विज्ञान

पारमार्थिक क्षेत्रात ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, विज्ञान इत्यादी शब्द बरेचदा कानावर पडतात. परंतु त्यांचा शास्त्रीय अर्थ आपल्याला माहिती नसतो. त्यामागील संकल्पना स्पष्टपणे कळलेल्या नसतात. त्या संकल्पना नीटपणे कळल्या, तरच संतांच्या ग्रंथातील खरा अर्थ आपल्याला समजतो. श्रीसमर्थ म्हणतात,

“येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान ।

हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ।। १४-९-१६ ।।”

पारमार्थिक भाषेत बोलायचे झाले तर विपरीत ज्ञान हे भ्रमरूप असते. वस्तू आहे तशी न दिसणे म्हणजे भ्रम. उदा. अंधारात दोरी सापासारखी दिसते. अज्ञानामुळे भ्रम होतो. परंतु दोरीवर उजेड पडला की तो साप नसून दोरी आहे याचे ज्ञान होते. याचप्रमाणे अज्ञानामुळे जीव ‘देह म्हणजेच मी’ असे समजतो. परंतु आत्मज्ञान झाले की जीवाला आपले खरे स्वरूप कळते. अज्ञान, विपरीत ज्ञान व ज्ञान या तीनही दृश्य विश्वाच्या अनुभवातील कल्पना आहेत. त्या सर्व नाहीशा झाल्या की ब्रह्मसाक्षात्कार घडतो. त्या अवस्थेला ‘विज्ञान’ असे म्हणतात. व्यवहारामध्ये आपण ज्ञान हा शब्द बऱ्याच गोष्टींच्या संदर्भात वापरतो. ज्ञान म्हणजे एखादी गोष्ट, वस्तुस्थिती, विषय समजणे, त्याचे आकलन होणे. प्रापंचिक ज्ञान व  पारमार्थिक ज्ञान यात मूलतः फरक आहे. प्रापंचिक ज्ञान होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. १) वस्तू किंवा व्यक्ती, २) जाणणारा.

व्यवहारी ज्ञानामध्ये जाणणारा आणि जाणली जाणारी वस्तू किंवा व्यक्ती यांच्यातील द्वैत कायम राहते. जोपर्यंत ज्ञानासाठी ज्ञाता, ज्ञेय व इंद्रिये यांची गरज आहे, तोपर्यंत त्या ज्ञानाला केवळ माहितीचे स्वरूप असते. परंतु पारमार्थिक ज्ञानात मात्र परमात्मवस्तू व तिला जाणणारा एकरुप होऊन जातात. ‘थेंबुटा सागरी मिळाला’ याप्रमाणे ज्ञात्याचे स्वतंत्र अस्तित्त्व शिल्लक उरत नाही, द्वैत संपते,  त्यामुळे ‘मी जाणले’ ही जाणीवही नष्ट होते. यालाच ‘आत्मज्ञान’ म्हणतात. 

आध्यात्मिक परिभाषेत ‘मी ब्रह्म आहे’ ही भावना हे ज्ञान होय, तर ‘मी देहच आहे’ ही वृत्ती म्हणजे अज्ञान असे मानले जाते. तसे पाहिले तर ज्ञान व अज्ञान दोन्ही वृत्ती रूपाने समान आहेत. श्रीसमर्थ म्हणतात,

“ज्ञान आणि अज्ञान । वृत्तिरूपें हें समान ।

निवृत्तिरूपें विज्ञान । जालें पाहिजे ।। २०-१-२८ ।।”

जसे, पंखा मला त्याच्या आकारावरून कळतो. पण तो कसा बनवला व कोणत्या तांत्रिक बाबींमुळे तो फिरतो याचे अज्ञान आहे. म्हणजे पंख्याच्या बाह्य रूपाचे ज्ञानही आहे आणि अंतरंगाचे अज्ञानही आहे. ज्ञानही मलाच होते आहे आणि अज्ञानही मलाच आहे.  दोन्हीतही ‘मी’ पणाची जाणीव आहे. मीपणाची जाणीव सुद्धा नाहीशी झाली की उरणारे केवळ अनुभवरुपी ज्ञान म्हणजे विज्ञान होय.  संतांनी जे ज्ञान सांगितले त्याची सोपी व्याख्या करताना श्रीसमर्थ म्हणतात,

“ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।

पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ।। ५-६-१ ।।”

‘पहावे आपणासी आपण’ म्हणजे मी कोण ? कुठून आलो ? येण्याचे प्रयोजन काय ? या गोष्टींचा विचार करणे. असा विवेकयुक्त विचार करीत असताना ‘खरा मी’ म्हणजे देह नसून आत्मरूप चैतन्य आहे हे कळते. यापैकी टिकणारे काय व तात्पुरते काय हे पाहिले असता, देह नाशिवंत आहे हे लक्षात येते. देहात असेपर्यंत ‘मी ब्रह्मस्वरूप आहे’ असा अनुभव घेणे, हेच आपल्या जन्माचे प्रयोजन आहे. अशाप्रकारे आपणच आपल्या अंतरंगात उतरून ‘खऱ्या मी’ चे ज्ञान करून घ्यावे असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे. सर्वसामान्यपणे मनुष्य देहासंबंधी विचार करतो. ‘मी देहच आहे’ या घट्ट भावनेने त्याचे सर्व व्यवहार सुरू असतात. या अज्ञानामुळे ती व्यक्ती, वस्तू व दृश्य जगाच्या संगाने बांधली जाते. त्या संगात अडकल्यामुळे त्या व्यक्तीला परमार्थ साधत नाही.

मनुष्याचे सुख-दुःख हे दुसऱ्या कशावर, कुणावर तरी अवलंबून असते. यामुळेच त्याच्या समाधानाला उणेपणा येतो. म्हणून जोपर्यंत देहबुद्धीचा संग सुटत नाही तोपर्यंत आनंदमय असलेल्या आत्मस्वरूपाचा जीवाला अनुभव येत नाही. नि:संग झालेल्या ‘खऱ्या मी’ ला भगवंताच्या चरणी समर्पित करणे हाच आत्मसाक्षात्काराचा राजमार्ग आहे. शरणागतीची ही युक्ती ज्याला साधते, त्याच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात. 

