नरदेहाची अपूर्वता

धन्य धन्य हा नरदेहो | येथील अपूर्वता पाहो |

जो जो कीजे परमार्थालाहो |  तो तो पावे सिद्धीतें || १.१०-१ ||

मनुष्यजन्म ही उन्नयन अवस्था होय. ८४ लक्ष योनीतून फिरून, ही अवस्था महत् भाग्याने प्राप्त होते. “पुनरपि जननं | पुनरपि मरणं | पुनरपि जननी जठरे शयनम ||” ह्या चक्रातून मुक्त होण्याची दिलेली संधी म्हणजे मनुष्य जन्म. विचार केला तर या जगात माझे काय आहे? स्पष्ट उत्तर काहीही नाही. मरणाच्या वेळी सोबत असते ती फक्त मन:पूर्वक उच्चारलेल्या रामनामाची… सामन्यांचा जीव मृत्यूच्या कल्पनेने भय व्याकुळ होतो तर संतांना तो अनुपम्य मुक्ती सोहळा वाटतो. आयुष्यभर मी माझे करत जगणाऱ्यांचे आयुष्य जितेपणीचे मरण ठरते. सारे स्वकीय स्मशानापर्यंत असतात. इतर रोज मरणारे असंख्य, कधी आपण; काय सत्कर्म केले याचा विचार करतील काय? 

आला आला जीव, जन्मासि  आला |

गेला गेला बापुडा, व्यर्थचि मेला ||”

जप, तप, तीर्थाटणे, नामस्मरण, हरिकीर्तन, ग्रंथपठण हे परमार्थ योग या नरदेहामुळे प्राप्त होतात. इतर सजीव आहार, निद्रा, भय, मैथुनात रमून मरून जातात, सजीव असूनही ते अज्ञानाने आत्मोध्दार करून घेऊ शकत नाही. आपण आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यात चतुर असतो. आपल्याच कृतीने आत्मघात करून मग फक्त रडत बसतो. परमेश्वराने आपल्याला दिलेले सुंदर शरीर पूर्णपणे वाया जाते. आपला नरदेह संग सोडून देतो. म्हणून समर्थ म्हणतात, “मरणाचे स्मरण असावे” त्यातून ते आत्मोध्दार सुचवतात. त्यासाठी वैराग्य हवे. विषयांची पिलावळ विवेक-वैराग्ययांना पिटाळते वा मानवी मनाला कवटाळते. ज्यातून त्यांचा सर्वनाश घडतो. 

जीवनातले वैराग्य कसे प्राप्त होते? तर मोठ्या कढईतल्या लाह्या भाजताना काही लाह्या ताडताड उडून कढई बाहेर पडतात. त्या सर्वांग  सुंदर लाह्या पांढऱ्या शुभ्र आकर्षक असतात. मात्र न तडतडणाऱ्या कढईतल्या लाह्यांना कुठेना कुठेतरी डाग असतो. संसारातला, मीपणा असणारा  माणूस; बहीणाबाईंच्या भाषेत – “अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर” अशाप्रकारे कलंकित होऊन संपून जातो. 

समर्थ म्हणतात “शरीरासारिखें यंत्र | आणीक नाहीं |” ते देहाला यंत्राची उपमा देतात. विजेवर चालणारी यंत्रे बटन दाबताच कार्यप्रवण होतात, तद्वत मनरूपी बटणाने दहा इंद्रियरुपी यंत्रे कार्यरत होतात. इतर यंत्रे बिघाड झाल्यास दुसऱ्याने दुरुस्त करावी लागतात. मात्र शरीर यंत्रे स्वत:ची दुरुस्ती स्वत: करतात, एका  कालमर्यादेनंतर हा जीवात्मा शरीर सोडून निघून जातो.

अफाट कार्यशक्ती, बुध्दीची देणगी, श्रेष्ठत्व ही या यंत्राची वैशिष्ट्ये. “नर करनी करे तो | नर का नारायण हो जाये |” देहप्राप्ती नंतर या देहाचे सार्थक करावे असा सर्वच संताचा आग्रह आहे. 

जेणें परमार्थ वोळखिला | तेणें जन्म सार्थक केला |

येर तो पापी जन्मला  | कुलक्षयाकारणें || दा. १-९-२५ ||

या नरदेहाद्वारे आनंदप्राप्ती, ज्ञानप्राप्ती साधते. अनेक साधुसंतांनी त्याच्याद्वारे उत्तमगती मिळवली. जन्ममृत्यूचे अरिष्ट चुकवणारा हा नरदेह सर्व देहात वरिष्ठ आहे. त्याला समर्थांनी ब्रह्मांड वृक्षाचे फळ म्हटले आहे. ब्रह्मदेवाने हा वृक्ष (प्रपंच) वाढविला. त्यास मानवरूपी फळ आले. त्यामुळे भगवंतास एवढा आनंद झाला की, मानवयोनीत आल्यावर तो प्राणी स्वस्वरूप जाणून मुक्त होईल. त्याला मन, बुध्दीद्वारे नित्यानित्य, सारासार विवेक करण्याचे वरदान मिळाले आहे. नरदेहाचे सार्थक, अहंकाराचा त्याग करून आत्मानंदाच्या अनुभवाने सुखरूप होण्यात आहे; असे समर्थ दासबोधात मानवी जीवनाची मूळ समस्या मांडताना म्हणतात. सर्वसामान्य माणूस आयुष्यभर सुखासाठी धडपडतो. पण “सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकोनी आले” अशी त्याची अवस्था होते. 

नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ।

मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान् भवाब्धिं न तरेत्स आत्महा ।।

श्रीमद्भागवत ११-२०-१७ ।।”

मानवदेह जसा सुलभ तसा दुर्लभ आहे. चांगला संकल्प हे त्याचे वल्हे तर गुरु सुकाणू धरणारा कर्णधार आहे. भगवंताची कृपा हा वारा आहे. त्या वाऱ्याने ते ढकलले जाणारे जहाज आहे. अशी सगळी मदत असताना जो माणूस भवसागर तरुन जात नाही तो आत्मघातकी होय.   

एक कथा आठवली. एक तांदळाच्या पोत्यांनी भरलेला ट्रक जंगलातील  रस्त्याने जाताना एक पोते रस्त्यात पडले. तेथे काही मुंग्या आल्या त्यांनी १०-१२ दाणे घेतले व त्या निघून गेल्या. मग उंदीर आला त्याने १००-२०० ग्रॅम खाल्ले व तो निघून गेला. नंतर एक गाय आली तिने एक-दोन किलो खाल्ले  व ती निघून गेली. सर्वांनी पोटापुरते खाल्ले. शेवटी एक माणूस आला अन त्याने ते पोतंच उचलून घरी घेऊन गेला. सृष्टीत सर्व प्राणी पोटासाठी जगतात फक्त आणि फक्त माणूसच स्वार्थासाठी जगतो. म्हणून जवळ सर्व असूनही तो सर्वात असमाधानी,  दु:खी आहे. हे जीवन  खूप  सुंदर आहे. फक्त त्यात समाधानी राहिले पाहिजे. हे समाधान आपणास फक्त संत, ग्रंथच देऊ शकतात.

देहेरक्षणाकारणें यत्न केला | 

परी शेवटीं काळ घेवोनि गेला  |

करीं रे मना भक्ति  या राघवाची | 

पुढें अंतरीं सोडिं  चिंता भवाची || मनोबोध २६||

समर्थ सांगतात, त्या भगवंतावर विश्वास ठेवा; तो सर्वकाही करेल. देहाची काळजी करण्यापेक्षा रामाची भक्ती करा. त्याने तुझ्या देहाचे सार्थक होईल. समर्थ म्हणतात, “देवाच्या सख्यत्वासा|ठी | पडाव्या जिवालगांसी तुटी”  पण माणूस विषयातच रंगलेला दिसतो. खऱ्याखुऱ्या सुखाचा शोध संतांनी लावला आणि चाखलाही. देवाचे नामस्मरण देवासाठी नसून नरदेहाचे सार्थक होण्यासाठी आहे. समर्थ म्हणतात, 

तुला ही तनू मानवी प्राप्त झाली । बहू जन्मपुण्ये फळालागीं आली ।

तिला तूं कसा गोविसी विषयीं रे । हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।।

राममंत्र केवळ सोपा नसून अत्यंत प्रभावी व तारक आहे. “जगी धन्य होईजे रामनामे” असा रामनामाचा महिमा आहे. मानवा, हा नरदेह व्यर्थ जावू देऊ नको रे. त्याचे सार्थक केले तर “नराचा नारायण होशील” असे समर्थ निक्षून सांगतात.

आज विज्ञानाने नेत्रदीपक प्रगती केली आहे. त्याच्या सहाय्याने माणसाचे बाह्यजीवन सुखाचे दिसले तरी अंतर्यामी असमाधान, असुरक्षितता, अगतिकता, अशांती घर करून आहे, हे सत्य नाकारता येत नाही. केवळ मी, माझे अशा आत्मकेंद्रित वृतीत माणूस गुंडाळला गेला आहे. समाजातील हे चित्र समर्थांनी ४०० वर्षापूर्वी अवलोकिले. त्यांच्यातील लोकशिक्षक जागा झाला. “चिंता करितो विश्वाची” म्हणून त्यांनी लोकोध्दारासाठी स्वत:ला वाहून घेतले.

समर्थांनी नरदेहाचा वापर करून अवघ्या जगाचा संसार केला. कल्पांतापर्यंत मार्गदर्शन होईल असे वाङ्मय निर्माण करून लोकांना दिशा दाखवली, ती या नरदेहाच्या सहाय्याने. त्यांनी ग्रंथराज दासबोधात मानवी जीवनाची चिरंतन मूल्ये, हितोपदेश सांगितला आहे. म्हणून तो  कधीही कालबाह्य न ठरणारा “यावच्चंद्रदिवाकरौ” असा ताजातवाना ग्रंथ आहे व तो पुढेही मानवजातीस मार्गदर्शन करेल यात शंकाच नाही.

परमार्थीं तो राज्यधारी | परमार्थ नाहीं तो भिकारी |

या परमार्थाची सरी | कोणांस द्यावी || दा.१-९-२३ ||

मी देवच आहे असे समजून आत्मज्ञान करून घेतले तर या नरदेहाचे सार्थक होईल. हा मार्ग फक्त संतच दाखवू शकतात. हे काम राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींनी दासबोध रूपाने दाखवले. शेवटच्या दशकात शेवटी ते म्हणतात,

ग्रंथाचें करावें स्तवन | स्तवनाचें काये प्रयोजन |

येथें प्रत्ययास कारण | प्रत्ययो पहावा ||

वीस दशक दासबोध | श्रवणद्वारें घेता शोध |

मननकर्त्यास विषद | परमार्थ होतो ||

श्रीसमर्थ व श्रीहनुमंत ह्यांच्यातील भावबंध भाग दुसरा

आपल्या देशाटणाच्या काळात श्रीसमर्थांनी तत्कालीन समाजस्थितीचे सूक्ष्म अवलोकन केले होते. अस्मानी सुलतानी संकटाने पिचलेली, मदांध सत्तेच्या अन्यायाखाली भरडली जाणारी मराठी जनता पहाताना त्यांचं काळीज पिळवटून गेलं होतं. हया समाजाला धीर देऊन संघटित करण्याची नितांत गरज होती. म्हणूनच “धीर्धरा धीर्धरा तकवा | हडबडूं गडबडू नका” असे समजावीत “वन्ही तो चेतवावा रे | चेतविताचि चेततो” हया धारणेने श्रीसमर्थांनी लोक जागरणाची मशाल हाती घेतली. श्रीसमर्थांनी संघटनेचे कौशल्य आपल्या आराध्याच्या अर्थात श्रीरामचंद्रांच्या चरित्रातून घेतले व तेच पराक्रमाचे, आत्मविश्वासाचे स्फुलिंग समाजात जागविण्यासाठी त्या कोदंडधारी श्रीरामांचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला. चळवळीचे सामर्थ्य पटवून दिले. 

“सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें ||

परंतु येथें भगवंतांचे | अधिष्ठान पाहिजे ||”

हया दृढ धारणेनेच त्यांनी रामकथा “ब्रम्हांड भेदून पैल” नेण्याचा अखंड प्रयास केला. हया साऱ्या प्रयासात त्यांचा “कैवारी” होता श्रीहनुमंत. श्रीरामांचा अनन्य दूत.

