हनुमंता रामदूता – भाग १

श्री समर्थांच्या कार्यातील केंद्रबिंदू म्हणजे चाफळ. महाराष्ट्राची अयोध्या म्हटले जाते ते चाफळ. इथे वीर मारुती आणि दास मारुती दोन्ही आहेत. श्री समर्थांनी दास मारुतीचे वर्णन प्रस्तुत स्तोत्रात केले आहे 

हनुमंता रामदूता। वायुपुत्रा महाबला।

ब्रह्मचारी कपीनाथा। विश्वंभरा जगत्पते ॥ १ ॥

इंद्राच्या वज्राने हनुवटी भंगली व त्यानंतर त्याच्याच वराने वज्रदेही झालेले मारुतीराय हे राम रायाचे परम भक्त होते, जन्मत: कटीला सुवर्ण कासोटी लेउन जन्मलेले प्रखर ब्रह्मचारी वानरकुलाला ललामभूत होते जगाचे नियामक, संरक्षक होते असा गौरव समर्थांनी केला आहे  

कामांतका दानवारी। शोकहारी दयानिधे ।

महारुद्रा मुख्यप्राणा। मूळमूर्ति पुरातना ॥ २ ॥

वज्रदेही सौख्यकारी। भीमरूपा प्रभंजना।

पंचभूतां मूळमाया। तूंचि कर्ता सकळही ॥ ३॥

मारुती रायांची उपासना ही, निरास करायला कठीण अशा वासनांचा निरास करायला, सद्भक्तांना मदत करते. सर्व प्रकारचे दु:ख व वियोगाच्या सुद्धा दु:खातून बाहेर पडायला हनुमंत उपासना मदत करते. ते अशी कृपा भक्तांवर करतात.वासना निर्मूळ करून ते हे साध्य करतात. शंकराचा रुद्रावतार आहे त्यातील अकराव्या रुद्राचा अंश म्हणून मारुती रायांचा अवतार झाला असून ते श्री रामांचा बहिस्थ प्राण आहेत. मारुतीराय चिरंजीव आहेत आदिपुरुष स्वरूपच आहेत.भक्ती कशी करावी याचे मूर्तीमंत उदाहरण त्यांनी घालून दिले असून उपासकांना सर्वतोपरी सहाय्य करून उपासना फलद्रूप होण्यासाठी मारुतीरायांची मोठी मदत होत असते. वायुरूप असून मनाच्या गती पेक्षाही वेगात कार्य करतात.मारुती राय हे अंतरात्म्याचे स्वरूप असल्याने समर्थ त्याना मूळ पुरुष, आदिमाया असेही संबोधतात.

स्थितिरूपें तूंचि विष्णु। संहारक पशुपती।

परात्पर स्वयंज्योती। नामरूपा गुणातिता ॥ ४॥

सांगता वर्णितां ये ना। वेदशास्त्रां पडे ठका।

शेष तो सीणला भारी। नेति नेति पराश्रुती ॥ ५ ॥

उत्पत्ती स्थिती  व लय म्हणजे सृष्टी उभारणी व संहारिणी या दोन्ही मारुतीरायांच्या लीला आहेत. परावाणी स्फुरण रूप असते. तिच्याही पलीकडे असलेले स्वयंप्रकाशित असे जे परमात्म तत्व आहे ते गुण व नामाच्या अतीत आहे म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूपच आहे. त्याचे वर्णन करता येत नाही, ते अनुर्वाच्य आहे.हजार फणी असलेला शेष पण तोही वर्णन करताना थकतो व मौन होतो व वेद इथे पांगुळे होतात असे हे वर्णनातीत  आनंद स्वरूप आहे.  

धन्य अवतार कैसा हा। भक्तालागिं परोपरी।

रामकार्य उतावेळा । भक्तरक्षक सारथी ॥ ६ ॥

वारितो दुर्घटं मोठीं। संकटीं धांवतो त्वरें।

दयाळा हा पूर्णदाता। नाम घेतांचि पावतो ॥ ७॥

भक्तांवर उपकार करणे म्हणजे त्याना भक्ती प्रवण करणे व त्यांचा निश्चय दृढ व्हावा म्हणून सर्वतोपरी सहाय्य करणे हा मारुती रायांच्या अवताराचा हेतू आहे आणि त्या कार्यासाठी राम रायांनी निजधामास जाताना मारुती रायांना चिरंजीव केले. मारुती राय संकट मोचक आहेत. मोठ मोठी संकटे ते लीलया दूर करतात. रावणाच्या बरोबर संघर्ष झाला त्यात कितीतरी अवघड प्रसंग आले पण ते निवारण्यात मारुती रायांचे योगदान मोठे आहे. तसेच जो कोणी पवित्र अंत:करणाने भक्ती करतो त्याच्याही सहाय्या साठी तत्पर असतात. नामसाधनेने मनोरथे पूर्ण करतो. पूर्ण दाता म्हणजे त्यांची कृपा झाली की काहीही मागायची इच्छा उरत नाही. वासनेचे मूळ किंवा बीज जाळून जाते मग त्यातून पुढे काहीही उगवून येत नाही.  

धीर वीर कपि मोठा। मागें न होय सर्वथा।

उड्डाण अद्भूत ज्याचें। लंघिलें समुद्राजळें ॥ ८॥

देउनी लिखिता हातीं। नमस्कारी सीतावरा।

वाचितो सौमित्र अंगें। रामसुखें सुखावला ॥ ९॥

गर्जतो स्वानंदमेळीं। ब्रह्मानंदे  सकळही।

अपार महिमा मोठा। ब्रह्मादिकांसी ना कळे ॥ १०॥

कोणतेही आव्हान असो-सीतामाईचा शोध असो की पाच जलधी ओलांडून औषधी संजीवनी असो, मारुतीराय कधीही मागे हटले नाहीत. आवेशे लोटून त्यांनी ते कार्य सिद्ध केले. कार्य स्वीकारले आणि त्यात झोकून दिले की अंतरीची शक्ती कशी सहाय्यक होते याचे हनुमंत उत्तम उदाहरण होते.स्वयं प्रकाशी म्हणजे स्व-प्रज्ञेने मार्ग शोधणारे होते. समुद्र ओलांडून जाण्यासाठी उड्डाण हे विलक्षण होते. सीता माईचा शोध घेउन लंका दहन केल्यावर मारुती रायांनी रामराया कडे यायला प्रस्थान केले तेव्हा त्यांच्या हाती ब्रह्माने एक पत्र दिले. त्यात मारुती रायांच्या कार्याचे वर्णन गौरव होता. स्वत: हनुमान ते सांगणार नाहीत म्हणून ब्रह्मदेवाने हे दिलेले पत्र रामारायांना दिले व नमस्कार करून मारुतीराय हात जोडून पुढील आज्ञा घेण्यासाठी उभे राहिले. ते पत्र वाचून राम राया व लक्ष्मण दोघाना आनंद झाला. आधीचा मोठा काळ राम राय मोठ्या  चिंतेत होते. पण त्यांची मुद्रा ते पत्र पाहून सुखावली हे पाहून त्यांचा भाउ सुखावला. मारुती राय आणि लक्ष्मण दोघेही रामाशी अतिशय एकरूप झाले होते. 

मारुती रायांनी सीतामाईचे स्थान शोधून काढले आणि रावणाला धडा शिकवून मारुती राय परतले, देवाना आणि सीतेला दिलासा देउन ते आले ह्या बातमीने सारे वानरकूळ किती आनंदले असेल व त्यांनी केवढा जल्लोष केला त्याचे वर्णन समर्थ करीत आहेत.मारुती अवताराचा हा महिमा ब्रह्मादिकांना देखील अनाकलनीय असा आहे असे समर्थ म्हणतात. ज्या शत्रू विरुद्ध दंड मारुती रायांनी थोपटले तो सामान्य नव्हता. देवाना आपल्या इशा-यावर फिरवणारा, बंदी बनवणारा होता. त्याला असा धडा कोणी शिकवू शकेल,असे काही घडू शकते हेच मुळी देवांनाही अनपेक्षित व अतर्क्य होते. 

याच पार्श्व भूमीवर आपण समर्थ काल बघितला तर तीनशे वर्षांच्या अंधारात शिव समर्थ असा तेजाचा किरण दिसू शकेल असे कोणाला स्वप्नात तरी वाटले असेल का? पण असा सूर्य उगवला आणि श्री समर्थ आणि शिवाजी राजे दोघेही शिवांश होते व राम रायांसारखे योजना करून कार्य सिद्ध करणारे होते हा निव्वळ योगायोग नक्कीच नव्हता. जे काही अद्भुत अतर्क्य असे काम मारुतीराय करून आले होते त्यामागे त्यांच्या अद्भुत शेपटी चे योगदान खूप मोठे होते. ते मंडलाकार फिरवले की नभात पोकळी उत्पन्न होते. दास मारुतीचे वर्णन करून झाल्यावर समर्थ आता ‘समर्थ मारुतीचे ‘ वर्णन करीत आहेत…

अद्भुत पुच्छ तें कैसें। भोवंडी नभपोकळी।

फांकडें तेज तें भारी। झांकिलें सूर्यमंडळ ॥ ११ ॥

हनुमानाचे दर्शन हे तेजाचे प्रगटन आहे. सूर्य मंडल झाकून टाकण्या इतके म्हणजे ते फिके वाटावे असे अति विशाल व महातेजस्वी आहे. 

