राम मंत्र श्लोक १९-२०-२१

“नसे सत्य कांहीं दिस दों दिसांचे

तुला लूटिती चोरटे लोक साचे ।

स्त्रिया पुत्र कामा न येती तुला रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १९ ।।”

 

सरळ अर्थ – या दृश्य जगात शाश्वत सत्य असे काहीच नाही. स्थित्यंतर/बदल हा निसर्गाचा नियम आहे. क्षणोक्षणी प्रत्येक वस्तूमात्र बदलत असते. या क्षणी सत्य साक्षात समोर असलेले असत्य ठरते, नाहिसे होते. जो पैसा, धन वेळेला उपयोगी पडेल म्हणून काबाडकष्टाने साठवला, तर ते प्रसंगी चोर-दरोडेखोर लुटून नेतात. तशीच वेळ आली की ‘आपले’ असणारे स्त्री-पुत्र इ. जीवलग सुद्धा मदतीला येत नाहीत. मुखी नित्य नाम असेल तरच काही हितकर होते. म्हणूनच अखंड ‘हरे राम हा मंत्र सोपा’ जपावा.  श्रीसमर्थांचा बोध – श्रीमद् आदिशंकराचार्य आपल्या “भज गोविन्दम्” या स्तोत्रातून हेच समजावून सांगतात. “का ते कान्ता कस्ते पुत्रः” आपल्याला आपल्या नातलगांचा खूप आधार वाटतो. आज परिस्थिती बदलली आहे. सगे-सोयरे, नातेवाईक आपले वाटत नाहीत. पण अगदी जवळचे आई-वडील, कन्या-पुत्र, पति-पत्नी, इ. कुटुंबीय तर फक्त माझेच असतात ना ? मात्र ते सुद्धा काही मर्यादेपर्यंतच आपले असतात. आज थोडे आजूबाजूला बघितले तर लक्षात यायला वेळ लागत नाही की, वाल्या कोळ्याची गोष्ट पुराणापुरती मर्यादित नाही तर वास्तव आहे. आज माणसाच्या स्वार्थाने चरमसीमा गाठली आहे. आपले म्हणवणारेच आपल्याला लुटायला बसले आहेत. नव्हे, मागील हिशोब पूर्ण करण्यासाठीच ते ‘संबंधी’ झालेले असतात. परमार्थाची वाटचाल करणाऱ्यांनी तरी हे ओळखून जगाचा भरवसा धरू नये. अंतरात एकच ठसवावे.

 

“राम येक माता राम येक पिता ।

राम सर्व भ्राता सहोदर ।।

त्यासाठीच श्रीसमर्थ सांगतात, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.”

“नको तू कदापी करूं तीर्थयात्रा ।

तनू दंडिनी क्षीणता सर्व गात्रा ।

करी ग्रस्त आयुष्य तू कोण सारे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। २० ।।”

सरळ अर्थ – चारशे वर्षांपूर्वी आजच्यासारखी प्रवासाची सुलभ साधने नव्हती. तीर्थयात्रा करणे जिकरीचे काम होते. अनेकदा लोक घरा-दारावर तुळशीपत्र ठेऊन प्रवासाला निघत. कारण, सुखरूप घरी परत येण्याची शाश्वती नव्हती. यातना आणि त्रास सोसणे म्हणजेच यात्रा असे मानले जाई व ते खरेच होते. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, अशा खडतर प्रवासाचे कष्ट, देहदंड सोसून किती पुण्यलाभ होणार ? त्याऐवजी शुद्ध अंतःकरणाने घरीच बसून निष्ठेने नाम घेतले तर जास्त बरे. तेव्हा हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

श्रीसमर्थांचा बोध – पुरश्चरण, जपानुष्ठान पूर्ण झाल्यावर बारा वर्षे तिर्थाटणाच्या निमित्ताने संपूर्ण भारतवर्ष आसेतूहिमाचल पादाक्रांत करणारे श्रीसमर्थ येथे म्हणतात, “नको तु कदापि करू तीर्थयात्रा” असे का ? श्रीसमर्थांचा तीर्थयात्रेचा हेतू आणि इतरांचा हेतू यात महदंतर आहे. तीर्थयात्रा करून पुण्यप्राप्ती एवढीच सर्वसामान्याची आदरयुक्त भावना असते. पूर्वीच्या काळी प्रवास करणे अत्यंत कठीण असे. वाटेत घनदाट जंगल, वन्य श्वापदांची भीती, त्याबरोबर चोर-दरोडेखोर, लुटारू यांची दहशत होती. मध्यम वयात गृहस्थाश्रमातील कर्तव्याची पूर्ती झाल्यावर वानप्रस्थ स्वीकारून एकमेकांच्या सोबतीने लोक तीर्थयात्रेला जायचे. तेव्हा किती काळ लागेल याची निश्चिती कोणीच देऊ शकत नव्हते. आज परिस्थिती अमुलाग्र बदलली आहे. आजच्या विज्ञानयुगात दळणवळणाची, अनेक सुखकर साधने उपलब्ध आहेत. पैसा खर्च केला तर प्रवासात, जेवण्याखाण्याच्या मनाप्रमाणे सोयी मिळतात. देवदर्शन, त्यासाठीचा भक्तिभाव असतोच असे नाही. तीर्थाटनाच्या नावाखाली ते पर्यटनच होते. खरोखर त्यातून पुण्यप्राप्ती होऊन मोक्षमार्गाला लागतो का ? हा ही एक प्रश्नच आहे. यामुळे शरीराला कष्टच जास्त होतात. सगळ्यांच्याच अंतःकरणात खरोखर ईश्वर प्राप्तीची ओढ, तळमळ असेलच असे नाही. केवळ रूढी, परंपरा, सगळे निघालेत म्हणून जायला पाहिजे. या आणि अशा विचाराने केलेली यात्रा पुण्यदायी असू शकते का ? अनेक संशय/विकल्प मनात ठेऊन केलेला प्रवास म्हणजे फुकटचा शीणच होतो. त्याने आत्महित कसे साधणार ? न पेक्षा घरीच निवांत बसून एकाग्र मनाने जप केला तर निश्चितच भावभक्तीच्या दिशेने पुढे पाऊल पडणार आहे. ईश्वरी अनुसंधान, जप, नामसाधन सोडून; प्रवासात, वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा सुलभ असे नामसाधन करणे श्रेयस्कर ठरते. म्हणूनच येथे श्रीसमर्थ म्हणतात ‘हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे’

“तुला येम पाशीं करी बद्ध जेंव्हा ।

सखा कोणता सोडवी सांग तेंव्हा ।

यमाला कदापि दया ते न ये रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। २१ ।।”

सरळ अर्थ – ज्यावेळी मृत्यू येतो तेव्हा कोणीही अगदी जीवाचा जीवलग, किंवा सत्ताधीश अधिकारी सुद्धा त्याला अडवू शकत नाही. ठरल्या वेळी ठरल्या क्षणी ‘तो’ येतोच. आणि तेथे कुठलीही विनंती, मागणी, लाच अशी कोणतीही मात्रा लागू पडत नाही. यमाला दयामाया नाही. म्हणूनच ‘हरे राम हा साधा सरळ सोपा मंत्र’ नित्य जपावा व आपले कल्याण साधावे.

श्रीसमर्थांचा बोध – जन्माला येणारा प्रत्येक जीव मृत्यू  बरोबर घेऊनच येत असतो. प्रत्येकाला मृत्यू  येणार हे निश्चित असते. फक्त मृत्यूची वेळ ठरलेली असली तरी, ती कोणालाही निश्चितपणे माहित नसते. यदाकदाचित तज्ञ ज्योतिषाने वेळ सांगितली किंवा आधुनिक  वैद्यकशास्त्राने वेळेची आधी कल्पना दिली तरी ते मरण टाळण्यासाठी कोण काय करू शकते? वाट पहाण्याशिवाय ज्योतिषी, वैद्य, सत्ताधीश असले तरी काहीही करू शकत नाही. श्रीसमर्थ दासबोधात लिहितात –

राजा असतां मृत्य आला । लक्ष कोटी कबुल जाला ।

तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ।। १२-८-३२ ।।”

एकदा आला की, मृत्यू पळभराची सवड देत नाही. त्याच्यासमोर लहान-थोर, भला-बुरा, राजा-रंक, शूर-भित्रा भेद नाही. सर्वांवर मृत्यूचा तडाखा सारखाच बसतो. तेव्हा मरण निश्चित आहे. तर जाण्यापूर्वी मिळालेल्या संधीचे सोने करावे. आपल्या जन्माचे सार्थक करावे. त्यासाठीचा सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण करणे. या घोर कलियुगातील भगवंताचा अवतार म्हणजे नामावतार होय. त्याची मनोभावे आराधना करावी. हे ओळखून ‘हरे राम मंत्र  सोपा जपा रे’ असे श्रीसमर्थ  आपल्याला या श्लोकातून सांगत आहेत. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

विज्ञान

पारमार्थिक क्षेत्रात ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, विज्ञान इत्यादी शब्द बरेचदा कानावर पडतात. परंतु त्यांचा शास्त्रीय अर्थ आपल्याला माहिती नसतो. त्यामागील संकल्पना स्पष्टपणे कळलेल्या नसतात. त्या संकल्पना नीटपणे कळल्या, तरच संतांच्या ग्रंथातील खरा अर्थ आपल्याला समजतो. श्रीसमर्थ म्हणतात,

“येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान ।

हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ।। १४-९-१६ ।।”

पारमार्थिक भाषेत बोलायचे झाले तर विपरीत ज्ञान हे भ्रमरूप असते. वस्तू आहे तशी न दिसणे म्हणजे भ्रम. उदा. अंधारात दोरी सापासारखी दिसते. अज्ञानामुळे भ्रम होतो. परंतु दोरीवर उजेड पडला की तो साप नसून दोरी आहे याचे ज्ञान होते. याचप्रमाणे अज्ञानामुळे जीव ‘देह म्हणजेच मी’ असे समजतो. परंतु आत्मज्ञान झाले की जीवाला आपले खरे स्वरूप कळते. अज्ञान, विपरीत ज्ञान व ज्ञान या तीनही दृश्य विश्वाच्या अनुभवातील कल्पना आहेत. त्या सर्व नाहीशा झाल्या की ब्रह्मसाक्षात्कार घडतो. त्या अवस्थेला ‘विज्ञान’ असे म्हणतात. व्यवहारामध्ये आपण ज्ञान हा शब्द बऱ्याच गोष्टींच्या संदर्भात वापरतो. ज्ञान म्हणजे एखादी गोष्ट, वस्तुस्थिती, विषय समजणे, त्याचे आकलन होणे. प्रापंचिक ज्ञान व  पारमार्थिक ज्ञान यात मूलतः फरक आहे. प्रापंचिक ज्ञान होण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. १) वस्तू किंवा व्यक्ती, २) जाणणारा.

व्यवहारी ज्ञानामध्ये जाणणारा आणि जाणली जाणारी वस्तू किंवा व्यक्ती यांच्यातील द्वैत कायम राहते. जोपर्यंत ज्ञानासाठी ज्ञाता, ज्ञेय व इंद्रिये यांची गरज आहे, तोपर्यंत त्या ज्ञानाला केवळ माहितीचे स्वरूप असते. परंतु पारमार्थिक ज्ञानात मात्र परमात्मवस्तू व तिला जाणणारा एकरुप होऊन जातात. ‘थेंबुटा सागरी मिळाला’ याप्रमाणे ज्ञात्याचे स्वतंत्र अस्तित्त्व शिल्लक उरत नाही, द्वैत संपते,  त्यामुळे ‘मी जाणले’ ही जाणीवही नष्ट होते. यालाच ‘आत्मज्ञान’ म्हणतात. 

