श्रीसमर्थांचे शब्द‌सामर्थ्य

श्रीसमर्थ रामदास स्वामी हे साक्षात्कारी संत वा स्वानुभवसंपन्न ब्रहज्ञानी होते. वय वर्षे बारा ते चोवीस या प्रारंभीच्या बारा वर्षांच्या काळात नाशिक जवळच्या टाकळी येथे कठोर तप साधना करून त्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले. पुढील बारा वर्षे त्यांनी आसेतु हिमालय प्रदभ्रमण केले. समाजाचे सूक्ष्म अवलोकन केले. अस्मानी, सुलतानी संकटांनी भरडून निघालेली, हीनदीन, लाचार, आपाप‌सातील कलहाने ग्रासलेली, फंदफितुरीने पोखरलेली, परवशतेची खंत नसलेली, मतामतांच्या गलबल्यात भ्रमलेली समाजस्थिती पाहून श्रीसमर्थ अत्यंत व्यथित झाले, अस्वस्थ झाले. अशा विपरित स्थितीत स्वत:च्याच आनंदात, ब्रह्मानादात मग्न न रहाता, समाजाचे पुनरुत्थान करण्याचे असिधारा व्रत त्यांनी मनोमन स्वीकारले. समाजाच्या स्वधर्म व संस्कृतीचे जागरण ही काळाची गरज ओळखूत त्यांनी आपले विचार मांडण्यास सुरुवात केली.

श्रीसमर्थांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती. ती सदासर्वदा जागृत असे. स्वधर्म व संस्कृतीचा जणू विसरच पडलेल्या समाजाची मनोभूमी निकोप होणे गरजेचे होते. त्यासाठी भक्तीची शिकवण देताना “भक्तिचेन योगे देव । निश्चयें पावती मानव ।।” अशी त्यांची भूमिका होती. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, व आत्मनिवेदन या नवविध भक्ती प्रकारांचा विस्तृत परीचय त्यांनी करून दिला आहे. त्यांचा भक्तीमार्ग विलक्षण बुद्धीप्रधान असल्याने, त्यांनी प्रपंच व परमार्थ यांची उत्तम सांगड घातली आहे. 

आधीं प्रपंच करवा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।

येथें आळस करूं नका । विवेकी हो ।।

प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।।

हे खरंच, पण त्याच बरोबर “परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगीसी । अंतीं परम कष्टी होसी ।।” हे ही खरेच आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणे हाच खरा विवेक हे ते स्पष्ट करतात.

श्रीसमर्थांचे सर्वच प्रतिपादन सरळ अन रोखठोक आहे. भाषा ओघवती, गतिमान आहे. मराठी बरोबरच हिंदी, उर्दू, फारसी, अरबी, संस्कृत शब्दांचा ते सहज उपयोग करताना दिसतात. त्यांना शब्दांची कधीच अडचण भासत नाही. जणू शब्द हात जोडून त्यांच्या पुढे उभे आहेत असे वाटते. मोजक्या शब्दात अगदी नेमका अर्थ अगदी निःसंदिग्धपणे सांगण्याची त्यांची हातोटी, त्यांचे शब्दसामर्थ्य विलक्षण होते.

तत्कालीन समाजातील देवत्वाबद्दलच्या व साधुत्वाबद्दलच्या रूढ आणि भोंगळ कल्पना विवेकाच्या शस्त्रानेच कापून काढीत खरा देव कोणता ते त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या अंतरंगात वास करणारा अंतरात्मा अर्थात् आत्माराम हाच खरा देव आहे हे त्यांनी ठासून सांगितले. संत व साधुत्वा बद्दलचे त्यांचे विचार असेच सुस्पष्ट होते. संत साधू कोणास म्हणावे?

जो जाणेल भगवंत । तया नाव बोलिजे संत ।

जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ।।६-१-१६।।

चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव ।

तोचि जाणिजे माहानुभाव । संत साधु ।।६-१-१७ ।।

नरदेह दुर्लभ आहे याची त्यांना जाणीव होती, म्हणून “वरकड देहे हें काबाड । नरदेह मोठें घबाड ।” असे ते सांगतात, नरदेहाला रत्नपेटी म्हणून त्याचा गौरव करतात आणि त्याचवेळी या दुर्लभ नरदेहाचे सामर्थ्य जाणा; त्याचे सार्थक करा असेही अगदी कळकळीने सांगतात. कोणताही माणूस सर्वगुण संपन्न नसतो. त्यात काही गुण व काही अवगुण यांचे मिश्रण असते,  हे त्यांना मान्य आहे. पण त्याच वेळी, “अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।” हा त्यांचा विश्वास आहे. बाह्य शृंगारापेक्षा अंतरंग  सत्त्वगुणांनी शोभिवंत करण्याचा ते आग्रह धरतात.

नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंघारणें ।

विवेकें विचारें राजकारणें । अंतर शृंघारिजे।

त्यासाठी हवा प्रयत्न. प्रयत्न, प्रबोधन व प्रचिती यांवर त्यांचा विशेष भर होता.  केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे । यत्न तो देव जाणावा । अंतरी धरिता बरे । क्रियेवीण वाचाळतां व्यर्थ आहे । प्रयत्नांच्या आड येतो तो आळस. निद्रा, आळस व दुश्चितपणा यांना दूर ठेवलेच पाहिजे. श्रीसमर्थांनी स्वत:चे आचरण तसेच ठेवले. “स्वये करून करवावे” हेच सूत्र त्यांनी स्वतः सांभाळले व समाजाला सांभाळण्यास उद्युक्त केले.

समाज मनाला चेतना आणण्यासाठी त्यांनी विचारपूर्वक श्रीराम, श्रीहनुमान, व तुळजाभवानी ही उपासना दैवते निवडली. सर्व शस्त्रधारी दैवते ! बुद्धी व शक्तीचा संगम असलेली ! नारी शक्ती बरोबरच नम्रता व समर्पण वृत्तीही हवी. त्यासाठी हनुमानाचा आदर्श पुढे ठेवला. वीरमारूती व दासमारूती ही मारूतीरायाची दोन्ही रूपे त्यांना फार प्रिय होती. गावोगावी त्यांनी हनुमान मंदिरे व जोडीला व्यायाम शाळा उभारल्या. अकराशे मठांची स्थापना केली. हे मठ म्हणजे ज्ञानोपासनेची विद्यापीठेच होती. त्यांचे मठपती अर्थात महंत समाजाचे नेतृत्व करणारे नेतेच होते. त्यांच्या मार्फत समाजात चेतनेची स्फुल्लिंगे फुलू लागली. श्रीसमर्थ सांगू लागले, “वन्ही तो चेतवावा रे । चेतविताची चेततो ।”, “धीर्धरा धीर्धरा तकवा । हडबडूं गडबडू नका ।”, “सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।”, “मराठा तितुका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा ।” श्रीसमर्थाचे हे संदेश समाजात दूर दूर पसरू लागले. ‘जय जय रघुवीर समर्थ’ ही गर्जना समाजात चैतन्य आणू लागली.

अवघ्या महाराष्ट्राचे सुदैव म्हणून श्रीसमर्थ व शिवाजी राजांची भेट झाली. राजांनी श्रीसमर्थांचा अनुग्रह प्राप्त केला. स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा या श्रध्देने व निष्ठेने मावळ्यांचे संघटन करून निजामशहा, आदिलशहा आणि दिल्लीच्या बादशहा यांच्याशी मोठ्या शर्थीने झुंझणाऱ्या राजाला श्रीसमर्थांनी अध्यात्मिक बळ दिले. दैवी आधिष्ठान प्राप्त करून दिले.  “राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच नेदावें ।” या सूत्रानुसार श्रीसमर्थ व शिवाजीराजे यांच्यामध्ये गुप्तपणे सल्लामसलती होत आणि त्यातून अचुक मार्गदर्शन होई. श्रीसमर्थांचे सर्वदूर फिरणारे शिष्य म्हणजे जणू गुप्तहेरांचे नेटवर्कच होतं ! याचं उत्तम उदाहरण अफजलखानच्या स्वारीचे वेळचं. श्रीसमर्थांचे पत्र राजांना रवाना झाले. वरवर पहाता काव्यातून अध्यात्मिक उपदेश, पण त्या काव्याची आद्याक्षर होती – “विजापूरचा सरदार निघाला आहे.”  केवळ आद्याक्षर एवढ्या सांकेतिक शब्दाने राजांना अचूकपणे माहिती मि‌ळाली. राजांनी भेटीसाठी कोणती खबरदारी घ्यावी, हेही असेच चातुर्याने सांगित‌ले गेले. “नाना वस्त्रे नाना भूषणें । येणें शरीर शृंघारणें”, “अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे ।” (बीज म्हणजे चिलखत.) राजे, आपण चिलखत घालून भेटीस जावे. अफजलखानाचा स्वभाव विशेष असाच सांगितला. श्रीसमर्थाच्या शब्दांच्या सामर्थ्याचा हा निखळ पुरावाच !

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्रीसमर्थकृत सुंदरकांड – पूर्वार्ध

महाराष्ट्राच्या संतभूमीत अवतार धारण केलेला एक अमूल्य हिरा म्हणजे समर्थ रामदासस्वामी होय. त्यांनी टाकळी येथील पुरश्चरण काळात वाल्मिकी रामायणाची हस्तलिखीत प्रत तयार केली. त्याबरोबर स्वतंत्र प्रतिभेने सुंदरकांड व युद्धकांड लिहिले.

वाल्मिकी रामायणातील सुंदरकांड कामधेनूच्या दुधाप्रमाणे मधुर आहे. तुलसीदासांनी त्यात साखर घातली. तर समर्थांच्या सुंदरकांडाने केशराचे काम केले. त्रिकुटाचलावरील तीन शिखरांपैकी सुंदर शिखरावर अशोकवाटिका आहे. येथेच हे चरित्र घडले म्हणून सुंदरकांड असे नाव पडले.

“सुंदरे सुंदरी सीता । सुंदरे सुंदर कपि ।”

सुंदरकांडात सारेच सुंदर आहे. सीता शुद्धि (शोध) ही हनुमंताची खास कामगिरी यात वर्णिली आहे. मारूतीचे वाक्चातुर्य, नम्रता, कर्तव्यनिष्ठा, तल्लख बुद्धिमत्ता, वेदशास्त्र पारंगतता, दास्यभक्ति या कशालाच तोड नाही. अशा या हनुमंताच्या पराक्रमाचे वर्णन करणारे हे सुंदरकांड वैशिष्ट्यपूर्ण आहे. श्रीसमर्थांच्या या सुंदरकांडात हनुमंताच्या लीलांचे वर्णन आहे. श्रीरामप्रभूंची लीला तर श्रेष्ठ आहेच पण त्यांच्या या दासाची लीलाही सुरस आहे, म्हणून या काव्याला सुंदरकांड नाव दिले आहे. आपल्या भक्ताचा, दासाचा अचाट पराक्रम श्रीरामाला सुंदर वाटतो, प्रसन्नता प्रदान करतो. ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ अशा या रामदूताची थोरवी एक रामदास वर्णन करतो आहे ही कल्पनाच अति हृदयंगम आहे.

