मारुतीस्तोत्रातील हे दुसरे स्तोत्र

समर्थांनी १६४८ मध्ये चाफळ येथे मठ स्थापन केला, तो प्रमुख मठ होता. १६५० मध्ये शिंगणवाडीच्या मारुतीची स्थापना केली. छोट्या खडीच्या डोंगरावर लपलेला म्हणून याला खडीचा मारुती म्हणतात. पण या मारुतीत प्रचंड शक्तीचा अविर्भाव आहे. शिंगणवाडीच्या या मारुतीचे बालस्वरूप खूप विलोभनीय आहे. मुलांना बालपणापासूनच उपासनेचे संस्कार द्यावेत, व्यायामाने शरीर सशक्त ठेवावे, हाच संदेश समर्थ या मारुती स्तोत्रातून देतात. मारुती सारखे धाडस हवे, कर्तृत्व हवे; हे शिकवताना मुलांना जीवनात माता, पिता, गुरु यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे हे सुद्धा समजवावे. या सगळ्या गोष्टींसाठी समर्थांनी दुसऱ्या मारुती स्तोत्राची सुरुवात अंजनी मातेच्या ईश्वरी रूपाचा गौरव करून केलेली आहे.

जनी ते अंजनी माता । जन्मली ईश्वरी तनु ।

तनु-मनु तो पवनु । एकची पाहतां  दिसे ।

समर्थ म्हणतात, ‘अंजनी माता’ म्हणजे जणू काही ‘ईश्वरी तन’ म्हणजे ‘ईश्वराचा अवतार’ आणि अशा ईश्वरी अवतारात ‘तन’ म्हणजे ‘शरीर’ आणि मन सुद्धा वाऱ्यासारखा असणारा हनुमंत जन्माला आला. समर्थांनी दुसऱ्या श्लोकात हनुमंताला ‘मारुती’ आणि ‘वातनंदनु’ म्हटले आहे. किती सुंदर विशेषणे वापरली आहेत. ‘मरुत’ म्हणजे ‘वारा’ म्हणून तो मारुती आणि ‘वात’ म्हणजे सुद्धा ‘वारा’ म्हणून तो ‘वातनंदन’. समर्थ चाफळ ते रामघळ या मार्गावर एकांत आणि आत्मचिंतनासाठी येत असत. समर्थांच्या हृदयातील अपार करुणा, वात्सल्य, प्रेम तिथल्या कणाकणात जाणवते. म्हणूनच समर्थांनी या मारुतीची स्थापना बालरूपात केली असेल असे वाटते. मूल कितीही मोठे झाले तरी ते आईला लहानच असते. हा भाव या स्तोत्रात जाणवतो. 

चळे ते चंचळे  नेटे । बाळ  मोवाळ साजिरें ।

चळताहे चळवळी ।  बाळ लोवाळ गोजिरें ।

या श्लोकातून मारुतीच्या सौंदर्याचे, त्याच्या गोंडस स्वरूपाचे दर्शन होते. हे स्तोत्र म्हणताना मनात निरागस भाव निर्माण होतो. तसेच मारुतीचे गुण वर्णन आत्मबल प्रदान करते. आणि समर्थांच्या काव्य प्रतिभा शक्तीचे दर्शन घडते. या एका श्लोकात ‘ळ’ या अक्षराचा दहा वेळेस उपयोग करून समर्थांनी अनुप्रास अलंकार साधला आहे. धन्य ते समर्थ ! हा मारुती स्थापन करण्यात समर्थांची भावना खूप विशाल झाली आहे. मारुतीला माता, पिता, बंधू, सखा या रूपात पाहणारे समर्थ या स्तोत्रात मात्र त्याच्याकडे मातेच्या प्रेमाने, वात्सल्याने पहात आहेत. भगवंतासह सर्वसृष्टी त्यांना पुत्रवत भासत होती. जीवाच्या कल्याणासाठी त्यांचे मातृ हृदय महान झाले होते. हा केवढा गोड विलक्षण आणि महान भाव आहे. पुढील श्लोकात समर्थांनी हनुमंताच्या अवयवांचे वर्णन करताना म्हटले आहे –

हात कि पाय कि सांगों । नखे बोटे परोपरी ।

दृष्टीचे देखणे मोठें । लांगूळ लळलळीतसे ।

 

हात, पाय, नखे, बोटे, दृष्टी या सर्व बाबतीत हनुमंत  देखणे आहेत. आणि त्यांची शेपटी त्यांच्या पाठीमागे लोंबकळत असते. समर्थांनी बाल मारुतीची स्थापना केली त्यामागे सुद्धा त्यांचे काहीतरी उद्दिष्ट होते हे आपल्याला स्तोत्रातील या श्लोकावरून समजते. 

बाळाने गिळीला बाळू । स्वभावे खेळता पहा ।

आरक्त पीत वाटोळे । देखिले  धरणीवरी ।

पूर्वेसी देखता तेथे । उडाले पावले बळे ।

पाहिले देखिले हाती । गिळीले जाळीले बहू ।

बाल हनुमंताची ही अद्भुत लीला सगळ्यांना माहित आहे. जन्मल्याबरोबर फळ समजून सूर्याला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे सूर्याच्या, इंद्राच्या क्रोधाला त्यांना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागला. त्याची कथा अशी आहे की,  हनुमंतांना भूक लागली तेव्हा सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने ते सूर्याकडे धाव घेऊ लागले. परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीमुळे चळाचळा कापू लागले. त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले. परंतु त्यांना तो खेळच वाटू लागला. ते सूर्याला पकडायचे आणि सोडून द्यायचे. त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरू लागला. असे करीत असताना त्यांनी सूर्याला गिळले. ते बघून इंद्रा सहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने  हनुमानाच्या हनुवटीला मार लागला आणि ते बेशुद्ध पडले. नंतर देवांनी भीतीमुळे त्याला शाप दिला की तुला आपल्या सर्व शक्तीचा विसर पडेल. पण अंजनी मातेच्या विनंतीवरून पुन्हा उःशाप दिला की कोणीतरी आठवण करून दिल्यावर त्याला आपली शक्ती आठवेल. ही कथा विद्यार्थ्यांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा प्रेरणा देणारी आहे. समर्थांना हेच सांगायचे आहे की हनुमंताने उत्तमाचा ध्यास घेतला, उत्तुंग ध्येय समोर ठेवल; ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धाडस सुद्धा दाखवले. पण त्याचबरोबर सारासार विचार सुद्धा करता आला पाहिजे. सूर्याकडे झेपावल्याने होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार हनुमंताने केला नाही. प्रत्येक जीवामध्ये बालपणापासून ऊर्जा असतेच. सारासार विचार करून त्या ऊर्जेचा उपयोग करून घेतला पाहिजे. मोठेपणी सुद्धा जो लहान बालकासारखा निरागस आणि सरळ हृदयी असतो तोच अध्यात्मिक होऊ शकतो. या दृष्टिकोनातून समर्थांनी बाल मारुतीची स्थापना केली. 

“उड्डाण पाहता मोठे । झेपावे रविमंडळा ।”

या ओळीवरून हनुमंताच्या शक्तीची कल्पना येते. हीच शक्ती आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये सुद्धा दिसते. वाऱ्याच्या वेगाने राजे गडकोट काबीज करत होते, गनिमीकाव्याने शत्रूला नेस्तनाबूत करून डोंगर कपारीमध्ये लपून बसत होते, या डोंगरावरून त्या डोंगरावर, या गडावरून त्या गडावर ‘हरहर महादेव’ ही गर्जना करत स्वराज्याचा विस्तार करीत होते. शिवाजी राजांच्या कर्तुत्वाचा समर्थांनी उल्लेख केला आहे की, पवनासारिखा धावे । वावरे विवरे बहू । सुंदरकांडात मारुतीच्या लीला रामाला खूप आनंद देतात. म्हणूनच त्या संपूर्ण अध्यायाला श्रीराम लीलाचे कांड म्हणून ‘सुंदरकांड’ असे प्रेमाने म्हणतात. श्रीराम आईप्रमाणे बाळाचे, त्याच्या गुणांचे, कर्तुत्वाचे कौतुक भावपूर्ण करतात. तोच भाव या स्तोत्रात आपल्याला जाणवतो. 

पळही राहिना कोठे । बळेची घालितो झडा ।

कडाडां मोडती झाडे । वाड वाडें उलंडती ।

या श्लोकातून सुद्धा मारुतीच्या कामाची तळमळ आपल्याला दिसून येते. प्रभू रामरायाची आज्ञा झाली की पळही म्हणजे एक क्षणभर सुद्धा वेळ न दवडता श्रीलंकेत जाऊन कडाडा मोडती झाडे, म्हणजे अशोक वनातील झाडे मोडली आणि वाड्या मागून वाडे ओलांडून रावणासमोर गेला. हेच हनुमंताचे स्वामी आज्ञा पालन खऱ्या दासाचे लक्षण आहे. जीवाच्या कल्याणासाठी, रामकार्यासाठी चिरंजीव झालेला हनुमंत क्षणभर सुद्धा उसंत घेत नव्हता. त्याचप्रमाणे हनुमंताच्या झंजावाती प्रतापाप्रमाणे शिवाजी राजे सह्याद्रीचे स्वातंत्र्य खेचून आणत होते. रामराज्याचे स्वप्न साकारताना पाहून आनंदित होत होते. या त्यांच्या कार्याला यश, कीर्ती, प्रताप, बल, सामर्थ्य देणारा शिंगणवाडीचा खडीचा मारुती बालरूपात दुडूदुडू धावत होता. मनातल्या मनात प्रसन्नपणे हसत होता. समर्थ सुद्धा मातृ हृदयाने आनंदी होते ही गाथा आहे. एका मारुती रूपाची मातृप्रेमाची आणि भक्ती-शक्तीच्या कार्याची ओळख म्हणूनच या मारुतीचे महत्व आहे. शिंगणवाडीच्या या मारुतीला शतशः प्रणाम !

