श्रीसमर्थांनी स्वतः राजकारण केले नसले तरीही राजनीतीच्या स्पष्ट कल्पना व त्यावर सखोल मार्गदर्शन त्यांनी २० ओव्यांच्या राजधर्म प्रासंगिक अभंगातून केले आहे.
“नमो मंगळमूर्ति विघ्नहरू | सरस्वतीस नमस्कारू |
सद्गुरू संत कुलेश्वरू | दाशरथी || १ ||”
या काव्याची सुरुवात मंगलाचरणाने केली असून मंगलमूर्ति श्रीगजाननास वंदन केले आहे. श्रीगणेश हे ईश्वराच्या निश्चळ अंगाचे स्वरूप होय. संत साहित्यात श्रीगणपती म्हणजे विश्वव्यापी शुद्ध जाणीव. माणसाच्या मनात अर्थ समजण्याची पात्रता श्रीगणपतीच्या अधिष्ठानामुळे येते. ज्ञानाचे आकलन होण्यासाठी श्रीगणेश कृपा हवीच. श्रीगणेश बुद्धीदाता आहे. अज्ञान नाहीसे करून मनातील भ्रम घालवून सिद्धीचे फळ देतो. श्रीगणेश विघ्नहर्ता आहे. तेंव्हा हाती घेतलेल्या कार्यात अडचण किंवा विघ्न येऊन ते अर्धवट राहते. कार्य खंड न पडता पूर्णत्वास जाण्यासाठी श्रीगणेशास वंदन केले आहे.
त्यानंतर माता श्रीसरस्वतीदेवीस वंदन केले आहे. श्रीसरस्वती ही ईश्वराच्या चंचळ अंगाचे स्वरूप होय. ही वेदांची आई, ब्रह्मदेवांची कन्या व वाणीची स्वामिनी आहे. आपल्याला समजलेल्या अर्थाला शब्दरूप देण्याची शक्ति श्रीशारदादेवी मुळेच प्राप्त होते. त्यामुळेच जगातील सर्व कर्तृत्व श्रीशारदादेवीच्या कृपेने चालते. श्रीसरस्वतीदेवी मुळे वेद, शास्त्र, पुराणे इत्यादींना मोठेपणा प्राप्त झाला आहे. यासाठी श्रीसरस्वतीला वंदन केले आहे.
त्यानंतर सद्गुरूंना वंदन केले आहे. सद्गुरू हे ईश्वराचे अनंत परमात्मस्वरूप होय. सद्गुरुंचे शब्दात वर्णन करणे कठिण आहे. सद्गुरू कृपा प्रसादानेच भगवंताचे दर्शन घडू शकते. आत्मानुभूती प्राप्त होते. साक्षात्काराचा अनुभव सद्गुरू कृपेनेच मिळतो. यामुळे श्रीसमर्थांनी सद्गुरूंना वंदन केले आहे.
यानंतर श्रीसमर्थांनी संताना वंदन केले आहे. संत आत्मस्वरूप असतात. संत संगत माणूस जन्माचे सार्थक करून देते. त्रैलोक्यात शोधले तरीही सापडणार नाही असे अलौकिक दान संत देतात. त्यामुळे श्रीसमर्थांनी संतांना वंदन केले आहे. आणि श्रीसमर्थांच्या कुळाचा ईश्वर कुळेश्वर दाशरथी श्रीरामाला वंदन केले आहे. कारण सर्व कार्याचा सिद्धीदाता तोच आहे. अशा रीतीने श्रीसमर्थांनी प्रथम चरणात श्रीगणेश, श्रीसरस्वती, श्रीसद्गुरू, श्रीसंत आणि कुळेश्वर दाशरथी श्रीरामाला वंदन करून राजधर्म यास आरंभ केला आहे.
“श्रोती मानेल तरी घ्यावे | अथवा वाचुनि सांडावे |
प्रपंचाकारणे स्वभावे | बोलिलो मी || २ ||”
श्रीसमर्थ राजाचा धर्म, नेत्याचा धर्म, कर्त्या पुरुषाचा धर्म अर्थात त्यांचे आचरण कसे असावे ते सांगत आहेत. पण हे आचरण कसे असावे हे सांगताना, त्यांचे हे मत स्वीकारण्याची जबरदस्ती श्रीसमर्थ करीत नाहीत. “प्रपंच्याकारणे स्वभावे | बोलिलो मी ||” चांगले व्हावे म्हणून ते मार्गदर्शन करीत आहेत. तरीही ते मार्गदर्शन योग्य वाटले तर स्वीकारावे. मुलगा विचारो अथवा न विचारो, आई- वडिलांच्या अंत:करणात मुलाच्या हिताबद्दल अंतरीक तळमळ असल्यामुळे मायेपोटी ते सांगत असतात. तीच माया श्रीसमर्थांच्या मनात आहे. कर्त्या नेत्याचे कल्याण व्हावे हा त्यांचा हेतू आहे. म्हणून त्यांचे म्हणणे ऐकाच असा आग्रह न धरता ते म्हणतात “श्रोती मानेल तरी घ्यावे”. पटले तर स्वीकारावे आणि नाही पटले तर “दाटुनी सांडावे”, सोडून द्यावे; अशी विनंतीही श्रीसमर्थ करीत आहेत. भांड्यात पाणी काठोकाठ भरलेले असेल, त्यात जागा नसेल तर वरून टाकलेले पाणी खाली सांडून वायाच जाणार. तसेच मनात ऐकण्याचा, शिकण्याचा, समजून घेण्याचा भाव नसेल, गर्वाने – अभिमानाने मन भरलेले असेल, तर त्यात बोधामृत मावणार नाही, तर ते सांडणार हे निश्चित. श्रीसमर्थांचा अधिकार खरे तर खूप मोठा आहे. म्हणून “प्रपंच्याकारणे स्वभावे | बोलिलो मी ||” असे मायेचे बोलणे श्रीसमर्थ बोलत आहेत.