देखतां रूप पैं ज्याचें। उड्डाण अद्भूत शोभलें।

ध्वजांग ऊर्ध्व तो बाहो। वाम हस्त कटावरी ॥ १२ ॥

कसिली हेमकासोटी। घंटा किंकिणि भोंवत्या।

मेखळे जडिलीं मुक्ते। दिव्य रत्नें परोपरी ॥ १३॥

मारुतीचे रूप त्याचे उड्डाण विलक्षण असे आहे. उजव्या हातात श्री रामांची ध्वजा असून डावा हात कटी वर म्हणजे कमरेवर आहे. सुवर्णाची कासोटी, किणकिण करणा-या घंटा मंजुळ नाद करीत आहेत. नाना रत्ने मोती जडवले आहेत. 

(क्रमश: भाग दुसरा….) 

संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)    

भीमरूपी स्तोत्र क्र. ४ – त्रिकूट जिंकिला भला

“अंजनी सुत प्रचंड । वज्रपुच्छ काळदंड ।
शक्ति पाहतां वितंड । दैत्य मारिले उदंड ।। १ ।।”

या स्तोत्रात अंजनी मातेच्या सुताचे/पुत्राचे, त्याच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याचे रूप भव्य आहे आणि
पुच्छ हे वज्रासमान आहे. त्याची प्रहार करण्याची क्षमता मोठी आहे. रावणाने मारुतीच्या शेपटीला कापड
बांधून त्यावर तेल लावून पेटविले तरी त्याला अग्नीने काही इजा झाली नाही. त्या अग्नीचा प्रयोग रावणाच्या
लंकेवर झाला आणि एक तृतीयांश लंका मारुतीने आपल्या प्रज्वलित पुच्छाने जाळून टाकली. अनेक राक्षस तर
या वज्र दंडाच्या तडाख्याने गारद झाले. यावरून त्याच्या अतिप्रचंड शक्तीचा अंदाज येतो. काळ दंड म्हणजे
यमाने दिलेला दंड, म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच. मारुतीचे महाशक्तीशाली पुच्छ, ताडणे; चिरडणे; उचलून फेकून देणे;
अशा अनेक मार्गांनी असुरांना मारत राहिले.

“धगधगीतसी कळा । वितंड शक्ति चंचळा ।
चळचळीतसी लिळा । प्रचंड भीम आगळा ।। २ ।।”

मारुतीने केलेल्या लीलांचे वर्णन यापूर्वीच्या भीमरूपी स्तोत्रात आले आहे. त्याचे पर्वत शिखरांवरून
उड्या  मारणे, वृक्षाच्या फांद्यांवरून उड्या मारताना वृक्ष कोसळणे आणि सर्वात विशेष म्हणजे सूर्य बिंब धरायला झेपावणे इ. हे त्याचे इतर वानरात आगळे-वेगळेपण; त्याच्या साहसात आणि धैर्यात दिसतेच. अति शक्तीशाली पुच्छ हे सुद्धा त्याचे वेगळेपण आहे. मारुती तेजस्वी आहे. हे तेज वैराग्याचे आहे व तेही कडकडीत असे आहे. त्याची धावण्याची गती, ही वायूसमान आहे. “वितंड” हे विशेषण पहिल्या श्लोकात, पुच्छाच्या शक्तीसाठी आणि प्रस्तुत श्लोकात मारुतीच्या विद्युत वेगाने धावणे; संचार करणे यासाठी आले आहे.

“उदंड वाढला असे । विराट धाकुटा दिसे ।
त्यजूनि शून्य मंडळा । नभांत पिंड आगळा ।। ३ ।।
लुळीत बाळकी लिळा  गिळोनि सूर्यमंडळा ।
बहूत पोळतां क्षणीं । थुंकिलाचि  तत्क्षणीं ।। ४ ।।”

या श्लोकांचा संदर्भ मारुती जन्मतःच सूर्य बिंब हस्तगत करायला झेपावला त्याचा आहे. त्याला त्याच्या पाळण्यातून सूर्य एखाद्या फळाच्या आकाराचा दिसला. पण जेव्हा मारुती आकाशात उंच उंच गेला, तेव्हा त्याला सूर्य बिंबाचा आकार आणि त्याची दाहकता दोन्हीही जाणवले. सूर्य बिंब याला श्रीसमर्थ शून्य मंडळ म्हणतात. ते शून्याकार आहे. तुरीय स्थितीत जो साक्षीभाव असतो त्याला श्रीसमर्थ शून्य स्थिती म्हणतात व साधकाने तीही ओलांडून पुढे जायला हवे म्हणजे भेद पूर्ण संपून, मीपणा संपूर्ण नाहीसा होऊन साधक
परब्रह्माला/स्वस्वरूपाला प्राप्त होतो असे श्रीसमर्थ दासबोधात सांगतात. मारुतीरायांच्या शून्य मंडळ ओलांडून पलीकडे जाणे याला असा अर्थही असू शकेल.  असे मोठे फळ खाणे हे एक रूपक म्हणूनही पहाता येईल.
श्रीसमर्थ म्हणतात की, मारुती विशाल होत गेला. त्याच्या पुढे विराट म्हणजे ब्रह्मांड ठेंगणे दिसू लागले. त्याने ते फळ गिळले आणि टाकूनही दिले. अनुभव घेतला आणि ते जितक्या सहजतेने गिळले तितक्या सहज फेकून दिले.
गिळणे आणि टाकणे हेही प्रतिकात्मक घ्यायला हवे. त्या त्या अवस्थेतील ज्ञान प्राप्त झाल्यावर तिथे अडकून न
पडता अलिप्त होता आले पाहिजे तरच पुढील प्रगती घडू शकेल. त्या फळाच्या आशेने झेपावणे उत्कट बाल
सुलभ उत्कंठा असली तरी त्याची दाहकता समजल्यावर ते फेकून देणे योग्य, हा विवेकही आहे. श्रीसमर्थ म्हणतात, नभात मारुतीचा हा जो खेळ होता तो आगळावेगळा असाच होता. मारुतीचे हे ब्रह्मांडाहून विशाल
होणे हे त्याचे मूळ परब्रह्माशी असलेले नाते दर्शवते.

“धगधगीत बूबुळा । प्रत्यक्ष सूर्यमंडळा ।
कराल काळमूख तो । रिपूकुळांसि दु:ख तो ।। ५ ।।
रूपें कपि अचाट हा । सुवर्ण कट्टचास तो ।
फिरे उदास दास तो । खळास काळ भासतो ।। ६ ।।”

मारुतीच्या कृद्ध स्वरूपात त्याचे डोळे सूर्याप्रमाणे तेजस्वी दाहक असे भासले. त्याचे मुख हे कराल आहे, जणू ते काळाने विनाशासाठी उघडले आहे. रावणादि असूरांना अत्यंत दु:ख देणारे असे हे रूप आहे. त्याना
दंडीत करणारे हे रूप आहे. असूर कितीही बलशाली असोत, संख्येने अधिक असोत त्यांचे निर्दालन होणारच असा सज्जनांसाठी दिलासा आहे. मारुतीने वानर सेनेचे अग्रभागी राहून नेतृत्व केले. वानरांना युद्ध सक्षम बनवले. त्यांच्यात रण आवेश फुंकला. सीतामाईची सुटका, आपणच करायची आहे असा दुर्दम्य आत्मविश्वास
त्यांच्या मनात उत्पन्न करणे हे मारुतीरायांचे मोठे कार्य आहे. श्रीसमर्थांना तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीशी
झुंज घेणारा असा समाज निर्माण करायचा होता. त्यासाठी हे स्तवन महत्वाचे आहे. मारुती शत्रूला धडकी भरवणारा असला तरी त्याची मूळ प्रवृत्ती उदास म्हणजे अनासक्त, विरक्त अशीच आहे. राम कार्यार्थ त्याचा आवेश आहे. पण मारुतीचे नित्य स्वरूप कोणते तर रामाचा दास हेच आहे. भक्तांना त्याचे सौम्य रूपच
अनुभवास येते.

