आल्हाददायक आषाढ

विषय वाचल्यावर काय लिहावे ? असे विचारमंथन चालू होते. हिंदू पंचांगानुसार चौथा महिना पहिले सगळे उत्सव हे शुक्ल पक्षातील आणि दिव्याची आवस म्हणजे दीप पूजन ही कृष्ण पक्षातील आहे. आषाढातील पहिला दिवस कालिदास जयंती. नंतर कांदे नवमी – ४ महिने कांदा लसूण वर्ज्य. नंतर येते देवशयनी एकादशी. अवघ्या महाराष्ट्राची पाऊले पंढरीकडे लावणारी. महाराष्ट्राच्या या पंढरी क्षेत्रात सर्वजण धर्म, जात, पंथ, संप्रदाय हे सारं विसरून एकत्र येतात. येथे खरी एकात्मता व समानता अनुभवाला येते. ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ! या पंढरीच्या राउळात सर्व संत मांदियाळीची भेट होते. काही दिवसांपूर्वी गोव्यात शंखनाद ऐकला होता ज्यांनी प्रत्यक्ष अनुभवले ते भाग्यवान ! ‘सुखी संसाराची सोडूनिया वाट‘ ! ही वाट संसार सुखाच्या त्यागाने मळलेली आहे. समर्थ रामदासांनीही पंढरीची वाट धरली होती, म्हणून तर समर्थ म्हणाले, 

“आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरी ।।”

असा हा पंढरीत सर्व संतांचा मेळावा भरतो.समर्थांनी संतांचे अचूक वर्णन केले आहे. ते अत्यंत लक्षणीय व बोधप्रद आहे.

“संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।

नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ।। १-५-१६ ।।”

समर्थ संतांचे वर्णन असे करतात की, संत आनंदाचे स्थान आहे. संत हे अनेक प्रकारच्या संतोषाचे मूळ आहे. संत केवळ सुखरुप आहेत. संतांचे सान्निध्य हेच विश्रांती स्थान आहे. संतांमुळे निजरूपाचे ज्ञान होते. संत केवळ धर्माचे धर्मक्षेत्र आहेत. असे हे सर्व संत पंढरीत येतात, त्यामुळे पंढरी क्षेत्र ही पुण्यभूमी झाली आहे. हे क्षेत्र समाधानाचे मंदिर बनले आहे. संत संगतीत विवेकाचा खजिना प्राप्त होतो. तेच साधकाला आत्मस्वरूपाचे दान करु शकतात. संत संगतीतच साधकाच्या अंत:करणात परमात्मा प्रकट होतो. समर्थ रामदासांनी एक स्फुट अभंग पण विठ्ठलावर रचला आहे.

“आम्ही देखिला विठोबा । आनंदे विटेवरी उभा ।। १ ।।

तेथे दृश्यांची जे दाटी । तेचि रुक्मिणी गोमटी ।। २ ।।

रामी रामदास म्हणे । जो ओळखे तो चि धन्य ।। ३ ।।”

प्रत्येक देवतेच्या आरत्या समर्थ रामदासांनी रचिल्या आहेत. विठ्ठलावर तीन आरत्या रचलेल्या आहेत. समर्थ रामदासांना विठ्ठल व प्रभूरामचंद्र यांच्यात भेद वाटत नाही. समर्थ म्हणतात,  

“धन्य धन्य पांडुरंग । अखंड कथेचा होतो धिंग ।

तानमानें रागरंग । नाना प्रकारीं ।। १८-१-१३ ।।”

तसेच ‘येथे का रे उभा श्रीरामा’ हा अभंग सर्वश्रुत आहे. पंढरपूरला विठ्ठलाच्या प्रथम दर्शनाचे वेळी रामदासांनी रचलेला हा अभंग.

