भीमरूपी स्तोत्र ५ – भाग २

समर्थांच्या अकरा स्तोत्रातील पाचव्या क्रमांकाचे हे स्तोत्र स.भ.मोहनबुवा रामदासी यांच्या पुस्तकात पाचव्या क्रमांकावर आहे. काही ठिकाणी ते सहाव्या क्रमांकावर आहे. या स्तोत्राच्या बारा श्लोकांचा अर्थ आपण भाग १ मध्ये बघितला. तेराव्या श्लोकांपासूनचा अर्थ भाग २ मध्ये बघणार आहोत. समर्थ स्थापित हा एकच मारुती दास मारुती आहे. दास मारुतीची स्थापना करताना शिष्याने दासानुदास व्हावे हीच शिकवण समर्थांनी दिली आहे. २४ श्लोकांच्या या स्तोत्रात हनुमंताची स्तुती करताना समर्थ खूप भावोत्कट होतात. स्कंदभागी रामाला वाहून नेणारा, द्रोणागिरी उचलून आणणारा, लंकेत झेप घेणारा अशा हनुमंताच्या कितीतरी छटा समर्थांनी या स्तोत्रात रंगवल्या आहेत.


“कासिली हेमकासोटी घंटा किंकिणी भोवत्या ।

मेखळे जडलीं मुक्तें दिव्य रत्ने परोपरी ।”

समर्थ म्हणतात की, यश संपादन करावे आणि रामावर भार टाकून निवांत रहावे. हनुमंताच्या कमरेला छोट्या घंटांनी किणकिण आवाज करणारी सोन्याची कासोटी ही जन्मजात आहे. ती त्याच्या ब्रह्मचर्याचे प्रतीक आहे. त्याच्या कमरेच्या कंबरपट्ट्यावर निरनिराळ्या प्रकारची रत्ने आणि मोती सुद्धा जडवलेले आहेत. मस्तकावर धारण केलेल्या मुकुटाचे तर काय वर्णन करावे.

“माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।”

यामध्ये कोटी चंद्र सूर्य लोप पावतात म्हणजेच नाहीसे होतात, लपून जातात. मुकुट तेजाने एवढा तळपत आहे. कानात दिव्य तेजस्वी कुंडले आहेत आणि गळ्यात मोत्यांची माळ शोभून दिसत आहे. समर्थांनी हनुमंताचे अगदी हुबेहूब वर्णन केले आहे. स्तोत्र म्हणताना तसाच हनुमंत आपल्या डोळ्यापुढे उभा रहातो. कपाळाला केशराचा टिळा लावलेला असल्यामुळे त्याचा हसतमुख चेहरा छान दिसत आहे. बोटांमध्ये अंगठ्या शोभत आहेत आणि कडे घातल्यामुळे हाताला शोभा आली आहे. समर्थ हनुमंताच्या सर्व अवयवांचे वर्णन करताना त्याने घातलेल्या आभूषणाचे सुद्धा वर्णन करतात .

“चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।

कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ।।”

त्याच्या पायातील वाळे वाजत आहेत आणि तोडा मात्र मोठ्याने आवाज करत आहे. असा हा अनाथांचा कैवारी आहे, रक्षण करणारा आहे, सगळ्यांना मोक्ष म्हणजे मुक्ती मिळवून देणारा ईश्वर आहे. समर्थ म्हणतात की, हनुमंताचे स्मरण केले तरी जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते. हनुमंताचे तेजच एवढे प्रभावी आहे की ते पाहून आणि त्याचा भुःभुकार ऐकून दैत्य चळाचळा कापतात. तो असुरांना त्वरेने आणि नेटकेपणे खाली पाडतो आणि भूमीवर आपटून मारून टाकतो. हनुमंताला, समर्थ सौमित्र प्राणदाताची म्हणतात. सौमित्र म्हणजे लक्ष्मणाला प्राण देणारा आणि वानरकुळामध्ये शोभून दिसणारा आहे.

 

“दंडिली पाताळशक्ति अहीमही निर्दाळिले ।

सोडिलें रामचंद्रा कीर्ति  हे भुवनत्रयीं ।”

रामायणात या विषयी एक कथा आहे. राम रावण युद्धाच्या वेळी रावणावर बिकट परिस्थिती आली तेव्हा रावणाने अहिरावण, महिरावणाला आणले. अहिरावण हा रावणाचा लहान भाऊ होता आणि पाताळपुरीचा राजा होता. मेघनादच्या मृत्यूनंतर रावणाने अहिरावणाला सांगितले की राम आणि लक्ष्मण या दोघांना पाताळपुरीत घेऊन जाऊन ठार मारा. रावणाच्या आज्ञेने अहिरावणाने श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांना निद्रिस्त असताना पळवून नेले. तेव्हा बुद्धिमान मारुतीने आदिमायेची करुणा भाकली आणि मारुतीचे सामर्थ्य ओळखून आदिमायेने गिधाडाच्या तोंडून राम लक्ष्मण कोठे आहेत ते सांगितले. मारुतीने पाताळात जाऊन महिरावणाचा वध केला आणि अहिरावणाचा वध रामाकडून करविला. हनुमंताच्या या पराक्रमाने त्याची कीर्ती तिन्ही भुवनामध्ये पसरली. विसाव्या श्लोकापासून स्तोत्राची फलश्रुती सांगितलेली आहे. 

 

“विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।

कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ।।”

सात चिरंजीवात हनुमंत सर्वात श्रेष्ठ आहे कारण तो रामाचा अनन्य सेवक आहे. तो मोक्ष देणारा आहे हे त्याचे ब्रीद आहे, व्रत आहे. त्याचे नाव घेतल्याने आपले कल्याण होते तसेच भूत पिशाच्चे भीतीने थरथर कापतात. साप, विंचू, इतर विषारी प्राणी यांच्यापासून विषबाधा झाली तर मारुतीचे नाव घेतल्याने विषबाधेपासून सुटका होते. पण यासाठी समर्थांनी अट घातली आहे की,

“आवडीं स्मरतां भावें काळकृतांत धाकतो ।”

त्याचे नाव आवडीने आणि भक्तीभावाने घ्यावे. मग काळ म्हणजे मृत्यूसुद्धा भयभीत होतो. या स्तोत्राच्या पठणाने विषबाधा, भूतबाधा, अपमृत्यू, गृहपिडा, दुःख, दारिद्र्य यातून मुक्ती मिळेल.

“पुरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।

त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ।।” या स्तोत्राचे तीनवेळा पठण करण्याने भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कारण हनुमंत भक्तकामकल्पतरू आहेत. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तो कल्पवृक्ष आहे. मनापासून भक्ती करा, त्याविषयी कोणताही संशय घेऊ नका. तो समर्थांचा सुद्धा सहाय्यक आहे, पदोपदी सांभाळतो हे समर्थांनी दिलेले वचन आहे. रामाचे खऱ्या अर्थाने दास्यत्व करतो तो रामदासी पण हे दास्यत्व हनुमंतासारखे असावे. साधकाला,भक्ताला, उपासकाला भवसागर पार करून नेण्याचे सामर्थ्य या स्तोत्रात आहे.

