्हणतात की, मी सर्वांच्या हृदयात निवास करतो. माझ्यापासून ज्ञान, स्मृती आणि मोह उत्पन्न होतो. खरोखर वेद आपल्याला जाणू इच्छितात. तो केवळ मीच आहे, मी वेदांताचा कर्ता आहे आणि  वेदज्ञही  आहे. हा सगळा विचार पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, विवेकाच्या जोरावरच या प्रकृतीचा निरास होऊ शकतो. देहबुद्धी कमी होते. आणि आत्मबुद्धी जागृत झाल्याखेरीज परमात्मा स्वरूप आकलन होत नाही. म्हणजे आत्मज्ञान आत्मसात होत नाही. 

या कारणें ज्ञाना समान । पवित्र उत्तम न दिसे अन्न ।

म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ।। दा. ५-४-३२ ।।

सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश ।

येविषईं जगदीश । बहुतां ठाईं बोलिला ।। ५-४-३३ ।।

हा आत्मज्ञानाचा उपदेश अंत:करणात रुजला तरच सूक्ष्मदेह आकलन होऊ शकेल.

स्थूल देह

आपण प्रत्येक प्राणीमात्रांची जी शरीरे बघतो ती सर्व हात, पाय, कान, नाक, डोळे वगैरे सर्व अवयवांनी तयार झालेली असतात. ती सारी स्थूल शरीरे म्हटली जातात. माणसाचे शरीर हे ब्याऐंशी तत्त्वांचे गाठोडे आहे. यातील प्रत्येक तत्त्व जड आहे. म्हणजेच त्या तत्त्वाला स्वतंत्र अशी चेतना नाही. उदाहरणार्थ – माझा हात जोपर्यंत माझ्या शरीराशी जोडलेला आहे, तोपर्यंत तो हालचाल करू शकतो. तसेच माझे इतर अवयवांचे आहे. माझा हात, माझा पाय, किंवा इतर कोणताही अवयव जर माझ्या शरीरापासून वेगळा केला, तर तो हालचाल करू शकणार नाही. किंवा त्याला संवेदना प्राप्त होणार नाही. वेगवेगळे स्पेअर पार्ट्स जोडून एखादी स्कूटर तयार करावी, त्याप्रमाणे माझे शरीर म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांची जोड आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचभूतांचे पंचवीस गुण मिळवून स्थूलदेह बनतो. या स्थूल देहाची पंचवीस तत्त्वे अशी आहेत. 

पहिले भूत पंचक : यामध्ये आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी येतात. 

दुसरे विषय पंचक : यामध्ये स्पर्श, रूप, शब्द, रस, गंध ही पाच तत्त्वे येतात.

तिसरे अंत:करण पंचक : यामध्ये प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही पाच तत्त्वे येतात.

चौथे प्राण पंचक : यात व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण ही पाच  तत्त्वे येतात. 

पाचवे ज्ञानेंद्रिय पंचक : यात  कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही पाच तत्त्वे येतात. कर्मेंद्रियात वाणी, हात, पाय, जननेंद्रिय व गुद अशी पाच तत्त्वे आहेत. 