“येथे कां रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ।।

चाप बाण काय केलें । कर कटावरी ठेविले ।।

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला ।।

काय जाली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ।।

शरयूगंगा काय केली । कैची भीमा मेळविली ।।

किल्किलाट वानरांचे । थवे न दिसती तयांचे ।।

दिसे हनुमंत येकला । हा कां सैन्यातून फुटला ।।

काय जाली सीतासति । येथे बहुत जन दिसती ।।

रामदासीं सद्भाव जाणा । राम जाला पंढरीराणा ।।”

समर्थ रचीत हा अभंग म्हणजे आपल्या आराध्य देव किंवा देवतेचा किती ध्यास लागायला हवा याचे उत्तम उदाहरण आहे. पंढरपुरात पांडुरंगाची मूर्ती पाहुन त्यात देखील समर्थांनी राम पाहिला आणि रामाचे बदललेले हे रूप पाहून समर्थ पांडुरंगरुपी श्रीरामाला अनेक प्रश्न विचारतात. आणि अखेरीस शेवटच्या दोन ओळीत समर्थ सांगतात खरा रामदासी तोच ज्याच्या अंतरी सद़्भाव आहे. तेव्हा खरा दास तोच जो बाहेर रुप कोणतेही असले तरी त्या रुपात समर्थांना पहातो आणि त्या रुपाच्या चरणी नम्र होतो, नतमस्तक होतो, त्या नवीन रुपाचा देखील आदर करतो. हनुमंताला प्रत्येक ठिकाणी राम दिसत असे. तोच ध्यास, तोच भाव समर्थांमध्ये होता. एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी की, एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला ना की; ती गोष्ट जेव्हा मिळते; होते तेव्हा ती सर्वोत्तम असते. जगात ज्या ज्या लोकांनी काही भव्य दिव्य करुन दाखवले त्यांना त्या गोष्टींचा ध्यास लागला होता म्हणूनच ते या गोष्टी करु शकले. आता आपण आत्मपरिक्षण करायला हवे ना ? की, आपल्याला असा समर्थांचा ध्यास लागला आहे का ? की नुसते आपण तसे दाखवतो. उत्तर जे काही असेल ते इतरांना सांगायची गरज नाही. फ़क्त जर काही सुधारणा गरजेची असेल तर ती मात्र अवश्य करायलाच हवी. समर्थांना नेमके हेच तर हवे आहे. तसेच समर्थ संप्रदायात दर बुधवारी विठ्ठलपर सवाई म्हटली जाते.

“नाम विठ्ठल सुंदर । ब्रह्मा विष्णु आणि हर ।

गुणातीत निर्विकार । शुकादिकी गायला ।।

चंद्रभागा रम्यतीर । तेथे उभा कटिकर ।

दिंड्या पताका अपार । यात्रा घोष जाहला ।।

तेथे येतां रामदास । दृढ श्रीरामीं विश्वास ।

रुप पालटोनी त्यास । रामरूपीं भेटला ।।

पुन्हा विठ्ठलस्वरूप । रामविठ्ठल एकरुप ।

पूर्वपुण्य हे अमूप । लक्ष पायीं ठेविला ।।”

असा एकात्मतेचा भाव समर्थांचे मनात होता. तुकोबांनीही झेंडा असा उभा केला की,

“विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।

वाळवंटी चंद्रभागेच्या तीरी डाव मांडला॥”

आणखी एके ठिकाणी तुकोबा म्हणतात, “खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।।” पंढरीचे वर्णन करताना जनाबाई म्हणतात, “संतभार पंढरीत । कीर्तनाचा गजर होत ।।” तुकाराम महाराज हे विठ्ठल भक्त असूनही त्यांना श्रीरामही तितकेच प्रिय होते. समर्थ रामभक्त असून विठ्ठलही त्यांना तितकेच प्रिय होते. संताना जात, धर्म, सांप्रदायिक भेद नसतो हे यातून स्पष्ट होते. एका अभंगात त्यांनी देहावर पंढरीचे रुपक केले आहे. देह हीच पंढरी आणि आत्मा हा पंढरीनाथ आहे. आमच्या येथे यात्रा आणि महोत्सव नेहमीच घडत असतात. यात भक्ती ही वीट आहे आणि या विटेवर आत्मरुपी विठ्ठल उभा आहे. वैराग्य ही भीमा नदी आणि आत्मज्ञान हा पुंडलिक आहे. 

