प. पू. आक्का स्वामींची काव्यसंपदा

श्रीसद्गुरू देशमुख काका व आक्का स्वामींना वंदन ! या लेखातून प. पू. आक्कास्वामींच्या ‘आनंदसागर’ या काव्यसंग्रहातील काही निवडक काव्यांचा परिचय करून घेणार आहोत. संतांच्या काव्यातून विशेष आनंद प्राप्त होतो, कारण; त्यात सुंदर अर्थ दडलेला असतो व मनाला बोधही केलेला असतो. ‘आनंदसागर’ या काव्यसंग्रहाविषयी आपले मनोगत व्यक्त करताना प. पू. आक्कास्वामी म्हणतात, “प्रभू कृपेने आनंद संजीवनी व आनंद सरिता याचे जनता जनार्दनाने स्वागत केले. म्हणून आता आनंद सागरही तोच निर्माण करत आहे, या आनंद सागरात डुंबूया. ही अल्पशी कृती सद्गुरूंना अर्पण.” असा शरणागत भाव या मनोगतातून व्यक्त केला आहे. या आनंदसागर काव्यसंग्रहात भगवान शंकर, गौरी, वासुदेव, भागवत धर्म, देहबुद्धी, मायेची करामत, नामाचा महिमा, गणेश वंदन अशा अनेक विषयांवर काव्यरचना केलेल्या आहेत. यातील काही निवडक काव्ये व त्या काव्यावर थोडक्यात निरूपण करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी श्रीसद्गुरू डॉ. देशमुख काका, श्रीसमर्थ रामदास स्वामी व अनेक संतांच्या साहित्याचा आधार घेतला आहे. या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन !

पहिले काव्य – गणेश वंदन :

“नमुया प्रेमे गणरायाला । सकळ मिळूनी अजि हो ।

आपण सकळ मिळूनी अजि हो । दुर्गुण त्यजूनि सद्भावाने स्मरू देवराया ।। १ ।।

भाव मनीचे जुडी दुर्वांची वाहू गणेशाला ।। २ ।।

प्रभू कार्यास्तव देह झिजवू या संघटित होऊया ।। ३ ।।

प्रार्थिते आशा श्रीगणेशा तनमन अर्पुया | आपण सगळे मिळूनी अजि हो ।। ४ ।।”

सगुण गणेशाची पूजा अगदी प्रेमाने, आनंदाने साग्रसंगीत करावी. त्यामुळे मन प्रसन्न होते, सात्त्विक भाव निर्माण होतो, समाधान मिळते. भगवंताच्या अस्तित्त्वाबद्दलची श्रद्धा वाढते. तोच मला सांभाळतो, प्रेरणा देतो, स्फूर्ती देतो असा विश्वास वाटू लागतो. पुढे सगुणातून निर्गुणाकडे कसे जायचे तर, दुर्गुणांचा त्याग करायचा, राग, लोभ, द्वेष, मत्सर इ. षड्रिपूंपासून दूर रहायचे. सर्वांनी एकत्र संघटित होऊन देवाचे कार्य सर्वांच्या सहकार्याने करायचे ही महत्त्वाची शिकवण या काव्यातून व्यक्त केली आहे.

(लेखाची शब्द मर्यादा लक्षात घेऊन काव्याचा थोडक्यात सारांश लिहिला आहे)

 

दुसरे काव्य –  नाम महिमा :

“नाम प्रभूचे गोड रे मना । नाम प्रभूचे गोड ।। धृ. ।।

भक्तीपंथाने जाता निशिदिनी । मिळेल हरीची जोड ।।१ ।।

पथ्य एकची पाळ सख्या तू । निंद्य अवघे सोड ।। २ ।।”

सर्वच संतांनी मानवाला दिलेली एक लौकिक देणगी म्हणजे ‘नाम’. नामाचा अधिकार तर सर्वांनाच आहे. या साधनेला काही खर्च नाही, मांडामांड नाही. माळ असली अथवा नसली तरी मुखाने नामस्मरण करता येते. या कलियुगात चिरंतन सुखाची प्राप्ती करून घेण्याचा नाम हा सर्वात सोपा मार्ग आहे. माया मोहाच्या बंधनात अडकलेल्या जीवाला हरिनामच बंधनातून मुक्त करू शकते. या मार्गात काही पथ्ये पाळावी लागतात. निंद्य गोष्टींचा त्याग करायचा, वेद वंद्य कर्म करायचे, विषयाची आसक्ती, हव्यास कमी करायचा. यामुळे मनाला स्थिरता येते. मनाला भगवंत रूप करणे हीच भक्ती.