निवेदन

भक्तीशास्त्रामध्ये परमेश्वर प्राप्ती करता सहज, सुलभ असा नवविधा भक्तीचा राजमार्ग संतांनी सांगून ठेवला आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं  पादसेवनम् ।

अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।।

सर्वसामान्य प्रापंचिक मनुष्य या आठ भक्तींपैकी आपल्याला जमेल ती, आवडेल त्या देवाची भक्ती करीत असतो. त्यामुळे भक्ती हे भगवंताच्या प्राप्तीचे अतिशय सोपे साधन आहे असा अनेकांचा समज असतो. परंतु तुकाराम महाराज म्हणतात –

“भक्ती तो कठीण सुळावरील पोळी ।निवडी तो बळी विरुळा शूर ।।”

भक्तीचा कठीणपणा सांगण्यासाठी तिला सूळावरच्या पोळीची उपमा दिली आहे. कारण भक्तीतील  अनन्यता साधण्याकरिता मनाची चंचलता, जिवलगांविषयी ममत्व आणि प्रपंचातील आसक्ती सोडावी लागते. प्रापंचिक मनुष्य विषयात गुंतलेला असल्यामुळे त्याला भक्तीचा अनुभव घेणे महाकठीण आहे. त्याच्या भक्तीच्या कल्पनाही संकुचित असतात. आपण करतो तीच भक्ती योग्य व खरी अशा कल्पनेने मनुष्य जन्मभर स्वतःचीच फसवणूक करीत रहातो व शेवटी हाती काहीही लागत नाही. म्हणून नवविधा भक्तीच्या आठही पायऱ्या सोप्या वाटत असल्या तरी त्याची परिणती आत्मनिवेदन भक्तीत झाल्याशिवाय भक्तीचे वर्म कळत नाही. श्रीसमर्थांनी ‘भक्त’ शब्दाची व्याख्या ‘विभक्त नव्हे तो भक्त’ अशी केलेली आहे. म्हणजे भगवंतापासून जो वेगळा उरत नाही तो भक्त होय. भगवंत व भक्त यांचा परस्पर संबंध कसा असतो हे समजण्यासाठी भगवंताचे खरे स्वरूप जाणून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 

भगवंत हा मूर्ती पुरता मर्यादित नसून तो अनंत, अपार, सर्वत्र भरून असलेला, अविनाशी, आनंदरूप असा आहे. त्याला वेगळेपणाने पहाता येत नाही कारण इंद्रियांना तो दिसत नाही, मनाला भासत नाही आणि त्याची कल्पनाही करता येत नाही. तो अतीन्द्रिय असल्यामुळे व्यक्त होत नाही. तो उत्पन्नही होत नाही आणि कधी नाशही पावत नाही. तो जशाचा तसा अलिप्तपणे सर्वांना व्यापून उरतो. अशा निर्गुण, निराकार शाश्वत देवाचे स्वरूप कसे आहे हे सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात-

“देवभक्तांचे मूळ । शोधून पाहातां सकळ ।

उपाधीवेगळा केवळ । निरोपाधी आत्मा ।। १२-३-२७।।”

जे इंद्रियांना दिसते ते सर्व दृश्य व अदृश्य जग नाशिवंत आहे, या वेगळा जो उरतो तो निरोपाधीक आत्माच खरा देव आहे. हा देव ओळखायचा कसा? तर खरा देव मीपणा दूर झाल्याशिवाय कळत नाही. यासाठी आधी ‘मी कोण’ याचा आपल्या अंतर्यामी शोध घेतला पाहिजे. जो देह म्हणजे ‘मी’ असे आपण समजतो, तो देह पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते व सत्त्व, रज व तम या तीन गुणांच्या मिश्रणापासून बनलेला आहे. तो सतत बदलणारा, मिथ्या व नाशिवंत आहे. अज्ञानामुळे जीवाला मी म्हणजे देहच आहे असे वाटते. या देहबुद्धीमुळे वासना उत्पन्न होऊन जीव दृश्य पदार्थ, व्यक्तींना मनाने चिकटतो व त्या बंधनात नकळतपणे बांधला जातो. देहाचे सुख तेच खरे सुख या भ्रामक जाणिवेने विषयसुख मिळविण्याकरता जीव दृश्य जगताकडे खेचला जातो आणि आपोआप स्वस्वरूपापासून दूर होतो. ज्या पंचभौतिक तत्वांचा मिळून देह बनलेला आहे ते पृथ्वी तत्त्व पाण्यात, पाणी तेजात, तेज वायूत, वायू आकाशात अशा पद्धतीने विलीन होतात आणि सगळ्यात शेवटी या सगळ्यांना व्यापून असणारा अविनाशी परमात्मा मात्र सदा, सर्वत्र, समत्वाने जशाचा तसाच शिल्लक राहतो. 

या परमात्मस्वरूप भगवंताशी ऐक्य साधण्यासाठी ‘मी देह आहे’ हा अहंकार सोडावा लागतो, तो कशाने सोडता येतो? तर स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पित करून सोडता येतो. यालाच आत्मनिवेदन म्हणतात. नि+विद् या धातूपासून निवेदन शब्द बनला आहे. आत्मनिवेदन हा नवविधा भक्तीचा आत्मा आहे. निवेदनाचे लक्षण सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात-

“ऐका निवेदनाचें लक्षण । देवासि वाहावें आपण ।

करावें तत्त्वविवरण । म्हणिजे कळे ।।४-९-३।।”

मीपणा संपून भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून जाणे हेच निवेदनाचे मुख्य लक्षण आहे. आपल्या देहातील पंचभौतिक तत्त्वांचा निरास झाला की शेवटी देहबुद्धीने पोसलेला खोटा मी सर्वस्वी नाहीसा होतो व केवळ चैतन्यमय आत्मतत्त्वच शिल्लक राहते. व तेच माझे खरे स्वरूप आहे असा भक्ताला साक्षात्कार होतो.

“तत्वें तत्व जेव्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे ।

आत्मनिवेदन येणें प्रकारें । सहजचि जालें ।। ४-९-९।।”

अश्याप्रकारे देवाला पाहायला गेलेला भक्त स्वतः देवरूपच होऊन जातो. ‘पाया पडू गेले तव पाऊलचि न दिसे’ अशी भक्ताची अवस्था होते. तेथे द्वैत पूर्णपणे संपून जाते. आत्मनिवेदनभक्तीमुळे संसारविरक्ती, सायुज्यमुक्ती व पाठीशी भगवतशक्ती असा तिहेरी लाभ साधकाच्या पदरी पडतो.

व्यवहारामध्यें भक्त व भगवंत हे दोघे देह रूपाने वेगळे दिसत असले तरी मी आणि निर्गुण निराकार भगवंत एकरूप आहोत असा विवेक जर भक्त सातत्याने करीत असेल तर तो मनाने भगवंतापासून कधीही दूर जात नाही. अश्याप्रकारे आत्मनिवेदनाने संपूर्ण संगत्याग झाला की अभेदभक्तीची अवस्था प्राप्त होते.

मी व माझे सगळे भगवंताला समर्पण करणे ही निवेदनाची पहिली पायरी होय. यासाठी वस्तू, व्यक्तींचा संग मनाने सोडावा लागतो. याला जड आत्मनिवेदन म्हणतात. 

भगवंत हा सर्व चराचराला व्यापून असून तोच सृष्टीचा कर्ता आहे हे पक्के ध्यानात ठेवले की, मी म्हणून कोणी वेगळा उरत नाही. त्यामुळे मी कर्ता, मी भोक्ता हा अहंकार नाहीसा होतो. ही निवेदनाची दुसरी पायरी आहे. यालाच ‘चंचळ आत्मनिवेदन’ म्हणतात. जे जे दिसते ते सगळे माया निर्मित, स्वप्नवत आहे. ते दिसत असले तरी खरेपणाने टिकत नाही. म्हणून जे शाश्वत परमात्मतत्त्व आहे तेच तेव्हढे खरे आहे आणि ‘तेच तू आहेस’ असा उपदेश संत आपल्याला करतात. ही निवेदनाची शेवटची पायरी आहे.

सगळ्या नाशिवंत गोष्टींचा संगत्याग व आत्मनिवेदन या दोन्हीचे फळ म्हणजे समाधानाची प्राप्ती होय. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे श्रीसमर्थ म्हणतात.

राममंत्र श्लोक ४, ५, ६

जरी ही तनू रक्षिसी पुष्ट काही ।

तरी भोग तो रोग होईल देहीं ।

विपत्ती पुढें ते न ये बोलतां रे।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥ ४ ॥

सरल अर्थ – अतिदुर्लभ असा नरदेह पूर्वसुकृताने मिळाला म्हणून त्याचे लाड-कोड पुरवण्यात, श्रीसमर्थांच्याच शब्दात “अत्यादरे पिंडपोषण” करण्यात आयुष्याचा सर्वाधिक काळ खर्च करावा का? माणूस आस्तिक असो वा नास्तिक, बुद्धिवादी असो वा समाजवादी सगळेच मनापासून या देहाचे, त्याबरोबर देहबुद्धिचे भरण-पोषण करण्यात गुंतलेले असतात. त्याच्या अतिरेकाने आपले शरिर रोगाचे भक्ष्य कधी बनते ते कळतही नाही. तेव्हा आधीपासूनच विवेकाने हरे राम या सोप्या मंत्राचा जप सुरू करावा हेच खरे.

श्रीसमर्थांचा बोध – या आधीच्या श्लोकातून श्रीसमर्थांनी स्पष्टच सांगितले आहे की, पूर्वपुण्याई फळाला आली आणि हा नरदेह लाभला आहे. अध्यात्मदृष्ट्या नरदेह हे ईश्वरप्राप्ती साठीचे एक साधन आहे. जन्माला येण्यापूर्वी जीव देवाला ‘सोऽहं’ म्हणत परमेश्वराकडे कळवळून प्रार्थना करतो, “येथील यातनातून सोडव रे देवा ! मी तुला कधीही विसरणार नाही.” मात्र गर्भातून बाहेर येताच ‘कोऽहं’ म्हणू लागतो. देहालाच ‘मी’ मानून त्याचे लाड करू लागतो. जसे प्रवास करताना गाडी हे प्रवासाचे साधन आहे. प्रवास सुखकर व्हावा म्हणून गाडीची काळजी घेणे, जसे इंधन भरणे; योग्य ती देखभाल करणे जरुरीचे असते. गंतव्य स्थानी पोहोचल्यावर गाडीचे महत्व संपते. त्याचप्रमाणे देहाचा उपयोग ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी आहे पण हा मुख्य उद्देश विसरून माणूस देहाचे चोचले पुरवण्यात गुंतून पडतो. अतिभोगाने देहबुद्धी बळावते, देह रोगाचे कोठार बनते. वेळेवारी भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केले तर इंद्रियांचे विषयांवर असलेले प्रेम हळूहळू भगवंताकडे रूपांतरीत होते. देहबुद्धी कमी होते. भक्ताच्या जीवनात संकटे आली तरी तो विचलीत होत नाही.  रामाचे चिंतन सुरू झाले की प्रापंचिक चिंता दूर पळतात. म्हणूनच श्रीसमर्थ  म्हणतात.. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. 

 

खुळे हस्तपादादि हे भग्न होती ।

दिठी मंद होवोनियां कर्ण जाती ।

तनू कंप सर्वांगी होती कळा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥ ५ ॥

सरळ अर्थ – सतत बदलणे हा या सृष्टीचा नियम आहे. ‘यद्दृष्टं तन्नष्टं’ जे दिसते ते सतत बदलत असते, कायमस्वरूपी असे येथे काहीही नाही. हात खुळे होतील, पाय तुटतील, नजर कमजोर होईल, कानही काम करेनासे होतील, शरीराला कंप सुटेल. तारुण्यात सौंदर्याने-शक्तीने रसरसलेला देह कमजोर होणार हे निश्चित आहे. मग आज आत्ता ताबडतोब नामाला लागावे आणि हरे राम हा सोपा मंत्र जपावा.

