उन्मनी ही मनाची परिपक्व अवस्था होय. उन्मनी = उद + मनस. उद म्हणजे उर्ध्वगती, पूर्णत्व, मुक्त होणे, विकास होणे व मनस म्हणजे मन. परमार्थ मार्गामध्ये मन जेव्हा दृश्य जगताचा संग सोडून वृत्तीरहित बनते, तेव्हा त्या अवस्थेला ‘उन्मनी’ म्हणतात. मनाचा उर्ध्वगतीने उन्मनीपर्यंत विकास करणे हेच साधकाचे अंतिम ध्येय असते. या अवस्थेमध्ये मनात कुठलेच संकल्प-विकल्प निर्माण होत नाहीत. ही निर्विकल्प अवस्था आहे. तेथे मन मनपणाने शिल्लक उरत नाही, म्हणून ही अवस्था शब्दाने सांगता येत नाही, त्याची कल्पनाही करता येत नाही आणि कुठल्याच इंद्रियांद्वारे ती जाणलीही जात नाही. मात्र संतांनी अनुभव घेऊन साधकांसाठी त्याचे वर्णन करून ठेवले आहे. या अवस्थेचे वर्णन करताना प.पू. हंसराज स्वामी आपल्या ‘आगमसार’ ग्रंथात म्हणतात,
“मन सांडून एकीकडे । आपण ओतप्रोत चहूकडे ।
वृत्तीसहित मन बुडे । हेचि उन्मनी ।।”
दासबोधातील ‘जगतज्योती’ या दहाव्या दशकातही उन्मनीचे लक्षण स्पष्ट केले आहे. सामान्यपणे मनुष्य दिवसाच्या २४ तासांमध्ये जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्था अनुभवतो. कसे ते पाहू.
१) जागृती – जागृतावस्थेत जीव आपल्या इंद्रियांच्या द्वारे व्यावहारिक जगाचा अनुभव घेतो. या अवस्थेत मन व इंद्रिये कार्यरत असतात. मनाची स्पष्ट जाणीव असते. इंद्रियाद्वारे विषयांपासून कितीही सुख मिळाले तरी मनाची तृप्ती होत नाही. ते सतत सुखाच्या ओढीने धडपडते.
“अंतःकरण-इंद्रिये । घेणे पडे जो जो विषय ।
तयासी नांव होय । जागृती ऐसी ।।”
२) स्वप्न – जागृती अवस्थेतील विषय भोग मनाने त्या त्या वेळी भोगून झालेले असतात. परंतु त्याचा सुप्त संस्कार अंतकरणात दडलेला असतो. जसे, कापुराच्या डबीतला कापूर संपला तरी त्या डबीला कापुराचा सुगंध येतो. त्याप्रमाणे स्वप्नात त्या सुप्त संस्कारामुळे प्रत्यक्ष विषय समोर नसले तरी ते खरे वाटतात व त्याच्या सुखदुःखाची जाणीव होते. उदा. स्वप्नात काही भीतीदायक पाहिले की अंगाला घाम फुटतो. परंतू जाग आल्यावर तो भ्रम होता हे कळते.
“इंद्रिय-विषयेंविण । संस्कारे कल्पी मन ।
घडे सुखदुःख भोगेंविण । ते स्वप्नावस्था ।।”
स्वप्नामध्ये सर्व इंद्रिये शांत झालेली असतात. परंतु मन कार्यरत असते.
३) सुषुप्ती – सुषुप्ती म्हणजे गाढ झोप.
“मन जेथे लया जाय । परी सुखाचा प्रत्यय होय ।
अज्ञान नाश न होय । ते सुषुप्ती ।।”
गाढ झोपेत इंद्रिये, मन व बुद्धीसह सर्व वृत्ती अज्ञानात विलीन होतात. त्यामुळे गाढ झोपलेल्या माणसाला बाहेर काय चालले आहे ते कळत नाही. झोपेतून उठल्यावर तात्पुरता सुखाचा अनुभव येतो. पण अज्ञान पूर्णपणे नाहीसे झालेले नसते. उन्मनी आणि सुषुप्ती या दोन्ही अवस्था बाहेरून सारख्याच वाटतात. परंतु उन्मनी अवस्थेमध्ये अंत:करणात शुद्ध जाणीव जागी असते तर सुषुप्तीमध्ये जाणीव अज्ञानात लय पावते. वृत्ती शांत होतात.
जागृती,स्वप्न व सुषुप्ती या तीनही सहजसाध्य अवस्था आहेत.
४) तुर्या – ही प्रयत्नसाध्य अवस्था आहे. ही साधना करून मिळवावी लागते.
“जाणे ब्रह्म जाणे माया । ते येक जाणावी तुर्या ।
सर्व जाणे म्हणोनिया । सर्वसाक्षिणी ।। ७-५-५ ।।”
या अवस्थेमध्ये साधकाला एकीकडे देहाचे भान असते तर दुसरीकडे ‘मी आत्मा आहे’ हेही ज्ञान असते. म्हणून या अवस्थेला ‘सर्वसाक्षिणी’ म्हणतात. ही अवस्था शुद्ध ज्ञानरूप आणि सच्चिदानंदरूप आहे. या अवस्थेलाच महाकारण देह असेही म्हणतात.
भक्ती मार्गामध्ये ईश्वराशी एकरूप झाल्यावर भक्ताच्या अनुभवास येणारी तुर्यावस्थाच होय. या अवस्थेमध्ये देहासहित सर्व दृश्य विश्वाला साधक वेगळेपणाने पाहू शकतो. तुर्येमध्ये साक्षीत्त्वाची सूक्ष्म वृत्ती शिल्लक असते. ही वृत्ती सुद्धा नाहीशी झाली की उन्मनी अवस्था प्राप्त होते. श्रीसमर्थ या अवस्थेचे वर्णन करताना म्हणतात,
“म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि जालिया उन्मन ।
मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ।। ७-५-११ ।।”
५)उन्मनी – उन्मनीत मनातील विषय, विकार समूळ नाश पावतात. मन पूर्णपणे शांत आणि विचार मुक्त होते. परब्रह्माशी एकरूप होऊन जाते. ही अवस्था साधायची कशी ? यासाठी समर्थांच्या चरित्रातील एक गोष्ट आपण पाहू –
श्रीसमर्थ गडावर असताना एकदा धोंडीबा नावाचा शिष्य त्यांची कीर्ती ऐकून दर्शनासाठी आला व त्याने ‘मला राम दर्शन होईल असे करा’ असे स्वामींना सांगितले. यावर ‘मनाचे काहीही ऐकू नकोस’ असे सोपे, सुलभ साधन स्वामींनी त्यास सांगितले. त्याप्रमाणे वागायचे ठरवून तो निघाला. असे करता करता त्याच्या सर्व वृत्तींची निवृत्ती झाली व त्याला उन्मनी साधली. संत एकनाथ महाराज उन्मनी अवस्थेबद्दल सांगतांना म्हणतात, “मी-तूपणाची झाली बोळवण । हरपले मन झाले उन्मन ।।” मी-माझे या आसक्तीतून सुटल्यावर मन संगरहित होते. अशा मनाला ध्यानकाळी अनुभवाला येणारी अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था होय. म्हणून संगत्याग व उन्मनी एकच होत. ही अवस्था प्राप्त झाल्यावर सगळीकडे ‘भरला घनदाट हरी दिसे’ अशी अवस्था होते. अशी अवस्था श्रीसमर्थांसह सर्व संतांना प्राप्त झाली होती.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।