राम मंत्र श्लोक २२-२३-२४

तपस्वी मनस्वी बहू पार गेले।

दुजी सृष्टीकर्ते असे थोर मेले।

चिरंजीव अल्पायु गेले किती रे।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे॥२२॥

सरळ अर्थ  — मृत्यु कोणालाही कोणत्याही उपायाने टाळता येत नाही.थोर थोर  तपस्वी,संशोधक एवढेच काय पण प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे सामर्थ्य अंगी असणारे ऋषी सुद्धा मृत्युच्या मार्गाने गेले.अगदी चिरंजीव/दीर्घायुष्य लाभलेले किंवा अत्यंत अल्पायुषी मृत्युच्या वाटेने गेले.जगात सर्वात निःपक्ष मृत्यु आहे.तेव्हा हरे राम हा मंत्र  सोपा जपावा हेच खरे.

श्रीसमर्थांचा बोध — ग्रंथराज दासबोधात श्रीसमर्थ मृत्यूनिरूपण समासात ‘ मृत्यू न म्हणे ‘अशी सुरवात करून मृत्यु पावणाऱ्या  सर्वांची सविस्तर यादीच देतात.आणि ” सकळ जीवास प्राशन। मृत्यचि करी॥” म्हणत हा ‘मृत्युलोक’ आहे असे दाखवून देतात.उपजे ते नाशे हा सृष्टीचा नियम आहे.आणि त्याला कोणताहीअपवाद नाही. या जगातील एकमेव सत्य म्हणजे मृत्यु.या मृत्युचे एक रूप काळ आहे.हा काळ ईश्वराची विभूती असुन प्रवाही आहे.देह जन्माला आला त्याच क्षणापासून तो मृत्युच्या दिशेने धावत असतो.हा काळ देहाला कसा अलगदपणे मृत्युमुखात नेऊन सोडतो हे कळतही नाही.म्हणुन मृत्युला घाबरायचे नसते तर त्याला सामोरे जायचे असते.आपले आचरण शुद्ध ठेऊन  त्याचे नित्य स्मरण ठेवायचे असते.श्रीसमर्थ म्हणतात “मरणाचे स्मरण असावे।हरिभक्तीस सादर व्हावे।” आपल्या देहदुःखाचा,यातनांचा, चिंता-काळजीचा अंत करणारा तो आपला हितैषी आहे हे समजुन घेतले तर त्याची भीती दूर होईल.श्रीसमर्थ याच समासाच्या शेवटी मृत्यूवर मात कोण करु शकतो याचे उत्तर देतात..”असो ऐसे सकळही गेले।परंतु  येकचि राहिले।जे स्वरूपाकार जाले।आत्मज्ञानी॥”आणि असे आत्मज्ञानी होण्याची पहिली पायरी आहे ‘ नामस्मरण साधना. ‘ या साठी श्रीसमर्थ आग्रहाने सांगतात हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जय श्रीराम.

 

बहू कामधंद्यामधे धाव घेसी।

किती नावारूपा जगी मिरवीसी।

कशाला तुला उंट घोडे नगारे।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥२३॥

सरळ अर्थ  — चरितार्थासाठी काही कामधंदा  करणे अपरिहार्य आहे.पण माणूस सतत त्यातुन मिळणाऱ्या  पैशाच्या मागे लागतो का तर पैसा मुबलक मिळवला,ऐश्वर्य वाढले तर मानमरातब वाढतो,प्रतिष्ठा मिळते,समाजात कीर्ति होते.श्रीसमर्थ या श्लोकातुन सांगतात  की,कशाला या भंपक आणि भ्रामक मायाजालात अडकतो! आज जरी कौतुकाचे नगारे झाडताना दिसत असले तरी ते अशाश्वत आहे क्षणभंगुर आहे.शाश्वत/कायमस्वरूपी सुखशांती हवी तर हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे.

श्रीसमर्थांचा बोध — श्रीसमर्थ द्रष्टे होते याची प्रचिती दासबोधात पदोपदी येते.चारशे वर्षापुर्वीच त्यांना आजची परिस्थिती समोर दिसत होती.म्हणुनच त्या काळी लिहुन ठेवलेले आज अनुभवाला येत आहे.उदरभरणासाठी कामधंदा करणे अपरिहार्य आहेच परंतु केवळ धनावर/पैशावर दृष्टी ठेऊन सर्वकाळ काम-धंदा करित राहाणे म्हणजे भगवंताने विशेष हेतुने दिलेले हे जीवन वाया घालवणे होय.होते काय की,चरितार्थ  चालवण्यासाठी माणूस काम-धंदा करू लागतो,त्यातुन त्याला पैसा मिळतो,सतत तेच काम केल्यावर सहजच त्यात प्राविण्य येते व सहाजीकच त्याचे कौतुक होते.वाहवा होते.अभिमान वाटतो.हळुहळु त्याची सवय नव्हे चटक लागते.अहंकार वाढतो.भगवंताचे अनुसंधान सुटते आणि मनुष्य त्या कामातच गढुन जातो.बरं हे काम,उद्योग कर्मयोग म्हणुन न करता  मान,मरातब,लौकीक,पद-प्रतिष्ठा ,असे अनेक स्वार्थमुलक हेतु अंतरी दडलेले असतात.जनसेवा, समाजसेवा या नावाने स्वतःची तुंबडी भरली जाते.त्या काळात  श्रीसमर्थांनी हे बघितले आहे.आजची परिस्थिती तर आपण बघतोच आहोत.नोकरी धंद्याच्या मागे,नवनव्या ‘पॅकेजेसच्या’ मागे धावपळ करताना खाण्यापिण्याची शुद्ध रहात नाही.समोर नावलौकिक,प्रसिद्धी,पद-प्रतिष्ठा, सत्ता,ऐश्वर्य, यांचे मृगजळ दिसत असते. त्यापाठी धावताना शब्दशः दमछाक होते.खायच्या प्यायच्या वयात, पैशापाठी धावताना वेळ नसतो,तर वेळ मिळतो तेव्हा खाण्यापिण्यावर बंधने येतात.मग प्रश्न येतो की,का कशासाठी ही धावपळ?मानवी जन्माचा मुळ हेतु तर बाजुलाच पडतो.साधा आनंद सुद्धा उपभोगता येत नाही,आत्मिक समाधान  कसे मिळणार? म्हणुनच श्रीसमर्थ या श्लोकातुन त्याची जाणीव करून देतात की मानसन्मानाच्या अपेक्षेत  स्वतःचे नुकसान करून घेण्याऐवजी साधा सुलभ असा हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.जय श्रीराम.

 

म्हणे देश माझे भूमी गाव वाडे।

शिबीकासनी बैससी उंच लोडे।

कसा उंच तू मंचकी लोळसी रे।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥२४॥

सरळ अर्थ  — नशीबाने म्हणा किंवा पुर्वसुकृताने सधन घरात जन्म झाला.बालपण लाडाकोडात गेले.तारुण्यात कोणताही पुरूषार्थ न करता, वडिलांच्या कमाईवर ऐषारामात,हे घर माझे,गाव माझे,जमीनजुमला ऐश्वर्य सारे माझे. काहीही न करता माझे म्हणतोस.बरं खर्या अर्थाने काहीही आपले नसताना मस्तवालपणे हे माझे,ते,माझे ,असे  ऐदखाऊ असुनही गाद्यागिरद्यावर लोळत लोळत गर्वाने म्हणतोस.यातले मृत्युनंतर कण सुद्धा बरोबर नेता येत नाही हे एकदा लक्षात घे. सहजी मिळालेल्या नरदेहाचे सार्थक फक्त आणि फक्त रामनाम स्मरणात आहे.मंचकी आरामात लोळण्या पेक्षा हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे.असे श्रीसमर्थ कळवळ्याने सांगत आहेत.

श्रीसमर्थांचा बोध — माणसाला कुठे आणि कसा जन्म मिळावा हे त्याच्याच पुर्वकर्माचे फळ असते.मी मी माझे माझे करण्यात,नाना उपभोग घेण्यात ,तसेच  ऐत्या  पीठावर रेघोट्या मारण्यात कसला आलाय पुरूषार्थ ? आज भोगलालसा  टोकाला पोहोचली आहे.माझे ते माझेच आणि तुझे ते ही माझेच ही वृत्ती समाजात फोफावलेली दिसुन येते. भोगाने  त्यागावर मात केली आहे.” दुल्लभ शरीरी  दुल्लभ आयुष्य।याचा करू नये नास।” असे दासबोधात श्रीसमर्थ ठामपणे बजावतात. ‘घबाड’ हाती आले आहे तर त्याचा पुर्ण लाभ करून घ्यावा. अर्थात जन्ममृत्यूच्या फेऱ्यातुन स्वतःची सुटका करून घेण्यासाठी अंतःकरणपुर्वक उपासना केली पाहिजे. भगवंताचे अनुसंधान राखले पाहिजे.नुसते “माझे माझे आणि भ्रमाचे ओझे” या म्हणीप्रमाणे मी माझे चे गाणे आधी बंद करावे लागेल. “पापपुण्य समता घडे।तरीच नरदेह जोडे।” असे जर आहे .तर ऐषोआराम झटकुन या दुर्मिळ संधीचा लाभ घेण्यासाठी त्वरीत नामाला लागणे महत्वाचे ठरते.या साठीच श्रीसमर्थ  येथे म्हणतात हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे. जय श्रीराम. 

