समर्थांचा भक्ती मार्ग

समर्थांनी आपल्या सर्वच वाङ्मयात भक्तीला प्राधान्य दिले आहे. दासबोधाच्या फळश्रृतीमध्ये ते म्हणतात, “भक्तीचेन योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथीं ।।” मनुष्यजन्माचे ध्येय जन्ममरणाच्या चक्रातुन मुक्ती मिळविणे हे आहे. अनेक जन्मांची पुण्याई खर्च झाल्यावर हा मनुष्य देह मिळाला आहे. समर्थ म्हणतात, “नाना सुकृताचें फळ । तो हा नरदेह केवळ । त्याहि मधें भाग्य सफळ । तरीच सन्मार्ग लागे ।।२-४-१।।” असा हा पूर्वपुण्याईने मिळालेला देह सार्थकी लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. “देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें । नाहीं तरी हें वेर्थचि गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ।।१-१०-६१।।” त्याचे सार्थक करण्याकरीता निव्वळ प्रपंचाच्या, वासनापूर्तीच्या मागे न लागता काही परमार्थ केला तरच मुक्ती हे ध्येय गाठणे शक्य आहे. मुक्ती मिळविण्याकरीता आत्मज्ञान होणे गरजेचे असते. ते मिळविण्याकरीता मुख्य तीन मार्ग आहेत, भक्तीमार्ग, ज्ञानमार्ग आणि योग मार्ग. हे तीनही मार्ग आपापल्या परीने श्रेष्ठच आहेत.

यातील भक्तीमार्ग हा सर्वांत सोपा असा मार्ग आहे. ज्ञानमार्गामध्ये बुद्धीचातुर्य आवश्यक असते. तर योगमार्गामध्ये शरिराला कष्ट द्यावे लागतात. भक्तीमार्गाला भोळाभाबडा भाव लागतो. भाव हीच भक्तीमधली अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. अशा या भक्तीमार्गाचे मर्म समजून घेण्यासाठी सर्व प्रथम भक्ती म्हणजे काय ते समजुन घेतले पाहिजे. भक्ती हा शब्द तीन प्रकारांनी सिद्ध होते. १) भजन भक्ती २) भागो भक्ती ३) भंजन: भक्तिः। 

भजनं भक्ती म्हणजे भजन करणे, रस घेणे. भागो भक्ती: मधील भाग म्हणजे अंश. जीव हा ईश्वराचा अंश आहे. मी ज‌गाचा नसून भगवंताचा आहे अशी खरी जाणीव निर्माण होणे, याचे नाव भक्ती. तीसरा अर्थ मंजनं भक्ती: म्हणजे, भगवंताच्या चरणी आपल्या अहंचा बळी देणे. भगवंताची सेवा करणे. त्याचाच आश्रय घेणे. अशा अर्थानेही भक्ती शब्द सिध्द होतो. भक्तीमध्ये प्रेम आहे. कारण भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर तो भगवंताचे पुन: पुन: चिंतन करतो. भक्तीमध्ये ज्ञान आहे, कारण मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्यावाचून जीव भगवंताच्या नादी लागत नाही. 

भक्तीमध्ये कर्म आहे कारण, भगवंतासाठी काही केल्यावाचून जीवाला चैन पडत नाही. भगवंताचे चिंतन करता करता जीव ध्यान साधतो, म्हणून भक्तीमध्ये योग देखील आहे म्हणून समर्थ आपल्याला, “भक्तीचेन योगें देव । निश्चयें पावती मानव ।” असे दासबोधात सांगतात. तसेच मनाच्या श्लोकांमध्ये ते म्हणतात, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।” भागवत ग्रंथात कपिल मुनी आपली माता देवहुतीला भक्तीयोग सांगताना म्हणतात, आपली जी इंद्रिये, स्पर्श, दर्शन, गुणांचा अनुभव घेतात त्या इंद्रियांचे खरे कार्य म्हणजे, परमात्म्याची सेवा, भक्ती ज्यामुळे होईल अशी कृत्ये करणे हेच होय. हीच मुख्य कृत्ये इंद्रियांकडून केली गेली म्हणजे विशेष प्रयत्न न करता परमात्म्यावर भक्ती जडते. अशी निरपेक्ष भक्तीच लिंगदेह नष्ट करते.


