उद्धव गोसावींचे समर्थांना पत्र

सारंगपूर या मठात उद्धव गोसावी मठाधिपती होते, तेव्हा त्यांनी समर्थांना पाठवलेलं पत्र आज आपण बघणार आहोत. मनाच्या श्लोकांसारखं हे पत्र आहे. 

गुरुराजया ब्रह्मरूपा दयाळा । दयासागरा धाव वेगे कृपाळा ।

अनाथा दिना कारणे तू कुसावा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। १ ।।

तुझे रुप पाहावया आस मोठी । तरी दाखवी रूप तत्काळ दृष्टी ।

जशी बाळका माय तू धाव तैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। २ ।।

मना इंद्रिया कामक्रोधासी मारी । मदे मत्सरे वासना हे निवारी ।

जळावेगळा तळमळे मीन जैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ३ ।।

नसे सुख संसार हा घोर मोठा । जसा सिंह हस्तीसी मारी चपेटा ।

अशा संकटी सोडवी राजहंसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ४ ।।

चकोरे जसा चंद्रमा चिंतताहे । वनी गाय ते वत्स घरी वाट पाहे ।

तसे ध्यान तुझे मला हो कुंवासा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ५ ।।

नको अंत पाहू माया हे हरावी । तुझी भक्ती विरक्ती शांतीही द्यावी ।

बरा अंतरी लावी वैराग्य ठसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ६ ।।

तुझे ब्रीद रे नित्य असेल खरे । प्रचिती मला दाखवी सत्वरी रे ।

पतीतासी हा हेत आधार जैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ७ ।।

मला वाटते अंतरी त्वां वसावे । तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे ।

अपत्यापरी पाजवी प्रेमरसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ८ ।।

म्हणे उद्धवासि त्वा हाती धरावे । सदासर्वदा अंतरी प्रेम द्यावे ।

उपेक्षू नका स्वामी दासासि हंसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ९ ।।

उद्धव गोसावी यांनी समर्थांना पाठवलेले हे पत्रं आहे. यात शिष्याची तळमळ, सद्गुरु भेटीची लागलेली ओढ व आपण त्यांना भेटू शकत नाही याची तळमळ लक्षात येते. आता पत्राचा अर्थ बघू. 

उद्धवस्वामी पहिल्या ओवीमध्ये समर्थांना नमस्कार करतात. समर्थांना वेगवेगळ्या उपमा देऊन त्यांना साष्टांग दंडवत घालतात. गुरुराजा, ब्रह्मस्वरूपा, दयाळा, दयासागरा ही सगळी समर्थांची विशेषणे आहेत. या पत्राचे एक वैशिष्ट्य आहे, याचा चौथा चरण महाराजया सद्गुरु रामदासा असा आहे. म्हणजे प्रत्येक ओवीच्या शेवटी उद्धवस्वामी समर्थांचा उदोउदो करतात व त्यांना शरण जातात.

दुसऱ्या ओवीत आता उद्धव गोसावींची तळमळ दिसून येते. तुझे रुप पाहावया आस मोठी.. म्हणजे तुझं दर्शन व्हावं, वारंवार सद्गुरुची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी ही तळमळ आहे. यात ते उपमा देतात, लहान बालकाला आईची जशी ओढ लागते, बालक मातेकडे धाव घेते त्याप्रमाणेच उद्धव स्वामींच्या मनाची अवस्था झाली आहे. सद्गुरूला मातेची उपमा देतात व अशा मातेला हे बाळ कधी भेटेल याची चिंता व्यक्त करतात. 

तिसऱ्या ओवीमध्ये स्वामी म्हणतात, इंद्रियांना काम, क्रोध, मत्सर, मद, वासना याने ग्रासले आहे. यापासून कसे सुटावे हे समजत नाही. ज्याप्रमाणे मासा पाण्यावाचून तळमळतो, तसेच तुम्ही मला या सगळ्या वासनेतून सोडवा. यासाठी माझी तडफड होते आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे.

