होळीपंचक समर्थांचे उत्तरार्ध

होळीपंचकामध्ये  मागील ओवीचा संदर्भ घेऊन पुढे सुरवात करूया. एक उडी घालूं जाती | लंडी चुकोनी पडती ||७|| याचा अर्थ आपण पहिला होता आता ओवी आठचा अर्थ पाहू. 

एक देहाचें पांगलें | तेचिं आगीं हुर्पळले ||८||

एक देहाचें पांगले – देहबुद्धीचा अहंकारं ज्याच्या अंगातून पूर्णपणे बाहेर गेला नाही त्याला हे खोबरे कसे मिळणार? अहंकार हा परमार्थातील मोठा अडसर आहे. ज्ञानेश्वरमाऊली आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांना नमस्कार लिहावा का आशिर्वाद या संभ्रमात असणारे चांगदेव, त्यांनी कोरा कागद पाठवला. कथा परिचित आहे. निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून त्या कोऱ्या कागदावर ज्ञानदेवांनी ओव्या लिहून पाठविल्या ज्याला चांगदेव पासष्टी म्हणतात. यात पूर्ण तत्वज्ञान भरलेले आहे. त्यात ते असे म्हणतात,

 

चांगदेवा तुझेनी व्याजे | माऊलिया श्रीनिवृत्ती राजें |

स्वानुभव रसाळ खाजें | दिधले लोभे || चां.पा. ६१||

चांगदेवा तुला मोठ्या प्रेमाने मधुर रसयुक्त शब्दखाद्य पाठविले आहे. ते गोड खाजे खाऊन,  द्वैत अद्वैत हे परोक्ष संवादही आपल्या स्वानुभवी अपरोक्ष दृष्टीनी जिरवून पुष्ट हो. परोक्षज्ञान म्हणजे ग्रंथ वाचनातून, श्रवणातून मिळालेले ज्ञान (पर+इक्ष) दुसऱ्याने जे पाहिले, समजले, अनुभवले ते आपल्याला सांगितले ते परोक्ष ज्ञान असते. पण जेंव्हा स्वत:ला अनुभूती येते त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. पण हे ‘खाजे’ त्यांना अहंकार बुद्धीमुळे प्रथम जिरवता, पचवता आले नाही. व्याघ्रावर स्वार होऊन, सर्प हाती घेऊन ते ज्ञानदेवांच्या भेटीस गेले. सजीवांवरील आपली सत्ता दाखवण्याच्या मोह त्यांना टाळता आला नाही. पण ज्यावेळी निर्जीव भिंतीवर बसून ही चार छोटी भावंडे येतांना पाहिली तेंव्हा अचंबित होऊन माउलींना शरण आले. मुक्ताबाईनी गुरूउपदेश केल्यावर त्या रसाळ खोबऱ्याचा स्वाद चांगदेवांना समजला. गुरूउपदेशाने ह्या मायेच्या होळीतील खोबऱ्याची चव घेता येते.

 

उडी अवघ्यांचीच पडे | परि तें हातांस न चढे ||९||

एके थोर धीर केला | खाजें घेऊन पळाला ||१०||

अशा या मायारुपी होळीमध्ये उड्या घेण्याचा प्रयत्न करणारे अनेकजण असतात, पण खोबरे सगळयाच्याच हाती लागते असे नाही. कारण वैराग्यपूर्ण जीवन जगणे सहज साध्य नसते. हे ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी अहंकार, कामना, आसक्ती, संकल्प विकल्प या सर्व द्वैतांचा त्याग करावा लागतो. संगत्याग करून संगनि:संगातीत व्हावे लागते.  मन बुद्धीवर नियंत्रण असावे लागते. द्वंद्वातीत व्हावे लागते. तेव्हाच हे परब्रह्म रुपी खोबरे हातात येते.   

एखादा एकटाच ते खोबरे घेऊन पळून जातो. आणि एकटाच खातो. परब्रह्माचे ज्ञान झालेले काही योगी तपस्वी एकांतात राहून त्या परब्रह्मात आत्मसंतुष्ट होतात. हिमालयासारख्या ठिकाणी जाऊन एकांत सेवन करतात त्यामुळे दुसऱ्यांना ते ज्ञान सांगण्याचा प्रसंग येत नाही. आणि हे अनुभवामृत दुसऱ्याला मिळत नाही. पण सगळेच तसे नसतात समर्थांसारखे काही लोकांतात राहून एकांत सेवन करणारे असतात. 

