श्रीसमर्थ रामदासस्वामी रचित आरत्या भाग २

भाग १ व भाग २ मधील आरत्यांचा जर आपण लेखाजोखा घेतला तर आपल्या हे लक्षात येते की, रामदासांच्या आरत्यांमधून १) तत्वज्ञान; २) नीतिचे विवेचन; ३)भक्तीमार्ग; कर्ममार्ग; ज्ञानमार्ग यांचे संतुलन; ४) काव्य-सौंदर्य छंद ही गुण वैशिष्ट्ये आढळून येतात. त्याचा फायदा घेऊन साधक; भक्त; गृहस्थाश्रमी यांची श्रध्दा, ईश्वरावरील निष्ठा; प्रेम; लोभ वृद्धिंगतच होईल. आपण मग असे म्हणू शकतो की, हाच यामागचा रामदासांचा उद्देश-हेतू असावा. त्यांच्या काही आरत्या सर्वश्रूत आहेत तर काही दुर्लक्षित आहेत. त्यांनी नवरात्री; ज्ञानेश्वर; शांतादेवी; आत्माराम; श्रीदेव; सद्‌गुरु; कृष्णा नदी; गणपती; हनुमंत; नृसिंह; सूर्य व त्यांचे आराध्य दैवत श्रीराम यांच्यावर आरत्या रचल्या आहेत.

समर्थांनी शांतादेवीच्या दोन आरत्या लिहिल्या आहेत. “कवण अपराधास्तव जननी केला तू रूसवा’ या आरतीमध्ये त्यांची भेटीची आर्तता दिसून येते. ते म्हणतात, मला अनंत चिंतांनी ग्रासले आहे. तू माझी माता-पिता आहेस, तूच जर दूर लोटलेस तर त्या चिंतेतून मला कोण सोडवेल ? हा भवसागर मी कसा तरून जाऊ ? देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय परमार्थ साधणार नाही. देहबुद्धी म्हणजे मी देह आहे. मग त्या देहाचे कोडकौतुक करायचे. परंतु हे विश्व नाशिवंत आहे, फक्त तो परमात्मा अविनाशी आहे. मग जे नाशवंत आहे त्याच्या नादी न लागता जे अविनाशी आहे त्याची कास धरायची. म्हणजे मग ईश्वराचा साक्षात्कार होतो व जन्ममरणाच्या फेऱ्यातून, त्रितापातून आपली सुटका होते. 

देहबुद्धी म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या ज्ञान देणाऱ्या म्हणजे ज्ञानेंद्रियांचे पाच विषय गुण होत. या पाच विषयांपासू‌न शरीराचा आराम; मान-सन्मान; नावाचा मोठेपणा यापासून सुख घेण्याला भोग म्हणतात. व ते भोग घेण्यासाठी पदार्थ; रुपये; पैसा; घर; इ. जो संग्रह केला जातो त्याला ऐश्वर्य म्हणतात. जे लोक भोग आणि ऐश्वर्य यात गुंग असतात; रममाण असतात, त्यांना देहबुद्धीचे लोक म्हणतात. ते देहाला, शरिरालाच प्राधान्य देतात. आपल्या कल्याणात कोणती बाधा असेल तर ती आहे भोग व ऐश्वर्य म्हणजे संग्रह याची. कोळ्याच्या जाळ्यात जसा कीटक अडकतो व तो सुटू शकत नाही, तसेच भोग आणि ऐश्वर्यात अडकलेल्या माणसाची स्थिती होते. तो परमात्म्याकडे, त्या साधनेकडे वाटचाल करु शकत नाही. समर्थांना या सामान्य माणसाची चिंता आहे. या संकटातून त्यांना त्याला बाहेर काढायचे आहे, लोकसंग्रह करायचा आहे. आईच्या चरणी सर्वांना लीन करायचे आहे. म्हणून त्या सामान्य माणसाला जागृत करण्याच्या हेतूने येथे ती उपाययोजना केली आहे. सर्वांना ते नि:श्रेयस व श्रेयस यांचे संतुलन साधून परमात्म्याकडे वळवू इच्छितात. आणि म्हणून वेद, शास्त्रे, पुराणे यातील तत्वज्ञानाचा पुरावा देऊन ते सुमती मागतात, बुध्दी मागतात.

श्रीरामदास आई शांतादेवीला शांते असे हक्काने म्हणतात. यात त्यांचे तिच्यावरील अनुराग, प्रेम व्यक्त होते. श्रीआद्य शंकराचार्य याला ‘प्रेमयोग’ असे म्हणतात. त्यात ते भगवंतावरील निस्सिम प्रेम हीच मूलभूत कल्पना मांडतात. यालाच सख्यभक्ती म्हणतात.

शांतादेवीवरील दुसऱ्या आरतीची सुरूवात श्रीसमर्थ ‘नवखणांचा पलंग शांते शोभतो बरा’ म्हणून करतात.  नऊ खण ही कल्पना अप्रतिम आहे. या ठिकाणी त्यांनी शांतादेवीला मूळमायेच्या रूपात पाहिले आहे. म्हणजे तिच्यातील शक्ती काम करते. अचेतनांमध्ये वीज, उष्णता, ध्वनी, प्रकाश इत्यादी रूपे घेऊन कार्य करते. सचेतना, प्राण, संकल्प, विचार, कल्पना, वासना या रूपांनी ती कार्य करते. परंतु अज्ञानी व्यक्तीला या शक्तीचा प्रत्यक्ष परिचय होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, या नऊ खणांच्या पलंगावर कार्य करीत ही मूळमाया लोकांना दिसत नाही, जणू ती झोपली आहे. तो पलंग तिला शोभत आहे. पुढे ते म्हणतात की, ‘सुमनांचे परिवारी शांते शयन करा’ म्हणजे तुम्ही सु+मने = शुद्ध मने यांचे मनात, वसतीस्थान करा. सौम्य शब्दात तिला या देह-मंदिरात यायची, ते तिला सर्व भक्त, साधक यांच्या वतीने विनंती करतात. पुढच्या पदात तर ते हक्काने लहान मूल जसे आईला, तू आत्ताच्या आत्ता मला जवळ घेच हे फर्मान सोडते, त्याच हक्काने भक्तजनांची ही आज्ञाच आहे असे सांगतात. पुढे ते म्हणतात, ‘मानस सुखी दशम स्थाने निद्रा हो केली’ म्हणजे त्या शक्तीने ५ ज्ञानेंद्रिये  व ५ कर्मेंद्रिये उद्दीपित केली तर मनुष्य प्राणी सुखी होईल. कारण आईने निद्रा घेत तेथेच मुक्काम ठोकला आहे. यामुळे त्या इंद्रियांचे मुख बाह्य पदार्थांकडे न वळता अंतर्मुख होईल व आपोआप इंद्रिय निग्रह होईल व मग शांता ध्यानी राहील. म्हणजे देवीची उपासना आपोआप होईल. चरणी मन एकाग्र होईल. म्हणजे समर्थ वारंवार देहबुद्धितून आत्मबुद्धित प्रवास करा हे सांगतात तेच येथेही आरतीतून सांगत आहेत.  

श्री समर्थांनी कृष्णा नदीवर आरती करून आपले तिच्या प्रती प्रेम व्यक्त केले आहे. ते या कृष्णा मातेला सुख, समृद्धीची सरिता म्हणतात. त्यामुळे ती गुणसंपन्न आहे. दु:खाचे निवारण करणारी आहे. ज्याने सर्वस्वाचा, त्याग केला आहे अश्यांसाठी ती चिद्गंगा, भवगंगा आहे. सर्वांना पावन करणारी ती नदी आहे. कृष्णा नदीचा संगम हा हरि व हर यांचाच जणू संगम आहे अशी भावना ते व्यक्त करतात. अशा संगमात जे तन; मनाने स्नानादि कर्मे, अर्घ्य देणे, उपासना करणे करतात व त्या संगमालाच आपलेसे मानतात ते पूजनीय वंदनीय असतात. सद्‌गुरू आरतीमध्ये श्रीसमर्थांनी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चार संतांना सदगुरू मानले आहे. प्रत्येकाच्या  वैशिष्ट्यपूर्ण  गुणांचे वर्णन केले आहे. त्यांनी या समाजासाठी आपले आत्मजीवन ओवाळून टाकले आहे, असे प्रतिपादन केले आहे.

मुक्ताबाई म्हणजे ब्रह्मीचा म्हणजे साक्षात स्त्री शक्तीचाच अवतार आहे. त्यामुळेच मला सद्‌गुरू ध्यान प्राप्त झाले असे ते म्हणतात. ब्रह्मी म्हणजे तू मूळमायेचेच रूप आहेस असे ते म्हणतात. चांगदेवांना तुझे अव्यक्त रूप दिसले.

निवृत्तिनाथांबाबत ते म्हणतात की, त्यांच्यामुळे माझ्यातील अहंभाव गळाला. माझा या संसारातील मोह सुटला म्हणजे माझी देहबुद्धि नष्ट झाली. ‘मी म्हणजेच आत्मा’ हा सोsहंभाव माझ्यामध्ये आला. तुम्ही केलेल्या गायत्रीच्या उपासनेने तुम्हांला आदिनाथांचा म्हणजे साक्षात भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळाला व गहिनीनाथांनी अनुग्रह दिला. शारदामातेने आशीर्वाद दिला. तसा तुम्ही मला द्या. सोपान महाराजांना सुध्दा ते धन्य धन्य म्हणतात.

ज्ञानदेवांबाबत ते म्हणतात, ते तर सद्गुरू. सद्गुरूसारखे दैवत नाही. आपण ज्ञानाचे सुद्धा देव आहात. ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण आहात. आपण विदेही आहात. देहबुद्धी मध्ये निर्माण होणारी कल्पना, बद्ध व मुक्त साधक अशी असते. पण ब्रह्मज्ञानी; आत्मज्ञानी हा देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी समरस झाल्याने तो भेदातीत व संदेहरहित असतो, म्हणजेच तो विदेही असतो. असे आरत्यांद्वारे समर्थ आपणास सांगतात. पुढील भागात आपण हनुमंत आणि श्रीरामांच्या आरत्यांचा परामर्श घेऊ.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मना मत्सरे नाम सांडू नको हो

समर्थ म्हणतात, मत्सर हा दोष भयंकर आहे. मत्सर हा शुद्ध गाढवपणा आहे. एखादी गोष्ट मला मिळूनही दुसऱ्याला मिळाली तरी माझा जळफळाट होत असेल तर तो मूर्खपणाचा कळस आहे. क्रोध हा रजोगुण आणि द्वेष हा तमोगुण आहे. क्रोध व द्वेष मत्सराचे चांडाळ भारवाहक आहेत. सत्वगुणाच्या सहाय्याने मत्सराचा मत्सर करावा. थोडक्यात मत्सरामुळे आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व गुणांवर काळिमा पसरतो. उदा. पंचपक्वान्नाचे ताट भरले आहे पण त्यावर चिमूटभर विष पेरले तर काय होईल? प्राण कासावीस होईल. पणतीमध्ये तेलवात आहे पण ज्योतच नाही तर काय होईल? अंधार पसरेल. भलेही मी सर्वगुणसंपन्न आहे पण त्यावर मत्सराचे बीज पेरले तर काय होईल? हे समजून घ्या.                                  

