मर्यादापुरुषोत्तम श्रीराम

विष्णूचा सातवा अवतार म्हणजे इक्ष्वाकु कुलाचे वंशज तसेच अयोध्या नगरीचे महाराज दशरथ आणि महाराणी कौसल्या यांचे सुपुत्र श्रीराम. महर्षि वाल्मिकी लिखित रामायण ग्रंथाचा नायक श्रीराम असून या विशाल रचनेतून श्रीरामाची ऐतिहासिक, परिपूर्ण आणि आदर्श व्यक्तिरेखा महर्षींनी साकारलेली दिसते. त्यांनी वर्णन केलेला श्रीराम हा पूर्ण मानवी मर्यादांचे पालन करताना दिसतो. जगातील श्रेष्ठ आणि सर्वोच्च गुणांचा समुदाय म्हणजे श्रीरामांचे चरित्र. 

महर्षि वाल्मिकींनी दशरथनंदन श्रीरामाच्या चरित्रातून आपल्यातील उत्तम गुणांचा वापर करून देवत्व कसे प्राप्त करून घेता येते याचे दर्शन घडवले आहे. अनेक उत्तम गुणांची खाण असलेला कौसल्यानंदन हा उत्कृष्ट प्रजादक्ष राजा, उत्कृष्ट योद्धा, उत्तम कर्मयोगी, एक मानव म्हणून देखील श्रेष्ठ आहे. वास्तविक सर्वसामान्य माणसाप्रमाणे त्याच्या आयुष्यात संकट आली, दुःखाचे प्रसंग आले, विरहाचे दुःख पदरी पडलं, मोहाचे, लोभाचे क्षण आले आणि श्रीरामाने या सर्वांचा स्वीकार केला. या सर्वांना ते सामोरे गेले. मानवी जीवनाशी ते इतके एकरूप झाले की त्यांना आपल्या देवत्वाचादेखीलविसर पडला. उत्तम आचार, उत्तम विचार कसा असावा याचा आदर्श म्हणजे श्रीराम आहेत. श्रीरामांनी धर्मरक्षणार्थ आणि लोकहितार्थ आपलं जीवन व्यतीत केलं. 

श्रीराम अत्यंत नम्र आणि नित्य शांत असून त्याची वाणी अत्यंत मधुर आणि गोड आहे. निंदा, द्वेष, कपट करण्याची त्याची वृत्ती नाही.लोकांची मने जपणारा श्रीराम लोकांमध्ये मिसळून त्यांची दुःख जाणून,त्यांच्या समस्या सोडवून त्यांची दुःख दूर करण्यासाठी सतत तत्पर राहणारा आहे. सर्वांना आनंद देणार्‍या श्रीरामाला ‘लोकाभिराम’ हे विशेषण सार्थ आहे.

‘सत्य वचन’ हा रघुवंशाचा गुणविशेष श्रीरामांमध्ये पूर्णपणे उतरला होता. आपल्या वडिलांचे शब्द खोटे ठरू नयेत यासाठी श्रीराम प्रयत्नवादी आहेत. ज्यादिवशी राज्याभिषेक होणार होता त्याच  दिवशी श्रीरामाला १४ वर्षे वनवास स्वीकाराला लागला. पण त्यांचा विशेष हा की त्यांनी आनंद आणि दु:खाचे हे दोन्ही प्रसंग शांत मनाने सहज स्वीकारले. स्थिरबुद्धीच्या श्रीरामांची स्वतःच्या बळावर राज्य हिसकावून घेण्याची वृत्ती नाही. आधाशीपणा, वखवख या दुर्गुणांना त्यांच्या ठिकाणी थारा नाही. अत्यंत समाधानी, शांत, पूर्ण संयमी असे हे व्यक्तिमत्व सर्वांच्या मनाला आजही भुरळ घालते. 

अत्यंत दयाळू अशा श्रीरामांच्या मनात कोणाविषयी राग नाही. सर्वांना क्षमा करण्याची त्यांची वृत्ती आहे. माऊलीनी ‘अनाक्रोशे क्षमा’ अशा सुंदर शब्दात क्षमेचे वर्णन केले आहे. अनाक्रोशे क्षमा म्हणजे कोणाबद्दल कुठलाही राग नाही, चरफड नाही. सहजपणे आणि शांतपणे केलेली क्षमा. याच वृत्तीतून त्यांनी कैकयी मातेला माफ केले, तिच्या वर्तणुकीबद्दल श्रीरामांच्या मनात कुठेही कटुता नाही. रावण वधानंतरही आपल्याला त्यांच्या क्षमाशीलतेचे दर्शन घडतं. रावणाच्या मृत्यूनंतर बिभीषणाने रावणाचा अग्नी संस्कार करण्यास नकार दिला. तेव्हा ‘मरणाबरोबर माणसाचं वैर संपतं’ ही विचारधारा असणार्‍या प्रभूनी बिभीषणाची समजूत घालून रावणाचा सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केला. शत्रूविषयी देखील उदात्त भाव ठेवणारे असे हे श्रीराम.

श्रीराम हे आदर्श शत्रू आहेत. रावणवधानंतर त्यांनी बिभीषणाला लंकेचे राज्य दिले. वालीवधानंतर सुग्रीवाला राज्य दिले आणि वालीपुत्र अंगद याचा युवराज पदावर राज्याभिषेक केला. ‘तोडणे’ यापेक्षा ‘जोडणे’ यावर श्रीरामांचा अधिक भर होता. 

दशरथनंदन श्रीराम यांच्यामधील महत्वाचे रूप म्हणजे कोदंडधारी राम. श्रीराम अत्यंत नम्र, सदाचारी, नीतीने वागणारा आहे पण त्याचबरोबर धर्मरक्षक देखील आहे. अन्यायविरोधात उभा ठाकणारा पराक्रमी, बलसंपन्न असा श्रीराम अत्यंत बलवान असून त्याचा त्याला अहंकार नाही, तो शत्रूला कधीच क्षुद्र लेखत नाही. धर्मरक्षणासाठी, प्रजेवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात, साधू संतांच्या रक्षणासाठी,त्यांनी कोदंड हाती धरलं आहे. विशेष म्हणजे आपल्या सामर्थ्याचा उपयोग त्यांने दुर्बलांवर कधीच केला नाही. त्याने पराक्रम गाजवला तरी तो शत्रूवर अन्याय करत नाही . लुटालुट, जाळपोळ असे विध्वंसक प्रकार श्रीरामाकडून कधीच घडले नाहीत. क्रूरता हा दुर्गुण श्रीरामांमध्ये नाही. 

स्वामी गोविंददेवगिरी म्हणतात त्याप्रमाणे, कोदंड हे श्रीरामांच्या जीवनातील महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. श्रीराम हे सज्जन आहेत आणि शक्तीचे  उपासकही आहेत.शक्तीची साधना म्हणजे गुंडगिरी नसून अन्यायाला प्रतिकार करण्याची ताकद निर्माण करणारी सकारात्मक ऊर्जा आहे. रामायणाचा आढावा घेतला तर श्रीरामाने अनेक गोष्टींचा त्याग केलेला दिसतो. अयोध्येचा, मातापित्याचा इतकेच  नाही तर भगवती सीतेचा,परम प्रिय लक्ष्मणाचा देखील त्यांना त्याग करावा लागला.पण त्यांनी आपल्या कोदंडाचा कधीच त्याग केला नाही. म्हणून भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे, ‘शस्त्र धारण करणाऱ्या लोकांमध्ये मी कोदंडधारी राम आहे’.

