नरदेह एक रथ – उत्तरार्ध

मागील भागात आपण नरदेहाचे महत्त्व आणि नरदेहाची रथासोबत केलेली तुलना बघितली होती. यमराजांनी नचिकेतला रथाचे हे रूपक समजावून सांगितले होते. आज आपण या देहाला व्यवस्थित कसे सांभाळायचे आणि इंद्रियांवर नियंत्रण का आणि कसे ठेवायचे ते बघणार आहोत. ‘मी देहच आहे’ ही भावना माणसाच्या बंधनास कारणीभूत होत असते. विवेक करून ही भावना उकलावी. मी देह आहे ही भावना जीवाला बांधते, विवेक करून त्या बंधनातून मोकळे होता येते. आपण जर रथापाशी किंवा घोड्यांजवळच थांबून राहिलो तर रथाची वाताहात व्हायला वेळ लागणार नाही, हे आपण मागच्या भागात बघितले होते. स्वतःला देह समजणे कधीही घातकच आहे.

“देह मी वाटे ज्या नरा।  तो जाणावा आत्महत्यारा ।

देहाभिमानें येरझारा। भोगिल्याच भोगी ।।५-६-५५।।”

म्हणून माणसाने हे पक्के लक्षात ठेवावे की, हा देह मला भगवंताच्या प्राप्तीकरिता मिळाला आहे. त्याचा योग्य उपयोग मी केला पाहिजे. आपले मन आणि इंद्रियांवर देखील आपला ताबा हवा.

मन भलतीकडे धावें।तें विवेकें आवरावें।

इंद्रियें दमन करावें।तो सत्वगुण।।२-७-७०।।”

देह, इंद्रिये आणि प्राण यांच्यावर नीट नियंत्रण नसेल, तर आध्यात्मिक ताप होतात.

देह इंद्रिय आणी प्राण।यांचेनि योगें आपण।

सुखदुःखें सिणे जाण।या नाव आध्यात्मिक।। ३-६-१३।।”

अशी निरनिराळ्या प्रकारची दुःखे माणसाला विविध कारणांनी भोगावी लागतात. याची कारणे, ताब्यात नसलेली इंद्रिये आहेत. यमराजांनी नचिकेतला हे समजवून सांगितले आहे. केवळ शुद्ध आत्मा भोक्ता असू शकत नाही. शरीर, मन, इंद्रिये, बुद्धी यांनी युक्त असलेला आत्माच भोक्ता आहे असे मनीषी सांगतात. पण जे अविवेकी आहेत, ते गल्लत करून कधी शरीर आणि मनालाच कर्ता, भोक्ता मानतात तर कधी चैतन्य स्वरूप परमात्म्यालाच भोक्ता समजतात. आता या पुढील पाच मंत्रांमधून यमराजांनी नचिकेतला देह-इंद्रिये-मन-बुद्धी यांना योग्य वळण देण्याने मनुष्य अज्ञान दूर करून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी कसा योग्य बनतो, आणि जर त्याला योग्य वळण लावले नाही, तर कसा संसारात गुरफटतो याचे रहस्य उलगडून दाखविले आहे. या पाच मंत्रांना आता आपण बघणार आहोत –

यस्तु विज्ञानवान् भवति युक्तेन मनसा सदा।

तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथेः।।

यस्त्वविज्ञानवान् भवत्यमनस्कः सदाशुचिः।

न स तत्पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति।।

यस्तु विज्ञानवान् भवति समनस्कः सदा शुचिः।

स तु तत्पदमाप्नोति यस्माद भूयो न जायते।।

विज्ञानसारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान्नरः।

अर्थात् – जो बुद्धिरूप सारथी अविज्ञानवान (अविवेकी व असंयत) आहे, त्याच्या मनरूपी लगामावर त्याचा कधीच ताबा रहात नाही आणि मग नाठाळ घोडे जसे सारथ्याच्या नियंत्रणात रहात नाहीत, तशीच इंद्रिये देखील त्या सारथीरूपी बुद्धीच्या ताब्यात रहात नाहीत. जो बुद्धिरूप सारथी विज्ञानवान अर्थात कुशल आणि विवेकी आहे त्याचे मनरूपी लगाम देखील त्याच्या नीट ताब्यात रहातात. आणि मग चांगले घोडे जसे सारथ्याच्या नियंत्रणात रहातात, तशी इंद्रिये देखील त्या सारथीरूपी बुद्धीच्या ताब्यात रहातात. ज्याचा आपल्या बुद्धीवर ताबा नाही, किंवा ज्याची बुद्धी कुशल नाही, आणि ज्याचे मन देखील ताब्यात नसते व त्यामुळे जो सर्वदा अपवित्र असतो, तो या शरीररूपी रथाद्वारे आपल्या त्या परम पदाला न पोहोचता संसारातच भटकत रहातो. आणि ज्याची बुद्धी कुशल आणि आज्ञाधारक आहे, त्याचे मन देखील ताब्यात रहाते व तो सदा पवित्र जीवन जगतो. तो त्या परम पदाला प्राप्त करतो, जिथे गेल्यावर पुनः जन्म घ्यावा लागत नाही. ज्याच्या कुशल सारथ्याने मनरूपी लगामांना नीट ताब्यात ठेवले आहे, तो या संसाराच्या पलीकडे असलेल्या विष्णूच्या परम पदाला प्राप्त करतो.

