समर्थांच्या जो ४०,००० ओव्यांचा कविता समुद्र आहे त्यातील मनाचे श्लोक, दासबोध, आत्माराम हे ग्रंथ समर्थ संप्रदायाची प्रस्थान त्रयी म्हणून मानली जाते. पण तरीही समर्थांच्या साहित्यात करुणाष्टकांनी त्यांचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. समर्थ संप्रदायात सांय उपासनेत करुणाष्टके रोज म्हणली जातात. गंगेचा प्रवाह जसा त्यात स्नान करणा-याला शुद्ध आणि पवित्र करतो तसा ह्या करुणाष्टकातील करूण रसाचा प्रवाह साधकाच्या मनाला शुद्ध आणि पवित्र करीत असतो. समर्थांच्या साधना काळात समर्थानी रामरायाला केलेली ती विनवणी आहे. प्रार्थना आहे. त्यात आर्तता आहे. त्यांची प्रत्यक्ष अनुभूती या काव्यातून प्रगट झाली आहे.
जोपर्यंत संतांचे मोठेपण समाजाला कळत नाही तोपर्यंत सर्वच संतांना समाजाकडून होणारी जननिंदा, उपेक्षा सहन करावी लागते. समर्थ ही याला अपवाद नव्हते. वयाच्या बाराव्या वर्षी विवाह प्रसंगी ‘सावधान’ म्हणताच समर्थ सावध झाले आणि त्यांनी घर सोडले. मनात ध्येय पक्के होते. धर्माची स्थापना, जनांचा उद्धार करण्यासाठी समर्थ टाकळीला आले. बारा वर्षे साधना केली तेव्हा आधार होता एका रामरायाचा! नाशिकच्या काळाराम मंदिरातील रामरायाचा! रामराया समोर समर्थांच्या मनातील भावनांचा कल्लोळ उघड करीत असत. ते भावनांचे प्रकटीकरण म्हणजे करूण रसाने ओथंबलेली करुणाष्टके. त्यात करुणा तर आहेच पण रामरायाबद्दलचे प्रेम, निष्ठा, अनन्यता, शरणागती, रामरायाच्या विरहातून आलेला पोरकेपणा दिसून येतो. अशा या करुणाष्टकातील ‘उदासीन हा काळ कोठे न कंठे’ या करुणाष्टकाचा आज आपण विचार करणार आहोत.
समाधान साधुजनांचेनि योगे | परी मागुते दुःख होते वियोगे ||
घडीने घडी सीण अत्यंत वाटे | उदासीन हा काळ कोठे न कंठे ||
घरे सुंदरा सौख्य नाना परीचे | परी कोण जाणेळ ते अंतरीचे ||
मनी आठवीतांचि तो कंठ दाटे | उदासीन हा काळ कोठे न कंठे || २ ||
बळे लावितां चित्त कोठे जडेना | समाधान ते काही केल्या मिळेना ||
नव्हे धीर नैनी सदा नीर लोळे | उदासीन हा काळ कोठे न कंठे || ३ ||
अवस्था मनी लागली काय सांगो | गुणी गुंतला हेत कोणासि मागो ||
बहुसाल भेटावया प्राण फुटे | उदासीन हा काळ कोठे न कंठे || ४ ||
कृपाळुपणे भेट रे रामराया। वियोगे तुझ्या सर्व व्याकुळ काया।
जनामाजि लोकीक हा हीन सूटे। उदासीन हा काळ कोठे न कंठे॥ ५॥
आहा रे विधी त्वा असे काय केले। पराधेनता पाप माझे उदेले।
बहुतां मध्ये चूकता तूक तूटे उदासीन हा काळ कोठे न कंठे॥ ६॥
समर्था मनी सांडि माझी नसावी। सदा सर्वदा भक्तचिंता असावी।
घडेना तुझा योग हा प्राप्त कोठे उदासीन हा काळ कोठे न कंठे॥ ७॥
अखंडीत हे सांग सेवा घडावी। न होतां तुझी भेटि काया पडावी।
दिसेंदीस आयुष्य हे वेर्थ आटे उदासीन हा काळ कोठे न कंठे॥ ८॥
भजो काय सर्वापरी हीन देवा। करूं काय रे सर्व माझाचि ठेवा।
म्हणो काय मी कर्मरेखा न लोटे उदासीन हा काळ कोठे न कंठे॥ ९॥
म्हणे दास मी वास पाहे दयाळा। रघुनायका भक्तपाळा भुपाळा।
पहावे तुला हे जीवी आर्त मोठे उदासीन हा काळ कोठे न कंठे॥ १०॥
संत साधु हे निस्पृह, निरपेक्ष निस्वार्थी तर असतातच पण मुख्य म्हणजे आत्मज्ञानी असतात. समाजाच्या उद्धाराची तळमळ असते. त्यांच्याजवळ समाधान असते. म्हणून संत संगतीमध्ये शांती समाधान लाभते. आनंद मिळतो. समर्थनाही नाशिकला हा अनुभव निश्चितच आला असेल. समर्थ म्हणतात संताच्या संगतीने समाधान मिळते हे खरे पण त्याचा वियोग होताच दुःख प्राप्त होते. संतांच्या संगतीने त्यांची साधना उत्तम होत असेल, मनाला साधना करण्यासाठी जे धैर्य हवे ते मिळत असेल, रामरायाच्या कृपेची शाश्वती त्यांच्याकडून मिळत असेल असा समर्थाचा काळ समाधानात जात होता परंतू त्याचा वियोग होताच समर्थांना अतिशय दुःख वाटते आहे ते रामरायाला म्हणतात मी असा दुःखी कष्टी काळ कसा घालवू मला समजत नाही.
