।।येथे कां रे उभा श्रीरामा।।

।।येथे कां रे उभा श्रीरामा।।
डॉ. सदानंद चावरे
  • April 19, 2025
  • 1 min read

येथे कां रे उभा श्रीरामा| मनमोहन मेघश्यामा  ||१||

चाप बाण काय केलें । कर कटावरी ठेविले  ||२||

कां बा धरिला अबोला । दिसे वेष पालटला  ||३||

काय जाली अयोध्यापुरी । येथे बसविली पंढरी  ||४||

शरयूगंगा काय केली । कैची भीमा मेळविली  ||५||

किल्किलाट वानरांचे ।थवे न दिसती तयांचे  ||६||

दिसे हनुमंत एकला । हा कां सैन्यांतुनी  फूटला  ||७||

काय जाली सीता सती । येथे बहुत जन दिसती  ||८||

रामदासीं सद् भाव जाणा ।  राम जाला पंढरिराणा  || ९||

|| जय जय रघुवीर समर्थ ||

पंढरपूरला विठ्ठलाच्या प्रथम दर्शनाचे वेळी रामदासांनी रचलेला हा अभंग. अनंत दास रामदासी लिखित श्री समर्थांचा गाथा या पुस्तकात हा अभंग क्रमांक ४८ असा आहे. त्यांच्याच श्री दासायन या ग्रंथात असे आढळते की समर्थ शके १५५४ ते शके १५६५ या काळात तीर्थयात्रा  करीत होते. यात्राक्रम तपासला असता काशी, प्रयाग, अयोध्या, बद्रीनारायण, रामेश्वर,           शैल्यपर्वत, गोकर्ण महाबळेश्वर, चिपळूण-परशुराम, महाबळेश्वर, भीमाशंकर, शिखर शिंगणापूर, पंढरपूर असा प्रवास करून शेवटी त्र्यंबकेश्वर करून पंचवटी येथे आले.  (संदर्भ:- श्रीदासायन   पान ८०)  

यात्रेदरम्यान समर्थ अनेक देव देवतांचे दर्शन घेत, त्या त्या दैवतांची यथासांग पूजा अर्चा करीत होते. त्या त्या देवाची स्तुती करणारी पदे आरत्या श्रीसमर्थांनी लिहिल्या. तरी त्यांच्या मनात हृदयात श्रीराम हेच आराध्य दैवत स्थिर होते. त्याचाच अखंड ध्यास समर्थांना लागलेला होता. प्रस्तुत अभंग हा समर्थांच्या अंतरी केवळ श्रीरामांचे अनुसंधान लागले होते याची साक्ष पटवून देणारा आहे. श्रीसमर्थ पंढरपुरी आले खरे. पण भावविभोर अवस्थेत त्यांना पंढरीच्या जागी अयोध्या व चंद्रभागेऐवजी शरयू नदी दिसू लागली. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या समोर उभे राहिले, तेव्हा तेथे श्रीराम रूपच  दिसू  लागले. तथापि  त्यांच्या हृदयातील रामप्रतीमेपेक्षा हे रूप वेगळे भासले, ते पाहून त्यांना पडलेले प्रश्नच प्रस्तुत अभंगात समर्थ आराध्य दैवत श्रीरामांना विचारत आहेत.

सर्वत्र यवनांच्या अत्याचाराने समाज गांजला असताना आपले आराध्य दैवत एकटे आणि नि:शस्त्र कसे? शरसंधान करायला सदैव सज्ज असणारे हे हात कमरेवर ठेवून कळिकाळाचा थरकाप उठवणारे राम प्रभू इथे स्वस्थ कसे?  हा समर्थांचा प्रश्न आहे, सर्व देश फिरून आल्यावर, सगळीकडची दैन्यावस्था पाहून आल्यावर पडलेला हा प्रश्न आहे हे खूप महत्वाचे आहे. 

दाशरथी राम अयोध्येचा राजा होता. हनुमंताने रामाचा वनवासी तपोवेश आणि राज्याभिषेकानंतरचा राजवेश पाहिला होता. लंकेतला समरप्रसंगी रुद्रावतार व नंतरचे शांत प्रजावत्सल रूप पाहिले होते. हनुमंताने कृष्णावतार व त्यातील बाललीला व महाभारत युद्धातील चतुरस्त्र सहभाग पाहिला होता. श्री समर्थ हे हनुमंताचे अंशावतार म्हटले जातात. अर्थात त्यांच्या मनात हे सारे प्रश्न येणे अत्यंत स्वाभाविक होते.

श्री विठ्ठल रूप अत्यंत साधे आहे, त्यात हरि व हर दोघांचे एकत्रीकरण आहे, शिरी शिवपिंडी आहे. विष्णू प्रतीक म्हणून मकर कुंडले, कौस्तुभ मणी, उजव्या हाती कमलाचा देठ आहे, उजव्या वक्षस्थळी भृगूऋषींनी केलेल्या प्रहाराचे चिन्ह आहे, नाभीत ब्रह्म देवाचे जन्म स्थान आहे व कटिस मेखलारूपी करदोटा आहे. कृष्ण अवतारातील घुंगुरवाळी काठी व उजव्या हाती पांचजन्य शंख आहे. म्हणून समर्थ विचारतात देवा हे वेषांतर करून अबोल का आहात? 

