गोड वाचे वदावे

वचनें बोलावी करुणेचीं | नाना प्रकारें स्तुतीचीं |

अंतरें निवती सकळांचीं | ऐसें वदावें || ४–७–२६||

सोबतची ओवी सांगते, “देवाच्या दासाचे बोलणे दयेने भरलेले असावे; दुसऱ्यांबद्दल चांगले बोलणारे असावे; ऐकणाऱ्यांचे मन सुखावेल; त्याचे अंत:करण समाधान पावेल असे असावे.” ही ओवी दशक ४ मधील सातव्या समासामध्ये दास्यभक्तीच्या निरुपणात येते. दास्य भक्तीमध्ये  नम्रता आणि दुसऱ्यांना आनंद होईल अशी सेवा करणे हे मूलभूत तत्त्व असते. नम्रतेमध्ये मृदु भाषा आपोआपच येते. तिथे कुणी कठोरतेने  बोलूच शकणार नाही. कठोर वचनात त्या व्यक्तिचा ताठा, अहंकार,गर्व किंवा अति आत्मविश्वासाचा वास डोकावेल. श्रीसमर्थांनी अन्य ठिकाणी म्हटलेच आहे की, “पेरलें तें उगवते | बोलण्यासारखे उत्तर येते | तरी कर्कश बोलावें तें | काय निमित्यें ||१२–१०–२६||” दास्य भक्तिमध्ये जर सेवाभाव जोपासायचा आहे तर कठोर वचनांना जागाच कुठे मिळणार ? 

या दशकामध्ये श्रीसमर्थ नवविधा भक्तींच्या निरुपणात सातवी भक्ती दास्यभक्ती वर्णन करतात. यात श्रीसमर्थ भगवंताची आणि त्याच भावनेने सद्गुरूंची सेवा, कशाप्रकारे करता येईल याची सविस्तर यादी देऊन विवेचन करतात. अशाच प्रकारचा तपशील सत्वगुण लक्षण(द.२.६) तसेच अर्चनभक्ती (द.४. ५) मध्येही येतो. यासाठी श्रीसमर्थांच्या काळाचा विचार लक्षात घ्यायला हवा. त्याकाळी यावनी राजवटीत समाजाची दुर्दशा, भंगलेली तीर्थस्थाने आणि देवालये त्यांनी आपल्या भारत भ्रमणात पाहिली होती, अनुभवली होती. त्यामुळे समाज पुन्हा एकत्र येऊन खंबीरपणाने उभा रहाण्यासाठी देवालये आणि धार्मिक उत्सवांच्या  जीर्णोद्धाराचा आग्रह ते पुन्हा पुन्हा धरतात. यासाठी दास्यभक्तीसारखी निरपेक्ष सेवा नाही, हेही ते जाणतात. त्यासाठी जे जे हवे ते ते तत्परतेने आणि आनंदाने करण्यासाठी आपल्या पदाचा, प्रतिष्ठेचा वा वैभावाचा यत्किंचितही विचार न करता लहानमोठी कामे सेवाभावाने करावीत असे या विवेचनात श्रीसमर्थ सांगतात. कुठलीही कामे अशी करावीत की अतिथी, साधकांची मने प्रसन्न व्हावीत. अर्थातच यासाठी आपली वाचा नम्र, मृदू व प्रेमळच असावी हे ओघानेच आले. श्रीसमर्थ म्हणतात की, “अंतरे निवती सकळांची | ऐसे वदावे ||”

श्रीगजानन महाराजांच्या शेगाव तीर्थक्षेत्रात पावलोपावली सेवक नम्रपणे उभे असतात. कुठेही साधा कागदाचा कपटा दिसू नये याची दक्षता घेतात. शिखांच्या गुरुद्वारांमध्ये कारसेवा म्हणून भाविकांच्या पादत्राणांची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी अनेक सुशिक्षित, उद्योगपती, श्रीमंत तत्पर असतात. सर्वांच्या मुखातून नम्र आणि मृदू भाषाच ऐकू येते. पक्षीेदेखील मंजूळ कुजन करून आपणास रिझवितात त्यात  काहीच स्वार्थ नसतो. कोणी ऐकतोय की नाही याचे भानही त्यांना नसते. मृदू बोलणाऱ्याने देखील पलिकडचा कसा बोलतोय, कसा प्रतिसाद देतोय याची चिंता न करता आपली वाचा नम्र व प्रसन्न भावातच राहू द्यावी. हाच बोध आपण घ्यावयाचा आहे. “म्हणोनि दुसर्‍यास सुखी करावे | तेणे आपण सुखी व्हावें || १४– ६–२३||” असे श्रीसमर्थांचे वचनच आहे. निसर्गातील पक्षीही तेच करतात. 