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

राम मंत्र श्लोक १९-२०-२१

“नसे सत्य कांहीं दिस दों दिसांचे

तुला लूटिती चोरटे लोक साचे ।

स्त्रिया पुत्र कामा न येती तुला रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १९ ।।”

 

सरळ अर्थ – या दृश्य जगात शाश्वत सत्य असे काहीच नाही. स्थित्यंतर/बदल हा निसर्गाचा नियम आहे. क्षणोक्षणी प्रत्येक वस्तूमात्र बदलत असते. या क्षणी सत्य साक्षात समोर असलेले असत्य ठरते, नाहिसे होते. जो पैसा, धन वेळेला उपयोगी पडेल म्हणून काबाडकष्टाने साठवला, तर ते प्रसंगी चोर-दरोडेखोर लुटून नेतात. तशीच वेळ आली की ‘आपले’ असणारे स्त्री-पुत्र इ. जीवलग सुद्धा मदतीला येत नाहीत. मुखी नित्य नाम असेल तरच काही हितकर होते. म्हणूनच अखंड ‘हरे राम हा मंत्र सोपा’ जपावा.  श्रीसमर्थांचा बोध – श्रीमद् आदिशंकराचार्य आपल्या “भज गोविन्दम्” या स्तोत्रातून हेच समजावून सांगतात. “का ते कान्ता कस्ते पुत्रः” आपल्याला आपल्या नातलगांचा खूप आधार वाटतो. आज परिस्थिती बदलली आहे. सगे-सोयरे, नातेवाईक आपले वाटत नाहीत. पण अगदी जवळचे आई-वडील, कन्या-पुत्र, पति-पत्नी, इ. कुटुंबीय तर फक्त माझेच असतात ना ? मात्र ते सुद्धा काही मर्यादेपर्यंतच आपले असतात. आज थोडे आजूबाजूला बघितले तर लक्षात यायला वेळ लागत नाही की, वाल्या कोळ्याची गोष्ट पुराणापुरती मर्यादित नाही तर वास्तव आहे. आज माणसाच्या स्वार्थाने चरमसीमा गाठली आहे. आपले म्हणवणारेच आपल्याला लुटायला बसले आहेत. नव्हे, मागील हिशोब पूर्ण करण्यासाठीच ते ‘संबंधी’ झालेले असतात. परमार्थाची वाटचाल करणाऱ्यांनी तरी हे ओळखून जगाचा भरवसा धरू नये. अंतरात एकच ठसवावे.

 

“राम येक माता राम येक पिता ।

राम सर्व भ्राता सहोदर ।।

त्यासाठीच श्रीसमर्थ सांगतात, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.”

“नको तू कदापी करूं तीर्थयात्रा ।

तनू दंडिनी क्षीणता सर्व गात्रा ।

करी ग्रस्त आयुष्य तू कोण सारे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। २० ।।”

सरळ अर्थ – चारशे वर्षांपूर्वी आजच्यासारखी प्रवासाची सुलभ साधने नव्हती. तीर्थयात्रा करणे जिकरीचे काम होते. अनेकदा लोक घरा-दारावर तुळशीपत्र ठेऊन प्रवासाला निघत. कारण, सुखरूप घरी परत येण्याची शाश्वती नव्हती. यातना आणि त्रास सोसणे म्हणजेच यात्रा असे मानले जाई व ते खरेच होते. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, अशा खडतर प्रवासाचे कष्ट, देहदंड सोसून किती पुण्यलाभ होणार ? त्याऐवजी शुद्ध अंतःकरणाने घरीच बसून निष्ठेने नाम घेतले तर जास्त बरे. तेव्हा हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

श्रीसमर्थांचा बोध – पुरश्चरण, जपानुष्ठान पूर्ण झाल्यावर बारा वर्षे तिर्थाटणाच्या निमित्ताने संपूर्ण भारतवर्ष आसेतूहिमाचल पादाक्रांत करणारे श्रीसमर्थ येथे म्हणतात, “नको तु कदापि करू तीर्थयात्रा” असे का ? श्रीसमर्थांचा तीर्थयात्रेचा हेतू आणि इतरांचा हेतू यात महदंतर आहे. तीर्थयात्रा करून पुण्यप्राप्ती एवढीच सर्वसामान्याची आदरयुक्त भावना असते. पूर्वीच्या काळी प्रवास करणे अत्यंत कठीण असे. वाटेत घनदाट जंगल, वन्य श्वापदांची भीती, त्याबरोबर चोर-दरोडेखोर, लुटारू यांची दहशत होती. मध्यम वयात गृहस्थाश्रमातील कर्तव्याची पूर्ती झाल्यावर वानप्रस्थ स्वीकारून एकमेकांच्या सोबतीने लोक तीर्थयात्रेला जायचे. तेव्हा किती काळ लागेल याची निश्चिती कोणीच देऊ शकत नव्हते. आज परिस्थिती अमुलाग्र बदलली आहे. आजच्या विज्ञानयुगात दळणवळणाची, अनेक सुखकर साधने उपलब्ध आहेत. पैसा खर्च केला तर प्रवासात, जेवण्याखाण्याच्या मनाप्रमाणे सोयी मिळतात. देवदर्शन, त्यासाठीचा भक्तिभाव असतोच असे नाही. तीर्थाटनाच्या नावाखाली ते पर्यटनच होते. खरोखर त्यातून पुण्यप्राप्ती होऊन मोक्षमार्गाला लागतो का ? हा ही एक प्रश्नच आहे. यामुळे शरीराला कष्टच जास्त होतात. सगळ्यांच्याच अंतःकरणात खरोखर ईश्वर प्राप्तीची ओढ, तळमळ असेलच असे नाही. केवळ रूढी, परंपरा, सगळे निघालेत म्हणून जायला पाहिजे. या आणि अशा विचाराने केलेली यात्रा पुण्यदायी असू शकते का ? अनेक संशय/विकल्प मनात ठेऊन केलेला प्रवास म्हणजे फुकटचा शीणच होतो. त्याने आत्महित कसे साधणार ? न पेक्षा घरीच निवांत बसून एकाग्र मनाने जप केला तर निश्चितच भावभक्तीच्या दिशेने पुढे पाऊल पडणार आहे. ईश्वरी अनुसंधान, जप, नामसाधन सोडून; प्रवासात, वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा सुलभ असे नामसाधन करणे श्रेयस्कर ठरते. म्हणूनच येथे श्रीसमर्थ म्हणतात ‘हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे’

“तुला येम पाशीं करी बद्ध जेंव्हा ।

सखा कोणता सोडवी सांग तेंव्हा ।

यमाला कदापि दया ते न ये रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। २१ ।।”

सरळ अर्थ – ज्यावेळी मृत्यू येतो तेव्हा कोणीही अगदी जीवाचा जीवलग, किंवा सत्ताधीश अधिकारी सुद्धा त्याला अडवू शकत नाही. ठरल्या वेळी ठरल्या क्षणी ‘तो’ येतोच. आणि तेथे कुठलीही विनंती, मागणी, लाच अशी कोणतीही मात्रा लागू पडत नाही. यमाला दयामाया नाही. म्हणूनच ‘हरे राम हा साधा सरळ सोपा मंत्र’ नित्य जपावा व आपले कल्याण साधावे.

