‘नित्य करितां श्रीराम स्मरण’
योगीराज श्रीकल्याणस्वामी हे श्रीसमर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य. ते वयाच्या ८-१० वर्षापासून, शके १५६५ ते १६०० पर्यंत म्हणजेच डोमगांवी रहाण्यास जाईपर्यंत श्रीसमर्थांच्या सहवासात राहिले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व हे संपूर्णतः श्रीसमर्थांच्या सहवासात घडले. श्रीसमर्थांप्रमाणेच, योगीराज श्रीकल्याणस्वामींची काव्यसंपदा आहे. स्फुट प्रकरण, चौचरणी ओव्या, स्फुट श्लोक, अष्टपदी, भूपाळ्या, आरत्या, पदपदांतरे आणि एक सवायी अशा काही त्यांच्या रचना आहेत. सवायी हा काव्यप्रकार श्लोक या प्रकाराहून वेगळा आहे. श्रीसमर्थांच्या अनेक सवाया आहेत. त्यामध्ये त्या वाराला त्या देवतेची सवायी म्हणण्याचा प्रघात सांप्रदायिक उपासनेमध्ये आहे. श्रीसमर्थांप्रमाणेच योगीराज श्रीकल्याणस्वामी सुद्धा नामस्मरण भक्तीचे महत्व त्यांच्या काव्यसंपदेमधून पटवून देतात. ‘नित्य करितां श्रीराम स्मरण’ या सवायी मधून ते हेच सांगतात.
“राम नामाचा कडकडाट । भवसिंधूस पायवाट ।
पायरी करून वैकुंठ । होती प्रविष्ट प्रविष्ट ।। १ ।।”
सरळ अर्थ – जिथे श्रीराम नामाचा सतत जयघोष असतो, जो नित्य श्रीराम नामात तल्लीन असतो, असा माणूस विना अडथळा भवसागर सहज पार करतो. तो वैकुंठ ओलांडून परब्रह्म पद प्राप्त करतो. कलियुगामध्ये नामस्मरण भक्ती ही सर्वात सोपी-सहज भक्ती आहे. सर्वच संतांप्रमाणे आणि सद्गुरूंप्रमाणे योगीराज श्रीकल्याणस्वामी पण नामस्मरणावर विशेष भर देतात. सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून पूर्ण श्रध्देने आणि निष्ठेने नाम घेतले तर वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. प्रत्यक्ष परब्रह्माचे सगुणरूप म्हणजे प्रभूरामचंद्र. त्यांची भक्ती करून त्यांच्याशी एकरूप होणं, हेच प्रत्येक माणसाचं ध्येय असावं. प्रपंचातील कोणतेही व्यवहार करत असताना त्याने परमात्म्याचं अनुसंधान कायम ठेवावे. आणि यासाठी नामस्मरण भक्ती मोठं काम करते. कारण नामस्मरण करणे ही आंतरिक साधना आहे. म्हणूनच स्वामी म्हणतात, तुम्ही सतत नाम घ्या, नामाचा जयघोष करा. पण नामावर पूर्ण श्रध्दा ठेवून जर नाम घेतले तर भवसागर अगदी सहज तरला जाईल. आणि वैकुंठाला सुद्धा पार करून परब्रह्म पदाला माणूस प्राप्त करेल. वैकुंठामध्ये गेलं तरी ती शाश्वत मुक्ती नाही. पुण्य संपले की तिथून खाली घसरणे आहेच. पण श्रीराम नामाच्या स्मरणाने परब्रह्म पदात विलीन होणे आहे, सायुज्यमुक्ती मिळवणे आहे.
“राम नामांकित नर । बुडऊं न शके भवसागर ।
श्रीराम मुद्रांकित मी वानर । सुखे परपार पावलों ।। २ ।।”
सरळ अर्थ – जो श्रीराम नामाच्या आश्रयाला आहे, त्याला भवसागर काहीही करत नाही. भवसागरामध्ये बुडण्याचे त्याला भय नाही. मी श्रीराम नामाची मुद्रा धारण केलेला एक साधारण जीव (वानर) आहे. पण प्रभूश्रीरामांच्या नामस्मरणाने अगदी सहजच हा भवसागर पार करून निजस्थानाला गेलो आहे, असे स्वामी म्हणतात. सद्गुरूंना पूर्ण शरणागत झालेला शिष्य, त्यांच्याच कृपेने आत्मानात्म-विवेक, सारासार विचार जाणत असतो. त्यांनीच दिलेल्या नामामुळे तो पूर्ण त्यांच्या आणि नामाच्या आश्रयाला असतो. नामरूपी कवचामुळे भवसागर त्याला बुडविण्याचे धाडस करत नाही. सद्गुरू कृपेमुळे तो देहात असून सुध्दा विदेही अवस्थेत असतो. पोस्टातील पाकिटावर जसा शिक्का असला की, ते पाकिट योग्य जागी पोहोचते. तसंच श्रीराम नामाचा शिक्का ज्याच्या अंतःकरणावर उमटतो, तो खात्रीने परपार पावतो. सेतूबंधनाच्या वेळी श्रीराम नामाची मुद्रा उमटवली आणि निर्जिव असून सुध्दा पाषाण पाण्यावर तरंगले. स्वामी म्हणतात, श्रीराम मुद्रा धारण केलेला मी एक साधारण वानर आहे. पण श्रीराम नामाची मुद्रा धारण केल्याने मी अगदी सुखाने पैलतीर गाठले आहे.
