ज्ञानाचा दीपोत्सव

दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव. दिव्यांची ज्योत शुभ, कल्याण करणारी, धनसंपदा व आरोग्य देणारी, शत्रुबुद्धीचा नाश करणारी असते. दीपज्योत परब्रह्म स्वरूप असते. म्हणून पापाचा नाश करते. दिवा अज्ञानाचा अंध:कार नष्ट करतो. तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्याची ज्योत मंद प्रकाश देते म्हणून डोळ्यांना सुखकारक असते. एका दिव्याच्या ज्योतीने अनेक दिवे लावता येतात तसेच एक ज्ञानाचा दिवा अनेकांच्या अंत:करणात ज्ञानाचा दिवा प्रज्वलीत करू शकतो. समर्थ म्हणतात,

 

“तैसें ज्ञानें तृप्त व्हावें । तेंचि ज्ञान जनास सांगावें ।

तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ।। १२-१०-२ ।।”

 

दीपोत्सव आनंद, उल्हास, प्रकाश व प्रसन्नता देणारा उत्सव असून दिवाळीत धनलक्ष्मी, विष्णुपत्नी महालक्ष्मी, विद्येची देवता सरस्वती यांची पूजा आपण करतो. नरकासुरा सारख्या क्रूर दैत्याचा संहार श्रीकृष्णाने केला. म्हणून नरकचतुर्दशीला श्रीकृष्णाचे स्मरण करतो. लक्ष्मीपूजनाला व्यापारी लक्ष्मीचे पूजन करतात. हिशोबाच्या वह्यांचे पूजन करतात. लक्ष्मी चुकीच्या मार्गाने मिळवली तर दूराचाराकडे खेचते व कष्ट करून मिळवली तर हातून सदाचार होतो. बलिप्रतिपदेला आपण बळीराजाचे आत्मनिवेदन आठवतो. भाऊबीजेला स्त्रीकडे माता किंवा बहिणीच्या नात्याने पाहायला आपली संस्कृती शिकवते. दीपावली शुभ संकल्प करण्याचा दिवस आहे.

 

ज्ञानाचा दिवा साधकाच्या स्थूल देहाची शुद्धी करतो. समर्थांसारखे संत “सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती” असे असतात.  संत चरित्र श्रवणाने व नाम साधनेने देह शुद्ध होतो. संत तुकाराम म्हणतात “पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ” वाणी वर्तनाशी जोडलेली असावी म्हणजे सत्कर्म होते. ज्ञानाचा दिवा विकार, मोह, अहंता व अज्ञान नष्ट करतो. ज्ञानदेवांनी २१व्या वर्षी समाधी घेतली पण त्यांचे ज्ञान इतके व्यापक झाले की आज अनेक वर्ष त्यांच्या वाङ्मयरूपी ज्ञानाचा दिवा भक्तांना पांडुरंगाच्या चरणावर स्वशक्तीने नेतो.

 

“काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ।” या संत तुकारामांच्या  वचनाप्रमाणे ज्ञानाचा दिवा म्हणजेच नित्य आत्मस्वरुपाचा दिवा भक्तांच्या अंत:करणात आत्मज्ञान प्रज्वलीत करतो. हा दिवा अनित्य, अशाश्वत गोष्टी, काम; क्रोध; लोभ; मोहादी; षड्रिपू नष्ट करतो. अंत:करणात नित्यानित्य विवेक, सारासार विचार जागा होतो. समर्थ या विवेक वैराग्याला स्थिर स्वरूप देतात, अशा स्थिर विचारालाच धारणा म्हणतात. “देव माझा मी देवाचा” ही तुकोबांची धारणा होती. “शोभे सिंहासनी राम माझा” ही समर्थांची धारणा होती. दासबोधासारखा ग्रंथ अज्ञान नष्ट करतो ही निरंतर जागृती आहे.

 

ज्ञानाचा दिवा अंतरंग जागृतीही करतो. शांती, सख्य, वात्सल्य, दास्यत्व, माधुर्य या निष्ठा निर्माण करतो; संशय नष्ट करतो व भगवत प्रेमाचा दीप अंत:करणात सतत तेवत ठेवतो. संतांचे ज्ञान भक्ताला निरंतर सांभाळते. ते आत्मधनाचे दान लक्ष्मीपूजनाला भक्ताला देतात. आपणही आपला वेळ त्यांच्या चरणी अर्पण करावा आणि पुढील वर्षभर “रिकामा जाऊ नेदि एक क्षण” हे समर्थ वचन आठवावे. 

 

या वर्षी कोजागिरीच्या आधीपासूनच आपण ज्ञानाची दिवाळी साजरी केली. आपल्या संसाररूपी भवसागरात समर्थांचा ज्ञान दीपस्तंभ सतत सदाचाराचा मार्ग दाखवतो. हा अंतरीचा ज्ञानदीप भक्तीची प्रेरणा देतो, मिथ्याचा नाश करून सत्याची प्राप्ती करून देतो, अंध:काराचा नाश करून स्वयंप्रकाश देतो, मृत्यू पासून सोडवून आत्मस्वरुपात विलीन होण्याची शक्ति देतो. आनंद हे आपले खरे स्वरूप आहे. आत्मज्ञानाने कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहाणे ही कला आत्मसात करता येते आणि श्रीगुरु सेवा मनोभावाने, निरलसपणे करता येते.

 

पंचमहाभूतांची पंचोपासना पूर्वार्ध

तत्त्वज्ञान हा कोणत्याही संप्रदायाचा आत्मा असतो. स्वरूप संप्रदाय हा समर्थ संप्रदाय आहे. समर्थांनी जाणीवपूर्वक, नियोजन आखून प्रयत्नपूर्वक हे शास्त्रीय नाव दिले. जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म, यांचे संबंध काय आहेत ? शरीरातील व सृष्टीतील सूक्ष्म घटक कोणता ? अनेकत्व दिसणार्‍या सृष्टीत एकत्व कशात आहे ? सतत परिवर्तन होणार्‍या देहात; सृष्टीत; संसारात अपरिवर्तनीय तत्व कोणते आहे ? जगत माणसात भिन्नत्व का आढळते ? पिंडी ते ब्रह्मांडी याचा नेमका अर्थ काय ? असे प्रश्न “चिंता करितो विश्वाची” यातील स्फुरण असलेल्या नारायण ठोसर किंवा समर्थ रामदासांना पडले. घरच्या चार भिंतीत उत्तर मिळणार नाही, या निश्चयाने ते घराबाहेर पडले. १२ वर्षे तपाचरण, १२ वर्षे देशाटन-निरीक्षण- अभ्यास, गुरु-शिष्य संवाद चर्चा यातून समर्थ वाङ्मयात या प्रश्नांची उत्तरे व विवेचन अभ्यासता येते. 

जीव सृष्टी निर्माण का झाली ? बृहदारण्यक उपनिषद १-४-३ म्हणते “स वै नैव रेमे तस्मादेकाकी न रमते स द्वितीयमैच्छत् ।” एक आहे अनेक व्हावे हे पहिले स्फुरण आहे. समर्थ दासबोधात म्हणतात, “मूळमाया जाणीवेची । मुळींच्या मूळ संकल्पाची ।।१५-७-२।।” ब्रह्म अधिष्ठानरूप असते. निर्मिती पूर्वी अनंत ब्रह्मांडे बीजरूपाने अव्यक्त किंवा सुप्तावस्थेत असतात. ब्रह्मत्वाच्या चैतन्याच्या आश्रयाने राहून माया शक्तिरूपाने जगत निर्माण करते. “ऐशा अनंत शक्ति होती । अनंत रचना होति  जाती । तरी अखंड खंडेना स्थिती । परब्रह्माची ।।६-४-५।।” अनंत शक्तिच्या सहाय्याने पंचमहाभुते आणि सत्व-रज-तमोगुणाने माणसाचे व्यक्तिमत्त्व आकार घेते. ही सृष्टी ईश्वराच्या योजनेनुसार चालते. समर्थ म्हणतात, “त्या तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि  पाहतां ।।१८-८-८।।” ब्रह्म-आकाश-वायु तेज-आप-पृथ्वी वनस्पती-जीव अशा क्रमाने सृष्टी निर्माण झाली. हे आवाहन किंवा उभारणी आहे. मूळ मायेपासून विश्वाचा पसारा आरंभ होतो. तिच्या ठिकाणी असणारी शुद्ध जाणीव व साम्यावस्था हेच भगवंताचे स्वरूप होय. दशक १६ मध्ये समर्थ पंचमहाभूतांचा विचार मांडतात तो आपण पाहू या.

