धर्मस्थापनेचे नर | ते ईश्वराचे अवतार |
जाले आहेत पुढें होणार | देणें ईश्वराचें ||
श्रीसमर्थांच्या जीवनात ह्या उक्तीची सत्यता शतप्रतिशत पटते. मराठवाड्यातील जांब ह्या छोट्याशा खेड्यात रहाणाऱ्या, गावच्या कुलकर्णीपणाचे वेतन सांभाळणाऱ्या, अतिशय भाविक वृत्तीच्या सूर्याजीपंत ठोसर व त्यांच्या पत्नी राणूबाई यांचे दुसरे अपत्य ‘नारायण’ म्हणजेच आपले सदगुरु श्रीसमर्थ रामदासस्वामी होत. त्यांच्या घराण्यात २४ पिढयांपासुन सूर्योपासना व श्रीरामोपासना केली जात होती. अशा पवित्र, तपस्वी घराण्यातच असे थोर महात्मे जन्माला येतात. म्हणूनच म्हणतात “शुध्द बीजा पोटी फळे रसाळ गोमटी”!
चैत्र शुध्दनवमी, श्रीरामजन्मोत्सवाच्या वेळेचा मुहूर्त साधून श्रीरामरायाच्या या शिष्योत्तमाने भूतलावर जन्म घेतला. सूर्याजीपंतांना त्याच्या जन्माचा संकेत आधीच मिळाला होता. सूर्याजीपंतांच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेल्या सूर्यनारायणाने त्यांना वर दिला होता, मदंशे करुन व मारुति अंशेकरुन असे दोन महान भगवत्भक्त पुत्र होतील. प्रथम पुत्र गंगाधर तीन वर्षापूर्वी लाभला होता आणि आता मारुतीचा अवतार असलेल्या व्दितीय पुत्राने श्रीरामजन्माचाच मुहूर्त साधला होता. सूर्याजीपंतांचं जीवन सुफळ झालं होतं. कृतार्थ बनलं होतं. श्रीसमर्थ मारुतीचेच अवतार आहेत असे म्हणायला सबळ पुरावे आहेत. मारुतीरायांची युगायुगांची परंपरा सांगणारा एक सुंदर श्लोक भविष्योत्तर पुराणात आहे.
कृतेतु मारुताख्यश्च त्रेतायां पवनात्मज |
द्वापारे भीमसंज्ञश्च रामदासे कलौयुगे ||
समर्थप्रताप, दासविश्रामधाम व बखरीत हीच विचारधारा दृढतेने मांडली गेली आहे. बालपणीचा चंचल व हूड स्वभाव, फळफळावळीची विशेष आवड, अंगी वैराग्यचिन्हे ही सारी मारुतीची लक्षणे त्यांच्या ठायी एकवटली होती. दोघांचं आराध्यदैवत एकच श्रीरामचंद्र!
श्रीहनुमंत व श्रीसमर्थ यांच्यातील हा भावबंध. श्रीसमर्थांना अगदी लहानपणीच एका अदभुत प्रसंगातून तो जाणवला. एकदा सूर्याजीपंत श्रीसमर्थांना म्हणजेच नारायणाला घेऊन नदीवर स्नानासाठी गेले होते, तेव्हा एक वानर दूत वेषाने तेथे आले व नारायणास घेऊन गावाबाहेर गेले. तेथे श्रीरामचंद्र व सीतामाई एका पालखीत बसले होते. श्रीरामांनी नारायणाला जवळ बोलाविले. त्याला “अहं ब्रम्हास्मि” हया महावाक्याचा उपदेश केला. श्रीहनुमंताकडे वळून श्रीरामचंद्र म्हणाले, “हनुमंता, यापुढे याला व याच्या परंपरेला सर्वस्वी सांभाळावे” अशी आज्ञा करुन नारायणाला श्रीहनुमंताच्या स्वाधीन करुन श्रीरामचंद्र व माता सीता अंतर्धान पावले. त्या क्षणापासून श्रीहनुमंतांनी नारायणावर आपले कृपाछत्र धरले. ह्याचे सुंदर वर्णन करतांना दिनकरस्वामी म्हणतात, महावाक्य उपदेशूनि त्वरित | हनुमंतासि निरविले || निरवणे म्हणजे एखाद्यावर जबाबदारी सोपविणे.
