समर्थ रामदासांची साधना व तपश्चर्या

चिंता करितो विश्वाचीया आंतरिक स्फुरणातून समर्थांनी घर, स्वजन, जन, सर्वांचा अगदी नावाचाही त्याग केला. त्यांना रामभक्तीचे वेड लागले होते. पायी प्रवास करत त्यांनी नाशिकच्या काळारामाचे दर्शन घेतले. सगुणमूर्ती चर्मचक्षुंनी पाहिली पण आपल्या अंत:करणात त्याचे आस्तित्व जाणवले नाही. मनातले दुःख हनुमंताला सांगितले. अंतर्मनात अप्राप्य ते प्राप्य करण्याची मनीषा जागी झाली. विद्याभ्यास, ज्ञानसाधनेची प्रेरणा मिळाली. जे तरुन जाण्यास कठीण, मिळण्यास कठीण, जाणायला कठीण, ते तपाने साध्य होते, हे सत्य कळले त्यासाठी नाशिक जवळ टाकळी येथे समर्थ पोहोचले. शांत जागा, नंदिनीगोदावरीचा संगम, तेथे एक जुनी मठी, भोवताली निंब, उंबर, वड या वृक्षवल्लींची साथ. असे स्थान तपश्चर्या साधनेसाठी मिळाले

अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणें कांहीं |

तुजविण मज या जगीं पाहतां कोणीच नाही || ||

ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा |

विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वील ठेवा || ||

युक्ति असेना बुद्धि असेना शांतिवसेना अंगी |

रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी || ||”

असे स्वतःचे आत्मपरीक्षण त्यांनी श्रीरामासमोर ठेवले त्याच्याशिवाय कोणी नाही याचे स्मरणही करून दिले.

समर्थांनी शके १५४२, रथसप्तमीच्या दिवशी पुरश्चरण साधना सुरू केली. पंचपंच उष:काली, पहाटे चार वाजता उठून शौचमुखमार्जन; स्नान; मानसपूजा करून ते १२०० सूर्यनमस्कार घालत. नियमित सूर्यनमस्कार घालत असल्यामुळे, शरीर स्वस्थ; बळकट झाले तर मन एकाग्र; प्रभावी प्रतिकारक्षम झाले. शरीराच्या अंगउपांगाचे सामर्थ्य वाढले. सूर्योदयाला सूर्याकडे तोंड करून नंदिनीगोदावरीच्या संगमात उभे राहून त्यांनी गायत्री पुरश्चरण सुरू केले

गायत्री या वैदिक मंत्राचा यज्ञाशी निकटचा संबंध असल्यामुळे हा पवित्र मंत्र विश्वातल्या शुभ दैवी शक्तीचे प्रतीक आहे. या गायत्री मंत्राच्या अनुष्ठानाने समर्थांचे मन अतिंद्रीय शक्तीचा अनुभव घेत होतेवाक् सिद्धी, संकल्प सिद्धी, भविष्य ज्ञान या शक्ती समर्थांना प्राप्त झाल्या. अंतरंग सूक्ष्म, संवेदनशील झाले.

गायत्री मंत्राच्या जपानंतर समर्थश्रीराम जय राम जय जय रामया त्रयोदशाक्षरी  मंत्राचा जप करत. १२ वर्षे, १३ कोटी जपाचा त्यांचा संकल्प होता. परावाणीतून सहज स्फुरलेला हा तारक मंत्र समर्थांना अखंड श्रीरामाच्या अनुसंधानात रहायला सहाय्यभूत ठरला. श्रीरामाचे गुण त्यांच्या अंगी प्रगट होऊ लागले. ‘नामत्यांच्या मनाच्या सूक्ष्म स्तरात पोहोचले. नामस्मरणाने हामहायोग’ ‘अखंड अनुसंधानहा ज्ञानयोग श्रीराम चरित्राचे मननहा भक्तीयोग समर्थांनी अनुभवला श्रीराम भक्तांचे लालन, पालन, पोषण रक्षण या कर्मयोगाचा त्यांनी निश्चय केला. नामस्मरणाने त्यांना अनाहत नादाचा अनुभव आला आणि श्रीरामाशी दासपणाचे नाते दृढ झाले. कायावाचामनाने ते श्रीरामाचे झाले.

समर्थ हनुमंताचे सगुण निर्गुण उपासक होते. टाकळीला त्यांनी गोमयाच्या मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. दोघांनी शक्ती, युक्ती, बुद्धी रामरायाकडून घेतली. बालपणापासून मारुतीने त्यांना पदरात घेतले रक्षण केले. क्रियाशीलता, गतिमानता, शत्रुभयकारक, ईश्वरकेंद्रित वृत्ती हे गुण त्यांनी आत्मसात केले

)नि:स्सीम ब्रह्मचर्य अचाट शरीर बळ

)संकटाने विचलित होणारी निर्भयता,

)दुष्टाची कपटनीती ओळखून त्याला प्रतिकार करण्याचे बुद्धीचातुर्य

)श्रीराम सेवेला समर्पित जीवन 

हे चार पैलू हनुमंत समर्थांच्या जीवनात आढळतात.

समर्थ रोज पाच घरी भिक्षा मागत. प्रत्येकाकडून मूठ पीठ असे पाच मुठींच्या पिठाचे ते पानगे करत. श्रीरामाला नैवेद्य दाखवून ग्रहण करत. भिक्षेत शिजवलेले अन्न मिळाले तर झोळी पाण्यात बुडवून पिळून ते अन्न भक्षण करत. चवीवर बोलण्यावर नियंत्रण असे. समर्थांनी भिक्षेच्या  माध्यमातून व्यक्ती, कुटुंब समाज यांचे निरीक्षण, लोकजागर संघटन उभे केले. अनेक महंत त्यांना मिळाले. मठ मंदिरे उभी राहिली, राष्ट्रप्रेम, धर्म प्रेम जागृत केले. रामदासी संप्रदायाचे भिक्षा हे प्रमुख अंग आजपर्यंत चालू आहे. देशाटनात भिक्षेमुळे अवघा देश स्वदेश वाटला. समर्थ रोज शास्त्री बुवांच्या वेदपाठ शाळेत पुराण श्रवण करायला जात. तेथील अनेक ग्रंथ समर्थ आणत दुपारच्या वेळी या ग्रंथांचा अभ्यास करत असत

भगवद्गीता तसेच इतर अनेक गीता, वेद, भागवत, उपनिषदे, वेदांत, श्रुती या ग्रंथांच्या अभ्यासाचा उल्लेख त्यानी दासबोध दशक समास मध्ये केला आहे. समर्थ रात्रीवाल्मिकी रामायणग्रंथाचे लेखन करत. शके १५४४ च्या माघ महिन्यापासून शके १५४६ च्या वैशाखापर्यंत रामायणाची कांडे तीर्थाटनानंतर १५६७ मध्ये उत्तरकांड १५७१ मध्ये अयोध्या कांडाचे लेखन समर्थांनी केले. रामायणाची पोथी आजही धुळे येथीलवाग्देवतामंदिरात पाहायला मिळते. त्यातील वळणदार अक्षर पाहून मन थक्क होते. रात्री समईच्या प्रकाशात टोकदार बोरू शाईच्या साह्याने समर्थ लेखन करतप्रत्येक अक्षर घडसून, वळवून काढलेले, वाटोळे, सरळ, मोकळे जणू मोतीच एकापुढे एक ठेवले आहेत असे वाटे. काना, मात्रा, वेलांटी अतिशय घोटीव प्रत्येक ओळ सुटी. हे अपूर्व लेखन पाहून आनंद वाटतो आणि दिसामाजी कांहि तरी ते ल्याहावे | प्रसंगी अखंडित वाचीत जावे |” यातील मर्म कळते.

समर्थांच्या साधनेची फलश्रुती –  “हृदयस्थ नारायण मला प्रेरणा देतो, सांभाळतो, रस्ता दाखवतोहा अनुभव समर्थांना आला. हृदयस्थ ईश्वर माझ्या बुद्धीचा प्रेरक, मनाचा चालक देहाची जीवन ज्योत आहे हा त्यांचा दृढनिश्चय पक्का झालातपश्चर्येनंतर समर्थ अध्यात्मिक नेतेपदावर आरूढ झाले. ईश्वराचे अस्तित्व त्यांना सतत जाणवत असल्यामुळे निस्वार्थी प्रेम, निर्भयता, निर्दोष साधुत्व, अखंड आनंद यांनी त्यांचे जीवन काठोकाठ भरले. रात्रंदिवस आपल्या हृदय मंदिरात तो आहे, हा विश्वास निर्माण झाला.

उत्तरेकडून येणारे यात्रेकरू समर्थांना उत्तरेकडे चाललेला विध्वंस सांगत असत. तलवारीच्या धाकाने धर्मांतरण होत आहे, धार्मिक प्राचीन ग्रंथांची होळी केली जात आहे, स्नान संध्या उपासना करण्याचे स्वातंत्र्य नाही, अन्न वस्त्र निवारा नाही, कोणाचा आश्रय नाही, लोकांना कसे जगावे किंवा मरावे हेही कळत नाही; हे ऐकून समर्थांनी देशाटन करण्याचा निर्णय घेतला. बारा वर्षांच्या तपश्चर्येमुळे त्यांचा रक्षणकर्ता प्रभू रामचंद्र आहे, त्याच्या या सेवकाकडे वक्रदृष्टीने पाहणारा अजून कोणी जन्मला नाही हा विश्वास त्यांच्या  मनात होता.

१२ वर्षांनंतर, शके १५५४ च्या फाल्गुन शुक्ल पक्षात एक तपस्वी, मुक्त, निग्रही, रामरंगी रंगलेला, जनांविषयी प्रेम कळवळ असणारा स्वच्छंद बैरागी, रामराज्याच्या निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून बाहेर पडला, तो समर्थ रामदास स्वामी होता.

ध्यान करूं जातां मन हारपलें सगुण तें झालें गुणातीत ॥१॥

जेथें पाहे तेथें राघवाचें ठाण करीं चापबाण शोभतसे ॥२॥

राम माझे मनीं राम माझे ध्यानीं शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥

रामदास ह्मणे विश्रांति मागणें जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थ रामदासांचा स्वरूप संप्रदाय

“रघुनायका सारिखा देव नाहीं |

क्रिया पाहतां चोखडी सर्व कांहीं ||”

धर्माचे आचरण, वेदोक्त ज्ञान, विज्ञानाचा अभ्यास, सगुण–निर्गुण रामोपासना या गोष्टींचा जिथे साकल्याने विचार होतो त्याला संप्रदाय म्हणतात. संप्रदाय म्हणजे ‘सम्यक प्रदान’. यात सर्व विचार करून नियम, रीती नक्की करून गुरुकडून शिष्याला ज्ञान दिले जाते. संप्रदायात निश्चितपणे आखलेला मार्ग, चाकोरी, नियम, व्रते, साधना यांचा समावेश असतो.

समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या संप्रदायाला समर्थ संप्रदाय, श्री संप्रदाय, राम संप्रदाय, महाराष्ट्र धर्म, स्वरूप संप्रदाय अशीही नावे आहेत. आपल्या देशात आठव्या शतकापासून सुरू झालेली आक्रमणे, अत्याचार, १६ व्या शतकापर्यंत बरीच स्थिर झाली होती व वाढली होती. समर्थांनी हे देशाटनात अनुभवले, व मूळापासून त्याच्या उच्चाटनासाठी; हरवलेल्या धर्माची स्थापना; उद्ध्वस्त समाज कार्यरत करणे; गमावलेले स्वत्व लोकांच्या मनात निर्माण करणे या सगळ्यासाठी समर्थ रामदासांनी “स्वरूप संप्रदाय” स्थापन केला. 

स्वरूप संप्रदायाची परंपरा – आदिनारायण- महाविष्णू-हंस-ब्रह्मदेव- वसिष्ठ-श्रीराम- रामदास अशी आहे. केंद्रस्थान – अयोध्या मठ, दैवते – जानकीदेवी; श्रीरघुनाथ; मारुती आणि तुळजा भवानी ही असून श्रीराम भक्ती व हनुमंताची उपासना या संप्रदायात सातत्याने होते. मठ – ११०० असून, ११०० मठपती व अनेक शिष्य या संप्रदायात होऊन गेले. या संप्रदायाची तीर्थस्थाने जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ व सज्जनगड ही होत. 

संप्रदायाचे चार स्तंभ – १. हरीकथा निरूपण, २. राजकारण, ३. सावधपण , ४.साक्षेप व आक्षेप फेडणे, हे आहेत.  उत्सव – रामनवमी, हनुमान जयंती हे मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. 

संप्रदायाची पाच वैशिष्ट्ये – १. शुद्धउपासना, २. विमलज्ञान, ३. वैराग्य, ४. गुरु परंपरा, ५. संत परंपरा. 

संप्रदायाची वीस लक्षणे – १. लेखन, २. वाचन, ३. अर्थांतर, ४. शंकानिरसन, ५. प्रचिती, ६. अर्थभेद, ७. गाणे व कीर्तन, ८. टाळी वाजवणे, ९. नृत्य, १०. प्रबंध, ११. प्रबोध प्रचिती, १२. वैराग्य, १३. विवेक, १४. लोक राजी राखणे, १५. राजकारण, १६. एकाग्रता, १७. प्रसंग जाणणे, १८. उदासीनता, १९. सर्वांशी समानता, २०. रामोपासना

स्वरूप संप्रदाय – स्वरूप म्हणजे सत्य, ज्ञान व आनंद याचे एकत्व. ब्रह्मबोध, ब्रह्मस्थिती किंवा आत्म्याची सत्ता होय. स्वरूपानुभव हे ज्ञानी पुरुषाचे प्रधान लक्षण आहे. परमार्थात त्याला सर्वोच्च स्थान आहे. मनाचा श्लोक ७७ मध्ये “करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे” यात जीवाचे मन सूक्ष्मात गेले की ते भगवत् रूप होते व ते त्याला सर्व प्राणी मात्रात दिसते यालाच “निर्गुण रूप दर्शन” म्हणतात. स्वरूपानुभव आलेला साधक अनासक्त, देहातीत, व्यापक, अलक्षब्रह्मा – ब्रह्माशी लक्ष लावलेला, परब्रह्माशी अनन्य असतो. सकळ धर्मामध्ये स्व-स्वरूपी रहाणे हा उत्तम धर्म आहे.  आठव्या दशकात स्वरूप स्थितीचे चांगले विवेचन आहे. स्वरुपात रहाताना साधक स्वरूपच होऊन जातो. घळीतल्या काकड आरतीत “उठी रे गोपाळा उघडी स्वरूप लोचना” असा चरण आहे. हे ज्ञानचक्षु आहेत. २१ समासीत समर्थ शिष्याला म्हणतात “तू, नि:संग; निर्मळ; आत्मस्वरूप आहेस.” यातील “मी” ची जाणीवही निर्विकल्प समाधीत नाहीशी होते. प.पू. गोंदवलेकर महाराज त्यांच्या ११ डिसेंबरच्या प्रवचनात म्हणतात “भगवंताला सर्व देण्यापेक्षा ‘स्व’ द्यायला शिका. एकदा ‘स्व’ दिल्यावर आपल्या मालकीचे काहीच रहात नाही व मी भगवंताचा आहे ही जाणीव मात्र मनामध्ये कायम राहाते”. प. पू. स्वरूपानंद स्वामी (पावस) म्हणतात “उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर” स्वस्वरूपाचा विचार समर्थ अद्वैत तत्वज्ञानामुळे करतात. या विचाराचे अधिक चिंतन दासबोध ९–२–९, ७–६–४७, ७–१०–२९, ९–८–१६, दशक ८, मनाचे श्लोक १४५, ७७, १७३, व आत्माराम १-४, २-३४, ३-७, ३४, ३५, ५-१६ या समासांमध्ये आढळून येते. 

समर्थ संप्रदायाची माहिती, त्याची वीस लक्षणे, सर्व रामदासी; दासबोध अभ्यासार्थी व सांप्रदायीकांनी अभ्यास करून आचरणात आणायला हवी. संप्रदायाच्या उभारणीसाठी व समर्थ रामदासांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्न करायला हवेत, कारण हे कार्य व विचार कालातीत आहेत. आजही त्यांची गरज आहे. समर्थ रामदासांचे चरित्र असामान्य व अलौकिक आहे. त्यांनी निर्माण केलेला संप्रदाय हिंदू धर्म संस्कृतीचा मानबिंदू आहे. त्याचे भवितव्य उज्वल करणे आपल्या हातात आहे. कल्याण स्वामी म्हणतात, 

“धर्मस्थापना स्थापियेली | न्याय नीतीने भक्ती वाढविली |

संत मंडळी ते निवाली | बहू दास ज्याचे भूमंडळी |

जन्मजन्मांतरी पुण्य कोटी | बहु संचित होते गाठी |

योगीरायाची झाली ज्यास भेटी | त्यास कल्याण होय सृष्टी ||”

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थांच्या जीवनातील अकरा-अकरा

आपल्या सद्गुरूंना म्हणजे श्रीरामाला ‘समर्थ’ म्हणणारे, रामदास आपल्या कर्तृत्वाने व ज्ञानाने ‘समर्थ’ झाले. श्रीरामांच्या आदेशावरून कार्य करणारे समर्थ, श्रीरामाचे दास्यत्व पत्करून त्याचे ‘दास’ झाले/रामदास झाले. “मुख्य हरिकथा निरुपण” हे लक्षात घेऊन निद्रिस्त समाजाला, आध्यात्मिक अधिष्ठान ठेऊन जागृत करण्यासाठी त्यांनी बोध केला; तो ‘दासबोध’ लिहून ! अशा समर्थ व्यक्तिमत्वाला लोक आपणहून ‘समर्थ रामदास’ म्हणू लागले. त्यांच्या जीवनातील ‘अकरा’ चे महत्व असे आहे.

“आक्रा आक्रा बहु आक्रा | काये आक्रा कळेचि ना |

गुप्त ते गुप्त जाणावे | आनंदवन भूवनी ||१७||”

समर्थ रामदासस्वामींनी  लिहिलेल्या आनंदवनभुवनी ह्या काव्यातील या ओळी आहेत.‘वनभुवन’ हे काशीचे पूर्वीचे नाव होते. समर्थांनी शिव राज्याभिषेकाचे स्वप्न तिथे पाहिले होते. काशीला पडलेल्या स्वप्नाचा आनंद त्यांनी या काव्यातून व्यक्त केला आहे. समर्थांच्या जीवनात या ११/११ चे महत्व आपल्याला खूप वेळा पहायला मिळते. श्रीसूर्यनारायण व श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने सूर्याजीपंत व राणूबाई यांना दोन पुत्र झाले. जेष्ठ पुत्र गंगाधर व लहान नारायण ! नारायण म्हणजे रामदासस्वामी हे हनुमंताचे अवतार होते. त्यांना अकरावा रुद्र म्हणतात.

“कृतेतू मरुताख्यश्च्य | त्रेतायांपवनात्मज |

द्वापरे भीम संज्ञश्च | रामदास कलौयुगे ||”

असे पुराणातील भविष्य परंपरा सांगताना बखरकारांनी म्हटले आहे. 

फाल्गुन वद्य षष्टी या दिवशी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दनस्वामी यांची पुण्यतिथी असते. या दिवशी सूर्याजीपंत व राणूबाई दोघंही पैठणला जात. राणूबाई व एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरीजाबाई या बहिणी–बहिणी होत्या. अकरा महिन्याच्या नारायणाला त्यांनी नाथांच्या मांडीवर दिले, तेव्हा ते गहिवरले. एकनाथमहाराज प्रेमाने राणूबाईना म्हणाले, “हा मुलगा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहे. अवघ्या महाराष्ट्रात याची कीर्ती पताका फडकत राहील.” अकराव्या महिन्यात नाथांचे आशीर्वाद मिळालेला असा हा अकरावा रुद्र !

बाल नारायण ‘श्रीराम जोशी’  यांचेकडे शिक्षणासाठी जात असे. नारायणाचे शिक्षण म्हणजे बाळबोधवाचन, लेखन, संध्या, गायत्री, पुरुषसूक्त, पवमान, ग्रंथसंहिता वगैरे. त्यांच्या शिक्षणाबद्दल गिरीधर स्वामी ‘समर्थप्रताप’ ग्रंथामध्ये सांगतात,

“समर्थे अकरा धड्यात केले धुळाक्षर |

अकरा प्रहरात वळिले अक्षर |

अकरा दिवसात केला जमाखर्च |

ब्रह्मांडकुळकर्ण चालवाया ||”

इथेही ‘अकाराचा’ उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करताना, तसेच समर्थांनी लवकर शिक्षण पूर्ण केले याचे वर्णन करताना, समर्थांच्या जीवनातील अकराचे महत्व सांगायला गिरीधरस्वामी विसरत नाहीत. समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे ‘कुलकर्णी’ हे पद भूषवित होते. म्हणून गिरीधर स्वामींनी समर्थांच्या बाबतीत ‘ब्रह्मांड कुळकर्ण’ असे सांगून त्यांच्या अफाट अध्यात्मिक शक्तीचे वर्णन केले आहे. “अकरा प्रहरात वळिले अक्षर” सांगतांना  अक्षर गिरवणे या साक्षरतेबरोबरच आत्ताचा नारायण म्हणजे अ-क्षराची ओळख करून घेणारा महायोगी होणार आहे, असेही त्यांना सुचवायचे असावे. समर्थ चरित्रात त्यांच्या लहानपणाच्या गोष्टी वाचतानासुद्धा अकराचा उल्लेख आढळतो. ‘अकरा ताकाची मडकी’, ‘अकरा धान्याची पोती’ असा कथाभाग आढळतो.