असा आत्मज्ञानी पुरुष देहात असूनही अलिप्तपणे राहून विदेहस्थिती भोगतो. कर्मफल कोणतेही असो, अनुकूल किंवा प्रतिकूल असे न मानता; जे आपल्या वाट्याला येईल ते आनंदाने स्वीकारतो. हीच त्याची सहज स्थिती असते. एकदा का साधक मनाच्या निर्विकल्प अवस्थेला पोहोचला की तेथे मन शिल्लकच रहात नाही. मग ‘आनंदाचे डोही । आनंद तरंग’ अशी त्याची अवस्था होऊन जाते. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात,

“संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरुप ।। ४-४-८ ।।”

या सातही संकेताद्वारे साधक अखंड समाधानाची स्थिती अनुभवू शकतो.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सहजस्थिती

सहजावस्था ही सिद्ध महापुरुषाची सर्वोच्च अवस्था होय. या अवस्थेमध्ये जीवाचा कर्म करणे किंवा न करणे यामागे कोणताही स्वार्थ नसतो. तसेच कर्म फळाविषयी सुख हवे, दुःख नको या भावना त्याच्या अंतकरणात उमटत नाहीत. त्यामुळे अनुकूल व प्रतिकूल घटनांमध्ये त्याची चित्तवृत्ती स्थिर असते. यालाच वेदांतात ‘सहजस्थिती’ म्हणतात. या अवस्थेचे वर्णन करतांना आपल्या ‘आगमसार’ या ग्रंथात प.पू. हंसराजस्वामी म्हणतात,

“जैसे प्रारब्धे देह व्यापारे । तैसे वर्तेना का बा रे ।

होय नव्हे करणे सरे । हे सहजस्थिती ।।”

दासबोधातील नवव्या दशकातही सहजस्थितीचे लक्षण स्पष्ट केलेले आहे. अनेक जन्मांच्या पूर्वसंस्कारामुळे जीवाला दृश्य जग खरे वाटते. ते डोळ्यांनी दिसते, अनुभवता येते. त्या संबंधाने त्याचे दैनंदिन व्यवहार होत असतात. त्यामुळे भ्रमाने जीव त्यात रममाण होतो. प्रारब्धानुसार देहाला, मनाला त्रिविध ताप भोगावे लागतात. यातून सुटण्यासाठी जीव अनेक आधार शोधतो. परंतु कुणीही यातून कायमचे सुटण्याचा मार्ग दाखवू शकत नाही. कुठलीच गोष्ट मनुष्याला शाश्वत, अखंड समाधान देऊ शकत नाही. समाधान हे ‘साधूजनाचेनी योगे’च प्राप्त होत असल्यामुळे आधी संतांची संगत धरली पाहिजे.

“सुन्यत्वातीत शुद्धज्ञान । तेणें जालें समाधान ।

ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिती ।। ६-१०-३९ ।।”

आत्मज्ञानी संतच आपल्याला ‘मीपणा’ तून बाहेर येण्याची कला शिकवतात. त्यासाठी आधी वृत्ती सर्व मायिक पसाऱ्यातून निवृत्त करावी लागते. मग वासनांचा समूळ नाश होतो. ‘राम कर्ता’ म्हणून कर्म केले की, कर्तृत्व; भोक्तृत्व; भ्रांतीतून सुटका होते. ‘खरा मी कोण’ याचे एकदा निश्चयरूप ज्ञान झाले की जीव देहाद्वारे होणाऱ्या सर्व व्यवहाराकडे अलिप्तपणे बघू लागतो. याचे वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

“माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें ।

तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा ।। १२- १२० ।।”

पाण्याचा गुणधर्म सरळ वहाणे हा आहे. परंतु माळी जसे वळण देईल तसे ते निमूटपणे वहाते. त्याचप्रमाणे प्रत्येक कर्म करताना भगवंताची इच्छा समजून वागले तर मनात कुठलेच संकल्प-विकल्प निर्माण होत नाहीत. अशी सहजस्थिती प्राप्त झालेला साधक प्रारब्ध असेपर्यंत अखंड आनंदात जीवन व्यतीत करतो. त्याची देहाबद्दलची आसक्ती, जगाबद्दलची ओढ आणि कर्तृत्वाची/कर्तेपणाची भावना पूर्णपणे नाहीशी झालेली असते. स्वतःच्या देह व अंतःकरणाचे व्यवहार बाधित झालेले असतात. बाधित होणे म्हणजे दृश्य जग हे परिवर्तनशील असून येथील एकही गोष्ट टिकाऊ नाही व जे दिसते तो केवळ भास आहे, असा बुद्धीचा पक्का निश्चय होणे.

“बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।

ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ।। ज्ञाने. ५-८७  ।।”

असा निश्चय मनात दृढ झाला की, देह, मन व बुद्धीचे सर्व व्यवहार त्रयस्थपणे होतात. जीव सुखदुःखात अडकत नाही. अशी सहजस्थिती लाभलेले ज्वलंत उदाहरण म्हणजे राजा जनक. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग असा –

एकदा जनकाच्या नगरीला आग लागली आणि त्यांच्या पायाला चटका बसला. तेव्हा ते म्हणाले, “माझा पाय जळतो आहे, परंतु माझ्या आत्म्याला काहीही झालेले नाही. म्हणजे राजा जनकाने ज्ञानाची अंतिम अवस्था प्राप्त केली होती. जे विषय ‘असार’ आहेत म्हणजे मृगजळाप्रमाणे ‘मिथ्या’ आहेत हे कळल्यानंतर त्या विषयांबद्दल कुठल्याच प्रकारची आसक्ती शिल्लक रहात नाही. ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे ब्रह्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट संपते. सहजस्थिती ही अंतःकरणाची अवस्था आहे. हिचा संबंध अंतरंगाशी आहे. सर्वसामान्य मनुष्याचा व ज्ञानी पुरुषाचा देह वरकरणी जरी सारखा दिसत असला तरी, मुख्यत्वे त्यांच्या मनोभूमिकेत फरक असतो.

“देह भावितां देहचि दिसे । परी अंतर अनारिसें असे ।

तयास शोधितां नसे । जन्ममरण ।। ९-३-२४ ।।”

त्यांच्या ठिकाणी अविद्येचा मागमूसही नसतो. देहधारी असल्यामुळे त्यांच्याही वाट्याला नाना प्रकारच्या यातना, दुःखे व संकटे येतात हे उघडपणे दिसते. परंतु ‘मी ब्रह्म आहे’ या निश्चयापासून ज्ञानी पुरुष कधीही ढळत नसल्यामुळे ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकत नाहीत. संत तुकाराम महाराजांनी जातीयतेचे चटके, आर्थिक दिवाळखोरी, आप्तांचे मृत्यू इत्यादी प्रकारचे आत्यंतिक दुःख सहन केले. तरी भोगून-अभोक्ता अशीच त्यांच्या अंतःकरणाची स्थिती होती. परमात्म्याच्या स्वरूपासंबंधीची किंवा भगवत्प्राप्तीची अनावर ओढ हळूहळू त्यांना ऐहिक जगाच्या आसक्तीपासून दूर घेऊन गेली. त्यामुळे संसार करीत असूनही ते त्यापासून अलिप्तच राहिले. सहजस्थिती व अलिप्तपण ही नित्यमुक्ताची लक्षणे त्यांच्या अंगी पुरेपूर भरलेली होती. अशाप्रकारे जीवन मुक्त हा भजनात तल्लीन झालेला असो की भोगात रमलेला दिसो, तो अंतर्बाह्य मोकळाच असतो. याविषयी एकनाथ महाराज म्हणतात,