मला जीवनामध्ये कर्मयोग कळत नाही. मी दानधर्म करत नाही. माझ्याकडून योगसाधना घडत नाही. माझ्या भोगेच्छा कधीच संपत नाहीत. त्यामुळे त्याग कसा करायचा हेच उमजत नाही. अशावेळी मला ‘जगावे कैसे मरावे कैसे’ हे कसे समजेल ? तेव्हा समर्थ म्हणतात, हे मना ‘राम’ नामाचे स्मरण कर. रामाच्या स्मरणामुळे आपल्या आवडीनिवडी बदलतात. आपण नेहमी चांगले तेच निवडतो व आवडीने कर्म करून धन्य होतो. आपण समाधानी होतो कारण भगवंताच्या हाती सर्व विश्वाचे लगाम असतात. कर्ता-करविता ‘राम’ आहे ही भावना मनात जागवा. म्हणजे देहाची तसेच संसाराची चिंता नष्ट होते. ‘राम’ हा एकेरी शब्द अनादि-अनंत आहे. ही ‘राम’ नाम नौका भवसागर पार करण्यासाठी मदत करणार आहे. ह्या ‘राम’ नामाची ओळख १) शब्द, २) स्पर्श, ३) रूप, ४) रस, ५) गंध या पाच विषयांमुळे होते आणि हे विषय कान; त्वचा; डोळे; जीभ; व नाक या पाच ज्ञानेंद्रियांमुळे कळतात.  पुढच्या श्लोकात समर्थ म्हणतात, बहूनाम या रामनामी तुळेना, रामरक्षेत राम-नामाचे महत्त्व वर्णन केले आहे. 

“राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्त्रनाम ततुल्य रामनाम वरानने ।।”

एकच रामनाम हे सहस्त्र नामाच्या तोडीचे आहे. आज जसे विज्ञानाच्या कसोटीवर आपल्या मस्तकाभोवती असलेले आभावलय दृष्टीस पडते; तसेच विज्ञानाच्या कसोटीवर ‘राम’ उच्चारातून निर्माण होणारे स्पंदन, वेग, तरंग याचे मापन करता येते. यातून ‘राम’ हे एकेरी नाव सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे हे सिद्ध होते. समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शंकराने हालाहल प्राशन केले होते तेव्हा ‘राम’ नामाच्या औषधांनीच त्याचा दाह शांत झाला आणि म्हणून नीलकंठ नामानी तो प्रसिद्ध झाला. खरं म्हणजे शंकर देवाधिदेव आहे; महादेव आहे; विश्वनाथ आहे; रामेश्वर आहे. परंतु ‘राम’नाम भक्त आहे. म्हणूनच ‘राम’ नामाचा भावार्थ समजून घ्या. भाव याचा अर्थ श्रद्धा; विश्वास आणि अर्थ याचा अर्थ हेतू असा होतो. थोडक्यात, जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।।

एक गोष्ट सांगते, गंगेवर दोघेजण स्नानासाठी जातात. एक म्हणतो, गंगा म्हणजे H2O. दोन वायू एकत्र केले की झाली गंगा. दुसरा म्हणतो, गंगा भगवान विष्णूच्या पदकमलातून निघाली; शंकराच्या जटाजूटात राहिली; भगीरथ प्रयत्नांनी इथे आली. गंगावतरण झाले. अशी ही पवित्र गंगामाई आहे. दोघेही स्नान करतात. देहशुद्धीचे फळ दोघांनाही मिळतेच. परंतु दुसऱ्या भक्ताला सोबत चित्तशुद्धीचे फळ देखील मिळते. स्नान करून सूर्याला नमस्कार घालणाऱ्या दोघांना व्यायामाचे फळ मिळेल. परंतु जो उपासनेला दृढ चालवत नमस्कार घालतो त्याला आरोग्याबरोबर स्फूर्ती आणि प्रतिभा ही मिळेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात, आनंद मिळावा म्हणून नाम घेऊ नका. आनंद वाटावा म्हणून नाम घ्या. व्याकरणदृष्ट्या आनंद मिळणे नामाचा परिणाम झाला. आनंद वाटणे नामाचा हेतू झाला. म्हणूनच कार्य करताना मनामध्ये सद्हेतू असावा हे उत्तम. 

उत्तम नागरिक बनवण्यासाठी राष्ट्रभक्तीची ज्योत जना-मनात सतत तेवत ठेवण्यासाठी भारतमाता की जय; वंदे- मातरम ह्या नामाचे स्मरण आवश्यक आहे. नाहीतर आपण म्हणजे आपले राष्ट्र पुनश्च गुलामगिरीत जाईल. स्वातंत्र्यदिनाचा जयजयकार प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजला पाहिजे. अंकुरला पाहिजे हे पटतंय ना ? चला तर मग रामाच्या अनुसंधानात राहायला शिका. म्हणूनच समर्थ रामदास म्हणतात,

चालता बोलता धंदा करिता । खाता-पिता सुखी होता ।

नाना उपभोग घेता । नाम विसरू नये ।।

समर्थ म्हणतात, “जीवा सोडवी राम हा अंतकाळी ।” अजून एक गोष्ट सांगते, गौतम बुद्धांनी निर्वाणाचा शोध लावला नाही. तपाचा; ध्यानाचा; समाधीचाही नाही. या गोष्टी आधीपासूनच होत्या. पण अंतिमत: तेथे पोचण्यासाठी मध्यम मार्गाचा शोध बुद्धांनी लावला. त्याचं नाव करुणा. करुणेचं मूल्य त्यांनी जाणलं, ते मृत्यूच्या जाणिवेने. त्यांनी मृत्यूला दुःखमय म्हटलं नाही. मृत्यू आहे म्हणूनच जिवंतपणाचा क्षण न् क्षण ज्ञानासाठी परिश्रम करण्यात घालवा व राग, द्वेष, मत्सर, लोभ, मोह, खोटेपणा यापासून दूर रहायला शिका असा त्यांनी उपदेश केला आहे.  पुढे समर्थ म्हणतात “मुखी राम विश्राम तेथेचि आहे ।” त्यासाठी तुमच्या इष्ट देवतेचे स्मरण करा. चिंतन करा. समर्थ म्हणतात “मना पावना भावना राघवाची ।” हे ‘रामनाम’ परमात्म्याचे शब्दरूप आहे. या परमात्म्याची रूपे अनंत आहेत व नामेही  अनंत आहेत. उदा. विष्णुसहस्त्रनाम. यातील प्रत्येक नाव मनात भावावयाचे; त्या अर्थाने सृष्टीत पहावयाचे व आपण त्याप्रमाणे व्हावयाचे. म्हणजे भावणे; पहाणे; होणे ही झाली त्रिपदा गायत्री. आपले संपूर्ण जीवन तीन त्रयी, त्रिमितीवरच आधारित आहे या अर्थाने आपण ‘राम कृष्ण हरी’ ला दंडवत घालू या. राम कृष्ण हरिचा जप करूया.

मूलमंत्र जपा तुम्ही भावाने जपा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। १ ।।

काया वाचा मने भावाने स्मरा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। २ ।।

सत्व-रज-तम भावाने जिंका । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ३ ।।

ज्ञान-ध्यान-गान भावाने शिका । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ४ ।।

सूर-ताल-लय भावाने बोला । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ५ ।।

जात-पात-गोत भावाने टाळा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ६ ।।

आचार-विचार-उच्चार भावाने करा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ७ ।।

शक्ती-युक्ती-भक्ती भावाने पहा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ८ ।।

धर्म-अर्थ-कर्म भावाने जगा । राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा ।। ९ ।।

भावणे-पहाणे-होणे भावाने जाणा । रामकृष्ण हरि जय जय भावाने म्हणा ।। १० ।।

मातोश्रींस पत्र

समर्थ वाङ्मयातील समर्थांची पत्रे हा प्रकार आपण पाहणार आहोत. हा एक वाङ्मय प्रकार आहे. पत्रलेखन हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे फार जुना आहे. शकुंतलेने दुष्यंत राजाला लिहिलेले पत्रं प्रसिद्ध आहे. समर्थांनी सर्व प्रकारच्या वाङ्मयाला स्पर्श केला आहे. गद्य, पद्य, ओव्या, अभंग, सवाया, चौपदी, भारुड, करुणाष्टके, दाम यमक असे अनेक प्रकार समर्थांनी हाताळले आहेत. समर्थांची ग्रंथसंपदा मोठी आहे. गोविंदगिरी महाराज सांगतात, समर्थांनी ४६,००० ओव्यांची रचना केलेली आहे. गेल्या पाच हजार वर्षात एवढी मोठी वाङ्मयसंपदा कोणीच निर्माण केलेली नाही. समर्थ महान व कर्तृत्ववान आहेत. समर्थांचे लेखन ही एक सामाजिक चळवळ आहे. बऱ्याच मोठ्या कर्तृत्ववान लोकांचा पत्रव्यवहार पुढे समाजाकरता ग्रंथरूपात प्रसिद्ध केला जातो, जो पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक व त्या वेळेचा इतिहास याची साक्ष देणारा ठरतो.

समर्थांनी ११०० मठ व अनेक देवळे स्थापन केली, त्या सगळ्या मठाधिपतींशी त्यांचा संपर्क होता. त्याकाळी सांडणीस्वार ही सेवा करीत किंवा समर्थांचे शिष्य सर्व दूर पसरले होते, त्यांच्या हाती पत्रं पोहोचवली जात. सध्या त्यातील फार थोडी पत्रं उपलब्ध आहेत. या पत्रांचं संकलन सुनील दादा चिंचोळकर यांनी केलं आहे, त्या पुस्तकाच्या आधारे आपण हा वाङ्मय प्रकार बघू. समर्थांच्या पत्रांचे सुनील दादांनी तीन भाग पाडले आहेत. कौटुंबिक, राजकीय, सामाजिक. आपण समर्थांची व्यक्तिगत पत्रं बघणार आहोत, यातील पहिले पत्रं कौटुंबिक या प्रकारातील. पहिलं पत्रं त्यांनी आपल्या मातेस लिहिलेलं आहे. ते पत्रं बघूया. 

सकळ गुणांचा निधी । निर्गुणाची कार्यसिद्धी । विवेकाची दृढबुद्धी । तुझेनि गुणें ।। १ ।।

तूं भवसिंधूचे तारूं । तूं भक्तांचा आधारू । तूं अनाथाचे अवसरू । वैष्णवी माया ।। २ ।।

तूं भावार्थाची जननी । तूं विरक्तां संजीवनी । तूं परमार्थाची खाणी । भजनशीळ ।। ३ ।।

तूं सर्व सुखांची मूस । तूं आनंदरत्नांची मांदूस । तुझेनि चुकती सायास । संसारींचे ।। ४ ।।

तूं परमार्थाविषयीं अग्रगण्य । सद्गुरु दासाचें मंडण । समाधानाची खूण । अंतरीं वसे ।। ५ ।।

सत्संगासी सादर । भक्तिमार्गासी तत्पर ।धूर्त कुशळ अति सादर । परोपकारी ।। ६ ।।

श्री गुरुभजनीं तत्पर ।स्वामिकृपा निरंतर ।म्हणोनी शुद्ध क्रियेचा उद्धार ।तुमचे ठायी ।।७ ।।

आत्मचर्चेसीं मुगुटमणी । अत्यंत सादरता निरूपणीं । बोलणें अमृतवाणी । मृदुवचनीं ।। ८ ।।

विवेकनिधी केवळ । अंतर शुद्ध निर्मळ । ज्ञानदीप प्रबळ । तुमचे ठायीं ।। ९ ।।

क्रियाशुद्धी निर्मळ मन ।निरभिमानी परम सज्जन ।निरंतर अनुसंधान । अंतरीं वसे ।।१० ।।

भावार्थाचें आगरू । प्रबळ शांतीचा सागरू ।पाहतां उपमे मेरू । तोही  उणा ।। ११ ।।

हे समर्थांनी मातोश्रींस लिहिलेले पत्र आहे, आता त्याचा अर्थ बघू. या पत्राचे वेगळेपण जाणवते. यात मातेला नमस्कार, खाली स्वतःची सही असा कोणताच प्रकार नाही. अकरा ओव्यांचं हे पत्रं आहे. यात पहिल्या ओवीत समर्थ सांगतात, तू सकळ गुणांचा निधी.. जे सगळे गुण तुझ्यात आहेत, विवेकाची दृढबुद्धी म्हणजे तू अत्यंत विवेकशील आहेस, तो विवेकच माझ्यात आला आहे.

