भीमरूपी स्तोत्र २ – अपूर्व बाळलीला

या स्तोत्रात मारुतीच्या बाळ लीलांचे वर्णन आले आहे. त्यामुळे या स्तोत्राला मारुतीच्या जन्मा आधी
घडलेल्या घटनांचा संदर्भ आहे. इंद्र दरबारातील अतिशय सुंदर अप्सरा (पुंजीकस्थला) ही एका तापसाला
हसल्यामुळे शापग्रस्त होते व हसण्यामागे असलेल्या चंचलता या स्वभाव दोषाचा दंड म्हणून वानरी होऊन
तिला मर्त्य लोकात यावे लागते. तिला हवी ती रूपे धारण करता येतील व पोटी महा पराक्रमी व चिरंजीव पुत्र
जन्म घेईल असा उ:शाप तिला प्राप्त झाला. यथायोग्य वेळी सुमेरू पर्वताचा राजा केसरी या वानराशी विवाह
झाला. बराच काळ प्रतीक्षा करूनही अपत्य प्राप्ती न झाल्याने तिने वृषभाचल पर्वतावर तप केल्यावर पवन देव
प्रसन्न झाले व त्यांच्या कृपेने तिला पुत्र प्राप्तीचा वर मिळाला. दशरथ राजाच्या पुत्र व्हावा या इच्छेने केलेल्या
यज्ञाच्या  पायसातील थोडा भाग एका घारीने पळवला आणि तो पर्वतावर बसलेल्या अंजनी मातेच्या ओंजळीत
तिने टाकला. त्या पायसाचे फळ म्हणून अंजनी मातेने चैत्र पौर्णिमा सूर्योदय काळी मारुतीला जन्म दिला. मरुत
म्हणजे वायू. त्याच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्ती झाली म्हणून मारुती.

जनीं ते अंजनी माता । जन्मली ईश्वरी तनु ।
तनु मनु तो पवनु । येकची पाहतां दिसे ।। १ ।।
त्रिलोकी पाहाता बाळे । ऐसे तो पाहता नसे ।
आतुळ तुळणा नाही । मारुती वात नंदनु ।। २ ।।

मारुतीचा देह दैवी गुणांनी युक्त होता. पवनाचा अंश असल्याने त्याचे मन व शरीर अद्वितीय असे होते.
वायूचा वेग आणि सामर्थ्य दोन्ही त्याच्यात एकवटले होते. ‘येकची’; म्हणजे एकमेवाद्वितीय. अद्वैत दर्शवते. वायू
हे पंच भूतातले महा शक्तीशाली भूत आहे. ब्रह्मांडात घडणाऱ्या अति प्रचंड हालचाली यांना हे तत्त्व जबाबदार
असते. सोसाट्याचा वारा, वादळ हे मोठ-मोठे वृक्ष उन्मळून टाकतातच. असे हे पवनाचे कर्तृत्व आहे व मारुती
अवतारात हे सारे सामर्थ्य प्रगट झाले म्हणून ईश्वरी तनु. हनुमानाचे जाणे येणे हे झंझावातासम होते. ही त्याची
अंगभूत शक्ती होती. श्रीसमर्थ म्हणतात की, त्रैलोक्यात शोधून सुद्धा असे तेजस्वी सामर्थ्यशाली बालक
सापडणार नाही..

चळे ते चंचळे नेटे । बाळ  मोवाळ साजिरे ।
चळवळी चळवळीताहे । बाळ लोवाळ गोजिरे ।। ३ ।।

स्पर्शाला मृदू, मुलायम लव असलेले ते बाळ त्वरेने क्षुब्ध झाले. का तर त्याला भूक लागली व आई तर
वनात त्याच्यासाठी फळे, कंद आणायला गेली होती. भुकेने कासावीस होणे म्हणजे क्षुब्ध होणे. इथे क्रोध नाही

तर क्षोभ आहे. भूक लागणे ही अपेक्षित अशी भावना आहे व तिचे शमन, तिची तृप्ती वेळेत व्हायला हवी. बाल
मारुतीची हालचाल श्रीसमर्थ चळवळी चळवळीताहे यातून व्यक्त करतात. द्विरुक्तीमुळे वर्णन प्रत्ययकारी होते.
नवजात बालकाचे हात-पाय, नखे, बोटे या साऱ्यांचे मातेला कोण कौतुक व किती कौतुकाने ती हे सारे
न्याहळते, त्याच ममतेने कौतुकाने श्रीसमर्थांचे शब्द येतात..

हात की पाय सांगावे । नखें बोटे परोपरी ।
दृष्टीचे देखणे मोठे । लांगूल लळलळीतसे ।। ४ ।।

मारुतीचे शेपूट/पुच्छ,  यालाच श्रीसमर्थ इथे लांगूल म्हणतात. लळलळीतसे म्हणजे मोठे असल्याने पीळ
किंवा वेटोळे दिलेले. ते देखणे आहेच पण अत्यंत सामर्थ्यशाली असल्याने त्याचे मोठे कौतुक आहे. ते शक्ती
स्वरूप आहे. आकार बदलण्याची सिद्धी हनुमानाला उपजत होती. मारुतीरायांच्या पराक्रमात या लांगूलाचे
मोठे योगदान आहे.

खडी खारी दडे तैसा । पीळ पेंच परोपरी ।
उड्डाण पाहातां मोठे । झेंपावे रविमंडळा ।। ५ ।।

भुकेने क्षुब्ध होऊन बाल मारुतीने आकाशातील लाल बुंद सूर्य बिंबाला फळ समजून झेप घेतली. तो
दिवस सूर्य ग्रहणाचा होता. आकाशात ‘खारी’; म्हणजे ढग होते व त्यामुळे मारुतीचे वेढा घातलेले शेपूट कधी
दिसत होते तर कधी दिसत नव्हते. श्रीसमर्थ तो प्रसंग किती बारकाव्याने आपल्या समोर मांडतात ते
अभ्यासण्या सारखे आहे. प्रत्यक्षदर्शी अनुभव असावा असे ते वाटते.

बाळाने गिळिला बाळू । स्वभावे खेळतां पहा ।
आरक्त पीत वाटोळे । देखिले धरणी वरी ।। ६ ।।

बाल हनुमान आणि आकाशात उगवणारा बाल सूर्य. त्याचे मनोहर स्वरूप-पिवळसर आणि थोडा
तांबूस असा तो सूर्य मारुतीस हवासा वाटला.. उगवतीचा सूर्य लोभस असतो खरा, पण तो म्हणजे फळ आहे
असे वाटून खाण्यास घ्यावे असे वाटणे हेच विशेष आहे. अप्राप्य, अति भव्य हवेसे वाटणे हेच थोर असल्याचे
निदर्शक लक्षण; इतक्या बाल्य अवस्थेत दिसून येणे हा या कथेचा गाभा आहे. अवतार असतात त्यांच्यापाशी
विशेष सामर्थ्य असते असे श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात.

पूर्वेसी देखतां तेथे । उडाले पावले बळे ।
पाहिले घेतले हाती । गिळिले जाळिले बहु ।। ७ ।।
थुंकुनी टाकितां तेथे । युद्ध जाले परोपरी ।
उपरी ताडिला तेणे । येक नामची पावला ।। ८ ।।

मारुतीने विशाल होऊन सूर्य बिंब हाती घेतले आणि खाण्यासाठी गिळले पण त्याच्या तेजाने दाह
झाल्याने ते त्याने थुंकले. सूर्य हा ज्ञानाचा प्रतीक. त्याचे मंडळ ग्रासले म्हणजे सारे ज्ञान आत्मसात केले आणि
त्यानंतर जे व्यापले होते त्याचा त्याग केला असाही एक अर्थ वाचण्यात आला. कथेनुसार ग्रहण काल असल्याने
सूर्याला गिळायला आलेल्या राहू बरोबर मारुतीचे युद्ध झाले व त्याच्या मदतीसाठी येऊन इंद्राने वज्रप्रहार
केल्याने मारुतीची हनुवटी विद्ध झाली. हा वायुसुत आहे हे, वायूने त्रिलोकाचे प्राण रोधल्यावर इंद्राच्या ध्यानी
आले. त्याने वर देऊन मारुतीची हनुवटी पूर्ववत केलीच पण हनुवटी आणि सर्व शरीर वज्रासमान कठीण केले.
असा कथाभाग आहे. यावरून त्याचे हनुमान (भंग पावलेली हनुवटी) नाव पडले.
बाल अवस्थेत राहूला म्हणजे बलिष्ठ अप प्रवृत्तीला आव्हान देणे व त्यासाठी युद्ध करणे हा उपजत गुण
दिसून येतो. यात धैर्य आहे आणि वीरता सुद्धा आहे. परिणामाची पर्वा नाही असे म्हणणे कठिण आहे कारण ते
नुकतेच जन्म झालेले बालक आहे. उत्सुकता , धाडस या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.

हा गिरी तो गिरी पाहे । गुप्त राहे तरुवरी ।
मागुता प्रगटे धावे । झेपांवे गगनोदरी ।। ९ ।।
पळही न राहे कोठे । बळेची घालितो झडा ।
कडाडा मोडती झाडे । वाडे वाडें उलांडती ।। १० ।।
पावनासारीखा धावे । वावरें विवरे बहु ।
अपूर्व बाळलीला हे । रामदास्य करी पुढे ।। ११ ।।

मारुतीचे बालपण, त्याच्या खोड्या व उद्यामशीलते मुळे विशेष जाणवतात. या पर्वतावरून त्या
पर्वतावर उड्या मारणे, झाडांवरून उड्या मारताना झाडे मोडून पडणे आणि एक क्षण सुद्धा स्थिर न राहणे हे
वायुतत्वाच्या प्रभावामुळे होते असे श्रीसमर्थ सांगतात. असा हा प्रचंड उपद्व्यापी बालक पुढे रामाचा दास झाला
आणि त्याच्या समोर अत्यंत स्थिर उभा राहिला. कोणत्याही प्रसंगात आवश्यक ते कृत्य करताना अत्यंत स्थिर
चित्ताने अत्यंत विवेकाने वागला. हे रूपांतर खूप महत्त्वाचे आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)

उद्धव गोसावींचे समर्थांना पत्र

सारंगपूर या मठात उद्धव गोसावी मठाधिपती होते, तेव्हा त्यांनी समर्थांना पाठवलेलं पत्र आज आपण बघणार आहोत. मनाच्या श्लोकांसारखं हे पत्र आहे. 