 

एक आपणचि खाती | एक सकळांते वांटिती ||११||

एक घेउनि पळाले | तंव त्यावरि पडे जाळें ||१२||

रामीरामदास होळी | केली संसाराची धुळी ||१३||

काहीजण सर्वांना वाटून त्यातच आनंद मिळवतो. प्रपंच व परमार्थ साधणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतचित्ताने विवेक विचाराने होळीतील खाजे अलगद मिळवतात. तर संत तुकारामांसारखे प्रपंच्याच्या भडकलेल्या होळीतून खाजे बाहेर काढतात. तुकारामासारखे अतिशय सहनशील संत हा प्रसाद सर्वच बालगोपालांना (चौदा टाळकऱ्याना) आणि बहेणाबाई, निळोबा, कान्होबा रामेश्वरभट्ट अशा शिष्यांना वाटतात. पण ते खाजे खाण्यासाठी आलेल्या शिवाजीराजांना प्रेमाने, समर्थ रामदासांसारख्या राजकारण, देवकारण, धर्मकारण, करणाऱ्या थोर संतांकडे जाऊन त्या खोबऱ्याचा आस्वाद घे असे सांगतात. सद्गुरू निवृत्ती नाथांकडून ज्ञानदेवांनी हे खोबरे अगदी बालवयातच मिळवले आणि मिळालेले हे परब्रह्म रुपी खाजे, ज्ञानेश्वर माउलीनी आनंदानी नामदेव, मुक्ताबाई, सोपान सर्वांना प्रेमानी दिले. 

 

म्हणून समर्थ होलीपंचकात म्हणतात, एखादा एकटाच ते खोबरे घेऊन पळून जातो. त्यांच्या मागे सर्वजण लागतात. हिसकाहिसकी ओढाताण करून आपल्याला काही मिळवता येते का ते बघतात. अगदी कबीरासारखे !! रामानंद स्वामी अत्यंत कर्मठ होते. ते  कबिरांना हे परब्रह्मरुपी खाजे द्यायला तयार नव्हते. तरीही कबीराने ते हिसकून घेऊन पटकावलेच की !! रामानंद रोज सकाळी गंगास्नानाला जात. मुखाने श्रीराम श्रीराम म्हणत हे कबिरांना माहित होते गुरुमुखातून मंत्र मिळवण्यासाठी कबीर पहाटेच्या वेळी गंगेच्या पायऱ्यांवर आडवे झाले. रामानंदाचा चरणस्पर्श त्यांना झाला आणि त्यांच्या मुखातून ‘श्रीराम’ शब्द बाहेर पडले. तोच गुरुमंत्र मानून कबीर त्यांना गुरु म्हणू लागले. कबीर अत्यंत तर्कनिष्ठ होते. त्यांनी विचार केला गुरु करणे हे कर्मकांड असून त्यापेक्षा गुरु मानून गुरुमंत्र श्रवण करणे, तो आत्मसात करणे आणि गुरुआज्ञेनी वागणे, हे जास्त श्रेष्ठ आहे.  म्हणून समर्थ म्हणतात, ‘एक घेउनी पळाले |’  कबीराने हे खाजे रामानंदांकडून पळवूनच आणले. अर्थात ह्यात धारिष्ट नक्कीच आहे. शिवाय हे खाजे एकट्यानेच न खाता भगवानदास, कमाल, कमाली (शेखतुकींची मुलगी) जीवदास, रामकृपाल या शिष्यांनाही दिले.  

 

समर्थ रामदास स्वामीं मात्र या संसाराच्या होळीमध्ये पाऊल टाकताक्षणीच खोबरे घेऊन बाहेर आले. लग्नमंडपात सावधान म्हणताच सावध होणाऱ्या समर्थानी त्या होळीतले खोबरे सुद्धा सावधपणे आणि विवेकविचाराने सहज हस्तगत केले. विवेक आणि वैराग्य यांनी मिळवलेले खोबरे, अगदी आनंदानी सर्वांना वाटून तर दिलेच, पण ते खाजे म्हणजे ब्रह्मज्ञान कसे मिळवायचे ह्याचे उत्तम मार्गदर्शनही आत्माराम, दासबोध यातून केले. आपल्यासारखेच अनेक शिष्य व महंत तयार केले. कल्याणस्वामी, गिरीधरस्वामी, उद्धवस्वामी, आक्कास्वामी, वेण्णास्वामी किती नावे सांगावीत, ज्यांनी समर्थांनी दिलेल्या खोबऱ्याचा आनंद लुटला. श्रीरामाचा दास झाले, म्हणून समर्थ होऊन, जगाचे स्वामी बनलेले हे समर्थ रामदास स्वामी !! त्यांचे होळीपंचक या तापत्रयाच्या  आणि मायेच्या होळीतून बाहेर पडून, आपल्या सर्वाना परमार्थ मार्गाकडे वळवण्याची प्रेरणा नक्कीच देईल. 

||जय जय रघुवीर समर्थ||

होळीपंचक समर्थांचे पूर्वार्ध

फाल्गुन महिन्यात येणारी होळीपौर्णिमा हा उत्सव आपल्याकडे उत्साहात साजरा केला जातो. होळी रे होळी, पुरणाची पोळी असे म्हणत पुरणपोळीचा स्वाद घ्यायचा आणि होळीसमोर सर्वांच्या नावाने बोंबा मारायच्या !! कोणाला दुखावण्याचा हेतू नसतो. होळीच्या निमित्ताने आज आपण समर्थ रामदासांनी लिहिलेले होळीपंचक पाहणार आहोत. या पंचकातसुद्धा मायारूपी होळी भोवती सर्वजण कसे बोंबा मारतात त्याचे वर्णन आहे. 