दुसरे ओवीत समर्थ आपल्या मातेला वैष्णवी माया म्हणतात, म्हणजे  मूळ माया. ह्या ठिकाणी मातेला मूळ मायेची उपमा दिली आहे कारण माझ्यासारख्या संताची तू माय आहेस, म्हणून जणू काही तू मूळ माया आहेस. मूळ मायेत जसे सगळे गुण असतात, ते उत्तम असतात, तसेच माझ्यात आले आहेत. त्याच्यापुढे समर्थ म्हणतात, तू सर्व सुखांची मूस आहेस, म्हणजेच परमार्थातले जे सुख आहे, आत्माराम भेटण्याचे जे सुख आहे, ते सुख मला तुझ्यामुळे प्राप्त झाले आहे. त्या सुखामुळे संसाराची दुःखे मला जाणवत नाहीत. ती दुःखे आपोआप नाहीशी होतात. 

त्याच्या पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, परमार्थाविषयी अग्रगण्य म्हणजेच परमार्थात जे परब्रम्हाला जाणून घेण्याचे उद्दिष्ट असते, ते तू पूर्ण केले आहेस, म्हणून तू पूर्ण समाधानी आहेस. यामुळेच असेच समाधान मलाही प्राप्त झाले आहे. सत्संगाशी सादर भक्तीमार्गाशी तत्पर.. म्हणजेच तू सदैव भक्तिमार्ग अनुसंधानात असतेस. सत्संग म्हणजेच कीर्तन, प्रवचन, अभ्यास यांचा तू सतत आस्वाद घेतेस. ग्रंथवाचन, नामस्मरण यामध्ये तू रममाण असतेस. परोपकारी म्हणजेच सतत दुसऱ्यांना मदत करण्याकरता तत्पर असतेस, म्हणूनच अतिशय आनंदात व समाधानात असतेस. गुरूभजनी तत्पर स्वामीकृपा निरंतर.. या ओवीत समर्थ, माता अखंड श्रीरामाच्या भजनात तल्लीन झाली आहे असे सांगतात. तसेच श्रीरामांची तिच्यावर पूर्ण कृपा आहे म्हणूनच तिचा उद्धार म्हणजेच मुक्ती तिला श्रीरामांकडून प्राप्त होणार आहे.

आठव्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, अत्यंत सादरता निरूपणी म्हणजेच कोणी विचारायला आलं तर त्याला परमार्थाविषयी उत्तम मार्गदर्शन करणे, बोलणं अतिशय मृदू असणे, आदराचं असणे असं तुझं मार्गदर्शन सगळ्या लोकांना लाभतं. विवेकनिधी केवळ अंतर शुद्ध निर्मळ.. म्हणजेच अतिशय सामान्य परिस्थितीत जरी तू आहेस, हा विचार पैशाच्या दृष्टिकोनातून झाला, तरी तू अत्यंत विवेकी आहेस. अतिशय आत्मनात्म विवेक करून तू या संसारात रहातेस. त्यामुळेच तुझे मन अतिशय शुद्ध आहे, त्यामुळेच अंतरात्म्याचे ज्ञान तुझ्याजवळ प्रकट झाले आहे. शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, भावार्थाचे आगरू प्रबळ शांतीचा सागरू.. म्हणजेच भावार्थ आणि शांती एकत्रपणे तुझ्यात नांदते. परमार्थाचा खरा शुद्ध भाव, भक्ती तुझ्यात प्रगट झाली आहे. त्यामुळेच अनुपम अशी शांती, स्थिरता व एकाग्रता तुझ्याजवळ आहे आणि म्हणूनच उपमेसी मेरू, तुला कशाचीच उपमा देता येणार नाही. जशी मूळ मायेला कशाचीच उपमा देता येत नाही ती हे सारे निर्माण करू शकत नाही, त्यापासून वेगळी असते, भासते, जाणवते पण दिसत नाही, तसेच सगळे गुण माझ्या मातेमध्ये आहेत असे समर्थांना या पत्रातून मातेबद्दल सांगायचे आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

साधनेची आवश्यकता

शरीर व मनाची शुद्धी : 

समर्थांनी मानव शरीराला घबाड म्हटले आहे. केवळ मानवी शरीराद्वारेच भगवंताची प्राप्ती होऊ शकते. अन्य कोणतेही शरीर या कामास उपयुक्त नाही. म्हणूनच तर “या शरीरा ऐसे यंत्र आणीक नाही” असे समर्थ म्हणतात. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याकरिता स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन दोन्ही आवश्यक आहेत. मन चंचल आहे ही तक्रार तर अर्जुन गीतेमध्ये करतो आणि यावर उपाय म्हणून “अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते ॥ ” असा उपाय भगवंत सांगतात. मन स्वस्थ ठेवायचा अभ्यास करायचा असेल तर मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवायला हवेत. आज आपण शरीर आणि मनाच्या शुद्धीचे उपाय थोडक्यात बघणार आहोत.

 

मन आणि शरीर : 

मन आणि शरीर हे वेगवेगळे नाहीत, ते एकमेकांशी संलग्न आहेत. ते सायकोसोमेटिक आहे. आपले शरीर व मन एकत्रच आहेत. शरीराचा अत्यंत सूक्ष्म भाग मन आहे तर मनाचा स्थूल भाग शरीर आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की मन-शरीर हे वेगळे नाहीत. म्हणून जे शरीरात घडते, त्याचे परिणाम मनात प्रतिध्वनित होतात. आणि जे मनात घडते त्याचे परिणाम शरीरावर पहायला मिळतात. मन जर आजारी असेल तर शरीर अधिक काळ स्वस्थ्य राहू शकणार नाही. शरीर आजारी झाले तर मन अस्वस्थ होईल.

 

शरीर शुद्धीचे उपाय :

शरीराला जे होते त्याचे परिणाम मनावर आणि मनाला जे होते त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. आपण जसा आहार घेऊ तसे मन बनते. म्हणून आहारात विवेक बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात आहार, विहार, कर्म आणि निद्रा यांचे योग्य असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

“युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।। गीता ६-१७।।”

अर्थ – “दुःखांचा नाश करणारा योग तर यथायोग्य आहार आणि विहार करणाऱ्यांना, कर्मात यथायोग्य व्यवहार करणाऱ्यांना तसेच यथायोग्य झोप व जाग्रण करणाऱ्यांना सिद्ध होतो.”  

भोजन कसे असावे ? – सत्य आणि न्यायाने मिळविलेल्या धनातून मिळविलेले भोजन असावे. ते सात्विक, पवित्र असावे, स्वादबुद्धी अथवा पुष्टबुद्धीने भोजन करू नये. तर ते साधन बुद्धीने केले जावे. जितके सहज पचेल तेवढेच भोजन घ्यावे. भोजन शरीराला अनुकूल, हलके, आणि मित असावे. भोजन केल्यावर आळस येऊ नये, अशा प्रकारे केलेले भोजन यथोचित, शुद्ध आहार म्हटले जाते. विहार म्हणजे चालणे-फिरणे व व्यायाम. स्वास्थ्यासाठी हितकर असेल तेवढे चालावे, व्यायाम व योगासने देखील योग्य प्रमाणात असायला हवीत.

 

कर्म : 

आपल्या वर्णाश्रमाला अनुकूल, देश, काल, परिस्थितिनुसार शरीर निर्वाहासाठी कर्म करणे आवश्यक आहे. यथाशक्ति कुटुंबियांची आणि समाजाची हित बुद्धीने सेवा करावी. परिस्थितिनुसार जे शास्त्र विहित कर्म आपल्या वाट्याला येईल ते प्रसन्नचित्ताने करावे. याला युक्तचेष्ट म्हणतात.

 

निद्रा :

झोप इतकीच असावी की जाग आल्यावर निद्रा किंवा आळसाने सतावू नये. दिवसा जागत रहावे व रात्रीच्या मध्यकाली झोप घ्यावी. रात्री लवकर झोपावे व प्रातःकाली लवकर उठावे म्हणजे स्वास्थ्य उत्तम राहिल. उत्तम मनःस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य सकाळी लवकर उठणे व व्यायामाने प्राप्त होते. ह्यातील आहार, विहार आणि निद्रा हे उपाय शरीर शुद्धीचे आहेत. साधकाला शरीर शुद्धीचे उपाय करणे आवश्यक आहे. या शिवाय विचार शुद्धी आणि भाव शुद्धी देखील साधनेसाठी आवश्यक आहे. त्यांची चर्चा आपण पुढे करणार आहोत.

 

भाव शुद्धी :

साधनेसंबंधी आता आपण भाव शुद्धीवर चिंतन करणार आहोत. साधनेमध्ये भाव शुद्धी सर्वाधिक महत्वपूर्ण आहे. शरीर आणि विचार या दोहोंपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. गरूड़ पुराणात एक सुभाषित येते.

 

“न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये ।

भावे तु विद्यते देवस्तस्मात् भावो हि कारणम् ।।”

देव लाकडात, पाषाणात किंवा मातीत नसतो, देव भावात असतो म्हणून भावच कारण आहे. ‘भाव तेथे देव’ ही म्हण आपल्याला माहित आहे. माणसाचं जीवन विचाराने कमी तर भावाने अधिक व्यापलेले असते. मनुष्य बुद्धिमान प्राणी जरूर आहे पण त्याचे भाव विश्व त्याच्या बुद्धीवर, विचारांवर मात करते. तुमचे दैनंदिन जीवन व्यतीत करतांना कित्येक वेळा भावना तुमच्या विचारांवर मात करतात. आपण घृणा करतो, क्रोध करतो, प्रेम करतो हे सारे करतांना भावना प्रबळ असतात, विचार तिथे गौण ठरतात.

 

जीवनातील अधिकांश क्रिया आपल्या भावनांवर अवलंबून असतात. काय होतं की, कधी कधी आपण विचार करून एक निर्णय घेतो पण प्रत्यक्ष कार्य घडतांना वेगळेच कार्य घडते, याला ऐनवेळी आलेल्या भावना कारणीभूत असतात. मी आज क्रोध करणार नाही हे ठरवतो. क्रोध वाईट आहे, पण प्रसंग असा येतो की आपले विचार आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही व नकळत आपण क्रोध करून जातो. भावनेच्या विश्वात जोपर्यंत आपण परिवर्तन घडवून आणत नाही तोपर्यंत विचारांचा उहापोह काहीही कामाचा नाही. म्हणून भावनांना फारच महत्व आहे. भाव शुद्धी फार आवश्यक आहे.