“आवडीने भावे हरिनामा घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ।।”

प्रेमपूर्वक नामस्मरण केल्याने नामधारकावर भगवंताची कृपा होते. त्याच्याच कृपेने ज्ञान होते. म्हणून प्रापंचिकांसाठी नाम हे उत्तम साधन आहे.

 

तिसरे काव्य –  देवाचे नवलाव :

“पहा कसा तो देव नाना नवलाव करितो ।। धृ. ।।

जलधीचे जल खारट असता । मधुर होईल गगनी जाता ।

अवनी वरती सिंचन करिता । मनी मोद होतो ।।

देहा ऐसे यंत्र बनवीतो । साधन करुनी साध्य साधितो ।

आशा म्हणे मग शांती देतो अनुभवा येतो ।।”

या निसर्गात किती सौंदर्य आहे, किती विविधता आहे, किती नावीन्य आहे. झाडे, वेली, पशु-पक्षी, नद्या, डोंगर, धबधबे, तलाव, फळे-फुले किती वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. ही सारी देवाची सौंदर्याने नटलेली सजलेली धरणी माता पाहून मन प्रसन्न होते. समुद्राचे पाणी तर खारट असते. त्याचे ढग बनवायचे, त्याचे गोड पाण्यात रूपांतर करून पृथ्वीवर जलधारांच्या रूपात पाठवायचे. पाणी म्हणजे अमृत. तहानलेल्याची तहान भागवते. धनधान्य पिकतात, फळाफुलांना बहर येतो आणि आपले जीवन तर पाण्यावर अवलंबून आहे. कुठल्याही कारखान्यात पाणी तयार होत नाही. ही भगवंताची कृपाच आहे, ही देवाची नवलाईच आहे. झाडांचे महत्त्वही एका कडव्यात वर्णन केले आहे. शेवटच्या कडव्यात नरदेहाचे महत्त्व सांगितले आहे. या देहातूनच खऱ्या देवाची ओळख करून घेण्याचे सामर्थ्य आहे. या देहात बुद्धीची महान देणगी लाभली आहे. म्हणून उत्तम कर्मे करून, सदाचाराने वागून देहाचे सार्थक करावे. तरच जीवनात सुख शांती समाधान लागणार आहे. 

प. पू. अक्कास्वामींचे दैवत म्हणजे बाळकृष्ण. कृष्णावर त्यांचे अतिशय प्रेम. तोच त्यांचा सखा, गुरू, मित्र, माता-पिता अशा अनेक नात्यात त्यांनी त्याचेच रूप पाहिले, त्याच्याशी सुख संवाद केला. माझा सखा’ या काव्यात त्या म्हणतात, “कृष्णजीविता सखा हो माझा । कृष्णजीवीचा सखा ।।” प्रत्यक्ष बालरूपात दर्शनाचा योग त्यांच्या जीवनात आला, साक्षात्कार झाला. आक्का लिहित असलेल्या भागवतावर चंदनाची केशरट रंगाची पावली उमटली. असा सुखद अनुभव भगवंत कृपेने त्यांच्या जीवनात आला. या सावळ्या बाळकृष्णाच्या अनेक लीला त्यांनी काव्यातून व्यक्त केल्या आहेत, ही एक गौळण –

“सखे ग हरी खोड्या करी अनिवार ।

लावी कलागती खटनट श्रीपती ।

त्वरित होई पसार । सखे ग हरी ।। १ ।।

आशा म्हणे अशी हरीची लीला ।

गावी अपरंपार सखे ग हरी ।। २ ।।”

आनंद सागर या काव्यसंग्रहात एकूण पन्नास काव्ये आहेत. यातील काही काव्यांचे थोडक्यात विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यांच्याच भजनाने या लेखाचा समारोप करत आहे. 