१९४७ मध्ये चाफळला भूकंपाचा धक्का बसला पण त्यामानाने मंदिराला फारशी इजा झाली नाही कारण प्रत्यक्ष दासमारुती तिथे संरक्षणाला होता असे चाफळचे रामभक्त मानतात. समर्थ मनाने कणखर असले तरी त्यांचे हृदय रामरायासाठी आणि हनुमंतासाठी संवेदनशील आहे. त्यांच्या हृदयात निष्ठेचा, भक्तीचा टवटवीत अंकुर सदैव फुललेला दिसतो. ‘दासोहम्’ म्हणण्यात त्यांना खूप आनंद होई. हीच संवेदना शब्दरूपात आकार घेऊन एक आदर्श बनून स्तोत्रातून प्रगट होई. या स्तोत्र पठणाचे फळ मिळविण्यासाठी समर्थ एक अट सुद्धा घालतात.

 

“परंतु पाहिजे भक्ति संधे कांहीं धरूं नका ।

रामदासा सहाकारी सांभाळीतो पदोंपदी ।।”

अंतःकरणात भक्ती असली तर मारुती सर्वतोपरी सहाय्य करतो, पण ते म्हणतात संदेह काही धरू नका, मनात कोणतीही शंका न धरता फक्त निर्मळ भक्ती करा. सर्व भक्तांसाठी समर्थ रामरायाला प्रार्थना करतात हे रामराया, मारुती सारखी भक्ती सर्वांना प्रदान कर. तूच निर्माण केलेला जीव प्रपंचासाठी राबेल पण तरीही अंतकाळी भव व्यथेपासून जीवाचे रक्षण करू दे. जीवनाचे सारे सुख ईश्वरार्पण कर्मात आणि भगवंताच्या दास्यत्वात आहे हाच संदेश चाफळचा मारुती देतो. रामनामाचा आश्रय घेत आत्माराम जाणायचा असेल तर संपूर्ण शरणागती हवी आणि जी फक्त भगवंताच्या दास्यभक्तीतूनच मिळवता येते. समर्थ जणूकाही हेच या स्तोत्रातून सांगतात. अतिशय बलवर्धक आणि तितकेच कारुण्य घेऊन ईश्वराच्या चरणावर समर्पित झालेले हे स्तोत्र भक्तांवर चाफळच्या दासमारुतीची कृपा प्रदान करेल यात शंका नाही. स्तोत्र श्रद्धेने म्हणताना समर्थांचा भाव मात्र अंत:करणात असायला हवा. तेवढ्याच अर्थपूर्णतेने ते म्हणावे.

 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मारुती स्तोत्र पाचवे – भाग १

समर्थ स्थापित अकरा मारुतींपैकी दहा मारुती हे वीर मारुती आहेत. हातात गदा घेतलेले, पुच्छ उंचावलेले असे हे मारुती आहेत. चाफळचा मारुती मात्र दास मारुती आहे. तो, प्रभू रामराया समोर शरणागत होऊन हात जोडून उभा आहे. तो रामाचा दास आहे म्हणून त्याला दास होऊनच जाणावे लागते. या मारुतीसाठी समर्थांनी हे स्तोत्र लिहिले असे म्हटले जाते. या स्तोत्रातील मारुती विनम्र आणि कल्याणकारी आहे. हे स्तोत्र अनुष्टुप छंदात आहे. हे स्तोत्र खूप ठिकाणी सहाव्या क्रमांकावर आहे. पण स.भ. मोहनबुवा रामदासी यांच्या पुस्तकात ते पाचव्या क्रमांकावर आहे. हे स्तोत्र २४ श्लोकांचे असल्याने याचा अर्थ आपण दोन भागात बघणार आहोत.

समर्थांना दासमारुतीची स्थापना करावीशी वाटली यातच समर्थांच्या अंतरंगातील संतत्व आणि दास्यत्व दिसून येते. समर्थांची काव्यरचना, तपस्या, समाजसंघटन, छत्रपतींसोबत रुजवलेले राजकारण अशा अनेक कर्तृत्वांचे कर्तेपण समर्थ आपल्या रघुरायाला बहाल करतात. काम करावे पण कर्तेपणा घेऊ नये, ते काम ईश्वराला अर्पण करावे, हा भगवंताने भगवद्गीतेत सांगितलेला निष्काम कर्मयोग समर्थ या स्तोत्रातून सांगतात.

“तूची कर्ता सकळही” असे म्हणून समर्थांनी ‘कर्ता मी नाही तर तूच आहेस’ असे म्हटले आहे. यातच त्यांचे आत्मसमर्पण दिसते. हनुमंतांचे आणि समर्थांचे कर्तृत्त्व सारखेच आहे. दोघेही आपल्या स्वामी कार्यात खूप तत्पर आहेत. इतर स्तोत्रांपेक्षा या स्तोत्रात समर्थांनी भक्तीरस, पूर्णपणे ओतला आहे. २४ श्लोक असलेल्या या स्तोत्रात हनुमंताचे वर्णन करताना ती अवस्था ते स्वतः अनुभवतात. हे मंदिर मुख्यत: भिक्षेतून बांधले जावे, येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या हृदयात विनम्रता जागृत राहावी, ‘होणारे कर्म ईश्वराचे’ अशी भावना वाढीस लागावी, आणि त्यासाठी रामापायी शरणागती असावी. त्याची कृपा असेल, इच्छा असेल तर मुंगीलाही मेरू पर्वत उचलता येतो हा विश्वास दृढ व्हावा, असा भाव समर्थांच्या कृतीत होता. आणि या विचारातून मंदिर बांधले गेले. दास मारुतीच्या स्थापनेतून गुरुभक्ती करताना शिष्याने दासानुदास व्हावे, हीच शिकवण समर्थ देतात, आणि म्हणूनच हनुमंताची स्तुती करताना समर्थांची वाणी भावोत्कट होते. पहिल्या चार श्लोकांमध्ये त्यांनी मारुतीला अनेक नावाने संबोधले आहे. हनुमानाची सर्व विशेषणे समर्थांनी सांगितलेली आहेत. हनुमंता, रामदूता, वायुपुत्रा, महाबळी, ब्रह्मचारी, कपिनाथा, विश्वंभरा, जगत्पते, कामांतका, दानचारी, शोकहारी, दयानिधी, महारुद्र, मुख्यप्राण, कुळमूर्ती, पुरातना, वज्रदेही, सौख्यकारी, भीमरूपा, प्रभंजना, पंचभुता, मूळमाया अशी २२ विशेषणे समर्थांनी हनुमंताला दिली आहेत. समर्थ म्हणतात, “हनुमंताचे वर्णन करावे तितके कमीच आहे.”

“सांगता वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।

शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ।।”

वेदशास्त्र, श्रुती ही सगळी त्याचे वर्णन करता करता दमून जातात. सहस्त्रफणा असलेला शेष सुद्धा त्याचे वर्णन करताना थकून जातो. भक्तांसाठी निरनिराळ्या प्रकारांनी घेतलेला दैवी अवताराचा मारुती हा राम कार्यासाठी अतिशय तत्पर आहे. भक्तांचे रक्षण करणारा त्यांचा पाठीराखा आहे. कितीही मोठी संकटे आली तरी तो तत्परतेने धावून जाऊन संकटे दूर करतो. हा अत्यंत दयाळू आणि उदार असून नामस्मरण करणाऱ्यांवर कृपा करतो. म्हणून समर्थ म्हणतात,

“वारीतों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।

दयाळा हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ।।”

त्याच्या शौर्याचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,

“धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।

उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिले समुद्राजळा ।।”

हनुमंत हा रणांगणातून कधीही मागे सरकणार नाही, कारण तो कसा आहे ? तर तो धीर, वीर आहे. त्याचे उड्डाण एवढे अद्भुत आहे की त्याने एका उड्डाणात समुद्रपार केला. रामायणात त्या विषयी एक कथा आहे. संपातीने दिव्य दृष्टीने सीतामाईला लंकेच्या अशोक वाटिकेत बघितले आणि सांगितले की, १०० योजनांचा सागर एका उड्डाणात पार करावा लागेल. अंगद म्हणाला की, मी जाऊ शकेन पण परत येऊ शकणार नाही. तेव्हा सगळे हनुमंताला शोधू लागले. हनुमंत एका शिलाखंडावर बसले होते, आणि “माझा भगवंताकरिता काय उपयोग”, असे म्हणून अश्रू ढाळत होते. तेव्हा जांबुवंताने हनुमंताचा पुरुषार्थ जागवला आणि म्हणाला, “उठ ! तूच हे काम करू शकतोस. तुझ्यातच एवढी शक्ती आहे.” तेव्हा हनुमंत एकदम जागे झाले आणि रामकार्याला सज्ज झाले. हनुमंताने समुद्रावरून केलेले उड्डाण ही अतिशय विलक्षण गोष्ट आहे. लंकेहून परत आल्यावर हनुमंताने रामाच्या हातात पत्र देऊन त्याला वंदन केले.

“देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।

वाचितां सौमित्र अंगें राम सूखे सुखावला ।।

गर्जती स्वानंदमेळी ब्रह्मानंदें सकळही ।

अपार महिमा मोठा ब्रह्मादिकांसी नाकळे ।।”

मारुती स्वतःचा पराक्रम सांगणार नाही म्हणून ब्रह्मदेवाने मारुतीच्या लंकेतील अफाट कार्याचे वर्णन लिहून एक लखोटा त्याच्या जवळ दिला होता. ते पत्र लक्ष्मणाने वाचून दाखवले. सुंदरकांडात तसे वर्णन आहे. ते पत्र वाचताच रामाला खूप आनंद झाला. सगळेजण आनंदाने गर्जना करू लागले. सगळ्यांना ब्रह्मानंद झाला. हनुमंताचा महिमाच एवढा मोठा आहे की ब्रह्मादी देवांनासुद्धा त्याचे आकलन होत नाही.

 

“अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।

फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ।।”

समर्थांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन केले आहे. मारुतीचे पुच्छ अद्भुत आहे, विलक्षण आहे. ते गोलगोल फिरवल्यामुळे गगनात गोल पोकळी निर्माण झाली आहे. त्याचे धगधगीत तेज सर्व दिशांना पसरल्याने त्याने सूर्यबिंब झाकून टाकले आहे. हनुमंताने समुद्रावरून उड्डाण केले तेव्हा त्याचे रूप कसे दिसत होते हे सांगताना समर्थ म्हणतात,

“देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।

ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ।।”

समर्थ म्हणतात की, हनुमंत सीतामाईंना शोधण्यासाठी जेव्हा लंकेला गेला तेव्हा त्याने समुद्रावरून उड्डाण केले. उजव्या हातात ध्वज होता आणि डावा हात कमरेवर ठेवला होता. त्याचे हे रूप बघता समुद्रावरचे विलक्षण उड्डाण त्याला निश्चितच शोभून दिसत होते. असे हे मारुतीच्या रूपाचे आणि पराक्रमाचे वर्णन करणारे हे पाचवे स्तोत्र आहे.

या स्तोत्रामुळे चाफळच्या दास मारुतीची कृपा आपल्या सगळ्यांवर होईल यात शंका नाही. श्रद्धेने म्हणताना समर्थांचा भाव मात्र अंतरंगात असायला हवा ! तेवढ्याच आर्तपणे ते म्हणावे ! हाच श्रद्धाभाव आणि आर्तता या स्तोत्राच्या भाग दोन मध्ये बघूयात.

।। जय जय  रघुवीर समर्थ ।।

भीमरूपी स्तोत्र चौथे

चाफळ पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले उंब्रज हे गाव. त्या गावातील हनुमंताचे वर्णन समर्थांनी अकरा कडव्यांच्या स्तोत्रात केले आहे. या स्तोत्रात मारुतीच्या सामर्थ्याचे वर्णन केले आहे. हा मारुती जवळपास सहा फूट उंचीचा आहे, आणि वीर; पराक्रमी; चपळ स्वरूपातील आहे. त्याचे डोळे थोडे लहान आहेत. सभोवतालच्या परिस्थितीचा विचारपूर्वक अभ्यास करून सुजाण नागरिक व्हावे हेच समर्थांना यातून सुचवायचे आहे.

हनुमंताचे वैशिष्ट्य हे आहे की, हनुमंत दास्यभक्तीचे जसे योग्य आणि चपखल उदाहरण आहे तसेच उत्तम मैत्रीचे सुद्धा उदाहरण आहे. सुग्रीवाचे भाग्य एवढ्यासाठीच थोर आहे की, त्याच्याकडे हनुमंतासारखा मित्र आहे. म्हणूनच त्याला सहजपणे विजय प्राप्त झाला. महाभारतात सुद्धा भगवंतांनी हनुमंताला अर्जुनाच्या रथावर बसवले ते एवढ्यासाठीच. हनुमंताची कृपा असल्यावर विजय प्राप्त होणार हे निश्चित आहे. समर्थांनी ही मूर्ती चुना, वाळू आणि ताग यांपासून तयार केली आहे. मठामध्येच मारुतीची स्थापना केल्यामुळे मंदिराला वेगळा कळस नाही. हा मारुती जागृत असून प्रभूरामचंद्रांनी समर्थांच्या रक्षणासाठी पाठवला होता.

यामागे एक कथा आहे. समर्थ एकदा कृष्णेच्या घाटावर स्नानाला गेले आणि बुडालो बुडालो असे ओरडू लागले. त्यांचा आवाज लोकांच्या कानापर्यंत पोहोचण्याआधी समर्थांच्या रक्षणासाठी मारुतीराय स्वतः आले आणि खडकावरून उडी मारून त्यांनी समर्थांना वाचवले. ते समर्थांना म्हणाले रामरायांनी तुझा सांभाळ करण्याची मला आज्ञा केली आहे. दोघेही रामाचे भक्त ! भगवंताची सेवा अनेक जण करतात. पण भगवंत ज्या भक्तांची सेवा करतो त्यांच्या भक्तीला साष्टांग दंडवत. प्रत्यक्ष रामाने मारुतीला आईच्या ममतेने समर्थांचा सांभाळ करायला सांगावे, यातच समर्थांच्या भक्तीचे मोठेपण आहे. भगवंत प्रेम करतो पण त्यासाठी समर्थांसारखे दास व्हावे लागते. ज्या खडकावरून उडी मारून मारुतीरायांनी समर्थांना वर काढले, तिथे हनुमंताची पाऊले उमटली आहेत असे म्हणतात. उंब्रजच्या मारुतीच्या जागृतीची प्रचिती सांगणाऱ्या अनेक कथा इथे घडल्या आहेत. सश्रद्ध मनासाठी आजही उंब्रजचा मारुती जागृत आहे.