नंतर पौर्णिमा- व्यासपौर्णिमा-गुरुपौर्णिमा. खरचंच आल्हाददायक. कारण गुरु हे शिष्याला योग्य वेळ आली की शोधत येतात. अनुग्रह हा द्यायचा किंवा घ्यायचा नसतो तर तो व्हायचा असतो. अनुग्रह होणे म्हणजे वासना कमी होणे, विकार कमी होणे, भगवंताचे प्रेम वाढीला लागणे. 

सद्गुरूंची परमकृपा होणे म्हणजे ‘अनुग्रह’. अनेक जन्मांच्या पुण्यसंचयामुळे आत्मज्ञानी सद्गुरूंकडून कडकडीत वैराग्यशील मुमुक्षु साधकास अनुग्रह प्राप्त होतो. जीवाचे शिवरूपात होणारे रूपांतर म्हणजे अनुग्रह. संत एकनाथ महाराज म्हणतात, सद्गुरु ओंकार स्वरूप असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, “सद्गुरुवाचोनि सापडेना सोय । धरावे तें पाय आधी आधी ।। ‘ज्ञानदेव म्हणतात, “ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो । आता उध्दरिलो गुरुकृपे ।।” समर्थ रामदास स्वामी सद्गुरुंबद्दल म्हणतात की, मी सद्गुरुंचे वर्णन करु शकत नाही. वास्तविक समर्थ सद्गुरु स्तवनात म्हणतात,  

“आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ।

तें स्वरूप हे अज्ञाना । काये कळे ।।  १-४-१ ।।”

आता सद्गुरू वर्णवेना म्हणजे ज्याचे वर्णन होऊ शकत नाही, हेच गुरुंचे वर्णन. ज्या गुरूरुपाला माया स्पर्श करु शकत नाही, परंतु मायेशिवाय वर्णन होणे शक्य नाही म्हणून गुरुकृपेची खूण म्हणजे काय तर, जेथे माया नाही ते सद्गुरुंचे रूप होय. अज्ञान्याला ज्ञान झाल्यावर ज्ञानानेच सद्गुरुंचा अनुभव होईल, पण अज्ञानातून सद्गगुरूरुप कोणासही जाणता येणार नाही. संत-सद्गुरु हे भगवंताचे चालते-बोलते रुप आहेत. त्यांना वंदन करून इथेच थांबते.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

संकल्प

संकल्प म्हणजे काय? संकल्प मोडण्यासाठी असतात असे खूप वेळा आणि खूप लोकांकडून ऐकले आहे. असे ऐकले की वाईट वाटते. कुठे चालली आहे आपली संस्कृती? पण ही वेळीच सुधारली पाहिजे. आधी आपण स्वतः बदलण्याचा संकल्प केला पाहिजे. तसे प्रयत्नपूर्वक केले पाहिजे. लोकांकडे जास्त (रिकामटेकड्या, आळशी) लक्ष न देता आपण आपले मन चांगल्या विचारात,bवाचनात गर्क केले पाहिजे. हाच संकल्प करावा. आपल्या सगळ्या संतांचे विचार हेच होते. आपण वेगवेगळ्या शाह्यांमध्ये अडकलो होतो. फक्त उदरनिर्वाह हेच ध्येय होते. पण देवाने बुध्दि, कल्पना, विचार करण्याची क्षमता फक्त मानवाला दिलेली देणगी आहे. त्याचा योग्य वापर केला पाहिजे. तर संकल्प, म्हणजे एखादी कृती करण्याचा निश्चय. रामदासस्वामींनी शिवाजी महाराजांना संकल्प करायला सांगितले, आठवतं का? मूठभर मावळ्यांनी संकल्प केला म्हणून तर आपल्याला (महाराष्ट्र) स्वराज्य मिळाले, त्याचे आपण सुराज्य करायला हवे. तुम्ही म्हणाल येवून जावून ही समर्थांचे विचार सांगते. पण आज ती काळाची गरज आहे. आम्ही चांगले वाचून त्यावर मनन चिंतन करून ते समाजापुढे, आपल्या नवीन पिढीला सांगितले तर काहीतरी ठीक आहे. तर, समर्थांच्या प्रस्थानत्रयीतील, म्हणजे मनोबोध आणि दासबोध यातील शिकवण आजही ३५० वर्षांनंतरही लागू पडते. समर्थाच्या दासबोधात शिकवण निरुपणाचे २ समास आहेत. त्यातील दशक ११ समास ३ यात आखिव दिनचर्या आहे. आताच्या काळानुरूप, आपल्या दिनक्रमात अंतर्भूत करून घेता येईल हाच संकल्प, यालाच गीतेत युक्त विहार म्हटले आहे. समर्थ रामदास म्हणतात, 