 

पृथ्वी – ‘पृथ्वी’ शब्द ‘प्रथ’ धातूपासून तयार होतो. ‘प्रथ’ म्हणजे वाढणे; मोठे होणे; पसरणे. जी सर्व दिशांना पसरलेली आहे ती “पृथ्वी”. पृथू राजाने गोरूपधारी भूमीचे दोहन करून अनेक बीजे उत्पन्न केली. जमीन सारखी करून नगरांची रचना केली. सर्व सचेतन, अचेतन, स्थावर व जंगम पदार्थांना पृथ्वीचा आधार आहे. शुभ्र बर्फाने आच्छादलेले पर्वत, अनेकांना जीवन देणार्‍या नद्या, पाण्याच्या प्रचंड साठयाने भरलेले समुद्र, नाना रंगाची व सुवासाची फुले, नाना स्वादांची फळे, उत्तुंग वृक्ष, रंगीबेरंगी सुस्वर असलेले पक्षी असे अलौकिक सौंदर्य पृथ्वीवर आढळते. समर्थ रामदास तिला “बहुरत्ना वसुंधरा” म्हणतात. पृथ्वी मातेची क्षमा व सहनशीलता अजोड आहे. आपण तिला खोदतो, नांगरतो, घाणेरडे पदार्थ टाकतो; त्याच्या बदल्यात ती आपल्याला अन्नधान्य, वनस्पती, औषधे, खनिज द्रव्ये, फुले, फळे देते. धरणी माता जल देऊन आपले जीवन समृद्ध करते. ही पृथ्वी देव-दानव, मानव, प्राणी, संत व दुष्ट सर्वांना आश्रय देते. रत्ने, हिरे , परिस पृथ्वीत मिळतात. काही लोक जमीन माझी म्हणतात, पण ते गेल्यावर ती रहाते म्हणून ती खरी भगवंताची आहे. पृथ्वीच्या शक्ती व सामर्थ्याचा वापर करून सुद्धा काही तत्त्वचिंतक जगाच्या अस्तित्वाबद्दल शंका घेतात. किंवा काही अज्ञानी; सत्ता, पैसा यांच्या बेसुमार तृष्णेमुळे पृथ्वीवर अत्याचार करतात व त्यामुळे जीव सृष्टीचा समतोल बिघडतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविध गुण पृथ्वीचे आहेत. स्थूल देहात हाडे, मांस, त्वचा, नाडी, आणि रोम ही पृथ्वी तत्वे आहेत. देहाच्या कर्मेंद्रियांद्वारे कर्म अवलंबले जाते व गृहस्थाश्रमात वंश परंपरा चालत रहाते.

आपतत्त्व – पाणी, नद्या, नाले, ओढे, डोह यातून मिळते. पाण्याचे थंड, उष्ण झरे असतात. ऊसाचा रस, फळाचा रस, गोरस यात पाणी असते. देह व पृथ्वी आपापासूनच बनते. शरीरात पाणी असते, पाण्याजवळ पवित्र तीर्थे असतात. आप तत्त्वात तेज, वायु, पृथ्वी व आकाश तत्त्वही असते. वैदिक ऋषींनी पाण्याचे महत्त्व जाणले होते. वरुण या पाण्याच्या देवतेचे ते पूजन करीत.  पाणी शुद्ध, निर्दोष, मधुर, दोष नाशक, बलदायक व रोग निवारक असते. पृथ्वीचा ३/४ भाग पाण्याने व्यापला आहे. पाणी, उष्णता; वाफ; बर्फ व पुन्हा पाणी हे जलचक्र अव्याहत चालते. सोडीयम, आयोडीन हे क्षार पाण्यातून मिळतात. पाण्याचा गैरवापर, पाण्याचे प्रदूषण व पाणी वाया घालवणे हे प्रकार आजही आपण पाहतो. समर्थांच्या काळात त्यांनी पाण्याच्या  नियोजनाचा विचार सांगितला. समर्थ म्हणतात, 

नदीचे उदक वाहत गेले । ते निरर्थकचि चालिलें ।

ते जरी बांधोन काढिलें । नाना तळी कालवें ।।

उदक निघेने वर्तविले । नाना जिनसी पीक काढिले ।

पुढें उदकचि जाले । पीके सुवर्ण ।।

गोंमुखें पाट कालवे । साधूनि बांधूनि आणावे ।

स्थळोस्थळीं खेळवावे । नळ टाकीं कारंजीं ।।”

या ओव्यांवरून समर्थांचा पाण्याच्या नियोजनाचा विचार कळतो.

तेज किंवा अग्नि – ‘अज’ या धातूपासून हा शब्द तयार होतो.अङ्ग नि ऊर्ध्व, म्हणजे वर जातो तो अग्नि. अग्नि ही इंद्रिय गोचर घटना आहे. दहन व ज्वलन हे तिचे स्वरूप आहे. उष्णता व प्रकाश अग्निमधून मिळतात. अग्नीचा प्रवास असतो. थंड वस्तूमध्ये गरम वस्तूतून उष्णता जाते. गॅसवर भांड्याच्या तळाशी असलेला पदार्थ प्रथम उष्ण होतो, तो वर येतो व वरचा खाली, अशाप्रकारे पदार्थ गरम होतो. अवकाशातूनही उष्णता मिळते. शरीर जिवंत रहाण्यासाठी उष्णता लागते, त्याला शरीराचे स्वाभाविक तापमान म्हणतो. वैदिकऋषींनी अग्नीचे महत्त्व जाणले. म्हणून ऋग्वेदाचा आरंभच अग्निस्तवनाने होतो. यज्ञातील अग्नीला ‘ग्रहपती’ म्हणतात. अग्नि प्रकाश देतो. ईश्वरी ज्ञानात अग्नि आहे तो देहबुद्धी नष्ट करतो. सूर्य व अग्नि ही मोठी दैवते आहेत. अग्नीमुळे अन्नाला चव येते. सागरात वडवानल, भूगोलाबाहेर आवरणानल असतो. आग्या सापाच्या तोंडतील अग्नि डोंगर जाळून टाकतो. अग्नीचे घर्षण करून तयार केलेली वीज, जलावर निर्माण केलेली वीज व अंतरिक्षातील वीज ही अग्नीची तीन रुपे आहेत. तीन लोक, वायु, आदित्य, आप, औषधी, वनस्पति, लाकूड, शरीर ही अग्नीची निवास स्थाने आहेत. काळी, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुचीदेवी या अग्नीच्या सात जिव्हा आहेत. समर्थ दासबोधामध्ये (१६-५-२९) चार शिंगे, तीन पाय, दोन डोकी, आणि सात हात  आहेत असे अग्नीचे वर्णन करतात. अग्नि, ज्ञानी लोकांचा परमेश्वर; गृहस्थाचा पालक; मानवाचा अतिथि आणि पृथ्वीचा रक्षणकर्ता आहे. वास्तूशांतीमध्ये अग्निची पुजा करतात. रामायणात दशरथाच्या यज्ञातून पायस मिळाले आणि श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचा जन्म झाला. कौसल्या अग्नीत समंत्र हवन करत असे. अग्निला साक्षी ठेवून श्रीराम व सुग्रीव मैत्री झाली. सीतेने अग्निदिव्य केले. अग्निहोत्र व वैश्वदेव या द्वारे अग्नीचे रोज पूजन करण्याची पद्धत होती. महाभारतात खांडव वनाचा दाह करण्यासाठी श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र व अर्जुनाने अक्षय भाता धनुष्य दिले. होलिकेचे पूजन करून, दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची पद्धत आजही आहे. पृथ्वी, आप, वायु व आकाश यात अग्नितत्त्व आहे व त्यामुळे सृष्टीत समतोल आहे. अग्नि भक्षकही आहे व त्यामुळे सावधपणे त्याचा वापर आपण करणे गरजेचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात “सर्वभक्षकु त्याची थोरी । काये म्हणोनी सांगावी ।” 

वायू व आकाश या तत्त्वांचा विचार उत्तरार्धात करूया.

जय जय रघवीर समर्थ

अनुताप

उपरती म्हणजे बाह्य विषयांपासून सुटण्याची धडपड होय. ही धडपड त्रिविध तापाने पोळल्यावर, संसार दु:खाने दुखावल्यावर सुरू होते. आपले गेले ते आयुष्य अज्ञानामुळे वाया गेले असे साधकाला मनोमनी वाटते. आता नव्या जीवनाची सुरुवात विवेक, विचार, वैराग्याने करावी असेही वाटत असते. अनुताप व पश्चाताप होणे ही साधकावस्थेची पहिली पायरी आहे. समर्थ करुणाष्टकात “अनुदिन अनुतापे तापलो रामराया” असे कळकळीने म्हणतात. समर्थांनी दृढ निश्चयाने घराचा त्याग  केला होता, तो ही लहानपणीच; म्हणून त्यांना स्वत:ला पश्चात्ताप होत नव्हता, पण लोकांचे अज्ञान; लोकांची व्यथा त्यांना स्वत:चीच वाटे त्या भावनेत त्यांनी करुणाष्टके  लिहिली. 