उंब्रज हे कृष्णामाईच्या पाण्याने ओले आणि पवित्र झालेले आहे. समर्थांना उंब्रजच्या मारुती प्रमाणेच कृष्णेचे सुद्धा खूप कौतुक होते. त्रिकाल स्नानामध्ये समर्थांचे एक स्नान कृष्णेच्या कुशीत असायचे. उंब्रज हे अंतर दहा किलोमीटर, पण एवढे अंतर पार करून समर्थ स्नान उंब्रजला कृष्णेच्या पात्रात करत. स्नानाच्या निमित्ताने जनतेचे मनोगत जाणणे, गुप्त हेरांसारख्या रामदासींकडून घटनांचा आढावा घेणे, ही त्यांची कामे असत. कृष्णामाईच्या घाटावर स्नान-संध्या करून समर्थ मारुतीचे पूजन करत. एकदा समर्थांनी सतत तेरा दिवस मारुती समोर कीर्तन केले. सतत फिरणाऱ्या समर्थांना मारुतीरायाने सलग तेरा दिवस आपल्याजवळ बांधून ठेवले, हीच हनुमंताच्या जागृतीची खूण आहे. समर्थांना त्यांच्या कार्यासाठी या मारुतीच्या स्थापनेबरोबरच उंब्रज मठासाठीही काही जमीन इनाम म्हणून मिळाली होती. समर्थांनी येथे मठ स्थापन करून भक्ती आणि शक्तीचा संगम करून दिला. उंब्रजचा भाग हा आदिलशाही अधिपत्याखाली होता. यवनांचे उग्र दडपण सातत्याने शेजारी असल्याने हा मठ समर्थांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. अशा या मारुतीचे वर्णन समर्थांनी या चौथ्या स्तोत्रात केले आहे. अंजनीसुत कसा आहे हे सांगताना ते म्हणतात, 

“अंजनीसुत प्रचंड वज्रपुच्छ काळदंड ।

शक्ति पाहतां वितंड  दैत्य मारिले उदंड ।। १ ।।”

अंजनी सुत म्हणजे अंजनीचा मुलगा शक्तिमान आहे. वज्रदेही आहे आणि त्याचे पुच्छ काळदंडाप्रमाणे आहे. त्याच्या शेपटीचा एक तडाखा यम सदनाला नेतो. लंकेत राम-रावण युद्धात या शेपटीच्या तडाख्याने त्याने कित्येक दैत्यांना यम सदनाला पाठवले. त्याच्यामध्ये भयंकर मोठी ऊर्जा शक्ती आहे. पहिल्या तीन कडव्यांत समर्थांनी हनुमंताच्या शक्तीचे वर्णन केले आहे. अवकाशात झेप घेणारा त्याचा देह प्रचंड आहे. पण तो अवकाशालाही भेदून जातो. समर्थ म्हणतात की, 

“नभांत भीम आगळा ।। ३ ।।”

त्याचं वेगळेपण असणे हीच त्याची ओळख आहे. समर्थांनी चौथ्या श्लोकात हनुमंताच्या लहानपणीची गोष्ट सांगताना म्हटले आहे की,

“लुळीत बाळकी लिळा गिळोनि सूर्यमंडळा ।

बहुत पोळतां क्षणीं थुंकीलाचि तत्क्षणीं  ।। ४ ।।”

लहानपणी याचे खेळणे काय ? तर एकदा हनुमंताने सूर्य गिळला. गळ्यात खूप आग व्हायला लागली आणि त्याने तो थुंकून टाकला. सगळ्याच गोष्टी या कल्पनेच्या पलीकडच्या. शत्रूला मारताना त्याच्या डोळ्यात वीररस उतरतो. डोळे जणू काही आग ओकत असतात. उंब्रजचा हा वीर मारुती खूप रुबाबदार, देखणा आणि विरक्त वृत्तीचा आहे. समर्थांनी या स्तोत्रात त्याच्या सौंदर्याचे सुद्धा खूप छान वर्णन केले आहे. ते म्हणतात, 

“झळक झळक दामिनी वितंड काळकामिनी ।

तयापरी झळाझळी लुळीत रोमजावळी ।। ७ ।।”

हनुमंताच्या शरीरावरची लव इतकी सुंदर आणि तुकतुकीत आहे की अंधारात तळपणाऱ्या विद्युलतेप्रमाणे ती नेत्राला आनंद देते. स्वतःच्या कर्तुत्वाच्या, पराक्रमाच्या आदेशाने तो निर्भय बनवतो. जन्माने वानर असून सुद्धा कर्माने ईश्वराचे अंतरंग असणारा हा हनुमंत. ब्रह्मदेवाने सुद्धा त्याला इच्छामरणाचे वरदान दिले, ते केवळ त्याच्या दास्यभक्तीने प्रसन्न होऊन. आपली माता अंजनी हिच्या आशीर्वादाने तो चिरंजीव आहे. ज्यांना आईचे आशीर्वाद असतात त्यांच्यावर कोणतेच संकट येत नाही आणि यश त्यांच्यासमोर हात जोडून उभे असते.

या स्तोत्रात मारुतीचा प्रताप आणि विनय हे दोन्ही गुण दिसतात. निकुंभाचल, सुवेलाचल आणि त्रिकुटाचल यांच्या पठारावर वसलेल्या लंकेला हनुमंताने आपल्या प्रतापाने गर्भगळीत केले. संपूर्ण लंका जाळली. सीतेसमोर मात्र तो रामसेवक म्हणून प्रकट झाला. अन्यायाच्या विरोधात रुद्रावतार धारण करणारा हा हनुमंत भक्तासाठी मात्र स्नेहाळू, तेजाळू, कनवाळू असा आहे. त्याच्या प्रतापाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,

“समस्त प्राणनाथ रे करी जना सनाथ रे ।

अतूळ तूळणा नसे अतूळशक्ति वीलसे ।।  ८ ।।”

या स्तोत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्तोत्रात ‘ळ’ हे अक्षर ३५ वेळा आले आहे. यातून समर्थांचे शब्द आणि साहित्य यावर असणारे वर्चस्व आपल्याला दिसते. हनुमंताचे रूप सांगताना समर्थ म्हणतात, 

“रूपें रसाळ बाळकू समस्त चित्तचाळकू ।

कपी परंतु ईश्वरू विशेष लाधला वरू ।। ९ ।।”

तो रसाळ आहे, बालक आहे, मनाला प्रसन्न करणारा आहे. कपी आहे पण ईश्वर आहे. हनुमंताने रुद्रावतार धारण केला की त्याला कोणीही आवरू शकत नाही. समर्थांनी हनुमंताच्या रूपाला सतेजरूप ईश्वरी असे म्हटले आहे. समर्थांना मारुतीरायाचा खूप अभिमान आहे. हा अभिमान व्यक्त करताना ते म्हणतात, 

“समर्थदास हा भला कपी कुळांत शोभला ।

सुरारि काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला ।। ११ ।।”

या श्लोकातून समर्थांना स्वतःचे आणि मारुतीचे ऐक्य दाखवायचे आहे. दोघेही रामाचे भक्त ! यातून दासावर असलेली मारुतीची कृपा दिसते. त्यांचा कृतज्ञ भाव दिसतो. उंब्रजचा हा असा मारुती संपूर्ण जगाचा प्राणनाथ आहे. समर्थ कृपेने या स्तोत्राचे मनन चिंतन करता आले हे भाग्यच म्हणावे लागेल. हनुमंताप्रमाणे शरणागत भाव ठेवता यावा हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना.

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

भीमरूपी स्तोत्र तिसरे

समर्थांनी रचलेले हे तिसरे भीमरूपी स्तोत्र, म्हणजे त्यांनी केलेले मारुतीच्या रुद्र रूपाचे वर्णन होय. चाफळ पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माजगाव येथे समर्थांनी वीर मारुतीची स्थापना केली. या मारुतीचे सुद्धा वळलेले आणि उंचावलेले शेपूट त्याच्या धाडसी स्वभावाचे प्रतीक आहे. शेपूट गुंडाळलेला दुबळा, हताश, दुःखी असा तो नाही. तर, विद्युल्लतेप्रमाणे आहे. दुर्बलतेवर प्रहार करायला शिकवणारा हा माजगावचा मारुती आहे. माजगाव म्हणजे माझं गाव, असं वाटणारं हे गाव आणि गावाला सतर्कपणे पहारा देणारा, गावाच्या वेशीवर असणारा हा मारुती.

