ज्ञानाच्या सात पायऱ्या

दासबोधात आत्मज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचा संपूर्ण अर्थ अभ्यासार्थींसमोर येतो. सारे विश्व ज्ञानवृत्तीतूनच निर्माण झाले म्हणून विश्वाच्या व्यवहारात योजना, व्यवस्था व विवेक आढळतो. प्रत्येक जीवात ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा असतेच. अथ तो ब्रह्म जिज्ञासा। यातूनच ब्रह्मसूत्र, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथात आत्मज्ञानाचा विचार आला. आत्मज्ञान म्हणजे आपले खरे स्वरुप पहाणे. ज्ञानाच्या कक्षा व्यापक आहेत. महावाक्याचे मनन, साधनचतुष्टय संपन्नता, अध्यात्म विद्या, सदगुरुकृपा उपदेश, श्रवण ते साक्षात्कार हा प्रवास, सत्त्वगुणाची वृद्धी, सोऽहं साधना अशा अनेक मार्गाने ज्ञानाची तत्त्वे उलगडतात. सर्व भूतांच्या ठिकाणी एकच एक परमात्मभाव ठेवणे, जे शुद्ध परमात्म स्वरुप आहे तेच आपण आहोत, अनिवार्य समाधानाची प्राप्ती, वृत्ती, देह व दृश्य जगातून काढून परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर ठेवणे यासाठी आत्मज्ञानाचा विचार व साधना करावी लागते. ज्ञानाच्या सात भूमिकांचा विचार आपण येथे करणार आहोत.

१.शुभेच्छा– प्रत्येक जीवाची बद्धावस्था संपली की विषयभोगात सुख नाही हे कळते व ज्ञानाच्या जिज्ञासेपोटी सत्संग व अद्वैत ग्रंथाचा अभ्यास सुरु होतो. अभ्यास व ज्ञानाची जिज्ञासा याला शुभेच्छा म्हणतात. अनंत राघवाच्या पंथाचा प्रवास इथे सुरु होतो. मनाचे श्लोक ४ ते ७ मध्ये या प्रवासाला निघण्यापूर्वी कोणत्या अनित्य, अशाश्वत गोष्टींचा त्याग करावा याचा विचार आहे. त्याग ही या प्रवासाची पहिली पायरी आहे. मंदिरातील उत्सव, लोककल्याणाची कामे, सत्संग, अभ्यास याकडे भोगाची आसक्ती व शक्ती वळते. हा प्रवास निर्विघ्न, सुखकर व्हावा म्हणून गणेश, शारदेचे आशिर्वाद व सदगुरुकृपा महत्त्वाची असते.

.विचारणा– वाचन, अभ्यास वाढला की शंका येतात. ग्रंथात याला ‘ग्यानबाची मेख’ म्हणतात. तसे अवघड विषय, सूत्रे असतात. ती सदगुरुला विचारली जातात यालाच विचारणा म्हणतात. “तद् विद्धिप्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया” गीता ४.३४ या वचनांप्रमाणे अहंकाराचा लय, शरणागतता, नम्रता, लीनता असली तर योग्य मार्ग मिळतो. अहंकाराचा लय जितक्या वेगाने होईल तितके क्षुद्र विचार, गोष्टी, वायफळ बडबड, निंदा, स्तुती, कल्पनेची मनोराज्य या गोष्टी मनातून व वर्तनातून बाहेर पडतात.

.तनुमानसा– साधना व अभ्यासासाठी दुर्लभ नरदेह व दुर्लभ आयुष्य याचे महत्त्व ओळखावे लागते. देह पंचभूतांचा, त्याला वृद्धत्व, मृत्यू असतोच म्हणून एकही क्षण वाया न घालवता  तो सक्षम शुद्ध, सात्विक ठेवून प्रवास करावा लागतो. समर्थांना देशाटनात हिमालयात देहत्याग करावा वाटला पण प्रभू रामचंद्र प्रगट होऊन म्हणाले, तुमची तनु ते आमुची तनु आहे “दोन तपे रक्षिली तुमची काया धर्मस्थापनेसाठी” त्या नंतर ११00 मठ, महंत निर्मिती, गावोगावी मंदिर, प्रचंड वाङ्मय निर्मिती हे कार्य समर्थांनी केले.

४.सत्त्वापत्ती– साधनेमुळे देहबुद्धी क्षीण झाली की, अतिंद्रिय अनुभव येतात. चित्त स्थिर होते. अनाहत नादाची संवेदना जाणवते. परावाणी जागृत होते. बोलतो तसे होण्याचा अनुभव येतो. या गोष्टीत न अडकता पुढचा प्रवास सुरु ठेवावा. लोकेषणा, वित्तेषणा इ. ईषणांपासून प्रयत्नपूर्वक दूर रहावे लागते. टाकळीच्या श्री. कुलकर्णी यांना जीवन प्रदान केल्यानंतर समर्थांनी टाकळी सोडले आणि ते देशाटनाला बाहेर पडले. समर्थांची परावाणी जागृत होती म्हणून वैखरीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांमध्ये सामर्थ्य होते. “जय जय रघुवीर समर्थ” या घोषवाक्याने मोठा लोकजागर केला.

५.असंसक्ती– सर्व आसक्तींचा त्याग आत्मज्ञानाने होतो. समर्थांनी स्वजन, जन, धन, गृह व स्वतःचे नाव याचा त्याग केला, यालाच समर्थ ‘विदेहीपणे मुक्ती भोगित जावी’ असे म्हणतात. योगारुढ झाल्यावरच निर्विकल्प समाधीचा अनुभव घेता येतो. व चिदानंद रुपः शिवोऽहं या भावनेत राहता येते.

६.पदार्थभाविनी- आत्मस्थितीत राहिल्यावर अनात्म पदार्थाविषयी विचारही होत नाही. देहसुख, कर्तेपण भोक्तेपण, मान-अपमान याचा लवलेशही साधकामध्ये राहात नाही. माझा-तुझा, गरीब-श्रीमंत असे सर्व भेद मावळतात. गजानन महाराजांना गांधील माशा चावल्या त्यांनी प्राणपणाने डंख बाहेर काढले व ते शांत राहीले. समर्थांनी थंडी घोंगडीत भरली व शिवाजी राजांशी चर्चा केली. प्रारब्धानुसार त्यांचे व्यवहार होतात.

.तूर्यगा- जागृती, स्वप्न, सुषुप्ती नंतरची ही अवस्था. यात ध्यानात एकीकडे देहावस्था व दुसरीकडे आत्मानुभव यात साक्षित्वाने साधक राहतो.  देह व जगाचे अस्तित्व असून  त्याचे त्याला भान नसते. फक्त वृत्तीरुप द्वैत शिल्लक असते. पुढे उन्मनी अवस्थेत मनाचा संपूर्ण लय होतो.

या सात पायऱ्यांमध्ये पहिल्या तीन साधनस्वरुप, चौथी ज्ञानावस्था व शेवटच्या तीन जीवनमुक्त स्वरुप आहेत. सर्व जग ईश्वरमय आहे. स्वतःच्या समर्पणानेच त्याचा प्रसाद मिळतो हे समर्पण ज्ञानाच्या सात भूमिकांमधून कळते.

ज्ञानेविण जे जे कळा। ते ते जाणावी अवकळा॥

ऐसे भगवंत बोलिला। चित्त द्यावे त्याच्या बोला॥

एक ज्ञानाचे सार्थक। सर्व कर्म निरर्थक॥

दास म्हणे ज्ञानेविण। प्राणी जन्मला पाषाण॥

॥जय जय रघुवीर समर्थ॥

दासबोधातील नवविधा भक्ती

आम्हां तुम्हांसी भववारिधिमाजि तारू

जे वाचितां परिसितां मग होय तारू।

ते दासबोधरचना घडली जयाला

वंदूं निरंतर तया गुरुराज याला।।

–कवी रघुनाथ पंडित

        ग्रंथराज दासबोध, ज्याचे वाचन, मनन, चिंतन केले असता वाचकांसाठी तारकठरतोच, पण वाचणाराही इतरांसाठी तारकहोऊन जातो, अशा या ग्रंथाच्या रचनाकाराला म्हणजेचं श्री समर्थांना माझे त्रिवार वंदन!

         श्री समर्थ सांगतातश्रीमद्भागवत या धर्मग्रंथात, स्वतः भगवंताने प्रल्हाद मुखाने भक्तीचे नवविधा प्रकार सांगितले आहेत,

श्रवणं कीर्तनं विष्णोःस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।

  (स्कंध ७।५।२३) 

            प्रसिद्ध निरुपणकार व समर्थ भक्त रविंद्र पाठकजी म्हणतात की, दासबोधातील नवविधा भक्तीचा हा चौथा दशक म्हणजे दिवाळी सणाइतकाचं आनंद स्वरूप मांगल्याच्या प्रकाशाने आपले जीवन भरून टाकणारा दशक आहे.

        नारदांनी सांगितलेल्या भक्तीसूत्रात ते म्हणतात, ”सा तु अस्मिन परम प्रेम स्वरूपा, अमृत स्वरूपा। भगवंताविषयी प्रेम निर्माण होण्याचा पहिला मार्ग म्हणजे भगवंतांबद्दल सतत ऐकत राहणे. यालाच श्री समर्थ श्रवणभक्ती असे म्हणतात. श्रवणातून प्रेम जन्माला येते. श्रवण केल्यानेच मनुष्याला कुठल्याही विषयाचे ज्ञान प्राप्त होऊ शकते. भगवंत जर सर्वत्र नटलेला आहे तर प्रत्येक कलेमध्ये आणि प्रत्येक विद्येमध्ये त्याचा आविष्कार पाहता आला पाहिजे, म्हणजेचं त्यातील ईश तत्वाचा शोध घेत आला पाहिजे. बहुश्रुत साधक असेल तर तो त्याच्या साधन मार्गावरचे अडथळे सहजी दूर करू शकतो. श्रवणभक्ती ही परीक्षित राजाप्रमाणे करावी असेही श्री समर्थ सांगतात. श्रवणापूर्वीचा मीव श्रवणानंतरचा मीयात आमूलाग्र परिवर्तन हवे. नुसते श्रवण पुरेसे नाही. आपण जे ऐकतो त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा आणि मग त्याच्या अनुभूतीची तळमळ लागायला हवी यालाच समर्थ मनन आणि निजध्यास म्हणतात. भांडे जसे रोज घासावे लागते तद्वतच चित्तशुद्धी साठी रोज श्रवण साधना हवी. पुढे समर्थ असेही सांगतात की विद्वान लोकांची अनुभवशून्य भाषणे ऐकण्यापेक्षा, गुरुमुखातून आलेल्या शब्दांचे श्रवण करावे. आपण स्वीकारलेल्या साधन पद्धतीला अनुकूल असे वाचन करावे म्हणजे साधनेला खोली प्राप्त होते. अध्यात्म श्रवण हे सर्वश्रेष्ठ होय असेही श्रीसमर्थ म्हणतात.

      साखरेशिवाय गोडीचे गोडपण, नाकाशिवाय नथीचे सौदर्य तसेच आत्मज्ञानावाचून निरूपण श्रवण व्यर्थ आहे. सगुण स्वरूपाची चरित्रे ऐकावी व निर्गुण स्वरूपाच्या अध्यात्म विचारांचा शोध घ्यावा, असे श्री समर्थ सांगतात.

        डोंगरे महाराज किर्तनाबद्दल म्हणतात की, ‘कीर्तनहा शब्द उलटा केला की नर्तकीहोते. आपल्या मनरूपी चंचल नर्तकीला स्थैर्य देणारी, आपलं अस्तित्व विसरावयास लावणारी भगवद्भक्ती म्हणजे कीर्तन! भगवंतांबद्दल सतत ऐकत राहिले, म्हणजे आपोआप भगवंतांबद्दल बोलत राहावेसे वाटते. याला कीर्तनभक्ती म्हणतात. विपुल श्रवणातूनच उत्तम वक्ता जन्माला येतो. सगुण आणि निर्गुण समन्वयाचे बंधन श्रवणाप्रमाणे कीर्तनात देखील आहे. कीर्तनकाराने पूर्वरंगात वेदांताच्या सिद्धांताचे निरूपण करावे तर उत्तर रंगात त्याला अनुलक्षून एखादे संतचरित्र, भगवत्चरित्र म्हणजेचं हरिकथा रंगवून सांगावी. शास्त्राला सोडून पदरचे काही सांगू नये, यांवरही श्री समर्थांचा कटाक्ष आहे. कीर्तन ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनात विवेक, वैराग्य, साधनप्रीती,ईश्वर प्रीती निर्माण झाली पाहिजे. लोकांना मायेच्या बंधनातून बाहेर काढण्यासाठी कीर्तन भक्ती असली पाहिजे असे समर्थाना वाटते.