अकरा वर्षाचा नारायण घराच्या अंगणात खेळत होता. तिथे एक मोठे वानर आले. त्याने सक्तीने ओढत ओढत नारायणाला मंदिरात नेले. तिथे पालखीत प्रभू रामचंद्र व सीतामाई बसले होते. ते वानर म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत होते. प्रभू रामचंद्रांनी नारायणाला “अहं ब्रह्मास्मि” चा उपदेश केला तोही अकराव्या वर्षीच ! असे दिनकर स्वामींनी आपल्या ‘स्वानुभव दिनकर’ या ग्रंथात म्हटले आहे. तर प्रत्यक्ष अकरावा रुद्र असलेल्या हनुमंतांनी, समर्थांना श्रीराम प्रभू यांच्यापर्यंत नेले.

“मुख्य हरिकथा निरुपण | दुसरे ते राजकारण” असे म्हणणाऱ्या समर्थांनी दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आसेतु हिमाचल मठांची स्थापना केली, त्याची संख्या सुद्धा अकराशेच होती. मठातून बुद्धिमान, विवेकी, शिस्तप्रिय मठाधिपतींची नेमणूक करून, त्यांनी परमार्थ व राजकारण यांचा समन्वय साधला. ते मठाधिपती महंत होते. आणि या सर्वांनी धर्माधिष्ठित निरपेक्ष राजकारण करताना शिवबांच्या स्वराज्य संस्थापनेला मदत केली.

प्रत्येक बुद्धिमान माणूस हा बलवान सुद्धा असला पाहिजे, असा समर्थांचा आग्रह होता. समर्थांनी ‘गाव तिथे मारुती’ ही संकल्पना राबवली. त्यांनी अनेक मंदिरे उभारून त्यात व्यायामशाळा सुरु केल्या. परंतु समर्थ स्थापित अकरा मारुतींचे महत्त्व काही वेगळेच आहे. ‘आनंद वनभुवनी’ मधील वर उल्लेखलेली ओवी या मारुतींनाही लागू पडते. समर्थांनी या अकरा मारुतींची अकरा स्तोत्रे लिहिली आहेत. त्यातील ‘भीमरुपीमहारुद्रा’ हे स्तोस्त्र प्रसिद्ध आहे. ही सर्व मंदिरे बलोपासना व राष्ट्राचे सामर्थ्य वर्धिष्णू होण्याच्या दृष्टीकोनातून निर्माण करण्यात आली. ही सर्व मारुती मंदिरे शिवसमर्थ भेटीची तसेच समर्थांच्या गुप्त राजकारणाची आठवण देतात. चाफळच्या मंदिरात आजही शिवाजीराजे व समर्थ यांच्या गुप्त चर्चेची जागा पहायला मिळते. इथे वीर मारुती व दास मारुती असे दोन मारुती आहेत. शिंगणवाडीच्या मारुतीच्या इथे समर्थांनी शिवबाला अनुग्रह दिला होता. बाहेगावच्या मारुतीच्या इथे समर्थांनी भिमाकुंडात जलस्तंभिनी विद्येचे प्रदर्शन केले होते व अकरा प्रहर डोहाच्या  तळाशी बसून होते. बाहेबोरगाव येथे समर्थांनी ‘अद्वैत तत्वज्ञान’ वेणास्वामींना  संक्रमित केले होते. त्याचे वर्णन करताना गिरीधरस्वामी म्हणतात,

“अकरा दिवस एक अंगी मेखला राहे |

उद्धव महंत अकरा दिवस वाट पाहे ||”

अकरा हा आकडा विशेष आहे. एक सद्गुरू आणि एक शिष्य यांचे एकरूप होणे आहे. अनंतदास रामदासी म्हणतात,

“येकी येक ऐक्य ब्रह्म | गुरुशिष्य दोनी परब्रह्म |

येकादेश हे अंकवर्ण | सहजसमाधी सांगितले ||”

एकावर एक अशा दोन आकड्यांचे जसे ऐक्य झाले तसे गुरुशिष्य मिळून एक परब्रह्मच आहे. स्वामी-सेवक, देव-भक्त, पुरुष-प्रकृती अशा जोड्या एकावर एक अकरा प्रमाणे एकरूप आहेत. समर्थांना प्रिय असणारे मारुतीराय हे अकरावे महारुद्र आहेत म्हणून समर्थांना अकरा हा आकडा प्रिय आहे. हे सर्व पाहता त्यांच्याच काव्यातील, 

“आक्राआक्रा बहु आक्रा | कायेआक्रा कळेचि ना |

गुप्त ते गुप्त जाणावे | आनंदवन भूवनी ||१७||”

ही ओवी किती सार्थ आहे हे लक्षात येते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

श्रीसमर्थांचा राजधर्म

श्रीसमर्थांनी स्वतः राजकारण केले नसले तरीही राजनीतीच्या स्पष्ट कल्पना व त्यावर सखोल मार्गदर्शन त्यांनी २० ओव्यांच्या  राजधर्म प्रासंगिक अभंगातून केले आहे. 

“नमो मंगळमूर्ति विघ्नहरू | सरस्वतीस नमस्कारू |

सद्गुरू संत कुलेश्वरू | दाशरथी || १ ||”

या काव्याची सुरुवात मंगलाचरणाने केली असून मंगलमूर्ति श्रीगजाननास वंदन केले आहे. श्रीगणेश हे ईश्वराच्या निश्चळ अंगाचे स्वरूप होय. संत साहित्यात श्रीगणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव. माणसाच्या मनात अर्थ समजण्याची पात्रता श्रीगणपतीच्या अधिष्ठानामुळे येते. ज्ञानाचे आकलन होण्यासाठी श्रीगणेश कृपा हवीच. श्रीगणेश बुद्धीदाता आहे. अज्ञान नाहीसे करून मनातील भ्रम घालवून सिद्धीचे फळ देतो. श्रीगणेश विघ्नहर्ता आहे. तेंव्हा हाती घेतलेल्या कार्यात अडचण किंवा विघ्न येऊन ते अर्धवट राहते. कार्य खंड न पडता पूर्णत्वास जाण्यासाठी श्रीगणेशास वंदन केले आहे. 

त्यानंतर माता श्रीसरस्वतीदेवीस वंदन केले आहे. श्रीसरस्वती ही ईश्वराच्या चंचळ अंगाचे स्वरूप होय. ही वेदांची आई, ब्रह्मदेवांची कन्या व वाणीची स्वामिनी आहे. आपल्याला समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ति श्रीशारदादेवी मुळेच प्राप्त होते. त्यामुळेच जगातील सर्व कर्तृत्व श्रीशारदादेवीच्या कृपेने चालते. श्रीसरस्वतीदेवी मुळे वेद, शास्त्र, पुराणे इत्यादींना मोठेपणा प्राप्त झाला आहे. यासाठी श्रीसरस्वतीला वंदन केले आहे.        

त्यानंतर सद्गुरूंना वंदन केले आहे. सद्गुरू हे ईश्वराचे अनंत परमात्मस्वरूप होय. सद्गुरुंचे शब्दात वर्णन करणे कठिण आहे. सद्गुरू कृपा प्रसादानेच भगवंताचे दर्शन घडू शकते. आत्मानुभूती प्राप्त होते. साक्षात्काराचा अनुभव सद्गुरू कृपेनेच मिळतो. यामुळे श्रीसमर्थांनी सद्गुरूंना वंदन केले आहे.      

यानंतर श्रीसमर्थांनी संताना वंदन केले आहे. संत आत्मस्वरूप असतात. संत संगत माणूस जन्माचे सार्थक करून देते. त्रैलोक्यात शोधले तरीही सापडणार नाही असे अलौकिक दान संत देतात. त्यामुळे श्रीसमर्थांनी संतांना वंदन केले आहे. आणि श्रीसमर्थांच्या कुळाचा ईश्वर कुळेश्वर दाशरथी श्रीरामाला वंदन केले आहे. कारण सर्व कार्याचा सिद्धीदाता तोच आहे. अशा रीतीने श्रीसमर्थांनी प्रथम चरणात श्रीगणेश, श्रीसरस्वती, श्रीसद्गुरू, श्रीसंत आणि कुळेश्वर दाशरथी श्रीरामाला वंदन करून राजधर्म यास आरंभ केला आहे.   

“श्रोती मानेल तरी घ्यावे | अथवा वाचुनि सांडावे |

प्रपंचाकारणे स्वभावे | बोलिलो मी || २ ||”   

श्रीसमर्थ राजाचा धर्म, नेत्याचा धर्म, कर्त्या पुरुषाचा धर्म अर्थात त्यांचे आचरण कसे असावे ते सांगत आहेत. पण हे आचरण कसे असावे हे सांगताना, त्यांचे हे मत स्वीकारण्याची जबरदस्ती श्रीसमर्थ करीत नाहीत. “प्रपंच्याकारणे स्वभावे | बोलिलो मी ||” चांगले व्हावे म्हणून ते मार्गदर्शन करीत आहेत. तरीही ते मार्गदर्शन योग्य वाटले तर स्वीकारावे. मुलगा विचारो अथवा न विचारो, आई- वडिलांच्या अंत:करणात मुलाच्या हिताबद्दल अंतरीक तळमळ असल्यामुळे मायेपोटी ते सांगत असतात. तीच माया श्रीसमर्थांच्या मनात आहे. कर्त्या नेत्याचे कल्याण व्हावे हा त्यांचा हेतू आहे. म्हणून त्यांचे म्हणणे ऐकाच असा आग्रह न धरता ते म्हणतात “श्रोती मानेल तरी घ्यावे”. पटले तर स्वीकारावे आणि नाही पटले तर “दाटुनी सांडावे”, सोडून द्यावे; अशी विनंतीही श्रीसमर्थ करीत आहेत. भांड्यात पाणी काठोकाठ भरलेले असेल, त्यात जागा नसेल तर वरून टाकलेले पाणी खाली सांडून वायाच जाणार. तसेच मनात ऐकण्याचा, शिकण्याचा, समजून घेण्याचा भाव नसेल, गर्वाने – अभिमानाने मन भरलेले असेल, तर त्यात बोधामृत मावणार नाही, तर ते सांडणार हे निश्चित. श्रीसमर्थांचा अधिकार खरे तर खूप मोठा आहे. म्हणून  “प्रपंच्याकारणे स्वभावे | बोलिलो मी ||” असे मायेचे बोलणे श्रीसमर्थ बोलत आहेत.                                                  