एकंदरीत, माणसाने परमात्म प्राप्तीचे आपले लक्ष गाठायचे असेल, तर इंद्रियांवर योग्य नियंत्रण मिळवून मन आणि बुद्धीचा योग्य वापर करावा, असे यमराज या रथाच्या रूपकातून सांगत आहेत. माणसाने मी देह आहे असे मानण्यापेक्षा, मी आत्मा आहे असे मानले पाहिजे. रथापाशी किंवा घोड्यांपाशी थांबण्यापेक्षा, रथी असणारा जो जीवात्मा आहे, त्याच्याशी जवळीक करणे आवश्यक आहे.

हित आहे देहातीत।म्हणौनि निरोपिती संत।

देहबुद्धीनें अन्हित।होंचि लागे।।७-२-३७।।

देहबुद्धी आणि आत्मबुद्धी हे शब्द आपण नेहमीच वापरत असतो. निश्चय करणे हे बुद्धीचे लक्षण आहे. मी देह आहे, असा निश्चय करणे याला देहबुद्धी म्हणतात. मी ब्रह्म आहे, असा निश्चय करणे ही आत्मबुद्धी आहे. जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे आपले मन देहाला चिकटलेले असते, त्यामुळे मी देहच आहे असा आपला समज होतो. आपले अस्तित्त्व या देहाच्या पलीकडे आहे हे आम्हांला माहितच नसते. मनाने आपण देहापासून आणि इंद्रियांपासून निघून आत्म्याकडे जायला हवे आहे. देहबोध नाहीसा होणे हे साऱ्या साधनेचे फलित आहे.

देहचि होऊन राहिजे।तेणें देहदुःख साहिजे।

देहातीत होतां पाविजे।परब्रह्म तें।।८-८-२५।।

देहातीत वस्तु आहे।तें तूं परब्रह्म पाहें।

देहसंग हा न साहे।तुज विदेहासी।।८-८-२८।।

साधना करून साधकाने देहाचा संग सोडावा आणि आपण विदेही आहोत याची प्रचिती घ्यावी. मी देह नाही, मी देहाचा स्वामी आहे, हे कळले की इंद्रियांवर नियंत्रण रहाते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

नरदेह एक रथ – पूर्वार्ध

या मानव देहाला समर्थांनी घबाड, रत्नांची मांदूस आणि परलोकीचे तारू म्हटले आहे. नरदेह इतका महत्त्वाचा आहे, की समर्थांनी नरदेह स्तवनाचा एक समासच दासबोध या ग्रंथात रचला आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या १३ व्या अध्यायात शरीराला क्षेत्र म्हटले आहे, तर जीवात्म्याला क्षेत्रज्ञ म्हणजे या क्षेत्राचा मालक म्हटले आहे.

“शरीरासारिखें यंत्र । आणीक नाहीं”

अशी ग्वाही समर्थ देतात. कठोपनिषदात तर शरीराला रथाची उपमा देऊन त्या रूपकाचे माध्यमातून मन, बुद्धी आणि इंद्रियांचे व त्यांचे विषयांचे महत्त्व समजून सांगितले आहे. समर्थ दासबोधात म्हणतात,

“धन्य धन्य हा नरदेहो।येथील अपूर्वता पाहो।

जो जो कीजे परमार्थलाहो।तो तो पावे सिद्धीतें।।१-१०-१।।”

या नरदेहाच्या सहाय्याने परमार्थ लाभावा म्हणून केलेले सारे प्रयत्न यशस्वी होतात, हे समर्थ या ओवीच्या माध्यमातून आपल्याला सांगत आहेत. माणसाच्या शरीराचा, आणि विशेषतः मनाचा कल्पनातीत विकास करता येतो. मनुष्याचा मेंदू इतर प्राण्यांच्या तुलनेत लहान दिसत असला, तरी तो सर्वात उत्तम मेंदू आहे. विलक्षण सामर्थ्य या मानवी मेंदूत साठविलेले आहे. याच्या बुद्धीमत्तेची आणि कल्पनाशक्तीची तर करावी तेवढी प्रशंसा कमीच आहे. साडे तीन हाताचा हा माणूस जगातील सर्व जीवसृष्टीवर आणि निसर्गावर प्रभुत्व गाजवित आहे. पण या मानव देहाचे सार्थक मात्र, आपल्यातील परमात्मा ओळखण्यात आहे. आणि हे आव्हान देखील पेलण्यास हा मनुष्य तयार आहे, नव्हे नव्हे त्याने ते साध्य केले आहे.