श्रीराम हे पतितपावन आहेत पश्चाताप झालेल्या भक्तांना ते अभय देतात . महर्षी वाल्मिकी, आहिल्या हे रामायणातील पश्चातापदग्ध व्यक्तीमत्व आहेत. ज्यांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे. असं पाप पुन्हा घडणार नाही हे वचन त्यांनी श्रीरामांना दिलं आहे. या शरणांगताना प्रभुंनी मनापासून स्वीकारलं आहे. श्रीरामांचा अजून एक विशेष म्हणजे त्यांच्यामधील उत्तम नेतृत्व गुण. पुढच्या माणसांच्या गुणांचा ते विकास करतात, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवतात. सुग्रीव अत्यंत भयभीत झाल्याने त्याला आपल्या सामर्थ्याचा विसर पडला तेव्हा त्याला त्याच्या गुणांची जाणीव करून देऊन त्याचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला.

श्रीरामचंद्र हे उत्तम संघटक होते. रावणावर चाल करून जाताना खूप मोठे सैन्य त्यांच्याबरोबर होतं पण त्यांचं वैशिष्ट्य हे की यामध्ये १४ वर्षात जे आदिवासी, वंचित समाजातील तरुण, वानरगण या सर्वांचे त्यांनी संघटन केले होते त्यांचा समावेश होता. गुह, सुग्रीव, हनुमान या सर्वांना घेऊन त्यांनी आपली सेना बनवली होती. एक तप म्हणून स्वीकारलेल्या भगवंताचा वनवास हा धर्म रक्षणार्थ, कर्तव्य पालनासाठी, वडिलांना दिलेल्या वचन पूर्ण करण्यासाठी आहे. 

विशेष म्हणजे रामराज्यामध्ये जनहितार्थ, जनता जनार्दन या शब्दाला तेव्हाचे राजे प्रामाणिक होते.कुटुंबापेक्षा, स्वहितापेक्षा जनतेचे कल्याण याला त्याकाळात अधिक प्राधान्य होते. किंबहुना प्रजेचे हित हे राजाचे प्रथम कर्तव्य होते. त्यामुळे प्रजेमध्ये भगवतीबद्दल शंका आहे लक्षात आल्यानंतर प्रजेच्या कल्याणासाठी वैयक्तिक सुखाचा विचार न करता त्यांनी आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. 

धर्माच्या सर्व मर्यादा पाळणार्‍या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे नावच मनाला शांति देणारे आहे. साधकांसाठी, भक्तांसाठी तो दशरथनंदन न राहता सर्वत्र व्यापून असणारा असा आत्माराम होतो. अणुरेणूमध्ये तो वसला आहे हीच त्यांची धारणा होते. इतकं राममय जीवन होऊन जाते.“ राम विश्राम देवांचा ” अनेक श्रेष्ठ देवांना देखील  श्रीराम आश्रय स्थान वाटतो. ज्याच्या ठिकाणी मन स्थिर झाले असता शांतता प्राप्त होते असा हा श्रीराम सर्वांचे विश्रांतीचे स्थान आहे. 

समर्थ म्हणतात,

ऐसा पुरुष धारणेचा | तोची आधार बहुतांचा ||

दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा ||

आजच्या काळात आत्मारामाबरोबर अन्यायाला विरोध करणाऱ्या रणकर्कश्य आवेशाची गरज आहे. केवळ आयोध्येला जाऊन त्यांचे दर्शन घेणे इतकाच भाव न ठेवता त्यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या आचरणातून तसे व्यक्त होणे हीच खरं त्या प्रभू रामचंद्रांची उपासना होय.

रामनवमी

आज रामनवमी. प्रभू रामचंद्र यांचा प्रकटदिन. त्या सर्वगुणसंपन्न अशा रामाचे गुणगान करण्याचा आजचा दिवस. आज श्री समर्थांचा देखील जन्मदिनआजच्या शुभदिनी   श्रीसमर्थ आपल्या आराध्य देवतेचे गुणगान करत आहेत.  

प्रभु श्रीराम हे सत्चिदानंद परिपूर्णब्रह्म आहेत. सत्चिदानंद म्हणजे सत्+ चिद+ आनंदसत् म्हणजे सत्य, शाश्वत, कायमस्वरूपी, परिवर्तन होणारासमाप्त होणारा म्हणजेच परब्रह्मचित् म्हणजे चेतना,  शुद्ध जाणीवशुद्ध संकल्पनाशुद्ध ज्ञान, आणि आनंद म्हणजे समाधान, शांती. आनंद हेच जीवाचे मूळ स्वरूप आहे कारण परमात्मा परब्रह्म हे आनंद स्वरूप आहे.

श्री समर्थ म्हणतात..

ऐसा सर्वात्मा राजाधीश सकळ पाहाती सावकाश।
तेथे पिसाट रामदास। उभा असे दीनरुप ।।१।।
रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग
तुजकारणें सर्व संग त्यक्त केला ।। ।।
रामा तुझिया स्वामीपणें मी हे ब्रह्मान्ड मानी ठेंगणे।
स्वामी तुजविण कोण जाणे अंतर आमुचे।।३।।
तुजविण मज माया। काही नाही रे रामराया।
आम्हां अनाथा कासया। उपेक्षिसी ।।४।।
तुज समुदाव दासांचा परी आम्हांसी स्वामी आणिक कैचा।
तुजकारणें जिवलगांचा।संग सोडिला ।।५।।
सगुण रघुनाथ मुदल। माझें इतुके चि भांडवल।
कास धरुनी टाकीन पैल पार या भवाचा ।।६।।

समर्थ अत्यंत करुणामय शब्दांत आपल्या अंतरीची तळमळ, व्यथा वरील ओव्यांतून मांडत  आहेत.  सर्व ओव्या करुणाष्टकांचीच आठवण करून देतात, करुणाष्टकातील विचार, भाव, तळमळ या ठिकाणी आपल्याला दिसून येतेसमर्थांना अक्षरशः रामाचं वेड लागले आहे हे पिसाट या शब्दांतून व्यक्त होतेदीनरूप म्हणजे नम्रपणे,  समर्थ रामाची करुणा भाकत आहेत.  श्री रामचंद्र हे विष्णूचा सातवा अवतार आहेत हे समर्थांना ज्ञात आहे त्यामुळे त्यांचे सर्व भक्त म्हणजे नारदमुनी, ध्रुव, प्रल्हाद या थोर भक्तांशी समर्थ स्वतःची तुलना करतात त्यांच्या मानाने आपण किती हीनदीन आहोत याचा विचार करतात. समर्थांचे मन एक रामाशिवाय कोठेही लागत नाही. राम हे अनाथांचा नाथ आहेत म्हणून स्वतःला समर्थ रामाविना अनाथ म्हणवून घेतात आणि म्हणतात की तुझ्याशिवाय मायेचं माझं कोणी नाहीं, माझी उपेक्षा करू नकोसतुम्हाला अनेक भक्त आहेत, पण भक्तांना एकमेव श्रीरामच आहेत. भक्त उदंड तुम्हाला आम्हाला कोण पुसते हे समर्थांचे दुःख किंवा  तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो। ही समर्थांची खंत आपल्याला करुणाष्टकांमध्ये दिसते. जिवलगांचा संग का सोडला याचं यथार्थ कारणही करुणाष्टकांमध्ये आहे. तर देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी।सर्व अर्पावें सेवटीं प्राण तोही वेंचावा ।।४८।। असे दासबोधात समर्थ सांगतात