|| जय  जय रघुवीर समर्थ ||

कल्याण करी रामराया

“कल्याण करी रामराया” ही प्रार्थना श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेली एक आगळी-वेगळी आर्त ‘आळवणी’ आहे. ही सर्वसाधारण प्रार्थनेप्रमाणे किंवा आरतीप्रमाणे इष्टदेवतेच्या सगुण स्वरूपाचे रूपसौंदर्य वर्णन करणारी; अथवा त्या त्या देवतेचे गुण वर्णन करणारी नाही. या प्रार्थनेला पसायदान म्हणावे, तर इतर  पसायदानाप्रमाणे केवळ मांगल्याचे, सुख-शांतीचे मागणे यात नाही. या प्रार्थनेत तत्कालीन समाजाचे, धर्मस्थितीचे आणि परकीय राज्यसत्तेचे जळजळीत दर्शन व्यक्त होते.

आक्रमक, निष्ठुर, निर्दयी अशा यावनी सत्तेपुढे हतबल झालेली प्रजा, धार्मिक स्थळांचा विध्वंस, स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे आणि आपलीच माणसे यवनांची चाकरी करून स्वतःचे स्वत्व विसरून, स्वधर्माला विसरून शिरजोर झालेल्यांचे वर्णन यात सूचकपणे व्यक्त झाले आहे. यामुळे श्रीसमर्थांना एकच आशेचा किरण दिसतो आहे, तो म्हणजे रामराया ! कोदंडदारी, महाप्रतापी, प्रभूरामचंद्रच यातून वाचवू शकतील; अशा आर्त भावनेने ते म्हणतात, “कल्याण करी रामराया ! हे रामराया, तूच आता यातून आम्हाला वाचव. तूच आमचा तारणहार, कर्ता आहेस.” या घडीला केवळ लौकिक भक्तिमार्ग समाजाला तारू शकणार नाही. या दृढ मनोधारणेने, जनजागृतीसाठी; समाजामध्ये कर्तव्याचा; बलाचा आणि स्वाभिमानाचा स्फुल्लिंग फुलवण्यासाठी श्रीसमर्थांनी आपल्या स्वतंत्र विचारसरणीच्या रामदासी पंथाची उभारणी केली. भक्ती मार्गातूनच आपल्या ईप्सित ध्येयाचा प्रसार आणि प्रचार त्यांनी केला. त्या ध्येयाला अनुसरून ही प्रार्थना त्यांनी लिहिलेली असावी. त्यांनी आपल्या भारत-भ्रमणामध्ये जी विदारक स्थिती पाहिली; ती त्यांनी नोंदवून ठेवली आहे. ते म्हणतात,

“पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशचि उरला ।

येणेकरिता बहुतांला ।  संकट जालें ।।”

त्यांनी धार्मिक स्थळांचा विध्वंस, स्त्रियांवरील अत्याचार आणि सामान्य प्रजेची दैना पाहून अखेरीस भगवंताला कळकळीची आळवणी केली. ते म्हणतात,

“दास म्हणे रे भगवंता । किती पाहसी सत्त्व ।

काय वांचुनि वांचुनि । नुपरते जीवित्व ।।”

आता जगून वाचून तरी काय करावे ? अशी अवस्था प्राप्त झाली आहे. हे भगवंता, तू तरी किती सत्त्व पाहणार आहेस ? अशी आर्त हाक ते मारतात. अशावेळी दुष्टांचा संहार करून प्रजेचे कल्याण करणारा निष्काम, महाप्रतापी योद्धा, शक्तिशाली रामराया त्यांना उपासनेसाठी आदर्श वाटला आणि त्यादृष्टीने त्यांनी जे कार्य केले ते पाहता, श्रीसमर्थ हे राष्ट्रवादाचे आद्य प्रवर्तक आहेत असे म्हणणे सार्थ ठरेल. त्यांचे कार्य आणि तळमळ पाहून आपण नतमस्तकच होतो.