विसृज्य सर्वान्यान्श्च मामेवं विश्वतोमुखम् ।

भजनत्यन्याया भक्त्या तान्मृत्योर्तिपराये ।। श्रीमद्भागवत ३/२५/४० ।।

ते म्हणतात, “माते ! जे भक्त धन, पशु, घर, अन्य पदार्थ किंवा अन्य संग्रहित वस्तू यांना सोडून अनन्य भक्तीने माझेच भजन करतात, त्यांना मी या संसार सागरातून पार नेतो.” समर्थ देखील या समासात सांगतात, “व्हावया ज्ञानाची प्राप्ती । आधीं केली पाहिजे भक्ति । भक्ती घडलिया मुक्ती । पाठी लागे ।।पंचसमासी ४-२।।” ज्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याने भगवंताला अथवा सद्गुरूंना अनन्यभावाने शरण जावे. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात, “अनन्याश्चिन्तयन्तो मां” किंवा “न मे भक्तः प्रणश्यति” अनन्य भक्तीने भगवंत प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला आपल्या हृदयात धारण करतात. आत्मज्ञान झाले, जीवशिवाची भेट झाली की; वासना शिल्लकच रहात नाहीत; मग परत परत जन्माला येण्याचे कारणच उरत नाही. वासनांच्या जाळ्यात फसलेला जीव भक्तीयोगाने मुक्त झाला.

संत एकनाथ महाराज म्हणतात, “भावें करितां भगवद्‌भक्ती । भक्त मुक्तीही न वंछिती । तरी त्यांपाशी चारी मुक्ती । दास्य करिती सर्वदा ।। एकनाथी भागवत २-६२३।।” भावपूर्ण भक्ती करणारा जरी मुक्तीची इच्छा धरीत नसला तरी चारही मुक्ती त्याच्या दास होतात. तुकाराम महाराज अभंगगाथेमध्ये म्हणतात, “करा हरिभक्ती परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ।।३९००।। भोळे भक्तीभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ।।४०२९।। भक्तीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ।।४४२०।।”

नामदेव महाराज भक्तीच्या संदर्भात त्यांच्या ‘उपदेश’ या प्रकरणात म्हणतात, “न धरावी चाड मानसन्मानाची । आवडी भक्तीची रूढवावी ।। अंतींचा लाभ आधींच साधिजे । देह असतां कीजे हरिभक्ती ।। भक्तीविणें जिणें जळों लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखरूप ।। भक्तीविण मोक्ष नव्हे हा सिद्धांत । वेद बोले हात उभारोनि ।।” 

अशा या भक्तीमार्गामध्ये सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती असे परत दोन प्रकार आहेत. यातील सगुण भक्ती ही सर्वसामान्य साधकांसाठी सोपी भक्ती आहे. येथे भक्त आणि भगवंत हे वेगळे असतात. त्यामुळे परमेश्वराची अर्चना करणे, नामस्मरण करणे हे शक्य होते. निर्गुण भक्ती मध्ये भक्त आणि भगवंत हे एकरूप असतात. त्यामुळे त्यात थोडी रूक्षता येते.  अशा या भक्तीमार्गाने जाण्यासाठी नवविधा भक्तीरूप एक नऊ पायऱ्यांचा सोपान सांगितला आहे. भक्त प्रल्हादाने आपल्या पित्याला भक्तिचे महत्व पटवुन देताना सांगितले होते, 

 

श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्  ।।

इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा । क्रियेत भगवत्यद्धा तन्मन्येऽधीतमुत्तमम् ।। श्रीमद्भागवत ७-५-२३,२४।।”