आध्यात्मिक परिभाषेत ‘मी ब्रह्म आहे’ ही भावना हे ज्ञान होय, तर ‘मी देहच आहे’ ही वृत्ती म्हणजे अज्ञान असे मानले जाते. तसे पाहिले तर ज्ञान व अज्ञान दोन्ही वृत्ती रूपाने समान आहेत. श्रीसमर्थ म्हणतात,

“ज्ञान आणि अज्ञान । वृत्तिरूपें हें समान ।

निवृत्तिरूपें विज्ञान । जालें पाहिजे ।। २०-१-२८ ।।”

जसे, पंखा मला त्याच्या आकारावरून कळतो. पण तो कसा बनवला व कोणत्या तांत्रिक बाबींमुळे तो फिरतो याचे अज्ञान आहे. म्हणजे पंख्याच्या बाह्य रूपाचे ज्ञानही आहे आणि अंतरंगाचे अज्ञानही आहे. ज्ञानही मलाच होते आहे आणि अज्ञानही मलाच आहे.  दोन्हीतही ‘मी’ पणाची जाणीव आहे. मीपणाची जाणीव सुद्धा नाहीशी झाली की उरणारे केवळ अनुभवरुपी ज्ञान म्हणजे विज्ञान होय.  संतांनी जे ज्ञान सांगितले त्याची सोपी व्याख्या करताना श्रीसमर्थ म्हणतात,

“ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।

पाहावें आपणासि आपण । या नाव ज्ञान ।। ५-६-१ ।।”

‘पहावे आपणासी आपण’ म्हणजे मी कोण ? कुठून आलो ? येण्याचे प्रयोजन काय ? या गोष्टींचा विचार करणे. असा विवेकयुक्त विचार करीत असताना ‘खरा मी’ म्हणजे देह नसून आत्मरूप चैतन्य आहे हे कळते. यापैकी टिकणारे काय व तात्पुरते काय हे पाहिले असता, देह नाशिवंत आहे हे लक्षात येते. देहात असेपर्यंत ‘मी ब्रह्मस्वरूप आहे’ असा अनुभव घेणे, हेच आपल्या जन्माचे प्रयोजन आहे. अशाप्रकारे आपणच आपल्या अंतरंगात उतरून ‘खऱ्या मी’ चे ज्ञान करून घ्यावे असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे. सर्वसामान्यपणे मनुष्य देहासंबंधी विचार करतो. ‘मी देहच आहे’ या घट्ट भावनेने त्याचे सर्व व्यवहार सुरू असतात. या अज्ञानामुळे ती व्यक्ती, वस्तू व दृश्य जगाच्या संगाने बांधली जाते. त्या संगात अडकल्यामुळे त्या व्यक्तीला परमार्थ साधत नाही.

मनुष्याचे सुख-दुःख हे दुसऱ्या कशावर, कुणावर तरी अवलंबून असते. यामुळेच त्याच्या समाधानाला उणेपणा येतो. म्हणून जोपर्यंत देहबुद्धीचा संग सुटत नाही तोपर्यंत आनंदमय असलेल्या आत्मस्वरूपाचा जीवाला अनुभव येत नाही. नि:संग झालेल्या ‘खऱ्या मी’ ला भगवंताच्या चरणी समर्पित करणे हाच आत्मसाक्षात्काराचा राजमार्ग आहे. शरणागतीची ही युक्ती ज्याला साधते, त्याच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात. 

असा आत्मज्ञानी पुरुष देहात असूनही अलिप्तपणे राहून विदेहस्थिती भोगतो. कर्मफल कोणतेही असो, अनुकूल किंवा प्रतिकूल असे न मानता; जे आपल्या वाट्याला येईल ते आनंदाने स्वीकारतो. हीच त्याची सहज स्थिती असते. एकदा का साधक मनाच्या निर्विकल्प अवस्थेला पोहोचला की तेथे मन शिल्लकच रहात नाही. मग ‘आनंदाचे डोही । आनंद तरंग’ अशी त्याची अवस्था होऊन जाते. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात,

“संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरुप ।। ४-४-८ ।।”

या सातही संकेताद्वारे साधक अखंड समाधानाची स्थिती अनुभवू शकतो.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

भीमरूपी स्तोत्र क्र. ४ – त्रिकूट जिंकिला भला

“अंजनी सुत प्रचंड । वज्रपुच्छ काळदंड ।
शक्ति पाहतां वितंड । दैत्य मारिले उदंड ।। १ ।।”

या स्तोत्रात अंजनी मातेच्या सुताचे/पुत्राचे, त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याचे रूप भव्य आहे आणि
पुच्छ हे वज्रासमान आहे. त्याची प्रहार करण्याची क्षमता मोठी आहे. रावणाने मारुतीच्या शेपटीला कापड
बांधून त्यावर तेल लावून पेटविले तरी त्याला अग्नीने काही इजा झाली नाही. त्या अग्नीचा प्रयोग रावणाच्या
लंकेवर झाला आणि एक तृतीयांश लंका मारुतीने आपल्या प्रज्वलित पुच्छाने जाळून टाकली. अनेक राक्षस तर
या वज्र दंडाच्या तडाख्याने गारद झाले. यावरून त्याच्या अतिप्रचंड शक्तीचा अंदाज येतो. काळ दंड म्हणजे
यमाने दिलेला दंड, म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच. मारुतीचे महाशक्तीशाली पुच्छ, ताडणे; चिरडणे; उचलून फेकून देणे;
अशा अनेक मार्गांनी असुरांना मारत राहिले.

“धगधगीतसी कळा । वितंड शक्ति चंचळा ।
चळचळीतसी लिळा । प्रचंड भीम आगळा ।। २ ।।”

मारुतीने केलेल्या लीलांचे वर्णन यापूर्वीच्या भीमरूपी स्तोत्रात आले आहे. त्याचे पर्वत शिखरांवरून
उड्या  मारणे, वृक्षाच्या फांद्यांवरून उड्या मारताना वृक्ष कोसळणे आणि सर्वात विशेष म्हणजे सूर्य बिंब धरायला झेपावणे इ. हे त्याचे इतर वानरात आगळे-वेगळेपण; त्याच्या साहसात आणि धैर्यात दिसतेच. अति शक्तीशाली पुच्छ हे सुद्धा त्याचे वेगळेपण आहे. मारुती तेजस्वी आहे. हे तेज वैराग्याचे आहे व तेही कडकडीत असे आहे. त्याची धावण्याची गती, ही वायूसमान आहे. “वितंड” हे विशेषण पहिल्या श्लोकात, पुच्छाच्या शक्तीसाठी आणि प्रस्तुत श्लोकात मारुतीच्या विद्युत वेगाने धावणे; संचार करणे यासाठी आले आहे.

“उदंड वाढला असे । विराट धाकुटा दिसे ।
त्यजूनि शून्य मंडळा । नभांत पिंड आगळा ।। ३ ।।
लुळीत बाळकी लिळा  गिळोनि सूर्यमंडळा ।
बहूत पोळतां क्षणीं । थुंकिलाचि  तत्क्षणीं ।। ४ ।।”

या श्लोकांचा संदर्भ मारुती जन्मतःच सूर्य बिंब हस्तगत करायला झेपावला त्याचा आहे. त्याला त्याच्या पाळण्यातून सूर्य एखाद्या फळाच्या आकाराचा दिसला. पण जेव्हा मारुती आकाशात उंच उंच गेला, तेव्हा त्याला सूर्य बिंबाचा आकार आणि त्याची दाहकता दोन्हीही जाणवले. सूर्य बिंब याला श्रीसमर्थ शून्य मंडळ म्हणतात. ते शून्याकार आहे. तुरीय स्थितीत जो साक्षीभाव असतो त्याला श्रीसमर्थ शून्य स्थिती म्हणतात व साधकाने तीही ओलांडून पुढे जायला हवे म्हणजे भेद पूर्ण संपून, मीपणा संपूर्ण नाहीसा होऊन साधक
परब्रह्माला/स्वस्वरूपाला प्राप्त होतो असे श्रीसमर्थ दासबोधात सांगतात. मारुतीरायांच्या शून्य मंडळ ओलांडून पलीकडे जाणे याला असा अर्थही असू शकेल.  असे मोठे फळ खाणे हे एक रूपक म्हणूनही पहाता येईल.
श्रीसमर्थ म्हणतात की, मारुती विशाल होत गेला. त्याच्या पुढे विराट म्हणजे ब्रह्मांड ठेंगणे दिसू लागले. त्याने ते फळ गिळले आणि टाकूनही दिले. अनुभव घेतला आणि ते जितक्या सहजतेने गिळले तितक्या सहज फेकून दिले.
गिळणे आणि टाकणे हेही प्रतिकात्मक घ्यायला हवे. त्या त्या अवस्थेतील ज्ञान प्राप्त झाल्यावर तिथे अडकून न
पडता अलिप्त होता आले पाहिजे तरच पुढील प्रगती घडू शकेल. त्या फळाच्या आशेने झेपावणे उत्कट बाल
सुलभ उत्कंठा असली तरी त्याची दाहकता समजल्यावर ते फेकून देणे योग्य, हा विवेकही आहे. श्रीसमर्थ म्हणतात, नभात मारुतीचा हा जो खेळ होता तो आगळावेगळा असाच होता. मारुतीचे हे ब्रह्मांडाहून विशाल
होणे हे त्याचे मूळ परब्रह्माशी असलेले नाते दर्शवते.

“धगधगीत बूबुळा । प्रत्यक्ष सूर्यमंडळा ।
कराल काळमूख तो । रिपूकुळांसि दु:ख तो ।। ५ ।।
रूपें कपि अचाट हा । सुवर्ण कट्टचास तो ।
फिरे उदास दास तो । खळास काळ भासतो ।। ६ ।।”

मारुतीच्या कृद्ध स्वरूपात त्याचे डोळे सूर्याप्रमाणे तेजस्वी दाहक असे भासले. त्याचे मुख हे कराल आहे, जणू ते काळाने विनाशासाठी उघडले आहे. रावणादि असूरांना अत्यंत दु:ख देणारे असे हे रूप आहे. त्याना
दंडीत करणारे हे रूप आहे. असूर कितीही बलशाली असोत, संख्येने अधिक असोत त्यांचे निर्दालन होणारच असा सज्जनांसाठी दिलासा आहे. मारुतीने वानर सेनेचे अग्रभागी राहून नेतृत्व केले. वानरांना युद्ध सक्षम बनवले. त्यांच्यात रण आवेश फुंकला. सीतामाईची सुटका, आपणच करायची आहे असा दुर्दम्य आत्मविश्वास
त्यांच्या मनात उत्पन्न करणे हे मारुतीरायांचे मोठे कार्य आहे. श्रीसमर्थांना तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीशी
झुंज घेणारा असा समाज निर्माण करायचा होता. त्यासाठी हे स्तवन महत्वाचे आहे. मारुती शत्रूला धडकी भरवणारा असला तरी त्याची मूळ प्रवृत्ती उदास म्हणजे अनासक्त, विरक्त अशीच आहे. राम कार्यार्थ त्याचा आवेश आहे. पण मारुतीचे नित्य स्वरूप कोणते तर रामाचा दास हेच आहे. भक्तांना त्याचे सौम्य रूपच
अनुभवास येते.