समर्थांनी रामाला स्वामी, धनी, मालक, राजा म्हणून मानलं आहे आणि रामाचं दास्यत्व स्वीकारले आहे आणि म्हणून आप्तस्वकीयच काय तर ब्रह्मान्ड देखील रामापुढे तुच्छ मानलें आहे. एक भगवंत साचार, तोच आधार, तोच स्वामीभगवंताचे सगुण रूप हेच माझें मुद्दल म्हणजे हीच माझी मूळ रक्कम, ठेव आहे. रामराया हेच माझे एकमेव भांडवल आहे. या भांडवलाच्या जोरावर समर्थांनी भक्तीचे मळे फुलवायचे होते, धर्मसंस्थापना, राष्ट्र उभारणीचे कार्य करायचे होते, रामकथा पल्याड न्यावयाची होती, आणि सद्गुरु म्हणून कास धरून हा भवसागर तरून जाण्यासाठी रामराया शिवाय दुसरं कोणतं मोठ्ठं भांडवल त्यांना दिसत नव्हते. सर्वसंगपरित्याग केलेल्या समर्थांची संपत्ती म्हणजे फक्त रामराया

दासाची संपत्ती राम सीतापति। जीवाचा सांगाती राम एक।। १।।

राम येक माता राम येक पिता। राम सर्व भ्राता सहोदरू।।२।।

अशाप्रकारे समर्थांची रामरायांवर अनन्य निष्ठा, भक्ती, प्रेम, होतं. रामराया हेच त्यांचे आराध्य दैवत, सद्गुरू, माता पिता, विद्या वैभव, कांचन, स्वजन होते. रामच कैवारी, ज्ञान, ध्यान आणि समाधान ही रामच होते

सूर्यकुलोत्पन्न, सुर्यवंशाचे भूषण श्रीराम सर्वात्मा म्हणजे सर्वांच्या हृदयात वास करणारा आहे. सगुणरुपी आहे. समर्थ रामाला लावण्यरूपी, लावण्यपेठी संबोधतात आणि याच सगुण रूपाच्या आधारे निर्गुणाची उपासना करायला सांगतात. श्री रामचंद्र हे समर्थांचे सगुण, साकार रूप तर राघव हे निर्गुण, निराकार रूप आहे, म्हणून मनाच्या श्लोकात समर्थ सांगतात गमू पंथ आनंत या राघवाचा. श्री रामरायाचे स्तवन म्हणजे मनाचे श्लोक. श्लोक क्र. ६७ ते १३५ या उपासना मार्गाच्या श्लोकात रामरायाचे स्तुती वर्णन दिसून येते. असा परिपूर्ण रामराया आपल्या दासांची, भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही, करणार नाही.  

समर्थ म्हणतात… 

महा संकटी सोडिले देव जेणें।
प्रतापें बळे आगळा सर्व गुणें।
जयातें स्मरे शैल्यजा शूळपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।३१।।

रावणाला ब्रह्मदेवाकडून जे विविध वरदान मिळाले त्याच्या बळावर त्याने अनन्वित अत्याचार सुरु केले. या अत्याचारांची परिसीमा म्हणजे त्याने स्वर्गावर विजय मिळवून देवांना बंदी बनविले. तुरुंगात या देवांना रावणाने हलकी सलकी कामे दिली म्हणून त्यांचे जीवन या भीषण संकटाने लाजिरवाणे आणि दुःखमय होऊन गेले होते, प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून सर्व देवांना संकटातून मुक्त केले. रामचंद्र प्रतापी आणि बलशाली तर होतेच पण त्याचबरोबर अनेक गुणांनी युक्त होते. केवळ पराक्रमी असणे, प्रतापी असणे, अत्यंत शौर्यशाली असणे एवढेच रामचंद्रांचे वैशिष्ट्य नाही, ज्या ज्या सद्गुणांच्या अस्तित्वामुळे थोरपणा येतो, श्रेष्ठत्व प्राप्त होते ते सर्व सद्गुण भगवान रामचंद्रांच्या ठिकाणी एकवटलेले आहेत

वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी रामचंद्रांच्या अनेक गुणांचं भावपूर्ण वर्णन केले आहे. रामांच्या या गुणांमुळे प्रत्यक्ष भगवान शंकर आणि भगवती पार्वती त्यांचे स्मरण करतात. भगवान शंकर ज्ञानी आणि पराक्रमी असूनही रामचंद्रांची भक्ती करतात. शौर्यसंपन्न, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवादी, दृढवत, चारित्र्यसंपन्न, सर्व भूतमात्रांचे हित साधण्यात तत्पर, विद्वान, सामर्थ्यशाली, संयमी, क्रोध जिंकलेला, निर्मत्सर, वीर, . गुणांनी रामचंद्र अलंकृत होते. 

इक्ष्वाकू कीर्तिमान वंशात जन्मलेला, अयोध्येचा राजा रामचंद्र सर्व गुणांचा मूर्तिमंत पुतळा आहे. मदनानेही लाजावे असे त्यांचे शरीर सर्व शुभलक्षणांनी युक्त आहे. रेखीव, सुडौल, दीर्घबाहू, बलवान, छाती रुंद आहे, कपाळ भव्य आहेश्रीरामचंद्र बुद्धिमान आहेत, नीतिमान आहेत, असामान्य वक्ता आहेत, सर्व शास्त्रांचे मर्म जाणणारे आहेत, चतुर आहेत, समदृष्टिने पाहणारे आहेत, साधूसंतसज्जनांनाही हवेहवेसे वाटणारे लोकप्रिय आहेत, समुद्रासारखे गंभीर आहेत, त्यांचे ध्येय हिमालया सारखे उत्तुंग आहे. महाविष्णूंचा सातवा अवतार असल्याने ते पराक्रमी आहेत, चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहेत, पृथ्वीसारखे क्षमाशील आहेत, संतापले म्हणजे प्रलय काळाचा अग्नी वाटावे असे तेजस्वी आहेत, कुबेरासारखे वैभवसंपन्न आहेत, प्रजावत्सल आहेत, आचरण अत्यंत पवित्र आहे. वेदशास्त्र निपुण आहेत रक्षणकर्ता आहेत.  

समर्थ म्हणतात, माझा प्रभू श्रीराम सर्व सद्गुणांनी युक्त आहे त्यांचे हे स्वरूप असामान्य आहे. नारदासारखे देवर्षी किंवा महर्षि वाल्मिकींसारखे प्रतिभासंपन्न कवी रामाच्या या गुणसंपदेला मोहित झाले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. देवाधिदेव भगवान शंकर आणि त्रिलोकजननी महासती पार्वतीही रामचंद्रांचे स्मरण करण्यात धन्यता मानतात. असा रामचंद्र भक्तांचा अभिमानी आहे तो भक्तांची कधीही उपेक्षा करणार नाही.   