पंचसमासीमध्ये समर्थ म्हणतात, “मोक्षभुवन अतिसुंदर । आनंदरूप मनोहर । तेथें जावयाचा विचार । ऐक बापा ।। तेथें नऊ पायर्‍या उत्तम । ऐक पायरी प्रथम । जे चढतां तुटे भ्रम । निःशेष जीवांचा ।। पंचसमासी समास ४-३,४।।” मोक्षभवन अतिसुंदर असून आनंदरुप मनोहर असल्याचा आपला अनुभव समर्थांनी सांगितला आहे. त्या ठिकाणी जाण्याकरीता नऊ पायऱ्यांचा सोपान आहे. यातील प्रत्येक पायरी महत्वाची आहे. साधक किंवा भक्त एक एक पायरी चढत चढत आत्मनिवेदन या अंतीम पायरीवर पोचतो. अंतीम पायरीवरून तो थेट आनंदरूप असणाऱ्या अतिसुंदर असणाऱ्या मोक्षभुवनात प्रवेश करतो. भागवतात भगवंत म्हणतात, “आध्यात्मिकानुश्रवणात् नामसङ्कीर्तनाच्च मे । आर्जवेनार्यसङ्गेन निरहङ्क्रियया तथा ।। भागवत ३/२९/१८।।” या भक्ती नऊ प्रकारच्या आहेत. १) श्रवण, २) कीर्तन, ३) नामस्मरण, ४) पादसेवन ५) अर्चन, ६) वंदन, ७) दास्य, ८) सख्य, ९) आत्मनिवेदन. या पायऱ्यांवरून चढत चढत मुक्तीभुवनात पोहोचता येते किंवा प्रत्येक पायरी किंवा भक्तीच्या कोणत्याही एका प्रकाराने देखील मुक्ती मिळू शकते. अशा या नविविधा भक्तीमार्गाचा विचार आपण दुसऱ्या लेखात करूया. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

प. पू. आक्कांच्या स्वभावाचे दोन पैलू (प्रेमळ आणि कर्तव्यकठोर आक्का)

परमपूज्य आक्का यांना मी जवळपास चार ते पांच वेळा भेटलो आणि त्यांचा सहवास अनुभवला आहे. त्यांचा स्वभाव कोकणातील फणसासारखा किंवा गोड शहाळ्यासारखा होता. त्यांनी कठोरपणाचा मुखवटा धारण केलेला होता. परंतु जेव्हा त्यांचा सहवास प्राप्त होतो तेव्हा त्यांच्यातील प्रेमळपणा जाणवतो. त्यांची माझी पहिला भेट पत्ररुपाने झाली होती. त्यांच्या त्या पत्रातील मजकूरावरून, हातात काठी घेऊन ऊभ्या असलेल्या कडक हेडमास्तरांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर ऊभी राहीली होती. वास्तविक संत हे अतिशय प्रेमळच असतात, मात्र उगीचच कुणीही मागे लागू नये म्हणून रागीट असल्याचा आव आणतात, हे आपण अनेक संताच्या चरित्रात वाचलेले आहे. संत सर्वच अज्ञानी जनांविषयी करूणा बाळगतात. त्या सर्व अज्ञानी जीवांना योग्य मार्ग मिळावा म्हणून प्रसंगी कठोर होतात. त्यांची ही प्रीति ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ।। अशी असते.  

माझे पत्रद्वारा दासबोध अभ्यासचे तिसरे वर्ष संपत आले होते. त्यादरम्यान सज्जनगड मासिक पत्रिके मध्ये दासबोधाचा सखोल अभ्यास बद्दल एका छोट्या चौकटीत माहिती आली होती. ती वाचल्यावर मला तो अभ्यासक्रम करावा अशी इच्छा झाली. या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती मिळावी म्हणून मी परमपूज्य आक्कांना त्यांच्या अंबरनाथच्या पत्यावर एक पत्र टाकले. त्या पत्रात मी माझ्या अभ्यासक्रमासंबधी सर्व शंका विचारल्या होत्या. त्या माझ्या पत्रावर आक्कांनी देखील सविस्तर उत्तर पाठविले होते. ही आमची पहिली अप्रत्यक्ष भेट.