मला माझ्या घराची आठवण येते आहे आईची आठवण येते आहे. मला घरात सगळया सुखसोई उपलब्ध होत्या. घरच्यांचे प्रेम मिळत होते पण माझ्या अंतःकरणात तुझ्या भेटीची तळमळ लागली आहे ती कोण जाणून घेईल म्हणून मी अस्वस्थ होतो आज मी त्या सुखावह घरापासून लांब आहे, घरच्या आठवणीने माझा कंठ दाटून येतो आहे असा दुःखमय काळ मी कसा घालवू? हा दुःखमय काळ जाता जात नाही. मनात घरच्या आठवणी उचंबळून येत आहेत, आईची माया आठवते आहे. तिलाही माझी आठवण येत असेलच.
हे रामराया! तुझी भेट व्हावी म्हणून साधना करण्यासाठी मी सौख्यदायक घर सोडले पण त्या आठवणीने साधनेतही व्यत्यय येतो आहे. जबरदस्तीने चित्त लावण्याचा प्रयत्न केला तरी चित्त लागत नाही. चित्त एकाग्र होत नाही. साधनकाळात धैर्य लागते हे खरे आहे पण माझा धीर आता सुटत चालला आहे. तुझे दर्शन न झाल्याने डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहात आहेत. त्या थांबता थांबत नाहीत हा काळ जाता जात नाही. मी नदीचा एक किनारा तर सोडला आहे पण दुसरा किनारा अजून दृष्टीपथात येत नाही रामराया! अजून तुझे दर्शन झाले नाही. माझ्या मनाची ही अवस्था मी कोणाला कशी सांगु? तुझ्या घनश्याम, धीर, गंभीर, पराक्रमी, लावण्यरुपच्या दर्शनाची इच्छा कोणाकडे व्यक्त करु? तुला भेटण्यासाठी कितीतरी वर्षापासून माझे प्राण व्याकुळ झाले आहेत.
तुझ्या भेटीशिवाय असणारा हा दुःखदायक काळ जाता जात नाही. मी काय करु? हा काळ कसा घालवू ते समजत नाही. हे रामराया! तुझ्या कृपेशिवाय तुझे दर्शन तरी कसे होणार? म्हणून तू माझ्यावर कृपा कर. तुझा वियोग आता सहन होत नाही. तुझ्या भेटीसाठी माझे प्राण व्याकुळ झाले आहेत. हे रामराया! पण काय करु? जनामध्ये वावरतांना लौकिकाची आशा अजून सुटली नाही. लोकांनी मला चांगले म्हणावे, लोकांमध्ये मला मान मिळावा ही आशा अजून आहेच. ही अपेक्षा, आशा मला तुझ्यापासून दूर ठेवते आहे. तुझी कृपा झाल्यावर अशक्य काय आहे? पण तोपर्यंतचा हा दुःखदायक काळ मी कसा कंठू? समर्थ त्या विधात्यालाच विचारतात की माझ्या भाग्यात असे दुःख का लिहून ठेवलेस? मी परस्वाधिन झालो आहे. पराधिनता असणे हे माझ्या पापाचेच फळ आहे, जे मला या नावलौकिकाच्या जाळयात अडकवून ठेवत आहे. समाजात वावरतांना माझ्याकडून ज्या चुका होतात त्यामुळे माझे महत्व कमी होत आहे असे वाटते. हे फार दुःखदायक आहे. हे रामराया! तू माझा आव्हेर करु नकोस. मला सोडून दूर जाऊ नकोस तुला माझ्यासारख्या भक्ताची चिंता असु दे. तुला काय म्हणू मला माझे प्रारब्धच खोटे दिसते आहे ज्यामुळे तुझ्या भेटीचा योग अजून येत नाही. यामुळे मी अतिशय उदास, निराश झालो आहे. असा उदासीनतेचा काळ मी कसा सहन करु?
