मागील भागात आपण नरदेहाचे महत्त्व आणि नरदेहाची रथासोबत केलेली तुलना बघितली होती. यमराजांनी नचिकेतला रथाचे हे रूपक समजावून सांगितले होते. आज आपण या देहाला व्यवस्थित कसे सांभाळायचे आणि इंद्रियांवर नियंत्रण का आणि कसे ठेवायचे ते बघणार आहोत. ‘मी देहच आहे’ ही भावना माणसाच्या बंधनास कारणीभूत होत असते. विवेक करून ही भावना उकलावी. मी देह आहे ही भावना जीवाला बांधते, विवेक करून त्या बंधनातून मोकळे होता येते. आपण जर रथापाशी किंवा घोड्यांजवळच थांबून राहिलो तर रथाची वाताहात व्हायला वेळ लागणार नाही, हे आपण मागच्या भागात बघितले होते. स्वतःला देह समजणे कधीही घातकच आहे.
“देह मी वाटे ज्या नरा। तो जाणावा आत्महत्यारा ।
देहाभिमानें येरझारा। भोगिल्याच भोगी ।।५-६-५५।।”
म्हणून माणसाने हे पक्के लक्षात ठेवावे की, हा देह मला भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळाला आहे. त्याचा योग्य उपयोग मी केला पाहिजे. आपले मन आणि इंद्रियांवर देखील आपला ताबा हवा.
मन भलतीकडे धावें।तें विवेकें आवरावें।
इंद्रियें दमन करावें।तो सत्वगुण।।२-७-७०।।”
देह, इंद्रिये आणि प्राण यांच्यावर नीट नियंत्रण नसेल, तर आध्यात्मिक ताप होतात.
देह इंद्रिय आणी प्राण।यांचेनि योगें आपण।
सुखदुःखें सिणे जाण।या नाव आध्यात्मिक।। ३-६-१३।।”
अशी निरनिराळ्या प्रकारची दुःखे माणसाला विविध कारणांनी भोगावी लागतात. याची कारणे, ताब्यात नसलेली इंद्रिये आहेत. यमराजांनी नचिकेतला हे समजवून सांगितले आहे. केवळ शुद्ध आत्मा भोक्ता असू शकत नाही. शरीर, मन, इंद्रिये, बुद्धी यांनी युक्त असलेला आत्माच भोक्ता आहे असे मनीषी सांगतात. पण जे अविवेकी आहेत, ते गल्लत करून कधी शरीर आणि मनालाच कर्ता, भोक्ता मानतात तर कधी चैतन्य स्वरूप परमात्म्यालाच भोक्ता समजतात. आता या पुढील पाच मंत्रांमधून यमराजांनी नचिकेतला देह-इंद्रिये-मन-बुद्धी यांना योग्य वळण देण्याने मनुष्य अज्ञान दूर करून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी कसा योग्य बनतो, आणि जर त्याला योग्य वळण लावले नाही, तर कसा संसारात गुरफटतो याचे रहस्य उलगडून दाखविले आहे. या पाच मंत्रांना आता आपण बघणार आहोत –
यस्तु विज्ञानवान् भवति युक्तेन मनसा सदा।
तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथेः।।
यस्त्वविज्ञानवान् भवत्यमनस्कः सदाशुचिः।
न स तत्पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति।।
यस्तु विज्ञानवान् भवति समनस्कः सदा शुचिः।
स तु तत्पदमाप्नोति यस्माद भूयो न जायते।।
विज्ञानसारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान्नरः।
अर्थात् – जो बुद्धिरूप सारथी अविज्ञानवान (अविवेकी व असंयत) आहे, त्याच्या मनरूपी लगामावर त्याचा कधीच ताबा रहात नाही आणि मग नाठाळ घोडे जसे सारथ्याच्या नियंत्रणात रहात नाहीत, तशीच इंद्रिये देखील त्या सारथीरूपी बुद्धीच्या ताब्यात रहात नाहीत. जो बुद्धिरूप सारथी विज्ञानवान अर्थात कुशल आणि विवेकी आहे त्याचे मनरूपी लगाम देखील त्याच्या नीट ताब्यात रहातात. आणि मग चांगले घोडे जसे सारथ्याच्या नियंत्रणात रहातात, तशी इंद्रिये देखील त्या सारथीरूपी बुद्धीच्या ताब्यात रहातात. ज्याचा आपल्या बुद्धीवर ताबा नाही, किंवा ज्याची बुद्धी कुशल नाही, आणि ज्याचे मन देखील ताब्यात नसते व त्यामुळे जो सर्वदा अपवित्र असतो, तो या शरीररूपी रथाद्वारे आपल्या त्या परम पदाला न पोहोचता संसारातच भटकत रहातो. आणि ज्याची बुद्धी कुशल आणि आज्ञाधारक आहे, त्याचे मन देखील ताब्यात रहाते व तो सदा पवित्र जीवन जगतो. तो त्या परम पदाला प्राप्त करतो, जिथे गेल्यावर पुनः जन्म घ्यावा लागत नाही. ज्याच्या कुशल सारथ्याने मनरूपी लगामांना नीट ताब्यात ठेवले आहे, तो या संसाराच्या पलीकडे असलेल्या विष्णूच्या परम पदाला प्राप्त करतो.
एकंदरीत, माणसाने परमात्म प्राप्तीचे आपले लक्ष गाठायचे असेल, तर इंद्रियांवर योग्य नियंत्रण मिळवून मन आणि बुद्धीचा योग्य वापर करावा, असे यमराज या रथाच्या रूपकातून सांगत आहेत. माणसाने मी देह आहे असे मानण्यापेक्षा, मी आत्मा आहे असे मानले पाहिजे. रथापाशी किंवा घोड्यांपाशी थांबण्यापेक्षा, रथी असणारा जो जीवात्मा आहे, त्याच्याशी जवळीक करणे आवश्यक आहे.
हित आहे देहातीत।म्हणौनि निरोपिती संत।
देहबुद्धीनें अन्हित।होंचि लागे।।७-२-३७।।
देहबुद्धी आणि आत्मबुद्धी हे शब्द आपण नेहमीच वापरत असतो. निश्चय करणे हे बुद्धीचे लक्षण आहे. मी देह आहे, असा निश्चय करणे याला देहबुद्धी म्हणतात. मी ब्रह्म आहे, असा निश्चय करणे ही आत्मबुद्धी आहे. जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे आपले मन देहाला चिकटलेले असते, त्यामुळे मी देहच आहे असा आपला समज होतो. आपले अस्तित्त्व या देहाच्या पलीकडे आहे हे आम्हांला माहितच नसते. मनाने आपण देहापासून आणि इंद्रियांपासून निघून आत्म्याकडे जायला हवे आहे. देहबोध नाहीसा होणे हे साऱ्या साधनेचे फलित आहे.
देहचि होऊन राहिजे।तेणें देहदुःख साहिजे।
देहातीत होतां पाविजे।परब्रह्म तें।।८-८-२५।।
देहातीत वस्तु आहे।तें तूं परब्रह्म पाहें।
देहसंग हा न साहे।तुज विदेहासी।।८-८-२८।।
साधना करून साधकाने देहाचा संग सोडावा आणि आपण विदेही आहोत याची प्रचिती घ्यावी. मी देह नाही, मी देहाचा स्वामी आहे, हे कळले की इंद्रियांवर नियंत्रण रहाते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।