नाना नामे भगवंताची। नाना ध्याने सगुणाची। नाना कीर्तने कीर्तीची। अद्भुत करावी।।५।।

राग रंग रसाळ सुरंगें। रत अंतर संगित रागें। रत्नपरीक्षी रत्नामागें। धांवती लोक।।२७।।

(दशक-चौदा, समास-चार)

कीर्तनकार किंवा हरिदास कसा असावा याबद्दलही समर्थ सांगतात, की जर सोन्याला सुगंध येत असेल, तर त्या सोन्याच मोल किती बरं वाढेल? जर ऊसाच्या कांडीलाच फळे लागली तर ती किती बर गोड, रसाळ असतील. नाही का? याची अपूर्वता काही वेगळीच! तद्वतच जर एखादा कीर्तनकार किंवा हरिदास हा जर विरक्त असेल सर्व ज्ञानी, तसेच प्रेमळ भक्तही असेल, व्युत्पन्न असूनही वाद घालीत नसेल, नम्र असेल तर ही सुद्धा एक अपूर्वताच म्हणावी लागेल. आपण जीवनभर देहरूपी घरात राहतो पण या घराचा खरा धनी कोण हे शेवटपर्यंत जाणून घेत नाही. म्हणून मनुष्याने आपली सर्व इंद्रिये, स्वस्वरूपाकडे वळवली तर मनात भक्तीचा उदय होईल व कदाचित आत्मारामाचे दर्शन सुद्धा!

         श्रवणभक्ती व कीर्तन भक्ती ही दोन्ही बहिरंग साधनेचे प्रकार आहेत, तर तिसरी नामस्मरण भक्ती हा मात्र अंतरंग साधनेचा प्रकार आहे. श्रवणभक्तीचा परिणाम नामसाधनेत झाला पाहिजे. महाराष्ट्रातील सारेच संत एकमुखाने आणि एक मताने नामस्मरणाचा महिमा सांगतात, त्याचे समर्थन करतात.

मुखी नाम हाती मोक्ष। ऐसी साक्ष बहुतांची।। असे नाथ महाराज म्हणतात तर, “रामनामें वाट चाली। यज्ञ पावलोपावलीं।। रामनाम ग्रासोग्रासीं तो जेविलाचि उपवासी।।” असे तुकोबाराय म्हणतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, श्री समर्थ या साऱ्यांनीच हरिपाठाचे अभंग लिहिले आहेत. नामसाधनेचे वैशिष्ट्य म्हणजे नाम घेताना कर्माचा अथवा संसाराचा त्याग करावा लागत नाही. नामानुसंधानात राहूनही व्यक्तीला आपले सारे व्यवहार सांभाळता येतात. नामसाधना सर्व जातीच्या आणि वर्णाच्या लोकांसाठी खुली आहे हे सुद्धा श्री समर्थ आवर्जून सांगतात.  गोंदवलेकर महाराज म्हणतात, जसा उंबरठ्यावर लावलेला दिवा हा अंगणात व घरात दोन्हीकडे प्रकाश टाकतो तद्वतच, वैखरीच्या उंबरठ्यावर लावलेला भगवंतनामाचा दिवा, मनुष्याच्या लौकिक आणि पारलौकिक जीवनात आनंदाचा प्रकाश भरून टाकतो.

          माणसाने एकट्याने प्रयत्न करून त्याला परमात्म्याचे ज्ञान प्राप्त होणार नाही. यासाठी त्याला सद्गुरूंचा सहवास व सत्संग याची आवश्यकता भासते. अध्यात्म शास्त्र हे अत्यंत गूढ आहे तर परब्रह्म ही संकल्पना अतिसूक्ष्म. आत्मज्ञान प्राप्त झालेल्या सत्पुरुषाच्या सान्निध्यात राहून साधना करणे यालाच श्री समर्थ पादसेवनभक्ती असे म्हणतात. शास्त्रकारांनी  याचे माता लक्ष्मीहे उत्तम उदाहरण सांगितले आहे.

रमासेवी पादांबुजे जाण तैसा। नमस्कार माझा सद्गुरू रामदासा।।     

देहबुद्धी चा संपूर्णपणे त्याग करून काया वाचा मनोभावे सद्गुरूंची सेवा करावी, त्यांनी दिलेला मंत्रजाप करावा, सतत भगवंताच्या अनुसंधानात राहावे. पक्षी आकाशमार्गाने जाताना किंवा मासा पाण्यातून धावताना जसा दिसत नाही तद्वतच अध्यात्म मार्ग हा अमूर्त आहे. पण संतांच्या सहवासात राहून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जाणे, त्यांचे अनुसरण करणे म्हणजे पादसेवनभक्तीहोय, असे समर्थ सांगतात.

पादसेवन चौथी भक्ती। पावन करितसे त्रिजगतीं। जयेकरितां सायुज्यमुक्ती। साधकास होये।।२५।।

(दशक ४,समास४)

          भावपूर्ण अंतःकरणाने भगवंताची पूजा करणे हा ईश्वर प्राप्तीचा अत्यंत साधा, सरळ व सुलभ मार्ग आहे. आपण एखादया धातूच्या मूर्तीची किंवा तसबिरीची पूजा करीत नसून प्रत्यक्ष भगवंतच तिथे आहेत असे समजून पूजा केली पाहिजे. पुढे श्री समर्थ असेही म्हणतात की आपल्या संप्रदायाचे जे तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन षोडशोपचारे पूजा केली पाहिजे. समर्थ सांगतात, काया, वाचा, मन, चित्त, वित्त, जीव आणि प्राण या सात गोष्टींचे एकरूपत्व ज्याला साधले त्याची अर्चन भक्ती फळाला आली. श्री समर्थांची अर्चनभक्तीची कल्पना अतिशय व्यापक आहे आणि मंदिराची संकल्पना ही समाजाभिमुख आहे हेही लक्षात येते. मानसपूजा ही सर्वश्रेष्ठ असे ते सांगतात. अनेक गोष्टी आपल्याला देवाला अर्पण कराव्याशा वाटतात पण काही कारणाने आपण त्या अर्पण करू शकत नाही. अशा वेळी मानसपूजा हा उत्तम मार्ग आहे. मनातल्या मनात आपल्या आवडत्या गोष्टीची धारणा करून त्या उपास्य दैवताला अर्पण करणे, भगवंताचा प्रत्यक्ष सहवास घडला नाही तरीही आपल्या मानसिक विश्वात त्याला सामावून घेणे म्हणजे मानसपूजा होय. यामध्ये भक्ताचा भाव अनन्य झाल्यास उपास्य देवतेचे प्रत्यक्ष दर्शन सुद्धा त्याला होऊ शकते. यासाठी आपल्या संत वाङ्मयात अनेक कथा सापडतात. संत नामदेवांच्या लहानपणची गोष्ट. विठ्ठलाने नैवेद्याची खीर खावी म्हणून त्याने बालहट्ट केला आणि विठ्ठलाने त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन ती खीर खाल्ली. भगवान रामकृष्ण देवीशी सतत बोलत. असे म्हणतात की तिने त्यांना प्रत्यक्ष दर्शनही  दिले होते. त्यांचे जीवन म्हणजे मानसपूजा कशी करावी याचे उत्तम उदाहरण आहे.

          भक्ती मध्ये लीनता किंवा नम्रपणा याला फार महत्त्व आहे. माऊली म्हणतात, “जगी धाकुटा होईजे। तया जवळीक माझी||” वंदनभक्ती हे त्याचेच प्रतीक आहे. ईश्वर प्राप्तीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे अहंकार! म्हणून देव, साधुसंत, सज्जन, तापसी, योगी यांना वंदन केले पाहिजे असे श्री समर्थ सांगतात. समर्थ पुढे असेही म्हणतात,

पशुपती श्रीपती आणि गभस्ती। यांच्या दर्शने दोष जाती। तैसाचि नमावा मारुती। नित्यनेमे विशेष।।६।।

( दशक ४,समास ६)       

 भगवंताने विभूती योगात आपले विभिन्न आविष्कार सांगितले आहेत. त्याचाच पुरस्कार करताना समर्थ म्हणतात, आपण नमस्कार करताना गुणांची अभिव्यक्ती पाहून नमस्कार करतो, त्याच्या सद्गुणांद्वारे भगवंतच तिथे प्रकट होतो. वंदन भक्तीतील परमोच्च अवस्था म्हणून अक्रूराचे उदाहरण दिले जाते. दिव्यांच्या अभिव्यक्तीत त्याच्या मेगावेटनुसार जरी तरतम भाव असला तरी विजेमध्ये कुठेही तरतमभाव नाही. जो साधक अत्यंत भावपूर्णतेने नमस्कार करतो, त्याला सद्गुरू जेंव्हा प्रेमाने स्पर्श करतात, तेंव्हा शक्तीपाता प्रमाणे त्या साधकाचे रूपांतरण होते. म्हणून नाईलाजास्तव कधीच नमस्कार करू नये, तर मनापासून आणि श्रद्धापूर्वक करावा. आकाशातून पडलेले पाणी जसे समुद्रालाच जाऊन मिळते, तसेच सर्व देवांना केलेला नमस्कार हा शेवटी केशवालाच जाऊन पोचतो.

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं | सर्व देव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति।।

          भक्ती मध्ये भाव हा अतिशय महत्वाचा. मी दास आहे आणि भगवंत माझा धनी, हा झाला दास्यभाव! वंदनभक्ती मध्ये सुरू झालेली लीनता दास्य भक्तीमध्ये पूर्ण फळाला येते. तुकोबा म्हणतात,”तरीच जन्माला यावे। दास विठ्ठलाचे व्हावे।।” सर्वच संतांनी स्वतःला भगवंताचे दास म्हणवून घेण्यात धन्यता मानली. हनुमंत हा दास्य भावाचे प्रतीक मानला जातो. हनुमंत हा पराक्रमी तर आहेच पण तो बुद्धिमान पण आहे, ‘बुद्धिमतां वरिष्ठंआहे. म्हणजे दास हा निर्बुद्ध किंवा दुबळा असतो असे नव्हे. भाव हा तात्पुरता नसतो तर अखंड असतो. भावना तात्पुरती असू शकते, पण भाव हा अखंडचं असला पाहिजे. एकीकडे स्वतःला देवाचा दास म्हणवून घ्यायचे आणि दुसरीकडे लोकांशी उर्मटपणाने बोलायचे हा विरोधाभास झाला. म्हणून दासाने सदैव नम्रच असले पाहिजे. पावसाची वृष्टी होत असताना, आकाशातून पडलेली गार जशी थोड्याच वेळात पाण्यात परिवर्तित होते तसेच दास्य भक्तीमध्ये लीन झालेला दास हा कालांतराने स्वतः स्वामीचं बनून जातो. दास्य भावात कुठलेही काम श्रेष्ठ कनिष्ठ असे द्वैत मनात ठेवू नये. छत्रपती शिवाजी महाराज चाफळच्या रामनवमी उत्सवात भोजने झाल्यावर शेणगोळा फिरवित असत. स्वतः भगवान श्रीकृष्ण घोड्याना खरारा करीत असत, युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात त्यांनी पत्रावळी उचलल्याचे सर्वश्रुत आहेच. अनेकदा भक्तांचा भाव पाहून भगवंतच त्याचे दास्यत्व पत्करतो. एकनाथांच्या घरी पाणी भरणारा श्रीखंड्या आणि जनाबाईची लुगडी धुणारा पांडुरंग ही त्याची बोलकी उदाहरणे नव्हेत काय? म्हणूनचं समर्थ म्हणतात,

दास्य सख्य भक्तीमिसे। संतसंगे श्रवण होतसे। अर्थास जीवी धरिजे मानसे। या नाव श्रद्धा।।(२०-कुबडी४)

          सख्यभक्ती म्हणजे अहंकार विसर्जनाचा अंतिम टप्पा. अर्जुन हे सख्यभक्ती चे उत्तम उदाहरण. सख्यभक्ती मध्ये शरीरे दोन असली तरी मन एकच असते. भगवंत व भक्त असे द्वैत उरतच नाही. माझे सर्व जावो। तुझे सर्व राहो।।असे श्री समर्थ म्हणतात. ज्याच्यावर आपले प्रेम आहे त्याला जे आवडते तसे आपण करायचे आणि त्याला जे आवडत नाही त्या गोष्टी टाळायचा हेच सख्य भक्तीचे लक्षण आहे. आपली इच्छाच संपणे हेच खरे सख्य भक्तीचे रहस्य आहे.

म्हणूनच असे म्हणतात की,

जैसे जयाचे भजन। तैसाचि देव आपण। म्हणौन हे आवघें जाण। आपणाची पासीं ।१४।।(दशक ४, समास८)       

 आकाशात मेघ नाहीत म्हणून चातक पक्षी नदीचे पाणी प्यायला किंवा चंद्र उगवला नाही म्हणून चकोराने दुसरा आहार घेतला असे होणे शक्य नाही. भक्ती सूत्रात नारद मुनी सांगतात, ‘तद् विस्मरणे परम व्याकुलता। तदर्पित अखिल आचारिता।।असा भक्त हा आईच्या कडेवरील लहान मुलासारखा असतो. या लहान मुलांचे सारे काही आई करते तसेच या भक्ताचे सारे जीवन भगवंत चालवतो. त्याच्या जीवनाचे सारथ्य स्वतः भगवंत करतो.