“अथवा तो इंद्रियसंगती । दैवे अनेक विषयप्राप्ती ।

भोगीताही अहोराती । ब्रह्मस्थिती भंगेना ।। ए.भा. २८-३२९ ।।”

अशा पुरुषाला विषयांचे ध्यान नसते. त्यामुळे त्याला त्यांचा संग नसतो. संग नसल्याने काहीतरी मिळावे अशी इच्छा नसते. तरी प्रारब्धामुळे त्याला भोग भोगावेच लागतात. परंतु आत्मज्ञानी पुरुष नित्यतृप्त व सुखरूप असल्याने त्याला भोगातून सुख मिळण्याची अपेक्षा नसते. प्रतिकूल भोगातून दुःख वाट्याला येईल अशी भीतीही नसते. भोग कमी किंवा जास्त मिळाले तरी त्याबद्दल खंत नसते.

स्वामी विवेकानंदांना परदेशात कधी उपाशी पोटी रहावे लागले तर कधी राजे, महाराजांकडे स्वादिष्ट रुचकर पक्वान्नेही खायला मिळाली, कधी पायपीट करावी लागली तर कधी बोटीचा प्रवासही झाला. परंतु याही परिस्थितीत त्यांची मन:शांती भंग पावली नाही. सहज स्थिती ही अशी अवस्था आहे, की त्यात नाशिवंत पदार्थांचे वृत्तीने जरी ज्ञान होत असले तरी पदार्थ व वृत्ती बाधित होऊन वस्तूतंत्र आत्मा अनुभव रूपाने रहातो. अंतकरणासह दृश्य जग भ्रामक, नश्वर आहे या दृढ, स्थिर व प्रत्यक्ष निश्चयामुळे कुठलेही कार्य करीत असताना किंवा कुठल्याही कार्यामुळे सहज स्थिती बदलत नाही. या स्थितीत राहून संतांनी कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता, 

“ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ।।”

या भूमिकेतून जगदुद्धाराचे महान कार्य केले. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

उन्मनी

उन्मनी ही मनाची परिपक्व अवस्था होय.  उन्मनी = उद + मनस. उद म्हणजे उर्ध्वगती, पूर्णत्व, मुक्त होणे, विकास होणे व मनस म्हणजे मन. परमार्थ मार्गामध्ये मन जेव्हा दृश्य जगताचा संग सोडून वृत्तीरहित बनते, तेव्हा त्या अवस्थेला ‘उन्मनी’ म्हणतात. मनाचा उर्ध्वगतीने उन्मनीपर्यंत विकास करणे हेच साधकाचे अंतिम ध्येय असते. या अवस्थेमध्ये मनात कुठलेच संकल्प-विकल्प निर्माण होत नाहीत. ही निर्विकल्प अवस्था आहे. तेथे मन मनपणाने शिल्लक उरत नाही, म्हणून ही अवस्था शब्दाने सांगता येत नाही, त्याची कल्पनाही करता येत नाही आणि कुठल्याच इंद्रियांद्वारे ती जाणलीही जात नाही. मात्र संतांनी अनुभव घेऊन साधकांसाठी त्याचे वर्णन करून ठेवले आहे. या अवस्थेचे वर्णन करताना प.पू. हंसराज स्वामी आपल्या ‘आगमसार’ ग्रंथात म्हणतात, 

“मन सांडून एकीकडे । आपण ओतप्रोत चहूकडे ।

वृत्तीसहित मन बुडे । हेचि उन्मनी ।।”

दासबोधातील ‘जगतज्योती’ या दहाव्या दशकातही उन्मनीचे लक्षण स्पष्ट केले आहे. सामान्यपणे मनुष्य दिवसाच्या २४ तासांमध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्था अनुभवतो. कसे ते पाहू.

१) जागृती – जागृतावस्थेत जीव आपल्या इंद्रियांच्या द्वारे व्यावहारिक जगाचा अनुभव घेतो. या अवस्थेत मन व इंद्रिये कार्यरत असतात. मनाची स्पष्ट जाणीव असते. इंद्रियाद्वारे विषयांपासून कितीही सुख मिळाले तरी मनाची तृप्ती होत नाही. ते सतत सुखाच्या ओढीने धडपडते. 

“अंतःकरण-इंद्रिये । घेणे पडे जो जो विषय ।

तयासी नांव होय । जागृती ऐसी ।।”

२) स्वप्न – जागृती अवस्थेतील विषय भोग मनाने त्या त्या वेळी भोगून झालेले असतात. परंतु त्याचा सुप्त संस्कार अंतकरणात दडलेला असतो. जसे, कापुराच्या डबीतला कापूर संपला तरी त्या डबीला कापुराचा सुगंध येतो. त्याप्रमाणे स्वप्नात त्या सुप्त संस्कारामुळे प्रत्यक्ष विषय समोर नसले तरी ते खरे वाटतात व त्याच्या सुखदुःखाची जाणीव होते. उदा. स्वप्नात काही भीतीदायक पाहिले की अंगाला घाम फुटतो. परंतू जाग आल्यावर तो भ्रम होता हे कळते.

“इंद्रिय-विषयेंविण । संस्कारे कल्पी मन ।

घडे सुखदुःख भोगेंविण । ते स्वप्नावस्था ।।”

स्वप्नामध्ये सर्व इंद्रिये शांत झालेली असतात. परंतु मन कार्यरत असते.

३) सुषुप्ती – सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. 

“मन जेथे लया जाय । परी सुखाचा प्रत्यय होय ।

अज्ञान नाश न होय । ते सुषुप्ती ।।”

गाढ झोपेत इंद्रिये, मन व बुद्धीसह सर्व वृत्ती अज्ञानात विलीन होतात. त्यामुळे गाढ झोपलेल्या माणसाला बाहेर काय चालले आहे ते कळत नाही. झोपेतून उठल्यावर तात्पुरता सुखाचा अनुभव येतो. पण अज्ञान पूर्णपणे नाहीसे झालेले नसते. उन्मनी आणि सुषुप्ती या दोन्ही अवस्था बाहेरून सारख्याच वाटतात. परंतु उन्मनी अवस्थेमध्ये अंत:करणात शुद्ध जाणीव जागी असते तर सुषुप्तीमध्ये जाणीव अज्ञानात लय पावते. वृत्ती शांत होतात.

