वैराग्य

वैराग्य
मंजुश्री सोनटक्के
  • March 8, 2026
  • 1 min read

विषय सुखाची आसक्ती कमी करणे म्हणजे वैराग्य. साधन चतुष्ट्यपैकी एक वैराग्य आहे. परमार्थ मार्ग एकदा स्वीकारला की विवेक वैराग्य ह्यांचं बळ अधिक लागतं. तरच परमार्थाची वाट आपण सुरळीत चालू शकतो.प्रपंच करत असताना साधना केली तर जीवाचं सार्थक होतं. साधना करताना साधन चतुष्ट्यचा स्वीकार करावा लागतो. साधनेच्या रथात बसल्यानंतर विवेक आणि वैराग्य ही रथाची दोन चाके फार महत्त्वाची असतात.श्रीसमर्थ म्हणतात _ 

वैराग्या परते नाही भाग्य। वैराग्य नाहीं तें अभाग्य।

वैराग्य नसता योग्य। परमार्थ नव्हे॥१२-७-१७||

श्रीसमर्थ म्हणतात मुळातच अंगी वैराग्य भावना नाही, स्वतःच्या अनुभवाचं ज्यांना ज्ञान नाही, ज्यांचं आचरण शुद्ध नाही, ज्यांना भजन पूजन करायला आवडत नाही. अशांना परमार्थ घडत नाही.

 एखादी जाहिरात नौकरीसाठी वृत्तपत्रात येते.त्यामध्ये पात्रतेसाठी अर्हता आणि पात्रता (qualification & eligibility) हे दोन मुख्य मुद्दे असतात. मग अर्जदाराकडे कितीही चांगले गुण असले पण ह्या दोन पैकी एकाची जरी कमतरता असली तर त्याचा अर्ज स्वीकारल्या जात नाही. तो तात्काळ नाकारला जातो. त्याचप्रमाणे परमार्थात देखील साधकाच्या अंगी विवेक आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टी असायलाच हव्यात.ह्यातली एखादी कमी असून चालत नाही. संत श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात,

जे वैराग्याची शीव न देखती। विवेका ची भाष नेणती।

ते कैसेनी पावती। मज ईश्वराते॥

आध्यात्मामध्ये साधक श्रीमंत आहे की गरीब आहे, साक्षर आहे की निरक्षर आहे, कोणत्या धर्माचा आहे किंवा कोणत्या संप्रदायाचा आहे, वर्ण कसा आहे, हे काहीच पाहिल्या जात नाही.आध्यात्मामध्ये ह्या गोष्टींना काहीच महत्त्व नाही.फक्त साधकाकडे विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी आहेत का हे पाहतात.ह्या दोन गोष्टींना फार महत्त्व आहे.भगवान रामकृष्ण परमहंस ह्यांनी विवेक आणि वैराग्य ह्या दोन संकल्पना एका छोट्याशा गोष्टीतून समजवून सांगितल्या आहेत.ती गोष्ट अशी :-

लहान बाळ घरात खेळत असतो व त्याची आई तिथेच घरातले काम करत असते. खेळता खेळता बाळ ते खेळणे टाकून देतो व रडायला लागतो. त्याची आई त्याला दुसरं खेळणं देते.पाच दहा मिनिटं तो त्या नवीन खेळण्याशी खेळतो. त्याला लगेच त्या खेळण्याचा कंटाळा येतो.त्याला आई जवळ जायचं असतं.म्हणून तो पुन्हा रडू लागतो. ती त्याला आणखी छान रंगीबेरंगी खेळणं खेळायला देते.तो खेळतो पण लगेच त्याला त्याही खेळण्याचा कंटाळा येतो. तो ते खेळणं फेकून देतो व जोरात रडू लागतो. पण इकडे आईला तर कामं उरकवायची असतात. ह्याचं रडणं काही केल्या थांबत नाही.हे पाहून आई बाळाच्या पाठीत एक धपाटा मारते व त्याला कडेवर घेते.कडेवर घेताच बाळ आईला घट्ट मिठी मारतो व रडायचं थांबतो. जणू काही तो आईला म्हणत असतो, “तार अथवा मार, आता मला तूच हवी आहेस.”  त्या मुलाला फक्त आई हवी असते त्याला विवेक म्हणतात आणि कितीही चांगलं खेळणं असलं तरी ते नको असतं ह्याला वैराग्य म्हणतात.

‘विवेक’ म्हणजे ‘निवड’ आणि ‘वैराग्य’ म्हणजे ‘नावड’ असा अर्थ होतो. साधकाच्या दृष्टीने फक्त भगवंत हवा हा झाला विवेक आणि भगवंता खेरीज दृश्य जगातली कोणतीच वस्तू नको हे झालं वैराग्य. वैराग्यामध्ये भगवंताला प्राप्त करण्यासाठी दृश्याचे सगळे विषय भोग म्हणजे अडथळे आहेत. ते दूर करावे लागतात. भक्त प्रल्हादाला भगवंताच्या नाम:स्मरणा शिवाय काहीही नको होतं, संत मीराबाईला भगवंताचं गुणगान गाण्यावाचून दुसरं तिसरं काहीही सुचत नव्हतं.