          आत्मनिवेदन भक्तीचे दोन प्रकार समर्थ सांगतात. पहिला, आपली सारी सुखदुःखे भगवंताला सांगणे, तर भगवंतापेक्षा स्वतःचे वेगळे अस्तित्वच शिल्लक न ठेवणे हा दुसरा! इथे भक्तच भगवत्स्वरुप होऊन जातो. सख्यभक्ती हा नदी सागरात मिळण्याचा टप्पा असेल तर आत्मनिवेदन म्हणजे नदी प्रत्यक्ष सागरात विलीन होण्याचा टप्पा आहे. जसे समुद्रात विलीन झालेली नदी नंतर वेगळी दाखवणे शक्य नाही, तसेच ज्याने भगवंताला जाणले तो त्याच्यापासून वेगळा राहूच शकत नाही. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत जीव आणि शिव निराळे आहेत. जीव शिवात विलीन झाल्यावर जीव शिल्लक राहात नाही आणि जीवाचे अस्तित्वच नसल्याने शिव म्हणण्याचे प्रयोजन उरत नाही. आत्मनिवेदन ही ज्ञानाची अवस्था असून हे ज्ञान ग्रंथाच्या अध्ययनाने नव्हे तर नवविधा भक्तीच्या यात्रेने प्राप्त झाले आहे. आत्मनिवेदन म्हणजे भक्तीतून जन्मलेले ज्ञान होय. मिठाची बाहुली जशी समुद्राची खोली बघण्यास जाते आणि त्यातच विरघळून जाते, तसेच भगवंत भेटीसाठी अधीर झालेला जीव स्वरूपाचे ज्ञान होताच आत्मसमर्पणाने शिवमय होऊन जातो. “देव पाहण्यासि गेलो, देव होवोनिया ठेलो” अशी त्याची अवस्था होऊन जाते. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “गायीबरोबर वासरू आणि आईबरोबर तान्हे मूल जसे आपोआप येते तसेच भक्तीबरोबर ज्ञानही आपोआपच येते.” साधकाच्या मनात भक्तीची तन्मयता, व्याकुळता वाढली की , आत्मज्ञान होऊ लागते.

      म्हणूनच, तेजस्वी साधकाने आपल्या परमार्थाची वाटचाल श्रवण भक्तीपासून सुरू करावी, आणि अंती आत्मनिवेदन भक्तीद्वारे स्वानंदसुख अनुभवून, स्वस्वरूपात विलीन होऊन जावे म्हणजेच सायोज्यमुक्ती प्राप्त करावी असे महापुरुष (श्रीसमर्थ) आज्ञा करतात..!!

****************************

संदर्भ : १) सार्थ श्री दासबोध- ह. भ. प. लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, सद्गुरू नारायण महाराज रामदासी संपादित, श्रीसमर्थ भक्त सुनीलजी चिंचोळकर लिखित, समास परिचय (सारांश)

२) दासबोधातील रहस्य: मारुतीबुवा रामदासी

३) दासबोध चिंतनसार: डॉ. विजय लाड

४) समर्थ भक्त निरूपणकार श्री रवींद्र पाठक यांचे ऑडिओ / सार लेखन लक्ष्मीकांत खांडके

****************************

मन परिवर्तनासाठी वाचा मनाचे श्लोक

आपल्या हिंदू  धर्मामध्ये म्हटल्या जाणाऱ्या विविध स्तोत्रांमध्ये, अभंगांमध्येभजनांमध्ये, श्लोकांमध्ये एक प्रकारचं सामर्थ्य आहे. गायत्री मंत्रासारख्या मंत्राचं सामर्थ्य तर वैज्ञानिक दृष्टीनेदेखील सिद्ध झालं आहे. स्तोत्रे, भजने, श्लोक म्हटल्यामुळे-  ऐकल्यामुळे किंवा वाचल्यामुळे व्यक्तीचा भौतिक दृष्टीने काहीही फायदा होत नाही किंवा व्यक्तीच्या जीवनात कोणतेही चमत्कार घडत नाहीत ! भौतिक लाभ प्राप्त होण्यासाठी कष्ट करावे लागतात. 

स्तोत्रे, भजने, श्लोकअभंग पठणामुळे- वाचनामुळे- ऐकण्यामुळे जर कोणताच भौतिक लाभ होत नाही, तर मग नेमका कोणता लाभ होतो असा प्रश्न निर्माण होतो. माझ्या मते, या गोष्टींच्या पठणामुळे- ऐकण्यामुळे- वाचनामुळे सर्वात मोठा लाभ होतो तो मन परिवर्तनाचा. याशिवाय मानसिक शांती मिळणे, मन खंबीर होणे, जीवनात सकारात्मकता निर्माण होण, आशावादी होणेभौतिक गोष्टींबद्दलची आसक्तीकमी होणे, वाईट कृत्ये न करणे हे आणि यासारखे विविध लाभ स्त्रोतांच्या, भजनांच्या, श्लोकांच्य, अभंगांच्या पठणामुळे – ऐकण्यामुळे – वाचनामुळे होतात असे मला वाटते. 

श्रीसमर्थ रामदासस्वामी रचित मनाच्या श्लोकांमध्ये सामर्थ्य आहे मनपरिवर्तनाचे. मनाच्या श्लोकांमधून आपल्याला मार्गदर्शन मिळते. एखाद्या प्रसंगात आपण कसे वागले पाहिजे, कोणता निर्णय घेतला पाहिजे याचेही मार्गदर्शन आपल्याला मिळते.

मनाचे श्लोक लयबद्ध पद्धतीने आणि स्पष्ट आवाजात म्हटल्याने  मन शांत होते असा माझा अनुभव आहे. मनाचे श्लोक  रोजच्या रोज वाचल्याने आपण त्या श्लोकांशी, हळूहळू एकरूप होऊ लागतो. मनाच्या काही श्लोकांचा अर्थ चटकन समजत नाही,पण मनाचे श्लोक म्हणण्यात सातत्य ठेवले की, मनाच्या सर्व श्लोकांचा अर्थ आपल्याला कळू लागतो. श्लोकांचा अर्थ समजल्यामुळे आपण अंतर्मुख होत जातो. आपल्या चुका आपल्या लक्षात येऊ लागतात. मनाचे श्लोक थोडे मोठ्या आवाजात म्हटल्याने मनाची तल्लीनता वाढून आपण त्या श्लोकांशी एकरूप होतो. मनाचे श्लोक म्हणताना एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपल्याभोवती निर्माण होऊ लागत. आपल्या मनाला धीर मिळतो. मनाला आलेले नैराश्य आणि शरीराला आलेला आळस दूर होतो. आपल्यामध्ये सकारात्मक शक्तीचा आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव वाढत जातो. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगाला आपण सहजपणे सामोरे जातो आणि त्यातून तरुनही जातो.

मनाच्या श्लोकांच्या नित्य पठणामुळे बुद्धी तल्लख बनते.

 

“मनाची शते ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती ॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ||२०५||”

मनाच्या श्लोकांच्या नित्य पठणामुळे आपण साधना करण्यास सक्षम होतो. आपल्या मनात आध्यात्मिक ज्ञान, वैराग्यभाव आणि आध्यात्मिक मार्गावर चालण्याचे सामर्थ्य उत्पन्न होते.  भौतिक गोष्टींबद्दल आपल्याला वाटणारी आसक्ती कुठल्याकुठे निघून जाते. मनाला एक प्रकारचे वैराग्य प्राप्त होते. आपली वाटचाल आध्यात्मिक मार्गाकडे होऊ लागते. परिणामी मोक्षाचा मार्ग खुला होतो.

समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक म्हणजे मनाला केलेल्या सूचनाच आहेत. मनाच्या श्लोकांचा अर्थ समजावून घेऊन जर आपण त्याप्रमाणे वागलो तर भरकटणारे आपले मन आपल्या ताब्यात येते. आपल्या मनात परिवर्तन होते. आपल्या हातून वाईट कृत्ये होत नाहीत, चांगलेच कर्म घडत जाते.  त्याचे फळही आपल्याला चांगलेच मिळते. चांगल्या कर्मामुळे आपल्या अंगी सात्विक वृत्ती वाढीस लागते. परिणामी आपल्यात अध्यात्माची आवड निर्माण होऊन मनाला एक प्रकारचे समाधान व शांती मिळते.   

प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात मानसिक समाधान आणि शांती हवी असते.  मनाचे श्लोक या दोन गोष्टी आपल्याला पुरेपूर मिळवून देतात. 

मनाच्या श्लोकांबाबतचा माझ्या एका मित्राचा अनुभव त्याच्याच शब्दात इथे सांगतो, तो जरूर वाचा.

मी एका खासगी कंपनीत नोकरीला होतो. निवृत्त होण्यास दहा वर्षे बाकी होती. काही  कारणाने कंपनीच्या मालाला मागणी कमी झाली. कंपनीने माझ्यासह अनेक कर्मचाऱ्यांना कमी केले. घरात एकदम सुतकी वातावरण निर्माण झाले. माझी दोन मुले अनुक्रमे इंजीनियरिंगला आणि बारावीला होती. 

मी व माझ्या पत्नीने घरखर्च कसा चालवावा याबद्दल बराच विचार केला. कंपनीकडून मला ग्रॅच्युईटीची रक्कम बँकेत ठेवावी व त्यातून येणाऱ्या व्याजावर घर चालवावे असा निर्णय आम्ही घेतला. त्याप्रमाणे ती रक्कम मी बँकेत ठेवली. त्या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून घर खर्च कसाबसा चालत होता. मात्र आजारपणंमुलांचे शिक्षण, सणासुदीनिमित्त होणारा खर्च काही आम्हाला झेपत नव्हता.  अखेर  एखादी खासगी नोकरी करावी असा निर्णय मी घेतला. नोकरीच्या शोधात फिरत असतानाच मी माझ्या एका मित्राच्या पुस्तकाच्या दुकानात गेलो. तेथे समर्थ रामदास स्वामी रचित मनाच्या श्लोकांचे छोटेसे पुस्तक माझ्या हाती पडले. ते छोटेसे पुस्तक मी विकत घेतले आणि घरी आलो . त्याच रात्री मी त्या पुस्तकातले सर्वच्या सर्व म्हणजे २०५ श्लोक वाचून काढले. सर्वच श्लोकांचा अर्थ काही समजला नाही.  पण तरीसुद्धा मनाचे श्लोक रोज वाचण्याचा निर्णय मी घेतला आणि त्याप्रमाणे हे श्लोक मी रोज वाचू लागलो.

मनाचे श्लोक वाचता वाचता माझ्यात कमालीचे परिवर्तन होऊ लागले. मनावरचे दडपण नाहीसे होऊन माझे मन हळूहळू शांत होऊ लागले. चिंता करणे हळूहळू कमी झाले. नोकरी मिळवण्याचे माझे प्रयत्न एकीकडे चालूच होते. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले !

पंधरा दिवसातच मला एका सराफी दुकानात अकाउंटंटची नोकरी मिळाली. आम्हा सर्वांना हायसे वाटले ! लवकरच मी माझ्या कामाने मालकांचा विश्वास संपादन केला. त्यांनी मला सहा महिन्यातच मोठी पगारवाढ दिली. 

त्यानंतरच्या दुसऱ्या वर्षी माझा मुलगा इंजिनियर होऊन नोकरीला लागला. धाकट्या मुलाला बारावीनंतर पॉलीटेक्निकला प्रवेश मिळाला. आमच्या घराला हळूहळू स्थैर्य मिळाले. सराफी दुकानात  मॅनेजर म्हणून मी वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत काम केले. दोन्ही मुलांचे विवाह झाले, आम्ही दोघे आजी-आजोबा झालो. आता सर्व काही सुरळीत चालू आहे.

असे असले तरी मनाच्या श्लोकांचे पठण मी,  माझी पत्नी आणि मुलांसह नियमितपणे आजही करीत आहे. नातवांनाही मी मनाचे श्लोक हळूहळू शिकवीत आहे. 