।। जानकीजीवनस्मरण जय जय राम ।।

समर्थ रामदासांच्या करुणाष्टकांची वैशिष्ट्ये

परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी केलेला धावा म्हणजे करुणाष्टक धावा. गजेंद्राचा, द्रौपदीचा संकटमुक्त करण्यासाठी केलेला धावा आठवतो. आद्य शंकराचार्यांची अष्टके आठ श्लोकांचीच आहेत, पण समर्थांची काही अष्टके आठ श्लोकांची आहेत, तर काही नाहीत. समर्थांची करुणाष्टके म्हणजे भगवंताची करुणा भाकण्याकरिता रचलेली आर्त गीते आहेत. समर्थांच्या काही करुणाष्टकांत चौथ्या चरणाची पुनरावृत्ती आहे. ही चरणे मनावर आघात करतात व तो विचार मनावर कायमचा कोरला जातो.

“बुद्धी दे रघुनायका” हा चरण एक नाद, लय, निर्माण करतो. समर्थांच्या करुणाष्टकातील भाव, भावना, निराशा, अगतिकता व्यक्तीनिष्ठ नाही तर व्यापक समाजमनाची आहे. “प्रपंचसंगे आयुष्य गेले”, “सुदृढ झाली देहबुद्धी देही” हा समर्थांचा वैयक्तिक प्रश्न नाही, तर तो जनमानसाचा प्रश्न आहे. तो त्यावेळी होता व आजही आपण तो अनुभवतो आहे.

समर्थांच्या करुणाष्टकांची निर्मिती दु:खातून झाली. जन्म हाच दु:ख मूळ. मीपणाच्या जाणिवेचे दु:ख, त्रिविध तापाचे दु:ख, देहाच्या व्याधीचे दु:ख, साधकावस्थेतील दु:ख, अज्ञानाचे दु:ख, विरहाचे दु:ख, समर्थांनी पाहिले होते.  भिक्षेसाठी गेले असताना घराघरातले दु:ख, व्यक्ती व्यक्तींचे दु:ख, समाजातील भयग्रस्त परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. दु:खाचे मूळ कारण अज्ञान. ज्ञान नाही म्हणून भरकटलेले लोक समर्थांनी पाहिले. अंध:श्रद्धा, साधनेचे अघोरी प्रकार, गैरसमजुती यामुळे लोक गांजलेले होते. “सुख सुख म्हणता दु:ख हे ठाकोनी आले” अशी त्यांची स्थिती समर्थांनी पाहिली होती. दु:खावर उपाय योजण्याची क्षमता नाही. दु:खाचे मूळ कारण ईश्वराचा वियोग व अज्ञान हे होय. “तुझिया वियोगे जीवित्व आले” असे समर्थ याचसाठी म्हणतात. समर्थांच्या काळात योग्य मार्ग दाखवणारा आध्यात्मिक नेता नव्हता, पारतंत्र्यामुळे लोक भयग्रस्त होते. सगुण निर्गुण श्रीरामाची उपासना कशी करावी ? याचे लोकांना ज्ञान नव्हते.

समर्थांना केवळ श्रीराम कृपाच हे दु:ख कमी करेल हा विश्वास होता. त्याच्या जवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. त्याच्याशी दास, सखा, मित्र, स्वामी असे नाते जोडावे. काया, वाचा, मनाने त्याचे व्हावे असे त्यांना वाटे व तशी प्रार्थना ते करुणाष्टकांतून करतात. 

अनन्यता – समर्थांना “एका रामाशिवाय माझे कोणी नाही” अशी अनन्य भक्ती करणे आवडत असे. तोच तारणारा, तोच माझे सर्वस्व म्हणून “तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही”, “तुजवीण रामा मज कंठवेना” असं ते म्हणतात. सामान्य जन मात्र प्रपंचात इतके गुंततात की, त्यांना ईश्वराची आठवण येत नाही, त्यांचा परमार्थ सवडीचा असतो.

संवाद – समर्थ सर्वस्वी श्रीरामाचे झाले म्हणून ते त्याच्याशी संवाद साधत. अशी एकाग्रता, तळमळ सामान्य माणसांमध्ये नसते. या संवादात “दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो । परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी ।” हा हट्ट आहे. काया, वाचा, मनाने तुझा झालो म्हणून “हे लाज तुजला माझी” यात सख्यत्व आहे. संवादात एका रामाशिवाय ही कृपा कोणीही करू शकत नाही ही प्रांजळ कबुली आहे. माझ्या साधनेत काही कमतरता आहे का ? हा प्रश्नही ते विचारतात. “नव्हे कार्यकर्ता भूमिभार झालो” अशी व्यथा ते मांडतात. हा संवाद आतील मनाचा होता, ते हितगुज होते, देव-भक्ताचा एकांतात घडलेला हा संवाद होता. एका असामान्य, निष्ठावान, श्रद्धाळू, अनन्य भक्ताचे ते हितगुज होते.

भाषा – ईश्वराशी संवाद साधायला समर्थांसारखे संत योग्य शब्द योजना करतात. प्रभूचे अंत:करण वितळावे, करुण रसातून, प्रेमातून त्याचे लक्ष आपण वेधावे, आर्तता प्रगट व्हावी म्हणून शब्दांचे सामर्थ्य समर्थ प्रगट करतात. “तुजवीण करुणा हे कोण जाणेल माझी ? तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता” यातील शब्द योजना पाहिली की त्यातील सामर्थ्य जाणवते. त्यातील एकही शब्द इकडचा तिकडे करता येत नाही. कारण त्यांची मांडणी नेमकी, नेटकी व प्रत्ययाची आहे.

भावावस्था – “श्रीराम आहेच” या मनाच्या अवस्थेला भाव म्हणतात. समर्थांमध्ये तो परिपूर्ण होता. पश्चात्ताप, कमतरतेची प्रांजळ कबुली, लोकांचे दु:ख कमी होण्याची तळमळ असलेला, हे लोक तुझेच; म्हणून स्मरण करुन देणारी तळमळ त्यात आहे.

अद्वैताची अवस्था – करुणाष्टकात श्रीराम व समर्थ यांची एकरूपता दिसते. “जेथे शब्दच निमाला, तेथे रामदास रामचि झाला” अशी अवस्था शब्दांतून प्रगट होते. 

मागणे – “रघूनायका मागणे हेची आता”. कोमळ वाचा, विमळ करणी, प्रसंग ओळखी, धूर्तकळा, हितकारक ते, विद्यावैभव, शब्दमनोहर, अर्थारोहण, अलापगोडी अशा शब्दात समर्थ रामाकडे मागणे मागतात. त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. “मजविण तू मज दे रे राम” यात अद्वैताची परमोच्च अवस्था आहे.

आपण सज्जनगडावर जातो तेव्हा मनातले ताण तणाव, प्रापंचिक दु:ख विसरतो. ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ या विचारात उठतो. समर्थ समाधी व श्रीरामाचा अभिषेक पहातो. सायंकाळी करुणाष्टके म्हणतो तेव्हा आपली व्यथा, दु:ख श्रीरामासमोर मांडले म्हणून मन हलकं व शांत होते, उत्साह वाढतो, एकाकीपणा नाहीसा होतो. रात्री दासबोध वाचन, शेजारती होते. मनाला विश्रांती व समाधान मिळते; प्रसन्न वाटते.    