श्रीसमर्थांचा बोध – दुर्लभ नरदेह पूर्वपुण्याईने लाभला तरी तो काही शाश्वत नाही. बाल्य-तारूण्य-वृद्धत्व या देहाच्या मर्यादा आहेत. वेळ-काळाचेही बंधन आहेच. तसेच हा मानवी देह कर्माच्या सिद्धांतानुसार सुख-दुःख भोगत असतो. श्रीसमर्थ करूणाष्टकात म्हणतात.. “सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले ।” सुखाच्या शिखरावर असताना अचानकपणे काहीतरी असे प्रसंग घडतात, माणूस मोडून पडतो. हात तुटतात, पाय मोडतो. जोषात चालू असलेले काम थांबते. दबक्या पावलाने वृद्धत्व पुढ्यात उभे राहाते. दृष्टी मंद होते, ऐकायला कमी येऊ लागते, दंतपंक्ती जागा सोडू लागतात, त्वचा सुरकुत्यांनी भरून जाते. प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे अध्यात्मिक-आधिभूतिक-आधिदैविक ताप तर भोगणे क्रमप्राप्त असते. या सर्व जंजाळातून भगवंताचे नाम घेण्यास वेळ मिळत नाही. मृत्यू समोर दिसू लागला की देव आठवतो. तोपर्यंत वेळ हाताच्या बंद मुठीतून वाळू गळून जावी तशी निघुन गेलेली असते. म्हणूनच श्रीसमर्थ कळकळीची विनंती करतात भल्या माणसांनो, अंगात ताकद आहे; शक्ती आहे तोपर्यंतच स्वतःला नाम घेण्याची सवय लावून घ्यावी. नाम घेताघेता नामाची गोडी आपोआप लागेल. म्हणूनच सातत्याने हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

कफे कंठ हा रोध होईल जेव्हां ।

अकस्मात तो प्राण जाईल तेंव्हां ।

तुला कोण तेथें सखे सोयरे रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥ ६ ॥

सरळ अर्थ – कफाने घसा भरलेला असल्याने आवाज निघत नाही. बोलायचा प्रयत्न केला तरी शब्द न फुटता भलताच आवाज येतो. बहुतेक या स्थितीला लोक घर घर लागली असे म्हणत असावेत. आणि अचानक प्राणपक्षी उडून जातो. तो जिथे जातो तिथे आपले म्हणावे असे सखे, सोयरे कोणीही नसतात. जिवंत असताना केलेल्या भगवंताच्या नामस्मरणाची तेवढी सोबत असते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात.. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

श्रीसमर्थांचा बोध – मनुष्याच्या जीवनातील अटळ आणि निश्चित गोष्ट म्हणजे मरण. जन्माला आला त्याच क्षणी मरण निश्चित झाले. ‘नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती ।’ हे माणूस विसरतो आणि अमर असल्याप्रमाणे विषय-विकाराच्या उपभोगात रमतो, गुंतून पडतो. अलौकिक असा नरदेह प्राप्त होऊनही हा जीव आपले ‘स्व-हीत’ साधत नाही. प्राप्त झालेल्या सुवर्णसंधीचा उपयोग न करता उपभोगाच्या बेहोशीत मरणाच्या दिशेने वाटचाल करतो. तारुण्याच्या मस्तीत देवधर्म करत नाही. हा माझा; तो माझा; ‘कन्या पुत्र दारा सगे सोयरे ते’ सगळ्यांचा आधार वाटतो. पण वेळ आली की कोणी कोणाचे नसते हे माणसाच्या लक्षात येत नाही. मानवेतर प्राण्यांपेक्षा मनुष्यास देवाने दिलेली बुद्धि आणि मन सर्वात जास्त विकसीत तसेच प्रगल्भ आहे. माणसाला भल्या-बुऱ्याची जाण असते. तो विवेकाने आपले कर्म बदलू शकतो. परमेश्वराने कर्मनिवडीचे स्वातंत्र्य फक्त माणसाला दिले आहे. तरीही मृत्यू जवळ आल्यावर सुद्धा नामस्मरण करावे असे वाटत नाही. सग्यासोयऱ्यांवर विश्वास असतो तेवढा देवावर नसतो. एके दिवशी अचानक मृत्यू गाठतो. कधी आजारपणाने कधी वृद्धत्वाकडे तर कधी अपघाताने मृत्यूलोक सोडून जावेच लागते. कुठे जातो? तिथे सगेसोयरे मदतीला येतात का? उत्तर आहे नाही. म्हणूनच परमार्थात प्रत्येकाने स्वार्थी = स्व+अर्थी असावे. आपले हित आपणच पहायचे असते. आपण जन्मभर जे रामनाम घेतो तेच अंतीम प्रवासात आपल्यासोबत असते. आपला स्वार्थ, आपले हित फक्त आणि फक्त नामस्मरणात साठवलेले आहे त्यासाठीच श्रीसमर्थ  म्हणतात.. हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे.

|| जय श्रीराम ||

अग्नि निरुपण

सप्ततिन्वय या १६ व्या दशकात समास ५ ‘अग्नि निरुपण’ समर्थांनी वर्णन केला आहे. सप्तसप्ति असे सूर्याचे एक नांव आहे. सूर्य आपल्याला उष्णता व प्रकाश देतो. उपासनेच्या पातळीवर असणाऱ्या प्रत्येक साधकाला आत्मानात्मविवेक आणि सारासार विचार करावा लागतो.

अग्नि आपल्या रोजच्या वापरात असतो. अग्नि शिवाय आपला एक दिवसही चालणार नाही. प्रभूरामचंद्भगवान व सुग्रीव यांची मैत्री अग्निच्या साक्षीनेच झाली होती. आपल्या मुला मुलींचे विवाह, अग्निला साक्षी मानूनच होतात. लग्नात अग्नीच्या सहाय्याने फटाके उडवतात व आनंद व्यक्त करतात. 

अग्नी हे सीतेचे वडिल होत. रामचंद्रांचे सासरे होत. १४ वर्षे वनवासातून प्रभूरामचंद्र आले तेव्हा, सीतामातेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. त्यावेळी अग्नी प्रकट झाले व रामांना म्हणाले ही माझी कन्या आहे. रावणाकडे अशोक वनांत राहिली तरी ती पवित्र आहे.

पूर्वीच्या काळी काडेपेटीचा शोध लागला नव्हता, तेव्हा गारगोटी एकमेकावर घासून, आग तयार करत. मानव त्या अग्निवरच मांस भाजून खात असे. थंडीत शेकण्यासाठी आगीची गरज लागते. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक वापरली तर तिचा चांगलाच उपयोग होतो, अन्यथा उन्हाळयात आगी लागण्याचे प्रकार आपण पहातोच. 

“धन्य धन्य हा वैश्वानरु  । होये रघुनाथाचा श्वशुरु  । विश्वव्यापक विश्वंभरू । पिता जानकीचा ।। १६-५-१ ।।” प्राचीन आर्य हे अग्निपूजक होते. भारतीय संस्कृती मध्ये अग्नीला ३ देवांचे प्रतिनिधी मानतात. याला ३ पाय, ६ हात आहेत. अग्निने  दिलेल्या उष्णतेने माणसाच्या शरीरातील सर्व क्रिया चालतात. अग्नि अत्यंत पवित्र आहे. तो अंत्यजाच्या घरचा जरी वापरला तरी तो पवित्रच आहे. अग्नि अंधार, थंडी, रोग निवारण करतो. अग्निमुळे सृष्टी चालते. त्याच्यामुळे लोक जिवंत रहातात व तृप्त होतात. अग्नि विश्व व्यापून आहे, तो जगाचे व जिवांचे पोषण करतो. तो ईश्वराचे मुख आहे. 

ज्ञानेश्वरीच्या ११ व्या अध्यायात, जेव्हा भगवंतानी अर्जुनाला दर्शन दिले, तेव्हा भगवंताच्या, मुखातून अग्नि बाहेर पडत होता. कारण अग्नि भगवंताचे मुख आहे. म्हणूनच होळीची पोळी आपण अग्नित टाकतो, तो अति पवित्र आहे. सर्व यज्ञयाग अग्निमुळे चालतात. ऋषींना तपश्चर्येचे फळ तोच देतो. पृथ्वी अग्निपासून निर्माण झाली. देहाला तोच व्यापून राहतो, त्याच्या मुळेच भूक लागते.

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित: ।

प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।। गीता १५-१४ ।।

बरोबर बारा वाजता आपल्याला भूक लागते. कारण नाभिस्थानावर वैश्वानर म्हणजे अग्निच विराजमान आहेत. आपण जे जे खातो ते सर्व अन्न पचविण्याचे काम तो करतो. चतुर्विध म्हणजे भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य असे चार प्रकारचे अन्न तो पचवतो. भक्ष्य म्हणजे पोळी, भात, वरण अशा प्रकारचे अन्न. भोज्य म्हणजे लाडू, जिलेबी, श्रीखंड, बासुंदी असे पदार्थ. लेह्य म्हणजे ताक, सांबार असे पातळ पदार्थ. चोष्य म्हणजे चोखून खायचे पदार्थ. उदा. आंबा, जांभूळ. आपण शेंगदाणे, फुटाणे असे कडक पदार्थ खातो तरी पचतात. ऊस दाताने खातो. काहीही खा, वैश्वानर पचवतो. भाजी, भाकरीचे लालभडक रक्त तयार होते. हे विशेष आहे की नाही ? 

दिवे अग्नीच्या सहाय्याने लागतात व जळतात. अंधारात व थंडीत तोच उपयोगी पडतो. त्याच्या जोरावर शत्रूस जिंकता येते. ऊष्ण औषधाने रोग हरण होतात. महारोग देखील बरा होतो. अग्नि जसा उपाय करतो, तसा अपाय पण करतो. सूर्य व अग्नी ही मोठी दैवते आहेत. जिवंतपणी जसे तो रक्षण करतो, तसेच मेल्यावर देहाचे भस्म करतो. जगात अग्नीदिव्य प्रसिध्दच आहे. अष्टधाप्रकृति व तिन्ही लोक अग्नीने व्यापले आहेत. 

सूर्य सकळांहून विशेष | सूर्याउपरी अग्नीप्रकाश |

रात्रभागीं लोक अग्नीस | साहें करिती || १६-५-११ ||

सूर्य मावळल्यावरही अग्नीच प्रकाश देतो. रात्रीच्या वेळी लोक अग्नीचीच मदत घेतात.