१. भूमीभार झाल्याची भावना – सक्षम, दुर्लभ नरदेह मिळून सुद्धा स्वत:मधील ईश्वरी स्वरूप ओळखले नाही, देहाचा उपयोग साधनेसाठी न करता भोग भोगण्यासाठी केला, भक्ती; आत्मज्ञान; ध्यान न करता; दीन दुबळा, खचलेला झालो म्हणून अनुताप होतो.

२. मन आवरत नाही – मन अतिशय चपळ, आवरता आवरत नाही. भगवत् गीतेत अर्जुनानेही ही व्यथा बोलून दाखवली. गीता अ. ६ श्लोक ३४ मध्ये अर्जुन म्हणतो “मन मोठे चंचल, क्षोभ निर्माण करणारे दृढ व बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे म्हणजे वार्‍याला अडवण्यासारखे कठीण आहे.” मन माणसाला विकल्पात गुंतवते व कोणताच अभ्यास, कोणतीच साधना पूर्ण होत नाही. ते सतत भूतकाळ, भविष्यकाळात रमते व वर्तमानात जे करायला हवे ते करू देत नाही. समर्थ म्हणतात “मन हे आवरेना की, वासना वावडे सदा | कल्पना धावते सैरा | बुद्धी दे रघुनायका ||”

३. व्यर्थ स्वार्थ साधण्याची वृत्ती – मी व माझे हे दोन शब्द साधकाला स्वजन, जन, धन या साखळीत अडकवतात. स्वार्थ हवेपणा वाढवतो, नेहमीच अपूर्णच असतो. विषय वासना नेहमीच अतृप्त असतात. त्या जीवाला दु:ख देतात व जन्म मृत्यू चक्रात अडकवतात. या गोष्टी टोकाच्या झाल्यावर त्यांचा पश्चात्ताप होतो.

४. स्वजन माया – आई-वडील, बहीण, भाऊ, पत्नी, मुले काही काळापुरते सोबती असतात. त्यांच्यापासून मनाने अलिप्त होऊन ते ईश्वर चरणी समर्पित करावे लागते. पण  समर्थ म्हणतात, “सकळ स्वजन माया तोडीता तोडवेना” तसे हे कठीण आहे. “जीवलग जीव घेती | प्रेत सांडोनी जाती” हे कटू सत्य पचवावे लागते. अनुताप झाला तर “घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा” असे होत नाही.

५. देशाटनातील निरीक्षण – समर्थांनी देशाटनात अनेक साधू, तपस्वी, हटयोगी पाहिले. देवालयांमधील भव्य पूजा पाहिली. तशीच काशी, अयोध्या येथील भग्न मंदिरे पाहिली. लोकांमधील अज्ञान, अंधश्रद्धा पाहिली. हिंदूंमधील उदासिनता पाहून त्यांना, या लोकांना इतिहासाचे विस्मरण कसे झाले? त्यांना मागील गोष्टींचा पश्चात्ताप का होत नाही? असे वाटे.

६. अज्ञानाची जाणीव – सुखाच्या धडपडीत दु:खच वाढते हे कळल्यावर आपलं काहीतरी चुकत आहे, खरा शाश्वताचा मार्ग वेगळाच आहे, त्या बाबत आपण अज्ञानी आहोत, याचे वाईट वाटणे म्हणजे अनुताप. अनुतापानंतर ज्ञानाची जिज्ञासा निर्माण होते. ग्रंथाचा अभ्यास, सत्संगतीत आपल्यामधील अपूर्णतेची; न्यूनतेची; दु:खभोगाची; आयुष्य वाया गेल्याची तीव्र जाणीव होऊन पश्चात्ताप होतो व पुढील जीवन बदलण्याची तीव्र इच्छा होते.

वाल्मिकी ऋषींचा अनुताप – वाल्मिकींचा अनुताप अत्यंत उद्बोधक आहे. नारदां सारख्या संताची गाठ पडली व त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. हे मला पाहून घाबरत कसे नाहीत? त्यांच्या जवळ काहीही नाही तरी समाधानी कसे? नाम स्मरणात हे निर्भयपणे या अरण्यात कसे हिंडत आहेत? या प्रश्नांची उत्तरे त्यांना हवी होती. स्वत: करत असलेले वाईट कर्म पत्नी-मुलांसाठी करतो हा त्यांचा भ्रम पत्नी-मुलांनीच घालवला. आपल्या पापात कोणी वाटेकरी नाही व आपण घर सोडत असताना कुणाला वाईटही वाटत नाही हे सत्य कळल्यावर त्यांना पश्चात्ताप झाला. त्यांच्या समग्र जीवनात मोठी क्रांती घडली, धगधगीत वैराग्याचा उदय झाला. राम नाम घेण्याची सवय नाही म्हणून “मरा मरा” जप सुरू केला. देहबुद्धी व देहाहंकार नष्ट झाला. अंगाभोवती वारूळ निर्माण झाले. नाम निष्ठेनी समाधीमग्न झाले. त्यांना शरीर, प्राणांचे विस्मरण झाले. ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी “रामकथा” लिही असे संगितले. वाल्मिकींनी २४००० श्लोकांचे रामायण लिहिले. 

समर्थ म्हणतात, 

वाल्मीक ऋषी बोलिला नसता | तरी आम्हांसी कैंची रामकथा |

म्हणोनियां समर्था | काय म्हणोनी वर्णावें?

रामनाम कथा श्रवणी पडता | होये सार्थकता श्रवणाची |

मुखें नाम घेतां रूप आठवले | प्रेम उणावले पाहावया |

राम माझे मनी शोभे सिंह्यासनी | येकायेकी ध्यानी सांपडला |

रामदास म्हणे विश्रांती मागेन  | जीवीचे सांगेन राघवासी ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

देवशोधन

दासबोधाचा अभ्यास करतांना पहिल्या दशकात “नित्यविचार”, दुसर्‍या दशकात त्याग करण्यासाठी “अनित्य विचार”, तिसऱ्या दशकात “संसारातील दु:खाबद्दल वैराग्य”, चौथ्या दशकात “नवविधा भजन”, पाचव्या दशकात “सत्शिष्य, गुरुपदेश” व सहा ते आठ दशक देवशोधन ते देवदर्शन असे आहेत.

देवाची गरज सामान्यांना “इच्छापूर्ती”साठी वाटते. समर्थ म्हणतात, “आरंभींच म्हणती  देव | म्हणिजे मला कांहीं देव | ऐसी वासना ||” संसारात सुख मिळत गेले तरी तृप्ती होत नाही, देहसुखासाठी धडपड केली तरी, खरं सुख मिळत नाही. तेव्हा खर्‍या देवाचा शोध सुरू होतो. दशक १८ स. ८-११ मध्ये समर्थ म्हणतात, “तो अंतर्देव चुकती | धांवा घेऊन तीर्था जाती | प्राणी बापुडे कष्टती | देवास नेणतां ||” “विचारें देव शोधावा”, सत्संगें देव सांपडला” या समर्थ वचनांमुळे देव शोधण्याचा मार्ग आपल्याला सापडतो.

खरा देव शोधण्यासाठी “मी म्हणजे देह व देहसुख हेच खरे सुख” व दिसणारी सृष्टी नित्य आहे, हे ममत्व या दोन्ही गोष्टी अंत:करणातून हद्दपार करून देहाने साधना करत सृष्टीतच रहावे लागते. कल्पना, मनोराज्य, भ्रम दूर करावे लागतात. असार बाजूला टाकून सार स्वीकारावे लागते. 

या गोष्टींसाठी दशक ६ मध्ये वेगवेगळे समास आहेत. ब्रह्म व माया यांचे स्वरूप जाणून तुलना करावी व मायेला कसे दूर करावे याचे ज्ञानही यात मिळते. स्वत:मधील ‘आत्मस्वरूपी देव’ शोधण्यासाठी सगुणाचा आधार घेत निर्गुणापर्यंत प्रवास करावा लागतो. प्रतिमा, मूर्ती, माळ, ही आलंबने देहाला व मनाला शिस्त लावायला उपयोगी पडतात. ‘राम सावळा सुंदर | कासे मिरवी पितांबर’ किंवा ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ या रूपात मूर्ती पहावी. तिला कोमट पाण्याने स्नान, उत्तम तलम वस्त्रे, अलंकार, सुवासिक फुले वहावी. पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. गोविंद विडा द्यावा. आरती, कथा-कीर्तन करावे. या सगुण उपासनेने देवाचे रूप, गुण, पराक्रम आपल्या मनात रुजतात. संत तुकाराम म्हणतात, “बोलावा विठ्ठल | पहावा विठ्ठल | करावा विठ्ठल | जीवभाव ||” इथे जीवभाव होण्यासाठी निर्गुण उपासना करावी. देहबुद्धी क्षीण झाली; देहाहंकार गेला; ममत्व; आसक्ती; वासना नष्ट झाली; गुरुकृपा झाली की, ध्यानात आत्म्याचा अनुभव येतो. यालाच “निर्गुणब्रह्म तें निश्चळ | अंतरीं बिंबलें” असे म्हणतात. आत्मा, परमात्मा, परब्रह्म हाच खरा देव व “तो मी आहे” असा दृढ, अपरिवर्तनीय अनुभव येणे हेच आत्मनिवेदन होय. अशा साक्षात्कारानंतरही सगुण उपासना देहाला सक्षम ठेवण्यासाठी करावीच. 