“झळक झळक दामिनी । वितंड काळ कामिनी ।
तयापरी झळाझळी । लुळीत रोमजावळी ।।७।।”

आकाशात तळपणारी वीज लोभस असते पण ती जिथे कोसळते तिथे विद्ध्वंस करते. जाळपोळ करते.
मारुती आकाशात उड्डाण करतात तेव्हा आकाशातील विजेचा प्रकाश अंगावर पडून त्याच्या अंगावरील लव
चमकून उठते असे वर्णन श्रीसमर्थ करीत आहेत. श्रीसमर्थांनी त्यांच्या भावविभोर अवस्थेत हे असे अनेक प्रसंग
प्रत्यक्ष अनुभवले असणार. अतिशय प्रत्ययकारी वर्णन आहे. वितंड काळ कामिनी म्हणजे विजेचा लोळ असे
श्रीसमर्थ म्हणत आहेत. मृत्यूची भयानकता आणि देवतेची लोभसता दोन्ही वर्णन करतात.

“समस्त प्राणनाथ रे । करी जना सनाथ रे ।
अतूळ तूळणा नसे । अतूळ शक्ति वीलसे ।। ८ ।।”

मारुती पवन पुत्र आहेत. वायुरूप आहेत. अखिल विश्वाचा प्राण आहेत. हनुमान हे असामान्य,
अतुलनीय अशा शक्तीने युक्त आहेत. त्यासम तेच. हनुमान ही शक्तीची देवता आहे. भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण
आहे. म्हणून जे बलोपासना करतात त्यांना आणि जे प्रभूश्रीरामांची भक्ती करतात त्या दोघांना मारुतीराय
सहाय्य करतात, त्यांच्यावर आलेली संकटे निवारतात.

“रूपें रसाळ बाळकू । समस्त चित्त चाळकू ।
कपी परंतु ईश्वरू । विशेष लाधला वरू ।। ९ ।।
स्वरूद्र कोपल्यावरी । त्यास कोण सांवरी ।
गुणागळा परोपरी । सतेज रूप ईश्वरी ।। १० ।।”

श्रीसमर्थ या दोन श्लोकात मारुतीचे लोभस बाल रूप आणि त्याचे रुद्रासम रौद्र रूप याचे वर्णन करतात. वानर
असूनही मारुतीला विशेष वर प्राप्त आहे. चिरंजीव रहाण्याचा वर त्यांना प्राप्त आहे. ध्रुव, प्रल्हाद, बिभीषण
आणि अश्वत्थामा हे सारे नरदेहधारी आहेत. मारुतीची अनन्य भक्ती आणि राम काजातील अपूर्व योगदान
यामुळे मारुतीने विशेष वर प्राप्त करून घेतला आहे. मारुतीचे कोपलेल्या रुद्राचे रूप हे कळीकाळाला अनावर
असे आहे, तर त्याचे बाल रूप; दास रूप मोठे लोभसवाणे आहे. ईश्वरी तेजस्वी रूप लाभले आहे.

“समर्थदास हा भला । कपीकुळांत शोभला ।
सुरारिकाळ क्षोभला । त्रिकूट जिंकिला भला ।। ११ ।।”

हनुमान अतिशय ज्ञानी आहे, रामाचा दास झाल्यामुळे वानर कुळाला अभिमान वाटावा असा आहे.
देवांच्या शत्रूंवर मात्र काळ होऊन तुटून पडणाऱ्या मारुतीने लंकेवर विजय मिळवला.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
संदर्भ – सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे, डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे

गुरूची महती

“पुस्तकज्ञानें निश्चये धरणें । तरी गुरु कासया करणें ।

याकारणें विवरणें । आपुल्या प्रत्ययें ।। १२-६-३० ।।”

अर्थ : “अनुभवाशिवाय जर केवळ पुस्तके वाचून परमात्मस्वरूपाचा निश्चय होत असता तर सद्गुरू करण्याची आवश्यकताच राहिली नसती. पुस्तकी ज्ञान हे लटके असते. त्यामुळे आधी स्वतः अनुभव घ्यावा, त्यावर सारासार विचार करावा.” 

आपला विवेक आपल्या प्रत्ययावर आधारित असावा, असं श्रीसमर्थ या ओवीतून सांगत आहेत. १२-६ या समासातील पहिल्या तीन ओव्यांमधून परब्रह्म कसे आहे याचे वर्णन श्रीसमर्थांनी केले आहे. ते निर्गुण, निर्मळ, शाश्वत, विमल असे आहे. त्याला जन्म-मरण नाही. शून्यातीत, मायातीत, निरंजन असे ते आहे. त्यातून संकल्प उठला व मूळमाया निर्माण झाली. त्याला षड्गुणेश्वर किंवा अर्धनारीनटेश्वर म्हणतात. त्यातून पुढे गुणमाया प्रसवली. सत्व, रज, तम हे तीन गुण निर्माण झाले. विष्णू म्हणजे सत्वगुण, तो सर्वांचा पालन कर्ता झाला. ब्रह्मा जाणीव नेणीव मिश्रित आपल्या कर्तृत्वाने त्रिभुवनांचा उत्पत्ती कर्ता झाला आणि पुढे संहारकर्त्या तमोगुणाचे कर्तेपण शंकराकडे आले. यातूनच पुढे पंचमहाभूते व्यक्त दशेला आली.

पुढे १२ ते १६ या ओव्यांमध्ये पंचमहाभूते कशी निर्माण झाली ते सांगितले आहे. आकाश म्हणजे अंतरात्मा. त्यात चळण झाले तो वायू. शीतल वायूपासून चंद्र, तारका निर्माण झाल्या आणि उष्ण वायूपासून अग्नी निर्माण झाला. शीत उष्ण दोन्ही मिळून तेज निर्माण झाले. त्या तेजापासून पाणी निर्माण झालं आणि या पाण्यापासून पृथ्वी म्हणजेच वनस्पती, औषधी, अन्न आणि ८४ लक्ष जीवयोनी निर्माण झाल्या.

आता अशा क्रमाने विश्वाची रचना झालेली आपण पाहिलं. याचा साधकाने प्रत्यक्ष अनुभव, प्रचिती पाहून मग त्याचा संहार कसा होतो तेही पहावं व अनुभवावं. यालाच सारासार विचार म्हणतात. संहाराच्या वेळी देखील ज्याच्यातून जे निर्माण झालं ते त्यातच पुन्हा विलीन झालेलं प्रत्ययाला येतं. शेवटी महाप्रलयाच्या वेळी सर्व विश्वाचा संहार होतो. 

विश्व अवतरताना आणि संहारताना शाश्वत, निरंजन ब्रह्म आरंभापासून अखेरपर्यंत जसेच्या तसे रहाते. उत्पत्ती, स्थिती आणि लय या सर्व गोष्टी उपाधीमय असतात; तात्पुरत्या असतात; भ्रमरुप असतात हे ओळखता आलं पाहिजे आणि शाश्वत ब्रह्माचे अनुसंधान राखता आलं पाहिजे. आणि हे साधण्यासाठी जो सूक्ष्म विवेक लागतो तो केवळ ग्रंथ वाचनाने, पुस्तकी ज्ञानाने करता येत नाही तर त्यासाठी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या सद्गुरूलाच अत्यंत तळमळीने शरण जाणे अत्यंत आवश्यक आहे. अंतरात्मा हा केवळ साक्षी आहे. त्याचा महिमा सगळे सांगतात. पण तो शुद्ध ब्रह्म नाही याचा प्रत्यय येण्यासाठी सर्वसाक्षिणी अवस्थेचा अनुभव घ्यावा लागतो. विश्वाच्या निर्मितीपासून ते संहारापर्यंत सर्व मायेचा प्रांत आहे. सर्व उपाधीरूप आहे. या उपाधींमध्ये जो गुंतून रहातो त्याला बाहेर काढणं महाकठीण आहे. सारासार विवेक विचाराच्या आधाराने, या गुंत्यातून बाहेर पडून प्रत्यक्ष अनुभव घेणाऱ्यालाच परब्रह्माची प्राप्ती होते.

अनेक ब्रह्मांडे निर्माण करणारी जी मूळमाया आहे, जी अपूर्ण आहे पण तिलाच विवेकहीन लोक पूर्णब्रह्म समजतात. ते मायेमध्येच अडकून रहातात. काही लोक इथेच वल्गना करत आपल्या जन्माचे नुकसान करून घेतात. स्वतःला मोठे म्हणवून घेणारे लोक या जगात पुष्कळ आहेत. परंतु विवेकी पुरुष खरा मोठा कोण हे बरोबर ओळखतात. अशा या टप्प्यावरती श्रीसमर्थ आपल्याला या तुर्येला ओलांडण्याचं साधन काय आहे ते १२-६-३० आणि ३१ या केवळ दोन ओव्यातून सांगतात. ती एकतीसावी ओवी पुढिलप्रमाणे –

“जो बहुतांच्या बोलें लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला।

एक साहेब नस्तां कोणाला । मुश्यारा मागावा ।। १२-६-३१ ।।”

अर्थ : “प्रत्येकाची मतं वेगवेगळी असल्यामुळे मत मतांतर ही असतातच.  त्यामुळे अनेकांच्या नादी लागतो तो आणखीनच गोंधळून जातो. ज्याला एकच एक मालक नाही, त्याने आपल्या कामाचा मोबदला मागावा तरी कोणाकडे ?”

आपण जे काम करणार आहोत त्या कामाचं स्वरूप तरी  काय आहे ? त्या कामाला लागणारा अवधी किती ? त्याचा मिळणारा मोबदला किती ? तसेच ज्याचं काम करतो आहोत तो मालक कोण आहे ? कसा आहे ? हे सर्व व्यवहारात पहावं लागतंच ना ?

आता आपण जेव्हा इलेक्ट्रॉनिक उपकरणं खरेदी करतो तेव्हा त्यासोबत मॅन्युअल दिलेलं असतं. तरीही त्यातील मार्गदर्शन करायला कोणीतरी लागतंच ना ? सीए, इंजिनियर्स यांना आर्टिकलशिप, इंटर्नशिप करावी लागतेच ना ? मग आपल्याला तर या मायेच्या जाळातून बाहेर पडायचं आहे, त्यासाठी योग्य विचार; योग्य धारणा; योग्य दिशा दाखवायला तसाच त्यातला ज्ञाता हवा ना? आपल्याला श्रीसमर्थांनी या समासात सृष्टीक्रम सांगितला आहे. या सृष्टीचा स्वामी म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक. या पदापर्यंत जायचं असेल तर त्याची किल्ली देखील सूक्ष्म आहे आणि ती म्हणजे गुरुकृपा.

तुर्येला ओलांडण्यासाठी करायला लागणारं सुंदर साधन, जिथे आपला अहम्; सूक्ष्मतम भावाने स्वाभाविक प्रवृत्ती घेऊन जिवंत आहे; त्याला नेमकं कशा पद्धतीने विलीन करायचं ते कुठलं पुस्तक शिकवणार ? प्रवचनातून कोण सांगू शकणार ? पुस्तकातील ज्ञानाच्या आधाराने कदाचित शब्द असतील, पण या शब्दांत लपलेला लक्ष्यांश गुरुची वाक्येच आपल्याला समजावून देतील.