श्रीसमर्थांचा बोध – जन्माला येणारा प्रत्येक जीव मृत्यू  बरोबर घेऊनच येत असतो. प्रत्येकाला मृत्यू  येणार हे निश्चित असते. फक्त मृत्यूची वेळ ठरलेली असली तरी, ती कोणालाही निश्चितपणे माहित नसते. यदाकदाचित तज्ञ ज्योतिषाने वेळ सांगितली किंवा आधुनिक  वैद्यकशास्त्राने वेळेची आधी कल्पना दिली तरी ते मरण टाळण्यासाठी कोण काय करू शकते? वाट पहाण्याशिवाय ज्योतिषी, वैद्य, सत्ताधीश असले तरी काहीही करू शकत नाही. श्रीसमर्थ दासबोधात लिहितात –

राजा असतां मृत्य आला । लक्ष कोटी कबुल जाला ।

तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ।। १२-८-३२ ।।”

एकदा आला की, मृत्यू पळभराची सवड देत नाही. त्याच्यासमोर लहान-थोर, भला-बुरा, राजा-रंक, शूर-भित्रा भेद नाही. सर्वांवर मृत्यूचा तडाखा सारखाच बसतो. तेव्हा मरण निश्चित आहे. तर जाण्यापूर्वी मिळालेल्या संधीचे सोने करावे. आपल्या जन्माचे सार्थक करावे. त्यासाठीचा सर्वात सोपा आणि सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण करणे. या घोर कलियुगातील भगवंताचा अवतार म्हणजे नामावतार होय. त्याची मनोभावे आराधना करावी. हे ओळखून ‘हरे राम मंत्र  सोपा जपा रे’ असे श्रीसमर्थ  आपल्याला या श्लोकातून सांगत आहेत. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

राम मंत्र श्लोक १६-१७-१८

नको फार मंत्राग्निच्या मंत्रदीक्षा ।

नको जारणामारणादी अपेक्षा ।

कळायुक्त चातुर्य तें विकळा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १६ ।।

सरळ अर्थ – भगवंताला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध अंतःकरण, शुद्ध भाव, शुद्ध कर्म याचे फार महत्त्व आहे. याशिवाय केलेल्या कर्मकांडात यांत्रिकता येते. भाव-भक्तीशिवाय केलेले यज्ञ-यागादी उपचार असोत की, सदगुरूंकडून मिळालेल्या मंत्रदीक्षेचा जप यासारखी सात्विक उपासना सुद्धा भावाअभावी तितकीशी प्रभावी ठरत नाही. तसेच जारण-मारणादी जादूटोणा किंवा मंत्र-तंत्र साधना यासारख्या तामसी पूजा-साधना यशस्वी ठरत नाहीत. तेव्हा ‘हरे राम हा सोपा मंत्र’ जपावा हेच उत्तम होय.

श्रीसमर्थांचा बोध – ईश्वराची पूजा हे अध्यात्माचे एक प्रधान अंग आहे. सर्वच शास्त्र-पुराणात सांगितलेल्या यज्ञयागादी सकाम व्रताचरणात मंत्रोच्चार, पूजासाहित्य, इ. अचूक कर्मकांडाला फार महत्व असते. ते एक  महत्त्वपूर्ण शास्त्र आहे. आज वैज्ञानिक ज्या निष्ठेने, अथक प्रयत्नांने संशोधन करतात, तसेच इथे सुद्धा शास्त्र ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शास्त्रशुद्ध विधीविधान केले तरच कामना सिद्धी होते. या क्रियेला श्रीसमर्थ ‘कळायुक्तचातुर्य’ असा शब्द वापरतात. असफल प्रयोग, म्हणजे ‘वीकळा’. काही सूक्ष्मातिसूक्ष्म त्रुटीसुद्धा असफलतेचे कारण बनतात व मनी धरलेली कामना/हेतू पूर्ण होऊ शकत नाही आणि हाती काही लागत नाही. मग नैराश्य येते, कामना पूर्ण झाली नाही म्हणून देवावरचा विश्वास उडतो. या उलट नामसाधना माणसाला निष्काम बनवते. प्रपंचात सतत काही तरी हवेच असते. ते हवेपण, अपेक्षा सदासर्वदा नाम घेतल्याने कमी कमी होत जाऊन विरून जातात. मन रामचरणी हळूहळू स्थिर होऊ लागते, शांत होते. कामनाच नाही म्हणून सकाम साधना करावीशी वाटतच नाही. ही मनाची स्थिती कायम राहावी, समाधान लाभावे यासाठी सतत अभ्यास करणे गरजेचे असते. तेव्हा श्रीसमर्थ नाममहात्म्य पटवून देताना म्हणतात, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.’

नको याग अष्टांग तो रोध प्राणा ।

नको कृच्छचांद्रायणी हट्ट जाणा ।

अपभ्रष्ट हा मार्ग कीं वोखटा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १७ ।।

सरळ अर्थ – अष्टांग योगातील कठीण असा प्राणनिरोध किंवा हटयोगातील कठोर अशा व्रतांचे आचरण केल्यानेच फक्त पापनाश होतो व परमेश्वराजवळ जाता येते ही समजूत मिथ्या आहे. हा मार्ग चुकीचा आहे. श्रीरामाचे पवित्र, सोपे, सरळ नाम श्रद्धेने; निष्ठापूर्वक; शुद्ध अंतःकरणाने; भावभक्तीने सतत घेतले तर आणखी काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही.

श्रीसमर्थांचा बोध – भगवंत प्राप्तीचे ज्ञान, योग, कर्म, भक्ती असे अनेक मार्ग आहेत. आपापल्या स्वभावधर्मानुसार, वृत्तीनुसार, आवडीनुसार मार्ग निवडून माणूस साधना करत परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतो. यातील सगळेच मार्ग खडतर आहेत. या श्लोकात श्रीसमर्थ हटयोग व त्यातील कठोर व्रताचरणाचा उल्लेख करतात. या मार्गात शारीरिक आणि मानसिक दोन्ही शक्तीची कसोटी लागते. अष्टांग योगातील प्राणनिरोध करणे सर्वसामान्यांना सहजसाध्य नक्कीच नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी आठ अंगे यांचे त्यांच्या क्लिष्ट नियमासह आचरण करणे तेवढेच कठीण असते. हातून कळत नकळत घडलेल्या पापाच्या क्षालनार्थ स्कंदपुराणात अनेक खडतर व्रते सांगितलेली आहेत. त्यातीलच चांद्रायणी व्रताचा उल्लेख श्रीसमर्थ येथे वानगीदाखल करतात. यात कृच्छचांद्रायणी व मृदचांद्रायणी असे प्रकार आहेत. हे व्रत चंद्राच्या साक्षीने केले जाते. चंद्रकलेप्रमाणे आहार घ्यायचा. संध्येची एक पळी किंवा एक घास जो संकल्प केला असेल तसे पहिल्या दिवशी अन्न प्राशन करायचे. वाढवत जाऊन पौर्णिमेला पंधरा पळी/घास अन्न घ्यायचे. तर कृष्ण प्रतिपदेपासून एकेक पळी/घास अन्न कमी करत अमावास्येला निराहार रहायचे. अशा प्रकारे सहनशक्तीची, संयमाची, निश्चयाची कसोटी पहाणारी कठोर व्रते करणे सामान्य जनांना साध्य होत नाही. तेव्हा हा मिथ्या/वोखटा मार्ग धरण्यापेक्षा सहज, सुलभ अशा नामसाधनेने तीच सारी फळे कष्ट न करता मिळत असताना तोच मार्ग अनुसरावा हे योग्य नव्हे का ?  म्हणूनच, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे’, असे श्रीसमर्थ सांगतात. 

कदापी घडेंना व्रतें यज्ञदाने ।

नसे द्रव्य गांठीं करावें जयाने ।

घडेना घडे यद्यपी कां फुका रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १८ ।।

सरळ अर्थ – व्रते, उद्यापने, दान-धर्म, यज्ञ-याग इ. करण्यासाठी मुबलक द्रव्य गाठीशी असणे आवश्यक आहे. प्रत्येकालाच ते जमणे शक्य होत नाही. म्हणून त्याने उपासना करू नये का ? श्रीसमर्थ म्हणतात, श्रीराम नाम अखंड घेणे हा सोपा उपाय आहे ना ! रामनामाच्या उच्चाराने सगळ्याच साधनाचे फळ अनायासे मिळते म्हणूनच, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.’ 

श्रीसमर्थांचा बोध – नामसाधना हा भगवंताच्या प्राप्तीचा सहज-सोपा-सुलभ मार्ग आहे. त्यामध्ये कष्ट नाहीत, अव्यवहारीपणा नाही, प्रपंच सोडावा लागत नाही, पैसा खर्च करावा लागत नाही, नीतिमत्ता उल्लंघन नाही, लौकिक ज्ञान अवश्यक आहे असेही नाही, स्थळ-काळाचे बंधन नाही, कुठलेही भौतिक बंधन किंवा अटी नाहीत. एवढी मुभा असताना लोक मात्र देव भेटीसाठी नाही तर आपल्या इच्छापूर्तीसाठी खडतर व्रते, उद्यापने, तीर्थयात्रा, यज्ञ-याग अशा सकाम उपासना याच्याच पाठी लागतात; अट्टाहास करतात. सर्वच संत नामाचे महत्त्व आग्रहाने प्रतिपादन करतात. तरीही आम्हाला आमचे खरे हित कळत नाही. याचे कारण जे सहजतेने उपलब्ध आहे त्याचे महत्त्व वाटत नाही. शिवाय आम्हाला परमार्थाचा सुद्धा इव्हेंट/समारंभ करायचा असतो. महापूजा-अभिषेक करताना त्यात मन नसतेच. फक्त देखावा करायचा असतो. आम्ही धार्मिक आहोत, आम्ही देवाचे किती करतो हे जगाला दाखवायचे असते. अंतःकरणात परमेश्वर प्राप्तीची तळमळ नसते. देव भावाचा भुकेला आहे. त्याला मी भक्ती करतो असे गर्जना करून सांगण्याची गरजच नसते. अंतःकरणात रामाचे नित्य स्मरण असेल तर केलेले प्रत्येक सत्कर्म रामकार्य होते. म्हणूनच, श्रीसमर्थ आग्रहाने प्रतिपादन करतात की, असे समारंभ साजरे करून पैसा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा, ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.’