समर्थांच्या होळीपंचकात आपल्याला प्रापंचिक माणसाची आणि साधुसंतांची होळी पहायला मिळते. मायेची बोंब मारली की ती भ्रमरूप मायासुद्धा निघून जाते. आणि आपल्याला परब्रह्मापर्यंत जाता येते, हेच समर्थांनी या होळीपंचकात सांगितले आहे. जरी पंचक म्हटले असले तरी यात १३ ओव्या आहेत    

अवघेंचि बोंबलती | होळीच्या भोंवती भोंवती ||१||

माया होळी प्रज्वळली | सृष्टी वेव्हारें लाविली ||२|| 

होळी छान पेटलेली आहे. ज्वाळा वरपर्यंत जात आहेत. सर्व लोक भोवती उभे राहून बोंब मारत आहेत. ही  मायेची होळी इथे जन्म घेणाऱ्या सर्वांनी पेटवलेली आहे. त्यात ममतेची, आसक्तीची, आशेची, अहंकाराची बोंबाबोंब चालू आहे. ज्या मायेबद्दल सर्वजण बोंब मारत आहेत ती माया खर तर नाहीच आहे !! ‘या नास्ति सा माया |’ भ्रमरूपाने भासते म्हणून माया !! जी नाहीच आहे तिच्याबद्दल बोंबाबोंब करण्याचे काहीच कारण नाही. पण भ्रमात गुंतलेले सर्व प्राणी ‘ती आहेच’ असे मानतात. जे बोंब मारत आहेत ते तरी शाश्वत आहेत का? तेही नश्वर आहेत. तरीही आपण चिरकाल राहणार आहोत असे वाटून ते धडपडत आहेत. त्यामुळे ही होळी लोकेषणा, वित्तेषणा, दारेषणा, पुत्रेषणा या सर्व ज्वाळांनी उग्र झाली आहे. प्रत्येकाला या व्यावहारिक जगामध्ये जगतांना प्रसिद्धीची हाव आहे. सर्वांनी आपल्याला मान द्यावा, मोठेपणा द्यावा म्हणून काय काय करामती करत असतात. वित्तेषणा याबद्दल तर काही बोलायलाच नको, इशावास्य उपनिषदात सांगितल्याप्रमाणे ‘तेन त्यक्तेन भून्जीथा’ हे फारच दूर राहिले. उलट आत्ता पुढच्या सात पिढ्यांची सोय करण्याची स्वार्थी वृत्ती वाढत आहे. दारेषणा, पुत्रेषणा संसारात आसक्तीने रमण्याचे, देहबुद्धीचे लक्षण आहे. सर्वजण मायेची ममतेची आसक्तीची बोंबाबोंब करत आहेत. असा हा सर्व सृष्टीचा व्यवहार आहे.

 

ज्या कारणें गुंडाळती | तेंचि वाचें उच्चारिती ||३||

होळीमध्यें खाजें आहें | तें तूं विचारूनि पाहे ||४||

सत्य तत्त्वाला सर्वसामान्यजनांनी मायेमध्ये गुंडाळून ठेवले आहे आणि ‘आम्हाला तो ईश्वर दिसत नाही. नक्की आहे का तो?’ म्हणून बोंबाबोंब करत आहेत. माया होळीच्या अज्ञानरूपी आवरणामुळे त्या होळीत असलेले खाजे म्हणजे खोबररुपी आत्मतत्व सापडत नाही याचा आरडओरडा करत आहेत. खर तर त्यांच्यावर असलेल्या पंचकोशाच्या आवरणामुळे ते सापडत नाही. ते सापडावे म्हणून सर्वजण प्रयत्न करत आहेत. होळीच्या आत जो नारळ टाकला जातो, ते खमंग खोबरे, खाण्यासाठी सर्व टपलेले आहेत. पण ते मिळणे इतके सहज सोपे नाही. ही तापत्रयाची होळी आहे. अध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक ताप आहेत. संसाराची आग भडकली की माणूस हाय हाय करतो. रडतो ओरडतो, तरीही त्याच संसाराभोवती फिरत राहतो. अगदी होळी भोवती प्रदक्षिणा घालतात तसा !! बायको मेली तरी पुन्हा पुन्हा लग्न करतो. मुलासाठी नवस सायास करतो. मुलं मोठी झाल्यावर विचारत नाहीत म्हणून एकटाच बोंब मारतो. अशी छोटी कौटुंबिक होळी प्रत्येकजण आपापल्या घरी पेटवत असतो.

काही सार्वजनिक होळ्या मोठ्या असतात. गावाची होळी चव्हाट्यावर किंवा गावाच्या वेशीवर पेटवतात. सर्वच गावकरी मिळून बोंब मारतात. घरातील होळीपेक्षा तिची आग मोठी असते. ती सर्वसंगपरित्यागाची होळी असते. ही होळी संसारावर, मुलाबाळावर कुठलीही आसक्ती न धरता पेटवलेली असल्यामुळे त्याची झळ जास्तच असते. ह्यातील परब्रह्मस्वरुप, अमृतमय ‘खाजे’ मिळवणे फार अवघड असते. 