मनाच्या श्लोकांच्या पठणामुळे माझे मन आता कमालीचे शांत व स्थिर झाले आहे. काळजी करणे मी आता सोडले आहे. बिकट प्रसंगांवर आम्ही मात केली आहे. आता कोणत्याही सुखाची अपेक्षा नाही. एक प्रकारचे वैराग्य सध्या मी अनुभवत आहे.  भरून पावलो’ या भावनेने मी आणि माझी पत्नी आता कृतकृत्य जीवन जगत आहोत ! ” 

मुखीं राम विश्राम तेथें चि आहे |

सदानंद आनंद होऊनि राहे |

तयाविण तो सीण  संदेहकारी |

निजधाम हें नाम शोकापहारी || ( मनाचे श्लोक : ८६ ) 

हरीचिंतने मुक्तिकांता वरावी

मुक्ति नावाच्या वधूशी भक्त विवाह करतो व जीव–शिव ऐक्य भोगतो. प्रपंचात द्रव्य, कांता, देहसुख, मी, माझे, या कल्पनांचे वर्चस्व असते. आदर्श गृहस्थाश्रमाचे वर्णन समर्थ “संसारी असताच मुक्त | तो चि जाणावा संयुक्त | अखंड पाहे युक्तायुक्त | विचारणा हे” या ओवीत करतात. गृहस्थाश्रमात त्याग, समर्पण, आनंद, प्रयत्न, प्रेम, आपुलकी याला स्थान दिले तर असा गृहस्थ व त्याची पत्नी संन्यासीच असतात. ही कल्पना “मुक्तिकांता वरावी” या चरणात आहे. संत तुकाराम म्हणतात “ तुका म्हणे मुक्ति परिणली नोवरी | आता दिस चारी खेळीमेळी | म्हणजे आता मुक्ति नावाच्या स्त्रीशी मी विवाह केला आहे. या वैवाहीक जीवनात फक्त सुख व समाधानच आहे. 

आद्य शंकराचार्य म्हणतात “ योग रतो वा भोग रतो वा | संगस्तो वां संगविहीन | यस्य  ब्रह्मणि रमते चित्त | नंद ति नंद ति नन्द्त्येव” म्हणजे ज्याची अंत:करण वृत्ती ब्रह्मानुसंधानात रमलेली आहे तो भोगात रमलेला असला किंवा एकांतात असला तो पूर्णानंदात आनंदरूपच असतो. जनक राजा , मंडन मिश्र, अत्री अनूसूया, श्रीराम-सीता, शंकर-पार्वती यांचे गृहस्थाश्रम याच प्रकारचे होते. 

कल्याण स्वामी एका अभंगात म्हणतात “ आवडी म्या व रिला | गुरु वर आवडी म्या वरिला| स्वात्मसुखाचे कुंकुम लेऊनी | संसृतिशीण हरिला.  समर्थांनी दासबोध सांगितला.  कल्याण स्वामींनी लिहिला. त्या नंतर शिष्यांमधील मीपणा जाऊन वृत्ती पालटावी म्हणून आत्माराम ग्रंथ लिहिला. कल्याण स्वामींना कुंडलिनी जागृतीचा अनुभव दिला. तो त्यांनी सोलिव सुखात शब्दबद्ध केला. आज्ञाचक्रात आत्मज्ञानाची अनुभूती मिळाली. त्यांना चारी देहांचा विसर पडला, उन्मनी अवस्था अनुभवली, आत्म्याशी अंत:करण वृत्ती एकरूप झाली. वृत्ती शून्य अवस्थेचा अनुभव आला. गुरुरूपी अंतरात्म्यात त्यांचा आत्मा विलीन झाला. अद्वैत अवस्थेचे वर्णन कल्याण स्वामी करतात. “एकपण एकचि झाले | ऐक्यरूपी सम मिळाले | करुनिया सुख उधळले | नाहीपण जाऊनी” समर्थांच्या अवतार समाप्तीनंतरही समर्थांच्या व कल्याण स्वामींच्या आस्थींचे विसर्जन एकाच वेळी झाले. 

रुक्मिणी व श्रीकृष्णाचा विवाह म्हणजे शुद्ध जीव-ईश्वर यांचा विवाह होता. श्रीकृष्ण गोपाळ म्हणजे जितेंद्रिय होते. रुक्मिणी निरपेक्ष, निष्काम, विकाररहित, निर्विकार, सद्गुणी, सुंदर, चतुर होती. तिने सहा श्लोकात भगवंताच्या ऐश्वर्य, यश श्री, ज्ञान, वैराग्य, विवेक या सहा गुणांचे वर्णन केले. सातव्यात विनंती केली असा हा सप्तपदी संबंध होता. पत्र फक्त सात श्लोकांचे पण भक्ति भावाने त्यातील अक्षर व भाषा भरलेली होती. जणू तिने छोट्या घागरीत भक्तीचा पूर्ण सागर भरला होता. जीव जेव्हा ईश्वराशी विवाह करतो तेव्हाच कृतार्थ होतो. रुक्मिणी भगवंताची “आद्य शक्ति होती. ती अनन्य होती. श्रीकृष्णाशी विवाह नाही झाला तर ती शरीर त्याग करणार होती. तिचे पत्र नेणाराही “सुदेव” ब्राह्मण होता. सद्गुरूकृपेशिवाय जीव शिवमय होत नाही. 

रासक्रीडेत गोपींच्या सूक्ष्म देहाचे आत्ममिलन होते. गोपींनी विषयांचा, कामविकारांचा, त्याग केलेला होता. गोपी पांच भौतिक शरीराने घरी होत्या. प्रभूची रासलीला शुद्ध प्रेमाची होती. “हरिचिंतने मुक्ति कांता वरावी” याचे चिंतन करतांना मुक्तिकांतेचे रूपकात्मक वर्णन करू शकतो. ही कांता स्वात्मसुखाचे कुंकू आज्ञा चक्रावर दोन भुवयांमध्ये लावते. आत्मबुद्धीची पैठणी नेसते. “ बहू जीर्ण झाली देह बुद्धी कंथा” या वचनाप्रमाणे देहबुद्धी नष्ट करते. नवविधा भक्तीचा रत्नाहार घालते. सहस्रधर चक्रावर बिंदी घालते. विवेक-वैराग्याची कुंडले कानी घालते. षट संपत्तीच्या बांगड्या  (शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा, समाधान) सारासार विचाराच्या पाटल्या घालणे अभेदाच्या वाक्या घालून मनातले भेद घालवते. परावाणीवर कंबरपट्टा घालते व सोsहं नादाची नथ घालते. मुक्तीसाठी या सर्व गोष्टी कराव्या लागतात. अद्वैताच्या फुलांच्या हाराने हा विवाह संपन्न होतो.

सर्व प्रकारच्या अज्ञानापासून, दु:खापासून, बंधनापासून, वासनांपासून, मोकळे होण्याची अवस्था म्हणजे मुक्ती त्यालाच अमृतत्वाची प्राप्ती, व कैवल्य असे म्हणतात. मीरेनी श्रीकृष्णाशी आध्यात्मिक विवाह करून ती मुक्त झाली. हरीचिंतने मुक्तिकान्ता वरावी या चरणात इतका अर्थ चिंतन करण्यासारखा आहे. 

आवडी म्या वरिला | गुरुवर आवडि म्या वरिला |

स्वात्म सुखाचे कुंकुम लेऊनि | संसृति शीण हरिला |

स्वात्म भूषणे भूषविले मज | संशय नच उरला |

गुरुकृपे कल्याणचि होईल | निश्चय मनी स्थिरला ||

                  

|| जय जय रघुवीर समर्थ ||

षड् विकार

विकार म्हणजे बदल ,फेरबदल परिवर्तन आणि चित्तक्षोभ.

आपल्या अध्यात्म शास्त्रात सहा विकार सांगितले आहेत.

अस्ति जायते वर्धते विपरणमिते क्षीयते आणि म्रीयते किंवा अस्तित्व, जन्म, वाढ, बदल, क्षीणता आणि मृत्यू हे सहा विकार कोणाला आहेत? तर जे निर्माण झालं त्या सगळ्यालाच. मग प्रश्न असा पडतो

जायतेच्या अगोदर अस्ति कसे काय आले? कसं काय?

पण असं पहा की माठ, सुगड, सुरई, रांजण इत्यादी वस्तू बनवण्यासाठी, त्या निर्माण करण्यासाठी आधी माती लागते. पाणी, कुंभार, त्याची तयार झालेली वस्तू पक्की करायला अग्नी हे सगळंच लागतं हे खरं आहे. पण माती असल्याशिवाय काहीच बनवता येणार नाही हेही तितकच खरं म्हणजे मातीचे अस्तित्व आधी असायला हवं. निरनिराळी वस्त्रे बनवायला धागा, यंत्र, कुशल कारागीर आणि मुख्य म्हणजे कापूस हवा. म्हणजे कापूस असल्याशिवाय बाकी काही होणार नाही. तसे, अलंकार बनवायचे तर सोने  असल्याशिवाय ते बनणार नाहीत. म्हणजे माती, पाणी, सोनं हे सारच अस्तित्वात आल्याशिवाय कारागीर   कितीही कुशल असला तरी त्याचा उपयोग नाही. आता आणखी काही उदाहरण बघू दुधाचं दही होणं, कैरीचा आंबा होण किंवा कच्च फळ  पक्व होणे, धान्य शिजवणं, भाज्या शिजवून अन्न तयार करणे हे सारे विकारच आहेत लौकिक भाषेत आपण त्याला रासायनिक बदल असेही म्हणतो. ते शाश्वत असतात हेही शिकलोय. आपण पण लौकिकातील शाश्वत आणि अध्यात्म शास्त्रातील शाश्वत हे भिन्न आहेत. दह्याचं पुन्हा दुधात रूपांतर होत नाही किंवा आंब्याची कैरी होत नाही. भातापासून पुन्हा तांदूळ होत नाही. कच्च्या भाज्या  परत मिळवता येत नाहीत.म्हणजेच  हे बदल कायमस्वरूपी आहेत. असं जरी असलं तरी दही खराब होतं, आंबा सडतो किंवा शिजवलेले अन्न खराब होते. काही तासदिवस, महिने असा त्याचा कालावधी असतो. म्हणजेच ते कायमस्वरूपी नाही. नष्ट होणारच आहे. बर, हे विश्व डोळ्यांना दिसते. प्रचंड विस्तार आहे. आपल्या सूर्यमाले सारख्या अनेक सूर्यमाला आहेत असं आज खगोलशास्त्रही सांगते. पण आपले अध्यात्मशास्त्र काय सांगते?

जे उपजे ते नाशे” | मग विश्व पण नाहीस होणारच ना ! मग त्याआधी अस्तित्व कशाचे? कशापासून, कशामुळे ही ब्रम्हांडे जन्माला आली?

तर अष्टधा प्रकृती पासून. पण ती सुद्धा नश्वरच आहे. त्यांना कोणी निर्माण केले तर परमात्म्याच्या शक्तीने! त्या शक्ती सुद्धा अनंत आहेत म्हणजेच परमात्मा अस्तित्वात आहे म्हणून जग निर्माण झाले. समर्थ दासबोधात सांगतात –

मूळ माया तेची मूळ पुरुष l तोचि सर्वांचा ईश l

अनंतनामी जगदीश l तयासी बोलिजे ll ८/३/२० ll

 

पण परमात्म्याला विकार नाहीत, तो कालातीत, गुणातीत, देहातीत आहे, तशी मूळमायाही अव्यक्तच!

पण तिच्या शक्ती गुणक्षोभिणी माया, जडमाया या विश्व निर्मिती करतात. अर्थातच मूळमाया, गुण माया, पंचभूते इत्यादी निर्माण झाले तरी परब्रह्म तसेच अविकारी, अचल आहे. ते निर्गुण निराकार होते. सगुणपंचभूते इत्यादी निर्माण झाले तरी परब्रह्म तसेच अविकारी, अचल आहे. ते निर्गुण निराकार होते ते सगुण निराकार झाले, ते मायोपाधित ब्रह्म. मग विश्वाची निर्मिती झाली.

वर्धते

बर, निर्मिती झाल्यावर ते तसेच राहिले का? अर्थातच नाही. अनेक ब्रह्मांडे, चार खाणी इत्यादी निर्माण झाले, त्यांची वाढ झाली आणि दृश्य विश्व निर्माण झाले – यात पिलू हळू हळू वाढतेच. सामान्यपणे आपण बाल, किशोर, प्रौढ अशा अवस्था पाहतो. पक्ष्याचे अंड्यातून बाहेर येणारे पिलू काही दिवसातच भरारी घेते. वनस्पतीच्या बीजातून अंकूर कोंब फुटताना दिसतो. त्यातून आपण  रोपं, झाडं झालेले पाहतो.  काही प्राण्यात पिलू मादीच्या शरीरातून जन्माला येते, तर काही वनस्पती मुळापासून, खोडापासून, फांद्यापासून, पानांपासून जन्माला येतात. तसे इतर प्राण्यात सहसा होत नाही.जन्माला आलेला जीव पुढे वाढतो, पण सर्वांचे स्वभाव, गुण, वृत्ती सारख्या नसतात. तसेच अचेतनातही इतक्या सूक्ष्म प्रमाणात होते की सामान्य माणूस ते जाणत नाही. उदा. हिमालयाची उंची वाढते, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते, अचानक नदी, तळी यांच्या जलसाठ्यात वाढ होते. सर्व सृष्टी माया – आकाश – वायू – तेज – आप – पृथ्वी या क्रमाने निर्माण झाली. महाभूतांचे गुण ही सांगितले आहेत. सृष्टीत विविधता आढळते आणि अर्थातच नामरूपेही भिन्न आहेत.