दासबोध वाचताना देखील आपल्याला हा अनुभव येतो ना की गुरुकृपेने ओवी वाचताना प्रत्येक वेळी ओवीच्या आत दडलेलं रहस्य वरती येत असतं, उलगडत असतं. त्यातून विलक्षण ऊर्जा, आनंद मिळत असतो. सद्गुरुकृपेचं बोधांजन लक्ष्यांश लक्षात आणून देतं. त्यांच्या कृपेशिवाय हे शक्य नाही. हे जीवन घडवणारे, जीवनाचे परम ध्येय गाठून देणारे शास्त्र आहे. गुरूचरणी जाऊन त्यांच्या कृपाशीर्वादाने ग्रंथ वाचावा.

हे ज्ञान होण्यासाठी तेवढीच साधना, उपासना, सद्गुरू भेटणं, त्यांचा अनुग्रह मिळणं, त्यांचं मार्गदर्शन लाभणं, त्याचं आचरण होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता एकच गुरू, एकच ग्रंथ, एकच साधन हे सूत्र आहे. गुरू देहात असोत वा नसोत, ते चेतनेमध्ये असतात. तुमची तळमळ असेल तर ते कृपा करतात, मार्गदर्शन करतात. योग्य व्यक्ती, योग्य ग्रंथ, योग्य साहित्य, योग्य ते सर्व काही ते पुरवतात.

आपणासारिखे करिती तात्काळ” परिसस्पर्शाने लोखंडाचं सुवर्ण होतं पण लोखंडाला परिसपण येत नाही.  आईवडिल आपल्या मुलाला कसं जगावं ते शिकवतात, व्यवहारज्ञान शिकवतात पण सद्गुरूमाऊली मात्र आपल्या अनन्य शरणागत भक्ताला जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सोडवतात, मुक्त करतात. आपल्यासारखेच करतात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

श्रीसमर्थांची मानसपूजा

“धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ।

जो जो कीजे परमार्थ लाहो । तो तो पावे सिद्धीतें ।।”

संसाराचा भवसागर तरून जायचा म्हणजे देहबुद्धी ते  आत्मबुध्दी हा प्रवास करायचा आहे. मोक्षप्राप्तीसाठी जी काही साधने आपल्या साधूसंतांनी सांगितलेली आहेत त्यामध्ये भक्तिमार्ग सर्वात सुलभ साधन आहे. सर्वांना आचरता येणारा असा भक्तिमार्ग आहे. यात सामुग्रीचे अवडंबर नाही, कर्मकांडाचे स्तोम नाही. घरदार सोडून अरण्यात जाण्याची गरज नाही. प्रपंचात राहूनही परमेश्वराकडे जाण्याचा हा मार्ग आहे. 

‘भक्ती’ म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम. अशी भक्तीची सोपी व्याख्या नारदांनी भक्तिसूत्रांमधून केलेली आहे. ते म्हणतात, ‘सा त्वस्मिन परमप्रेमरूपा’ म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी नितांत प्रेम म्हणजे भक्ती होय. ‘अमृतस्वरूपा च’ हे एक महत्त्वाचं लक्षण होय. अमृत, रसमय आणि अमरत्व प्राप्त करणारं आहे म्हणून ही उपमा दिली आहे.  शाश्वत आनंद प्राप्त करून देणाऱ्या या भक्तीचं वर्णन श्रीसमर्थांनी दासबोधातील चौथ्या दशकात नवविधा भक्तिच्या सहाय्याने अतिशय सोप्या, सरळ आणि नेटक्या शब्दात केलं आहे. या नऊ भक्तींमध्ये अर्चन भक्ती ही पाचवी भक्ती आहे. आपल्या उपास्य देवतेची पूजा करणे याचं नाव अर्चन ! शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजा म्हणजे सगुण पूजा होय. यात आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, उत्तम वस्त्रे, यज्ञोपवीत, गंध, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, साष्टांग नमस्कार आणि मंत्रपुष्प हे उपचार येतात. पण हे नाही जमलं तर मानस पूजा करावी असं श्रीसमर्थ सांगतात. 

“ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी ।

मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ।। ४-५-३१ ।।”

ही पूजा केव्हाही, कुठेही करता येते. अगदी प्रवासात सुद्धा. मानसपूजा इतकी महत्वाची आहे हे जाणून श्रीसमर्थानी ‘मानसपूजा’ या विषयावर स्वतंत्र काव्यरचना केली आहे. श्रीसमर्थांची जी ओवीबद्ध अकरा लघुकाव्ये आहेत, त्यातील ‘मानसपूजा’ हे एक लघुकाव्य आहे. याचे तेरा समास आहेत. प्रत्येक समासात अकरा ओव्या आहेत. या काव्यात मानसपूजेविषयी श्रीसमर्थ म्हणतात, ‘कोणाच्या मनात कधीही न आलेली आणि न येणारी, भव्य, दिव्य व व्यापक अशी ही मानसपूजा आहे.

प्रत्येक काम हे भगवंताचे आहे. ‘आहे तितुके देवाचे’ असताना त्यालाच अर्पण करताना कशाला कंजुषी? त्याचेच सारे त्याला अर्पण करायचे, तर मग ताम्हणात किंवा काचेच्या चौकटीत बसवून पूजा करायची नाही; तर एखाद्या सिंहासनाधिष्ठीत राजाचे वैभव जसे असावे त्याहून शतपट वैभवशाली अशा ब्रह्मांडनायकाची ही पूजा त्याच वैभवात केली पाहिजे. रत्नजडित सिंहासन, छत्र, चामर अशी ही पूजा या काव्यात मनाने कल्पून केली आहे. श्रीसमर्थांच्या काळी चाफळला अशी पूजा नक्कीच होत असणार, कारण यातील पहिल्या समासातील स्थळाचं वर्णन चाफळचं असावं असं वाटतं. 

मानसपूजा म्हणजे, आपलं आराध्य दैवत किंवा सद्‌गुरू यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून तिची षोड‌शोपचारे पूजा कल्पनेनेच करणे, म्हणजेच सूक्ष्म अर्चन. या मानसपूजेला परमार्थात फार महत्त्व आहे. सद्वस्तू सूक्ष्म आहे, म्हणून तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी मन सूक्ष्म करणे जरूरीचं आहे. मन उन्मन व्हावं यासाठी मानसपूजा हा उत्तम, श्रेष्ठ मार्ग आहे. मनाला उन्मन करण्याची पहिली पायरी म्हणजे मानसपूजा. मन उन्मन होणे म्हणजेच मन दृश्यातून बाहेर पडून, मुक्त होऊन, परमश्रेष्ठ ब्रह्मामध्ये विलीन होणे, अशा मानसपूजेचा रोज सराव ठेवला तर मनाला स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजेच सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्यास अडचण पडत नाही. असं सूक्ष्मात विहार करण्याने मन अमूर्तात रमू लागते आणि परमेश्वर अंतर्यामी आहे ही भावना दृढ होते.

श्रीसमर्थांनी ‘मानसपूजा’ या लघुकाव्यामध्ये जी पूजा सांगितली आहे, ती ब्र‌ह्मांडनायकाची म्हणजेच ब्रह्मांडात भरून रहाणाऱ्या परमात्म स्वरूपाची आहे. आपल्या अंतरंगामध्ये वसणारा परमेश्वर किंवा सद्‌गुरु हे त्या निर्गुण निराकार परमात्म्याचेच सगुण रूप आहे. श्रीसमर्थानी त्याला “वैकुंठराजा” हे नाव दिले आहे. या वैकुंठराजाची म्हणजेच भगवान विष्णूची मानसपूजा करावी, असं सांगितलं आहे. मात्र समास ८ मध्ये (देवार्चन) श्रीसमर्थांनी त्यांच्या आराध्यदैवताची/आपल्या सद्गुरूंची, श्रीरामांची मानसपूजा सांगितली आहे. अर्थात, त्यांचे आराध्य; प्रभूश्रीराम म्हणजे श्रीसमर्थांच्या अनन्य निष्ठेचा विषय असल्याने श्रीरामांची पूजा केल्याशिवाय त्यांना चैन कसे पडेल ? प्रभूश्रीराम हे अवतारी देव. त्यांच्या सगुणरूप पूजेमुळे आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रगट होतो. हा अंतरात्मा जागा करणे हेच सगुणपूजेचे महत्त्वाचे कार्य. हीच भक्तीची उत्कट अवस्था, एकरूपता होय. या अंतर्देवालाच श्रीसमर्थ “थोरला देव” असेही म्हणतात. हा थोरला देव सर्व विश्वात भरून राहिला आहे. हाच वैकुंठराजा, हाच चराचर सृष्टीचा निर्माता, हाच सत् म्हणजेच परब्रह्म, आणि त्यासाठी या देवाची मानसपूजा महत्त्वाची आहे.  

मानसपूजा म्हणजे परमात्म्यापर्यंत पोह‌चण्यासाठी जी साधना केली जाते त्यातील एक भाग आहे. हे प्रत्येकाने आपापल्या अधिकारानुसार समजून घेणे आवश्यक आहे. सगुणाकडून निर्गुणापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा नाही म्हणूनच श्रीसमर्थ शेवटच्या समासात सांगतात,

“ऐसी मानसपूजा करावी । मूर्ति अंतरीं धरावी ।

दास म्हणे विवरावी । उपासना ।। १३-१३ ।।”

आपल्या अंतरंगामध्ये सद्गुरूंची किंवा आराध्याची मूर्ती स्थापन करणे हे मानसपूजेचे साध्य आहे. त्यासाठी उपासना आवश्यक आहे. अंतःकरण पवित्र असल्याशिवाय तेथे परमात्मा विराजमान होणार नाही, त्यासाठी चित्तशुद्धी आणि वैराग्य आवश्यक आहेत.  चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्माचरण आणि नित्यानित्यवस्तू विवेक पाहिजे, वैराग्यासाठी सत्संग; सद्गुरूंचे भजन; स्मरण पाहिजे. परमार्थ हा मनाचा विषय आहे. म्हणून मानसपूजा साधली की आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. मानसपूजा काल्पनिक असते. म्हणून कल्पना भव्यदिव्य ऐश्वर्य संपन्न असावी. म्हणजे..

“मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें ।

मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ।। ४-६-३२ ।।”

देवाला वैभवात बसवावे याच उद्देशाने श्रीसमर्थांनी मानसपूजेच्या तेराही समासात वैभवसंपन्नतेचे वर्णन केले आहे. मात्र कुठेही गडबड, गोंधळ नाही तर उत्कृष्ट व्यवस्थापन कसे असावे याचे सुंदर चित्र मानसपूजेच्या समासांमधून आपल्यापुढे उभे केले आहे.

“जें जें आपणास पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे।

येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ।। ४-६-३३ ।।”

आपण ही प्रयत्न करूया आणि मानसपूजेच्या माध्यमातून भगवंताला सगळं समर्पण करूया. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

यत्न तो देव जाणावा

“प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. प्रयत्न केल्याशिवाय मनुष्याची प्रगती होणे अशक्य आहे. लहान मुलगा प्रथम चालायला लागतो, किती वेळा पडतो, अडखळतो, पण तरीही उठून परत चालायला लागतो. तेव्हां तो स्वतः तर हसतोच, पण त्याच्या आई-वडिलांनाही आनंद होतो. या लहान मुलाने मी पडलो म्हणून चालायचा प्रयत्न केला नसता तर तो चालू शकला असता का ? निसर्गाचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात. उदा. मुंगी दिसायला अतिशय लहान, पण साखरेचे; धान्याचे कण उचलून साठवून ठेवते. ती आळस करीत नाही. पक्षी, पाऊस यायच्या आधी काडी-काडी जमवून झाडावर घरटे बांधतो. कधी कधी सोसाट्याच्या वार्‍याने त्याचे घरटे पडून जाते, पण तो हार मानीत नाही. परत काडी-काडी जमवून नवीन घरटे बांधतो. तात्पर्य काय, तर मनुष्य; पशू; पक्षी सगळयांना या विश्वामध्ये जगण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. 

