स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते समर्थ रामदास

स्त्री-स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते समर्थ रामदास
संजय पाठक
  • May 18, 2025
  • 1 min read

श्रीसमर्थ रामदासस्वामींनी अध्यात्माची उपासना तर केलीच पण त्याच बरोबरीने ज्ञानोपासना देखील केली. ज्ञानोपासनेसाठी त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी रचना केली होती. श्रीरामाच्या उपासनेबरोबरच ज्ञानाची उपासना करणारा ‘रामदासी संप्रदाय’  हा एक नवीन संप्रदाय त्यांनी स्थापन केला. त्या संप्रदायाची नियमावली रामदासांनी आखून दिली होती. तिला ‘श्रीसंप्रदायाची वीस लक्षणे’ असे म्हणतात.

ज्ञानोपासनेसाठी श्रीसमर्थांनी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली. या मठांमध्ये त्यांनी लोकशिक्षणाची व्यवस्था निर्माण केली. या व्यवस्थेमध्ये कोणताही वर्णभेद, लिंगभेद, जातीभेद नव्हता.

रामदासी संप्रदायात असंख्य तरुणांच्या बरोबरीने समाजातल्या विविध स्तरातील, विविध वर्गातील आणि विविध वर्णातील स्त्रियादेखील सहभागी झाल्या होत्या. त्या स्त्रियांमध्ये गृहस्थाश्रमी महिलांबरोबरच अनेक बालविधवा, विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांचादेखील समावेश होता.

स्त्रियांनी नेतृत्व करावे

श्रीसमर्थ  रामदासांनी आपल्या मठांमध्ये जे नियम घालून दिले होते त्यापैकी एक नियम होता, रामदासी संप्रदायातील अनुग्रहित किंवा उपासक स्त्रियांना मठातील स्वयंपाक वा स्वयंपाकाशी संबंधित कोणतीही कामे  न देण्याचा. त्यामुळे मठात स्वयंपाक करण्यापासून ते जेवण वाढण्यापर्यंतची सर्व कामे पुरुष उपासकच करत. नित्यनियमाने त्यांच्याकडून केली जाणारी स्वयंपाकादी कामे किंवा स्वच्छतेची कामे स्त्रियांना न देण्याचा आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रातील कामे करण्याचा पायंडाच श्रीसमर्थांनी आपल्या मठांमध्ये पाडला.

याशिवाय, उपासक म्हणून रामदासी मठांमध्ये आलेल्या स्त्रियांना लिहिण्या-वाचण्यासारखी बौद्धिक व दफ्तरी कामे देण्याचा नियम श्रीसमर्थांनी आखून दिला होता.  हा नियम देशभरातील आठ राज्यात शिल्लक असलेल्या २५० हून अधिक मठांमधून आजही पाळला जातो !

पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही परमार्थाचा अधिकार आहे असे श्रीसमर्थांचे मत होते. स्त्रियांनी धर्म आणि अध्यात्म या दोन्ही ठिकाणी नेतृत्व करावे अशी एक वेगळीच भूमिका श्रीसमर्थ रामदासांनी मांडली होती आणि त्यानुसार त्यांनी आचरणही केले. मठांवर मठाधिपती म्हणून श्रीसमर्थांनी स्त्रियांची नेमणूक केली. ज्या स्त्रियांना लिहिता- वाचता येत नसे त्यांना रामदासी मठामध्ये लिहायला व वाचायला शिकविले जाई. लिहिण्या-वाचण्यास आल्यानंतर त्या स्त्रियांना विविध ग्रंथांचा अभ्यास, पारायणे, जप-जाप्य -अनुष्ठाने करू दिली जात. उपासक स्त्रियांना लिहिण्या-वाचण्यास शिकवून श्रीसमर्थांनी स्त्रियांचे सबलीकरण केले !

स्त्रियांची निंदा करणाऱ्या एका वृद्धाला रामदासांनी,

“बहुता दिसांच्या वयोवृद्ध मूला| जनी बायकोच्या गुणे जन्म तूला |

तये जन्ननीच्या कुळा निंदितोसी |वृथा पुष्ट तू मानवामाजि होसी ||”

या शब्दात फटकारले आहे ! श्रीसमर्थांच्या नंतरच्या मठपतींनीही स्त्री- उपासकांच्याबाबतीत समर्थांनी घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन केले. याचं उत्तम उदाहरण म्हणजे परांडा येथील रामदासी मठाचे सातवे मठपती हंसराजस्वामी ! या हंसराजस्वामींनी विधवा असलेल्या मनाबाई रजपूत या अशिक्षित, विधवा स्त्रीला लिहिण्या- वाचण्यास तर शिकविलेच पण मनाबाईंना त्यांनी वेदांतातील मंत्रही शिकविले. त्यावर आधारित ‘ कथाकल्पलता ‘ नावाचा एक ग्रंथ मनाबाईंनी लिहिला हंसराजस्वामींनी हा ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून अनेक शिष्यांना अध्ययनासाठी दिला.