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अग्नी उपासना

 तेज किंवा अग्नी– अज या धातूपासून  हा शब्द तयार होतो अङ्ग नि ऊर्ध्व म्हणजे वर जातो तो अग्नि. अग्नी ही इंद्रिय गोचर घटना आहे, दहन व ज्वलन हे तिचे स्वरूप आहे व उष्णता व प्रकाश अग्नीमधून मिळतात. अग्नीचा प्रवास असतो, थंड वस्तु मध्ये गरम वस्तूतून उष्णता जाते, गॅस वर भांड्याच्या तळाशी असलेला पदार्थ प्रथम उष्ण होतो तो वर येतो व वरचा खाली असे पाणी गरम होते. अवकाशातूनही उष्णता मिळते शरीर जीवंत राहण्यासाठी उष्णता लागते त्याला स्वाभाविक शरीराचे तापमान म्हणतो. वैदिक ऋषींनी अग्नीचे महत्व जाणले. म्हणून ऋग्वेदाचा आरंभच अग्निस्तवनाने होतो. यज्ञातील अग्नीला ग्रहपती म्हणतात. अग्नी  प्रकाश देतो. ईश्वरी ज्ञानात अग्नी आहे तो  देह बुद्धी नष्ट करतो. सूर्य व अग्नी ही मोठी दैवते आहेत. पोटातील जठराग्नीमुळे अन्नाची चव वाढते. सागरात वडवानल, भूगोलाबाहेर आवरणातल असतो. आग्या सापाच्या तोंडतील अग्नी डोंगर जाळून टाकतो. अग्नीचे घर्षण करून तयार केलेली वीज, जलावर निर्माण केलेली वीज व अंतरिक्षातील वीज ही अग्नीची तीन रुपे आहेत. तीन लोक, वायु, आदित्य, आप, औषधी, वनस्पती, लाकूड, शरीर ही अग्नीची निवास स्थाने आहेत. काळी, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुची देवी या अग्नीच्या सात जिव्हा आहेत. समर्थ दासबोध १६.५.२९ मध्ये  तीन जिव्हा, चार नेत्र, तीक्ष्ण दाढा, तीन मस्तके, तीन पाद, असे अग्नीचे वर्णन करतात. अग्नी ज्ञानी लोकांचा परमेश्वर, गृहस्थाचा पालक, मानवाचा अतिथि, पृथ्वीचा रक्षणकर्ता आहे.  वास्तु शांतीने अग्नीची पुजा करतात. रामायणात दशरथाच्या यज्ञातून पायस मिळाले व श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचा चा जन्म झाला. कौसल्या अग्नीत समंत्र हवन करत असे. अग्निला साक्षी ठेवून श्रीराम, व सुग्रीव मैत्री झाली. सीतेने अग्निदिव्य केले. अग्निहोत्र व वैश्वदेव या द्वारे अग्नीचे रोज पूजन करण्याची  पद्धत होती. महाभारतात खांडव वनाचा दाह करण्यासाठी  श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र व अर्जुनाने अक्षय भाता धनुष्य दिले.  होलिकेचे पूजन करून दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची पद्धत आजही आहे. पृथ्वी, आप, वायु व आकाश यात अग्नी तत्व आहे व त्यामुळे सृष्टीत समतोल आहे. अग्नी भक्षकही आहे व त्यामुळे सावधपणे त्याचा वापर आपण करणे गरजेचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात “सर्व भक्षकु | त्याची थोरी म्हणोनी सांगावी?

अग्निहोत्र हा मूळ धर्म आहे, ते वेदाचे किंवा सत्यधर्माचे विशुद्धरूप आहे. हा सत्यं प्रात: नित्य चालवायचा यज्ञ आहे व सुलभ अल्पसामुग्रीने, अल्पवेळात, अल्पखर्चात करता येते. दोन चिमटी तांदूळ, 2 थेंब गाईचे तुप, ही आहुती एक व्यक्ती मंत्रोच्चार करून देते. नित्यत्व, सातत्य विशिष्ट वेळ, व नित्य स्मरण यामुळे ही तप:साधना आहे. 

वैश्वदेव म्हणजे अग्नीत आहुती देणे, अन्न ग्रहण करण्या अगोदर तुप भाताची आहुती अग्नीला अर्पण करतात. आतिथीची वाट पाहावी. त्याला भोजन द्यावे. गाय, कावळा, कुत्रा यांना द्यावे. जगा व जगू द्या हा संदेश त्यातून मिळतो. अन्न ही ईश्वरी कृपा आहे. जगी पाहता देव हा अन्नदाता असे समर्थ म्हणतात.

आपल्या वैदिक संस्कृतीत आर्य अग्नीपूजक होते. त्यांना तेज व अग्नी पासून ज्ञान व प्रेरणा मिळत असे. विटा भाजण्यापासून, अन्न शिजवण्यापर्यंत मानवाचे जीवन अग्नीने व्यापले आहे. उष्णता व शक्तीमुळे अर्थार्जन शक्य होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय अग्नि पासून शक्ती घेतात. त्यांना नियंत्रणात ठेवले तर जीवनात समतोल राहातो. अनियंत्रित ठेवले तर जीवन उध्वस्त होते. मोक्षप्राप्ती संन्यस्त वृत्ती साठी अग्नीउपासना महत्वाची आहे. यात विषय वासना दग्ध होतात. मी व माझे याची निवृत्ती होते. सारी संपदा भगवंताची आहे या भावात कर्म करून ते अग्नीरूप भगवंताला अर्पण करावे.              

|| जय जय रघुवीर समर्थ ||

अद्वैत विचार

आपले पूर्ण जीवन द्वैताने भरलेले आहे. “द्वितीयात भयं भवति” असे उपनिषदे सांगतात. द्वैत म्हणजे दोन मी-तो, गरीब–श्रीमंत, सुंदर-कुरूप, श्रेष्ठ-कनिष्ठ, ज्ञानी-अज्ञानी हे भेद किंवा अनेकत्व मायेच्या शक्तीमुळे निर्माण होते. आपल्या शरीरातही हाताच्या बोटांची लांबी वेगळी असते. द्वैतामुळे भय निर्माण होते. श्रीमंताला चोराचे, सौंदर्याला वृद्धपणाचे, जन्मानंतर मृत्युचे भय असते. भयामुळे अशांती, बेचैनी, गैरसमज, असुरक्षितता वाढते. द्वैतामुळे पैसा,विद्या, रूप, गुण, यश, बळ याची तुलना होते. तुलनेमुळे द्वेष, मत्सर, आसक्ती, क्रोध, हिंसेचे विचार निर्माण होतात, देह सुखाची आसक्ती, कर्तेपणा, भोक्तेपणा या क्रमांमुळे खर्‍या परमार्थ साधनेपासून माणूस दूर जातो. गणितातील १ ते ९ आकड्यात अद्वैत आहे १० आकड्यापासून पुढे द्वैतच सुरू होते. मी म्हणजे देह, देह सुख हे खरे सुख, मी कर्ता, मी भोक्ता, या भ्रमांमुळे द्वैत विचार वाढतो, तुलना व स्पर्धा होते व मनाची शांती बिघडते. 