माऊली म्हणते, “म्हणूनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ।। ज्ञानेश्वरी ६-५१।।” अग्नीसेवा न सोडता, किंवा कर्माची मर्यादा न ओलांडता, आपले योगसुख आपल्याजवळच आहे. अग्नीमुळे सृष्टी चालते. अग्नीमुळे लोक तृप्त होतात. अंगातील उष्णता नाहिशी झाली तर सगळे प्राणी मरून जातात. प्रथम देहातील अग्नि मंद होतो, नंतर प्राण्याची प्रकृति बिघडते.

युध्दाचे वेळी मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्र यात अग्निच असतो. अग्नी तृप्त झाला की, मग तो अति प्रसन्न होतो. देव‌, दानव, मानव या सर्वांचे व्यवहार अग्नीच्या बळावरच चालतात. सर्व लोकांना अग्नी हाच तारक उपाय आहे. जगात मोठमोठ्या यात्रा भरतात, त्या दारुकामानेच शोभतात.

सूर्य व अग्नि हे ब्राह्मणाचे सर्वस्व होय. “लोकामध्यें जठरानळु | सागरीं आहे वडवनाळु | भूगोळाबाहेर आवर्णानळु | शिवनेत्रीं विद्युल्यता || १६-५-१८ |”| शरीरात जठराग्नी असतो. सागरामध्ये वडवानल असतो. भूगोलाबाहेर आवरणानल असतो. आणि शंकराच्या डोळ्यात वीजरूपी अग्नी असतो. काचेतून अग्नी निघतो. तसा तो आरशातूनही प्रकट होतो. लाकडावर लाकूड घासल्याने आणि चकमकीने अग्नी प्रकट होतो. आग्या सर्पाच्या तोंडातील अग्नी डोंगरदऱ्या जाळून टाकतो.

अष्टधा प्रकुर्तीं लोक तिन्ही । सकळ व्यापून राहिला वन्ही । अगाध महिमा वदनीं । किती म्हणोनी बोलावा ।। १६-५-२८ ।।” तिन्ही लोक व अष्टधा प्रकृती यास अग्नीने व्यापले आहे. त्याचा महिमा मुखाने किती वर्णन करावा ? प्रलयकाळचा अग्नी सर्व सृष्टीचा संहार करतो. त्या अग्नीपुढे काही शिल्लक रहात नाही. दिपाराधने आणि निरांजने पेटवून लोक देवाला ओवाळतात. अग्नीदिव्य करूनच खरे खोटे, न्याय निवा‌डा होत असतो. कडकडीत तापलेल्या तेलात सोन्याचे नाणे टाकायचे, व हाताच्या बोटांनी ते बाहेर काढायचे, हे अग्नीदिव्य  होय.

समर्थांनी अग्नीचे वर्णन छान केले आहे. अग्नीशिवाय आपले काहीच चालत नाही. कामाग्नी, क्रोधाग्नी, भडाग्नी असे अग्निचे अनेक प्रकार आहेत. पुरुरव्याने पुढे तीन अग्नीचा शोध लावला. गार्हपत्य (घरातही चोवीस तास असलेला), आहवनिय (यज्ञ कार्यासाठी गृहपत्नीने आणावयाचा), तिसरा दाक्षिणाग्नी असे अग्नीचे प्रकार आहेत. 

संत श्रीगजानन महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग आहे. गजानन महाराज मुलांबरोबर संवाद साधत होते तेव्हा त्यांना चिलिम ओढण्याकरीता अग्नि हवा होता, म्हणून त्यांनी मुलांना जवळच्याच सोनाराकडून अग्नि आणायला सांगितला. परंतु त्या जानकीराम सोनाराने अग्नि देण्यास नकार दिला. म्हणून महाराजांनी मुलांना चिलमीवर नुसती काडी धरायला सांगितली. तेव्हा अग्नि प्रकट झाला आणि चिलिम धूर सोडू लागली.

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, “जयाचेनि बोले धर्मु जिये । दिठी महासिध्दिते विये । देख स्वर्गसुखादि ईये । खेळू जयाचा ।।” ज्यांच्या बोलण्याने धर्म जागतो, त्या संतांची नुसती दृष्टि महासिध्दीना जन्म देते. “मूळव्दारी दादा स्थापिला गणपती । माया ही उत्पत्ती कैशी झाली । वेदाचें जन्मस्थान तेंचि बाई । दहा पवनांचा एक झाला मेळा । रेणूचा जिव्हाळा सर्वांसी हा ।।” दहा पवन म्हणजे पंचतन्मात्रा व पंचमहाभूते ध्यानात हे सर्व एक होते. अणू म्हणजे माया. रेणू म्हणजे चित्शक्ती. सूर्य धगधगीत आहे. त्याची उर्जा मूळ स्वयंभू आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्री दासविश्रामधाम …………….. समर्थ संप्रदायाचा एन्सायक्लोपीडिया

एक्केहाळी अर्थात सध्याचे जहीराबाद मठाचे मठपती श्री आत्माराम महाराज यांनी श्री दासविश्रामधाम या ग्रंथाची रचना केली आहे . श्री समर्थ रामदास.. कल्याण ..शिवराम.. रामचंद्र आणि आत्माराम अशी ही शिष्य परंपरा होय. आत्माराम महाराजांचे मूळ नाव तीपण्णा. त्यांच्या मुंजीनंतर त्यांना प्रखर वैराग्य प्राप्त झाले. एके दिवशी त्यांचा भाग्योदय होऊन आपचंद मठाचे मठपती रामचंद्र महाराज यांचा त्यांना अनुग्रह झाला .
एक हजार पानांचा हा ग्रंथ एक्केहळी मठाच्या बाहेर नेता येत नाही, अशी त्याची ख्याती आहे. हा ग्रंथ उतरवून घेण्याचे मोठे काम समर्थ हृदय नानासाहेब देव यांचे कडे असलेल्या श्री श्रीधर पंत नाटू टिकले यांनी केले. हा ग्रंथ नक्कल करून घेण्यासाठी त्यांना चार महिने दहा दिवस लागले. 1910 मध्ये या ग्रंथाची नक्कल झाली. आणि पुढे बारा वर्षांनी म्हणजे 1922 मध्ये श्री नानासाहेब देव तथा शंकर श्रीकृष्ण देव यांनी हा ग्रंथ छापून समर्थ भक्तांपुढे आणला .
श्री रामदास स्वामींचे बृहत चरित्र असलेला श्री दासविश्रामधाम या ग्रंथांमध्ये 121 अध्याय असून ओवी संख्या ही सोळा हजार तीनशे एवढी आहे . या ग्रंथात जवळपास 500 अभंग , 230 पदे , 100 श्लोक आणि प्रसंगोपात घेतलेल्या आरत्या , भूपाळ्या अशी सगळी संख्या 17000 ओवींच्या पुढे जाते. या ग्रंथामध्ये श्री समर्थांचे चरित्र आलेले आहे. पण त्यात बालपण , तारुण्य, साधना काळ , समर्थांचे परिभ्रमण, हिंदवी स्वराज्याची स्थापना अशा क्रमाने आलेले प्रसंग दिसत नाहीत . बरीच नाविन्यपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला प्रसंगोपात दिसून येते. अनेक संतांची पदे या ग्रंथामध्ये आपल्याला पहावयास मिळतात.

साडेतीन कोटी जप संख्या झाल्यानंतर माझे दर्शन होईल असे प्रभू श्रीरामांचे वचनाचा संदर्भ या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो . समर्थांनी घेतलेल्या 36 मुद्रांची अर्थात नावांची 36 पदे ओळीने आलेली आहेत, ही एक खासियत या ग्रंथात दिसते.

समर्थ रचित मनाचे श्लोक , त्याचे महत्त्व आणि पद्धत आपल्याला या ग्रंथात विशेषत्वाने सांगितलेली आहे. आद्य कवी मुकूंद राजांच्या विवेक सिंधूचा प्रभाव दासबोधावर आहे याचा प्रत्यय आपल्याला आत्माराम महाराजांनी वर्णन करून सांगितला आहे . या ग्रंथात क पासून क्ष वर्णापर्यंत अक्षर माळीका डफ गाणे आपले लक्ष वेधून घेते . अशा अनेक वैविध्यपूर्ण आणि प्रसंगांची वर्णने असलेला हा ग्रंथ म्हणजे समर्थ संप्रदायाचा एनसायक्लोपीडिया होय. कीर्तनकार , प्रवचनकार , समर्थ भक्त आणि समर्थ वाङ्मयाचे संशोधक यांच्या घरी हा ग्रंथ असणे म्हणजे समर्थांची वांग्मयीन मूर्तीच आपल्या घरी आहे, अशी आनंददायी व भाग्याची बाब समर्थ भक्तांना वाटणे स्वाभाविक आहे. धुळे येथील सत्कार्योतेजक सभेने ( श्री नाना साहेब देव मार्ग, राम वाडी, धुळे 424OO1) या ग्रंथाची उपलब्धता सर्वांना करून दिलेली आहे, ही मोठी समाधानाची गोष्ट आहे.

परम पूजनीय अक्का स्वामी वेलणकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे समीक्षक श्री अनिल वाकणकर यांनी महत्प्रयासाने या ग्रंथाचे पीडीएफ केले, तर श्री आनंद जोगळेकर आणि त्यांच्या टीमने श्रीदासविश्रामधाम हा ग्रंथ दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संकेतस्थळावर जगातील सर्व समर्थ भक्तांना अथक परिश्रमातून उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

समर्थ संप्रदायासाठी एक अभिमानास्पद कार्य या मंडळींनी केले आहे, याचा मोठा आनंद वाटतो.

ग्रंथाची लिंक  – https://ramdasswami-sahityashodh.in/shridasvishramdham.aspx

|| जय जय रघुवीर समर्थ ||

स्थूल देह

आपण प्रत्येक प्राणीमात्रांची जी शरीरे बघतो ती सर्व हात, पाय, कान, नाक, डोळे वगैरे सर्व अवयवांनी तयार झालेली असतात. ती सारी स्थूल शरीरे म्हटली जातात. माणसाचे शरीर हे ब्याऐंशी तत्त्वांचे गाठोडे आहे. यातील प्रत्येक तत्त्व जड आहे. म्हणजेच त्या तत्त्वाला स्वतंत्र अशी चेतना नाही. उदाहरणार्थ – माझा हात जोपर्यंत माझ्या शरीराशी जोडलेला आहे, तोपर्यंत तो हालचाल करू शकतो. तसेच माझे इतर अवयवांचे आहे. माझा हात, माझा पाय, किंवा इतर कोणताही अवयव जर माझ्या शरीरापासून वेगळा केला, तर तो हालचाल करू शकणार नाही. किंवा त्याला संवेदना प्राप्त होणार नाही. वेगवेगळे स्पेअर पार्ट्स जोडून एखादी स्कूटर तयार करावी, त्याप्रमाणे माझे शरीर म्हणजे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय यांची जोड आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचभूतांचे पंचवीस गुण मिळवून स्थूलदेह बनतो. या स्थूल देहाची पंचवीस तत्त्वे अशी आहेत. 

