भगवती सीता

भारतीय जीवनाचा अंतीम आदर्श म्हणजे सीता ! महात्मा गांधीना प्रार्थनेनंतर एकीने प्रश्न विचारला की, “आम्ही स्त्रियांनी आमच्या जीवनात कोणाचा आदर्श ठेवावा ?” गांधीजी म्हणाले, “तुम्हीच काय पण जगातील कोणत्याही स्त्रीने सती सीतेचा आदर्श ठेवावा.” लगेच तिने विचारले की, “पुरुषाने रामाचा आदर्श ठेवावा का ?” गांधीजी “नाही” म्हणाले. पुढे ते म्हणतात, “माझा असा विश्वास आहे की सीतेच्या जीवनातून राम जन्माला येतो. रामाच्या जन्मासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.” 

जनकराजांना एकदा भूमी नांगरताना एक लाकडाची पेटी मिळाली. त्यात अत्यंत सुंदर, तेजस्वी मुलगी होती. नांगराच्या फाळाच्या टोकाला सीत म्हणतात. भूमीत सीत अडकून पेटी मिळाली म्हणून नाव पडले सीता. जनकाची मानसकन्या म्हणून जानकी, मिथिलेची राजकन्या म्हणून मैथिली आणि विदेहराजाची लाडकी कन्या म्हणून वैदेही! 

रामायणात सीतेचा उल्लेख प्रथम सीता स्वयंवराच्यावेळी आला. राम लक्ष्मण मिथिलेत विश्वामित्रांबरोबर आले असताना, दोघे भाऊ गुरुदेवांना पूजेसाठी फुले आणायला म्हणून बागेत गेले होते. तिथे राम-सीता प्रथम भेटले. पाहता क्षणीच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वयंवरासाठी जनक राजाने एक कठीण पण लावला होता. शिवधनुष्याला जो भंग करेल त्याला सीता द्यावयाची. शिवधनुष्याला उचलणे महा सामर्थ्यवान मनुष्याला देखील शक्य नव्हते. परंतु रामाने त्याचा भंग केला. सुवर्णासारख्या तेजस्वी व्यक्तीला जनकाने सीतेसारखे लावण्यरत्न अर्पण केले. 

दांपत्य जीवनाचे सर्व गुण राम-सीतेजवळ होते. राम-सीता सामान्य व्यक्ती नव्हत्या. रामापुढे सीतेला जगातल्या सर्व गोष्टी, स्वर्ग आणि मोक्ष सुद्धा तुच्छ होत्या. रामाची सुद्धा सीतेविषयी तीच भावना होती. सासरी जाताना सीतेची आई, सुनयनाने केलेला उपदेश खूप छान आहे.

१. घरातील सर्व मोठ्या लोकांची सेवा कर.

२. ‘सम्राज्ञी श्वशुरे भव’ – तू घराची सम्राज्ञी व्हावेस.

३. रामाने दुसरे लग्न केले तरी तू सवती बरोबर बहिणीसारखी वाग.

४. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असे समजू नकोस.

५. एखाद्या गोष्टीला जर तुझ्या पतीने नकार दिला तर एकदम चिडू नकोस. तू शांत रहा.

६. हात उदार ठेव.

७. अन्नदान उत्तम दान समज.


एक मुलगा चांगला निघाला तर कुळाचा उद्धार होतो पण एक मुलगी चांगली निघाली तर ती दोन्ही कुळांचा उद्धार करते. अयोध्येत आल्यावर राम सीतेने बारा वर्ष तेजस्वी संसार केला. जगात सौंदर्य आणि गुण एकत्र आलेले क्वचितच पहायला मिळतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सीता ! सीता तिन्ही सासवांची लाडकी सून होती. सर्वांनाच ती आदर्श स्त्री वाटायची. 

सीतेच्या महालात, राम ‘वनात जायला निघालो’ हे सांगायला आणि तिचा निरोप घ्यायला जातो. अगं सीते, मला आता अयोध्येचे नाही; वनाचे राज्य मिळालं आहे; हे सांगताना कधीचे आवरून धरलेले अश्रू रामाच्या डोळ्यात आले. ते बघून सीता रामाला म्हणते, “अहो, रडता कशाला ? जेथे राघव तेथे सीता ! तुम्ही बरोबर असल्यावर अयोध्या काय किंवा वन काय ? दोन्हीही सारखेच. नाथ ज्या दिवशी दैवाने तुमच्याशी माझी गाठ घालून दिली ती सुखदुःखात साथ देण्यासाठीच. जंगलातल्या वाघ सिंहाची भीती मला दाखवू नका. बाहुबलाने, एका स्त्रीचे रक्षण करायला असमर्थ असल्यामुळे राम सीतेला वनात बरोबर घेऊन गेला नाही; अशी बेअब्रू होऊ नये म्हणून मला यायलाच हवे.” राम म्हणतो, “माझ्या बरोबर यायचे असेल तर सर्व संपत्ती त्यागावी लागेल.” भारतातील पतिव्रता दुबळी नाही. सीतेने सर्व संपत्तीचे दान दिले परंतु, राजस्नुषा असल्यामुळे वसिष्ठांच्या आज्ञेप्रमाणे सीता सौभाग्य अलंकार घालून बाहेर पडली.

गंगापार केल्यावर केवटाला द्यायला हातातील अंगठी काढून सीतेने रामाला दिली. वाटेत ते अत्रि-अनुसूयेच्या आश्रमात येतात. अनसूया सीतेला विचारते, “काय देऊ ?” सीता म्हणते, “मला काही नको. ज्याला काही कमी असते ती मागते. पतीच्या सहवासात माझ्या जीवनात कोणतीच उणीव नाही. मी क्षत्रिय आहे, दान घेण्यासाठी माझा हात खाली येणार नाही. दान देण्यासाठी हात वर राहील” असे बाणेदार उत्तर सीता देते. 