 

खाजें खातां सुख होय | परि कठीण हातां नये ||५||

खोल दृष्टीनें पाहिलें | खाजें त्याच्या हातां आलें ||६||

आसक्ती, संसाराबद्दलचे ममत्व, उपभोगात्मक आकर्षण, ह्या सर्वांचा संगत्याग केल्यानंतर मिळणारे शुद्ध विमलब्रहम अतिशय आनंदरूप असते. पण ते सहजसोपे नाही. त्याकडे ज्ञानचक्षूंनी, दिव्यदृष्टीने पाहावे लागते. तेंव्हा ते दिसत आहे असे वाटते. पण प्रत्यक्षात मूळ माया आणि ब्रह्म यात शून्याचा पडदा आहे. ते शून्य म्हणजे ब्रह्म आहे असा भास होतो. परब्रह्म सूक्ष्मात सूक्ष्म आहे. जो तद्रूप होतो, त्याची त्रिपुटी नष्ट होते, श्रीसमर्थांच्या शब्दात सांगायचे तर जगीं पाहतां पाहणें जात आहे ||म.श्लो.१४९|| अशी ज्याची स्थिती असते त्यालाच हे परब्रह्मरुपी खोबरे मिळू शकते. 

 

एक उडी घालूं जाती | लंडी चुकोनी पडती ||७||

एक देहाचें पांगलें | तेचिं आगीं हुर्पळले ||८||

मायेच्या होळीत उपासना, नामस्मरण, श्रवण, मनन, यांनी हे खोबरे कुठे थोडेफार दृष्टीस पडते आहे असे वाटू लागते. छान खरपूस भाजलेले हे चविष्ट खोबरे सर्वांनाच खावेसे वाटते. पण आत हात घालून खावे म्हटले तर हात भाजतो. तसेच हे परब्रह्मरुपी खोबरे खाण्यासाठी काहीजण विचार विवेक न करता उडी मारतात. त्यावेळी मात्र ते तोंडघशी पडतात. विश्वामित्र ऋषींनी असेच हे खाजे खाण्यासाठी त्या होळीत जोराने उडी मारली होती. परंतु मेनेकेच्या पायात पाय अडकून तोंडघशी पडले होते. असे आदरणीय कृष्णाजी नारायण आठल्ये म्हणतात. वशिष्ठ ऋषींप्रमाणे आपल्याला ब्रह्मर्षी पद मिळावे हा हेतू होता. पण मनातील कामक्रोधादी विकार गेल्याशिवाय आणि मनाचे उन्मन झाल्याशिवाय ब्रम्हपद मिळणे अवघड असते. पंचवीस वर्षे तप करूनही मेनकेच्या सात्विक सौंदर्यामुळे, रंभेवरील क्रोधामुळे त्यांचा तपोभंग झाला. गायत्री मंत्राचे द्रष्टे असणाऱ्या विश्वामित्र ऋषींची जिद्द आणि चिकाटी वाखाणण्यासारखी आहे, विश्वामित्र म्हणजे मूर्तिमंत प्रयत्नवाद हे आपण लक्षात घ्यायला हवे. अनेक परिश्रमानंतर त्यांना ब्रह्मर्षी पदवी, परब्रह्मरुपी खाजे मिळाले. 

काहीजण त्या धगीला बघून मागे सरतात. त्यांना कशाचे खोबरे आणि काय !! ते नुसतेच हात चोळत बसतात. अर्थात असे प्रापंचिकांच्या बाबतीतही घडते. ते लांबूनच होळी बघतात. त्यांना परब्रह्मस्वरुप खोबरे खाता येणार नाही याची कल्पना असते. साधकाच्या बाबतीत साधना अपुरी असते म्हणून तर काही साधक अष्टसिद्धी मिळवतात आणि त्यातच रममाण होतात त्यामुळे त्यांना परब्रह्मापर्यंत पोहोचता येत नाही. याच ओवीचा संदर्भ घेऊन नंतर उत्तरार्धाची सुरवात करूया. 

||जय जय रघुवीर समर्थ||

समर्थ भक्तांची चार तीर्थक्षेत्रे

श्रीसमर्थ भक्तांची चार तीर्थक्षेत्रे, पहिले ‘जांब’ ही श्रीसमर्थांची जन्मभूमी, दुसरी ‘टाकळी’ ही तपोभूमी, तिसरी ‘चाफळ’ ही कर्मभूमी, आणि चौथी ‘सज्जनगड’ हे विश्रांती स्थान !! आज आपण त्या स्थानांची विशेषता बघणार आहोत. 