“मनोजवं मारुततुल्यवेगं | जितेंद्रियं बुध्दिमतां वरिष्ठम् |

वातात्मजं वानरयूथमुख्यं | श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ||”

शक्ती, बुध्दी, युक्ति, त्याग, सेवा, श्रध्दा, साहस व निष्काम कर्मयोग अशा  अपूर्व गुणसमुच्चय असलेल्या श्रीहनुमंताचा आदर्श समोर ठेवून श्रीसमर्थ कार्य करीत होते. श्रीहनुमंतासारखेच सर्वांनी बलसंपन्न व्हावे म्हणून त्यांनी ठिकठिकाणी मारुती मंदिरे उभारली. अकराशे मठ व त्यावर अकराशे मठपतींची नियुक्ती केली. श्रीहनुमंताचाच धूर्तपणा व मुत्सददीपणा दाखवीत त्यांनी शिवाजीराजांना मदत केली. आपल्या शिष्यांच्या माध्यमांतून त्यांनी मोगल सत्ताधीशांच्या हालचालींच्या बित्तंबातम्या काढल्या, त्या गुप्त राखून शिवाजीराजांपर्यंत पोहोचविल्या. योग्य ती सल्लामसलतही केली. “राजकारण बहुत करावें | परंतु कळोंच नेदावें ||” इतक्या सावधपणे वागून त्यांनी संपूर्ण देशभर आपलं “नेटवर्क” उभारलं होतं.

परमप्रतापी, महाबली असूनही आपल्या बळाचा अहंकार श्रीहनुमंतांनी कधी केली नाही. तसेच सर्व सिध्दी प्राप्त असूनही त्या शक्तींचा उपयोग श्रीसमर्थांनी लोक कल्याणासाठीच केला. श्रीहनुमंताचा पराक्रम व दास्यभावाचं प्रतिक म्हणून श्रीसमर्थांनी “दासमारुती” व “वीरमारुती” अशा दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली आहे. गुरुपदाधिष्ठित होऊनही मारुतरायांसारखंच आपलं दास्यत्व श्रीसमर्थांनी कधीही सोडलं नाही. ते स्वत:ला “रामदास” म्हणवत व श्रीरामचंद्रांना “समर्थ” म्हणत.

आमचे कुळीं रघुनाथ | रघुनाथें आमुचा परमार्थ ||

जो समर्थांचाहि समर्थ  |  देवां सोडविता || दा. ६-७-२१||

  रघुनाथभजनें ज्ञान जालें  | रघुनाथभजनें  महत्व वाढलें | ६-७-३१||” 

हे रामभक्तीचे बळ  श्रीहनुमंतांनी दिले. म्हणून श्रीसमर्थ कृतज्ञतेने  म्हणतात, –

“हनुमंत आमुची कुळवल्ली | राममंडपा वेला गेली |

श्रीराम भक्तीने फळली  |  रामदास बोले या नांवे ||

आमुचे कुळीं  हनुमंत | हनुमंत आमुचे मुख्य दैवत |

तयावीण आमुचा परमार्थ | सिध्दीतें  न पवे सर्वथा ||

साहय आम्हांसी हनुमंत | आराध्य दैवत श्रीरघुनाथ |”

श्रीसमर्थांना, श्रीहनुमंताचे अनेक प्रसंगी साहय झाल्याचे दाखले मिळतात. कोणताही कठीण प्रसंग येवो, श्रीहनुमंत तेथे तत्परतेने हजर होत. बेदरला श्रीसमर्थ शिष्यांचे संरक्षण करण्यासाठी ते लगेच आले. पाडळी गावच्या मुस्लिम अंमलदाराला अददल घडविण्यासाठी त्यांनी गावालाच आग लावली. नंतर श्रीसमर्थांच्या विनंतीवरुन ती विझवलीही.

मसूरच्या पश्चिमेस चार मैलांवर उंब्रज गाव आहे. इथे श्रीसमर्थ चाफळ मुक्कामी असले की स्नानास जात. एकदा स्नान करतांना ते “बुडालो बुडालो” असे ओरडले. शिष्य मदतीला येण्यापूर्वीच मारुतीरायांनी खडकावरुन नदीपात्रात उडी मारली व श्रीसमर्थांना बाहेर काढले. एवढी त्यांची तत्परता असे. श्रीसमर्थ म्हणत,

बलभीम माझा सखा सहोदर | निवारी दुस्तर  तापत्रय |

ठेवा संचिताचा मम उघडला | कैवारी जोडला हनुमंत |

हनुमंत माझे अंगीचें कवच | मग भय कैचें दास म्हणे |

रामरायाला नैवेद्य अर्पण केल्या खेरीज श्रीसमर्थ अन्नग्रहण करीत नसत. कधी कधी त्यांचा सखा सहोदर श्रीहनुमंत त्यांच्या समवेत प्रसाद भोजन घ्यायला हजर असे. श्हापूरच्या सतीबाईंना हयाची प्रचिती आली होती. वामन पंडितांना देखील श्रीसमर्थांच्या जागीच श्रीहनुमंताचे दर्शन घडले होते.

श्रीहनुमंत हे अकरावे रुद्र आहेत. म्हणून अकरा हा आकडा श्रीसमर्थांचाही आवडता आहे. श्रीसमर्थांनी स्वत:चे शिक्षण फारच झटपट उरकले याबददल गिरीधरस्वामी म्हणत,

“समर्थें अकरा घडयात केले धूळाक्षर |

अकरा प्रहरात वळिले अक्षर |

अकरा दिवसे केला जमाखर्च सुंदर |

ब्रम्हांड कुलकर्ण चालवावया ||”

श्रीसमर्थांनी देशभरात अकराशे मठांची स्थापना करुन त्यानंतर अकराशे महंतांची निवड केली होती. त्यांनी ठिकठिकाणी मारुतरायाची मंदिरे स्थापन केली पण त्यातील अकरा मारुती विशेष प्रसिध्द आहेत. मिरजच्या मठपती श्रीसमर्थ शिष्या वेणास्वामी हयांनी अकरा मारुतींना एका अभंगात गुंफून त्यांना शब्दमाला अर्पण केली आहे त्या म्हणतात,

“चाफळामाजी दोन उंब्रजेसी एक |

पारगांवी देख चौथा तो हा ||१||

पांचवा मसुरी, शहापुरी सहावा |

जाण तो सातवा शिराळयांत ||२||

सिंगणवाडी आठवा मनपाडळे नववा |

दहावा जाणावा माजगावी ||३||

बाहयांत अकरावा येणे रीती गावा |

सर्व मनोरथा पुरवील ||४||

वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास |

कीर्ती गगनात न समावे ||५||” 

श्रीसमर्थांनी श्रीहनुमंताची जी स्तुती स्तोत्रे रचली आहेत ती जवळजवळ पंचवीस आहेत पण त्यातील अकरा स्तोत्रे विशेष प्रसिध्द आहेत.

त्यातील “फणिवर उठविला” हया स्तोत्रात श्रीसमर्थ श्रीहनुमंतास आर्ततेने म्हणतात –

“तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे |

म्हणउनि मन माझें रे तुझी वा पाहे |

मज तुज निरविलें पाहिजे आठवीलें |

सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें ||”

श्रीसमर्थ आणि श्रीहनुमंत हयांच्यातील भावबंध असे गहिरे आहेत. दृढ भावभक्तीने भारावलेले आहेत.

नुकतीच एक लौकिक कथा ऐकायला मिळाली. श्रीसमर्थांनी भीमरुपी महारुद्रा हे सुप्रसिध्द स्तोत्र रचण्यास सुरुवात केली तेव्हा प्रत्यक्ष श्रीहनुमंत समोर प्रकट झाले. जसजशी स्तोत्ररचना होत होती तसतसे श्रीहनुमंत श्रीसमर्थांच्या निकट येत होते व स्तोत्र समाप्त होते वेळी ते श्रीसमर्थांच्या देहात लुप्त झाले.

हया लौकिक कथेत सत्यांश किती हा मत मतांतराचा भाग असू शकतो पण श्रीहनुमंत व श्रीसमर्थ हयांच्यात किती अद्वैत होतं किंवा उत्कट भावबंध होता हे मात्र हया कथेतून अधोरेखित होतेच होते!

|| जय जय रघुवीर समर्थ ||

श्रीसमर्थ व श्रीहनुमंत ह्यांच्यातील भावबंध भाग पहिला

 धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार |

जाले आहेत पुढें होणार | देणें ईश्वराचें ||

श्रीसमर्थांच्या जीवनात ह्या उक्तीची सत्यता शतप्रतिशत पटते. मराठवाड्यातील जांब ह्या छोट्याशा खेड्यात रहाणाऱ्या, गावच्या कुलकर्णीपणाचे वेतन सांभाळणाऱ्या, अतिशय भाविक वृत्तीच्या सूर्याजीपंत ठोसर व त्यांच्या पत्नी राणूबाई यांचे दुसरे अपत्य ‘नारायण’ म्हणजेच आपले सदगुरु श्रीसमर्थ रामदासस्वामी होत. त्यांच्या घराण्यात २४ पिढयांपासुन सूर्योपासना व श्रीरामोपासना केली जात होती. अशा पवित्र, तपस्वी घराण्यातच असे थोर महात्मे जन्माला येतात. म्हणूनच म्हणतात “शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी”!

चैत्र शुध्दनवमी, श्रीरामजन्मोत्सवाच्या वेळेचा मुहूर्त साधून श्रीरामरायाच्या या शिष्योत्तमाने भूतलावर जन्म घेतला. सूर्याजीपंतांना त्याच्या जन्माचा संकेत आधीच मिळाला होता. सूर्याजीपंतांच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेल्या सूर्यनारायणाने त्यांना वर दिला होता, मदंशे करुन व मारुति अंशेकरुन असे दोन महान भगवत्भक्त पुत्र होतील. प्रथम पुत्र गंगाधर तीन वर्षापूर्वी लाभला होता आणि आता मारुतीचा अवतार असलेल्या ‍व्दितीय पुत्राने श्रीरामजन्माचाच मुहूर्त साधला होता. सूर्याजीपंतांचं जीवन सुफळ झालं होतं. कृतार्थ बनलं होतं. श्रीसमर्थ मारुतीचेच अवतार आहेत असे म्हणायला सबळ पुरावे आहेत. मारुतीरायांची युगायुगांची परंपरा सांगणारा एक सुंदर श्लोक भविष्योत्तर पुराणात आहे.

कृतेतु मारुताख्यश्च त्रेतायां पवनात्मज |

द्वापारे भीमसंज्ञश्च रामदासे कलौयुगे ||

समर्थप्रताप, दासविश्रामधाम व बखरीत हीच विचारधारा दृढतेने मांडली गेली आहे. बालपणीचा चंचल व हूड स्वभाव, फळफळावळीची विशेष आवड, अंगी वैराग्यचिन्हे ही सारी मारुतीची लक्षणे त्यांच्या ठायी एकवटली होती. दोघांचं आराध्यदैवत एकच श्रीरामचंद्र!

श्रीहनुमंत व श्रीसमर्थ यांच्यातील हा भावबंध. श्रीसमर्थांना अगदी लहानपणीच एका अदभुत प्रसंगातून तो  जाणवला. एकदा सूर्याजीपंत श्रीसमर्थांना म्हणजेच नारायणाला घेऊन नदीवर स्नानासाठी गेले होते, तेव्हा एक वानर दूत वेषाने तेथे आले व नारायणास घेऊन गावाबाहेर गेले. तेथे श्रीरामचंद्र व सीतामाई एका पालखीत बसले होते. श्रीरामांनी नारायणाला जवळ बोलाविले. त्याला “अहं ब्रम्हास्मि” हया महावाक्याचा उपदेश केला. श्रीहनुमंताकडे वळून श्रीरामचंद्र म्हणाले, “हनुमंता, यापुढे याला व याच्या परंपरेला सर्वस्वी सांभाळावे” अशी आज्ञा करुन नारायणाला श्रीहनुमंताच्या स्वाधीन करुन श्रीरामचंद्र व माता सीता अंतर्धान पावले. त्या क्षणापासून श्रीहनुमंतांनी नारायणावर आपले कृपाछत्र धरले. ह्याचे सुंदर वर्णन करतांना दिनकरस्वामी म्हणतात, महावाक्य उपदेशूनि त्वरित | हनुमंतासि निरविले || निरवणे म्हणजे एखाद्यावर जबाबदारी सोपविणे.