सीतेच्या बुद्धीप्रगल्भामुळे रामाला अनेक वेळा तिच्याबरोबर शास्त्रार्थांची, सिद्धांताची चर्चा करावी लागत असे. रावण सीतेला घेऊन जातो त्यावेळी रावण सीतेला म्हणतो, “राम क्षुद्र आहे, मी किती मोठा आहे. लंकेत सर्व देव माझी शुश्रुषा करीत आहेत.” सीता म्हणते, “तू कोल्हा आहेस पण मी सिंहीण आहे. देव तुला मारू शकत नसले तरी सुद्धा माझा राम तुला मारील.” केवढी निर्भयता ! रामाच्या सामर्थ्यावर केवढा विश्वास !! 

आत्यंतिक धर्मनिष्ठ आणि उत्कट कर्तव्यनिष्ठ असल्यामुळेच सीता रघुकुळाची अब्रु वाचविण्यासाठी रावणाला दान द्यायला जाते व त्याच्या तावडीत सापडते. तिच्याकडे मूर्खपणा, वेडेपणा, भोळेपणा नसून ती विचारी होती. ती कोठे आहे, हे रामाला कळावे म्हणून, ती आपले नुपूर, दागिने वगैरे रस्त्याने टाकत जाते. रावणाला कधी सीता घाबरली नाही. त्याच्याशी बोलताना सीता हातात समोर काडी धरायची, याचा अर्थ तू मला कस्पटा समान आहेस ! ती त्याच्या डोळ्याला डोळा लावून बोलायची नाही. रावणाला एकदा ती म्हणाली, “तू काजवा आहेस. सूर्यासमान असणाऱ्या माझ्या पतीशी काय तुलना करतोस ?” एकदा म्हणाली, “मी राजहंस आहे, आणि तू डोमकावळा आहेस.” अशोकवनात तिच्या अवतीभवती दुष्ट, अक्राळ विक्राळ राक्षसिणी असूनही ती त्यांच्याशी हिंमतीने वागे. रावण वधानंतर हनुमान सीतेला म्हणतो, “आई, मी सर्व राक्षसिणींना मारून टाकतो.” तर ती म्हणते, “त्यांची काय चूक ? त्या सगळ्या हुकमाच्या ताबेदार आहेत.”

सीता सौजन्यमूर्ती होती, तितकीच ती हृदयाची उदारही होती. रावण वधानंतर रामाने तिच्याविषयी अविश्वास प्रगट केला. खरंतर सीता शुद्ध, पवित्र आहे हे रामला माहित होते; पण सोन्याची परीक्षा रामाला दाखवायची होती. सीता रामाला म्हणते, “तुम्हाला माझा जर त्याग करायचा होता, तर तसा निरोप हनुमानाबरोबर पाठवायचा होता; म्हणजे मी माझ्या जीवनाचा त्याग केला असता. म्हणजे तुमच्यावर इतका त्रास, इतके दुःख सहन करण्याची पाळी आली नसती. लंकेला यावेच लागले नसते.” सौजन्यमूर्ती सीतेला पाहून मस्तक विनम्र होते व रामापेक्षाही सीतेचे चरित्र दिव्य आहे असे वाटते. 

लोकापवाद टाळण्यासाठी राम सीतेचा त्याग करतो. सीता म्हणते, “ज्या कर्तव्यनिष्ठेमुळे रामाने माझा त्याग केला त्या पौरजनांशी तुम्ही प्रेमाने वागा. त्यांच्यावर रागावू नका. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. “वाणीमध्ये काय तेज आहे सीतेच्या !! 

लव कुशांसाठी सीता परत अयोध्येत येते व भयंकर मोठी प्रतिज्ञा करते. 

मनसा कर्मणा वाचा यदी राम समर्चये ।

तदा मे माधवी देवी विवरं दातु मर्हति ।।”

कर्माने, मनाने आणि वाणीने मी दुसऱ्यावर प्रेम केले नाही. हे सीतेचे जाज्वल्य चारित्र्य सांगते. इतक्यात सिंहासन घेऊन भूमीतून वसुंधरा बाहेर येते. सीता भूमी प्रवेश करते. अश्यातऱ्हेने सीतेचा अंतही अलौकिक आहे. तिचे बलिदान हा अमर व दिव्य करुण प्रसंग आहे. जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत रामायण आहे. जोपर्यंत रामायण आहे तोपर्यंत सीता आहे. त्या कोमल पुष्पाचा सुगंध पूर्वीपासून दरवळतो आहे. पुढेही असाच दरवळणार ! त्या भगवती सीतेला माझा नमस्कार !


।। जानकीजीवन स्मरण जयजय राम ।।

भरत

रामायणामध्ये रामानंतर मुख्य चरित्र भरताचे आहे. याचे कारण लक्ष्मण ही रामाची सावली आहे. लक्ष्मणला स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व नव्हते, त्याने आपले असामान्य व्यक्तिमत्व रामात विलीन केले होते. राम लहान भावासाठी राज्य सोडून वनात गेला, परंतु रामापेक्षाही भरताचा त्याग मोठा आहे. राज्य गादी प्राप्त होऊनही रामासाठी भरताने त्याग केला. जणूकाही दोन भावांमध्ये त्याग-निर्लोभता यांची शर्यतच लागली आहे. अश्यातऱ्हेची शर्यत फक्त रामायणतच बघायला मिळते. जगात राज्याकरता भांडणे, खून, मारामाऱ्या पहायला मिळतात. परंतु इथे एक म्हणतो, “तू घे” आणि दुसरा म्हणतो, “छे, तू घे” भांडणातही केवढी दिव्यता!!