 

समर्थांच्या या तिसऱ्या स्तोत्रात, मारुती गदा घेऊन संकटाचा सामना करायला सज्ज आहे. ही गदा म्हणजे त्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आहे. मारुतीचा आपल्या इष्टदेवतेवर प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे. त्याचे उड्डाण अडचणींना दूर करून धैर्याने संकटाचा सामना करण्याचे शिकवते. माजगावच्या वेशीवर एक खूप मोठी शिळा होती. या शिळेवर वर्षानुवर्षे शेंदुराचा लेप लावून त्या शिळेलाच ग्रामरक्षक मारुती म्हणून गावकरी पूजा करीत. हा ग्रामरक्षक विध्वंसक वृत्तीचा संहार करणारा आहे. हनुमंत लंकेत सीतेला शोधण्यासाठी गेला तेव्हा त्याने अशोक वनाचा, लंकेचा विध्वंस केला. रावणाची अधर्मी विनाशी वृत्ती ठेचून रावणाला जरब देण्यासाठी तो सज्ज झाला. लंकेत आलेल्या संकटांना बुद्धी आणि बल वापरून मारुतीने यशस्वी रीतीने तोंड दिले. त्याच्या प्रत्येक कृतीत रामाच्या विधायक कार्याला समर्पित होण्याचा संकल्प होता. धर्म स्थापनेचा संकल्प होता. त्याचा तो आवेश समर्थांनी या स्तोत्रात वर्णन केला आहे. समर्थांनी या स्तोत्राची सुरुवातच आवेश पूर्ण केली आहे.

 

“कोपला रुद्र जे काळीं । ते काळीं पाहवेचि ना ।”

 

रुद्र, म्हणजे हनुमंत जर कोपला, म्हणजे त्याला राग आला तर त्याच्याकडे कोणीही बघू शकत नाही. त्याच्याकडे बघण्याचे सामर्थ्यच कोणाच्या डोळ्यात नाही, मग वाणीने वर्णन तरी कसे करावे. पुढे ते म्हणतात,

 

“बोलणे चालणे कैचें । ब्रह्मकल्पांत मांडिला ।”

 

त्याच्याकडे पाहिले, की जणू काही ब्रह्माण्डाचा प्रलय होतो की काय असे वाटावे. त्याच्या मूर्तीवरून हनुमंताची व्यापकता समजते. तो शत्रूवर आक्रमण करतो तेव्हा त्याचे डोळे रक्ताप्रमाणे लाल होतात. दातांचा जबडा आवळला जातो. आणि त्याचे हे रूप नुसते आठवले, तरी भक्ताच्या मनात निर्भयता येते. हनुमंताचा कोप, म्हणजेच राग आणि त्याचे फळ म्हणजे सीतामाईचा शोध, आणि समर्थाच्या कोपाचे फळ म्हणजे आनंदवनभुवनी वसलेले राज्य. दोघांच्याही मनाचा आवेश दाखवणारे हे स्तोत्र आहे.

 

स्वधर्माचे, स्वराष्ट्राचे, संरक्षण करण्यासाठी समाजाला स्वतःमधील परमेश्वराची ओळख होणे गरजेचे आहे. सह्याद्रीच्या कडे-कपारीत संघटना निर्माण करणे, धर्माभिमान जागृत करणे, स्वराज्य स्थापनेसाठी त्याचा उपयोग करून घेणे, आणि त्याचबरोबर मारुतीचे चरित्र आणि पराक्रम त्याचे गुणगान सामान्य माणसात भिनवणे सोपे नव्हते. पण समर्थांनी मारुतीची शक्ती, भक्ती आणि स्तोत्र याच्या अपूर्व संगमातून हे काम केले.

 

मारुतीचे शौर्य, धैर्य, वीर्य, चातुर्य यातून समाजापुढे एक महान आदर्श ठेवला. या मारुती स्तोत्रातून समर्थांच्या बलवान, पण तितक्याच प्रेमळ अंतःकरणाचे दर्शन होते. हे स्तोत्र म्हणताना आपल्या हृदयात सुद्धा तोच भाव निर्माण होतो. समर्थांचे अकरापैकी दहा मारुती हे वीर मारुती आहेत. एक हात हृदयावर ठेवलेला, पुच्छ माथ्यावर मुरडून आलेले, आणि दुसरा हात गदा हातात घेऊन सज्ज आहे. समर्थांची कुळवल्ली हनुमंत असल्याने समर्थ सुद्धा हनुमंताप्रमाणेच धर्म स्थापनेसाठी सरसावले आहेत. आपल्या मनातील संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी समर्थांनी माजगाव येथे या वीर मारुतीची स्थापना केली. मारुतीच्या रुद्र रूपाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,

 

ब्रह्माण्डाहून जो मोठा । स्थूळ उंच भयानकु ।

 

तो ब्रह्माण्डाहून मोठा, स्थूल, उंच आणि भयानक आहे. हे सांगताना ते म्हणतात की त्याची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही. क्रोध ही त्याची शक्ती आहे. आणि त्या आवेगात तो अचाट कार्य करतो. समर्थ म्हणतात की हनुमंताप्रमाणे क्रोध हा हितावह असावा, अन्यायाची चीड आणणारा असावा, त्या अन्यायाच्या विरुद्ध काम करण्याचे सामर्थ्य असावे. धर्माचरणावर कोणी आक्रमण करीत असेल तर मारुतीप्रमाणेच आवेश निर्माण व्हावा. हनुमंताच्या क्रोधाचे वर्णन करताना समर्थ म्हणतात,

 

“मार्तंड मंडळा ऐसे । दोन्ही पिंगाक्ष पावले ।

कर्करा घर्डिल्या दाढा । उभे रोमांच उठिले ।।”

 

क्रोध आला की त्याचे दोन्ही डोळे सूर्या एवढे मोठे होतात, आणि तो करकरा दाढा आणि दात खातो. त्याला बघून अंगावर रोमांच उभे राहतात. संतापाने थरथरणाऱ्या शरीराने तो प्रचंड भूभूःकार करतो. त्या क्रोधामुळे असे वाटते की जणू काही भूमीवर मेघांचा प्रचंड गडगडाट होत आहे. गर्जनेने पर्वतांचे कडे कोसळत आहेत. समुद्र जलहीन झाले आहेत. पण एवढा पृथ्वी आणि आसमंत दणाणून टाकणारा क्रोध आणि आवेश कशासाठी, तर समर्थ या स्तोत्राच्या शेवटी सांगतात,

 

“धर्म संस्थापनेसाठी । दास तो उठिला बळे ।”

 

या ओळीतून समर्थांनी मारुती स्थापनेच्या मागचे रहस्य सुद्धा सांगितले आहे. ते म्हणतात की ही माती, हा धर्म तुझा आहे तर त्यावर परकीयांचा अंमल कशासाठी ? या परकीय दडपणातून मोकळा श्वास घ्यायचा असेल, धर्माचे रक्षण करायचे असेल तर सर्व शक्तीनिशी हा दास; समर्थ झाला पाहिजे. त्यासाठी फक्त मारुतीच्या पराक्रमाचे, चरित्राचे स्मरण करावे लागेल. मारुतीप्रमाणे अतुल्य बळ प्रत्येकात आहे हेच या स्तोत्रातून समर्थांना सांगायचे आहे. हा मारुती अपूर्व वीर्य, धैर्य, शक्ती, बुद्धी देतो. चाफळला हा मारुती पश्चिमेकडे रामाकडे तोंड करून उभा आहे. तो रामधर्माचे, रामकर्माचे, राम भक्तीचे, राक्षसी वृत्तीपासून डोळ्यात तेल घालून संरक्षण करीत आहे. रामप्राप्तीच्या वाटेवर चालणाऱ्या सगळ्यांचे हा मारुती रक्षण करतो. अंतकरणातील रामरायाला समजून घ्यावे. साधना करताना मोहाने, लोभाने, क्रोधाने मनाचे पतन होऊ नये म्हणून तो रक्षण करतो. मार्गदर्शन करतो. देहाभिमुख असणाऱ्या जीवाला रामाभिमुख होऊन ईश्वर प्राप्तीच्या मार्गात अडचणी येऊ नयेत म्हणून शक्ती देतो, बुद्धी देतो.