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

राम मंत्र श्लोक १६-१७-१८

नको फार मंत्राग्निच्या मंत्रदीक्षा ।

नको जारणा-मारणादी अपेक्षा ।

कळायुक्त चातुर्य तें विकळा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। १६ ।।

सरळ अर्थ – भगवंताला प्रसन्न करण्यासाठी शुद्ध अंतःकरण, शुद्ध भाव, शुद्ध कर्म याचे फार महत्व आहे. यांशिवाय केलेल्या कर्मकांडात यांत्रिकता येते. भाव-भक्ती शिवाय केलेले यज्ञयागादी उपचार असोत की, सदगुरूंकडून मिळालेल्या मंत्रदीक्षेचा जप यासारखी सात्त्विक उपासना सुद्धा असो; भावा अभावी  तितकीशी प्रभावी ठरत नाही. तसेच जारणमारणादी, जादूटोणा किंवा मंत्र-तंत्र साधना यांसारख्या तामसी पूजा-साधनाही यशस्वी ठरत नाहीत. तेव्हा ‘हरे राम’ हा सोपा मंत्र जपावा हेच उत्तम होय.

श्रीसमर्थांचा बोध – ईश्वराची पूजा हे अध्यात्माचे एक प्रधान अंग आहे. सर्वच शास्त्र-पुराणात सांगितलेल्या यज्ञयागादी सकाम  व्रताचरणात, मंत्रोच्चार; पूजासाहित्य इत्यादि अचूक कर्मकांडाला फार महत्व असते. ते एक महत्त्व पूर्ण शास्त्र आहे. आज वैज्ञानिक ज्या निष्ठेने, अथक प्रयत्नाने संशोधन करतात तसेच इथेसुद्धा शास्त्र ग्रंथात सांगितल्याप्रमाणे शास्त्र शुद्ध विधीविधान केले तरच कामना सिद्धी होते. या क्रियेला श्रीसमर्थ  ‘कळायुक्तचातुर्य’ असा शब्द वापरतात. असफल प्रयोग म्हणजे ‘विकळा’. काही  सूक्ष्मातिसूक्ष्म त्रुटी सुद्धा असफलतेचे कारण बनतात व मनी धरलेली कामना/हेतु पूर्ण होऊ शकत नाही आणि हाती काही लागत नाही. मग नैराश्य येते, कामना पूर्ण झाली नाही म्हणून देवावरचा विश्वास उडतो.  या  उलट नामसाधना माणसाला निष्काम  बनवते. प्रपंचात सतत काही तरी हवेच असते, ते हवेपण; अपेक्षा सदासर्वदा नाम घेतल्याने कमी कमी होत जाऊन विरून जाते. मन रामचरणी हळूहळू स्थिर होऊ लागते, शांत होते. कामनाच नाही म्हणून सकाम साधना करावीशी वाटतच नाही. ही मनाची स्थिती कायम राहावी, समाधान लाभावे या साठी सतत अभ्यास करणे गरजेचे असते. तेव्हा श्रीसमर्थ  नाममहात्म्य पटवूवुन देताना म्हणतात,  “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

 

“नको योग अष्टांग तो रोध प्राणा ।

नको कृच्छचांद्रायणी हट्ट जाणा ।

अपभ्रष्ट हा मार्ग की वोखटा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १७ ।।”

सरळ अर्थ – अष्टांगयोगातील कठीण असा प्राणनिरोध किंवा हटयोगातील कठोर अशा व्रतांचे आचरण केल्यानेच फक्त पापनाश होतो व परमेश्वराजवळ जाता येते ही समजुत मिथ्या आहे. हा मार्ग  चुकीचा आहे. श्रीरामाचे पवित्र , सोपे, सरळ नाम श्रद्धेने, निष्ठापु पुर्वक,शुद्ध अंतःकरणाने, भावभक्तीने सतत घेतले तर आणखी काही वेगळे करण्याची आवश्यकता नाही.

श्रीसमर्थांचा बोध – भगवंत प्राप्तीचे ज्ञान, योग, कर्म, भक्ती असे अनेक मार्ग आहेत. आपापल्या स्वभावधर्मानुसार, वृत्तीनुसार, आवडीनुसार मार्ग निवडून माणूस साधना करत परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतो. यातील सगळेच मार्ग खडतर आहेत. या श्लोकात श्रीसमर्थ हटयोग व त्यातील कठोर व्रताचरणाचा उल्लेख करतात. या मार्गात शारीरिक आणि मानसिक दोन्ही शक्तीची कसोटी लागते. अष्टांग योगातील प्राणनिरोध करणे सर्वसामान्यांना सहजसाध्य नक्कीच नाही. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी आठ अंगे त्यांच्या क्लिष्ट  नियमासह आचरण करणे तेवढेच कठीण असते. हातून कळत नकळत घडलेल्या पापाच्या क्षालनार्थ स्कंदपुराणात अनेक खडतर व्रते सांगितलेली आहेत, त्यातीलच चांद्रायणी व्रताचा उल्लेख श्रीसमर्थ येथे वानगीदाखल करतात. यात कृच्छचांद्रायणी व मृदचांद्रायणी असे प्रकार आहेत. हे व्रत चंद्राच्या साक्षीने केले जाते. चंद्रकलेप्रमाणे आहार घ्यायचा. संध्येची एक पळी किंवा एक घास जो संकल्प केला असेल तसे पहिल्या दिवशी अन्न प्राशन करायचे वाढवत जाऊन पौर्णिमेला पंधरा पळी/घास अन्न घ्यायचे तर कृष्ण प्रतिपदेपासून एकेक पळी/घास अन्न कमी करत अआमावस्येला निराहार रहायचे. अशाप्रकारे सहनशक्तीची, संयमाची, निश्चयाची कसोटी पहाणारी कठोर व्रते करणे सामान्य जनांना साध्य होत नाही. तेव्हा हा मिथ्या/वोखटा मार्ग धरण्यापेक्षा सहज, सुलभ अशा नामसाधनेने तीच सारी फळे कष्ट न करता मिळत असताना तोच मार्ग अनुसरावा हे योग्य नव्हे का ? म्हणूनच “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे” असे श्रीसमर्थ काकुळतीतेने सांगतात. 

 

“कदापी घडेंना व्रतें यज्ञदाने ।

नसे द्रव्य गांठी करावें जयाने ।

घडे ना घडे  यद्यपी कां फुका रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १८ ।।”

सरळ अर्थ – व्रते, उद्यापने, दान-धर्म, यज्ञ-याग इ. करण्यासाठी मुबलक द्रव्य गाठीशी असणे आवश्यक आहे. प्रत्येकालाच  ते जमणे शक्य होत नाही. म्हणून त्याने उपासना करू नये का? श्रीसमर्थ  म्हणतात श्रीराम नाम अखंड घेणे हा सोपा उपाय आहे ना ! रामनामाच्या उच्चाराने सगळ्याच साधनाचे फळ अनायासे मिळते म्हणू म्हणूनच “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

श्रीसमर्थांचा बोध – नामसाधना हा भगवंताच्या प्राप्तीचा सहज-सोपा-सुलभ मार्ग आहे. त्यामध्ये कष्ट नाहीत,  अव्यवहारीपणा नाही, प्रपंच सोडावा लागत नाही, पैसा खर्च करावा लागत नाही, नीतीमत्ता उल्लंघन नाही, लौकिक ज्ञान आवश्यक आहे असेही नाही, स्थळ-काळाचे बंधन नाही; कुठलेही भौतिक बंधन किंवा अटी नाहीत. एवढी मुभा असताना लोक मात्र देवभेटीसाठी नाही तर आपल्या इच्छापूर्तीसाठी खडतर व्रते, उद्यापने, तीर्थयात्रा, यज्ञ-याग अशा सकाम उपासना यांच्याच पाठी लागतात, अट्टाहास करतात. सर्वच संत नामाचे महत्त्व आग्रहाने प्रतिपादन करतात, तरीही आम्हाला आमचे खरे हित कळत नाही. याचे कारण जे सहजतेने उपलब्ध आहे त्याचे महत्त्व वाटत नाही. शिवाय आम्हाला परमार्थाचा सुद्धा इव्हेंट/समारंभ करायचा असतो. महापूजा-अभिषेक करताना त्यात मन नसतेच फक्त देखावा करायचा असतो. आम्ही धार्मिक आहोत, आम्ही देवाचे किती करतो, हे जगाला दाखवायचे असते. अंतःकरणात परमेश्वर प्राप्तीची तळमळ नसते. देव भावाचा भुकेला आहे. त्याला मी भक्ती करतो असे गर्जना करून सांगण्याची गरजच नसते. अंतःकरणात रामाचे नित्य स्मरण असेल तर केलेले प्रत्येक सत्कर्म रामकार्य होते. म्हणूनच श्रीसमर्थ आग्रहाने प्रतिपादन करतात की, असे समारंभ साजरे करून पैसा आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