चौथ्या ओवीमध्ये स्वामी म्हणतात, हा संसार जो आहे, जो बाहेरून सुख वाटतो परंतु तो अत्यंत कठीण आहे. जसा काही सिंहाने हत्तीला पंजा मारावा त्याप्रमाणे हा संसार म्हणजेच यातील वासना मनाला सतत त्रास देत राहतात. त्यामुळे अशा या संकटातून सोडवण्याकरता सद्गुरुराया तुम्ही धावा व मला या वासनेच्या महापुरातून वाचवण्याचा प्रयत्न करा.

पाचव्या ओवीत ते म्हणतात, ध्यान मार्गाने तुम्हाला भेटण्याचा एकच प्रयत्न मी करतो. ज्याप्रमाणे चकोर चंद्रमाचे चिंतन करतो किंवा गाय वनामध्ये गेली असता तिचे लक्ष सतत तिच्या वासराकडे लागलेले असते, तसेच ध्यानामध्ये तुमचे दर्शन व्हावे यासाठी मी सतत तळमळत असतो. नको अंत पाहू माया हे हरावी.. इथे परत उद्धवस्वामी समर्थांना शरण जातात. हा प्रपंच म्हणजेच मठाचा कारभार करताना ही माया मधेमधे येते, त्यामुळे तुमची भक्ती, विरक्ती, शांती मनाला मिळत नाही, पूर्ण वैराग्य प्राप्त होत नाही. मठाच्या कारभारात लक्ष घालावेच लागते व त्यात कुठेतरी ही माया अडकवते म्हणून लवकर या व मला यातून सोडवा.

उद्धवस्वामी पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, तुमचं ब्रीदवचन आहे की तुम्ही आपल्या शिष्याला मायेपासून सोडवता. मी अत्यंत पतीत, दीन, दुबळा आहे; मला तुमच्या आधाराची गरज आहे; त्यामुळे तुम्ही मला प्रचिती दाखवा आणि या मोहमायेपासून त्वरित सोडवा.

आठवी ओवी प्रसिद्ध आहे. नित्याच्या दासबोध पठणामध्ये आपण समर्थांना ही विनंती करतो, तशीच विनंती उद्धवस्वामी येथे समर्थांना करतात. अत्यंत प्रेमाने तुम्ही माझा सांभाळ केला, तसाच यापुढेही करा व तुमचा आधार, तुमची कृपा मला सतत प्राप्त होऊ दे. हीच विनंती या ओवीतून करतात.

शेवटच्या ओवीमध्ये उद्धवस्वामी म्हणतात, मला तुम्ही हाताशी धरा म्हणजेच दूर लोटू नका. समर्थांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या उत्तम शिष्यांना वेगवेगळ्या मठामध्ये मठाधिपती म्हणून ठेवले होते. परंतु या शिष्यांच्या मनाला तळमळ आहे समर्थांच्या जवळ रहाण्याची. त्याचीच प्रचिती या पत्रातून येते. वारंवार उद्धवस्वामी विनंती करतात की मला तुमच्याजवळ येऊ द्या. तुमची सगुणमूर्ती सतत मला पाहता यावी, तुमचे उद्बोधन ऐकता यावे व तुमच्या पायाशी बसून मला श्रीरामरायाची भक्ती करता यावी. हीच विनंती वारंवार उद्धवस्वामी या पत्रातून समर्थांना करतात.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

ज्येष्ठ बंधूंना लिहिलेले पत्र

आपण समर्थांची कौटुंबिक पत्रे पहात आहोत. यातील हे पत्र समर्थांनी परत आपल्या ज्येष्ठ बंधूंना लिहिले आहे. या पत्राकरिता मी आ. समर्थव्रती सुनीलदादा चिंचोळकर यांच्या छोट्याशा पुस्तिकेचा आधार घेतला आहे.