विपरणमिते, क्षीयते –

जन्म झाल्यावर सचेतन असो वा अचेतन,  त्यात वाढ, विकास होतो. (कमी जास्त).

प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, मनुष्य, वनस्पती यांच्यात बदलाची प्रक्रिया सुरू असतेच. वजन उंचीत बदल होतोच पण शरीरातील संप्रेरकात काही बदल होत असतात. तरुण प्रौढ होतो, प्रौढ वृद्ध होतो. साऱ्या शक्ती क्षीण होत जातात. आपणही म्हणतो बघा पहिल्यासारखे आणि आधीसारखे वेगाने काम होत नाही.ही क्षीणता सर्वच सचेतनात दिसते – प्रमाण कमी जास्त. वनस्पतीमध्येही पान गळती, कुठे झाडं मोडून पडणे हे  दिसतेच. कडे कोसळून डोंगराचा ऱ्हास होतो, तर कुठे पाणी आटून नदी, तळी – जल साठ्यांचा ऱ्हास  होतो. वादळाने धूळ एका ठिकाणाहून दुसरीकडे जाते. पूर्वी डोंगरांना पंख होते असे पुराणात वाचायला मिळते आणि आज तर कोणत्याच पर्वताला पंख नाहीत. त्यांच्यातील हा बदल, ऱ्हास / मृत्यू म्हणता येईल. अगदी पृथ्वीचा व्यास ही कमी होतो आहे असे आज शास्त्रज्ञ सांगतात.

 

म्रियते  –

वृद्ध प्राणी शक्ती क्षीण झाल्याने, रोगाला बळी पडल्याने मृत होतो. प्राणी, पक्षी सुद्धा ठराविक काळाने काहीवेळा रोगाने मृत होतात. पूर्वीचे डायनासोर सारखे महाकाय प्राणी, काही पक्षाच्या जाती तर आता नामशेष झाल्या आहेत. पण इतर प्राणी, मनुष्य प्राणी आपल्याच शरीरात अस्तित्व टिकवण्याचे बीज राखून असतो आणि अनेक जन्मातून फिरत राहतो.

मग अचेतनाला मृत्यू / विनाश आहे का? असा प्रश्न येतोच.

तर आहेच. त्याची झलक आपल्याला त्सुनामी, ढगफुटी, महापूर, तीव्र दुष्काळ इत्यादितून पाहायला मिळते.

आता विकार म्हणजे चित्तक्षोभ असा अर्थ घेतला की सारे बदल चित्त शांत, स्थिर करण्यासाठी होतात. परमार्थात हे अंतरंगातील बदल अपेक्षित आहेत आणि ते ही कायमस्वरूपी! कारण मनुष्य लवकर मोहग्रस्त होतो (अर्जुनाला आठवून पाहा), परमार्थ मार्गात अडथळे खूप, तेही आपणच  निर्माण करतो. कारण निर्माण होऊ देणारेही आपल्या आतच असतात, म्हणून चित्तशुद्धी साठी प्रयत्न हवेत. तेही सातत्याने! नाहीतर खाली घसरणे आहेच. जन्म मृत्यू चक्रातून सुटका नाही.

म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा |”

रोजची उगवणारी पहाट तशीच आयुष्याची सुरुवात (बालपण) ही सुद्धा पहाटच!

मग आपल्या अज्ञानाला दूर करून ज्ञान प्राप्तीची सुरुवात ही पण पहाटच, तो ही विकारच!

|| श्रीराममंत्राचे श्लोक ||

शास्त्र, वेद इत्यादी पेक्षा ही रामनाम श्रेष्ठ आहे  असे श्रीसमर्थांचे श्रीराममंत्राचे एकूण ४९ श्लोक आहेत. कलियुगातील धकाधकीच्या जीवनशैलीत, राममंत्रश्लोक म्हणजे सुखी शांत समाधानी जीवन जगण्याचा श्रीसमर्थांनी दाखवलेला अत्यंत सुंदर सोपा मार्ग आहे. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे |’ हे चरण घेत मंत्राचे महत्व सांगितले आहे. यात माणसाने काय करु नये याची यादीच दिली आहे. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी बहुपुण्याने नरदेह मिळाला आहे तो विषयात, प्रपंचात न गुंतवता त्याचे सार्थक करावे यासाठी राममंत्राचे प्रयोजन. 

      

बालपण खेळ व शिक्षणात जाते. तारुण्यात आधी स्वतःचे लग्न, नंतर मुलांचे शिक्षण, मुंज, लग्न या प्रपंचासाठी नोकरी व्यवसाय करताना, यश; किर्ती; वैभव; स्थावर जंगम; प्राप्तीसाठी, घाण्याला बैल जुंपल्याप्रमाणे आयुष्य रात्रंदिवस खर्ची घालतो. खूप द्रव्य कमावतो कधी पत्नीप्रेमात मातृपितृऋण विसरतो. गुळाला मुंगळे तसे द्रव्यासाठी आप्तइष्ट चिकटतात. लोकेषणेत साधुसंत यांना मदाने बोलतो. आपल्या अवतीभोवती असलेल्या काही वृद्ध तर काही तरुणांचे मृत्यु पहावे लागतात. काहींच्या वाट्याला स्वतःच्या मुलांचे क्रियाकर्म करण्याचे दुर्दैव येते. यातच तारुण्य संपून वृद्धावस्था येते. 

देह विषयभोगात रमला तर पुढे अनेक रोग होतात. म्हातारपणी डोळे, कान, नाक, दात क्षीण होतात. इंद्रियांवर ताबा राहिला नाही की मुले कन्या, सून नातवंडे बोलू लागतात. घरातील सर्वांनाच कंटाळा येतो. शेजारीपाजारी बोलू लागतात. आयुष्य लोडाला टेकून ऐश्वर्यात घालवलेले, पण म्हातारपणाचा काळ कठिण जातो. सगळे आपल्या मृत्युची वाट पाहत आहेत, हे पाहून वाईट वाटते. पण दिवसही संपतासंपत नाहीत. अंतसमयी कोणी कोणाचे नाही हेच सत्य आहे. पण काळाच्या हातात मापदंड आहे. काटेकोर तराजू घेऊन तो मोजमाप करीत असतो म्हणून त्याला मापारी म्हटले आहे. 

 

काळ कसा आहे ? काळा, गोरा की सावळा, उंच की बुटका ? जीवास एकदम न सांगता घेऊन जातो म्हणून वेडा की; न सांगता आपले कार्य चोख बजावतो म्हणून शहाणा ? काळ नेमका कसा आहे हे कोणीही पाहिले नाही. पण तो त्याचे अस्तित्व दाखवतो म्हणून आहे हे निश्चित. हा काळ पक्षी नसला तरी त्याच्या गतीला आकाश सुद्धा कमी पडते. त्याच्या गतीला कोणीही बाधा आणू शकत नाही, आणि या काळापासून कोणीही कोणालाही वाचवू शकत नाही. या काळाचे सावज चराचरातील सगळे जीव आहेत. म्हणून समर्थ विनवणी करतात की काळाची गती ओळखा. आपण त्याचे सावज आहोत. तो पक्षासारखा कधीही येऊन झडप घालून माणूसरूपी त्याचे भक्ष घेऊन जातो. तेव्हा आताच सावध होऊन काळाची गती ओळखा. म्हणून समर्थ म्हणतात ‘रवीसुत ते दूत विक्राळ येती |’ रवीसुत म्हणजे सूर्यपुत्र यमराजा. यमराजाचे यमदूत आपल्याला सांगून येत नाहीत. त्यांच्याकडे आपल्या कर्माचा अगदी शंभर टक्के बरोबर हिशोब असतो. तिथे कोणालाही दयामाया, क्षमा, माफी नाही. ‘दशग्रीव लंकापुरी मस्त जाला |’ सोन्याची नगरी असलेला लंकापती  रावण यालाही मृत्यु आला. पण द्वेषाने का असेना अखंड रामाच्या स्मरणात दिवस गेल्याने मोक्ष मिळाला. आणि नित्य रामनामस्मरणात रमणारा बिभीषण चिरंजीवपद पावून लंकेचा राजा झाला. 

तपस्वी मनस्वी भले पार गेले | दुजी सृष्टिकर्ते असे थोर मेले |

चिरंजीव कल्पायु गेले किती रे |२२||

मृत्युसमयी काळ कोणाचेही रूप, संपत्ती, महती, तपाचरण या कशाचाही विचार न करता एका क्षणात घेऊन जातो. मग पुढे केलेल्या कर्माचे फळ भोगणे आले. पापकर्म केले तर यमयातना भोगाव्या, पुण्यकर्म केले तर स्वर्गलोक भोगावा. पण दोन्ही ठिकाणचे  भोग भोगून संपले की पुन्हा या भुलोकावर जन्माला येणे आहेच, मोक्ष नाही. जन्ममृत्यु चक्रातून सुटका नाही. प्रारब्ध संचित या प्रमाणे नवा जन्म.

नवा जीव मातेच्या उदरात नऊ महीने ‘अधोमुख विष्ठेमधे मायपोटी’ गर्भयातना भोगतो. श्रीसमर्थांनी या देहाला केतकीचे बन म्हटले आहे कारण जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा केतकीसारखा सोन्यासारखा शुद्ध स्वरुप असतो. नंतर मोठा होताना अहंकाराचे-षड्रिपुचे एकेक डाग लागत त्याचे स्वरुप बदलत जाते. 

सोsहं सोsहं म्हणणारा जीव कोsहं कोsहं म्हणत राहतो. जन्माला येताना एकटे येतो. मृत्युनंतर जाताना स्मशानापर्यंत सोबत येतात, पुढे एकटा प्रवास. जन्माला येताना कमजोर येतो. वृद्धापकाळी जाताना कमजोरच जातो. जन्माला येताना पैसा, सामान काहीही न घेता येतो. जातानाही पैसा, सामान, कुटुंब, जायदाद काहीही सोबत येत नाही. जन्माला आल्यावर पहिले स्नान दुसऱ्याच कोणी घातलेले असते. शेवटचे स्नान पण दुसरेच घालतात. आयुष्य हे असेच आहे. मग त्यात षड्रिपु, अहंकार, विषयवासना एषणा कशाला हव्या ? आपण या जगात काही ठराविक काळापूरते आलो म्हणून जीवन इतर फालतू कामात घालवणे पढतमूर्खपणा आहे. ‘कसी जन्मुनी माय त्वां वांझ केली’  वंशाला लाजिरवाणा असा भूमीला भार जणू धोंडा. धोंडा तरी काही कामाला येतो.

म्हणून समर्थ या राममंत्राचे श्लोकातून काय करु नये ते सांगताना म्हणतात – 

नको योग अष्टांग तो रोध प्राणा | नको कृच्छचांद्रयणी हट्ट जाणा ||

अपभ्रंश हा मार्ग की वोखटा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||१७||

तसेच ‘ नको तू कदापी करु तीर्थयात्रा | तनूदंडणी क्षीणता सर्व गात्रा |

करी ग्रस्त आयुष्य तू कोणसारे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||२०||

अलंकारमानी तनू सजवीतो | मना दर्पणी पाहुनी रंजवितो |

कळेना जळे सर्पणी रूप ते रे |

म्हणून हा मनुष्य देह सजवण्यापेक्षा आत्मा ‘राममंत्राने’ सजव. समारोपात समर्थ म्हणतात-

‘महाघोर हा थोर संसार मोठा | कळे संतसंगे समुळीच खोटा |

कळे भक्ति मुक्ती विरक्तीच गा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||४६||

हे संत सद्गुरू पंचाक्षरी मांत्रिक आहेत. निःसंशय ते मिथ्या संसाराची भूतबाधा काढून टाकून, युक्तीने देहबुद्धीची राखरांगोळी करीत आत्मबुद्धी जागृत करीत, रामनामबीजमंत्राने पश्चातापदग्ध करुन, अनुतापाच्या चटक्याने जागे करीत, विवेकरूपी फोकाचे मार देत, धि:काराची धुरी देऊन साधकातील दोष काढून टाकतात. अंतराची तगमग वाढवून, जीवावर पुन्हापुन्हा येणाऱ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या  संकटाची जाणीव करुन देत, मातृवत्सल भावाने त्यातून निश्चितपणे सोडवत मोक्ष प्राप्त करुन देतात. यासाठी हे माणसा ! सगळी  साधने सोडून देवून फक्त मनोमनी रामनाम मंत्राला वंदन करीत रामनामबीजमंत्र जप. या भवसागरातून सोडवणारा तोच एकमेव रामबाण उपाय आहे. 