श्रीसमर्थ व श्रीहनुमंत हयांच्यातील भावबंध स्पष्ट करणारी दुसरी कथाही  सांगितली जाते –

नारायणाचा उपनयन संस्कार झाल्यावर त्याला श्रीरामाचा अनुग्रह घ्यायची ओढ लागली. त्याने वडिल बंधूंना अनुग्रह देण्याबद्दल विनवले पण त्यांनी “तू अजून लहान आहेस, अंमळ धीर धरावा” असा सबुरीचा सल्ला दिला. परंतु नारायणाच्या मनातील रामदर्शनाची उत्कट इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. अखेरीस गांवाबाहेरच्या मारुती मंदिरात त्याने आसन मांडले. तीन दिवस तीन रात्री त्याने श्रीहनुमंताचा धावा केला. अखेर श्रीहनुमंत प्रकट झाले. त्यांनी “काय हवे?” विचारल्यावर श्रीरामप्रभूंच्या दर्शनाची उत्कट इच्छा असल्याचे त्याने सांगितले. श्रीहनुमंतांनी श्रीरामचंद्रांची प्रार्थना केली श्रीरामचंद्र प्रकट झाले व “कशास ध्यान केले?’’ असे श्रीहनुमंतांना विचारल्यावर श्रीहनुमंत म्हणाले, “मदंशेकरुन धर्मस्थापनेसाठी ह्या नारायणास आपण निर्माण केले आहे. तरी आता यास अनुग्रह द्यावा.” श्रीरामचंद्रांनी नारायणास मंत्रोपदेश दिला. पूजेसाठी बाण, जपासाठी माळ, हुर्मुजी रंगाचे वस्त्र, व त्रयोदशाक्षरी मंत्र दिला, व “कलिच्या प्रथम चरणात म्लेच्छांचे वर्चस्व सुरु होईल तेव्हा कृष्णातीरी राहून सांब अंशेकरुन उत्पन्न झालेल्या शिवनाम राजास मंत्रोपदेश द्यावा व धर्मस्थापनेसाठी सहाय्य करावे”, अशी कार्याची रुपरेषाही सांगितली. नारायणास “रामदास” हे नाव देऊन त्याला श्रीहनुमंताच्या स्वाधीन करुन श्रीरामचंद्र अंतर्धान पावले.  त्याक्षणापासून श्रीहनुमंत व श्रीसमर्थ ह्यांच्यात अतूट भावबंध निर्माण झाले.

स्वधामासी जाता महारामराजा |

हनुमंत तो ठेविला याची काजा |

सदा सर्वदा रामदासासी पावे |

खळी गांजिता ध्यान सांडुनी धावे ||

याचा प्रत्यय श्रीसमर्थचरित्रात पुन:पुन्हा आलेला आहे. “आई, चिंता करितो विश्वाची” असे उद्गार बालपणीच आईसमोर काढलेल्या लहान नारायणाला संसार- प्रपंच ह्याबद्दल ओढ नव्हतीच. केवळ आईच्या आग्रहाखातर “बोहोल्यावर चढेन” असे अभिवचन त्याने आईस दिले आणि ते पाळलेही! भटजींचा “शुभ मंगल  साsवधान” हा उच्चारवाने म्हटलेला मंत्र नारायणाच्या कानांत शिरला मात्र, त्याने लग्नमंडपाबाहेर धांव घेतली. कुणाच्या हाती पडू नये म्हणून एका उंच वृक्षावर चढून तीन दिवस तीन रात्री तो तिथेच बसून होता. चौथ्या दिवशी रामरायाने आपल्या वास्तव्याने पावन केलेल्या पंचवटी क्षेत्राकडे जाण्यास  तो निघाला. छोटा जीव दमायचा. त्यावेळी वेष पालटून मारुतीरायाने खायला आणून द्यावे. धीर द्यावा. नारायण नाशिकला पोहोचला. रामरायाचे दर्शन घेतले अन गावापासून थोडे दूर गोदावरी-नंदिनीच्या संगमाजवळ असलेल्या टाकळीतील एक गुंफा त्याला पसंत पडली. गोदावरी-नंदिनीच्या संगमात उभे राहून तेरा कोटी रामनामजप व गायत्री पुरश्चरण करायचे त्याने निश्चित केले.

उपासनेचा मोठा आश्रयो | उपासनेविण निराश्रयो |

उदंड केलें तरी जयो | प्राप्त नाहीं ||

टाकळीला राहून नारायणाने बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. ह्या संपूर्ण काळात वानररुपात उपस्थित राहून मारुतीरायाने त्याची सर्वतोपरी काळजी घेतली असे उल्लेख आहेत.

दशकपंचकच्या कुलकर्ण्यांचे प्रेत उठवून, त्यांना रामरायाच्या कृपेने जे नवजीवन नारायणाने मिळवून दिले, या चमत्कारानंतर लोक त्यांना कमालीच्या आदराने वागवीत. ते त्यांना “समर्थ” म्हणू लागले. कुलकर्णी दाम्पत्याने आपला पहिला पुत्र श्रीसमर्थांच्या चरणावर ठेवला.  श्रीसमर्थांना लाभलेला हा पहिला शिष्य उध्दव आणि त्याच्यासाठीच स्वहस्ते गोमयाने बनविलेला “प्रताप मारुती” हा श्रीसमर्थांनी स्थापन केलेला पहिला मारुती. इथे स्थापलेला मठ हा पहिला मठ व पहिला मठपती उध्दव. “टाकळी” ही श्रीसमर्थांची तपोभूमी तर आहेच पण त्यांच्या कार्याची मुहूर्तमेढही इथल्या पहिल्या मठाने झाली. म्हणून टाकळी हे साऱ्या समर्थभक्तांचं पावन स्थान!

बारा वर्षांचे तप, पुरश्चरण पूर्ण करुन उध्दवास टाकळीला ठेवून श्रीसमर्थ भारत भ्रमणास निघाले. हृदयस्थ श्रीहनुमंत होतेच, मनात उदंड श्रध्दा होती.

नांव मारुतीचे घ्यावे | पुढे पाऊल टाकावे ||१||

अवघा मुहूर्त शकून | हृदयी मारुतीचे ध्यान ||२||

जिकडे तिकडे भक्त | पाठी जाय हनुमंत ||३||

राम उपासना करी | मारुती नांदे त्याचे घरी ||४||

दास म्हणे ऐसे करा | सदा मारुती हृदयी धरा ||५||

भारत भ्रमण करीत श्रीसमर्थ काशीस विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेले. पुजाऱ्याने आत जाण्यास मज्जाव केला. श्रीसमर्थ परत फिरले. इकडे पुजाऱ्याला महादेवाची पिंडीच दिसेना. महादेवांचा आदेश झाला, “तू ज्याला परत पाठविलेस तो मारुतीचा अवतार आहे. त्यास शरण जा”.  पुजारी धांवत आला त्याने श्रीसमर्थांचे पाय धरले. त्यांना आदराने मंदिरात आणले. त्यांचा अनुग्रह घेतला. काशीच्या हनुमंत घाटावर श्रीसमर्थांनी श्रीहनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली. श्रीसमर्थ हिमालयात आले. ब्रदीनारायण, बद्रिकेदार दर्शनानंतर ते तेथील श्वेत-मारुतीच्या दर्शनाला गेले. श्रीसमर्थांना हिमालयातल्या थंडीवाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून श्रीहनुमंतांनी त्यांना वल्कले, टोप, मेखला, कुबडी, जपमाळ इ. वस्तू दिल्या. ते दक्षिणेकडे रामेश्वराच्या दर्शनाला गेले तेव्हा चिरंजीव मारुतीराय त्यांना घेऊन लंकेस चिरंजीव बिभीषणाच्या भेटीला घेऊन गेले. आपल्याकडे सप्त चिरंजीव प्रसिध्द आहेत. 

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः |

कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीविन: ||

चिरंजीव बिभीषणाने दोघांचे उत्तम स्वागत केले. रामभक्तांचे असे त्रिकुट जमले अन त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तीर्थाटन पूर्ण झाले. श्रीसमर्थांनी तीर्थाटनाचा सर्व वृत्तांन्त श्रीरामरायांना सादर केला. तीर्थाटनाचे पुण्य श्रीरामचरणी अर्पण केले आणि श्रीरामरायाच्या आज्ञेनुसार ते कृष्णातीरी अर्थात आपल्या कर्मभूमीकडे निघाले.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

दासबोधात प्रतीत होणारी ईश्वर संकल्पना :- उगम विस्तार आणि विकास….

सनातन धर्म, वैदिक हिंदू संस्कृतीत ईश्वर ही संकल्पना महत्वाची आहे. पूजनीय, चिंतनीय आहे. ईश्वर म्हणजे सृष्टी निर्माता, रक्षणकर्ता, संचालक आणि विनाशकर्ता अशी संकल्पना आहे. (ईश म्हणजे राज्य व नियंत्रण करणे + वर) विश्वाचा निर्माता, त्याचे आणि आपले सत्य स्वरूप काय ? त्या जग नियंत्याचा-विश्वाचा-माझा संबंध कसा आहे ? ही जिज्ञासा माणसाला आहे. तो कार्यकारण भाव समजून घ्यायचा आहे.ही संकल्पना ग्रंथराज दासबोधात निरनिराळ्या टप्प्यावर कशी विकसित होत गेली आहे हे पहाणे उद्बोधक ठरेल.

ईश्वराचे विस्मरण झाले म्हणून जन्म घ्यावा लागला. जीवाला मीपणा चिकटला. ज्यांनी ईश्वर समजून उमजून आपलासा केला ते भाविक निजसुखाचा स्वानंद सोहोळा उपभोगतात असे समर्थ सांगतात. ईश्वराची शक्ती म्हणजे माया. तिची निर्मिती म्हणजे हे दृश्य विश्व, जे प्रत्यक्ष दिसते. (माया हे अनादि असे| शक्ती ईश्वराची | ८-२-२९) आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण लागते म्हणून समर्थ इथे हा दाखला देत आहेत. परब्रह्माच्या ठिकाणी जे स्पंदन उठले त्याला, त्या ‘अस्तित्व’ जाणीवेलाच, ‘माया किंवा ईश्वर’ म्हटले गेले आहे (मायाब्रह्मीं जो समीर | त्यांत जाणता तो ईश्वर १०-४-१६). मूळ मायेत त्रिगुण सूक्ष्म अव्यक्त दशेत होते. पुढे त्या गुणांना व्यक्त स्वरूप आले. त्रिगुण भेदातून ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव उत्पन्न झाले. (तोचि ईश्वर गुणासी आला | त्याचा त्रिगुणभेद जाला |१०-४-१७). निर्माता, पालनकर्ता आणि विनाशकर्ता अशी ही कर्म विभागणी झाली. सृष्टी उत्पत्ती, स्थिती व लय ही व्यवस्था सुरु रहावी या परब्रह्माच्या इच्छेनुसार ही व्यवस्था झाली. त्रिगुणात्मक ईश्वरापासून ही पंचमहाभूतात्मक सृष्टी झाली. त्यातील तमोगुणापासून आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही तत्वे निर्माण झाली. या तत्वांच्या मिश्रणाने सारे दृश्य आकारास आले. (पंचीकरण) “वायोमध्यें जाणीव गुण | तेंचि ईश्वराचें लक्षण | तयापासून त्रिगुण | पुढें जाले || १०-९-११ ||”

वायू म्हणजे स्पंदन. वा-याची झुळूक. विद्युत लहर हे स्पंदनाचे परिचित असे शक्ती स्वरूप आहे. त्या शक्तीला स्वत:ची जाणीव नाही. तिचा वापर सृजनासाठी आणि विनाशासाठीही होउ शकतो. तो कसा व्हावा हे ठरवणारी ‘नियामक सत्ता’ म्हणजे ईश्वर. ही सत्ता अदृश्य आहे (ऐसा जो गुप्तेश्वर | त्यास म्हणावें ईश्वर |११-८-५). तिला ईश्वर म्हटले आहे. सृष्टीत जे जे वैविध्य दिसते ते सारे कोणाचे ऐश्वर्य आहे तर ते ईश्वराचे आहे. राज्याची सारी मालमत्ता, ऐश्वर्य राजाचे असते तसे. राजसत्ता त्याच्यात एकवटलेली असते. आपण राजाचे उदाहरण जरी घेतले तरी तो वेषधारी आहे, देहधारी आहे. त्याच्या सत्तेला सामर्थ्याला मर्यादा आहे. ईश्वराची सत्ता ही कितीतरी मोठी आहे. अमर्याद आहे हे लक्षात घ्यायचे आहे. (ईश्वराची बराबरी | कैसा करील वेषधारी |१२-७-२०) या सत्तेची विभागणी ध्यानात यावी म्हणून समर्थ सांगतात..