 

भावाच्या विविध दिशा आहेत, त्यातील चार दिशा महत्त्वाच्या आहेत. अशुद्ध भावांचा उदय याच चार तत्वांपासून होत असतो. हे चार भाव असे –

प्रथम भाव : मैत्री.

द्वितीय भाव : करूणा.

तृतीय भाव : प्रमुदिता अर्थात् आनंदाचा बोध, प्रसन्नता, प्रफुल्लता.

चतुर्थ भाव : कृतज्ञता.

हे चार भाव जी व्यक्ति आपल्या जीवनात आणू शकेल त्याला भाव शुद्धी उपलब्ध होऊ शकेल. ज्याचे जीवनात याचे विपरीत भाव असतील त्याचे भाव अशुद्ध आहेत असे समजावे. कोणते आहेत ते अशुद्ध भाव ? मैत्रीच्या विरूद्ध घृणा किंवा वैर. करूणाच्या विरूद्ध क्रूरता, हिंसा, अदया. प्रमुदिताच्या विरुद्ध उदासी, विषाद, संताप. आणि कृतज्ञतेच्या विरूद्ध अकृज्ञता. आमच्या भावाचे विश्व कोणत्या गोष्टींनी प्रभावित आहे ? आमच्या जीवनात मैत्रीपेक्षा वैर प्रभावी ठरते काय ? क्रोधात शक्ती असते पण मैत्री मध्ये देखील शक्ती आहे. आपण मैत्रीची शक्ती वापरू इच्छित नाही काय ? असे असेल तर आम्ही जीवनाच्या फार मोठ्या लाभापासून वंचित ठरतो. महावीर, बुद्ध आणि येशू यांनी मैत्रीच्या शक्तीला प्रतिष्ठित केले. साधारण मनुष्य जेव्हा शत्रुत्वाच्या भावात असतो तेव्हा तो बलवान असल्याचे त्याला जाणवते. या उलट जेव्हा तो कोणा प्रति शांत किंवा प्रेमाने भरलेला असेल तेव्हा तो त्यापेक्षा कमजोर असल्याचे त्याला आढळते. याचा अर्थ असा आहे की हा मनुष्य जेव्हा शत्रुत्वाच्या भावात असेल तेव्हा तो अशुद्ध भावाने प्रभावित झालेला असतो. असा मनुष्य स्वतःच्या अंतरंगात जाऊ शकत नाही. शत्रुत्व बाह्यकेंद्रित असते. कारण शत्रु बाहेर असतो, आत नसतो. या उलट प्रेम हे हृदयात असते. कोणी असो वा नसो हृदय प्रेमाने भरून राहू शकते. म्हणून प्रेम हे अंतर्केंद्रित असते. मैत्री अंतरकेंद्रित असते. प्रेम हे दिव्याच्या प्रकाशासमान असते. कोणी असो वा नसो दिवा प्रकाश देणारच. प्रेमाची देखील अशीच वृत्ती असते. साधूचे मन प्रेमाने भरलेले असते. समोर प्रेम घेणारा असो अथवा नसो प्रेम ओसंडून वहात असते. प्रेम उचंबळून आले की द्यावे लागते, घेणारा समोर असो नसो, साधूचा स्वभाव प्रेम वाटणे असतो.

 

साधकाला साधना करतांना या शुद्धींचे भान ठेवणे आवश्यक आहे. या शुद्धी साधणारा साधक लवकर प्रगती करीत असतो. शरीर, मन किंवा भाव शुद्ध नसतील तर साधनेमध्ये प्रगती होणे दुरापास्त आहे.

विदेहस्थिती

परमार्थामध्ये विदेहस्थिती अनुभवणे ही सर्वोच्च अवस्था मानली गेली आहे. यालाच मुक्ती किंवा मोक्ष असेही म्हणतात. जीवाचा संबंध जोपर्यंत दृश्य जगाशी व देहाशी असतो, तोपर्यंत जीव देहबुद्धीने बांधला गेलेला असतो. आत्मानात्मविवेकाने जेव्हा जीवाला आपण ब्रह्मस्वरूप आहोत अशी प्रचिती येते, तेव्हा जीव देहात असून विदेह अवस्था भोगतो. या अवस्थेचे वर्णन करताना श्रीसमर्थ म्हणतात –

ना तें साधन ना तें देह । आपला आपण निःसंदेह ।

देहीच असोन विदेह । स्थिती ऐसी ।। ७-७-६३ ।।

देहात असूनही विदेह अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आधी बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे . बंधन कशाचे व कोणाला असते याचा विचार करीत असताना, आधी हे लक्षात घेतले पाहिजे की, बंधन व मुक्ती या जीवाच्या अवस्था आहेत त्या जिवंतपणीच अनुभवता येतात. ‘जन्म घेणे लागे वासनेच्या संगे’ या न्यायानुसार जीव वासनेमुळे जन्माला येतो. वासनापूर्तीसाठी अनेक विषय हवेहवेसे वाटतात. विषय म्हणजे काय? ‘विशेषेण सिणोती इति विषय:’ सुख मिळवण्यासाठी ज्याच्यावर अवलंबून रहावे लागते त्याला ‘विषय’ म्हणतात. विषयात सुख आहे अशी कल्पना असणे याला ‘विषयवासना’ म्हणतात. 

सर्वसामान्य माणसाच्या वासना देहाशी संबंधित असतात.  जसे, चांगले खायला मिळावे; महागडे कपडे; आलिशान गाड्या; घर असावे; समाजात मान असावा म्हणजे थोडक्यात सत्ता; संपत्ती; कीर्ती मिळाली की आपण सुखी होऊ असे मनुष्याला वाटते. आपल्या मनासारखे सगळे मिळाले नाही तर विकार उत्पन्न होतात. दुसऱ्याला मिळाले आणि स्वतःला मिळाले नाही कीमत्सर वाढतो. वस्तू- पदार्थांविषयी आसक्ती असेल तर लोभ वाढतो. मनासारखे घडले नाही की क्रोध निर्माण होतो. अशाप्रकारे शब्द, स्पर्श, रस, रूप व गंध इत्यादि विषय माणसाला जखडून ठेवतात. श्रीसमर्थांनी या करता एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे, ते म्हणतात –

हस्त बांधीजे ऊर्णतंतें । लोभें मृत्य भ्रमरातें ।

ऐसा जो प्रपंचीं गुंते। तो येक पढतमूर्ख ।। २-१०-१५ ।।

ज्याप्रमाणे कोळ्याच्या जाळे विणण्याच्या धाग्याने हत्ती बांधला जाऊ शकत नाही, तसेच लाकूड पोखरण्याचे सामर्थ्य असलेला भुंगा कमळातील मकरंदाच्या लोभाने विषयासक्त झाल्यामुळे कमळात अडकून पडतो, त्याप्रमाणे मनुष्य जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत प्रबळ विषयसुखाच्या इच्छेमुळे देहबुद्धीच्या बंधनात अडकतो व परिणामतः सुखदुःख भोगतो, जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. या सगळ्या त्रासांपासून मनुष्याला मुक्ती हवी असते. परंतु ती कशी मिळेल हे ठाऊक नसते. त्यासाठी संतांची संगत धरली पाहिजे. संत लौकिक बंधनातून पूर्णपणे सुटलेले असतात, त्यांना देहाचे स्मरण उरलेले नसते; म्हणून ते खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतात. त्यांचे स्वातंत्र्य कशावरही,कुणावरही अवलंबून नसते. अशा मुक्तावस्थेला पोहोचलेल्या सिद्धाचे तीन प्रकार सांगतांना श्रीसमर्थ म्हणतात –

सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेहमुक्त ।

दोहिवेगळे ते नित्यमुक्त । योगेश्वर जाणावे ।। ७-६-४६ ।।

१) नित्यमुक्त २) जीवन्मुक्त ३) विदेह मुक्त. या पैकी नित्यमुक्त हे जन्मापासूनच मुक्त असतात. त्यांच्या सगळ्या वृत्ती संपूर्णपणे मावळलेल्या असतात. ते आपल्या देहासहित दृश्य जगातील कुठल्याच गोष्टीने बध्द होत नाहीत. त्यांच्या अंगी योगाचे अचाट सामर्थ्य असते म्हणून त्यांना योगेश्वर म्हणतात. उदा. आद्य शंकराचार्य, शुकमुनी, रामदास स्वामी, स्वामी विवेकानंद इत्यादि. असे ज्ञानी महापुरुष केवळ लोकोद्धाराचे कार्य करण्यासाठीच अवतार घेतात. त्यांनी केलेले कार्य अनेक काळापर्यंत लोकांना प्रेरणादायी ठरते.

जीवन्मुक्त अवस्थेमध्ये देहासंबंधी अज्ञान नाहीसे होते. साधक आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणतो आणि अंतर्बाह्य मोकळा होतो. परंतु प्रारब्ध कर्मे शिल्लक असल्यामुळे देह सोडत नाहीत, उलट व्यक्ती, वस्तू व पदार्थांच्या संगात आसक्त न होता अलिप्तपणे आपली कर्तव्यकर्मे पार पाडतो. ज्ञानेश्वर माऊली त्याचे वर्णन करतांना म्हणतात-

तो शरीराचेनि मेळें । करू कां कर्में सकळें ।

परी आकाश धुये न मैळे । तैसा असे ।। ज्ञाने. १३-१०३२ ।।

बाह्यतः त्याचे जीवन चारचौघांसारखे चाललेले दिसते परंतु वृत्तीचा बाध झाल्यामुळे त्याच्याकडून धर्म-अधर्म घडत नाही, पाप-पुण्याचा लेप लागत नाही. “संचित, प्रारब्ध, क्रियमाण । अवघा झाला नारायण।” ह्या सर्वोच्च दशेला तो जाऊन पोहोचतो. संत एकनाथमहाराज व अलीकडच्या काळातील प.पू. वरदानंद भारती यांनी अश्या प्रकारे आपला प्रपंच व परमार्थ निर्लेपपणे करून दाखविला. जिवंतपणीच मुक्त होऊन देहभान विसरून गेले आहेत त्यांना विदेहमुक्त म्हणतात. जीवन्मुक्त व विदेहमुक्तामधील मुख्य फरक हाच की, जीवन्मुक्त सचेतन असतात म्हणजे प्रारब्ध कर्मे करीत असतात, तर विदेहमुक्त अचेतन असतात म्हणजे त्यांचे कर्म करणे थांबलेले असते. देहाशी संबंधित कुठलीही उपाधी ते सांभाळीत नाहीत. तसेच व्यावहारिक आचाराचेही त्यांना भान नसते. उदा. संत गजानन महाराज. उष्टयापत्रावळीवरची शीते खाऊन ते तृप्त झाले. कारण अन्न हेही ब्रह्म आणि खाणाराही ब्रह्मरूप ही त्यांची धारणा होती. मधमाशांनी अंगभर दंश केला तरी त्यांना देहदुःख जाणवले नाही हीच विदेही अवस्था होय. या अवस्थेमध्ये देह असून नसल्यासारखा होतो कारण कशाचाही संग तेथे शिल्लक नसतो म्हणून संगत्याग व विदेहस्थिती एकच आहे असे श्रीसमर्थ म्हणतात.