“या नरदेहाचेनि संमंधें।बहुत पावले उत्तम पदें।

अहंता सांडून स्वानंदें।सुखी जाले।।१-१०-१९।।”

इतके असून देखील कित्येक लोक या नरदेहाचा योग्य वापर करीत नाहीत. असे का होत असेल ? तर, या देहाबद्दल असलेले अज्ञान. अद्भूत असे घबाड आपल्याला मिळाले आहे, पण आपली गत त्या करंट्यासारखी आहे, ज्याचे घरात सर्वत्र धन पुरून ठेवले आहे, पण त्याला ते माहितच नाही. ही माहिती आपण करून घेणे आवश्‍यक आहे. अन्यथा आपण देखील करंटेच ठरू. ही माहिती समर्थांनी दासबोधात दिलेली आहे. दशक एक समास दहा आणि दशक सात समास दोन मध्ये याचे उत्तर आपल्याला गवसते.  याशिवाय कठोपनिषदातील यमराज आणि नचिकेत यांच्या संवादाच्या माध्यमातून हे जाणून घेता येते. कठोपनिषदात नरदेहाला रथाची उपमा दिलेली आहे. हा रथ कसा आहे, त्याचा सारथी कोण, घोडे कोण वगैरे बाबी आज आपण समजून घेऊया.

एक सात-आठ वर्षाचा बालक यमराजाकडे येतो आणि आत्मज्ञान मागू लागतो. हा बालक खरोखर आत्मज्ञान प्राप्त करण्यास लायक आहे किंवा नाही याची परीक्षा घेऊन यमराज त्याला आत्मज्ञान देण्यास तयार होतात. नचिकेतला आत्मज्ञान देण्याआधी यमराज प्रथम त्याला श्रेयस आणि प्रेयसाची तसेच इतर माहिती देऊन, आता देह-देही संबंध विषद करणारे रथाचे रूपक सांगतात. हेच रूपक आपण समजून घेणार आहोत. यमराज नचिकेतला सांगतात.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु।

बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च।।

इन्द्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान्।

आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः।।


हे नचिकेता, आत्म्याला रथात बसून प्रवास करणारा रथाचा स्वामी जाण. शरीर हाच तो रथ होय. बुद्धी त्या रथाचे सारथ्य करीत असून, मन हा लगाम आहे असे समज. इंद्रिये त्या रथाचे घोडे आहेत असे सांगितले जाते. विषय हे त्यांचे मार्ग आहेत. मनीषी सांगतात की, इंद्रिये व मन यांनी युक्त आत्माच भोक्ता होय. आपण आधी, देह; मन यांनी युक्त आत्मा म्हणजे काय ते बघू. जाणिवेच्या गुहेत दोन आत्मे वास करतात. पैकी, एक परमात्मा असून, दुसरा शरीर मनादी मध्ये त्याचे पडलेले प्रतिबिंब, म्हणजेच जीवात्मा आहे. हा जीवात्मा स्वतःला देह-मनयुक्त मानतो आणि सुख-दुःखांचा भोग घेतो. त्यामुळेच तो जन्म-मरणाला प्राप्त होतो. हा जीवात्मा विविध शरीरांमध्ये सुख-दु:ख भोगत असतो. हाच जीवात्मा जर स्वतःला शरीर-मनादीपासून भिन्न मानेल, तर तो स्वतःच्या प्रयत्नाने मुक्त देखील होऊ शकतो. मुंडक उपनिषदात या दोन आत्म्यांना, एकाच शरीररूपी वृक्षावर बसलेल्या, एकमेकांचे मित्र असणाऱ्या दोन पक्षांची उपमा दिली आहे. त्यातील वरचा पक्षी फक्त साक्षी भावाने खालच्या पक्षाकडे बघत आहे आणि खालचा पक्षी मात्र त्या वृक्षाची कडू-गोड फळे चाखत असतो. फळे चाखणारा हा, जीवात्मा तर वरचा पक्षी परमात्मा आहे.

रथाच्या रूपकात, आपण; आपले शरीर; आपली बुद्धी; आपले मन; आपली इंद्रिये आणि या इंद्रियांचे विषय या सर्व भिन्न भिन्न, पण एकमेकांशी संबंधित गोष्टींचा ऊहापोह ऋषींनी केलेला आहे. या दोन आत्म्यापैंकी जो शरीरादी उपाधींशी जोडला गेलेला आहे, असा संसारी जीवात्मा स्वतःच्या प्रयत्नाने मुक्तीकडे अथवा बंधनाकडे जाऊ शकतो. या दोन्हीकडच्या प्रवासासाठी तो शरीर व मनाचा रथाप्रमाणे वापर करतो. 