“झळक झळक दामिनी । वितंड काळ कामिनी ।
तयापरी झळाझळी । लुळीत रोमजावळी ।।७।।”

आकाशात तळपणारी वीज लोभस असते पण ती जिथे कोसळते तिथे विद्ध्वंस करते. जाळपोळ करते.
मारुती आकाशात उड्डाण करतात तेव्हा आकाशातील विजेचा प्रकाश अंगावर पडून त्याच्या अंगावरील लव
चमकून उठते असे वर्णन श्रीसमर्थ करीत आहेत. श्रीसमर्थांनी त्यांच्या भावविभोर अवस्थेत हे असे अनेक प्रसंग
प्रत्यक्ष अनुभवले असणार. अतिशय प्रत्ययकारी वर्णन आहे. वितंड काळ कामिनी म्हणजे विजेचा लोळ असे
श्रीसमर्थ म्हणत आहेत. मृत्यूची भयानकता आणि देवतेची लोभसता दोन्ही वर्णन करतात.

“समस्त प्राणनाथ रे । करी जना सनाथ रे ।
अतूळ तूळणा नसे । अतूळ शक्ति वीलसे ।। ८ ।।”

मारुती पवन पुत्र आहेत. वायुरूप आहेत. अखिल विश्वाचा प्राण आहेत. हनुमान हे असामान्य,
अतुलनीय अशा शक्तीने युक्त आहेत. त्यासम तेच. हनुमान ही शक्तीची देवता आहे. भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण
आहे. म्हणून जे बलोपासना करतात त्यांना आणि जे प्रभूश्रीरामांची भक्ती करतात त्या दोघांना मारुतीराय
सहाय्य करतात, त्यांच्यावर आलेली संकटे निवारतात.

“रूपें रसाळ बाळकू । समस्त चित्त चाळकू ।
कपी परंतु ईश्वरू । विशेष लाधला वरू ।। ९ ।।
स्वरूद्र कोपल्यावरी । त्यास कोण सांवरी ।
गुणागळा परोपरी । सतेज रूप ईश्वरी ।। १० ।।”

श्रीसमर्थ या दोन श्लोकात मारुतीचे लोभस बाल रूप आणि त्याचे रुद्रासम रौद्र रूप याचे वर्णन करतात. वानर
असूनही मारुतीला विशेष वर प्राप्त आहे. चिरंजीव रहाण्याचा वर त्यांना प्राप्त आहे. ध्रुव, प्रल्हाद, बिभीषण
आणि अश्वत्थामा हे सारे नरदेहधारी आहेत. मारुतीची अनन्य भक्ती आणि राम काजातील अपूर्व योगदान
यामुळे मारुतीने विशेष वर प्राप्त करून घेतला आहे. मारुतीचे कोपलेल्या रुद्राचे रूप हे कळीकाळाला अनावर
असे आहे, तर त्याचे बाल रूप; दास रूप मोठे लोभसवाणे आहे. ईश्वरी तेजस्वी रूप लाभले आहे.

“समर्थदास हा भला । कपीकुळांत शोभला ।
सुरारिकाळ क्षोभला । त्रिकूट जिंकिला भला ।। ११ ।।”

हनुमान अतिशय ज्ञानी आहे, रामाचा दास झाल्यामुळे वानर कुळाला अभिमान वाटावा असा आहे.
देवांच्या शत्रूंवर मात्र काळ होऊन तुटून पडणाऱ्या मारुतीने लंकेवर विजय मिळवला.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
संदर्भ – सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे, डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे

भीमरूपी स्तोत्र ३ – कोपला रुद्र जे काळी

“कोपला रुद्र जे काळीं । ते काळीं पाहवेचि ना ।

बोलणे चालणे कैचें । ब्रह्मकल्पांत मांडिला ।। १ ।।”

शिव कोपला की कल्पांत होतो. दक्ष राजाच्या यज्ञाच्या प्रसंगी पतीचा अपमान/उपमर्द सहन न झाल्याने देवी सतीने अग्नी प्रवेश केला तेव्हा अत्यंत क्रोधीत होऊन शिवाने तांडव केले. जणू कल्पांत आला अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली. शंकर ही देवता तिच्या विनाशकारी शक्तीसाठी प्रसिद्ध आहे. कोपला रुद्र म्हणजे या शिवाच्या अकराव्या रुद्राचा अंश अवतार मारुती जेव्हा कोपला तेव्हा काय परिस्थिती उत्पन्न झाले त्याचे वर्णन समर्थ या मारुती स्तोत्रात करीत आहेत. देवतांचे सौम्य रूप आपल्याला भावते, आवडते आणि सहन होते. रौद्र रूप मनात धडकी भरवते. भगवंताचे विराट विश्व रूप पहाताना अर्जुनाची अवस्था कशी झाली होती ? पहावेचिना अशीच होती म्हणून तर भगवंता, आपल्या सौम्य रूपात आपण यावे अशी विनंती अर्जुनाला करावी लागली आणि देवानेही ती मान्य केली.

मारुतीराय का बरे एवढे कोपले ? रागावले ? तर रावणाने उच्छाद मांडला होता. वैदिक धर्म संकटात होता. उपास्य देव सारे रावणाच्या कैदेत हाल अपेष्टा भोगत कनिष्ठ कार्य करीत होते. देवतांची ही अवस्था, तर सामान्य माणसांचे काय सांगावे ? देशोदेशीच्या रूपवान स्त्रिया त्याने आपल्या अंत:पुरात आणून बंदी केल्या होत्या. रावण विद्वान होता, शिव भक्त होता पण अन्य असुरांसारखाच त्याला अनावर मोह होता आणि शक्तीचा अहंकार होता. प्रत्यक्ष जगदंबेला/सीतामाईला हरण करून बंदी बनवण्याचा घोर अपराध रावणाने केला होता. देवता या पूजनीय असतात हे विसरून त्यांची विटंबना केली होती. हे सारे मारुतीरायांनी लंकेत फिरून पाहिल्रे आणि त्यांच्या तळ पायाची आग मस्तकी गेली. 

समर्थांनी देखील १२ वर्षे देश फिरून पाहिला आणि देवा-धर्माची दुरवस्था, समाजाची दैन्य अवस्था पाहिली होती. मारुतीची लंकेत जी मनाची अवस्था होती तीच समर्थांची भारत फिरताना झालेली होती. या भाव अवस्थेत हे स्तोत्र  समर्थ रामदास स्वामीना स्फुरले हे ध्यानात घेतले की, समर्थांच्या शब्दांना एवढी धार का आहे, त्यातून स्फुल्लिंगे का बाहेर पडत आहेत हे ध्यानात येते. रावणाचे वन उध्वस्त करणारे मारुतीराय आणि त्यांच्या शेपटीला चिंध्या बांधून पेटवून दिल्यानंतरचे मारुती राय आणि प्रत्यक्ष रणांगणातील मारुतीराय हे अत्यंत क्रोधायमान अवस्थेत होते. हा सात्विक संताप होता. अन्यायाचा बदला घ्यायची त्यांची भूमिका होती. तेच स्फुल्लिंग तोच सात्त्विक संताप देशातील तरुण मनात फुलावा असाही हेतू समर्थांचा हे स्तोत्र लिहिताना असावा. समर्थ म्हणतात की, मारुतीचे हे रूप पहाणे अतिशय भय उत्पन्न करणारे होते. कोणाच्या मनात ? तर ज्यांनी अन्याय केला किंवा अन्यायाची पाठराखण केली त्यांच्यासाठी ल. सीतामाई, बिभीषण यांना मारुतीरायांच्या क्रोधाचा त्रास झाला नाही; कारण ते राम भक्त होते आणि त्यांना राम नामाची कवच कुंडले होती. मारुतीरायांने लंकेत जे आरंभले तो सर्वनाश होता, जणू ब्रह्माचा कल्पांत ओढवला होता व सारी लंका त्या विनाशाच्या कराल काळ मुखात जात होती. 

“ब्रह्मांडाहूनि जो मोठा । स्थूळ उंच भयानकु ।

पुच्छ तें मुरडिले माथां । पाऊल शून्य मंडळा ।। २ ।।”

मारुतीचे हे विश्वाला व्यापून उरणारे उग्र रूप कसे होते ? ते अतिशय भव्य, उंच आणि उग्र होते. त्याने आपली शेपटी मस्तकाजवळ आणली होती तर पाऊल सूर्य बिंबापाशी होते, एवढे ते विशाल होते. जसे भगवान श्रीकृष्णाचे विराट दर्शन हे कृष्ण अवतारापेक्षा किती तरी विशाल होते तसेच हे मारुतीचे व्यापक रूप समर्थ वर्णन करतात. ते मारुती अवतारापेक्षा खूप मोठे जाणवते. ते केवळ देहाचे विस्तारणे नाही तर ते परब्रह्म स्वरूपाचे, त्याच्या सर्व शक्ती सामर्थ्यानिशी व्यक्त होणे असते. 

“त्याहून उंच वज्रांचा । सव्य बाहो उभारिला ।

त्यापुढें दुसरा कैंचा । अद्भूत तुळणा नसे ।। ३ ।।”

हनुमानाचा वज्रासमान हात सूर्य बिंबापेक्षा उंच होता असे समर्थ म्हणतात तेव्हा ते विशाल रूप विश्वाच्या मर्यादा ओलांडून कितीतरी मोठे आहे असे समर्थ सांगत आहेत. त्या हाताचा आघात विलक्षण संहार करणारा होता. हनुमानाच्या पुच्छाने लंकेचा विध्वंस केला. त्याचा हात व त्यातही गदाधारी हात हा त्याच्या विलक्षण सामर्थ्याचे प्रतीक मानावे लागेल. हे अद्भुत रूप अतुलनीय असेच आहे. 