सुंदरकांडाच्या १०१ ओव्या आहेत. प्रथम ओवीत मंगलाचरण आहे – ‘नमू सर्व कर्ताचि तो विश्वभर्ता‌’ संपूर्ण विश्वाचे भरणपोषण करणाऱ्या परमेश्वराला नमन केले आहे. सीता शोधासाठी श्रीराम किष्किंधा नगराजवळ आले. ऋष्यमुक पर्वतावर सुग्रीवाने हनुमंताला हे दोन वीर कोण आहेत ? ते बघून ये असे सांगितले. बटूवेषात हनुमंत श्रीरामासमोर येऊन अत्यंत नम्रतेने आपण कोण ? कोठून आलात ? अशी विचारणा करतो. सुग्रीवाचा मी सचिव अशी ओळख देऊन सगळी कथा सांगतो. श्रीराम हनुमंताला ओळखून तो विद्वान आहे असे लक्ष्मणाला सांगतात. हनुमंत रूद्राचा अवतार व श्रीसमर्थ हनुमंताचा अवतार. दोघेही रामाचे दास. हनुमंताचे सगळेच गुण अलौकिक होते. सुंदरकांडात श्रीसमर्थ हनुमंताला महावीर, महारूद्र अशी संबोधने वापरतात. प्रभूराम व सुग्रीव मैत्री, वालीवध हे सगळे आपण जाणतोच. रामकार्य म्हणून सीताशोधासाठी कपिवीर चारी दिशांना निघाले. हनुमंतासह नल, नील, जांबुवंत, अंगद दक्षिण दिशेकडे निघाले. 

“सीता शुद्धि आणावया सिद्ध झाले ।”

समर्थभक्त चिंचोळकर म्हणाले होते सीताशोध न म्हणता सीताशुद्धि असे का म्हटले असेल ? तर खरी सीता ही आदिशक्ति, परमेश्वरी, शक्तीचे प्रतिक; ती नित्य शुद्धच आहे, चिरंतन आहे. तिचा शोध काय घेणार ? रावणाने पळविलेली सीता मायावी होती. दुसरे असे की, परमभक्त हनुमंत इतका मायातीत आहे की; तो मायेला कसा वश होणार ? सीता श्रीरामाच्या अंतःकरणात वास करते, तिला वेगळे कसे शोधणार ? मायारूपी सीतेला रावणाने पळविले होते. मुख्य सीता अग्निच्या स्वाधीन केली होती. म्हणूनच अग्निदिव्यानंतर अग्निदेवतेने सीता परत केली. राजा सुग्रीव व प्रभुरामाच्या आज्ञेने हनुमंत, सोबतच्या कपिवीरांसह निघाला. दक्षिण दिशेला सीतेचा शोध सुरू झाला. नाना देश, कडे, पठारे, डोंगर, दऱ्या सगळीकडे शोध सुरू होता.

“पुरे पट्टणे अट्टणे धुंडिताती ।

कपिवीर दाही दिशा हिंडताती ।।”

शोधासाठी महिनाभराचा वेळ मिळाला होता. वने, भुवने, कपाटे, विवरे सगळीकडे शोधून कपि दमले; थकून गेले. दीनवाणे होऊन समुद्र किनाऱ्यावर येऊन बसले. सीतेचा शोध लागला नाही तर परत कसे जाणार ? त्यापेक्षा मरण पत्करणे बरे, असे सगळे एकमेकांशी बोलत आहेत तोच जांबुवंताने हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली. एकाच उड्डाणात तू समुद्र उल्लंघून, पुन्हा परत येशील तेव्हा लवकर जा. हे बोलणे ऐकून हनुमंताला स्फुरण चढले. त्याची शक्ती जागृत झाली.म्हणे मारोती वीर हो स्थिर बैसा ।

तिन्ही लोक पाहून येतो तमासा ।।

हनुमंताचे बाहू स्फुरण पावले. तो थोडा मागे सरकला व त्याने उंच उड्डाण केले. समुद्रपार करताना या दासाला मैनाक पर्वताने अडविले, सुरसा राक्षसीने खाण्यासाठी तोंड वासले. या सगळ्या अडचणींवर मात करून हनुमंत समुद्र पार करून गेलाच. स्वामी कार्य करताना कितीही संकटे आली तरी दास आमिषांनाही बळी पडत नाही. सगळ्या अडचणी पायदळी तुडवून दास आपले स्वामी कार्य पूर्ण करतोच.

“भयासूर तो भीम सिंधू उडाला ।

त्रिकूटाचळाहुनि पैलाड गेला ।”

सुंदरकांडात समर्थांनी सुंदर वर्णन केले आहे. 

“अकल्पित लंकापुरी कांचनाची ।

पुढे देखिली सौख्यदाती मनाची ।।”

आखीव, रेखीव अशा सुंदर लंकानगरीचे वर्णन केले आहे. गोपुरे, देऊळे, मोठमोठे महाल, भव्य राजवाडे, बघून हनुमंत आश्चर्यचकित झाला. अत्यंत सूक्ष्मरूप घेऊन त्याने लंकापुरीत प्रवेश केला.

“गुहे गोपुरे  पाहिल्या धर्मशाळा ।

अकस्मात त्या देखिल्या बंदीशाळा ।।

हिणासारखे देव ते दीन जाले ।

नसे शक्ति ना युक्ति पोटी गळाले ।।”


‘बहु सज्ज ते राज्य लंकापुरीचे‌’ बघून हनुमंत क्षणभर थबकला. आपले कार्य कसे करावे यासाठी मनात विचार केला. योजना तयार केली. त्यासाठी सूक्ष्मरूपाने सगळी लंका पालथी घातली व पुढील कार्यासाठी सिद्ध झाला. हनुमंताने लंकेचे बारकाईने निरीक्षण केले. बंदीशाळेत असलेले देव बघून हनुमंत व्यथित झाला. रावणाने शनिदेवाला पायातळी घातले तर ‘गणेश गाढवे वळी‌’ असे वर्णन नाथांनी केले. ‘सुराकारणे कोप भीमासि आला‌’ त्याला दुःख झाले, रागही आला. तो म्हणाला हे राक्षस ‘बहु बळाने मातले’ त्याने ठरविले- ‘तया झोडितो दास मी राघवाचा’  वाल्मिकींच्या मताप्रमाणे रामाने सीता सोडविण्याच्या उद्देशाने लंकेवर स्वारी केली. पण समर्थ म्हणतात, देवांना बंदीवासातून मुक्तता देणे हा खरा उद्देश होता. हीनदीन अशी देवांची अवस्था पाहून हनुमंताने रावणाला धडा शिकवावा असे ठरविले. देवांना बंधनातून मुक्त करावे ह्या उद्देशाने श्रीरामाने लंकेपार स्वारी केली. पुढे अचाट पराक्रम केला, तो पुढच्या भागात उत्तरार्धात पाहूया. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सोलीव सुख

  1. दासबोधातील ५० ओव्यांचे हे प्रकरण म्हणजे सोलीव सुख आहे. एखादे फळ सोलल्यानंतर त्याचा गर जसा मधुर, अवीट चवीचा लागतो; परमानंद देतो तसे या सोलीव सुखातून मोक्षप्राप्तीचा आनंद मिळतो. यामध्ये नाद, ज्योती, तीव्र व सौम्य प्रकाश याचे समर्पक वर्णन आले असून त्याद्वारे आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. साधकाचे विविध ताप दूर होऊन त्यास शाश्वत सुख मिळते. तो जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. ग्रंथराज दासबोधात देखील श्रीसमर्थांनी योगविषयक संकेत व्यक्त केले आहेत. सोलीवसुखामध्ये शक्ती संक्रमण योगदिक्षेचा संपूर्ण विधी आहे. श्रीसमर्थांनी योगीराज कल्याणांकरिता हा विधी सिद्ध केला आहे. 

कल्याणांनी अनन्यतेने श्रीसमर्थांना प्रार्थना केली आहे. “महाराज या भवसमुद्रामुळे पोळलेले, विषय मदाने अंध झालेले, चौऱ्यांशी लक्ष योनीत फिरून फिरून कंटाळलेले अशांना आपण मूर्तिमंत ज्ञानसूर्य, आम्हांला ज्ञान द्या.” श्रीसमर्थाना त्यांची दया आली, त्यांनी प्रेमाने शिष्याला आलिंगन दिले, कानात दिव्य रसायन म्हणजे ओंकाराचे शब्द फुंकले. ते डोळ्यावाटे म्हणजे अंतःचक्षूने त्याच्या शरीरात उतरले. शिष्याचा आत्मज्ञानाचा-शक्ती संक्रमणाचा प्रवास सुरु झाला. त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ या चक्रांचा निरास झाला. इडा, पिंगला, सुषुम्ना आत्मसुखात विरून गेल्या. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण चारही देह विरून गेले. इंद्रियांनी आपले विषय भोगण्याची वृत्ती सोडून दिली.

शिष्याला घंटानाद, किंकीणीनाद, अनाहत नाद इ. नादांचा कल्लोळ ऐकू येतो. इथे श्रीसमर्थ कल्याणांना इशारा देतात की नाद, ध्वनी, प्रकाश दिसले तरी घाबरु नको, पुढे जा. तुझी समाधी ढळू देऊ नको. अशा प्रकारे षटचक्र भेदन, पंचमहाभूतांचे अस्तित्व, प्रकाश, नाद यांचा लय झाला की, शिष्याला ब्रह्मरंध्रातून सतत प्रकाशकिरणे कारंज्याप्रमाणे उसळून त्याची प्रभा जमिनीवर पडल्याचा अनुभव येतो. सद्गुरू प्रसादाने शिष्याला सर्वत्र ब्रह्म भरल्याची अनुभूती येते. ही अनुभूती श्रीसमर्थांनी कल्याणांना दिलेली आहे.

सद्गुरूकृपेने शिष्याची पूर्ण तयारी झाल्यानंतर घडणारे शक्तीसंक्रमण, योगातील षटचक्रांचा विचार केला असता असे लक्षात येते की; कंठ ते भ्रुकुटी मध्य या मार्गाला पूर्व म्हणजे पुढचा मार्ग म्हणतात. सद्गुरुकृपा झाली की, हे सहज साध्य होते. या मार्गामध्ये १) त्रिकुट (मुख) २) श्रीहाट (रसना) ३) गोल्हाट (चक्षू) ४) औटपीठ (भ्रूमध्य) ५) भ्रमरगुंफा (श्रोत्र) ६) ब्रह्मरंध्र ( सहस्त्रदल) ही षटचक्रे आहेत. त्यांच्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होते. हे जर साध्य झाले नाही, तर योगी हा मार्ग बदलून मागच्या मार्गाने जातो. या मागच्या मार्गाला पश्चिम मार्ग म्हणतात. तो थेट आज्ञाचक्रावर पोहोचतो. या मार्गातील षटचक्रे – मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार ही होत. 