चारित्र्यनिष्ठा, कुलाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा हे तीन गुण भरताच्या जीवनात आहेत. भरत आजोळहून परत आल्यावर बाबा गेल्याची वार्ता त्याने ऐकली. कैकेयीला जाऊन त्याने विचारले, “आई, बाबा जायच्या वेळी कोण कोण जवळ होते ?” ती उत्तर देते की ‘राम राम’ म्हणत ते गेले. ह्या उत्तरावरून भरत ओळखतो की त्यावेळी राम, लक्ष्मण आणि सीतावहिनी जवळ नव्हते. पुढे कैकेयी त्याला सांगते की, राम; लक्ष्मण आणि सीता यांना वनवासात पाठविण्यात आले आहे. भरत अत्यंत बुद्धिमान, विवेकी आणि भाऊक आहे. तरीही बाबा गेल्याचे अश्रू पुसून विचारतो की, रामाकडून एखाद्या ब्राह्मणाचा वध झाला का ? गोहत्या झाली का ? त्याने परस्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितले का? कैकेयी रागाने ओरडून म्हणते, “अरे, कोणाबद्दल तू विचारतो आहेस? राम अश्या प्रकारचे अपराध कधीतरी करेल का? परस्त्रीकडे वक्र दृष्टीने बघेल का? हेच रामाचे वैशिष्ठ्य आहे.” पूजकाने स्तुती करावी ह्यात विशेष काय? पण जिने रामाला चौदा वर्षे वनवासात पाठविले तिचे हे उद्गार आहेत. 

भरताचं व लक्ष्मणाचं रामावर खूप प्रेम आहे. लक्ष्मणाचं प्रेम व्यक्तिनिष्ठ आहे. राम कसंही वागो तो माझा आहे हा लक्ष्मणाचा भाव. भरताचं प्रेम व्यक्तिनिष्ठ नाही. रामामध्ये सर्व प्रकारचे सद्गुण आहेत. राम धीरोदात्त आहे. तो परिपूर्ण आहे. या त्याच्या गुणांमुळे भरत रामाचा पूजक, सेवक आहे. भरताला आपल्या वंशाचा खूप अभिमान आहे. वरील पैकी एखादा अपराध जर रामाच्या हातून घडला असला तर लक्ष्मण रामाला सोडून गेला नसता. भरत मात्र रामापासून दूर गेला असता. खरं म्हणजे भरताला कोणी ओळखलंच नाही. दशरथ, कैकेयी, भरद्वाजमुनी, कौसल्या, गुह आणि लक्ष्मणापैंकी कोणीही नाही. फक्त राम आणि वसिष्ठांनी त्याला ओळखलं होतं. भरताने कैकेयीला विचारलं, आई, तुला वाटलंच कसं मी रामाला डावलून राज्याभिषेक करून घेईन. कौसल्येलाही भरत म्हणतो, “आई, मला राजा बनायचं नाही. मी रामाला आणायला चाललो आहे.” दुसऱ्या दिवशी भरताच्या महालाबाहेर सनई चौघडे वाजायला लागतात. भरत ते सर्व बंद करतो. दुसऱ्या दिवशी राज्यसभेत गेल्यावर भरत म्हणतो, हे सिंहासन दादाचं आहे. त्यावर  बसण्याचा अधिकार मला नाही. मी उद्या दादाला आणायला निघणार व त्याला परत आणून सिंहासनावर बसवणार. लोकांनी आनंदाने टाळ्या वाजवून जयजयकार केला.

निषादराज गुहाने भरताशी लढायची तयारी केली कारण भरत सैन्य घेऊन निघाला होता. उलट, जिथे रामाने चिक लावून जटा केल्या तसेच भरतानेही केले. पुढे भरद्वाजांनी त्यांच्या आश्रमात सर्वांसाठी जेवणाची, रहाण्याची उत्तम व्यवस्था केली होती. पण भरत मात्र जिथे राम झोपले होते त्या झाडाखाली सिताराम सिताराम म्हणत बसला होता. त्याची विरक्ती पाहून भरद्वाज म्हणाले “भरता, आयुष्यभर केलेल्या उपासनेचे फळ म्हणून मला रामसीतेचे दर्शन झालं व भगवंताच्या दर्शनाचं फळ म्हणून आज तुझ्यासारख्या भक्ताच दर्शन झालं.”  

सर्व प्रजानन, तीन माता, वसिष्ठ, दोन भाऊ, त्यांच्या बायका श्रीकामगिरी पर्वत चढू लागले. लांबून लक्ष्मणाने पाहिले व तो युद्ध करायला सज्ज झाला. रामाच्या सर्व लक्षात आले. राम म्हणाला, अरे, भरत मला मारायला किंवा लढायला नाही, न्यायाला आला आहे. रामाने परत यावे म्हणून भरताने खुप युक्तिवाद केला. हा युक्तिवाद वाल्मिकी रामायणामध्ये वाचण्यासारखा आहे. शेवटी ‘चौदा वर्षे भरताने राज्य करावे, रामाने आपल्या पादुका द्याव्यात’ असे ठरले. “कैकेयी मातेला, भरता; अपशब्द बोलू नकोस”, असे रामाने सांगितले. सगळे जण अयोध्येला परतले. नंदीग्रामात झोपडी बांधून, वल्कल नेसून, कंदमुळे खाऊन भरत रामासारखे जीवन जगू लागला. भरताने विचारलं, ह्या पादुकांचा राज्याभिषेक शास्त्रानुसार करता येतो का ? वसिष्ठ म्हणाले, आजोळहून परत आल्यापासून, मी तुला बारकाईने बघत आहे. तुला शास्त्र बघण्याची गरज नाही. तुझ्या आचरणाप्रमाणे शास्त्रं वागतील. रोज पादुकांचे यथासांग पूजन करून, प्रत्यक्ष राम सिंहासनावर बसले आहेत असे समजून, दिवसभराच्या झालेल्या घटना सांगायच्या. हा अयोध्येचा स्वामी सवल्कल जटाधारी असून वनवासी जीवन जगतोय. जो जितका महान त्याने उपभोगांपासून दूरच रहावे हीच मूळ भारतीय धारणा आहे.