गुरुराजया ब्रह्मरूपा दयाळा । दयासागरा धाव वेगे कृपाळा ।

अनाथा दिना कारणे तू कुसावा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। १ ।।

तुझे रुप पाहावया आस मोठी । तरी दाखवी रूप तत्काळ दृष्टी ।

जशी बाळका माय तू धाव तैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। २ ।।

मना इंद्रिया कामक्रोधासी मारी । मदे मत्सरे वासना हे निवारी ।

जळावेगळा तळमळे मीन जैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ३ ।।

नसे सुख संसार हा घोर मोठा । जसा सिंह हस्तीसी मारी चपेटा ।

अशा संकटी सोडवी राजहंसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ४ ।।

चकोरे जसा चंद्रमा चिंतताहे । वनी गाय ते वत्स घरी वाट पाहे ।

तसे ध्यान तुझे मला हो कुंवासा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ५ ।।

नको अंत पाहू माया हे हरावी । तुझी भक्ती विरक्ती शांतीही द्यावी ।

बरा अंतरी लावी वैराग्य ठसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ६ ।।

तुझे ब्रीद रे नित्य असेल खरे । प्रचिती मला दाखवी सत्वरी रे ।

पतीतासी हा हेत आधार जैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ७ ।।

मला वाटते अंतरी त्वां वसावे । तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे ।

अपत्यापरी पाजवी प्रेमरसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ८ ।।

म्हणे उद्धवासि त्वा हाती धरावे । सदासर्वदा अंतरी प्रेम द्यावे ।

उपेक्षू नका स्वामी दासासि हंसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ९ ।।

उद्धव गोसावी यांनी समर्थांना पाठवलेले हे पत्रं आहे. यात शिष्याची तळमळ, सद्गुरु भेटीची लागलेली ओढ व आपण त्यांना भेटू शकत नाही याची तळमळ लक्षात येते. आता पत्राचा अर्थ बघू. 

उद्धवस्वामी पहिल्या ओवीमध्ये समर्थांना नमस्कार करतात. समर्थांना वेगवेगळ्या उपमा देऊन त्यांना साष्टांग दंडवत घालतात. गुरुराजा, ब्रह्मस्वरूपा, दयाळा, दयासागरा ही सगळी समर्थांची विशेषणे आहेत. या पत्राचे एक वैशिष्ट्य आहे, याचा चौथा चरण महाराजया सद्गुरु रामदासा असा आहे. म्हणजे प्रत्येक ओवीच्या शेवटी उद्धवस्वामी समर्थांचा उदोउदो करतात व त्यांना शरण जातात.

दुसऱ्या ओवीत आता उद्धव गोसावींची तळमळ दिसून येते. तुझे रुप पाहावया आस मोठी.. म्हणजे तुझं दर्शन व्हावं, वारंवार सद्गुरुची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी ही तळमळ आहे. यात ते उपमा देतात, लहान बालकाला आईची जशी ओढ लागते, बालक मातेकडे धाव घेते त्याप्रमाणेच उद्धव स्वामींच्या मनाची अवस्था झाली आहे. सद्गुरूला मातेची उपमा देतात व अशा मातेला हे बाळ कधी भेटेल याची चिंता व्यक्त करतात. 

तिसऱ्या ओवीमध्ये स्वामी म्हणतात, इंद्रियांना काम, क्रोध, मत्सर, मद, वासना याने ग्रासले आहे. यापासून कसे सुटावे हे समजत नाही. ज्याप्रमाणे मासा पाण्यावाचून तळमळतो, तसेच तुम्ही मला या सगळ्या वासनेतून सोडवा. यासाठी माझी तडफड होते आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे.

चौथ्या ओवीमध्ये स्वामी म्हणतात, हा संसार जो आहे, जो बाहेरून सुख वाटतो परंतु तो अत्यंत कठीण आहे. जसा काही सिंहाने हत्तीला पंजा मारावा त्याप्रमाणे हा संसार म्हणजेच यातील वासना मनाला सतत त्रास देत राहतात. त्यामुळे अशा या संकटातून सोडवण्याकरता सद्गुरुराया तुम्ही धावा व मला या वासनेच्या महापुरातून वाचवण्याचा प्रयत्न करा.

पाचव्या ओवीत ते म्हणतात, ध्यान मार्गाने तुम्हाला भेटण्याचा एकच प्रयत्न मी करतो. ज्याप्रमाणे चकोर चंद्रमाचे चिंतन करतो किंवा गाय वनामध्ये गेली असता तिचे लक्ष सतत तिच्या वासराकडे लागलेले असते, तसेच ध्यानामध्ये तुमचे दर्शन व्हावे यासाठी मी सतत तळमळत असतो. नको अंत पाहू माया हे हरावी.. इथे परत उद्धवस्वामी समर्थांना शरण जातात. हा प्रपंच म्हणजेच मठाचा कारभार करताना ही माया मधेमधे येते, त्यामुळे तुमची भक्ती, विरक्ती, शांती मनाला मिळत नाही, पूर्ण वैराग्य प्राप्त होत नाही. मठाच्या कारभारात लक्ष घालावेच लागते व त्यात कुठेतरी ही माया अडकवते म्हणून लवकर या व मला यातून सोडवा.

उद्धवस्वामी पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, तुमचं ब्रीदवचन आहे की तुम्ही आपल्या शिष्याला मायेपासून सोडवता. मी अत्यंत पतीत, दीन, दुबळा आहे; मला तुमच्या आधाराची गरज आहे; त्यामुळे तुम्ही मला प्रचिती दाखवा आणि या मोहमायेपासून त्वरित सोडवा.

आठवी ओवी प्रसिद्ध आहे. नित्याच्या दासबोध पठणामध्ये आपण समर्थांना ही विनंती करतो, तशीच विनंती उद्धवस्वामी येथे समर्थांना करतात. अत्यंत प्रेमाने तुम्ही माझा सांभाळ केला, तसाच यापुढेही करा व तुमचा आधार, तुमची कृपा मला सतत प्राप्त होऊ दे. हीच विनंती या ओवीतून करतात.

शेवटच्या ओवीमध्ये उद्धवस्वामी म्हणतात, मला तुम्ही हाताशी धरा म्हणजेच दूर लोटू नका. समर्थांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या उत्तम शिष्यांना वेगवेगळ्या मठामध्ये मठाधिपती म्हणून ठेवले होते. परंतु या शिष्यांच्या मनाला तळमळ आहे समर्थांच्या जवळ रहाण्याची. त्याचीच प्रचिती या पत्रातून येते. वारंवार उद्धवस्वामी विनंती करतात की मला तुमच्याजवळ येऊ द्या. तुमची सगुणमूर्ती सतत मला पाहता यावी, तुमचे उद्बोधन ऐकता यावे व तुमच्या पायाशी बसून मला श्रीरामरायाची भक्ती करता यावी. हीच विनंती वारंवार उद्धवस्वामी या पत्रातून समर्थांना करतात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्रीसमर्थांच्या सानिध्यात दिवाळी

आनंदाची दिपवाळी, घरी बोलवा वनमाळी,

घालीते मी रांगोळी, गोविंद गोविंद ।। ध्रु. ।।

सुंदर माझ्या घरात, आत्मा हा नांदतो,

चंद्र सूर्य दारात, गोविंद गोविंद ।। ।।

दळण दळीते मंदिरी, विष्णू यावे लवकरी,

चित्त माझे शुद्ध करी, गोविंद गोविंद ।। ।।

दीपावली म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा, अज्ञानावर ज्ञानाचा विजय मिळवण्याचे जणू प्रतीकच. संतांच्या घरी नित्य दिवाळी असते. संतांची दिवाळी अंतरंगातली असते. संतांचे अंत:करण अत्यंत दयाळू, प्रेममय, आनंद, समाधान, तृप्ती, शांती याने काठोकाठ भरलेले असते

श्रीरामदासस्वामी प्रभूरामचंद्रांना समर्थ म्हणतात. त्या प्रभूरामचंद्रांच्या घरी नित्य दिवाळीच असते. आपल्याला जर नित्य दिवाळी साजरी व्हावी असे वाटत असेल, तर प्रथम मनाची साफसफाई आवश्यक आहे. अंतरंगातलामीपणा, अहंता, अज्ञान, नैराश्य याचा कचरा काढायला हवा. आपल्या मनाला भगवत् प्रेमात बुडवून ठेवायचं मनाला अलिप्तपण शिकवायचं. संसाराची सर्व कर्तव्य अत्यंत चोखपणे करायची, पण त्यात गुंतायचे नाही. विवेक आणि वैराग्याच्या आधाराने ज्ञानज्योत तेवत ठेवायची.

दासविश्रामधामया ग्रंथातील पंचकन्यांच्या दिवाळीचा उल्लेख येथे नमूद करावासा वाटतो. अक्काबाई, आंतूबाई, वेण्णाबाई, बहिणाबाई, गिरीबाई यांच्या समवेत कशी दिवाळी साजरी झाली याचा उल्लेख येथे आहे. या पाचही कन्यांना समर्थांनी आत्मज्ञानी केले होते. दिवाळीमध्ये सकाळी चाफळला अक्कांनी समर्थांना ओवाळले, आंतूबाईंनी समर्थांना स्नान घातले, भोजनाला बहिणाबाईंकडे सीउर येथे गेले. बहिणाबाईंकडे जेवणात दोडक्याची भाजी होती. समर्थांना ती आवडली असे समजून त्यांनी ती पुन्हा पुन्हा वाढली आणि स्वतः नंतर जेवायला बसल्या, तेव्हा कळले की भाजी अगदी कडू आहे. त्या समर्थांना म्हणाल्या, आपण काहीच बोलला नाहीत. समर्थ म्हणाले, “नैवेद्य रामाने खाल्ला मग कसले कडूगोडपण!” असे समर्थांचे वैराग्य होते. नंतर विडा गिरीबाईंकडे घेतला पुन्हा दुपारी समर्थ चाफळला  आले. आंतूबाईंकडे जेव्हा समर्थ, प्रथम भिक्षेसाठी गेले होते; तेव्हा त्या म्हणाल्याजा खापरासमर्थांनीम्हणजे आकाश परम्हणजे पलीकडे असा गूढ अर्थ लावला. आंतूबाईंना पश्चात्ताप झाला कायमच्या त्या समर्थांना शरण आल्या. असा समर्थांचा विवेक पदोपदी जाणवतो

संतांच्या संगतीत नित्य दीपावली साजरी करण्यासाठी काही पायऱ्या लक्षात ठेवायला हव्यात. शरणागतता, सज्जन संगती, गाढ विश्वासश्रद्धा, सद्गुरूंचा अनुग्रह, आज्ञापालन, सेवा दान, धैर्यधारिष्ट, सहनशक्ती, साधनेचे सातत्य अशा या आठ पायऱ्या आहेत. आता आपण त्यातील एकेक पायरी पाहूया

) शरणागतताअहंता कमी होण्यासाठी शरणागत भाव निर्माण झाला पाहिजे, स्वतःकडे लहानपण घेता आला पाहिजे. कार्य हिमालयासारखे करावे पण कर्तेपण परमेश्वराकडे द्यावे. “सकळ करणे जगदीशाचेअसा समर्थांचा सतत भाव असे. “राम कर्ताहा भाव जपला, की नित्य दिवाळी आहे

) सज्जनांची संगतआत्मानुसंधान राखण्याची कला संतांजवळ सहज प्राप्त होते. कमी वेळात अध्यात्मिक प्रगती साधते म्हणून, सदा सर्वदा संग दे सज्जनासी जेणे नित्यानंद वाटे मनासी ।।  संतसज्जन, सद्गुरू यांच्या संगतीत खरे समाधान लाभते

) नि:संशय श्रद्धासद्गुरू निश्चित होईपर्यंत जरूर परीक्षा करावी, पण एकदा खरा सद्गुरू मिळाला की, कणभर सुद्धा संशय असता कामा नये. समर्थांनी प्रभूरामचंद्र ह्यांच्यावर गाढ विश्वास ठेवला. अंतरात सद्गुरूंना, त्यांच्या आज्ञेला अगदी घट्ट धरून ठेवावे  तसे आचरण करावे की नित्य दिवाळीच आहे.