परब्रह्माची सृजनशक्ती म्हणजे माया. या मायेत  सुप्तरूपात सत्त्व, रज, तम हे तीन गुण असतात. हे तीन गुण जेव्हा व्यक्त दशेत येतात तेव्हा त्या मायेला गुणक्षोभिनी असे म्हणतात. मनुष्याच्या पाठीच्या कण्यात इडा – पिंगला – सुषुम्ना या तीन नाड्या असतात. वास्तविक सुषुम्ना ही मार्गिका आहे. सूक्ष्म वाट आहे. हठयोगात प्राणशक्ती या मार्गाने वर जाते. आपल्या शरीरात ७२ हजार नाड्यांचे जाळे आहे. कुंडलिनी शक्ती ज्या विशिष्ठ मार्गाने नाभिकमलापासून वर सहस्त्रार चक्रापर्यंत जाते ती सुषुम्ना नाडी होय. कुंडलिनी शक्ती जागी झाली की त्रिकुट प्रदेशातील मुलाधार चक्र, श्रीहाट मधील बुद्धी/प्रज्ञा प्रदेश आणि स्वाधिष्ठान चक्राच्या अधोभागातील मार्ग भेदून उर्ध्वगामी होते. तिथून ती अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र यांचाही भेद करून सहस्त्रार चक्रातील ब्रह्मात विलीन होते. म्हणून श्रीसमर्थ इथे त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ हे सगळे बुडाले. इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांचे तटसुद्धा आत्मसुखात विरले असे म्हणतात.

श्रीसमर्थानी सोलीव सुखाच्या ३३ व्या ओवीत त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ या चक्रांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. त्रिकुट म्हणजे सत्व, रज, तम या तीन गुणांच्या पलिकडे जाऊन, त्रिविध तापांच्या म्हणजे आधिभौतिक, आधिदैवीक, अध्यात्मिक तापांच्या पलिकडे जाऊन, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलिकडे जाऊन शिष्य पुढे जातो.

श्रीहाट – श्री म्हणजे वैभव, लक्ष्मी, पवित्रता आणि हाट म्हणजे बाजार किंवा बाजाराची जागा. श्रीहाट म्हणजे योग्याच्या देहातील, बाजारातील माल किंवा देहाची पवित्र जागा. 

गोल्हाट – यातील गो म्हणजे इंद्रिये. छातीच्या आतील पोकळीत जो प्राण आहे त्यातील ज्ञानवृत्तीला या दिव्यचक्षू इंद्रियावाचून स्वतःच्या स्वरुपाचा यथार्थ बोध होत नाही. त्या प्राणवायू रहाण्याच्या ठिकाणाला गोल्हाट म्हणतात. 

औटपीठ – एक घटका म्हणजे २४ मिनीटे औट घटका म्हणजे साडेतीन घटका म्हणजे ८४ मिनीटे. औटपीठ म्हणजे साडेतीन हातांचा नाशिवंत देह. स्वस्वरूपाच्या दर्शनासाठी देहबुद्धीचा त्याग करून देहभाव मागे टाकला की कुंडलिनी शक्ती वर जाते.

सोलीवसुखामध्ये योगमार्गात येणाऱ्या ध्वनींचा उल्लेख आहे. किंकीणी, चिंचिणी, घंटानाद, वीणारव, भ्रमराचा गुंजारव अशा विविध मंजुळ ध्वनींचा आवाज येतो. अनाहत नादाचाही उल्लेख आहे. अनाहत नाद म्हणजे जो कोणत्याही आघाताने निर्माण झालेला नाही असा स्वयंभू नाद. हे नाद अनाहत चक्रात ऐकू येतात. हृदयाच्या मागे याचे स्थान आहे. याचा ताबा फुप्फुस व हृदयावर असतो. या चक्राच्या ठिकाणी मनाचे वास्तव्य मानले जाते. प्राण आणि मन यांचे इथे ऐक्य होते. कुंडलिनी इथपर्यंत आली की मग कानात विविध मंजुळ ध्वनी ऐकू येतात. 

योगमार्गात येणाऱ्या प्रकाशतत्त्वाच्या अभिव्यक्तीचे वर्णनही श्रीसमर्थांनी केले आहे. या प्रवासात नाना सूर्यांची तेजोरूपे, त्यातून निघणाऱ्या तेजाच्या; अग्नीच्या ज्वाळा पाहून शिष्य घाबरून जाईल म्हणून या गोष्टींना न घाबरता पुढे कसे जायचे याचे मार्गदर्शन श्रीसमर्थांनी अगोदरच केले. शीतली प्राणायामाचे द्वारे, मुखाद्वारे बाहेरील वायू आत मुखामधून सहस्त्रधारात वर न्यायला सांगितला, त्यामुळे प्रखर उग्र तेज आपोआप सौम्य झाले. या प्रक्रियेत शिष्याचे धैर्य, चिकाटी, सावधानता, सूक्ष्मता, गुरुवचनी दृढ श्रध्दा हे गुण प्रगट झाले. पुढे सातत्याने देहातील, मुख्यतः सहस्त्रधारातील तेजोलहरी उर्ध्वगतीने पण संथपणे वाहू लागल्या. त्या शिष्याला नियंत्रित करता आल्या. हालचाली इच्छेप्रमाणे घडू लागल्या. यांचे लक्ष्य आत्मा असल्याने त्याचे दर्शन होणार या आत्मविश्वासाने, विहंगम मार्गाने वाटचाल सुरू झाली. ती होताच देहातील उष्णता, दाह कमी झाला. शरीर सुखद वाटू लागले‌ व चिदाकाशात प्रत्यक्ष चंद्रदर्शन घडले. हेच ते आत्मदर्शन. यात देह व भोवतालची भूमी चंद्रप्रकाशात  न्हाहून निघाली. त्या प्रकाशाने सर्वकाही व्यापून टाकले. हेच ते ब्रह्मरूप त्याला प्राप्त झाले. आत्मसुखाने अभिनव शांती लाभली. शिष्याने शक्ती संक्रमण योगाने आत्मसुख मिळवले. त्याने या प्रवासात असे अनुभवले की, नाभी कमलापासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा किंवा मुलाधारापासून सहस्त्रार चक्रापर्यंतचा सर्व मार्गच आत्मप्रकाशाने व्यापला आहे.

मानवी देहामध्ये आत्मीय चैतन्याचा स्रोत गुप्तरूपाने असतो. तो ॐ कार अर्धमात्रेच्या दिव्य अभिव्यक्तीने प्रगट होतो. त्याने शरीर नखशिखांत व्यापले जाते. त्यामुळे ज्ञानशक्ती जागृत होते. श्रीसमर्थ कृपेने साधकाला समाधी अवस्थेचा लाभ होतो, आणि साधक सातत्याने आपल्या शांत सच्चिदानंद स्वरूपात निमग्न होतो. त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका होते. हेच ‘सोलीव सुखाचे’ सार आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

दासनवमी आणि दासबोध सखोल अभ्यास परिवार

राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांनी माघ वद्य नवमी या तिथीला सज्जनगडावर देह ठेवला. महाबळेश्वर मठाचे अनंतकवी लिहून ठेवतात, 

सोळाशेवरी तीन दुर्मती पहा संवत्सरा अंतरी |

माध्यान्ही शुभ माघ वद्य नवमी त्या मंद वारांतरी|

रामी आत्मनिवेदनी करी वपु सत्कीर्तीची हे ध्वजा |

स्वानंदे सुसमाधी सज्जनगडी श्री रामदासा भजा ||

त्यालाच आपण दासनवमी असे म्हणतो. संतांचे निजधामी जाणे म्हणजे पुण्य पर्वाचा सोहळा असे संप्रदायातील साधकांनी मानले पाहिजे. त्याचे कारण म्हणजे असे अवतारी पुरुष विशेष कार्यासाठी पृथ्वीतलावर जन्माला येतात. समर्थ प्रताप या ग्रंथांमध्ये गिरीधर स्वामी असे वर्णन करतात 

समर्थांशी शिष्य पुसती निर्धारे|

संत साधु ब्रह्मरूप केवी अवतारे |

अरे अवतार धरीजे सर्वेश्वरे|

माया पूर्वपक्ष निरासावया ||

यावरून आपल्याला संताच्या जन्माचे रहस्य समजेल. समर्थ हृदय नानासाहेब देव यांनी तीन शब्दांमध्ये समर्थांचे बृहत चरित्र समास रूपाने वर्णन केले आहे,  ते म्हणजे  तप, व्याप आणि त्याग”. पू. अक्कास्वामी वेलणकर यांनी ४० वर्षांपूर्वी बिजारोपण केलेला दासबोध सखोल अभ्यास परिवार याच तीन शब्दांभोवती आणि रामदास स्वामींनी निर्याणाच्या वेळी केलेल्या  उपदेशाप्रमाणे कार्यरत आहे. ग्रंथराज दासबोध , समर्थ रामदास स्वामींचे चरित्र , मनाचे श्लोक आणि गीता या चतु:सूत्रीवर  मार्गक्रमण करीत साधनेतील उत्कटता अंगी बाणवण्याचा प्रयत्न दासबोध सखोल अभ्यास करतो आहे. करारी शिस्तीचे पालन, समर्थ वाङ्मयाचा अभ्यास आणि दातृत्व संपन्नतेचा अलौकिक सेवाभाव साधकांच्या ठाई व्यवच्छेदक लक्षण म्हणून प्रसिद्ध झाला आहे. समर्थ आज्ञा झाली बरवी | श्रीराम कथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी ||”  या आदेशाप्रमाणे अयोध्या मठात परिवारातर्फे दासबोध पारायण करण्यात आले. श्रीरामाचे सगुण लीला संकीर्तन करण्यासाठी श्रीरामकथेचे आयोजन साधक करीत आहेत. 

धन्य तू गा  रघोत्तमा |कोण ते द्यावी उपमा |

सुखाचिया सुखधामा | मी काय जाणे महिमा ||

सोडविले ब्रह्मादिक | तू रे त्रैलोक्य नायक |

दास म्हणे तुझे रंक | सांभाळी आपले लोक ||

समर्थांनी “आधी केले, मग सांगितले” या  उक्ती प्रमाणे आपले जीवन दीपस्तंभा प्रमाणे समाजासमोर ठेवले.  दासबोधामध्ये ते सांगतात,

धन्य धन्य हा नरदेहो| याची अपूर्वता पाहो |

जो जो की जे परमार्थ लाहो| तो तो पावे सिद्धीते ||

तर श्री समर्थ प्रतापकार लिहितात, 

समर्थे श्रीराम काजी दिव्य देह समर्पिले |

श्री रामदास्य श्री गुरुरूपे केले |

आधी केले मग सांगितले | दासबोध  ग्रंथार्थे ||

याच मार्गावरून दासबोध सखोल अभ्यास परिवार ब्रह्मांडाचे फळ असे मिळालेला दुर्लभ नरदेह त्याला हरी भजनी लावून समाजाचे संघटन आणि ज्ञानाचा प्रसार, प्रचार करतो आहे. संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे ” नरदेहाचेनी साधने|सच्चिदानंद पदवी घेणे | ऐसा अधिकार “नारायणे”| कृपावलोकने दिला असे ||”  याची प्रचिती परिवारातील सदस्य घेत असतात. सोळाशे तीनच्या चैत्र वद्यात श्री कल्याण स्वामींनी वीस दशकी दासबोध पुरा करून समर्थांना दाखवण्यासाठी आणला. रामदास स्वामींनी हा ग्रंथ पाहून १२_१० मध्ये एक ओवी समाविष्ट केली,

आमची प्रतिज्ञा ऐसी | काही न मागावे शिष्यासी |

आपणामागे जगदीशासी | भजत जावे ||

ही श्रीसमर्थांची शेवटची आज्ञा दासबोध सखोल अभ्यास परिवार उरी शिरी बाळगतो आहे.