हाच जीवात्मा ‘आत्मानं रथिनं’ आहे. हा रथाचा स्वामी, स्वतःला या रथाहून वेगळा समजतो, आपण त्या रथाचे मालक असल्याचे तो समजतो. तो साक्षी आहे, द्रष्टा आहे. तेच परम तत्त्व आहे. हा रथ म्हणजे आपले शरीर होय. आता हा रथ ओढण्यास घोड्यांची आवश्‍यकता असते. आपली इंद्रिये म्हणजे घोडे आहेत तर लगाम म्हणून मन कार्य करीत असते. या लगामाच्या सहाय्याने घोड्यांना हव्या त्या दिशेने, हव्या त्या मार्गावर आणि आवश्‍यक त्या गतीने नेण्याचे काम  सारथी करतो. हे मार्ग म्हणजे विषय आहेत. प्रत्येक इंद्रियांचा एक एक विषय आहे. त्यामुळे ही इंद्रिये रथाला आपापल्या विषयांकडे ओढायचा प्रयत्न करतील, त्यांनी स्वैर जाऊ नये म्हणून बुद्धीरूपी सारथी, मनरूपी लगाम हाती धरून ठेवतो. सारथी हा रथाच्या गतीचे आणि दिशेचे नियंत्रण करीत असतो.

सारथी रथाचे नियंत्रण स्वामीच्या इच्छेनुसार करतो. आम्ही ना स्वामीला ओळखत, ना सारथ्याला ओळखत. आम्ही रथाजवळ आणि घोड्यांजवळच थांबून असतो. रथाला उगीचच सजवायचा आपण प्रयत्न करीत असतो. हे घोडे आपापल्या आवडीच्या विषयांकडे धावायचा प्रयत्न करतात, आणि मग रथाची वाताहात होते. म्हणून लगाम चांगले हवे आणि सारथी सक्षम हवा. अन्यथा आपले जीवन, कलह आणि द्वंद्वाने भरून जाईल. घोड्यांकडून आपले लक्ष काढून बुद्धीकडे नेलं तर रथावर योग्य नियंत्रण मिळविता येईल. आणि सारथ्यापेक्षाही जर आपले लक्ष रथाच्या स्वामीकडे नेले, तो साक्षी असल्यामुळे आपण आपल्या जीवनाचे स्वामी होऊ शकू. आपल्या लक्षात येईल की आपणच सम्राट झालो आहोत. आपल्या जीवनात पीडा, दुःख रहाणारच नाहीत. केवळ शुद्ध आत्मा, भोक्ता असू शकत नाही. शरीर, मन, इंद्रिये, बुद्धी यांनी युक्त असलेला आत्माच भोक्ता आहे असे मनीषी सांगतात. पण जे अविवेकी आहेत, ते गल्लत करून कधी शरीर आणि मनालाच कर्ता; भोक्ता मानतात, तर कधी चैतन्य स्वरूप परमात्म्यालाच भोक्ता समजतात. सारे सुरळीत असेल तर हा रथ नीट चालून आपल्या गंतव्य स्थळी सुखरूप पोहोचेल. पण जर यातील एक किंवा अधिक घटक नियंत्रणाबाहेर गेले तर काय होते ? ते आपण पुढील भागात बघणार आहोत.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

जालें साधनाचें फळ

श्रीसमर्थांचे वाङ्मय अफाट आहे. एका जन्मात त्याचा अभ्यास होणे तर केवळ अशक्य आहे. दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक हे ग्रंथ श्रीसमर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहेत. वीस दशक आणि दोनशे समासाचा श्रीमत् दासबोध तर अप्रतिम ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या अखेरच्या ओव्यांमध्ये एक महत्त्वाची ओवी येते. ग्रंथ किंवा समास वाचन झाल्यावर ज्या बारा ओव्या अखेरीस म्हणण्याची प्रथा आहे, त्यातील ही पहिलीच ओवी आहे.

“जालें साधनाचें फळ | संसार जाला सफळ |

निर्गुणब्रह्म तें निश्चळ  | अंतरीं बिंबलें ||२०–१०–२६||”

श्रीसमर्थांनी दासबोध ग्रंथाची फलश्रुती पहिल्याच दशकाच्या पहिल्या समासात सांगितली आहे. आणि या ओवीपासून श्रीसमर्थ आपल्याला काय काय मिळाले याची यादी या ठिकाणी देत आहेत. साधनेचे पूर्णत्व इथे सांगितले गेले आहे. ज्या कोणी श्रद्धेने आणि मनापासून हा ग्रंथ वाचला असेल त्याला याचा अनुभव निश्चित मिळेल. या आधीच्या २५ व्या ओवीमध्ये श्रवण, मननाने विवेक साधतो हे सांगितले आहे. श्रवण, मनन आणि स्वानुभव याद्वारे ज्ञानाचे विज्ञान होते, उन्मनी अवस्था प्राप्त होते. ज्याला उन्मनी अवस्था साधली त्याला साधनेचे फळ मिळाले. निश्चल व निर्गुण ब्रह्म त्याच्या अंतरंगात प्रतिबिंबित झाले. अंतःकरणात ब्रह्म बिंबणे हेच आत्मज्ञान होय. आत्मज्ञान प्राप्त करणे हेच माणसाचे ध्येय आहे.