) सद्गुरूंचा अनुग्रहसंतांनी, सद्गुरूंनी आपल्यालाआपलेम्हणावे अनुग्रह द्यावा यासारखे भाग्य नाही. पहिल्या तीन पायऱ्यामुळे सद्गुरूंचा अनुग्रह मिळतो. सद्गुरू विशिष्ट नाम, काही उपासना, काही साधन, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार देतात. तो सद्गुरूंचा बोध प्राणापलीकडे जपणं ही चौथी पायरी आहे. संत मूळ परब्रह्म शोधायची युक्ती देतात.

) आज्ञापालनआपण एकदा शिष्यत्व पत्करलं की स्वतःला रामाचा दास, रामाचा सेवक म्हणावं. सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून तो बोध निर्मळ मनाने पाळणे, आचरणात आणणे म्हणजे आज्ञापालन होय. आपल्या जीवनात सद्गुरूंचा प्रवेश हे परम वैभव आहे. जेव्हा सद्गुरू हीच आपली सुप्रीम व्हॅल्यू ठरते, तेव्हा सेवा मनापासून घडते, कारण आपण सद्गुरूंना प्राधान्य देतो

) सेवा दातृत्वआपली देह बुद्धी कमी झाल्याशिवाय मनापासून सेवा घडत नाही. भगवंताच्या दारात जे पडेल ते काम तत्काळ करायची तयारी हवी. आपला मान, सन्मान, पद, पदव्या, अधिकार परमेश्वरापुढे, सद्गुरूंच्या पुढे संपवता आले पाहिजे. सेवेबरोबर दानही हवे. निस्वार्थी भावनेने केलेले दान सेवा, वृत्ती शांत समाधानी ठेवते. मन तृप्त होते अर्थातच त्यामुळे नित्य दिपावली असते

) धैर्यधारिष्ट, सहनशक्तीजसजशी साधना वाढते तसतशी सद्गुरू परीक्षा घेतात. अपमान, अपशब्द सहज पचवता आले पाहिजेत. दुसऱ्यांना मोठ्या मनाने क्षमा करता आली पाहिजे. विसरून जाता आलं पाहिजे. सोडून देता आलं पाहिजे. आपले अंतःकरण क्षमा प्रेमाने भरून गेले पाहिजे. मग द्वेषराग, क्रोध काहीही विकार रहाणार नाहीत मग आनंदी आनंद.

) साधनेचे सातत्यतपश्चर्यामाणसांना जरा यश आले की, साधनेमध्ये  ढिलाई होते, सातत्य रहात नाही. बाह्य विरोधापेक्षा अंतर्विरोध सांभाळावा लागतो. सातत्याने जप करत गेल्यास तो आत आत मुरतो. वैखरी, मध्यमा, पशन्ति परा असा नामाचा प्रवास चालतो. परा वाणीत एकदा नाम स्थिरावले की ते सहज येते. नामस्मरण होते, करावे लागत नाही.

रामाच्या, कृष्णाच्या, आपल्या आराध्य दैवताच्याडोळ्यात पहावे त्यांचं दाट कृपाळूपण पहावे, गोड स्मितहास्य पहावे. ते हास्य म्हणजे आनंद, तृप्ती, समाधान, पूर्ण ज्ञान याचे प्रतीक असते. साधना सतत करत रहावी. ह्या आठ पायऱ्यांनी गेलं की नित्य दिवाळीच आहे. कारण पूर्णज्ञान, पूर्ण आनंद, पूर्ण समाधान, पूर्ण शांती, पूर्ण तृप्ती सदगुरूंजवळच असते. “जेथे समाधानी वृत्ती, तेथे भगवंताची वस्ती.” सर्व आहे हे सद्गुरूंमुळे हा विवेक तर सर्वकाही फक्त सद्गुरूंसाठीच हे वैराग्य साधता आले पाहिजे की, नित्य दिवाळीच आहे

आली दिवाळी दिवाळी लागू संतांच्या पायी ।।

आठ पायऱ्यांची शिडी सदा स्मरणात ठेवावी ।।

बोध सद्गुरूंचा स्मरावा उपदेश प्रेमे आचरावा ।।

तेणें आत्मज्ञान होईल तृप्ती जीवनी येईल ।।

अवघा आनंदी आनंद  उघडू समाधानाची पेठ ।।

मग नित्य दिवाळी दिवाळी सखा माझा वनमाळी ।।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

परम पूजनीय आक्का वेलणकर

 

परम पूजनीय आक्का वेलणकर अर्थात तीर्थरूप आशालता चिंतामणराव वेलणकर या थोर कृष्ण भक्त होत्या. पण त्यांनी आपले आयुष्य समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार करण्यात घालवले. पू. आक्कांनी जवळपास ५०० भागवत कथा केल्या. भागवत कथा पुष्पमाला आणि इतर काव्यमय ग्रंथांची रचना त्यांनी केली. पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमानंतर साधकांच्या मागणीप्रमाणे त्यांनी १९८४ मध्ये ‘दासबोध सखोल’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. पाहता पाहता ४० वर्ष या उपक्रमाला झाली. समर्थ वाङ्मयाचा सखोल आणि शिस्तबद्ध अभ्यास करणाऱ्यांचा परिवार म्हणून दासबोध सखोल उपक्रमाकडे पाहिले जाते.

पू. आक्कांना मी पहिल्यांदा नांदेड येथे ‘आत्माराम’ या ग्रंथावर त्यांची प्रवचने चालू असताना पाहिले. नऊवार पांढरी साडी, तिला बारीक निळे काठ, नेसलेली एक सोज्वळ मूर्ती मी पाहिली आणि माझ्या मनात अत्यंत सात्त्विक भाव निर्माण झाला.

आत्माराम ग्रंथावरचे त्यांचे प्रवचन मला त्यावेळी तसे फारसे उमगले नाही. पण त्यांची छबी मात्र माझ्या मनावर कायमची कोरली गेली. प्रवचनासाठी एकदा मांडी घातली की दोन अडीच तास ती हलत देखील नसे. नांदेड शहरात ज्यांनी दोन तपे समर्थ संप्रदायाचा प्रचार प्रसार केला, त्या माढेकर परिवारांच्या घरी  पू. आक्का रहात असत. मी नांदेडला ज्या भागात राहत होतो तेथे आजूबाजूला शेती असल्यामुळे मी पू. आक्कांना स्कूटरवरून घरी नेऊ शकलो नाही. पू. आक्कांची पाय धूळ माझ्या घरी पडली नाही हे माझे दुर्दैव.

वंदनीय आक्का यांनी दासबोध सखोल अभ्यास उपक्रम सुरू केला, त्यानंतरचे पहिले संचालक आदरणीय वसंतराव तथा तात्यासाहेब गाडगीळ; समर्थ रामदास स्वामी आणि मी; आंम्हा सगळ्यांचे गोदावरीशी एक वेगळे नाते आहे. पू. आक्कांनी नांदेडला देह ठेवला आणि मी सुद्धा नांदेडला नाभीस्थान असलेल्या गोदाकाठीच रहात असे. आता संभाजीनगरला आलो असलो तरी येथून जवळच गोदावरी आहे. 

तीर्थरूप तात्यासाहेब गाडगीळ यांनी घालून दिलेल्या शिरस्त्याप्रमाणे आणि पू. आक्कांच्या शिस्तीप्रमाणे दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची यशोगाथा चढत्या वाढत्या आलेखाने समर्थ संप्रदायात चालू आहे. या उपक्रमाचा कुटुंब प्रमुख म्हणून मला मोठा अभिमान आणि समाधान आहे. समर्थ संप्रदायामध्ये दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन म्हणून नोंदणी झाली. उपक्रमातील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ जाणकार यांनी तयार केलेल्या रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळाचे चढते वाढते कार्य पाहून, समर्थ संप्रदायच नव्हे तर इतर अनेक संतांची काव्य आणि वाङ्मय यांचा सुद्धा संकेतस्थळावर समावेश केला आहे. या संकेतस्थळामुळे अध्यात्मिक क्षेत्रात अनेक गोष्टी सहज आणि सुलभ झाल्या आहेत. 

दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन या उपक्रमातील अनेक साधक आणि समीक्षक हे लेखक, प्रवचनकार व निरूपणकार म्हणून समाजात पुढे येत आहेत. २०२१ मध्ये पू. आक्कांची जन्म शताब्दी मोठ्या उत्साहाने देश, विदेशात साजरी करण्यात आली. पावणे दोनशे वर्षांपूर्वी पूजनीय योगीराज महाराजांनी हैदराबाद येथे समर्थांचे ओवीबद्ध चरित्र सांगितले तो ग्रंथ म्हणजेच श्री दासलीला आणि इतर अनेक ग्रंथांचे प्रकाशन या वर्षभरात फाउंडेशन तर्फे करण्यात आले. 

श्री सुंदरमठ सेवा समिती, शिवथरघळ येथे आलेला मोठा प्रलय आणि झालेली पडझड यात खारीचा वाटा म्हणून पू. आक्कांचा दास्य भक्तीचा आदर्श घेऊन दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन तर्फे रुपये अकरा लाख एवढा निधी तेरा दिवसांमध्ये जमा झाला, ही एक मोठी उपलब्धी होय. त्याचप्रमाणे पूजनीय स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी अयोध्येत समर्थांच्या नावे वेद पाठशाळा काढण्याचे  घोषित केल्यानंतर आपला खारीचा वाटा म्हणून अकरा लाख रुपयांचा निधी स्वामीजींना पुण्यातील मोशी येथील दिमाखदार सोहळ्यात श्री दासनवमी अर्थात २२ फेब्रुवारी, २०२५ या दिवशी अर्पण करण्यात आला. त्यापूर्वी फाउंडेशनच्या शंभर साधकांनी नोव्हेंबर मध्ये अयोध्येत जाऊन समर्थ संप्रदायातील प्रस्थानत्रयी ग्रंथाचे पारायण केले. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची आकाशात फडकत असलेली ही ध्वजा पाहून  पू. आक्कास्वामी वेलणकरांना नक्कीच आनंद होत असणार. फाउंडेशनचा हा उपक्रम अभ्यासाची खोली आणि शिस्तीची पातळी वर्धिष्णू ठेवत दातृत्व संपन्न असा ‘समर्थ भक्तांचा परिवार’ समाजापुढे येतो आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या वाङ्मयाचा सखोल अभ्यास, अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करीत कोजागिरी पौर्णिमेपासून पासून सात दिवस साधना सप्ताह साजरा करणारा  समर्थ भक्तांचा हा मेळा पू. अक्का स्वामींच्या ध्येयाप्रमाणे उत्कट साधक तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

प. पू. आक्कांच्या स्वभावाचे दोन पैलू (प्रेमळ आणि कर्तव्यकठोर आक्का)

परमपूज्य आक्का यांना मी जवळपास चार ते पांच वेळा भेटलो आणि त्यांचा सहवास अनुभवला आहे. त्यांचा स्वभाव कोकणातील फणसासारखा किंवा गोड शहाळ्यासारखा होता. त्यांनी कठोरपणाचा मुखवटा धारण केलेला होता. परंतु जेव्हा त्यांचा सहवास प्राप्त होतो तेव्हा त्यांच्यातील प्रेमळपणा जाणवतो. त्यांची माझी पहिला भेट पत्ररुपाने झाली होती. त्यांच्या त्या पत्रातील मजकूरावरून, हातात काठी घेऊन ऊभ्या असलेल्या कडक हेडमास्तरांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर ऊभी राहीली होती. वास्तविक संत हे अतिशय प्रेमळच असतात, मात्र उगीचच कुणीही मागे लागू नये म्हणून रागीट असल्याचा आव आणतात, हे आपण अनेक संताच्या चरित्रात वाचलेले आहे. संत सर्वच अज्ञानी जनांविषयी करूणा बाळगतात. त्या सर्व अज्ञानी जीवांना योग्य मार्ग मिळावा म्हणून प्रसंगी कठोर होतात. त्यांची ही प्रीति ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ।। अशी असते.  