कली साधने याविणे सर्व निंदी | हरे राम हा मंत्र जो त्यासि वंदी |

हरे राम हे माळिका साध का रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||४९||

प्रभूप्राप्ती कुलूपाची खरी मूळ किल्ली रामनाम हीच आहे. रामनामापुढे वेद, शास्त्रे, पुराणे ग्रंथाभ्यास सर्व त्यागून ‘राम’ हा एकच नाममंत्र जो अखंड जपतो, त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होतो.  

|| रामकृष्णहरी ||

।।येथे कां रे उभा श्रीरामा।।

येथे कां रे उभा श्रीरामा| मनमोहन मेघश्यामा  ||१||

चाप बाण काय केलें । कर कटावरी ठेविले  ||२||

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला  ||३||

काय जाली अयोध्यापुरी । येथे बसविली पंढरी  ||४||

शरयूगंगा काय केली । कैची भीमा मेळविली  ||५||

किल्किलाट वानरांचे ।थवे न दिसती तयांचे  ||६||

दिसे हनुमंत एकला । हा कां सैन्यांतुनी  फूटला  ||७||

काय जाली सीता सती । येथे बहुत जन दिसती  ||८||

रामदासीं सद् भाव जाणा ।  राम जाला पंढरिराणा  || ९||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

पंढरपूरला विठ्ठलाच्या प्रथम दर्शनाचे वेळी रामदासांनी रचलेला हा अभंग. अनंत दास रामदासी लिखित श्री समर्थांचा गाथा या पुस्तकात हा अभंग क्रमांक ४८ असा आहे. त्यांच्याच श्री दासायन या ग्रंथात असे आढळते की समर्थ शके १५५४ ते शके १५६५ या काळात तीर्थयात्रा  करीत होते. यात्राक्रम तपासला असता काशी, प्रयाग, अयोध्या, बद्रीनारायण, रामेश्वर,           शैल्यपर्वत, गोकर्ण महाबळेश्वर, चिपळूण-परशुराम, महाबळेश्वर, भीमाशंकर, शिखर शिंगणापूर, पंढरपूर असा प्रवास करून शेवटी त्र्यंबकेश्वर करून पंचवटी येथे आले.  (संदर्भ:- श्रीदासायन   पान ८०)  

यात्रेदरम्यान समर्थ अनेक देव देवतांचे दर्शन घेत, त्या त्या दैवतांची यथासांग पूजा अर्चा करीत होते. त्या त्या देवाची स्तुती करणारी पदे आरत्या श्रीसमर्थांनी लिहिल्या. तरी त्यांच्या मनात हृदयात श्रीराम हेच आराध्य दैवत स्थिर होते. त्याचाच अखंड ध्यास समर्थांना लागलेला होता. प्रस्तुत अभंग हा समर्थांच्या अंतरी केवळ श्रीरामांचे अनुसंधान लागले होते याची साक्ष पटवून देणारा आहे. श्रीसमर्थ पंढरपुरी आले खरे. पण भावविभोर अवस्थेत त्यांना पंढरीच्या जागी अयोध्या व चंद्रभागेऐवजी शरयू नदी दिसू लागली. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, तेव्हा तेथे श्रीराम रूपच  दिसू  लागले. तथापि  त्यांच्या हृदयातील रामप्रतीमेपेक्षा हे रूप वेगळे भासले, ते पाहून त्यांना पडलेले प्रश्नच प्रस्तुत अभंगात समर्थ आराध्य दैवत श्रीरामांना विचारत आहेत.

सर्वत्र यवनांच्या अत्याचाराने समाज गांजला असताना आपले आराध्य दैवत एकटे आणि नि:शस्त्र कसे? शरसंधान करायला सदैव सज्ज असणारे हे हात कमरेवर ठेवून कळिकाळाचा थरकाप उठवणारे राम प्रभू इथे स्वस्थ कसे?  हा समर्थांचा प्रश्न आहे, सर्व देश फिरून आल्यावर, सगळीकडची दैन्यावस्था पाहून आल्यावर पडलेला हा प्रश्न आहे हे खूप महत्वाचे आहे. 

दाशरथी राम अयोध्येचा राजा होता. हनुमंताने रामाचा वनवासी तपोवेश आणि राज्याभिषेकानंतरचा राजवेश पाहिला होता. लंकेतला समरप्रसंगी रुद्रावतार व नंतरचे शांत प्रजावत्सल रूप पाहिले होते. हनुमंताने कृष्णावतार व त्यातील बाललीला व महाभारत युद्धातील चतुरस्त्र सहभाग पाहिला होता. श्री समर्थ हे हनुमंताचे अंशावतार म्हटले जातात. अर्थात त्यांच्या मनात हे सारे प्रश्न येणे अत्यंत स्वाभाविक होते.

श्री विठ्ठल रूप अत्यंत साधे आहे, त्यात हरि व हर दोघांचे एकत्रीकरण आहे, शिरी शिवपिंडी आहे. विष्णू प्रतीक म्हणून मकर कुंडले, कौस्तुभ मणी, उजव्या हाती कमलाचा देठ आहे, उजव्या वक्षस्थळी भृगूऋषींनी केलेल्या प्रहाराचे चिन्ह आहे, नाभीत ब्रह्म देवाचे जन्म स्थान आहे व कटिस मेखलारूपी करदोटा आहे. कृष्ण अवतारातील घुंगुरवाळी काठी व उजव्या हाती पांचजन्य शंख आहे. म्हणून समर्थ विचारतात देवा हे वेषांतर करून अबोल का आहात? 

अयोध्या नगरीचा विध्वंस पाहून समर्थ पंढरपुरी आले असल्यामुळे  देवाला विचारतात की देवा अयोध्या आपली राजधानी सोडून पंढरी का वसवली? अयोध्या ही राजधानी नावाप्रमाणेच अवध्य होती. शस्त्रास्त्र सज्ज नगरी होती. तेथील नागरिक, सुशील सात्विक सामर्थ्यशाली होते.  मोठे शक्तिशाली  सैन्य होते. या सा-याचीच आज अत्यंत गरज असताना इथे पंढरीत रामराजा काय करतो आहेस? 

पंढरी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी होती.अनेक संत इथे भक्तीभावाने येत व विठ्ठल चरणी लीन होत.समर्थ पंढरीचे महत्व जाणून होते. पण त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची नितांत आवश्यकता व तातडी जाणवलेली असल्याचे या अभंगातून दिसते. भक्ती उपासना निर्वेध चालवयाची असेल तर, समर्थ राज्य व्यवस्था रक्षणासाठी सुसज्जच असलीच पाहिजे. 

हा विवेक न राहिल्याने विजय नगर, देवगिरी व अयोध्या येथील हिंदु राजवटी धुळीस मिळाल्याची खंत समर्थ व्यक्त करीत आहेत, ते सारे प्रत्यक्ष अवलोकन करून श्रीसमर्थ श्रीविठ्ठलासमोर उभे होते. त्यांच्या मनातील आंदोलने व्याकुळता तळमळ हे सारे या अभंगात दिसून येते आहे.  जणु ते विठ्ठल रूपातील रामाला नेमकं ओळखून आठवण देतात की आपल्या वैभवशाली नगरीनजीक, गंगेसमान पवित्र व विशाल शरयू नदी होती. वानरांचा किलकिलाट होता आणि इथे मात्र शांतता जाणवते आहे. रामाने वानर म्हणजे वनवासी नरांना शस्त्रसज्ज व युद्ध सन्मुख केले व यशश्री तुम्ही सुद्धा मिळवू शकता असा दुर्दम्य विश्वास दिला. सद्यस्थितीत हेच बळ हाच दुर्दम्य आशावाद व हिंमत समाजाला देणारे युयुत्सु नेतृत्व हवे आहे व त्याचे प्रतीक        ‘राजाराम’ हे लोकांचे आराध्य दैवत असणे गरजेचे आहे हे श्रीसमर्थ सांगत आहेत.

इथे हनुमंत एकटा आहे. खरंतर तो वानरयुथ मुख्य आहे म्हणजे ससैन्य असला पाहिजे. दास मारुती भक्तीचे प्रतीक. तो एकटा असतो पण वीर मारुती हा ससैन्य व अग्रभागी असे याचेही स्मरण श्रीसमर्थ रामाला (विठ्ठलाला) व पर्यायाने समाजमनात असलेल्या जगदीश्वराला देत आहेत. त्याने योग्य तो बदल घडवून आणावा अशी विनंती केली आहे.

श्रीराम-जानकी हे शिव-शक्ती, माया-ब्रह्म, गणेश-शारदा असे ज्ञान व सामर्थ्य, बुद्धी व शक्तीस्त्रोत यांचे अविच्छिन्न स्वरूप आहे. इथे तर सीतामाई दिसत नाहीत. अनेक लोक मात्र दिसतात, असे समर्थ म्हणतात तेव्हा हे जन एका उद्दिष्टाने प्रेरित नाहीत, सुसंघटीत नाहीत, एकजिनसी नाहीत म्हणून शक्ती विखुरलेली आहे आणि  ती कार्यान्वित होत नाही हे समर्थ सांगत असावेत.

शेवटच्या दोन ओळीत समर्थ म्हणतात की खरा रामदासी रामरायाला ओळखतो. त्याने कितीही वेगळे रुप घेतले, स्थान बदलले, वेशभूषा बदलली तरी ओळख पटते. कारण रामदासी ‘वरवर’ पाहत नसून दैवतांची  ‘अंतरंग परीक्षा’  करणे जाणतो.

म्हणून सध्या रामराय पंढरीत विठ्ठल रूपाने स्थित आहेत हे श्रीसमर्थांनी ओळखले आहे. विठ्ठलरूप समोर दिसत असूनही त्यात अनुस्यूत असलेले ‘रामरुप परमचैतन्य’ ध्यानात घेऊन समर्थ त्याची पूजा बांधतात. अनेक रूपात एकच परमेश्वर अनुभवणे ही भक्तांची शक्ती आहे, सिद्धी आहे व त्याचे दर्शन या प्रस्तुत अभंगातून घडते.

(काव्याची काल निश्चिती :- श्री समर्थ पंढरपूरला परत शालिवाहन शके १५७१ च्या आषाढ महिन्यात गेल्याचा उल्लेख वाकेनिशी टिपण व बखर या दोन्हीत आला आहे. समर्थ कृष्णातीरी भ्रमण करत असताना वारकरी जथ्याने पंढरपूर येथे जात होते व त्यांनी समर्थांना आषाढवारी साठी बरोबर यायचा आग्रह केला. समर्थ श्रीरामा शिवाय इतर दैवता कडे जायला तयार नव्हते. पण विठ्ठल भट नावाच्या वृद्ध वारक-याने आग्रह केल्याने ते पंढरपूरला गेले आणि तिथे विठ्ठल दर्शन त्यांनी घेतले असा हा कथाभाग आहे. त्यावेळी हे काव्य समर्थांना स्फुरले.                 संदर्भ:-‘श्री दासायन’, ले. अनंतदास रामदासी, पान क्रमांक २०१ सर्ग, चापबाण काय केले)

||जय जय रघुवीर समर्थ||

मारुती स्तोत्र पहिले

दास्यभक्तीचे एकमेव उदाहरण म्हणजे श्रीरामाचा भक्त हनुमंत होय. अलौकिक बुद्धीचे वरदान त्याला लाभले होते. हनुमंताने श्रीरामाचे दास्यत्व पत्करले, त्या हनुमंताच्या गोष्टी आपण रामायणकालापासून ऐकत आलो आहोत .पण समर्थांनी आपल्यासमोर जे मारुतीराय उभे केले आहेत ते शक्ती, युक्ती आणि उपासना याचे प्रतीक आहेत ,कारण समर्थांना त्या काळात शक्ती, युक्ती आणि उपासना यांच्याद्वारे समाजाला बलाढ्य करायचे होते. मरगळलेल्या आणि चेतनाहीन बनलेल्या महाराष्ट्राला संघटित करायचे होते .त्यांना बलोपासनेचा संदेश द्यायचा होता

हनुमंत हे समर्थांचे उपास्यदैवत आणि म्हणूनच त्यांनी मारुतीची मंदिरे स्थापन केली .प्रत्येक गावातील युवकांना एकत्र करून भक्तिमार्गाला, उपासनामार्गाला लावले .समाजाला सामर्थ्यशाली बनवायचे हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता. भक्तिमार्गाने समाज संघटित होतो हे त्यांनी ओळखले आणि भक्तीचे अधिष्ठान समोर ठेवून. अकरा मारुती सातारा जिल्ह्यातील चाफळ आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात स्थापन केले. या अकरा मारुतीची ११ स्तोत्रे त्यांनी रचली जी सगळ्यांना परिचित नाहीत. सर्वसामान्य घरांमध्ये जे रोज संध्याकाळी म्हणले जाते ते म्हणजेभीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुतीपण त्याशिवाय बाकी स्तोत्रांचा सुद्धा अभ्यास व्हावा  आणि त्या स्तोत्रात समर्थांना काय म्हणायचे याचा आढावा या ठिकाणी घेतला आहे

समर्थांनी अकरा मारुती कुठे स्थापन केले यासाठी समर्थांची शिष्या वेण्णास्वामी यांनी एक सुंदर अभंग रचला आहे. ज्यामध्ये या अकरा मारुतींचा उल्लेख आहे.