“आळस उदास नागवणा । आळस प्रेत्नबुडवणा ।

आळसें करंटपणाच्या खुणा । प्रगट होती ॥११-३-१२||”

पुढे जाऊन समर्थ रामदास एक सरळ, साधा उपाय सांगत आहेत; आणि तो म्हणजे ‘आपण जे जे काही करतो, ते देवाचे कार्य आहे या दृढ भावनेने करावे’. त्यामुळे संसारात किंवा परमार्थात उद्वेग निर्माण होणार नाहीत व आपणास काहीही बाधा होणार नाही.  समर्थ म्हणतात की, 

“आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें ।

मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥११-३-२८॥”

मनोबोधात पण २ श्लोक आहेत.  १) ५ , २) १३० थोडेसे त्या संदर्भात पाहू. 

“मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥

मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥”

सरळ अर्थ:- ‘हे मना, जो जो पापी विचार असेल त्याचा त्याग कर आणि जो सद्विचार आहे (परमात्मस्वरुपाचे ज्ञान करून घेणे) त्याची कास धरून रहा. विषयी गोष्टींचाच नेहमी विचार करत राहिलास तर विकारांचे प्राबल्य वाढेल आणि सरतेशेवटी जनमानसात नामुष्कीच होईल.’

आता थोडेसे विवरण पाहू. पाप-पुण्याची कल्पना, धर्म व नीती या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत. आचार, विचारात विधिनिषेधांमध्ये चमत्कारिक विविधता आढळते. उदा. कोकणस्थ ब्राह्मण जिला मामेबहीण म्हणतो ती मामाची मुलगी ऋग्वेदी देशस्थ ब्राहृमणांत विवाहासाठी योग्य मानतात. पापपुण्य ही कल्पनाच वाईट आहे असे म्हटले तर आपल्याला जगताच येणार नाही.  माणसाच्या हातून पातक घडते. त्यामागे पातकासंबंधीचा संकल्प असतो. छोटेसे उदा. पाहू. भूक लागते, खावेसे वाटते; खाण्याचा पदार्थ चिवडा असेल तर बरे असा विचार मनात येतो; खावेसे वाटते इथपर्यंत ठीक. बहुतेक वेळी अनावश्यक आणि अनारोग्य खाणे होते. हा या प्रकरणातील पापसंकल्प. (हे सगळ्याच बाबतीत लागू होते.) आधी पापसंकल्प होतो व त्यानंतर पाप घडते. पापसंकल्प उत्पन्न झाला नाही, तर पाप घडणार नाही. म्हणून समर्थ अधिक सावधपणे पाप सोडून द्यावे असे म्हणण्यापेक्षा पापसंकल्प सोडून द्यावा असे म्हणतात. आता अजून थोडे विस्ताराने पाहू या. मानवी देहामध्ये असणाऱ्या चंचल मनाला संकल्प-विकल्पात्मक मन: असा बहुमान मिळाला आहे. बाहेरच्या कोणत्याही विषयाचा प्रथम संबंध मनाशीच येत असतो. अशा प्रसंगी हे मन प्रथम बाहेरच्या विषयांचा संकल्प करीत असते. त्या विषयांचा संकल्प करून झाला, म्हणजे हे मन त्वरित त्याच विषयाचा विकल्प करू लागते. आपल्या देहात असणारा जीवात्मा हा अनेक विषयसुखांचा रसास्वाद घेऊन बध्द झालेला असतो. हे मन अनेक विषय विकारांनी व्यापलेले असते. प्रत्यक्ष शरीराने घडणाऱ्या पापापेक्षांहि, पापाचे चिंतन परमार्थ दृष्ट्या घातक ठरते. म्हणून समर्थांनी पापसंकल्प सोडून दे असे आग्रहाने सांगितले आहे. मन कधी रिकामे राहू शकत नाही. यासाठी काय टाकावे हे सांगितल्यानंतर लगेच काय घ्यावे हेही सांगितले पाहिजे. समर्थ म्हणतात, ”मना, सदा सर्वकाळ सत्य विषयांचा संकल्प करीत जा.” शरीराने चांगले घडविण्यासाठी मनाने सतत चांगले विचार करीत असले पाहिजे. सत्य शब्दाचा मूळ अर्थ केवळ अस्तित्व असाच आहे. नियमितपणा, व्यवस्थितपणा, अनुशासन, उद्योगशीलता, स्वच्छता इ. सत्यसंकल्पाचे विषय होऊ शकतात. भक्तिमार्गामध्ये भगवंतास विसरून दृश्याच्या नादी लागणे यास पाप म्हणतात. भगवंतास न विसरता कर्तव्यापुरते देहसुख घेणे यास पुण्य म्हणतात. आता १३० वा श्लोक पाहू.