माझे पत्रद्वारा दासबोध अभ्यासचे तिसरे वर्ष संपत आले होते. त्यादरम्यान सज्जनगड मासिक पत्रिके मध्ये दासबोधाचा सखोल अभ्यास बद्दल एका छोट्या चौकटीत माहिती आली होती. ती वाचल्यावर मला तो अभ्यासक्रम करावा अशी इच्छा झाली. या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती मिळावी म्हणून मी परमपूज्य आक्कांना त्यांच्या अंबरनाथच्या पत्यावर एक पत्र टाकले. त्या पत्रात मी माझ्या अभ्यासक्रमासंबधी सर्व शंका विचारल्या होत्या. त्या माझ्या पत्रावर आक्कांनी देखील सविस्तर उत्तर पाठविले होते. ही आमची पहिली अप्रत्यक्ष भेट.

त्या पत्रातील मजकूराचा गोषवार पुढील प्रमाणे होता. त्यातील पहिलेच वाक्य थेट घाव घालणारेच होते. आपले पत्र पोहोचले. प्रश्नपत्रिकेच्या पुस्तकांत फक्त प्रश्नच असणार! आपणास दा. स. अ. बद्दल ज्यांनी माहिती दिली त्यांनी संपूर्ण माहिती दिली नाही. म्हणून हा पत्रव्यवहार वाढला. अभ्यासाकरिता फी नाही. पण फी पेक्षा सुध्दा महत्वाची अट एकच की, संपूर्ण २०० समासांचा अभ्यास करण्यास ८ वर्षे ४ महिने वा अधिक काळ लागणार. प्रपंचात अडचणी असतातच. तरी एकदा सुरु केल्यानंतर कोणत्याही सबबीस्तव बंद करता येणार नाही. हे कटाक्षाने मान्य असेल तरच भाग घ्यावा. प्रबोध पूर्ण झाला की, अभ्यासास सुरवात करुन चालेल. या प्रश्नाचे उत्तर आपण सांगावे.  मला येत नाही, असले उत्तर सखोल अभ्यासात नकोच नको. मात्र दोनपेक्षा जास्त स्वाध्याय कधीच पाठवायचे नाहित. पत्रामधील मजकूरावरुन त्या खूप कडक स्वभावाच्या असाव्यात अशी त्यांची प्रतिमा मनांत निर्माण झाली. त्यानंतर पहिले दोन स्वाध्याय त्यांच्याकडे पाठिविल्यानंतर  त्यांनी मला खोपोलीच्या सौ उज्वला दाबके यांच्याकडे पुढील स्वाध्याय पाठविण्यास सांगितले. त्या देखिल आक्कांच्या अनुग्रहित होत्या. हल्लीच त्या वारल्या असे समजले. 

नियमित स्वाध्याय पाठविण्यास सुरवात झाल्यानंतर सौ. दाबके यांनी शिवथर घळीतिल साधना सप्ताहा संबधी माहिती दिली. त्या सप्ताहास आवर्जुन हजर राहण्याविषयी सूचना केली. त्यांच्या सूचनेनंतर  घळीत सप्ताहाला कोजागिरीच्या दिवशी संध्याकाळी हजर झालो.  त्यावेळी आक्का रेल्वेने वीर रेल्वे स्टेशनला येत असत तेथुन शिवथरला असा त्यांचा प्रवास असायचा. येताना त्या मोठ्या प्रमाणात भाजी घेऊन येत असत. मी घळीत आलो तेव्हा कल्याण मंडपात सर्व अभ्यासार्थी हजर होते. मुखाने रामनाम आणि हाताने भाजी निवडण्याचे काम तेव्हा चालू होते. त्यावेळी आक्कांचे प्रथम प्रत्यक्ष दर्शन झाले. स्वत: आक्का देखिल भाजी निवडत होत्या. त्यावेळी सप्ताहाला पुरुषवर्ग फार कमी असायचा. तेथे बसलेल्या पुरुषांच्या रांगेत शेवटी मी बसलो आणि भाजी निवडण्याचे कामाला लागलो. सर्व भाजी निवडुन झाल्यावर ती रामनामाच्या गजरात एकत्र केली जायची.  

त्याच दिवशी रात्री कोजागिरी निमित्ताने निरनिराळे खेळ खेळले जात होते. परंतु तेथे बहूसंख्येने महिला असल्यामुळे मी जरा लांब लांबच होतो. परंतु आक्कांच्या चाणाक्ष नजरेने ते हेरले आणि मला त्या खेळात यायला लावले. लहान मुले खेळतात तसा एकमेकांचा पदर धरुन आगगाडीचे खेळ चालू होता. परत तोच संकोच आड येत होता. तेव्हा आक्कांनी मला त्यांचाच पदर धरुन त्या खेळात भाग घ्यायला लावला. अशा रितीने मी आक्कांचा पदर धरुनच या उपक्रमात सामिल झाला असे म्हणता येईल. त्यानंतर त्याच दिवशी अचानक वारा सुटल्याने माझ्या डोळ्यात काही कचरा गेला होता. तो काढण्याकरीता मी डोळा चोळायला लागलो होतो. ते बघुन आक्कांनी स्वत:च परत त्यांच्या पदराच्या शेवाने माझ्या डोळ्यातील तो कचरा काढला. हे दोन प्रसंग हा योगायोग होता की, त्यातुन आक्कांना मला काही सूचवायचे होते हा प्रश्न आता मला पडतो. 

माझ्या सारख्या असंख्य अज्ञानी अभ्यासार्थिंच्या डोळ्यांत गेलेला कचरा त्यांनी काढला आहे. कदाचित पदर धरुन खेळात सामिल करुन घेणे अथवा डोळ्यांत गेलेला कचरा पदराने साफ करणे असो या कृतीद्वारे त्यांनी मला या परिवारात मायेने आणले. मी माझ्या आईचा पदर कधी धरलेला मला आठवत नाही. परंतु या गुरुमाऊलीने मात्र तो अनुभव दिला. त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचा पैलू मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आणि माझ्या मनांत त्यांची असलेली प्रतिमा एकदम बदलून गेली. आक्का कल्याण मंडपात घळीकडे जाणाऱ्या दरवाजाच्या बाजूला बसलेल्या असत. त्यांची तीक्ष्ण नजर सर्वत्र फिरत असे. काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या पाटीवर लिहून दिल्यावर त्या प्रश्न विचारणाऱ्याचे समाधान होईपर्यंत त्याचे उत्तर किंवा स्पष्टीकरण सांगत असत. जर प्रश्न कॉमन असेल तर प्रवचनांत देखील सांगत असत. त्यावेळी विवेकसिंधूवर प्रवचन देत असत. त्यांच्या त्या प्रवचनात दिवसभरात इतर कार्यक्रमांत साधकांनी केलेल्या काही आगळीका असतील त्याचा त्या थेट उल्लेख न करता पुराणातील दाखल्यांच्या स्वरूपात सांगत असत.

याच साधना सप्ताहात घळीतील समर्थ आणि कल्याण स्वामी यांच्या साक्षीने त्यांनी मला अनुग्रह दिला. त्यानंतर माझ्या नकळत त्या माझा फॉलोअप घेत असत. माझ्या त्यावेळच्या समिक्षक कै. सौ. उज्वला दाबके यांच्या पत्रातुन ते समजत असे. एकदा मी अंबरनाथ येथील त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे मंदिरात कलावती आई यांचे भजन चालू होते. आक्का त्यावेळी त्यांच्या बेडवर बसुन काहीतरी लिहित होत्या. भजन चालू होते म्हणून मी गप्प बसलो होतो. परंतु त्यांनी मला भजन चालू असले तरी बोलायला हरकत नाही असे सूचवले. त्यावेळी त्या पडवीवरचा दासबोध हे पुस्तक लिहीत होत्या. मी त्यांच्या ज्ञानापुढे हिऱ्यापुढे काच असावी असा होतो. परंतु तरीही त्यांनी आपल्या हातातली डायरी मला वाचायला दिली आणि माझे त्यावरचे मत विचारले. वास्तविक त्यांच्या लेखनावर काही अभिप्राय देण्याएवढी माझी लायकीही नव्हती. तरीही त्यांनी मला माझे मत विचारले. त्यावर मी काही तरी गुळमुळित उत्तर दिले. ही त्यांची माझी शेवटची भेट होती.   

मला परमपूज्य आक्कांच्या कठोर किंवा रागिट बाजूचा अनुभव आलाच नाही असे म्हटले तरी चालेल. त्या खरोखरच शहाळ्यासारख्या मधूर स्वभावाच्या होत्या. त्यांनी महिन्याला किती स्वाध्याय पाठवायचे याचा नियम ठरवला होता. त्याबाबतीत त्या काटेखोर देखील होत्या. मात्र त्याला अपवाद केलेला देखील मी पाहिला आहे. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाला एकेचाळीस पूर्ण होण्याच्या कालात, मला आलेला परमपूज्य आक्कांच्या सहवाचा अनुभव मला शेअर करायला परवानगी दिल्या बद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करून विराम घेतो. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

प. पू. आक्का स्वामींची काव्यसंपदा

श्रीसद्गुरू देशमुख काका व आक्का स्वामींना वंदन ! या लेखातून प. पू. आक्कास्वामींच्या ‘आनंदसागर’ या काव्यसंग्रहातील काही निवडक काव्यांचा परिचय करून घेणार आहोत. संतांच्या काव्यातून विशेष आनंद प्राप्त होतो, कारण; त्यात सुंदर अर्थ दडलेला असतो व मनाला बोधही केलेला असतो. ‘आनंदसागर’ या काव्यसंग्रहाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना प. पू. आक्कास्वामी म्हणतात, “प्रभू कृपेने आनंद संजीवनी व आनंद सरिता याचे जनता जनार्दनाने स्वागत केले. म्हणून आता आनंद सागरही तोच निर्माण करत आहे, या आनंद सागरात डुंबूया. ही अल्पशी कृती सद्गुरूंना अर्पण.” असा शरणागत भाव या मनोगतातून व्यक्त केला आहे. या आनंदसागर काव्यसंग्रहात भगवान शंकर, गौरी, वासुदेव, भागवत धर्म, देहबुद्धी, मायेची करामत, नामाचा महिमा, गणेश वंदन अशा अनेक विषयांवर काव्यरचना केलेल्या आहेत. यातील काही निवडक काव्ये व त्या काव्यावर थोडक्यात निरूपण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी श्रीसद्गुरू डॉ. देशमुख काका, श्रीसमर्थ रामदास स्वामी व अनेक संतांच्या साहित्याचा आधार घेतला आहे. या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन !

पहिले काव्य – गणेश वंदन :

“नमुया प्रेमे गणरायाला । सकळ मिळूनी अजि हो ।

आपण सकळ मिळूनी अजि हो । दुर्गुण त्यजूनि सद्भावाने स्मरू देवराया ।। १ ।।

भाव मनीचे जुडी दुर्वांची वाहू गणेशाला ।। २ ।।

प्रभू कार्यास्तव देह झिजवू या संघटित होऊया ।। ३ ।।

प्रार्थिते आशा श्रीगणेशा तनमन अर्पुया | आपण सगळे मिळूनी अजि हो ।। ४ ।।”

सगुण गणेशाची पूजा अगदी प्रेमाने, आनंदाने साग्रसंगीत करावी. त्यामुळे मन प्रसन्न होते, सात्त्विक भाव निर्माण होतो, समाधान मिळते. भगवंताच्या अस्तित्त्वाबद्दलची श्रद्धा वाढते. तोच मला सांभाळतो, प्रेरणा देतो, स्फूर्ती देतो असा विश्वास वाटू लागतो. पुढे सगुणातून निर्गुणाकडे कसे जायचे तर, दुर्गुणांचा त्याग करायचा, राग, लोभ, द्वेष, मत्सर इ. षड्रिपूंपासून दूर रहायचे. सर्वांनी एकत्र संघटित होऊन देवाचे कार्य सर्वांच्या सहकार्याने करायचे ही महत्त्वाची शिकवण या काव्यातून व्यक्त केली आहे.

(लेखाची शब्द मर्यादा लक्षात घेऊन काव्याचा थोडक्यात सारांश लिहिला आहे)

 

दुसरे काव्य –  नाम महिमा :

“नाम प्रभूचे गोड रे मना । नाम प्रभूचे गोड ।। धृ. ।।

भक्तीपंथाने जाता निशिदिनी । मिळेल हरीची जोड ।।१ ।।

पथ्य एकची पाळ सख्या तू । निंद्य अवघे सोड ।। २ ।।”

सर्वच संतांनी मानवाला दिलेली एक लौकिक देणगी म्हणजे ‘नाम’. नामाचा अधिकार तर सर्वांनाच आहे. या साधनेला काही खर्च नाही, मांडामांड नाही. माळ असली अथवा नसली तरी मुखाने नामस्मरण करता येते. या कलियुगात चिरंतन सुखाची प्राप्ती करून घेण्याचा नाम हा सर्वात सोपा मार्ग आहे. माया मोहाच्या बंधनात अडकलेल्या जीवाला हरिनामच बंधनातून मुक्त करू शकते. या मार्गात काही पथ्ये पाळावी लागतात. निंद्य गोष्टींचा त्याग करायचा, वेद वंद्य कर्म करायचे, विषयाची आसक्ती, हव्यास कमी करायचा. यामुळे मनाला स्थिरता येते. मनाला भगवंत रूप करणे हीच भक्ती.

“आवडीने भावे हरिनामा घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।”

प्रेमपूर्वक नामस्मरण केल्याने नामधारकावर भगवंताची कृपा होते. त्याच्याच कृपेने ज्ञान होते. म्हणून प्रापंचिकांसाठी नाम हे उत्तम साधन आहे.

 

तिसरे काव्य –  देवाचे नवलाव :

“पहा कसा तो देव नाना नवलाव करितो ।। धृ. ।।

जलधीचे जल खारट असता । मधुर होईल गगनी जाता ।

अवनी वरती सिंचन करिता । मनी मोद होतो ।।

देहा ऐसे यंत्र बनवीतो । साधन करुनी साध्य साधितो ।

आशा म्हणे मग शांती देतो अनुभवा येतो ।।”

या निसर्गात किती सौंदर्य आहे, किती विविधता आहे, किती नावीन्य आहे. झाडे, वेली, पशु-पक्षी, नद्या, डोंगर, धबधबे, तलाव, फळे-फुले किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ही सारी देवाची सौंदर्याने नटलेली सजलेली धरणी माता पाहून मन प्रसन्न होते. समुद्राचे पाणी तर खारट असते. त्याचे ढग बनवायचे, त्याचे गोड पाण्यात रूपांतर करून पृथ्वीवर जलधारांच्या रूपात पाठवायचे. पाणी म्हणजे अमृत. तहानलेल्याची तहान भागवते. धनधान्य पिकतात, फळाफुलांना बहर येतो आणि आपले जीवन तर पाण्यावर अवलंबून आहे. कुठल्याही कारखान्यात पाणी तयार होत नाही. ही भगवंताची कृपाच आहे, ही देवाची नवलाईच आहे. झाडांचे महत्त्वही एका कडव्यात वर्णन केले आहे. शेवटच्या कडव्यात नरदेहाचे महत्त्व सांगितले आहे. या देहातूनच खऱ्या देवाची ओळख करून घेण्याचे सामर्थ्य आहे. या देहात बुद्धीची महान देणगी लाभली आहे. म्हणून उत्तम कर्मे करून, सदाचाराने वागून देहाचे सार्थक करावे. तरच जीवनात सुख शांती समाधान लागणार आहे. 

प. पू. अक्कास्वामींचे दैवत म्हणजे बाळकृष्ण. कृष्णावर त्यांचे अतिशय प्रेम. तोच त्यांचा सखा, गुरू, मित्र, माता-पिता अशा अनेक नात्यात त्यांनी त्याचेच रूप पाहिले, त्याच्याशी सुख संवाद केला. माझा सखा’ या काव्यात त्या म्हणतात, “कृष्णजीविता सखा हो माझा । कृष्णजीवीचा सखा ।।” प्रत्यक्ष बालरूपात दर्शनाचा योग त्यांच्या जीवनात आला, साक्षात्कार झाला. आक्का लिहित असलेल्या भागवतावर चंदनाची केशरट रंगाची पावली उमटली. असा सुखद अनुभव भगवंत कृपेने त्यांच्या जीवनात आला. या सावळ्या बाळकृष्णाच्या अनेक लीला त्यांनी काव्यातून व्यक्त केल्या आहेत, ही एक गौळण –

“सखे ग हरी खोड्या करी अनिवार ।

लावी कलागती खटनट श्रीपती ।

त्वरित होई पसार । सखे ग हरी ।। १ ।।

आशा म्हणे अशी हरीची लीला ।

गावी अपरंपार सखे ग हरी ।। २ ।।”

आनंद सागर या काव्यसंग्रहात एकूण पन्नास काव्ये आहेत. यातील काही काव्यांचे थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांच्याच भजनाने या लेखाचा समारोप करत आहे. 

“सद्गुरुनाथ माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ।

इंदूरच्या जीजीआई । मजला ठाव द्यावा पायी ।।”

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

प. पू. आक्कांचे भागवत

प. पू. आक्का म्हणजे दासबोध सखोल अभ्यासाच्या संयोजिका कुमारी आशालता चिंतामणराव वेलणकर, अंबरनाथ. प. पू. आक्कांनी जे ग्रंथ लेखन केले त्यात आनंद सरिता, आनंद सागर इ. काव्यसंग्रह, पडवीवरचा दासबोध, स्वयंपाकघरातील दासबोध, बलराम चरित्र, भागवत पुष्पमाला इत्यादी ग्रंथ आहेत. त्यात ‘भागवत पुष्पमाला’ या ग्रंथाला विशेष असे स्थान आहे. भागवत महापुराण आहे. त्यामध्ये बारा स्कंद, अठरा हजार श्लोक आहेत. ते अतिशय लोकप्रिय असून ते संस्कृत भाषेमध्ये आहे. अनेक ठिकाणी क्लिष्ट आहे. “बुडते हे जन न देखवे डोळा । म्हणोनि कळवळा येत असे ।” संतांचे हृदय अतिशय कोमल असते. त्यांना सामान्य जनांचे दुःख पहावत नाही. या दुःखी कष्टी जीवाला धावपळीच्या जीवनात आनंद हा हवासा वाटतो. सद्गुरूकृपेने प. पू. आक्कांना या आनंदाच्या झर्‍याचा शोध लागला. तोच आनंद त्यांनी त्यांच्या भागवत सप्ताहातून लुटला. पण जे सप्ताहाला येऊ शकत नाही पण आनंद तर हवा आहे अशांसाठी आनंदाची, विश्रांतीची जागा म्हणजे आक्कांचे भागवत म्हणजे ‘भागवत कथा पुष्पमाला’ हा ग्रंथ होय. प्रत्यक्ष बाळकृष्णाचा कृपाप्रसाद या ग्रंथाला लाभलेला आहे. प. पू. आक्का ग्रंथाचे लेखन करीत असताना वहीवर प्रत्यक्ष बाळकृष्णाचे पदचिन्ह उमटलेले अनेकांनी पाहिले आहे. प. पू. आक्का या शिक्षिका होत्या. त्यामुळे कठीण विषय सहज सोपा करून सांगण्याची हातोटी आपल्याला या ग्रंथात दिसून येते. या पुष्पमालेत ३१ पुष्प गुंफलेली आहेत, रेखाचित्रे आहेत. संतांची, कवींची पदे तसेच स्वतः आक्कांनी रचलेली पदे या ग्रंथाची शोभा वाढवतात. साध्या, सोप्या, सरळ शब्दातून अतिशय गहन तत्वज्ञान या पदांमधून सांगितले आहे. उदा. धृतराष्ट्र व गांधारी महाभारत युद्धानंतर पांडवांजवळ रहात असत. धर्मराज रोज त्यांना वंदन करीत असे. भीमाला राग यायचा तेव्हा धर्मराज म्हणतो, “कशाला दोष द्यावा दुसऱ्याला । कर्म आपुले दैव आपुले । परब्रम्ह सर्वत्र संचले । दूर करू मोहाला । कशाला दोष द्यावा दुसऱ्याला ।।” त्याचप्रमाणे या ग्रंथातील वाक्यरचना देखील विचार करायला लावणारी आहेत व जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवणारी आहेत. असे काही अमृत विचार जे चिंतन करायला लावणारे आहेत, त्याचा आता विचार करूया. 

१) मनुष्य, नष्ट होणाऱ्या शरीराला पुष्ट करण्यासाठी कष्ट करतो पण दुष्ट वासना त्याला टाकतात. मृत्यू समयाला जी वासना उद्भवते त्याप्रमाणे पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून नाश पावणाऱ्या शरीरावर अतोनात प्रेम करून पुन्हा पुन्हा संसारात पडण्यापेक्षा याच शरीराचे सहाय्याने भगवंताची प्राप्ती का न करून घ्यावी ? 