“मार्तंडमंडळा ऐसे । दोन्ही पिंगाक्ष ताविले ।

कर्करा घर्डिल्या दाढा । उभे रोमांच ऊठिले ।। ४ ।।”

मारुतीरायांच्या नेत्रात क्रोध म्हणजे जणू अंगार पेटला होता व त्याची तुलना सूर्य बिंबाच्या दाहकतेशीच करता येणे शक्य आहे. तसेच करकरा वाजणारे दात हे क्रोधाच्या तीव्रतेचा अंदाज देतात. ते ऐकून अंगावर काटा येत होता असे समर्थ सांगत आहेत. हे सारे दुष्टांच्या हृदयात धडकी भरवते तर सज्जन आणि जे दुर्जनांच्या त्रासाने गांजलेले आहेत त्यांना आशेचा किरण दाखवणारे ठरते.

“अद्भूत गर्जना केली । मेघचि वोळिले भुमीं ।

तूटले गिरीचे गाभे । फुटले सिंधू आटले ।। ५ ।।”

हनुमानाची गर्जना मोठी विलक्षण आणि भयानक होती. जणू गर्जना करून प्रचंड मेघ भूमीकडे वोळले म्हणजे वळाले. मेघांची दिशा बदलू शकेल इतकी ती गर्जना प्रभावी होती. आपली दैवते ही पंचभूतांना वळवू शकतात इतकी प्रभावी असताना आपण मात्र हात-पाय गाळून अन्याय सहन करणे योग्य नाही, असा संदेश समर्थ या स्तोत्रातून देत आहेत. त्या गर्जनेच्या स्पंदनांमुळे पर्वतांचे कडे तुटत होते तर सागराचे जल आटत होते. आपण काही वर्षांपूर्वी हिमाचल प्रदेशात झालेले भूस्खलन आणि प्रचंड जल वर्षाव यांचा विनाशकारी अनुभव घेतला आहे, आणि म्हणून या वर्णनाचा अर्थ आपल्याला लागू शकतो. 

“अद्भूत वेश आवेशें । कोपला रणकर्कशू ।

धर्म संस्थापनेसाठीं । दास तो ऊठिला बळें ।। ६ ।।”

हनुमानाचा हा रण आवेश कुठल्याही वैयक्तिक कारणासाठी नाही. तो पुन्हा धर्म नीती यांची स्थापना करण्यासाठी आहे. श्रीराम आणि हनुमान यांच्या कार्याचा हा हेतू समर्थ या श्लोकात सांगत आहेत. हनुमान रणभूमीवर चालताना ती हादरत होती. हे धक्के रावणाच्या अन्यायी राजवटीला होते. नीती-धर्म यांना सोडून वागण्याला होते. अहंकार, कामी वृत्तीला आव्हान होते. म्हणून हा कोप, हा क्रोध वंदनीय आहे. सज्जन लोकांचे रक्षण आणि दुर्जन-आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे निर्दालन हे श्रीराम आणि श्रीहनुमान यांच्या अवताराचे कारणच होते. 

“यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ।

अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्म्यानं सृजाम्यहम ।

परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम ।

धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ।।”

या भगवंताच्या आश्वासनांची आठवण हे स्तोत्र वाचताना/अभ्यासताना होते. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)    

 

भीमरूपी स्तोत्र २ – अपूर्व बाळलीला

या स्तोत्रात मारुतीच्या बाळ लीलांचे वर्णन आले आहे. त्यामुळे या स्तोत्राला मारुतीच्या जन्मा आधी
घडलेल्या घटनांचा संदर्भ आहे. इंद्र दरबारातील अतिशय सुंदर अप्सरा (पुंजीकस्थला) ही एका तापसाला
हसल्यामुळे शापग्रस्त होते व हसण्यामागे असलेल्या चंचलता या स्वभाव दोषाचा दंड म्हणून वानरी होऊन
तिला मर्त्य लोकात यावे लागते. तिला हवी ती रूपे धारण करता येतील व पोटी महा पराक्रमी व चिरंजीव पुत्र
जन्म घेईल असा उ:शाप तिला प्राप्त झाला. यथायोग्य वेळी सुमेरू पर्वताचा राजा केसरी या वानराशी विवाह
झाला. बराच काळ प्रतीक्षा करूनही अपत्य प्राप्ती न झाल्याने तिने वृषभाचल पर्वतावर तप केल्यावर पवन देव
प्रसन्न झाले व त्यांच्या कृपेने तिला पुत्र प्राप्तीचा वर मिळाला. दशरथ राजाच्या पुत्र व्हावा या इच्छेने केलेल्या
यज्ञाच्या  पायसातील थोडा भाग एका घारीने पळवला आणि तो पर्वतावर बसलेल्या अंजनी मातेच्या ओंजळीत
तिने टाकला. त्या पायसाचे फळ म्हणून अंजनी मातेने चैत्र पौर्णिमा सूर्योदय काळी मारुतीला जन्म दिला. मरुत
म्हणजे वायू. त्याच्या आशीर्वादाने पुत्र प्राप्ती झाली म्हणून मारुती.

जनीं ते अंजनी माता । जन्मली ईश्वरी तनु ।
तनु मनु तो पवनु । येकची पाहतां दिसे ।। १ ।।
त्रिलोकी पाहाता बाळे । ऐसे तो पाहता नसे ।
आतुळ तुळणा नाही । मारुती वात नंदनु ।। २ ।।

मारुतीचा देह दैवी गुणांनी युक्त होता. पवनाचा अंश असल्याने त्याचे मन व शरीर अद्वितीय असे होते.
वायूचा वेग आणि सामर्थ्य दोन्ही त्याच्यात एकवटले होते. ‘येकची’; म्हणजे एकमेवाद्वितीय. अद्वैत दर्शवते. वायू
हे पंच भूतातले महा शक्तीशाली भूत आहे. ब्रह्मांडात घडणाऱ्या अति प्रचंड हालचाली यांना हे तत्त्व जबाबदार
असते. सोसाट्याचा वारा, वादळ हे मोठ-मोठे वृक्ष उन्मळून टाकतातच. असे हे पवनाचे कर्तृत्व आहे व मारुती
अवतारात हे सारे सामर्थ्य प्रगट झाले म्हणून ईश्वरी तनु. हनुमानाचे जाणे येणे हे झंझावातासम होते. ही त्याची
अंगभूत शक्ती होती. श्रीसमर्थ म्हणतात की, त्रैलोक्यात शोधून सुद्धा असे तेजस्वी सामर्थ्यशाली बालक
सापडणार नाही..

चळे ते चंचळे नेटे । बाळ  मोवाळ साजिरे ।
चळवळी चळवळीताहे । बाळ लोवाळ गोजिरे ।। ३ ।।

स्पर्शाला मृदू, मुलायम लव असलेले ते बाळ त्वरेने क्षुब्ध झाले. का तर त्याला भूक लागली व आई तर
वनात त्याच्यासाठी फळे, कंद आणायला गेली होती. भुकेने कासावीस होणे म्हणजे क्षुब्ध होणे. इथे क्रोध नाही

तर क्षोभ आहे. भूक लागणे ही अपेक्षित अशी भावना आहे व तिचे शमन, तिची तृप्ती वेळेत व्हायला हवी. बाल
मारुतीची हालचाल श्रीसमर्थ चळवळी चळवळीताहे यातून व्यक्त करतात. द्विरुक्तीमुळे वर्णन प्रत्ययकारी होते.
नवजात बालकाचे हात-पाय, नखे, बोटे या साऱ्यांचे मातेला कोण कौतुक व किती कौतुकाने ती हे सारे
न्याहळते, त्याच ममतेने कौतुकाने श्रीसमर्थांचे शब्द येतात..

हात की पाय सांगावे । नखें बोटे परोपरी ।
दृष्टीचे देखणे मोठे । लांगूल लळलळीतसे ।। ४ ।।

मारुतीचे शेपूट/पुच्छ,  यालाच श्रीसमर्थ इथे लांगूल म्हणतात. लळलळीतसे म्हणजे मोठे असल्याने पीळ
किंवा वेटोळे दिलेले. ते देखणे आहेच पण अत्यंत सामर्थ्यशाली असल्याने त्याचे मोठे कौतुक आहे. ते शक्ती
स्वरूप आहे. आकार बदलण्याची सिद्धी हनुमानाला उपजत होती. मारुतीरायांच्या पराक्रमात या लांगूलाचे
मोठे योगदान आहे.