पिंडीं देहधर्ता जीव | ब्रह्मांडीं देहधर्ता शिव |

ईश्वरतनुचतुष्टये सर्व | ईश्वर धर्ता |(१३-१-२४)

शरीरात सत्ता आत्म्याची, ब्रह्मांडात म्हणजे विश्वात शिवात्मा हे चैतन्य तत्व आहे. विराट हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया यांना ‘ईश्वर तनु चतुष्टय’ म्हटले आहे. (पिंडाचे स्थूल; सूक्ष्म; कारण; महाकारण असे चार देह कल्पिले आहेत.) ब्रह्मांडाचे चार देह व त्यांना धारण (धर्ता) करणारा तो ईश्वर असा हा विचार समर्थ मांडतात. 

आत्ता पर्यंत आपण ब्रह्मा; विष्णू; महेश हे त्रिगुणात्मक ईश्वरी स्वरूप पाहिले. इथे समर्थ आणखी पुढे नेत त्रिगुणा ‘पर्ता’ म्हणजे या व्यक्त ईश्वरा पलीकडे जी सत्ता आहे, त्याकडे निर्देश करतात. अर्धनारी नटेश्वर, माया-ब्रह्म, शिव-शक्ती असेही त्या चैतन्याला म्हणतात. तिथून सृष्टीचा विस्तार झाला. “त्रिगुणापर्ता जो ईश्वर | अर्धनारीनटेश्वर | सकळ सृष्टीचा विस्तार | तेथून जाला ||१३-१-२५||”

निर्गुण निराकार परब्रह्म, त्यात ‘एकोSहम’ असे झालेले स्फुरण ही मूळ माया. ती परब्रह्मा इतकीच अव्यक्त आहे; पण परब्रह्माला नसलेली जाणीव मूळ मायेत आहे. मूळ माया त्या स्फुरणाला/संकल्पाला (मी एक आहे, बहु व्हावे) प्रत्यक्षात आणण्यासाठी शक्ती ‘कार्यान्वित’ करते. मूळ मायेत सूक्ष्म; सम असलेले गुण, व्यक्त दशेला येताना त्यांचा समतोल ढळतो. त्याला ‘गुणक्षोभिणी माया’ असे म्हटले आहे. त्रिगुण म्हणजे सत्व-रज-तम व्यक्त दशेत आले की त्यांना आपण सगुण साकार रूपात  ब्रह्मा-विष्णू-महेश या स्वरूपात जाणतो. आपण ‘सगुण’ आहोत, म्हणून आपण तशी ‘कल्पना’ करतो हे समर्थ सांगतात. 

मी तूं हा भ्रम | उपासनाहि भ्रम |

ईश्वरभाव हाहि भ्रम | निश्चयेंसी || १०-६-११ ||

समर्थ आपल्याला कोणत्याही संकल्पानेबाबत ‘जरासाही’ भ्रम बाळगू देत नाहीत. ज्याची ज्याची कल्पना करतो ते सारे मायिक !! असे समर्थ सांगतात. त्या पर्ता तो ‘खरा’ ईश्वर, ‘थोरला देव’.ईश्वर आपली सत्ता कशी राबवतो ? 

ईश्वरी गुण असलेले ‘अवतार’ उत्पन्न करून ईश्वर हे कार्य अव्याहत चालवतो. उदाहरणार्थ – समर्थांचे उपास्य दैवत म्हणजे हनुमंत. (हनुमंत ईश्वरी अवतार | याचा पुरुषार्थ सुरवर |  पाहातचि राहिले || १६-६-२९) रामांचा बहिस्थ प्राण म्हणून त्याने राम लक्ष्मण यांचे संकटात रक्षण केले. रावणासारख्या खल पुरुषाचे सैन्य-पुत्र-बंधू यांच्यासहित विनाश करण्यात हनुमंताने ‘अतुलनीय’ योगदान दिले. हे ईश्वरी शक्तीचे विराट प्रदर्शन होते. ईश्वराचे अस्तित्व, महानत्व आपल्याला अशा प्रसंगातून व उदाहरणातून जाणवते. रावणाने सर्व देवांना बंदी बनवून ठेवले होते. त्यांना हलकी कामे दिली होती. हनुमानाच्या विराट पराक्रमामुळे सर्व देव सुखावले. ज्यांनी ज्यांनी धर्म स्थापनेसारखे उदात्त कार्य हाती घेतले आणि तडीस नेले, त्यानां सुद्धा ईश्वरी अवतार मानले जाते. (श्रीराम, कृष्ण, शिवाजे राजे)

“यदा यदा हि धर्मस्य…” या भगवंताच्या वचनानुसार हे ईश्वरी अवतार होत असतात.  (धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार || १८-६-२०) जे जे धर्म स्थापना करतात, उत्तम गुणांचे चाहते असतात व अनेक गुण धारण करून असतात, विवेकी असतात; पुण्यवान असतात ते ‘ईश्वरी कृपेस’ पात्र झालेले असतात. ते आपल्यासाठी ‘ईश्वर स्वरूपच’ असतात असे समर्थ सांगतात. 

सकळ करणें ईश्वराला | म्हणोनी भेद निर्माण केला |

ऊर्धमुख होतां भेदाला | ठाव कैंचा |(२०-८-१६)

हेतू – ईश्वराला ही सकळ सृष्टी रचायची होती व ती सुविहित चालावी म्हणून एवढे भेद, एवढी विविधता त्याने निर्माण केली. मूळ स्वरूपापाशी कसलाच भेद नाही. प्रकृतीपुरुष, शिवशक्ती आणि शड्गुणईश्वर हे सारे मूलत: एकच आहे. हे ऐक्य आपण समजून घेतले की काही भ्रम रहात नाही. तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे | शिवशक्ती वोळखिजे | शड्गुणईश्वर बोलिजे | तया कर्दमासी || २०-९-२६ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

संगत्याग

संगत्याग आणी  निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तही येकरूप ।। ४-४-८ ।।

परमार्थ शास्त्रामध्ये ‘संग’ शब्द फार व्यापक अर्थाने आलेला आहे. सर्वच संतांनी संगाचे स्वरूप, मर्यादा व परिणाम आपल्या वाङ्मयातून विस्तृतपणे मांडलेले आहेत. संग म्हणजे काय? संगत्याग कसा करायचा?, त्याने काय साध्य होते? या प्रश्नांचा सखोल विचार करीत गेल्यावर असे लक्षात येते की, मनुष्याला जीवनात शांती, समाधान हवे असते. जन्मभर त्यासाठी तो धडपडत असतो. परंतु नक्की काय करावे? म्हणजे त्याचा अनुभव येईल हे त्याला उमगत नाही. त्यासाठी मुळातूनच संगत्यागाचा विचार करणे गरजेचे आहे. संग हा शब्द ‘संज’  धातूपासून बनला आहे. संज म्हणजे चिकटणे. कोणत्याही दोन घटकांचा जेव्हा संबंध येतो तेव्हा त्याला ‘संग’ असे म्हणतात. संग या शब्दाचे एकत्र येणे, संयोग, संबंध, मैत्री, आसक्ती असे अर्थ निर्वाण लघुकोशात दिलेले आहेत. ज्याच्या संगतीत आपण राहतो, मग ती व्यक्ती, वस्तू किंवा पदार्थ यापैकी काहीही असले तरी त्यांची संगत आपल्या शरीरावर व मनावर परिणाम करते हा जीवनाचा नियमच आहे. जसे, हातात कात्री घेतली तर काहीतरी कापावेसे वाटेल, या उलट हातात जपमाळ घेतली तर मुखाने नामच घ्यावेसे वाटेल हा झाला संगाचा स्थूल परिणाम. अशाच प्रकारे सकाळी एखादे गाणे ऐकले तर दिवसभर ते गाणे मनात रेंगाळत राहते हा झाला संगाचा सूक्ष्म परिणाम. म्हणजे संगाशिवाय व्यवहारिक जीवन चालूच शकत नाही. संग हा संसर्गजन्य आहे. संपर्कात आलेल्या वस्तू लगेच आपले गुणधर्म एकमेकांवर लादतात. त्याचे विपरीत परिणाम आपण अनुभवतो. 

संगाचे प्रामुख्याने दोन प्रकार होतात – १) बाह्य संग २) अन्तःसंग.

१) बाह्य संग म्हणजे दृश्य, स्थूल वस्तूंचा, पदार्थाचा किंवा व्यक्तीचा संग. उदाहरणार्थ –  घरदार, बायका-मुले, संपत्ती व सर्व व्यवहारिक गोष्टींचा संग. संगाला कमीत कमी दोन जण लागतात.  मग ती व्यक्ती असो की वस्तू किंवा पदार्थ असो. ह्या बाह्य गोष्टींपासून सुख मिळेल अशी जीवाची धारणा असते. त्यामुळे देहाला मिळणारे सुखच खरे सुख मानून त्यासाठी विषयसुख देणाऱ्या साधनांचा संग्रह करण्यात मनुष्य आयुष्य घालवतो. यातून वासनांचे गाठोडे तयार होत जाते व जीव जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडतो. येथे श्रीसमर्थ सांगतात-  

संसारसंगें सुख जालें । ऐसें देखिलें ना ऐकिलें ।

ऐसें जाणोन अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ।। ५-३-१०१ ।।

जीव मूळचा सच्चिदानंदस्वरूप असूनही अज्ञानामुळे तो स्वतःला देहापुरताच सीमित समजतो व दुःख भोगतो. यासाठी संत साधकाला ‘परिसंग सोडून सुखी राहावे’ असा उपदेश करतात.

संग सोडायचा म्हणजे दृश्य जगातले सर्व सोडून दूर कुठेतरी लांब निघून जायचे असे नाही, तर आसक्ती; ममत्व; स्वामित्वाच्या भावनेतून मनाने सुटले पाहिजे. वस्तूंचा त्याग करणे एक वेळेस सोपे आहे, परंतु मनाने ज्या गोष्टी धरून ठेवलेल्या आहेत; मग त्या अनुकूल असो अथवा प्रतिकूल असो; त्यांचा त्याग करणे अवघड असते. कारण मनाने या सर्व गोष्टींचा वर्षानुवर्ष संग केलेला असतो. म्हणून मनाची गुंतवणुक ही मोठी त्रासदायक असते.  यासाठी श्रीसमर्थ म्हणतात – मना सर्वही संग सोडून द्यावा..  

२) अंतःसंग – ममत्व, आसक्ती, अहंता, कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादींची जाणीव हे अंतःसंगाचे मुख्य घटक आहेत. स्वरूपाचा व अज्ञानाचा संबंध आला की जीव ‘मी’ म्हणजेच देह असे समजतो. माझेपणाची व्याप्ती देहापासून सुरू होऊन देह संबंधाने येणाऱ्या स्थूल गोष्टी, तसेच अंतःकरण संबंधाने येणाऱ्या सूक्ष्म गोष्टी म्हणजे माझे मन, माझी बुद्धी, माझे चित्त इत्यादी पर्यंत वाढत जाते. अहंता म्हणजे स्वतः विषयीच्या विशेष जाणिवा. जसे, मी बुद्धिमान, मी कर्तव्यदक्ष, मी सुगरण इत्यादी. अशा अहंतेचा संबंध तोडणे म्हणजे संगत्याग होय. संगत्यागाशिवाय परमार्थ साधत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात –

”न करी रे संग। राही रे निश्चळ ।

लागो नेदी मळ । ममतेचा ।”

संगत्याग कसा करायचा याचे मार्गदर्शन करतांना संत आपल्याला आत्मानात्मविवेक करायला सांगतात. ‘यदृष्टं तं नष्टं’ या नियमाप्रमाणे जे जे काही निर्माण होते ते सर्व नाश पावते. मग संग विनाशी वस्तूंचा करायचा की अविनाशी परब्रह्माचा करायचा हे साधकाने ठरविले पाहिजे. श्रीहंसराज स्वामी आपल्या ‘आगमसार’ या ग्रंथात संगत्यागाचे वर्णन करताना म्हणतात –

 ”संग म्हणिजे मीपण । जें मुक्तपणाचे बंधन ।

तेंचि सांडील्या वाचून । संगत्याग कैसा ।।

दीप-कापुरा मिळणी । कापूर जाता जळूनी ।

ज्योती काजळी दोन्ही । किमपी उरेना ।।

तैसे अज्ञान स्वानुभव ज्ञाने । जाळून आपण लया जाणे ।

अनुभवेंवीण जें का असणे । हाची संगत्याग ।। ”

मी व माझेपणाचा कल्पनेने धरून ठेवलेला संग सोडल्याशिवाय जीव देहासकट सर्व दृश्य व विनाशी  वस्तूंच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. जसे, अग्नी व कापुराचा संबंध आला की कापूर क्षणभरात जळून जातो. तेथे ज्योत किंवा काजळी काहीही मागे उरत नाही. त्याचप्रमाणे एकदा का आत्मज्ञान झाले की देहबुद्धी नष्ट होते, व मी ब्रम्हाचा अनुभव घेतला असे म्हणायलाही कोणी शिल्लक राहत नाही. कारण अनुभव म्हटलं की द्वैत आले. जोपर्यंत साधकाचा द्वैताचा निरास करण्याचा प्रयत्न चालू आहे, तोपर्यंत जीव; आत्मा व ब्रह्म हे तिन्ही एकरूप आहेत असा अनुभव येत नाही. व्यवहाराच्या दृष्टीने जेव्हा कशाचा तरी, कुणाला तरी आणि काहीतरी अनुभव येतो. तेंव्हा तेथे अनुभव, अनुभविता आणि अनुभवी अशी त्रिपुटी उत्पन्न होते. मी संगत्याग करतो हा अनुभव त्रिपुटीतच मोडतो. म्हणून त्रिपुटीमध्ये आत्मानुभव नसतो. 