मना अल्पसंकल्प तो ही नसावा । सदा सत्य संकल्प चित्तीं वसावा ।

जनीं जल्प वीकल्प तो ही तजावा । रमाकांत येकांतकाळीं भजावा ॥

वायफळ बोलण्याने माणसाची फार मानसिक शक्ति खर्च होते. व्यवहारात बोलल्याशिवाय चालणार नाही. पण वाजवीपेक्षा अधिक न बोलण्याने व्यवहार पण बिघडत नाही. आहे त्या पेक्षा वेगळे मनात येणे हा विकल्प. अनुकुल घडावे असे वाटत राहणे हा संकल्प. आता व्यवहारातील, रोजच्या जीवनातील पाहू. समजा मी एखादी वस्तू एखाद्याला दिली किंवा एखाद्या करिता थोडेसे काही केले, की त्याने कृतज्ञता व्यक्त करावी असे मला वाटते, म्हणजे संकल्प. पण, जर का तसे म्हटले नाही, की ते जाणवते. साधा शिष्टाचार पण पाळता येत नाही, शिष्ठ आहे! हा झाला विकल्प. कोणाबद्दल त्याच्या मागे बोलणे, निंदा करणे टाळावे म्हणजे विकल्प वाढत नाहीत. मन निर्विकार व्हावे, मनामध्ये नेहमी चांगलेच विचार यावेत, विकल्पाची शक्यता उणी, कमी होत जावो यासाठी समर्थ रामदास उपाय सांगतात की एकांतात जाऊन ईश्वराचे भजन, स्मरण करावे. अजून महत्वाचे समर्थांनी सांगितले आहे की, परमार्थाची वाटचाल करणाऱ्या साधकाच्या ठिकाणी मनोबल असावे लागते, मनोधैर्यही असावे लागते आणि मनाचा सरळपणा, समतोलपणाही असावा लागतो. कारण, सरळ वागणाऱ्या साधकाची विचार करण्याची उंची वाढलेली असते. समाधानासाठी विहंगम मार्गाचा सद्विचार हा अत्यंत महत्वाचा ठरतो. म्हणून साधकाने सद्विचारांचा संग धरुनच आपला परमार्थ करावा हाच सत्य संकल्प आहे.

आजच्या काळात (विषाणू) जरी कुठे बाहेर जाता येत नसले तरी विज्ञानाच्या साहाय्याने वेगवेगळ्या देवस्थानच्या संकल्प प्रक्रियेत सहभागी होता येते, ते ही घरबसल्या, ही सद्गुरू कृपा आहे.

Language