शिवशक्ती

वडाचं बीज लहान असता फोडून पाहिलं तर त्यात वृक्ष काही दिसत नाही. पण झाडाचं खोड, फांद्या, पाने, फळे असा प्रचंड विस्तार या बीजातून होतो. “फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । १७-२-१४ ।।” ८-३-२० आणि २३ या दोन्ही ओव्यांमध्ये किंवा अनेक ठिकाणी मूळ माया तोचि मूळ पुरुष असे श्रीसमर्थ सांगतात. मूळ माया बीजासारखी आहे आणि तिच्यात संपूर्ण विश्वविस्तार आहे. श्रीसमर्थ इथे अद्वैतच सांगतात. आकाशात चंचल वायू निर्माण झाला त्यात शुद्ध जाणीव वास करते. तो जगत्ज्योतिचा मूळ झरा ! अर्थात वायू ही प्रकृती, जगतज्योति पुरुष होय. 

“निर्गुणीं गुणविकारु । तोचि शड्गुणैश्वरु ।

अर्धनारीनटेश्वरु । तयास म्हणिजे ।।१७-२-८ ।।”

प्रकृती पुरुष हे मूळमायेचे नाव. तीच शिवशक्ती, अर्धनारीनटेश्वर, षड् गुणेश्वर. ही नावे मायेचे स्वरूप अधिक स्पष्ट करतात. इथेच द्वैताला सुरुवात होते. तिथेपर्यंत जायचे आहे व नंतर अद्वैत व्हायचे आहे. शिवशक्तीचे एकत्रित रूप म्हणजे शिवलिंग म्हणजेच शंकराची पिंड होय. मुळात भगवान शिव हे चिन्हरहित आहेत, अलिंग आहेत. वायूपासून त्रिगुण झाले, तमोगुणापासून झाली पंचभूते. मूळमायेत असणारी शक्ती अनंत, अपार आहे. त्यातच त्रिगुण साम्यवस्थेत आहेत. हे साम्य डळमळीत झाले की त्रिगुण प्रकटतात. हे त्रिगुण, जाणीव, पंचभूते, मायेच्या अनंत शक्ती होत्या कुठे ? तर सारे काही मूळमायेतच सामावलेले आहे.

गणितात एक संकल्पना आहे venn diagram. त्यात असलेले संच म्हणजे subsets आहेत. तसे परब्रह्म हा super set आणि त्रिगुण, मायेच्या साऱ्या शक्ती त्यातच कर्दम रूपाने असतात त्याला subset म्हणू या. अणूऊर्जेचे उदाहरण घ्या. जेव्हा अणूकेंद्र डळमळीत केले जाते तेव्हा अणू ऊर्जा मिळते आणि तिचे प्रचंड परिणाम पहावयास मिळतात. गुणसाम्य डळमळीत झाले की साऱ्या शक्ती व्यक्त होतात. आपण पाहतो ते सारे शक्तीचे परिणाम 

“आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति ।

तेथून पुढें नाना वेक्ती । निर्माण जाल्या ।। १७-२-९ ।।”

आपण विजेचे परिणाम पहातो, प्रत्यक्ष वीज ऊर्जा पहात नाही. गुरुत्वाकर्षणाचे परिणाम पाहतो, पण गुरुत्वाकर्षण दिसत नाही. झाडावरील फळ खालीच पडते, कितीही उंच उडी मारली तरी आपण खालीच येतो. निर्माण झाल्यापासून ग्रहगोल विशिष्ट कक्षांमधून फिरतात, एकमेकावर आदळत नाहीत. हा गुरुत्वाकर्षण आणि inter planetary forces चा परिणाम. Inter molecular forces वस्तूला आकार देतात. या साऱ्या शक्ती, जगातील चैतन्य म्हणजेच प्रकृती-पुरुष. मग हे २ आहेत का? भेद निर्माण करतात का ? गुणमाया ते मुळमाया भेदच दाखवले जातात. शिवशक्तीमुळे संसारात स्त्रीपुरूष असा भेद दिसतो. जीवशास्त्रीय दृष्ट्या अवयवात, संप्रेरकात भेद आहे, ते रहाणारच. 

“नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव ।

येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ।। १७-२-२० ।।”

नवरीला नवरा हवा असतो असा भेद तर दिसतोच. पिंडात दिसणाऱ्या या भेदावरून ब्रह्मांडाच्या बीजाची कल्पना करता येते. पण भगवंताने गाय, माता निर्माण केली त्यावेळी वात्सल्य त्यांच्या ठिकाणी अधिक दिले. “माता वाटून कृपाळू जाला” असे श्रीसमर्थ म्हणतातच. मग वात्सल्य, ममता फक्त स्त्रियातच असते का ? धैर्य, कणखरपणा, धाडस, निश्चयी वृत्ती फक्त पुरुषातच आहे का ? (पुरुषाचे गुण, स्त्रीगुण या साऱ्या मानवी कल्पना) तर तसं नाही. अनेक प्रेमळ, काळजी घेणारेही पुरुष आहेत. घरोघरी स्त्रियांनी स्वयंपाक केला तरी जागतिक कीर्तीचा शेफ म्हणून आज पुरुषाचे नाव पुढे येते. जिजामातेने ममतेने, वात्सल्याने शिवबाला वाढवले. पण राजकारण, न्यायनिवाडा करण्याचे कसबही शिकवले ना ! राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांचे उदाहरण घ्या. अगदी अलीकडची उदाहरणे घ्यायची तर मॅडम कामा, डिटेक्टिव रजनी पंडित, किरण बेदी आणि मीरा बोरवणकर इ. पहा.

आज शास्त्रज्ञ, विमानचालक, लोकोपायलट, कंडक्टर, पोस्टमन कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. उद्योग व्यवसायात उच्च शिखर गाठणाऱ्याही आहेतच. उदा. इंद्रा नूयी. आज राजकारणातही स्त्रिया मागे नाहीत. उदा. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज. कुप्रसिद्ध डाकू फुलनदेवी होऊन गेली. कीर्तन, प्रवचन करणाऱ्या, मठपती महिला तर श्रीसमर्थांच्या काळापासून आहेतच. म्हणजेच भेद शरीरात असला तरी गुणात नाही. ईश्वराने सारी माणसे परस्परात गुंतून रहातील असे लोभाचे गुंडाळे केले आहेत. “वासना मुळींची अभेद । देहसमंधें जाला भेद । १७-२-२३ ।।” 

या भेदात श्रीसमर्थांचे सांगणे असे की, 

“पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष ।

परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ।। १७-२-२९ ।।”

असे आकर्षण असले तरी सूक्ष्म विवेकाने पहावे असा सावध इशाराच श्रीसमर्थ आपल्याला देत आहेत. पुराणात एक कथा आहे. आदियोगी, आदिगुरु भगवान शिव काही ज्ञान देत होते. सभोवताली ऋषी बसले होते. त्यातील भृगू (काही ठिकाणी भृंगी असे आहे) ऋषींना शिवाला प्रदक्षिणा घालाव्या असे वाटले. परवानगी मागितली. ती शिवशंकरांनी दिली. पार्वती माता भगवान शिवांच्या डाव्या बाजूला बसली होती. भृगुंना तिला प्रदक्षिणा नव्हती घालायची. त्यांनी सूक्ष्म होऊन दोघांच्या मधून मार्ग काढला. शंकरांच्या ते लक्षात आले, त्यांनी पार्वतीमातेला डाव्या मांडीवर घेतले. आता भृगुंनी शिवाच्या खाली असलेल्या पावलाला प्रदक्षिणा केली. तेव्हा भगवान शिवांनी पार्वतीमातेला पूर्ण आपल्यात सामावून अर्धनारीनटेश्वराचे दर्शन भृगुंना घडवले. शिवशक्तीचे अभेदत्वच दाखवले.