दशरथ राजाच्या चारही मुलांची नावं वसिष्ठांनी ठेवली. पहिल्याचे राम तर दुसऱ्याचे भरत. चातकत्व व हंसत्व याचा संगम आपल्याला भरत चरित्रात बघायला मिळतो. आपल्या भक्तीत काही कमतरता वाटली तर भरताच्या चारित्र्याच चिंतन करावं. भरताचं चरित्र अनुकरणीय आहे. चौदा वर्षानंतर राम परतल्यावर रामाने हनुमानाला भरताकडे पाठवले व त्याचे भाव कसे आहेत याचे निरीक्षण करायला सांगितले. चौदा वर्षे पुरी झाल्यावर दोघांची जेव्हा भेट होते त्यावेळी राम कोणता व भरत कोणता हे ओळखताही येत नव्हते. कारण दोघेही तपस्वी, चारित्र्यनिष्ठ, कुलाभिमानी, संस्कृतीचे उपासक, कर्तव्यनिष्ठ. दोन शरीरे आत्मा एकच म्हणा ना ! चारित्र्याची भव्यता आणि भातृप्रेम यांच्यापुढे वाल्मिकींची लेखणी सुद्धा थिटी पडली…..! 

लक्ष्मण व भरत अतिशय प्रेमळ. दोघेही परम भक्त आहेत. एकाला संयोगाचे भाग्य तर दुसऱ्याला वियोगाचे. भरताने ईश्वरापासून दूर राहून निष्ठेने काम केले आहे. चौदा वर्षे नंदीग्रामात राहून ‘इदं न मम’ या वृत्तीने जीवन जगला आहे. 

आहे तितुके देवाचे।ऐसे वर्तणे निश्चयाचे।

मुळ तुटे उद्वेगाचे।येणे रिती।।

आपण भरताचा आदर्श जीवनात कायम ठेवला पाहिजे. निष्काम होऊन ईश्वरी कार्यात निर्लोभ अंतःकरणाने तुटून पडायला हवे. निर्लोभ अंतःकरणाने भरताने जीवनभर जे केले ते आपण शिकायला हवे. साधनेचे शिखर म्हणजे लक्ष्मण ते कदाचित आपल्याला जमणार नाही, पण आपल्याला भरताकडून खूप काही शिकता येईल. 

भारतात एकंदर तीन भरतांची पूजा – उपासना होते

१ . रामायणातील भरत 

२. महाभारतातील भरत म्हणजे दुष्यंतचा मुलगा. अत्यंत शूर. लहानपणी तो सिंहाचे दात मोजायला निघाला. ज्याच्यामुळे आपल्या देशाचे नाव भारत पडले.

३. भागवतातील जडभरत – अत्यंत विद्वान राजर्षी.

भरतामुळे रामायणाला शोभा आली आहे. भरत केवळ रामायणाचा नव्हे तर जगातील संपूर्ण सांस्कृतिक वाङ्मयाचा दागिना आहे. वाल्मिकींनी हा अनुपम आदर्श पुढच्या संस्कृती पूजकांसमोर ठेवला आहे. अश्या या बुद्धिमान, कर्तृत्ववान, शीलवान, गुणवान भरताला माझा नमस्कार. 

लक्ष्मण

राजा दशरथाला चार मुले होती. कौसल्येचा राम, कैकेयीचा भरत आणि सुमित्रेचे लक्ष्मण व शत्रुघ्न. राम–लक्ष्मण जोडी होती तर, भरत–शत्रुघ्न जोडी प्रसिद्ध होती. या चारही पुत्रांची नावं महर्षी वसिष्ष्ठांनी ठेवली होती. ज्येष्ठ सुमित्रानंदनाचे नामकरण केले लक्ष्मण! ‘लक्ष्मीवान स लक्ष्मणः’ याचा अर्थ वाल्मिकींनी ज्यांच्याकडे लक्ष्मी आहे तो लक्ष्मण असा सांगितला. त्याच्याकडे एकच संपत्ती होती ती म्हणजे दास्यलक्ष्मी ! कैकर्य हीच लक्ष्मणाची संपत्ती. लक्ष्मी म्हणजे शोभा, ज्याचे जीवन केवळ कैकर्याने सुशोभित केले आहे. एका रामाशिवाय लक्ष्मणाने कशाचेही चिंतन केले नाही. जे रामाला अनुकूल ते लक्ष्मणाला अनुकूल. जे जे रामाला प्रतिकूल, ते मग कोणीही असोत, माता-पिता का असेनात ते लक्ष्मणाचे शत्रू! राम जेव्हा वनवासाला जायला निघाला तेव्हा लक्ष्मण पण बरोबर निघाला, तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितले जा तुझ्या आईला विचारून ये. लक्ष्मण म्हणतो, 

मातारामो मत्पिता रामचंद्रः !

रामाला वडिलांमुळे वनवासात जावे लागले आहे हे कळल्यावर तो म्हणतो “बाबांना तुरुंगात टाका.” रामानेच अयोध्येच्या सिंहासनावर बसले पाहिजे. वनवासात जाताना त्याला आपल्या बायकोला म्हणजे उर्मिलेला भेटावेसे देखील वाटले नाही. कुठलीही भक्ती माणसाला वेडी करते. देशभक्तांचे जीवन आठवा. लक्ष्मण म्हणजे रामाचा बहिश्चर प्राण आहे. लक्ष्मणाचे चरित्र भव्यदिव्य आहे. रामाबरोबर लक्ष्मणाचा कधी संघर्ष झाला नाही. विश्वामित्राने दशरथाजवळ केवळ रामाचीच मागणी केली होती. पण लक्ष्मण रामाबरोबर गेलाच. त्याला वेगळ्या निमंत्रणाची गरज नव्हती. माणसाला बोलवल्यावर त्याची सावली देखील सोबत येते तसेच रामाबरोबर लक्ष्मण येणारच. लक्ष्मण रामाचा उजवा हात होता. दोघांची जोडी खरी. रामात लक्ष्मण आलाच! रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी राम असे नाही म्हणत की “मी राजा होणार.” उलट राम म्हणतो की, “लक्ष्मणा तुलाच राज्य करायचे आहे.” किती ही उच्च भावना! लक्ष्मण मूर्च्छित झाल्यावर राम म्हणतो,