खडी खारी दडे तैसा । पीळ पेंच परोपरी ।
उड्डाण पाहातां मोठे । झेंपावे रविमंडळा ।। ५ ।।

भुकेने क्षुब्ध होऊन बाल मारुतीने आकाशातील लाल बुंद सूर्य बिंबाला फळ समजून झेप घेतली. तो
दिवस सूर्य ग्रहणाचा होता. आकाशात ‘खारी’; म्हणजे ढग होते व त्यामुळे मारुतीचे वेढा घातलेले शेपूट कधी
दिसत होते तर कधी दिसत नव्हते. श्रीसमर्थ तो प्रसंग किती बारकाव्याने आपल्या समोर मांडतात ते
अभ्यासण्या सारखे आहे. प्रत्यक्षदर्शी अनुभव असावा असे ते वाटते.

बाळाने गिळिला बाळू । स्वभावे खेळतां पहा ।
आरक्त पीत वाटोळे । देखिले धरणी वरी ।। ६ ।।

बाल हनुमान आणि आकाशात उगवणारा बाल सूर्य. त्याचे मनोहर स्वरूप-पिवळसर आणि थोडा
तांबूस असा तो सूर्य मारुतीस हवासा वाटला.. उगवतीचा सूर्य लोभस असतो खरा, पण तो म्हणजे फळ आहे
असे वाटून खाण्यास घ्यावे असे वाटणे हेच विशेष आहे. अप्राप्य, अति भव्य हवेसे वाटणे हेच थोर असल्याचे
निदर्शक लक्षण; इतक्या बाल्य अवस्थेत दिसून येणे हा या कथेचा गाभा आहे. अवतार असतात त्यांच्यापाशी
विशेष सामर्थ्य असते असे श्रीसमर्थ दासबोधात म्हणतात.

पूर्वेसी देखतां तेथे । उडाले पावले बळे ।
पाहिले घेतले हाती । गिळिले जाळिले बहु ।। ७ ।।
थुंकुनी टाकितां तेथे । युद्ध जाले परोपरी ।
उपरी ताडिला तेणे । येक नामची पावला ।। ८ ।।

मारुतीने विशाल होऊन सूर्य बिंब हाती घेतले आणि खाण्यासाठी गिळले पण त्याच्या तेजाने दाह
झाल्याने ते त्याने थुंकले. सूर्य हा ज्ञानाचा प्रतीक. त्याचे मंडळ ग्रासले म्हणजे सारे ज्ञान आत्मसात केले आणि
त्यानंतर जे व्यापले होते त्याचा त्याग केला असाही एक अर्थ वाचण्यात आला. कथेनुसार ग्रहण काल असल्याने
सूर्याला गिळायला आलेल्या राहू बरोबर मारुतीचे युद्ध झाले व त्याच्या मदतीसाठी येऊन इंद्राने वज्रप्रहार
केल्याने मारुतीची हनुवटी विद्ध झाली. हा वायुसुत आहे हे, वायूने त्रिलोकाचे प्राण रोधल्यावर इंद्राच्या ध्यानी
आले. त्याने वर देऊन मारुतीची हनुवटी पूर्ववत केलीच पण हनुवटी आणि सर्व शरीर वज्रासमान कठीण केले.
असा कथाभाग आहे. यावरून त्याचे हनुमान (भंग पावलेली हनुवटी) नाव पडले.
बाल अवस्थेत राहूला म्हणजे बलिष्ठ अप प्रवृत्तीला आव्हान देणे व त्यासाठी युद्ध करणे हा उपजत गुण
दिसून येतो. यात धैर्य आहे आणि वीरता सुद्धा आहे. परिणामाची पर्वा नाही असे म्हणणे कठिण आहे कारण ते
नुकतेच जन्म झालेले बालक आहे. उत्सुकता , धाडस या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.

हा गिरी तो गिरी पाहे । गुप्त राहे तरुवरी ।
मागुता प्रगटे धावे । झेपांवे गगनोदरी ।। ९ ।।
पळही न राहे कोठे । बळेची घालितो झडा ।
कडाडा मोडती झाडे । वाडे वाडें उलांडती ।। १० ।।
पावनासारीखा धावे । वावरें विवरे बहु ।
अपूर्व बाळलीला हे । रामदास्य करी पुढे ।। ११ ।।

मारुतीचे बालपण, त्याच्या खोड्या व उद्यामशीलते मुळे विशेष जाणवतात. या पर्वतावरून त्या
पर्वतावर उड्या मारणे, झाडांवरून उड्या मारताना झाडे मोडून पडणे आणि एक क्षण सुद्धा स्थिर न राहणे हे
वायुतत्वाच्या प्रभावामुळे होते असे श्रीसमर्थ सांगतात. असा हा प्रचंड उपद्व्यापी बालक पुढे रामाचा दास झाला
आणि त्याच्या समोर अत्यंत स्थिर उभा राहिला. कोणत्याही प्रसंगात आवश्यक ते कृत्य करताना अत्यंत स्थिर
चित्ताने अत्यंत विवेकाने वागला. हे रूपांतर खूप महत्त्वाचे आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।
संदर्भ :- सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे)

श्रीभीमरूपी स्तोत्र १ – भाग १

मारुती व श्रीसमर्थ भेट “मारुतीचा गुण गौरव”

त्रयोदशाक्षरी राम मंत्राचा तेरा कोटी जप श्रीसमर्थ टाकळी येथे संगमावर करीत असताना मारुतीराय वानर रूपात येत असत. जप पूर्ण झाल्यावर अतिशय आनंदित होउन मारुतीरायांनी श्रीसमर्थांना आपल्या भीम रूपात म्हणजे विशाल स्वरूपात दर्शन दिले व आनंदाने उचलून घेतले, मिठी मारली. मारुतीचे भव्य दिव्य रूप पाहून श्रीसमर्थांना जी काव्य स्फ़ूर्ती झाली ती या स्तोत्रात आली आहे. पहिले चार श्लोक हे मारुतीचे गुण वर्णन करणारे आहेत. 

“भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।

वनारी अंजनीसुता रामदूता प्रभंजना ।। १ ।।”

मारुतीचे रूप अत्यंत विशाल व भव्य आहे. प्रत्यक्ष श्रीमहादेवाचा अवतार म्हणून महारुद्र व त्यातही एकादश रुद्राचा अवतार आहे. यात भव्यते बरोबरच भय उत्पन्न करणारे अचाट सामर्थ्य सुद्धा आहे. या अवतारात शक्तीरूपाने सहाय्य करण्यासाठी देवी पार्वती ज्याच्या शेपटीत शक्तीरूपाने राहिली असा हा अवतार. इंद्राच्या वज्राघाताने हनुवटी भंगलेला पण त्या वज्रासमान कठोर देह असणारा असा हा अवतार आहे. रावणाच्या वनाचा नाश करणारा म्हणून वनारी आणि अंजनी मातेचा पुत्र म्हणून अंजनीसुत असा हनुमान हा श्रीरामाच्या महान कार्यात सहाय्यक होणारा आहे. त्याचा दूत म्हणून कार्य अत्यंत चोख बजावणारा असा वायुपुत्र हनुमान आहे व तुफान वाऱ्यात जो वेग आवेग आणि बल असते तद्वत हा अत्यंत वेगवान हालचाल करणारा आहे. दूताला अत्यंत चतुर असावे लागते. कार्य करताना बंदी होण्याची शक्यता असते. दूताला पकडू नये असा संकेत आहे आणि तो सज्जन पाळतात. म्हणूनच युद्ध सुरु करण्यापूर्वी आपल्या देशातील दूतावासातील सर्वांना सुखरूप माय देशात पाठवले जाते. पण रावणासारखे दुरात्मे असले संकेत थोडेच मानतात ? ते दूताला बंदी बनवून त्याचे प्राण हरण करणे अथवा त्याला शारीर कष्ट देणे असे विकृत मार्ग अवलंबतात. दूताकडे आपली सुटका करून व शत्रूला संदेश पोहोचवून परत येण्याचे सामर्थ्य हवे. ते मारुतीराय व अंगद दोघांकडे होते. सुग्रीव व अंगद बलशाली होते पण मारुतीराय विवेकी होते आणि कुठलेही वेडे धाडस त्यांनी कधीही केले नाही. राजनीती, कुटील नीती जाणत असल्याने ते रावण, अहिरावण व महिरावण यांचे मनसुबे निष्प्रभ करू शकले आणि इंद्रजीताच्या मायेवर उपाय शोधू शकले . वनात अरण्यात दाट झाडी असते, सूर्य प्रकाश सुद्धा उतरत नाही व अंधार असतो. आपल्या मनात सुद्धा भाव भावना व विकार यांची दाटी जणू काही वासना विकारांचे जंगल असते. मारुतीला विनंती आहे की जसे रावणाचे अशोक वन उध्वस्त  केले तसे मनातील हे जंगल सुद्धा तू जाळून टाक.

“महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळे ।

सौख्यकारी शोकहर्ता  धूर्त वैष्णव गायका ।। २ ।।”

प्राण हरण करण्याच्या उद्देशाने प्रयोग केलेल्या इंद्रजीताच्या शक्ती प्रभावाने सर्व वानर सैन्य व राम लक्ष्मण मूर्च्छित होऊन पडले असताना म्हणजे मृत्यू समीप पोहोचले असताना हनुमान हे एकच असे महाबली होते की ज्यांच्यावर त्या शक्तीचा प्रभाव पडला नव्हता. जांबुवंताच्या आदेशानुसार द्रोणागिरी पर्वतावरील औषधी वनस्पती अतिशय त्वरेने आणून तो परत मूळ जागी नेऊन पोहोचवणे हे अशक्य कोटीतले काम करून स्वामी राम व लक्ष्मण तसेच समस्त वानर सेनेला त्यांचे प्राण मिळवून देणारा, संजीवन देणारा असा हा हनुमान लोकांची संकटे दु:खे निवारून सुख देणारा आहे. हनुमानाने कोणाकोणाचे दु:ख निवारण केले ? 

सुग्रीव राज्य हीन झाला होता. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी सुग्रीव व रामराया यांची गाठ घालून दिली, पत्नी हरणाच्या शोकातून सीतेचा शोध घेऊन प्रत्यक्ष रामांचा शोक कमी केला. शक्ती लागून मूर्च्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान देऊन श्रीरामांना मोठ्या संकटातून  सोडवले. रामांची अंगठी देऊन राम सुटकेसाठी येत आहेत हे सांगून सीतामाईचा शोक कमी केला. गांजलेल्या देवांना लंका दहन करून दिलासा दिला. तो वैष्णव म्हणजे राम भक्त असून सतत वाणीने राम भक्तीचे मधुर गायन करणारा चतुर व अतिशय बुद्धिमान असा गायक आहे असे श्रीसमर्थ म्हणत आहेत. तसेच जिथे भक्तीने राम कथा सांगितली जाते तिथे मारुतीराय येतात अशी श्रद्धा आहे.  

“दिनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।

पाताळ देवताहंता भव्य सिंदूर लेपना ।। ३ ।।

लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।

पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ।। ४ ।।

हनुमंत हा अनाथांचा रक्षक आहे. जेव्हा देवांना रावणाने बंदी बनवले होते तेव्हा त्यांना कोणी वाली राहिला नव्हता व ते अतिशय दयनीय परिस्थितीत होते. हनुमंताने जाऊन लंका दहन केले तेव्हा देवांच्या सुद्धा सुटकेच्या आशा पालवल्या. रामाशी, विष्णूच्या अवताराशी एकरूप असा हनुमान समर्थांच्या मनाला प्रसन्न करणारा असा आहे. तो जगताच्या अंतरी स्थित आहे म्हणजे सकल जगाचा आत्मा आहे. अहिरावण व महिरावण या पाताळ स्थित राक्षसांचा संहार करून हनुमानाने राम व लक्ष्मण यांची सुटका केली. तो भव्य असून त्याने सर्वांगाला शेंदूर लेपन केले आहे. हा रंग वैराग्याचा रंग आहे. हनुमान हे अत्यंत विरक्त आहेत. जनरक्षक अखिल जगाचा कैवार घेणारा आणि वायुरूप असल्याने जणू सकल जगाचा प्राण असलेला हनुमान. त्याने वायू रोधून धरला तर सर्व त्रिलोक कासावीस होतात. तो सर्वांच्या प्राणाचे रक्षण करतो. त्याचे पुण्य थोर असून तो काया वाचा मनाने अत्यंत पवित्र पावन आहे. जे भक्त त्याची मनोभावे पूजा करतात त्यांना इच्छापूर्तीचे समाधान प्रसाद हनुमान देतात असे समर्थ सांगत आहेत.

“ध्वजांगे उचले बाहो आवेशे लोटिला पुढे ।

काळाग्नि काळरुद्राग्नी देखता कापती भये ।। ५ ।।

ब्रह्मांड माईले नेणो आवळे दंत पंगती ।

नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळे ।। ६ ।।”

हनुमानाचा रण आवेश समर्थ सांगत आहेत. सैन्याच्या पुढे विजयी ध्वज घेऊन मारुती आवेशाने आक्रमण करीत आहे. काळाग्नि काळरुद्राग्नी हे यमाचे दूत, त्यांनाही भयाने धडकी भरावी असा हा आवेश आहे. विश्वरूप दर्शन आठवावे असे वर्णन समर्थ करतात. ब्रह्मांडाचा घास घ्यायला सरसावलेला काल पुरुष विनाशासाठी दाढा करकरा वाजवीत पुढे येत आहे व क्रोधाने डोळ्यातून अग्नी ज्वाळा बाहेर पडत आहेत असे हे भयावह दृश्य आहे. अत्यंत क्रोध आल्यामुळे भुवया वक्र झाल्या आहेत. श्रीसमर्थ इथे हनुमानाच्या रौद्र रूपाचे वर्णन करीत आहेत. रावण व त्याची सेना जशी अत्याचारी झाली होती तशीच वेळ महाभारत काळी आली होती व समर्थ-शिवराय यांच्या काळात सुद्धा अत्याचारी अतिशय वाढले होते. रामदास स्वामी पुरश्चरण करीत होते तो काळ लक्षात घेतला तर श्रीसमर्थांनी श्रीरामाचे रौद्र रूप व हनुमानाचे रौद्र रूप समाजापुढे का ठेवले असावे हे ध्यानात येते. ते श्रीसमर्थांना स्वत:ला किती भावले होते व असा काही तरी अवतार व्हावा ही त्यांची किती तीव्र इच्छा होती ते या वर्णनातून लक्षात येते.

।। जय जय रघुविर समर्थ ।।

संदर्भ : सार्थ व सविवरण भीमरूपी स्तोत्रे (डॉ. सौ. सुनीती विजय सहस्रबुद्धे) 

दासबोधात प्रतीत होणारी ईश्वर संकल्पना :- उगम विस्तार आणि विकास….

सनातन धर्म, वैदिक हिंदू संस्कृतीत ईश्वर ही संकल्पना महत्वाची आहे. पूजनीय, चिंतनीय आहे. ईश्वर म्हणजे सृष्टी निर्माता, रक्षणकर्ता, संचालक आणि विनाशकर्ता अशी संकल्पना आहे. (ईश म्हणजे राज्य व नियंत्रण करणे + वर) विश्वाचा निर्माता, त्याचे आणि आपले सत्य स्वरूप काय ? त्या जग नियंत्याचा-विश्वाचा-माझा संबंध कसा आहे ? ही जिज्ञासा माणसाला आहे. तो कार्यकारण भाव समजून घ्यायचा आहे.ही संकल्पना ग्रंथराज दासबोधात निरनिराळ्या टप्प्यावर कशी विकसित होत गेली आहे हे पहाणे उद्बोधक ठरेल.

ईश्वराचे विस्मरण झाले म्हणून जन्म घ्यावा लागला. जीवाला मीपणा चिकटला. ज्यांनी ईश्वर समजून उमजून आपलासा केला ते भाविक निजसुखाचा स्वानंद सोहोळा उपभोगतात असे समर्थ सांगतात. ईश्वराची शक्ती म्हणजे माया. तिची निर्मिती म्हणजे हे दृश्य विश्व, जे प्रत्यक्ष दिसते. (माया हे अनादि असे| शक्ती ईश्वराची | ८-२-२९) आपल्याला प्रत्यक्ष प्रमाण लागते म्हणून समर्थ इथे हा दाखला देत आहेत. परब्रह्माच्या ठिकाणी जे स्पंदन उठले त्याला, त्या ‘अस्तित्व’ जाणीवेलाच, ‘माया किंवा ईश्वर’ म्हटले गेले आहे (मायाब्रह्मीं जो समीर | त्यांत जाणता तो ईश्वर १०-४-१६). मूळ मायेत त्रिगुण सूक्ष्म अव्यक्त दशेत होते. पुढे त्या गुणांना व्यक्त स्वरूप आले. त्रिगुण भेदातून ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव उत्पन्न झाले. (तोचि ईश्वर गुणासी आला | त्याचा त्रिगुणभेद जाला |१०-४-१७). निर्माता, पालनकर्ता आणि विनाशकर्ता अशी ही कर्म विभागणी झाली. सृष्टी उत्पत्ती, स्थिती व लय ही व्यवस्था सुरु रहावी या परब्रह्माच्या इच्छेनुसार ही व्यवस्था झाली. त्रिगुणात्मक ईश्वरापासून ही पंचमहाभूतात्मक सृष्टी झाली. त्यातील तमोगुणापासून आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी ही तत्वे निर्माण झाली. या तत्वांच्या मिश्रणाने सारे दृश्य आकारास आले. (पंचीकरण) “वायोमध्यें जाणीव गुण | तेंचि ईश्वराचें लक्षण | तयापासून त्रिगुण | पुढें जाले || १०-९-११ ||”

वायू म्हणजे स्पंदन. वा-याची झुळूक. विद्युत लहर हे स्पंदनाचे परिचित असे शक्ती स्वरूप आहे. त्या शक्तीला स्वत:ची जाणीव नाही. तिचा वापर सृजनासाठी आणि विनाशासाठीही होउ शकतो. तो कसा व्हावा हे ठरवणारी ‘नियामक सत्ता’ म्हणजे ईश्वर. ही सत्ता अदृश्य आहे (ऐसा जो गुप्तेश्वर | त्यास म्हणावें ईश्वर |११-८-५). तिला ईश्वर म्हटले आहे. सृष्टीत जे जे वैविध्य दिसते ते सारे कोणाचे ऐश्वर्य आहे तर ते ईश्वराचे आहे. राज्याची सारी मालमत्ता, ऐश्वर्य राजाचे असते तसे. राजसत्ता त्याच्यात एकवटलेली असते. आपण राजाचे उदाहरण जरी घेतले तरी तो वेषधारी आहे, देहधारी आहे. त्याच्या सत्तेला सामर्थ्याला मर्यादा आहे. ईश्वराची सत्ता ही कितीतरी मोठी आहे. अमर्याद आहे हे लक्षात घ्यायचे आहे. (ईश्वराची बराबरी | कैसा करील वेषधारी |१२-७-२०) या सत्तेची विभागणी ध्यानात यावी म्हणून समर्थ सांगतात..