राम मंत्र श्लोक १०-११-१२

बहू व्याप संताप तो मूळ पापा ।

गतायुष्य द्रव्यें न ये कोटि बापा ।

कळेना तुला कोणता तो नफा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १० ।।

सरळ अर्थ  – सामान्य माणूस आपली प्रगती ‘किती पैसा कमावतो?’ या वरून ठरवतो आणि मग पैसा मिळवण्यासाठी धावाधाव, प्रचंड व्याप, उलाढाली करत रहातो. येन-केन-प्रकारेन पैसा मिळवणे हेच उद्दीष्ट समोर असल्याने नीती-अनीती, भल्या-बुऱ्याचा फारसा विचार केला जात नाही. इथेच त्याच्या पापाचे मूळ  सापडते. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सहजा-सहजी सापडत नाही. आतापर्यंत केलेले उद्योग व त्यापासून नेमका काय लाभ झाला हेही समजत नाही. गोंधळून जातो बिचारा. तेव्हा श्रीसमर्थ म्हणतात, वेळ हातात असतानाच ‘हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे’.

श्रीसमर्थांचा बोध – श्रीसमर्थ या श्लोकातून प्रापंचिकांना आहे त्या परिस्थितीत भगवंताचे अनुसंधान ठेऊन आनंदाने कसे जगावे, याचेच जणू धडे देत आहेत. सामान्यपणे व्यवहार करताना  नफा-तोट्याचा विचार केला जातो. परमार्थात मात्र “हाट भरला प्रपंचाचा । नफा पहावा देवाचा ।” असे श्रीसमर्थ म्हणतात.

जन्माला आलेल्या प्रत्येकालाच कर्म करणे अनिवार्य आहे. मृत्यूनेच कर्माचा अंत होतो. ही मृत्युभूमी आहे तशीच कर्मभूमीही आहे. भगवंताच्या विस्मरणात केलेले प्रत्येक कर्म हे पाप समजावे. प्रपंच/व्यवहार करताना भगवंताच्या अनुसंधानात राहून केलेले कर्म अकर्म होते. या उलट  विषय-विकारात वहावत जाऊन, पैशाला महत्त्व देत केलेले प्रत्येक कर्म पापाचे मूळ ठरते. भौतिक सुख हे मृगजळ आहे. त्याच्या पाठी धावणे सर्वनाशाला आमंत्रण देणे होय. चौऱ्यांशी लक्ष योनींचा फेरा पूर्ण करून पाप-पुण्य समसमान झाल्यानंतर हा दुर्लभ असा नरदेह मिळाला आहे. श्रीसमर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘घबाड’ हाती आले आहे. तेव्हा नरजन्माचे हित/फायदा कशातआहे हे ओळखता आलेच पाहिजे, नाहीतर पुनरपि जन्म-मरणाचे चक्रात अडकणे आलेच. असे होऊ नये हे वाटणे आणि त्यासाठी अंतःकरणपूर्वक प्रयत्न करणे यालाच ‘उपासना’ म्हणतात. नित्य उपासनेतून भगवंताच्या निकट पोहोचणे हाच नरदेहात येऊन केलेल्या व्यवहाराचा फायदा/ नफा होय. या साठीची जवळची वाट (शॉर्टकट) आहे ‘अखंड नामस्मरण’. म्हणूनच श्रीसमर्थ या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात.. “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”.

तुझे आप्त द्रव्यार्थि नुस्तेचि होती ।

तनू हे चितेमाजी कीं बोळविती ।

असें जाणूनी हित काहीं करा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। ११ ।।

सरळ अर्थ  –  माणसाला देवापेक्षा जास्त भरवसा आपल्या आप्तस्वकियांचा असतो. श्रीसमर्थ येथे स्पष्टपणे वस्तुस्थितीची जाणीव करून देतात. नातलग सगळे ‘द्रव्यार्थी’ असतात. पैशासाठी स्वार्थापुरते जवळ येतात. मरणानंतर देह चितेत जाळून मोकळे होतात आणि लगेच विसरूनही जातात. हे लक्षात घेऊन आपण आपल्या हितासाठी ‘हरे राम हा मंत्र सोपा’ जपावा हेच उत्तम.

श्रीसमर्थांचा बोध  –  माझे-माझे म्हणवणाऱ्या आप्त स्वकीयांवर कितीही प्रेम केले, त्यांना आपले मानले तरी ते सोडून जाणार आहेत. सर्व सुखाचे सोबती असतात.  प्रतिकूल काळ आला की सगळे दूर जातात. श्रीसमर्थ म्हणतात, “आवघी सोइरी सुखाची । हे तुझ्या सुखदुःखाची । सांगाती नव्हेती ।।” जे आपले समजुन आयुष्यभर त्यांच्यासाठी काबाड-कष्ट केले, भल्या-बुऱ्या मार्गाने पैसा मिळवला; ते जीवलग म्हणवणारे, पैसा-धन असेतोवर जवळ राहतात, प्रतिकुल काळात मात्र ‘वाल्याच्या’ नातलगांप्रमाणे सहजपणे दूर निघून जातात. हीच जगाची रीत आहे. तोपर्यंत अर्ध्याच्या वर आयुष्य कुटूंबासाठी खर्ची पडलेले असते. अशाप्रकारे जीवनातील अमुल्य वेळ रामभजनावीण माणूस वाया घालवतो. प्रत्येक माणसाने हे ओळखून आपला खरा स्वार्थ साधणे गरजेचे आहे. नरदेहाचे जे प्रमुख उद्दीष्ट, जे परमेश्वर प्राप्ती, त्यासाठी साधना-उपासना करणे गरजेचे असते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, या दुर्लभ नरजन्माचे सार्थक करून घ्यायचे तर ‘हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे’.

कुटुंबीं स्त्रिया पुत्र ते दासदासी ।

बहु पोषिसी सोसूनी दुःखरासी ।

त्यजीं भार काबाड ओझें किती रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। १२ ।।

सरळ अर्थ  –  कुटुंब म्हणजे आईवडील, पती-पत्नी, एक किंवा दोन मुले, शक्य असेल तिथे एखादी घरकाम करणारी बाई. हे झाले आजचे, त्यातही शहरातील कुटुंबाचे चित्र. श्रीसमर्थांच्या काळात याच्या उलट परिस्थिती होती. गृहस्थाश्रमात, एकत्र कुटुंब पद्धती होती. तेव्हा कुटुंबात घरोघरी नोकरचाकरासह किमान दहा-पंधरा तरी माणसे असायची. त्या सगळ्यांचा पालनकर्ता कुटुंबातील कर्ता पुरूष असायचा. सगळ्यांचा चरितार्थ चालवणे त्या एकट्याची जबाबदारी मानली जात असे. अत्यंत कष्ट, दुःख,सोसून हे करावेच लागत असे. श्रीसमर्थ म्हणतात, ‘हरे राम’ हा साधा सोपा मंत्र अखंड जपला, तर करावे लागणारे काबाडकष्ट नक्कीच सुसह्य होतील.व अंतरी समाधान लाभेल.