चाफळा माजी दोन, उंब्रजेशी एक

पारगावी देख चौथा तो हा

पाचवा मसूरी शहापुरी सहावा |

जाण तो सातवा शिराळ्यात॥

सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा |

 

दहावा जाणावा माजगांवी॥

बह्यात अकरावा, येणे रीती गावा|

सर्व मनोरथा पुरविल॥

वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास।

कीर्ती गगनात समावे॥

समर्थ विवाह मंडपातून पळाले ते विश्वाची चिंता करण्यासाठी टाकळीला आले. तिथे गोदावरीच्या पाण्यात उभे राहून त्यांनी उपासना केली या उपासनेचे  फळ म्हणजे समर्थांना झालेलं हनुमंताचे दर्शन . समर्थांनी टाकळीला श्रीराम जय राम जय जय राम हा  १३ कोटी जप केला ,जप करत असताना एक वानर तिथे येऊन बसत असे , समर्थांच्या रामभक्तिने एक दिवस त्या वानरातील मारुतीने आपले अक्राळ विक्राळ भीमरूप दाखवले .आनंदाने त्याने समर्थांना गळा मिठी मारली. समर्थांच्या शरीराचा कणकण तृप्त झाला. त्यांच्या हृदयातून कृतज्ञतेचा झरा वाहू लागला . हनुमंताच्या ठिकाणी असणारा एकनिष्ठ भाव, भक्ती, प्रेम हे सगळे शब्दबद्ध झाले

त्यावेळी समर्थांनी उस्फूर्तपणे केलेली हनुमंताची स्तुती म्हणजे हे भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र होय .या स्तोत्रात समर्थांनी हनुमंताच्या गुणांचे वर्णन केले आहे , तो कसा आहे, त्याचे चरित्र काय आहे, तो दिसतो कसा ,त्याच्यातील शक्ती कशी आहे हे सर्व वर्णन करून शेवटच्या चौदाव्या श्लोकापासून त्याची फलश्रुती सांगितली आहे. चाफळला श्रीराम मंदिरात रामाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला जो मारुती आहे तो हा प्रताप मारुती, ज्याचं संपूर्ण वर्णन समर्थांनी या स्तोत्रात केले आहे .हे स्तोत्र म्हणताना समर्थांच्या प्रतिभा शक्तीची भव्यता लक्षात येते. समर्थांच्या डोळ्यासमोर दर्शन दिलेला हनुमंत कसा असेल , समर्थ किती मारुतीमय झाले असतील हे समजते

समर्थांनी रचलेल्या या स्तोत्राने समाजात एक नवचैतन्य निर्माण केले .समर्थांची हनुमंतावरील अपार श्रद्धा त्याची  प्रत्यक्ष अनुभूती समर्थांचे प्रसादिक शब्द आणि उत्कट भाव यामुळे समाजाला एक नवी ऊर्जा मिळाली. एक नवे चैतन्य मिळाले .या स्तोत्राचा पहिलाच शब्द भीमरूपी, भीम म्हणजे भयानक संस्कृत मध्ये याचा अर्थ भयानक असला तरी मराठीत आपण तो सौंदर्य युक्त, श्रद्धायुक्त असा वापरतो.एखादी गोष्ट काय भयानक सुंदर आहे! असे आपण म्हणतो, त्या दृष्टीने हे भीमरूप महारुद्रा. रुद्र म्हणजे शंकर ,मारुतीची आई अंजनी ही शापित असल्याने ती वानरीच्या जन्माला आली होती. शंकर तुझ्या पोटी मारुतीच्या रूपाने  जन्म घेतील तेव्हा तू शाप मुक्त होशील ,हा तिला उःशाप होता .दशरथाने केलेल्या पुत्र कामेष्टी यज्ञातील प्रसाद घारीने पळवला, तो अंजनीला मिळाला, आणि मारुतीचा जन्म झाला. शंकराचा प्रसाद म्हणून तो महारुद्र ,वायूचा पुत्र म्हणून मारुती, इंद्राने वज्र मारुतीवर फेकले त्याला फक्त हनुवटीला खोच पडली म्हणून हनुमान, वनात राहणारा म्हणून वनारी , अंजनी चा मुलगा म्हणून अंजनी सुता, रामाचा सेवक म्हणून रामदूता , प्रभंजन म्हणजे उद्ध्वस्त करणारा सीतेला शोधायला गेला तेव्हा लंका उध्वस्त केली म्हणून प्रभंजना , केवढी सुंदर आणि अर्थपूर्ण विशेषणे समर्थांनी वापरली आहेत. पहिल्या श्लोकातच समर्थांनी हनुमंताचा जन्म, त्यांना दिसलेलं रूप, त्याला ही विशेषणे का हे सर्व सांगितले . हा हनुमंत कसा आहे तर महाबळी म्हणजे बलवान आहे , सुख देणारा, दुःख हरण करणारा आहे. सगळ्यात महत्त्वाचे तो धूर्त आहे. हनुमंताच्या धूर्तपणाच्या गोष्टी आपण संपूर्ण रामायण बघतो शिवाय निष्ठावान वैष्णव आहे. उत्तम गायक आहे कारण सतत रामरायाचे गुणगान गातो तो दिनांचा नाथ आहे, भव्य सिंदूरलेपन,  ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सीतेने रामाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून फक्त भांगात सिंदूर लावला, तर हनुमंताने प्रेमाचे प्रतीक म्हणून आपले सर्वांग  शेंदूराने माखले म्हणून भव्य सिंदूर लेपना तरी तो सुंदर आहे जगदंतर म्हणजे जगाचे अंतकरण आहे. तो जगन्नाथ म्हणजे जगाचा नायक आहे

पुण्यवान लोकांना परितोषका म्हणजे आनंद देणारा आहे .हनुमंताचा आवेश बघितला तर काळरुपी अग्नि सुद्धा थरथर कापेल .त्याने आपल्या दंतपंक्ती आवळल्या आहेत .त्याचा राग कसा आहे तर काळाचा सुद्धा थरकाप उडेल. अन्याय बघितला की त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला निघतात. भुवया ताणून पुच्छ मागे घेतो .हनुमंताचा ब्रह्मांडाला गिळणारा राग बघितला की सगळे घाबरतात. एवढा राग असला तरी आपल्या भक्तासाठी तो उत्तरेकडे झेपावतो. कारण त्याच्या रामरायाची अयोध्या उत्तरेला आहे. त्याचे किरीट कुंडले, कमरेभोवती सोन्याचा कासोटा घातलेला असून तो सडपातळ आहे, चपळ आहे. त्याच्या चपळतेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात महा विद्युल्लतेपरी, तसेच त्याची गती मनाला सुद्धा मागे टाकणारी आहे

हनुमंताच्या शक्तीच्या व्याप्तीच वर्णन करताना समर्थ म्हणतात की मेरु मंदार पर्वत सुद्धा त्याच्यापुढे लहान वाटतात .अणुपासून ब्रह्मांडापर्यन्त त्याची व्याप्ती आहे. ब्रह्मांडाच्या भोवती सुद्धा वेढा घालू शकेल अशा वज्रासारख्या असणाऱ्या शेपटीमध्ये तर हनुमंताची सगळ्यात जास्त ताकद आहे .आपल्या ताकदीने त्याने संपूर्ण सूर्य मंडळ ग्रासून टाकले आहे. चाफळच्या भीमरूपी स्तोत्रातून प्रकटलेला वीर मारुती शारीरिक आणि मानसिक बलाबरोबर करुणा आणि प्रेम सुद्धा बहाल करतो. या स्तोत्र पठणाने भूत प्रेत संबंध शारीरिक व्याधी या तर नष्ट होतातच ,पण चिंता सुद्धा दूर होतात. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती

ही फलश्रुती म्हणजे आपल्याला अंतर्यामी रामाचे दर्शन होईल ही समर्थांनी दिलेली खात्री आहे. आजही रोज संध्याकाळी हे स्तोत्र प्रत्येक घरात म्हणले जाते .या स्तोत्रातील प्रत्येक शब्द म्हणजे समर्थाचे हनुमंतावरील प्रेम आहे. नियमित पठणाने येणारा अनुभव सुद्धा तेवढाच आनंददायी आहे. हनुमंताप्रमाणे समर्थांची अकरा ही स्तोत्रे चिरंजीव आहेत यात शंका नाही.

‘बलोपासनेची प्रेरणा देणारे’ श्रीमारुती

मारुती स्तोत्र ही एक नितांत सुंदर काव्यरचना आहे. श्रीसमर्थांनी एकूण तेरा मारुती स्तोत्रे लिहिली. शब्दकळा, गेयता, रेखीव रचना आणि आवेश यामुळे प्रचलितभीमरूपी महारुद्राहे मारुतीस्तोत्र सर्वांच्या पसंतीला उतरलेले दिसते. इतर संस्कृत स्तोत्रप्रमाणे हे देखील इष्ट देवतेची म्हणजेच हनुमंताची स्तुती करणारे आहे. त्यात मारुतीच्या विविध पराक्रमांचे संदर्भ येतात. तसेच बहुतेक स्तोत्रे, आरत्या, अभंग किंवा प्रार्थना त्या, त्या इष्ट देवतेची स्तुति सुमने गाणारी, सुखसमृद्धी मागणारी असतात. परंतु जेव्हा हीच शब्दरचना काव्यात्मकता घेऊन येते तेव्हा त्या शब्दांना, विचारांना भाषासौंदर्याचे आगळेच लेणे चढवित जाते. हे संत केवळ धर्मप्रसाराचे किंवा धर्मरक्षणाचे काम करणारे धर्माचेजागलेनव्हते तर ते व्युत्पन्न आणि प्रतिभावंत कविदेखील होते. त्यामुळे शारदेच्या दरबारात संत साहित्याचे दालन फार मोठे आणि तेवढेच वैभवशाली आहे. समर्थांचेभीमरूपीसुद्धा त्यातलेच एक लेणे आहे, हे नि:संशयपणे मान्यच करायला हवे

हनुमंताची उपासना केवळ शक्तिची उपासना नव्हे. शक्ती, भक्ती, नीती, साहस, वीरश्री, नम्रता, मुत्सद्दीपणा, कर्तव्यपरायणता, अनन्य निष्ठा आणि श्रद्धा अशा उत्तमोत्तम गुणांचा समुच्चय हनुमंताच्या ठायी एकत्रित झाला आहे. अशा श्रीरामांच्या सर्वश्रेष्ठ अनुयायी भक्ताला उद्देशून समर्थ म्हणतात,”भीमरूपी महारुद्रा! हे महाकाय बलवंता, तू महारुद्र भगवान शंकराचा अवतार आहेस. तू वज्रासारखा शक्तिमान आहेस. तू तर वादळासारखा झंझावात, प्रभंजन आहेस.” ते त्यालावनारीअशी उपमा देतात. वनाचा अरी म्हणजे वनाचा शत्रू! ही उपमा सामान्यांना बुचकळ्यांत टाकणारी आहे

सीतेच्या शोधात लंकेत गेल्यावर आपले शक्तिप्रदर्शन करताना मारुतीने रावणाच्या आवडत्या अशोकवनाचा विध्वंस मांडला होता. त्याचाच संदर्भ यावनारीउपमेशी आहे. अन्यथा वानर कुळातील असूनही हनुमंत वनाचा शत्रू कसा होऊ शकेल? पुढे ते म्हणतात, “हे बुद्धिवंता, तू तर श्रीरामाचा दूत आहेस.” रावणाच्या दरबारात मारुती श्रीरामांचा दूत म्हणून सामंजस्याची बोलणी करायला गेला होता. रावणासारख्या वेदशास्त्रसंपन्न सम्राटाशी बोलणी करायला श्रीरामांनी त्याची निवड करावी, यातच हनुमंताच्या राजकारणाची, मुत्सद्दीपणाची आणि विद्वत्तेची ओळख पटावी. ते पुढे म्हणतात,”हे महाबलो, तू प्राणदाता आहेस, सर्वांमध्ये चैतन्य फुंकणारा, बलाची स्थापना करणारा आहेस. लक्ष्मणासाठी तू हिमालयातून संजीवनी आणल्यामुळे त्याचे प्राण तर वाचलेच परंतु त्याचबरोबर त्या संजीवनीमुळे युद्धात मारले गेलेले वानरगणही पुन्हा जिवंत झाले. असा तू प्राणदाताही आहेस. तू सुखांचा वर्षाव करणारा आणि दु:खितांचे दु: हरण करणारा,अत्यंत हुशार वैष्णव आहेस.” 