समर्थांनी पंचमीला तंजावरहून आलेल्या श्रीराम, लक्ष्मण, सीतामाईंच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून पूजा केली, या मुर्तींपुढे निर्याणाच्या अभंगांचे गायन केले व नवमीला त्यांचा अवतार समाप्त झाला. नऊ हा आकडा अद्वैत दर्शविणारा आहे. १० पासून दोन आकड्यांना म्हणजे द्वैताला सुरुवात होते. सज्जनगडावरील या सुरेख मुर्ती आजही प्रेरणा देतात. त्या भावात दर्शन घ्यावे. सगुण-निर्गुण विचार ६-६, ६-७, १०-७, १४-९, १७-१, १८-८, १६-९ या समासांमध्ये पाहायला मिळतो. “सगुणाचेनि आधारें | निर्गुण पाविजे निर्धारें | सारासारविचारें | संतसंगें |” या ओवीचे चिंतन करावे.

समर्थ देहाने अखंड लोककल्याणाचे कार्य करत व आतून स्वरूप स्थितीत रहात. हे स्वरूप नित्य, सुखरूप व आनंद रूप आहे. समर्थ आहे त्या परिस्थितीत आनंदी उत्साही रहात असत.

सारासार विवेकाने मी, माझे, देहसुख, संसारातील आसक्ती, ममत्व, मायावी जग यांचा त्याग करावा. शब्दाचे महत्व अर्थ कळेपर्यंत, अर्थाचे महत्व अनुभव येईपर्यंत व अनुभव आला की शब्द, अर्थ मागे पडतात व साक्षी अवस्था येते तीच “तुर्या” होय. देव शोधताना जागृती ते उन्मनी अवस्थेपर्यंत प्रवास व्हावा व नि:शब्द अवस्थेत एकरूप व्हावे. असा सहाव्या दशकाचा अभ्यास आपण करू या. या अभंगाचेही चिंतन सर्वजण करूया.

मुर्ती त्रैलोकीं संचली | दृष्टी विश्वासाची चुकली ||१||

भाग्य आले संतजन | जालें देवाचे दर्शन  || धृ ||

देव जवळी अंतरी | भेटीं नाही जन्मवरी || २ ||

रामदासी योग जाला | देही देव प्रगटला || ३ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

ज्ञानाच्या सात पायऱ्या

दासबोधात आत्मज्ञानाच्या तत्त्वज्ञानाचा संपूर्ण अर्थ अभ्यासार्थींसमोर येतो. सारे विश्व ज्ञानवृत्तीतूनच निर्माण झाले म्हणून विश्वाच्या व्यवहारात योजना, व्यवस्था व विवेक आढळतो. प्रत्येक जीवात ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा असतेच. अथ तो ब्रह्म जिज्ञासा। यातूनच ब्रह्मसूत्र, उपनिषदे, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथात आत्मज्ञानाचा विचार आला. आत्मज्ञान म्हणजे आपले खरे स्वरुप पहाणे. ज्ञानाच्या कक्षा व्यापक आहेत. महावाक्याचे मनन, साधनचतुष्टय संपन्नता, अध्यात्म विद्या, सदगुरुकृपा उपदेश, श्रवण ते साक्षात्कार हा प्रवास, सत्त्वगुणाची वृद्धी, सोऽहं साधना अशा अनेक मार्गाने ज्ञानाची तत्त्वे उलगडतात. सर्व भूतांच्या ठिकाणी एकच एक परमात्मभाव ठेवणे, जे शुद्ध परमात्म स्वरुप आहे तेच आपण आहोत, अनिवार्य समाधानाची प्राप्ती, वृत्ती, देह व दृश्य जगातून काढून परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर ठेवणे यासाठी आत्मज्ञानाचा विचार व साधना करावी लागते. ज्ञानाच्या सात भूमिकांचा विचार आपण येथे करणार आहोत.

१.शुभेच्छा– प्रत्येक जीवाची बद्धावस्था संपली की विषयभोगात सुख नाही हे कळते व ज्ञानाच्या जिज्ञासेपोटी सत्संग व अद्वैत ग्रंथाचा अभ्यास सुरु होतो. अभ्यास व ज्ञानाची जिज्ञासा याला शुभेच्छा म्हणतात. अनंत राघवाच्या पंथाचा प्रवास इथे सुरु होतो. मनाचे श्लोक ४ ते ७ मध्ये या प्रवासाला निघण्यापूर्वी कोणत्या अनित्य, अशाश्वत गोष्टींचा त्याग करावा याचा विचार आहे. त्याग ही या प्रवासाची पहिली पायरी आहे. मंदिरातील उत्सव, लोककल्याणाची कामे, सत्संग, अभ्यास याकडे भोगाची आसक्ती व शक्ती वळते. हा प्रवास निर्विघ्न, सुखकर व्हावा म्हणून गणेश, शारदेचे आशिर्वाद व सदगुरुकृपा महत्त्वाची असते.

.विचारणा– वाचन, अभ्यास वाढला की शंका येतात. ग्रंथात याला ‘ग्यानबाची मेख’ म्हणतात. तसे अवघड विषय, सूत्रे असतात. ती सदगुरुला विचारली जातात यालाच विचारणा म्हणतात. “तद् विद्धिप्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया” गीता ४.३४ या वचनांप्रमाणे अहंकाराचा लय, शरणागतता, नम्रता, लीनता असली तर योग्य मार्ग मिळतो. अहंकाराचा लय जितक्या वेगाने होईल तितके क्षुद्र विचार, गोष्टी, वायफळ बडबड, निंदा, स्तुती, कल्पनेची मनोराज्य या गोष्टी मनातून व वर्तनातून बाहेर पडतात.

.तनुमानसा– साधना व अभ्यासासाठी दुर्लभ नरदेह व दुर्लभ आयुष्य याचे महत्त्व ओळखावे लागते. देह पंचभूतांचा, त्याला वृद्धत्व, मृत्यू असतोच म्हणून एकही क्षण वाया न घालवता  तो सक्षम शुद्ध, सात्विक ठेवून प्रवास करावा लागतो. समर्थांना देशाटनात हिमालयात देहत्याग करावा वाटला पण प्रभू रामचंद्र प्रगट होऊन म्हणाले, तुमची तनु ते आमुची तनु आहे “दोन तपे रक्षिली तुमची काया धर्मस्थापनेसाठी” त्या नंतर ११00 मठ, महंत निर्मिती, गावोगावी मंदिर, प्रचंड वाङ्मय निर्मिती हे कार्य समर्थांनी केले.

४.सत्त्वापत्ती– साधनेमुळे देहबुद्धी क्षीण झाली की, अतिंद्रिय अनुभव येतात. चित्त स्थिर होते. अनाहत नादाची संवेदना जाणवते. परावाणी जागृत होते. बोलतो तसे होण्याचा अनुभव येतो. या गोष्टीत न अडकता पुढचा प्रवास सुरु ठेवावा. लोकेषणा, वित्तेषणा इ. ईषणांपासून प्रयत्नपूर्वक दूर रहावे लागते. टाकळीच्या श्री. कुलकर्णी यांना जीवन प्रदान केल्यानंतर समर्थांनी टाकळी सोडले आणि ते देशाटनाला बाहेर पडले. समर्थांची परावाणी जागृत होती म्हणून वैखरीतून बाहेर पडणाऱ्या शब्दांमध्ये सामर्थ्य होते. “जय जय रघुवीर समर्थ” या घोषवाक्याने मोठा लोकजागर केला.

५.असंसक्ती– सर्व आसक्तींचा त्याग आत्मज्ञानाने होतो. समर्थांनी स्वजन, जन, धन, गृह व स्वतःचे नाव याचा त्याग केला, यालाच समर्थ ‘विदेहीपणे मुक्ती भोगित जावी’ असे म्हणतात. योगारुढ झाल्यावरच निर्विकल्प समाधीचा अनुभव घेता येतो. व चिदानंद रुपः शिवोऽहं या भावनेत राहता येते.