 

जय जय रघुवीर समर्थ

सूक्ष्मदेह निरूपण

आपण प्रथम स्थूल देहाचा विचार केला. आपण बघितले की आपला देह हे ब्याऐंशी तत्त्वांचे गाठोडे आहे. त्याला चेतना देणारा कोणीतरी आहे.

तो कोण ? तर आत्मा होय. 

आत्मा देहामध्यें असतो । नाना सुखदुखें भोगितो ।

सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ।। दा. १७ -६-१ ।।

या जीवात्म्याने सर्वप्रथम देहाचा आधार घेऊन या विश्वामध्ये उघड प्रवेश केला आहे. आता हा आत्मा कुठे असतो ? तर तो देहात असतो. तो सूक्ष्म आहे, दिसत नाही; पण असतो हे निश्चित. देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर । आता आपण सूक्ष्मदेहाचा विचार करणार आहोत. सूक्ष्म देहात अंत:करण, मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांचा समावेश होतो. सूक्ष्मदेह समजण्यासाठी मन पण सूक्ष्मात शिरले पाहिजे. त्यासाठी श्रीसमर्थांनी मनाचे श्लोक म्हणजे मनोपनिषद रचले. आपल्याला या संसारात राहूनच आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे आहे. श्रीसमर्थ दासबोधाच्या सहाव्या दशकात सांगतात की,

जो जनामधें वागे । परी जनावेगळी गोष्टी सांगे ।

ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधु ।। दा. ६-१-१८ ।।

आपण पहातो की माणसाला जेव्हा आत्मज्ञान होते, तेव्हा स्थूल देहातील त्याच्या साऱ्या वासना, अहंकार नष्ट होतात. असे घडले की, असा माणूस काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, स्वार्थ, मोह,भय, चिंता, प्रपंचाची आसक्ती या दोषापासून मुक्त होतो. त्याला मनन-चिंतनाने, साधनेने सूक्ष्मदेह कळलेला असतो. या सूक्ष्म देहाची पंचवीस तत्त्वे आता आपण बघूया. त्यांना अंत:करण पंचक असे म्हणतात. हे अंत:करण पंचक समजून घेण्यासाठी आपण ग्रंथराज दासबोधातील ओव्यांचा आधार घेऊ या.

निर्विकल्प जें स्फुरण । उगेंच असतां आठवण ।

तें जाणावें अंत:कर्ण । जाणती कळा ।। दा. १७-८-४ ।।

आपण उगीच बसलो असता सहज एखादी आठवण व्हावी/स्फुरण व्हावे. अंत:करणात स्फुरण झाले पण काम होईल की नाही, अशी स्थिती असणारे मन. कारण, मन हे कायम संकल्प-विकल्प करीत असते. या मनाला योग्य निर्णय करून देणारी बुद्धी विवेकाने निर्णय योग्य प्रकारे देते. अंत:करण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या पाच तत्त्वांचा संबंध सतत अंतरात्म्याशी असतो. यांना मिळून सूक्ष्मदेह म्हणतात. हा सूक्ष्मदेह मुळात शुद्ध स्वरूप आहे. त्याला कशाचाही लेप नाही. तो निर्लेप, निर्गुण, निराकार असा आहे. 

आत्मा आत्मपणें असतो । देहसंगें विकारतो ।

साभिमानें भरीं भरतो । भलतिकडे ।। दा.१७-७-२ ।।

मुळामध्ये पाणी हे स्वच्छ, शुद्ध, पारदर्शी असेच असते. पाण्याला रंग नाही किंवा चवही नाही. ज्या योनीतील जीवाशी त्या पाण्याचा घनिष्ठ संबंध येतो, त्याप्रमाणे त्या पाण्याचा गुणधर्म बदलत असतो. ज्या वनस्पतींमध्ये ते पाणी असते, त्याप्रमाणे ते पाणी आम्ल, तिखट, खारट, कडू अथवा गोड असते. स्वच्छ असणाऱ्या पाण्यावर संगतीचा परिणाम होत असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक देहात असणाऱ्या जीवात्म्यावर देहादी संगतीचा परिणाम होतो, पंचभूतांचा परिणाम होतो तसाच तो निसर्गाचाही होतो. स्वकर्माचा, आहार-विहाराचाही परिणाम होतच असतो. आपण बघतो की पृथ्वीच्या पाठीवर असणारे स्वच्छ पाणी उसामध्ये रस स्वरूपात वाहू लागले, की त्या रसामध्ये अमृतासारखी मधुर गोडी असते. त्या गोडीपासून समाधान प्राप्त होते. याउलट तेच पाणी डोंगरातील विषारी वनस्पतीमध्ये, वृक्ष-वेलींमध्ये विष म्हणून वाढते. केरळमध्ये एका झुडपाला अगदी आंब्याच्या कैरीप्रमाणे फळे लागलेली पाहिली. विचारल्यावर कळले की ही फळे सुंदर दिसत असली तरी भयंकर विषारी आहेत. विष अनेकांच्या जीवनाचा घात करीत असते. पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व जीवन पाणी म्हणूनच आहे. पण त्या पाण्यावर संगतीचा परिणाम होत असतो. 

उत्तम संगतीचें फळ सुख । अद्धम संगतीचें फळ दुःख ।

आनंद सांडुनियां शोक । कैसा घ्यावा ।। दा.१७-७-१७ ।।

मनुष्याने आपल्या जीवनामध्ये जाणत्याची संगती धरून, सुखाच्या प्राप्तीचा प्रयत्न करावा. संगतीचा परिणाम एखाद्या जड वस्तूवर होतो, त्याचप्रमाणे चैतन्यावरही होत असतो. जड वस्तूला सुख अथवा दुःख, बरे अथवा वाईट हे काही कळत नाही. तसेच ते सांगताही येत नाही. पण जीवात्म्याला मात्र या सुखदुःखाचा अनुभव नेहमी येत असतो. हे सारे कशाच्या आधारे घडते ? तर मनामुळे घडते. आणि गंमत अशी आहे की मनाचे अस्तित्व भासमान आहे. श्रीसमर्थांनी तर आत्माराम या ग्रंथांमध्ये मनालाच माया म्हटले आहे. संत ज्ञानेश्वर तर मनाचे अस्तित्वच नाकारतात. ते म्हणतात,

वायां मन हें नांव । एऱ्हवीं कल्पनाचि सावेव ।

जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु ।। ज्ञा. १३-११० ।।

सतत कल्पना करीत राहिल्यामुळे शरीर तयार झाले व त्यात आत्म्याचे प्रतिबिंब पडून जीवदशा प्राप्त झाली. वासनेमुळे शरीर निर्माण होत रहाते. स्वामी विवेकानंद म्हणतात, “मन, विचाराच्या द्वारे शरीर तयार करते.” मन आणि विचार सारखे बदलत असतील, तर मग त्यातील कशाला आपले खरे अस्तित्व मानायचे ? मनाचे अस्तित्व सगळेच संत नाकारतात आणि अंत:करण पंचक केवळ मानसिक आहे. अंत:करण पंचक म्हणजे काही खरे अस्तित्व नाही. जाणिवेला अंत:करण असे म्हणतात. संतांच्या जीवनात अंतःकरणाचा सर्वात जास्त विकास आपण बघतो. आपण सूक्ष्म देहाचा विचार बघत आहोत. त्यासाठी आपण एक दृष्टांत बघूया. मुळात जल आहे म्हणून तरंग आहे. मुळात धातू आहे म्हणून सोने व अलंकार हे दोन्ही आहेत. तसा, अघटित घटना पण सर्व कर्ता जो ईश्वर आहे, म्हणून ही सृष्टी आहे. अद्वैत व द्वैत दोन्ही भेद शब्दच आहेत. पण अनंत शक्तिमान भगवंत आहे म्हणूनच सर्व भेद कल्पना उपजल्या. कार्य त्याचे साधन व कर्तुत्व यास त्या मूळ पुरुषाचीच अनंत, अचिंत्य प्रकृती मूळ माया आहे. या मूळ मायेची ही सर्व निर्मिती आणि हा सारा तिचाच खेळ आहे. मूळ माया आणि मूळ पुरुष एकच आहेत. व्यासादिक सर्वच ऋषींनी आपल्याला सांगून ठेवले आहे की, आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. मुख्य अविनाशी आत्मा ओळखणे महत्त्वाचे आहे. आत्मा हा साक्षी आणि वेगळाच आहे. आकाश जसे एकच तसा आत्माही एकच आहे. उपाधी भेदाने वेगळेपण भासते. संतांच्या मुखाने असे निरूपण ऐकून हे ज्ञान ज्या क्षणी होते, त्या क्षणीच मोक्ष होतो. ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थ म्हणतात,

ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।

पाहावें आपणासि आपण । या नांव ज्ञान ।। दा.५-६-१ ।।

परमात्मभाव अखंड असतो, संलग्न असतो. सूक्ष्मदेह हा चिरंतन आहे. त्यासाठी आपण विवेकाने हे सर्व जाणून घेत आहोत. सूक्ष्म देहाचे चिंतन करीत असताना, एक गोष्ट आपल्या लक्षात आली की, आत्मा हा कृष्णाचा शाश्वत अंश आहे. तसा गीतेतील पंधराव्या अध्यायात श्लोक आहे –

ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन: ।

मन:षष्ठानीन्द्रियाणि प्रक्रृतिस्थानि कर्षति ।। १५-७ ।।

माझा शाश्वत अंश जीव म्हणून या मर्त्य जगात जन्म घेतो. त्याला पाच इंद्रिये मिळतात. आणि सहावे इंद्रिय म्हणजे मन. हे सर्व भौतिक प्रकृतीत वास करतात. याच अध्यायाच्या पंधराव्या श्लोकात भगवंत स्पष्टपणे म्हणतात की, मी सर्वांच्या हृदयात निवास करतो. माझ्यापासून ज्ञान, स्मृती आणि मोह उत्पन्न होतो. खरोखर वेद आपल्याला जाणू इच्छितात. तो केवळ मीच आहे, मी वेदांताचा कर्ता आहे आणि  वेदज्ञही  आहे. हा सगळा विचार पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की, विवेकाच्या जोरावरच या प्रकृतीचा निरास होऊ शकतो. देहबुद्धी कमी होते. आणि आत्मबुद्धी जागृत झाल्याखेरीज परमात्मा स्वरूप आकलन होत नाही. म्हणजे आत्मज्ञान आत्मसात होत नाही. 

या कारणें ज्ञाना समान । पवित्र उत्तम न दिसे अन्न ।

म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ।। दा. ५-४-३२ ।।

सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश ।

येविषईं जगदीश । बहुतां ठाईं बोलिला ।। ५-४-३३ ।।

हा आत्मज्ञानाचा उपदेश अंत:करणात रुजला तरच सूक्ष्मदेह आकलन होऊ शकेल.