श्रीसमर्थांचा बोध  – आपला प्रपंच/संसार ही माझी जबाबदारी म्हणून त्यासाठी माणूस प्रचंड कष्ट करतो. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. फार चैनीची साधने नसली तरी घरातील माणसांव्यतिरिक्त,  नोकरचाकर, गोधन, कुत्री-मांजरे अशी खाणारी तोंडे भरपूर होती आणि कमावणारा एकमेव कुटुंब प्रमुख होता. आज काळ बदलला, परिस्थितीत बदल झाला. नवरा-बायको दोघेही कमवत असले तरी गरजा वाढल्याने कितीही मिळवले तरी पैसा पुरेनासा झाला. रात्रंदिवस राबणे काही थांबले नाही. त्याबरोबर सोसावे लागणारे दुःखही कमी झालेले नाही. श्रीसमर्थ म्हणतात तसे, माणूस कुटुंबाचा ‘काबाडी’ तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. जोपर्यंत हे संसाराचे ओझे स्वतःहून झटकत नाही, उतरवून ठेवत नाही तोपर्यंत ते मानगुटीवर असतेच. त्यातूनच प्रयत्नपुर्वक थोडा वेळ भगवंता साठी काढायचा असतो. प्रपंचात रिकामा वेळ कधीच मिळणार नाही. ‘समुद्रातील लाटा थांबल्या की मी पाण्यात उतरेन’ असे ते म्हणण्यासारखे आहे. म्हणूनच श्रीसमर्थ या श्लोकातून सांगतात की, ते काल्पनिक ओझे थोडे बाजुला ठेऊन आत्महितासाठी “हरे राम” हा साधा सोपा मंत्र नित्य जपावा व आपले कल्याण करून घ्यावे. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

राम मंत्राचे श्लोक क्र. ७ – ८ – ९

तुझें बाळ तारुण्य गेलें निघोनी ।

कळेना कसे लोक जाती मरोनी ।

करिसी मुलाची स्वहस्तें क्रिया रे

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ।। ७ ।।

सरळ अर्थ  – बाबारे, जन्माला आलो म्हणता म्हणता कधी बालपण जाऊन तारुण्यात पदार्पण केले आणि रसरसते तारूण्य ओसरून वृद्धत्वापर्यंत पोहोचलो कळलेच नाही. बरोबरीचे बरेचसे लोक, सगे-सोयरे कमी कमी होताना दिसत आहेत. ‘जात्यामधले दाणे रडती, सुपातले हसती । कळे न त्यांना मरण उद्याचे भाळीला अंती ।।’ कवीच्या या शब्दाची प्रचिती वरचेवर येते. दुर्दैवाने कोणाला आपल्याहून वयाने लहान असणाऱ्याचे क्रियाकर्मही करावे लागते. या घटनांवरून काहीच धडा घेणार नाही का ? म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, ‘हरेराम हा मंत्र सोपा जपा रे’.

श्रीसमर्थांचा बोध – ‘मरे एक त्याचा दूजा शोक वाहे । अकस्मात तो ही पुढे जात आहे ।’ हा मृत्यूलोक आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव क्षणाक्षणाने मृत्यूच्या दिशेने जात असतो. अगदी जोरदार, मोठा, समारंभपूर्वक आपला वाढदिवस साजरा करताना आपण हे विसरतो की, आपण एकेक वर्षाने मृत्यूच्या अधिक जवळ जातो आहोत. ज्यांना आपण आपले मानतो, स्वकीय समजतो ते आप्त; इष्ट; सखे-सोबती या अनंताच्या प्रवासात कधीही साथ सोडून जातात. तेव्हा दुःख करत बसण्यापेक्षा, नामस्मरण करणे जास्त श्रेयस्कर असते. हे जगच मुळी मृत्यूची पाठशाला आहे. जन्म जरी पुर्वकर्मानुसार झाला असला तरी आपला मृत्यू   कसा व्हावा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य नियतीने माणसाला दिले आहे. इथे जगायचे कसे ? या पेक्षा मरावे कसे ? हे शिकणारा यशस्वी ठरतो. परमार्थ साधनेने हे सामर्थ्य मिळते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, ‘मरणाचे स्मरण असावे । हरीभक्तीस सादर व्हावे ।’ जन्माला आला, जगला आणि मेला, यापेक्षा रामभक्तीत/भगवद् चिंतनात व्यतीत केलेला काळ खऱ्या अर्थाने माणूस जगलेला असतो. तेव्हा, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे हेच खरे.

दुराशा नको रे परस्त्री धनाची ।

नको तूं करूं नीचसेवा जनाची ।

पराधीन कैसा भला दिससी रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। ८ ।।

सरळ अर्थ  – परधन आणि परस्त्री  यांची अभिलाषा कधीही धरू नये. त्यासाठी बहुतेक वेळा ‘नीचसेवा’ अर्थात अगदी खालच्या स्तराला जाऊन केलेली सेवा, तसेच शूद्र लोकांची सेवासुद्धा करावी लागते, त्यामुळे पराधीनता येते. मन-बुद्धी गहाण ठेऊन जगण्यापेक्षा हरे राम हा मंत्र सोपा जपावा हेच उत्तम होय.

श्रीसमर्थांचा बोध – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात – “परद्रव्य परनारी यांचा धरी विटाळ”. श्रीसमर्थ  म्हणतात – “कांचनाचे ध्यान परस्त्री चिंतन ।  जन्मासी कारण हे चि दोन्ही ।” कामिनी आणि कांचन म्हणजेच अर्थ आणि काम हे परमार्थ साधनातील दोन मोठे अडथळे आहेत. ज्यांना नरजन्माचे सार्थक करून घ्यावेसे वाटते, याच जन्मी मोक्ष मिळावा असे वाटते, त्या प्रत्येकाने जी पथ्ये पाळणे अत्यावश्यक आहेत, त्यात परद्रव्य आणि परस्री यांपासून दूर रहाणे हे प्रमुख आहे. मानवेतर प्राण्यांपेक्षा ‘मनुष्य’ वेगळा, नव्हे तर विशेष महत्वाचा आहे, याचे प्रमुख कारण भगवंताने फक्त आणि फक्त मनुष्यालाच विवेकशक्ती दिलेली आहे. ज्याच्या आधारे मनुष्य ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून घेऊ शकतो. श्रीसमर्थ म्हणतात, 

म्हणौनि नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्ये वरिष्ठ ।

जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचे ।।

असे असताना माणूस मात्र विषय-विकारांच्या आहारी जाऊन “माझे ते माझेच, पण तुझे ते ही माझेच” म्हणत अतिलोभापायी, जे आपले नाही ते मिळवण्याचा हट्ट धरतो. नीती-मर्यादांचे उल्लंघन करतो. त्यासाठी नीचसेवा अंगिकारतो. म्हणजे करू नये ती कामे करतो. किंवा, आपली पत-प्रतिष्ठा, आत्मसन्मान विसरून फक्त पैसा मिळवण्याकरता शूद्रांचे दास्यत्व पत्करतो व आपले स्वातंत्र्य गमावतो. समाजात आपणच आपली छी-थू करून घेतो. श्रीसमर्थ म्हणतात, असे अपमानीत होण्यापूर्वीच अंतःकरणपूर्वक हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

मदे डोलसी बोलसी साधुवृंदा ।

कसें हीत तूं नेणसी बुद्धिमंदा ।

रिकामाचि तू गुंतशी  वाउगा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ।। ९ ।।

सरळ अर्थ  – अहंकार, अभिमान, दंभ याने उन्मत्त होऊन, साधु-सज्जनांना उर्मटपणे टाकून बोलणे चांगले नाही. अशा माणसांना श्रीसमर्थ ‘बुद्धिमंद’ म्हणतात. साधे स्वतःचे हित सुद्धा या अहंकारी लोकांना कळू नये याचे त्यांना वाईट वाटते. त्यांची  समजूत काढताना श्रीसमर्थ म्हणतात , “बाबा रे, असे  नको ते रिकामटेकडे उद्योग करण्याऐवजी, साधे सरळ सोपे ‘हरेराम’ असे नाम मुखाने घेतले, तर तुझे कल्याणच होईल बरं.”

श्रीसमर्थांचा बोध – ज्याला आपण ‘मद’ म्हणतो त्याचे नेमके स्वरूप तरी काय आहे ? बघा हं! काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. यात मद आणि मत्सर, हे दोघे जुळे भाऊच आहेत. माणसाच्या या नैसर्गिक विकारांना अध्यात्म शास्त्रात षड्रिपू म्हटले आहे. या विकारांचा संग, म्हणजे दुःसंग होय. पण हे विकार तर परमेश्वराने दिलेले आहेत, तेव्हा त्यांचा उपयोग आहे हे नक्की. हे विकार कुठे, केव्हा, कसे आणि किती प्रमाणात वापरावे हे समजत नाही. स्वयंपाकात मिठाचे प्रमाण जसे, तसे हे विकार जरूर तेथे त्या प्रमाणात वापरणे अपेक्षित आहे. जिथे जिथे शक्तीचा साठा असतो तिथे मद-मत्सर डोके वर काढतात. कुणाकडे शारीरिक शक्ती असते, कुणाकडे मानसिक ताकद असते, कुणाजवळ  ज्ञानशक्ती, तर कुणाजवळ आर्थिक बळ असते. अशी शक्ती देवाचे देणे न मानता आपलेच कर्तृत्व आहे, असा भ्रम जेव्हा होतो तेव्हा मद-मत्सर माणसाला मदोन्मत्त बनवतात. त्यातही मद-मत्सर-स्वार्थ असा त्रिवेणी संगम होतो, तेव्हा त्याला प्रचंड धार येते व त्यातूनच असुरीवृत्तीचा उदय होतो. अशी व्यक्ती समोरच्यावर अकारण अन्याय, अत्याचार करू लागते. त्यामुळे समाजस्वास्थ्य बिघडते, त्याबरोबर स्वतःचेही स्वास्थ्य-समाधान-शांती हरवते, हे त्याला कळत नाही. अशा नादान व्यक्तींना श्रीसमर्थ कळवळ्याने सांगतात, हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे. 