“सावधपणे प्रपंच केला | तेणें सुखचि पावला |

दीर्घ प्रेत्ने मोडला | कार्यभाग सांधे || ३ ||”

श्रीसमर्थ आता लोकसंग्राहकाला, नेत्याला, राजाला, प्रमुखाला राजधर्माचे; नेतेपणाचे वर्म सांगत आहेत. प्रपंच, मग तो आपल्या वैयक्तिक कुटुंबाचा असो किंवा देशाचा; तो नेहमीच सावधपणे आणि जागरूकतेने केला पाहिजे. कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबाचा तर राजा म्हणून देशाचा. दोन्ही कर्तव्ये सारखीच महत्त्वाची आहेत. त्यांचा तो स्वधर्म होय. हा प्रपंच कारभार अत्यंत काळजीपूर्वक, दक्षतेने सर्वांच्या हिताचा विचार करून केला पाहिजे. सर्वांस समान वागणूक द्यावयास हवी. कमीजास्त असा दुजा भाव नको. अनावधानानेही भेदभाव होऊ न देता, मनात समता ठेवून सतत जागरूक वागावयास हवे. तरच सर्वाना सुख लाभेल. स्वधर्माचे, स्वतःच्या कर्तव्याचे पालन करताना, प्रपंचाचा खर्चाचा हिशोब मांडताना, आईवडील; मुले; स्वतःचा जोडीदार; भागीदार; अत्यंत जवळचे नातलग; सहकारी; मित्रदोस्त; शेजारी आणि समाजातील इतर लोक यांच्याशी वागताना सर्वांची मने सांभाळून वागावे लागते. प्रसंगी त्यांच्या मनाला न पटणारे निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी धैर्याने, जबाबदारीने कर्ता पुरुष म्हणून काही वेळा मन कणखर; कठोर करावे लागते. असे आचरण करताना अंगी चिकाटी असावी लागते. अशा वागण्याचे सातत्य नित्य हवेच. असा अखंड प्रयत्न करीत राहिला तरच हाती घेतलेल्या कार्यात हमखास यश मिळून कार्यभाग साधतो. म्हणून अखंड, सतत सावधपणाने, जागरूकतेने वागल्यास हातून चूक घडत नाही. सर्व आनंदी राहून प्रपंच कुटुंबाचा असो की देशाचा यशस्वी होतो. 

“आधी मनुष्य ओळखावे | योग्य पाहूनि काम सांगावे |

निकामी तरी ठेवावे | येकीकडे || ४ ||”

या ओवीतून श्रीसमर्थ तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार मांडत आहेत .  

१) आधी योग्य माणसाची पारख करावी.

२ ) त्याला योग्य तेच काम द्यावे. 

३) निकामी लोकांना वेगळे बाजूला काढावे.  

कोणतेही सार्वजनिक काम, राज्य कारभार, लोकसंग्रह करताना आणि घरचे काम करताना सुद्धा, ते काम करण्यासाठी; योग्य माणसाची पारख करता यायला हवी. माणूस कसा आहे, त्याचे आचार-विचार, आवड-निवड कशी आहे हे समजायला हवे. त्याच्या वागण्या-बोलण्यावरुन त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. कामाचे स्वरूप काय आहे हे पाहून, योग्य माणसाची निवड करून, त्याला झेपेल असेच काम त्याच्यावर सोपवावे. कारण काम करण्याची क्षमता सर्वांमध्ये सारखीच असते असे नाही तर व्यक्ती-व्यक्ती परत्वे ती भिन्न भिन्न असू शकते. माणूस ओळखून, योग्यता पाहून काम दिल्यास त्या कामात हमखास यश येते. कार्य  यशस्वीरित्या पार पडते. अडचणी कमीतकमी येतात. माणसाची पारख करताना, एखादा माणूस निकामी असेल; कामाचा कंटाळा करणारा; जबाबदारीने काम न करणारा; कामचुकार असेल; निरुपयोगी असेल; तर तो काम करण्यास अयोग्य समजून त्याला त्या कामापासून बाजूला सारावे. इतरांपासून दूर ठेवावे. कारण अशा माणसामुळे इतर काम करणारेही बिघडू शकतात. आणि मग कार्य पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो, कार्य अपूर्णही राहू शकते. म्हणून माणसाची योग्यता, वकूब, कुवत पाहून, त्याची काम करण्याची क्षमता लक्षात घेऊन त्याला योग्य ते काम द्यावे. तरच कार्य तडीस जाते, पूर्णत्वास जाते. अन्यथा कुचर, आळशी, निकामी माणसामुळे कार्य अपूर्ण राहते.   

क्रमशः 


|| जय जय रघुवीर समर्थ ||

गोड वाचे वदावे

वचनें बोलावी करुणेचीं | नाना प्रकारें स्तुतीचीं |

अंतरें निवती सकळांचीं | ऐसें वदावें || ४–७–२६||

सोबतची ओवी सांगते, “देवाच्या दासाचे बोलणे दयेने भरलेले असावे; दुसऱ्यांबद्दल चांगले बोलणारे असावे; ऐकणाऱ्यांचे मन सुखावेल; त्याचे अंत:करण समाधान पावेल असे असावे.” ही ओवी दशक ४ मधील सातव्या समासामध्ये दास्यभक्तीच्या निरुपणात येते. दास्य भक्तीमध्ये  नम्रता आणि दुसऱ्यांना आनंद होईल अशी सेवा करणे हे मूलभूत तत्त्व असते. नम्रतेमध्ये मृदु भाषा आपोआपच येते. तिथे कुणी कठोरतेने  बोलूच शकणार नाही. कठोर वचनात त्या व्यक्तिचा ताठा, अहंकार,गर्व किंवा अति आत्मविश्वासाचा वास डोकावेल. श्रीसमर्थांनी अन्य ठिकाणी म्हटलेच आहे की, “पेरलें तें उगवते | बोलण्यासारखे उत्तर येते | तरी कर्कश बोलावें तें | काय निमित्यें ||१२–१०–२६||” दास्य भक्तिमध्ये जर सेवाभाव जोपासायचा आहे तर कठोर वचनांना जागाच कुठे मिळणार ? 

या दशकामध्ये श्रीसमर्थ नवविधा भक्तींच्या निरुपणात सातवी भक्ती दास्यभक्ती वर्णन करतात. यात श्रीसमर्थ भगवंताची आणि त्याच भावनेने सद्गुरूंची सेवा, कशाप्रकारे करता येईल याची सविस्तर यादी देऊन विवेचन करतात. अशाच प्रकारचा तपशील सत्वगुण लक्षण(द.२.६) तसेच अर्चनभक्ती (द.४. ५) मध्येही येतो. यासाठी श्रीसमर्थांच्या काळाचा विचार लक्षात घ्यायला हवा. त्याकाळी यावनी राजवटीत समाजाची दुर्दशा, भंगलेली तीर्थस्थाने आणि देवालये त्यांनी आपल्या भारत भ्रमणात पाहिली होती, अनुभवली होती. त्यामुळे समाज पुन्हा एकत्र येऊन खंबीरपणाने उभा रहाण्यासाठी देवालये आणि धार्मिक उत्सवांच्या  जीर्णोद्धाराचा आग्रह ते पुन्हा पुन्हा धरतात. यासाठी दास्यभक्तीसारखी निरपेक्ष सेवा नाही, हेही ते जाणतात. त्यासाठी जे जे हवे ते ते तत्परतेने आणि आनंदाने करण्यासाठी आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा वा वैभावाचा यत्किंचितही विचार न करता लहानमोठी कामे सेवाभावाने करावीत असे या विवेचनात श्रीसमर्थ सांगतात. कुठलीही कामे अशी करावीत की अतिथी, साधकांची मने प्रसन्न व्हावीत. अर्थातच यासाठी आपली वाचा नम्र, मृदू व प्रेमळच असावी हे ओघानेच आले. श्रीसमर्थ म्हणतात की, “अंतरे निवती सकळांची | ऐसे वदावे ||”

श्रीगजानन महाराजांच्या शेगाव तीर्थक्षेत्रात पावलोपावली सेवक नम्रपणे उभे असतात. कुठेही साधा कागदाचा कपटा दिसू नये याची दक्षता घेतात. शिखांच्या गुरुद्वारांमध्ये कारसेवा म्हणून भाविकांच्या पादत्राणांची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी अनेक सुशिक्षित, उद्योगपती, श्रीमंत तत्पर असतात. सर्वांच्या मुखातून नम्र आणि मृदू भाषाच ऐकू येते. पक्षीेदेखील मंजूळ कुजन करून आपणास रिझवितात त्यात  काहीच स्वार्थ नसतो. कोणी ऐकतोय की नाही याचे भानही त्यांना नसते. मृदू बोलणाऱ्याने देखील पलिकडचा कसा बोलतोय, कसा प्रतिसाद देतोय याची चिंता न करता आपली वाचा नम्र व प्रसन्न भावातच राहू द्यावी. हाच बोध आपण घ्यावयाचा आहे. “म्हणोनि दुसर्‍यास सुखी करावे | तेणे आपण सुखी व्हावें || १४– ६–२३||” असे श्रीसमर्थांचे वचनच आहे. निसर्गातील पक्षीही तेच करतात. 

|| जय  जय रघुवीर समर्थ ||

मूर्खलक्षणे आणि पढतमूर्ख लक्षणे – पूर्वार्ध

मायेने ओतप्रोत भरलेल्या या विविधरंगी जगामध्ये जसे सगळीकडे एकजिनसी परब्रह्मच भरलेले अंती आढळून येते, तसेच नाना विषयांचे प्रतिपादन जरी दासबोधात केलेले असले तरी या सर्व प्रतिपादनातून ‘आधी केले मग सांगितले’ असा श्रीसमर्थांच्या आत्मप्रचितीचा रंग उधळलेला दिसून येतो. जगात वावरताना पदोपदी आपल्याला मूर्ख व्यक्ती भेटत असतात. अशा व्यक्ती ओळखायच्या कशा? याबद्दल श्रीसमर्थांनी या दशकात सविस्तर सांगितले आहे.