 

आपण संतकाळाचा आढावा घेतला तर असे दिसून येईल की, संतांनी त्यांच्या जीवनात किती अथक प्रयत्न केले. त्याकाळात परिस्थिती कठीण होती. कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. लहान गोष्टींसाठी सुद्धा त्यांना अपार मेहनत, कष्ट, प्रयत्न करावे लागत असत, पण त्यांनी कधी हार मानली नाही. ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास सहन करावा लागला ? ते व त्यांची भावंड अपमान सहन करुन, लहान वयात आई-वडिलांचं छत्र नसताना, अविरत प्रयत्नांनी संतपदाला पोहोचली. जगद्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, श्रीसमर्थ रामदास स्वामी या संतांच्या मांदियाळीचा अभ्यास केला तर असे आढळून येते की, हे सर्व संत प्रयत्नवादी होते. बिकट वाट असूनही त्यांनी अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल केली. त्यांनी आपले प्रयत्न कधी सोडले नाही. ज्या काळात स्त्रियांना समाजात मानाचे स्थान नव्हते, घराबाहेर जाण्यास परवानगी नव्हती, त्याकाळात मुक्ताबाई; बहिणाबाई (तुकाराम महाराजांची शिष्या), जनाबाई, वेण्णाबाई व इतर अनेक स्त्रिया प्रयत्न करुन, समाजाची चौकट मोडून संतपदाला पोहोचल्या. त्यांनी समाजात मानाचे स्थान मिळवले. या संतांनी, संत कवयित्रींनी समाजात जनजागृती केली. लोकांना नामस्मरणाचा साधा, सोपा मार्ग सांगितला. लोकांचे कल्याण केले. सुरवातीला लोकांकडून त्यांना त्रासही सहन करावा लागला. पण त्यांनी आपले प्रयत्न कधी सोडले नाहीत.

 

श्रीसमर्थांचा प्रयत्नवाद तर आगळावेगळाच आहे. श्रीसमर्थ प्रयत्नाला देव मानणारे आहेत. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही म्हण त्यांनी चुकीची ठरविली. श्रीसमर्थांच्या मते आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. आळशी माणसे स्वतःच्या जीवनाचा तर नाश करतातच, पण त्याबरोबरच कुटुंबातील इतर लोकांनाही त्याचा त्रास होतो. प्रपंच, संसार करणार्‍या माणसांना त्यांच्या जीवनात जी वाईट अवस्था येते ती त्यांच्या आळसामुळे. अशा लोकांना प्रयत्न, मेहनत करायला नको असते. श्रीसमर्थ म्हणतात, माणसाने आळस झटकून योग्य दिशेने प्रयत्न केला तर त्याला दैव अनुकूल झाल्यावाचून रहाणार नाही. हा फार महत्त्वपूर्ण संदेश श्रीसमर्थ सांगतात. आजचे काम उद्या करु, अशाने ते कधीच होत नाही. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. देवाने मनुष्याला महत्त्वाचे म्हणजे बुद्धीचे वरदान दिले आहे. त्याला जर प्रयत्नांची जोड दिली तर नक्कीच यश प्राप्त होईल. “केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे । यत्न तो देव जाणावा” यावर श्रीसमर्थांचा भर होता. 

 

श्रीसमर्थांनी आधी स्वतः केले आणि मग लोकांना सांगितले. श्रीसमर्थांच्या चरित्रात ठिकठिकाणी प्रयत्नवाद दिसून येतो. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आपले घर, नातेवाईक, गावाचा त्याग केला. नाशिकजवळील गोदावरीच्या काठी टाकळी येथे बारा वर्षे श्रीरामोपासना केली. सुरुवातीला गावकऱ्यांकडून अपमान, अवहेलना सहन कराव्या लागल्या. घरच्या लोकांच्या विरहाचं दुःख सहन केलं, परंतु प्रयत्न मात्र सोडले नाही. “रेखा तितुकी पुसोन जाते ।  प्रत्यक्ष प्रत्यया येतें” असा स्वतःचा अनुभव श्रीसमर्थ सांगतात. 

 

श्रीसमर्थांच्या काळातील परिस्थिती पहाता अस्मानी आणि सुलतानी संकटांनी देश होरपळून निघाला होता. समाजाची ही परिस्थिती पाहून श्रीसमर्थांचे मन दुःखी झाले आणि त्याच क्षणी त्यांनी ठरविले की, लोकांचे दुःख नाहीसे करेन. त्यासाठी यात्रेच्या निमित्ताने बारा वर्षे लोकस्थितीचे निरीक्षण केले. हिमालयातून परत आल्यावर त्यांनी लोककार्यास सुरुवात केली. तरुणांना संघटित केले, त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. गावोगावी हनुमानाची मंदिरे बांधली. अकराशे मठ स्थापन केले, मठपती तयार केले. अशाप्रकारचे श्रीसमर्थांचे अविरत, अखंड प्रयत्न सुरूच होते. संघटनेसाठी कार्यकर्ते पाहिजेत आणि कार्यकर्ते मिळविण्यासाठी माणसांची पारख पाहिजे. श्रीसमर्थांनी भिक्षेच्या निमित्ताने माणसांचे निरीक्षण केले. ते म्हणतात, 

“नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें । १४-२-८ ।।

कुग्रामें अथवा नगरें । पाहावीं घरांचीं घरें ।

भिक्षामिसें लाहानथोरें । परीक्षून सोडावीं ।।१५-६-२४ ।।”

श्रीसमर्थांनी भिक्षेच्या माध्यमातून असंख्य शिष्य मिळविले. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आपल्या सामर्थ्य बळाने अखिल राष्ट्र संघटित केले. समाजसेवेकरिता, राष्ट्राच्या स्थैर्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, प्रयत्नांनाच देव मानले. महाराष्ट्र धर्माची ध्वजा उभारली. प्रभूरामचंद्र हे दैवत, त्याच्यावरील दृढ निष्ठा, पराक्रमी श्रीमानयोगी श्रीछत्रपती शिवाजीमहाराजांसारख्या राजांचे नेतृत्त्व आणि श्रीसमर्थांचे अगणित कष्ट/अपार मेहनत या सगळ्यांच्याच सामर्थ्याने श्रीसमर्थांनी यावनी सत्तेचा पराभव केला आणि भारतीय समाज संकटमुक्त झाला. 

श्रीसमर्थांच्या चरित्रातून लक्षात येते की, प्रयत्न किती मौल्यवान, महत्त्वपूर्ण आहेत. परिस्थिती कठीण, कशीही असो, कितीही संकटे, दुःख जरी जीवनात आली तरी माणसाने निराश न होता, आहे त्या परिस्थितीवर मात करायला पाहिजे. त्याबरोबरच योग्य प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. श्रीसमर्थ म्हणतात, “प्रयत्न करायलाच हवेत, पण चांगला प्रयत्न होण्यासाठी मनात दक्षता पाहिजे व त्याचबरोबर अंगी सावधानताही आवश्यक आहे.” त्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात, 

“म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा ।

दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळें ।। १२-९-८ ।।”

आळस संपूर्ण सोडून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, प्रयत्न करताना मनातील संशय, निराशा पूर्णपणे काढून टाकावी. त्यासाठी प्रयत्नशील माणसाने आपली जीवनपद्धती बदलावी. जास्तीत जास्त वेळ योग्य व चांगल्याच कामामध्ये घालवावा. लहानातले लहान कामही आनंदाने करावे. बोलल्याप्रमाणे आपले आचरण असावे, तसेच आपले बोलणे नम्र व मधुर असावे. आपले प्रयत्न कुठेच कमी पडू देऊ नयेत. मनुष्याचे आचरण असे असेल तर, त्याची नक्कीच प्रगती होईल आणि शेवटी त्यालाही पटेल, “यत्न तो देव जाणावा.”

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

योगीराज श्रीकल्याणस्वामी कृत सवायी

‘नित्य करितां श्रीराम स्मरण’

 

योगीराज श्रीकल्याणस्वामी हे श्रीसमर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य. ते वयाच्या ८-१० वर्षापासून, शके १५६५ ते १६०० पर्यंत म्हणजेच डोमगांवी रहाण्यास जाईपर्यंत श्रीसमर्थांच्या सहवासात राहिले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हे संपूर्णतः श्रीसमर्थांच्या सहवासात घडले. श्रीसमर्थांप्रमाणेच, योगीराज श्रीकल्याणस्वामींची काव्यसंपदा आहे. स्फुट प्रकरण, चौचरणी ओव्या, स्फुट श्लोक, अष्टपदी, भूपाळ्या, आरत्या, पदपदांतरे आणि एक सवायी अशा काही त्यांच्या रचना आहेत. सवायी हा काव्यप्रकार श्लोक या प्रकाराहून वेगळा आहे. श्रीसमर्थांच्या अनेक सवाया आहेत. त्यामध्ये त्या वाराला त्या देवतेची सवायी म्हणण्याचा प्रघात सांप्रदायिक उपासनेमध्ये आहे. श्रीसमर्थांप्रमाणेच योगीराज श्रीकल्याणस्वामी सुद्धा नामस्मरण भक्तीचे महत्व त्यांच्या काव्यसंपदेमधून पटवून देतात. ‘नित्य करितां श्रीराम स्मरण’ या सवायी मधून ते हेच सांगतात.

 

“राम नामाचा कडकडाट । भवसिंधूस पायवाट ।

पायरी करून वैकुंठ । होती प्रविष्ट प्रविष्ट ।। १ ।।”

 

सरळ अर्थ – जिथे श्रीराम नामाचा सतत जयघोष असतो, जो नित्य श्रीराम नामात तल्लीन असतो, असा माणूस विना अडथळा भवसागर सहज पार करतो. तो वैकुंठ ओलांडून परब्रह्म पद प्राप्त करतो. कलियुगामध्ये नामस्मरण भक्ती ही सर्वात सोपी-सहज भक्ती आहे. सर्वच संतांप्र‌माणे आणि सद्‌गुरूंप्रमाणे योगीराज श्रीकल्याणस्वामी पण नामस्मरणावर विशेष भर देतात. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून पूर्ण श्रध्देने आणि निष्ठेने नाम घेतले तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. प्रत्यक्ष परब्रह्माचे सगुणरूप  म्हणजे प्रभूरामचंद्र. त्यांची भक्ती करून त्यांच्याशी एकरूप होणं, हेच प्रत्येक माणसाचं ध्येय असावं. प्रपंचातील कोणतेही व्यवहार करत असताना त्याने परमात्म्याचं अनुसंधान कायम ठेवावे. आणि यासाठी नामस्मरण भक्ती मोठं काम करते. कारण नामस्मरण करणे ही आंतरिक साधना आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, तुम्ही सतत नाम घ्या, नामाचा जयघोष करा. पण नामावर पूर्ण श्रध्दा ठेवून जर नाम घेतले तर भवसागर अगदी सहज तरला जाईल. आणि वैकुंठाला सुद्धा पार करून परब्रह्म पदाला माणूस प्राप्त करेल. वैकुंठामध्ये गेलं तरी ती शाश्वत मुक्ती नाही. पुण्य संपले की तिथून खाली घसरणे आहेच. पण श्रीराम नामाच्या स्मरणाने परब्रह्म पदात विलीन होणे आहे, सायुज्यमुक्ती मिळवणे आहे.