जागृती,स्वप्न व सुषुप्ती या तीनही सहजसाध्य अवस्था आहेत. 

४) तुर्या – ही प्रयत्नसाध्य अवस्था आहे. ही साधना करून मिळवावी लागते.

“जाणे ब्रह्म जाणे माया । ते येक जाणावी तुर्या ।

सर्व जाणे म्हणोनिया । सर्वसाक्षिणी ।। ७-५-५ ।।”

या अवस्थेमध्ये साधकाला एकीकडे देहाचे भान असते तर दुसरीकडे ‘मी आत्मा आहे’ हेही ज्ञान असते. म्हणून या अवस्थेला ‘सर्वसाक्षिणी’ म्हणतात. ही अवस्था शुद्ध ज्ञानरूप आणि सच्चिदानंदरूप आहे. या अवस्थेलाच महाकारण देह असेही म्हणतात.

भक्ती मार्गामध्ये ईश्वराशी एकरूप झाल्यावर भक्ताच्या अनुभवास येणारी तुर्यावस्थाच होय. या अवस्थेमध्ये देहासहित सर्व दृश्य विश्वाला साधक वेगळेपणाने पाहू शकतो. तुर्येमध्ये साक्षीत्त्वाची सूक्ष्म वृत्ती शिल्लक असते. ही वृत्ती सुद्धा नाहीशी झाली की उन्मनी अवस्था प्राप्त होते. श्रीसमर्थ या अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात,

“म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि जालिया उन्मन ।

मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ।। ७-५-११ ।।”

५)उन्मनी – उन्मनीत मनातील विषय, विकार समूळ नाश पावतात. मन पूर्णपणे शांत आणि विचार मुक्त होते. परब्रह्माशी एकरूप होऊन जाते. ही अवस्था साधायची कशी ? यासाठी समर्थांच्या चरित्रातील एक गोष्ट आपण पाहू – 

 

श्रीसमर्थ गडावर असताना एकदा धोंडीबा नावाचा शिष्य त्यांची कीर्ती ऐकून दर्शनासाठी आला व त्याने ‘मला राम दर्शन होईल असे करा’ असे स्वामींना सांगितले. यावर ‘मनाचे काहीही ऐकू नकोस’ असे सोपे, सुलभ साधन स्वामींनी त्यास सांगितले. त्याप्रमाणे वागायचे ठरवून तो निघाला. असे करता करता त्याच्या सर्व वृत्तींची निवृत्ती झाली व त्याला उन्मनी साधली. संत एकनाथ महाराज उन्मनी अवस्थेबद्दल सांगतांना म्हणतात, “मी-तूपणाची झाली बोळवण । हरपले मन झाले उन्मन ।।”  मी-माझे या आसक्तीतून सुटल्यावर मन संगरहित होते. अशा मनाला ध्यानकाळी अनुभवाला येणारी अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था होय. म्हणून संगत्याग व उन्मनी एकच होत. ही अवस्था प्राप्त झाल्यावर सगळीकडे ‘भरला घनदाट हरी दिसे’ अशी अवस्था होते. अशी अवस्था श्रीसमर्थांसह सर्व संतांना प्राप्त झाली होती.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अलिप्तपण

अलिप्तपण म्हणजे संगात राहूनही निर्विकार असणे. अलिप्तपण म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पाण्यातील कमलपत्र येते. जे पाण्यात राहूनही भिजत नाही. आपल्या मूळ स्थितीत तसेच राहते. लिप धातूपासून लिप्त शब्द बनलेला आहे. लिप म्हणजे दूषित करणे, व्यापणे, माखणे. लिप्त म्हणजे माखलेला, बरबटलेला. आणि अ + लिप्त = अलिप्त म्हणजे कशाचाही संसर्ग न झालेला. जन्माला आल्यापासून मनुष्य काही ना काही कर्म करीत असतो. या कर्मा मागची प्रेरणा मन असते. शरीराला केवळ भौतिक सुखे हवी असतात. त्यासाठी मन विषयांकडे सैरभैर धावते. जशी वासना असेल त्याप्रमाणे मनुष्याला व्यक्ती, वस्तू व पदार्थ हवेहवेसे वाटू लागतात. त्यांच्यापासून सुख मिळते या भ्रमाने त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. ही आसक्तीच सर्व दुःखाचे मूळ आहे. आसक्तीने लिप्त झाल्यामुळे जीव, व्यक्ती; वस्तूच्या ममत्वाच्या बंधनात अडकतो व दुःख भोगतो. वास्तविक आपले मूळ स्वरूप शुद्ध,पवित्र व आनंदरूप आहे परंतु अज्ञानामुळे मनुष्य हे विसरून मायेच्या पसाऱ्यात गुरफटून जातो व वासनांनी दूषित होतो. यावर उपाय सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात –

ना तरी ते नाना रसी । रिघोनी दर्वी जैसी ।

परी रस स्वादासी । चाखून येणे ।। ज्ञा. १६-२४८ ।।

ज्याप्रमाणे स्वयंपाकघरातील पळी ही प्रत्येक रसात जाते. उदा. कढी, आमटी, श्रीखंड, आमरस, खीर. पण ती कशाचाच स्वाद घेत नाही. ती सर्व रसांपासून अलिप्त असते. त्याप्रमाणे कुठल्याही चांगल्या किंवा वाईट कर्माचे कर्तेपण स्वतःकडे घेऊ नये. सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून कर्म व फळांचा संग सोडला की अलिप्तपणाची स्थिती प्राप्त होते. म्हणूनच श्रीसमर्थ रामरायाजवळ ‘अलिप्तपण मज देरे राम’ असे मागणे मागतात.

ऐहीक जीवनात आपली कर्तव्यकर्मे अलिप्तपणे करून काया, वाचा व मनाने ईश्वरभक्ती करता येते हे संत सावतामाळी यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले आहे. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची धारणा होती. ते कधीही ‘मी कर्ता’ या कर्तुत्व भावनेत अडकले नाहीत.