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

राममंत्र श्लोक ४, ५, ६

जरी ही तनू रक्षिसी पुष्ट काही ।

तरी भोग तो रोग होईल देहीं ।

विपत्ती पुढें ते न ये बोलतां रे।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥ ४ ॥

सरल अर्थ – अतिदुर्लभ असा नरदेह पूर्वसुकृताने मिळाला म्हणून त्याचे लाड-कोड पुरवण्यात, श्रीसमर्थांच्याच शब्दात “अत्यादरे पिंडपोषण” करण्यात आयुष्याचा सर्वाधिक काळ खर्च करावा का? माणूस आस्तिक असो वा नास्तिक, बुद्धिवादी असो वा समाजवादी सगळेच मनापासून या देहाचे, त्याबरोबर देहबुद्धिचे भरण-पोषण करण्यात गुंतलेले असतात. त्याच्या अतिरेकाने आपले शरिर रोगाचे भक्ष्य कधी बनते ते कळतही नाही. तेव्हा आधीपासूनच विवेकाने हरे राम या सोप्या मंत्राचा जप सुरू करावा हेच खरे.

श्रीसमर्थांचा बोध – या आधीच्या श्लोकातून श्रीसमर्थांनी स्पष्टच सांगितले आहे की, पूर्वपुण्याई फळाला आली आणि हा नरदेह लाभला आहे. अध्यात्मदृष्ट्या नरदेह हे ईश्वरप्राप्ती साठीचे एक साधन आहे. जन्माला येण्यापूर्वी जीव देवाला ‘सोऽहं’ म्हणत परमेश्वराकडे कळवळून प्रार्थना करतो, “येथील यातनातून सोडव रे देवा ! मी तुला कधीही विसरणार नाही.” मात्र गर्भातून बाहेर येताच ‘कोऽहं’ म्हणू लागतो. देहालाच ‘मी’ मानून त्याचे लाड करू लागतो. जसे प्रवास करताना गाडी हे प्रवासाचे साधन आहे. प्रवास सुखकर व्हावा म्हणून गाडीची काळजी घेणे, जसे इंधन भरणे; योग्य ती देखभाल करणे जरुरीचे असते. गंतव्य स्थानी पोहोचल्यावर गाडीचे महत्व संपते. त्याचप्रमाणे देहाचा उपयोग ईश्वरप्राप्ती करून घेण्यासाठी आहे पण हा मुख्य उद्देश विसरून माणूस देहाचे चोचले पुरवण्यात गुंतून पडतो. अतिभोगाने देहबुद्धी बळावते, देह रोगाचे कोठार बनते. वेळेवारी भगवंताची भक्ती केली, नामस्मरण केले तर इंद्रियांचे विषयांवर असलेले प्रेम हळूहळू भगवंताकडे रूपांतरीत होते. देहबुद्धी कमी होते. भक्ताच्या जीवनात संकटे आली तरी तो विचलीत होत नाही.  रामाचे चिंतन सुरू झाले की प्रापंचिक चिंता दूर पळतात. म्हणूनच श्रीसमर्थ  म्हणतात.. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. 

 

खुळे हस्तपादादि हे भग्न होती ।

दिठी मंद होवोनियां कर्ण जाती ।

तनू कंप सर्वांगी होती कळा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥ ५ ॥

सरळ अर्थ – सतत बदलणे हा या सृष्टीचा नियम आहे. ‘यद्दृष्टं तन्नष्टं’ जे दिसते ते सतत बदलत असते, कायमस्वरूपी असे येथे काहीही नाही. हात खुळे होतील, पाय तुटतील, नजर कमजोर होईल, कानही काम करेनासे होतील, शरीराला कंप सुटेल. तारुण्यात सौंदर्याने-शक्तीने रसरसलेला देह कमजोर होणार हे निश्चित आहे. मग आज आत्ता ताबडतोब नामाला लागावे आणि हरे राम हा सोपा मंत्र जपावा.

श्रीसमर्थांचा बोध – दुर्लभ नरदेह पूर्वपुण्याईने लाभला तरी तो काही शाश्वत नाही. बाल्य-तारूण्य-वृद्धत्व या देहाच्या मर्यादा आहेत. वेळ-काळाचेही बंधन आहेच. तसेच हा मानवी देह कर्माच्या सिद्धांतानुसार सुख-दुःख भोगत असतो. श्रीसमर्थ करूणाष्टकात म्हणतात.. “सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनी आले ।” सुखाच्या शिखरावर असताना अचानकपणे काहीतरी असे प्रसंग घडतात, माणूस मोडून पडतो. हात तुटतात, पाय मोडतो. जोषात चालू असलेले काम थांबते. दबक्या पावलाने वृद्धत्व पुढ्यात उभे राहाते. दृष्टी मंद होते, ऐकायला कमी येऊ लागते, दंतपंक्ती जागा सोडू लागतात, त्वचा सुरकुत्यांनी भरून जाते. प्रत्येकाला आपल्या कर्माप्रमाणे अध्यात्मिक-आधिभूतिक-आधिदैविक ताप तर भोगणे क्रमप्राप्त असते. या सर्व जंजाळातून भगवंताचे नाम घेण्यास वेळ मिळत नाही. मृत्यू समोर दिसू लागला की देव आठवतो. तोपर्यंत वेळ हाताच्या बंद मुठीतून वाळू गळून जावी तशी निघुन गेलेली असते. म्हणूनच श्रीसमर्थ कळकळीची विनंती करतात भल्या माणसांनो, अंगात ताकद आहे; शक्ती आहे तोपर्यंतच स्वतःला नाम घेण्याची सवय लावून घ्यावी. नाम घेताघेता नामाची गोडी आपोआप लागेल. म्हणूनच सातत्याने हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

कफे कंठ हा रोध होईल जेव्हां ।

अकस्मात तो प्राण जाईल तेंव्हां ।

तुला कोण तेथें सखे सोयरे रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥ ६ ॥

सरळ अर्थ – कफाने घसा भरलेला असल्याने आवाज निघत नाही. बोलायचा प्रयत्न केला तरी शब्द न फुटता भलताच आवाज येतो. बहुतेक या स्थितीला लोक घर घर लागली असे म्हणत असावेत. आणि अचानक प्राणपक्षी उडून जातो. तो जिथे जातो तिथे आपले म्हणावे असे सखे, सोयरे कोणीही नसतात. जिवंत असताना केलेल्या भगवंताच्या नामस्मरणाची तेवढी सोबत असते. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात.. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे.

श्रीसमर्थांचा बोध – मनुष्याच्या जीवनातील अटळ आणि निश्चित गोष्ट म्हणजे मरण. जन्माला आला त्याच क्षणी मरण निश्चित झाले. ‘नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती ।’ हे माणूस विसरतो आणि अमर असल्याप्रमाणे विषय-विकाराच्या उपभोगात रमतो, गुंतून पडतो. अलौकिक असा नरदेह प्राप्त होऊनही हा जीव आपले ‘स्व-हीत’ साधत नाही. प्राप्त झालेल्या सुवर्णसंधीचा उपयोग न करता उपभोगाच्या बेहोशीत मरणाच्या दिशेने वाटचाल करतो. तारुण्याच्या मस्तीत देवधर्म करत नाही. हा माझा; तो माझा; ‘कन्या पुत्र दारा सगे सोयरे ते’ सगळ्यांचा आधार वाटतो. पण वेळ आली की कोणी कोणाचे नसते हे माणसाच्या लक्षात येत नाही. मानवेतर प्राण्यांपेक्षा मनुष्यास देवाने दिलेली बुद्धि आणि मन सर्वात जास्त विकसीत तसेच प्रगल्भ आहे. माणसाला भल्या-बुऱ्याची जाण असते. तो विवेकाने आपले कर्म बदलू शकतो. परमेश्वराने कर्मनिवडीचे स्वातंत्र्य फक्त माणसाला दिले आहे. तरीही मृत्यू जवळ आल्यावर सुद्धा नामस्मरण करावे असे वाटत नाही. सग्यासोयऱ्यांवर विश्वास असतो तेवढा देवावर नसतो. एके दिवशी अचानक मृत्यू गाठतो. कधी आजारपणाने कधी वृद्धत्वाकडे तर कधी अपघाताने मृत्यूलोक सोडून जावेच लागते. कुठे जातो? तिथे सगेसोयरे मदतीला येतात का? उत्तर आहे नाही. म्हणूनच परमार्थात प्रत्येकाने स्वार्थी = स्व+अर्थी असावे. आपले हित आपणच पहायचे असते. आपण जन्मभर जे रामनाम घेतो तेच अंतीम प्रवासात आपल्यासोबत असते. आपला स्वार्थ, आपले हित फक्त आणि फक्त नामस्मरणात साठवलेले आहे त्यासाठीच श्रीसमर्थ  म्हणतात.. हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे.

|| जय श्रीराम ||

श्रीराममंत्राचे श्लोक

श्रीसमर्थ श्रीरामभक्त आहेत. श्रीराम हेच त्यांचे सद्गुरू, त्यांचे आराध्य, त्यांचे सर्वस्व आहेत. श्रीराम श्रीसमर्थांसाठी देवांचाही देव आहेत. कारण, “राम योग्यांचे मंडण । राम भक्तांचे भूषण । राम धर्माचे रक्षण । संरक्षण दासांचे ॥” धर्माचा पक्ष घेऊन धर्मरक्षण करणारे श्रीराम अद्वितीयच आहेत. प्रभूश्रीरामचंद्रांचे वर्णन करताना श्रीसमर्थांचे ह्रदय उचंबळून येते. त्यांच्या प्रतिभेला नवनवे पांगारे फुटतात. 

