“प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे” अशी म्हण मराठीत प्रसिद्ध आहे. प्रयत्न केल्याशिवाय मनुष्याची प्रगती होणे अशक्य आहे. लहान मुलगा प्रथम चालायला लागतो, किती वेळा पडतो, अडखळतो, पण तरीही उठून परत चालायला लागतो. तेव्हां तो स्वतः तर हसतोच, पण त्याच्या आई-वडिलांनाही आनंद होतो. या लहान मुलाने मी पडलो म्हणून चालायचा प्रयत्न केला नसता तर तो चालू शकला असता का ? निसर्गाचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात. उदा. मुंगी दिसायला अतिशय लहान, पण साखरेचे; धान्याचे कण उचलून साठवून ठेवते. ती आळस करीत नाही. पक्षी, पाऊस यायच्या आधी काडी-काडी जमवून झाडावर घरटे बांधतो. कधी कधी सोसाट्याच्या वार्याने त्याचे घरटे पडून जाते, पण तो हार मानीत नाही. परत काडी-काडी जमवून नवीन घरटे बांधतो. तात्पर्य काय, तर मनुष्य; पशू; पक्षी सगळयांना या विश्वामध्ये जगण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात.
आपण संतकाळाचा आढावा घेतला तर असे दिसून येईल की, संतांनी त्यांच्या जीवनात किती अथक प्रयत्न केले. त्याकाळात परिस्थिती कठीण होती. कोणतीही साधने उपलब्ध नव्हती. लहान गोष्टींसाठी सुद्धा त्यांना अपार मेहनत, कष्ट, प्रयत्न करावे लागत असत, पण त्यांनी कधी हार मानली नाही. ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास सहन करावा लागला ? ते व त्यांची भावंड अपमान सहन करुन, लहान वयात आई-वडिलांचं छत्र नसताना, अविरत प्रयत्नांनी संतपदाला पोहोचली. जगद्गुरू तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, श्रीसमर्थ रामदास स्वामी या संतांच्या मांदियाळीचा अभ्यास केला तर असे आढळून येते की, हे सर्व संत प्रयत्नवादी होते. बिकट वाट असूनही त्यांनी अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल केली. त्यांनी आपले प्रयत्न कधी सोडले नाही. ज्या काळात स्त्रियांना समाजात मानाचे स्थान नव्हते, घराबाहेर जाण्यास परवानगी नव्हती, त्याकाळात मुक्ताबाई; बहिणाबाई (तुकाराम महाराजांची शिष्या), जनाबाई, वेण्णाबाई व इतर अनेक स्त्रिया प्रयत्न करुन, समाजाची चौकट मोडून संतपदाला पोहोचल्या. त्यांनी समाजात मानाचे स्थान मिळवले. या संतांनी, संत कवयित्रींनी समाजात जनजागृती केली. लोकांना नामस्मरणाचा साधा, सोपा मार्ग सांगितला. लोकांचे कल्याण केले. सुरवातीला लोकांकडून त्यांना त्रासही सहन करावा लागला. पण त्यांनी आपले प्रयत्न कधी सोडले नाहीत.
श्रीसमर्थांचा प्रयत्नवाद तर आगळावेगळाच आहे. श्रीसमर्थ प्रयत्नाला देव मानणारे आहेत. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ ही म्हण त्यांनी चुकीची ठरविली. श्रीसमर्थांच्या मते आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. आळशी माणसे स्वतःच्या जीवनाचा तर नाश करतातच, पण त्याबरोबरच कुटुंबातील इतर लोकांनाही त्याचा त्रास होतो. प्रपंच, संसार करणार्या माणसांना त्यांच्या जीवनात जी वाईट अवस्था येते ती त्यांच्या आळसामुळे. अशा लोकांना प्रयत्न, मेहनत करायला नको असते. श्रीसमर्थ म्हणतात, माणसाने आळस झटकून योग्य दिशेने प्रयत्न केला तर त्याला दैव अनुकूल झाल्यावाचून रहाणार नाही. हा फार महत्त्वपूर्ण संदेश श्रीसमर्थ सांगतात. आजचे काम उद्या करु, अशाने ते कधीच होत नाही. ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब’ ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. देवाने मनुष्याला महत्त्वाचे म्हणजे बुद्धीचे वरदान दिले आहे. त्याला जर प्रयत्नांची जोड दिली तर नक्कीच यश प्राप्त होईल. “केल्याने होत आहे रे । आधी केलेची पाहिजे । यत्न तो देव जाणावा” यावर श्रीसमर्थांचा भर होता.