श्रीसमर्थांनी दासबोधामार्फत, आपल्यातील माणूसपण जागवायला शिकवले. श्रीसमर्थांनी व्यक्तिमत्त्व विकासाची विविध अंगे यांत उलगडून दाखवली आहेत. जीवन म्हणजे बाहेरून थोपलेली गोष्ट नाही तर ती आतून उमलण्याची प्रक्रिया आहे. पारमार्थिक होण्यापूर्वी आपण आधी प्रामाणिक मनुष्य झाले पाहिजे, असे श्रीसमर्थांना वाटते. मूर्खलक्षणे सांगताना, निंदा करणे किंवा टिंगल उडवणे हा श्रीसमर्थांचा हेतू खचितच नाही. माणसाचे जीवन बदलावे, नरदेहाचे सार्थक व्हावे, हा त्यांचा प्रधान हेतू आहे. ज्या माणसाला स्वतःचे हित कळत नाही त्याला ते ‘मूर्ख’ म्हणतात. खडे काढल्यावाचून धान्य वापरता येत नाही, तसेच दोष काढल्यावाचून प्रवृत्ती मार्ग शुद्ध होत नाही. शास्त्राप्रमाणे सद्वर्तन होण्यासाठी दोषत्याग केलाच पाहिजे. माणसाने प्रयत्नपूर्वक आत्मपरीक्षण करून स्वतःतील दोष समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःच्या खाजगी जीवनात शुद्धता आणि सार्वजनिक जीवनात व्यवहार चातुर्य संपादन करण्यासाठी परिश्रमपूर्वक मूर्खपणाचा त्याग केला पाहिजे, असे श्रीसमर्थ म्हणतात. श्रीसमर्थ सांगतात,

येक मूर्ख येक पढतमूर्ख | उभय लक्षणीं कौतुक |

श्रोतीं सादर विवेक | केला पाहिजे || २-१-४ ||

श्रीसमर्थांनी जवळ जवळ सत्तर ते पंचाहत्तर प्रकारची मूर्खलक्षणे सांगितली आहेत, ती अशी – 

बायकोच्या सांगण्यावरून स्वतःच्याच आई–वडिलांशी वाकडेपणा घेणारा, बाईलबुद्धीने वागून सर्व आप्त मित्रांशी संबंध तोडणारा, नित्य सासुरवाडीला जाऊन राहणारा, परस्त्रीशी लघळपणा करणारा, सामर्थ्य नसता सत्ता गाजवणारा, आपल्याच तोंडाने स्वतःचीच स्तुती करणारा, स्वतःचा नाकर्तेपणा दिसत असतानाही उगीच घराण्याच्या – वाडवडिलांच्या फुशारक्या मारणारा,  कुणी विवेकविचार सांगितला असता न मानणारा, अनेकांशी शत्रूत्व असणारा,  आपल्याच माणसांशी फटकून वागणारा आणि परक्यांशी मैत्री करणारा, इतरांच्या दोषांचे त्यांच्या पश्चात काथ्याकूट करणारा, परक्या ठिकाणी वचावचा जेवणारा, आपला मान अपमान स्वतःच्याच तोंडाने उघड करणारा, द्यूत, वेश्यागमन, चोरी, चहाडी, परद्रव्य हरण, परद्वारगमन या सर्व व्यसनात रमणारा, स्वतः काहीही न करता; दुसऱ्याच्या सहाय्याची आशा धरून आळशीपणात आनंद मानणारा, घरात शहाणपणाच्या गोष्टी सांगणारा पण सभेत, चारचौघात सांगताना लाजणारा आणि बोलताना घाबरणारा, कुणी शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या तरी लक्षात न घेणारा, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांसमोर घोटाळ्यात पडणारे वर्तन करणारा, निर्लज्जपणे बेलगाम वागणारा, रोग असून औषध न घेणारा, पथ्य न पाळणारा, प्राप्त परिस्थितीत आनंद न मानणारा, स्वभाव न समजून घेताच संगत किंवा मैत्री करणारा, सर्वकाळ दुश्चित्त किंवा कुढ्या मनाचा असणारा, कारणांचा विचार न करता किंवा अपराधावाचून दंड करणारा, शक्ती नसताना मध्येच तोंड घालून बोलणारा, घरच्या माणसांवर तोंडसुख घेणारा व बाहेर गोगलगायी सारखा वागणारा, स्वतः कुणावरही उपकार न करणारा, आणि दुसऱ्याने जरी याच्यावर उपकार केले तरी त्याची फेड अपकाराने करणारा, कृतीशून्य पण वाचाळ असणारा, तापट, खादाड, आळशी, घाणेरडा, दुष्ट, भित्रट, निलाजरा, लबाड, झोपाळू ही सर्व मुर्खलक्षणे होत; असे श्रीसमर्थांचे सांगणे आहे. पुढे ते सांगतात, विद्या, वैभव, संपत्ती, पराक्रम, सामर्थ्य यापैकी काहीच नसताना कोरडा अभिमान वहाणारा, चव्हाट्यावर शौचविधी किंवा लघुशंका करणारा, सदा नग्नप्राय दिसणारा, तो मूर्ख होय. अपशकुन झाले तरी ते न मानता आपलेच नुकसान करून घेणारा, मायेच्या माणसांना सुखाचा शब्दही न देता छळणारा, नीच लोकांशी नमून असणारा, शरण आलेल्यांस झिडकारणारा, स्त्री, पुत्र, कुटुंब हेच खरे मानून परमेश्वराला विसरणारा, जसे करावे तसे भरावे म्हणजेच, पाप अथवा पुण्य याचे फळ भोगावे लागते हेच ज्याला कळत नाही तोही मूर्खच होय. दुर्जनांच्या सल्ल्याने वागून अमर्यादपणा करणारा, विचार न करता वाटेल ती पापकर्मे दिवसाढवळ्या करणारा, देव, गुरू, माता-पिता, ब्राह्मण व स्वामी यांच्याशी द्रोह किंवा कपट करणारा, दुसऱ्याच्या दुःखात सुख व सुखामध्ये दुःख मानणारा, हरवलेल्या वस्तूचा शोक करणारा, ऐकणाऱ्याचा आदर नसला तरी बोलणारा, न विचारता साक्ष देणारा, ज्याला स्वतःची पत सांभाळता येत नाही, स्वतः नेहमी दुसऱ्यांची थट्टा मस्करी करतो; पण दुसऱ्यांनी केली असता लगेच चिडतो व वर्दळीस येतो तो मूर्ख. कारणाशिवाय बडबड करतो व जरूर तिथे तोंडात मिठाची गुळणी धरतो, भाऊबंदांवर विश्वास ठेवतो तो मूर्ख !  दृष्टीस पडलेली प्रत्येक गोष्ट मागणारा, रागाच्या भरात आपलेच नुकसान करून घेणारा, हलक्या लोकांशी बरोबरी करणारा, चढेल पणाने बोलणारा, आपल्या योग्यतेस न झेपणाऱ्या दुष्प्राप्य वस्तूंचा हेवा करणारा, स्वतःच्याच घरात चोरी करणारा, सदैव तलवारीच्या धारेवर धरल्याप्रमाणे दुसऱ्याचा छळ करणारा, विश्वासघातकी तसेच थोरांच्या मर्जीतून उतरलेला, उलटसुलट वागून सभेचा रसभंग करणारा, मुक्या प्राण्यांस क्रूरपणे मारणारा, खरे माहीत असतानाही खोटे सहन करणारा, संपत्ती प्राप्त झाली असता मागील ओळख विसरणारा, आपले काम होईपर्यंत नम्रपणे वागणारा, पण नंतर दुसऱ्यांचे काम न करणारा, स्वतः पुस्तके न वाचणारा, पण दुसऱ्यालाही वाचायला न देणारा, तो मूर्खच होय; असे श्रीसमर्थ म्हणतात.

तर अशी ही श्रीसमर्थांनी सांगितलेली नुसती मूर्खांची लक्षणे वाचूनच दमायला झाले; नाही का ? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, संपर्कात अशी मूर्खांची लक्षणे असलेली व्यक्ती कधी ना कधी आलेली असतेच.. होय ना ? यातील कितीतरी लक्षणे आपल्यातही असूच शकतात. ती जाणून घेऊन, ते दोष दूर करणे महत्त्वाचे, किंबहुना हेच श्रीसमर्थांना अभिप्रेत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

जालें साधनाचें फळ

श्रीसमर्थांचे वाङ्मय अफाट आहे. एका जन्मात त्याचा अभ्यास होणे तर केवळ अशक्य आहे. दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ श्रीसमर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहेत. वीस दशक आणि दोनशे समासाचा श्रीमत् दासबोध तर अप्रतिम ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या अखेरच्या ओव्यांमध्ये एक महत्त्वाची ओवी येते. ग्रंथ किंवा समास वाचन झाल्यावर ज्या बारा ओव्या अखेरीस म्हणण्याची प्रथा आहे, त्यातील ही पहिलीच ओवी आहे.

“जालें साधनाचें फळ | संसार जाला सफळ |

निर्गुणब्रह्म तें निश्चळ  | अंतरीं बिंबलें ||२०–१०–२६||”

श्रीसमर्थांनी दासबोध ग्रंथाची फलश्रुती पहिल्याच दशकाच्या पहिल्या समासात सांगितली आहे. आणि या ओवीपासून श्रीसमर्थ आपल्याला काय काय मिळाले याची यादी या ठिकाणी देत आहेत. साधनेचे पूर्णत्व इथे सांगितले गेले आहे. ज्या कोणी श्रद्धेने आणि मनापासून हा ग्रंथ वाचला असेल त्याला याचा अनुभव निश्चित मिळेल. या आधीच्या २५ व्या ओवीमध्ये श्रवण, मननाने विवेक साधतो हे सांगितले आहे. श्रवण, मनन आणि स्वानुभव याद्वारे ज्ञानाचे विज्ञान होते, उन्मनी अवस्था प्राप्त होते. ज्याला उन्मनी अवस्था साधली त्याला साधनेचे फळ मिळाले. निश्चल व निर्गुण ब्रह्म त्याच्या अंतरंगात प्रतिबिंबित झाले. अंतःकरणात ब्रह्म बिंबणे हेच आत्मज्ञान होय. आत्मज्ञान प्राप्त करणे हेच माणसाचे ध्येय आहे.

आत्मज्ञान झाले की निर्गुण ब्रह्म निश्चळ अंतरी बिंबते. या ठिकाणी ब्रह्म निश्चळ आणि निर्गुण आहे असा अर्थ घेता येईल किंवा ब्रह्म निर्गुण आहे आणि अंतःकरण निश्चळ आहे असेही म्हणता येईल. त्या निश्चळ अंतःकरणात निर्गुण ब्रह्म बिंबले असाही अर्थ घेता येईल. ब्रह्म अंतःकरणात बिंबून आत्मज्ञान होणे हेच साधनेचे फळ आहे. इथे मायेचा निरास होतो. सारी तत्त्वे अशाश्वत आहेत हे पटलेले असते. साध्य पदरात पडून सारी साधना विराम पावते. दासबोध ग्रंथ म्हणजे काय असेल ? या ग्रंथाचे कर्तेपण श्रीसमर्थ स्वतःकडे मुळीच घेत नाहीत. श्रीसमर्थ म्हणतात,

“भक्ताचेनि साभिमाने  | कृपा केली दाशरथीने  |

समर्थ कृपेची वचने | तो हा दासबोध ||२०–१०–३०||”

श्रीसमर्थांनी साधना काळात आणि त्यानंतर देखील शास्त्र ग्रंथांचा आणि उपनिषद, रामायण, महाभारत, भागवत आदि ग्रंथांचा भरपूर अभ्यास केला होता. या साऱ्या ग्रंथांचे सार दासबोध ग्रंथात असल्याचे आढळून येते. हा ग्रंथ म्हणजे वेदांत संमतीचा काव्यसिंधू आहे. श्रीसमर्थ याच समासात म्हणतात,

“वीस दशके दोनीसें समास | साधकें पाहावें सावकाश  |

विवरतां विशेषा विशेष | कळों लागें || २०–१०–३२ ||”

श्रीसमर्थांचा खरा भर “विवरतां विशेषा विशेष” वर आहे. या ग्रंथाला जितके जास्त वेळा अभ्यासाल तितका गहन अर्थ सापडत जाईल. दासबोध हा केवळ पारायणाचा ग्रंथ नसून सखोल अभ्यासाचा ग्रंथ आहे. हा बासनात बांधून ठेवायचा ग्रंथ नाही, अभ्यास आणि त्यानुसार साधना अपेक्षित आहे.