 

समर्थांच्या प्रत्येक मारुती स्तोत्रातून मिळणारे हे गुप्तधन आहे. मारुतीराया समोर वचनबद्ध होईल, राष्ट्राला घडविण्यासाठी विचाराने; कार्याने; धर्माने; कामाने प्रयत्न करेल त्यालाच ते धन सापडते. असे कार्य करणाऱ्यांबरोबर समर्थ आहेतच. रामराय सुद्धा आहेतच. म्हणून समर्थांच्या अकरा मारुती स्तोत्रांचा अभ्यास आणि परिचय करून घ्यायचा. 


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

मारुतीस्तोत्रातील हे दुसरे स्तोत्र

समर्थांनी १६४८ मध्ये चाफळ येथे मठ स्थापन केला, तो प्रमुख मठ होता. १६५० मध्ये शिंगणवाडीच्या मारुतीची स्थापना केली. छोट्या खडीच्या डोंगरावर लपलेला म्हणून याला खडीचा मारुती म्हणतात. पण या मारुतीत प्रचंड शक्तीचा अविर्भाव आहे. शिंगणवाडीच्या या मारुतीचे बालस्वरूप खूप विलोभनीय आहे. मुलांना बालपणापासूनच उपासनेचे संस्कार द्यावेत, व्यायामाने शरीर सशक्त ठेवावे, हाच संदेश समर्थ या मारुती स्तोत्रातून देतात. मारुती सारखे धाडस हवे, कर्तृत्व हवे; हे शिकवताना मुलांना जीवनात माता, पिता, गुरु यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे हे सुद्धा समजवावे. या सगळ्या गोष्टींसाठी समर्थांनी दुसऱ्या मारुती स्तोत्राची सुरुवात अंजनी मातेच्या ईश्वरी रूपाचा गौरव करून केलेली आहे.

जनी ते अंजनी माता । जन्मली ईश्वरी तनु ।

तनु-मनु तो पवनु । एकची पाहतां  दिसे ।

समर्थ म्हणतात, ‘अंजनी माता’ म्हणजे जणू काही ‘ईश्वरी तन’ म्हणजे ‘ईश्वराचा अवतार’ आणि अशा ईश्वरी अवतारात ‘तन’ म्हणजे ‘शरीर’ आणि मन सुद्धा वाऱ्यासारखा असणारा हनुमंत जन्माला आला. समर्थांनी दुसऱ्या श्लोकात हनुमंताला ‘मारुती’ आणि ‘वातनंदनु’ म्हटले आहे. किती सुंदर विशेषणे वापरली आहेत. ‘मरुत’ म्हणजे ‘वारा’ म्हणून तो मारुती आणि ‘वात’ म्हणजे सुद्धा ‘वारा’ म्हणून तो ‘वातनंदन’. समर्थ चाफळ ते रामघळ या मार्गावर एकांत आणि आत्मचिंतनासाठी येत असत. समर्थांच्या हृदयातील अपार करुणा, वात्सल्य, प्रेम तिथल्या कणाकणात जाणवते. म्हणूनच समर्थांनी या मारुतीची स्थापना बालरूपात केली असेल असे वाटते. मूल कितीही मोठे झाले तरी ते आईला लहानच असते. हा भाव या स्तोत्रात जाणवतो. 

चळे ते चंचळे  नेटे । बाळ  मोवाळ साजिरें ।

चळताहे चळवळी ।  बाळ लोवाळ गोजिरें ।

या श्लोकातून मारुतीच्या सौंदर्याचे, त्याच्या गोंडस स्वरूपाचे दर्शन होते. हे स्तोत्र म्हणताना मनात निरागस भाव निर्माण होतो. तसेच मारुतीचे गुण वर्णन आत्मबल प्रदान करते. आणि समर्थांच्या काव्य प्रतिभा शक्तीचे दर्शन घडते. या एका श्लोकात ‘ळ’ या अक्षराचा दहा वेळेस उपयोग करून समर्थांनी अनुप्रास अलंकार साधला आहे. धन्य ते समर्थ ! हा मारुती स्थापन करण्यात समर्थांची भावना खूप विशाल झाली आहे. मारुतीला माता, पिता, बंधू, सखा या रूपात पाहणारे समर्थ या स्तोत्रात मात्र त्याच्याकडे मातेच्या प्रेमाने, वात्सल्याने पहात आहेत. भगवंतासह सर्वसृष्टी त्यांना पुत्रवत भासत होती. जीवाच्या कल्याणासाठी त्यांचे मातृ हृदय महान झाले होते. हा केवढा गोड विलक्षण आणि महान भाव आहे. पुढील श्लोकात समर्थांनी हनुमंताच्या अवयवांचे वर्णन करताना म्हटले आहे –

हात कि पाय कि सांगों । नखे बोटे परोपरी ।

दृष्टीचे देखणे मोठें । लांगूळ लळलळीतसे ।

 

हात, पाय, नखे, बोटे, दृष्टी या सर्व बाबतीत हनुमंत  देखणे आहेत. आणि त्यांची शेपटी त्यांच्या पाठीमागे लोंबकळत असते. समर्थांनी बाल मारुतीची स्थापना केली त्यामागे सुद्धा त्यांचे काहीतरी उद्दिष्ट होते हे आपल्याला स्तोत्रातील या श्लोकावरून समजते. 