“न लगे सायास न पडे संकट । नामे सोपी वाट, वैकुंठाची ।।”  असा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव होता. कर्माद्वारेच त्यांनी मोक्ष प्राप्त केला. यावरून हेच सिद्ध होते की अलिप्तपण म्हणजे कर्माचा त्याग नसून त्यामागचा ‘मी कर्ता’ हा अहंकार बाधक असतो. ‘मी करून अकर्ता’  ही भावना जर दृढ असेल तर निंदा-स्तुती, मद-मत्सर इत्यादी विकारांनी मन दूषित होत नाही. प.पू. गोंदवलेकर महाराज अलिप्तपणा कसा राखावा याची सोपी युक्ती सांगताना म्हणतात… 

“नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।

हाची सुबोध गुरुचा भोगा संगे कुठे न गुंतावे ।”

परक्या घरी एखादा पाहुणा आला. तेथे वावरत असताना तेथील सर्व व्यवहार जरी त्याला दिसत असले, तरी आपण वेगळे आहोत या जाणिवेमुळे तो कशातही गुंतून न राहता मोकळ्या वृत्तीने आनंदात राहतो, तसे आपण संसारात निर्लेपवृत्तीने राहिले पाहिजे. शरीर म्हणजे ‘मी’ नाही हा निश्चय एकदा पक्का झाला की, शरीराबद्दल असलेले ममत्त्व संपते. ज्ञानी पुरुषाला शरीर मिथ्यापणाने भासते. म्हणून त्याचे विकार त्यास यत्किंचित बाधत नाहीत. उदा. रामकृष्ण परमहंस यांना कर्करोग झाला होता. त्यांनी त्या व्याधीची पर्वा केली नाही. उलट ‘देहे दुःख ते सुख मानित जावे’ हा भाव ठेवून ते दुःख त्यांनी शांतपणे सहन केले. संत, सज्जन जरी जगात इतरांसारखे वावरत असले तरी त्यांची अंतरस्थिती फार वेगळी असते. त्यांच्या देहाला कष्ट, व्याधी किंवा दुःख झाले तरी त्यांना त्याची तमा नसते. ते आपल्या स्वानंदामध्ये मग्न असतात कारण त्यांना अलिप्तपणाची कला साधलेली असते.

संगत्याग म्हणजेच अलिप्तपण साधले की मन एका भगवंता वाचून कोणालाही चिकटत नाही. सगळ्या बंधनातून जीव मुक्त होतो व सर्वत्र समत्वाने लिप्त असलेल्या परब्रम्हाशी एकरूप होतो. म्हणून संगत्याग व अलिप्तपण एकच होय असे श्रीसमर्थ म्हणतात. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

विदेहस्थिती

परमार्थामध्ये विदेहस्थिती अनुभवणे ही सर्वोच्च अवस्था मानली गेली आहे. यालाच मुक्ती किंवा मोक्ष असेही म्हणतात. जीवाचा संबंध जोपर्यंत दृश्य जगाशी व देहाशी असतो, तोपर्यंत जीव देहबुद्धीने बांधला गेलेला असतो. आत्मानात्मविवेकाने जेव्हा जीवाला आपण ब्रह्मस्वरूप आहोत अशी प्रचिती येते, तेव्हा जीव देहात असून विदेह अवस्था भोगतो. या अवस्थेचे वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात –

ना तें साधन ना तें देह । आपला आपण निःसंदेह ।

देहीच असोन विदेह । स्थिती ऐसी ।। ७-७-६३ ।।

देहात असूनही विदेह अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आधी बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे . बंधन कशाचे व कोणाला असते याचा विचार करीत असताना, आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, बंधन व मुक्ती या जीवाच्या अवस्था आहेत त्या जिवंतपणीच अनुभवता येतात. ‘जन्म घेणे लागे वासनेच्या संगे’ या न्यायानुसार जीव वासनेमुळे जन्माला येतो. वासनापूर्तीसाठी अनेक विषय हवेहवेसे वाटतात. विषय म्हणजे काय? ‘विशेषेण सिणोती इति विषय:’ सुख मिळवण्यासाठी ज्याच्यावर अवलंबून रहावे लागते त्याला ‘विषय’ म्हणतात. विषयात सुख आहे अशी कल्पना असणे याला ‘विषयवासना’ म्हणतात. 

सर्वसामान्य माणसाच्या वासना देहाशी संबंधित असतात.  जसे, चांगले खायला मिळावे; महागडे कपडे; आलिशान गाड्या; घर असावे; समाजात मान असावा म्हणजे थोडक्यात सत्ता; संपत्ती; कीर्ती मिळाली की आपण सुखी होऊ असे मनुष्याला वाटते. आपल्या मनासारखे सगळे मिळाले नाही तर विकार उत्पन्न होतात. दुसऱ्याला मिळाले आणि स्वतःला मिळाले नाही कीमत्सर वाढतो. वस्तू- पदार्थांविषयी आसक्ती असेल तर लोभ वाढतो. मनासारखे घडले नाही की क्रोध निर्माण होतो. अशाप्रकारे शब्द, स्पर्श, रस, रूप व गंध इत्यादि विषय माणसाला जखडून ठेवतात. श्रीसमर्थांनी या करता एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे, ते म्हणतात –

हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें ।

ऐसा जो प्रपंचीं गुंते। तो येक पढतमूर्ख ।। २-१०-१५ ।।

ज्याप्रमाणे कोळ्याच्या जाळे विणण्याच्या धाग्याने हत्ती बांधला जाऊ शकत नाही, तसेच लाकूड पोखरण्याचे सामर्थ्य असलेला भुंगा कमळातील मकरंदाच्या लोभाने विषयासक्त झाल्यामुळे कमळात अडकून पडतो, त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रबळ विषयसुखाच्या इच्छेमुळे देहबुद्धीच्या बंधनात अडकतो व परिणामतः सुखदुःख भोगतो, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. या सगळ्या त्रासांपासून मनुष्याला मुक्ती हवी असते. परंतु ती कशी मिळेल हे ठाऊक नसते. त्यासाठी संतांची संगत धरली पाहिजे. संत लौकिक बंधनातून पूर्णपणे सुटलेले असतात, त्यांना देहाचे स्मरण उरलेले नसते; म्हणून ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतात. त्यांचे स्वातंत्र्य कशावरही,कुणावरही अवलंबून नसते. अशा मुक्तावस्थेला पोहोचलेल्या सिद्धाचे तीन प्रकार सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात –

सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेहमुक्त ।

दोहिवेगळे ते नित्यमुक्त । योगेश्वर जाणावे ।। ७-६-४६ ।।

१) नित्यमुक्त २) जीवन्मुक्त ३) विदेह मुक्त. या पैकी नित्यमुक्त हे जन्मापासूनच मुक्त असतात. त्यांच्या सगळ्या वृत्ती संपूर्णपणे मावळलेल्या असतात. ते आपल्या देहासहित दृश्य जगातील कुठल्याच गोष्टीने बध्द होत नाहीत. त्यांच्या अंगी योगाचे अचाट सामर्थ्य असते म्हणून त्यांना योगेश्वर म्हणतात. उदा. आद्य शंकराचार्य, शुकमुनी, रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद इत्यादि. असे ज्ञानी महापुरुष केवळ लोकोद्धाराचे कार्य करण्यासाठीच अवतार घेतात. त्यांनी केलेले कार्य अनेक काळापर्यंत लोकांना प्रेरणादायी ठरते.