सूर्याजीपंत व राणूबाई यांना, त्यांची निस्सीम भक्ती आणि तपश्चर्या पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवांनी ब्राह्मणाच्या वेषात दर्शन दिले. सूर्याच्या अंशाने एक आणि मारुतीच्या अंशाने एक असे दोन पुत्र होतील असे आशीर्वाद सूर्यदेवांनी दिले. त्यापैकी सूर्यदेवांच्या अंशाने गंगाधरपंत यांचा जन्म इ.स.१६०५ साली मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला सूर्योदयाच्या वेळेस झाला आणि मारुतीच्या अंशाने इ.स.१६०८ साली रामनवमीच्याच दिवशी दुपारी रामजन्माच्यावेळी नारायणाचा जन्म झाला.

क्षेत्र जांब – ही श्रीसमर्थ रामदासांची जन्मभूमी आहे. अर्थात संतांचा जन्म कुठे झाला याला महत्व नसते. त्याचे कार्य सिद्ध झाल्यावर ते जिथे देह ठेवतात ते तीर्थक्षेत्र बनते. पण जांब या समर्थ जन्मस्थानाला महत्व आले ते समर्थांना तिथे  मिळालेल्या अनुग्रहामुळे! श्रीसमर्थांना वयाच्या अकराव्या वर्षी प्रत्यक्ष श्रीरामरायाने अनुग्रह देऊन त्रयोदशाक्षरी मंत्र दिला आणि त्याचबरोबर, पृथ्वी म्लेच्छमय झाली असून धर्माचा उच्छेद झाला आहे. ह्यासाठी शिशोदे वंशामध्ये शिव नामे करून राजा होईल त्याला अनुग्रह देऊन, कृष्णातीरी राहून धर्मसंस्थापना करावी असा आदेश ही दिला. म्हणून हे क्षेत्र झाले. या अनुग्रहाला विशेष महत्व आहे. श्रीरामाने अनुग्रहाच्यावेळी नारायणाला रामदास हे नाव दिले. नारायणाच्या बाललीला शिक्षण जांब येथे चालू होते. त्यांच्या बाललीलांमधून ते हनुमंताचे अवतार अकरावा रुद्र आहेत हे वारंवार जाणवत असे. नारायणाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, हळूहळू घरात नारायणाच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. लग्नाचा मुहूर्त ठरला. परंतु मुहूर्त वेळी सावधान म्हणताच ‘सावध’ झालेल्या नारायणांनी जांब सोडून टाकळीला प्रयाण केले. 

टाकळी – ‘देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी’ हे लक्षात घेऊन नारायणानी टाकळीला बारा वर्ष तपश्चर्या केली. म्हणूनच तपोभूमी ‘टाकळी’ हे तीर्थक्षेत्र मानले जाते. चिंता करितो विश्वाची असे उत्तर आईला देणाऱ्या नारायणांनी स्वत:चा लौकिक प्रपंच दूर सारून विश्वाचा प्रपंच करायचे ठरविले. गोदावरीच्या पाण्यात लग्नाच्या वेळेला लावलेली हळद धुवून टाकली. ईश्वरप्राप्ती, स्वराज्यसंस्थापना आणि लोकोद्धार या उद्देशासाठी त्यांनी नारायण हे नाव बदलून श्रीरामाने दिलेले रामदास हे नाव धारण केले. श्रीरामाचे दर्शन घेण्याची तीव्र ओढ त्यांच्या मनात होती. रात्री देवळात माणसांची वर्दळ कमी होते हे लक्षात घेऊन ते रात्री काळाराम मंदिरात गेले. सर्व सभामंडप तेजानी भरून गेला. श्रीरामाने त्यांना दर्शन दिले. 

रामदासांनी टाकळी हे गोदावरी व नंदिनीच्या संगमावरील ठिकाण आपल्या तपश्चर्येसाठी निवडले. जवळच एक गुहा होती. तिथे ते रहात होते. सकाळी उठून नंदिनी नदीवर स्नान करून, संध्या आटोपून ते बाराशे सूर्य नमस्कार घालत. काळाराम मंदिरात प्रवचन कीर्तनाला जात. त्यावेळी त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्याचा उल्लेख दासबोध ग्रंथात आहे. त्यांनी रामायणासह अनेक ग्रंथ लिहून काढले. व्यायाम जपध्यान, ग्रंथांचा अभ्यास असा त्यांचा दिनक्रम चालू होता. कारण श्रीसमर्थ रामदास हनुमंता प्रमाणेच शक्तीबुद्धीचा निश्चयो होते. हळू हळू त्यांच्या अन्नवस्त्राची आबाळ होऊ लागली. घराची आठवण त्रास देऊ लागली. त्यावेळचे त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या करुणाष्टकामधून पहायला मिळते. पण त्याचवेळी श्रीरामाशिवाय आपल्याला दुसरे कोणी नाही ही भावना दृढ होत होती. त्यांचा हा बद्ध, मुमुक्षू साधक आणि सिद्ध हा प्रवास आपल्याला त्यांच्या करुणाष्टकातून उलगडतो. त्यांनी गायत्रीचे पुरश्चरण केले. श्रीसमर्थांना त्यांचा पहिला शिष्य उद्धव हा टाकळीला लाभला. पुढे तीर्थाटनाला बाहेर पडतांना उद्धव त्यांच्याबरोबर येण्याचा आग्रह करू लागला. त्यावेळी उद्धवाला गोमयाचा मारुती स्थापन करून देऊन तिथेच राहण्याची आज्ञा दिली. हा श्रीसमर्थांचा पहिला शिष्य व पहिला मठ होय. उद्धवाची मुंज श्रीसमर्थांच्या मांडीवर लागली. 