आत्मज्ञान झाले की निर्गुण ब्रह्म निश्चळ अंतरी बिंबते. या ठिकाणी ब्रह्म निश्चळ आणि निर्गुण आहे असा अर्थ घेता येईल किंवा ब्रह्म निर्गुण आहे आणि अंतःकरण निश्चळ आहे असेही म्हणता येईल. त्या निश्चळ अंतःकरणात निर्गुण ब्रह्म बिंबले असाही अर्थ घेता येईल. ब्रह्म अंतःकरणात बिंबून आत्मज्ञान होणे हेच साधनेचे फळ आहे. इथे मायेचा निरास होतो. सारी तत्त्वे अशाश्वत आहेत हे पटलेले असते. साध्य पदरात पडून सारी साधना विराम पावते. दासबोध ग्रंथ म्हणजे काय असेल ? या ग्रंथाचे कर्तेपण श्रीसमर्थ स्वतःकडे मुळीच घेत नाहीत. श्रीसमर्थ म्हणतात,

“भक्ताचेनि साभिमाने  | कृपा केली दाशरथीने  |

समर्थ कृपेची वचने | तो हा दासबोध ||२०–१०–३०||”

श्रीसमर्थांनी साधना काळात आणि त्यानंतर देखील शास्त्र ग्रंथांचा आणि उपनिषद, रामायण, महाभारत, भागवत आदि ग्रंथांचा भरपूर अभ्यास केला होता. या साऱ्या ग्रंथांचे सार दासबोध ग्रंथात असल्याचे आढळून येते. हा ग्रंथ म्हणजे वेदांत संमतीचा काव्यसिंधू आहे. श्रीसमर्थ याच समासात म्हणतात,

“वीस दशके दोनीसें समास | साधकें पाहावें सावकाश  |

विवरतां विशेषा विशेष | कळों लागें || २०–१०–३२ ||”

श्रीसमर्थांचा खरा भर “विवरतां विशेषा विशेष” वर आहे. या ग्रंथाला जितके जास्त वेळा अभ्यासाल तितका गहन अर्थ सापडत जाईल. दासबोध हा केवळ पारायणाचा ग्रंथ नसून सखोल अभ्यासाचा ग्रंथ आहे. हा बासनात बांधून ठेवायचा ग्रंथ नाही, अभ्यास आणि त्यानुसार साधना अपेक्षित आहे.

साधना सुरू करण्यापूर्वी हा संसार सत्यच वाटत असतो. मनुष्य संसाररूपी मृगजळाच्या मागे ऊर  फाटेपर्यंत धावत असतो. भ्रमाच्या भोवर्‍यात तो वारंवार अडकत रहातो आणि त्याला योग्य वाट मात्र गवसत नाही. साधना पूर्ण होताच त्याचे मृगजळ रूपी हे स्वप्न संपुष्टात येते.

“स्वप्नी जें जें देखिलें | तें तें जागृतीस उडालें  |

सहजचि अनुर्वाच्य जालें | बोलता न यें ||२०–१०–२८||”

मनुष्याला सुरूवातीला मूळमायेपासून चार खाणीपर्यंत साऱ्या गोष्टी सत्य वाटतात, माणूस पूर्णपणे ऐहिक सुख-दुःखामध्ये अडकलेला असतो. साधना करता करता हे सारे विश्व भ्रामक आहे हे लक्षात येते आणि हा साधक मग साध्य गाठायच्या प्रयत्नाला लागतो. स्वप्नात बघितलेले सारे जाग येताच नाहीसे होते, तद्वतच मायेचा निरास झाला की या जगताचे मिथ्यत्व लक्षात येऊ लागते. हे स्वप्न बघणारा जीव, स्वप्न विसरतो आणि अनिर्वचनीय परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतो.