सकळ तीर्थाचे सार । सत्यस्वरूप निर्विकार ।

तुमचे चित्त तदाकार । निरंतर ।। १ ।।

विमळ ब्रह्मपरायण । सगुण भक्ती संरक्षण ।

विशेष वैराग्य लक्षण । तुमचे ठायी ।। २ ।।

मुक्त क्रियेचा अनादरू । स्वधर्मकर्मी अत्यादरू ।

आग्रहनिग्रहाचा विचारू । तोहि नसे ।। ३ ।।

नसे कामनेचा लेश । जयंत्या पर्वांचा हव्यास ।

अंतरी आवडे विशेष । हरिकथा निरूपण ।। ४ ।।

तुमचे देह सार्थकाचे । सर्वदा परोपकाराचे ।

भगवंते निर्मिले बहुतांचे । समाधान ।। ५ ।।

तुमचेनी वाग्विलासे । बहु पाखंड नासे ।

संशयातील प्रकाशे । विमल वस्तू  ।। ६ ।।

सन्मार्गींचा कैपक्षी । अनमार्ग करणे अलक्षी ।

लोक पावती प्रत्यक्षी । समाधान ।। ७ ।।

दक्षता आणि चातुर्यता । वित्पन्नता आणि लीनता ।

उत्तम गुण सर्वज्ञता । तुमचे ठायी ।। ८ ।।

तुमचे स्वरूप वर्णवेना । म्हणोनि देहाचि वर्णना ।

युक्त आयुक्त मित्रजना । क्षमा केली पाहिजे ।। ९ ।।

समर्थांनी या पत्रात परत आपल्या ज्येष्ठ बंधूंचे गुणगान केले आहे. ते निर्गुणी उपासनेत कसे रत आहेत व आत्मबोधाच्या सर्वोच्च पायरीवर पोहोचले आहेत, याचेच वर्णन या पत्रात केले आहे. सकळ तीर्थांचे सार.. ही पहिली ओवी. यात समर्थ म्हणतात, सगळ्या तीर्थांचं सार किंवा सगळ्या देवांचे भजन हे जसं एकाच सद्गुरूच्या चरणाशी पोहोचतं, तसंच तुम्ही सद्गुरु पदापर्यंत पोहोचलेले आहात. म्हणूनच तुमचं चित्त, मन, बुद्धी सदैव त्या रामरायाशी तदाकार असते. पुढच्या ओवीत त्याचं लक्षण सांगताना विमल ब्रह्म म्हणजेच निर्गुण निराकार आणि शुद्ध असणाऱ्या परब्रह्माशी आपण तदाकार झाले आहात, तरीही आपण सगुण भक्ती नित्य नियमाने करता. यातही वैराग्य, विरक्तता, अलिप्तता हे गुण विशेष आहेत.

स्वधर्मकर्मी अत्यादरु.. म्हणजेच आपल्या स्वधर्माबद्दल आणि स्वकर्मांबद्दल आपण जागरूक आहात. या ठिकाणी स्वधर्म म्हणजे मनुष्य जन्मात आलो आहोत, म्हणून अंतरात्म्याला जाणून घेणे हे आपले स्वकर्म व स्वधर्म आहे. तसेच प्रपंचात आहोत म्हणून प्रपंचाची जबाबदारी, समाजाची जबाबदारी, लोकांना जागरूक करणे ही सगळी जबाबदारी म्हणजेच स्वधर्म. या दोन्ही अर्थाने त्यांचे जेष्ठ बंधू त्या धर्माचे पालन उत्तम रीतीने करत होते, म्हणून समर्थ त्यांना अत्यादरू म्हणतात. नसे कामनेचा लेश.. म्हणजेच वैराग्य एवढे प्रखर आहे की, कोणतीच कामना, इच्छा, वासना निर्माण होत नाही. सगुण अभ्यास, निर्गुणाची उपासना याव्यतिरिक्त कोणतीच भावना मनामध्ये येत नाही. सतत अंतरात्म्याशी जुळलेले रहाणे हेच त्यांना आवडते, हेच या ओवीतून लक्षात येते. 