भारतीय संस्कृतीत उत्तुंग, भव्य अद्वैत दर्शन आहे. प्राचीन ऋषी एकांतात अरण्यात राहात, निसर्ग व चराचर सृष्टीशी एकरूप होत असत. त्यामुळे अद्वैत तत्वज्ञानात त्यांनी वेद वाङ्मय लिहिले. सृष्टी अद्वैतविचार शिकवते. मेघ सर्वांना पाणी देतात. झाडे सावली व फळे देतात, पृथ्वीमाता पेरल्यापेक्षा अनेक पटींनी ज्यास्त धान्य देते, फुले सुगंध देतात, सूर्याचा तेजस्वी प्रकाश उष्णता देतो, चंद्र शीतलता व प्रकाश सर्वांना देतो. नदी म्हणजे लहान-मोठ्या नद्यांचा संगम होय. गंगेचे पाणी शुद्ध व शुभ्र, यमुनेचे पाणी काळे पण दोघी प्रेमाने मिठी मारतात. एकरूप होतात संगमानंतर कुठले गंगेचे, कुठले यमुनेचे पाणी कळत नाही. नदी समुद्रात एकरूप होऊन मिळते म्हणून ती अद्वैताची युती आहे. गंगा, यमुना, सरस्वती म्हणजे कर्म, ज्ञान, भक्तीचा सुरेख संगम आहे. 

समर्थांना विश्वाची चिंता होती. त्यांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे ते वाङ्मयरूपात अमर झाले. त्यांनी नाम व रूपाचा, स्वजनांचा त्याग केला व निर्गुण रूपात आत्मस्वरुपात राहून देहाने लोककल्याणाचे कार्य अविरत केले. भिक्षा मागताना टोपले भरून पीठ आणले तरी ५ मुठीच ते घेत. इतरांच्या भुकेचा विचार करत म्हणून त्यांच्या भिक्षेला “पावन भिक्षा” म्हणतात. समर्थ अद्वैत तत्वज्ञानाचे खंदे पुरस्कर्ते होते. अद्वैत व मोक्ष या दोन्हीचा अर्थ एकच असे ते म्हणतात. समर्थांनी समाजाचा प्रपंच श्रीरामाच्या साक्षीत्वात केला. त्यांच्या अंत:करणात निर्गुण आत्माराम स्थिर होता व त्यांचे जीवन श्रीरामाच्या दिव्य प्रेरणेनेच चालत होते.

ज्ञानदेवादी संतांनी १८ पगड जातींना भागवत धर्माखाली एकत्र आणले. सुतार, कुंभार, चांभार, सोनार, विणकर या सर्वांची गरज समाजाला असते, ते स्वत:च्या कर्माने समाज पुरुषाची सेवा करतात. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद नाही. “सारे सुखी व निरोगी  असोत हा अद्वैताचा मंत्र त्यांनी आपल्याला दिला. संत तुकाराम म्हणतात “संकोचूनि काय झालासी लहान ? घेई आपोषण ब्रह्मांडाचे” अद्वैत विचारात आपले मन ब्रह्मांडाहून व्यापक होते. 

दासबोध दशक ७ समास ९ मध्ये अद्वैत वेदान्तशास्त्र ज्यात सांगितले आहे. अशाच ग्रंथाची निवड करण्यास समर्थ सांगतात. भयमुक्त जीवनासाठी अद्वैतचा अनुभव आवश्यक आहे. अद्वैत विचाराच्या ग्रंथाच्या श्रवणाने मोक्षाचा विचार पक्का होतो. समर्थ म्हणतात “जयास स्वहित करणे | तेणे सदा विचरणे, अद्वैत ग्रंथी |”  द्वैतामुळे आत्मसुखाची कपाटे बंद होतात पण सद्गुरू कृपेच्या किल्लीने उघडतात, बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो व एकाग्र चित्ताने आत्म्याच्या अनुसंधानाचा अनुभव येतो. मन व बुद्धी च्या ऐक्याने चित्ताची समता होते व जीव –आत्म्याच्या ऐक्याचा अनुभव येतो. 

समर्थ मनाच्या श्लोकातही अद्वैत विचार मांडतात. श्लोक १३६ मध्ये अनेकत्वामुळे भय निर्माण होते, परब्रह्माशी एकरूप झाल्यावर भय नष्ट होते व जगातील सर्व व्यवहारांकडे साक्षीत्वाने पाहाता येते, असे समर्थ म्हणतात. उपनिषदे ब्रह्मस्वरूपाला सत्य अथवा भूमा म्हणतात. हे ब्रह्मस्वरूप अत्यंत पुरातन, विशाल, आपल्या तर्काच्या पलीकडे, गुप्त, स्थिर, व रहस्यमय आहे. त्याच्या ठिकाणी दुजेपण नाही कारण ते एकच एक आहे. विश्वामध्ये अनेकपणा अथवा द्वैत असते. अनेकपणात भय असते पण दृश्याचा भेद करून आपण परब्रह्मापर्यंत पोहोचलो तर भय मुक्त होतो व ईश्वरापासून विभक्त नाही असा भक्त होतो. 

आपल्या देशात भाषा चालीरीती, पोशाख, जीवनपद्धती, हवामान यात भिन्नता आहे. अद्वैत तत्वज्ञान हा भारतीय तत्वज्ञानाचा गाभा आहे म्हणून इथे अनेकात एकत्व आहे. भय मुक्त जीवनासाठी एकत्व विचार आपण सांभाळायला हवा. आपल्या अंत:र्बाह्य कृतीतून त्याचा सुगंध बाहेर यावा. 

अवघे ब्रह्ममय रिता  नाही ठाव | प्रतिमा तो देव नोहे कैसा ?

सगुण हे ब्रह्म निर्गुण हे ब्रह्म | पाहाता मुख्य वर्म ब्रह्ममय |

नाही द्वैत भेद मिथ्या का भ्रमसी | सत्य माया ऐसे मानू नये |

मृगजळ डोळा दिसे परी नासे | तैसा हा विलास दिसताहे|

दास म्हणे देह बुद्धी हे त्यागावी | एकत्वे रंगावी मनोवृत्ती ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

अभयम्

भगवद्गीतेत  पुरुषोत्तम योग हा पूर्ण योग १५ व्या अध्यायात सांगितला व त्याला पूर्णता येण्यासाठी १६ व्या अध्यायात दैवी संपत्तीचे २६ गुण व आसुरी संपत्तीचे ६ अवगुण सांगितले आहेत. “अभयम” हा पहिला गुण इतर गुणांचा मुकुटमणी किंवा पाया आहे. “मला काही गमवावे लागेल, माझ्यावर काही संकट येईल.यामुळे अंत:करणात जी घालमेल होते, तिला “भय” म्हणतात. जन्मापासून मृत्यू पर्यंत प्रत्येकजण भयाच्या दडपणाखाली वावरत असतो. भर्तृहरी वैराग्य शतकात भोगाला रोगाचे, द्रव्याला कर आकारण्याचे, रूपाला वार्धक्याचे. शास्त्राला वादाचे, शरीराला मृत्यू व व्याधीचे, बलाला शत्रूचे भय असते,असे भयाचे प्रगट वर्णन करतात. 

महाभारतात सद्गुणांची दैवी सेना व दुर्गुणांची आसुरी सेना यांच्यातील संघर्षाचे वर्णन 

आहे. चांगल्या व वाईटाचा संघर्ष अनादि काळापासून चालू आहे.२६ गुणांपैकी निर्भयता प्रथम व नम्रता अखेर ठेवली तर मध्ये २४ गुणांचा विकास व्हायला मदत होते. या सेनेचा सेनापति “अभय” हा गुण आहे. 