आपण आपल्या स्थूल देहाचा विचार करीत आहोत. हे सारे दृश्य जगत पंचभूतांनी नटलेले आहे. आणि आपले शरीरही या जगताचाच एक घटक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाच महाभूते आहेत. अर्थात जे माता-पित्यांच्या रज-वीर्यापासून उत्पन्न होत असते, त्याला स्थूल शरीर म्हणतात. याचे दुसरे नाव अन्नमय कोश आहे. कारण हे अन्नाच्या विकारापासून उत्पन्न होत असते आणि जिवंत रहाते. म्हणून हे अन्नस्वरूपच आहे. इंद्रियांना विषय असल्याने हे शरीर “इदम” असे म्हटले जाते. मनुष्याला यापासूनच बुद्धीपर्यंतचे ज्ञान होते. परंतु बुद्धीच्या पुढील ज्ञान होत नाही म्हणून त्याला अज्ञान म्हणतात. श्रीमद् भगवद्गीतेत या शरीराला क्षेत्र म्हणजे शेत म्हटले आहे. जसे शेतात निरनिराळी बीजे पेरून पिके घेतली जातात, तसेच या मनुष्य शरीरात अहंता; ममता धारण करून जीव अनेक प्रकारचे कर्म करीत असतो. त्या कर्माचे संस्कार जेव्हा फळाच्या रूपात प्रकट होतात, तेव्हा देवता; पशु; पक्षी; कीटक; पतंग; इत्यादी शरीरे मिळत असतात. शेतात आपण जसे बीज पेरू तसे धान्य उत्पन्न होते. त्याचप्रमाणे शरीराने जशी कर्म केली जातात, त्यानुसार  शरीर; परिस्थिती; इत्यादी प्राप्त होतात.

तात्पर्य, या शरीरात केलेल्या कर्मानुसारच हा जीव वारंवार जन्म-मरणरूपी फळ भोगत असतो. प्रत्येक निर्मित वस्तू कालबद्ध असल्यामुळे ती सतत बदलत असते, गतिमान असते; ती तिच्या विनाशाकडे हळूहळू जात असते. सतत परिवर्तन हे तर विश्वाचं स्वरूपच आहे. वस्तूमध्ये अनेकत्व असतंच. ह्या विश्वात अगणित नामं आणि रूपं आहेत. आता हे सर्व आपल्या शरीराला लावून पाहायचं आहे, कारण या शरीराला “इदम” म्हटलं आहे. आपण आपल्या शरीराला मात्र “अहं”, “मी” किंवा मम म्हणजे माझं असं समजत असतो. तसं पाहिलं तर हे पुस्तकही माझं आहे, पण ते मी आहे असं मला कधी वाटत नाही. त्या पुस्तकाची सुखदुःख ती माझी  नाहीत. कुठलीही वस्तू खराब झाली तर आपण तिचा सहज त्याग करतो. मग शरीर माझं आहे, त्याचं दुखणं हे माझं दुखणं; त्याला भूक लागली की मला भूक लागली; असं मला का वाटतं/ पटतं? कारण ते नुसतं माझं नाही तर ते म्हणजे मीच आहे, अशी माझी ठाम समजूत आहे. शरीराला वेगळे पहाणे हे फार महत्त्वाचे आहे. असे पहाणे फक्त साधकासाठी नाही तर प्रत्येक मनुष्यमात्रासाठी आवश्यक आहे. कारण स्वतःचा  उद्धार करण्याचा अवसर फक्त मनुष्य शरीरातच आहे.

आता आपल्याला या स्थूल शरीराच्या माध्यमातून सूक्ष्म असणारा अंतरात्मा जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी या स्थूल देहाचाच आधार घ्यायचा आहे. आपण सुरुवातीलाच बघितले की, आपले शरीर मग ते स्थूल असो वा सूक्ष्म असो, तत्त्वांचे गाठोडे आहे. आणि ही सारी तत्त्वे जड आहेत. याचा अर्थ असा आहे की, या साऱ्या तत्त्वांना स्वतंत्र जाणीव नाही, चेतना नाही. आपला प्रत्येक अवयव जोपर्यंत शरीराशी जोडलेला आहे, तोपर्यंतच तो कार्य करू शकतो. यातील कोणताही अवयव जर वेगळा केला, तर हालचाल करू शकणार नाही, किंवा त्याला संवेदना प्राप्त होणार नाही. आता आपले जे शरीर आहे, ते जड आहे; त्याला वजन आहे का? तर आहे. माझ्यातील ते ‘पृथ्वी तत्व’ आहे. आता पृथ्वी म्हटले की, आपल्यासमोर पृथ्वीचा म्हणजेच ब्रह्मांडाचा मोठा आकार उभा रहातो. पण आपल्या स्थूलदेहातील पृथ्वी तत्त्व म्हणजे, माझी हाडे; मांस; त्वच नाडी व रोम. या सर्वांनाच आकार आणि वजन आहे. आणि तेच माझ्यातील पृथ्वी तत्त्व होय.