हरीकथा निरूपण.. सगुण अभ्यासाबरोबर, जमलेल्या लोकांना हरीकथा सांगणे; आचरणाचा योग्य मार्ग दाखवणे; मार्गदर्शन करणे; नामस्मरणाला लावणे; उपदेश करणे हेच त्यांना आवडते. बहुत पाखंड नासे.. या ओवीत समर्थ सांगतात, पाखंड म्हणजे त्या काळच्या ब्राह्मणांनी धर्माच्या नावावर उभा केलेला बागुलबुवा, ज्याला उल्लंघून जाण्याचा समाजाला धीर नव्हता. ब्राह्मण सांगतील ती पूर्व दिशा हाच समाजाचा न्याय होता. आपण ज्ञानेश्वर माऊलींबद्दल या गोष्टी बघितल्या आहेत. त्यांच्या मातापित्यांना देहांताचे प्रायश्चित्त त्याच कारणाने दिले गेले होते, तरीही या चार भावंडांची शुद्धी करून घेतली नाही; याला पाखंड म्हणतात. तर, तुम्ही प्रवचनाद्वारे; कीर्तनाद्वारे लोकांना या पाखंडापासून दूर करता, सत्य धर्म काय आहे; योग्य आचार काय आहे हे स्पष्टपणे सांगून अंधश्रद्धा बाजूस करता, असेच समर्थांना यातून सुचवायचे आहे.

लोक पावती प्रत्यक्षी समाधान.. हा तुमचा स्पष्ट, सहज, सोपा, आचरणास सहज असणारा भक्तिमार्ग पाहून लोकांना समाधान प्राप्त होते. अतिशय सोपे असणारे नामस्मरण आपण सगळ्यांना सांगता. समर्थांनीही त्यांच्या दासबोधात नामस्मरणालाच महत्त्व दिले आहे. तेच त्यांचे बंधूपण करतात, असेच समर्थांना सुचवायचे आहे. दक्षता आणि चातुर्यता.. प्रपंचात रहाताना सर्व प्रकारची कर्मे करावी लागतात. ती करताना त्यात चूक होणार नाही, कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यासाठीच तत्परता, चातुर्य आवश्यक असते. तुमचा लोकसंग्रह उत्तम असल्याने तुम्ही ही दक्षता नेहमीच घेता. असे सगळे उत्तम गुण तुमच्यात आहेत. 

तुमचे स्वरूप वर्णवेना.. या शेवटच्या ओवीत समर्थ म्हणतात, तुमचं मूळ रूप जे आहे म्हणजेच आत्मरूप जे आहे त्याचं वर्णन करता येत नाही. तुमच्यातल्या विविध उत्तम गुणातून ते सांगण्याचा मी प्रयत्न केला, परंतु अंतरात्मक त्याहीपेक्षा मोठे आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून शेवटी देहाच्या माध्यमातून व देहाच्या कृतीतून तुमचं वर्णन करावं लागलं. अधिक काही कमी जास्त सांगितलं असेल तर क्षमा करावी. यातून श्रेष्ठींची पारमार्थिक उंची लक्षात येते. समर्थही तसेच आहेत, असे या दोन बंधूंचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जरी फार काळ ते एकत्र राहिले नाहीत, तरी मनापासून ते एकमेकांशी जुळलेले आहेत. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मातोश्रींस पत्र

समर्थ वाङ्मयातील समर्थांची पत्रे हा प्रकार आपण पाहणार आहोत. हा एक वाङ्मय प्रकार आहे. पत्रलेखन हा वाङ्मय प्रकार आपल्याकडे फार जुना आहे. शकुंतलेने दुष्यंत राजाला लिहिलेले पत्रं प्रसिद्ध आहे. समर्थांनी सर्व प्रकारच्या वाङ्मयाला स्पर्श केला आहे. गद्य, पद्य, ओव्या, अभंग, सवाया, चौपदी, भारुड, करुणाष्टके, दाम यमक असे अनेक प्रकार समर्थांनी हाताळले आहेत. समर्थांची ग्रंथसंपदा मोठी आहे. गोविंदगिरी महाराज सांगतात, समर्थांनी ४६,००० ओव्यांची रचना केलेली आहे. गेल्या पाच हजार वर्षात एवढी मोठी वाङ्मयसंपदा कोणीच निर्माण केलेली नाही. समर्थ महान व कर्तृत्ववान आहेत. समर्थांचे लेखन ही एक सामाजिक चळवळ आहे. बऱ्याच मोठ्या कर्तृत्ववान लोकांचा पत्रव्यवहार पुढे समाजाकरता ग्रंथरूपात प्रसिद्ध केला जातो, जो पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक व त्या वेळेचा इतिहास याची साक्ष देणारा ठरतो.