फ्रेंच विचारवंत रुसोने १८ व्या शतकात सामाजिक करारातून राज्य निर्मिती व्हावी हा विचार मांडला. समर्थ रामदास स्वामींनी सोळाव्या शतकात सामूहिक सत्संकल्प हेच राज्याचे अधिष्ठान आहे आणि लोककल्याण हे त्याचे मुख्य कार्य आहे ही संकल्पना हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरली. समर्थांनी हा विषय आपल्या विशेष शैलीमध्ये तपशीलाने मांडलाच पण समाज संघटनेचा स्वतंत्र उद्योगही केला. 

श्री रविकिरण साने यांनी आपल्या “आधुनिक राष्ट्रवादाचे उद्गाते समर्थ रामदास या ग्रंथांमध्ये हा विषय साकल्याने मांडला आहे. ते म्हणतात, महाभारतानंतर एवढ्या आग्रहपूर्वक बुद्धीयोग, अभ्यास योग फक्त समर्थांनीच पुरस्कारला आहे. म्हणून ते या दोन्ही योगाचे श्रेष्ठ प्रणेते ठरतात. क्षमतेनुसार काम हा व्यावसायिक बाणा समर्थांनी संघटनेत उत्पन्न केला. 

आज दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या परिवारात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्त्री, पुरुष साधक समर्थांना अभिप्रेत असलेल्या महंताप्रमाणे ब्लॉग लिहिणे, ग्रंथलेखन,  समर्थांच्या पद्यांना संगीताची जोड देणे, व्याख्याने, प्रवचने, संकेतस्थळ आणि त्यावरील शब्द शोध सारखी अद्भुत कार्ये अशा अनेक आयमांवर कार्यरत आहेत ही समर्थ कृपाच होय. या व्यापामुळे समर्थ  वांग्मय विश्वातल्या पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये  पोचले आहे. समर्थांनी घालून दिलेला ” सामाजिक विषमतेला नकार पण विविधतेचा साधन म्हणून उपयोग ” या आदर्श पंथाचा वापर आज हा परिवार करीत आहे.

भारतीय ग्राहक चळवळीची मुळाक्षरे देशाला देणारे ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी एका ग्रंथात म्हणतात, ” रामदासांचा विचार दैववादी नाही. प्रयत्न,  अफाट प्रयत्न आणि त्यासाठी चळवळ , मात्र त्या चळवळीला धर्माचे अधिष्ठान आणि पारदर्शक व्यवहाराचे आचरण तसेच ’ मी नाही रामकर्ता ’ ही साधकाची भूमिका दासबोध सखोल अभ्यास परिवारात जागोजागी दिसून येते. एक्केहळी मठाचे, श्रीरामदास पंथ क्रमसार या ग्रंथाचे कर्ते श्री आत्माराम महाराज यांच्या वचनाप्रमाणे 

“समाधी पादुका की प्रसादाते | प्रत्यक्ष गुरु चि मानिजे  त्याते ||

समर्थ संप्रदायातील इतिहासात पहिल्यांदा दासबोध सखोल अभ्यास परिवारातर्फे समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यपर्वकाळात एक अद्भुत आणि अलौकिक प्रसंग घडला. श्री रामदास स्वामी स्थापित महाबळेश्वर मठातील समर्थांच्या चरण पादुका, कुबडी आणि तुंबा या सद्गुरु रूपात असलेल्या दुर्मिळ वस्तू सध्याचे मठपती आदरणीय श्री दिवाकर देशपांडे गोसावी यांनी पुण्यातील किवळे येथे आणल्या. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी पहाटे काकड आरती, मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी, भजन, प्रवचन, ग्रंथ प्रकाशन, कीर्तन आणि शेजारती असा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला.
500 पेक्षा जास्त धर्मप्रेमी भक्तांनी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले. महाबळेश्वर मठासाठी एक लाख ऐंशी हजार एवढा निधी जमा झाला. अत्यंत देखणा आणि भव्य दिव्य असा हा सोहळा दासबोध सखोल अभ्यास परिवारासाठी परिवाराच्या कारकिर्दीत एक मानाचा तुरा म्हणून शोभून दिसेल .

श्री समर्थ रामदास स्वामींच्या सेवेच्या एक अनोखा प्रसंग यानिमित्ताने समाजाच्या पुढे उभा राहिला .

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थ भक्तांची चार तीर्थक्षेत्रे

श्रीसमर्थ भक्तांची चार तीर्थक्षेत्रे, पहिले ‘जांब’ ही श्रीसमर्थांची जन्मभूमी, दुसरी ‘टाकळी’ ही तपोभूमी, तिसरी ‘चाफळ’ ही कर्मभूमी, आणि चौथी ‘सज्जनगड’ हे विश्रांती स्थान !! आज आपण त्या स्थानांची विशेषता बघणार आहोत. 

सूर्याजीपंत व राणूबाई यांना, त्यांची निस्सीम भक्ती आणि तपश्चर्या पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवांनी ब्राह्मणाच्या वेषात दर्शन दिले. सूर्याच्या अंशाने एक आणि मारुतीच्या अंशाने एक असे दोन पुत्र होतील असे आशीर्वाद सूर्यदेवांनी दिले. त्यापैकी सूर्यदेवांच्या अंशाने गंगाधरपंत यांचा जन्म इ.स.१६०५ साली मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला सूर्योदयाच्या वेळेस झाला आणि मारुतीच्या अंशाने इ.स.१६०८ साली रामनवमीच्याच दिवशी दुपारी रामजन्माच्यावेळी नारायणाचा जन्म झाला.

क्षेत्र जांब – ही श्रीसमर्थ रामदासांची जन्मभूमी आहे. अर्थात संतांचा जन्म कुठे झाला याला महत्व नसते. त्याचे कार्य सिद्ध झाल्यावर ते जिथे देह ठेवतात ते तीर्थक्षेत्र बनते. पण जांब या समर्थ जन्मस्थानाला महत्व आले ते समर्थांना तिथे  मिळालेल्या अनुग्रहामुळे! श्रीसमर्थांना वयाच्या अकराव्या वर्षी प्रत्यक्ष श्रीरामरायाने अनुग्रह देऊन त्रयोदशाक्षरी मंत्र दिला आणि त्याचबरोबर, पृथ्वी म्लेच्छमय झाली असून धर्माचा उच्छेद झाला आहे. ह्यासाठी शिशोदे वंशामध्ये शिव नामे करून राजा होईल त्याला अनुग्रह देऊन, कृष्णातीरी राहून धर्मसंस्थापना करावी असा आदेश ही दिला. म्हणून हे क्षेत्र झाले. या अनुग्रहाला विशेष महत्व आहे. श्रीरामाने अनुग्रहाच्यावेळी नारायणाला रामदास हे नाव दिले. नारायणाच्या बाललीला शिक्षण जांब येथे चालू होते. त्यांच्या बाललीलांमधून ते हनुमंताचे अवतार अकरावा रुद्र आहेत हे वारंवार जाणवत असे. नारायणाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, हळूहळू घरात नारायणाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. लग्नाचा मुहूर्त ठरला. परंतु मुहूर्त वेळी सावधान म्हणताच ‘सावध’ झालेल्या नारायणांनी जांब सोडून टाकळीला प्रयाण केले. 

टाकळी – ‘देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी’ हे लक्षात घेऊन नारायणानी टाकळीला बारा वर्ष तपश्चर्या केली. म्हणूनच तपोभूमी ‘टाकळी’ हे तीर्थक्षेत्र मानले जाते. चिंता करितो विश्वाची असे उत्तर आईला देणाऱ्या नारायणांनी स्वत:चा लौकिक प्रपंच दूर सारून विश्वाचा प्रपंच करायचे ठरविले. गोदावरीच्या पाण्यात लग्नाच्या वेळेला लावलेली हळद धुवून टाकली. ईश्वरप्राप्ती, स्वराज्यसंस्थापना आणि लोकोद्धार या उद्देशासाठी त्यांनी नारायण हे नाव बदलून श्रीरामाने दिलेले रामदास हे नाव धारण केले. श्रीरामाचे दर्शन घेण्याची तीव्र ओढ त्यांच्या मनात होती. रात्री देवळात माणसांची वर्दळ कमी होते हे लक्षात घेऊन ते रात्री काळाराम मंदिरात गेले. सर्व सभामंडप तेजानी भरून गेला. श्रीरामाने त्यांना दर्शन दिले. 

रामदासांनी टाकळी हे गोदावरी व नंदिनीच्या संगमावरील ठिकाण आपल्या तपश्चर्येसाठी निवडले. जवळच एक गुहा होती. तिथे ते रहात होते. सकाळी उठून नंदिनी नदीवर स्नान करून, संध्या आटोपून ते बाराशे सूर्य नमस्कार घालत. काळाराम मंदिरात प्रवचन कीर्तनाला जात. त्यावेळी त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्याचा उल्लेख दासबोध ग्रंथात आहे. त्यांनी रामायणासह अनेक ग्रंथ लिहून काढले. व्यायाम जपध्यान, ग्रंथांचा अभ्यास असा त्यांचा दिनक्रम चालू होता. कारण श्रीसमर्थ रामदास हनुमंता प्रमाणेच शक्तीबुद्धीचा निश्चयो होते. हळू हळू त्यांच्या अन्नवस्त्राची आबाळ होऊ लागली. घराची आठवण त्रास देऊ लागली. त्यावेळचे त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या करुणाष्टकामधून पहायला मिळते. पण त्याचवेळी श्रीरामाशिवाय आपल्याला दुसरे कोणी नाही ही भावना दृढ होत होती. त्यांचा हा बद्ध, मुमुक्षू साधक आणि सिद्ध हा प्रवास आपल्याला त्यांच्या करुणाष्टकातून उलगडतो. त्यांनी गायत्रीचे पुरश्चरण केले. श्रीसमर्थांना त्यांचा पहिला शिष्य उद्धव हा टाकळीला लाभला. पुढे तीर्थाटनाला बाहेर पडतांना उद्धव त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह करू लागला. त्यावेळी उद्धवाला गोमयाचा मारुती स्थापन करून देऊन तिथेच राहण्याची आज्ञा दिली. हा श्रीसमर्थांचा पहिला शिष्य व पहिला मठ होय. उद्धवाची मुंज श्रीसमर्थांच्या मांडीवर लागली. 