भगवंताच्या अवतारातही बघा, श्रीरामांबरोबर सीतामाई, श्रीकृष्ण रखुमाई सोबतच आहेत. शंकरांचा ११वा रुद्र ब्रह्मचारी मारुती, पण त्याच्या शेपटीत शक्ती (पार्वती) शिरली. तिने काय केले ते आपण सुंदरकांडात वाचले आहे. निसर्गातील पूर्ण फुलात स्त्रीकेसर, पुकेसर असतात. मग self कधी एका फुलात दोन्ही नसतात तेव्हा cross pollination ने प्रजा वाढते. सर्वच प्राणी, पक्षी, यातही नर मादी असतातच आणि तेच लैंगिक प्रजा वाढवतात. ब्रह्म निर्गुण, निराकार, निश्चल असले तरी प्रकृतीपुरुष तीच शिवशक्ती, सर्वत्र आहेच. तिच्यामुळे जगरहाटी चालू आहे. संसार/प्रपंचात स्त्री – पुरुष, पति-पत्नी परस्परपूरक गुणाचे; कार्याचे असायला हवेत. तरच संसार नेटका होईल.

जीव ब्रह्म यात अनेक पडदे (जन्म) आहेत. पण सामान्यांना आपल्यातील जीव कळत नाही, विश्वातील शिव कळत नाही. सूक्ष्माचा विचारही आकलन होत नाही. नुसते यंत्र निर्माण करून चालत नाही, त्याला चालवायला शक्तीही हवीच ना ! म्हणूनच भारताचे चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण भागात जिथे उतरले तो पॉईंट, शिवशक्ती म्हणूनच सर्वांनी मान्य केलाच ना !

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

षड् विकार

विकार म्हणजे बदल ,फेरबदल परिवर्तन आणि चित्तक्षोभ.

आपल्या अध्यात्म शास्त्रात सहा विकार सांगितले आहेत.

अस्ति जायते वर्धते विपरणमिते क्षीयते आणि म्रीयते किंवा अस्तित्व, जन्म, वाढ, बदल, क्षीणता आणि मृत्यू हे सहा विकार कोणाला आहेत? तर जे निर्माण झालं त्या सगळ्यालाच. मग प्रश्न असा पडतो

जायतेच्या अगोदर अस्ति कसे काय आले? कसं काय?

पण असं पहा की माठ, सुगड, सुरई, रांजण इत्यादी वस्तू बनवण्यासाठी, त्या निर्माण करण्यासाठी आधी माती लागते. पाणी, कुंभार, त्याची तयार झालेली वस्तू पक्की करायला अग्नी हे सगळंच लागतं हे खरं आहे. पण माती असल्याशिवाय काहीच बनवता येणार नाही हेही तितकच खरं म्हणजे मातीचे अस्तित्व आधी असायला हवं. निरनिराळी वस्त्रे बनवायला धागा, यंत्र, कुशल कारागीर आणि मुख्य म्हणजे कापूस हवा. म्हणजे कापूस असल्याशिवाय बाकी काही होणार नाही. तसे, अलंकार बनवायचे तर सोने  असल्याशिवाय ते बनणार नाहीत. म्हणजे माती, पाणी, सोनं हे सारच अस्तित्वात आल्याशिवाय कारागीर   कितीही कुशल असला तरी त्याचा उपयोग नाही. आता आणखी काही उदाहरण बघू दुधाचं दही होणं, कैरीचा आंबा होण किंवा कच्च फळ  पक्व होणे, धान्य शिजवणं, भाज्या शिजवून अन्न तयार करणे हे सारे विकारच आहेत लौकिक भाषेत आपण त्याला रासायनिक बदल असेही म्हणतो. ते शाश्वत असतात हेही शिकलोय. आपण पण लौकिकातील शाश्वत आणि अध्यात्म शास्त्रातील शाश्वत हे भिन्न आहेत. दह्याचं पुन्हा दुधात रूपांतर होत नाही किंवा आंब्याची कैरी होत नाही. भातापासून पुन्हा तांदूळ होत नाही. कच्च्या भाज्या  परत मिळवता येत नाहीत.म्हणजेच  हे बदल कायमस्वरूपी आहेत. असं जरी असलं तरी दही खराब होतं, आंबा सडतो किंवा शिजवलेले अन्न खराब होते. काही तासदिवस, महिने असा त्याचा कालावधी असतो. म्हणजेच ते कायमस्वरूपी नाही. नष्ट होणारच आहे. बर, हे विश्व डोळ्यांना दिसते. प्रचंड विस्तार आहे. आपल्या सूर्यमाले सारख्या अनेक सूर्यमाला आहेत असं आज खगोलशास्त्रही सांगते. पण आपले अध्यात्मशास्त्र काय सांगते?