पहिले भूत पंचक : यामध्ये आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी येतात. 

दुसरे विषय पंचक : यामध्ये स्पर्श, रूप, शब्द, रस, गंध ही पाच तत्त्वे येतात.

तिसरे अंत:करण पंचक : यामध्ये प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही पाच तत्त्वे येतात.

चौथे प्राण पंचक : यात व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण ही पाच  तत्त्वे येतात. 

पाचवे ज्ञानेंद्रिय पंचक : यात  कान, नाक, डोळे, जीभ व त्वचा ही पाच तत्त्वे येतात. कर्मेंद्रियात वाणी, हात, पाय, जननेंद्रिय व गुद अशी पाच तत्त्वे आहेत. 

आपण आपल्या स्थूल देहाचा विचार करीत आहोत. हे सारे दृश्य जगत पंचभूतांनी नटलेले आहे. आणि आपले शरीरही या जगताचाच एक घटक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाच महाभूते आहेत. अर्थात जे माता-पित्यांच्या रज-वीर्यापासून उत्पन्न होत असते, त्याला स्थूल शरीर म्हणतात. याचे दुसरे नाव अन्नमय कोश आहे. कारण हे अन्नाच्या विकारापासून उत्पन्न होत असते आणि जिवंत रहाते. म्हणून हे अन्नस्वरूपच आहे. इंद्रियांना विषय असल्याने हे शरीर “इदम” असे म्हटले जाते. मनुष्याला यापासूनच बुद्धीपर्यंतचे ज्ञान होते. परंतु बुद्धीच्या पुढील ज्ञान होत नाही म्हणून त्याला अज्ञान म्हणतात. श्रीमद् भगवद्गीतेत या शरीराला क्षेत्र म्हणजे शेत म्हटले आहे. जसे शेतात निरनिराळी बीजे पेरून पिके घेतली जातात, तसेच या मनुष्य शरीरात अहंता; ममता धारण करून जीव अनेक प्रकारचे कर्म करीत असतो. त्या कर्माचे संस्कार जेव्हा फळाच्या रूपात प्रकट होतात, तेव्हा देवता; पशु; पक्षी; कीटक; पतंग; इत्यादी शरीरे मिळत असतात. शेतात आपण जसे बीज पेरू तसे धान्य उत्पन्न होते. त्याचप्रमाणे शरीराने जशी कर्म केली जातात, त्यानुसार  शरीर; परिस्थिती; इत्यादी प्राप्त होतात.

तात्पर्य, या शरीरात केलेल्या कर्मानुसारच हा जीव वारंवार जन्म-मरणरूपी फळ भोगत असतो. प्रत्येक निर्मित वस्तू कालबद्ध असल्यामुळे ती सतत बदलत असते, गतिमान असते; ती तिच्या विनाशाकडे हळूहळू जात असते. सतत परिवर्तन हे तर विश्वाचं स्वरूपच आहे. वस्तूमध्ये अनेकत्व असतंच. ह्या विश्वात अगणित नामं आणि रूपं आहेत. आता हे सर्व आपल्या शरीराला लावून पाहायचं आहे, कारण या शरीराला “इदम” म्हटलं आहे. आपण आपल्या शरीराला मात्र “अहं”, “मी” किंवा मम म्हणजे माझं असं समजत असतो. तसं पाहिलं तर हे पुस्तकही माझं आहे, पण ते मी आहे असं मला कधी वाटत नाही. त्या पुस्तकाची सुखदुःख ती माझी  नाहीत. कुठलीही वस्तू खराब झाली तर आपण तिचा सहज त्याग करतो. मग शरीर माझं आहे, त्याचं दुखणं हे माझं दुखणं; त्याला भूक लागली की मला भूक लागली; असं मला का वाटतं/ पटतं? कारण ते नुसतं माझं नाही तर ते म्हणजे मीच आहे, अशी माझी ठाम समजूत आहे. शरीराला वेगळे पहाणे हे फार महत्त्वाचे आहे. असे पहाणे फक्त साधकासाठी नाही तर प्रत्येक मनुष्यमात्रासाठी आवश्यक आहे. कारण स्वतःचा  उद्धार करण्याचा अवसर फक्त मनुष्य शरीरातच आहे.

आता आपल्याला या स्थूल शरीराच्या माध्यमातून सूक्ष्म असणारा अंतरात्मा जाणून घ्यायचा आहे. त्यासाठी या स्थूल देहाचाच आधार घ्यायचा आहे. आपण सुरुवातीलाच बघितले की, आपले शरीर मग ते स्थूल असो वा सूक्ष्म असो, तत्त्वांचे गाठोडे आहे. आणि ही सारी तत्त्वे जड आहेत. याचा अर्थ असा आहे की, या साऱ्या तत्त्वांना स्वतंत्र जाणीव नाही, चेतना नाही. आपला प्रत्येक अवयव जोपर्यंत शरीराशी जोडलेला आहे, तोपर्यंतच तो कार्य करू शकतो. यातील कोणताही अवयव जर वेगळा केला, तर हालचाल करू शकणार नाही, किंवा त्याला संवेदना प्राप्त होणार नाही. आता आपले जे शरीर आहे, ते जड आहे; त्याला वजन आहे का? तर आहे. माझ्यातील ते ‘पृथ्वी तत्व’ आहे. आता पृथ्वी म्हटले की, आपल्यासमोर पृथ्वीचा म्हणजेच ब्रह्मांडाचा मोठा आकार उभा रहातो. पण आपल्या स्थूलदेहातील पृथ्वी तत्त्व म्हणजे, माझी हाडे; मांस; त्वच नाडी व रोम. या सर्वांनाच आकार आणि वजन आहे. आणि तेच माझ्यातील पृथ्वी तत्त्व होय.

आता माझ्यातील पृथ्वी तत्त्वाला स्वतंत्र चेतना आणि स्वतंत्र अस्तित्व नाही, त्याला जाणीवही नाही. त्याचप्रमाणे त्यात सतत बदल होत असतो, म्हणून पृथ्वी तत्त्व हे काही माझे खरे स्वरूप नाही. आता आपण जेव्हा आपाचा विचार करतो तेव्हा माझ्यातील/माझ्या शरीरातील रक्त, लाळ, रेत, मूत्र व घाम हे माझ्यातील ‘आपतत्त्व’ आहे. माझ्या शरीरात रक्ताचा प्रवाह चालू आहे, ते माझ्यातील आप तत्त्व  आहे. शरीरात असा ओलसरपणा आहे म्हणून माझी हाडे लवचिक आहेत. माझ्या शरीरातील आप तत्त्व नश्वर आहे. या आप तत्त्वाला स्वतःची अशी स्वतंत्र जाणीव नाही. म्हणून ते आपतत्त्व हे माझे खरे स्वरूप नव्हे.

तसेच तेजाच्या बाबतीतही म्हणता येते. आपण ९७ ते ११० या तापमानात जगत असतो. आता भूक, तहान, आळस, झोप, मैथुन ही माझ्यातील ‘तेज तत्त्वं’ आहेत. परंतु, या साऱ्या गोष्टी मानसिक असून जड आहेत. त्यांना स्वतःची अशी स्वतंत्र चेतना नाही, म्हणून तेज हे माझे खरे स्वरूप नाही.

तसेच वायूच्या बाबतीतही म्हणता येते. मी श्वासोच्छ्वास घेतो. त्यावरून, माझ्यात वायू तत्त्व आहे. ते सूक्ष्म असले तरी, शेवटी जड तत्त्वच आहे. त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, म्हणजे ते माझे स्वरूप नाही. आकाश तत्त्व सर्वात सूक्ष्म आहे. माझ्या शरीरात अवकाश म्हणजेच पोकळी आहे. म्हणून काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे वृत्तीचे तरंग अंत:करणात उमटू शकतात. २४ तास रक्ताभिसरण सुरू असते, ते सूक्ष्म आहे. पण, त्यालाही जडत्व आहे. म्हणजेच आकाश सुद्धा माझे खरे स्वरूप नाही. 

आपण स्थूल देहाच्या आठ अवस्था बघितल्या आहेत. स्थूल देहामध्ये जागृती अवस्था असते, तेव्हा इंद्रिय जागृत असतात. त्यामुळे सारे व्यवहार सुरळीत व सुसंगत होत असतात. आणि त्यातूनच मी कर्ता हा त्याचा अभिमान असतो. तो विश्वातील प्रत्येक योनीत असतो. या साऱ्या गोष्टीचा आत्मानात्मक विवेक आपण करतो, तेव्हा बुद्धी आत्मसन्मुख होते. हळूहळू ती सूक्ष्म होत जाते. आणि मग आपण ईश्वराच्या अस्तित्वाविषयी नि:शंक होतो; वासना क्षीण होऊन रामकर्ता भावना निर्माण होत वृत्ती शांत होते. या साऱ्या गोष्टी गुरुच्या सान्निध्यातच आपल्याला कळायला लागतात. आणि आपला साधनेचा प्रवास सुखाने सुरू होतो. म्हणून सत्शास्त्राचे श्रवण सतत करावे. उत्तम गुणांचा अभ्यास करावा. आणि याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा अनुभवावा.

जय जय रघुवीर समर्थ

भगवद्गीतेच्या १५ व्या अध्यायातील पुरुषोत्तम आणि श्रीसमर्थांचा उत्तमपुरुष

गीता सुगीता कर्तव्या किमन्यै: शास्त्रविस्तरै: ‌|

या स्वयं पद्मनाभस्य मुख्यपद्मादि्वनि:सृता |‌| ४‌ ||

पुण्यपावनी भगवद्गीतेची महानता यथार्थतेने व्यक्त करणारा हा श्लोक आहे. भगवद्गीता हे वेदांचं सार. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून हे सार बाहेर पडलेलं आहे. त्यातही पंधरावा अध्याय हे “गुह्यतम्” शास्त्र असल्याची ग्वाही भगवंत स्वत:च देत आहेत. हे जाणणारा बुध्दिमंत “कृतार्थ, कृतकृत्य” व्हावा ही अपेक्षाही व्यक्त झाली आहे. हा पंधरावा अध्याय “पुरुषोत्तम योगा”चा आहे.

“पुरुषोत्तम योग” हा अत्यंत व्यापक विचार आहे. “पुरुषोत्तम” म्हणजे सच्चिदानंदरुप, सर्वव्यापक, अनादि, अनंत, शाश्वत परमतत्व/परब्रम्ह/सद्वस्तू. “योग” म्हणजे जोडणे. मीलन, एकरुपत्व. (युज् – युज्यते = जोडला जाणे). म्हणून “पुरुषोत्तम योग” म्हणजे त्या परब्रम्हाशी मीलन, जीव-शिव ऐक्य, एकरुपता ! जीव हा मुळात शिवरूपच आहे, पण अज्ञानाचे आवरण आल्याने तो “स्वरुप” विसरला आहे. हया स्वरुपाची जाण होण्यासाठी कोणता मार्ग अनुसरला पाहिजे हे “रहस्य” भगवंतांनी विशद केले आहे, म्हणून हे रहस्य जाणून घ्यायला हवेच.

“ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।

छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ।। १५-१ ।।”

पहिल्या तीन श्लोकांत संसारवृक्षाचे सुंदर रुपक मांडून, जन्ममृत्यूच्या चक्रात जीव कसा गुरफटतो तो विचार सांगितला आहे. हया दृश्य विश्वरुप अश्वत्थ वृक्षाचे मूळ वर (दृश्याच्या पल्याड) अन् फांद्या खाली पसरलेल्या आहेत. रसमय वेद ही त्याची पाने अन् त्रिगुणात्मक विषयरुप ही त्याची कोवळी पालवी ! हया संसाररुप अश्वत्थाच्या रमणीयतेला भुललेले जीव तेथेच रममाण होतात आणि आपल्या कर्मांनी कर्मबंधनात पुन्हा पुन्हा अडकत जातात. ज्यांना ह्यातून स्वत:ची सुटका करुन घ्यायची आहे, मुक्त व्हायचं आहे त्यांना भगवंतांनी सुटकेचा उपायही सांगितला आहे. “असंगरुप शस्त्राने दृढतापूर्वक हा वृक्ष तोडून टाका!” 

असंगता (निरासक्तता) :- संग दोन प्रकारचा असतो. (१) बाहेरचा, (२) आतला. सारे जीव पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने शब्द, स्पर्श, रुप, रस गंधादिंचे सेवन करीत असतात. सर्व जीवांची ओढ सुखाकडे असते. जोपर्यंत देहबुध्दी आहे तोपर्यंत हया बाहयसुखांना तो खरी सुखे मानतो व त्यातच रममाण होतो. पण परमभाग्याने सदगुरुंची भेट झाली तर हया साऱ्या सुखांचे क्षणिकत्व त्याला समजते. त्याचे देहभान गुरुंनी दिलेल्या ज्ञानाने संपते व आत्मभान जागे होते आणि “अर्थ व कामा”तच गढलेला तो बाहयसंग सोडून अंतर्मुख होतो.

बाहयसंगाप्रमाणेच जीवाला बांधून ठेवणारा आतला संग असतो आसक्तींचा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्ररिपू सारखे त्याच्या अंत:करणावर आघात करत  रहातात. “रात्रंदिन हा युध्दाचा प्रसंग” चालूच असतो. विविध ईषणा त्याच्या चित्ताचा ताबा घेत असतात. वित्तेषणा, कामेषणा… कनक, कांता व कीर्ती, हया “क”कारांच्या संगाच्या मगरमिठीमधून सुटका होते, तीही गुरुपदेशातूनच. बाहय अंत:संगातून मुक्त झालेला जीव मग नि:संग होतो, निर्मोही होतो. त्याच्या साऱ्या कामभावना निवृत्त होतात. त्याचे अंत:करण निर्मळ बनते व ते आत्मतत्वाला सन्मुख होते.

निर्द्वंद्वत्व :- जीवाचं ओढाळ मन सतत इंद्रियसुखांकडे त्याला खेचत रहातं. त्यामुळे अनुकूल संवेदनेने ते सुखावतं अन् प्रतिकूल संवेदनेने ते दुखावतं. सुख-दु:ख, आशा-निराशा, मान-अपमान, लाभ-हानी, जय-पराजय हया परस्परविरोधी भावनांच्या हिंदोळयावर हिंदोळत रहातं. हया द्वंद्वातून मुक्त होण्यासाठी चित्ताला स्थिर करणारी बुध्दी, व्यावसायात्मिका बुध्दी, ऋतंभरा प्रज्ञा वाढीस लावावी लागते. येथेही सद्गुरुंनी दाखविलेली भक्तीची शक्तीच उपयोगी पडते. कर्माला भक्तीची जोड देऊन समर्पणवृत्तीने प्रज्ञा “स्थिर”, “प्रतिष्ठित” केली की इंद्रियांची धाव संपते, भावनांचे आंदोलन थंडावते व वृत्तीला स्थिरता येते. सद्गुरुकृपेने अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. ज्ञानचक्षू उन्मिलीत होतात.

“अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांञ्जजनशलाकया |

चक्षुरुन्मीलितं येनतस्मै श्रीगुरवे नम: ||”

सद्गुरुकृपेने कर्माला भक्तीची, उपासनेची जोड मिळाली की त्या भक्तियुक्त कर्मातूनच आत्मज्ञान प्राप्त हाते. 

“आधी तें करावें कर्म | कर्मामार्गें उपासना |

उपासकां सांपडे ज्ञान | ज्ञानें मोक्षचि पावणें  ||”

असा ज्ञानी उपासक ज्या “अव्ययपदाकडे” जाऊ पाहतो त्या अव्ययपदाचे वर्णन भगवंतांनी खालील श्लोकातून प्रत्ययकारकतेने वर्णिले आहे.

“न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः ।

यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ।। १५-६ ।।”

ज्ञानी भक्ताला जी अनुभूती येते ती भगवंतांनी पुढे विशद केली आहे. 

“सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।

वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम् ॥ १५-१५ ॥”

“जें जें भेटिजे भूत | तें तें मानिजे भगवंत” हाच भगवंतांच्या सांगण्याचा भावार्थ ! असा “विश्वात्मक देव” पाहणारा ज्ञानी भक्त क्षर व अक्षर यांना यथार्थतेने जाणतो.

“द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च |

क्षर: सर्वाणि भूतानि कूटस्थोsक्षर उच्यते || १५-१६ ||”

भगवान स्पष्ट करतात की, या जगात दोन प्रकारचे पुरुष आहेत. नाशवंत (क्षर) व अविनाशी (अक्षर). सर्व नाशवंत जगत् म्हणजे क्षर आणि नाशवंत देहातील जीवात्मे हे अक्षर होत. हया क्षर-अक्षराच्या पलीकडे आहे तो उत्तम पुरुष अर्थात् “पुरुषोत्तम”! अनादी, अनंत, अविनाशी, शाश्वत, सच्चिदानंदरुप पुरुषोत्तम!

असंगत्व निर्द्वंद्वत्व प्राप्त केलेला असा ज्ञानी भक्तच जीवनाचे कर्म पार पाडतच “पुरुषोत्तमाशी” “योग” साधतो, एकरुप होतो. हया एकरुपत्वामुळे ‘पुरुषोत्तमाचे दिव्यत्व’ त्याच्यात संक्रमित होते. तो स्वत:च पुरुषोत्तम होतो. तुकाराम महाराज म्हणतात, “देव पहाया गेलो | तो देवचि होऊनि ठेलो ||”

भगवदगीतेतला पुरुषोत्तम सर्वव्यापक आहे, सत्‍चिदानंदरुप; अविनाशी; अनादी; अनंत आहे. तो दृश्य विश्वाच्या पलीकडे आहे. तो निर्गुण निराकारी आहे. तो दृश्य विश्वाचा उत्पत्तीकर्ता, स्थितीकर्ता व लयकर्ताही आहे. तो चक्षुगोचर नाही. चर्मचक्षूंना दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी ज्ञानचक्षूंचीच गरज असते.

पुरुषोत्तमातील दिव्यत्व प्राप्त केलेला समर्थांचा उत्तमपुरुष मात्र चक्षुगोचर आहे. तो भूलोकावरच राहतो. सर्वांमधलाच एक असतो. सर्व पुरुषांतलाच एक असतो. पण आपल्यातल्या गुणांनी तो “उत्तम पुरुष” म्हणून मान्यता पावलेला असतो.

थोडक्यात सांगायचे तर, विश्वव्यापक ईश्वराचे – परब्रम्हाचे निर्गुण निराकार रुप म्हणजे “पुरुषोत्तम”, तर त्याचे सगुण साकार मानवी रुप म्हणजे “उत्तम पुरुष”. विश्वातील कोणत्याही पुरुषाला “उत्तम पुरुष” होणे शक्य आहे. ते कष्टसाध्य जरुर आहे, पण असाध्य मात्र नाही. पुरुषाचा “उत्तम पुरुष” कसा होऊ शकतो हयाचे प्रत्ययकारी वर्णन श्रीसमर्थांनी दासबोधात केले आहे.

“पुनरपि जननं पुनरपि मरणं” हया जन्ममरणाच्या अखंड चक्रात जीव गरगरत असतो. अशा चक्रगतीत नरदेहप्राप्ती हा अद्भूत टप्पा आहे. नरदेहप्राप्ती दुर्लभ खरीच, पण या नरदेहात आल्यावर जीवापुढे दोन वाटा असतात. १) ईशमार्ग व २) असुरमार्ग. ईश मार्गाने गेल्यास तो नराचा “नारायण” होतो. पण दुसऱ्या मार्गाने गेल्यास तो नराचा “नराधम” होतो. कोणत्या मार्गाने जायचे याचे संपूर्ण स्वातंत्र्य नराला आहे. जो ईशमार्गाने जातो तो उत्तम पुरुष होय. उत्तम पुरुषात पुरुषोत्तमाचे सर्व गुण दिसून येतात.

देवशोधन

दासबोधाचा अभ्यास करतांना पहिल्या दशकात “नित्यविचार”, दुसर्‍या दशकात त्याग करण्यासाठी “अनित्य विचार”, तिसऱ्या दशकात “संसारातील दु:खाबद्दल वैराग्य”, चौथ्या दशकात “नवविधा भजन”, पाचव्या दशकात “सत्शिष्य, गुरुपदेश” व सहा ते आठ दशक देवशोधन ते देवदर्शन असे आहेत.

देवाची गरज सामान्यांना “इच्छापूर्ती”साठी वाटते. समर्थ म्हणतात, “आरंभींच म्हणती  देव | म्हणिजे मला कांहीं देव | ऐसी वासना ||” संसारात सुख मिळत गेले तरी तृप्ती होत नाही, देहसुखासाठी धडपड केली तरी, खरं सुख मिळत नाही. तेव्हा खर्‍या देवाचा शोध सुरू होतो. दशक १८ स. ८-११ मध्ये समर्थ म्हणतात, “तो अंतर्देव चुकती | धांवा घेऊन तीर्था जाती | प्राणी बापुडे कष्टती | देवास नेणतां ||” “विचारें देव शोधावा”, सत्संगें देव सांपडला” या समर्थ वचनांमुळे देव शोधण्याचा मार्ग आपल्याला सापडतो.

खरा देव शोधण्यासाठी “मी म्हणजे देह व देहसुख हेच खरे सुख” व दिसणारी सृष्टी नित्य आहे, हे ममत्व या दोन्ही गोष्टी अंत:करणातून हद्दपार करून देहाने साधना करत सृष्टीतच रहावे लागते. कल्पना, मनोराज्य, भ्रम दूर करावे लागतात. असार बाजूला टाकून सार स्वीकारावे लागते. 