जीवन्मुक्त अवस्थेमध्ये देहासंबंधी अज्ञान नाहीसे होते. साधक आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणतो आणि अंतर्बाह्य मोकळा होतो. परंतु प्रारब्ध कर्मे शिल्लक असल्यामुळे देह सोडत नाहीत, उलट व्यक्ती, वस्तू व पदार्थांच्या संगात आसक्त न होता अलिप्तपणे आपली कर्तव्यकर्मे पार पाडतो. ज्ञानेश्वर माऊली त्याचे वर्णन करतांना म्हणतात-

तो शरीराचेनि मेळें । करू कां कर्में सकळें ।

परी आकाश धुये न मैळे । तैसा असे ।। ज्ञाने. १३-१०३२ ।।

बाह्यतः त्याचे जीवन चारचौघांसारखे चाललेले दिसते परंतु वृत्तीचा बाध झाल्यामुळे त्याच्याकडून धर्म-अधर्म घडत नाही, पाप-पुण्याचा लेप लागत नाही. “संचित, प्रारब्ध, क्रियमाण । अवघा झाला नारायण।” ह्या सर्वोच्च दशेला तो जाऊन पोहोचतो. संत एकनाथमहाराज व अलीकडच्या काळातील प.पू. वरदानंद भारती यांनी अश्या प्रकारे आपला प्रपंच व परमार्थ निर्लेपपणे करून दाखविला. जिवंतपणीच मुक्त होऊन देहभान विसरून गेले आहेत त्यांना विदेहमुक्त म्हणतात. जीवन्मुक्त व विदेहमुक्तामधील मुख्य फरक हाच की, जीवन्मुक्त सचेतन असतात म्हणजे प्रारब्ध कर्मे करीत असतात, तर विदेहमुक्त अचेतन असतात म्हणजे त्यांचे कर्म करणे थांबलेले असते. देहाशी संबंधित कुठलीही उपाधी ते सांभाळीत नाहीत. तसेच व्यावहारिक आचाराचेही त्यांना भान नसते. उदा. संत गजानन महाराज. उष्टयापत्रावळीवरची शीते खाऊन ते तृप्त झाले. कारण अन्न हेही ब्रह्म आणि खाणाराही ब्रह्मरूप ही त्यांची धारणा होती. मधमाशांनी अंगभर दंश केला तरी त्यांना देहदुःख जाणवले नाही हीच विदेही अवस्था होय. या अवस्थेमध्ये देह असून नसल्यासारखा होतो कारण कशाचाही संग तेथे शिल्लक नसतो म्हणून संगत्याग व विदेहस्थिती एकच आहे असे श्रीसमर्थ म्हणतात.

 

जय जय रघुवीर समर्थ

निवेदन

भक्तीशास्त्रामध्ये परमेश्वर प्राप्ती करता सहज, सुलभ असा नवविधा भक्तीचा राजमार्ग संतांनी सांगून ठेवला आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं  पादसेवनम् ।

अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।

सर्वसामान्य प्रापंचिक मनुष्य या आठ भक्तींपैकी आपल्याला जमेल ती, आवडेल त्या देवाची भक्ती करीत असतो. त्यामुळे भक्ती हे भगवंताच्या प्राप्तीचे अतिशय सोपे साधन आहे असा अनेकांचा समज असतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात –

“भक्ती तो कठीण सुळावरील पोळी ।निवडी तो बळी विरुळा शूर ।।”

भक्तीचा कठीणपणा सांगण्यासाठी तिला सूळावरच्या पोळीची उपमा दिली आहे. कारण भक्तीतील  अनन्यता साधण्याकरिता मनाची चंचलता, जिवलगांविषयी ममत्व आणि प्रपंचातील आसक्ती सोडावी लागते. प्रापंचिक मनुष्य विषयात गुंतलेला असल्यामुळे त्याला भक्तीचा अनुभव घेणे महाकठीण आहे. त्याच्या भक्तीच्या कल्पनाही संकुचित असतात. आपण करतो तीच भक्ती योग्य व खरी अशा कल्पनेने मनुष्य जन्मभर स्वतःचीच फसवणूक करीत रहातो व शेवटी हाती काहीही लागत नाही. म्हणून नवविधा भक्तीच्या आठही पायऱ्या सोप्या वाटत असल्या तरी त्याची परिणती आत्मनिवेदन भक्तीत झाल्याशिवाय भक्तीचे वर्म कळत नाही. श्रीसमर्थांनी ‘भक्त’ शब्दाची व्याख्या ‘विभक्त नव्हे तो भक्त’ अशी केलेली आहे. म्हणजे भगवंतापासून जो वेगळा उरत नाही तो भक्त होय. भगवंत व भक्त यांचा परस्पर संबंध कसा असतो हे समजण्यासाठी भगवंताचे खरे स्वरूप जाणून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 

भगवंत हा मूर्ती पुरता मर्यादित नसून तो अनंत, अपार, सर्वत्र भरून असलेला, अविनाशी, आनंदरूप असा आहे. त्याला वेगळेपणाने पहाता येत नाही कारण इंद्रियांना तो दिसत नाही, मनाला भासत नाही आणि त्याची कल्पनाही करता येत नाही. तो अतीन्द्रिय असल्यामुळे व्यक्त होत नाही. तो उत्पन्नही होत नाही आणि कधी नाशही पावत नाही. तो जशाचा तसा अलिप्तपणे सर्वांना व्यापून उरतो. अशा निर्गुण, निराकार शाश्वत देवाचे स्वरूप कसे आहे हे सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात-

“देवभक्तांचे मूळ । शोधून पाहातां सकळ ।

उपाधीवेगळा केवळ । निरोपाधी आत्मा ।। १२-३-२७।।”