राम मंत्राचे श्लोक क्र. ७ – ८ – ९

तुझें बाळ तारुण्य गेलें निघोनी ।

कळेना कसे लोक जाती मरोनी ।

करिसी मुलाची स्वहस्तें क्रिया रे

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। ७ ।।

सरळ अर्थ  – बाबारे, जन्माला आलो म्हणता म्हणता कधी बालपण जाऊन तारुण्यात पदार्पण केले आणि रसरसते तारूण्य ओसरून वृद्धत्वापर्यंत पोहोचलो कळलेच नाही. बरोबरीचे बरेचसे लोक, सगे-सोयरे कमी कमी होताना दिसत आहेत. ‘जात्यामधले दाणे रडती, सुपातले हसती । कळे न त्यांना मरण उद्याचे भाळीला अंती ।।’ कवीच्या या शब्दाची प्रचिती वरचेवर येते. दुर्दैवाने कोणाला आपल्याहून वयाने लहान असणाऱ्याचे क्रियाकर्मही करावे लागते. या घटनांवरून काहीच धडा घेणार नाही का ? म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, ‘हरेराम हा मंत्र सोपा जपा रे’.

श्रीसमर्थांचा बोध – ‘मरे एक त्याचा दूजा शोक वाहे । अकस्मात तो ही पुढे जात आहे ।’ हा मृत्यूलोक आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव क्षणाक्षणाने मृत्यूच्या दिशेने जात असतो. अगदी जोरदार, मोठा, समारंभपूर्वक आपला वाढदिवस साजरा करताना आपण हे विसरतो की, आपण एकेक वर्षाने मृत्यूच्या अधिक जवळ जातो आहोत. ज्यांना आपण आपले मानतो, स्वकीय समजतो ते आप्त; इष्ट; सखे-सोबती या अनंताच्या प्रवासात कधीही साथ सोडून जातात. तेव्हा दुःख करत बसण्यापेक्षा, नामस्मरण करणे जास्त श्रेयस्कर असते. हे जगच मुळी मृत्यूची पाठशाला आहे. जन्म जरी पुर्वकर्मानुसार झाला असला तरी आपला मृत्यू   कसा व्हावा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य नियतीने माणसाला दिले आहे. इथे जगायचे कसे ? या पेक्षा मरावे कसे ? हे शिकणारा यशस्वी ठरतो. परमार्थ साधनेने हे सामर्थ्य मिळते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, ‘मरणाचे स्मरण असावे । हरीभक्तीस सादर व्हावे ।’ जन्माला आला, जगला आणि मेला, यापेक्षा रामभक्तीत/भगवद् चिंतनात व्यतीत केलेला काळ खऱ्या अर्थाने माणूस जगलेला असतो. तेव्हा, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे हेच खरे.

दुराशा नको रे परस्त्री धनाची ।

नको तूं करूं नीचसेवा जनाची ।

पराधीन कैसा भला दिससी रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। ८ ।।

सरळ अर्थ  – परधन आणि परस्त्री  यांची अभिलाषा कधीही धरू नये. त्यासाठी बहुतेक वेळा ‘नीचसेवा’ अर्थात अगदी खालच्या स्तराला जाऊन केलेली सेवा, तसेच शूद्र लोकांची सेवासुद्धा करावी लागते, त्यामुळे पराधीनता येते. मन-बुद्धी गहाण ठेऊन जगण्यापेक्षा हरे राम हा मंत्र सोपा जपावा हेच उत्तम होय.

श्रीसमर्थांचा बोध – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात – “परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ”. श्रीसमर्थ  म्हणतात – “कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतन ।  जन्मासी कारण हे चि दोन्ही ।” कामिनी आणि कांचन म्हणजेच अर्थ आणि काम हे परमार्थ साधनातील दोन मोठे अडथळे आहेत. ज्यांना नरजन्माचे सार्थक करून घ्यावेसे वाटते, याच जन्मी मोक्ष मिळावा असे वाटते, त्या प्रत्येकाने जी पथ्ये पाळणे अत्यावश्यक आहेत, त्यात परद्रव्य आणि परस्री यांपासून दूर रहाणे हे प्रमुख आहे. मानवेतर प्राण्यांपेक्षा ‘मनुष्य’ वेगळा, नव्हे तर विशेष महत्वाचा आहे, याचे प्रमुख कारण भगवंताने फक्त आणि फक्त मनुष्यालाच विवेकशक्ती दिलेली आहे. ज्याच्या आधारे मनुष्य ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून घेऊ शकतो. श्रीसमर्थ म्हणतात, 

म्हणौनि नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्ये वरिष्ठ ।

जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचे ।।

असे असताना माणूस मात्र विषय-विकारांच्या आहारी जाऊन “माझे ते माझेच, पण तुझे ते ही माझेच” म्हणत अतिलोभापायी, जे आपले नाही ते मिळवण्याचा हट्ट धरतो. नीती-मर्यादांचे उल्लंघन करतो. त्यासाठी नीचसेवा अंगिकारतो. म्हणजे करू नये ती कामे करतो. किंवा, आपली पत-प्रतिष्ठा, आत्मसन्मान विसरून फक्त पैसा मिळवण्याकरता शूद्रांचे दास्यत्व पत्करतो व आपले स्वातंत्र्य गमावतो. समाजात आपणच आपली छी-थू करून घेतो. श्रीसमर्थ म्हणतात, असे अपमानीत होण्यापूर्वीच अंतःकरणपूर्वक हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

मदे डोलसी बोलसी साधुवृंदा ।

कसें हीत तूं नेणसी बुद्धिमंदा ।

रिकामाचि तू गुंतशी  वाउगा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। ९ ।।

सरळ अर्थ  – अहंकार, अभिमान, दंभ याने उन्मत्त होऊन, साधु-सज्जनांना उर्मटपणे टाकून बोलणे चांगले नाही. अशा माणसांना श्रीसमर्थ ‘बुद्धिमंद’ म्हणतात. साधे स्वतःचे हित सुद्धा या अहंकारी लोकांना कळू नये याचे त्यांना वाईट वाटते. त्यांची  समजूत काढताना श्रीसमर्थ म्हणतात , “बाबा रे, असे  नको ते रिकामटेकडे उद्योग करण्याऐवजी, साधे सरळ सोपे ‘हरेराम’ असे नाम मुखाने घेतले, तर तुझे कल्याणच होईल बरं.”

श्रीसमर्थांचा बोध – ज्याला आपण ‘मद’ म्हणतो त्याचे नेमके स्वरूप तरी काय आहे ? बघा हं! काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. यात मद आणि मत्सर, हे दोघे जुळे भाऊच आहेत. माणसाच्या या नैसर्गिक विकारांना अध्यात्म शास्त्रात षड्रिपू म्हटले आहे. या विकारांचा संग, म्हणजे दुःसंग होय. पण हे विकार तर परमेश्वराने दिलेले आहेत, तेव्हा त्यांचा उपयोग आहे हे नक्की. हे विकार कुठे, केव्हा, कसे आणि किती प्रमाणात वापरावे हे समजत नाही. स्वयंपाकात मिठाचे प्रमाण जसे, तसे हे विकार जरूर तेथे त्या प्रमाणात वापरणे अपेक्षित आहे. जिथे जिथे शक्तीचा साठा असतो तिथे मद-मत्सर डोके वर काढतात. कुणाकडे शारीरिक शक्ती असते, कुणाकडे मानसिक ताकद असते, कुणाजवळ  ज्ञानशक्ती, तर कुणाजवळ आर्थिक बळ असते. अशी शक्ती देवाचे देणे न मानता आपलेच कर्तृत्व आहे, असा भ्रम जेव्हा होतो तेव्हा मद-मत्सर माणसाला मदोन्मत्त बनवतात. त्यातही मद-मत्सर-स्वार्थ असा त्रिवेणी संगम होतो, तेव्हा त्याला प्रचंड धार येते व त्यातूनच असुरीवृत्तीचा उदय होतो. अशी व्यक्ती समोरच्यावर अकारण अन्याय, अत्याचार करू लागते. त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडते, त्याबरोबर स्वतःचेही स्वास्थ्य-समाधान-शांती हरवते, हे त्याला कळत नाही. अशा नादान व्यक्तींना श्रीसमर्थ कळवळ्याने सांगतात, हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे. 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

श्रीसमर्थ रामदास स्वामी रचित आरत्या भाग १

मराठी भाषेतील आरत्या हे भक्तीरसप्रधान काव्य मंदिरातील एक स्वतंत्र असे देवघर आहे. या देवघरात परमेश्वराचे सुरम्य, सगुण स्वरूप आणि भक्त याशिवाय इतर काही दिसत नाही. देव आणि भक्त यांच्या मधील पूज्य पूजक संबंधाची साक्षात दर्शन घडविणारे आरसे म्हणजे आरत्या होय, असे ल.रा. पांगारकर यांनी म्हटले आहे.

श्रीसमर्थांच्या सर्व आरत्या या कसोटीत चपखलपणे बसतात. नारद भक्तीसूत्रात सांगितल्याप्रमाणे भक्ती ११ प्रकारे करता येते. हे सर्व प्रकार श्रीसमर्थांच्या निरनिराळ्या आरत्यांमध्ये आपणास आढळून येतात. तसेच नारद भक्तीसूत्रे सुध्दा त्यामध्ये दिसून येतात. श्रीसमर्थांच्या आरत्या ह्या भावनात्मकता, एकाग्रला वाढविणाऱ्या, अंतरंगास स्पर्श करणाऱ्या रचना आहेत. त्यांच्या स्फूट रचनेने त्या पाठांतरास सोयीच्या आहेत. त्यांमध्ये एक गेयता आहे. त्या म्हणताना टाळ, मृदुंग, झांजा यांची साथ घेतली तर; म्हणणारा भक्तीत लीन होतो, नादब्रह्मात तल्लीन होतो. आणि म्हणून आबालवृद्ध सर्वजण या आरत्या म्हणतात. याचे उदाहरण गणपतीची आरती आहे. “सुखकर्ता दुखहर्ता वार्ता निघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।” या आरतीचे वैशिष्ट्य असे आहे की, यात नारद भक्तीसूक्तात भक्तीचे जे अकरा प्रकार सांगितले आहेत त्यातील खूप यात लक्षात येतात. 

  1. ईश्वराच्या विशेषांचे गुणगान – पहिली ओळ – सुख व दु:ख यापासून विश्व, दुःख, इत्यादि गोष्टींपासून आपला बचाव करून, आपल्याला सुखी करणारा, आपल्यावर कृपाछत्र धरणारा, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा.
  2. ईश्वरस्वरूप – दर्शनमात्रे मन कामनापुरती.
  3. स्वगूण स्वरुपाची उपासना – जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती.
  4. ईशसेवा – त्या मंगलमूर्तीला खूप सजवले आहे, सर्वांगाला शेंदूर फासला आहे. वस्त्र, अलंकार अर्पण केले आहेत.
  5. सख्यत्व – तो वक्रतुंड आहे त्याला ३ डोळे आहेत, पण तरी त्याचे रुप लोभस वाटते ते सख्यत्वामुळे. 
  6. ईश्वराविषयी आपलेपणा – दास रामाचा वाट पाहे सदना ! आपण घरी आपल्या माणसाची वाट पाहतो. त्यातून 
  7. ईशचिंतन 
  8. ईश्वरावरचे प्रेमही व्यक्त होते. एवढेच नाहीतर, 
  9. ईश्वरापासून दूर झाल्याची खंतही व्यक्त होते. 
  10. त्या गणपती बाप्पाशी एकरूप होऊन ते आपल्या मनातील भावना इच्छा व्यक्त करतात. संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, असे मागणे मागतात. 