मानवी जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे जीवनमुक्ती. ते साध्य करण्यासाठी काय करायचे हे सांगतांना आद्य शंकराचार्य म्हणतात – 

” सत्संगत्वे निस्संगत्वं, निस्संगत्वे निर्मोहत्वम् ।

निर्मोहत्वे निश्चलतत्वं, निश्चलतत्वे जीवनमुक्तिः ।। ”

सज्जनांच्या संगतीत राहिले की, संसाराबद्दलची आसक्ती क्षीण होते. त्यामुळे मोह मायेचा नाश होतो. मोह नष्ट झाला की चित्त शांत व स्थिर होते व अश्या निश्चल चित्तामध्ये जीवनमुक्तीचा अनुभव येतो. असे जीवन्मुक्त असणे हीच अत्यंत संगरहित असण्याची खूण आहे.

आनंदवनभुवनाची ३५० वर्षे

दिनांक ६ जून, २०२३ ला तारखेने श्रीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या  राज्याभिषेक सोहळ्याने ३५० व्या वर्षात पदार्पण केले. शालिवाहन शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, सन १६७४ प्रात:समयी ५ वाजून ४० मिनिटांनी राजे अर्थात सकल जनांचा लाडका शिवाजीराजा सिंहासनाधीश्वर होणार होता. असे ठरले होते की, प्रात:समयी ५ वाजून ४० मिनिटांनी स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यावर तोफांचे आवाज दिले जातील आणि शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेक समयी जी पदवी धारण केली होती तिचा प्रत्येक किल्ल्यावर जयघोष होईल. समर्थ आणि गिरिधरस्वामी प्रात:समयी ५ वाजता तुळजाभवानी मंदिरात आले. त्यांनी भवानी मातेचे पूजन केले. सर्वांगाचे कान करून तोफांचे आवाज आणि छत्रपतींचा जयघोष ऐकण्यासाठी समर्थ आणि स्वतः तुळजाभवानी उत्सुक होती. ‘तुझा तू वाढवी राजा ! शीघ्र आम्हांस देखता !’ ही समर्थांची प्रार्थना भवानी मातेने पूर्ण केली होती. प्रात:समयी पाच वाजून चाळीस मिनिटे झाली. राजे सिंहासनारूढ झाले. एक-दोन नाही तर तब्बल ३६० गडांवरून तोफा कडाडल्या. समर्थांच्या कानावर ललकारी पडली. “महाराज….सिंहासनाधीश्वर…प्रौढ प्रताप पुरंदर… क्षत्रिय कुलावतंस…. राजा श्रीछत्रपती शिवाजी महाराज !” सर्वांगाचे कान करून समर्थ ऐकत होते त्याचे अंतःकरण उचंबळून आले आणि त्यांना काव्य स्फुरले..

स्वप्नी जे देखिले रात्री । ते ते तैसेची होतसे ।।

हिंडता फिरता गेलो । आनंदवनभुवनी ।।७।।

बुडाले सर्वही पापी । हिंदुस्थान बळावले ।।

अभक्तांचा क्षयो झाला । आनंदवनभुवनी ।।२८।।

हे काव्य ५९ कडव्यांचे आहे. “आनंदवनभुवनी” हे काशीचे पौराणिक नाव आहे. सातव्या कडव्यांत जे वर लिहिले आहे, त्यात काशीच्या स्वप्नाचा उल्लेख आहे. काशीला पडलेले स्वप्न खरे झाले म्हणून झालेला आनंद तो “आनंदवनभुवन” होय.

खरं सांगायचं तर या राज्याभिषेकानंतर ६ जून २०२३ ला साडेतीनशे वर्षे झाली, आणि राज्याभिषेक झाला त्यावेळी ३५० वर्षांचं पारतंत्र्याचं सुतक फिटलं होतं. सारी दु:खं, विषण्णता, नैराश्य लयाला गेलं होतं. हिंदुहृदयांना एक सम्राट मिळाला होता. नव्या जीवनाचा साक्षात्कार सर्वांना झाला होता. न्यायासाठी, संरक्षणासाठी, सुखदुःखे सांगण्यासाठी, हवे ते हक्काने मागण्यासाठी, ममतेचे, समतचे, उदार आणि बलाढ्य सिंहासन निर्माण झाले. सावलीसाठी विशाल क्षेत्र उघडले गेले. महाराष्ट्रात आनंद संवत्सर उगवले. सृष्टीही आनंदाने डोलली. सह्याद्रीला हर्षवायू झाला. तर असा हा ‘स्वर्गालाही गवसणी घालणारा प्रसंग’! त्या प्रसंगाला ३५० वर्षे झाली आहेत. हा राज्याभिषेकाचा प्रसंग तनामनात रुजलाय.

त्या प्रसंगात सहभाग कोणाचा? फक्त राजांचा? फक्त समर्थांचा? फक्त मावळ्यांचा? फक्त मठाधिपतींचा?  नक्की कोणाचा कसं सांगावं? अर्जुन पात्र होता म्हणून गीता सांगितली गेली. तसंच काहीसं हे! राजा शिवाजी वेगळ्या मुशीतला होता. ज्याला समर्थांनी पैलू पाडले. घडवले….. तसं पाहिले तर समर्थांचा शिष्य होणं सोपं नाही. मठाधिपती होणंही सोपं नाही. मावळा होणं त्याहूनही सोपं नाही. एका लहानश्या मुलाला हिंदु राष्ट्राचं स्वप्नं दाखवून तयार करणं, लढायला प्रवृत्त करणं, सोपं काम नक्कीच नव्हतं. समर्थांनी रामरायाची भक्ती जनमानसात भिनवून भोंदूगिरी-बुवाबाजी तुडवली. ‘देवकारण’ केलं. हिंदु राष्ट्रासाठी प्रचंड लोकसंग्रह केला. जनमानसात राजांप्रती विश्वास निर्माण करून “राष्ट्र माझे आहे ते मीच राखेन” हा आत्मविश्वास जागवला. प्रत्येक माणसाकडून, भले तो दुर्जनही का असेना त्याच्यातलं चांगलं शोधून काढत काम करून घेण्याचं राजकारण केलं. सदैव “सावधपण” समर्थांनी राजेंना शिकवलं. योजकत्व आणि उत्तम नेतृत्व समर्थांनी राजांकडून करवून घेतलं.

राजा एका दिवसांत उभा राहिलेला नाही. त्याला क्षात्रधर्म , राजधर्म शिकवत समर्थांनी उत्तुंग यशशिखरावर पोहोचवलं आहे. हे करताना राजांचं गर्वहरण करण्याचं कामही समर्थ समर्थपणे करतात. तसेच “हे तुझे गुण ईश्वरी देणे आहे” हेही ते राजांना परखडपणे सांगतात. समर्थांचे परस्त्री, परद्रव्याबद्दलचे नियम अत्यंत कठोर होते. त्यात केलेल्या गैरवर्तनासाठी कठोर शासन दिले जात असे. समर्थांचा शिष्य अभ्यासू, विवेकी आणि निस्पृहतेने काम करणाराच असायला हवा हे ठरलेले असे. या नियमांमध्ये स्वतः शिवाजी राजालाही सूट नव्हती हे नक्की!

समर्थांच्या शिकवणीचा पाया अशा विचारांवर होता. कष्ट करणे आपणाकडे, कृपा करणे त्याच्याकडे…..अर्थात रामरायाकडे. तो कृपा करेलच असा विश्वास त्यांना होताच. समर्थ आपल्या शिष्यांना तुम्ही सिंहाचे बच्चे आहात असं म्हणून धीर देत आणि कर्मप्रवृत्त करत. राम आपलासा करवून घ्या. यश निश्चित आहे असं ते सांगत. आकाश कोसळून पडले तरी मार्गापासून ढळू नका. या संप्रदायाचे, हिंदुराष्ट्राचे कैवारी राम आहेत, सहाय्यकर्ते हनुमंत आहेत ते चिंता वाहतील असे समर्थ सतत सांगत.

“आधी केले मग सांगितले” या न्यायाने स्वतः निस्पृहतेने अनासक्त होऊन समर्थ संप्रदाय उभा केल्यावर राष्ट्र उभारणीसाठी त्यांनी राजांना सर्वतोपरी राष्ट्र उभारणीसाठी मदत केली. या सर्वतोपरी राष्ट्र उभारणीच्या कार्याचा पाया विवेकाधिष्ठित होता हे सर्वश्रुत आहे. समर्थांच्या इतका विवेकाचा पुरस्कार कोणीही केलेला नाही. साडेतीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतर भारतवर्षाने “आनंदवनभुवन” या अनमोल राष्ट्रसंतामुळे अनुभवले. आता या वर्षी ३५० वर्षे राज्याभिषेक सोहळ्याला होतील. आता आपण तपासून पहायला हवं की, मी या सोहोळ्यातून, त्या आधीच्या साडेतीनशे वर्षांमधून काय शिकले/शिकलो? त्या राजा शिवाजी ‘शिष्याने’ मला काय शिकवलं? आणि समर्थ रामदास या त्यांच्या गुरूकडून आपण काय शिकलो? हे जरा आत डोकावून पहायलाच  हवं. एक छोटं उदाहरण देते. समर्थांची शिस्त अति कडक असे. महंतांचीही समर्थांच्या ठायी इतकी प्रखर निष्ठा असे की ते ती शिस्त धर्म समजून पाळत. ज्याला ही शिस्त पाळायची नसेल त्याने महंत होऊ नये हा समर्थांचा दंडक होता. समर्थांनी एका महंताला त्याच्या अपराधाबद्दल वेताने फोडून काढले आहे. त्यामुळे समर्थ भक्त होणे सोपे नव्हते.

समर्थाच्या प्रत्येक कसोटीला राजा विश्वासी उतरत गेला आणि म्हणूनच आनंदवनभुवन निर्माण होऊ शकलं, जे आजही  ३५० वर्षानंतर आपल्या ध्यानी मनी रुंजी घाललंय. खूप उपदेशपर लिहावं असं मला वाटत नाही. कारण ही दोन व्यक्तीमत्वंच इतकी स्फूर्तिदायी  आहेत की तुम्ही जितकं घ्याल तितकं कमी आहे. आयुष्य उध्दरून जाईल इतकी मोठी शिकवण या गुरुशिष्यांनी आपल्याला दिलेली आहे. हे आपल्यापाशी आहे. आपण काय घ्यायचं आणि त्याच काय करायचं? नुसताच उत्सव? का राष्ट्र उभारणीसाठी काही भरीव कार्य? समर्थांनी लिहून ठेवलंय…

त्रैलोक्य गांजिले मागे । विवेकी ठाउके जना ।

कैपक्ष घेतला रामे । आनंदवन‌भुवनी ।। ३० ।।

येथुनि वाढिला धर्मू । रमाधर्म समागमे ।

संतोष मांडिला मोठा । आनंदवनभुवनी ।। ३१ ।।

त्या भयाण ३५० वर्षानंतर उभ्या राहिलेल्या हिंदुराष्ट्राचं आज पुन्हा ३५० व्या वर्षी आपण सुजलाम सुफलाम हिंदु राष्ट्र निर्माण करायला हवं ना? हा प्रश्न ज्याने त्याने स्वत:ला विचारत ६ जून २०२३ चा पावन मंगल दिवस मनीध्यानी आठवू या!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

श्रीसमर्थ रामदास स्वामी

धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार |

झाले आहेत पुढे होणार | देणे ईश्वराचे ||

श्रीसमर्थ रामदास स्वामी

संत म्हणजे संतांचे वाङ्मय!  चिरकाल मार्गदर्शन करणारा तत्त्वज्ञान बोध! ती संतांची चिरंतन साक्ष आहे. श्रीमद्भगवद्गीते सारख्या स्मृती ग्रंथांपासून संत वाङ्मयापर्यंत हजारो वर्ष तत्त्वचिंतक, कीर्तन, प्रवचनकार या आध्यात्मिक ग्रंथांवरील चिंतन प्रगट करीत आलेले आहेत. श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य, टीका, निरूपण, वाङ्मय व मौखिक प्रबोधनाची तर गणतीच नाही. 