सत-प्रवृत्तीला निर्भयता लागते. ढोंग, घमेंड अभिमान, राग, कठोरपणा, अज्ञान ही आसुरी संपत्ती आहे. या ६ पैकी काम, क्रोध, व लोभ या तीन गुणांचे वर्णन नरकाच्या द्वाराची कमान असे भगवंत करतात. हे सहा दोष बलवान आहेत व एका पाठोपाठ एक प्रवेश करतात.त्यांच्या निवृत्तीसाठी मात्र वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. क्रोधामुळे दुर्वास ऋषींना त्रास झाला. विश्वामित्रांची तपश्चर्या मेनकेच्या कामवासनेमुळे व रंभेवरील क्रोधामुळे भंग पावली. सद्गुण मात्र प्रयत्नपूर्वक स्विकारून वाढवावे लागतात. समर्थ यालाच “अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती| कुविद्या सांडून सिकती शहाणे विद्या |दा. १४.६.५ असे म्हणतात. सद्गुण अंगिकारण्याचे प्रयत्न बालपणा पासूनच व्हावेत. भय हा अवगुण जन्मत: नसतो पण आई मुलाला बागुलबुवाची भीती दाखवते, मुलाला खरे वाटते.पण मोठा झाल्यावर बागुल बुवा नसतोच हे ज्ञान होते व भय नष्ट होते. 

परमार्थातील प्रवेशाची पहिली पायरी निर्भयता ही आहे. प्रतिकूलता, संकट, मृत्यू, यांच्या कल्पनेमुळे भय निर्माण होते. अज्ञान व मायेमुळे कल्पना निर्माण होतात. सृष्टीच्या नियमनासाठी माया लागतेच पण माया ईश्वराच्या आधीन असते व जीव मायेच्या आधीन असतो. म्हणून जीव अशुद्ध कल्पना करतो. मनाचा श्लोक १७२ मध्ये “स्फुरे, विषयी कल्पना ते अविद्या” असे समर्थ याचसाठी म्हणतात. कल्पनेचा सविस्तर विचार दासबोध दशक ७-३ व ७-५ मध्ये आहे. ११व्या अध्यायात विश्वरूप पाहून अर्जुन घाबरतो. भीतीने व्याकूळ होतो व मला तुझे चतुर्भुज रूप दाखव. असे भगवंताला म्हणतो . भगवंताने परम तेजोमय, सर्वांचे आदि, विराटरूप अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान करून,हे रूप दाखवले. ते त्याने या पूर्वी कुणालाच दाखवले नव्हते . पण ते पाहायला अर्जुन घाबरला . समर्थ मनाचा श्लोक १३६ मध्ये”भये व्यापिले सर्व ब्रम्हाण्ड आहे” असे म्हणतात. विश्वातील अनेकपणामुळे एक वस्तु दुसरीला मर्यादा घालते व मर्यादेतून भय निर्माण होते. आज तर साध्या शिंकण्याचे, खोकण्याचे सुद्धा भय वाटत आहे. देहसुखा साठी झटणे मृत्यूच्या भयामुळेच असते. अर्जुन मोह, शोक,पाप,या कल्पनांमुळे भयग्रस्त झाला व त्याने धनुष्य खाली टाकले. लोकांना लुबाडणे,मारणे हे पाप करताना वाल्या कोळ्याला भय वाटत होते,कारण भयरहित, स्वानंदात भगवंताचे नाम घेणार्‍या नारद महर्षिना पाहून त्याला आश्चर्य वाटले. 

निर्भयता आली की भय जाते, शांत रसात क्रोध नष्ट होतो, विवेक, वैराग्य, अनात्म गोष्टींचा त्याग करून, नित्य आत्मवस्तूचा स्वीकार केल्याने निर्भयता येते. अलिप्तपणा, अनासक्ती वाढली, ममत्व नष्ट झाले, की भय जाते. परब्रह्म भयाच्या पलीकडे आहे तेथे व्दैत नसते. गुरुकृपेच्या एका कटाक्षाने भय  जाते. 

आत्मज्ञान, निष्काम कर्म भक्ति व उपासना करण्यासाठी निर्भयता लागते. कर्मयोगी कर्माच्या फळाची आशा न करता शांत, स्थिरवृत्तीने कर्तेपणाचा त्याग करून कर्म करतो व इतरांना अनंत शक्ति व प्रेरणा देतो. निर्भयतेमुळे आत्मज्ञानासाठी लागणारी एकाग्रता, समदृष्टी, विश्वाकडे पाहण्याचे व्यापक मन तयार होते. ११वा अध्याय विश्वातील अनेकत्वाकडे एकत्वाने कसे पहावे हे शिकवतो. पवित्र नद्या, विशाल पर्वत, गंभीर सागर, वत्सल गाय, वनराज सिंह, मधुर कोकिळा, एकांतप्रिय सर्पातही ईश्वरीस्वरूप पाहावे. परमात्मा मुंगी पासून  ते ब्रह्मांडापर्यंत अणुरेणूत आहे. या जाणीवेमुळे अनेकत्वातील भय नष्ट होते.’विभक्त नाही तो भक्त’  अशी भक्तीची व्याख्या समर्थ करतात. प्रल्हादासारखा भक्त संकटाला घाबरत नाही. कल्याणस्वामी, निर्भयपणे समर्थांची सेवा अनेक कठीण प्रसंगात करतात. अर्जुनाचा मोह, ममत्व, आसक्ती, व त्याच्या मनातील पापाचे भय भगवंतांनी नष्ट केले. “करिष्ये वचनं तव”या त्याच्या वचनात निर्भयता व ईश्वरार्पणता दिसते. हे निर्भयतेचे सामर्थ्य आहे. 

नि:शंक हो निर्भय हो मना रे|

प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे |

अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी |

अशक्य ही शक्य करतील स्वामी ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

आध्यात्मिक संवाद

व्यक्तीच्या भावना, कल्पना, त्यांचे विचार जाणून घेण्याचे महत्त्वाचे माध्यम  म्हणजे संवाद! संवाद दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये घडतो. आध्यात्मिक संवाद सद्गुरू व सत्शिष्यात होतो. त्यात सद्गुरूंचा अनुभव व उपदेशाचे, शिष्य श्रवण; मनन; चिंतन करतो व त्यामुळे तत्वज्ञानाची उकल होते. आध्यात्मिक संवादात सत्य विचार, विवेक, ज्ञानप्राप्ती, मूळ तत्वांचा शोध, त्या परब्रह्मापर्यंत पोहोचण्याची साधना या गोष्टींचा समावेश असतो. 

संवादात सद्गुरू ज्ञानी, अनुभवी, दयाळू असतो तर शिष्य तत्पर अनुतापी विरक्त, साक्षेपी, दक्ष, बुद्धीमान, श्रद्धावान असतो. गुरु अहंकारी व शिष्य अनाधिकारी असला तर संवाद न होता विसंवाद होतो. संवादात सद्गुरू व सत्शिष्यात प्रेमाचे, सख्यत्वाचे नाते असावे. श्रीकृष्ण व अर्जुनाचे सख्यत्वाचे नाते होते त्यातून गीतेचे तत्वज्ञान आपल्याला मिळाले. आत्मारामात “तूवा आशंका नाही घेतली | परी मज तुझी चिंता लागली” असे शिष्याचे हित करण्याच्या तळमळीचे नाते आहे. उपनिषदात यमदेव-नचिकेत, याज्ञवल्क्य-गार्गी, आरुणी-श्वेतकेतू , पिप्पलाद मुनि व जिज्ञासू शिष्य, नारद – सनद् कुमार असे संवाद आहेत. महाभारतात यक्ष व युधिष्ठिर, युधिष्ठिर व भीष्माचार्य यांचेही संवाद आहेत. 