६.पदार्थभाविनी- आत्मस्थितीत राहिल्यावर अनात्म पदार्थाविषयी विचारही होत नाही. देहसुख, कर्तेपण भोक्तेपण, मान-अपमान याचा लवलेशही साधकामध्ये राहात नाही. माझा-तुझा, गरीब-श्रीमंत असे सर्व भेद मावळतात. गजानन महाराजांना गांधील माशा चावल्या त्यांनी प्राणपणाने डंख बाहेर काढले व ते शांत राहीले. समर्थांनी थंडी घोंगडीत भरली व शिवाजी राजांशी चर्चा केली. प्रारब्धानुसार त्यांचे व्यवहार होतात.

.तूर्यगा- जागृती, स्वप्न, सुषुप्ती नंतरची ही अवस्था. यात ध्यानात एकीकडे देहावस्था व दुसरीकडे आत्मानुभव यात साक्षित्वाने साधक राहतो.  देह व जगाचे अस्तित्व असून  त्याचे त्याला भान नसते. फक्त वृत्तीरुप द्वैत शिल्लक असते. पुढे उन्मनी अवस्थेत मनाचा संपूर्ण लय होतो.

या सात पायऱ्यांमध्ये पहिल्या तीन साधनस्वरुप, चौथी ज्ञानावस्था व शेवटच्या तीन जीवनमुक्त स्वरुप आहेत. सर्व जग ईश्वरमय आहे. स्वतःच्या समर्पणानेच त्याचा प्रसाद मिळतो हे समर्पण ज्ञानाच्या सात भूमिकांमधून कळते.

ज्ञानेविण जे जे कळा। ते ते जाणावी अवकळा॥

ऐसे भगवंत बोलिला। चित्त द्यावे त्याच्या बोला॥

एक ज्ञानाचे सार्थक। सर्व कर्म निरर्थक॥

दास म्हणे ज्ञानेविण। प्राणी जन्मला पाषाण॥

॥जय जय रघुवीर समर्थ॥

हरीचिंतने मुक्तिकांता वरावी

मुक्ति नावाच्या वधूशी भक्त विवाह करतो व जीव–शिव ऐक्य भोगतो. प्रपंचात द्रव्य, कांता, देहसुख, मी, माझे, या कल्पनांचे वर्चस्व असते. आदर्श गृहस्थाश्रमाचे वर्णन समर्थ “संसारी असताच मुक्त | तो चि जाणावा संयुक्त | अखंड पाहे युक्तायुक्त | विचारणा हे” या ओवीत करतात. गृहस्थाश्रमात त्याग, समर्पण, आनंद, प्रयत्न, प्रेम, आपुलकी याला स्थान दिले तर असा गृहस्थ व त्याची पत्नी संन्यासीच असतात. ही कल्पना “मुक्तिकांता वरावी” या चरणात आहे. संत तुकाराम म्हणतात “ तुका म्हणे मुक्ति परिणली नोवरी | आता दिस चारी खेळीमेळी | म्हणजे आता मुक्ति नावाच्या स्त्रीशी मी विवाह केला आहे. या वैवाहीक जीवनात फक्त सुख व समाधानच आहे. 

आद्य शंकराचार्य म्हणतात “ योग रतो वा भोग रतो वा | संगस्तो वां संगविहीन | यस्य  ब्रह्मणि रमते चित्त | नंद ति नंद ति नन्द्त्येव” म्हणजे ज्याची अंत:करण वृत्ती ब्रह्मानुसंधानात रमलेली आहे तो भोगात रमलेला असला किंवा एकांतात असला तो पूर्णानंदात आनंदरूपच असतो. जनक राजा , मंडन मिश्र, अत्री अनूसूया, श्रीराम-सीता, शंकर-पार्वती यांचे गृहस्थाश्रम याच प्रकारचे होते. 

कल्याण स्वामी एका अभंगात म्हणतात “ आवडी म्या व रिला | गुरु वर आवडी म्या वरिला| स्वात्मसुखाचे कुंकुम लेऊनी | संसृतिशीण हरिला.  समर्थांनी दासबोध सांगितला.  कल्याण स्वामींनी लिहिला. त्या नंतर शिष्यांमधील मीपणा जाऊन वृत्ती पालटावी म्हणून आत्माराम ग्रंथ लिहिला. कल्याण स्वामींना कुंडलिनी जागृतीचा अनुभव दिला. तो त्यांनी सोलिव सुखात शब्दबद्ध केला. आज्ञाचक्रात आत्मज्ञानाची अनुभूती मिळाली. त्यांना चारी देहांचा विसर पडला, उन्मनी अवस्था अनुभवली, आत्म्याशी अंत:करण वृत्ती एकरूप झाली. वृत्ती शून्य अवस्थेचा अनुभव आला. गुरुरूपी अंतरात्म्यात त्यांचा आत्मा विलीन झाला. अद्वैत अवस्थेचे वर्णन कल्याण स्वामी करतात. “एकपण एकचि झाले | ऐक्यरूपी सम मिळाले | करुनिया सुख उधळले | नाहीपण जाऊनी” समर्थांच्या अवतार समाप्तीनंतरही समर्थांच्या व कल्याण स्वामींच्या आस्थींचे विसर्जन एकाच वेळी झाले. 

रुक्मिणी व श्रीकृष्णाचा विवाह म्हणजे शुद्ध जीव-ईश्वर यांचा विवाह होता. श्रीकृष्ण गोपाळ म्हणजे जितेंद्रिय होते. रुक्मिणी निरपेक्ष, निष्काम, विकाररहित, निर्विकार, सद्गुणी, सुंदर, चतुर होती. तिने सहा श्लोकात भगवंताच्या ऐश्वर्य, यश श्री, ज्ञान, वैराग्य, विवेक या सहा गुणांचे वर्णन केले. सातव्यात विनंती केली असा हा सप्तपदी संबंध होता. पत्र फक्त सात श्लोकांचे पण भक्ति भावाने त्यातील अक्षर व भाषा भरलेली होती. जणू तिने छोट्या घागरीत भक्तीचा पूर्ण सागर भरला होता. जीव जेव्हा ईश्वराशी विवाह करतो तेव्हाच कृतार्थ होतो. रुक्मिणी भगवंताची “आद्य शक्ति होती. ती अनन्य होती. श्रीकृष्णाशी विवाह नाही झाला तर ती शरीर त्याग करणार होती. तिचे पत्र नेणाराही “सुदेव” ब्राह्मण होता. सद्गुरूकृपेशिवाय जीव शिवमय होत नाही. 

रासक्रीडेत गोपींच्या सूक्ष्म देहाचे आत्ममिलन होते. गोपींनी विषयांचा, कामविकारांचा, त्याग केलेला होता. गोपी पांच भौतिक शरीराने घरी होत्या. प्रभूची रासलीला शुद्ध प्रेमाची होती. “हरिचिंतने मुक्ति कांता वरावी” याचे चिंतन करतांना मुक्तिकांतेचे रूपकात्मक वर्णन करू शकतो. ही कांता स्वात्मसुखाचे कुंकू आज्ञा चक्रावर दोन भुवयांमध्ये लावते. आत्मबुद्धीची पैठणी नेसते. “ बहू जीर्ण झाली देह बुद्धी कंथा” या वचनाप्रमाणे देहबुद्धी नष्ट करते. नवविधा भक्तीचा रत्नाहार घालते. सहस्रधर चक्रावर बिंदी घालते. विवेक-वैराग्याची कुंडले कानी घालते. षट संपत्तीच्या बांगड्या  (शम, दम, तितिक्षा, उपरम, श्रद्धा, समाधान) सारासार विचाराच्या पाटल्या घालणे अभेदाच्या वाक्या घालून मनातले भेद घालवते. परावाणीवर कंबरपट्टा घालते व सोsहं नादाची नथ घालते. मुक्तीसाठी या सर्व गोष्टी कराव्या लागतात. अद्वैताच्या फुलांच्या हाराने हा विवाह संपन्न होतो.

सर्व प्रकारच्या अज्ञानापासून, दु:खापासून, बंधनापासून, वासनांपासून, मोकळे होण्याची अवस्था म्हणजे मुक्ती त्यालाच अमृतत्वाची प्राप्ती, व कैवल्य असे म्हणतात. मीरेनी श्रीकृष्णाशी आध्यात्मिक विवाह करून ती मुक्त झाली. हरीचिंतने मुक्तिकान्ता वरावी या चरणात इतका अर्थ चिंतन करण्यासारखा आहे. 

आवडी म्या वरिला | गुरुवर आवडि म्या वरिला |

स्वात्म सुखाचे कुंकुम लेऊनि | संसृति शीण हरिला |

स्वात्म भूषणे भूषविले मज | संशय नच उरला |

गुरुकृपे कल्याणचि होईल | निश्चय मनी स्थिरला ||

                  

|| जय जय रघुवीर समर्थ ||

हनुमंत आमची कुळवल्ली

रामायणात श्रीराम-लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताजवळ सीतामातेच्या शोधासाठी येतात व त्यांची व हनुमंताची भेट होणे या क्षणापासून रामायणात हनुमंताचे महत्व प्रगट होते. ब्राह्मण वेशात हनुमंत श्रीरामांसमोर आले. स्वत:च्या मधुर बोलण्याने त्यांनी श्रीरामांबरोबर सख्यत्वाचे नाते जोडले व श्रीरामांनी त्यांचे गुण तात्काळ ओळखले. हनुमंत ब्रह्मज्ञानी, जितेंद्रिय, चारही वेदांचा अभ्यास केलेले, शास्त्रविचार जाणणारे, महायोगी आहेत. हनुमंताचे सूक्ष्म व विशाल रूप पाहून त्यांना अष्ट सिद्धि प्राप्त आहेत हे पण त्यांनी ओळखले. 