तू दीनांचा नाथ असून जगातील अती सुंदर असे हरीचे रूप लाभलेला देखणा वीर आहेस. तूपाताळ देवताहंताम्हणजे पाताळातील राक्षसांना जिंकणारा आहेस. लंकेतील युद्धाच्या वेळी रात्री निद्रेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण यांना मायावी राक्षस अहिमही यांनी आपल्या मायावी शक्तीचा वापर करून पाताळात पळवून नेले बांधून ठेवले होते. परंतु हनुमंताने त्यांचा वध करून त्यांना सोडवून आणले होते. हा कथासंदर्भ इथे आहे

पुढे ते म्हणतात की, हे मारुतीराया, तुला शेंदूरलेपन आवडते आहे. तू पुण्यवंत, पावन, शीलवान असून सर्व जगाला परमानंद देणारा आहेस. अशी स्तुतीसुमने गाऊन समर्थ हनुमंताच्या सामर्थ्याचे आणि पराक्रमाचे वर्णन रामायणातील संदर्भ घेऊन करू लागतात

हनुमंताच्या युद्ध सज्जतेचे वर्णन करताना ते म्हणतात,”मारुती अत्यंत उग्र धारण करून तो रावणसैन्यावर तुटून पडतो. ‘ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू मारुतीराया पर्वतासारखा शत्रूच्या सैन्यापुढे मार्ग अडवून उभा राहिला. त्याची शरीरयष्टी अतिशय कमावलेली, कुठे ही स्थूलता नसलेली होती. त्याची चपलता तर विद्युल्लतेला लाजवील अशी होती. त्याने आपले मोठे रौद्र रूप धारण केले. ते ब्रह्मांड व्यापून राहिले. रागारागाने दातओठ आवळून तो पुढे सरसावला. त्याच्या डोळ्यातून जणू काही अग्नीचे लोळ बाहेर पडू लागले. रागाने त्याने आपले पुच्छ डोक्यामागून वळविले. त्याचा मुकूट आणि कानातली कुंडले थरारून उठली. त्याच्या विजेसारख्या चपळ हालचालींमुळे त्याच्या सुवर्णमय कासोटीच्या लहान लहान घंटा किणकिण नाद करू लागल्या. आपला उजवा हात पुढे करून तो शत्रूच्या सैन्यावर तुटून पडला. त्याचे असे उग्र रूप पाहून यमराजाचे काळाग्नी आणि काळरुद्र हे दोन्ही दूत चळचळा कापू लागले

युद्धात इंद्रजिताच्या अमोघ अस्त्राने लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर त्यावर उपचार करण्यासाठी तितकीच अमोघ औषधी महोदय पर्वतावर आहे, असे वैद्य सुषेणाने सांगितल्यावर ती आणण्यासाठी हनुमानवर तिथे जाण्याची जबाबदारी येते. मारुतीस अणूपासून ब्रह्मांडाएवढे म्हणजेच लहानात लहान, आणि मोठ्यात मोठं ब्रह्मांड व्यापेल असे रूप घेण्याची सिद्धी प्राप्त असल्यामुळे त्याने आपले प्रचंड रूप धारण करून उत्तरेकडे झेप घेतली. द्रोणागिरी पर्वत रांगातील महोदय पर्वतावरील नेमकी संजीवनी औषधी कोणती हे ध्यानात आल्यामुळे त्याने ते पर्वत शिखरच उखडून, उचलून आणले.. समर्थ म्हणतात की, मनासही मागे टाकेल अशा वेगाने त्याने पर्वत शिखर आणून परत नेऊनही ठेवले. अशा अनेक कथांचे  संदर्भ येतात. काव्यरचनेच्या सोयीनुसार त्यांचा कालानुक्रम पुढे मागे झाला आहे इतकेच

अणूपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे असे सूक्ष्मापासून महाविक्राळ रूप धारण करणाया  मारुतीची कोणाशी तुलना करणार? त्याच्या अतिविशाल, अक्राळविक्राळ रूपापुढे मेरुमांदार हे पर्वत देखील छोटे वाटू लागले. तर त्याच्या शेपटीचे महात्म्य काय सांगावे? रावणाच्या दरबारात त्याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळून ती पेटविण्याच्या प्रयत्नात ती एवढी वाढू लागली की सगळ्या  राक्षसांची भंबेरी उडाली. त्यातूनच लंकादहनाचा प्रसंग घडला

समर्थ म्हणतात की, “हे पुच्छ एवढे वाढू शकते की,सगळ्या ब्रह्मांडालाही वेढा घालू शकेल. यामुळे हनुमंताची तुलना विश्वात कुणाशीही होऊ शकणार नाही, असे ते म्हणतात. त्याच्या रागाने लाल झालेल्या डोळयांपुढे सूर्याची प्रभाही त्याने व्यापून टाकल्यासारखे भासू लागले. तर त्याचे वाढलेले अक्राळविक्राळ रूप अंतराळाचे शून्यमंडळ देखील भेदून जाईल एवढे विशाल झाले. इथे विसाव्या शतकात पाश्चात्त्य आधुनिक विज्ञानाने स्वीकारलेलीअंतराळातील काळेविवरही संकल्पना आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी फार पूर्वीच जाणली होती याचा प्रत्यय येतो. अशा महाबली हनुमंतापुढे आपणही नतमस्तक होतो

आपल्या आराध्य दैवतावर स्तुतिसुमनांची अशी उधळण केल्यावर समर्थ स्तोत्राच्या फलश्रुतीकडे वळतात. प्रार्थना अथवा ग्रंथाच्या अखेरीस प्रसाद मागण्याची परंपरा समर्थही पाळतात, असे आपल्याला वाटते पण हे श्लोक समर्थांचे नसावेत कारण सामार्थांच्या स्तोत्रात कुठेही ऐहिक फलप्राप्ती नाही. शेवटच्या दोन श्लोकात ते सांगतात की, ‘हे पंधरा श्लोक पठण केल्यामुळे म्हणजेच मारुतीची उपासना केल्याने बलदंड शरीर आणि कोणताही संदेह नसलेले, चिंतामुक्त खंबीर मन लाभेल. त्यांची प्रगती चंद्राच्या वाढत्या कलांप्रमाणे चढत्या क्रमाने वाढतच जाईल

वानरकपिकुळातील अग्रगण्य रामभक्त, ज्याचे अंतरंग श्रीराममय झाले आहे अशा परमश्रेष्ठ हनुमंताचे दर्शन भक्तांच्या सर्व पीडा नाहीशा करील. हनुमंताची उपासना म्हणजे केवळ ईश्वर भक्ती नाही, तर ती मरगळलेल्या आणि तेजहीन झालेल्या हृदयात शौर्य, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा स्फुल्लिंग जागृत करणारी बलाची, कर्तृत्वाची आणि आत्मसन्मानाची उपासना आहे. समर्थांच्या जीविताचे तेच ध्येय होते. त्यामुळेच हे स्तोत्र लिहितांना त्यांची प्रतिभा अत्यंत उत्साहाने उचंबळून आलेली दिसते. असा सुंदर अर्थ आणि उच्चारण्याची स्फू्र्तिदायक गेयता यामुळे ते कुणासही मुखोद्गत करता येण्यासारखे झाले आहे. त्यामुळेच  ” भीमरूपी महारुद्राहे मारुती स्तोत्र सर्वांना अतिशय प्रिय झाले आहे.

हनुमंत आमची कुळवल्ली

रामायणात श्रीराम-लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताजवळ सीतामातेच्या शोधासाठी येतात व त्यांची व हनुमंताची भेट होणे या क्षणापासून रामायणात हनुमंताचे महत्व प्रगट होते. ब्राह्मण वेशात हनुमंत श्रीरामांसमोर आले. स्वत:च्या मधुर बोलण्याने त्यांनी श्रीरामांबरोबर सख्यत्वाचे नाते जोडले व श्रीरामांनी त्यांचे गुण तात्काळ ओळखले. हनुमंत ब्रह्मज्ञानी, जितेंद्रिय, चारही वेदांचा अभ्यास केलेले, शास्त्रविचार जाणणारे, महायोगी आहेत. हनुमंताचे सूक्ष्म व विशाल रूप पाहून त्यांना अष्ट सिद्धि प्राप्त आहेत हे पण त्यांनी ओळखले. 

 

बालपणीच हनुमंताला इंद्राच्या वज्रापासून अभय, सूर्याकडून उत्तम वक्ता म्हणून आशिर्वाद, यमाकडून, यमदंडापासून अभय, शंकराकडून भगवान शंकराच्या आयुधांपासून अभय, ब्रह्मदेवाकडून ब्रह्मास्त्रांपासून संरक्षण असे अनेक वर प्राप्त झाले पण त्याचा अहंकार हनुमंतामध्ये नव्हता.

चारही युगात हनुमंताचे प्रताप आहेत. सत्य युगात ते शिवरूपात पार्वतीला रामकथा सांगतात. व्दापार युगात अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करतात त्रेतायुगात वानर रूपात श्रीरामाचे दास्यत्व करतात व आजच्या कलियुगात जिथे रामकथा, रामाच्या नामाचे संकीर्तन असते तेथे नतमस्तक होऊन श्रवण करतात. 

हनुमंत चारही वेदांचा ज्ञाता, व्याकरणाच्या नऊ शाखांचा विद्वान, संस्कार संपन्न भाषा असलेला ज्ञान संपन्न व बलसंपन्न दास होता. अचूक निर्णय घेण्याची क्षमता, सूक्ष्म निरीक्षण शक्ती असल्यामुळे रामायणात अत्यंत अवघड कार्य त्यांनी सहजपणे पार पाडले. रामचरीत मानस म्हणते, “हनुमंताने रावणाला मान, भ्रम, वैर, मोह, मद व तमोगुण सोडून ईश्वराचे भजन, सीतेला परत करणे, श्रीरामांना शरण जाणे व श्रीराम कृपेला पात्र होण्याचा आग्रह केला. हनुमंताला मैनाक पर्वताचे काही काळ विश्रांती घेण्याचा आग्रह केला तो त्याने नम्रपणे नाकारला. श्रीराम कार्यात तत्पर राहाणे, अखंड कार्य करणे हीच त्याची विश्रांती होती. लक्ष्मणाच्या प्राणासाठी द्रोणागिरी आणण्यात हीच तत्परता आपल्याला दिसते. 

समर्थ रामदास जांब सोडून टाकळीला आले. अंत:करणात प्रभू रामाचे आस्तित्व जाणवत नाही म्हणून दु:खी व निराश झाले, त्यांची व्यथा हनुमंताने ओळखली व मनाने त्यांच्याशी हितगुज केले. “रामकृपेसाठी साधना हवी. नाम साधना, सूर्योपासना, सूर्यनमस्कार, गायत्री जप, बलोपासना करायला हवी. विवेक, वैराग्य, या गुणांनी देहबुद्धीचा निरास करायला हवा. त्या  पूर्ण पुरुषाची लक्षणे अभ्यासून अंगी बाणायला हवीत. निराश होऊ नको मी तुला सहाय्य करीन. दुष्टांच निर्दालन, सज्जनांच रक्षण करायला रामदासी पंथ भविष्यात तुला स्थापन करायचं आहे. 

समर्थांनी अशीच साधना १२ वर्षे केली. श्रीरामायणाचे लेखन केले, हनुमंताच्या चरित्रापासून १)त्याचे शारीरिक बळ व ब्रह्मचर्य २)संकटाचे वेळी दाखवलेली निर्भयता ३)दुष्टांची कपटनीती ओळखण्याचे बुद्धीचातुर्य ४)श्रीराम चरणी समर्पित केलेले दास्यत्व हे चार गुण समर्थांनी आत्मसात केले.

समर्थांनी गोमयाचा मारुती टाकळीला साकारला ते महारुद्र स्वरूप टाकळीच्या ग्रामस्थांचे प्रेरणा स्थान होते. देशाटनात गावोगावी मारुतीची मंदिरे उभी केली. चाफळ परिसरातील ११ मारुति प्रसिद्धच आहेत. “आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तयावीण आमुचा परमार्थ, सिद्धि ते न पावे सर्वथा” या समर्थ वचनात समर्थांच्या पारमार्थिक प्रवासात हनुमंताचे सहाय्य व मार्गदर्शन किती महत्वाचे आहे हे कळते.

श्रीरामांनी हनुमंताला तू कोण आहेस? असे विचारले तेव्हा हनुमंत म्हणाला “देहा जे मी तुमचा दास आहे, जीवने मी तुमचं अंश आहे व आत्मरूपात तुम्ही व मी एकरूप आहोत” या तीन रूपांचे आपण अखंड चिंतन करू या समर्थ रामदासांनी तेच केले.

नांव मारूतीचे घ्यावे | पुढे पाऊल टाकावे |

अवघा मुहूर्त शकुन | हृदयी मारूतीचे ध्यान |

जिकडे जिकडे जाती भक्त |पाठी जय हनुमंत |

राम उपासना करी | मारुती वसे त्याचे घरी |

दास म्हणे ऐसे  करा | सदा मारुती हृदयी धरा ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language