     उपनिषदे आणि भगवद्गीता या दोन संस्कृत ग्रंथांनी सबंध भारतामध्ये अध्यात्माची जोपासना केली. पण महाराष्ट्रामध्ये मात्र श्रीज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आणि श्रीसमर्थांचा दासबोध या दोन संत ग्रंथांनी आजपर्यंत शुद्ध अध्यात्म जिवंत ठेवले आहे. श्रीज्ञानेश्वर आणि श्रीसमर्थ दोघेही भक्तोत्तम होत. दोघेही मोठे साक्षात्कारी व ब्रह्मज्ञानी पुरुष होते. सच्चिदानंद स्वरूप परमात्म वस्तूचा साक्षात अनुभव घेऊन दोघेही परमात्म्यात स्थित झालेले अति मानव होते. दोघांच्या जीवनामध्ये अध्यात्मिक अनुभवाची श्रीमंती ओसंडून वाहत होती. ती श्रीमंती दोघांनी आपल्या ग्रंथांद्वारे मराठी जनतेला मुक्त हस्ताने वाटली. अज्ञानी माणसे मी देहच आहे या निश्चयाने जीवन जगतात, त्यांना सारे दृश्य विश्वासारखेपणाने प्रचितीस येते. आत्मज्ञानी अथवा ब्रह्मज्ञानी पुरुष “मी ब्रह्मच” आहे याविषयी पूर्ण ज्ञानी असतात. सर्व संतांना वस्तूंचे सारखेपण प्रचितीस येते म्हणून सर्व संतांचे परमात्मा स्वरूपाचे अनुभव मूलतः समान असतात. परमात्मा स्वरूपाच्या साक्षात दर्शनाने संपूर्ण समाधान पावलेली संत मंडळी आत्मसाक्षात्कारानंतर स्वस्थ बसत नाहीत. आपल्या सभोवार पसरलेल्या मानव समूहातील लहान मोठ्या सर्व व्यक्तींनी सुखी जीवन जगावे, परमात्म वस्तूचे साक्षात दर्शन घ्यावे आणि आपल्यासारखे कृतार्थ होऊन जावे म्हणून ते जन्मभर खटपट करत असतात. लोककल्याणाच्या त्या पवित्र कार्यासाठी संत आपले शरीर, आपली वाणी, आणि लेखणी अक्षरश: अहोरात्र झिजवतात. हे सारे दिव्यपण श्रीसमर्थांच्या जीवनात उत्कटपणे बघायला मिळते. अनेक वर्षे तपश्चर्या केल्यावर श्रीसमर्थांना आत्मसाक्षात्कार झाला. साक्षात्कार झाल्यावर त्या शाश्वत मुख्यपदावर ते आरूढ झाले. त्यानंतर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रमप्रधान लोकसंग्रह आरंभला. लोकांमध्ये समूह भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी कितीतरी मठ स्थापन केले. प्रत्येक मठात लोकशिक्षणाचे काम निस्वार्थपणे करणारे संन्यासी-महंत तयार केले. त्या सगळ्या महंतांचे महंत म्हणून श्रीसमर्थांच्यापाठी मोठा व्याप होता. अगदी हजारो स्त्री पुरुष त्यांना भेटून गेले असणार. त्यापैकी कित्येकांशी ते कितीतरी अध्यात्मिक बोलले असणार. अनेकांना त्यांनी साधनेमध्ये, राजकारणामध्ये, व्यवहारांमध्ये, आणि व्यक्तिगत समस्यांमध्ये यथार्थ मार्गदर्शन केले होते. त्यांची ती संभाषणे, विनोदवचने व समस्या सोडवणे कालाच्या उदरात गडप झाली. परंतु आपल्या भाग्याने श्रीसमर्थांनी पुष्कळ वाङ्मय लिहूनही ठेवले आहे. त्यांच्या त्या वाङमय भांडारामध्ये श्रीमत् दासबोध एखाद्या कोहिनूर हिऱ्याप्रमाणे शोभून दिसतो. अध्यात्मदृष्ट्या जगाला कल्याणकारक असे जिवंत तत्वज्ञान त्यांच्यापाशी होते. ते तत्त्वज्ञान त्यांचे दासबोधामध्ये एकत्र गुंफलेले आढळते.

       

श्रीसमर्थांच्या वाङ्मयापैकी काही पदे, काही आरत्या, करुणाष्टके, मनाचे श्लोक आणि दासबोध हे वाङ्मय  महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. मराठी माणसाच्या मनावर त्याची पकड अजून कायम आहे. श्रीमत् दासबोध हा समर्थांचा प्रधान ग्रंथ होय. जगाला त्यांना जे सांगायचे होते ते त्यांनी दासबोधामध्ये स्वच्छपणे सांगून ठेवले आहे. त्या काळाच्या रितीप्रमाणे त्यांनी दासबोध ओवी मध्ये रचला.

आत्माराम दासबोध । माझे स्वरूप स्वतःसिद्ध ।

असता न करावा खेद । भक्तजनी ।।

नका करू खटपट । पहा माझा ग्रंथ नीट ।

येणे सायुज्जाची वाट । गवसेल की ।।

दासबोधाची  ओवी अगदी साधी, सरळ, सोपी व छोटी आहे. ती अधिक गद्य अनुकूलच आहे. श्रीसमर्थांना दासबोध गद्यांमध्ये सांगण्यात अधिक पसंत पडले असे वाटते. दासबोधाचे एकंदरीत वीस दशक आणि २०० समास आहेत. २०० समासांची ओवी संख्या ७,७५१ भरते. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर थोडेच दिवसांनी श्रीसमर्थांनी दासबोध रचला. स्वस्वरूप अनुभूतीचा नवीनपणा व आवेश, आत्मज्ञानाचा निर्भयपणा, उपासनेचा निधडेपणा, साधनेचा स्पष्टपणा त्यामध्ये विशेष रीतीने आढळतो. श्रीसमर्थांनी खरोखरच उदंड वाङमय निर्माण केले. रामायणातील सुंदरकांड, अभंग, ओव्याशतके, पूर्वारंभ, अंतर्भाव, आत्माराम, चतुर्थमान, पंचमानक, मानपंचक, गोसावी, पंचसमासी, सप्तसमासी, सगुण ध्यान, निर्गुण ध्यान, जुनाट पुरुष, षड्रिपुनिरूपण, पंचिकरण योग, मनाचे श्लोक, श्रीमत् दासबोध, इतर स्फूटप्रकरणे, काही ओवीबद्ध पत्रे, वगैरे त्यांचे वाङ्मय प्रसिद्ध आहे. ग्रंथराज दासबोधामध्ये विवेकावर विलक्षण भर देणारे श्रीसमर्थ यत्नाला देव मानत असत, पण विवेकाला यत्नाची जोड देऊन व्यवहारात उतरवणारे तेच श्रीसमर्थ अंतकरणाने किती कोमल, प्रेमळ, उत्कट होते ही गोष्ट त्यांची करुणाष्टके वाचताना प्रकर्षाने प्रचितीला येते. त्यांच्या अंगी जबरदस्त प्रतिभा होती यात शंकाच नाही. शिवाय ती अहोरात्र जागी असे. त्यांच्या प्रतिभेचा विशेष असा की जसे त्यांनी अनुभवले तसेच अगदी साध्या सरळ शब्दात त्यांनी व्यक्त केले. त्या सरळपणे व रोखठोकपणे मांडण्यात जे काव्य गुण येतील ते येतील. मराठी, हिंदी व उर्दू भाषा तर त्यांच्या दासीच होत्या. विषय सांगण्याचा ओघ मोठा गतिमान असल्याकारणाने त्या ओघामध्ये हिंदी, उर्दू, फारशी, अरबी व संस्कृत शब्दांचा ते सहज उपयोग करतात. कित्येक ठिकाणी आपल्याला हवेत असे नवीन शब्द तयार करून त्यांनी विषय समजावून दिला आहे. त्यांची भाषा सोपी व सुटसुटीत दिसते.  मोजक्या शब्दात नेमका अर्थ निसंदिग्धपणे सांगण्याची त्यांची हातोटी त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे गमक आहे. त्यांची ओवी दिसते छोटी पण अर्थाने मोठी गंभीर आहे. त्यांच्या इतके मानवी जीवन पाहिलेला आणि त्यावर सतत चिंतन केलेला महात्मा दुर्मिळ असतो. त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये प्रबळ गतिमानता होती म्हणून एखादा विषय ते सांगू लागले की त्या विषयाची अफाट माहिती त्यांच्या मनापुढे हात जोडून उभी राहत असे. अर्थात, त्यांच्या प्रतिपादनाला व भाषेला विलक्षण ओघ प्राप्त होतो. श्रीसमर्थ मोठे सिद्ध महानुभाव असल्याने त्यांची प्रतिभा अखेरपर्यंत अगदी जशीच्या तशीच टिकली. योगायोगाने कल्याण स्वामी सारखा अद्वितीय लेखनिक त्यांना भेटला.

श्रीसमर्थ म्हणतात –

माझी काया आणि वाणी । गेली म्हणाल अंतःकरणी ।

परी मी आहे जगज्जीवनी । निरंतर ।।

ब्रह्मज्ञान, भक्ती, गुरुपद, वाङमय, आणि विशाल लोकसंग्रह या पाचही अंगांनी वैभव संपन्न असलेले एकमेव संत म्हणजे श्रीसमर्थ रामदासस्वामी!! धन्य रामदास! जय रघुवीर!

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मनाचिये गुंफी

समर्थ रामदास स्वामींचा जन्म इसवी सन १६०८ मध्ये चैत्र शुद्ध नवमी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी राम जन्माच्या वेळेस झाला. प्रभू श्रीराम व समर्थ रामदास या दोघांची जन्म तिथी व जन्मवेळ एकच असल्याचा योगायोग अपूर्व आहे. त्यांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांब या गावी झाला. आज या गावाला जांब समर्थ असेही म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत.  दासबोध – मनाचे श्लोक – करुणाष्टके मारुती स्तोत्र – भीमरूपी, मारुती आरती – सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, आणि आपण रोज म्हणतो ती सुखकर्ता दुःखहर्ता आरती, आदि प्रसिद्ध रचना त्यांनी केल्या आहेत. या ग्रंथातून अध्यात्माबरोबर सामाजिक प्रबोधन पण केले आहे. भक्ती भाव आणि सामाजिक ज्ञानाच्या प्रसारात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी इसवी सन १६८१ ला सज्जनगडावर समाधी घेतली, तो दिवस होता माघ कृष्ण नवमी. त्या दिवसाला दासनवमी म्हणतात. समाधी घेण्याआधी पाच दिवस त्यांनी अन्न व पाणी यांचा त्याग केला होता. या विधीला “प्रायोपवेशन” म्हणतात. असो. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी समर्थांची समाधी सज्जनगडावर बांधली.