साधना सुरू करण्यापूर्वी हा संसार सत्यच वाटत असतो. मनुष्य संसाररूपी मृगजळाच्या मागे ऊर  फाटेपर्यंत धावत असतो. भ्रमाच्या भोवर्‍यात तो वारंवार अडकत रहातो आणि त्याला योग्य वाट मात्र गवसत नाही. साधना पूर्ण होताच त्याचे मृगजळ रूपी हे स्वप्न संपुष्टात येते.

“स्वप्नी जें जें देखिलें | तें तें जागृतीस उडालें  |

सहजचि अनुर्वाच्य जालें | बोलता न यें ||२०–१०–२८||”

मनुष्याला सुरूवातीला मूळमायेपासून चार खाणीपर्यंत साऱ्या गोष्टी सत्य वाटतात, माणूस पूर्णपणे ऐहिक सुख-दुःखामध्ये अडकलेला असतो. साधना करता करता हे सारे विश्व भ्रामक आहे हे लक्षात येते आणि हा साधक मग साध्य गाठायच्या प्रयत्नाला लागतो. स्वप्नात बघितलेले सारे जाग येताच नाहीसे होते, तद्वतच मायेचा निरास झाला की या जगताचे मिथ्यत्व लक्षात येऊ लागते. हे स्वप्न बघणारा जीव, स्वप्न विसरतो आणि अनिर्वचनीय परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतो.

साधकाने मी देह आहे या भूमिकेतून साधना सुरू केली होती. श्रीसमर्थांचा हात धरून ग्रंथ वाचता वाचता एकोणीसावा दशक देखील संपला. अशाश्वत आणि अपूर्ण असे दृश्य बाजूला सारून आता वाटचाल पूर्ण झाली आहे. आणि मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाल्यामुळेच जीव समाधान पावला आहे. या विसाव्या दशकात शाश्वत आणि पूर्ण ब्रह्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन या जीवाला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. मला देव हवा ही इच्छा मनाशी धरून साधनेत एक एक पाऊल टाकत हा जीव पुढे गेला. मी कर्ता आहे, मी ते प्राप्त करून घेईन अशी आशा आणि जिद्द मनात होती. पण विसावा दशक येण्यापूर्वीच मी कर्ता नाही, तोच कर्ता आहे ही खात्री पटली. अंतरात्मा किंवा जगदीश्वर कर्ता आहे हे प्रस्तुत दशकात कळायला लागले. अज्ञान अवस्थेत दासबोध हाती घेतला आणि पहाता पहाता ज्ञान दशा प्राप्त झाली. अज्ञानाचे निरसन झाले. ज्ञानक्रिया पूर्ण होत ज्ञानाचे विज्ञान देखील झाले.

या विश्वात वस्तूचे दोन प्रकार आहेत. एक चंचळ आणि दुसरे निश्चळ. चंचळ अंतःकरण प्रथम स्थिर, निश्चळ होते आणि त्यात निश्चळ परब्रह्म बिंबल्यावर पूर्ण विश्रांती लाभते. परब्रह्म अपरंपारपणाने सर्वत्र भरलेले आहे. चंचळ दृश्य त्यावर झाकण घालते. खोल आणि सूक्ष्म विचाराने दृश्य बाजूस सारावे आणि निश्चळ परब्रह्माची भेट घ्यावी. ज्याप्रमाणे रिकामे आकाश चोहीकडे असते त्याचप्रमाणे चंचळ मूळमाया उत्पन्न होण्यापूर्वीच निर्गुण ब्रह्म निश्चळपणे असत असते. दृश्य विश्व आले आणि गेले तरी निश्चळ ब्रह्म जसेच्या तसेच साचलेले रहाते. ज्याप्रमाणे अवकाशमय आकाश सर्वत्र कोंदाटलेले असते, त्याच प्रमाणे परब्रह्म सर्वत्र साठलेले असते. परब्रह्माला ज्या बाजूने पहावे त्या बाजूने ते अपार असते. त्याचा अंत कोणत्याही बाजूला लागत नाही. परब्रह्म अगदी एकजिनसी आहे, स्वतंत्र आहे. त्याच्यावाचून दुसरे काहीही नाही. साधकाने विवेकाने ब्रह्मांडाच्या पलिकडे जावून तेथून ब्रह्मांड झालेच नाही अशी कल्पना करावी. केवळ अवकाशमय रिकामे आकाश पहावे. विश्वाला व्यापून असणारा चंचलपणा तेथे नाहीसा होईल, शून्यवत होईल. नित्यानित्याचा विवेक करून दृश्य नाहीसे करावे. मग सर्वत्र परब्रह्म भरून असल्याचा अनुभव येईल. पण या ब्रह्माची संपूर्ण कल्पना कोणालाही कधीच करता येणार नाही.

ग्रंथराज दासबोधाचा पहिला समास हा प्रस्तावनेचा आहे. याच समासात श्रीसमर्थांनी ग्रंथाची फलश्रुती दिलेली आहे. ग्रंथाच्या सुरूवातीलाच श्रीसमर्थ म्हणतात,

“ग्रंथानाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद  |

येथे बोलिला विशद | भक्तिमार्ग ||१–१–२||

नवविधा भक्ति आणी ज्ञान  | बोलिलें वैराग्याचे लक्षण |

बहुधा अध्यात्मनिरोपण | निरोपिले ||१–१–३||

भक्तिचेनि योगे देव | निश्चये पावती मानव |

ऐसा आहे अभिप्राव  | इये ग्रंथी ||१–१–४||”

ही फलश्रुतीच सांगते की दासबोध अभ्यास आणि त्या अनुषंगाने साधना केल्यास आत्मज्ञान नक्की प्राप्त होईल. श्रीसमर्थ आयुष्याच्या अखेरीस म्हणतात की,

“नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |

तेणे सायुज्यतेची वाट | गवसेल की ||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

मरणाचे स्मरण असावे

अनादि कालापासून भारतीय तत्त्ववेत्त्यांनी व साधूसंतांनी मृत्यूचे रहस्य उकलण्याचा प्रयत्न केला. पण मृत्युनंतर काय ? याचे कोडे अद्याप कुणाला स्पष्ट उलगडले नाही. भारतीय तत्त्वज्ञान पुनर्जन्म मानते. जीवाला त्याच्या वासनेनुसार व बऱ्यावाईट कर्मानुसार जगात पुनःपुन्हा जन्म घ्यावा लागतो. माणूस या जगात प्रवेश करतो तेच मुळात परतीचे तिकीट सोबत घेऊन ! मृत्यू हा अटळ असला तरी मरणाचे स्मरणही नकोसे वाटते हे आश्चर्यच नव्हे काय?… श्रीसमर्थ म्हणतात,

मरणाचें स्मरण असावें | हरिभक्तीस सादर व्हावें |

मरोन कीर्तीस उरवावें | येणें प्रकारें ||१२१०१३ ||“

शेवटचा दिस गोड व्हावा” किंवा सहजसुलभ उत्तम मरण येण्यास जन्मभर हरिभक्तीची, भगवंताच्या अनु‌संधानात रहाण्याची साधना करावी लागते. मृत्यूला निर्भय चित्ताने, शांतपणे सामोरे जाण्यातच खरा पुरुषार्थ आहे. ज्ञानी महात्म्यांना तो साधतो.

सरतां संचिताचें शेष | नाहीं क्षणाचा अवकाश |

भरतां न भरतां निमिष्य | जाणें लागे ||३-९-३||”

पूर्वसंचित संपले की यमदूत क्षणभरही थांबत नाहीत. येथे उधारी नाही. तेव्हा अंतर्यामी ही तयारी ठाम हवी. मरणाचे स्मरण ठेवायचे म्हणजे मन उदास, नीरस, रुग्ण ठेवणे असे नसून, या जीवनाची क्षणभंगूरता पटून आसक्ती कमी करणे, अंगी वैराग्य बाणवणे हे होय. मनुष्य किती वर्षे जगला यापेक्षा तो कसा जगला यातच खरे मर्म आहे. म्हणून श्रीसमर्थ सांगतात मरोन कीर्तीस उरवावे”. संसारातच गुंतून अमूल्य आयुष्य व्यर्थ जावयास नको. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे” यानुसार मानवी जीवन म्हणजे बंदिशाळा असून मरण म्हणजे त्यातून मुक्ती ! वास्तवात देहेबुद्धी ते आत्मबुद्धीकरून माणसाने या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करावा ! त्यासाठी जन्मभर फार मोठी साधना हवी.

मरणाचं स्मरण का करायचं तर तारुण्यात माणूस आपल्याच मस्तीत, गुर्मीत वागतो. मीपणा, माझे-माझे, मलाच सर्व ऐहिक सुखे हवीत म्हणून त्याच्या हातून पापकर्मे, अनाचार घडतो. तो स्वार्थ, मोह, लोभ आदि षड्रिपूत गुंतत जातो, अहंकारी व दुराचारी बनतो. माणसाच्या या घमेंडीला मृत्यू हा जबरदस्त उतारा आहे.

मना पाहतां सत्य हे मृत्यभूमी |

जिता बोलती सर्वही जीव मी मी |

चिरंजीव हे सर्वही मानिताती |

अकस्मात सांडूनिया सर्व जाती ||१५||

अहंकार, गर्व, काम हे सर्वनाशाला कसे कारणीभूत ठरते हे रावणाच्या उदाहरणावरून सिद्ध होते. श्रीसमर्थ “मृत्यूनिरुपण” या समासात आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालीत आहेत.