याच भावनेतून श्रीसमर्थानी लिहिलेली ही प्रार्थना, इतर प्रार्थना किंवा सर्वसाधारण आरत्यांप्रमाणे भगवंतावर स्तुती-सुमने उधळणारी किंवा त्याच्या सगुण स्वरूपाचे गुणवर्णन करणारी नसणे हे ओघाने आलेच. तत्कालीन समाजाचे दारुण चित्र सुचकरीत्या व्यक्त करताना, त्यांचे शब्द-सामर्थ्य आणि आंतरिक तळमळ अतिशय प्रभावीपणे, प्रत्ययकारी स्वरूपामध्ये व्यक्त होते. या प्रार्थनेतून त्यांना स्वतःला किंवा आपल्या पंथासाठी काहीच मागावयाचे नाही. ते समाजाचे, धर्माचे म्हणजे पर्यायाने राष्ट्राचे कल्याण; श्रीरामांकडे मागतात. यातही त्यांची धगधगीत वैराग्य दृष्टीच व्यक्त होते. ते प्रार्थना करतात, “जनहित विवरी कल्याण करी रामराया” ही प्रजा, समाज, धर्म, सारे संकटात सापडले आहेत. दुष्टांचे निर्दालन करून भक्तांना तारणार्‍या हे रामराया, आमच्या संकटाचे तूच निवारण कर. तुझ्या धनुष्याचा टणत्कार ऐकून प्रत्यक्ष काळ देखील थरारून जातो, अशी तुझी कीर्ती आहे. समाजाची स्थिती पाहून माझ्या जीवाची तळमळ होत आहे. आता या दुःखी जनास तूच हाती घेऊन आधार दे, असे ते म्हणतात. त्याला तुझ्या करुणेच्या पंखाखाली घे, असे आर्जवाने म्हणतात. यातून श्रीसमर्थांची श्रद्धा आणि दृढ विश्वास व्यक्त होतो. ते पुढे म्हणतात, अपराध, अन्याय करणारे; अपराध करतच आहेत. अन्याय, जुलूम, अत्याचार करून जनतेला हवालदिल करत आहेत. रयत गांजून गेली आहे. हे रामराया, आता तूच त्यांना सावर ! त्यांना आधार दे ! त्यांना प्रेरणा देऊन उभे राहण्याची शक्ती दे ! या संकटामध्ये वाईटात अधिकच वाईट घडावे, अशी कठीण परिस्थिती होत चालली आहे. त्यामुळे रयतेपुढे निराशेचा अंधार पसरला आहे. आशेचा किरणही कुठे दिसत नाही. परचक्र निरूपणात ते म्हणतात, 

“ऐसें जालें वर्तमान । पुढेचि अवघ्या अनमान ।

सदा दुश्चित अवघें जन ।उद्वेगरुपी ।।”

म्हणून ते पुढे म्हणतात “कोठे जावे, काय करावे ?” जनसामान्यांना आगीतून निघावे तर फुफाट्यात पडावे, अशा अवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. आता कुठे जायचे ? आणि कसे वाचायचे ? ह्या केविलवाण्या अवस्थेला तोंड द्यावे लागत आहे. स्त्रिया-मुलींना जगणे अशक्य झाले आहे. अशा भयानक स्थितीत आत्महत्येशिवाय मार्ग उरलेला नाही. 

ते म्हणतात. “आरंभिली बोहरी” याला संदर्भ राजपुतान्यातील सैनिकांनी केसरीया धारण केल्यानंतर स्त्रियांनी जौहार करून अग्नी-प्रवेश केला होता त्याचा आहे. परचक्र निरूपणात ते म्हणतात, 

“कितेक अनाचारी पडिली । कितेक यातिभ्रष्ट जालीं ।

कितेक विषे घेतली । कितेक जळी बुडाली ।

जाळिली ना पुरिली । किती येक ।।

येक म्हणती कोठें जावें । येक म्हणती काये करावें ।।”

अशा भयावह अवस्थेमध्ये श्रीसमर्थांना रामराया हाच आधार, तारणहार वाटतो. म्हणून ते म्हणतात, “कल्याण करी रामराया !” आणि शेवटच्या चरणात ते आशादायी सकारात्मक विधान करतात. आपल्या प्रयत्नांना, तपश्चर्येला फळ लाभल्याचे समाधान; आनंद ते व्यक्त करतात. याचा संदर्भ छत्रपती शिवरायांच्या प्रतापाचा आणि धर्मरक्षणाच्या यशस्वी कार्याशी आहे, असे अनुमान काढता येते. आनंदभुवनी या स्फुट काव्यात ते म्हणतात, 

“स्वप्नी जे देखिलें रात्री । तें तें तैसेचि होतसे ।।”

आपल्या तपश्चर्येचे फळ, भगवंतच शिवरायांच्या रुपाने अवतरला आहे, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, 