श्रीराम रूपाने सर्वांग सुंदर, करुणेचे सागर, त्रैलोक्याचे प्राण, दीनानाथ, उद्धारक आहेत. कल्याणाचे कल्याण, मंगळाचे मंगळ, प्रत्यक्ष कैवल्यदानी, सूर्यवंशाचे मंडण, अशा अनेक शब्दालंकारांनी श्रीरामांचे सगुणरूप आळवणे श्रीसमर्थांना फार आवडते. श्रीरामांकडे अगणित गुणसंपदा आहे, परंतु श्रीसमर्थ रामरायाच्या महान पराक्रमावर जास्त प्रेम करतात. अवघ्या देवांना रावणाच्या बंदीशाळेतून सोडविण्याचे कार्य, अन्य कोणालाही करता आलेले नाही ते श्रीरामांरानी केले म्हणून श्रीराम, श्रीसमर्थांचा आवडता देव आहे. काही घडणे किंवा बिघडणे सर्व रामरायाच्याच हाती आहे, अशी श्रीसमर्थांची दृढ श्रद्धा आहे. 

श्रीसमर्थांनी रामभक्तीपर, रामगुणवर्णनपर, रामराज्य सांगणारे असंख्य श्लोक, पदे-अभंग लिहिले आहेत. त्यात ४९ श्लोक असलेले राममंत्राचे स्फुट काव्य विशेष आहे. मनाच्या श्लोकांप्रमाणे अत्यंत ओजस्वी आणि मानवमात्राला सन्मार्गाच्या वाटेवर घेऊन जाणारे हे श्लोक प्रत्येकाने एकदा तरी नक्की वाचावेत. यातून रामनामाचा सरल-सोपा मंत्र निरंतर जपण्याचा आग्रह श्रीसमर्थ साधकाला करतात. माणसाचा जन्म ‘बहुत सूकृताने’ लाभतो. तो आत्मोद्धारासाठी सन्मार्गाने झिजवायचा असतो. अन्यथा फक्त उपभोगाने देहाचा नाश होतो व सहजी मिळालेली संधी हुकते. म्हणूनच श्रीसमर्थ परत परत सांगतात “हरे राम हा मंत्र सोपा जपा रे”. या एकेका श्लोकातून श्रीसमर्थ नामस्मरणाची सोपी वाट जनसामान्यांसाठी मोकळी करत आहेत. जय श्रीराम. 

श्रीसमर्थरचित श्रीराममंत्राचे श्लोक : श्लोक क्र. १

नको शास्त्र अभ्यास वित्पत्ति मोठी ।

जडे गर्व ताठा अभिमान पोटीं ।

कसा कोणता नेणेवे आजपा रे ।

हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥ १॥

आपल्याला भगवंताचे दर्शन घडावे, किमानपक्षी काही अनुभव तरी यावा, असे प्रत्येकालाच आतून वाटत असते. आणि त्यासाठी बरेच लोक आपापल्या मनाने काहीबाही प्रयत्न करत असतात. मात्र फारच कमी लोकांना त्यात थोडेफार यश मिळते, तर अगदी एखाद दुसर्‍यालाच भगवंताचे दर्शन घडून ‘तो’ दिव्य अनुभव येतो. याचे कारण श्रीसमर्थ म्हणतात तसे, “परंतु त्यांची निष्ठा कांहीं |  तैसीच नसे ।” माणसाची देवाच्या बाबतीत असणारी कल्पना आणि देवाशी केली जाणारी वागणूक, दोन्ही खऱ्या नसतात. सगळाच दांभिकपणा. खऱ्या भक्तीत भाव महत्वाचा असतो. कर्मयोगात शारीरिक, आर्थिक शक्ती लागते. ज्ञानमार्गात बौद्धिक शक्ती महत्वाची असते, शास्त्रग्रंथांचे अध्ययन; पाठांतर करावे लागते. त्यामुळे काही प्रमाणात सिद्धी, कीर्ती, पद, प्रतिष्ठा प्राप्त तर होते, पण त्यातून अहंकार दुणावतो. स्पर्धा, ईर्षा वाढून तीच माणसाच्या पतनाला कारण ठरते. योग मार्गाचा अवलंब करताना आसन, प्राणायाम, अस्तेय, अपरिग्रह अशी अनेक विधिविधाने सांभाळावी लागतात, ती साधताना कठीण वाटू लागते. अजपाजप समजून घेणे फारच अवघड आणि प्रत्यक्ष साधणे तर दूरच रहाते. म्हणूनच सरळ सोपा भक्तिमार्ग, आणि त्यातही नामस्मरण करणे सामान्य जनांना सुलभ आहे. त्यात काही कष्ट नाही आणि खर्चही करावा लागत नाही. सर्वच संतांनी एकमुखाने नामस्मरण करण्यावर विशेष भर दिलेला आहे. आपले श्रीसमर्थ तर श्रीरामभक्त आहेत. त्यांनी निरंतर रामनामाचा उद्घोष केला. ते स्पष्टपणे सांगतात की, मला जे काही प्राप्त झाले ते या रामनामानेच. म्हणून तुम्ही सुद्धा साधे सरळ सोपे रामनाम नित्य जपावे व स्वहित साधावे. जय श्रीराम. 

श्रीसमर्थरचित श्रीराममंत्राचे श्लोक : श्लोक क्र. २ 

नको कंठ शोषू बहू वेदपाठी ।

नको तूं पडूं साधनांचे कपाटी ।

घडे कर्म खोटें बहू तो दगा रे ।

हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे ॥२॥

सरल अर्थ – वेदांचे काही शिक्षण नसताना, अर्थात ज्ञान नसताना वेदांचे पाठांतर करणे, फुकाचा कंठशोष ठरतो. तसे कोणी करतो म्हणून आपण साधना करणे एक प्रकारे बंधनात अडकणे होय. हातून घडणारे हे कर्म, म्हणजे निव्वळ स्वतःच स्वतःची केलेली फसवणूकच असते. म्हणून ‘हरे राम’ या सोप्या मंत्राचा जप करावा.

श्रीसमर्थांचा बोध – पहिल्या श्लोकात सांगतात, शास्त्रांचा अभ्यास नको. आता म्हणतात वेदपाठ करणे, साधना करणे ही कर्मं सारे फसवे आहे. मग हे करणारे चुकीचे असतात का? नाही. तसे श्रीसमर्थांना म्हणायचे नाही. प्रत्येक कर्म हे अधिकाराशिवाय करणे धोक्याचे असते. वेदपाठ करण्यासाठी काही अधिकार प्राप्त करून घ्यावा लागतो. तीच गोष्ट साधन करण्याची सुद्धा आहे. अधिकारी व्यक्तीकडून, सदगुरूंकडून मिळालेले साधन श्रद्धेने, निष्ठेने करायचे असते. त्या मागे त्या अधिकारी व्यक्तीचे तप जोडलेले असते. केवळ आपल्या मनाने केलेले पाठांतर, साधन फक्त ‘पाट्या टाकणे’ असते; पोपटपंची असते. त्याने वृथा श्रम होतात, हाती काही लागत नाही. योग्य अधिकाराशिवाय केलेल्या कर्माने गती प्राप्त न होता अधोगती होण्याचीच शक्यता जास्त असते. नामसाधना एकमेव अशी साधना आहे की तेथे फारसे नियम नाही, कठोर बंधने नाहीत, बाह्य साधनांची आवश्यकता नाही. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, “पेढा जसा कसाही खावा, गोडच लागतो. तसे नाम कसेही घ्यावे ते काम करणारच”. म्हणून श्रीसमर्थ म्हणतात, “हरे राम हा मंत्र  सोपा जपा रे”.

जय श्रीराम. 

Language