“सद्गुरुनाथ माझे आई । मजला ठाव द्यावा पायी ।

इंदूरच्या जीजीआई । मजला ठाव द्यावा पायी ।।”

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

सदा संगती सज्जनांची धरावी

नरदेह परम दुल्लभ । येणे घडे अलभ्य लाभ ।

दुल्लभ तें सुलभ । होत आहे ।। दासबोध २०-६-२५ ।।”

मानवी शरीराचा लाभ होणे अतिशय दुर्लभ आहे, पण त्यातच मोक्षाचा लाभ होतो. तो फार दुर्लभ असला तरी या शरीरातच सहजसाध्य आहे. मनुष्य शरीरातच आत्मा अधिक स्पष्ट झाला आहे. कळलेले बोलणे, कालची गोष्ट आज आठवणे, प्रकाश व अंधार यांचे ज्ञान, मर्त्य शरीराच्या सहाय्याने अमृत आत्म्याच्या प्राप्तीची इच्छा करणे, इत्यादी योग्यता असलेले हे शरीर आहे. भगवान शंकराचार्यांनी तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या आहेत. 

१) मनुष्य जन्म, २) मुमुक्षुत्व (मोक्षाची इच्छा), ३) सज्जन संगती. 

मनुष्य शरीर ईश्वराच्या अनुग्रहानेच प्राप्त होते. अनेक योनीतून फिरता फिरता पाप-पुण्याची समानता झाल्यावर नरदेह प्राप्त होतो. मनुष्यशरीर निर्माण केल्यावर ईश्वरालाही आनंद झाला कारण या शरीरातच आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य आहे.

“या नरदेहाचेनी कारणे । सच्चिदानंद पदवी घेणे ।

एवढा अधिकार नारायणे । कृपावलोकने दिधला ।।”

या ध्येयसिद्धीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे क्रियमाण स्वातंत्र्य माणसाला आहे. जीवनाला सुंदर घाट देण्याचे सामर्थ्य सर्व जीवात आहे, पण अज्ञानाने ते कसे सुंदर करावे हेच कळत  नाही. कोणीही मनुष्य उपजत शहाणा असणे दुर्मिळच असते. कारण मनुष्याचा जन्मच अज्ञानावस्थेत होत असतो. मनुष्य पुढे स्वप्रयत्नांनी, संत संगतीने व सद्गुरुकृपेने शहाणपण शिकत जातो. शहाणपण नित्य अभ्यासानेच प्राप्त होते, म्हणून सत्संगतीला जीवनात फार महत्व आहे. सत्संग हा परमार्थाचा पायाच आहे. सत्संगतीशिवाय जीवनात खरी प्रगती होऊ शकत नाही. 

“अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।”

अवगुण सोडायचे म्हटले तर सोडता येतात व उत्तम गुण अभ्यासाने प्राप्त करून घेता येतात. जो माणूस प्रयत्न करीत नाही, कष्ट करीत नाही, शहाणपण शिकत नाही, उत्तम गुणांकडे दुर्लक्ष करतो, कळूनही त्यांचा स्वीकार करत नाही, तो नेहमी दुर्मुखलेला, चिडचिडलेलाच रहातो. परंतु यातून बाहेर पडायला केवळ आणि केवळ सज्जन संगतीच कामी येते. त्यांच्या सहवासातून, विचारातून मनाचा पालट होण्याचे सामर्थ्य असते. 

“संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ।

मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे |।।”

कोणत्याही जीवाचा सत्संगामुळे उद्धार होतो. संत हे परमेश्वराचे अवतार आहेत. संत म्हणजे सत्पुरुष, दोष नसलेले.  