 

“राम नामांकित नर । बुडऊं न शके भवसागर ।

श्रीराम मुद्रांकित मी वानर । सुखे परपार पावलों ।। २ ।।”

 

सरळ अर्थ – जो श्रीराम नामाच्या आश्रयाला आहे, त्याला भवसागर काहीही करत नाही. भवसागरामध्ये बुडण्याचे त्याला भय नाही. मी श्रीराम नामाची मुद्रा धारण केलेला एक साधारण जीव (वानर) आहे. पण प्रभूश्रीरामांच्या नामस्मरणाने अगदी सहजच हा भवसागर पार करून निजस्थानाला गेलो आहे, असे स्वामी म्हणतात. सद्‌गुरूंना पूर्ण शरणागत झालेला शिष्य, त्यांच्याच कृपेने आत्मानात्म-विवेक, सारासार विचार जाणत असतो. त्यांनीच दिलेल्या नामामुळे तो पूर्ण त्यांच्या आणि नामाच्या आश्रयाला असतो. नामरूपी कवचामुळे भवसागर त्याला बुडविण्याचे धाडस करत नाही. सद्‌गुरू कृपेमुळे तो देहात असून सुध्दा विदेही अवस्थेत असतो. पोस्टातील पाकिटावर जसा शिक्का असला की, ते पाकिट योग्य जागी पोहोचते. तसंच श्रीराम नामाचा शिक्का ज्याच्या अंतःकरणावर उमटतो, तो खात्रीने परपार पावतो. सेतूबंधनाच्या वेळी श्रीराम नामाची मुद्रा उमटवली आणि निर्जिव असून सुध्दा पाषाण पाण्यावर तरंगले. स्वामी म्हणतात, श्रीराम मुद्रा धारण केलेला मी एक साधारण वानर आहे. पण श्रीराम नामाची मुद्रा धारण केल्याने मी अगदी सुखाने पैलतीर गाठले आहे.

 

“नित्य श्रीराम नामस्मरण । तेथे वीर्य धैर्य कल्याण ।

ब्रह्म पावती सनातन । हे महिमान स्मरणाचें ।। ३ ।।”

 

सरळ अर्थ – जो नित्य नामस्मरण साधना करतो, श्रीराम मंत्राचा जयघोष करतो, तो वीर्यवान, धैर्यवान बनतो. या नामस्मरण भक्तीचा महिमाच असा आहे की, ती केल्यामुळे माणूस सनातन, शाश्वत अशा ब्रह्मपदाला पोहोचतो, त्याच्या जन्माचे कल्याण होते. श्रीमारुतीराय, श्रीसमर्थ किंवा सगळेच संत, सदैव नामानुसंधानात असल्यामुळे त्यांच्या मुद्रेवर कायम एकप्रकारचे तेज दिसते. भगवंताचा भक्त कायम निर्भय असतो, कारण जिवंतपणीच तो जीवन्मुक्तीचा आनंद उपभोगत असतो. आणि हेच त्याचं जगणं कल्याणकारी असतं. नामस्मरणाचं माहात्म्यच असं आहे की, ते करणारा माणूस कुठेही न अडकता थेट ब्रह्मपदाला पोहोचतो.

 

“जेथे श्रीराम विस्मरण । तेथे अकीर्ति अपेश अकल्याण ।

अति निंद्यत्वें पापी पूर्ण । अधःपतन महा नरकी ।। ४ ।।”

 

सरळ अर्थ – जो माणूस भगवद्भक्ती करत नाही, त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही, त्याचं नाम घेत नाही, त्याला जीवनात कशामध्येच यश येत नाही. सगळी कडे त्याची दुष्कीर्ति होऊन त्याचं जीवन वाया जातं. श्रीरामांच्या नामाचे विस्मरण केल्यामुळे, हातून असंख्य पापं घडल्यामुळे तो अतिशय निंदनीय होऊन अखेर यमयातनेमध्ये; महानरकामध्ये त्याचं अधःपतन होते. जो पंचभूतांचा दास झाला, मायोपाधिक विश्वाचा दास झाला, तो देहबुद्धीतच वावरत असतो. अज्ञानामुळे तो प्रपंचातच गुंतून पडतो. त्यामुळे त्याला प्रभूश्रीरामांचे विस्मरण होतं. प्रपंचात गुंतल्यामुळे मी, माझे, इतकेच विश्व कल्पिल्यामुळे तो प्रभूश्रीरामांची भक्ती, त्याचे नाम हे काहीच जाणत नाही. सदैव षड्विकारांच्या आहारी, वासनेच्या आहारी जीवन असल्यामुळे निंदेला पात्र होतो. जीवन अपयशी होऊन सगळीकडे नावे ठेवली जातात. यामुळे आयुष्य व्यर्थ जातं. आणि मृत्यूनंतर आदिदैविक ताप भोगताना, महानरकामध्ये प्रचंड यातना भोगाव्या लागतात. कारण अतिशय निंदनीय, पापी आचरण आणि त्यातून प्रभूश्रीरामांचं विस्मरण, त्यामुळे अधःपतन होतं.

 

“यालागी साक्षपें आपण । समूळ सांडावे विस्मरण ।

नित्य करितां श्रीराम स्मरण । कीर्ति कल्याण निज विजयी ।। ५ ।।”

 

सरळ अर्थ – यासाठी आपण प्रभूश्रीरामांचे कटाक्षाने विस्मरण टाळावे म्हणजेच निश्चयाने अखंड नामस्मरणात रहावे. जो या नामस्मरण साधनेला प्राणापलीकडे सांभाळतो, त्याची सगळीकडे सत्कीर्ति होऊन त्याच्या आयुष्याचे कल्याण होते. तो निजपदाला निश्चितच प्राप्त होतो. अशा प्रकारे योगीराज श्रीकल्याणस्वामी या सवायीमध्ये नामस्मरणाचे महात्म्य सांगतात. 

 

नाम न घेणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देतात. माणसाने एक क्षणभर सुद्धा प्रभूश्रीरामांचे विस्मरण होऊ देऊ नये. कारण त्यांच्याच सत्तेवर हे विश्व चालते. प्रत्येकामध्ये आत्माराम रुपाने तेच अधिष्ठित आहेत. याची जाणीव ठेवून अखंड त्यांच्या अनुसंधानात राहिले, तर तिन्ही लोकांत त्याची कीर्ति होऊन, त्याचे इहलोकी आणि परलोकी कल्याणच होईल. तो सगळीकडे विजयी होईल. श्रीसमर्थांनी जसा आपल्या सर्वच वाङ्‌मयात प्रभूश्रीरामांच्या भक्तीचा ध्यास घेतलेला आहे, तसाच ध्यास योगीराज श्रीकल्याणस्वामींच्या अंतःकरणात दिसून येतो. श्रीराम भक्तीबरोबरच, आपले सद्‌गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी यांची भक्ती आणि सेवा ही त्यांच्या जीवनाला पूर्णपणे व्यापून राहिली आहे. म्हणूनच ते श्रीसमर्थांप्रमाणेच श्रीराम नामाचं महत्त्व आपल्याला पदोपदी पटवून देतात.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

राम मंत्र श्लोक १६-१७-१८

नको फार मंत्राग्निच्या मंत्रदीक्षा ।

नको जारणामारणादी अपेक्षा ।

कळायुक्त चातुर्य तें विकळा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १६ ।।

सरळ अर्थ – भगवंताला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध अंतःकरण, शुद्ध भाव, शुद्ध कर्म याचे फार महत्त्व आहे. याशिवाय केलेल्या कर्मकांडात यांत्रिकता येते. भाव-भक्तीशिवाय केलेले यज्ञ-यागादी उपचार असोत की, सदगुरूंकडून मिळालेल्या मंत्रदीक्षेचा जप यासारखी सात्विक उपासना सुद्धा भावाअभावी तितकीशी प्रभावी ठरत नाही. तसेच जारण-मारणादी जादूटोणा किंवा मंत्र-तंत्र साधना यासारख्या तामसी पूजा-साधना यशस्वी ठरत नाहीत. तेव्हा ‘हरे राम हा सोपा मंत्र’ जपावा हेच उत्तम होय.

श्रीसमर्थांचा बोध – ईश्वराची पूजा हे अध्यात्माचे एक प्रधान अंग आहे. सर्वच शास्त्र-पुराणात सांगितलेल्या यज्ञयागादी सकाम व्रताचरणात मंत्रोच्चार, पूजासाहित्य, इ. अचूक कर्मकांडाला फार महत्व असते. ते एक  महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. आज वैज्ञानिक ज्या निष्ठेने, अथक प्रयत्नांने संशोधन करतात, तसेच इथे सुद्धा शास्त्र ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शास्त्रशुद्ध विधीविधान केले तरच कामना सिद्धी होते. या क्रियेला श्रीसमर्थ ‘कळायुक्तचातुर्य’ असा शब्द वापरतात. असफल प्रयोग, म्हणजे ‘वीकळा’. काही सूक्ष्मातिसूक्ष्म त्रुटीसुद्धा असफलतेचे कारण बनतात व मनी धरलेली कामना/हेतू पूर्ण होऊ शकत नाही आणि हाती काही लागत नाही. मग नैराश्य येते, कामना पूर्ण झाली नाही म्हणून देवावरचा विश्वास उडतो. या उलट नामसाधना माणसाला निष्काम बनवते. प्रपंचात सतत काही तरी हवेच असते. ते हवेपण, अपेक्षा सदासर्वदा नाम घेतल्याने कमी कमी होत जाऊन विरून जातात. मन रामचरणी हळूहळू स्थिर होऊ लागते, शांत होते. कामनाच नाही म्हणून सकाम साधना करावीशी वाटतच नाही. ही मनाची स्थिती कायम राहावी, समाधान लाभावे यासाठी सतत अभ्यास करणे गरजेचे असते. तेव्हा श्रीसमर्थ नाममहात्म्य पटवून देताना म्हणतात, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.’

नको याग अष्टांग तो रोध प्राणा ।

नको कृच्छचांद्रायणी हट्ट जाणा ।

अपभ्रष्ट हा मार्ग कीं वोखटा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १७ ।।

सरळ अर्थ – अष्टांग योगातील कठीण असा प्राणनिरोध किंवा हटयोगातील कठोर अशा व्रतांचे आचरण केल्यानेच फक्त पापनाश होतो व परमेश्वराजवळ जाता येते ही समजूत मिथ्या आहे. हा मार्ग चुकीचा आहे. श्रीरामाचे पवित्र, सोपे, सरळ नाम श्रद्धेने; निष्ठापूर्वक; शुद्ध अंतःकरणाने; भावभक्तीने सतत घेतले तर आणखी काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही.

