श्रीसमर्थ वाङ्मयातील प्रयत्नवाद

श्रीसमर्थ वाङ्मयातील प्रयत्नवाद
सौ. अश्विनी कुलकर्णी
  • May 26, 2025
  • 1 min read

वाङ्मय म्हणजे विविध प्रकारच्या साहित्यकृतींचे एकत्रीकरण! वाङ्मय म्हणजे लेखन, वाचन, विचार, आणि कल्पना या माध्यमातून अभिव्यक्त होणाऱ्या संकल्पना, भावना, उपदेश, संदेश, आणि शिकवण असा लोकोपयोगी विचारांचा संग्रह होय. असे हे वाङ्‌मय समाजाच्या, राष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या सांस्कृतिक, नैतिक आणि बौध्दिक उन्नतीचे द्योतक मानले जाते.

     

अशाच दर्जेदार, सामर्थ्यशाली वाङ्‌मयात समर्थ रचित साहित्याची गणना केली जाते. बारा वर्षे भारतभर भ्रमण केल्यानंतर श्रीसमर्थ रामदास स्वामींनी समाजाचे सूक्ष्मातिसूक्ष्म असे अंतर्बाह्य निरीक्षण केले. त्या आधारानेच सर्व प्रश्नांना, सर्व समस्यांना ‘रामबाण’ उपायांसह आपल्या विविध साहित्यातून, वाङ्मयातून जाहीरपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्‌कार्य केले. त्यात दासबोध, मनाचे श्लोक, रामायण, आत्माराम, एकविस समासी दासबोध, करुणाष्टके, स्फुट श्लोक, स्फुट प्रकरणे, लघुकाव्ये, ओवीशतके, सवाया, अभंग, पदे, ललिते, आरत्या, मानसपूजा इ. अफाट वाङ्‌मयाचा समावेश होतो.

समर्थांच्या वाङ्‌मयाचे वैशिष्ट्य हे आहे की, त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून ‘प्रयत्नवाद’ या विषयावर सर्वाधिक भर दिलेला आढळतो. प्रयत्नवाद म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी भाग्य, नशीब किंवा परिस्थितीवर अवलंबून न राहता, आपल्या कठोर परिश्रमांवर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवणे. सतत परिश्रम करणाऱ्या व्यक्तिला यश नक्कीच प्राप्त होते, आणि अशा व्यक्तिचे जीवन सुदृढ आणि समाधानी बनते, अशी ग्वाही समर्थानी दिली आहे. यापुढेही जाऊन समर्थ म्हणतात, “स्वत:चा विकास करण्यासाठी सतत प्रयत्न करणे हाच मानवाचा खरा धर्म आहे.”

प्रयत्नवादाच्या प्रमुख विचारधारा :-

१. आळसाला थारा न देता माणसाने नेटाने प्रयत्न करीत राहिले तर दैवही त्याला अनुकूल होते. कर्म व कर्तृत्व याला समर्थांनी विशेष महत्त्व दिले आहे.

२. सर्वच संत प्रयत्नवाद सांगतात, हे जरी खरे असले तरी समर्थांनी सांगितलेला प्रयत्नवाद कर्मवीर बनवणारा आहे. समर्थांनी प्रयत्नाचे गुणगान गाताना ‘यत्न तो देव जाणावा’ असे म्हटले आहे.

३. लोकांमध्ये वावरताना आपले बोलणे व वागणे यात तीळमात्रही फरक नसावा.

४. “आपुले स्वहित न कळे जना । तेणें भोगिती यातना |” अशी अवस्था स्वहितासाठी प्रयत्न न करणाऱ्यांची होते. “म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा | असे समर्थ तळमळीने सांगतात. कारण, समर्थ हे प्रयत्नवादाचे पुरस्कर्ते आणि दैववादाचे खंडनकर्ते आहेत.

५. समर्थांचा काळ हा जरी ३D चा नव्हता तरी त्यांनी ३D साठी तेव्हा प्रयत्नवादच सांगितला आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे अगदी खरे आहे. फक्त त्यांच्या ३D ची परिभाषा वेगळी आहे. १) D = देव २) D = देश आणि  ३) D = धर्म! असा ३D समर्थांशी संबंधित आहे. यावरून ३D + BT = V असे आगळेवेगळे समीकरण तयार होते. या Best Try infinite (BT) ची जोड मिळाली तर विजय निश्चित आहे.

६. समर्थांनी सर्वसामान्यांना संकटकाळी घाबरून न जाता धैर्याने त्याचा सामना करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या प्रयत्नवादाच्या प्रमुख विचारधारेत  ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हे सूत्र गठित झाले आहे.

७. “केल्याने होत आहे रे” ही प्रयत्नवादातील प्रमुख विचारधारा आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत विद्या, कला अथवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी बारा वर्षाचे परिश्रम आवश्यक मानले आहेत. या सतत केलेल्या प्रयत्नानाच ‘तप’ असे म्हणतात. अशा रीतीने दीर्घकाळ तापल्यानंतर अंत:करणात धैर्य निर्माण होते. प्रयत्नवादाच्या प्रमुख विचारधारा जाणून घेतल्यानंतर समर्थांनी त्यांच्या विविध ग्रंथांमधून प्रयत्नवादाचे महत्त्व कुठे आणि कसे अधोरेखित केले आहे, ते पाहू.