साधकाने मी देह आहे या भूमिकेतून साधना सुरू केली होती. श्रीसमर्थांचा हात धरून ग्रंथ वाचता वाचता एकोणीसावा दशक देखील संपला. अशाश्वत आणि अपूर्ण असे दृश्य बाजूला सारून आता वाटचाल पूर्ण झाली आहे. आणि मी ब्रह्म आहे असा साक्षात्कार झाल्यामुळेच जीव समाधान पावला आहे. या विसाव्या दशकात शाश्वत आणि पूर्ण ब्रह्मवस्तूचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन या जीवाला पूर्णत्व प्राप्त झाले आहे. मला देव हवा ही इच्छा मनाशी धरून साधनेत एक एक पाऊल टाकत हा जीव पुढे गेला. मी कर्ता आहे, मी ते प्राप्त करून घेईन अशी आशा आणि जिद्द मनात होती. पण विसावा दशक येण्यापूर्वीच मी कर्ता नाही, तोच कर्ता आहे ही खात्री पटली. अंतरात्मा किंवा जगदीश्वर कर्ता आहे हे प्रस्तुत दशकात कळायला लागले. अज्ञान अवस्थेत दासबोध हाती घेतला आणि पहाता पहाता ज्ञान दशा प्राप्त झाली. अज्ञानाचे निरसन झाले. ज्ञानक्रिया पूर्ण होत ज्ञानाचे विज्ञान देखील झाले.

या विश्वात वस्तूचे दोन प्रकार आहेत. एक चंचळ आणि दुसरे निश्चळ. चंचळ अंतःकरण प्रथम स्थिर, निश्चळ होते आणि त्यात निश्चळ परब्रह्म बिंबल्यावर पूर्ण विश्रांती लाभते. परब्रह्म अपरंपारपणाने सर्वत्र भरलेले आहे. चंचळ दृश्य त्यावर झाकण घालते. खोल आणि सूक्ष्म विचाराने दृश्य बाजूस सारावे आणि निश्चळ परब्रह्माची भेट घ्यावी. ज्याप्रमाणे रिकामे आकाश चोहीकडे असते त्याचप्रमाणे चंचळ मूळमाया उत्पन्न होण्यापूर्वीच निर्गुण ब्रह्म निश्चळपणे असत असते. दृश्य विश्व आले आणि गेले तरी निश्चळ ब्रह्म जसेच्या तसेच साचलेले रहाते. ज्याप्रमाणे अवकाशमय आकाश सर्वत्र कोंदाटलेले असते, त्याच प्रमाणे परब्रह्म सर्वत्र साठलेले असते. परब्रह्माला ज्या बाजूने पहावे त्या बाजूने ते अपार असते. त्याचा अंत कोणत्याही बाजूला लागत नाही. परब्रह्म अगदी एकजिनसी आहे, स्वतंत्र आहे. त्याच्यावाचून दुसरे काहीही नाही. साधकाने विवेकाने ब्रह्मांडाच्या पलिकडे जावून तेथून ब्रह्मांड झालेच नाही अशी कल्पना करावी. केवळ अवकाशमय रिकामे आकाश पहावे. विश्वाला व्यापून असणारा चंचलपणा तेथे नाहीसा होईल, शून्यवत होईल. नित्यानित्याचा विवेक करून दृश्य नाहीसे करावे. मग सर्वत्र परब्रह्म भरून असल्याचा अनुभव येईल. पण या ब्रह्माची संपूर्ण कल्पना कोणालाही कधीच करता येणार नाही.

ग्रंथराज दासबोधाचा पहिला समास हा प्रस्तावनेचा आहे. याच समासात श्रीसमर्थांनी ग्रंथाची फलश्रुती दिलेली आहे. ग्रंथाच्या सुरूवातीलाच श्रीसमर्थ म्हणतात,

“ग्रंथानाम दासबोध | गुरुशिष्यांचा संवाद  |

येथे बोलिला विशद | भक्तिमार्ग ||१–१–२||

नवविधा भक्ति आणी ज्ञान  | बोलिलें वैराग्याचे लक्षण |

बहुधा अध्यात्मनिरोपण | निरोपिले ||१–१–३||

भक्तिचेनि योगे देव | निश्चये पावती मानव |

ऐसा आहे अभिप्राव  | इये ग्रंथी ||१–१–४||”

ही फलश्रुतीच सांगते की दासबोध अभ्यास आणि त्या अनुषंगाने साधना केल्यास आत्मज्ञान नक्की प्राप्त होईल. श्रीसमर्थ आयुष्याच्या अखेरीस म्हणतात की,

“नका करू खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |

तेणे सायुज्यतेची वाट | गवसेल की ||”

 

|| जय जय रघुवीर समर्थ ||

साधनेची आवश्यकता

शरीर व मनाची शुद्धी : 

समर्थांनी मानव शरीराला घबाड म्हटले आहे. केवळ मानवी शरीराद्वारेच भगवंताची प्राप्ती होऊ शकते. अन्य कोणतेही शरीर या कामास उपयुक्त नाही. म्हणूनच तर “या शरीरा ऐसे यंत्र आणीक नाही” असे समर्थ म्हणतात. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याकरिता स्वस्थ शरीर आणि स्वस्थ मन दोन्ही आवश्यक आहेत. मन चंचल आहे ही तक्रार तर अर्जुन गीतेमध्ये करतो आणि यावर उपाय म्हणून “अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते ॥ ” असा उपाय भगवंत सांगतात. मन स्वस्थ ठेवायचा अभ्यास करायचा असेल तर मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवायला हवेत. आज आपण शरीर आणि मनाच्या शुद्धीचे उपाय थोडक्यात बघणार आहोत.