या गोष्टींसाठी दशक ६ मध्ये वेगवेगळे समास आहेत. ब्रह्म व माया यांचे स्वरूप जाणून तुलना करावी व मायेला कसे दूर करावे याचे ज्ञानही यात मिळते. स्वत:मधील ‘आत्मस्वरूपी देव’ शोधण्यासाठी सगुणाचा आधार घेत निर्गुणापर्यंत प्रवास करावा लागतो. प्रतिमा, मूर्ती, माळ, ही आलंबने देहाला व मनाला शिस्त लावायला उपयोगी पडतात. ‘राम सावळा सुंदर | कासे मिरवी पितांबर’ किंवा ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ या रूपात मूर्ती पहावी. तिला कोमट पाण्याने स्नान, उत्तम तलम वस्त्रे, अलंकार, सुवासिक फुले वहावी. पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. गोविंद विडा द्यावा. आरती, कथा-कीर्तन करावे. या सगुण उपासनेने देवाचे रूप, गुण, पराक्रम आपल्या मनात रुजतात. संत तुकाराम म्हणतात, “बोलावा विठ्ठल | पहावा विठ्ठल | करावा विठ्ठल | जीवभाव ||” इथे जीवभाव होण्यासाठी निर्गुण उपासना करावी. देहबुद्धी क्षीण झाली; देहाहंकार गेला; ममत्व; आसक्ती; वासना नष्ट झाली; गुरुकृपा झाली की, ध्यानात आत्म्याचा अनुभव येतो. यालाच “निर्गुणब्रह्म तें निश्चळ | अंतरीं बिंबलें” असे म्हणतात. आत्मा, परमात्मा, परब्रह्म हाच खरा देव व “तो मी आहे” असा दृढ, अपरिवर्तनीय अनुभव येणे हेच आत्मनिवेदन होय. अशा साक्षात्कारानंतरही सगुण उपासना देहाला सक्षम ठेवण्यासाठी करावीच. 

समर्थांनी पंचमीला तंजावरहून आलेल्या श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईंच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली, या मुर्तींपुढे निर्याणाच्या अभंगांचे गायन केले व नवमीला त्यांचा अवतार समाप्त झाला. नऊ हा आकडा अद्वैत दर्शविणारा आहे. १० पासून दोन आकड्यांना म्हणजे द्वैताला सुरुवात होते. सज्जनगडावरील या सुरेख मुर्ती आजही प्रेरणा देतात. त्या भावात दर्शन घ्यावे. सगुण-निर्गुण विचार ६-६, ६-७, १०-७, १४-९, १७-१, १८-८, १६-९ या समासांमध्ये पाहायला मिळतो. “सगुणाचेनि आधारें | निर्गुण पाविजे निर्धारें | सारासारविचारें | संतसंगें |” या ओवीचे चिंतन करावे.

समर्थ देहाने अखंड लोककल्याणाचे कार्य करत व आतून स्वरूप स्थितीत रहात. हे स्वरूप नित्य, सुखरूप व आनंद रूप आहे. समर्थ आहे त्या परिस्थितीत आनंदी उत्साही रहात असत.

सारासार विवेकाने मी, माझे, देहसुख, संसारातील आसक्ती, ममत्व, मायावी जग यांचा त्याग करावा. शब्दाचे महत्व अर्थ कळेपर्यंत, अर्थाचे महत्व अनुभव येईपर्यंत व अनुभव आला की शब्द, अर्थ मागे पडतात व साक्षी अवस्था येते तीच “तुर्या” होय. देव शोधताना जागृती ते उन्मनी अवस्थेपर्यंत प्रवास व्हावा व नि:शब्द अवस्थेत एकरूप व्हावे. असा सहाव्या दशकाचा अभ्यास आपण करू या. या अभंगाचेही चिंतन सर्वजण करूया.

मुर्ती त्रैलोकीं संचली | दृष्टी विश्वासाची चुकली ||१||

भाग्य आले संतजन | जालें देवाचे दर्शन  || धृ ||

देव जवळी अंतरी | भेटीं नाही जन्मवरी || २ ||

रामदासी योग जाला | देही देव प्रगटला || ३ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

श्रीराममंत्राचे श्लोक

श्रीसमर्थ श्रीरामभक्त आहेत. श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू, त्यांचे आराध्य, त्यांचे सर्वस्व आहेत. श्रीराम श्रीसमर्थांसाठी देवांचाही देव आहेत. कारण, “राम योग्यांचे मंडण । राम भक्तांचे भूषण । राम धर्माचे रक्षण । संरक्षण दासांचे ॥” धर्माचा पक्ष घेऊन धर्मरक्षण करणारे श्रीराम अद्वितीयच आहेत. प्रभूश्रीरामचंद्रांचे वर्णन करताना श्रीसमर्थांचे ह्रदय उचंबळून येते. त्यांच्या प्रतिभेला नवनवे पांगारे फुटतात. 

श्रीराम रूपाने सर्वांग सुंदर, करुणेचे सागर, त्रैलोक्याचे प्राण, दीनानाथ, उद्धारक आहेत. कल्याणाचे कल्याण, मंगळाचे मंगळ, प्रत्यक्ष कैवल्यदानी, सूर्यवंशाचे मंडण, अशा अनेक शब्दालंकारांनी श्रीरामांचे सगुणरूप आळवणे श्रीसमर्थांना फार आवडते. श्रीरामांकडे अगणित गुणसंपदा आहे, परंतु श्रीसमर्थ रामरायाच्या महान पराक्रमावर जास्त प्रेम करतात. अवघ्या देवांना रावणाच्या बंदीशाळेतून सोडविण्याचे कार्य, अन्य कोणालाही करता आलेले नाही ते श्रीरामांरानी केले म्हणून श्रीराम, श्रीसमर्थांचा आवडता देव आहे. काही घडणे किंवा बिघडणे सर्व रामरायाच्याच हाती आहे, अशी श्रीसमर्थांची दृढ श्रद्धा आहे. 

श्रीसमर्थांनी रामभक्तीपर, रामगुणवर्णनपर, रामराज्य सांगणारे असंख्य श्लोक, पदे-अभंग लिहिले आहेत. त्यात ४९ श्लोक असलेले राममंत्राचे स्फुट काव्य विशेष आहे. मनाच्या श्लोकांप्रमाणे अत्यंत ओजस्वी आणि मानवमात्राला सन्मार्गाच्या वाटेवर घेऊन जाणारे हे श्लोक प्रत्येकाने एकदा तरी नक्की वाचावेत. यातून रामनामाचा सरल-सोपा मंत्र निरंतर जपण्याचा आग्रह श्रीसमर्थ साधकाला करतात. माणसाचा जन्म ‘बहुत सूकृताने’ लाभतो. तो आत्मोद्धारासाठी सन्मार्गाने झिजवायचा असतो. अन्यथा फक्त उपभोगाने देहाचा नाश होतो व सहजी मिळालेली संधी हुकते. म्हणूनच श्रीसमर्थ परत परत सांगतात “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”. या एकेका श्लोकातून श्रीसमर्थ नामस्मरणाची सोपी वाट जनसामान्यांसाठी मोकळी करत आहेत. जय श्रीराम. 

श्रीसमर्थरचित श्रीराममंत्राचे श्लोक : श्लोक क्र. १

नको शास्त्र अभ्यास वित्पत्ति मोठी ।

जडे गर्व ताठा अभिमान पोटीं ।

कसा कोणता नेणेवे आजपा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ १॥

आपल्याला भगवंताचे दर्शन घडावे, किमानपक्षी काही अनुभव तरी यावा, असे प्रत्येकालाच आतून वाटत असते. आणि त्यासाठी बरेच लोक आपापल्या मनाने काहीबाही प्रयत्न करत असतात. मात्र फारच कमी लोकांना त्यात थोडेफार यश मिळते, तर अगदी एखाद दुसर्‍यालाच भगवंताचे दर्शन घडून ‘तो’ दिव्य अनुभव येतो. याचे कारण श्रीसमर्थ म्हणतात तसे, “परंतु त्यांची निष्ठा कांहीं |  तैसीच नसे ।” माणसाची देवाच्या बाबतीत असणारी कल्पना आणि देवाशी केली जाणारी वागणूक, दोन्ही खऱ्या नसतात. सगळाच दांभिकपणा. खऱ्या भक्तीत भाव महत्वाचा असतो. कर्मयोगात शारीरिक, आर्थिक शक्ती लागते. ज्ञानमार्गात बौद्धिक शक्ती महत्वाची असते, शास्त्रग्रंथांचे अध्ययन; पाठांतर करावे लागते. त्यामुळे काही प्रमाणात सिद्धी, कीर्ती, पद, प्रतिष्ठा प्राप्त तर होते, पण त्यातून अहंकार दुणावतो. स्पर्धा, ईर्षा वाढून तीच माणसाच्या पतनाला कारण ठरते. योग मार्गाचा अवलंब करताना आसन, प्राणायाम, अस्तेय, अपरिग्रह अशी अनेक विधिविधाने सांभाळावी लागतात, ती साधताना कठीण वाटू लागते. अजपाजप समजून घेणे फारच अवघड आणि प्रत्यक्ष साधणे तर दूरच रहाते. म्हणूनच सरळ सोपा भक्तिमार्ग, आणि त्यातही नामस्मरण करणे सामान्य जनांना सुलभ आहे. त्यात काही कष्ट नाही आणि खर्चही करावा लागत नाही. सर्वच संतांनी एकमुखाने नामस्मरण करण्यावर विशेष भर दिलेला आहे. आपले श्रीसमर्थ तर श्रीरामभक्त आहेत. त्यांनी निरंतर रामनामाचा उद्घोष केला. ते स्पष्टपणे सांगतात की, मला जे काही प्राप्त झाले ते या रामनामानेच. म्हणून तुम्ही सुद्धा साधे सरळ सोपे रामनाम नित्य जपावे व स्वहित साधावे. जय श्रीराम. 

श्रीसमर्थरचित श्रीराममंत्राचे श्लोक : श्लोक क्र. २ 

नको कंठ शोषू बहू वेदपाठी ।

नको तूं पडूं साधनांचे कपाटी ।

घडे कर्म खोटें बहू तो दगा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥२॥

सरल अर्थ – वेदांचे काही शिक्षण नसताना, अर्थात ज्ञान नसताना वेदांचे पाठांतर करणे, फुकाचा कंठशोष ठरतो. तसे कोणी करतो म्हणून आपण साधना करणे एक प्रकारे बंधनात अडकणे होय. हातून घडणारे हे कर्म, म्हणजे निव्वळ स्वतःच स्वतःची केलेली फसवणूकच असते. म्हणून ‘हरे राम’ या सोप्या मंत्राचा जप करावा.