१. दासबोधातील प्रयत्नवाद :-

दशक १२ मधील ९ व्या समासात (येत्नसिकवणनाम ) समर्थ प्रयत्नवादावर भर देताना दिसतात. काही माणसे प्रारब्धावर विश्वास ठेवून प्रयत्न करायचे सोडून देतात. “असेल माझा हरी…” या वृत्तीचा समर्थ कडाडून विरोध करतात. समर्थांना हे मुळीच मान्य नाही. ‘रेषा तितुकी पुसोन जाते…’ अर्थात्, प्रयत्नांवर भर दिला की तळहातावरच्या रेषाही पुसल्या जाऊ शकतात. बदलू शकतात. याकरिताच समर्थांनी प्रयत्नवादी असण्याचा आग्रह धरला आहे.

“अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना ।

आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्यां ।। १२.२.६ ।।

यात अचूक प्रयत्नांच्या अभावी येणाऱ्या अपयशाचे वर्णन केले आहे. समर्थ पदोपदी योग्य प्रयत्नांची वाट शोधायला सांगतात.

आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निर्फळ ।

साक्षेपेंविण केवळ । वृथापुष्ट ।। ११.१०.२० ।।

हा प्रयत्नवादाचा आचरणात आणण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी सांगितला आहे.

२. मनाचे श्लोकातील प्रयत्नवाद :-

मनाच्या श्लोकांच्या निर्मितीची कथाच मुळात प्रयत्नवाद सांगणारी आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता मनाला प्रयत्नाभिमुख करणे म्हणजेच समर्थांना अपेक्षित असलेला प्रयत्नवाद होय.

३. आत्माराम ग्रंथातील प्रयत्नवाद :-

आत्माराम हा समर्थांचा लहानसा परंतु महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. यात त्यांनी मनुष्याच्या आत्मबळावर भर देत प्रयत्नशीलतेचा महिमा गायला आहे. “आपुलिया आत्मबळा । साधावे आपुले कला ।“ प्रत्येकाने आपले आत्मबळ ओळखूनच प्रयत्न करावेत, असा समर्थांचा जनहितासाठीच अट्टाहास आहे. “आदिकर्ता आहे सोबती । परि कर प्रयत्न निश्चिती ।” भगवंताची कृपा मिळविण्यासाठी तर मानवाने स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे.

४. श्री मारुती स्तोत्रातील प्रयत्नवाद :-

हनुमान हा उत्तुंग, धडाडी, कार्यक्षमता आणि प्रयत्नवादाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. “सिद्धी साधतो जे प्रयत्न । हनुमंत तव सेवक जन ||”

५. समर्थांच्या अभंगातील प्रयत्नवाद:-

“भाग्य बोले परंतु कर्म । त्यावाचून नाही धर्म । प्रयत्न हे धरावे कर्म । त्याने मिळते फळ ।। समर्थांनी केलेली ही प्रार्थना प्रयत्नवादाला पुष्टी देणारी आहे

६. समर्थांच्या आरत्यांमधील प्रयत्नवाद:-

जय जय रघुवीर समर्था । जय जय मारुती वीर संकट हा | तुझे अधिष्ठान धरूनि पाहा । प्रयत्न करा सदा ।।” श्रीराम आणि हनुमान यांचे अधिष्ठानाखाली माणसाने सतत प्रयत्न करावे. भगवंताची कृपा आणि स्वतःचा प्रयत्न यांच्या समन्वयातून यशप्राप्ती होते.  “संकट येईल मार्गावरी । तरी धरावे साहस भारी ।  प्रयत्ने तुजविण नाही खरी । अशी कृपा करावी ।।” संकटे आली तरी माणसाने धैर्याने आणि साहसाने प्रयत्न करावे. भगवंताची कृपा देखील प्रयत्नशील असणाऱ्यांना मिळते.

७. समर्थांच्या सवायांमधील प्रयत्नवाद:-

“अवघे मिळवावे परिश्रमाने । तरी न धरी विसावा जनाने ||” येथे समर्थ स्पष्ट सांगतात की, सर्व काही परिश्रमाने मिळवावे. प्रयत्न करताना मनाने दुर्बल होऊ नये. आत्मविश्वासाने आणि धैर्याने पराक्रम केल्यास यश निश्चित मिळेल, अशी समर्थांनी ग्वाही दिली आहे. वरील सर्व समर्थ वाङ्‌मयाच्या अभ्यासातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ‘प्रयत्नवाद’ हाच समर्थांच्या शिकवणुकीचा आधारस्तंभ आहे. “प्रयत्न हा मुख्य आणि कृपा ही सहकारी” असे मानून जीवनात भौतिक आणि पारमार्थिक यशासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा केवळ संदेशच नव्हे, तर रामाज्ञा समर्थांनी आपल्यापर्यंत पोहचविली आहे, अशा समर्थांचरणी माझे त्रिवार वंदन !!!

“शतश: वंदन समर्थ गुरुराया ।

तुमची कृपा आम्हा लाभो सदा ।।

तुमच्या विचारांनी जीवन उजळो |

प्रयत्नांची ज्योत अखंड तेवो ।।”

Language