“धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ।
जो जो कीजे परमार्थ लाहो । तो तो पावे सिद्धीतें ।।”
संसाराचा भवसागर तरून जायचा म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुध्दी हा प्रवास करायचा आहे. मोक्षप्राप्तीसाठी जी काही साधने आपल्या साधूसंतांनी सांगितलेली आहेत त्यामध्ये भक्तिमार्ग सर्वात सुलभ साधन आहे. सर्वांना आचरता येणारा असा भक्तिमार्ग आहे. यात सामुग्रीचे अवडंबर नाही, कर्मकांडाचे स्तोम नाही. घरदार सोडून अरण्यात जाण्याची गरज नाही. प्रपंचात राहूनही परमेश्वराकडे जाण्याचा हा मार्ग आहे.
‘भक्ती’ म्हणजे भगवंतावर केलेलं प्रेम. अशी भक्तीची सोपी व्याख्या नारदांनी भक्तिसूत्रांमधून केलेली आहे. ते म्हणतात, ‘सा त्वस्मिन परमप्रेमरूपा’ म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी नितांत प्रेम म्हणजे भक्ती होय. ‘अमृतस्वरूपा च’ हे एक महत्त्वाचं लक्षण होय. अमृत, रसमय आणि अमरत्व प्राप्त करणारं आहे म्हणून ही उपमा दिली आहे. शाश्वत आनंद प्राप्त करून देणाऱ्या या भक्तीचं वर्णन श्रीसमर्थांनी दासबोधातील चौथ्या दशकात नवविधा भक्तिच्या सहाय्याने अतिशय सोप्या, सरळ आणि नेटक्या शब्दात केलं आहे. या नऊ भक्तींमध्ये अर्चन भक्ती ही पाचवी भक्ती आहे. आपल्या उपास्य देवतेची पूजा करणे याचं नाव अर्चन ! शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजा म्हणजे सगुण पूजा होय. यात आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, उत्तम वस्त्रे, यज्ञोपवीत, गंध, अक्षता, फुले, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, साष्टांग नमस्कार आणि मंत्रपुष्प हे उपचार येतात. पण हे नाही जमलं तर मानस पूजा करावी असं श्रीसमर्थ सांगतात.
“ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी ।
मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ।। ४-५-३१ ।।”
ही पूजा केव्हाही, कुठेही करता येते. अगदी प्रवासात सुद्धा. मानसपूजा इतकी महत्वाची आहे हे जाणून श्रीसमर्थानी ‘मानसपूजा’ या विषयावर स्वतंत्र काव्यरचना केली आहे. श्रीसमर्थांची जी ओवीबद्ध अकरा लघुकाव्ये आहेत, त्यातील ‘मानसपूजा’ हे एक लघुकाव्य आहे. याचे तेरा समास आहेत. प्रत्येक समासात अकरा ओव्या आहेत. या काव्यात मानसपूजेविषयी श्रीसमर्थ म्हणतात, ‘कोणाच्या मनात कधीही न आलेली आणि न येणारी, भव्य, दिव्य व व्यापक अशी ही मानसपूजा आहे.
प्रत्येक काम हे भगवंताचे आहे. ‘आहे तितुके देवाचे’ असताना त्यालाच अर्पण करताना कशाला कंजुषी? त्याचेच सारे त्याला अर्पण करायचे, तर मग ताम्हणात किंवा काचेच्या चौकटीत बसवून पूजा करायची नाही; तर एखाद्या सिंहासनाधिष्ठीत राजाचे वैभव जसे असावे त्याहून शतपट वैभवशाली अशा ब्रह्मांडनायकाची ही पूजा त्याच वैभवात केली पाहिजे. रत्नजडित सिंहासन, छत्र, चामर अशी ही पूजा या काव्यात मनाने कल्पून केली आहे. श्रीसमर्थांच्या काळी चाफळला अशी पूजा नक्कीच होत असणार, कारण यातील पहिल्या समासातील स्थळाचं वर्णन चाफळचं असावं असं वाटतं.
मानसपूजा म्हणजे, आपलं आराध्य दैवत किंवा सद्गुरू यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणून तिची षोडशोपचारे पूजा कल्पनेनेच करणे, म्हणजेच सूक्ष्म अर्चन. या मानसपूजेला परमार्थात फार महत्त्व आहे. सद्वस्तू सूक्ष्म आहे, म्हणून तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी मन सूक्ष्म करणे जरूरीचं आहे. मन उन्मन व्हावं यासाठी मानसपूजा हा उत्तम, श्रेष्ठ मार्ग आहे. मनाला उन्मन करण्याची पहिली पायरी म्हणजे मानसपूजा. मन उन्मन होणे म्हणजेच मन दृश्यातून बाहेर पडून, मुक्त होऊन, परमश्रेष्ठ ब्रह्मामध्ये विलीन होणे, अशा मानसपूजेचा रोज सराव ठेवला तर मनाला स्थूलाकडून सूक्ष्माकडे म्हणजेच सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्यास अडचण पडत नाही. असं सूक्ष्मात विहार करण्याने मन अमूर्तात रमू लागते आणि परमेश्वर अंतर्यामी आहे ही भावना दृढ होते.