समर्थांनी ११०० मठ व अनेक देवळे स्थापन केली, त्या सगळ्या मठाधिपतींशी त्यांचा संपर्क होता. त्याकाळी सांडणीस्वार ही सेवा करीत किंवा समर्थांचे शिष्य सर्व दूर पसरले होते, त्यांच्या हाती पत्रं पोहोचवली जात. सध्या त्यातील फार थोडी पत्रं उपलब्ध आहेत. या पत्रांचं संकलन सुनील दादा चिंचोळकर यांनी केलं आहे, त्या पुस्तकाच्या आधारे आपण हा वाङ्मय प्रकार बघू. समर्थांच्या पत्रांचे सुनील दादांनी तीन भाग पाडले आहेत. कौटुंबिक, राजकीय, सामाजिक. आपण समर्थांची व्यक्तिगत पत्रं बघणार आहोत, यातील पहिले पत्रं कौटुंबिक या प्रकारातील. पहिलं पत्रं त्यांनी आपल्या मातेस लिहिलेलं आहे. ते पत्रं बघूया. 

सकळ गुणांचा निधी । निर्गुणाची कार्यसिद्धी । विवेकाची दृढबुद्धी । तुझेनि गुणें ।। १ ।।

तूं भवसिंधूचे तारूं । तूं भक्तांचा आधारू । तूं अनाथाचे अवसरू । वैष्णवी माया ।। २ ।।

तूं भावार्थाची जननी । तूं विरक्तां संजीवनी । तूं परमार्थाची खाणी । भजनशीळ ।। ३ ।।

तूं सर्व सुखांची मूस । तूं आनंदरत्नांची मांदूस । तुझेनि चुकती सायास । संसारींचे ।। ४ ।।

तूं परमार्थाविषयीं अग्रगण्य । सद्गुरु दासाचें मंडण । समाधानाची खूण । अंतरीं वसे ।। ५ ।।

सत्संगासी सादर । भक्तिमार्गासी तत्पर ।धूर्त कुशळ अति सादर । परोपकारी ।। ६ ।।

श्री गुरुभजनीं तत्पर ।स्वामिकृपा निरंतर ।म्हणोनी शुद्ध क्रियेचा उद्धार ।तुमचे ठायी ।।७ ।।

आत्मचर्चेसीं मुगुटमणी । अत्यंत सादरता निरूपणीं । बोलणें अमृतवाणी । मृदुवचनीं ।। ८ ।।

विवेकनिधी केवळ । अंतर शुद्ध निर्मळ । ज्ञानदीप प्रबळ । तुमचे ठायीं ।। ९ ।।

क्रियाशुद्धी निर्मळ मन ।निरभिमानी परम सज्जन ।निरंतर अनुसंधान । अंतरीं वसे ।।१० ।।

भावार्थाचें आगरू । प्रबळ शांतीचा सागरू ।पाहतां उपमे मेरू । तोही  उणा ।। ११ ।।

हे समर्थांनी मातोश्रींस लिहिलेले पत्र आहे, आता त्याचा अर्थ बघू. या पत्राचे वेगळेपण जाणवते. यात मातेला नमस्कार, खाली स्वतःची सही असा कोणताच प्रकार नाही. अकरा ओव्यांचं हे पत्रं आहे. यात पहिल्या ओवीत समर्थ सांगतात, तू सकळ गुणांचा निधी.. जे सगळे गुण तुझ्यात आहेत, विवेकाची दृढबुद्धी म्हणजे तू अत्यंत विवेकशील आहेस, तो विवेकच माझ्यात आला आहे.