बारा वर्ष श्रीसमर्थांनी आसेतु हिमाचल पदभ्रमण केले. पदभ्रमणामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण केले. अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली. यवन राजकर्त्यांचे असभ्य, असंस्कृत वागणे, लोकांवर केलेले अत्याचार पाहिले. पराक्रमी राजपूत तसेच मुगल सुलतानाला स्त्रिया देणारे राजपूत पाहिले. जवळ दोन तलवारी बाळगणारे शिखांचे सहावे गुरु हरगोविन्द्सिंह यांची भेट झाली. त्यांच्याकडून जेंव्हा एक तलवार धर्मासाठी आणि दुसरी तलवार स्त्रियांच्या रक्षणासाठी हे समजल्यावर धर्म रक्षणासाठी आपणही शस्त्र वापरले पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी गुप्तीचा वापर सुरु केला. स्वधर्माविषयी अभिमान जरूर असावा. तसेच परधर्माचा आदर करावा.  दुसऱ्याच्या धर्मातील चांगल्या गोष्टी घेण्यास काहीच हरकत नसते. याच काळात त्यांनी आपला संप्रदाय वाढवला. अकाराशे मठांची स्थापना काश्मीर (पहेलगाम) ते कन्याकुमारीपर्यंत केली. अनेक मठ व महंत तयार केले. तसेच शिष्य करताना वयाने लहान पण लिहिता वाचता येणारे अशांना प्राधान्य दिले. त्यांचे अनेक शिष्य होते. स्त्रीशिष्यांना मठाधिपती करून स्त्रीपुरुष समानहक्क ही खरी पात्रता गुणांवर अवलंबून असते. हे दाखवून दिले. 

तिसरे स्थान चाफळ ही कर्मभूमी आहे. स्वराज्य संस्थापनेचा श्रीरामाने दिलेला आदेश सार्थ करण्यासाठी कृष्णेच्या तीरावर श्रीसमर्थांनी वस्ती केली. पहिल्याच भेटीत महाराजांनी श्रीसमर्थांचा अनुग्रह घेतला. श्रीसमर्थांनी शिवाजीराजांना लघुबोध, क्षात्रधर्म सांगितला. सेवकांना सेवकधर्म सांगितला. क्षात्रतेज व ब्राह्मतेज एकत्र आले. शिवरायाची राजवट होती म्हणून श्रीसमर्थ सुखरूप होते. तसेच श्रीसमर्थांचे मजबूत संघटन कौशल्य, गुप्त सल्लामसलती, मार्गदर्शन, मठाचे जाळे, महंतांची नि:स्वार्थी व गुप्तता बाळगून सावधपणे केलेली मदत, या सर्वांचा फायदा शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्य संस्थापनेसाठी झाला. चाफळ येथे अंगापूरच्या डोहात सापडलेल्या श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. श्रीसमर्थ रामदासांनी इ.स.१६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. श्रीसमर्थांच्या मठाचा उपयोग जसा शिवाजी महाराजांना झाला तसेच शिवाजी राजांच्या आश्रयामुळे मठांना स्थैर्य आले. 

चौथे सज्जनगड श्रीसमर्थांचे विश्रांती स्थान. इ.स.१६५० साली श्रीसमर्थ सज्जनगडावर आले होते. पूर्वीचे त्याचे नाव परळीचा किल्ला असे होते. श्रीसमर्थांनी तेथे अंग्लाई देवीचे मंदिर बांधले. श्रीसमर्थ इ.स. १६७६ साली सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले. त्यानंतर गंगाधर स्वामीं, शिष्या वेणाबाई आणि नंतर शिवाजी महाराजांचे निर्वाण अशा दु:खद घटना घडल्या. शेवटी श्रीसमर्थांनी संभाजीराजांना पत्र पाठवून उपदेश केला आणि नंतर समर्थ रामरायाच्या दर्शनाला चाफळ येथे आले. श्रीरामाचा निरोप घेऊन परत सज्जनगडावर आले. निर्वाणाच्या आधी पंधरा दिवस सर्व शिष्यांना बोलावून घेतले. श्लोकाचे दोन चरण म्हटले. रघुकुलटिळकाचा वेध सन्निध आला | तदुपरी भजनाचा पाहिजे चांग केला | उद्धवाने हा श्लोक पूर्ण केला, अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी | बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी || इ.स.१६८२ साली माघ वद्य नवमीला श्रीसमर्थांचे निर्वाण झाले. श्रीसमर्थ रामदासस्वामींचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याजागी समाधी बांधण्यात आली. या चार स्थानांना अवश्य भेट द्यावी. ज्यामुळे आपल्याच इतिहासाची, शिवाजी महाराज व समर्थ यांच्या कर्तृत्वाची आणि वैभवशाली परंपरेची ओळख होईल.

||जय जय रघुवीर समर्थ||

 

परि मी आहे जगज्जीवनी निरंतर

असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले ।

जे स्वरूपाकार जाले । आत्मज्ञानी ।।३-९-५९।।

जन्माच्या वेळी जितक्या सहजपणे जीव देह धारण करतो, तितक्याच सहजपणे तो देहातून बाहेर पडतो; यालाच मृत्यू म्हणतात.  व्यक्तातून अव्यक्तात जाणे व अव्यक्तातून व्यक्तात येणे ही क्रिया अविरत अखंड चालू असते. माणसाला मृत्यूचा काळ माहीत नसतो, मृत्यू नंतर काय होते हे पण माहीत नसते. “लोक मरमरों जाती । वडिलें गेलीं हे प्रचिती” असे समर्थ म्हणतात. मृत्यू ही नेहमी घडणारी घटना पण प्रत्येकाला त्याचे भय वाटते. भारतीय तत्त्वज्ञानात, कठोपनिषदात, छांदोग्य उपनिषदात, प्रश्नोपनिषदात मृत्यूविषयी सखोल चिंतन आहे. भगवद्गीतेच्या ८ व्या अध्यायात, ज्ञानेश्वरीच्या ६ व्या व ८ व्या अध्यायातही हा विचार आहे.  मृत्यू सर्वभक्षक, सर्वनाशक, सर्वंकष आहे. विद्वान संत, पराक्रमी राजे, कलावंत, योगी सर्वांना मृत्यू आहे. म्हणून समर्थ सकळही गेले असे म्हणतात. महाथोर ते मृत्यूपंथेचि गेले या समर्थ वचनात हे रहस्य आहे. 

निसर्गाचा, जीवनाचा समतोल राखण्यासाठी मृत्यू अनिवार्य आहे. उत्पत्ती, स्थिती, विनाश हे चक्र चालूच असते. मृत्यूचा विचार म्हणजे, मर्यादा; दुर्लभ शरीर व दुर्लभ आयुष्य यात प्रत्येक क्षण सत्कर्मात घालविण्याचा विचार. स्वार्थ, हवेपणा, दुष्टपणा, स्पर्धा, वैर भावना, तिरस्कार यालाही मर्यादा येतात. जाते घडी आपुली साधा, काळ मागे लागला, थांबला तो संपला या वचनांप्रमाणे मृत्यूचा विचार सत्कर्माची प्रेरणा देतो. देह थकल्यानंतर, तो कार्य करू शकत नाही, तेव्हा देहाला मृत्यूमुळे चिरविश्रांती मिळते. देहबुद्धी, देहाचा अहंकार नष्ट झाला, ‘आहे तितुके देवाचे’ हा विचार पक्का झाला तर मृत्यूचे भय कमी होते. आपणास आहे मरण । म्हणौन राखावें बरेंपण ।” या समर्थ वचनात दुसर्‍यांना सुखी केल्यानेच आपण सुखी होतो हे सत्य सांगितलेले आहे. 

आत्मज्ञानी संत व योगी, अलौकिक जीवन जगतात व त्यांचे प्रयाणही अलौकीक असते. ज्ञानदेवांनी अल्पायुष्यात ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव व अभंग लिहीले. स्वत:चे कार्य संपल्याच्या जाणिवेत त्यांनी संजीवन समाधीचा निर्णय घेतला. ज्ञानदेवांनी पृथ्वीतत्त्वाला, एकनाथांनी जलतत्त्वाला, मुक्ताईने तेजतत्त्वाला, संत तुकारामांनी आकाशतत्त्वाला, आद्य शंकराचार्यांनी वायूतत्त्वाला देह अर्पण केला.

उत्तम मरण येण्यासाठी जन्मभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास करावा लागतो. कृतकृत्य होऊन भगवंताच्या स्मरणात शांतपणे देह सोडण्यासाठी जी साधना करावयाची त्यालाच परमार्थ म्हणतात. दासबोधात दशक ३ समास ९ मध्ये समर्थ रामदास मृत्यूचा विचार प्रभावीपणे, ओघवत्या भाषेत मांडतात. त्यांचे चिंतन सर्वांनी करणे गरजेचे आहे. भगवंत भक्ताचे स्मरण अखंड करतो. ज्ञानदेव ज्ञानेश्वरी ८-१३१ मध्ये हा विचार मांडतात. भगवंत मृत्यू समयी भक्ताची परीचर्या करतो. त्याला आत्मबोधाच्या पिंजर्‍यात ठेवतो, स्वस्वरूपाची थंडगार सावली त्याच्या वेदनेचा दाह कमी करते. त्याचा प्राणसमुदाय सोsहं साधनेने टवटवीत असतो. मन प्रफुल्लित असते. ब्रह्म स्वरुपात एकरूप होण्यासाठी तो आतुर असतो. स्थूल शरीर, पंचमहाभूते आपापल्या वाटेने नेतात. इंद्रिये परमात्मस्वरूपा पुढे नतमस्तक होतात व अहंकार नष्ट होतो. पूर्ण आयुष्यभराच्या साधनेचे हे फळ असते. भगवंत अनाहत नादाचे अंगाई गीत गातो. देहाला उन्मनीच्या प्रकाशात आत्मदर्शन होते. भक्त, भगवंत व भक्तीचे ऐक्य होते. हा आनंददायक क्षण असतो. सोलीव सुख ओवी ३० मध्ये कल्याणस्वामी म्हणतात,

“ऐसे सुख योगिया लाधले । तेव्हा देहाचे मरण गेले ।

सांगणे ऐकणे मुराले । एकत्वपणे एकचि ।।

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर समर्थ रामदास उदास झाले. १६०३ चैत्र वद्यात ते सज्जनगडावर आले. 

माघ वद्य नवमी । जाणे आहे परंधामी ।

केला निश्‍चय अंतर्यामी । ऐसा असे ।।

असे त्यांच्या मनात होते. या दहा महिन्यात दासबोध ७ दशक व उरलेले १३ दशक जोडून पूर्ण केला. समर्थ उद्धवस्वामींना म्हणाले, रघुकुळटिळकाचा वेध सन्निध आला. उद्धव स्वामी म्हणाले अनुदिन नवमी हे मानसी धरावी. समर्थ, तंजावर येथून घडवून येणाऱ्या पंचधातूच्या श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमंताच्या मूर्तींची वाट पहात होते. त्या गडावर माघ वद्य पंचमीला आल्या. समर्थांनी मूर्ती पाहिल्या, श्रींचे मुखावलोकन केले; प्राणप्रतिष्ठा केली; यथासांग पूजन केले. समर्थांचे सगुण भक्तीचे प्रेम या प्रसंगात दिसते. 

समर्थांनी अभंगातून श्रीरामाशी हितगुज केले. रामा माझे तू इतके दिवस पालन पोषण केलेस. बालपणापासून मी तुझ्या कृपेसाठी वेडा झालो आहे. तू मला आधार दिलास, सनाथ केलेस. आता माझे चित्त तुझ्या भेटीसाठी उतावीळ झाले आहे. प्राण त्यागाच्या वेळेस तू मला सांभाळ. तुझ्या स्वरूपदर्शनात माझा देह पडावा. माझ्या मागे तुझ्या भक्तांना तू सांभाळ, जे कोणी १३ कोटी श्रीराम नामाचा जप करतील त्यांना दर्शन दे.