पिंडीं देहधर्ता जीव | ब्रह्मांडीं देहधर्ता शिव |

ईश्वरतनुचतुष्टये सर्व | ईश्वर धर्ता |(१३-१-२४)

शरीरात सत्ता आत्म्याची, ब्रह्मांडात म्हणजे विश्वात शिवात्मा हे चैतन्य तत्व आहे. विराट हिरण्यगर्भ, अव्याकृत आणि मूळ माया यांना ‘ईश्वर तनु चतुष्टय’ म्हटले आहे. (पिंडाचे स्थूल; सूक्ष्म; कारण; महाकारण असे चार देह कल्पिले आहेत.) ब्रह्मांडाचे चार देह व त्यांना धारण (धर्ता) करणारा तो ईश्वर असा हा विचार समर्थ मांडतात. 

आत्ता पर्यंत आपण ब्रह्मा; विष्णू; महेश हे त्रिगुणात्मक ईश्वरी स्वरूप पाहिले. इथे समर्थ आणखी पुढे नेत त्रिगुणा ‘पर्ता’ म्हणजे या व्यक्त ईश्वरा पलीकडे जी सत्ता आहे, त्याकडे निर्देश करतात. अर्धनारी नटेश्वर, माया-ब्रह्म, शिव-शक्ती असेही त्या चैतन्याला म्हणतात. तिथून सृष्टीचा विस्तार झाला. “त्रिगुणापर्ता जो ईश्वर | अर्धनारीनटेश्वर | सकळ सृष्टीचा विस्तार | तेथून जाला ||१३-१-२५||”

निर्गुण निराकार परब्रह्म, त्यात ‘एकोSहम’ असे झालेले स्फुरण ही मूळ माया. ती परब्रह्मा इतकीच अव्यक्त आहे; पण परब्रह्माला नसलेली जाणीव मूळ मायेत आहे. मूळ माया त्या स्फुरणाला/संकल्पाला (मी एक आहे, बहु व्हावे) प्रत्यक्षात आणण्यासाठी शक्ती ‘कार्यान्वित’ करते. मूळ मायेत सूक्ष्म; सम असलेले गुण, व्यक्त दशेला येताना त्यांचा समतोल ढळतो. त्याला ‘गुणक्षोभिणी माया’ असे म्हटले आहे. त्रिगुण म्हणजे सत्व-रज-तम व्यक्त दशेत आले की त्यांना आपण सगुण साकार रूपात  ब्रह्मा-विष्णू-महेश या स्वरूपात जाणतो. आपण ‘सगुण’ आहोत, म्हणून आपण तशी ‘कल्पना’ करतो हे समर्थ सांगतात. 

मी तूं हा भ्रम | उपासनाहि भ्रम |

ईश्वरभाव हाहि भ्रम | निश्चयेंसी || १०-६-११ ||

समर्थ आपल्याला कोणत्याही संकल्पानेबाबत ‘जरासाही’ भ्रम बाळगू देत नाहीत. ज्याची ज्याची कल्पना करतो ते सारे मायिक !! असे समर्थ सांगतात. त्या पर्ता तो ‘खरा’ ईश्वर, ‘थोरला देव’.ईश्वर आपली सत्ता कशी राबवतो ? 

ईश्वरी गुण असलेले ‘अवतार’ उत्पन्न करून ईश्वर हे कार्य अव्याहत चालवतो. उदाहरणार्थ – समर्थांचे उपास्य दैवत म्हणजे हनुमंत. (हनुमंत ईश्वरी अवतार | याचा पुरुषार्थ सुरवर |  पाहातचि राहिले || १६-६-२९) रामांचा बहिस्थ प्राण म्हणून त्याने राम लक्ष्मण यांचे संकटात रक्षण केले. रावणासारख्या खल पुरुषाचे सैन्य-पुत्र-बंधू यांच्यासहित विनाश करण्यात हनुमंताने ‘अतुलनीय’ योगदान दिले. हे ईश्वरी शक्तीचे विराट प्रदर्शन होते. ईश्वराचे अस्तित्व, महानत्व आपल्याला अशा प्रसंगातून व उदाहरणातून जाणवते. रावणाने सर्व देवांना बंदी बनवून ठेवले होते. त्यांना हलकी कामे दिली होती. हनुमानाच्या विराट पराक्रमामुळे सर्व देव सुखावले. ज्यांनी ज्यांनी धर्म स्थापनेसारखे उदात्त कार्य हाती घेतले आणि तडीस नेले, त्यानां सुद्धा ईश्वरी अवतार मानले जाते. (श्रीराम, कृष्ण, शिवाजे राजे)

“यदा यदा हि धर्मस्य…” या भगवंताच्या वचनानुसार हे ईश्वरी अवतार होत असतात.  (धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार || १८-६-२०) जे जे धर्म स्थापना करतात, उत्तम गुणांचे चाहते असतात व अनेक गुण धारण करून असतात, विवेकी असतात; पुण्यवान असतात ते ‘ईश्वरी कृपेस’ पात्र झालेले असतात. ते आपल्यासाठी ‘ईश्वर स्वरूपच’ असतात असे समर्थ सांगतात. 

सकळ करणें ईश्वराला | म्हणोनी भेद निर्माण केला |

ऊर्धमुख होतां भेदाला | ठाव कैंचा |(२०-८-१६)

हेतू – ईश्वराला ही सकळ सृष्टी रचायची होती व ती सुविहित चालावी म्हणून एवढे भेद, एवढी विविधता त्याने निर्माण केली. मूळ स्वरूपापाशी कसलाच भेद नाही. प्रकृतीपुरुष, शिवशक्ती आणि शड्गुणईश्वर हे सारे मूलत: एकच आहे. हे ऐक्य आपण समजून घेतले की काही भ्रम रहात नाही. तोचि प्रकृतिपुरुष जाणिजे | शिवशक्ती वोळखिजे | शड्गुणईश्वर बोलिजे | तया कर्दमासी || २०-९-२६ ||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

।।येथे कां रे उभा श्रीरामा।।

येथे कां रे उभा श्रीरामा| मनमोहन मेघश्यामा  ||१||

चाप बाण काय केलें । कर कटावरी ठेविले  ||२||

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला  ||३||

काय जाली अयोध्यापुरी । येथे बसविली पंढरी  ||४||

शरयूगंगा काय केली । कैची भीमा मेळविली  ||५||

किल्किलाट वानरांचे ।थवे न दिसती तयांचे  ||६||

दिसे हनुमंत एकला । हा कां सैन्यांतुनी  फूटला  ||७||

काय जाली सीता सती । येथे बहुत जन दिसती  ||८||

रामदासीं सद् भाव जाणा ।  राम जाला पंढरिराणा  || ९||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

पंढरपूरला विठ्ठलाच्या प्रथम दर्शनाचे वेळी रामदासांनी रचलेला हा अभंग. अनंत दास रामदासी लिखित श्री समर्थांचा गाथा या पुस्तकात हा अभंग क्रमांक ४८ असा आहे. त्यांच्याच श्री दासायन या ग्रंथात असे आढळते की समर्थ शके १५५४ ते शके १५६५ या काळात तीर्थयात्रा  करीत होते. यात्राक्रम तपासला असता काशी, प्रयाग, अयोध्या, बद्रीनारायण, रामेश्वर,           शैल्यपर्वत, गोकर्ण महाबळेश्वर, चिपळूण-परशुराम, महाबळेश्वर, भीमाशंकर, शिखर शिंगणापूर, पंढरपूर असा प्रवास करून शेवटी त्र्यंबकेश्वर करून पंचवटी येथे आले.  (संदर्भ:- श्रीदासायन   पान ८०)  

यात्रेदरम्यान समर्थ अनेक देव देवतांचे दर्शन घेत, त्या त्या दैवतांची यथासांग पूजा अर्चा करीत होते. त्या त्या देवाची स्तुती करणारी पदे आरत्या श्रीसमर्थांनी लिहिल्या. तरी त्यांच्या मनात हृदयात श्रीराम हेच आराध्य दैवत स्थिर होते. त्याचाच अखंड ध्यास समर्थांना लागलेला होता. प्रस्तुत अभंग हा समर्थांच्या अंतरी केवळ श्रीरामांचे अनुसंधान लागले होते याची साक्ष पटवून देणारा आहे. श्रीसमर्थ पंढरपुरी आले खरे. पण भावविभोर अवस्थेत त्यांना पंढरीच्या जागी अयोध्या व चंद्रभागेऐवजी शरयू नदी दिसू लागली. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, तेव्हा तेथे श्रीराम रूपच  दिसू  लागले. तथापि  त्यांच्या हृदयातील रामप्रतीमेपेक्षा हे रूप वेगळे भासले, ते पाहून त्यांना पडलेले प्रश्नच प्रस्तुत अभंगात समर्थ आराध्य दैवत श्रीरामांना विचारत आहेत.