जे उपजे ते नाशे” | मग विश्व पण नाहीस होणारच ना ! मग त्याआधी अस्तित्व कशाचे? कशापासून, कशामुळे ही ब्रम्हांडे जन्माला आली?

तर अष्टधा प्रकृती पासून. पण ती सुद्धा नश्वरच आहे. त्यांना कोणी निर्माण केले तर परमात्म्याच्या शक्तीने! त्या शक्ती सुद्धा अनंत आहेत म्हणजेच परमात्मा अस्तित्वात आहे म्हणून जग निर्माण झाले. समर्थ दासबोधात सांगतात –

मूळ माया तेची मूळ पुरुष l तोचि सर्वांचा ईश l

अनंतनामी जगदीश l तयासी बोलिजे ll ८/३/२० ll

 

पण परमात्म्याला विकार नाहीत, तो कालातीत, गुणातीत, देहातीत आहे, तशी मूळमायाही अव्यक्तच!

पण तिच्या शक्ती गुणक्षोभिणी माया, जडमाया या विश्व निर्मिती करतात. अर्थातच मूळमाया, गुण माया, पंचभूते इत्यादी निर्माण झाले तरी परब्रह्म तसेच अविकारी, अचल आहे. ते निर्गुण निराकार होते. सगुणपंचभूते इत्यादी निर्माण झाले तरी परब्रह्म तसेच अविकारी, अचल आहे. ते निर्गुण निराकार होते ते सगुण निराकार झाले, ते मायोपाधित ब्रह्म. मग विश्वाची निर्मिती झाली.

वर्धते

बर, निर्मिती झाल्यावर ते तसेच राहिले का? अर्थातच नाही. अनेक ब्रह्मांडे, चार खाणी इत्यादी निर्माण झाले, त्यांची वाढ झाली आणि दृश्य विश्व निर्माण झाले – यात पिलू हळू हळू वाढतेच. सामान्यपणे आपण बाल, किशोर, प्रौढ अशा अवस्था पाहतो. पक्ष्याचे अंड्यातून बाहेर येणारे पिलू काही दिवसातच भरारी घेते. वनस्पतीच्या बीजातून अंकूर कोंब फुटताना दिसतो. त्यातून आपण  रोपं, झाडं झालेले पाहतो.  काही प्राण्यात पिलू मादीच्या शरीरातून जन्माला येते, तर काही वनस्पती मुळापासून, खोडापासून, फांद्यापासून, पानांपासून जन्माला येतात. तसे इतर प्राण्यात सहसा होत नाही.जन्माला आलेला जीव पुढे वाढतो, पण सर्वांचे स्वभाव, गुण, वृत्ती सारख्या नसतात. तसेच अचेतनातही इतक्या सूक्ष्म प्रमाणात होते की सामान्य माणूस ते जाणत नाही. उदा. हिमालयाची उंची वाढते, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते, अचानक नदी, तळी यांच्या जलसाठ्यात वाढ होते. सर्व सृष्टी माया – आकाश – वायू – तेज – आप – पृथ्वी या क्रमाने निर्माण झाली. महाभूतांचे गुण ही सांगितले आहेत. सृष्टीत विविधता आढळते आणि अर्थातच नामरूपेही भिन्न आहेत.