जे इंद्रियांना दिसते ते सर्व दृश्य व अदृश्य जग नाशिवंत आहे, या वेगळा जो उरतो तो निरोपाधीक आत्माच खरा देव आहे. हा देव ओळखायचा कसा? तर खरा देव मीपणा दूर झाल्याशिवाय कळत नाही. यासाठी आधी ‘मी कोण’ याचा आपल्या अंतर्यामी शोध घेतला पाहिजे. जो देह म्हणजे ‘मी’ असे आपण समजतो, तो देह पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या मिश्रणापासून बनलेला आहे. तो सतत बदलणारा, मिथ्या व नाशिवंत आहे. अज्ञानामुळे जीवाला मी म्हणजे देहच आहे असे वाटते. या देहबुद्धीमुळे वासना उत्पन्न होऊन जीव दृश्य पदार्थ, व्यक्तींना मनाने चिकटतो व त्या बंधनात नकळतपणे बांधला जातो. देहाचे सुख तेच खरे सुख या भ्रामक जाणिवेने विषयसुख मिळविण्याकरता जीव दृश्य जगताकडे खेचला जातो आणि आपोआप स्वस्वरूपापासून दूर होतो. ज्या पंचभौतिक तत्वांचा मिळून देह बनलेला आहे ते पृथ्वी तत्त्व पाण्यात, पाणी तेजात, तेज वायूत, वायू आकाशात अशा पद्धतीने विलीन होतात आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यांना व्यापून असणारा अविनाशी परमात्मा मात्र सदा, सर्वत्र, समत्वाने जशाचा तसाच शिल्लक राहतो. 

या परमात्मस्वरूप भगवंताशी ऐक्य साधण्यासाठी ‘मी देह आहे’ हा अहंकार सोडावा लागतो, तो कशाने सोडता येतो? तर स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पित करून सोडता येतो. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. नि+विद् या धातूपासून निवेदन शब्द बनला आहे. आत्मनिवेदन हा नवविधा भक्तीचा आत्मा आहे. निवेदनाचे लक्षण सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात-

“ऐका निवेदनाचें लक्षण । देवासि वाहावें आपण ।

करावें तत्त्वविवरण । म्हणिजे कळे ।।४-९-३।।”

मीपणा संपून भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून जाणे हेच निवेदनाचे मुख्य लक्षण आहे. आपल्या देहातील पंचभौतिक तत्त्वांचा निरास झाला की शेवटी देहबुद्धीने पोसलेला खोटा मी सर्वस्वी नाहीसा होतो व केवळ चैतन्यमय आत्मतत्त्वच शिल्लक राहते. व तेच माझे खरे स्वरूप आहे असा भक्ताला साक्षात्कार होतो.

“तत्वें तत्व जेव्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे ।

आत्मनिवेदन येणें प्रकारें । सहजचि जालें ।। ४-९-९।।”

अश्याप्रकारे देवाला पाहायला गेलेला भक्त स्वतः देवरूपच होऊन जातो. ‘पाया पडू गेले तव पाऊलचि न दिसे’ अशी भक्ताची अवस्था होते. तेथे द्वैत पूर्णपणे संपून जाते. आत्मनिवेदनभक्तीमुळे संसारविरक्ती, सायुज्यमुक्ती व पाठीशी भगवतशक्ती असा तिहेरी लाभ साधकाच्या पदरी पडतो.

व्यवहारामध्यें भक्त व भगवंत हे दोघे देह रूपाने वेगळे दिसत असले तरी मी आणि निर्गुण निराकार भगवंत एकरूप आहोत असा विवेक जर भक्त सातत्याने करीत असेल तर तो मनाने भगवंतापासून कधीही दूर जात नाही. अश्याप्रकारे आत्मनिवेदनाने संपूर्ण संगत्याग झाला की अभेदभक्तीची अवस्था प्राप्त होते.

मी व माझे सगळे भगवंताला समर्पण करणे ही निवेदनाची पहिली पायरी होय. यासाठी वस्तू, व्यक्तींचा संग मनाने सोडावा लागतो. याला जड आत्मनिवेदन म्हणतात. 

भगवंत हा सर्व चराचराला व्यापून असून तोच सृष्टीचा कर्ता आहे हे पक्के ध्यानात ठेवले की, मी म्हणून कोणी वेगळा उरत नाही. त्यामुळे मी कर्ता, मी भोक्ता हा अहंकार नाहीसा होतो. ही निवेदनाची दुसरी पायरी आहे. यालाच ‘चंचळ आत्मनिवेदन’ म्हणतात. जे जे दिसते ते सगळे माया निर्मित, स्वप्नवत आहे. ते दिसत असले तरी खरेपणाने टिकत नाही. म्हणून जे शाश्वत परमात्मतत्त्व आहे तेच तेव्हढे खरे आहे आणि ‘तेच तू आहेस’ असा उपदेश संत आपल्याला करतात. ही निवेदनाची शेवटची पायरी आहे.

सगळ्या नाशिवंत गोष्टींचा संगत्याग व आत्मनिवेदन या दोन्हीचे फळ म्हणजे समाधानाची प्राप्ती होय. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे श्रीसमर्थ म्हणतात.

संगत्याग

संगत्याग आणी  निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तही येकरूप ।। ४-४-८ ।।

परमार्थ शास्त्रामध्ये ‘संग’ शब्द फार व्यापक अर्थाने आलेला आहे. सर्वच संतांनी संगाचे स्वरूप, मर्यादा व परिणाम आपल्या वाङ्मयातून विस्तृतपणे मांडलेले आहेत. संग म्हणजे काय? संगत्याग कसा करायचा?, त्याने काय साध्य होते? या प्रश्नांचा सखोल विचार करीत गेल्यावर असे लक्षात येते की, मनुष्याला जीवनात शांती, समाधान हवे असते. जन्मभर त्यासाठी तो धडपडत असतो. परंतु नक्की काय करावे? म्हणजे त्याचा अनुभव येईल हे त्याला उमगत नाही. त्यासाठी मुळातूनच संगत्यागाचा विचार करणे गरजेचे आहे. संग हा शब्द ‘संज’  धातूपासून बनला आहे. संज म्हणजे चिकटणे. कोणत्याही दोन घटकांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा त्याला ‘संग’ असे म्हणतात. संग या शब्दाचे एकत्र येणे, संयोग, संबंध, मैत्री, आसक्ती असे अर्थ निर्वाण लघुकोशात दिलेले आहेत. ज्याच्या संगतीत आपण राहतो, मग ती व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यापैकी काहीही असले तरी त्यांची संगत आपल्या शरीरावर व मनावर परिणाम करते हा जीवनाचा नियमच आहे. जसे, हातात कात्री घेतली तर काहीतरी कापावेसे वाटेल, या उलट हातात जपमाळ घेतली तर मुखाने नामच घ्यावेसे वाटेल हा झाला संगाचा स्थूल परिणाम. अशाच प्रकारे सकाळी एखादे गाणे ऐकले तर दिवसभर ते गाणे मनात रेंगाळत राहते हा झाला संगाचा सूक्ष्म परिणाम. म्हणजे संगाशिवाय व्यवहारिक जीवन चालूच शकत नाही. संग हा संसर्गजन्य आहे. संपर्कात आलेल्या वस्तू लगेच आपले गुणधर्म एकमेकांवर लादतात. त्याचे विपरीत परिणाम आपण अनुभवतो. 