 

मन आणि शरीर : 

मन आणि शरीर हे वेगवेगळे नाहीत, ते एकमेकांशी संलग्न आहेत. ते सायकोसोमेटिक आहे. आपले शरीर व मन एकत्रच आहेत. शरीराचा अत्यंत सूक्ष्म भाग मन आहे तर मनाचा स्थूल भाग शरीर आहे. एक लक्षात ठेवलं पाहिजे की मन-शरीर हे वेगळे नाहीत. म्हणून जे शरीरात घडते, त्याचे परिणाम मनात प्रतिध्वनित होतात. आणि जे मनात घडते त्याचे परिणाम शरीरावर पहायला मिळतात. मन जर आजारी असेल तर शरीर अधिक काळ स्वस्थ्य राहू शकणार नाही. शरीर आजारी झाले तर मन अस्वस्थ होईल.

 

शरीर शुद्धीचे उपाय :

शरीराला जे होते त्याचे परिणाम मनावर आणि मनाला जे होते त्याचे परिणाम शरीरावर होत असतात. आपण जसा आहार घेऊ तसे मन बनते. म्हणून आहारात विवेक बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायात आहार, विहार, कर्म आणि निद्रा यांचे योग्य असणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे.

“युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ।। गीता ६-१७।।”

अर्थ – “दुःखांचा नाश करणारा योग तर यथायोग्य आहार आणि विहार करणाऱ्यांना, कर्मात यथायोग्य व्यवहार करणाऱ्यांना तसेच यथायोग्य झोप व जाग्रण करणाऱ्यांना सिद्ध होतो.”  

भोजन कसे असावे ? – सत्य आणि न्यायाने मिळविलेल्या धनातून मिळविलेले भोजन असावे. ते सात्विक, पवित्र असावे, स्वादबुद्धी अथवा पुष्टबुद्धीने भोजन करू नये. तर ते साधन बुद्धीने केले जावे. जितके सहज पचेल तेवढेच भोजन घ्यावे. भोजन शरीराला अनुकूल, हलके, आणि मित असावे. भोजन केल्यावर आळस येऊ नये, अशा प्रकारे केलेले भोजन यथोचित, शुद्ध आहार म्हटले जाते. विहार म्हणजे चालणे-फिरणे व व्यायाम. स्वास्थ्यासाठी हितकर असेल तेवढे चालावे, व्यायाम व योगासने देखील योग्य प्रमाणात असायला हवीत.

 

कर्म : 

आपल्या वर्णाश्रमाला अनुकूल, देश, काल, परिस्थितिनुसार शरीर निर्वाहासाठी कर्म करणे आवश्यक आहे. यथाशक्ति कुटुंबियांची आणि समाजाची हित बुद्धीने सेवा करावी. परिस्थितिनुसार जे शास्त्र विहित कर्म आपल्या वाट्याला येईल ते प्रसन्नचित्ताने करावे. याला युक्तचेष्ट म्हणतात.

 

निद्रा :

झोप इतकीच असावी की जाग आल्यावर निद्रा किंवा आळसाने सतावू नये. दिवसा जागत रहावे व रात्रीच्या मध्यकाली झोप घ्यावी. रात्री लवकर झोपावे व प्रातःकाली लवकर उठावे म्हणजे स्वास्थ्य उत्तम राहिल. उत्तम मनःस्वास्थ्य आणि शरीर स्वास्थ्य सकाळी लवकर उठणे व व्यायामाने प्राप्त होते. ह्यातील आहार, विहार आणि निद्रा हे उपाय शरीर शुद्धीचे आहेत. साधकाला शरीर शुद्धीचे उपाय करणे आवश्यक आहे. या शिवाय विचार शुद्धी आणि भाव शुद्धी देखील साधनेसाठी आवश्यक आहे. त्यांची चर्चा आपण पुढे करणार आहोत.

 

भाव शुद्धी :

साधनेसंबंधी आता आपण भाव शुद्धीवर चिंतन करणार आहोत. साधनेमध्ये भाव शुद्धी सर्वाधिक महत्वपूर्ण आहे. शरीर आणि विचार या दोहोंपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. गरूड़ पुराणात एक सुभाषित येते.