“अहंकार नाहीं दुराशा अंतरीं । ममता हे दुरी मोकलीली ।।१।।

मोकलिली भ्रांती शरीरसंपत्ती ।  वैभव संतती लोलंगता ।।२।।

लोलंगता नसे ज्ञानें धालेपणें । ऐसीं हीं लक्षणें सज्जनाचीं ।।३।।”

जे संत सज्जन असतात ते अहंकार विरहित, आसक्ती विरहित, ममतेपासून दूर, वैभव, संपत्ती यापासून दूर, अनासक्त, अपेक्षा विरहित असतात. संत हे समाजाचे भूषण व वैभव आहे. ते भोगवादापासून समाजाला दूर ठेवून, ईश्वरनिष्ठ करून मोक्षाची सोपी वाट दाखविण्याचे महत् कार्य करतात. 

“संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।

नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ।।”

संतांचे जीवन आनंदमय असते. सुखच जणू त्यांच्या रूपाने आकाराला येते. त्रिविध ताप नष्ट करून सर्व प्रकारे संतुष्ट जीवन जगण्याची विद्या, कला संतांकडूनच शिकावी. संत श्रीमंत व उदार असतात म्हणून अतिशय दानशूर असतात. यांनी कितीही दिली तरी त्यांची ज्ञानरूप संपत्ती कधीच संपत नाही. सज्जन संगतीत सर्व गोष्टींचे मार्गदर्शन मिळण्याची व्यवस्था आहे.

संत सज्जनांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी वेद, उपनिषदे, गीता, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला. संस्कृत भाषेतील ज्ञान त्यांनी प्राकृत भाषेत सांगून ज्ञानाचे भांडारच सर्वांसाठी खुले केले. याशिवाय अभंग, ओव्या, भारुड, श्लोक, भजने, गवळणी, स्फुटकाव्ये, गोंधळ, जागर, पोवाडे, आरत्या, भूपाळ्या अशा विविध रचनांच्या माध्यमातून समाजावर उत्तम संस्कार व्हावेत या दृष्टीने ते अखंड कार्यरत राहिले. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा इत्यादी ग्रंथातून ज्ञानाची गंगा लोकांना उपलब्ध करून दिली.

आता खरा प्रश्न असा आहे की, या संत साहित्याची, सज्जन संगतीची समाजाला गरज आहे का ? तर याचे उत्तर नक्कीच होय असे आहे. कारण आम्ही फारच भोगसंस्कृतीकडे वळलेलो आहोत. प्रत्येक गोष्ट मला मिळायलाच हवी. मी, माझे, माझा प्रपंच, माझे घर, माझी मुले, माझा पैसा अशी लालसा वाढत चालली आहे. प्रसंगी गैरमार्ग जरी अवलंबावा लागला तरी चालेल, पण मला सर्व सोयी मिळायलाच हव्यात. हक्कासाठी माणूस जागृत असतो पण कर्तव्य मात्र विसरतो किंवा त्याला त्याचे महत्त्वही वाटत नाही. ही समाजाची बिघडत चाललेली घडी संत सज्जनांच्या मार्गदर्शनाशिवाय, त्यांच्या विचारांशिवाय बदलणे फार कठीण आहे. श्रीसमर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात सांगतात – 

“नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।

अतिस्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे ।”

अनैतिक मार्गाने मिळवलेले धन शेवटी पापास कारणीभूत होते. संत तुकाराम महाराजही म्हणतात, “जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ।।” संतांचे विचार फार मोलाचे असतात पण ज्ञानी जीवांना मात्र पटत नाहीत. त्याला काय होते ? असे सगळे वागतात, असे म्हणून ते आपलेच खरे करतात व आपलेच कसे बरोबर आहे, याचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतात.