नहि मे जीविते नार्थः सीतया वाजयेन वा।

कोहिमे जीविते नार्थः त्वयिपंचत्वमागते।।

देशे देशे कलत्राणी देशे देशे च बांधवाः।

तं तु देशं न पश्यामी यत्र भ्राता सहोदरः।।

राम शब्द तर लक्ष्मण अर्थ. राम म्हणतो सीता मिळाली नाही तरी चालेल परंतु जर लक्ष्मण गेला तर माझा प्राण जाणारच. ‘यत्र भ्राता सहोदरः’ राम कौसल्येचा तर लक्ष्मण सुमित्रेचा असूनही राम सहोदरः म्हणजे एकाच आईच्या पोटी जन्मलेले असे म्हणत आहे. लक्ष्मण अतिशय पराक्रमी होता. राक्षसांना मारण्यात त्याचा मोठा सहभाग होता. रामाने रावणाला मारले ह्यात काही विशेष नव्हते, कारण रावणाचा अनेक वेळा पराभव झालेला होता. परंतु लक्ष्मणाने इंद्रजिताला मारले जो अजिंक्य होता. जीवनात इंद्रजिताने कधीही पराभव पाहिलेला नव्हता. अजिंक्य इंद्रजिताचा पराभव महापराक्रमी व बुद्धिमान लक्ष्मणाने केला होता. त्याची बुद्धी अती सूक्ष्म विषयाचा निर्णय करीत असे. राजधर्माच्या बाबतीतील त्याची भाषणे अतिशय श्रेष्ठ आहेत. चौदा वर्षाचा वनवास हा रघुकुळाला शोभणारा नाही त्यामुळे राजगादीच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार आहे. दशरथाला कैदेत टाकावे आणि रामाला गादीवर बसवावे ही त्याची मनिषा होती. राम म्हणाला ही गोष्ट योग्य नाही, हे ऐकल्यावर बोलणे संपले मग नंतर प्रश्न नाही की विचार नाही.  Not to question why? But to do and die! 

खरोखर लक्ष्मणाच्या जीवनाचा अवर्णनीय, अद्भुत आणि अनुकरणीय आदर्श मानव जातीसमोर आहे. भरत सैन्यासह वनात आलाय म्हणजे नक्कीच हा रामाला मारायला आला असेल ना ! असे समजून लक्ष्मण धनुष्य बाण घेऊन भरताला मारायला निघतो. तेव्हा राम लक्ष्मणाला म्हणतो, “अरे, भरत मला मारायला नाही तर परत न्यायाला आला आहे, भाऊ कधी भावाला मारेल का ? तुला राज्य हवंय का ?” लगेच लक्ष्मण वरमतो. हीच गोष्ट त्याच्या हृदयाची श्रीमंती दाखवते. 

लक्ष्मण अत्यंत कडक स्वभावाचा होता, परंतु त्याचबरोबर त्याच्याजवळ अंतःकरणाचे औदार्यही होते. अलौकिक चारित्र्य हा रघुकुलाचा परिपाक होता, प्रतिष्ठा होती. लक्ष्मणाचे चारित्र्य अत्यंत दैदिप्यमान आहे. सीतेचे दागिने ओळखण्याचा प्रसंग येतो त्यावेळी दुःखी झालेला राम लक्ष्मणाला विचारतो की सर्व दागिने सीतेचेच आहेत ना? 

नाहं जानामि केयूरे नाहं जानामि कुण्डले।

नूपुरेत्वभिजानामि नित्यं पादाभिवन्दनात्।।

हे वाचल्यावर लक्ष्मणाविषयीची असलेली आपली आदर भावना द्विगुणित होते. अत्यंत पराक्रमी असूनही रामात स्वतः मिळून जाणे हा त्याचा मोठेपणाच आहे.  सीतेला वनात सोडायचे काम रामाने लक्ष्मणावर सोपवले होते, लक्ष्मणाला ते मुळीच पटले नव्हते. सीता कायेने, मनाने शुद्ध आहे ह्याची लक्ष्मणाला खात्री होती. पण रामाची आज्ञा तो टाळू शकला नाही.  

मारीचीच्या आवाजाने सीता बेचैन होते व रामाच्या मदतीला जा असे लक्ष्मणाला सांगते. लक्ष्मणाने मारीचीचा आवाज ओळखलेला असतो. सीता दुःखाच्या भरात अतिशय कठोर शब्द बोलते. सीता म्हणते, “तुम्हाला माझ्या रूपाची अभिलाषा आहे. तुम्ही गेला नाहीत तर मी माझी जीभ कापून मरून जाईन.” शेवटी नाईलाजास्तव मनाच्या विरुद्ध लक्ष्मण जातो. इकडे आड तिकडे विहीर अशी त्याची परिस्थिती होते. 

शेवटचा प्रसंग, राम काल पुरुषाशी बोलत असतांना कोणी आत येऊ नये आणि आत आल्यास त्याला मृत्यू दंडाची शिक्षा होईल असे ठरले होते. त्यावेळी दुर्वास मुनी अयोध्येत येतात. त्यामुळे लक्ष्मणाला रामाच्या खोलीत जावेच लागते, कारण मी आल्याचा निरोप नाही दिला तर सगळी अयोध्या जाळून टाकेन असे मुनी म्हणतात. सिंहासनाची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी रामाचा कंठ दाटून येतो. राम सांगतो, “हे लक्ष्मणा अयोध्या सोडून जा.” राम वसिष्ठ मुनींना म्हणतात, “मी बाबांचा, सीतेचा वियोग सहन केला पण मी लक्ष्मणाशिवाय जिवंत राहू शकणार नाही.” राम लक्ष्मणामागे शरयूत जातात. 

लक्ष्मण म्हणजे रामाच्या कीर्तीध्वजाची काठी ! लक्ष्मणामुळेच रामरुपी ध्वज काठीवर फडकत आहे. लक्ष्मणच्या चरित्राचा विचार करीत असताना तर्क आणि प्रज्ञा काम करीत नाही. तर्क आणि बुद्धी ज्या ठिकाणी कुंठित होतील असे महान चरित्र लक्ष्मणाचे आहे. महर्षी वाल्मिकींनी रामाचे चरित्र चित्रण करून मानवासमोर संस्कृतीचे अतिशय उच्च ध्येय ठेवले आहे. तसेच ध्येयाप्रत पोचण्यासाठी लक्ष्मणासारखी उग्र साधना केली पाहिजे हे दाखवले आहे. लक्ष्मणासारखे असामान्य, अलौकिक आणि अपूर्व चरित्र जगाच्या इतिहासात कोणत्याही वाङ्मयात, कोणत्याही ठिकाणी मिळणार नाही. तीक्ष्ण बुद्धी असूनही स्वतःचे चरित्र रामात विलीन केले हाच लक्ष्मणाचा मोठेपणा. साध्य राम साधन लक्ष्मण त्याला माझा नमस्कार!

