सोहं या शब्दात आत्मा आणि परमात्मा यांचा समन्वय आहे. त्याचबरोबर शरीर आणि प्राण यांचाही समन्वय आहे. सोहं साधना जेवढी सरळ आणि बंधनरहित आहे तेवढीच ती महत्त्वपूर्ण आहे. सोहं साधनेला सर्व साधनांमध्ये अत्युच्च असे स्थान आहे, कारण त्या साधनेसोबत जो संकल्प जोडलेला असतो; तो देहातील चेतनेला उच्चस्तरावर नेण्यासाठी आणि जीव आणि ब्रह्म यांना एकरूप करण्यासाठी महत्त्वाचा असतो. सोहं हा एक भाव आहे, एक संवेदना आहे; ती इतर कोणत्याही साधनेमध्ये नाही. या सोहं साधनेला इतर साधनेच्या तुलनेत किंवा इतर साधनेच्या पंक्तीमध्ये समाविष्ट न करता स्वतंत्र असे स्थान आहे. या साधनेला हंसयोग असेही म्हणतात.
सर्व संत मंडळी सोहं या सहजावस्थेतच असतात. संतांच्या सांगण्यानुसार, केलेल्या अभ्यासाने दिव्य प्रकाश दर्शन तसेच अनाहत नादाचे श्रवण घडते. लय योगात नादानुसंधान श्रेष्ठ मानले आहे आणि नामस्मरणानेही हेच साधले जाते.
श्रीएकनाथ महाराज भागवतात म्हणतात,
“प्राणाचे गमनागमन । तेथे सोहं हंसाचे नित्य ध्यान ।
तेंचिं करिता सावधान हे । हेचिं पूजन वायूचें ।”
किंवा
“हे पावावया माझे स्थान । अति गुह्य आहे अनुष्ठान ।
सोहं हंसाचे साधन । सावधान जो साधी ।।
प्राणाचेनि गमना गमनें । सोहं हंसाचेनि स्मरणे ।
सावधाने जो साधू जाणे । तेणे पावणे हें स्थान ।।”
श्रीज्ञानेश्वर माऊली एका अभंगात म्हणतात,
“उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐक रे बीज । अनुहत टाळी वाजविते ।
सोहं सोहं हाचि नित्य छंद धरी । सुखी निद्रा करी अद्वैती रे ।।”
श्रीनामदेव महाराज म्हणतात,
“जप करी ऐसा अखंड खंडेना । निशी दिनी मना होय जागा ।
नामा म्हणे मना होई रामरूप । अखंडित जप सोहं ।”
श्रीजनाबाई म्हणतात,
“चारी वाचा कुंठीत जाहली सोहं ज्योती उभारली ।
अनुहत घंटा श्रवणी ऐकुनी विस्मित झाली जनी ।।”
श्रीगोंदवलेकर महाराज अभंगात म्हणतात,
“नका करू काही आस । राम जपा श्वासोश्वास ।।
नाम श्वासोस्वासी वसे । तेथे ब्रह्म उभे असे ।।
ब्रह्मा विष्णू महेश । नामी लक्ष्य श्वासोश्वास ।।”
श्रीसमर्थ रामदास स्वामी सांगतात,
“ते शब्द सांडून बैसला । तो मौनी म्हणावा भला । योगाभ्यासाचा गल्बला । याकारणें ।।
येकांतीं मौन्य धरून बैसला । तेथें कोण शब्द जाला । सोहं ऐसा भासला । अंतर्यामीं ।।”
शब्द म्हणजे, सोहं शब्द सांडून कसे बसावे ? तर आपल्याला जे सोहं शब्द उठलेले कळतात, ऐकू येतात, ते ज्याला कळतात तोच साक्षीरूप चैतन्य राम. त्या चैतन्याकडे आपली वृत्ती एकाग्र करणे व त्याच्याशी एकरूप होऊन रहाणे याचेच नाव शब्द सांडूनि बसणे.
थोडक्यात नामसाधनेत देखील नाम जेव्हा परावाणीत पोहोचते तेव्हा नामामुळे वासनेचा क्षय होतो. नाम घेताना अशी एक अवस्था येते की फक्त नामच शिल्लक रहाते. नाम घेणारा नामामध्ये विलीन होऊन जातो. सोहं मध्ये देखील श्वासाकडे लक्ष असताना असा एक क्षण येतो की, साधक ब्रह्ममय होऊन जातो आणि त्यामुळे सोहं ऐकायला तो शिल्लक रहात नाही. यालाच समर्थ ‘ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला‘ असे म्हणतात. म्हणजे नामसाधना आणि सोहंचा जप यांचा अंतिम परिणाम हा एकच आहे. सोहंचा जप सहज विनासायास आपल्या श्वास आणि उच्छ्वासाद्वारे आपोआप होत असतो. ही संख्या चोवीस तासात २१ हजार ६०० इतकी होते. समर्थ म्हणतात,
“येकवीस सहश्र सासें जपा । नेमून गेली ते अजपा ।
विचार पाहातां सोपा । सकळ कांहीं ।।”
दिवसाच्या चोवीस तासात आपले २१ हजार ६०० श्वासोच्छ्वास होतात, हीच अजपा जपाची संख्या होय. स्वरांचे जन्मस्थान, नाभी आणि हृदय यामध्ये आहे. शांतपणे बसावे व लक्ष द्यावे म्हणजे सूक्ष्म असा सोहं नाद ऐकू येतो. उच्चारेविण शब्द असतो. सोहंला ध्वनी नाही, म्हणून तो सहज शब्द होय. श्वास घेताना सो आणि सोडताना हं असा सोहं मंत्र अजपात चालतो. साधना करताना नाभीकडे लक्ष दिल्यास वृत्ती शांत होण्यास मदत होते. सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये श्वासाच्या नियमनाला खूप महत्त्व आहे. नामजप आणि अजपाजप या दोन्हीमुळे श्वासाचे आपोआप नियमन होते. श्वास जितका संथ आणि सूक्ष्म असेल तितकी वासना आणि विकार कमी होतात. अंत:करणात विकार बळावला की, श्वासाची गती वाढते. चिडल्यानंतर, घाबरल्यावर, किंवा वासनेचा आवेग आल्यावर श्वास जोरात सुरू होतो. अजपामुळे श्वास संथ होतो आणि विकारांचे विनासायास नियमन होते. अशा प्रकारे सोहंच्या अनुसंधानाने साधकास परमोच्च आनंद मिळून शेवटी त्यास मोक्षप्राप्ती होते.