२) एक दिवस भरपूर पाणी घालून चार दिवस न घातले तर साधे रोपटे सुद्धा सुकून जाते, वाढत नाही; तसेच भक्तीचे आहे. भक्ती ही सातत्याने असावी. आपल्या दुःखावरून दुसऱ्याचे दुःख जाणावे हेच खरे भक्तीचे लक्षण. जग सुखी असू दे मी दुःखात राहूनही दुसऱ्याचे सुख पाहू शकेन, समाधानी राहीन; हा आदर्श सदैव डोळ्यासमोर ठेवायला नको का ? 

३) एखादी गोष्ट मनाने घेतली तर जगात अवघड काय आहे ?

४) जितक्या गरजा कमी तितके सुख अधिक. आयुष्याचा क्षण अन् क्षण नामस्मरणात जावा. अध्यात्म श्रवणाची गोडी वाढवावी म्हणजे विषयांची आवडी कमी होईल.

विषय सेवनाने चित्त मलीन होते. भागवत कथा श्रवणाने ते शुद्ध होते. चित्ताची आत्यंतिक शुद्धता म्हणजे मोक्ष. आत्म्याच्या बंधाला व मुक्तीला कारण चित्तच. विषयांचे ठिकाणी आसक्त झाले की बंध. ईश्वराचे ठिकाणी रत झाले तेच चित्त मुक्तीला कारण. 

५) स्थूल देह व सूक्ष्म देह कार्य करण्यास अयोग्य झाले की तेच जीवात्म्याचे मरण. पुन्हा दोन्ही देह उत्पन्न झाले की जीवात्म्याचा जन्म. म्हणून जगण्याबद्दल दैन्य दाखवू नये. मरणाबद्दल भय मानू नये. 

६) वासनारुप मळ धुतला गेला पाहिजे. भगवंताचे ठिकाणी प्रीती असली तर मळ लवकर धुतला जातो.  देहावरची प्रीती कमी व्हावी, आत्मस्वरूपाबद्दल प्रेम उत्पन्न व्हावे हाच खरा कल्याणकारक साधन मार्ग होय. नामस्मरणाने वासना क्षीण होतात. नामाला कधीच सोडू नये.  

७) कामात सफलता प्राप्त होईपर्यंत प्रयत्न करावा.  

८) स्तुतीच्या वर्षावाने मनुष्य कर्तव्य विसरतो. कृष्ण पूर्ण कर्तव्यदक्ष. 

९) झाले गेले विसरून जायला मन मोठे असावे लागते. असे मनच विश्वमन होऊ शकते. 

१०) मनुष्य विलासात राहिला की ज्ञानावर आवरण येते. सद्गुरूकडूनच हे आवरण दूर होते. 

११) मनुष्य शरीर दुर्लभ आहे हे सदैव ध्यानात ठेवावे. मनुष्य शरीर म्हणजे संसार सागर तरून जाण्याची नाव. अनन्य शरणागती आली की सद्गुरू नावाडी होतात. 

अशा प्रकारच्या मौलिक विचारांची पेरणी आक्कांच्या भागवतात पानोपानी आहे. कृष्णकथा मुळातच गोड. त्यात प. पू. आक्कांसारख्या कृष्णभक्तांनी आळवल्यामुळे अधिकच गोड झाली आहे. भागवताचा नायक भगवान श्रीकृष्ण आहे. त्याचे चरित्र या ग्रंथात विस्तृतपणे सांगितले आहे. त्याचबरोबर अनेक राजांच्या कथा, भगवंताच्या अवतार कथा, सुकन्या चरित्र, ध्रुव बाळाची कथा, कपिल मुनींनी मातेला केलेला उपदेश, इ. मागचे रहस्य सोप्या भाषेत उलगडून दाखवले आहे. या कथांमधून आपण काय घ्यायचे हे पण स्पष्ट केले आहे. 

भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा संगम म्हणजे भागवत कथा पुष्पमाला. या त्रिवेणी संगमात नित्य स्नान करायला हवे. प. पू. आक्कांनी तीनशेच्या वर भागवत सप्ताह केले. अगदी खेड्यापाड्यात त्यांनी सप्ताह केले. अनेक भागवतकार तयार केले ‘भागवत कथा पुष्पमाला’ या ग्रंथाद्वारे त्यांचे भागवत आजही उपलब्ध आहे. आपण त्याचे श्रवण, मनन, निदिध्यासन करून स्वानंद लुटावा. ज्यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली त्या सद्गुरू माऊलीला त्रिवार वंदन ! 

गोपाल कृष्ण भगवान की जय ।

सद्गुरूनाथ महाराज की जय ।

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

माझ्या आक्का

मागील वर्षी म्हणजेच २०२४ साली नोव्हेंबर महिन्यात दा.  स. अ. चे अभ्यासार्थी, समीक्षक अयोध्येला दासबोध पारायणाला गेलो होतो. अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी नवीन रामांच्या मंदिराजवळ आम्ही ३ दिवसाचे पाराय‌ण केले. प.पू. आक्का वेलणकरांनी घळीत सकाळची जशी उपासना नेमून दिली आहे, त्याप्रमाणे काकड आरती वगैरे केली. सर्वजण एका वेगळ्या आनंदात होतो. प.पू. आक्कांची सर्वांना खूप आठवण येत होती कारण त्यांच्या प्रेमळ छत्राखाली आम्ही सारेजण जमलो होतो. त्यांच्या व रामाच्या कृपेमुळे तीन दिवसाचे पारायण निर्विघ्नपणे पार पडले. १९८४ साली नागपूरला माझ्या आईच्या एकसष्टीसाठी मी आक्कांना भागवत सांगायला बोलावले होते. स्टेशनवर त्यांना पाहिल्यावर मनात विचार आला की या काय भागवत सांगणार? पांढरे शुभ्र लुगडे, हातात कापडी पिशवी, लहान ट्रंक, गाडीतत्या प्रवासाने थकलेल्या, ते रूप पाहून वरील विचार मनात आला.  मी त्यावेळी वयाने लहान, अज्ञानी, अपरिपक्वच होते. पण चंदन उगाळल्यावर जसा सुवास सुटतो, तसा दोन दिवसात आक्का माझ्याच नव्हे, तर आमच्या सर्वांच्या झाल्या. 

१९८५ साली माझे आई-वडील अंदमानला गेले असताना तिथेच माझ्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून आक्का आमच्या घरी आल्या. त्यांच्या नुसत्या असण्याने आमचे घर शांत झाले. त्यावेळी त्या आईच्या सद्गुरू झाल्या. नागपूरात त्यांची कोणाशीच ओळख नसल्याने त्या आमच्या घरीच घरच्यासारख्या रहायच्या. पण पुढे मात्र आक्का सर्वांच्या झाल्या. चालता-बोलता, खाता-पिता, उठता-बसता त्या अनेक गोष्टी शिकवायच्या. त्यांचं अक्षर सुंदर होतं, त्या सुरेख रांगोळी काढायच्या. अंघोळ केल्यावर पांढरं शुभ्र नऊवारी लुगडं  चापून चोपून नेसल्यावर दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच असायचं. रुपवान होत्या. हातात माळ असायची, सतत जप करायच्या. पुढे अभ्यासार्थी वाढल्यावर वेळ मिळेल तेव्हा स्वाध्याय तपासायच्या. ‘रिकामा जाऊ नेदी क्षण’ असा कधी वेळ घालवायच्या नाहीत. कोणी कधीही प्रश्न विचारल्यावर, त्या समोरच्याचे समाधान करायच्या.

तरुण वयात त्या अत्यंत रागीट स्वभावाच्या असल्याने त्यांना फिटस् यायच्या. साधनेने, ध्यानाने त्यांनी क्रोधावर मात केली व फिटस् येणे थांबवले. एकदा रेल्वेलाईन ओलांडताना त्या पडल्या, पाय फ्रॅक्चर झाला. पण व्यायाम करुन त्यांनी पाय बरा केला व नंतर तीन तास मांडी न हालवता भागवत सांगायच्या. संतांचे जीवन आम्ही जवळून पाहिले आहे. एकदा द्वारकेहून आल्या तेव्हा तापाने फणफणल्या होत्या. सर्दी, खोकला प्रचंड झाला होता. सकाळी औषध घेऊन झोपल्या. दुपारी सर्व शिष्यवर्ग भेटायला आला. सोलीव सुखावर अडीच तास बोलल्या. ताप अंगात होताच. कोणाला या आजारी आहेत हे समजले नाही. देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करावी ते आम्ही पाहिले.

एकदा आमच्या घरी भागवत स‌प्ताह सुरु होता. पाचव्या दिवशी अंगात ताप खूप होता, दम लागला होता. त्या देवघरात गेल्या, पाट मांडला; कृष्णाला म्हणाल्या, तीन तास माझा ताप जाऊ दे, असे म्हणून व्यासपीठावर बसल्या व त्या दिवशी कृष्ण जन्म, त्याच्या लीला अतिशय रंगवून सांगितल्या. वेगळेच तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. झाल्यावर म्हणाल्या, नीला माझा कृष्ण मला सांभाळतो गं! किती विश्वास कृष्णावर! अनेकवेळा बालरूपातल्या कृष्णाने त्यांना दर्शन दिले आहे. सज्जनगडावर गेल्या असताना भागवताच्या वहीवर कृष्णाचे पाऊल उमटलेले सर्वांनी पाहिले आहे. तीनशेच्या वर त्यांचे भागवत सप्ताह झाले. पन्नासच्या वर भागवतकार त्यांनी तयार केले. भागवताचा पैसा त्या अनेक संस्थांना, गरीबांना दान करायच्या. साधना सप्ताह घळीत व्हायचा त्याचा खर्च त्या स्वतः करायच्या. 

आक्का अत्यंत निःस्पृह, निष्काम, निर्लोभी, निर्मत्सरी होत्या. पुढे पुढे माझ्या लक्षात आले की त्या संत आहेत. रहाणी अत्यंत साधी, निगर्वीपणा, निर्मळ मनाच्या, शुद्ध अंतःकरणाच्या, रसाळ वक्त्या होत्या. एकदा गुरुपौर्णिमेला त्या घरी आल्यावर, मी फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केले. “आज हे काय खूळ ?”,  त्यांनी विचारले. गुरुपुजन केले. “अगं मी काही तुझी गुरु नाही”. “आक्का माझ्या गुरूंना मी तुमच्यात पाहते” असं मी म्हटल्यावर त्यांनी मला मिठीच मारली. मनात विचार केला त्या नुसत्या आक्का नसून आक्कास्वामी आहेत, माझ्या आहेत. संताचे जीवन जनसामान्यांना सुसंस्कारीत करते. त्यांच्यातील भक्ती, नीती, प्रीती जागृत करतात. जीवन कस जगायचं ते स्वतः जगून, जगाला शिकवतात. त्यांनी सखोल दासबोध अभ्यासक्रम सुरू केल्याने घराघरात दासबोध सखोल अभ्यास झाला. प्रवचनकार, कीर्तनकार तयार झाले. दुख्खितांचे अश्रू पुसले गेले, अनेकांना जीवन जगायला उमेद मिळाली. विदर्भातल्या लहान लहान खेडेगावात आक्का गेल्या, भागवत केले. अनेक ग्रंथांवर प्रवचने केली, बायका तयार केल्या. पुढे पुढे आक्का ध्यानाला बसल्या की, दोन दोन तास त्या ध्यानात आत आत शिरलेल्या मी पाहिल्या आहेत. तेव्हा त्या अत्यंत तेज:पुंज, सुंदर दिसायच्या. 