बारा वर्ष श्रीसमर्थांनी आसेतु हिमाचल पदभ्रमण केले. पदभ्रमणामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण केले. अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली. यवन राजकर्त्यांचे असभ्य, असंस्कृत वागणे, लोकांवर केलेले अत्याचार पाहिले. पराक्रमी राजपूत तसेच मुगल सुलतानाला स्त्रिया देणारे राजपूत पाहिले. जवळ दोन तलवारी बाळगणारे शिखांचे सहावे गुरु हरगोविन्द्सिंह यांची भेट झाली. त्यांच्याकडून जेंव्हा एक तलवार धर्मासाठी आणि दुसरी तलवार स्त्रियांच्या रक्षणासाठी हे समजल्यावर धर्म रक्षणासाठी आपणही शस्त्र वापरले पाहिजे हे लक्षात घेऊन त्यांनी गुप्तीचा वापर सुरु केला. स्वधर्माविषयी अभिमान जरूर असावा. तसेच परधर्माचा आदर करावा.  दुसऱ्याच्या धर्मातील चांगल्या गोष्टी घेण्यास काहीच हरकत नसते. याच काळात त्यांनी आपला संप्रदाय वाढवला. अकाराशे मठांची स्थापना काश्मीर (पहेलगाम) ते कन्याकुमारीपर्यंत केली. अनेक मठ व महंत तयार केले. तसेच शिष्य करताना वयाने लहान पण लिहिता वाचता येणारे अशांना प्राधान्य दिले. त्यांचे अनेक शिष्य होते. स्त्रीशिष्यांना मठाधिपती करून स्त्रीपुरुष समानहक्क ही खरी पात्रता गुणांवर अवलंबून असते. हे दाखवून दिले. 

तिसरे स्थान चाफळ ही कर्मभूमी आहे. स्वराज्य संस्थापनेचा श्रीरामाने दिलेला आदेश सार्थ करण्यासाठी कृष्णेच्या तीरावर श्रीसमर्थांनी वस्ती केली. पहिल्याच भेटीत महाराजांनी श्रीसमर्थांचा अनुग्रह घेतला. श्रीसमर्थांनी शिवाजीराजांना लघुबोध, क्षात्रधर्म सांगितला. सेवकांना सेवकधर्म सांगितला. क्षात्रतेज व ब्राह्मतेज एकत्र आले. शिवरायाची राजवट होती म्हणून श्रीसमर्थ सुखरूप होते. तसेच श्रीसमर्थांचे मजबूत संघटन कौशल्य, गुप्त सल्लामसलती, मार्गदर्शन, मठाचे जाळे, महंतांची नि:स्वार्थी व गुप्तता बाळगून सावधपणे केलेली मदत, या सर्वांचा फायदा शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्य संस्थापनेसाठी झाला. चाफळ येथे अंगापूरच्या डोहात सापडलेल्या श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. श्रीसमर्थ रामदासांनी इ.स.१६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. श्रीसमर्थांच्या मठाचा उपयोग जसा शिवाजी महाराजांना झाला तसेच शिवाजी राजांच्या आश्रयामुळे मठांना स्थैर्य आले. 

चौथे सज्जनगड श्रीसमर्थांचे विश्रांती स्थान. इ.स.१६५० साली श्रीसमर्थ सज्जनगडावर आले होते. पूर्वीचे त्याचे नाव परळीचा किल्ला असे होते. श्रीसमर्थांनी तेथे अंग्लाई देवीचे मंदिर बांधले. श्रीसमर्थ इ.स. १६७६ साली सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले. त्यानंतर गंगाधर स्वामीं, शिष्या वेणाबाई आणि नंतर शिवाजी महाराजांचे निर्वाण अशा दु:खद घटना घडल्या. शेवटी श्रीसमर्थांनी संभाजीराजांना पत्र पाठवून उपदेश केला आणि नंतर समर्थ रामरायाच्या दर्शनाला चाफळ येथे आले. श्रीरामाचा निरोप घेऊन परत सज्जनगडावर आले. निर्वाणाच्या आधी पंधरा दिवस सर्व शिष्यांना बोलावून घेतले. श्लोकाचे दोन चरण म्हटले. रघुकुलटिळकाचा वेध सन्निध आला | तदुपरी भजनाचा पाहिजे चांग केला | उद्धवाने हा श्लोक पूर्ण केला, अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी | बहुत लगबगीने कार्य सिद्धी करावी || इ.स.१६८२ साली माघ वद्य नवमीला श्रीसमर्थांचे निर्वाण झाले. श्रीसमर्थ रामदासस्वामींचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याजागी समाधी बांधण्यात आली. या चार स्थानांना अवश्य भेट द्यावी. ज्यामुळे आपल्याच इतिहासाची, शिवाजी महाराज व समर्थ यांच्या कर्तृत्वाची आणि वैभवशाली परंपरेची ओळख होईल.