बाळाने गिळीला बाळू । स्वभावे खेळता पहा ।

आरक्त पीत वाटोळे । देखिले  धरणीवरी ।

पूर्वेसी देखता तेथे । उडाले पावले बळे ।

पाहिले देखिले हाती । गिळीले जाळीले बहू ।

बाल हनुमंताची ही अद्भुत लीला सगळ्यांना माहित आहे. जन्मल्याबरोबर फळ समजून सूर्याला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे सूर्याच्या, इंद्राच्या क्रोधाला त्यांना सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागला. त्याची कथा अशी आहे की,  हनुमंतांना भूक लागली तेव्हा सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने ते सूर्याकडे धाव घेऊ लागले. परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीमुळे चळाचळा कापू लागले. त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले. परंतु त्यांना तो खेळच वाटू लागला. ते सूर्याला पकडायचे आणि सोडून द्यायचे. त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरू लागला. असे करीत असताना त्यांनी सूर्याला गिळले. ते बघून इंद्रा सहित सर्व देवांना काळजी वाटू लागली. सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने  हनुमानाच्या हनुवटीला मार लागला आणि ते बेशुद्ध पडले. नंतर देवांनी भीतीमुळे त्याला शाप दिला की तुला आपल्या सर्व शक्तीचा विसर पडेल. पण अंजनी मातेच्या विनंतीवरून पुन्हा उःशाप दिला की कोणीतरी आठवण करून दिल्यावर त्याला आपली शक्ती आठवेल. ही कथा विद्यार्थ्यांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा प्रेरणा देणारी आहे. समर्थांना हेच सांगायचे आहे की हनुमंताने उत्तमाचा ध्यास घेतला, उत्तुंग ध्येय समोर ठेवल; ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धाडस सुद्धा दाखवले. पण त्याचबरोबर सारासार विचार सुद्धा करता आला पाहिजे. सूर्याकडे झेपावल्याने होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार हनुमंताने केला नाही. प्रत्येक जीवामध्ये बालपणापासून ऊर्जा असतेच. सारासार विचार करून त्या ऊर्जेचा उपयोग करून घेतला पाहिजे. मोठेपणी सुद्धा जो लहान बालकासारखा निरागस आणि सरळ हृदयी असतो तोच अध्यात्मिक होऊ शकतो. या दृष्टिकोनातून समर्थांनी बाल मारुतीची स्थापना केली. 

“उड्डाण पाहता मोठे । झेपावे रविमंडळा ।”

या ओळीवरून हनुमंताच्या शक्तीची कल्पना येते. हीच शक्ती आपल्याला शिवाजी महाराजांमध्ये सुद्धा दिसते. वाऱ्याच्या वेगाने राजे गडकोट काबीज करत होते, गनिमीकाव्याने शत्रूला नेस्तनाबूत करून डोंगर कपारीमध्ये लपून बसत होते, या डोंगरावरून त्या डोंगरावर, या गडावरून त्या गडावर ‘हरहर महादेव’ ही गर्जना करत स्वराज्याचा विस्तार करीत होते. शिवाजी राजांच्या कर्तुत्वाचा समर्थांनी उल्लेख केला आहे की, पवनासारिखा धावे । वावरे विवरे बहू । सुंदरकांडात मारुतीच्या लीला रामाला खूप आनंद देतात. म्हणूनच त्या संपूर्ण अध्यायाला श्रीराम लीलाचे कांड म्हणून ‘सुंदरकांड’ असे प्रेमाने म्हणतात. श्रीराम आईप्रमाणे बाळाचे, त्याच्या गुणांचे, कर्तुत्वाचे कौतुक भावपूर्ण करतात. तोच भाव या स्तोत्रात आपल्याला जाणवतो. 

पळही राहिना कोठे । बळेची घालितो झडा ।

कडाडां मोडती झाडे । वाड वाडें उलंडती ।

या श्लोकातून सुद्धा मारुतीच्या कामाची तळमळ आपल्याला दिसून येते. प्रभू रामरायाची आज्ञा झाली की पळही म्हणजे एक क्षणभर सुद्धा वेळ न दवडता श्रीलंकेत जाऊन कडाडा मोडती झाडे, म्हणजे अशोक वनातील झाडे मोडली आणि वाड्या मागून वाडे ओलांडून रावणासमोर गेला. हेच हनुमंताचे स्वामी आज्ञा पालन खऱ्या दासाचे लक्षण आहे. जीवाच्या कल्याणासाठी, रामकार्यासाठी चिरंजीव झालेला हनुमंत क्षणभर सुद्धा उसंत घेत नव्हता. त्याचप्रमाणे हनुमंताच्या झंजावाती प्रतापाप्रमाणे शिवाजी राजे सह्याद्रीचे स्वातंत्र्य खेचून आणत होते. रामराज्याचे स्वप्न साकारताना पाहून आनंदित होत होते. या त्यांच्या कार्याला यश, कीर्ती, प्रताप, बल, सामर्थ्य देणारा शिंगणवाडीचा खडीचा मारुती बालरूपात दुडूदुडू धावत होता. मनातल्या मनात प्रसन्नपणे हसत होता. समर्थ सुद्धा मातृ हृदयाने आनंदी होते ही गाथा आहे. एका मारुती रूपाची मातृप्रेमाची आणि भक्ती-शक्तीच्या कार्याची ओळख म्हणूनच या मारुतीचे महत्व आहे. शिंगणवाडीच्या या मारुतीला शतशः प्रणाम !

मारुती स्तोत्र पहिले

दास्यभक्तीचे एकमेव उदाहरण म्हणजे श्रीरामाचा भक्त हनुमंत होय. अलौकिक बुद्धीचे वरदान त्याला लाभले होते. हनुमंताने श्रीरामाचे दास्यत्व पत्करले, त्या हनुमंताच्या गोष्टी आपण रामायणकालापासून ऐकत आलो आहोत .पण समर्थांनी आपल्यासमोर जे मारुतीराय उभे केले आहेत ते शक्ती, युक्ती आणि उपासना याचे प्रतीक आहेत ,कारण समर्थांना त्या काळात शक्ती, युक्ती आणि उपासना यांच्याद्वारे समाजाला बलाढ्य करायचे होते. मरगळलेल्या आणि चेतनाहीन बनलेल्या महाराष्ट्राला संघटित करायचे होते .त्यांना बलोपासनेचा संदेश द्यायचा होता

हनुमंत हे समर्थांचे उपास्यदैवत आणि म्हणूनच त्यांनी मारुतीची मंदिरे स्थापन केली .प्रत्येक गावातील युवकांना एकत्र करून भक्तिमार्गाला, उपासनामार्गाला लावले .समाजाला सामर्थ्यशाली बनवायचे हाच त्यांचा प्रमुख उद्देश होता. भक्तिमार्गाने समाज संघटित होतो हे त्यांनी ओळखले आणि भक्तीचे अधिष्ठान समोर ठेवून. अकरा मारुती सातारा जिल्ह्यातील चाफळ आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात स्थापन केले. या अकरा मारुतीची ११ स्तोत्रे त्यांनी रचली जी सगळ्यांना परिचित नाहीत. सर्वसामान्य घरांमध्ये जे रोज संध्याकाळी म्हणले जाते ते म्हणजेभीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुतीपण त्याशिवाय बाकी स्तोत्रांचा सुद्धा अभ्यास व्हावा  आणि त्या स्तोत्रात समर्थांना काय म्हणायचे याचा आढावा या ठिकाणी घेतला आहे

समर्थांनी अकरा मारुती कुठे स्थापन केले यासाठी समर्थांची शिष्या वेण्णास्वामी यांनी एक सुंदर अभंग रचला आहे. ज्यामध्ये या अकरा मारुतींचा उल्लेख आहे.