“मनासी प्रचिती आली । शब्दीं विश्वास वाटला ।

कामना पुरती सर्वे । आनंदवनभूवनी ।।

बंड पाषाण्ड उडाले । शुद्ध अध्यात्म वाढले ।

रामकर्ता रामभोक्ता । आनंदवनभूवनी ।।”

आपल्या स्वप्नांना आणि ध्यासाला रामरायाचा आशीर्वाद शिवरायांच्या रूपाने लाभला आहे. आपण जे जे प्रयत्न केले, त्याचे फळ आपण अनुभवतो आहोत अशी समाधानाची भावना ते व्यक्त करतात. “आम्ही केले, पावलो” अशी भावना ते शेवटच्या चरणात आनंदाने शब्दांकित करतात. शिवरायांचे राजकारणाच्या क्षितिजावरती यशस्वी पदार्पण हा ईश्वरी संकेतच श्रीसमर्थांना वाटतो. 

“कल्पांत मांडिला मोठा | म्लेंच्छ दैत्य बुडावया |

कैपक्ष घेतला देवी | आनंदवनभभूवनी ।।”

म्हणून ते अभिमानाने सांगतात, “आम्हाला मिळालेल्या या कृपाशीर्वादाला कशाचीही सर येणार नाही, असा तो अलौकिक आहे. अशी ही छोटेखानी प्रार्थना तत्कालीन समाजाच्या भीषण स्थितीचे आणि श्रीसमर्थांच्या ध्येय स्वप्नांचे चित्र उभी करणारी आहे, तितकीच स्फूर्तीदायी; प्रेरणादायी देखील आहे!  

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

‘बलोपासनेची प्रेरणा देणारे’ श्रीमारुती

मारुती स्तोत्र ही एक नितांत सुंदर काव्यरचना आहे. श्रीसमर्थांनी एकूण तेरा मारुती स्तोत्रे लिहिली. शब्दकळा, गेयता, रेखीव रचना आणि आवेश यामुळे प्रचलितभीमरूपी महारुद्राहे मारुतीस्तोत्र सर्वांच्या पसंतीला उतरलेले दिसते. इतर संस्कृत स्तोत्रप्रमाणे हे देखील इष्ट देवतेची म्हणजेच हनुमंताची स्तुती करणारे आहे. त्यात मारुतीच्या विविध पराक्रमांचे संदर्भ येतात. तसेच बहुतेक स्तोत्रे, आरत्या, अभंग किंवा प्रार्थना त्या, त्या इष्ट देवतेची स्तुति सुमने गाणारी, सुखसमृद्धी मागणारी असतात. परंतु जेव्हा हीच शब्दरचना काव्यात्मकता घेऊन येते तेव्हा त्या शब्दांना, विचारांना भाषासौंदर्याचे आगळेच लेणे चढवित जाते. हे संत केवळ धर्मप्रसाराचे किंवा धर्मरक्षणाचे काम करणारे धर्माचेजागलेनव्हते तर ते व्युत्पन्न आणि प्रतिभावंत कविदेखील होते. त्यामुळे शारदेच्या दरबारात संत साहित्याचे दालन फार मोठे आणि तेवढेच वैभवशाली आहे. समर्थांचेभीमरूपीसुद्धा त्यातलेच एक लेणे आहे, हे नि:संशयपणे मान्यच करायला हवे

हनुमंताची उपासना केवळ शक्तिची उपासना नव्हे. शक्ती, भक्ती, नीती, साहस, वीरश्री, नम्रता, मुत्सद्दीपणा, कर्तव्यपरायणता, अनन्य निष्ठा आणि श्रद्धा अशा उत्तमोत्तम गुणांचा समुच्चय हनुमंताच्या ठायी एकत्रित झाला आहे. अशा श्रीरामांच्या सर्वश्रेष्ठ अनुयायी भक्ताला उद्देशून समर्थ म्हणतात,”भीमरूपी महारुद्रा! हे महाकाय बलवंता, तू महारुद्र भगवान शंकराचा अवतार आहेस. तू वज्रासारखा शक्तिमान आहेस. तू तर वादळासारखा झंझावात, प्रभंजन आहेस.” ते त्यालावनारीअशी उपमा देतात. वनाचा अरी म्हणजे वनाचा शत्रू! ही उपमा सामान्यांना बुचकळ्यांत टाकणारी आहे