त्या पत्रातील मजकूराचा गोषवार पुढील प्रमाणे होता. त्यातील पहिलेच वाक्य थेट घाव घालणारेच होते. आपले पत्र पोहोचले. प्रश्नपत्रिकेच्या पुस्तकांत फक्त प्रश्नच असणार! आपणास दा. स. अ. बद्दल ज्यांनी माहिती दिली त्यांनी संपूर्ण माहिती दिली नाही. म्हणून हा पत्रव्यवहार वाढला. अभ्यासाकरिता फी नाही. पण फी पेक्षा सुध्दा महत्वाची अट एकच की, संपूर्ण २०० समासांचा अभ्यास करण्यास ८ वर्षे ४ महिने वा अधिक काळ लागणार. प्रपंचात अडचणी असतातच. तरी एकदा सुरु केल्यानंतर कोणत्याही सबबीस्तव बंद करता येणार नाही. हे कटाक्षाने मान्य असेल तरच भाग घ्यावा. प्रबोध पूर्ण झाला की, अभ्यासास सुरवात करुन चालेल. या प्रश्नाचे उत्तर आपण सांगावे.  मला येत नाही, असले उत्तर सखोल अभ्यासात नकोच नको. मात्र दोनपेक्षा जास्त स्वाध्याय कधीच पाठवायचे नाहित. पत्रामधील मजकूरावरुन त्या खूप कडक स्वभावाच्या असाव्यात अशी त्यांची प्रतिमा मनांत निर्माण झाली. त्यानंतर पहिले दोन स्वाध्याय त्यांच्याकडे पाठिविल्यानंतर  त्यांनी मला खोपोलीच्या सौ उज्वला दाबके यांच्याकडे पुढील स्वाध्याय पाठविण्यास सांगितले. त्या देखिल आक्कांच्या अनुग्रहित होत्या. हल्लीच त्या वारल्या असे समजले. 

नियमित स्वाध्याय पाठविण्यास सुरवात झाल्यानंतर सौ. दाबके यांनी शिवथर घळीतिल साधना सप्ताहा संबधी माहिती दिली. त्या सप्ताहास आवर्जुन हजर राहण्याविषयी सूचना केली. त्यांच्या सूचनेनंतर  घळीत सप्ताहाला कोजागिरीच्या दिवशी संध्याकाळी हजर झालो.  त्यावेळी आक्का रेल्वेने वीर रेल्वे स्टेशनला येत असत तेथुन शिवथरला असा त्यांचा प्रवास असायचा. येताना त्या मोठ्या प्रमाणात भाजी घेऊन येत असत. मी घळीत आलो तेव्हा कल्याण मंडपात सर्व अभ्यासार्थी हजर होते. मुखाने रामनाम आणि हाताने भाजी निवडण्याचे काम तेव्हा चालू होते. त्यावेळी आक्कांचे प्रथम प्रत्यक्ष दर्शन झाले. स्वत: आक्का देखिल भाजी निवडत होत्या. त्यावेळी सप्ताहाला पुरुषवर्ग फार कमी असायचा. तेथे बसलेल्या पुरुषांच्या रांगेत शेवटी मी बसलो आणि भाजी निवडण्याचे कामाला लागलो. सर्व भाजी निवडुन झाल्यावर ती रामनामाच्या गजरात एकत्र केली जायची.  

त्याच दिवशी रात्री कोजागिरी निमित्ताने निरनिराळे खेळ खेळले जात होते. परंतु तेथे बहूसंख्येने महिला असल्यामुळे मी जरा लांब लांबच होतो. परंतु आक्कांच्या चाणाक्ष नजरेने ते हेरले आणि मला त्या खेळात यायला लावले. लहान मुले खेळतात तसा एकमेकांचा पदर धरुन आगगाडीचे खेळ चालू होता. परत तोच संकोच आड येत होता. तेव्हा आक्कांनी मला त्यांचाच पदर धरुन त्या खेळात भाग घ्यायला लावला. अशा रितीने मी आक्कांचा पदर धरुनच या उपक्रमात सामिल झाला असे म्हणता येईल. त्यानंतर त्याच दिवशी अचानक वारा सुटल्याने माझ्या डोळ्यात काही कचरा गेला होता. तो काढण्याकरीता मी डोळा चोळायला लागलो होतो. ते बघुन आक्कांनी स्वत:च परत त्यांच्या पदराच्या शेवाने माझ्या डोळ्यातील तो कचरा काढला. हे दोन प्रसंग हा योगायोग होता की, त्यातुन आक्कांना मला काही सूचवायचे होते हा प्रश्न आता मला पडतो. 