मृत्य न म्हणे थोर थोर | मृत्य न म्हणे हरिहर |

मृत्य न म्हणे अवतार | भगवंताचे || ३-९-४० ||

गेले विद्येचे सागर | गेले बळाचे डोंगर |

गेले धनाचे कुबेर | मृत्यूपंथें ||३-९-५०||”

असे सगळे गेले तरी शेवटी एकच अमर झाले आहेत ते म्हणजे थोर असे आत्मज्ञानी‘. आत्मसाक्षात्कारी असे संतमहात्मे अजरामर झाले आहेत.

असो ऐसे सकळहि गेले | परंतु येकचि राहिले |

जे स्वरूपाकार जाले | आत्मज्ञानी ||३-१०-५९||”

संत ज्ञानेश्वर, शांतीब्रह्म एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदासस्वामी इ. अव्यक्तरूपाने ते आजही साधकांना मार्गदर्शन करीत आहेत.

मरोन किर्तीस उरवावे”  हे साधायचे असेल तर चंदनासारखे झिजले पाहिजे. सेवावृत्ती, परोपकार, मधूर व नम्र वाणी यांच्या सहाय्याने लोकांना आपलसं केलं तरच किर्ती मिळते. “केवळ स्वतःसाठी जगलात तर मेलात आणि दुसऱ्यासाठी, देशासाठी मेलात तर जगलात” असे सुभाषितकार म्हणतात. यातच साऱ्या जीवनाचं सार आहे. वासनाक्षय झालेले महात्मे मृत्यूला जिंकतात व अमर होतात. आयुष्याची अनिश्चितता पटली की साधक अंर्तमुख होऊन भक्तीमार्गाला लागतो. महाभारतात यक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना धर्मराज युधिष्ठिर जगातील आश्चर्य सांगताना म्हणतात की “आसपास नित्य मरणारी माणसे पहात असूनही, मानव; अमरपट्टा घेऊन आल्यासारखा वागतो हे एक कटू सत्य व आश्चर्यच आहे.” सात दिवसांनी मृत्यू येणार हे कळल्यावर परिक्षित राजाने शुकमुनींकडून भागवत श्रवण करून जीवनाचे कल्याण करून घेत मुक्ती मिळविली. आत्मज्ञान न होता मृत्यू आला तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून साधकाने तातडी करावी आणि सत्समागमाने या जन्ममृत्यूच्या रहाटगाडग्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी हा अमूल्य संदेश श्रीसमर्थ आपणाला “मरणाचे स्मरण असावे” या ओवीतून देत आहेत. मरणाचे नित्य स्मरण असल्यास हातून गैरवर्तन, पाप न घडता माणूस त्यागाने; प्रेमाने; सेवेने वागेल. त्याच्यात प्रथम आत्मपरिक्षण घडून पुढे आत्मपरिवर्तन घडेल.

संत एकनाथांच्या चरित्रातील एक गोष्ट सर्वांनाच ज्ञात आहे. पैठण गावातील एका दुष्ट, उर्मट सावकाराला त्याचा आठ दिवसांनी मृत्यू होईल असे सांगून त्याचा संपूर्ण कायापालट घडविला व तो अखेर वाल्याचा वाल्मिकी झाला. म्हणून “मरणाचे स्मरण” असावे. जीवनाची सार्थकता यातच आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||

पंचमहाभूतांची पंचोपासना उत्तरार्ध

पृथ्वी, आप, तेज या तत्त्वांचा विचार आपण पूर्वार्धात केला, आता उर्वरित तत्त्वांचा विचार करूया.

वायूतत्त्व – ‘वा म्हणजे वाहणे. या धातुपासून ‘वात’ शब्द तयार होतो. वैदिक ऋषींनी वायूदेवतेची स्तुती केली. आध्यात्मिक दृष्टीने ‘वायू’ म्हणजे ‘शरीर संचारी प्राण होय’. शब्दाच्या उच्चारात वायू हवा. बोलण्याची इच्छा, मज्जातंतूची चालना, प्राणाची शक्ति, सूक्ष्म नाद व वैखरीतील शब्द असा शब्दाचा प्रवास आहे. वायू किंवा हवेत धुळीचे कण, कोळशाचे कण, बाष्प असते. हवेला वास किंवा चव नसते. ती सुगंध, दुर्गंध पसरवते. परमार्थ दृष्ट्या वायू, शरीर; प्राण व मन या त्रयीत जिवंत ठेवणारी चित्कला आहे. श्रीसमर्थांची मारुती उपासना ही वायू शक्तीची उपासना आहे. वायू मोठा व्यापक कारभारी आहे. वायूच्या योगानेच पंचभूते एकमेकात मिसळतात. वायू प्रथम ब्रह्मांडात प्रगट होतो. नंतर देवदेवतांमध्ये व पिंडात उतरतो. शेष, वायूमुळे पृथ्वी डोक्यावर तोलतो. हनुमान हा वायूचा मुलगा.  दशक ९ समास ८ मध्ये समर्थ ‘वायू’ शब्द शक्ति या अर्थाने वापरतात. विश्वात वायू शक्तीचा खेळ दिसतो. तिच्या स्थिर रूपाने विश्व अनंत काळ टिकते व गतिमान रूपाने विश्वात घडामोडी होतात. शक्ति जाणीव संपन्न आहे. मूळमाया, स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव रूप आहे. वायू मंत्राना सामर्थ्य देतो. ज्ञानेश्वरांनी अचेतन भिंत वायू शक्तीवर चालवली. सच्चिदानंद बाबांच्या कानात वायू फुंकून त्यांना जिवंत केले. आद्य शंकराचार्य व श्रीसमर्थ रामदास वायू वेगाने संचार करत. 

आकाशतत्त्व – आकाशाचे वर्णन करतांना श्रीसमर्थ त्याला ‘महत् भूत’ म्हणतात. ‘महत्’ म्हणजे ‘सर्वांहून मोठे’ आणि ‘भूत’ म्हणजे अनादि, नित्य, सिद्ध वस्तू होय. ब्रह्म ही वस्तू आत्मारूपाने आपल्यात असते व ती स्वत: सिद्ध म्हणून ती सिद्ध करायला कोणत्या प्रमाणाची गरज भासत नाही. सर्व भूतांमध्ये ‘आकाश’ अतिशय सूक्ष्म, विशाल, निराकार व अमर्याद आहे. म्हणून आत्म्याला आकाशाची उपमा देतात व त्याचा अनुभव यायला आपले मन देखील सूक्ष्म, विशाल निराकार व रिकामे बनले पाहिजे. मनाला आत्म्याच्या निकट स्थिर व्हायला मदत करणे, हीच खरी परमार्थ साधना आहे. आकाश, पिंड व ब्रह्मांडात व्यापून आहे. इंद्रियांचे व्यापार त्याच्यामुळे होतात. शरीररूपी आकाशात काम, क्रोध, शोक, मोह व भय ही तत्त्वे असतात. मानवी शरीरातील आकाशाला जीवात्मा म्हणतात. घटाकाश, मठाकाश व महदाकाश या तीन शब्दांनी आकाशाचे वर्णन करतात. 

सूर्य – ‘सूर्य’ शब्दात ‘सृ’ हा मूळ धातू आहे. त्याचा अर्थ ‘गती’. ‘गती’ म्हणजे चालणे, गमन, ज्ञान, मोक्ष, स्थिति अथवा प्राप्ती होय. जो आकाशात गतिशील आहे. बुद्धीला प्रेरणा देणारा अंधार नष्ट करणारा स्थावर जंगमाला जीवन देणारा, सत्याचे व नियमांचे पालन करणारा, तो ‘सूर्य’. भव्यपणा, प्रचंडपणा, चिरंतन प्रकाश, निष्काम कर्म, निस्वार्थी त्याग, समत्व याची साकार प्रतिमा म्हणजे ‘सूर्य’. वैदिक ऋषी सूर्योपासना करत व त्याला जगाचा आत्मा म्हणत. सूर्यापासून ऊर्जा लहरी पृथ्वी पर्यन्त पोहचतात. रोज सूर्य दर्शनाने निरंतर स्फूर्ति वाढते. माणसाच्या शरीरात हृदय, नाडीचक्र व डोळा यावर सूर्याची सत्ता चालते. कौसल्या सूर्याची उपासना करत असे. सूर्यवंशातील सर्व राजे पराक्रमी व सत्वशील होते. श्रीसमर्थ म्हणतात, 

“ऐसा हा सविता सकळांचा । पूर्वज होय रघुनाथाचा ।

अगाध महिमा मानवी वाचा । काय म्हणोनि वर्णावी ।।१६-२-१९ ।।”

पंचिकरण – विश्वाची रचना व रहस्य याचा विचार पंचिकरणात आहे. पंचमहाभूतांपैकी एक महाभूत एक जिनसीपणाने सांभाळून त्यात बाकीच्या चार भूतांचा समावेश बरोबरीने सांभाळण्याची कला ईश्वर करतो. जगा व जगू द्या हे तत्व त्यामागे आहे. पिंड व ब्रह्मांडात सर्वत्र व्यपून असलेला स्वयंप्रकाश आत्मा पूर्णतत्व म्हणून ओळखला जातो. दशक १७ स. ८ व ९ मध्ये ८२ तत्त्वांचा विचार आहे. मुळात ही पंचमहाभूते अत्यंत सूक्ष्म, अव्यक्त होती, ती परस्परात मिसळली गेली व व्यक्त झाली. या पाच तत्त्वांचा विकास हाच मायेचा विकास ईश्वरी इच्छेनुसार घडून आला. विवेकसिंधू (डॉ. हरिश्चंद्र बोरकर पृष्ठ ५६) 

तत्त्वझाडा – ‘तत्त्व’ म्हणजे पिंड-ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे कारण होय. ‘तत्त्वनिरास’ म्हणजे माया व अज्ञानाचा अंत व सत्याचा स्वीकार व तत्त्वझाडा स्वरुपाच्या शोधासाठी करतात. शरीर हे तत्त्वांचे गाठोडे आहे, पंचमहाभूतांचे आहे. त्यांना नाश आहे व एक आत्माच अविनाशी आहे. या ज्ञानाने व साधनेच्या अनुभवाने “निर्गुण आत्मा तोचि आपण ।। ६-३-३० ।।” हे सत्य कळते. हे कळल्यावर “तेथें निमाली देहअहंता ।। ६-३-२१ ।।” हा अनुभव येतो व मी म्हणजे देह, श्रीसमर्थ म्हणतात,

“सकळ देहाचा झाडा केला । तत्वसमुदाव उडाला ।

तेथें कोण्या पदार्थाला । आपुलें म्हणावें ।। २०-१०-३६ ।।”

व्यापक विचाराने, नारायण असे विश्वी हा विचार पक्का होतो. आनंदाची देवाण घेवाण होते श्रीसमर्थांची रामोपासना व पंचभौतिक उपासना ‘व्यापक व विश्वपाळीती’ होती. श्रीसमर्थ म्हणतात,

“ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना ।

नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ।। १५-९-२९ ।।”

विकल्पाचिया मंदिरी दीप नाही । सदा शुद्ध संकल्प दे आत्मदेही ।

यशस्वी दयानंद कल्याणमस्तु । तथास्तु तथास्तु तथास्तु ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

भीमरूपी स्तोत्र चौथे

चाफळ पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले उंब्रज हे गाव. त्या गावातील हनुमंताचे वर्णन समर्थांनी अकरा कडव्यांच्या स्तोत्रात केले आहे. या स्तोत्रात मारुतीच्या सामर्थ्याचे वर्णन केले आहे. हा मारुती जवळपास सहा फूट उंचीचा आहे, आणि वीर; पराक्रमी; चपळ स्वरूपातील आहे. त्याचे डोळे थोडे लहान आहेत. सभोवतालच्या परिस्थितीचा विचारपूर्वक अभ्यास करून सुजाण नागरिक व्हावे हेच समर्थांना यातून सुचवायचे आहे.