एका दिवसात एक अशी एकशे तेरा दासबोधाची पारायणे मी नागपूरात एकशे तेरा घरी केली. शेवटच्या पारायणाला त्या गडावर आल्या. आक्का डोलीतून चला, पण जिद्दी आक्कांनी ऐकले नाही. प्रत्येक पायरीवर बसत-बसत रामनाम घेत दीड दोन तास चढण चढत होत्या. एकशे चौदाव्या पारायणाला मध्यभागी मी, एका बाजूला माझे सद्गुरू प.पू. अण्णाबुवा कालगावकर, दुसऱ्या बाजूला प.पू. आक्कास्वामी अशा थाटात पारायणाची समाप्ती केली. सर्वांना स्वर्गीय सुख मिळाले. अजूनही तो दिवस आठवला की आनंद होतो. आक्का मागे लागल्या म्हणून मी भागवत करायला लागले. १९९८ साली आईच्या पंचाहत्तरीला आक्कांनी नागपूरला रामाच्या मंदिरात भागवत केले. एकदा भागवत सांगताना मला म्हणाल्या, नीला आता मी मेले तर तू काय करशील?, काही नाही; मला खाली ठेवायचे व भागवत पूर्ण करायचे. चार महिन्यांनी असेच झाले, नांदेडला भागवत सुरू असताना त्यांनी देह ठेवला. आपुले मरण पाहिले म्या डोळा.. आज त्या आपल्यात नाहीत पण दा. स. अ. च्या रुपाने त्यांचे नित्य स्मरण आपण करतो. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांना माझा    शि. सा. नमस्कार.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

पूजनीय आक्कांचे कार्य

पूजनीय आक्कांच्या चरित्राचा विचार आपण केला तर तो कालावधी हिंदू संस्कृती नुसार महत्त्वाचा आहे कार्तिक कृष्ण तृतीया हा आक्कांचा जन्म दिन तर धनत्रयोदशी  हा निर्याण दिन!  या कालावधी मध्ये घरोघरी दीप उजळले जातात. प्रकाशाचा हा सण. आपल्याकडे असे म्हटले जाते की 

असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय।।

म्हणजे ही वैदिक प्रार्थना आपल्याकडे अतिशय पुरातन काळापासून अस्तित्वात आहे. याचा अर्थ असत्यापासून मला सत्याकडे ने, अंधाराकडून मला प्रकाशाकडे ने, आणि मृत्यू पासून मला अमरत्वाकडे ने, अशी ही भव्योदात्त प्रार्थना दिवाळीच्या सणात प्रतिबिंबित झाली आहे.  असत्याच्या, अशाश्वताच्या आणि अज्ञानाच्या अंधारापासून प्रत्येक मनुष्यमात्राची सुटका व्हावी, अशी प्रार्थना या त्रिपदीत आहे. दिवाळी हा तर दिव्यांचा सण संस्कृत मध्ये दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ – दिव्यांची रांग. ह्या दिवाळीच्या सणामागे केवढे तरी प्रचंड तत्त्वज्ञान आहे आणि आपण जे कार्य या भूतलावर येऊन करणार आहोत ते कार्य करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे दिवस पूजनीय अक्कांनी म्हणूनच ठरवले असावेत असे वाटते कारण त्यांना प्रत्येक मनुष्याच्या अंत:करणात ज्ञानदीप प्रज्वलित करायचा होता आणि प्रत्येकाची ब्रह्मजिज्ञासा जागृत करण्याची अनिवार ओढ होती. त्यांची ही ओढ बालपणापासून तीव्र होती. त्यामुळे त्यांनी पुढे तसेच कार्य केले.

 

ज्ञानदीप लावू जगी

हाच त्यांनी घेतलेला वसा होता आणि यासाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वक योजनाबद्ध रीतीने दासबोध सखोल अभ्यास याची आखणी केली आणि हे कार्य यावत्चंद्रो दिवाकरौ…याप्रमाणे चालू राहील समर्थ संप्रदायामध्ये असे कार्य आपल्याला एकमेवच म्हणता येईल अतिशय शिस्तबद्ध, नेटके, सर्वसमावेशक आणि तरीही प्रत्येक माणसाची ज्ञान जिज्ञासा जागृत करण्याचं कार्य पूजनीय आक्का या उपक्रमा मार्फत आजही करत आहेत. एका मध्यम वर्गीय सामान्य कुटूंबात जन्मलेल्या आक्का! परंतु त्यांचा कल, बुद्धिची झेप, रोख-ठोकपणा, निर्भिडपणा इ. विशेष गुण जाणून माता-पित्यांनी उच्च नीतिमूल्यांचे संस्कार त्यांच्यावर केले.घरची आर्थिक स्थिती बेताची होती.त्यामुळे शालेय शिक्षणासाठीही त्यांना फार कष्ट घ्यावे लागले. एकाच वेळी आक्कांनी ज्ञानार्जनही केले अन् ज्ञानदानही ! कमवा आणि शिका हे धोरण त्यांनी अवलंबले.

आयुष्य उमलत असताना मनात अनेक भावनांचा कल्लोळ उठत होता, स्रीसुलभ स्वभावानुसार अंतःकरणात अनेक इच्छा प्रबळ होत असत…संस्कारांचे शिंपण करणारे वडिल यातील वैय्यर्थ पटवून देत असत. त्यांच्या पश्चात हे कार्य आजी-आई दोघी करत. कधी आक्का याबाबत नाराजी व्यक्त करत. असा संघर्ष होता-होता.एक निश्चय पू.आक्कांनी ठामपणानं केला शिक्षण घेउन स्वतःच्या पायावर उभे रहायचे आणि आजन्म अविवाहीत राहून समाजसेवा करायची! 

नाथ महाराज म्हणतात तसे, मन जिंकावें पां आधीं।तेणें तुटेल उपाधी।। एकाजनार्दनीं मन। दृढ ठेवावें बांधून।। मनाच्या चंचलतेचा अनुभव आक्का स्वतः घेत होत्या आणि त्याचवेळी साक्षीभावानं ही त्या मनाचे खेळ न्याहाळत होत्या. १९५६ मध्ये अकस्मात झालेली सद्गुरु भागिरथी आई वैद्य यांची भेट आक्कांच्या जीवनाला अमूलाग्र कलाटणी देणारी ठरली.

जप, ध्यान, चिंतनाने प्रयत्नपूर्वक वाटचाल सुरु झाली.आणि त्यांनी शिष्यादिच्छेत् पराजयं अशी जी प्रत्येक गुरुंची इच्छा असते ती पू. आक्कांनी पूर्ण केली. अल्पावधीतच सद्गुरु हृदय जिंकले. सद्गुरुंचा सहवास अवघा दोन वर्ष लाभला. शिक्षिकेची नोकरी करत. शरीर,मन,बुद्धि,आत्मा या सर्वांच्या संतुलनातून आक्कांचे व्यक्तिमत्व अधिक उजळून निघाले. सद्गुरु आज्ञेनं भागवत सप्ताह सुरु झाले. समाजसेवा, भगवद्सेवा कार्य सुरु झाले.सर्व ग्रंथात ग्रंथराज दासबोध आणि भागवत याचा सतत अभ्यास, मनन, चिंतन सुरु झाले. साधारण १९७९ पासून प दा अ.चे केंद्रप्रमुख म्हणून कार्य सुरु झाले. दासबोध प्रचार प्रसार सुरु असतानाच भागवत सप्ताह होउ लागले. आक्कांनी केवळ स्वतःच भागवत सप्ताह न करता अनेक प्रापंचिक महिलांना भागवतकार म्हणून घडवले, तयार केले.

१९८४ मध्ये दासबोध सखोल अभ्यासास प्रारंभ झाला. स्वतः समीक्षण करु लागल्या. परंतु बघता-बघता याचा विस्तार खूप झाला. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अनेक राज्यांत अभ्यासार्थी अभ्यास करु लागले. आज भारतभर अनेक राज्यांत अभ्यासार्थी आहेत तसेच विविध परदेशातही दासबोध सखोलचे अभ्यासार्थी विखुरले आहेत. या अभ्यासाद्वारे उत्तम साधक घडावे या करिता साधना सप्ताहाचे आयोजन केले १९८५ पासून अव्याहतपणानं साधना सप्ताह सुरु आहे. यापुढेही सुरु राहील. मनुष्य प्राणी जन्माला येतो तो कोऽहं कोऽहं म्हणत. हा शोध आपल्या आकलना पलीकडचा आहे. याची यथातथ्य जाणीव ज्यांना असते तेच महानुभाव, संत होय. जाणे तोचि महानुभाव।- इति समर्थ

पू. आक्कांचा दासबोध सखोल अभ्यास उपक्रम म्हणजे रामदासाची उपमा। ग्राम नाही कैची सीमा।। समर्थांच्या भाषेत सीमा नसलेले गांव. आपण जेथून आलो ती जागा असीम आहे, अनंत आहे. हे जाणले तरी पुष्कळ झाले. विश्वाच्या अगडबंब आणि अफाट पसार्‍यात आपण किती लहान आहोत आणि अफाट पसार्‍यात आपण किती लहान आहोत अन् त्या सर्वेश्वराचे एक अंश म्हणून आपण किती मोठे आहोत, याची विनम्र पण साभिमान जाणीव आपल्या मनात असली पाहिजे. आपले सगळे जीवन, सगळे आयुष्य हे सीमा नसलेले गाव आहे. ते म्हटले तर क्षणभंगुर म्हटले तर अनादि-अनंत! दा स अ.परिवार एक सीमा नसलेले गांव होय! याचे कोडे उकलण्याचे तंत्र आणि मंत्र दासबोध सखोल अभ्यास शिकवतो. कोऽहं पासून सोऽहं पर्यंत कसे पोहोचायचे? देहेबुद्धि ते आत्मबुद्धी करावी। या करिता पू.आक्कांनी दासबोधातील प्रत्येक समासावर एक अशा २०० प्रश्नपत्रिका काढल्या. तसेच ते तपासण्यासाठी समीक्षक नेमले, तयार केले. इतकेच नव्हे तर समीक्षकांचा अभ्यास कायम Update रहावा म्हणून समीक्षकांच्या १८ प्रश्नपत्रिका काढल्या. या प्रश्नपत्रिका अभ्यासाला आव्हानात्मक असल्या तरीही बरोबर समास सापडल्यावर होणारा आनंद अनिर्वचनीय आहे.