सर्वत्र यवनांच्या अत्याचाराने समाज गांजला असताना आपले आराध्य दैवत एकटे आणि नि:शस्त्र कसे? शरसंधान करायला सदैव सज्ज असणारे हे हात कमरेवर ठेवून कळिकाळाचा थरकाप उठवणारे राम प्रभू इथे स्वस्थ कसे?  हा समर्थांचा प्रश्न आहे, सर्व देश फिरून आल्यावर, सगळीकडची दैन्यावस्था पाहून आल्यावर पडलेला हा प्रश्न आहे हे खूप महत्वाचे आहे. 

दाशरथी राम अयोध्येचा राजा होता. हनुमंताने रामाचा वनवासी तपोवेश आणि राज्याभिषेकानंतरचा राजवेश पाहिला होता. लंकेतला समरप्रसंगी रुद्रावतार व नंतरचे शांत प्रजावत्सल रूप पाहिले होते. हनुमंताने कृष्णावतार व त्यातील बाललीला व महाभारत युद्धातील चतुरस्त्र सहभाग पाहिला होता. श्री समर्थ हे हनुमंताचे अंशावतार म्हटले जातात. अर्थात त्यांच्या मनात हे सारे प्रश्न येणे अत्यंत स्वाभाविक होते.

श्री विठ्ठल रूप अत्यंत साधे आहे, त्यात हरि व हर दोघांचे एकत्रीकरण आहे, शिरी शिवपिंडी आहे. विष्णू प्रतीक म्हणून मकर कुंडले, कौस्तुभ मणी, उजव्या हाती कमलाचा देठ आहे, उजव्या वक्षस्थळी भृगूऋषींनी केलेल्या प्रहाराचे चिन्ह आहे, नाभीत ब्रह्म देवाचे जन्म स्थान आहे व कटिस मेखलारूपी करदोटा आहे. कृष्ण अवतारातील घुंगुरवाळी काठी व उजव्या हाती पांचजन्य शंख आहे. म्हणून समर्थ विचारतात देवा हे वेषांतर करून अबोल का आहात? 

अयोध्या नगरीचा विध्वंस पाहून समर्थ पंढरपुरी आले असल्यामुळे  देवाला विचारतात की देवा अयोध्या आपली राजधानी सोडून पंढरी का वसवली? अयोध्या ही राजधानी नावाप्रमाणेच अवध्य होती. शस्त्रास्त्र सज्ज नगरी होती. तेथील नागरिक, सुशील सात्विक सामर्थ्यशाली होते.  मोठे शक्तिशाली  सैन्य होते. या सा-याचीच आज अत्यंत गरज असताना इथे पंढरीत रामराजा काय करतो आहेस? 

पंढरी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी होती.अनेक संत इथे भक्तीभावाने येत व विठ्ठल चरणी लीन होत.समर्थ पंढरीचे महत्व जाणून होते. पण त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची नितांत आवश्यकता व तातडी जाणवलेली असल्याचे या अभंगातून दिसते. भक्ती उपासना निर्वेध चालवयाची असेल तर, समर्थ राज्य व्यवस्था रक्षणासाठी सुसज्जच असलीच पाहिजे. 

हा विवेक न राहिल्याने विजय नगर, देवगिरी व अयोध्या येथील हिंदु राजवटी धुळीस मिळाल्याची खंत समर्थ व्यक्त करीत आहेत, ते सारे प्रत्यक्ष अवलोकन करून श्रीसमर्थ श्रीविठ्ठलासमोर उभे होते. त्यांच्या मनातील आंदोलने व्याकुळता तळमळ हे सारे या अभंगात दिसून येते आहे.  जणु ते विठ्ठल रूपातील रामाला नेमकं ओळखून आठवण देतात की आपल्या वैभवशाली नगरीनजीक, गंगेसमान पवित्र व विशाल शरयू नदी होती. वानरांचा किलकिलाट होता आणि इथे मात्र शांतता जाणवते आहे. रामाने वानर म्हणजे वनवासी नरांना शस्त्रसज्ज व युद्ध सन्मुख केले व यशश्री तुम्ही सुद्धा मिळवू शकता असा दुर्दम्य विश्वास दिला. सद्यस्थितीत हेच बळ हाच दुर्दम्य आशावाद व हिंमत समाजाला देणारे युयुत्सु नेतृत्व हवे आहे व त्याचे प्रतीक        ‘राजाराम’ हे लोकांचे आराध्य दैवत असणे गरजेचे आहे हे श्रीसमर्थ सांगत आहेत.

इथे हनुमंत एकटा आहे. खरंतर तो वानरयुथ मुख्य आहे म्हणजे ससैन्य असला पाहिजे. दास मारुती भक्तीचे प्रतीक. तो एकटा असतो पण वीर मारुती हा ससैन्य व अग्रभागी असे याचेही स्मरण श्रीसमर्थ रामाला (विठ्ठलाला) व पर्यायाने समाजमनात असलेल्या जगदीश्वराला देत आहेत. त्याने योग्य तो बदल घडवून आणावा अशी विनंती केली आहे.

श्रीराम-जानकी हे शिव-शक्ती, माया-ब्रह्म, गणेश-शारदा असे ज्ञान व सामर्थ्य, बुद्धी व शक्तीस्त्रोत यांचे अविच्छिन्न स्वरूप आहे. इथे तर सीतामाई दिसत नाहीत. अनेक लोक मात्र दिसतात, असे समर्थ म्हणतात तेव्हा हे जन एका उद्दिष्टाने प्रेरित नाहीत, सुसंघटीत नाहीत, एकजिनसी नाहीत म्हणून शक्ती विखुरलेली आहे आणि  ती कार्यान्वित होत नाही हे समर्थ सांगत असावेत.

शेवटच्या दोन ओळीत समर्थ म्हणतात की खरा रामदासी रामरायाला ओळखतो. त्याने कितीही वेगळे रुप घेतले, स्थान बदलले, वेशभूषा बदलली तरी ओळख पटते. कारण रामदासी ‘वरवर’ पाहत नसून दैवतांची  ‘अंतरंग परीक्षा’  करणे जाणतो.

म्हणून सध्या रामराय पंढरीत विठ्ठल रूपाने स्थित आहेत हे श्रीसमर्थांनी ओळखले आहे. विठ्ठलरूप समोर दिसत असूनही त्यात अनुस्यूत असलेले ‘रामरुप परमचैतन्य’ ध्यानात घेऊन समर्थ त्याची पूजा बांधतात. अनेक रूपात एकच परमेश्वर अनुभवणे ही भक्तांची शक्ती आहे, सिद्धी आहे व त्याचे दर्शन या प्रस्तुत अभंगातून घडते.

(काव्याची काल निश्चिती :- श्री समर्थ पंढरपूरला परत शालिवाहन शके १५७१ च्या आषाढ महिन्यात गेल्याचा उल्लेख वाकेनिशी टिपण व बखर या दोन्हीत आला आहे. समर्थ कृष्णातीरी भ्रमण करत असताना वारकरी जथ्याने पंढरपूर येथे जात होते व त्यांनी समर्थांना आषाढवारी साठी बरोबर यायचा आग्रह केला. समर्थ श्रीरामा शिवाय इतर दैवता कडे जायला तयार नव्हते. पण विठ्ठल भट नावाच्या वृद्ध वारक-याने आग्रह केल्याने ते पंढरपूरला गेले आणि तिथे विठ्ठल दर्शन त्यांनी घेतले असा हा कथाभाग आहे. त्यावेळी हे काव्य समर्थांना स्फुरले.                 संदर्भ:-‘श्री दासायन’, ले. अनंतदास रामदासी, पान क्रमांक २०१ सर्ग, चापबाण काय केले)

||जय जय रघुवीर समर्थ||

Language