सारंगपूर या मठात उद्धव गोसावी मठाधिपती होते, तेव्हा त्यांनी समर्थांना पाठवलेलं पत्र आज आपण बघणार आहोत. मनाच्या श्लोकांसारखं हे पत्र आहे.
गुरुराजया ब्रह्मरूपा दयाळा । दयासागरा धाव वेगे कृपाळा ।
अनाथा दिना कारणे तू कुसावा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। १ ।।
तुझे रुप पाहावया आस मोठी । तरी दाखवी रूप तत्काळ दृष्टी ।
जशी बाळका माय तू धाव तैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। २ ।।
मना इंद्रिया कामक्रोधासी मारी । मदे मत्सरे वासना हे निवारी ।
जळावेगळा तळमळे मीन जैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ३ ।।
नसे सुख संसार हा घोर मोठा । जसा सिंह हस्तीसी मारी चपेटा ।
अशा संकटी सोडवी राजहंसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ४ ।।
चकोरे जसा चंद्रमा चिंतताहे । वनी गाय ते वत्स घरी वाट पाहे ।
तसे ध्यान तुझे मला हो कुंवासा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ५ ।।
नको अंत पाहू माया हे हरावी । तुझी भक्ती विरक्ती शांतीही द्यावी ।
बरा अंतरी लावी वैराग्य ठसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ६ ।।
तुझे ब्रीद रे नित्य असेल खरे । प्रचिती मला दाखवी सत्वरी रे ।
पतीतासी हा हेत आधार जैसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ७ ।।
मला वाटते अंतरी त्वां वसावे । तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे ।
अपत्यापरी पाजवी प्रेमरसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ८ ।।
म्हणे उद्धवासि त्वा हाती धरावे । सदासर्वदा अंतरी प्रेम द्यावे ।
उपेक्षू नका स्वामी दासासि हंसा । महाराजया सद्गुरु रामदासा ।। ९ ।।
उद्धव गोसावी यांनी समर्थांना पाठवलेले हे पत्रं आहे. यात शिष्याची तळमळ, सद्गुरु भेटीची लागलेली ओढ व आपण त्यांना भेटू शकत नाही याची तळमळ लक्षात येते. आता पत्राचा अर्थ बघू.
उद्धवस्वामी पहिल्या ओवीमध्ये समर्थांना नमस्कार करतात. समर्थांना वेगवेगळ्या उपमा देऊन त्यांना साष्टांग दंडवत घालतात. गुरुराजा, ब्रह्मस्वरूपा, दयाळा, दयासागरा ही सगळी समर्थांची विशेषणे आहेत. या पत्राचे एक वैशिष्ट्य आहे, याचा चौथा चरण महाराजया सद्गुरु रामदासा असा आहे. म्हणजे प्रत्येक ओवीच्या शेवटी उद्धवस्वामी समर्थांचा उदोउदो करतात व त्यांना शरण जातात.
दुसऱ्या ओवीत आता उद्धव गोसावींची तळमळ दिसून येते. तुझे रुप पाहावया आस मोठी.. म्हणजे तुझं दर्शन व्हावं, वारंवार सद्गुरुची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, यासाठी ही तळमळ आहे. यात ते उपमा देतात, लहान बालकाला आईची जशी ओढ लागते, बालक मातेकडे धाव घेते त्याप्रमाणेच उद्धव स्वामींच्या मनाची अवस्था झाली आहे. सद्गुरूला मातेची उपमा देतात व अशा मातेला हे बाळ कधी भेटेल याची चिंता व्यक्त करतात.
तिसऱ्या ओवीमध्ये स्वामी म्हणतात, इंद्रियांना काम, क्रोध, मत्सर, मद, वासना याने ग्रासले आहे. यापासून कसे सुटावे हे समजत नाही. ज्याप्रमाणे मासा पाण्यावाचून तळमळतो, तसेच तुम्ही मला या सगळ्या वासनेतून सोडवा. यासाठी माझी तडफड होते आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे.
चौथ्या ओवीमध्ये स्वामी म्हणतात, हा संसार जो आहे, जो बाहेरून सुख वाटतो परंतु तो अत्यंत कठीण आहे. जसा काही सिंहाने हत्तीला पंजा मारावा त्याप्रमाणे हा संसार म्हणजेच यातील वासना मनाला सतत त्रास देत राहतात. त्यामुळे अशा या संकटातून सोडवण्याकरता सद्गुरुराया तुम्ही धावा व मला या वासनेच्या महापुरातून वाचवण्याचा प्रयत्न करा.
पाचव्या ओवीत ते म्हणतात, ध्यान मार्गाने तुम्हाला भेटण्याचा एकच प्रयत्न मी करतो. ज्याप्रमाणे चकोर चंद्रमाचे चिंतन करतो किंवा गाय वनामध्ये गेली असता तिचे लक्ष सतत तिच्या वासराकडे लागलेले असते, तसेच ध्यानामध्ये तुमचे दर्शन व्हावे यासाठी मी सतत तळमळत असतो. नको अंत पाहू माया हे हरावी.. इथे परत उद्धवस्वामी समर्थांना शरण जातात. हा प्रपंच म्हणजेच मठाचा कारभार करताना ही माया मधेमधे येते, त्यामुळे तुमची भक्ती, विरक्ती, शांती मनाला मिळत नाही, पूर्ण वैराग्य प्राप्त होत नाही. मठाच्या कारभारात लक्ष घालावेच लागते व त्यात कुठेतरी ही माया अडकवते म्हणून लवकर या व मला यातून सोडवा.
उद्धवस्वामी पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, तुमचं ब्रीदवचन आहे की तुम्ही आपल्या शिष्याला मायेपासून सोडवता. मी अत्यंत पतीत, दीन, दुबळा आहे; मला तुमच्या आधाराची गरज आहे; त्यामुळे तुम्ही मला प्रचिती दाखवा आणि या मोहमायेपासून त्वरित सोडवा.
आठवी ओवी प्रसिद्ध आहे. नित्याच्या दासबोध पठणामध्ये आपण समर्थांना ही विनंती करतो, तशीच विनंती उद्धवस्वामी येथे समर्थांना करतात. अत्यंत प्रेमाने तुम्ही माझा सांभाळ केला, तसाच यापुढेही करा व तुमचा आधार, तुमची कृपा मला सतत प्राप्त होऊ दे. हीच विनंती या ओवीतून करतात.
शेवटच्या ओवीमध्ये उद्धवस्वामी म्हणतात, मला तुम्ही हाताशी धरा म्हणजेच दूर लोटू नका. समर्थांनी दूरदृष्टी ठेवून आपल्या उत्तम शिष्यांना वेगवेगळ्या मठामध्ये मठाधिपती म्हणून ठेवले होते. परंतु या शिष्यांच्या मनाला तळमळ आहे समर्थांच्या जवळ रहाण्याची. त्याचीच प्रचिती या पत्रातून येते. वारंवार उद्धवस्वामी विनंती करतात की मला तुमच्याजवळ येऊ द्या. तुमची सगुणमूर्ती सतत मला पाहता यावी, तुमचे उद्बोधन ऐकता यावे व तुमच्या पायाशी बसून मला श्रीरामरायाची भक्ती करता यावी. हीच विनंती वारंवार उद्धवस्वामी या पत्रातून समर्थांना करतात.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।