||जय जय रघुवीर समर्थ||

 

समर्थांच्या जीवनातील अकरा-अकरा

आपल्या सद्गुरूंना म्हणजे श्रीरामाला ‘समर्थ’ म्हणणारे, रामदास आपल्या कर्तृत्वाने व ज्ञानाने ‘समर्थ’ झाले. श्रीरामांच्या आदेशावरून कार्य करणारे समर्थ, श्रीरामाचे दास्यत्व पत्करून त्याचे ‘दास’ झाले/रामदास झाले. “मुख्य हरिकथा निरुपण” हे लक्षात घेऊन निद्रिस्त समाजाला, आध्यात्मिक अधिष्ठान ठेऊन जागृत करण्यासाठी त्यांनी बोध केला; तो ‘दासबोध’ लिहून ! अशा समर्थ व्यक्तिमत्वाला लोक आपणहून ‘समर्थ रामदास’ म्हणू लागले. त्यांच्या जीवनातील ‘अकरा’ चे महत्व असे आहे.

“आक्रा आक्रा बहु आक्रा | काये आक्रा कळेचि ना |

गुप्त ते गुप्त जाणावे | आनंदवन भूवनी ||१७||”

समर्थ रामदासस्वामींनी  लिहिलेल्या आनंदवनभुवनी ह्या काव्यातील या ओळी आहेत.‘वनभुवन’ हे काशीचे पूर्वीचे नाव होते. समर्थांनी शिव राज्याभिषेकाचे स्वप्न तिथे पाहिले होते. काशीला पडलेल्या स्वप्नाचा आनंद त्यांनी या काव्यातून व्यक्त केला आहे. समर्थांच्या जीवनात या ११/११ चे महत्व आपल्याला खूप वेळा पहायला मिळते. श्रीसूर्यनारायण व श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने सूर्याजीपंत व राणूबाई यांना दोन पुत्र झाले. जेष्ठ पुत्र गंगाधर व लहान नारायण ! नारायण म्हणजे रामदासस्वामी हे हनुमंताचे अवतार होते. त्यांना अकरावा रुद्र म्हणतात.

“कृतेतू मरुताख्यश्च्य | त्रेतायांपवनात्मज |

द्वापरे भीम संज्ञश्च | रामदास कलौयुगे ||”

असे पुराणातील भविष्य परंपरा सांगताना बखरकारांनी म्हटले आहे. 

फाल्गुन वद्य षष्टी या दिवशी एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दनस्वामी यांची पुण्यतिथी असते. या दिवशी सूर्याजीपंत व राणूबाई दोघंही पैठणला जात. राणूबाई व एकनाथ महाराजांच्या पत्नी गिरीजाबाई या बहिणी–बहिणी होत्या. अकरा महिन्याच्या नारायणाला त्यांनी नाथांच्या मांडीवर दिले, तेव्हा ते गहिवरले. एकनाथमहाराज प्रेमाने राणूबाईना म्हणाले, “हा मुलगा प्रत्यक्ष ईश्वरी अवतार आहे. अवघ्या महाराष्ट्रात याची कीर्ती पताका फडकत राहील.” अकराव्या महिन्यात नाथांचे आशीर्वाद मिळालेला असा हा अकरावा रुद्र !

बाल नारायण ‘श्रीराम जोशी’  यांचेकडे शिक्षणासाठी जात असे. नारायणाचे शिक्षण म्हणजे बाळबोधवाचन, लेखन, संध्या, गायत्री, पुरुषसूक्त, पवमान, ग्रंथसंहिता वगैरे. त्यांच्या शिक्षणाबद्दल गिरीधर स्वामी ‘समर्थप्रताप’ ग्रंथामध्ये सांगतात,

“समर्थे अकरा धड्यात केले धुळाक्षर |

अकरा प्रहरात वळिले अक्षर |

अकरा दिवसात केला जमाखर्च |

ब्रह्मांडकुळकर्ण चालवाया ||”

इथेही ‘अकाराचा’ उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. समर्थांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करताना, तसेच समर्थांनी लवकर शिक्षण पूर्ण केले याचे वर्णन करताना, समर्थांच्या जीवनातील अकराचे महत्व सांगायला गिरीधरस्वामी विसरत नाहीत. समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर हे ‘कुलकर्णी’ हे पद भूषवित होते. म्हणून गिरीधर स्वामींनी समर्थांच्या बाबतीत ‘ब्रह्मांड कुळकर्ण’ असे सांगून त्यांच्या अफाट अध्यात्मिक शक्तीचे वर्णन केले आहे. “अकरा प्रहरात वळिले अक्षर” सांगतांना  अक्षर गिरवणे या साक्षरतेबरोबरच आत्ताचा नारायण म्हणजे अ-क्षराची ओळख करून घेणारा महायोगी होणार आहे, असेही त्यांना सुचवायचे असावे. समर्थ चरित्रात त्यांच्या लहानपणाच्या गोष्टी वाचतानासुद्धा अकराचा उल्लेख आढळतो. ‘अकरा ताकाची मडकी’, ‘अकरा धान्याची पोती’ असा कथाभाग आढळतो.