हे रामराया! असे असले तरी माझ्या हातून तुझी अखंड सेवा घडू दे, आणि जर भेट झाली नाही तर सेवा करता करताच ही काया पडू दे. तुझ्या भेटी शिवाय हे आयुष्य व्यर्थ आहे. आयुष्याचा क्षण क्षण आता जड जातो आहे. तेव्हा असा हा काळ मी कसा घालवू? हे रामराया! तुझे अनेक प्रकारचे भक्त आहेत ते तुझी विविध प्रकाराने भक्ती करतात पण मी तर तुझा सर्वात हीन भक्त आहे. मला तुझी भक्ती कशी करावी, हे पण समजत नाही, पण मी तरी काय करू? हे सर्व माझेच पूर्व संचित आहे (पुढे दासबोधात ‘रेखा वितुकी पुसोन जाते’ म्हणणारे समर्थच आहेत.) समर्थांची ही साधकावस्था आहे. येथे कसोटी लागते.
सर्वच साधकांना या अवस्थांतून जावे लागते. ‘करूणाष्टक’ हे समर्थांनी स्वतःसाठी लिहिले हे एक निमित्त आहे. ती एक अवस्था आहे. मन कळणे जितके अवघड तितकी ही करूणाष्टके कळणे अवघड आहे. ‘जीवनावेगळी मासोळी। तैसा तुका तुळमळी।‘ अशी समर्थांची ही अवस्था आहे. समर्थ म्हणतात, हे रामराया! हा तुझा दास म्हणवणारा मी तुझी वाट पाहात आहे. तूच माझे सर्व काही आहेस तू अतिशय दयाळू आहेस. भक्ताचे, दासाचे पालन करणारा आहेस. त्यांचे दुःख तुला बघवत नाही. तू भक्तावर कृपा करतोस. तुझ्या कृपेची मी उत्कंठेने वाट पाहात आहे. तुझ्या दर्शनाची मनात आस लागली आहे. तुझे ते सुंदर रूपडे कधी पाहीन असे झाले आहे. हा विरहाचा एकेक क्षण मोठा दुःखदायक वाटतो आहे. हे रामराया! तुझे दर्शन मला कधी होईल? असे जीवेचे आर्त या बाळनारायणाने रामराया समोर प्रगट केले आहे. अंतःकरणपूर्वक मारलेली हाक आहे. हितगुज आहे ज्यात प्रेम आहे. करुणा आहे. अंतःकरणाच्या स्थितीचा निर्वाळा आहे . समर्थांची करूणाष्टके म्हणजे परमप्रेमाचा उत्कट अविष्कार आहेत.
आ. सुनिल दादांच्या मते एका भगवंताखेरीज ज्यांना जीवनात काहीही नको असे अव्याभिचारी भक्त या करूणाष्टकांचे अधिकारी आहेत, पण ज्यांना अशी तळमळ लागलेली नाही पण रामाच्या दर्शनाची ईच्छा आहे अशा नविन साधकांना या करूणाष्टकांचे नित्य पठण नक्कीच सहाय्यभूत ठरेल व रामाविषयी प्रिती निर्माण होईल असे या करूणाष्टकांच्या शब्दांचे सामर्थ्य आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ।।
खुप छान निरूपण 🌹🙏
जय श्रीराम
माधुरीताई करुणामय शब्दात करुणाष्टकाचे विवेचन खूपच सुंदर सांगितले आहे ,अगदी मनाला भिडले.
राष्ट्राच्या कल्याणार्थ
जय जय रघुवीर समर्थ
समर्थांच्या मनातील भाव कल्लोळांचे भावपूर्ण/सुंदर विवेचन.
खुप छान निरुपण. समाजहितासाठी असा सर्वस्वाचा त्याग करणे, खरेच किती कठीण! आपण आपली एखादी आवडती निर्जीव वस्तू कोणाला दिली तरी
शंभर वेळा आठवतो. इथे तर प्रत्यक्ष जन्मदात्रीशी वियोग.
🙏🏻🙏🏻🙏🏻
नमस्कार.
आपल्या ओघवत्या विवेचना मुळे श्री समर्थांचे या करुणाष्टकातून व्यक्त झालेले मनोगत जाणणे शक्य झाले.
खूप सुंदर निरूपण
माधुरी ताई करुणाष्टकाचा अर्थ अतिशय उद्बोधक आम्हा नवीन अभ्यास करणाऱ्यांना अतिशय उद्बोधक अशा पद्धतीने विशद केला जय श्रीराम
सुरेख विवेचन…. आर्तता प्रकट झाली
मनाच्या गाभाऱ्यातून रामरायाना साधन काळात घातलेली साद हृदयाला भिडते. मनात करुणा भरून येते. नजरेसमोर प्रेमळ राम उभे ठाकतात. हात जोडले जातात.🙏