माघ वद्य नवमी दुपारी २ वाजता त्यांनी तीन वेळा  रामनामाचा घोष केला, जो सर्व गडाच्या आसमंतात निनादला व समर्थ राम स्वरुपात एकरूप झाले. माघ वद्य नवमी म्हणजेच दासनवमी. या दिवशी सज्जनगडावर उत्सव असतो. श्रीसमर्थ म्हणजे मारूतीचा अवतार ते चिरंजीव आहेत. 

समर्थांचा पांचभौतिक देह पंचमहाभूतात विलीन झाला तरी दासबोध, आत्माराम, मनोबोध, स्फुट काव्य व अभंगांच्या रूपात ते आजही आपल्यात आहेत. प्रपंचरूपी मातीतून पारमार्थिक अत्तर काढायला त्यांनी शिकवले. माझा दाता राम आहे या निश्चयातून ते राहिले. समर्थांच्या काळी उपासना धर्माचरण याचे स्वातंत्र्य नव्हते. आज स्वातंत्र्य आहे, पण मन व बुद्धी बाह्य विषयात रमण्याचा धोका जास्त आहे. दूरदर्शन, बाहेरील आकर्षण वाढवतो; म्हणून मनाचा समतोल, स्थिरता, सूक्ष्मात जाण्याची वृत्ती  वाढविण्यासाठी समर्थांच्या ग्रंथांचा अभ्यास गरजेचा आहे. जो श्रीरामाचा दास होतो त्यालाच हे ग्रंथ आवडतात. श्रीरामाचा दास व्हायला त्याच्या नामाची गोडी, नामावर विश्वास व नामावर प्रेम असावे. समर्थ म्हणतात,

“श्रीराम देवार्चन सिद्धचि आहे ।

ग्रंथराज दासबोध सामर्थ्य सिद्धचि आहे ।

जो जो महंत येथे निश्चये राहे ।

तो तो लाहे साक्षात्कारु ।।”


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

दुसरे ते राजकारण

कोणत्याही समाजाचे संघटन, संरक्षण, संवर्धन,भौतिक व अध्यात्मिक वैभवाचे जतन हे शासनाद्वारे पूर्ण होत असते. शासनकर्त्यांनी देशाची सर्वांगीण प्रगती साधणे व देशाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवणे हे कार्य करावे ही लोकांची अपेक्षा असते. देशाटनात समर्थांनी लोकस्थिती, भयग्रस्त समाज, पारतंत्र्याचे परिणाम पाहिले व अनुभवले, म्हणून “पहिले ते हरिकथा निरूपण । दुसरे ते राजकारण । तिसरे ते सावधपण व चौथा साक्षेप” या खांबांवर त्यांनी आपला संप्रदाय उभा केला. अध्यात्मिक साधनेमुळे, मूळ मायेपासून निर्माण झालेल्या या चराचर विश्वात पशुपक्षी, वनस्पती, प्राणी, माणसे यात चैतन्यरूप अंतरात्मा आहे व तो शुद्ध जाणिवेच्या रूपात प्रगट होतो हे ज्ञान होते. समर्थांमध्ये ही जाणीव विशाल होती म्हणून त्यांना चराचरात राम रूप दिसले व सामाजिक जगदोद्धाराची चळवळ प्राणीमात्रांच्या सुखासाठी त्यांनी ‘राजकारण’ या शब्दातून उभी केली. तिला भगवंताचे अधिष्ठान होते म्हणून सामर्थ्य होते.

समर्थांच्या कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत जनतेचे आरोग्य व आर्थिक स्थिती चांगली रहावी, त्यांना शिक्षण मिळावे, विद्या, शास्त्र, कला यांची समाजात वाढ व्हावी; जनतेला न्याय मिळावा व दंड करण्याची वेळच येऊ नये; आश्रमात राहून साधना, तपश्चर्या, अभ्यास करणारे संत; ऋषीमुनी यांना संरक्षण मिळावे या गोष्टींचा समावेश होता. “ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी.” राजा राज्यसंस्थेचा प्रतिनिधी असावा. तो, जनतेचा सेवक; नि:स्वार्थी; पराक्रमी व अलिप्त असावा. प्रजाहित दक्षता, राज्य स्थापना व धर्मस्थापना हे त्याचे ध्येय असावे. प्रजेच्या सुखासाठी व राज्याच्या विकासासाठी त्याने अखंड प्रयत्न करावे. दुष्टांचा संहार, बंड पाखंडे मोडून काढणे, शत्रूला नामोहरम करणे, देशातील सीमा व समुद्र यांचे रक्षण सैन्यामार्फत करणे हे राजाचे कर्तव्य आहे. राजाने धर्मसत्ता व भक्तिमार्गाची प्रतिष्ठा वाढवावी, प्रजेला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवावा. ईश्वराचे अनुसंधान सांभाळावे. ‘हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा’ या भावनेत अनासक्त वृत्तीने राज्य कारभार पाहावा.

शक्तीची उपासना – समर्थांच्या काळात त्यांना शरीर सामर्थ्याला फार महत्त्व द्यावे असे वाटले. शक्तीमुळे स्वसंरक्षण व राष्ट्र संरक्षण होते. सत्तेला शक्ती व युक्ती दोन्हीही आवश्यक आहेत.

महाराष्ट्रधर्म – समर्थांच्या राजकारणात राष्ट्रधर्म व महाराष्ट्र धर्माला प्राधान्य होते. “अवघे जन मिळवावे । धर्मकार्यासी लावावे । महाराष्ट्र धर्म स्थापावे । प्रतिष्ठा स्वराज्य ।।” हा त्यांचा विचार होता. स्वराज्य व सुराज्य निर्मितीसाठी त्यांनी अठरा पगड जातींना एकत्र केले. अभक्तांचा क्षय व्हावा, नष्ट; चांडाळ व पापींना शासन व्हावे, अन्याय व अत्याचाराला प्रत्युत्तर मिळावे यासाठी सर्वांनी हातभार लावणे महत्त्वाचे होते. मंदिरे सुरक्षित रहावी, धार्मिक आचाराचे स्वातंत्र्य असावे, विद्या व कला यांची वाढ व्हावी, वैभव संपन्न जीवनाकडे लोकांची वाटचाल व्हावी, म्हणून त्यांनी द्रष्टेपणाने अविरत आनंदवन भुवनाचे स्वप्न पाहिले. या एका ध्येयपूर्तीसाठी जे सामूहिक प्रयत्न त्यांनी केले तेच त्यांचे राजकारण होय. लोकांना राजी राखावे, त्यांचे अंत:करण सांभाळावे. नष्टाला नष्ट योजावे, सशक्ताला नाना बुद्धी शिकवाव्या, महंताने महंत करावे व देशभर मठ व महंत कार्यरत असावे या पद्धतीने समर्थांनी सामूहिक शक्ती उभी केली. “बुडाले सर्वही पापी हिंदुस्तान बळावले” या त्यांच्या वचनात संघर्षाचा तीक्ष्णपणा व विजयाचा आत्मविश्वास जाणवतो.


सावधपणा – समर्थांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी सावधपणा व गुप्तपणा याला महत्त्व दिले. इशारतीचें बोलतां नये । बोलायाचें लिहूं नये, संकेतें लोक वेधावा, कांटीनें कांटी झाडावी, मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवीं करवावें या पद्धतीने त्यांनी कार्य केले. शिवाजी महाराजांचा आग्र्याहून परतीचा प्रवास, अफजलखानाचा वध या सर्व प्रसंगात गुप्तता होती. समर्थांच्या कार्याचा पुरावा या गुप्ततेमुळे मिळत नाही.


श्रीराम व हनुमान यांचा आदर्श – राष्ट्रधर्म जागवण्यासाठी समर्थांनी श्रीराम व हनुमंत ही आराध्य दैवते लोकांसमोर ठेवली. श्रीराम चरित्रातून मानवता, संघटित प्रयत्न, नीती न्यायाचे राज्य, कर्तव्यनिष्ठा, निस्वार्थी प्रेम व सर्वांना आपलेसे करण्याची कला शिकता येते. हनुमंताच्या जीवनातून ब्रह्मचर्य, अचाट शरीरबळ, निर्भयता, बुद्धिचातुर्य व सेवेचे समर्पित जीवन दिसते. समर्थांच्या मठातून श्रीराम व हनुमंताच्या उपासनेमुळे लोकांच्या मनावर बळाचे व निर्भयतेचे संस्कार झाले व कल्याणकारी राज्याची संकल्पना लोकांमध्ये रुचली. समर्थांचे महंत स्वतःच्या चारित्र्याने, कर्तुत्वाने व उपासनेच्या प्रभावाने प्रभावी लोकनेता म्हणून कार्यरत होते.


समर्थांच्या ’राजकारण’ शब्दाभोवती आदर्श समाज रचनेचा वेध घेणारा तत्ववेत्ता आपल्याला दिसतो. त्यांचे स्वतंत्र रामराज्याचे स्वप्न म्हणजे एका मंत्रदृष्ट्या ऋषीचे भावरम्य चित्र म्हणून डोळ्यापुढे येते. आज आपण भक्तीची मांदियाळी व अयोध्या येथे साकार झालेले राम मंदिर पहात आहोत. याची अव्यक्त बीजे त्या स्वप्नात दडलेली असावीत.

राज्य जालें रघुनाथाचें । भाग्य उदेले भक्तांचे ।।१।।

कल्पतरू चिंतामणी । कामधेनूची दुभणी ।।धृ।।

परीस झाले पाषाण । अंगीकार करी कोण ।।२।।

नाना रत्नांचे डोंगर । अमृताचे सरोवर ।।३।।

पृथ्वी आघवी सुवर्णमय । कोणीकडे न्यावे काय ।।४।।

ब्रह्मादिकांचा कैवारी । रामदासाचा अंतरी ।।५।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

आजच्या काळातही समर्थ विचारांची आवश्यकता

वैदिक परंपरा, संत विचार, संत चरित्र, रामायण, महाभारत व भागवतासारखे ग्रंथ कधीच कालबाह्य होत नाहीत. बदलत्या काळातले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, आव्हाने पेलण्यासाठी ते साहित्य शक्ती पुरवतात, मार्ग दाखवतात. समर्थ रामदासांचा दासबोध, आत्माराम व मनोबोध हे ग्रंथ काळाची ही गरज पुरवतात.

समर्थांच्या काळात परकीय सत्ता, आक्रमण, विखुरलेला समाज होता. आजही कलियुग आहे. जग जवळ आले आहे पण मने दुरावलेली आहेत. अधर्म, धर्मकार्यात अडचणी आणत आहे. असत्य, सत्याचा बुरखा पांघरून सत्याचा पराभव करत आहे. भ्रष्टाचार, शिष्टाचार झाला आहे. व्यसनाधीनता, महागाई, बेफिकीर वृत्ती, बेशिस्त, विषय वासना, तृप्तीची धडपड वाढत आहे. परकीय आक्रमणे, फंदफितुरी, देशातील स्वकीयांकडून होणाऱ्या देशविघातक कृती अशांती पसरवत आहेत. दूरदर्शन सारखे माध्यम सकारात्मक विचार वाढवण्याऐवजी, विषयवासना, स्वार्थ, ढोंगीपणा वाढवत आहेत. सात्विक अन्नाचा विचार फास्टफुड मुळे लोप पावत आहे. अर्थ, काम, धर्म व मोक्ष यांची चौकट मोडून स्वैराचाराकडे वळत आहे. जाती-जातीतील तेढ, लोकनेते स्वार्थासाठी वाढवत आहेत. “कोठे जावे काय करावे आरंभिली बोहरी” हे समर्थ वचन आजही प्रकर्षाने आठवत आहे.