“सावधपणे प्रपंच केला | तेणें सुखचि पावला |
दीर्घ प्रेत्ने मोडला | कार्यभाग सांधे || ३ ||”
श्रीसमर्थ आता लोकसंग्राहकाला, नेत्याला, राजाला, प्रमुखाला राजधर्माचे; नेतेपणाचे वर्म सांगत आहेत. प्रपंच, मग तो आपल्या वैयक्तिक कुटुंबाचा असो किंवा देशाचा; तो नेहमीच सावधपणे आणि जागरूकतेने केला पाहिजे. कुटुंबप्रमुख म्हणून कुटुंबाचा तर राजा म्हणून देशाचा. दोन्ही कर्तव्ये सारखीच महत्त्वाची आहेत. त्यांचा तो स्वधर्म होय. हा प्रपंच कारभार अत्यंत काळजीपूर्वक, दक्षतेने सर्वांच्या हिताचा विचार करून केला पाहिजे. सर्वांस समान वागणूक द्यावयास हवी. कमीजास्त असा दुजा भाव नको. अनावधानानेही भेदभाव होऊ न देता, मनात समता ठेवून सतत जागरूक वागावयास हवे. तरच सर्वाना सुख लाभेल. स्वधर्माचे, स्वतःच्या कर्तव्याचे पालन करताना, प्रपंचाचा खर्चाचा हिशोब मांडताना, आईवडील; मुले; स्वतःचा जोडीदार; भागीदार; अत्यंत जवळचे नातलग; सहकारी; मित्रदोस्त; शेजारी आणि समाजातील इतर लोक यांच्याशी वागताना सर्वांची मने सांभाळून वागावे लागते. प्रसंगी त्यांच्या मनाला न पटणारे निर्णय घ्यावे लागतात. अशावेळी धैर्याने, जबाबदारीने कर्ता पुरुष म्हणून काही वेळा मन कणखर; कठोर करावे लागते. असे आचरण करताना अंगी चिकाटी असावी लागते. अशा वागण्याचे सातत्य नित्य हवेच. असा अखंड प्रयत्न करीत राहिला तरच हाती घेतलेल्या कार्यात हमखास यश मिळून कार्यभाग साधतो. म्हणून अखंड, सतत सावधपणाने, जागरूकतेने वागल्यास हातून चूक घडत नाही. सर्व आनंदी राहून प्रपंच कुटुंबाचा असो की देशाचा यशस्वी होतो.
“आधी मनुष्य ओळखावे | योग्य पाहूनि काम सांगावे |
निकामी तरी ठेवावे | येकीकडे || ४ ||”
या ओवीतून श्रीसमर्थ तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार मांडत आहेत .
१) आधी योग्य माणसाची पारख करावी.
२ ) त्याला योग्य तेच काम द्यावे.
३) निकामी लोकांना वेगळे बाजूला काढावे.
कोणतेही सार्वजनिक काम, राज्य कारभार, लोकसंग्रह करताना आणि घरचे काम करताना सुद्धा, ते काम करण्यासाठी; योग्य माणसाची पारख करता यायला हवी. माणूस कसा आहे, त्याचे आचार-विचार, आवड-निवड कशी आहे हे समजायला हवे. त्याच्या वागण्या-बोलण्यावरुन त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो. कामाचे स्वरूप काय आहे हे पाहून, योग्य माणसाची निवड करून, त्याला झेपेल असेच काम त्याच्यावर सोपवावे. कारण काम करण्याची क्षमता सर्वांमध्ये सारखीच असते असे नाही तर व्यक्ती-व्यक्ती परत्वे ती भिन्न भिन्न असू शकते. माणूस ओळखून, योग्यता पाहून काम दिल्यास त्या कामात हमखास यश येते. कार्य यशस्वीरित्या पार पडते. अडचणी कमीतकमी येतात. माणसाची पारख करताना, एखादा माणूस निकामी असेल; कामाचा कंटाळा करणारा; जबाबदारीने काम न करणारा; कामचुकार असेल; निरुपयोगी असेल; तर तो काम करण्यास अयोग्य समजून त्याला त्या कामापासून बाजूला सारावे. इतरांपासून दूर ठेवावे. कारण अशा माणसामुळे इतर काम करणारेही बिघडू शकतात. आणि मग कार्य पूर्ण होण्यास वेळ लागू शकतो, कार्य अपूर्णही राहू शकते. म्हणून माणसाची योग्यता, वकूब, कुवत पाहून, त्याची काम करण्याची क्षमता लक्षात घेऊन त्याला योग्य ते काम द्यावे. तरच कार्य तडीस जाते, पूर्णत्वास जाते. अन्यथा कुचर, आळशी, निकामी माणसामुळे कार्य अपूर्ण राहते.
क्रमशः
|| जय जय रघुवीर समर्थ ||