सोलीव सुख

सोलीव सुख
डॉ. सौ. मृणालिनी कुलकर्णी
  • February 14, 2026
  • 1 min read
  1. दासबोधातील ५० ओव्यांचे हे प्रकरण म्हणजे सोलीव सुख आहे. एखादे फळ सोलल्यानंतर त्याचा गर जसा मधुर, अवीट चवीचा लागतो; परमानंद देतो तसे या सोलीव सुखातून मोक्षप्राप्तीचा आनंद मिळतो. यामध्ये नाद, ज्योती, तीव्र व सौम्य प्रकाश याचे समर्पक वर्णन आले असून त्याद्वारे आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. साधकाचे विविध ताप दूर होऊन त्यास शाश्वत सुख मिळते. तो जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटतो. ग्रंथराज दासबोधात देखील श्रीसमर्थांनी योगविषयक संकेत व्यक्त केले आहेत. सोलीवसुखामध्ये शक्ती संक्रमण योगदिक्षेचा संपूर्ण विधी आहे. श्रीसमर्थांनी योगीराज कल्याणांकरिता हा विधी सिद्ध केला आहे. 

कल्याणांनी अनन्यतेने श्रीसमर्थांना प्रार्थना केली आहे. “महाराज या भवसमुद्रामुळे पोळलेले, विषय मदाने अंध झालेले, चौऱ्यांशी लक्ष योनीत फिरून फिरून कंटाळलेले अशांना आपण मूर्तिमंत ज्ञानसूर्य, आम्हांला ज्ञान द्या.” श्रीसमर्थाना त्यांची दया आली, त्यांनी प्रेमाने शिष्याला आलिंगन दिले, कानात दिव्य रसायन म्हणजे ओंकाराचे शब्द फुंकले. ते डोळ्यावाटे म्हणजे अंतःचक्षूने त्याच्या शरीरात उतरले. शिष्याचा आत्मज्ञानाचा-शक्ती संक्रमणाचा प्रवास सुरु झाला. त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ या चक्रांचा निरास झाला. इडा, पिंगला, सुषुम्ना आत्मसुखात विरून गेल्या. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण चारही देह विरून गेले. इंद्रियांनी आपले विषय भोगण्याची वृत्ती सोडून दिली.

शिष्याला घंटानाद, किंकीणीनाद, अनाहत नाद इ. नादांचा कल्लोळ ऐकू येतो. इथे श्रीसमर्थ कल्याणांना इशारा देतात की नाद, ध्वनी, प्रकाश दिसले तरी घाबरु नको, पुढे जा. तुझी समाधी ढळू देऊ नको. अशा प्रकारे षटचक्र भेदन, पंचमहाभूतांचे अस्तित्व, प्रकाश, नाद यांचा लय झाला की, शिष्याला ब्रह्मरंध्रातून सतत प्रकाशकिरणे कारंज्याप्रमाणे उसळून त्याची प्रभा जमिनीवर पडल्याचा अनुभव येतो. सद्गुरू प्रसादाने शिष्याला सर्वत्र ब्रह्म भरल्याची अनुभूती येते. ही अनुभूती श्रीसमर्थांनी कल्याणांना दिलेली आहे.

सद्गुरूकृपेने शिष्याची पूर्ण तयारी झाल्यानंतर घडणारे शक्तीसंक्रमण, योगातील षटचक्रांचा विचार केला असता असे लक्षात येते की; कंठ ते भ्रुकुटी मध्य या मार्गाला पूर्व म्हणजे पुढचा मार्ग म्हणतात. सद्गुरुकृपा झाली की, हे सहज साध्य होते. या मार्गामध्ये १) त्रिकुट (मुख) २) श्रीहाट (रसना) ३) गोल्हाट (चक्षू) ४) औटपीठ (भ्रूमध्य) ५) भ्रमरगुंफा (श्रोत्र) ६) ब्रह्मरंध्र ( सहस्त्रदल) ही षटचक्रे आहेत. त्यांच्यामुळे आत्मज्ञान प्राप्त होते. हे जर साध्य झाले नाही, तर योगी हा मार्ग बदलून मागच्या मार्गाने जातो. या मागच्या मार्गाला पश्चिम मार्ग म्हणतात. तो थेट आज्ञाचक्रावर पोहोचतो. या मार्गातील षटचक्रे – मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार ही होत. 

परब्रह्माची सृजनशक्ती म्हणजे माया. या मायेत  सुप्तरूपात सत्त्व, रज, तम हे तीन गुण असतात. हे तीन गुण जेव्हा व्यक्त दशेत येतात तेव्हा त्या मायेला गुणक्षोभिनी असे म्हणतात. मनुष्याच्या पाठीच्या कण्यात इडा – पिंगला – सुषुम्ना या तीन नाड्या असतात. वास्तविक सुषुम्ना ही मार्गिका आहे. सूक्ष्म वाट आहे. हठयोगात प्राणशक्ती या मार्गाने वर जाते. आपल्या शरीरात ७२ हजार नाड्यांचे जाळे आहे. कुंडलिनी शक्ती ज्या विशिष्ठ मार्गाने नाभिकमलापासून वर सहस्त्रार चक्रापर्यंत जाते ती सुषुम्ना नाडी होय. कुंडलिनी शक्ती जागी झाली की त्रिकुट प्रदेशातील मुलाधार चक्र, श्रीहाट मधील बुद्धी/प्रज्ञा प्रदेश आणि स्वाधिष्ठान चक्राच्या अधोभागातील मार्ग भेदून उर्ध्वगामी होते. तिथून ती अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञाचक्र यांचाही भेद करून सहस्त्रार चक्रातील ब्रह्मात विलीन होते. म्हणून श्रीसमर्थ इथे त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ हे सगळे बुडाले. इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांचे तटसुद्धा आत्मसुखात विरले असे म्हणतात.