या मागणी मध्ये खूप मोठे तत्वज्ञान दडले आहे. संकटी पावावे म्हणजे कोणते संकट ? तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, परिग्रह इ. जे शत्रु आहेत त्यांच्या पासून वाचव. अहंकार, बल, दर्प हे माझ्यापासून दूर ठेव. हट्टीपणा, दुराग्रहीपणा, क्रुरता, नीचपणा, द्वेष वाटणे, अधमपणा, दुराचारीपणा इ. अवगुणाची वस्ती माझ्यामध्ये होऊ देऊ नको. या संकटापासून मला वाचव. माझे अंतःकरण, मन, बुद्धी, इंद्रिये ही शुध्द सात्विक गुणांनी भरू दे. माझे अगदी निर्वाणतेने रक्षण कर. मला निर्भय बनव. ही निर्भयता कशी तर, छांदोग्य उपनिषदात सत्यकाम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सत्याची कास धरण्याची असावी. मी भगवंतात अनुरागीत होऊन माझ्या अंतःकरणात सम्यक बुद्धी नांदो. म्हणजे भगवंताप्रती माझ्या मनात फक्त प्रेमभाव निर्माण होवो. यालाच स्वामी विवेकानंद प्रेमयोग म्हणतात. माझ्या मनात भगवन्नामाचा जप सतत चालू दे. म्हणजे माझ्याकडून स्वाध्याय होऊ दे. अहिंसा, राग, क्रोध न धरणे, संसाराच्या कामनेचा त्याग मला करू दे. माझे अंत:करण शांत असू दे, मला कोणाची चहाडी, चुगली करायची सवय, इच्छा न होवो, माझ्यामध्ये भूतदया निर्माण होऊ दे. मला सांसारिक विषयात लालसा उत्पन्न न होवो. माझे अवयव, वाणी, प्राण, नेत्र, कर्ण आणि माझ्यातील सामर्थ्य, सर्व इंद्रिये तेजस्वी म्हणजे पुष्ट होवोत. माझ्यामध्ये दया, क्षमा, धृति म्हणजे अनुकुल प्रतिकूल परिस्थितीत धैर्यवान, अचल राहणे हे गुण विकसीत होवोत. माझ्यातील वैरभाव नष्ट होवो. असा मला गुणसंपन्न करुन तू माझे रक्षण कर.

नृसिंहाच्या आरतीत रामदासांनी प्रल्हादाची पूर्ण कथा सांगितली आहे. ही कथा सांगताना त्यांनी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्रास दिला, त्याचा छळ केला हे सांगून देवाला, त्या ईश्वरा‌ला त्या बालकाचे हे दु:ख सहन झाले नाही, त्याला राहवले नाही, व त्याने नृसींह अवतार धारण करून प्रल्हादास वाचविले. येथे देव हा त्याच्या भक्तांचा कैवारी आहे हे रामदासांनी देव भक्तांचा कैवारी साचा’ असे शब्द वापरून म्हटले आहे. येथे रामदास स्वामी आपल्याला, आपण जर परमात्म्याची भक्ती केली, त्याच्यावर आपली पूर्ण श्रध्दा, निष्टा ठेवली तर तो आपले रक्षण करतो, हे सांगितले आहे. म्हणजे आपण त्याचे नामस्मरण भजन, कीर्तन, लीलांचे गुणगान, मनन, निदिध्यासन करून त्याचे स्मरण केले पाहिजे. आपण भक्त होण्यास स्वत:ला पात्र केले पहिले असे ते सुचवितात.

ज्ञानेश्वरांच्या आरतीत ते श्रीकृष्णांनी स्वत: ज्ञानेश्वरांच्या रुपात अवतार घेतला आहे असे म्हटले आहे. भगवद्गीता प्राकृतात आणून अज्ञानाचा अंध:कार दूर केला. अविद्या नष्ट केली. ब्रह्मज्ञानाने मत्सर दीप मालवले असे स्पष्ट केले आहे. आत्मारामाच्या आरतीत आत्मारामाचा महिमा विशद केला आहे. पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व उजागर केले आहे. तसेच आत्माराम हा खूप पूरातन, सनातन आहे हे सांगायला ते विसरले नाहीत. 

सूर्याच्या आरतीमध्ये सूर्याचे गुणगान त्यांनी केले आहे. त्याचे तेज हे असंभाव्य आहे असे ते कटाक्षाने उद्धृत करतात. त्याच्या सूर्यमंडला बद्दल ते म्हणतात की,  ते अतुलनीय आहे. सूर्याची उपासना ही अतुलनीय आहे  कारण, सूर्यनमस्कार घातल्याने आपले शरीर सुदृढ होते. धष्ट पुष्ट बनते. तसेच सूर्याची उपासना केल्याने मन सुध्दा सक्षम बनते. या सर्व ज्ञानाचे विज्ञान त्यांनी अनुभवले होते. म्हणून ते म्हणतात, सूर्याची उपासना केल्याने मी सूर्याचा वंशजच झालो आहे. म्हणजे ते सूर्याप्रमाणे निष्काम कर्मयोगी झाले आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर आत्मनात्म‌निवेक बुध्दीने ते देहबुध्दीतून आत्मबुध्दी पर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे. त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे.

नवरात्रीच्या अंबाबाईच्या आरतीत त्यांनी या स्त्रीशक्तीचे पूजन, ब्रह्मा, विष्णू, रूद्र करतात असे प्रतिपादित केले आहे. ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू पालन कर्ता, व रुद्र हा संहारक व नियामक होय. विष्णू या सृष्टीचे/ब्रह्मांडाचे पालन करतो, त्याची काळजी घेतो. तर रूद्र म्हणजे शिव जो कल्याणकारी आहे, ज्ञानमय आहे. ऋग्वेदामध्ये या रूद्र देवावर अनेक सूक्ते आहेत. असे हे सर्वश्रेष्ठ विश्वंभर सुध्दा या जगन्मातेला पूजतात, असा तिचा महिमा समर्थ आपल्याला सांगू इच्छितात.  या आरतीमध्ये समर्थ रामदासांनी नऊ दिवस-रात्रींचे वर्णन खूपच काव्यमय गुंफले आहे. नवरात्रीतील पूजा-अर्चा, कथा त्यांनी थोडक्या शब्दांत पण आशयघन रचली आहे. षष्ठीला दिवट्या नाचवून, कवड्या अर्पण करतात. सप्तमीला पूजार्चन जाई, जुई, शेवंती इ. फुलांची आरास करतात. नवमीला पारणे; सप्तशती; होम, दशमीला म्हणजे दसऱ्याला सीमोल्लंघन असे अगदी रसभरीत वर्णन केले आहे. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अखंड ध्यान निरूपण

अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण ।

याचें कळतां विवरण । सहजचि घडे ।। दासबोध १४-८-२४।।

श्रीरामाचे अखंड ध्यान धरावे. अखंड ध्यानाचे लक्षण म्ह‌णजे देवाचे अखंड स्मरण होय. ध्यान आणि स्मरण याचा परस्पर संबंध लक्षात आला की, अखंड स्मरण सहज घडते.

सर्व साधारणपणे समाजात ज्याच्याकडे भरपूर संपत्ती असते, तो भाग्यवान मानतात. पण समर्थांची भाग्यवानाची व्याख्या वेगळी आहे. ज्याच्या अंतः‌करणात भगवंताला स्थान तोच खरा भाग्यवान अशी समर्थांची व्याख्या आहे. भगवंत शुद्ध जाणिवरूप आहे. जगातील  यच्चयावत प्राण्यांच्या अंतर्यामी तो वावरतो. जो शुद्ध जाणिवेला वश करून घेतो, त्याला सगळे प्राणी आपोआप वश होतात. मग त्या व्यक्तिला काही कमी पडत नाही. तोच खरा भाग्यवंत ! हृदयांत असणारी अखंड जाणिव म्हणजेच आत्मस्वरूप.

स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।

नामस्मरणें पावावें । समाधान ।। दासबोध ४-३-२।।

अखंड नामस्मरणाने अखंड ध्यान लागते. “पापाचे कळप पळती पुढें । हरिपाठ १४-२ ।।” ज्यावेळी आपण ध्यानाला बसतो, तेव्हा ज्याचे ध्यान करायचे ती मूर्ती व आपण वेगळे असतो. म्हणजेच त्या ठिकाणी द्वैत असते.  “ऐशिया आपुलियाची सह‌जस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती । तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।। ज्ञानेश्वरी ८-१९।।” जीव आणि शिव यांची गाठ आपल्या अंत:करणात आधीच आहे. पण मायेमुळे व मल विक्षेप आवरणामुळे आपणास परब्रह्म दिसू शकत नाही. देहबुद्धि जात नाही. मी देह आहे इथ पासून मी आत्मा आहे इथ पर्यतचा मार्ग म्हणजे परमार्थ. समर्थ या समासात म्हणतात,

देव पुजावा विमळहस्तीं । तेणें भाग्य पाविजे समस्तीं ।

मूर्ख अभक्त वेस्तीं । दरिद्र भोगिजे ।। दासबोध १४-८-२।।

विमळहस्ते देव पूजायचा म्हणजे काय करायचे? आपण स्नान करूनच देवपूजा करतो, यात वाद नाही. समर्थाना विमळहस्ती म्हणजे सत्य मार्गाने मिळवलेली संपत्तीच प्रपंचासाठी वापरायची आहे. टेबलाखालू‌न घेतलेली नाही. दुसऱ्याचे लुबाडून आपले कल्याण होत नाही. स्वच्छ कर्म हीच भगवंताची पूजा व त्याला नामाची जोड दिली की, दुधात साखर !

आधीं देवास वोळखावे । मग अनन्यभावें भजावें ।

अखंड ध्यानचि धरावें । सर्वोत्तमाचें ।। दासबोध १४-८-३ ।।

देवाला ओळखायचे म्हणजे काय करायचे ? आपल्याकडे तेहतीस कोटी देव मानतात. राम, कृष्ण, देवी, दत्त, शंकर असे अनेक देव आहेत. समर्थांना अभिप्रेत आहे तो आत्माराम ! म्हणजे थोरला देव. तोच सर्व विश्व चालवतो. तीच जाणिव विशाल बनवावी लागते. कुणालाही अंत:करणाने दुखवू नये.

देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।

तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ।। ज्ञानेश्वरी २-३६२ ।।”

ज्याचे अंत:करण महासुखात निमग्न असते, त्याला रिध्दिसिद्धी आल्या काय नि गेल्या काय त्याचे त्याला भान नसते. अगदी याच अर्थाची ओवी आत्माराम ग्रंथात आहे.

“मायेकरितां देव आणि भक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त ।

मायेकरितां जीवन्मुक्त । होती स्वानुभवें ।। आत्माराम २-३२ ।।”

माया म्हणजे मूळ जाणिव शक्ती. या मायेमुळे देव आणि भक्त होतात. ज्ञाते विरक्त होतात आणि मायेमुळेच स्वानुभवाने (साधक) जीवन्मुक्त होतात. अंत:करण स्वस्थ झाले असता सर्व दुःख नाश होतो व त्या प्रसन्न चित्त पुरुषाची ब्रह्मदर्शिनी प्रज्ञा प्रतिष्ठीत होते.

जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।

तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ।।

तैसैं हृदय प्रसन्न होये । तरी दु:ख कैचें कें आहे ।

तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ।। ज्ञानेश्वरी २-३३९, ४०।।

ज्याच्या जठरातून पित्ता ऐवजी अमृतच स्त्रवत असते, त्याला तहान भुकेची  पर्वा कशी असेल ? त्याप्रमाणे अंत:करण प्रसन्न झाल्यावर मग दुःख कसले ? त्याची बुद्धि परमात्म स्वरूपाचे ठिकाणी सहजच स्थिर होते.

“यथा दीपो निवातस्थो  नेङ्गते सोपमा स्मृता ।

योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ।। भ.गीता ६-१९ ।।”

निर्वात ठिकाणी ठेवलेला दिवा, ज्योत जशी हालत नाही त्याप्रमाणे योगाभ्यासी पुरुषाच्या चित्ताचा मनोनिग्रह झालेला असतो. अग्नीत टाकलेले बीज जसे उगवत नाही, तसे अशांत माणसाचे चित्त चंचल असते. मनाची चंचलता हेच दुःखाचे बीज असते. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रसुखही तुच्छ लेखतो, तो भिल्लाच्या झोपडीवर कसा खुश होईल ? जेथे स्वर्गसुखाची पर्वा नाही, तेथे कवडीमोल रिद्धि-सिद्धिची काय किंमत ?

सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन ।

मनामध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ।। दासबोध १४-८-३५ ।।”

ध्यान योग्य लागले याची साक्ष आपले मनच देत असते.

सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा ।

माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ।। दासबोध १४-८-४९ ।।

खऱ्या साधकाने सर्व संप्रदायाचा अभिमान सोडून अनुभव घ्यावा व मग विवेक मांडावा. त्या विवेकाच्या बळावर मायेचा पूर्वपक्ष खंडून टाकावा, मायेचा निरास झाला की, परब्रह्माला स्पर्श होतो.

मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि  नासोन  जातें ।

कृपा केलियां रघुनाथें । प्रचित येते ।। दासबोध ६-७-३०।।”

श्रीरामांच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित घडते. भगवंताचे ध्यान अखंड असणे हेच त्याचे दर्शन होय. त्याच्या अस्तित्वाची जाणिव रहाणे हेच त्याचे दर्शन. सतराव्या दशकात समर्थ म्हणतात, सोहंला ध्वनी नाही, म्हणूनच तो सहज शब्द आहे. हा शब्द मागे टाकून सूक्ष्मात जाणारा खरा मौनी होय. आपल्या मधील अजपा सहज बघावी. गुप्त द्रव्य जसे शोधतो त्याप्रमाणे आपल्या अंतर्यामी भरलेली अजपा आपणच ओळखावी.  

शिवधरघळीत साधना सप्ताह सुरु करणाऱ्या वंदनीय अक्का ! त्यांची भागवत कथा सातारा येथे एकजणांच्या घरी चालू होती. त्यांचे बंधू त्यांच्याबरोबर कथेला जात असत. वंदनीय अक्का राममंदिरात रिक्षेने दर्शनाला गेल्या. तेथे काही माळा व जप लिहून ठेवण्यासाठी वही, पेन आणि आसने पण ठेवली होती. म्हणजे येथे जपाची गरज आहे, असे समजून वंदनीय अक्कांनी नळावर हात-पाय धुतले व आसन घालून माळ हातात घेतली. रामाचे दर्शन घेतले. राम, लक्ष्मण, सीता तसेच रामचरणीं हनुमंत अशा मुर्ती तेथे होत्या. जप सुरू करताच, माळ सारखी हातातून पडत होती. तीन तीन वेळा पडली. वंदनीय अक्कांचे गुडघे दुखावले होते. त्यावेळी त्यांनी ११ कोटी ॐ नमो भगवते वासुदेवाय या जपाचा संकल्प केला होता. गुडघे दुखत असतांनाच त्यांनी दासबोधाच्या २०० समासावर २०० प्रश्नपत्रिका काढल्या. त्यांच्या सद्‌गुरू जिजी महाराज त्यांना म्हणाल्या, ‘गुडघे दुखावलेत ! हात नाही ? घे दासबोध आणि अभ्यासाला लाग.’

जप करताना माळ पडत होती म्हणून त्यांनी रामाकडे पाहिले तर हनुमंताची मूर्ति दुभंगली व त्यातून समर्थ प्रकट झाले. तुझा सव्वा कोटी जप झाला आहे. उचल माळ आणि समर्थांनी त्यांना श्रीराम जयराम जय जय राम हा मंत्र तेरा वेळा सांगितला. व त्यांनी म्हटले २० च्या दशकातील घडलेला दृष्टांत ! नामाने इतके साधले जाते. घरी येऊन पहातात, तो सव्वा कोटी जप झाला होता. अक्कांचे डोळे झिरपत होते. अक्कांना जसे समर्थ भेटले तसे आपणा सर्वांना समर्थांचे दर्शन व्हावे हीच अपेक्षा.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अनुताप

उपरती म्हणजे बाह्य विषयांपासून सुटण्याची धडपड होय. ही धडपड त्रिविध तापाने पोळल्यावर, संसार दु:खाने दुखावल्यावर सुरू होते. आपले गेले ते आयुष्य अज्ञानामुळे वाया गेले असे साधकाला मनोमनी वाटते. आता नव्या जीवनाची सुरुवात विवेक, विचार, वैराग्याने करावी असेही वाटत असते. अनुताप व पश्चाताप होणे ही साधकावस्थेची पहिली पायरी आहे. समर्थ करुणाष्टकात “अनुदिन अनुतापे तापलो रामराया” असे कळकळीने म्हणतात. समर्थांनी दृढ निश्चयाने घराचा त्याग  केला होता, तो ही लहानपणीच; म्हणून त्यांना स्वत:ला पश्चात्ताप होत नव्हता, पण लोकांचे अज्ञान; लोकांची व्यथा त्यांना स्वत:चीच वाटे त्या भावनेत त्यांनी करुणाष्टके  लिहिली. 

१. भूमीभार झाल्याची भावना – सक्षम, दुर्लभ नरदेह मिळून सुद्धा स्वत:मधील ईश्वरी स्वरूप ओळखले नाही, देहाचा उपयोग साधनेसाठी न करता भोग भोगण्यासाठी केला, भक्ती; आत्मज्ञान; ध्यान न करता; दीन दुबळा, खचलेला झालो म्हणून अनुताप होतो.

२. मन आवरत नाही – मन अतिशय चपळ, आवरता आवरत नाही. भगवत् गीतेत अर्जुनानेही ही व्यथा बोलून दाखवली. गीता अ. ६ श्लोक ३४ मध्ये अर्जुन म्हणतो “मन मोठे चंचल, क्षोभ निर्माण करणारे दृढ व बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे म्हणजे वार्‍याला अडवण्यासारखे कठीण आहे.” मन माणसाला विकल्पात गुंतवते व कोणताच अभ्यास, कोणतीच साधना पूर्ण होत नाही. ते सतत भूतकाळ, भविष्यकाळात रमते व वर्तमानात जे करायला हवे ते करू देत नाही. समर्थ म्हणतात “मन हे आवरेना की, वासना वावडे सदा | कल्पना धावते सैरा | बुद्धी दे रघुनायका ||”

३. व्यर्थ स्वार्थ साधण्याची वृत्ती – मी व माझे हे दोन शब्द साधकाला स्वजन, जन, धन या साखळीत अडकवतात. स्वार्थ हवेपणा वाढवतो, नेहमीच अपूर्णच असतो. विषय वासना नेहमीच अतृप्त असतात. त्या जीवाला दु:ख देतात व जन्म मृत्यू चक्रात अडकवतात. या गोष्टी टोकाच्या झाल्यावर त्यांचा पश्चात्ताप होतो.

४. स्वजन माया – आई-वडील, बहीण, भाऊ, पत्नी, मुले काही काळापुरते सोबती असतात. त्यांच्यापासून मनाने अलिप्त होऊन ते ईश्वर चरणी समर्पित करावे लागते. पण  समर्थ म्हणतात, “सकळ स्वजन माया तोडीता तोडवेना” तसे हे कठीण आहे. “जीवलग जीव घेती | प्रेत सांडोनी जाती” हे कटू सत्य पचवावे लागते. अनुताप झाला तर “घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा” असे होत नाही.

५. देशाटनातील निरीक्षण – समर्थांनी देशाटनात अनेक साधू, तपस्वी, हटयोगी पाहिले. देवालयांमधील भव्य पूजा पाहिली. तशीच काशी, अयोध्या येथील भग्न मंदिरे पाहिली. लोकांमधील अज्ञान, अंधश्रद्धा पाहिली. हिंदूंमधील उदासिनता पाहून त्यांना, या लोकांना इतिहासाचे विस्मरण कसे झाले? त्यांना मागील गोष्टींचा पश्चात्ताप का होत नाही? असे वाटे.

६. अज्ञानाची जाणीव – सुखाच्या धडपडीत दु:खच वाढते हे कळल्यावर आपलं काहीतरी चुकत आहे, खरा शाश्वताचा मार्ग वेगळाच आहे, त्या बाबत आपण अज्ञानी आहोत, याचे वाईट वाटणे म्हणजे अनुताप. अनुतापानंतर ज्ञानाची जिज्ञासा निर्माण होते. ग्रंथाचा अभ्यास, सत्संगतीत आपल्यामधील अपूर्णतेची; न्यूनतेची; दु:खभोगाची; आयुष्य वाया गेल्याची तीव्र जाणीव होऊन पश्चात्ताप होतो व पुढील जीवन बदलण्याची तीव्र इच्छा होते.

वाल्मिकी ऋषींचा अनुताप – वाल्मिकींचा अनुताप अत्यंत उद्बोधक आहे. नारदां सारख्या संताची गाठ पडली व त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे मला पाहून घाबरत कसे नाहीत? त्यांच्या जवळ काहीही नाही तरी समाधानी कसे? नाम स्मरणात हे निर्भयपणे या अरण्यात कसे हिंडत आहेत? या प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी होती. स्वत: करत असलेले वाईट कर्म पत्नी-मुलांसाठी करतो हा त्यांचा भ्रम पत्नी-मुलांनीच घालवला. आपल्या पापात कोणी वाटेकरी नाही व आपण घर सोडत असताना कुणाला वाईटही वाटत नाही हे सत्य कळल्यावर त्यांना पश्चात्ताप झाला. त्यांच्या समग्र जीवनात मोठी क्रांती घडली, धगधगीत वैराग्याचा उदय झाला. राम नाम घेण्याची सवय नाही म्हणून “मरा मरा” जप सुरू केला. देहबुद्धी व देहाहंकार नष्ट झाला. अंगाभोवती वारूळ निर्माण झाले. नाम निष्ठेनी समाधीमग्न झाले. त्यांना शरीर, प्राणांचे विस्मरण झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी “रामकथा” लिही असे संगितले. वाल्मिकींनी २४००० श्लोकांचे रामायण लिहिले. 

समर्थ म्हणतात, 

वाल्मीक ऋषी बोलिला नसता | तरी आम्हांसी कैंची रामकथा |

म्हणोनियां समर्था | काय म्हणोनी वर्णावें?

रामनाम कथा श्रवणी पडता | होये सार्थकता श्रवणाची |

मुखें नाम घेतां रूप आठवले | प्रेम उणावले पाहावया |

राम माझे मनी शोभे सिंह्यासनी | येकायेकी ध्यानी सांपडला |

रामदास म्हणे विश्रांती मागेन  | जीवीचे सांगेन राघवासी ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language