अयोध्या नगरीचा विध्वंस पाहून समर्थ पंढरपुरी आले असल्यामुळे  देवाला विचारतात की देवा अयोध्या आपली राजधानी सोडून पंढरी का वसवली? अयोध्या ही राजधानी नावाप्रमाणेच अवध्य होती. शस्त्रास्त्र सज्ज नगरी होती. तेथील नागरिक, सुशील सात्विक सामर्थ्यशाली होते.  मोठे शक्तिशाली  सैन्य होते. या सा-याचीच आज अत्यंत गरज असताना इथे पंढरीत रामराजा काय करतो आहेस? 

पंढरी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी होती.अनेक संत इथे भक्तीभावाने येत व विठ्ठल चरणी लीन होत.समर्थ पंढरीचे महत्व जाणून होते. पण त्यांच्या मनात स्वराज्य स्थापनेची नितांत आवश्यकता व तातडी जाणवलेली असल्याचे या अभंगातून दिसते. भक्ती उपासना निर्वेध चालवयाची असेल तर, समर्थ राज्य व्यवस्था रक्षणासाठी सुसज्जच असलीच पाहिजे. 

हा विवेक न राहिल्याने विजय नगर, देवगिरी व अयोध्या येथील हिंदु राजवटी धुळीस मिळाल्याची खंत समर्थ व्यक्त करीत आहेत, ते सारे प्रत्यक्ष अवलोकन करून श्रीसमर्थ श्रीविठ्ठलासमोर उभे होते. त्यांच्या मनातील आंदोलने व्याकुळता तळमळ हे सारे या अभंगात दिसून येते आहे.  जणु ते विठ्ठल रूपातील रामाला नेमकं ओळखून आठवण देतात की आपल्या वैभवशाली नगरीनजीक, गंगेसमान पवित्र व विशाल शरयू नदी होती. वानरांचा किलकिलाट होता आणि इथे मात्र शांतता जाणवते आहे. रामाने वानर म्हणजे वनवासी नरांना शस्त्रसज्ज व युद्ध सन्मुख केले व यशश्री तुम्ही सुद्धा मिळवू शकता असा दुर्दम्य विश्वास दिला. सद्यस्थितीत हेच बळ हाच दुर्दम्य आशावाद व हिंमत समाजाला देणारे युयुत्सु नेतृत्व हवे आहे व त्याचे प्रतीक        ‘राजाराम’ हे लोकांचे आराध्य दैवत असणे गरजेचे आहे हे श्रीसमर्थ सांगत आहेत.

इथे हनुमंत एकटा आहे. खरंतर तो वानरयुथ मुख्य आहे म्हणजे ससैन्य असला पाहिजे. दास मारुती भक्तीचे प्रतीक. तो एकटा असतो पण वीर मारुती हा ससैन्य व अग्रभागी असे याचेही स्मरण श्रीसमर्थ रामाला (विठ्ठलाला) व पर्यायाने समाजमनात असलेल्या जगदीश्वराला देत आहेत. त्याने योग्य तो बदल घडवून आणावा अशी विनंती केली आहे.

श्रीराम-जानकी हे शिव-शक्ती, माया-ब्रह्म, गणेश-शारदा असे ज्ञान व सामर्थ्य, बुद्धी व शक्तीस्त्रोत यांचे अविच्छिन्न स्वरूप आहे. इथे तर सीतामाई दिसत नाहीत. अनेक लोक मात्र दिसतात, असे समर्थ म्हणतात तेव्हा हे जन एका उद्दिष्टाने प्रेरित नाहीत, सुसंघटीत नाहीत, एकजिनसी नाहीत म्हणून शक्ती विखुरलेली आहे आणि  ती कार्यान्वित होत नाही हे समर्थ सांगत असावेत.

शेवटच्या दोन ओळीत समर्थ म्हणतात की खरा रामदासी रामरायाला ओळखतो. त्याने कितीही वेगळे रुप घेतले, स्थान बदलले, वेशभूषा बदलली तरी ओळख पटते. कारण रामदासी ‘वरवर’ पाहत नसून दैवतांची  ‘अंतरंग परीक्षा’  करणे जाणतो.

म्हणून सध्या रामराय पंढरीत विठ्ठल रूपाने स्थित आहेत हे श्रीसमर्थांनी ओळखले आहे. विठ्ठलरूप समोर दिसत असूनही त्यात अनुस्यूत असलेले ‘रामरुप परमचैतन्य’ ध्यानात घेऊन समर्थ त्याची पूजा बांधतात. अनेक रूपात एकच परमेश्वर अनुभवणे ही भक्तांची शक्ती आहे, सिद्धी आहे व त्याचे दर्शन या प्रस्तुत अभंगातून घडते.

(काव्याची काल निश्चिती :- श्री समर्थ पंढरपूरला परत शालिवाहन शके १५७१ च्या आषाढ महिन्यात गेल्याचा उल्लेख वाकेनिशी टिपण व बखर या दोन्हीत आला आहे. समर्थ कृष्णातीरी भ्रमण करत असताना वारकरी जथ्याने पंढरपूर येथे जात होते व त्यांनी समर्थांना आषाढवारी साठी बरोबर यायचा आग्रह केला. समर्थ श्रीरामा शिवाय इतर दैवता कडे जायला तयार नव्हते. पण विठ्ठल भट नावाच्या वृद्ध वारक-याने आग्रह केल्याने ते पंढरपूरला गेले आणि तिथे विठ्ठल दर्शन त्यांनी घेतले असा हा कथाभाग आहे. त्यावेळी हे काव्य समर्थांना स्फुरले.                 संदर्भ:-‘श्री दासायन’, ले. अनंतदास रामदासी, पान क्रमांक २०१ सर्ग, चापबाण काय केले)

||जय जय रघुवीर समर्थ||

Language