समर्थांनी दुर्लभ शरीर, दुर्लभ आयुष्य याची महती सांगितली. “या शरीरासारखे यंत्र आणिक नाही” म्हणून बलोपासना, सात्विक आहार, विहार, चांगल्या सवयी, आजही महत्त्वाच्या आहेत. आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे याची जाणीव महत्त्वाची आहे. जेव्हा शरीरात शक्ती असते, तेव्हा ग्रंथ अभ्यास; उपासना; पाठांतर; ध्यानाची सवय महत्त्वाची असते नाहीतर, ‘नंतर करेन’ या सवयीने पश्चात्ताप होतो. 

व्यवसाय व संसारात अलिप्तपण व अनासक्त वृत्ती महत्त्वाची असे समर्थ म्हणतात. २० दशक व २०० समासाच्या दासबोधाच्या लेखनाचे श्रेय समर्थ घेत नाहीत. मठ करून एके ठिकाणी ते राहिले नाहीत. संसारात व व्यवसायात निवृत्तीचा शांत मनाने स्वीकार करून, आपण वाचन; लेखन; उपासना; ध्यान; अभ्यास; लोकोपयोगी एखादे काम यात वेळ घालवला, तर निवृत्तीनंतरचे जीवन आनंदात जाते. निवृत्ती स्वेच्छेने स्वीकारली तर ताण-तणाव वाढत नाही.

शरीराबरोबरच मनाच्या मशागतीचा विचार समर्थ मनाचे श्लोकांमधून मांडतात. सदाचाराचे नैतिक जीवन, शांती व समाधान देते. देहसुखाच्या मर्यादा ओळखून देहबुद्धीच्या पायावरचे जीवन अपूर्ण, दुःखव्याप्त आहे. भगवंताच्या स्मरणात अखंड कार्य केल्यामुळे निर्भयता व सुरक्षितपणा वाढतो. आजचे जीवन धकाधकीचे, आव्हानाचे आहे. या स्थितीत बाहेर पडताना भगवंत माझ्याजवळ आहे, तो रक्षण करतो हा स्थिर भाव आत्मविश्वास वाढवतो. मन, संकल्प-विकल्प; भीती; स्पर्धा; ईर्ष्या; द्वेष यांनी अशांत होते. एखाद्या ईश्वरी शक्तीच्या, संतांच्या, देवाच्या ठिकाणी मन स्थिर ठेवले तर ते एकाग्र होते. विवेक-वैराग्याने मनाची हाव, धडपड शांत होते, वृत्ती स्थिर होते. सर्व ठिकाणी एकच आत्मचैतन्य आहे या भावनेने मानवी मन विश्व मनाचा विचार करते व माणूस स्वतःशी व इतरांशी सुखसंवाद करण्याच्या प्रयत्नात रहातो.

दासबोधाच्या अभ्यासाने शाश्वताचा मार्ग स्वीकारला जातो. नित्य-अनित्याचा विचार दृढ होतो. देहाला, बालपण; तारुण्य; वृद्धपण आहे. तो पंचभौतिक आहे, त्याला मृत्यू आहे या सत्याचे भान रहाते. देह साधन म्हणून वापरावयाचा आहे. आपले जीवन, पृथ्वी; आप; तेज; वायू; आकाशाशी निगडित आहे. त्यामुळे निसर्गात समतोल आहे. आपल्या देहाला पंचभौतिक शक्तीची देणगी ईश्वराने दिली आहे. तेव्हा मी, माझा देह व निसर्ग याचा सखोल विचार आपण दासबोधामुळे करतो. मुक्त अवस्था व मृत्यू याबद्दलचे गैरसमज व भीती नष्ट होते. व्यवस्थापनाचे अमूल्य असे भरपूर विचार दासबोधात आढळतात. व्यक्ती म्हणून आपला सर्वांगीण विकास दासबोधातून साधता येतो. विवेक, विचार सावधानता, एकाग्रता, एकांताची आवड कशी जोपासावी हे दासबोधातून कळते. प्रपंच-परमार्थ, व्यक्तिगत जीवन, सामूहिक जीवन, कुटुंब व व्यावसायिक क्षेत्र या दोन्ही क्षेत्रात समतोल राखायला मदत होते. अखंड चाळणा हा समर्थांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. त्यांच्या जीवनात असहायता, निराशा, थकवा, अगतिकता यांना थारा नव्हता. निरंतर ध्यास, उत्कट ध्येय, मनन, चिंतन, निरीक्षण, परीक्षण, प्रचिती, प्रबोध व तेजस्वी वाणी हे त्यांचे गुण आपल्याला आत्मसात करता येतात. दासबोधात धर्म, उपासना, पिंड व ब्रह्मांडाचे रहस्य, व्यवहार, समाजशास्त्र, मानसशास्त्र याचे एकत्र रसायन सापडते. व्यक्ति बरोबरच समाजाचे कल्याण, समाजाची बांधिलकी, समाजाविषयी प्रेम हे विचारही आपल्याला कळतात. समर्थांचे विचार हे ब्रह्मांडाला गवसणी घालण्याइतके व्यापक आहेत. 

“आपल्या पुरुषार्थ वैभवें | बहुतांस सुखी करावें |”

हा विचार आजच्या जागतिक अशांतीच्या परिस्थितीत महत्त्वाचा आहे. आजच्या काळात आपण युद्धामुळे होणारी मनुष्यहानी, स्त्रिया व मुलांचे उध्वस्त जीवन, कष्टाने उभ्या केलेल्या इमारती नष्ट होणे हा संहार; विश्वव्यापक उपासनेने टाळता येऊ शकतो. “पृथ्वीमध्ये जितुके शरीरे | तितुकी भगवंताची घरे” हा विचार फक्त भारतात रुजू शकतो व इतरांना तो देता येतो.

समर्थ विचार Specific व Time Bound आहेत. आत्मकल्याण हे ध्येय व त्यासाठी प्रयत्न व त्याचे मूल्यमापन आपणच करायचे आहे. समर्थ विचारांच्या श्रवणाने आपल्यात बदल व्हावा. “जगदीश्वरे अनुक्रमे | सकळ केले |” हे आश्वासन समर्थ देतात. त्यात कर्तुत्वाचा हुंकार, भक्तीचा आग्रह, उपासनेचे सातत्य आहे कारण समर्थांचे जीवन तेजोमय, सूर्य बिंबासारखे निर्मळ व प्रेरक, जीवनातला अज्ञानाचा अंधकार दूर करणारे आहे.

“देश काळ वर्तमान | हा तो अवघाचि अनुमान ||१||

भक्ति करावी देवाची | घडी जाते सोनयाचि || धृ ||

काळ वेळचि पाहतो | सदा सन्निध राहातो ||२||

रामी रामदास म्हणे | देह आहे जाईजणें ||३||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थ रामदासांचे लोकशिक्षण

श्रीसमर्थ दासबोध दशक १ समास १ मध्ये म्हणतात, “आतां श्रवण केलियाचें फळ | क्रिया पालटे तत्काळ |” याचा अर्थ, शिक्षण म्हणजे विचारात व वर्तनात झालेला बदल होय. अध्यात्म ग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधना करणे याला श्रीसमर्थ ‘अभ्यास’ म्हणतात. महंताने अभ्यास करून, स्वत: अनुभव घेऊन, तसे वर्तन करून मग लोकांना शिकवावे हा त्यांचा आग्रह होता. दासबोध दशक १४ समास ४ मध्ये बावन्न मातृकांचा विषय आहे. ५२ मातृकांचे अधिष्ठान पंचभूते व षट्चक्रे आहेत. मातृकांमधून शब्द तयार होतो. विचारांनी भरलेले शब्द दृश्य स्वरुपात असतात व शब्दात अर्थ दडलेला असतो. शब्दाचा संबंध शरीराशी असतो. परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी वाणीतून शब्द बाहेर पडतो. श्रीसमर्थांच्या शब्दात जोश, सामर्थ्य, वीररस, भक्ति याचे दर्शन घडते. अस्मानी सुलतानीच्या अत्याचाराने गांजलेल्या भयग्रस्त समाजाला “धीर्धरा धीर्धरा तकवा | हडबडूं गडबडू नका”, “उत्कट भव्य तेंचि घ्यावें | मळमळीत अवघेंचि टाकावें |” या शब्दांनी धीर दिला व महत्त्वाकांक्षी जीवनाची प्रेरणा मिळाली. शब्दानंतर अर्थ कळतो, तो शब्दाच्या उच्चारातच दडलेला असतो. अर्थाचा शब्द मनाशी असतो. शब्द व अर्थाचे रूपांतर, अनुभवात व प्रत्यक्ष वर्तनात होते. आध्यात्मिक अनुभव शब्दाने सांगतात पण अनुभव आल्यावर शब्द व अर्थ मागे पडून मौनाची स्थिती प्राप्त होते. 

ज्ञानदेवांप्रमाणे श्रीसमर्थांचे वाङ्मय मराठी भाषेत आहे. देशाटनात श्रीसमर्थ १६ भाषा शिकले, म्हणून उर्दू; हिन्दी भाषेतही त्यांनी लिखाण केले. लोकांना शिकवताना प्रथम अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षा याबाबत त्यांच्या अडचणी श्रीसमर्थ प्रथम जाणून घेत व त्यावर उपाय सांगत. “मानत मानत शिकवावे” ही त्यांची पद्धत होती. नेमके बोलावे व तात्काळ उत्तर द्यावे यासाठी स्वत: ज्ञानी होणे व अनुभव घेणे याला त्यांनी प्राधान्य दिले. त्या काळात “लेकुरें उदंड जालीं | तों ते लक्ष्मी निघोन गेली” हा कुटुंब नियोजनाचा तसेच “मेळविती तितुकें भक्षिती | ते कठीण काळीं मरोन जाती” हा बचतीचा विचार त्यांनी लोकांना सांगितला. बलोपासनेचे महत्त्व, सदा दात घासोनी तोंडा धुवावे ही शारीरिक स्वच्छतेची सूचना श्रीसमर्थांनी केली, त्याचा उपयोग आजही आपण करत आहोत.

श्रीसमर्थ साक्षरता प्रसाराचे ‘आद्य प्रवर्तक’ होते. लेखन, वाचन, अर्थांतर सांगणे ही त्यांची लोक शिक्षणाची पद्धत होती. “दिसामाजी कांहि तरी ते ल्याहावे | प्रसंगी अखंडित वाचीत जावे” हा नियम त्यांचे महंत काटेकोर पाळत. श्रीसमर्थांच्या शिष्यांच्या दासबोधाच्या हस्तलिखित प्रती आजही पाहायला मिळतात. अक्षर कसे असावे, लेखन क्रिया कशी करावी याविषयी दासबोधात एक समासच आहे. श्रीसमर्थांच्या लेखनात शब्द, भाषा मांडणी याची साखळी दिसते. 