दासबोध सखोलचे २०० स्वाध्याय पूर्ण झाल्यावर त्याच समासांचा अधिक सूक्ष्मपणे अभ्यास व्हावा म्हणून ४९ पुरवणी प्रश्नपत्रिका काढल्या.या सर्व उपक्रमावरुन पू. आक्कांचा शिक्षकी बाणा लक्षात आल्याशिवाय रहात नाही. हीच ज्ञानाची ज्योत पू.आक्कांनी प्रज्वलित केली हे त्यांचे अजोड अद्वितीय कार्य!  आ.तात्यासाहेब गाडगीळ, आ.आगरकर सरांनी तेवत ठेवले आणि सद्या ही धुरा विद्यमान संचालक आ.लाड सर समर्थ पणानं पेलत आहेत. अनेक आघाड्यांवर दा स अ. परिवार अग्रणी होत आहे. हे पाहून पू.आक्का शाबास! शाबास! शाबास म्हणत असतील. ज्ञानाचा अमृत कलश घेउन अवतीर्ण झालेल्या आक्का तो अमृतकुंभ रिता करुन धनत्रयोदशी दिनी धन्वंतरीला भेटायला गेल्या. जाताना भागवताचा अमृतकुंभ आमच्याकडे सोपवून गेल्या. अशा आक्कांच्या चरणी कोटि कोटि वंदना !

|| जय जय रघुवीर समर्थ ||

महाकारणदेह

आता आपण महाकारण देह बघूया. जेव्हा मनुष्य देहातच माणसाला आत्मज्ञान होते, ते जागृत असे आत्मज्ञान त्याला महाकारणदेह असे म्हणतात. आत्मज्ञान होण्यासाठी समर्थ चार पायऱ्या सांगतात. श्रवण, मनन, निधीध्यासन आणि रोकडा आत्मसाक्षात्कार. आपण बघितले की, ज्ञानाचा विचार फार सूक्ष्म आहे. आणि तो जितका सूक्ष्म आहे, तितकाच त्यावर मनन करण्यासाठी सूक्ष्म विचार करावा लागतो. आपण परमार्थात आत्मस्वरूपावर विचार करतो, तेव्हा असे लक्षात येते की, अंतरात्मा हा युगानयुगे विश्व चालवत असतो. त्यासाठीच जगातील मोठे-मोठे पुरुष, संतमहात्मे जगले. अंतरात्मा जर नसेल तर सारे व्यर्थ जाते. म्हणूनच तर सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. जो अत्यंत मननशील आहे, विवेकसंपन्न आहे, त्याला पंचभूतांच्या पलीकडे स्वतःपाशीच तो आत्मा सापडतो. त्यासाठी सूक्ष्मात शिरणे फार गरजेचे आहे. पण या मायेच्या गुंत्यामुळे सूक्ष्मामध्ये लक्ष गुंतवणारी माणसे फार कमी असतात. कारण हा अंतरात्मा फार सूक्ष्म आहे आणि आपला देह तर अत्यंत जड आहे. अंतरात्मा हा खरा देव आहे. माणसाला दृश्याचे आकर्षण असते, पण दृश्य हे नाश पावणारे आहे. त्यामुळे हा लोक आणि परलोक दोन्हीही मिळत नाही. सगळ्या कल्पना बाजूला सारून स्वच्छ ब्रह्माचाच शोध घ्यावा. आपण सारखे बघत आहोत की, तत्त्वज्ञानापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आत्मज्ञान झाले की मूळमायेपर्यंत जाता येते. प्रथम स्फुरण आढळते. त्या संकल्पाला उपासनेच्या सहाय्याने मिठी मारावी.

“उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो ।

उदंड केलें तरी तो जयो । प्राप्त नाहीं ।। १६-१०-२९ ।।”

उपासनेत मी उपासक असतो आणि अंतरात्मा उपास्य असतो. मी अंतरात्म्याशी तदाकार झालो की, उपासना फळास आली असे समजावे. आता अंतरात्म्याच्या पलीकडे अगदी एकरस निर्गुण, निर्मळ व निश्चळ परब्रह्म आहे. येथून तेथ पर्यंत ते ब्रह्म सगळीकडे दाट भरलेले आहे. समर्थ म्हणतात, ते नाही अशी जागाच नाही. सर्व प्राण्यांना ते सर्वकाळ भेटते. सर्व पदार्थांना ते आतबाहेर व्यापून आहे, लागून आहे, सर्व ठिकाणी व्याप्त आहे. ब्रह्म सर्वत्र आहे आणि श्रेष्ठ पण आहे. पण ते कसे आहे ? तर ते सूक्ष्मातिसूक्ष्म असे आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला बघितले, तसा सूक्ष्म विचारच करावा लागतो. याठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, जेव्हा साधक आत्मनिवेदन करतो तेव्हा, त्याचा “मी” नष्ट होतो आणि त्याला खऱ्या मी चे दर्शन होते. यासाठी फार सुंदर ओवी आहे.

“आपणांस निवेदिती । ऐसे भक्त थोडे असती ।

तयांस परमात्मा मुक्ती । तत्काळ देतो ।। ८-८-१० ।।”

यावरून आपल्या असे लक्षात येते की, “मी” चे विसर्जन फार गरजेचे आहे. अनेकजण भक्ती करताना नकळत स्वतःच्या अहंकाराची जोपासना करीत असतात. त्यातून देहबुद्धीच घट्ट होत जाते. समर्थांनी आपल्याला पुन्हा पुन्हा “देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी” असे सांगितले आहे. पण असे आहे की, फारच थोडे साधक अहंकाराचे विसर्जन करून उपासना करतात. अशांनाच आत्मदर्शन घडते. म्हणून भगवंताने लक्षावधी लोकांमध्ये एखाद्यालाच मी प्राप्त होतो असे म्हटले आहे.

“मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।। भ. गीता ७-३ ।।”

आत्मदर्शन म्हणजे काही शाब्दिक संकल्पना नाही. ती प्रत्यक्ष अनुभूती आहे. त्यासाठी बुद्धी संपूर्ण नाहीशी झाली पाहिजे आणि मी स्वतःच भगवत्स्वरूप आहे अशी ठाम धारणा झाली पाहिजे. नदी समुद्राला मिळाल्यावर वेगळी दाखवता येत नाही. तसेच साधक एकदा भगवत्स्वरूप झाला की, भगवंतापेक्षा वेगळा रहात नाही. असे अद्वैत साधल्या शिवाय खरे आत्मनिवेदन घडत नाही. यासाठी समर्थांनी एक फार सुंदर दृष्टांत दिला आहे. सगळे सैन्य मेल्यावर राजेपद प्राप्त झाले तर यात काय अर्थ आहे ? सैन्य असतानाच राजेपद असणे महत्त्वाचे. कारण सैन्याच्या सहाय्याने सत्ता गाजवून राज्य करावयाचे असते. तसेच माया अस्तित्वात असताना मायेवर मात करून मुक्ती मिळवायची असते. अज्ञानामुळे आपल्याला मायेचा धाक वाटतो. जोपर्यंत दोरी वरती सापाचा भास होत असतो, तोपर्यंत सापाची भीती वाटते. परंतु एकदा साप नसून दोरीच आहे, हे लक्षात आल्यावर दोरीची अडचण दूर होते. त्याचप्रमाणे आत्मदर्शन झाले की, मायेचा पडदा दूर सारला जातो. ग्रंथराज दासबोधात दशक आठ समास आठ ओवी क्रमांक ६१ ते ७० मध्ये आत्मदर्शनाचे फार सुंदर वर्णन समर्थ करतात. आत्मस्वरूप मुळात देहातीत आहे. देहबुद्धीमुळे आत्मा स्वतःला देह समजतो. आत्मदर्शन होते तेव्हा, हे वाटणे बंद होते. अशी आत्मस्वरूपाची जाणीव म्हणजेच महाकारण देह होय.

याच सूत्रानुसार परब्रह्माला मी एकमेव “परब्रह्म” आहे हे स्फुरण होते. असेच स्फुरण होते असे मानल्यास, त्या जाणीवेला ब्रह्मांडाचा महाकारणदेह म्हणावे लागते. या स्फुरणालाच मूळमाया म्हणतात. परब्रह्म स्वरूपाशी संत तदाकार झालेले असतात. त्यामुळे त्यांना जेथे तेथे एकचएक घनदाट, निर्मळ, निष्चळ, निर्गुण आणि गगनासारखी वाड अशी चिन्मय वस्तू प्रचितीस येते. कारण त्यांनी ईश्वराची कृपा प्राप्त करून घेऊन शुद्ध परब्रह्म प्राप्त केलेले असते. महाकारणदेहाच्या पलीकडे केवळ ब्रह्म असते. ईश्वराला त्याच्या स्वरूपाचे स्फुुरण सुद्धा नसून ते त्यांच्या अनादी निर्गुण मूळ स्वरुपात असतात.

अशा अवस्थेत ब्रह्मांडाच्या चारही देहाचा निरास झालेला असतो आणि यालाच परमात्मा म्हणतात. आणि याच अवस्थेला पिंडाच्या संदर्भाने अंतरात्मा म्हणतात. माणसाचे सर्वश्रेष्ठ जीवनध्येय काय आहे ? तर अनात्म्यास विन्मुख होऊन आत्मस्वरूपास सन्मुख होणे हे आहे. समर्थ सांगतात, मानव शरीर म्हणजे ब्रह्मांडवृक्षाचे उत्तम फळ आहे. आपल्याला आत्मस्वरूप जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी आपण साधकाची भूमिका कशी असावी ते बघूया. तर ती भूमिका विश्वस्तांची असावी. त्याला वस्तूचा वापर योग्य प्रकारे करता येतो, पण दुरूपयोग करता येत नाही. आपल्याला मिळालेल्या सर्वच वस्तू आपण भगवंताचे विश्वस्त म्हणून सांभाळायला हव्यात. स्वामी विवेकानंद कर्मयोगात छान सांगतात. ते म्हणतात, “मुलगा असू द्या पण माझा मुलगा म्हणू नका, रामरायाचा  म्हणा. घर असू द्या पण माझे घर म्हणू नका, रामरायाचे म्हणा. पावसचे स्वामी स्वरूपानंद एका अभंगात म्हणतात,

 

“धन सूतसुत  दारा । असू दे पसारा ।

चित्ती त्यासी थारा ।देऊ नको ।।”

हेच जड आत्मनिवेदनाचे रहस्य आहे. माझ्या अंतर्यामी  परमात्मा आहे. त्याप्रमाणे तो सर्वांच्या अंतर्यामी आहे. आणि तोच खरा परमात्मा आहे. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती स्थूल देहाच्या जागृती मध्येच सर्व क्रिया घडत असतात. सूक्ष्मदेहाच्या स्वप्नावस्थेत मनाचे चलनवलन होत असते. कारणदेहाच्या सुषुप्तीमध्येच अज्ञानात वासना रहात असते. महाकारणदेहाच्या तुर्यावस्थेत शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होत असते. या सर्व अभ्यासातून आपल्या लक्षात येते की, स्वयंप्रकाश, आनंद स्वरूप अंतरात्मा आपणच आहोत. हे सारे लक्षात घेऊनच आपल्या दृष्टीसमोर, आपल्या प्रयत्नांमध्ये मोक्ष प्राप्तीचेच ध्येय असावे.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language