श्रीसमर्थांनी ‘मानसपूजा’ या लघुकाव्यामध्ये जी पूजा सांगितली आहे, ती ब्रह्मांडनायकाची म्हणजेच ब्रह्मांडात भरून रहाणाऱ्या परमात्म स्वरूपाची आहे. आपल्या अंतरंगामध्ये वसणारा परमेश्वर किंवा सद्गुरु हे त्या निर्गुण निराकार परमात्म्याचेच सगुण रूप आहे. श्रीसमर्थानी त्याला “वैकुंठराजा” हे नाव दिले आहे. या वैकुंठराजाची म्हणजेच भगवान विष्णूची मानसपूजा करावी, असं सांगितलं आहे. मात्र समास ८ मध्ये (देवार्चन) श्रीसमर्थांनी त्यांच्या आराध्यदैवताची/आपल्या सद्गुरूंची, श्रीरामांची मानसपूजा सांगितली आहे. अर्थात, त्यांचे आराध्य; प्रभूश्रीराम म्हणजे श्रीसमर्थांच्या अनन्य निष्ठेचा विषय असल्याने श्रीरामांची पूजा केल्याशिवाय त्यांना चैन कसे पडेल ? प्रभूश्रीराम हे अवतारी देव. त्यांच्या सगुणरूप पूजेमुळे आपल्या अंतरातील अंतरात्मा प्रगट होतो. हा अंतरात्मा जागा करणे हेच सगुणपूजेचे महत्त्वाचे कार्य. हीच भक्तीची उत्कट अवस्था, एकरूपता होय. या अंतर्देवालाच श्रीसमर्थ “थोरला देव” असेही म्हणतात. हा थोरला देव सर्व विश्वात भरून राहिला आहे. हाच वैकुंठराजा, हाच चराचर सृष्टीचा निर्माता, हाच सत् म्हणजेच परब्रह्म, आणि त्यासाठी या देवाची मानसपूजा महत्त्वाची आहे.
मानसपूजा म्हणजे परमात्म्यापर्यंत पोहचण्यासाठी जी साधना केली जाते त्यातील एक भाग आहे. हे प्रत्येकाने आपापल्या अधिकारानुसार समजून घेणे आवश्यक आहे. सगुणाकडून निर्गुणापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा नाही म्हणूनच श्रीसमर्थ शेवटच्या समासात सांगतात,
“ऐसी मानसपूजा करावी । मूर्ति अंतरीं धरावी ।
दास म्हणे विवरावी । उपासना ।। १३-१३ ।।”
आपल्या अंतरंगामध्ये सद्गुरूंची किंवा आराध्याची मूर्ती स्थापन करणे हे मानसपूजेचे साध्य आहे. त्यासाठी उपासना आवश्यक आहे. अंतःकरण पवित्र असल्याशिवाय तेथे परमात्मा विराजमान होणार नाही, त्यासाठी चित्तशुद्धी आणि वैराग्य आवश्यक आहेत. चित्तशुद्धीसाठी निष्काम कर्माचरण आणि नित्यानित्यवस्तू विवेक पाहिजे, वैराग्यासाठी सत्संग; सद्गुरूंचे भजन; स्मरण पाहिजे. परमार्थ हा मनाचा विषय आहे. म्हणून मानसपूजा साधली की आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. मानसपूजा काल्पनिक असते. म्हणून कल्पना भव्यदिव्य ऐश्वर्य संपन्न असावी. म्हणजे..
“मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें ।
मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ।। ४-६-३२ ।।”
देवाला वैभवात बसवावे याच उद्देशाने श्रीसमर्थांनी मानसपूजेच्या तेराही समासात वैभवसंपन्नतेचे वर्णन केले आहे. मात्र कुठेही गडबड, गोंधळ नाही तर उत्कृष्ट व्यवस्थापन कसे असावे याचे सुंदर चित्र मानसपूजेच्या समासांमधून आपल्यापुढे उभे केले आहे.
“जें जें आपणास पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे।
येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ।। ४-६-३३ ।।”
आपण ही प्रयत्न करूया आणि मानसपूजेच्या माध्यमातून भगवंताला सगळं समर्पण करूया.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।