हनुमंताचे वैशिष्ट्य हे आहे की, हनुमंत दास्यभक्तीचे जसे योग्य आणि चपखल उदाहरण आहे तसेच उत्तम मैत्रीचे सुद्धा उदाहरण आहे. सुग्रीवाचे भाग्य एवढ्यासाठीच थोर आहे की, त्याच्याकडे हनुमंतासारखा मित्र आहे. म्हणूनच त्याला सहजपणे विजय प्राप्त झाला. महाभारतात सुद्धा भगवंतांनी हनुमंताला अर्जुनाच्या रथावर बसवले ते एवढ्यासाठीच. हनुमंताची कृपा असल्यावर विजय प्राप्त होणार हे निश्चित आहे. समर्थांनी ही मूर्ती चुना, वाळू आणि ताग यांपासून तयार केली आहे. मठामध्येच मारुतीची स्थापना केल्यामुळे मंदिराला वेगळा कळस नाही. हा मारुती जागृत असून प्रभूरामचंद्रांनी समर्थांच्या रक्षणासाठी पाठवला होता.

यामागे एक कथा आहे. समर्थ एकदा कृष्णेच्या घाटावर स्नानाला गेले आणि बुडालो बुडालो असे ओरडू लागले. त्यांचा आवाज लोकांच्या कानापर्यंत पोहोचण्याआधी समर्थांच्या रक्षणासाठी मारुतीराय स्वतः आले आणि खडकावरून उडी मारून त्यांनी समर्थांना वाचवले. ते समर्थांना म्हणाले रामरायांनी तुझा सांभाळ करण्याची मला आज्ञा केली आहे. दोघेही रामाचे भक्त ! भगवंताची सेवा अनेक जण करतात. पण भगवंत ज्या भक्तांची सेवा करतो त्यांच्या भक्तीला साष्टांग दंडवत. प्रत्यक्ष रामाने मारुतीला आईच्या ममतेने समर्थांचा सांभाळ करायला सांगावे, यातच समर्थांच्या भक्तीचे मोठेपण आहे. भगवंत प्रेम करतो पण त्यासाठी समर्थांसारखे दास व्हावे लागते. ज्या खडकावरून उडी मारून मारुतीरायांनी समर्थांना वर काढले, तिथे हनुमंताची पाऊले उमटली आहेत असे म्हणतात. उंब्रजच्या मारुतीच्या जागृतीची प्रचिती सांगणाऱ्या अनेक कथा इथे घडल्या आहेत. सश्रद्ध मनासाठी आजही उंब्रजचा मारुती जागृत आहे.

उंब्रज हे कृष्णामाईच्या पाण्याने ओले आणि पवित्र झालेले आहे. समर्थांना उंब्रजच्या मारुती प्रमाणेच कृष्णेचे सुद्धा खूप कौतुक होते. त्रिकाल स्नानामध्ये समर्थांचे एक स्नान कृष्णेच्या कुशीत असायचे. उंब्रज हे अंतर दहा किलोमीटर, पण एवढे अंतर पार करून समर्थ स्नान उंब्रजला कृष्णेच्या पात्रात करत. स्नानाच्या निमित्ताने जनतेचे मनोगत जाणणे, गुप्त हेरांसारख्या रामदासींकडून घटनांचा आढावा घेणे, ही त्यांची कामे असत. कृष्णामाईच्या घाटावर स्नान-संध्या करून समर्थ मारुतीचे पूजन करत. एकदा समर्थांनी सतत तेरा दिवस मारुती समोर कीर्तन केले. सतत फिरणाऱ्या समर्थांना मारुतीरायाने सलग तेरा दिवस आपल्याजवळ बांधून ठेवले, हीच हनुमंताच्या जागृतीची खूण आहे. समर्थांना त्यांच्या कार्यासाठी या मारुतीच्या स्थापनेबरोबरच उंब्रज मठासाठीही काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. समर्थांनी येथे मठ स्थापन करून भक्ती आणि शक्तीचा संगम करून दिला. उंब्रजचा भाग हा आदिलशाही अधिपत्याखाली होता. यवनांचे उग्र दडपण सातत्याने शेजारी असल्याने हा मठ समर्थांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. अशा या मारुतीचे वर्णन समर्थांनी या चौथ्या स्तोत्रात केले आहे. अंजनीसुत कसा आहे हे सांगताना ते म्हणतात, 

“अंजनीसुत प्रचंड वज्रपुच्छ काळदंड ।

शक्ति पाहतां वितंड  दैत्य मारिले उदंड ।। १ ।।”

अंजनी सुत म्हणजे अंजनीचा मुलगा शक्तिमान आहे. वज्रदेही आहे आणि त्याचे पुच्छ काळदंडाप्रमाणे आहे. त्याच्या शेपटीचा एक तडाखा यम सदनाला नेतो. लंकेत राम-रावण युद्धात या शेपटीच्या तडाख्याने त्याने कित्येक दैत्यांना यम सदनाला पाठवले. त्याच्यामध्ये भयंकर मोठी ऊर्जा शक्ती आहे. पहिल्या तीन कडव्यांत समर्थांनी हनुमंताच्या शक्तीचे वर्णन केले आहे. अवकाशात झेप घेणारा त्याचा देह प्रचंड आहे. पण तो अवकाशालाही भेदून जातो. समर्थ म्हणतात की, 

“नभांत भीम आगळा ।। ३ ।।”

त्याचं वेगळेपण असणे हीच त्याची ओळख आहे. समर्थांनी चौथ्या श्लोकात हनुमंताच्या लहानपणीची गोष्ट सांगताना म्हटले आहे की,

“लुळीत बाळकी लिळा गिळोनि सूर्यमंडळा ।

बहुत पोळतां क्षणीं थुंकीलाचि तत्क्षणीं  ।। ४ ।।”

लहानपणी याचे खेळणे काय ? तर एकदा हनुमंताने सूर्य गिळला. गळ्यात खूप आग व्हायला लागली आणि त्याने तो थुंकून टाकला. सगळ्याच गोष्टी या कल्पनेच्या पलीकडच्या. शत्रूला मारताना त्याच्या डोळ्यात वीररस उतरतो. डोळे जणू काही आग ओकत असतात. उंब्रजचा हा वीर मारुती खूप रुबाबदार, देखणा आणि विरक्त वृत्तीचा आहे. समर्थांनी या स्तोत्रात त्याच्या सौंदर्याचे सुद्धा खूप छान वर्णन केले आहे. ते म्हणतात, 

“झळक झळक दामिनी वितंड काळकामिनी ।

तयापरी झळाझळी लुळीत रोमजावळी ।। ७ ।।”

हनुमंताच्या शरीरावरची लव इतकी सुंदर आणि तुकतुकीत आहे की अंधारात तळपणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती नेत्राला आनंद देते. स्वतःच्या कर्तुत्वाच्या, पराक्रमाच्या आदेशाने तो निर्भय बनवतो. जन्माने वानर असून सुद्धा कर्माने ईश्वराचे अंतरंग असणारा हा हनुमंत. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याला इच्छामरणाचे वरदान दिले, ते केवळ त्याच्या दास्यभक्तीने प्रसन्न होऊन. आपली माता अंजनी हिच्या आशीर्वादाने तो चिरंजीव आहे. ज्यांना आईचे आशीर्वाद असतात त्यांच्यावर कोणतेच संकट येत नाही आणि यश त्यांच्यासमोर हात जोडून उभे असते.

या स्तोत्रात मारुतीचा प्रताप आणि विनय हे दोन्ही गुण दिसतात. निकुंभाचल, सुवेलाचल आणि त्रिकुटाचल यांच्या पठारावर वसलेल्या लंकेला हनुमंताने आपल्या प्रतापाने गर्भगळीत केले. संपूर्ण लंका जाळली. सीतेसमोर मात्र तो रामसेवक म्हणून प्रकट झाला. अन्यायाच्या विरोधात रुद्रावतार धारण करणारा हा हनुमंत भक्तासाठी मात्र स्नेहाळू, तेजाळू, कनवाळू असा आहे. त्याच्या प्रतापाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,

“समस्त प्राणनाथ रे करी जना सनाथ रे ।

अतूळ तूळणा नसे अतूळशक्ति वीलसे ।।  ८ ।।”

या स्तोत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्तोत्रात ‘ळ’ हे अक्षर ३५ वेळा आले आहे. यातून समर्थांचे शब्द आणि साहित्य यावर असणारे वर्चस्व आपल्याला दिसते. हनुमंताचे रूप सांगताना समर्थ म्हणतात, 

“रूपें रसाळ बाळकू समस्त चित्तचाळकू ।

कपी परंतु ईश्वरू विशेष लाधला वरू ।। ९ ।।”

तो रसाळ आहे, बालक आहे, मनाला प्रसन्न करणारा आहे. कपी आहे पण ईश्वर आहे. हनुमंताने रुद्रावतार धारण केला की त्याला कोणीही आवरू शकत नाही. समर्थांनी हनुमंताच्या रूपाला सतेजरूप ईश्वरी असे म्हटले आहे. समर्थांना मारुतीरायाचा खूप अभिमान आहे. हा अभिमान व्यक्त करताना ते म्हणतात, 

“समर्थदास हा भला कपी कुळांत शोभला ।

सुरारि काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला ।। ११ ।।”

या श्लोकातून समर्थांना स्वतःचे आणि मारुतीचे ऐक्य दाखवायचे आहे. दोघेही रामाचे भक्त ! यातून दासावर असलेली मारुतीची कृपा दिसते. त्यांचा कृतज्ञ भाव दिसतो. उंब्रजचा हा असा मारुती संपूर्ण जगाचा प्राणनाथ आहे. समर्थ कृपेने या स्तोत्राचे मनन चिंतन करता आले हे भाग्यच म्हणावे लागेल. हनुमंताप्रमाणे शरणागत भाव ठेवता यावा हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language