श्रीसमर्थांचा बोध – भगवंत प्राप्तीचे ज्ञान, योग, कर्म, भक्ती असे अनेक मार्ग आहेत. आपापल्या स्वभावधर्मानुसार, वृत्तीनुसार, आवडीनुसार मार्ग निवडून माणूस साधना करत परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतो. यातील सगळेच मार्ग खडतर आहेत. या श्लोकात श्रीसमर्थ हटयोग व त्यातील कठोर व्रताचरणाचा उल्लेख करतात. या मार्गात शारीरिक आणि मानसिक दोन्ही शक्तीची कसोटी लागते. अष्टांग योगातील प्राणनिरोध करणे सर्वसामान्यांना सहजसाध्य नक्कीच नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी आठ अंगे यांचे त्यांच्या क्लिष्ट नियमासह आचरण करणे तेवढेच कठीण असते. हातून कळत नकळत घडलेल्या पापाच्या क्षालनार्थ स्कंदपुराणात अनेक खडतर व्रते सांगितलेली आहेत. त्यातीलच चांद्रायणी व्रताचा उल्लेख श्रीसमर्थ येथे वानगीदाखल करतात. यात कृच्छचांद्रायणी व मृदचांद्रायणी असे प्रकार आहेत. हे व्रत चंद्राच्या साक्षीने केले जाते. चंद्रकलेप्रमाणे आहार घ्यायचा. संध्येची एक पळी किंवा एक घास जो संकल्प केला असेल तसे पहिल्या दिवशी अन्न प्राशन करायचे. वाढवत जाऊन पौर्णिमेला पंधरा पळी/घास अन्न घ्यायचे. तर कृष्ण प्रतिपदेपासून एकेक पळी/घास अन्न कमी करत अमावास्येला निराहार रहायचे. अशा प्रकारे सहनशक्तीची, संयमाची, निश्चयाची कसोटी पहाणारी कठोर व्रते करणे सामान्य जनांना साध्य होत नाही. तेव्हा हा मिथ्या/वोखटा मार्ग धरण्यापेक्षा सहज, सुलभ अशा नामसाधनेने तीच सारी फळे कष्ट न करता मिळत असताना तोच मार्ग अनुसरावा हे योग्य नव्हे का ?  म्हणूनच, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे’, असे श्रीसमर्थ सांगतात. 

कदापी घडेंना व्रतें यज्ञदाने ।

नसे द्रव्य गांठीं करावें जयाने ।

घडेना घडे यद्यपी कां फुका रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १८ ।।

सरळ अर्थ – व्रते, उद्यापने, दान-धर्म, यज्ञ-याग इ. करण्यासाठी मुबलक द्रव्य गाठीशी असणे आवश्यक आहे. प्रत्येकालाच ते जमणे शक्य होत नाही. म्हणून त्याने उपासना करू नये का ? श्रीसमर्थ म्हणतात, श्रीराम नाम अखंड घेणे हा सोपा उपाय आहे ना ! रामनामाच्या उच्चाराने सगळ्याच साधनाचे फळ अनायासे मिळते म्हणूनच, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.’ 

श्रीसमर्थांचा बोध – नामसाधना हा भगवंताच्या प्राप्तीचा सहज-सोपा-सुलभ मार्ग आहे. त्यामध्ये कष्ट नाहीत, अव्यवहारीपणा नाही, प्रपंच सोडावा लागत नाही, पैसा खर्च करावा लागत नाही, नीतिमत्ता उल्लंघन नाही, लौकिक ज्ञान अवश्यक आहे असेही नाही, स्थळ-काळाचे बंधन नाही, कुठलेही भौतिक बंधन किंवा अटी नाहीत. एवढी मुभा असताना लोक मात्र देव भेटीसाठी नाही तर आपल्या इच्छापूर्तीसाठी खडतर व्रते, उद्यापने, तीर्थयात्रा, यज्ञ-याग अशा सकाम उपासना याच्याच पाठी लागतात; अट्टाहास करतात. सर्वच संत नामाचे महत्त्व आग्रहाने प्रतिपादन करतात. तरीही आम्हाला आमचे खरे हित कळत नाही. याचे कारण जे सहजतेने उपलब्ध आहे त्याचे महत्त्व वाटत नाही. शिवाय आम्हाला परमार्थाचा सुद्धा इव्हेंट/समारंभ करायचा असतो. महापूजा-अभिषेक करताना त्यात मन नसतेच. फक्त देखावा करायचा असतो. आम्ही धार्मिक आहोत, आम्ही देवाचे किती करतो हे जगाला दाखवायचे असते. अंतःकरणात परमेश्वर प्राप्तीची तळमळ नसते. देव भावाचा भुकेला आहे. त्याला मी भक्ती करतो असे गर्जना करून सांगण्याची गरजच नसते. अंतःकरणात रामाचे नित्य स्मरण असेल तर केलेले प्रत्येक सत्कर्म रामकार्य होते. म्हणूनच, श्रीसमर्थ आग्रहाने प्रतिपादन करतात की, असे समारंभ साजरे करून पैसा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.’

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

भीमरूपी स्तोत्र तिसरे

समर्थांनी रचलेले हे तिसरे भीमरूपी स्तोत्र, म्हणजे त्यांनी केलेले मारुतीच्या रुद्र रूपाचे वर्णन होय. चाफळ पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माजगाव येथे समर्थांनी वीर मारुतीची स्थापना केली. या मारुतीचे सुद्धा वळलेले आणि उंचावलेले शेपूट त्याच्या धाडसी स्वभावाचे प्रतीक आहे. शेपूट गुंडाळलेला दुबळा, हताश, दुःखी असा तो नाही. तर, विद्युल्लतेप्रमाणे आहे. दुर्बलतेवर प्रहार करायला शिकवणारा हा माजगावचा मारुती आहे. माजगाव म्हणजे माझं गाव, असं वाटणारं हे गाव आणि गावाला सतर्कपणे पहारा देणारा, गावाच्या वेशीवर असणारा हा मारुती.

 

समर्थांच्या या तिसऱ्या स्तोत्रात, मारुती गदा घेऊन संकटाचा सामना करायला सज्ज आहे. ही गदा म्हणजे त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. मारुतीचा आपल्या इष्टदेवतेवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे. त्याचे उड्डाण अडचणींना दूर करून धैर्याने संकटाचा सामना करण्याचे शिकवते. माजगावच्या वेशीवर एक खूप मोठी शिळा होती. या शिळेवर वर्षानुवर्षे शेंदुराचा लेप लावून त्या शिळेलाच ग्रामरक्षक मारुती म्हणून गावकरी पूजा करीत. हा ग्रामरक्षक विध्वंसक वृत्तीचा संहार करणारा आहे. हनुमंत लंकेत सीतेला शोधण्यासाठी गेला तेव्हा त्याने अशोक वनाचा, लंकेचा विध्वंस केला. रावणाची अधर्मी विनाशी वृत्ती ठेचून रावणाला जरब देण्यासाठी तो सज्ज झाला. लंकेत आलेल्या संकटांना बुद्धी आणि बल वापरून मारुतीने यशस्वी रीतीने तोंड दिले. त्याच्या प्रत्येक कृतीत रामाच्या विधायक कार्याला समर्पित होण्याचा संकल्प होता. धर्म स्थापनेचा संकल्प होता. त्याचा तो आवेश समर्थांनी या स्तोत्रात वर्णन केला आहे. समर्थांनी या स्तोत्राची सुरुवातच आवेश पूर्ण केली आहे.

 

“कोपला रुद्र जे काळीं । ते काळीं पाहवेचि ना ।”

 

रुद्र, म्हणजे हनुमंत जर कोपला, म्हणजे त्याला राग आला तर त्याच्याकडे कोणीही बघू शकत नाही. त्याच्याकडे बघण्याचे सामर्थ्यच कोणाच्या डोळ्यात नाही, मग वाणीने वर्णन तरी कसे करावे. पुढे ते म्हणतात,

 

“बोलणे चालणे कैचें । ब्रह्मकल्पांत मांडिला ।”

 

त्याच्याकडे पाहिले, की जणू काही ब्रह्माण्डाचा प्रलय होतो की काय असे वाटावे. त्याच्या मूर्तीवरून हनुमंताची व्यापकता समजते. तो शत्रूवर आक्रमण करतो तेव्हा त्याचे डोळे रक्ताप्रमाणे लाल होतात. दातांचा जबडा आवळला जातो. आणि त्याचे हे रूप नुसते आठवले, तरी भक्ताच्या मनात निर्भयता येते. हनुमंताचा कोप, म्हणजेच राग आणि त्याचे फळ म्हणजे सीतामाईचा शोध, आणि समर्थाच्या कोपाचे फळ म्हणजे आनंदवनभुवनी वसलेले राज्य. दोघांच्याही मनाचा आवेश दाखवणारे हे स्तोत्र आहे.

 

स्वधर्माचे, स्वराष्ट्राचे, संरक्षण करण्यासाठी समाजाला स्वतःमधील परमेश्वराची ओळख होणे गरजेचे आहे. सह्याद्रीच्या कडे-कपारीत संघटना निर्माण करणे, धर्माभिमान जागृत करणे, स्वराज्य स्थापनेसाठी त्याचा उपयोग करून घेणे, आणि त्याचबरोबर मारुतीचे चरित्र आणि पराक्रम त्याचे गुणगान सामान्य माणसात भिनवणे सोपे नव्हते. पण समर्थांनी मारुतीची शक्ती, भक्ती आणि स्तोत्र याच्या अपूर्व संगमातून हे काम केले.

 

मारुतीचे शौर्य, धैर्य, वीर्य, चातुर्य यातून समाजापुढे एक महान आदर्श ठेवला. या मारुती स्तोत्रातून समर्थांच्या बलवान, पण तितक्याच प्रेमळ अंतःकरणाचे दर्शन होते. हे स्तोत्र म्हणताना आपल्या हृदयात सुद्धा तोच भाव निर्माण होतो. समर्थांचे अकरापैकी दहा मारुती हे वीर मारुती आहेत. एक हात हृदयावर ठेवलेला, पुच्छ माथ्यावर मुरडून आलेले, आणि दुसरा हात गदा हातात घेऊन सज्ज आहे. समर्थांची कुळवल्ली हनुमंत असल्याने समर्थ सुद्धा हनुमंताप्रमाणेच धर्म स्थापनेसाठी सरसावले आहेत. आपल्या मनातील संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी समर्थांनी माजगाव येथे या वीर मारुतीची स्थापना केली. मारुतीच्या रुद्र रूपाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,

 

ब्रह्माण्डाहून जो मोठा । स्थूळ उंच भयानकु ।

 

तो ब्रह्माण्डाहून मोठा, स्थूल, उंच आणि भयानक आहे. हे सांगताना ते म्हणतात की त्याची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. क्रोध ही त्याची शक्ती आहे. आणि त्या आवेगात तो अचाट कार्य करतो. समर्थ म्हणतात की हनुमंताप्रमाणे क्रोध हा हितावह असावा, अन्यायाची चीड आणणारा असावा, त्या अन्यायाच्या विरुद्ध काम करण्याचे सामर्थ्य असावे. धर्माचरणावर कोणी आक्रमण करीत असेल तर मारुतीप्रमाणेच आवेश निर्माण व्हावा. हनुमंताच्या क्रोधाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,

 

“मार्तंड मंडळा ऐसे । दोन्ही पिंगाक्ष पावले ।

कर्करा घर्डिल्या दाढा । उभे रोमांच उठिले ।।”

 

क्रोध आला की त्याचे दोन्ही डोळे सूर्या एवढे मोठे होतात, आणि तो करकरा दाढा आणि दात खातो. त्याला बघून अंगावर रोमांच उभे राहतात. संतापाने थरथरणाऱ्या शरीराने तो प्रचंड भूभूःकार करतो. त्या क्रोधामुळे असे वाटते की जणू काही भूमीवर मेघांचा प्रचंड गडगडाट होत आहे. गर्जनेने पर्वतांचे कडे कोसळत आहेत. समुद्र जलहीन झाले आहेत. पण एवढा पृथ्वी आणि आसमंत दणाणून टाकणारा क्रोध आणि आवेश कशासाठी, तर समर्थ या स्तोत्राच्या शेवटी सांगतात,

 

“धर्म संस्थापनेसाठी । दास तो उठिला बळे ।”

 

या ओळीतून समर्थांनी मारुती स्थापनेच्या मागचे रहस्य सुद्धा सांगितले आहे. ते म्हणतात की ही माती, हा धर्म तुझा आहे तर त्यावर परकीयांचा अंमल कशासाठी ? या परकीय दडपणातून मोकळा श्वास घ्यायचा असेल, धर्माचे रक्षण करायचे असेल तर सर्व शक्तीनिशी हा दास; समर्थ झाला पाहिजे. त्यासाठी फक्त मारुतीच्या पराक्रमाचे, चरित्राचे स्मरण करावे लागेल. मारुतीप्रमाणे अतुल्य बळ प्रत्येकात आहे हेच या स्तोत्रातून समर्थांना सांगायचे आहे. हा मारुती अपूर्व वीर्य, धैर्य, शक्ती, बुद्धी देतो. चाफळला हा मारुती पश्चिमेकडे रामाकडे तोंड करून उभा आहे. तो रामधर्माचे, रामकर्माचे, राम भक्तीचे, राक्षसी वृत्तीपासून डोळ्यात तेल घालून संरक्षण करीत आहे. रामप्राप्तीच्या वाटेवर चालणाऱ्या सगळ्यांचे हा मारुती रक्षण करतो. अंतकरणातील रामरायाला समजून घ्यावे. साधना करताना मोहाने, लोभाने, क्रोधाने मनाचे पतन होऊ नये म्हणून तो रक्षण करतो. मार्गदर्शन करतो. देहाभिमुख असणाऱ्या जीवाला रामाभिमुख होऊन ईश्वर प्राप्तीच्या मार्गात अडचणी येऊ नयेत म्हणून शक्ती देतो, बुद्धी देतो.