“नित्य श्रीराम नामस्मरण । तेथे वीर्य धैर्य कल्याण ।
ब्रह्म पावती सनातन । हे महिमान स्मरणाचें ।। ३ ।।”
सरळ अर्थ – जो नित्य नामस्मरण साधना करतो, श्रीराम मंत्राचा जयघोष करतो, तो वीर्यवान, धैर्यवान बनतो. या नामस्मरण भक्तीचा महिमाच असा आहे की, ती केल्यामुळे माणूस सनातन, शाश्वत अशा ब्रह्मपदाला पोहोचतो, त्याच्या जन्माचे कल्याण होते. श्रीमारुतीराय, श्रीसमर्थ किंवा सगळेच संत, सदैव नामानुसंधानात असल्यामुळे त्यांच्या मुद्रेवर कायम एकप्रकारचे तेज दिसते. भगवंताचा भक्त कायम निर्भय असतो, कारण जिवंतपणीच तो जीवन्मुक्तीचा आनंद उपभोगत असतो. आणि हेच त्याचं जगणं कल्याणकारी असतं. नामस्मरणाचं माहात्म्यच असं आहे की, ते करणारा माणूस कुठेही न अडकता थेट ब्रह्मपदाला पोहोचतो.
“जेथे श्रीराम विस्मरण । तेथे अकीर्ति अपेश अकल्याण ।
अति निंद्यत्वें पापी पूर्ण । अधःपतन महा नरकी ।। ४ ।।”
सरळ अर्थ – जो माणूस भगवद्भक्ती करत नाही, त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही, त्याचं नाम घेत नाही, त्याला जीवनात कशामध्येच यश येत नाही. सगळी कडे त्याची दुष्कीर्ति होऊन त्याचं जीवन वाया जातं. श्रीरामांच्या नामाचे विस्मरण केल्यामुळे, हातून असंख्य पापं घडल्यामुळे तो अतिशय निंदनीय होऊन अखेर यमयातनेमध्ये; महानरकामध्ये त्याचं अधःपतन होते. जो पंचभूतांचा दास झाला, मायोपाधिक विश्वाचा दास झाला, तो देहबुद्धीतच वावरत असतो. अज्ञानामुळे तो प्रपंचातच गुंतून पडतो. त्यामुळे त्याला प्रभूश्रीरामांचे विस्मरण होतं. प्रपंचात गुंतल्यामुळे मी, माझे, इतकेच विश्व कल्पिल्यामुळे तो प्रभूश्रीरामांची भक्ती, त्याचे नाम हे काहीच जाणत नाही. सदैव षड्विकारांच्या आहारी, वासनेच्या आहारी जीवन असल्यामुळे निंदेला पात्र होतो. जीवन अपयशी होऊन सगळीकडे नावे ठेवली जातात. यामुळे आयुष्य व्यर्थ जातं. आणि मृत्यूनंतर आदिदैविक ताप भोगताना, महानरकामध्ये प्रचंड यातना भोगाव्या लागतात. कारण अतिशय निंदनीय, पापी आचरण आणि त्यातून प्रभूश्रीरामांचं विस्मरण, त्यामुळे अधःपतन होतं.
“यालागी साक्षपें आपण । समूळ सांडावे विस्मरण ।
नित्य करितां श्रीराम स्मरण । कीर्ति कल्याण निज विजयी ।। ५ ।।”
सरळ अर्थ – यासाठी आपण प्रभूश्रीरामांचे कटाक्षाने विस्मरण टाळावे म्हणजेच निश्चयाने अखंड नामस्मरणात रहावे. जो या नामस्मरण साधनेला प्राणापलीकडे सांभाळतो, त्याची सगळीकडे सत्कीर्ति होऊन त्याच्या आयुष्याचे कल्याण होते. तो निजपदाला निश्चितच प्राप्त होतो. अशा प्रकारे योगीराज श्रीकल्याणस्वामी या सवायीमध्ये नामस्मरणाचे महात्म्य सांगतात.
नाम न घेणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देतात. माणसाने एक क्षणभर सुद्धा प्रभूश्रीरामांचे विस्मरण होऊ देऊ नये. कारण त्यांच्याच सत्तेवर हे विश्व चालते. प्रत्येकामध्ये आत्माराम रुपाने तेच अधिष्ठित आहेत. याची जाणीव ठेवून अखंड त्यांच्या अनुसंधानात राहिले, तर तिन्ही लोकांत त्याची कीर्ति होऊन, त्याचे इहलोकी आणि परलोकी कल्याणच होईल. तो सगळीकडे विजयी होईल. श्रीसमर्थांनी जसा आपल्या सर्वच वाङ्मयात प्रभूश्रीरामांच्या भक्तीचा ध्यास घेतलेला आहे, तसाच ध्यास योगीराज श्रीकल्याणस्वामींच्या अंतःकरणात दिसून येतो. श्रीराम भक्तीबरोबरच, आपले सद्गुरू श्रीसमर्थ रामदासस्वामी यांची भक्ती आणि सेवा ही त्यांच्या जीवनाला पूर्णपणे व्यापून राहिली आहे. म्हणूनच ते श्रीसमर्थांप्रमाणेच श्रीराम नामाचं महत्त्व आपल्याला पदोपदी पटवून देतात.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।