श्रीसमर्थ व श्रीहनुमंत हयांच्यातील भावबंध स्पष्ट करणारी दुसरी कथाही सांगितली जाते –
नारायणाचा उपनयन संस्कार झाल्यावर त्याला श्रीरामाचा अनुग्रह घ्यायची ओढ लागली. त्याने वडिल बंधूंना अनुग्रह देण्याबद्दल विनवले पण त्यांनी “तू अजून लहान आहेस, अंमळ धीर धरावा” असा सबुरीचा सल्ला दिला. परंतु नारायणाच्या मनातील रामदर्शनाची उत्कट इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना. अखेरीस गांवाबाहेरच्या मारुती मंदिरात त्याने आसन मांडले. तीन दिवस तीन रात्री त्याने श्रीहनुमंताचा धावा केला. अखेर श्रीहनुमंत प्रकट झाले. त्यांनी “काय हवे?” विचारल्यावर श्रीरामप्रभूंच्या दर्शनाची उत्कट इच्छा असल्याचे त्याने सांगितले. श्रीहनुमंतांनी श्रीरामचंद्रांची प्रार्थना केली श्रीरामचंद्र प्रकट झाले व “कशास ध्यान केले?’’ असे श्रीहनुमंतांना विचारल्यावर श्रीहनुमंत म्हणाले, “मदंशेकरुन धर्मस्थापनेसाठी ह्या नारायणास आपण निर्माण केले आहे. तरी आता यास अनुग्रह द्यावा.” श्रीरामचंद्रांनी नारायणास मंत्रोपदेश दिला. पूजेसाठी बाण, जपासाठी माळ, हुर्मुजी रंगाचे वस्त्र, व त्रयोदशाक्षरी मंत्र दिला, व “कलिच्या प्रथम चरणात म्लेच्छांचे वर्चस्व सुरु होईल तेव्हा कृष्णातीरी राहून सांब अंशेकरुन उत्पन्न झालेल्या शिवनाम राजास मंत्रोपदेश द्यावा व धर्मस्थापनेसाठी सहाय्य करावे”, अशी कार्याची रुपरेषाही सांगितली. नारायणास “रामदास” हे नाव देऊन त्याला श्रीहनुमंताच्या स्वाधीन करुन श्रीरामचंद्र अंतर्धान पावले. त्याक्षणापासून श्रीहनुमंत व श्रीसमर्थ ह्यांच्यात अतूट भावबंध निर्माण झाले.
स्वधामासी जाता महारामराजा |
हनुमंत तो ठेविला याची काजा |
सदा सर्वदा रामदासासी पावे |
खळी गांजिता ध्यान सांडुनी धावे ||
याचा प्रत्यय श्रीसमर्थचरित्रात पुन:पुन्हा आलेला आहे. “आई, चिंता करितो विश्वाची” असे उद्गार बालपणीच आईसमोर काढलेल्या लहान नारायणाला संसार- प्रपंच ह्याबद्दल ओढ नव्हतीच. केवळ आईच्या आग्रहाखातर “बोहोल्यावर चढेन” असे अभिवचन त्याने आईस दिले आणि ते पाळलेही! भटजींचा “शुभ मंगल साsवधान” हा उच्चारवाने म्हटलेला मंत्र नारायणाच्या कानांत शिरला मात्र, त्याने लग्नमंडपाबाहेर धांव घेतली. कुणाच्या हाती पडू नये म्हणून एका उंच वृक्षावर चढून तीन दिवस तीन रात्री तो तिथेच बसून होता. चौथ्या दिवशी रामरायाने आपल्या वास्तव्याने पावन केलेल्या पंचवटी क्षेत्राकडे जाण्यास तो निघाला. छोटा जीव दमायचा. त्यावेळी वेष पालटून मारुतीरायाने खायला आणून द्यावे. धीर द्यावा. नारायण नाशिकला पोहोचला. रामरायाचे दर्शन घेतले अन गावापासून थोडे दूर गोदावरी-नंदिनीच्या संगमाजवळ असलेल्या टाकळीतील एक गुंफा त्याला पसंत पडली. गोदावरी-नंदिनीच्या संगमात उभे राहून तेरा कोटी रामनामजप व गायत्री पुरश्चरण करायचे त्याने निश्चित केले.