 

समर्थांच्या प्रत्येक मारुती स्तोत्रातून मिळणारे हे गुप्तधन आहे. मारुतीराया समोर वचनबद्ध होईल, राष्ट्राला घडविण्यासाठी विचाराने; कार्याने; धर्माने; कामाने प्रयत्न करेल त्यालाच ते धन सापडते. असे कार्य करणाऱ्यांबरोबर समर्थ आहेतच. रामराय सुद्धा आहेतच. म्हणून समर्थांच्या अकरा मारुती स्तोत्रांचा अभ्यास आणि परिचय करून घ्यायचा. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

कार्यप्रेरणा

“कष्टेंविण फळ नाही । कष्टेंविण राज्य नाहीं ।

केल्याविण होत नाहीं । साध्यजनीं ।।”

 

प्रस्तुत ओवी दशक अठरा, समास सातवा आणि ओवी तिसरी आहे. सातवा समास ‘जनस्वभाव निरूपण’. जगामधील बहुसंख्य लोकांचा स्वभाव स्वार्थी आणि आळशी असून त्यांना काहीही कष्ट न करताच सुख व समृद्धी असे फळ पाहिजे असते. अशा लोकांचा श्रीसमर्थांना अतिशय तिटकारा असून त्यांची संभावना श्रीसमर्थांनी कठोरपणे करंटे अशी केलेली आहे. श्रीसमर्थांचा प्रयत्नवाद, कष्ट व शुद्ध विचार यांच्यावर मोठा विश्वास असून त्यांच्या योगाने श्रमणाऱ्या माणसाला यश प्राप्त होतेच अशी त्यांची निष्ठा आहे. हा विचार या समासात सांगितला आहे.

 

आता आपण वरील ओवीचा अर्थ आणि गर्भितार्थ पाहूया. ही ओवी सुभाषितवजा आहे. अशा कितीतरी सुभाषित ओव्या आपण श्रीमत्  दासबोधात अभ्यासिल्या आहेत. उदा. ‘पेरिले ते उगवते’, ‘केल्याने होत आहे रे । आधी केलेचि पाहिजे ।’, ‘यत्न तो देव जाणावा । अंतरी धरीता बरे ।’

 

आता वरील ओवीचा सरलार्थ पाहूया. या जगात कष्टावाचून फळ मिळत नाही. कष्टावाचून राज्य मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय जगात कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. 

या ओवीतील प्रत्येक चरणाचा गर्भितार्थ बघूया.

 

‘कष्टेंविण फळ नाहीं’ – समाजात सामान्य माणसे बहुसंख्येने असतात आणि असा हा प्रातिनिधिक माणूस अत्यंत स्वार्थी, लोभी प्रवृत्तीचा असतो. शिवाय स्वतःहून प्रयत्न, विचार, उद्योग, व्यापांचेही त्याला वावडे असते. अशी अज्ञानी माणसे आळशी, निःष्क्रिय आणि तामसी वृत्तीची असतात. अशा अज्ञानी व्यक्त्तींना कष्टाशिवाय फळ नाही, जगात काही फुकट मिळत नाही, मिळाले असे वाटले तरी त्याची कोणत्या ना कोणत्या रूपाने सव्याज परतफेड करावी लागते याचे त्यांना भान, ज्ञान, आकलन काहीच नसते. अशा अज्ञानी माणसांना श्रीसमर्थ अत्यंत कळकळीने सांगतात, बाबांनो कष्टाशिवाय कोणतेही यश प्राप्त होणार नाही.

 

भक्तीमार्गातही भक्ती, उपासना करायची नाही; आणि देवाची कृपा व्हावी अशी इच्छा करायची. तेवढे करून न थांबता, माझी इच्छा पूर्ण झाली तर मी तुला सव्वा किलो पेढ्यांचा नैवेद्य दाखवीन असा नवसही बोलायचा. पण या कर्मभूमीचा नियम असा आहे की, येथे कष्टावाचून फळ, यश मिळत नाही. ‘कष्टेंविण राज्य नाहीं’ – कष्ट केल्यावाचून, त्यासाठी तन-मनाने झिजल्याशिवाय, लहानमोठे कोणतेच काम; अगदी राज्यप्राप्तीपर्यंत या जगात काहीच साध्य होत नाही. राज्य म्हटल्याबरोबर मला शिवाजी महाराज आठवतात. त्यांची प्रत्येक कृती ही हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाने भारलेली होती. तसेच या ध्येयातच, आपल्या जगण्याचा अर्थ शोधणारी जिवाभावाची माणसे त्यांनी जोडली. आणि शिवाजीमहाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाने झपाटून जाऊन योग्य दिशेने, योग्य मार्गाने, योग्य प्रकारे अथक कष्ट; जिद्दीने; प्रयत्नाने स्वराज्य निर्माण केले. शिवबाचे चरित्र म्हणजे चालता-बोलता महामंत्र आहे. श्रीसमर्थांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न त्यातून साकार झाले.

 

‘केल्याविण होत नाहीं’ –  श्रीसमर्थ सामान्य, अज्ञानी जनांना सांगतात की, करून पाहिल्या शिवाय त्यातील अडचणी कळणार नाहीत. पण आम्ही म्हणतो,

 

‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्या वरी.’

 

याचा परिणाम अपयश येते. मग आपण अपयशाचे खापर नशिबावर फोडतो. अशा आळशी, सुस्त माणसाच्या दैववादी, नकारात्मक विचारांना श्रीसमर्थांच्या विचारप्रणालीत व उपदेशात काडीचेही स्थान नाही. उलट ‘लहानथोर काम कांही ।केल्याविण होत नाही ।’  श्रीसमर्थांप्रमाणे अनेक संतांनी कष्टाचा महिमा वर्णन केला आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, 

 

“असाध्य ते साध्य करता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।”

 

या जगात असाध्य असे काहीच नाही. पण अभ्यास म्हणजे कष्टात सातत्य हवे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “अभ्यासाची कांही सर्वथा दुष्कर नाही ।” कष्टात सातत्य ठेवल्यावर कोणतीच गोष्ट अवघड नाही. श्रीसमर्थही आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत की, कष्ट केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की ती मनावर ठसते, ही सामान्य जनांची मानसिकता श्रीसमर्थांनी ओळखली होती. कारण ते मानसतज्ञ होते.

 

‘साध्यजनीं’ – साध्य म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे. यासाठी कष्ट व प्रयत्नांची जोड हवी. इथे मला जपानचे उदाहरण द्यावेसे वाटते. हिरोशिमा आणि नागासाकी वरील अणूबाँबच्या हल्ल्यानंतर जपानने अपार धैर्याने स्वतःचा पुनर्विकास सुरू केला. शिक्षणाची मशाल, श्रमांची ताकद आणि जिद्दीचा किल्ला उभारून त्यांनी इतिहासाला नव्याने वळण दिले. या सर्व प्रयत्नांमुळे जपान कांही दशकातच एक आर्थिक महासत्ता बनला. आणि राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखा तेजाने झळकला.

 

आपले ध्येय गाठण्यासाठी कष्टाचीच कास धरावी लागते. यासाठी माझ्या वाचनात आलेले एक पुस्तक, ते म्हणजे वीणा गवाणकर लिखीत, ‘गोल्डा एक अशांत वादळ’ यातील एक सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी हवी या विचाराने, ध्येयाने झपाटली जाते. साध्या राहणीने आणि सहज वाणीने, अपार कष्ट करून आपला स्वतंत्र ठसा उमटवते. ज्यूंसाठी इज्रायल देश उभा करते. इज्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करणारी ती एकमेव स्त्री ठरली. सत्तरी नंतरही पंतप्रधान होते. हे तिच्या कष्टाचेच फळ नव्हे का ? आपल्या देशावर ब्रिटिशांनी दिडशे वर्षे राज्य केले. त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी जीवनाची आहुती दिली आणि स्वातंत्र्य मिळाले. त्यांनी स्वत:चा प्रपंच केला नाही तर देशाचा केला. म्हणून आज आपण स्वातंत्र्याची फळे उपभोगत आहोत. आजच्या घडीलाही आजच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी, आणि सामान्य जनतेने कष्टाची कास धरली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आपला भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही.

थोडक्यात या ओवीचा श्रीसमर्थांनी सांगितलेला मतितार्थ म्हणजे, ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे.’ तशीच ती अनर्थकारक आहे. जगाच्या या कर्मभूमीत लहान मोठे कोणतेही कार्य ठरवून केल्याशिवाय होत नाही हे न उमजणाऱ्या प्रवाहपतित दुर्देवी माणसाच्या मानसिकतेवर श्रीसमर्थांनी कळकळीने चिंतन केले आहे. सामान्यजनांनी स्वतःची प्रगती करून सुखाने रहावे या पोटतिडकीने, वृत्ती; प्रवृत्तीवर; स्वभावावर प्रकाश झोत टाकला आहे.

 

श्रीसमर्थांनी बारा वर्षे भारताच्या कानाकोपऱ्यात आसेतु हिमाचल अशी एकट्याने खडतर पायी यात्रा केली. त्या पदभ्रमणात श्रीसमर्थींनी ठिकठिकाणच्या लोकांचे, समाजाचे सूक्ष्म अवलोकन केले. त्यांचे गुणदोष हेरले आणि त्या अनुभवाचे शब्दरूपातून अधिकार वाणीने वर्णन, विवेचन, विश्लेषण केले आहे. हे साडे तीनशे वर्षापूर्वीचे विचारधन, हा उपदेशाचा गाभा आजच्या काळापुरताच नव्हे तर भावी काळात, तसेच मानवाचे मूलभूत गुणदोष कायम असेपर्यंत दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.  

 

चला तर, हे विचारधन अंतरी बाणवूया, अंतर्मूख होऊया. आपल्या आचरणात बदल करूया, आणि हीच या ओवीची खरी फलश्रुती ठरेल असे मला वाटते.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language