आता माझ्यातील पृथ्वी तत्त्वाला स्वतंत्र चेतना आणि स्वतंत्र अस्तित्व नाही, त्याला जाणीवही नाही. त्याचप्रमाणे त्यात सतत बदल होत असतो, म्हणून पृथ्वी तत्त्व हे काही माझे खरे स्वरूप नाही. आता आपण जेव्हा आपाचा विचार करतो तेव्हा माझ्यातील/माझ्या शरीरातील रक्त, लाळ, रेत, मूत्र व घाम हे माझ्यातील ‘आपतत्त्व’ आहे. माझ्या शरीरात रक्ताचा प्रवाह चालू आहे, ते माझ्यातील आप तत्त्व  आहे. शरीरात असा ओलसरपणा आहे म्हणून माझी हाडे लवचिक आहेत. माझ्या शरीरातील आप तत्त्व नश्वर आहे. या आप तत्त्वाला स्वतःची अशी स्वतंत्र जाणीव नाही. म्हणून ते आपतत्त्व हे माझे खरे स्वरूप नव्हे.

तसेच तेजाच्या बाबतीतही म्हणता येते. आपण ९७ ते ११० या तापमानात जगत असतो. आता भूक, तहान, आळस, झोप, मैथुन ही माझ्यातील ‘तेज तत्त्वं’ आहेत. परंतु, या साऱ्या गोष्टी मानसिक असून जड आहेत. त्यांना स्वतःची अशी स्वतंत्र चेतना नाही, म्हणून तेज हे माझे खरे स्वरूप नाही.

तसेच वायूच्या बाबतीतही म्हणता येते. मी श्वासोच्छ्वास घेतो. त्यावरून, माझ्यात वायू तत्त्व आहे. ते सूक्ष्म असले तरी, शेवटी जड तत्त्वच आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, म्हणजे ते माझे स्वरूप नाही. आकाश तत्त्व सर्वात सूक्ष्म आहे. माझ्या शरीरात अवकाश म्हणजेच पोकळी आहे. म्हणून काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे वृत्तीचे तरंग अंत:करणात उमटू शकतात. २४ तास रक्ताभिसरण सुरू असते, ते सूक्ष्म आहे. पण, त्यालाही जडत्व आहे. म्हणजेच आकाश सुद्धा माझे खरे स्वरूप नाही. 

आपण स्थूल देहाच्या आठ अवस्था बघितल्या आहेत. स्थूल देहामध्ये जागृती अवस्था असते, तेव्हा इंद्रिय जागृत असतात. त्यामुळे सारे व्यवहार सुरळीत व सुसंगत होत असतात. आणि त्यातूनच मी कर्ता हा त्याचा अभिमान असतो. तो विश्वातील प्रत्येक योनीत असतो. या साऱ्या गोष्टीचा आत्मानात्मक विवेक आपण करतो, तेव्हा बुद्धी आत्मसन्मुख होते. हळूहळू ती सूक्ष्म होत जाते. आणि मग आपण ईश्वराच्या अस्तित्वाविषयी नि:शंक होतो; वासना क्षीण होऊन रामकर्ता भावना निर्माण होत वृत्ती शांत होते. या साऱ्या गोष्टी गुरुच्या सान्निध्यातच आपल्याला कळायला लागतात. आणि आपला साधनेचा प्रवास सुखाने सुरू होतो. म्हणून सत्शास्त्राचे श्रवण सतत करावे. उत्तम गुणांचा अभ्यास करावा. आणि याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा अनुभवावा.

जय जय रघुवीर समर्थ

Language