अयोध्या

श्रीरामप्रभूंचे चरित्र हा समस्त भारतीयांच्या विचारविश्वाचा, भावविश्वाचा केंद्रबिंदू ! आज पासून ८ दिवस आपण रामायणातील काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा पाहणार आहोत. त्यापैकी पहिले पुष्प ‘अयोध्या’ हे आहे. 

अतिशय विस्तृत असा कोसल नावाचा प्रदेश शरयू नदीच्या तीरावर वसलेला होता. या प्रदेशात वैवस्वत मनूने हिरवीगार, समृद्ध व धनधान्याने संपन्न अशी सुप्रसिद्ध अयोध्या नगरी वसवली होती. ही नगरी १२ योजने लांब व ३ योजने रुंद होती. या नगरीत रोज संध्याकाळी सुगंधित पाण्याने रस्ते शिंपलेले असत. तसेच त्यावेळी स्वर्गीय अप्सरा विमानातून फुलांचा वर्षाव करीत. कमानदार प्रवेशद्वारे संगमरवरी असून सोन्या रूपाने मढविलेल्या दरवाजांवर मौल्यवान रत्ने जडवलेली होती. अजस्त्र तोफा व गोफणयंत्रे शहराच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ठेवलेल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा ७ मजली इमारती व मोठमोठ्या बाजारपेठा होत्या. 

कोरीव काम केलेले सुंदर राजवाडे, फुलाफळांनी बहरलेली झाडे, सुरेख बागांमध्ये नगरवासी जन कर्णमधुर संगीत ऐकत बसलेले असायचे. संपूर्ण शहरात भाट, गायक, नर्तक भगवंताच्या कीर्तीचे गुणगान, नृत्य करीत असत. तलावात रंगेबिरंगी कमळे फुललेली असायची. कारंज्यातून सुगंधी तुषार बाहेर पडत असल्याने सर्व नगरवासियांना वाऱ्याने थंडावा मिळत असे. त्यामुळे उन्हाळ्यातही लोकांना त्रास होत नसे. मोर व क्रौंच पक्षांचा गुंजारव सर्वत्र ऐकू येत असे. पिण्याचे पाणी व झाडाझुडपांसाठी पाणी मुबलक असल्याने सृष्टी नेहमी सुजलाम सुफलाम दिसायची. रथी, महारथी, योद्धे हातात शस्त्रास्त्रे घेऊन या महान नगरीचे संरक्षण करायचे. अयोध्येकडे जाणारे रस्ते प्रवाशांनी नेहमीच गजबजलेले असत. 

देशोदेशीचे राजे, राजपुत्र व्यापारासाठी; वार्षिक खंडणी भरण्यासाठी किंवा एकमेकांना भेटण्यासाठी अयोध्येत येत असत. या अयोध्या नगरीत दशरथ नावाचा राजा होऊन गेला. तो वेदोक्ता, दूरदर्शी, महाप्रतापी आणि नगरवासियांचा लाडका होता. इक्ष्वाकु वंशातील दशरथ राजा अतिरथी, यज्ञयाग केलेला, धर्मनिष्ठ, त्रैलोक्य विख्यात राजर्षी, शत्रूंचा नाश केलेला, मित्रांनी युक्त, जितेंद्रीय होता. द्रव्य आणि इतर धान्यादी संचय यांच्या योगाने इंद्र कुबेरांशी बरोबरी करणारा होता. त्याने धर्म, अर्थ आणि काम या त्रिवर्गाचे अवलंबन केले होते. तो सत्य वचनी असून त्याने अयोध्या नगरीचे पालन उत्तमरित्या केले. अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या रघुवंशात राजा दशरथ शोभून दिसत असे. या श्रेष्ठ राजधानीतील लोक बहुश्रुत, धर्मनिष्ठ, आनंदित, समाधानी, संतुष्ट, निर्लोभी आणि सत्यवादी होते. ऐहिक व पारमार्थिक फल प्राप्त न झालेले आणि गाई, अश्व, पशु व धनधान्य यांची समृद्धी नसलेले एकही कुटुंब या नगरीत नव्हते. 

अयोध्येत विषयलंपट, दुष्ट, अविद्वान, नास्तिक असा कोणी आढळत नसे. तेथील सर्व स्त्रिया व सर्व पुरुष शील आणि आचरण यांच्या योगाने महर्षींप्रमाणे निर्मळ असून इंद्रियनिग्रही आणि आनंदी होते. प्रत्येक जण कानात कुंडले, हातात विविध अलंकार, गळ्यात माळा धारण करणारे, चंदनादी सुगंधी उटी लावणारे होते. ब्राह्मण प्रभृती, चारही वर्णातील लोक; देव आणि अतिथी यांचे पुजन करणारे कृतज्ञ; उदार; शूर आणि पराक्रमी होते. लोक दिर्घायु असून स्त्रिया, पुत्रपौत्र यांसह वर्तमान सर्वच धर्म व सत्य यांचा आश्रय करून राहणारे होते. असे अयोध्येचे वर्णन वाचल्यावर तत्कालीन समाज किती श्रेष्ठ, संस्कारसंपन्न, धर्मनिष्ठ, कर्तव्य परायण, ज्ञानसंपन्न, वैभवसंपन्न, शीलसंपन्न होता याची कल्पना येते. 