श्रीसमर्थांचा बोध – पहिल्या श्लोकात सांगतात, शास्त्रांचा अभ्यास नको. आता म्हणतात वेदपाठ करणे, साधना करणे ही कर्मं सारे फसवे आहे. मग हे करणारे चुकीचे असतात का? नाही. तसे श्रीसमर्थांना म्हणायचे नाही. प्रत्येक कर्म हे अधिकाराशिवाय करणे धोक्याचे असते. वेदपाठ करण्यासाठी काही अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो. तीच गोष्ट साधन करण्याची सुद्धा आहे. अधिकारी व्यक्तीकडून, सदगुरूंकडून मिळालेले साधन श्रद्धेने, निष्ठेने करायचे असते. त्या मागे त्या अधिकारी व्यक्तीचे तप जोडलेले असते. केवळ आपल्या मनाने केलेले पाठांतर, साधन फक्त ‘पाट्या टाकणे’ असते; पोपटपंची असते. त्याने वृथा श्रम होतात, हाती काही लागत नाही. योग्य अधिकाराशिवाय केलेल्या कर्माने गती प्राप्त न होता अधोगती होण्याचीच शक्यता जास्त असते. नामसाधना एकमेव अशी साधना आहे की तेथे फारसे नियम नाही, कठोर बंधने नाहीत, बाह्य साधनांची आवश्यकता नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, “पेढा जसा कसाही खावा, गोडच लागतो. तसे नाम कसेही घ्यावे ते काम करणारच”. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

जय श्रीराम. 

संकल्प

संकल्प म्हणजे काय? संकल्प मोडण्यासाठी असतात असे खूप वेळा आणि खूप लोकांकडून ऐकले आहे. असे ऐकले की वाईट वाटते. कुठे चालली आहे आपली संस्कृती? पण ही वेळीच सुधारली पाहिजे. आधी आपण स्वतः बदलण्याचा संकल्प केला पाहिजे. तसे प्रयत्नपूर्वक केले पाहिजे. लोकांकडे जास्त (रिकामटेकड्या, आळशी) लक्ष न देता आपण आपले मन चांगल्या विचारात,bवाचनात गर्क केले पाहिजे. हाच संकल्प करावा. आपल्या सगळ्या संतांचे विचार हेच होते. आपण वेगवेगळ्या शाह्यांमध्ये अडकलो होतो. फक्त उदरनिर्वाह हेच ध्येय होते. पण देवाने बुध्दि, कल्पना, विचार करण्याची क्षमता फक्त मानवाला दिलेली देणगी आहे. त्याचा योग्य वापर केला पाहिजे. तर संकल्प, म्हणजे एखादी कृती करण्याचा निश्चय. रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांना संकल्प करायला सांगितले, आठवतं का? मूठभर मावळ्यांनी संकल्प केला म्हणून तर आपल्याला (महाराष्ट्र) स्वराज्य मिळाले, त्याचे आपण सुराज्य करायला हवे. तुम्ही म्हणाल येवून जावून ही समर्थांचे विचार सांगते. पण आज ती काळाची गरज आहे. आम्ही चांगले वाचून त्यावर मनन चिंतन करून ते समाजापुढे, आपल्या नवीन पिढीला सांगितले तर काहीतरी ठीक आहे. तर, समर्थांच्या प्रस्थानत्रयीतील, म्हणजे मनोबोध आणि दासबोध यातील शिकवण आजही ३५० वर्षांनंतरही लागू पडते. समर्थाच्या दासबोधात शिकवण निरुपणाचे २ समास आहेत. त्यातील दशक ११ समास ३ यात आखिव दिनचर्या आहे. आताच्या काळानुरूप, आपल्या दिनक्रमात अंतर्भूत करून घेता येईल हाच संकल्प, यालाच गीतेत युक्त विहार म्हटले आहे. समर्थ रामदास म्हणतात, 

“आळस उदास नागवणा । आळस प्रेत्नबुडवणा ।

आळसें करंटपणाच्या खुणा । प्रगट होती ॥११-३-१२||”

पुढे जाऊन समर्थ रामदास एक सरळ, साधा उपाय सांगत आहेत; आणि तो म्हणजे ‘आपण जे जे काही करतो, ते देवाचे कार्य आहे या दृढ भावनेने करावे’. त्यामुळे संसारात किंवा परमार्थात उद्वेग निर्माण होणार नाहीत व आपणास काहीही बाधा होणार नाही.  समर्थ म्हणतात की, 

“आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें ।

मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥११-३-२८॥”

मनोबोधात पण २ श्लोक आहेत.  १) ५ , २) १३० थोडेसे त्या संदर्भात पाहू. 

“मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥

मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥”

सरळ अर्थ:- ‘हे मना, जो जो पापी विचार असेल त्याचा त्याग कर आणि जो सद्विचार आहे (परमात्मस्वरुपाचे ज्ञान करून घेणे) त्याची कास धरून रहा. विषयी गोष्टींचाच नेहमी विचार करत राहिलास तर विकारांचे प्राबल्य वाढेल आणि सरतेशेवटी जनमानसात नामुष्कीच होईल.’

आता थोडेसे विवरण पाहू. पाप-पुण्याची कल्पना, धर्म व नीती या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. आचार, विचारात विधिनिषेधांमध्ये चमत्कारिक विविधता आढळते. उदा. कोकणस्थ ब्राह्मण जिला मामेबहीण म्हणतो ती मामाची मुलगी ऋग्वेदी देशस्थ ब्राहृमणांत विवाहासाठी योग्य मानतात. पापपुण्य ही कल्पनाच वाईट आहे असे म्हटले तर आपल्याला जगताच येणार नाही.  माणसाच्या हातून पातक घडते. त्यामागे पातकासंबंधीचा संकल्प असतो. छोटेसे उदा. पाहू. भूक लागते, खावेसे वाटते; खाण्याचा पदार्थ चिवडा असेल तर बरे असा विचार मनात येतो; खावेसे वाटते इथपर्यंत ठीक. बहुतेक वेळी अनावश्यक आणि अनारोग्य खाणे होते. हा या प्रकरणातील पापसंकल्प. (हे सगळ्याच बाबतीत लागू होते.) आधी पापसंकल्प होतो व त्यानंतर पाप घडते. पापसंकल्प उत्पन्न झाला नाही, तर पाप घडणार नाही. म्हणून समर्थ अधिक सावधपणे पाप सोडून द्यावे असे म्हणण्यापेक्षा पापसंकल्प सोडून द्यावा असे म्हणतात. आता अजून थोडे विस्ताराने पाहू या. मानवी देहामध्ये असणाऱ्या चंचल मनाला संकल्प-विकल्पात्मक मन: असा बहुमान मिळाला आहे. बाहेरच्या कोणत्याही विषयाचा प्रथम संबंध मनाशीच येत असतो. अशा प्रसंगी हे मन प्रथम बाहेरच्या विषयांचा संकल्प करीत असते. त्या विषयांचा संकल्प करून झाला, म्हणजे हे मन त्वरित त्याच विषयाचा विकल्प करू लागते. आपल्या देहात असणारा जीवात्मा हा अनेक विषयसुखांचा रसास्वाद घेऊन बध्द झालेला असतो. हे मन अनेक विषय विकारांनी व्यापलेले असते. प्रत्यक्ष शरीराने घडणाऱ्या पापापेक्षांहि, पापाचे चिंतन परमार्थ दृष्ट्या घातक ठरते. म्हणून समर्थांनी पापसंकल्प सोडून दे असे आग्रहाने सांगितले आहे. मन कधी रिकामे राहू शकत नाही. यासाठी काय टाकावे हे सांगितल्यानंतर लगेच काय घ्यावे हेही सांगितले पाहिजे. समर्थ म्हणतात, ”मना, सदा सर्वकाळ सत्य विषयांचा संकल्प करीत जा.” शरीराने चांगले घडविण्यासाठी मनाने सतत चांगले विचार करीत असले पाहिजे. सत्य शब्दाचा मूळ अर्थ केवळ अस्तित्व असाच आहे. नियमितपणा, व्यवस्थितपणा, अनुशासन, उद्योगशीलता, स्वच्छता इ. सत्यसंकल्पाचे विषय होऊ शकतात. भक्तिमार्गामध्ये भगवंतास विसरून दृश्याच्या नादी लागणे यास पाप म्हणतात. भगवंतास न विसरता कर्तव्यापुरते देहसुख घेणे यास पुण्य म्हणतात. आता १३० वा श्लोक पाहू.

मना अल्पसंकल्प तो ही नसावा । सदा सत्य संकल्प चित्तीं वसावा ।

जनीं जल्प वीकल्प तो ही तजावा । रमाकांत येकांतकाळीं भजावा ॥

वायफळ बोलण्याने माणसाची फार मानसिक शक्ति खर्च होते. व्यवहारात बोलल्याशिवाय चालणार नाही. पण वाजवीपेक्षा अधिक न बोलण्याने व्यवहार पण बिघडत नाही. आहे त्या पेक्षा वेगळे मनात येणे हा विकल्प. अनुकुल घडावे असे वाटत राहणे हा संकल्प. आता व्यवहारातील, रोजच्या जीवनातील पाहू. समजा मी एखादी वस्तू एखाद्याला दिली किंवा एखाद्या करिता थोडेसे काही केले, की त्याने कृतज्ञता व्यक्त करावी असे मला वाटते, म्हणजे संकल्प. पण, जर का तसे म्हटले नाही, की ते जाणवते. साधा शिष्टाचार पण पाळता येत नाही, शिष्ठ आहे! हा झाला विकल्प. कोणाबद्दल त्याच्या मागे बोलणे, निंदा करणे टाळावे म्हणजे विकल्प वाढत नाहीत. मन निर्विकार व्हावे, मनामध्ये नेहमी चांगलेच विचार यावेत, विकल्पाची शक्यता उणी, कमी होत जावो यासाठी समर्थ रामदास उपाय सांगतात की एकांतात जाऊन ईश्वराचे भजन, स्मरण करावे. अजून महत्वाचे समर्थांनी सांगितले आहे की, परमार्थाची वाटचाल करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी मनोबल असावे लागते, मनोधैर्यही असावे लागते आणि मनाचा सरळपणा, समतोलपणाही असावा लागतो. कारण, सरळ वागणाऱ्या साधकाची विचार करण्याची उंची वाढलेली असते. समाधानासाठी विहंगम मार्गाचा सद्विचार हा अत्यंत महत्वाचा ठरतो. म्हणून साधकाने सद्विचारांचा संग धरुनच आपला परमार्थ करावा हाच सत्य संकल्प आहे.

आजच्या काळात (विषाणू) जरी कुठे बाहेर जाता येत नसले तरी विज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळ्या देवस्थानच्या संकल्प प्रक्रियेत सहभागी होता येते, ते ही घरबसल्या, ही सद्गुरू कृपा आहे.

Language