श्रीसमर्थानी सोलीव सुखाच्या ३३ व्या ओवीत त्रिकुट, श्रीहाट, गोल्हाट, औटपीठ या चक्रांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे. त्रिकुट म्हणजे सत्व, रज, तम या तीन गुणांच्या पलिकडे जाऊन, त्रिविध तापांच्या म्हणजे आधिभौतिक, आधिदैवीक, अध्यात्मिक तापांच्या पलिकडे जाऊन, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलिकडे जाऊन शिष्य पुढे जातो.

श्रीहाट – श्री म्हणजे वैभव, लक्ष्मी, पवित्रता आणि हाट म्हणजे बाजार किंवा बाजाराची जागा. श्रीहाट म्हणजे योग्याच्या देहातील, बाजारातील माल किंवा देहाची पवित्र जागा. 

गोल्हाट – यातील गो म्हणजे इंद्रिये. छातीच्या आतील पोकळीत जो प्राण आहे त्यातील ज्ञानवृत्तीला या दिव्यचक्षू इंद्रियावाचून स्वतःच्या स्वरुपाचा यथार्थ बोध होत नाही. त्या प्राणवायू रहाण्याच्या ठिकाणाला गोल्हाट म्हणतात. 

औटपीठ – एक घटका म्हणजे २४ मिनीटे औट घटका म्हणजे साडेतीन घटका म्हणजे ८४ मिनीटे. औटपीठ म्हणजे साडेतीन हातांचा नाशिवंत देह. स्वस्वरूपाच्या दर्शनासाठी देहबुद्धीचा त्याग करून देहभाव मागे टाकला की कुंडलिनी शक्ती वर जाते.

सोलीवसुखामध्ये योगमार्गात येणाऱ्या ध्वनींचा उल्लेख आहे. किंकीणी, चिंचिणी, घंटानाद, वीणारव, भ्रमराचा गुंजारव अशा विविध मंजुळ ध्वनींचा आवाज येतो. अनाहत नादाचाही उल्लेख आहे. अनाहत नाद म्हणजे जो कोणत्याही आघाताने निर्माण झालेला नाही असा स्वयंभू नाद. हे नाद अनाहत चक्रात ऐकू येतात. हृदयाच्या मागे याचे स्थान आहे. याचा ताबा फुप्फुस व हृदयावर असतो. या चक्राच्या ठिकाणी मनाचे वास्तव्य मानले जाते. प्राण आणि मन यांचे इथे ऐक्य होते. कुंडलिनी इथपर्यंत आली की मग कानात विविध मंजुळ ध्वनी ऐकू येतात. 

योगमार्गात येणाऱ्या प्रकाशतत्त्वाच्या अभिव्यक्तीचे वर्णनही श्रीसमर्थांनी केले आहे. या प्रवासात नाना सूर्यांची तेजोरूपे, त्यातून निघणाऱ्या तेजाच्या; अग्नीच्या ज्वाळा पाहून शिष्य घाबरून जाईल म्हणून या गोष्टींना न घाबरता पुढे कसे जायचे याचे मार्गदर्शन श्रीसमर्थांनी अगोदरच केले. शीतली प्राणायामाचे द्वारे, मुखाद्वारे बाहेरील वायू आत मुखामधून सहस्त्रधारात वर न्यायला सांगितला, त्यामुळे प्रखर उग्र तेज आपोआप सौम्य झाले. या प्रक्रियेत शिष्याचे धैर्य, चिकाटी, सावधानता, सूक्ष्मता, गुरुवचनी दृढ श्रध्दा हे गुण प्रगट झाले. पुढे सातत्याने देहातील, मुख्यतः सहस्त्रधारातील तेजोलहरी उर्ध्वगतीने पण संथपणे वाहू लागल्या. त्या शिष्याला नियंत्रित करता आल्या. हालचाली इच्छेप्रमाणे घडू लागल्या. यांचे लक्ष्य आत्मा असल्याने त्याचे दर्शन होणार या आत्मविश्वासाने, विहंगम मार्गाने वाटचाल सुरू झाली. ती होताच देहातील उष्णता, दाह कमी झाला. शरीर सुखद वाटू लागले‌ व चिदाकाशात प्रत्यक्ष चंद्रदर्शन घडले. हेच ते आत्मदर्शन. यात देह व भोवतालची भूमी चंद्रप्रकाशात  न्हाहून निघाली. त्या प्रकाशाने सर्वकाही व्यापून टाकले. हेच ते ब्रह्मरूप त्याला प्राप्त झाले. आत्मसुखाने अभिनव शांती लाभली. शिष्याने शक्ती संक्रमण योगाने आत्मसुख मिळवले. त्याने या प्रवासात असे अनुभवले की, नाभी कमलापासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा किंवा मुलाधारापासून सहस्त्रार चक्रापर्यंतचा सर्व मार्गच आत्मप्रकाशाने व्यापला आहे.

मानवी देहामध्ये आत्मीय चैतन्याचा स्रोत गुप्तरूपाने असतो. तो ॐ कार अर्धमात्रेच्या दिव्य अभिव्यक्तीने प्रगट होतो. त्याने शरीर नखशिखांत व्यापले जाते. त्यामुळे ज्ञानशक्ती जागृत होते. श्रीसमर्थ कृपेने साधकाला समाधी अवस्थेचा लाभ होतो, आणि साधक सातत्याने आपल्या शांत सच्चिदानंद स्वरूपात निमग्न होतो. त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यातून कायमची सुटका होते. हेच ‘सोलीव सुखाचे’ सार आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Language