१४ वर्षे राम वनवासात गेल्यावर अतिव दुःखाने राजा दशरथाने राम राम म्हणत प्राण त्याग केला. त्यावेळी भरताला त्याच्या मामाकडून परत आणण्यासाठी वसिष्ठ ऋषी गेले. भरताला वस्तुस्थितीची काहीच कल्पना नव्हती. त्याला दिसले की शेतात लोक काम करत नाहीत. उद्याने रिकामी पडली आहेत. लोक गायन वादनाचा आस्वाद न घेता आपापसात गंभीर चर्चा करीत आहेत. नेहमीचा आनंद उत्साह जाणवत नव्हता. अयोध्येत पक्षांचा किलबिलाट सतत असायचा पण आता सर्वदूर शांतता पसरलेली भरताने बघितली. रस्ते अस्वच्छ होते, दुकाने बंद होती, मंदिरे ओस पडली होती. लोक भरताबद्दल एकमेकांशी कुजबुजत होते. काहीतरी अघटीत घडले आहे हे अयोध्येतील वातावरणावरून भरताने ओळखले व तो कैकयी मातेच्या महालात गेला. अयोध्येतून राम निघून गेल्यावर भरताला अयोध्येचे जे दुःखी दर्शन झाले त्याने तोही दुःखी झाला. अयोध्येलाही रामाचा, दशरथाचा विरह सहन झाला नाही. 

लंकेत रामाने रावणाचा वध केला, बिभीषण लंकेचा राजा झाला. बिभीषण रामाला विनंती करतो की तुम्ही आता अयोध्येला परत जाऊ नका, लंकेचा राजा व्हा. राम म्हणतात, बिभीषणा, मला सोन्याच्या लंकेचा मोह नाही. मला स्वर्गाचाही मोह नाही. मला माझी अयोध्या पहायची आहे. माझ्या मातांना, भरताला, शत्रुघ्नाला, त्यांच्या भार्याना भेटायचे आहे. अयोध्या माझी मातृभूमी आहे. स्वर्गाचे वैभवही अयोध्येपुढे तुच्छ आहे. 

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।

जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी।।

मातृभूमीवर किती प्रेम करावे ते राजाकडून शिकावे. कितीही शिका मोठे व्हा पण भारत भूमीला विसरू नका. इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेची आठवण होते – ‘ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला’

त्रेतायुगातील हे अयोध्येचे वर्णन आपण पाहिले. पण कलियुगातही जगाच्या नकाशावर आज अयोध्या चमकत आहे. त्रेतायुगातील अयोध्या म्हणजे जेथे युद्ध नाही ती अयोध्या ! पण गेली अनेक वर्ष अयोध्येने खूप युद्धे पाहिली. रामाच्या मुक्तीसाठी अनेकांना आपला जीव गमवावा लागला. पण रामाच्याच कृपेने २२ जानेवारी २०२४ या सुवर्ण दिवशी ५०० वर्षांच्या वनवासानंतर भव्य मंदिरात रामाची प्रतिष्ठापना अयोध्येत झाली. आपल्या सर्वांसाठी ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. देशविदेशातील पाऊले अयोध्येत रामाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. अयोध्येचा कायापालट झाला आहे. शरयूचे घाट सुंदर बांधले आहेत.

सरयू तीरावरी, अयोध्या मनुनिर्मित नगरी

इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण, राजा दशरथ धर्मपरायण

त्या नगरीचें करितो रक्षण, गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा, सूर्य जसा संगरी

रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली अयोध्या, जिथे शरयू नदीत राम आणि त्याची भावंड डुंबली असतील त्या पवित्र शरयूला मी साष्टांग वंदन करते.


।। जय श्रीराम ।।

माझ्या आक्का

मागील वर्षी म्हणजेच २०२४ साली नोव्हेंबर महिन्यात दा.  स. अ. चे अभ्यासार्थी, समीक्षक अयोध्येला दासबोध पारायणाला गेलो होतो. अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी नवीन रामांच्या मंदिराजवळ आम्ही ३ दिवसाचे पाराय‌ण केले. प.पू. आक्का वेलणकरांनी घळीत सकाळची जशी उपासना नेमून दिली आहे, त्याप्रमाणे काकड आरती वगैरे केली. सर्वजण एका वेगळ्या आनंदात होतो. प.पू. आक्कांची सर्वांना खूप आठवण येत होती कारण त्यांच्या प्रेमळ छत्राखाली आम्ही सारेजण जमलो होतो. त्यांच्या व रामाच्या कृपेमुळे तीन दिवसाचे पारायण निर्विघ्नपणे पार पडले. १९८४ साली नागपूरला माझ्या आईच्या एकसष्टीसाठी मी आक्कांना भागवत सांगायला बोलावले होते. स्टेशनवर त्यांना पाहिल्यावर मनात विचार आला की या काय भागवत सांगणार? पांढरे शुभ्र लुगडे, हातात कापडी पिशवी, लहान ट्रंक, गाडीतत्या प्रवासाने थकलेल्या, ते रूप पाहून वरील विचार मनात आला.  मी त्यावेळी वयाने लहान, अज्ञानी, अपरिपक्वच होते. पण चंदन उगाळल्यावर जसा सुवास सुटतो, तसा दोन दिवसात आक्का माझ्याच नव्हे, तर आमच्या सर्वांच्या झाल्या. 

१९८५ साली माझे आई-वडील अंदमानला गेले असताना तिथेच माझ्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून आक्का आमच्या घरी आल्या. त्यांच्या नुसत्या असण्याने आमचे घर शांत झाले. त्यावेळी त्या आईच्या सद्गुरू झाल्या. नागपूरात त्यांची कोणाशीच ओळख नसल्याने त्या आमच्या घरीच घरच्यासारख्या रहायच्या. पण पुढे मात्र आक्का सर्वांच्या झाल्या. चालता-बोलता, खाता-पिता, उठता-बसता त्या अनेक गोष्टी शिकवायच्या. त्यांचं अक्षर सुंदर होतं, त्या सुरेख रांगोळी काढायच्या. अंघोळ केल्यावर पांढरं शुभ्र नऊवारी लुगडं  चापून चोपून नेसल्यावर दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच असायचं. रुपवान होत्या. हातात माळ असायची, सतत जप करायच्या. पुढे अभ्यासार्थी वाढल्यावर वेळ मिळेल तेव्हा स्वाध्याय तपासायच्या. ‘रिकामा जाऊ नेदी क्षण’ असा कधी वेळ घालवायच्या नाहीत. कोणी कधीही प्रश्न विचारल्यावर, त्या समोरच्याचे समाधान करायच्या.