उपासनेचा मोठा आश्रयो | उपासनेविण निराश्रयो |
उदंड केलें तरी जयो | प्राप्त नाहीं ||
टाकळीला राहून नारायणाने बारा वर्षे खडतर तपश्चर्या केली. ह्या संपूर्ण काळात वानररुपात उपस्थित राहून मारुतीरायाने त्याची सर्वतोपरी काळजी घेतली असे उल्लेख आहेत.
दशकपंचकच्या कुलकर्ण्यांचे प्रेत उठवून, त्यांना रामरायाच्या कृपेने जे नवजीवन नारायणाने मिळवून दिले, या चमत्कारानंतर लोक त्यांना कमालीच्या आदराने वागवीत. ते त्यांना “समर्थ” म्हणू लागले. कुलकर्णी दाम्पत्याने आपला पहिला पुत्र श्रीसमर्थांच्या चरणावर ठेवला. श्रीसमर्थांना लाभलेला हा पहिला शिष्य उध्दव आणि त्याच्यासाठीच स्वहस्ते गोमयाने बनविलेला “प्रताप मारुती” हा श्रीसमर्थांनी स्थापन केलेला पहिला मारुती. इथे स्थापलेला मठ हा पहिला मठ व पहिला मठपती उध्दव. “टाकळी” ही श्रीसमर्थांची तपोभूमी तर आहेच पण त्यांच्या कार्याची मुहूर्तमेढही इथल्या पहिल्या मठाने झाली. म्हणून टाकळी हे साऱ्या समर्थभक्तांचं पावन स्थान!
बारा वर्षांचे तप, पुरश्चरण पूर्ण करुन उध्दवास टाकळीला ठेवून श्रीसमर्थ भारत भ्रमणास निघाले. हृदयस्थ श्रीहनुमंत होतेच, मनात उदंड श्रध्दा होती.
नांव मारुतीचे घ्यावे | पुढे पाऊल टाकावे ||१||
अवघा मुहूर्त शकून | हृदयी मारुतीचे ध्यान ||२||
जिकडे तिकडे भक्त | पाठी जाय हनुमंत ||३||
राम उपासना करी | मारुती नांदे त्याचे घरी ||४||
दास म्हणे ऐसे करा | सदा मारुती हृदयी धरा ||५||
भारत भ्रमण करीत श्रीसमर्थ काशीस विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गेले. पुजाऱ्याने आत जाण्यास मज्जाव केला. श्रीसमर्थ परत फिरले. इकडे पुजाऱ्याला महादेवाची पिंडीच दिसेना. महादेवांचा आदेश झाला, “तू ज्याला परत पाठविलेस तो मारुतीचा अवतार आहे. त्यास शरण जा”. पुजारी धांवत आला त्याने श्रीसमर्थांचे पाय धरले. त्यांना आदराने मंदिरात आणले. त्यांचा अनुग्रह घेतला. काशीच्या हनुमंत घाटावर श्रीसमर्थांनी श्रीहनुमंताच्या मूर्तीची स्थापना केली. श्रीसमर्थ हिमालयात आले. ब्रदीनारायण, बद्रिकेदार दर्शनानंतर ते तेथील श्वेत-मारुतीच्या दर्शनाला गेले. श्रीसमर्थांना हिमालयातल्या थंडीवाऱ्याचा त्रास होऊ नये म्हणून श्रीहनुमंतांनी त्यांना वल्कले, टोप, मेखला, कुबडी, जपमाळ इ. वस्तू दिल्या. ते दक्षिणेकडे रामेश्वराच्या दर्शनाला गेले तेव्हा चिरंजीव मारुतीराय त्यांना घेऊन लंकेस चिरंजीव बिभीषणाच्या भेटीला घेऊन गेले. आपल्याकडे सप्त चिरंजीव प्रसिध्द आहेत.
अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च बिभीषणः |
कृप: परशुरामश्च सप्तैते चिरंजीविन: ||
चिरंजीव बिभीषणाने दोघांचे उत्तम स्वागत केले. रामभक्तांचे असे त्रिकुट जमले अन त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. तीर्थाटन पूर्ण झाले. श्रीसमर्थांनी तीर्थाटनाचा सर्व वृत्तांन्त श्रीरामरायांना सादर केला. तीर्थाटनाचे पुण्य श्रीरामचरणी अर्पण केले आणि श्रीरामरायाच्या आज्ञेनुसार ते कृष्णातीरी अर्थात आपल्या कर्मभूमीकडे निघाले.
|| जय जय रघुवीर समर्थ ||