दुसरे ओवीत समर्थ आपल्या मातेला वैष्णवी माया म्हणतात, म्हणजे  मूळ माया. ह्या ठिकाणी मातेला मूळ मायेची उपमा दिली आहे कारण माझ्यासारख्या संताची तू माय आहेस, म्हणून जणू काही तू मूळ माया आहेस. मूळ मायेत जसे सगळे गुण असतात, ते उत्तम असतात, तसेच माझ्यात आले आहेत. त्याच्यापुढे समर्थ म्हणतात, तू सर्व सुखांची मूस आहेस, म्हणजेच परमार्थातले जे सुख आहे, आत्माराम भेटण्याचे जे सुख आहे, ते सुख मला तुझ्यामुळे प्राप्त झाले आहे. त्या सुखामुळे संसाराची दुःखे मला जाणवत नाहीत. ती दुःखे आपोआप नाहीशी होतात. 

त्याच्या पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, परमार्थाविषयी अग्रगण्य म्हणजेच परमार्थात जे परब्रम्हाला जाणून घेण्याचे उद्दिष्ट असते, ते तू पूर्ण केले आहेस, म्हणून तू पूर्ण समाधानी आहेस. यामुळेच असेच समाधान मलाही प्राप्त झाले आहे. सत्संगाशी सादर भक्तीमार्गाशी तत्पर.. म्हणजेच तू सदैव भक्तिमार्ग अनुसंधानात असतेस. सत्संग म्हणजेच कीर्तन, प्रवचन, अभ्यास यांचा तू सतत आस्वाद घेतेस. ग्रंथवाचन, नामस्मरण यामध्ये तू रममाण असतेस. परोपकारी म्हणजेच सतत दुसऱ्यांना मदत करण्याकरता तत्पर असतेस, म्हणूनच अतिशय आनंदात व समाधानात असतेस. गुरूभजनी तत्पर स्वामीकृपा निरंतर.. या ओवीत समर्थ, माता अखंड श्रीरामाच्या भजनात तल्लीन झाली आहे असे सांगतात. तसेच श्रीरामांची तिच्यावर पूर्ण कृपा आहे म्हणूनच तिचा उद्धार म्हणजेच मुक्ती तिला श्रीरामांकडून प्राप्त होणार आहे.

आठव्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, अत्यंत सादरता निरूपणी म्हणजेच कोणी विचारायला आलं तर त्याला परमार्थाविषयी उत्तम मार्गदर्शन करणे, बोलणं अतिशय मृदू असणे, आदराचं असणे असं तुझं मार्गदर्शन सगळ्या लोकांना लाभतं. विवेकनिधी केवळ अंतर शुद्ध निर्मळ.. म्हणजेच अतिशय सामान्य परिस्थितीत जरी तू आहेस, हा विचार पैशाच्या दृष्टिकोनातून झाला, तरी तू अत्यंत विवेकी आहेस. अतिशय आत्मनात्म विवेक करून तू या संसारात रहातेस. त्यामुळेच तुझे मन अतिशय शुद्ध आहे, त्यामुळेच अंतरात्म्याचे ज्ञान तुझ्याजवळ प्रकट झाले आहे. शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, भावार्थाचे आगरू प्रबळ शांतीचा सागरू.. म्हणजेच भावार्थ आणि शांती एकत्रपणे तुझ्यात नांदते. परमार्थाचा खरा शुद्ध भाव, भक्ती तुझ्यात प्रगट झाली आहे. त्यामुळेच अनुपम अशी शांती, स्थिरता व एकाग्रता तुझ्याजवळ आहे आणि म्हणूनच उपमेसी मेरू, तुला कशाचीच उपमा देता येणार नाही. जशी मूळ मायेला कशाचीच उपमा देता येत नाही ती हे सारे निर्माण करू शकत नाही, त्यापासून वेगळी असते, भासते, जाणवते पण दिसत नाही, तसेच सगळे गुण माझ्या मातेमध्ये आहेत असे समर्थांना या पत्रातून मातेबद्दल सांगायचे आहे.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language