श्रीदासबोध ग्रंथात द. ३ रा हा मनांत दृश्य जगातील गोष्टी मिळवण्याची नावड निर्माण करणारा आहे.ह्यात संसार कसा दु:खदायक आहे हे सांगितलं आहे.जीवनातले वैमनस्य टाळण्यासाठी भगवंताला शरण जाण्याचा मार्ग भक्तीतून निर्माण होतो.म्हणून पुढचा ४ था दशक हा नवविधा भक्तीचा सांगितला आहे.द. ३ स. १० वैराग्य निरुपणा मध्ये श्री समर्थ म्हणतात:-

जयास वाटे सुखचि असावे।तेणे रघुनाथ भजनी लागावे।

स्वजन सकळहि त्यागावे।दु:खमूळ जे॥३-१०-६३

श्री समर्थ म्हणतात ज्याला खरं सुख हवंय म्हणजे आत्मसुख हवंय त्याने भगवंताचं भजन करावं.वेळप्रसंगी आप्तजनांना देखील सोडावे.जे दु:खाला कारणीभूत आहेत.आपले आप्त कायम आपल्या सोबत राहात नाहीत.म्हणून कठोर वैराग्य पत्करून स्वजनांचा सुद्धा त्याग करावा.त्याग करतांना द्वेष, तिरस्कार निर्माण होणार नाही ही दक्षता देखील साधकाने घेतली पाहिजे.ज्याप्रमाणे झाडाचं पिकलेलं पान गळून पडतं.तसं वस्तूंबद्दलचं प्रेम आपल्याला सोडून देता आलं पाहिजे.वासना वाढवून माणूस स्वतःला स्वतःच्याच हाताने जखमी करत असतो.

लहान मुलं रेती मध्ये खेळताना रेतीचं घर करतात. मनसोक्त त्या तयार केलेल्या घराशी खेळतात. घरी परततांना मात्र ते घर मुले पायाने तुडवून मोडून देखील टाकतात.त्या रेतीच्या घराशी त्यांचं काहीच ममत्व नसतं.हे रेतीचं घर तुडवणे म्हणजे वैराग्य.मुलांना हे घर मोडल्याची अजिबात खंत वाटत नाही.आपल्या खऱ्या घराची आठवण होणे हे झालं मुमुक्षुत्व, आठवण होताच घराकडे धावत सुटणे हे झालं साधकत्व आणि घरी पोहचणे हे झालं सिद्धत्व.घरी पोहचताच त्यांना आनंद होतो, मन सुखावते, निवांत वाटतं.म्हणजेच काय तर वैराग्य ही दुःखदायक संकल्पना नसून आनंद प्राप्त करून देणारी आनंददायी संकल्पना आहे.संग्रह न करणे म्हणजे वैराग्य नाही तर संग्रहाविषयीची च आसक्ती नसणे म्हणजे वैराग्य आहे.” असेल तर असू दे, नसेल तर नसू दे ” ही चित्ताची दशा म्हणजे खरे वैराग्य आहे.दृश्य वस्तूंवर प्रेम नसणे म्हणजे वैराग्य.म्हणजे इथे विवेकाने वैराग्य पत्करावे लागते. १२-४-६ मध्ये श्रीसमर्थ म्हणतात,

विवेकेंविण वैराग्ये केलें।तरी अविवेकें अर्थी घातलेलं।

अवघे वेर्थचि गेलें।दोहिंकडे॥१२-४-६||

विवेका शिवाय वैराग्य केलं तर माणूस संकटात पडेल.त्याची प्रपंचात व परमार्थात दोन्हीकडे फसगत होईल. पुढे ह्याच समासात ओ.क्र.१२ मध्ये श्रीसमर्थ म्हणतात, 

विवेकें अंतरी सुटला।वैराग्यें प्रपंच तुटला।

अंतर्बाह्य मोकळा जाला।नि:संग योगी॥१२-४-१२

ज्यांच्या अंगी विवेक आणि वैराग्य योग्य प्रमाणात असतो तो आत बाहेर मोकळा असतो.त्याचं जीवन प्रभावित होतं.विवेक युक्त आणि वैराग्य युक्त पुरुष आतून बाहेरून मोकळा होतो, बंधन रहित होतो, तोच खरा नि:संग योगी आहे.तो बंधनरहित असल्यामुळे त्याचं जीवन सुसंगत असतं.त्याला येणारे अनुभव तो लोकांना सांगतो.लोकं त्यांच्यावर प्रभावित होऊन सन्मार्गाला लागतात. ओ.क्र २३ मध्ये श्रीसमर्थ म्हणतात, 

विवेक वैराग्य तें ऐसें।नुस्तें वैराग्य हेंकाडपिसें।

शब्द ज्ञान येळिलसें।आपणचि वाटे॥१२-४-१९||

श्रीसमर्थ म्हणतात की वैराग्य प्रखर असलं पाहिजे.स्वानुभवाने मिळालेलं ब्रह्मज्ञान असायला हवं.वैराग्यशील माणसाने आचरणशील असावं.विवेक आणि वैराग्य ह्या दोन्हींची जोड असायला हवी.नुसतंच वैराग्य हे दुराग्रही व वेडपटपणाचं लक्षण आहे आणि केवळ शब्दज्ञान असणं हे ही कंटाळवाणी असतं.असं हे साधनचतुष्य मधलं दुसरे साधन ” वैराग्य” आहे.

 

॥जय जय रघुवीर समर्थ॥

Language