मठपती म्हणून स्त्रियांची नेमणूक

शक्तिस्तोत्रांत श्रीसमर्थ रामदास लिहितात —

रामवरदायिनी माता| दासे धुंडुन काढली|

वोळखी पाडितां  ठाई| भिन्न भेद असेचिना ||

रामदासांनी हा श्लोक नुसता लिहिला नाही तर तो अंमलातदेखील आणला!  समर्थांनी त्यांच्या संप्रदायातल्या प्रत्येक स्त्रिला तिच्या बौद्धिक  क्षमतेला शोभणारे स्थान दिले.

श्रीसमर्थ रामदासांनी एक-दोन नव्हे तर अठरा स्त्रियांना रामदासी मठांचे मठपती म्हणून नेमले. या सर्व स्त्री- मठपतींचा उल्लेख ‘ गिरिधर- बखरी ‘ मध्ये आहे.  वेणाबाई व बाईयाबाई ( मिरज मठ ), अंबिकाबाई ( राशिवडे व वाळवे ), नबाबाई ( तापीतीर, गुजरात ), मनाबाई ( राजांगणी ), सखाबाई व कृष्णाबाई ( चाफळ ), अन्नपूर्णाबाई ( टाकळी ),  सतीबाई ( महाबळेश्वर ), आपाबाई , द्वारकाबाई,  गंगाबाई, मुधाबाई, बाकुबाई,  भीमाबाई, गोदाबाई अंताबाई ( कृष्णातीर )आणि  चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई ( सज्जनगड मुख्यालय ) या  त्या अठरा स्त्री-मठपती होत.

चिमणाबाई ऊर्फ आक्काबाई या स्त्री-मठपतीचा उल्लेख सांप्रदायिक दफ्तरात ‘आक्कास्वामी’ असा आढळतो. या आक्कास्वामी लिहिण्या-वाचण्याबरोबरच दफ्तरी कामे, घोडेस्वारी, तलवारबाजी यात अतिशय निपुण होत्या. समर्थ रामदास स्वामींच्या पुण्यतिथीला ‘दासनवमी’ उत्सवाचे स्वरूप आक्कास्वामी ऊर्फ आक्काबाईंनीच दिले आहे. याच आक्काबाईंनी, भारतात सर्वदूर पसरलेल्या मठांच्या मुख्यालयाचे काम, समर्थांच्या पश्चात सुमारे ३९ वर्षे अत्यंत समर्थपणे पेलले ! देशभरातील मठपतींशी  सज्जनगडावरून संपर्क साधण्याची एक विलक्षण यंत्रणा आक्काबाईंनी निर्माण केली होती.

श्रीसमर्थांच्या संप्रदायातल्या स्त्रियांना मठपती होण्याबरोबरच उभे राहून कीर्तन करण्याचा अधिकारही होता. श्रीसमर्थांच्या काळात खरं तर स्त्रियांना आपल्याच घरात मोकळेपणी वावरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. अशा काळात समर्थांच्या शिष्या मठपती तर बनल्याच पण मठपती म्हणून मंदिरांमध्ये उभे राहून कीर्तनाद्वारे समाजाला त्या आध्यात्मिक ज्ञानही देऊ लागल्या. ही गोष्ट त्या काळात क्रांतिकारी अशीच होती. कीर्तन करणाऱ्या त्या स्त्रियांमध्ये गृहस्थाश्रमी स्त्रियांबरोबरच विधवा आणि परित्यक्ता स्त्रियादेखील होत्या. रामदासी मठात सहभागी झालेल्या या सर्व स्त्रिया समर्थांच्या आधुनिक विचारांना प्रत्यक्षात उतरविणाऱ्या ठरल्या! म्हणूनच श्रीसमर्थ रामदास स्वामींना स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असंच म्हटलं पाहिजे.

       || जय जय रघुवीर समर्थ ||

 

Language