सीतेच्या शोधात लंकेत गेल्यावर आपले शक्तिप्रदर्शन करताना मारुतीने रावणाच्या आवडत्या अशोकवनाचा विध्वंस मांडला होता. त्याचाच संदर्भ यावनारीउपमेशी आहे. अन्यथा वानर कुळातील असूनही हनुमंत वनाचा शत्रू कसा होऊ शकेल? पुढे ते म्हणतात, “हे बुद्धिवंता, तू तर श्रीरामाचा दूत आहेस.” रावणाच्या दरबारात मारुती श्रीरामांचा दूत म्हणून सामंजस्याची बोलणी करायला गेला होता. रावणासारख्या वेदशास्त्रसंपन्न सम्राटाशी बोलणी करायला श्रीरामांनी त्याची निवड करावी, यातच हनुमंताच्या राजकारणाची, मुत्सद्दीपणाची आणि विद्वत्तेची ओळख पटावी. ते पुढे म्हणतात,”हे महाबलो, तू प्राणदाता आहेस, सर्वांमध्ये चैतन्य फुंकणारा, बलाची स्थापना करणारा आहेस. लक्ष्मणासाठी तू हिमालयातून संजीवनी आणल्यामुळे त्याचे प्राण तर वाचलेच परंतु त्याचबरोबर त्या संजीवनीमुळे युद्धात मारले गेलेले वानरगणही पुन्हा जिवंत झाले. असा तू प्राणदाताही आहेस. तू सुखांचा वर्षाव करणारा आणि दु:खितांचे दु: हरण करणारा,अत्यंत हुशार वैष्णव आहेस.” 

तू दीनांचा नाथ असून जगातील अती सुंदर असे हरीचे रूप लाभलेला देखणा वीर आहेस. तूपाताळ देवताहंताम्हणजे पाताळातील राक्षसांना जिंकणारा आहेस. लंकेतील युद्धाच्या वेळी रात्री निद्रेत असताना श्रीराम आणि लक्ष्मण यांना मायावी राक्षस अहिमही यांनी आपल्या मायावी शक्तीचा वापर करून पाताळात पळवून नेले बांधून ठेवले होते. परंतु हनुमंताने त्यांचा वध करून त्यांना सोडवून आणले होते. हा कथासंदर्भ इथे आहे

पुढे ते म्हणतात की, हे मारुतीराया, तुला शेंदूरलेपन आवडते आहे. तू पुण्यवंत, पावन, शीलवान असून सर्व जगाला परमानंद देणारा आहेस. अशी स्तुतीसुमने गाऊन समर्थ हनुमंताच्या सामर्थ्याचे आणि पराक्रमाचे वर्णन रामायणातील संदर्भ घेऊन करू लागतात

हनुमंताच्या युद्ध सज्जतेचे वर्णन करताना ते म्हणतात,”मारुती अत्यंत उग्र धारण करून तो रावणसैन्यावर तुटून पडतो. ‘ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू मारुतीराया पर्वतासारखा शत्रूच्या सैन्यापुढे मार्ग अडवून उभा राहिला. त्याची शरीरयष्टी अतिशय कमावलेली, कुठे ही स्थूलता नसलेली होती. त्याची चपलता तर विद्युल्लतेला लाजवील अशी होती. त्याने आपले मोठे रौद्र रूप धारण केले. ते ब्रह्मांड व्यापून राहिले. रागारागाने दातओठ आवळून तो पुढे सरसावला. त्याच्या डोळ्यातून जणू काही अग्नीचे लोळ बाहेर पडू लागले. रागाने त्याने आपले पुच्छ डोक्यामागून वळविले. त्याचा मुकूट आणि कानातली कुंडले थरारून उठली. त्याच्या विजेसारख्या चपळ हालचालींमुळे त्याच्या सुवर्णमय कासोटीच्या लहान लहान घंटा किणकिण नाद करू लागल्या. आपला उजवा हात पुढे करून तो शत्रूच्या सैन्यावर तुटून पडला. त्याचे असे उग्र रूप पाहून यमराजाचे काळाग्नी आणि काळरुद्र हे दोन्ही दूत चळचळा कापू लागले