सोहं साधनेस सहज साधनाही म्हणतात, कारण त्यास कोणतेही कृत्रिम आलंबन लागत नाही. कृत्रिम आलंबनापेक्षा सहज साधना समर्थांना जास्त प्रिय होती. सहज साधनेत, बहिरंग साधनेच्या कटकटी नाहीत; कारण ती अंतरंग साधना आहे. अशी साधना समर्थांची होती आणि वेण्णास्वामींची पण होती. अजपामध्ये स: शिल्लक रहावा आणि अहं विसर्जित व्हावा असे अपेक्षित आहे. त्यालाच वेण्णास्वामी ‘अहं गेले ब्रह्म ठेले‘ असे म्हणतात. अहं चे म्हणजे मी चे, स: मध्ये; म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी विलीनीकरण होण्यासाठी साधकाने स्वस्वरूपाचे स्वरूप नीट समजावून घ्यायला हवे. दासबोधातील ब्रह्मनिरूपणाचे समास, वेगवेगळी उपनिषदे ,शंकराचार्यांचे आत्मषट्क किंवा वेदांत प्रकरणे यांच्या सखोल अभ्यासाने ब्रह्म म्हणजे काय किंवा ब्रह्माची धारणा तयार होईल. ते ब्रह्म मीच आहे असा भाव जसजसा दृढ होईल, तसतसा साधक ब्रह्ममय होऊन जाईल. सोहं साधनेला सहजता येण्यापूर्वी काही काळ प्रयत्नपूर्वक सोहं भाव अंगी बाणवायला हवा. प्रयत्नाने सोहं बोध स्थिर झाला की, आपोआप मन ब्रह्मात लय पावेल. समर्थांच्या मते सोहं ही संपत्ती असून प्रत्येक साधकाचा त्याच्यावर जन्मसिद्ध हक्क आहे. इतर साधनांची खटपट करण्यापेक्षा ही सहजसाधना सोपी आहे व प्रयत्नाने आत्मसात करता येते. नामस्मरण करताना, ज्या भगवंताचे नाम आपण घेतो, तो भगवंतच माझे खरे स्वरूप आहे असा भाव, असा बोध किंवा अशी धारणा, विश्वास अंत:करणात दृढ झाल्यास नामसाधनेचे अजपात रूपांतर होते.
पावसचे स्वरूपानंद स्वामी म्हणजे सोहं बोधाद्वारे साक्षात्कार झालेले अलीकडच्या काळातील महान सत्पुरुष होत. गोरक्ष संहितेनुसार, जीव; हकार या ध्वनीमार्फत बाहेर येतो आणि सकार या मार्फत आत घेतला जातो. म्हणजेच “हंकारेण बहिर्यती । संकारेण विशेत्पुन्न ।” याचा अर्थ असा की, हं या अक्षराच्या मानसिक जपाने उष्णता उत्पन्न होऊन त्याचा परिणाम कुंडलिनीवर घडतो व स: या अक्षराच्या जपाचा परिणाम इच्छाशक्तीवर होतो. हं च्या जपाने कुंडलिनी जागृत होते आणि स: चा जप कुंडलिनीला सहस्त्रदलाकडे वर चढवतो. त्यायोगे आपण शक्तिमान झालो आहोत असे साधकास वाटते. जीव शिव एक झाले आहेत असे साधकास वाटून त्या साधकाची पूर्ण एकाग्रता होते आणि तेथे तो अत्यंत सुखाचा उपभोग घेतो. अशाप्रकारे जीव सतत हंस सोहं असा जप करत असतो, म्हणजेच जीवाचा दिवस रात्र मिळून २१ हजार ६०० वेळा हा जप आपोआप होत असतो.
क्रमशः
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
ताई, खुप सुंदर सोहं साधनाचे स्वरूप स्पष्ट केले.
जय जय रघुवीर समर्थ
Khup chan
खूपच छान. जय जय रघुवीर समर्थ
सुंदर लेख… जय जय रघुवीर समर्थ
सोंह साधना अती गुढ आहे व ती सर्वाना घडणे शक्य नाही असाच अध्यात्मात समज आहे. या निरूपनाने तो सहज खोडला जातो. सोह साधना नाम जप करणारा साधक सहज करू शकतो. हे अनेक संताच्या वचनाने छान समजविले
👏🏼🌹👏🏼
खूप छान सोहम साधना समजावून सांगितली आहे!
सोहं साधना… फार सोप्या भाषेत विवेचन!
गुह्य साधना सोपी करून सांगितली…सुरेख
👌👌👌छान स्पष्टीकरण
अप्रतिम माहिती मिळाली.
सोहम साधना खूप सुंदर समजावून सांगितली
जय जय रघुवीर समर्थ
खुप छान स्पष्टीकरण, अपर्णा ताई..
अवघड वाटणारे साधन सोपे करून सांगितले
अनेक संतांचे दाखले देऊन ‘सोहम् साधना ‘ सोपी करून सांगितली आहे. 👌🙏