 

बालपणीच हनुमंताला इंद्राच्या वज्रापासून अभय, सूर्याकडून उत्तम वक्ता म्हणून आशिर्वाद, यमाकडून, यमदंडापासून अभय, शंकराकडून भगवान शंकराच्या आयुधांपासून अभय, ब्रह्मदेवाकडून ब्रह्मास्त्रांपासून संरक्षण असे अनेक वर प्राप्त झाले पण त्याचा अहंकार हनुमंतामध्ये नव्हता.

चारही युगात हनुमंताचे प्रताप आहेत. सत्य युगात ते शिवरूपात पार्वतीला रामकथा सांगतात. व्दापार युगात अर्जुनाच्या रथावर बसून त्याचे रक्षण करतात त्रेतायुगात वानर रूपात श्रीरामाचे दास्यत्व करतात व आजच्या कलियुगात जिथे रामकथा, रामाच्या नामाचे संकीर्तन असते तेथे नतमस्तक होऊन श्रवण करतात. 

हनुमंत चारही वेदांचा ज्ञाता, व्याकरणाच्या नऊ शाखांचा विद्वान, संस्कार संपन्न भाषा असलेला ज्ञान संपन्न व बलसंपन्न दास होता. अचूक निर्णय घेण्याची क्षमता, सूक्ष्म निरीक्षण शक्ती असल्यामुळे रामायणात अत्यंत अवघड कार्य त्यांनी सहजपणे पार पाडले. रामचरीत मानस म्हणते, “हनुमंताने रावणाला मान, भ्रम, वैर, मोह, मद व तमोगुण सोडून ईश्वराचे भजन, सीतेला परत करणे, श्रीरामांना शरण जाणे व श्रीराम कृपेला पात्र होण्याचा आग्रह केला. हनुमंताला मैनाक पर्वताचे काही काळ विश्रांती घेण्याचा आग्रह केला तो त्याने नम्रपणे नाकारला. श्रीराम कार्यात तत्पर राहाणे, अखंड कार्य करणे हीच त्याची विश्रांती होती. लक्ष्मणाच्या प्राणासाठी द्रोणागिरी आणण्यात हीच तत्परता आपल्याला दिसते. 

समर्थ रामदास जांब सोडून टाकळीला आले. अंत:करणात प्रभू रामाचे आस्तित्व जाणवत नाही म्हणून दु:खी व निराश झाले, त्यांची व्यथा हनुमंताने ओळखली व मनाने त्यांच्याशी हितगुज केले. “रामकृपेसाठी साधना हवी. नाम साधना, सूर्योपासना, सूर्यनमस्कार, गायत्री जप, बलोपासना करायला हवी. विवेक, वैराग्य, या गुणांनी देहबुद्धीचा निरास करायला हवा. त्या  पूर्ण पुरुषाची लक्षणे अभ्यासून अंगी बाणायला हवीत. निराश होऊ नको मी तुला सहाय्य करीन. दुष्टांच निर्दालन, सज्जनांच रक्षण करायला रामदासी पंथ भविष्यात तुला स्थापन करायचं आहे. 

समर्थांनी अशीच साधना १२ वर्षे केली. श्रीरामायणाचे लेखन केले, हनुमंताच्या चरित्रापासून १)त्याचे शारीरिक बळ व ब्रह्मचर्य २)संकटाचे वेळी दाखवलेली निर्भयता ३)दुष्टांची कपटनीती ओळखण्याचे बुद्धीचातुर्य ४)श्रीराम चरणी समर्पित केलेले दास्यत्व हे चार गुण समर्थांनी आत्मसात केले.

समर्थांनी गोमयाचा मारुती टाकळीला साकारला ते महारुद्र स्वरूप टाकळीच्या ग्रामस्थांचे प्रेरणा स्थान होते. देशाटनात गावोगावी मारुतीची मंदिरे उभी केली. चाफळ परिसरातील ११ मारुति प्रसिद्धच आहेत. “आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तयावीण आमुचा परमार्थ, सिद्धि ते न पावे सर्वथा” या समर्थ वचनात समर्थांच्या पारमार्थिक प्रवासात हनुमंताचे सहाय्य व मार्गदर्शन किती महत्वाचे आहे हे कळते.

श्रीरामांनी हनुमंताला तू कोण आहेस? असे विचारले तेव्हा हनुमंत म्हणाला “देहा जे मी तुमचा दास आहे, जीवने मी तुमचं अंश आहे व आत्मरूपात तुम्ही व मी एकरूप आहोत” या तीन रूपांचे आपण अखंड चिंतन करू या समर्थ रामदासांनी तेच केले.

नांव मारूतीचे घ्यावे | पुढे पाऊल टाकावे |

अवघा मुहूर्त शकुन | हृदयी मारूतीचे ध्यान |

जिकडे जिकडे जाती भक्त |पाठी जय हनुमंत |

राम उपासना करी | मारुती वसे त्याचे घरी |

दास म्हणे ऐसे  करा | सदा मारुती हृदयी धरा ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

समर्थ रामदासांच्या करुणाष्टकांची वैशिष्ट्ये

परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी केलेला धावा म्हणजे करुणाष्टक धावा. गजेंद्राचा, द्रौपदीचा संकटमुक्त करण्यासाठी केलेला धावा आठवतो. आद्य शंकराचार्यांची अष्टके आठ श्लोकांचीच आहेत, पण समर्थांची काही अष्टके आठ श्लोकांची आहेत, तर काही नाहीत. समर्थांची करुणाष्टके म्हणजे भगवंताची करुणा भाकण्याकरिता रचलेली आर्त गीते आहेत. समर्थांच्या काही करुणाष्टकांत चौथ्या चरणाची पुनरावृत्ती आहे. ही चरणे मनावर आघात करतात व तो विचार मनावर कायमचा कोरला जातो.

“बुद्धी दे रघुनायका” हा चरण एक नाद, लय, निर्माण करतो. समर्थांच्या करुणाष्टकातील भाव, भावना, निराशा, अगतिकता व्यक्तीनिष्ठ नाही तर व्यापक समाजमनाची आहे. “प्रपंचसंगे आयुष्य गेले”, “सुदृढ झाली देहबुद्धी देही” हा समर्थांचा वैयक्तिक प्रश्न नाही, तर तो जनमानसाचा प्रश्न आहे. तो त्यावेळी होता व आजही आपण तो अनुभवतो आहे.

समर्थांच्या करुणाष्टकांची निर्मिती दु:खातून झाली. जन्म हाच दु:ख मूळ. मीपणाच्या जाणिवेचे दु:ख, त्रिविध तापाचे दु:ख, देहाच्या व्याधीचे दु:ख, साधकावस्थेतील दु:ख, अज्ञानाचे दु:ख, विरहाचे दु:ख, समर्थांनी पाहिले होते.  भिक्षेसाठी गेले असताना घराघरातले दु:ख, व्यक्ती व्यक्तींचे दु:ख, समाजातील भयग्रस्त परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली होती. दु:खाचे मूळ कारण अज्ञान. ज्ञान नाही म्हणून भरकटलेले लोक समर्थांनी पाहिले. अंध:श्रद्धा, साधनेचे अघोरी प्रकार, गैरसमजुती यामुळे लोक गांजलेले होते. “सुख सुख म्हणता दु:ख हे ठाकोनी आले” अशी त्यांची स्थिती समर्थांनी पाहिली होती. दु:खावर उपाय योजण्याची क्षमता नाही. दु:खाचे मूळ कारण ईश्वराचा वियोग व अज्ञान हे होय. “तुझिया वियोगे जीवित्व आले” असे समर्थ याचसाठी म्हणतात. समर्थांच्या काळात योग्य मार्ग दाखवणारा आध्यात्मिक नेता नव्हता, पारतंत्र्यामुळे लोक भयग्रस्त होते. सगुण निर्गुण श्रीरामाची उपासना कशी करावी ? याचे लोकांना ज्ञान नव्हते.

समर्थांना केवळ श्रीराम कृपाच हे दु:ख कमी करेल हा विश्वास होता. त्याच्या जवळ कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. त्याच्याशी दास, सखा, मित्र, स्वामी असे नाते जोडावे. काया, वाचा, मनाने त्याचे व्हावे असे त्यांना वाटे व तशी प्रार्थना ते करुणाष्टकांतून करतात. 