 

“न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये ।

भावे तु विद्यते देवस्तस्मात् भावो हि कारणम् ।।”

देव लाकडात, पाषाणात किंवा मातीत नसतो, देव भावात असतो म्हणून भावच कारण आहे. ‘भाव तेथे देव’ ही म्हण आपल्याला माहित आहे. माणसाचं जीवन विचाराने कमी तर भावाने अधिक व्यापलेले असते. मनुष्य बुद्धिमान प्राणी जरूर आहे पण त्याचे भाव विश्व त्याच्या बुद्धीवर, विचारांवर मात करते. तुमचे दैनंदिन जीवन व्यतीत करतांना कित्येक वेळा भावना तुमच्या विचारांवर मात करतात. आपण घृणा करतो, क्रोध करतो, प्रेम करतो हे सारे करतांना भावना प्रबळ असतात, विचार तिथे गौण ठरतात.

 

जीवनातील अधिकांश क्रिया आपल्या भावनांवर अवलंबून असतात. काय होतं की, कधी कधी आपण विचार करून एक निर्णय घेतो पण प्रत्यक्ष कार्य घडतांना वेगळेच कार्य घडते, याला ऐनवेळी आलेल्या भावना कारणीभूत असतात. मी आज क्रोध करणार नाही हे ठरवतो. क्रोध वाईट आहे, पण प्रसंग असा येतो की आपले विचार आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही व नकळत आपण क्रोध करून जातो. भावनेच्या विश्वात जोपर्यंत आपण परिवर्तन घडवून आणत नाही तोपर्यंत विचारांचा उहापोह काहीही कामाचा नाही. म्हणून भावनांना फारच महत्व आहे. भाव शुद्धी फार आवश्यक आहे.

 

भावाच्या विविध दिशा आहेत, त्यातील चार दिशा महत्त्वाच्या आहेत. अशुद्ध भावांचा उदय याच चार तत्वांपासून होत असतो. हे चार भाव असे –

प्रथम भाव : मैत्री.

द्वितीय भाव : करूणा.

तृतीय भाव : प्रमुदिता अर्थात् आनंदाचा बोध, प्रसन्नता, प्रफुल्लता.

चतुर्थ भाव : कृतज्ञता.

हे चार भाव जी व्यक्ति आपल्या जीवनात आणू शकेल त्याला भाव शुद्धी उपलब्ध होऊ शकेल. ज्याचे जीवनात याचे विपरीत भाव असतील त्याचे भाव अशुद्ध आहेत असे समजावे. कोणते आहेत ते अशुद्ध भाव ? मैत्रीच्या विरूद्ध घृणा किंवा वैर. करूणाच्या विरूद्ध क्रूरता, हिंसा, अदया. प्रमुदिताच्या विरुद्ध उदासी, विषाद, संताप. आणि कृतज्ञतेच्या विरूद्ध अकृज्ञता. आमच्या भावाचे विश्व कोणत्या गोष्टींनी प्रभावित आहे ? आमच्या जीवनात मैत्रीपेक्षा वैर प्रभावी ठरते काय ? क्रोधात शक्ती असते पण मैत्री मध्ये देखील शक्ती आहे. आपण मैत्रीची शक्ती वापरू इच्छित नाही काय ? असे असेल तर आम्ही जीवनाच्या फार मोठ्या लाभापासून वंचित ठरतो. महावीर, बुद्ध आणि येशू यांनी मैत्रीच्या शक्तीला प्रतिष्ठित केले. साधारण मनुष्य जेव्हा शत्रुत्वाच्या भावात असतो तेव्हा तो बलवान असल्याचे त्याला जाणवते. या उलट जेव्हा तो कोणा प्रति शांत किंवा प्रेमाने भरलेला असेल तेव्हा तो त्यापेक्षा कमजोर असल्याचे त्याला आढळते. याचा अर्थ असा आहे की हा मनुष्य जेव्हा शत्रुत्वाच्या भावात असेल तेव्हा तो अशुद्ध भावाने प्रभावित झालेला असतो. असा मनुष्य स्वतःच्या अंतरंगात जाऊ शकत नाही. शत्रुत्व बाह्यकेंद्रित असते. कारण शत्रु बाहेर असतो, आत नसतो. या उलट प्रेम हे हृदयात असते. कोणी असो वा नसो हृदय प्रेमाने भरून राहू शकते. म्हणून प्रेम हे अंतर्केंद्रित असते. मैत्री अंतरकेंद्रित असते. प्रेम हे दिव्याच्या प्रकाशासमान असते. कोणी असो वा नसो दिवा प्रकाश देणारच. प्रेमाची देखील अशीच वृत्ती असते. साधूचे मन प्रेमाने भरलेले असते. समोर प्रेम घेणारा असो अथवा नसो प्रेम ओसंडून वहात असते. प्रेम उचंबळून आले की द्यावे लागते, घेणारा समोर असो नसो, साधूचा स्वभाव प्रेम वाटणे असतो.

 

साधकाला साधना करतांना या शुद्धींचे भान ठेवणे आवश्यक आहे. या शुद्धी साधणारा साधक लवकर प्रगती करीत असतो. शरीर, मन किंवा भाव शुद्ध नसतील तर साधनेमध्ये प्रगती होणे दुरापास्त आहे.

Language