चाफळा माजी दोन, उंब्रजेशी एक

पारगावी देख चौथा तो हा

पाचवा मसूरी शहापुरी सहावा |

जाण तो सातवा शिराळ्यात॥

सिंगणवाडी आठवा, मनपाडळे नववा |

 

दहावा जाणावा माजगांवी॥

बह्यात अकरावा, येणे रीती गावा|

सर्व मनोरथा पुरविल॥

वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास।

कीर्ती गगनात समावे॥

समर्थ विवाह मंडपातून पळाले ते विश्वाची चिंता करण्यासाठी टाकळीला आले. तिथे गोदावरीच्या पाण्यात उभे राहून त्यांनी उपासना केली या उपासनेचे  फळ म्हणजे समर्थांना झालेलं हनुमंताचे दर्शन . समर्थांनी टाकळीला श्रीराम जय राम जय जय राम हा  १३ कोटी जप केला ,जप करत असताना एक वानर तिथे येऊन बसत असे , समर्थांच्या रामभक्तिने एक दिवस त्या वानरातील मारुतीने आपले अक्राळ विक्राळ भीमरूप दाखवले .आनंदाने त्याने समर्थांना गळा मिठी मारली. समर्थांच्या शरीराचा कणकण तृप्त झाला. त्यांच्या हृदयातून कृतज्ञतेचा झरा वाहू लागला . हनुमंताच्या ठिकाणी असणारा एकनिष्ठ भाव, भक्ती, प्रेम हे सगळे शब्दबद्ध झाले

त्यावेळी समर्थांनी उस्फूर्तपणे केलेली हनुमंताची स्तुती म्हणजे हे भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र होय .या स्तोत्रात समर्थांनी हनुमंताच्या गुणांचे वर्णन केले आहे , तो कसा आहे, त्याचे चरित्र काय आहे, तो दिसतो कसा ,त्याच्यातील शक्ती कशी आहे हे सर्व वर्णन करून शेवटच्या चौदाव्या श्लोकापासून त्याची फलश्रुती सांगितली आहे. चाफळला श्रीराम मंदिरात रामाच्या मंदिराच्या मागच्या बाजूला जो मारुती आहे तो हा प्रताप मारुती, ज्याचं संपूर्ण वर्णन समर्थांनी या स्तोत्रात केले आहे .हे स्तोत्र म्हणताना समर्थांच्या प्रतिभा शक्तीची भव्यता लक्षात येते. समर्थांच्या डोळ्यासमोर दर्शन दिलेला हनुमंत कसा असेल , समर्थ किती मारुतीमय झाले असतील हे समजते

समर्थांनी रचलेल्या या स्तोत्राने समाजात एक नवचैतन्य निर्माण केले .समर्थांची हनुमंतावरील अपार श्रद्धा त्याची  प्रत्यक्ष अनुभूती समर्थांचे प्रसादिक शब्द आणि उत्कट भाव यामुळे समाजाला एक नवी ऊर्जा मिळाली. एक नवे चैतन्य मिळाले .या स्तोत्राचा पहिलाच शब्द भीमरूपी, भीम म्हणजे भयानक संस्कृत मध्ये याचा अर्थ भयानक असला तरी मराठीत आपण तो सौंदर्य युक्त, श्रद्धायुक्त असा वापरतो.एखादी गोष्ट काय भयानक सुंदर आहे! असे आपण म्हणतो, त्या दृष्टीने हे भीमरूप महारुद्रा. रुद्र म्हणजे शंकर ,मारुतीची आई अंजनी ही शापित असल्याने ती वानरीच्या जन्माला आली होती. शंकर तुझ्या पोटी मारुतीच्या रूपाने  जन्म घेतील तेव्हा तू शाप मुक्त होशील ,हा तिला उःशाप होता .दशरथाने केलेल्या पुत्र कामेष्टी यज्ञातील प्रसाद घारीने पळवला, तो अंजनीला मिळाला, आणि मारुतीचा जन्म झाला. शंकराचा प्रसाद म्हणून तो महारुद्र ,वायूचा पुत्र म्हणून मारुती, इंद्राने वज्र मारुतीवर फेकले त्याला फक्त हनुवटीला खोच पडली म्हणून हनुमान, वनात राहणारा म्हणून वनारी , अंजनी चा मुलगा म्हणून अंजनी सुता, रामाचा सेवक म्हणून रामदूता , प्रभंजन म्हणजे उद्ध्वस्त करणारा सीतेला शोधायला गेला तेव्हा लंका उध्वस्त केली म्हणून प्रभंजना , केवढी सुंदर आणि अर्थपूर्ण विशेषणे समर्थांनी वापरली आहेत. पहिल्या श्लोकातच समर्थांनी हनुमंताचा जन्म, त्यांना दिसलेलं रूप, त्याला ही विशेषणे का हे सर्व सांगितले . हा हनुमंत कसा आहे तर महाबळी म्हणजे बलवान आहे , सुख देणारा, दुःख हरण करणारा आहे. सगळ्यात महत्त्वाचे तो धूर्त आहे. हनुमंताच्या धूर्तपणाच्या गोष्टी आपण संपूर्ण रामायण बघतो शिवाय निष्ठावान वैष्णव आहे. उत्तम गायक आहे कारण सतत रामरायाचे गुणगान गातो तो दिनांचा नाथ आहे, भव्य सिंदूरलेपन,  ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सीतेने रामाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून फक्त भांगात सिंदूर लावला, तर हनुमंताने प्रेमाचे प्रतीक म्हणून आपले सर्वांग  शेंदूराने माखले म्हणून भव्य सिंदूर लेपना तरी तो सुंदर आहे जगदंतर म्हणजे जगाचे अंतकरण आहे. तो जगन्नाथ म्हणजे जगाचा नायक आहे

पुण्यवान लोकांना परितोषका म्हणजे आनंद देणारा आहे .हनुमंताचा आवेश बघितला तर काळरुपी अग्नि सुद्धा थरथर कापेल .त्याने आपल्या दंतपंक्ती आवळल्या आहेत .त्याचा राग कसा आहे तर काळाचा सुद्धा थरकाप उडेल. अन्याय बघितला की त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाला निघतात. भुवया ताणून पुच्छ मागे घेतो .हनुमंताचा ब्रह्मांडाला गिळणारा राग बघितला की सगळे घाबरतात. एवढा राग असला तरी आपल्या भक्तासाठी तो उत्तरेकडे झेपावतो. कारण त्याच्या रामरायाची अयोध्या उत्तरेला आहे. त्याचे किरीट कुंडले, कमरेभोवती सोन्याचा कासोटा घातलेला असून तो सडपातळ आहे, चपळ आहे. त्याच्या चपळतेचे वर्णन करताना समर्थ म्हणतात महा विद्युल्लतेपरी, तसेच त्याची गती मनाला सुद्धा मागे टाकणारी आहे

हनुमंताच्या शक्तीच्या व्याप्तीच वर्णन करताना समर्थ म्हणतात की मेरु मंदार पर्वत सुद्धा त्याच्यापुढे लहान वाटतात .अणुपासून ब्रह्मांडापर्यन्त त्याची व्याप्ती आहे. ब्रह्मांडाच्या भोवती सुद्धा वेढा घालू शकेल अशा वज्रासारख्या असणाऱ्या शेपटीमध्ये तर हनुमंताची सगळ्यात जास्त ताकद आहे .आपल्या ताकदीने त्याने संपूर्ण सूर्य मंडळ ग्रासून टाकले आहे. चाफळच्या भीमरूपी स्तोत्रातून प्रकटलेला वीर मारुती शारीरिक आणि मानसिक बलाबरोबर करुणा आणि प्रेम सुद्धा बहाल करतो. या स्तोत्र पठणाने भूत प्रेत संबंध शारीरिक व्याधी या तर नष्ट होतातच ,पण चिंता सुद्धा दूर होतात. रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती

ही फलश्रुती म्हणजे आपल्याला अंतर्यामी रामाचे दर्शन होईल ही समर्थांनी दिलेली खात्री आहे. आजही रोज संध्याकाळी हे स्तोत्र प्रत्येक घरात म्हणले जाते .या स्तोत्रातील प्रत्येक शब्द म्हणजे समर्थाचे हनुमंतावरील प्रेम आहे. नियमित पठणाने येणारा अनुभव सुद्धा तेवढाच आनंददायी आहे. हनुमंताप्रमाणे समर्थांची अकरा ही स्तोत्रे चिरंजीव आहेत यात शंका नाही.

Language