विपरणमिते, क्षीयते –

जन्म झाल्यावर सचेतन असो वा अचेतन,  त्यात वाढ, विकास होतो. (कमी जास्त).

प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, मनुष्य, वनस्पती यांच्यात बदलाची प्रक्रिया सुरू असतेच. वजन उंचीत बदल होतोच पण शरीरातील संप्रेरकात काही बदल होत असतात. तरुण प्रौढ होतो, प्रौढ वृद्ध होतो. साऱ्या शक्ती क्षीण होत जातात. आपणही म्हणतो बघा पहिल्यासारखे आणि आधीसारखे वेगाने काम होत नाही.ही क्षीणता सर्वच सचेतनात दिसते – प्रमाण कमी जास्त. वनस्पतीमध्येही पान गळती, कुठे झाडं मोडून पडणे हे  दिसतेच. कडे कोसळून डोंगराचा ऱ्हास होतो, तर कुठे पाणी आटून नदी, तळी – जल साठ्यांचा ऱ्हास  होतो. वादळाने धूळ एका ठिकाणाहून दुसरीकडे जाते. पूर्वी डोंगरांना पंख होते असे पुराणात वाचायला मिळते आणि आज तर कोणत्याच पर्वताला पंख नाहीत. त्यांच्यातील हा बदल, ऱ्हास / मृत्यू म्हणता येईल. अगदी पृथ्वीचा व्यास ही कमी होतो आहे असे आज शास्त्रज्ञ सांगतात.

 

म्रियते  –

वृद्ध प्राणी शक्ती क्षीण झाल्याने, रोगाला बळी पडल्याने मृत होतो. प्राणी, पक्षी सुद्धा ठराविक काळाने काहीवेळा रोगाने मृत होतात. पूर्वीचे डायनासोर सारखे महाकाय प्राणी, काही पक्षाच्या जाती तर आता नामशेष झाल्या आहेत. पण इतर प्राणी, मनुष्य प्राणी आपल्याच शरीरात अस्तित्व टिकवण्याचे बीज राखून असतो आणि अनेक जन्मातून फिरत राहतो.

मग अचेतनाला मृत्यू / विनाश आहे का? असा प्रश्न येतोच.

तर आहेच. त्याची झलक आपल्याला त्सुनामी, ढगफुटी, महापूर, तीव्र दुष्काळ इत्यादितून पाहायला मिळते.

आता विकार म्हणजे चित्तक्षोभ असा अर्थ घेतला की सारे बदल चित्त शांत, स्थिर करण्यासाठी होतात. परमार्थात हे अंतरंगातील बदल अपेक्षित आहेत आणि ते ही कायमस्वरूपी! कारण मनुष्य लवकर मोहग्रस्त होतो (अर्जुनाला आठवून पाहा), परमार्थ मार्गात अडथळे खूप, तेही आपणच  निर्माण करतो. कारण निर्माण होऊ देणारेही आपल्या आतच असतात, म्हणून चित्तशुद्धी साठी प्रयत्न हवेत. तेही सातत्याने! नाहीतर खाली घसरणे आहेच. जन्म मृत्यू चक्रातून सुटका नाही.

म्हणून प्रभाते मनी राम चिंतीत जावा |”

रोजची उगवणारी पहाट तशीच आयुष्याची सुरुवात (बालपण) ही सुद्धा पहाटच!

मग आपल्या अज्ञानाला दूर करून ज्ञान प्राप्तीची सुरुवात ही पण पहाटच, तो ही विकारच!

Language