अनन्यता – समर्थांना “एका रामाशिवाय माझे कोणी नाही” अशी अनन्य भक्ती करणे आवडत असे. तोच तारणारा, तोच माझे सर्वस्व म्हणून “तुजवीण रघुनाथा वोखटे सर्व काही”, “तुजवीण रामा मज कंठवेना” असं ते म्हणतात. सामान्य जन मात्र प्रपंचात इतके गुंततात की, त्यांना ईश्वराची आठवण येत नाही, त्यांचा परमार्थ सवडीचा असतो.

संवाद – समर्थ सर्वस्वी श्रीरामाचे झाले म्हणून ते त्याच्याशी संवाद साधत. अशी एकाग्रता, तळमळ सामान्य माणसांमध्ये नसते. या संवादात “दुष्ट संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो । परंतु रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी ।” हा हट्ट आहे. काया, वाचा, मनाने तुझा झालो म्हणून “हे लाज तुजला माझी” यात सख्यत्व आहे. संवादात एका रामाशिवाय ही कृपा कोणीही करू शकत नाही ही प्रांजळ कबुली आहे. माझ्या साधनेत काही कमतरता आहे का ? हा प्रश्नही ते विचारतात. “नव्हे कार्यकर्ता भूमिभार झालो” अशी व्यथा ते मांडतात. हा संवाद आतील मनाचा होता, ते हितगुज होते, देव-भक्ताचा एकांतात घडलेला हा संवाद होता. एका असामान्य, निष्ठावान, श्रद्धाळू, अनन्य भक्ताचे ते हितगुज होते.

भाषा – ईश्वराशी संवाद साधायला समर्थांसारखे संत योग्य शब्द योजना करतात. प्रभूचे अंत:करण वितळावे, करुण रसातून, प्रेमातून त्याचे लक्ष आपण वेधावे, आर्तता प्रगट व्हावी म्हणून शब्दांचे सामर्थ्य समर्थ प्रगट करतात. “तुजवीण करुणा हे कोण जाणेल माझी ? तुजवीण शीण होतो धाव रे धाव आता” यातील शब्द योजना पाहिली की त्यातील सामर्थ्य जाणवते. त्यातील एकही शब्द इकडचा तिकडे करता येत नाही. कारण त्यांची मांडणी नेमकी, नेटकी व प्रत्ययाची आहे.

भावावस्था – “श्रीराम आहेच” या मनाच्या अवस्थेला भाव म्हणतात. समर्थांमध्ये तो परिपूर्ण होता. पश्चात्ताप, कमतरतेची प्रांजळ कबुली, लोकांचे दु:ख कमी होण्याची तळमळ असलेला, हे लोक तुझेच; म्हणून स्मरण करुन देणारी तळमळ त्यात आहे.

अद्वैताची अवस्था – करुणाष्टकात श्रीराम व समर्थ यांची एकरूपता दिसते. “जेथे शब्दच निमाला, तेथे रामदास रामचि झाला” अशी अवस्था शब्दांतून प्रगट होते. 

मागणे – “रघूनायका मागणे हेची आता”. कोमळ वाचा, विमळ करणी, प्रसंग ओळखी, धूर्तकळा, हितकारक ते, विद्यावैभव, शब्दमनोहर, अर्थारोहण, अलापगोडी अशा शब्दात समर्थ रामाकडे मागणे मागतात. त्यात वैयक्तिक स्वार्थ नाही. “मजविण तू मज दे रे राम” यात अद्वैताची परमोच्च अवस्था आहे.

आपण सज्जनगडावर जातो तेव्हा मनातले ताण तणाव, प्रापंचिक दु:ख विसरतो. ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ या विचारात उठतो. समर्थ समाधी व श्रीरामाचा अभिषेक पहातो. सायंकाळी करुणाष्टके म्हणतो तेव्हा आपली व्यथा, दु:ख श्रीरामासमोर मांडले म्हणून मन हलकं व शांत होते, उत्साह वाढतो, एकाकीपणा नाहीसा होतो. रात्री दासबोध वाचन, शेजारती होते. मनाला विश्रांती व समाधान मिळते; प्रसन्न वाटते.    

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

अग्नी उपासना

 तेज किंवा अग्नी– अज या धातूपासून  हा शब्द तयार होतो अङ्ग नि ऊर्ध्व म्हणजे वर जातो तो अग्नि. अग्नी ही इंद्रिय गोचर घटना आहे, दहन व ज्वलन हे तिचे स्वरूप आहे व उष्णता व प्रकाश अग्नीमधून मिळतात. अग्नीचा प्रवास असतो, थंड वस्तु मध्ये गरम वस्तूतून उष्णता जाते, गॅस वर भांड्याच्या तळाशी असलेला पदार्थ प्रथम उष्ण होतो तो वर येतो व वरचा खाली असे पाणी गरम होते. अवकाशातूनही उष्णता मिळते शरीर जीवंत राहण्यासाठी उष्णता लागते त्याला स्वाभाविक शरीराचे तापमान म्हणतो. वैदिक ऋषींनी अग्नीचे महत्व जाणले. म्हणून ऋग्वेदाचा आरंभच अग्निस्तवनाने होतो. यज्ञातील अग्नीला ग्रहपती म्हणतात. अग्नी  प्रकाश देतो. ईश्वरी ज्ञानात अग्नी आहे तो  देह बुद्धी नष्ट करतो. सूर्य व अग्नी ही मोठी दैवते आहेत. पोटातील जठराग्नीमुळे अन्नाची चव वाढते. सागरात वडवानल, भूगोलाबाहेर आवरणातल असतो. आग्या सापाच्या तोंडतील अग्नी डोंगर जाळून टाकतो. अग्नीचे घर्षण करून तयार केलेली वीज, जलावर निर्माण केलेली वीज व अंतरिक्षातील वीज ही अग्नीची तीन रुपे आहेत. तीन लोक, वायु, आदित्य, आप, औषधी, वनस्पती, लाकूड, शरीर ही अग्नीची निवास स्थाने आहेत. काळी, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुलिंगिनी व विश्वरुची देवी या अग्नीच्या सात जिव्हा आहेत. समर्थ दासबोध १६.५.२९ मध्ये  तीन जिव्हा, चार नेत्र, तीक्ष्ण दाढा, तीन मस्तके, तीन पाद, असे अग्नीचे वर्णन करतात. अग्नी ज्ञानी लोकांचा परमेश्वर, गृहस्थाचा पालक, मानवाचा अतिथि, पृथ्वीचा रक्षणकर्ता आहे.  वास्तु शांतीने अग्नीची पुजा करतात. रामायणात दशरथाच्या यज्ञातून पायस मिळाले व श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचा चा जन्म झाला. कौसल्या अग्नीत समंत्र हवन करत असे. अग्निला साक्षी ठेवून श्रीराम, व सुग्रीव मैत्री झाली. सीतेने अग्निदिव्य केले. अग्निहोत्र व वैश्वदेव या द्वारे अग्नीचे रोज पूजन करण्याची  पद्धत होती. महाभारतात खांडव वनाचा दाह करण्यासाठी  श्रीकृष्णाने सुदर्शनचक्र व अर्जुनाने अक्षय भाता धनुष्य दिले.  होलिकेचे पूजन करून दुष्ट प्रवृत्तींचा नाश करण्याची पद्धत आजही आहे. पृथ्वी, आप, वायु व आकाश यात अग्नी तत्व आहे व त्यामुळे सृष्टीत समतोल आहे. अग्नी भक्षकही आहे व त्यामुळे सावधपणे त्याचा वापर आपण करणे गरजेचे आहे. म्हणून समर्थ म्हणतात “सर्व भक्षकु | त्याची थोरी म्हणोनी सांगावी?

अग्निहोत्र हा मूळ धर्म आहे, ते वेदाचे किंवा सत्यधर्माचे विशुद्धरूप आहे. हा सत्यं प्रात: नित्य चालवायचा यज्ञ आहे व सुलभ अल्पसामुग्रीने, अल्पवेळात, अल्पखर्चात करता येते. दोन चिमटी तांदूळ, 2 थेंब गाईचे तुप, ही आहुती एक व्यक्ती मंत्रोच्चार करून देते. नित्यत्व, सातत्य विशिष्ट वेळ, व नित्य स्मरण यामुळे ही तप:साधना आहे. 

वैश्वदेव म्हणजे अग्नीत आहुती देणे, अन्न ग्रहण करण्या अगोदर तुप भाताची आहुती अग्नीला अर्पण करतात. आतिथीची वाट पाहावी. त्याला भोजन द्यावे. गाय, कावळा, कुत्रा यांना द्यावे. जगा व जगू द्या हा संदेश त्यातून मिळतो. अन्न ही ईश्वरी कृपा आहे. जगी पाहता देव हा अन्नदाता असे समर्थ म्हणतात.