श्रीसमर्थांनी लोक शिक्षणात स्त्रियांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. त्या काळात स्त्रियांना पळवून नेणे, भ्रष्ट करणे, अशा प्रकारांमुळे स्त्रिया असुरक्षित होत्या. अशा भीषण काळात श्रीसमर्थांनी वेणाबाई, अंबिकाबाई, आक्काबाई, यांच्यासारख्या मोठी परमार्थिक योग्यता असणाऱ्या उत्तमोत्तम शिष्या तयार केल्या. यांत  वेणाबाईंच्या शिष्या बयाबाई यांचाही समावेश होतो. वेणास्वामी मिरज मठाच्या मठाधिपती होत्या तर श्रीसमर्थांच्या निर्याणानंतर ४० वर्षे आक्कास्वामींनी चाफळ व सज्जनगड ही संस्थाने समर्थपणे चालवली. श्रीसमर्थांनी त्या काळात ही स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली.

श्रीसमर्थांनी उदासीन, आळशी, विवेकहीन, असहाय जनतेला आशावादी; प्रयत्नशील; विवेकी बनवले. लोकांना शरीर व मनाने बलवान बनविण्यासाठी श्रीसमर्थांनी लोकशिक्षणाची चळवळ उभी केली. श्रीसमर्थांचे ११०० मठ म्हणजे अध्यात्मिक विद्यापीठे होती. श्रीसमर्थांचे महंत नाना मते, घातक रूढी, परंपरा, पाखंडे, हा मतमतांचा गलबला मोडून नीतीची; धर्माची; उपासनेची; कर्मयोगाची शुद्ध कल्पना जनतेला समजाऊन देत. शिक्षण देताना लोकांची अंत:करणे सांभाळत, त्यांच्यातील दुरावा नष्ट करत. महंताचे लिहिणे, वाचणे, अर्थ सांगणे, वक्तृत्व, माणसांची पारख आणि नि:स्वार्थीपणा याकडे श्रीसमर्थ लक्ष ठेवत. तीक्ष्ण बुद्धीच्या मुलांना युक्ती-बुद्धीने सक्षम करून नवे महंत तयार करत. महंतांनी अशी शिस्त लावावी की, तो नसताना सुद्धा हे कार्य चालू राहील. अशा कार्यामुळेच समर्थ संप्रदायाचा विस्तार झाला. 

श्रीसमर्थांची शिक्षण पद्धती औपचारीक व अनौपचारीक होती. भिक्षेच्या वेळी व्यक्तीला भेटणे, त्याच्याशी संवाद साधणे, कुटुंबाचे निरीक्षण करणे या गोष्टी होत असत. प्रवचन कीर्तनाच्या वेळी समूहाचे शिक्षण होत असे. संवादाचे माध्यमही श्रीसमर्थ वापरत. दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. पूर्वारंभ गाथेत संवादच आहे. संवादामुळे व्यक्तीमध्ये  चांगल्या प्रकारे परिवर्तन होते. बहूजन समाजाला “मुलाचे चालीनें चालावें” या पद्धतीने श्रीसमर्थ शिकवत. सामान्य माणसांसाठी बाराखडी शिक्षण पद्धतीने त्यांनी लोकांच्या मनात शिक्षणाविषयी प्रेम निर्माण केले. श्रीसमर्थांच्या लोकशिक्षणामुळे, समाज  यशस्वी प्रपंच करून परमार्थाकडे लागला. एकमेकांवर प्रेम करू लागला. लोकांना स्वधर्म व स्वातंत्र्याचा विचार कळला. वाचन, लेखनामुळे विचार व विवेक शक्ती वाढली. खरा कर्ता राम या भावनेत लोक व्याप व वैभव वाढवून भक्तीच्या समाधानाचा आनंद भोगू लागले. 

“प्रथम लिहिणें दुसरें वाचणें | तिसरें सांगणें अर्थांतर |

आशंकानिवृत्ती ऐसी चौथी स्थिति | पांचवी प्रचीति अनुभवें |

साहावें तें गाणें सातवें नाचणें | ताळी वाजवणें आठवें तें |

नवां अर्थभेद दाहावा प्रबंद | आक्रावां प्रबोध प्रचीतीसीं ||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थांचे देशाटन

“येके ठाईं बैसोन राहिला | तरी मग व्यापचि बुडाला |

सावधपणें ज्याला त्याला | भेटि द्यावी ||१५–१–३४||”

समर्थांनी गृहत्याग केल्यावर बारा वर्षे स्वतः साधना केली. साधनेने एक तेजस्वी, विवेकी, तीक्ष्ण नजरेचा, बलदंड शरीराचा, हनुमंताचा भक्त समर्थ रामदास असे परिवर्तन त्यांच्यात घडले. नाशिकमध्ये पूर्ण देशातून यात्रेकरू येत असत. त्यांच्याकडून उत्तरेकडे चाललेला विध्वंस, मूर्तींची विटंबना, देवालय नष्ट करणे, स्त्रियांना पळवणे, सक्तीचे धर्मांतर या गोष्टी कळल्या. स्वतः पहावे, काही उपाय करावा, लोकजागर करावा यासाठी पायी देशाटन करण्याचे समर्थांनी ठरविले.

एक तप:पूत, विरक्त, मुक्त, रामभक्तित रंगलेला, करुणेनी व्यथित झालेला महंत रामदास, त्र्यंबकेश्वराला पोहोचला. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना तो एकनाथ व  निवृत्तीनाथांची शिकवण आठवत होता. सप्तशृंगीचे दर्शन घेताना, उग्र रूपाच्या; हातात आयुधे असणाऱ्या त्या अष्टभुजाधारिणीकडे त्यांनी सामर्थ्य मागितले. प्रवास करत त्यांनी पोहून तापी नदी ओलांडली. नाझीर साहेब बळजबरीने यात्रेकरूंची तपासणी करत होते. समर्थांनी त्याला विरोध केला. त्यांच्या दृष्टीत थोडा क्रोध, निर्धार, प्रतिकाराची सिद्धता होती. सर्व यात्रेकरू निर्भय झाले. नंतर समर्थ नर्मदा तीरी आले. ओंकारेश्वराचे दर्शन घेतले. आद्य शंकराचार्यांचे स्मरण केले. तेथे मठ स्थापला. चरणदास याला मठपती नेमले. उज्जैनी, ग्वाल्हेरला गेले, महांकालेश्वराचे आशीर्वाद घेतले. सर्व ठिकाणी सत्ता, स्वार्थ, यवन सत्तेचा अत्याचाराचा वरवंटा अमानुषपणे फिरताना समर्थांनी पाहिला. समर्थ चित्रकुटावर, त्यांच्या प्रभूच्या वनवासभूमीत पोहोचले. तेथे श्रीराम वास्तव्याच्या अनुभवाने शक्ती मिळाली. मथुरेला मठ स्थापला. रुद्र प्रयागला स्नान करून, बद्रीनारायण; गंगोत्री; यमुनोत्री; केदारनाथाचा प्रवास केला. परतीच्या प्रवासात वाराणसी, अयोध्या पाहिली. काशीक्षेत्री मंदिरात चिरेबंदी मशिद पाहून ते व्यथीत झाले. अयोध्येत श्रीराम लल्लाच्या मंदिराशेजारी तेच होते. त्यांना वाटलं माझा देश, माझा धर्म काहीच राहिला नाही. लोकांना साधं, शांत, स्थिर, निर्भय जीवन कष्ट करून जगता येत नाही. “आश्रयो पाहता नाही” असं झालं आहे. वाराणसीत मठ स्थापला. माझा स्वरूप संप्रदाय, अयोध्या मठ; “जानकी देवी श्री रघुनाथ दैवत | मारुती उपासना नेमस्त” असा असेल असे हितगुज त्यांनी श्रीरामाशी केले. 

समर्थांनी कर्नाटकातील विजयनगर येथील संपन्न बाजारपेठा, प्रशस्त शहर, नामघोषाने दुमदुमलेली मंदिरे पाहिली. बेंगळूरला न्यायी व शूर शहाजीराजांची नगरी पाहून त्यांना आनंद वाटला. शहाजीराजांच्या  भेटीत समर्थांनी स्वतः पाहिलेले क्रौर्य, दुष्काळ, कल्पान्त, धाडी, ओस पडलेली गावे, जीवघेणे आकांत त्यांना कथन केले. शहाजीराजांनी, समर्थांना मांसाहेब जिजाबाई; पुत्र शिवबा व त्यांचे पुणे येथील जहागिरीची माहिती दिली. त्या स्वराज्याचे व सुराज्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना आशीर्वाद द्यावेत असे समर्थांना सांगितले. 

देशाटनामुळे समर्थांचे अनुभव विश्व वाढले, अस्मिता वाढली, शक्ती वाढली. कुरुक्षेत्री संघर्षाचे स्फुल्लिंग चेतवले गेले. “हे राज्य व्हावे  हे तो श्रींची इच्छा” हे शब्द त्यांच्या कानात घुमू लागले. समर्थ महाराष्ट्रात आले. जांबेला मातोश्रींना भेटले. चाफळचे मंदिर व ११ मारुतींची स्थापना वेगाने झाली. ११०० मठांची उभारणी व महंतांची साखळी उभी राहिली. चिपळूणला परशुरामांचे आशीर्वाद घेतले. महाडला शिवथरघळीत दासबोध लेखन केले. अफजलखानाच्या वधाने  शिवाजीराजांच्या पराक्रमाने “स्वप्नी जे देखिले रात्री | ते ते तैसेचि होतसे” असा प्रत्यय समर्थांना आला. या देशाटनातून संघटना, लोकशिक्षण व भक्तीमार्गाचा प्रसार, लोकजागर झाला. समाजात स्वातंत्र्याचा वन्ही चेतवला गेला. परकीय सत्तेविरुद्ध संघर्षाला लोकांची मने, मेंदू, मनगटे तयार झाली. “बुडाले सर्व ही पापी | हिंदुस्तान बळावले | अभक्तांचा क्षयो झाला | आनंदवन भुवनी ||” हे स्वप्न सत्यात उतरले. 

एक डोळस दृष्टीने केलेले देशाटन म्हणून समर्थांच्या या प्रवासाची इतिहासाला नोंद घ्यावीच लागेल. या देशाटनामुळे स्वातंत्र्यसंग्रामाचे बीज रोवले गेले, व त्यातूनच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद यांना प्रेरणा मिळाली. इतिहासाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य या देशाटनाने दिले.

“जेथे जावे तेथे राम समागमी | आता कासयां मी खंती करू ||१||

खंती करू ज्याची तो समागमेची | वाहाता सुखाची घडी होये ||२||

होये देव खरा भूमंडळवासी | जातां दिगंतासी सारीखाची ||३||

सारीखाची तो जनी वनी वनांतरी | गिरिकंदरी तो सारीखाची ||४||

सारीखाची तो कडांकपारी पाहाता | राम आठवितां दास म्हणे ||५||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language