श्रीसमर्थांनी आधी स्वतः केले आणि मग लोकांना सांगितले. श्रीसमर्थांच्या चरित्रात ठिकठिकाणी प्रयत्नवाद दिसून येतो. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी आपले घर, नातेवाईक, गावाचा त्याग केला. नाशिकजवळील गोदावरीच्या काठी टाकळी येथे बारा वर्षे श्रीरामोपासना केली. सुरुवातीला गावकऱ्यांकडून अपमान, अवहेलना सहन कराव्या लागल्या. घरच्या लोकांच्या विरहाचं दुःख सहन केलं, परंतु प्रयत्न मात्र सोडले नाही. “रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्यया येतें” असा स्वतःचा अनुभव श्रीसमर्थ सांगतात.
श्रीसमर्थांच्या काळातील परिस्थिती पहाता अस्मानी आणि सुलतानी संकटांनी देश होरपळून निघाला होता. समाजाची ही परिस्थिती पाहून श्रीसमर्थांचे मन दुःखी झाले आणि त्याच क्षणी त्यांनी ठरविले की, लोकांचे दुःख नाहीसे करेन. त्यासाठी यात्रेच्या निमित्ताने बारा वर्षे लोकस्थितीचे निरीक्षण केले. हिमालयातून परत आल्यावर त्यांनी लोककार्यास सुरुवात केली. तरुणांना संघटित केले, त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. गावोगावी हनुमानाची मंदिरे बांधली. अकराशे मठ स्थापन केले, मठपती तयार केले. अशाप्रकारचे श्रीसमर्थांचे अविरत, अखंड प्रयत्न सुरूच होते. संघटनेसाठी कार्यकर्ते पाहिजेत आणि कार्यकर्ते मिळविण्यासाठी माणसांची पारख पाहिजे. श्रीसमर्थांनी भिक्षेच्या निमित्ताने माणसांचे निरीक्षण केले. ते म्हणतात,
“नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें । १४-२-८ ।।
कुग्रामें अथवा नगरें । पाहावीं घरांचीं घरें ।
भिक्षामिसें लाहानथोरें । परीक्षून सोडावीं ।।१५-६-२४ ।।”
श्रीसमर्थांनी भिक्षेच्या माध्यमातून असंख्य शिष्य मिळविले. त्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आपल्या सामर्थ्य बळाने अखिल राष्ट्र संघटित केले. समाजसेवेकरिता, राष्ट्राच्या स्थैर्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले, प्रयत्नांनाच देव मानले. महाराष्ट्र धर्माची ध्वजा उभारली. प्रभूरामचंद्र हे दैवत, त्याच्यावरील दृढ निष्ठा, पराक्रमी श्रीमानयोगी श्रीछत्रपती शिवाजीमहाराजांसारख्या राजांचे नेतृत्त्व आणि श्रीसमर्थांचे अगणित कष्ट/अपार मेहनत या सगळ्यांच्याच सामर्थ्याने श्रीसमर्थांनी यावनी सत्तेचा पराभव केला आणि भारतीय समाज संकटमुक्त झाला.
श्रीसमर्थांच्या चरित्रातून लक्षात येते की, प्रयत्न किती मौल्यवान, महत्त्वपूर्ण आहेत. परिस्थिती कठीण, कशीही असो, कितीही संकटे, दुःख जरी जीवनात आली तरी माणसाने निराश न होता, आहे त्या परिस्थितीवर मात करायला पाहिजे. त्याबरोबरच योग्य प्रयत्नांची जोड आवश्यक आहे. श्रीसमर्थ म्हणतात, “प्रयत्न करायलाच हवेत, पण चांगला प्रयत्न होण्यासाठी मनात दक्षता पाहिजे व त्याचबरोबर अंगी सावधानताही आवश्यक आहे.” त्यासाठी काय करायला पाहिजे हे सांगताना श्रीसमर्थ म्हणतात,
“म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा ।
दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळें ।। १२-९-८ ।।”
आळस संपूर्ण सोडून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, प्रयत्न करताना मनातील संशय, निराशा पूर्णपणे काढून टाकावी. त्यासाठी प्रयत्नशील माणसाने आपली जीवनपद्धती बदलावी. जास्तीत जास्त वेळ योग्य व चांगल्याच कामामध्ये घालवावा. लहानातले लहान कामही आनंदाने करावे. बोलल्याप्रमाणे आपले आचरण असावे, तसेच आपले बोलणे नम्र व मधुर असावे. आपले प्रयत्न कुठेच कमी पडू देऊ नयेत. मनुष्याचे आचरण असे असेल तर, त्याची नक्कीच प्रगती होईल आणि शेवटी त्यालाही पटेल, “यत्न तो देव जाणावा.”
।। जय जय रघुवीर समर्थ ।।