तरुण वयात त्या अत्यंत रागीट स्वभावाच्या असल्याने त्यांना फिटस् यायच्या. साधनेने, ध्यानाने त्यांनी क्रोधावर मात केली व फिटस् येणे थांबवले. एकदा रेल्वेलाईन ओलांडताना त्या पडल्या, पाय फ्रॅक्चर झाला. पण व्यायाम करुन त्यांनी पाय बरा केला व नंतर तीन तास मांडी न हालवता भागवत सांगायच्या. संतांचे जीवन आम्ही जवळून पाहिले आहे. एकदा द्वारकेहून आल्या तेव्हा तापाने फणफणल्या होत्या. सर्दी, खोकला प्रचंड झाला होता. सकाळी औषध घेऊन झोपल्या. दुपारी सर्व शिष्यवर्ग भेटायला आला. सोलीव सुखावर अडीच तास बोलल्या. ताप अंगात होताच. कोणाला या आजारी आहेत हे समजले नाही. देहबुद्धी ते आत्मबुद्धी कशी करावी ते आम्ही पाहिले.

एकदा आमच्या घरी भागवत स‌प्ताह सुरु होता. पाचव्या दिवशी अंगात ताप खूप होता, दम लागला होता. त्या देवघरात गेल्या, पाट मांडला; कृष्णाला म्हणाल्या, तीन तास माझा ताप जाऊ दे, असे म्हणून व्यासपीठावर बसल्या व त्या दिवशी कृष्ण जन्म, त्याच्या लीला अतिशय रंगवून सांगितल्या. वेगळेच तेज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. झाल्यावर म्हणाल्या, नीला माझा कृष्ण मला सांभाळतो गं! किती विश्वास कृष्णावर! अनेकवेळा बालरूपातल्या कृष्णाने त्यांना दर्शन दिले आहे. सज्जनगडावर गेल्या असताना भागवताच्या वहीवर कृष्णाचे पाऊल उमटलेले सर्वांनी पाहिले आहे. तीनशेच्या वर त्यांचे भागवत सप्ताह झाले. पन्नासच्या वर भागवतकार त्यांनी तयार केले. भागवताचा पैसा त्या अनेक संस्थांना, गरीबांना दान करायच्या. साधना सप्ताह घळीत व्हायचा त्याचा खर्च त्या स्वतः करायच्या. 

आक्का अत्यंत निःस्पृह, निष्काम, निर्लोभी, निर्मत्सरी होत्या. पुढे पुढे माझ्या लक्षात आले की त्या संत आहेत. रहाणी अत्यंत साधी, निगर्वीपणा, निर्मळ मनाच्या, शुद्ध अंतःकरणाच्या, रसाळ वक्त्या होत्या. एकदा गुरुपौर्णिमेला त्या घरी आल्यावर, मी फुलांच्या पायघड्या घालून स्वागत केले. “आज हे काय खूळ ?”,  त्यांनी विचारले. गुरुपुजन केले. “अगं मी काही तुझी गुरु नाही”. “आक्का माझ्या गुरूंना मी तुमच्यात पाहते” असं मी म्हटल्यावर त्यांनी मला मिठीच मारली. मनात विचार केला त्या नुसत्या आक्का नसून आक्कास्वामी आहेत, माझ्या आहेत. संताचे जीवन जनसामान्यांना सुसंस्कारीत करते. त्यांच्यातील भक्ती, नीती, प्रीती जागृत करतात. जीवन कस जगायचं ते स्वतः जगून, जगाला शिकवतात. त्यांनी सखोल दासबोध अभ्यासक्रम सुरू केल्याने घराघरात दासबोध सखोल अभ्यास झाला. प्रवचनकार, कीर्तनकार तयार झाले. दुख्खितांचे अश्रू पुसले गेले, अनेकांना जीवन जगायला उमेद मिळाली. विदर्भातल्या लहान लहान खेडेगावात आक्का गेल्या, भागवत केले. अनेक ग्रंथांवर प्रवचने केली, बायका तयार केल्या. पुढे पुढे आक्का ध्यानाला बसल्या की, दोन दोन तास त्या ध्यानात आत आत शिरलेल्या मी पाहिल्या आहेत. तेव्हा त्या अत्यंत तेज:पुंज, सुंदर दिसायच्या. 

एका दिवसात एक अशी एकशे तेरा दासबोधाची पारायणे मी नागपूरात एकशे तेरा घरी केली. शेवटच्या पारायणाला त्या गडावर आल्या. आक्का डोलीतून चला, पण जिद्दी आक्कांनी ऐकले नाही. प्रत्येक पायरीवर बसत-बसत रामनाम घेत दीड दोन तास चढण चढत होत्या. एकशे चौदाव्या पारायणाला मध्यभागी मी, एका बाजूला माझे सद्गुरू प.पू. अण्णाबुवा कालगावकर, दुसऱ्या बाजूला प.पू. आक्कास्वामी अशा थाटात पारायणाची समाप्ती केली. सर्वांना स्वर्गीय सुख मिळाले. अजूनही तो दिवस आठवला की आनंद होतो. आक्का मागे लागल्या म्हणून मी भागवत करायला लागले. १९९८ साली आईच्या पंचाहत्तरीला आक्कांनी नागपूरला रामाच्या मंदिरात भागवत केले. एकदा भागवत सांगताना मला म्हणाल्या, नीला आता मी मेले तर तू काय करशील?, काही नाही; मला खाली ठेवायचे व भागवत पूर्ण करायचे. चार महिन्यांनी असेच झाले, नांदेडला भागवत सुरू असताना त्यांनी देह ठेवला. आपुले मरण पाहिले म्या डोळा.. आज त्या आपल्यात नाहीत पण दा. स. अ. च्या रुपाने त्यांचे नित्य स्मरण आपण करतो. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत त्यांना माझा    शि. सा. नमस्कार.

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language