आपल्या वैदिक संस्कृतीत आर्य अग्नीपूजक होते. त्यांना तेज व अग्नी पासून ज्ञान व प्रेरणा मिळत असे. विटा भाजण्यापासून, अन्न शिजवण्यापर्यंत मानवाचे जीवन अग्नीने व्यापले आहे. उष्णता व शक्तीमुळे अर्थार्जन शक्य होते. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंचविषय अग्नि पासून शक्ती घेतात. त्यांना नियंत्रणात ठेवले तर जीवनात समतोल राहातो. अनियंत्रित ठेवले तर जीवन उध्वस्त होते. मोक्षप्राप्ती संन्यस्त वृत्ती साठी अग्नीउपासना महत्वाची आहे. यात विषय वासना दग्ध होतात. मी व माझे याची निवृत्ती होते. सारी संपदा भगवंताची आहे या भावात कर्म करून ते अग्नीरूप भगवंताला अर्पण करावे.              

|| जय जय रघुवीर समर्थ ||

अद्वैत विचार

आपले पूर्ण जीवन द्वैताने भरलेले आहे. “द्वितीयात भयं भवति” असे उपनिषदे सांगतात. द्वैत म्हणजे दोन मी-तो, गरीब–श्रीमंत, सुंदर-कुरूप, श्रेष्ठ-कनिष्ठ, ज्ञानी-अज्ञानी हे भेद किंवा अनेकत्व मायेच्या शक्तीमुळे निर्माण होते. आपल्या शरीरातही हाताच्या बोटांची लांबी वेगळी असते. द्वैतामुळे भय निर्माण होते. श्रीमंताला चोराचे, सौंदर्याला वृद्धपणाचे, जन्मानंतर मृत्युचे भय असते. भयामुळे अशांती, बेचैनी, गैरसमज, असुरक्षितता वाढते. द्वैतामुळे पैसा,विद्या, रूप, गुण, यश, बळ याची तुलना होते. तुलनेमुळे द्वेष, मत्सर, आसक्ती, क्रोध, हिंसेचे विचार निर्माण होतात, देह सुखाची आसक्ती, कर्तेपणा, भोक्तेपणा या क्रमांमुळे खर्‍या परमार्थ साधनेपासून माणूस दूर जातो. गणितातील १ ते ९ आकड्यात अद्वैत आहे १० आकड्यापासून पुढे द्वैतच सुरू होते. मी म्हणजे देह, देह सुख हे खरे सुख, मी कर्ता, मी भोक्ता, या भ्रमांमुळे द्वैत विचार वाढतो, तुलना व स्पर्धा होते व मनाची शांती बिघडते. 

भारतीय संस्कृतीत उत्तुंग, भव्य अद्वैत दर्शन आहे. प्राचीन ऋषी एकांतात अरण्यात राहात, निसर्ग व चराचर सृष्टीशी एकरूप होत असत. त्यामुळे अद्वैत तत्वज्ञानात त्यांनी वेद वाङ्मय लिहिले. सृष्टी अद्वैतविचार शिकवते. मेघ सर्वांना पाणी देतात. झाडे सावली व फळे देतात, पृथ्वीमाता पेरल्यापेक्षा अनेक पटींनी ज्यास्त धान्य देते, फुले सुगंध देतात, सूर्याचा तेजस्वी प्रकाश उष्णता देतो, चंद्र शीतलता व प्रकाश सर्वांना देतो. नदी म्हणजे लहान-मोठ्या नद्यांचा संगम होय. गंगेचे पाणी शुद्ध व शुभ्र, यमुनेचे पाणी काळे पण दोघी प्रेमाने मिठी मारतात. एकरूप होतात संगमानंतर कुठले गंगेचे, कुठले यमुनेचे पाणी कळत नाही. नदी समुद्रात एकरूप होऊन मिळते म्हणून ती अद्वैताची युती आहे. गंगा, यमुना, सरस्वती म्हणजे कर्म, ज्ञान, भक्तीचा सुरेख संगम आहे. 

समर्थांना विश्वाची चिंता होती. त्यांची देहबुद्धी नष्ट झाल्यामुळे ते वाङ्मयरूपात अमर झाले. त्यांनी नाम व रूपाचा, स्वजनांचा त्याग केला व निर्गुण रूपात आत्मस्वरुपात राहून देहाने लोककल्याणाचे कार्य अविरत केले. भिक्षा मागताना टोपले भरून पीठ आणले तरी ५ मुठीच ते घेत. इतरांच्या भुकेचा विचार करत म्हणून त्यांच्या भिक्षेला “पावन भिक्षा” म्हणतात. समर्थ अद्वैत तत्वज्ञानाचे खंदे पुरस्कर्ते होते. अद्वैत व मोक्ष या दोन्हीचा अर्थ एकच असे ते म्हणतात. समर्थांनी समाजाचा प्रपंच श्रीरामाच्या साक्षीत्वात केला. त्यांच्या अंत:करणात निर्गुण आत्माराम स्थिर होता व त्यांचे जीवन श्रीरामाच्या दिव्य प्रेरणेनेच चालत होते.

ज्ञानदेवादी संतांनी १८ पगड जातींना भागवत धर्माखाली एकत्र आणले. सुतार, कुंभार, चांभार, सोनार, विणकर या सर्वांची गरज समाजाला असते, ते स्वत:च्या कर्माने समाज पुरुषाची सेवा करतात. त्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद नाही. “सारे सुखी व निरोगी  असोत हा अद्वैताचा मंत्र त्यांनी आपल्याला दिला. संत तुकाराम म्हणतात “संकोचूनि काय झालासी लहान ? घेई आपोषण ब्रह्मांडाचे” अद्वैत विचारात आपले मन ब्रह्मांडाहून व्यापक होते. 

दासबोध दशक ७ समास ९ मध्ये अद्वैत वेदान्तशास्त्र ज्यात सांगितले आहे. अशाच ग्रंथाची निवड करण्यास समर्थ सांगतात. भयमुक्त जीवनासाठी अद्वैतचा अनुभव आवश्यक आहे. अद्वैत विचाराच्या ग्रंथाच्या श्रवणाने मोक्षाचा विचार पक्का होतो. समर्थ म्हणतात “जयास स्वहित करणे | तेणे सदा विचरणे, अद्वैत ग्रंथी |”  द्वैतामुळे आत्मसुखाची कपाटे बंद होतात पण सद्गुरू कृपेच्या किल्लीने उघडतात, बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडतो व एकाग्र चित्ताने आत्म्याच्या अनुसंधानाचा अनुभव येतो. मन व बुद्धी च्या ऐक्याने चित्ताची समता होते व जीव –आत्म्याच्या ऐक्याचा अनुभव येतो. 

समर्थ मनाच्या श्लोकातही अद्वैत विचार मांडतात. श्लोक १३६ मध्ये अनेकत्वामुळे भय निर्माण होते, परब्रह्माशी एकरूप झाल्यावर भय नष्ट होते व जगातील सर्व व्यवहारांकडे साक्षीत्वाने पाहाता येते, असे समर्थ म्हणतात. उपनिषदे ब्रह्मस्वरूपाला सत्य अथवा भूमा म्हणतात. हे ब्रह्मस्वरूप अत्यंत पुरातन, विशाल, आपल्या तर्काच्या पलीकडे, गुप्त, स्थिर, व रहस्यमय आहे. त्याच्या ठिकाणी दुजेपण नाही कारण ते एकच एक आहे. विश्वामध्ये अनेकपणा अथवा द्वैत असते. अनेकपणात भय असते पण दृश्याचा भेद करून आपण परब्रह्मापर्यंत पोहोचलो तर भय मुक्त होतो व ईश्वरापासून विभक्त नाही असा भक्त होतो. 

आपल्या देशात भाषा चालीरीती, पोशाख, जीवनपद्धती, हवामान यात भिन्नता आहे. अद्वैत तत्वज्ञान हा भारतीय तत्वज्ञानाचा गाभा आहे म्हणून इथे अनेकात एकत्व आहे. भय मुक्त जीवनासाठी एकत्व विचार आपण सांभाळायला हवा. आपल्या अंत:र्बाह्य कृतीतून त्याचा सुगंध बाहेर यावा. 

अवघे ब्रह्ममय रिता  नाही ठाव | प्रतिमा तो देव नोहे कैसा ?

सगुण हे ब्रह्म निर्गुण हे ब्रह्म | पाहाता मुख्य वर्म ब्रह्ममय |

नाही द्वैत भेद मिथ्या का भ्रमसी | सत्य माया ऐसे मानू नये |

मृगजळ डोळा दिसे परी नासे | तैसा हा विलास दिसताहे|

दास म्हणे देह बुद्धी हे त्यागावी | एकत्वे रंगावी मनोवृत्ती ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language