माझ्या सारख्या असंख्य अज्ञानी अभ्यासार्थिंच्या डोळ्यांत गेलेला कचरा त्यांनी काढला आहे. कदाचित पदर धरुन खेळात सामिल करुन घेणे अथवा डोळ्यांत गेलेला कचरा पदराने साफ करणे असो या कृतीद्वारे त्यांनी मला या परिवारात मायेने आणले. मी माझ्या आईचा पदर कधी धरलेला मला आठवत नाही. परंतु या गुरुमाऊलीने मात्र तो अनुभव दिला. त्यांच्या या प्रेमळ स्वभावाचा पैलू मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला आणि माझ्या मनांत त्यांची असलेली प्रतिमा एकदम बदलून गेली. आक्का कल्याण मंडपात घळीकडे जाणाऱ्या दरवाजाच्या बाजूला बसलेल्या असत. त्यांची तीक्ष्ण नजर सर्वत्र फिरत असे. काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर त्यांच्या पाटीवर लिहून दिल्यावर त्या प्रश्न विचारणाऱ्याचे समाधान होईपर्यंत त्याचे उत्तर किंवा स्पष्टीकरण सांगत असत. जर प्रश्न कॉमन असेल तर प्रवचनांत देखील सांगत असत. त्यावेळी विवेकसिंधूवर प्रवचन देत असत. त्यांच्या त्या प्रवचनात दिवसभरात इतर कार्यक्रमांत साधकांनी केलेल्या काही आगळीका असतील त्याचा त्या थेट उल्लेख न करता पुराणातील दाखल्यांच्या स्वरूपात सांगत असत.

याच साधना सप्ताहात घळीतील समर्थ आणि कल्याण स्वामी यांच्या साक्षीने त्यांनी मला अनुग्रह दिला. त्यानंतर माझ्या नकळत त्या माझा फॉलोअप घेत असत. माझ्या त्यावेळच्या समिक्षक कै. सौ. उज्वला दाबके यांच्या पत्रातुन ते समजत असे. एकदा मी अंबरनाथ येथील त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे मंदिरात कलावती आई यांचे भजन चालू होते. आक्का त्यावेळी त्यांच्या बेडवर बसुन काहीतरी लिहित होत्या. भजन चालू होते म्हणून मी गप्प बसलो होतो. परंतु त्यांनी मला भजन चालू असले तरी बोलायला हरकत नाही असे सूचवले. त्यावेळी त्या पडवीवरचा दासबोध हे पुस्तक लिहीत होत्या. मी त्यांच्या ज्ञानापुढे हिऱ्यापुढे काच असावी असा होतो. परंतु तरीही त्यांनी आपल्या हातातली डायरी मला वाचायला दिली आणि माझे त्यावरचे मत विचारले. वास्तविक त्यांच्या लेखनावर काही अभिप्राय देण्याएवढी माझी लायकीही नव्हती. तरीही त्यांनी मला माझे मत विचारले. त्यावर मी काही तरी गुळमुळित उत्तर दिले. ही त्यांची माझी शेवटची भेट होती.   

मला परमपूज्य आक्कांच्या कठोर किंवा रागिट बाजूचा अनुभव आलाच नाही असे म्हटले तरी चालेल. त्या खरोखरच शहाळ्यासारख्या मधूर स्वभावाच्या होत्या. त्यांनी महिन्याला किती स्वाध्याय पाठवायचे याचा नियम ठरवला होता. त्याबाबतीत त्या काटेखोर देखील होत्या. मात्र त्याला अपवाद केलेला देखील मी पाहिला आहे. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाला एकेचाळीस पूर्ण होण्याच्या कालात, मला आलेला परमपूज्य आक्कांच्या सहवाचा अनुभव मला शेअर करायला परवानगी दिल्या बद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करून विराम घेतो. 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language