आद्य शंकराचार्य व मंडन मिश्रांचा संवाद वादातून आहे. यात प्रमाणे व तर्क शास्त्राचा उपयोग होतो. या वादात स्पर्धा, ईर्ष्या, नव्हती त्यामुळेच मंडनमिश्र पुढे सुरेश्वराचार्य म्हणून आद्य शंकराचार्यांच्या मठाचे प्रमुख झाले. दासबोधाची सुरुवातच शिष्याने विचारलेल्या प्रश्नाने झाली आहे. “श्रोते पुसती कोण ग्रंथ | काय बोलिलें जी येथ | श्रवण केलियाने प्राप्त | काय आहे”? हे तीन प्रश्न व त्यावर समर्थांचे उत्तर हा गुरु-शिष्य संवाद आहे व इथे भक्तिमार्गाचे विवेचन आहे अशी झाली. श्रोते एकाग्र मनाने ऐकत होते. पहिल्या दशकात नित्य विचार, दुसर्‍या दशकात अनित्य विचार (ज्याचा आपण त्याग करायचा) तिसऱ्या दशकात प्रपंच परमार्थातील विविध ताप व त्यातील कष्ट यांनी गांजलेला संसारीक माणूस याचे विवेचन समर्थ करतात. 

आपल्या सारख्या अभ्यासार्थींनी हे सर्व अनुभवलेले असते पण त्याची रचनात्मक उकल या तीन दशकांच्या अभ्यासाने होते. मृत्युचा तर इतका सखोल विचार आपण केलेलाच नसतो, तो इथे होतो. विवेक-वैराग्य या शब्दाचा अर्थ, गुढार्थ याची जिज्ञासा आपल्यात निर्माण होते.  दशक ३ समास १० ओवी ६९ मध्ये आपल्यातील श्रोता जागृत होऊन विचारतो “देवासी वास्तव्य कोठे | तो मज कैसेनि भेटे | दू:खमूळ संसार तुटे | कोणे परी स्वामी ||” या प्रश्नांनी आपले व समर्थांचे नाते सुरू होते. अगोदरच मंगलाचरणात केलेली “तुझ्या दासबोधासी त्वां बोधवावे” ही प्रार्थना आपण नम्रपणे करू या. 

समर्थ म्हणतात, भगवद्भजन करावें | तेणें होईल स्वभावें | समाधान || (३-१०-७१).. आता आमची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नाही म्हणून आम्ही विचारतो 

कैसें करावें भगवत् भजन | कोठें ठेवावें हें मन |

भगवद्भजनाचें लक्षण | मज निरोपावें || (३-१०-७२)

म्हणून नवविधा भक्तीच्या ४थ्या दशकात षट्संपत्तीचा विचार व भक्तीचे ९ प्रकार समर्थ सांगतात. १ ते ४ दशकाच्या अभ्यासाने आपण आत्मानात्मविवेक, प्रपंचातील वैराग्य, षट्संपत्ती व मुमुक्षुत्व हा प्रवास करून “साधन चतुष्ट्य संपन्न होतो.” दासबोधात असे संवाद व त्यातून मिळालेली ज्ञानतत्वे आहेत. संवादामुळे समर्थांशी सद्गुरू म्हणून नाते दृढ व्हावे व त्यांचे बोट धरून आपला श्रीराम व आत्मारामापर्यंतचा आनंदाचा प्रवास घडावा. आत्माराम व मनाच्या श्लोकातील संवादाचा ही असाच विचार व्हावा. समर्थांशी असा संवाद साधला तर अभ्यासातील रुक्षपणा कमी होतो,   प्रेम-आपुलकीचे नाते वाढते, एकाकीपणा नाहीसा होतो व आपोआप प्रश्नांची उकल होते व नंतर “फोडूनी शब्दाचे अंतर | वस्तू दाखवी निजसार” या समर्थ वचनाचा अनुभव येतो.

अशा संवादाने आपण अभ्यासार्थी व समर्थ रामदास यांच्या मधील नात्याचा विकास होणार आहे. त्यामुळे आपण करतो ती साधना अर्थपूर्ण होणार आहे. साधनेने अनुभवाचा विकास होणार आहे व गुरु शिष्याचे नाते दृढ, अपरिवर्तनीय होऊन “खरा साधक” होण्याचा आनंद मिळणार आहे.            

|| जय जय रघुवीर समर्थ ||

प्रास्ताविक

दि. ०७/१२/२०२४
(चंपाषष्ठी)

राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र, वाङ्मय आणि या श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथत्रयींचा चिकित्सक अभ्यास म्हणजे “दासबोध सखोल अभ्यास उपक्रम”! श्री समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणार्‍या अनेक व्यासपीठांमध्ये “दा.स.अ.” फाउंडेशन गुणवत्ता आणि शिस्त या दोन्ही आयामांवर उच्चस्थानी विराजमान आहे याचा सार्थ अभिमान वाटतो.

विश्वातल्या सहा देशांमध्ये आणि देशातल्या नऊ राज्यांमध्ये अभ्यासार्थी असलेले “दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशन” आता आपली कार्यध्वजा “संकेतस्थळाच्या” माध्यमातून जगभरातील साधकांपर्यंत सहजपणे फडकवित ठेवणार याचा मोठा आनंद वाटतो आहे. “दा.स.अ. संकेतस्थळाच्या” रुपाने समर्थ रामदासस्वामींचे तत्वज्ञान संपूर्ण विश्वातील मानवाला ऐहिक आणि पारमार्थिक पातळीवर उच्चस्थान मिळवून देईल यात शंका नाही. “मागील पाच हजार वर्षात श्री दासबोधासारखा मानवी जीवनाच्या प्रत्येक आयामाला स्पर्श करुन ते जीवन सुखकर करणारा ग्रंथ झाला नाही” या प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांच्या मुखारविंदातून निघालेल्या वाक्याचे मला येथे स्मरण होत आहे. साध्या यःकश्चित भाजीच्या व्यवहारापासून मानवी जीवनाचे अंततोगत्वा ध्येय म्हणजे मोक्षा पर्यंतचा विचार ज्या अलौकिक आणि अद्भूत वाङ्मयात केला , ते म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले ४५००० हजार पेक्षा जास्त ओवी संख्या असलेले हे साहित्य !

मानवी जीवनाचे आत्मभान जागृत करणारे हे अक्षर वाङ्मय प.पू. अक्कास्वामी तथा आशालता चिंतामणराव वेलणकर यांनी चाळीस वर्षांपूर्वी रुजवलेल्या “दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशन संकेतस्थळाच्या” रुपाने जगासमोर येत आहे याचा सात्विक अभिमान आणि आनंद आम्हास वाटतो.
“दा.स.अ. संकेतस्थळासाठी” कार्यरत असलेल्या सर्व टीमला मी शुभेच्छा देतो. या अलौकिक व अथक कार्यासाठी अभिनंदन करण्याचे आणि धन्यवाद देण्याचे भाग्य मला मिळाले हा माझ्यासाठी कृतार्थ क्षण होय !

– विजय लाड

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language