संगाचे प्रामुख्याने दोन प्रकार होतात – १) बाह्य संग २) अन्तःसंग.

१) बाह्य संग म्हणजे दृश्य, स्थूल वस्तूंचा, पदार्थाचा किंवा व्यक्तीचा संग. उदाहरणार्थ –  घरदार, बायका-मुले, संपत्ती व सर्व व्यवहारिक गोष्टींचा संग. संगाला कमीत कमी दोन जण लागतात.  मग ती व्यक्ती असो की वस्तू किंवा पदार्थ असो. ह्या बाह्य गोष्टींपासून सुख मिळेल अशी जीवाची धारणा असते. त्यामुळे देहाला मिळणारे सुखच खरे सुख मानून त्यासाठी विषयसुख देणाऱ्या साधनांचा संग्रह करण्यात मनुष्य आयुष्य घालवतो. यातून वासनांचे गाठोडे तयार होत जाते व जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो. येथे श्रीसमर्थ सांगतात-  

संसारसंगें सुख जालें । ऐसें देखिलें ना ऐकिलें ।

ऐसें जाणोन अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ।। ५-३-१०१ ।।

जीव मूळचा सच्चिदानंदस्वरूप असूनही अज्ञानामुळे तो स्वतःला देहापुरताच सीमित समजतो व दुःख भोगतो. यासाठी संत साधकाला ‘परिसंग सोडून सुखी राहावे’ असा उपदेश करतात.

संग सोडायचा म्हणजे दृश्य जगातले सर्व सोडून दूर कुठेतरी लांब निघून जायचे असे नाही, तर आसक्ती; ममत्व; स्वामित्वाच्या भावनेतून मनाने सुटले पाहिजे. वस्तूंचा त्याग करणे एक वेळेस सोपे आहे, परंतु मनाने ज्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत; मग त्या अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो; त्यांचा त्याग करणे अवघड असते. कारण मनाने या सर्व गोष्टींचा वर्षानुवर्ष संग केलेला असतो. म्हणून मनाची गुंतवणुक ही मोठी त्रासदायक असते.  यासाठी श्रीसमर्थ म्हणतात – मना सर्वही संग सोडून द्यावा..  

२) अंतःसंग – ममत्व, आसक्ती, अहंता, कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादींची जाणीव हे अंतःसंगाचे मुख्य घटक आहेत. स्वरूपाचा व अज्ञानाचा संबंध आला की जीव ‘मी’ म्हणजेच देह असे समजतो. माझेपणाची व्याप्ती देहापासून सुरू होऊन देह संबंधाने येणाऱ्या स्थूल गोष्टी, तसेच अंतःकरण संबंधाने येणाऱ्या सूक्ष्म गोष्टी म्हणजे माझे मन, माझी बुद्धी, माझे चित्त इत्यादी पर्यंत वाढत जाते. अहंता म्हणजे स्वतः विषयीच्या विशेष जाणिवा. जसे, मी बुद्धिमान, मी कर्तव्यदक्ष, मी सुगरण इत्यादी. अशा अहंतेचा संबंध तोडणे म्हणजे संगत्याग होय. संगत्यागाशिवाय परमार्थ साधत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात –

”न करी रे संग। राही रे निश्चळ ।

लागो नेदी मळ । ममतेचा ।”

संगत्याग कसा करायचा याचे मार्गदर्शन करतांना संत आपल्याला आत्मानात्मविवेक करायला सांगतात. ‘यदृष्टं तं नष्टं’ या नियमाप्रमाणे जे जे काही निर्माण होते ते सर्व नाश पावते. मग संग विनाशी वस्तूंचा करायचा की अविनाशी परब्रह्माचा करायचा हे साधकाने ठरविले पाहिजे. श्रीहंसराज स्वामी आपल्या ‘आगमसार’ या ग्रंथात संगत्यागाचे वर्णन करताना म्हणतात –

 ”संग म्हणिजे मीपण । जें मुक्तपणाचे बंधन ।

तेंचि सांडील्या वाचून । संगत्याग कैसा ।।

दीप-कापुरा मिळणी । कापूर जाता जळूनी ।

ज्योती काजळी दोन्ही । किमपी उरेना ।।

तैसे अज्ञान स्वानुभव ज्ञाने । जाळून आपण लया जाणे ।

अनुभवेंवीण जें का असणे । हाची संगत्याग ।। ”

मी व माझेपणाचा कल्पनेने धरून ठेवलेला संग सोडल्याशिवाय जीव देहासकट सर्व दृश्य व विनाशी  वस्तूंच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. जसे, अग्नी व कापुराचा संबंध आला की कापूर क्षणभरात जळून जातो. तेथे ज्योत किंवा काजळी काहीही मागे उरत नाही. त्याचप्रमाणे एकदा का आत्मज्ञान झाले की देहबुद्धी नष्ट होते, व मी ब्रम्हाचा अनुभव घेतला असे म्हणायलाही कोणी शिल्लक राहत नाही. कारण अनुभव म्हटलं की द्वैत आले. जोपर्यंत साधकाचा द्वैताचा निरास करण्याचा प्रयत्न चालू आहे, तोपर्यंत जीव; आत्मा व ब्रह्म हे तिन्ही एकरूप आहेत असा अनुभव येत नाही. व्यवहाराच्या दृष्टीने जेव्हा कशाचा तरी, कुणाला तरी आणि काहीतरी अनुभव येतो. तेंव्हा तेथे अनुभव, अनुभविता आणि अनुभवी अशी त्रिपुटी उत्पन्न होते. मी संगत्याग करतो हा अनुभव त्रिपुटीतच मोडतो. म्हणून त्रिपुटीमध्ये आत्मानुभव नसतो. 

मानवी जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे जीवनमुक्ती. ते साध्य करण्यासाठी काय करायचे हे सांगतांना आद्य शंकराचार्य म्हणतात – 

” सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वम् ।

निर्मोहत्वे निश्चलतत्वं, निश्चलतत्वे जीवनमुक्तिः ।। ”

सज्जनांच्या संगतीत राहिले की, संसाराबद्दलची आसक्ती क्षीण होते. त्यामुळे मोह मायेचा नाश होतो. मोह नष्ट झाला की चित्त शांत व स्थिर होते व अश्या निश्चल चित्तामध्ये जीवनमुक्तीचा अनुभव येतो. असे जीवन्मुक्त असणे हीच अत्यंत संगरहित असण्याची खूण आहे.

Language