युद्धात इंद्रजिताच्या अमोघ अस्त्राने लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर त्यावर उपचार करण्यासाठी तितकीच अमोघ औषधी महोदय पर्वतावर आहे, असे वैद्य सुषेणाने सांगितल्यावर ती आणण्यासाठी हनुमानवर तिथे जाण्याची जबाबदारी येते. मारुतीस अणूपासून ब्रह्मांडाएवढे म्हणजेच लहानात लहान, आणि मोठ्यात मोठं ब्रह्मांड व्यापेल असे रूप घेण्याची सिद्धी प्राप्त असल्यामुळे त्याने आपले प्रचंड रूप धारण करून उत्तरेकडे झेप घेतली. द्रोणागिरी पर्वत रांगातील महोदय पर्वतावरील नेमकी संजीवनी औषधी कोणती हे ध्यानात आल्यामुळे त्याने ते पर्वत शिखरच उखडून, उचलून आणले.. समर्थ म्हणतात की, मनासही मागे टाकेल अशा वेगाने त्याने पर्वत शिखर आणून परत नेऊनही ठेवले. अशा अनेक कथांचे  संदर्भ येतात. काव्यरचनेच्या सोयीनुसार त्यांचा कालानुक्रम पुढे मागे झाला आहे इतकेच

अणूपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे असे सूक्ष्मापासून महाविक्राळ रूप धारण करणाया  मारुतीची कोणाशी तुलना करणार? त्याच्या अतिविशाल, अक्राळविक्राळ रूपापुढे मेरुमांदार हे पर्वत देखील छोटे वाटू लागले. तर त्याच्या शेपटीचे महात्म्य काय सांगावे? रावणाच्या दरबारात त्याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळून ती पेटविण्याच्या प्रयत्नात ती एवढी वाढू लागली की सगळ्या  राक्षसांची भंबेरी उडाली. त्यातूनच लंकादहनाचा प्रसंग घडला

समर्थ म्हणतात की, “हे पुच्छ एवढे वाढू शकते की,सगळ्या ब्रह्मांडालाही वेढा घालू शकेल. यामुळे हनुमंताची तुलना विश्वात कुणाशीही होऊ शकणार नाही, असे ते म्हणतात. त्याच्या रागाने लाल झालेल्या डोळयांपुढे सूर्याची प्रभाही त्याने व्यापून टाकल्यासारखे भासू लागले. तर त्याचे वाढलेले अक्राळविक्राळ रूप अंतराळाचे शून्यमंडळ देखील भेदून जाईल एवढे विशाल झाले. इथे विसाव्या शतकात पाश्चात्त्य आधुनिक विज्ञानाने स्वीकारलेलीअंतराळातील काळेविवरही संकल्पना आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी फार पूर्वीच जाणली होती याचा प्रत्यय येतो. अशा महाबली हनुमंतापुढे आपणही नतमस्तक होतो

आपल्या आराध्य दैवतावर स्तुतिसुमनांची अशी उधळण केल्यावर समर्थ स्तोत्राच्या फलश्रुतीकडे वळतात. प्रार्थना अथवा ग्रंथाच्या अखेरीस प्रसाद मागण्याची परंपरा समर्थही पाळतात, असे आपल्याला वाटते पण हे श्लोक समर्थांचे नसावेत कारण सामार्थांच्या स्तोत्रात कुठेही ऐहिक फलप्राप्ती नाही. शेवटच्या दोन श्लोकात ते सांगतात की, ‘हे पंधरा श्लोक पठण केल्यामुळे म्हणजेच मारुतीची उपासना केल्याने बलदंड शरीर आणि कोणताही संदेह नसलेले, चिंतामुक्त खंबीर मन लाभेल. त्यांची प्रगती चंद्राच्या वाढत्या कलांप्रमाणे चढत्या क्रमाने वाढतच जाईल

वानरकपिकुळातील अग्रगण्य रामभक्त, ज्याचे अंतरंग श्रीराममय झाले आहे अशा परमश्रेष्ठ हनुमंताचे दर्शन भक्तांच्या सर्व पीडा नाहीशा करील. हनुमंताची उपासना म्हणजे केवळ ईश्वर भक्ती नाही, तर ती मरगळलेल्या आणि तेजहीन झालेल्या हृदयात शौर्य, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा स्फुल्लिंग जागृत करणारी बलाची, कर्तृत्वाची आणि आत्मसन्मानाची उपासना आहे. समर्थांच्या जीविताचे तेच ध्येय होते. त्यामुळेच हे स्तोत्र लिहितांना त्यांची प्रतिभा अत्यंत उत्साहाने उचंबळून आलेली दिसते. असा सुंदर अर्थ आणि उच्चारण्याची स्फू्र्तिदायक गेयता यामुळे ते कुणासही मुखोद्गत करता येण्यासारखे झाले आहे. त्यामुळेच  ” भीमरूपी महारुद्राहे मारुती स्तोत्र सर्वांना अतिशय प्रिय झाले आहे.

Language