त्यांच्या ग्रंथ परिवारातील मनाचे श्लोक यावर मी भाष्य करणार आहे मनाचे श्लोक वाचताना त्यातील वाच्यार्थ व लक्ष्यार्थ जाणून घेणे महत्त्वाचे असते. शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योगासने, व्यायाम, प्राणायाम यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्याच प्रकारे मनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या मनाने, आपल्या जाणिवेने, रामाशी सतत अनुसंधान जोडणे आवश्यक असते. खरं म्हणजे भगवंताचे रूप अणूपेक्षाही सूक्ष्म व आकाशाहून विशाल आहे. तरीसुद्धा समर्थांनी संपूर्ण रूपातील रामाचे दर्शन आपल्याला घडवले आहे. ते म्हणतात, 

घनश्याम हा राम लावण्यरूपी ।

महा धीर गंभीर पूर्णप्रतापी ।

करी संकटीं सेवकाचा कुढावा ।

प्रभातें मनीं राम चिंतित जावा ।।

या ठिकाणी प्रभातेचा अर्थ सातत्याने व कुढावाचा अर्थ रक्षण करणे असा होतो. समर्थ म्हणतात “सदा राम निष्काम चिंतीत जावा” याचा म्हणजे निष्काम महत्त्वाकांक्षेचा अनुभव, आपल्या सर्वांना अयोध्येच्या प्रभूराम मंदिरामुळे आला. अयोध्या हे प्रभूरामाचे जन्मगाव. तिथल्या मंदिरात २२ जानेवारी २०२४ ला रामलल्लाची म्हणजे बालक रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याचे ७०० वर्षांपासूनचे बंदीवासातले वास्तव्य संपुष्टात आले. सोबत केदारनाथचे शिवमंदिर, आदि शंकराचार्यांचे मंदिर यामुळे देवस्थानाला जागृती आली आहे. काशी विश्वनाथ धामचा जीर्णोद्धार झाला आहे. आपल्या या पौराणिक वर्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. हे निष्काम कर्माचेच फलित आहे.

समर्थांनी सुद्धा निष्काम कर्मयोग्याप्रमाणे टाकळी गावापासून मानसरोवरापर्यंत मजल दरमजल केलेली आहे. तिथून सागर तीरावरून पदभ्रमण करत ते रामेश्वरला पोहोचले. तिथून कोल्हापूर, चिपळूण याला पण भेट दिली. दिल्लीला गेले असताना तिथल्या बादशहाने धर्मप्रचारासाठी फकिरांचा गट तयार केला होता, हे पाहून समर्थांना सुद्धा हिंदू धर्मियांचा असा गट असावा, असे मनापासून वाटू लागले होते. परंतु हिंदू तन-मन-धनाने त्यांच्यापेक्षा अशक्त वाटत होते. त्यासाठी त्यांनी प्राप्त झालेला नरदेह सुदृढ व्हावा म्हणून सामर्थ्याचा  उद्घोष केला. शरीर साधना आवश्यक आहे हे सर्वांना पटवून दिले. त्यासाठी भारतभरात ५०० मारुतींची स्थापना केली. मंदिरात भजन सुरू केले. भजनाचे सुरुवातीचे बोल आहेत.

भेटो कोणी येक नर । धेड महार चांभार ।

त्याचें राखावें अंतर मन । याचें नाव भजन ।।

तसेच त्यांनी “आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।” यासाठी लोकजागरण केले. हळूहळू त्यांचा शिष्य परिवार जमा झाला. कित्येक माता, भगिनी पण त्यांच्या शिष्य परिवारात होत्या. समर्थ रामदास स्वामी स्वतः स्थितप्रज्ञ, आत्मज्ञानी पुरुष होते. लोकांना मार्गदर्शन करणारे आदर्श मार्गदर्शक होते. त्याकाळी त्यांनी जे सामाजिक प्रबोधनाचे काम केले, ते आजच्या काळीही अत्यंत उपयुक्त आहे. फक्त रामाची मानस पूजा करून कर्म करण्याची इच्छा पाहिजे, तर सारे जण सर्वोत्तम बनतील. समर्थ एका श्लोकात म्हणतात,  जाणता भक्त – न लिंपे कदा दंभ वादे विवादे ।

दंभ म्हणजे फसवा युक्तिवाद. जे नाही ते दाखवणे. अशा खोट्या अपप्रचाराला आज सुद्धा अनेक जण बळी पडतात. राष्ट्रद्रोही लोक रघुपति राघव राजाराम या गाण्यात “ईश्वर अल्ला तेरो नाम”
असे शब्द घुसडतात. दांभिकपणे लोकांची मने घुसळतात. असे होऊ नये म्हणून समर्थ म्हणतात, हे सज्जन मना, सत्यापासून दूर पळू नकोस. समर्थांचा उपदेश ध्यानी धरावा हे उत्तम. समर्थ म्हणतात, आपला राम हा निधीचा साठा आहे. तो कल्पतरू, कामधेनू आहे. तो श्लोक असा – 

मना राम कल्पतरु कामधेनु ।

निधी सार चिंतामणी काय वानूं ।।

समर्थ म्हणतात, सदा सर्वदा राम सन्निध ठेवला तर आपल्या हातूनच कल्पतरूचे बीज पेरता येते. आपल्या हातूनच कामधेनूचे दोहन करता येते. आपल्या हातून असेच चिंतामणी सारखे चिंता हरण करणे सहज शक्य होते. समर्थ भारत बनवण्याचे स्वप्न साकार करणे हे एकट्या सरकारचे काम नाही, तर राष्ट्र सर्वप्रथम या नात्याने जनतेचा सहभागही आवश्यक आहे.

समर्थांना बालवयातच श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र स्फुरला होता. परमेश्वराशी संवाद करण्यासाठी त्यांनी बारा वर्षाचा काळ घालवला होता. समर्थ रोज वीस तास काम करत असत. समर्थ महापुरुष होते. महापुरुष आणि धबधबा स्वतःचा मार्ग शोधत असतात. समर्थ वस्तुनिष्ठ होते. उदंड ऐकत होते. पण खरे खोटे तपासून पहात होते. प्राचीन ग्रंथाचा अभ्यास विज्ञाननिष्ठेनी करत होते. त्यांना परमेश्वराची प्रत्यक्ष गाठ भेट हवी होती. त्यासाठी ते प्रयत्नशील होते. समर्थांचे गुरु कोण होते माहित नाही. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते. असा कुठलाही नरदेह समर्थांचा गुरु नव्हता. प्रभूरामचंद्र हेच त्यांचे गुरु. या दृष्टीने समर्थ हे स्वयंभू होते. पूर्णावस्था प्राप्त झाल्यावर देखील समर्थ जग पहायला हवं, म्हणून चालत राहिले. समाजजीवनाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत त्यांनी जग पाहिले. ते अनेक प्रांतात फिरले. भाषा अनेक, संस्कृती एक असा त्यांना अनुभव आला. सर्व भाषिकांसाठी त्यांनी “राम कृष्ण हरी” हा पण मंत्र तयार केला. असे हे त्यांचे मनाचे श्लोक मनाचिये गुंफी गुंफण घालतात. गोफ विणतात, आपणही विणू या.

विणू बाई गोफ विणू । आनंदाचा गोफ विणू ।।

गोफ विणू बाई गोफ विणू । कौशल्याने गोफ विणू ।

मनाचिये गुंफी गोफ विणू । राष्ट्र सर्वप्रथमचा गोफ विणू ।।

।। जय रघुवीर समर्थ ।।

श्रीसमर्थ वाङ्मयातील प्रयत्नवाद

वाङ्मय म्हणजे विविध प्रकारच्या साहित्यकृतींचे एकत्रीकरण! वाङ्मय म्हणजे लेखन, वाचन, विचार, आणि कल्पना या माध्यमातून अभिव्यक्त होणाऱ्या संकल्पना, भावना, उपदेश, संदेश, आणि शिकवण असा लोकोपयोगी विचारांचा संग्रह होय. असे हे वाङ्‌मय समाजाच्या, राष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या सांस्कृतिक, नैतिक आणि बौध्दिक उन्नतीचे द्योतक मानले जाते.

     

अशाच दर्जेदार, सामर्थ्यशाली वाङ्‌मयात समर्थ रचित साहित्याची गणना केली जाते. बारा वर्षे भारतभर भ्रमण केल्यानंतर श्रीसमर्थ रामदास स्वामींनी समाजाचे सूक्ष्मातिसूक्ष्म असे अंतर्बाह्य निरीक्षण केले. त्या आधारानेच सर्व प्रश्नांना, सर्व समस्यांना ‘रामबाण’ उपायांसह आपल्या विविध साहित्यातून, वाङ्मयातून जाहीरपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्‌कार्य केले. त्यात दासबोध, मनाचे श्लोक, रामायण, आत्माराम, एकविस समासी दासबोध, करुणाष्टके, स्फुट श्लोक, स्फुट प्रकरणे, लघुकाव्ये, ओवीशतके, सवाया, अभंग, पदे, ललिते, आरत्या, मानसपूजा इ. अफाट वाङ्‌मयाचा समावेश होतो.

समर्थांच्या वाङ्‌मयाचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून ‘प्रयत्नवाद’ या विषयावर सर्वाधिक भर दिलेला आढळतो. प्रयत्नवाद म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी भाग्य, नशीब किंवा परिस्थितीवर अवलंबून न राहता, आपल्या कठोर परिश्रमांवर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवणे. सतत परिश्रम करणाऱ्या व्यक्तिला यश नक्कीच प्राप्त होते, आणि अशा व्यक्तिचे जीवन सुदृढ आणि समाधानी बनते, अशी ग्वाही समर्थानी दिली आहे. यापुढेही जाऊन समर्थ म्हणतात, “स्वत:चा विकास करण्यासाठी सतत प्रयत्न करणे हाच मानवाचा खरा धर्म आहे.”

प्रयत्नवादाच्या प्रमुख विचारधारा :-

१. आळसाला थारा न देता माणसाने नेटाने प्रयत्न करीत राहिले तर दैवही त्याला अनुकूल होते. कर्म व कर्तृत्व याला समर्थांनी विशेष महत्त्व दिले आहे.

२. सर्वच संत प्रयत्नवाद सांगतात, हे जरी खरे असले तरी समर्थांनी सांगितलेला प्रयत्नवाद कर्मवीर बनवणारा आहे. समर्थांनी प्रयत्नाचे गुणगान गाताना ‘यत्न तो देव जाणावा’ असे म्हटले आहे.

३. लोकांमध्ये वावरताना आपले बोलणे व वागणे यात तीळमात्रही फरक नसावा.

४. “आपुले स्वहित न कळे जना । तेणें भोगिती यातना |” अशी अवस्था स्वहितासाठी प्रयत्न न करणाऱ्यांची होते. “म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा | असे समर्थ तळमळीने सांगतात. कारण, समर्थ हे प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते आणि दैववादाचे खंडनकर्ते आहेत.

५. समर्थांचा काळ हा जरी ३D चा नव्हता तरी त्यांनी ३D साठी तेव्हा प्रयत्नवादच सांगितला आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे अगदी खरे आहे. फक्त त्यांच्या ३D ची परिभाषा वेगळी आहे. १) D = देव २) D = देश आणि  ३) D = धर्म! असा ३D समर्थांशी संबंधित आहे. यावरून ३D + BT = V असे आगळेवेगळे समीकरण तयार होते. या Best Try infinite (BT) ची जोड मिळाली तर विजय निश्चित आहे.

६. समर्थांनी सर्वसामान्यांना संकटकाळी घाबरून न जाता धैर्याने त्याचा सामना करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रयत्नवादाच्या प्रमुख विचारधारेत  ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हे सूत्र गठित झाले आहे.

७. “केल्याने होत आहे रे” ही प्रयत्नवादातील प्रमुख विचारधारा आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नानाच ‘तप’ असे म्हणतात. अशा रीतीने दीर्घकाळ तापल्यानंतर अंत:करणात धैर्य निर्माण होते. प्रयत्नवादाच्या प्रमुख विचारधारा जाणून घेतल्यानंतर समर्थांनी त्यांच्या विविध ग्रंथांमधून प्रयत्नवादाचे महत्त्व कुठे आणि कसे अधोरेखित केले आहे, ते पाहू.

१. दासबोधातील प्रयत्नवाद :-

दशक १२ मधील ९ व्या समासात (येत्नसिकवणनाम ) समर्थ प्रयत्नवादावर भर देताना दिसतात. काही माणसे प्रारब्धावर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे सोडून देतात. “असेल माझा हरी…” या वृत्तीचा समर्थ कडाडून विरोध करतात. समर्थांना हे मुळीच मान्य नाही. ‘रेषा तितुकी पुसोन जाते…’ अर्थात्, प्रयत्नांवर भर दिला की तळहातावरच्या रेषाही पुसल्या जाऊ शकतात. बदलू शकतात. याकरिताच समर्थांनी प्रयत्नवादी असण्याचा आग्रह धरला आहे.

“अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना ।

आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्यां ।। १२.२.६ ।।

यात अचूक प्रयत्नांच्या अभावी येणाऱ्या अपयशाचे वर्णन केले आहे. समर्थ पदोपदी योग्य प्रयत्नांची वाट शोधायला सांगतात.

आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निर्फळ ।

साक्षेपेंविण केवळ । वृथापुष्ट ।। ११.१०.२० ।।

हा प्रयत्नवादाचा आचरणात आणण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी सांगितला आहे.

२. मनाचे श्लोकातील प्रयत्नवाद :-

मनाच्या श्लोकांच्या निर्मितीची कथाच मुळात प्रयत्नवाद सांगणारी आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता मनाला प्रयत्नाभिमुख करणे म्हणजेच समर्थांना अपेक्षित असलेला प्रयत्नवाद होय.

३. आत्माराम ग्रंथातील प्रयत्नवाद :-

आत्माराम हा समर्थांचा लहानसा परंतु महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यात त्यांनी मनुष्याच्या आत्मबळावर भर देत प्रयत्नशीलतेचा महिमा गायला आहे. “आपुलिया आत्मबळा । साधावे आपुले कला ।“ प्रत्येकाने आपले आत्मबळ ओळखूनच प्रयत्न करावेत, असा समर्थांचा जनहितासाठीच अट्टाहास आहे. “आदिकर्ता आहे सोबती । परि कर प्रयत्न निश्चिती ।” भगवंताची कृपा मिळविण्यासाठी तर मानवाने स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे.

४. श्री मारुती स्तोत्रातील प्रयत्नवाद :-

हनुमान हा उत्तुंग, धडाडी, कार्यक्षमता आणि प्रयत्नवादाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. “सिद्धी साधतो जे प्रयत्न । हनुमंत तव सेवक जन ||”

५. समर्थांच्या अभंगातील प्रयत्नवाद:-

“भाग्य बोले परंतु कर्म । त्यावाचून नाही धर्म । प्रयत्न हे धरावे कर्म । त्याने मिळते फळ ।। समर्थांनी केलेली ही प्रार्थना प्रयत्नवादाला पुष्टी देणारी आहे

६. समर्थांच्या आरत्यांमधील प्रयत्नवाद:-

जय जय रघुवीर समर्था । जय जय मारुती वीर संकट हा | तुझे अधिष्ठान धरूनि पाहा । प्रयत्न करा सदा ।।” श्रीराम आणि हनुमान यांचे अधिष्ठानाखाली माणसाने सतत प्रयत्न करावे. भगवंताची कृपा आणि स्वतःचा प्रयत्न यांच्या समन्वयातून यशप्राप्ती होते.  “संकट येईल मार्गावरी । तरी धरावे साहस भारी ।  प्रयत्ने तुजविण नाही खरी । अशी कृपा करावी ।।” संकटे आली तरी माणसाने धैर्याने आणि साहसाने प्रयत्न करावे. भगवंताची कृपा देखील प्रयत्नशील असणाऱ्यांना मिळते.

७. समर्थांच्या सवायांमधील प्रयत्नवाद:-

“अवघे मिळवावे परिश्रमाने । तरी न धरी विसावा जनाने ||” येथे समर्थ स्पष्ट सांगतात की, सर्व काही परिश्रमाने मिळवावे. प्रयत्न करताना मनाने दुर्बल होऊ नये. आत्मविश्वासाने आणि धैर्याने पराक्रम केल्यास यश निश्चित मिळेल, अशी समर्थांनी ग्वाही दिली आहे. वरील सर्व समर्थ वाङ्‌मयाच्या अभ्यासातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ‘प्रयत्नवाद’ हाच समर्थांच्या शिकवणुकीचा आधारस्तंभ आहे. “प्रयत्न हा मुख्य आणि कृपा ही सहकारी” असे मानून जीवनात भौतिक आणि पारमार्थिक यशासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा केवळ संदेशच नव्हे, तर रामाज्ञा समर्थांनी आपल्यापर्यंत पोहचविली आहे, अशा समर्थांचरणी माझे त्रिवार वंदन !!!

“शतश: वंदन समर्थ गुरुराया ।

तुमची कृपा आम्हा लाभो सदा ।।

तुमच्या विचारांनी जीवन उजळो |

प्रयत्नांची ज्योत अखंड तेवो ।।”

स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते समर्थ रामदास

श्रीसमर्थ रामदासस्वामींनी अध्यात्माची उपासना तर केलीच पण त्याच बरोबरीने ज्ञानोपासना देखील केली. ज्ञानोपासनेसाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना केली होती. श्रीरामाच्या उपासनेबरोबरच ज्ञानाची उपासना करणारा ‘रामदासी संप्रदाय’  हा एक नवीन संप्रदाय त्यांनी स्थापन केला. त्या संप्रदायाची नियमावली रामदासांनी आखून दिली होती. तिला ‘श्रीसंप्रदायाची वीस लक्षणे’ असे म्हणतात.

ज्ञानोपासनेसाठी श्रीसमर्थांनी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली. या मठांमध्ये त्यांनी लोकशिक्षणाची व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेमध्ये कोणताही वर्णभेद, लिंगभेद, जातीभेद नव्हता.

रामदासी संप्रदायात असंख्य तरुणांच्या बरोबरीने समाजातल्या विविध स्तरातील, विविध वर्गातील आणि विविध वर्णातील स्त्रियादेखील सहभागी झाल्या होत्या. त्या स्त्रियांमध्ये गृहस्थाश्रमी महिलांबरोबरच अनेक बालविधवा, विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांचादेखील समावेश होता.

स्त्रियांनी नेतृत्व करावे

श्रीसमर्थ  रामदासांनी आपल्या मठांमध्ये जे नियम घालून दिले होते त्यापैकी एक नियम होता, रामदासी संप्रदायातील अनुग्रहित किंवा उपासक स्त्रियांना मठातील स्वयंपाक वा स्वयंपाकाशी संबंधित कोणतीही कामे  न देण्याचा. त्यामुळे मठात स्वयंपाक करण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंतची सर्व कामे पुरुष उपासकच करत. नित्यनियमाने त्यांच्याकडून केली जाणारी स्वयंपाकादी कामे किंवा स्वच्छतेची कामे स्त्रियांना न देण्याचा आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील कामे करण्याचा पायंडाच श्रीसमर्थांनी आपल्या मठांमध्ये पाडला.

याशिवाय, उपासक म्हणून रामदासी मठांमध्ये आलेल्या स्त्रियांना लिहिण्या-वाचण्यासारखी बौद्धिक व दफ्तरी कामे देण्याचा नियम श्रीसमर्थांनी आखून दिला होता.  हा नियम देशभरातील आठ राज्यात शिल्लक असलेल्या २५० हून अधिक मठांमधून आजही पाळला जातो !

पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही परमार्थाचा अधिकार आहे असे श्रीसमर्थांचे मत होते. स्त्रियांनी धर्म आणि अध्यात्म या दोन्ही ठिकाणी नेतृत्व करावे अशी एक वेगळीच भूमिका श्रीसमर्थ रामदासांनी मांडली होती आणि त्यानुसार त्यांनी आचरणही केले. मठांवर मठाधिपती म्हणून श्रीसमर्थांनी स्त्रियांची नेमणूक केली. ज्या स्त्रियांना लिहिता- वाचता येत नसे त्यांना रामदासी मठामध्ये लिहायला व वाचायला शिकविले जाई. लिहिण्या-वाचण्यास आल्यानंतर त्या स्त्रियांना विविध ग्रंथांचा अभ्यास, पारायणे, जप-जाप्य -अनुष्ठाने करू दिली जात. उपासक स्त्रियांना लिहिण्या-वाचण्यास शिकवून श्रीसमर्थांनी स्त्रियांचे सबलीकरण केले !

स्त्रियांची निंदा करणाऱ्या एका वृद्धाला रामदासांनी,

“बहुता दिसांच्या वयोवृद्ध मूला| जनी बायकोच्या गुणे जन्म तूला |

तये जन्ननीच्या कुळा निंदितोसी |वृथा पुष्ट तू मानवामाजि होसी ||”

या शब्दात फटकारले आहे ! श्रीसमर्थांच्या नंतरच्या मठपतींनीही स्त्री- उपासकांच्याबाबतीत समर्थांनी घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे परांडा येथील रामदासी मठाचे सातवे मठपती हंसराजस्वामी ! या हंसराजस्वामींनी विधवा असलेल्या मनाबाई रजपूत या अशिक्षित, विधवा स्त्रीला लिहिण्या- वाचण्यास तर शिकविलेच पण मनाबाईंना त्यांनी वेदांतातील मंत्रही शिकविले. त्यावर आधारित ‘ कथाकल्पलता ‘ नावाचा एक ग्रंथ मनाबाईंनी लिहिला हंसराजस्वामींनी हा ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून अनेक शिष्यांना अध्ययनासाठी दिला.

मठपती म्हणून स्त्रियांची नेमणूक

शक्तिस्तोत्रांत श्रीसमर्थ रामदास लिहितात —

रामवरदायिनी माता| दासे धुंडुन काढली|

वोळखी पाडितां  ठाई| भिन्न भेद असेचिना ||

रामदासांनी हा श्लोक नुसता लिहिला नाही तर तो अंमलातदेखील आणला!  समर्थांनी त्यांच्या संप्रदायातल्या प्रत्येक स्त्रिला तिच्या बौद्धिक  क्षमतेला शोभणारे स्थान दिले.

श्रीसमर्थ रामदासांनी एक-दोन नव्हे तर अठरा स्त्रियांना रामदासी मठांचे मठपती म्हणून नेमले. या सर्व स्त्री- मठपतींचा उल्लेख ‘ गिरिधर- बखरी ‘ मध्ये आहे.  वेणाबाई व बाईयाबाई ( मिरज मठ ), अंबिकाबाई ( राशिवडे व वाळवे ), नबाबाई ( तापीतीर, गुजरात ), मनाबाई ( राजांगणी ), सखाबाई व कृष्णाबाई ( चाफळ ), अन्नपूर्णाबाई ( टाकळी ),  सतीबाई ( महाबळेश्वर ), आपाबाई , द्वारकाबाई,  गंगाबाई, मुधाबाई, बाकुबाई,  भीमाबाई, गोदाबाई अंताबाई ( कृष्णातीर )आणि  चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई ( सज्जनगड मुख्यालय ) या  त्या अठरा स्त्री-मठपती होत.

चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई या स्त्री-मठपतीचा उल्लेख सांप्रदायिक दफ्तरात ‘आक्कास्वामी’ असा आढळतो. या आक्कास्वामी लिहिण्या-वाचण्याबरोबरच दफ्तरी कामे, घोडेस्वारी, तलवारबाजी यात अतिशय निपुण होत्या. समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यतिथीला ‘दासनवमी’ उत्सवाचे स्वरूप आक्कास्वामी ऊर्फ आक्काबाईंनीच दिले आहे. याच आक्काबाईंनी, भारतात सर्वदूर पसरलेल्या मठांच्या मुख्यालयाचे काम, समर्थांच्या पश्चात सुमारे ३९ वर्षे अत्यंत समर्थपणे पेलले ! देशभरातील मठपतींशी  सज्जनगडावरून संपर्क साधण्याची एक विलक्षण यंत्रणा आक्काबाईंनी निर्माण केली होती.

श्रीसमर्थांच्या संप्रदायातल्या स्त्रियांना मठपती होण्याबरोबरच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकारही होता. श्रीसमर्थांच्या काळात खरं तर स्त्रियांना आपल्याच घरात मोकळेपणी वावरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. अशा काळात समर्थांच्या शिष्या मठपती तर बनल्याच पण मठपती म्हणून मंदिरांमध्ये उभे राहून कीर्तनाद्वारे समाजाला त्या आध्यात्मिक ज्ञानही देऊ लागल्या. ही गोष्ट त्या काळात क्रांतिकारी अशीच होती. कीर्तन करणाऱ्या त्या स्त्रियांमध्ये गृहस्थाश्रमी स्त्रियांबरोबरच विधवा आणि परित्यक्ता स्त्रियादेखील होत्या. रामदासी मठात सहभागी झालेल्या या सर्व स्त्रिया समर्थांच्या आधुनिक विचारांना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या ठरल्या! म्हणूनच श्रीसमर्थ रामदास स्वामींना स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असंच म्हटलं पाहिजे.

       || जय जय रघुवीर समर्थ ||

 

Language