अकरा वर्षाचा नारायण घराच्या अंगणात खेळत होता. तिथे एक मोठे वानर आले. त्याने सक्तीने ओढत ओढत नारायणाला मंदिरात नेले. तिथे पालखीत प्रभू रामचंद्र व सीतामाई बसले होते. ते वानर म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत होते. प्रभू रामचंद्रांनी नारायणाला “अहं ब्रह्मास्मि” चा उपदेश केला तोही अकराव्या वर्षीच ! असे दिनकर स्वामींनी आपल्या ‘स्वानुभव दिनकर’ या ग्रंथात म्हटले आहे. तर प्रत्यक्ष अकरावा रुद्र असलेल्या हनुमंतांनी, समर्थांना श्रीराम प्रभू यांच्यापर्यंत नेले.

“मुख्य हरिकथा निरुपण | दुसरे ते राजकारण” असे म्हणणाऱ्या समर्थांनी दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी आसेतु हिमाचल मठांची स्थापना केली, त्याची संख्या सुद्धा अकराशेच होती. मठातून बुद्धिमान, विवेकी, शिस्तप्रिय मठाधिपतींची नेमणूक करून, त्यांनी परमार्थ व राजकारण यांचा समन्वय साधला. ते मठाधिपती महंत होते. आणि या सर्वांनी धर्माधिष्ठित निरपेक्ष राजकारण करताना शिवबांच्या स्वराज्य संस्थापनेला मदत केली.

प्रत्येक बुद्धिमान माणूस हा बलवान सुद्धा असला पाहिजे, असा समर्थांचा आग्रह होता. समर्थांनी ‘गाव तिथे मारुती’ ही संकल्पना राबवली. त्यांनी अनेक मंदिरे उभारून त्यात व्यायामशाळा सुरु केल्या. परंतु समर्थ स्थापित अकरा मारुतींचे महत्त्व काही वेगळेच आहे. ‘आनंद वनभुवनी’ मधील वर उल्लेखलेली ओवी या मारुतींनाही लागू पडते. समर्थांनी या अकरा मारुतींची अकरा स्तोत्रे लिहिली आहेत. त्यातील ‘भीमरुपीमहारुद्रा’ हे स्तोस्त्र प्रसिद्ध आहे. ही सर्व मंदिरे बलोपासना व राष्ट्राचे सामर्थ्य वर्धिष्णू होण्याच्या दृष्टीकोनातून निर्माण करण्यात आली. ही सर्व मारुती मंदिरे शिवसमर्थ भेटीची तसेच समर्थांच्या गुप्त राजकारणाची आठवण देतात. चाफळच्या मंदिरात आजही शिवाजीराजे व समर्थ यांच्या गुप्त चर्चेची जागा पहायला मिळते. इथे वीर मारुती व दास मारुती असे दोन मारुती आहेत. शिंगणवाडीच्या मारुतीच्या इथे समर्थांनी शिवबाला अनुग्रह दिला होता. बाहेगावच्या मारुतीच्या इथे समर्थांनी भिमाकुंडात जलस्तंभिनी विद्येचे प्रदर्शन केले होते व अकरा प्रहर डोहाच्या  तळाशी बसून होते. बाहेबोरगाव येथे समर्थांनी ‘अद्वैत तत्वज्ञान’ वेणास्वामींना  संक्रमित केले होते. त्याचे वर्णन करताना गिरीधरस्वामी म्हणतात,

“अकरा दिवस एक अंगी मेखला राहे |

उद्धव महंत अकरा दिवस वाट पाहे ||”

अकरा हा आकडा विशेष आहे. एक सद्गुरू आणि एक शिष्य यांचे एकरूप होणे आहे. अनंतदास रामदासी म्हणतात,

“येकी येक ऐक्य ब्रह्म | गुरुशिष्य दोनी परब्रह्म |

येकादेश हे अंकवर्ण | सहजसमाधी सांगितले ||”

एकावर एक अशा दोन आकड्यांचे जसे ऐक्य झाले तसे गुरुशिष्य मिळून एक परब्रह्मच आहे. स्वामी-सेवक, देव-भक्त, पुरुष-प्रकृती अशा जोड्या एकावर एक अकरा प्रमाणे एकरूप आहेत. समर्थांना प्रिय असणारे मारुतीराय हे अकरावे महारुद्र आहेत म्हणून समर्थांना अकरा हा आकडा प्रिय आहे. हे सर्व पाहता त्यांच्याच काव्यातील, 

“आक्राआक्रा बहु आक्रा | कायेआक्रा कळेचि ना |

गुप्त ते गुप्त जाणावे | आनंदवन भूवनी ||१७||”

ही ओवी किती सार्थ आहे हे लक्षात येते.

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Language