वास्तविक नरदेह हा देहधारी जीवांपेक्षा श्रेष्ठ आहे कारण ईश्वराने मानवाला दोन अलौकिक शक्ती दिल्या आहेत. १) परमेश्वराने माणसाला विवेक करण्याची शक्ती दिली, २) त्याला वैखरी वाणीची देणगी प्राप्त आहे. भगवंताचे नाव घेण्याची व्यवस्था या देहातच आहे. नरदेह मोठे घबाड आहे. ही एक मनुष्यदेहातील महान देणगी आपल्याला लाभली आहे पण विषयात व वासनेत अडकलेल्या जीवाला नरदेहाचे महत्त्व कळत नाही, त्यामुळे चांगला देह (अव्यंग) मिळूनही तो सत्कारणी लागतोच असे नाही. जीवनातील अस्थिरता, चंचलता, भोगलालसा, आसक्ती, स्वार्थीपणा, अहंकार, हव्यास, द्वेष, मत्सर, हेवेदावे, गर्व, मीपणा इत्यादी अनेक दुर्गुण दूर करून आनंदी जीवन कसे जगावे ? प्रपंच करता करता परमार्थही कसा साध्य करावा ? देवाची भक्ती कशी करावी ? खरा देव कोठे आहे ? त्याला कसे ओळखावे ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे, मनातील शंका, संशय दूर करण्याचे सामर्थ्य फक्त आणि फक्त सज्जनसंगतीतच आहे.

“जगाच्या कल्याणा संताच्या विभूती । देह कष्टविती उपकारें ।” जीवाचे अज्ञान दूर करून त्याचा उद्धार करणे ही तळमळ त्यांना लागलेली असते, पण संतांची थोरवी, महती कळायला पुण्याई लागते हे मात्र खरे ! म्हणूनच मानवी जीवनात सज्जन संगतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

हा देह ईश्वर भक्तीसाठी, परमार्थ साधनेसाठी वापरायचा आहे. साधना नसेल तर या देहाला किंमत नाही. या नरदेहाला साधनधाम म्हटले आहे. या देहाच्या आधारानेच शुद्ध जाणीवरूप असणाऱ्या अंतरात्म्याचा शोध घेण्यात खरे समाधान आहे. सगुणाच्या आधाराने भक्ती करत करत निर्गुण तत्त्व जाणायचे आहे व यासाठी सज्जन संगतीची फार आवश्यकता आहे. 

संतांच्या, सद्गुरूंच्या सांगण्यानुसार वाटचाल केली, संतांच्या वचनावर पूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवून त्यांच्या बोधानुसार वागत राहिलो तर निश्चितच खऱ्या देवाचे दर्शन घडते. “भाग्य आले संतजन । तेही देवाचे दर्शन ।।” असे श्रीसमर्थांनी अभंगात सांगितले आहे.

“देहादी सृष्टी असू दे खुशाल । हाती असू दे विवेकी मशाल ।

पुढे वाकडे कोण करील कैसे । तनु रोमरोमी आनंद पैसे ।।”

प. पू. डॉक्टर देशमुख काका यांच्या या काव्यातून माणसाने आनंदी जीवन कसे जगावे याचे उत्तम मार्गदर्शन मिळते. या सौंदर्यशाली सृष्टीच्या झळकणाऱ्या पडद्यामागे दडलेला ईश्वरच आहे. ही सृष्टी त्याची वस्तूप्रभा आहे, म्हणून विवेकरूपी मशाल हाती घेऊन सृष्टीमध्ये वावरावे. सगळ्याचा आनंद घ्यावा पण मनाने मात्र कशातच गुंतू नये. ही भगवंताची लीला आनंदाने पहावी. आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेली नित्यकर्मे प्रामाणिकपणे, कौशल्यपूर्ण व आनंदाने करावी. प्रपंचही अगदी मनापासून करावा पण मनात मात्र भगवंताशी अनुसंधान असावे. ज्याने हे शरीर दिले, बुद्धी दिली, कार्य करण्यास लागणारी शक्ती दिली, उत्साह दिला, प्रेरणा दिली, त्याचे अनुसंधान अखंड असावे. भगवंतावर नितांत श्रद्धा ठेवून प्रेमाने, भावपूर्णतेने केलेली सेवा भगवंतापर्यंत पोहोचते. 

“शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ।।”

सर्वसामान्य जनांना संतांच्या संगतीतच खऱ्या देवाचे सामर्थ्य कळू शकते/लागते. संत या चराचरात व्यापून असलेल्या ईश्वराला पाहण्याची दृष्टी देतात. सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना त्रिवार वंदन करूया.

जय जय रघुवीर समर्थ

Language