|| श्रीराममंत्राचे श्लोक ||

|| श्रीराममंत्राचे श्लोक ||
सौ.विद्याताई लव्हेकर
  • April 20, 2025
  • 1 min read

शास्त्र, वेद इत्यादी पेक्षा ही रामनाम श्रेष्ठ आहे  असे श्रीसमर्थांचे श्रीराममंत्राचे एकूण ४९ श्लोक आहेत. कलियुगातील धकाधकीच्या जीवनशैलीत, राममंत्रश्लोक म्हणजे सुखी शांत समाधानी जीवन जगण्याचा श्रीसमर्थांनी दाखवलेला अत्यंत सुंदर सोपा मार्ग आहे. प्रत्येक श्लोकाच्या शेवटी ‘हरे राम हा मंत्र सोपा जपा रे |’ हे चरण घेत मंत्राचे महत्व सांगितले आहे. यात माणसाने काय करु नये याची यादीच दिली आहे. पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी बहुपुण्याने नरदेह मिळाला आहे तो विषयात, प्रपंचात न गुंतवता त्याचे सार्थक करावे यासाठी राममंत्राचे प्रयोजन. 

      

बालपण खेळ व शिक्षणात जाते. तारुण्यात आधी स्वतःचे लग्न, नंतर मुलांचे शिक्षण, मुंज, लग्न या प्रपंचासाठी नोकरी व्यवसाय करताना, यश; किर्ती; वैभव; स्थावर जंगम; प्राप्तीसाठी, घाण्याला बैल जुंपल्याप्रमाणे आयुष्य रात्रंदिवस खर्ची घालतो. खूप द्रव्य कमावतो कधी पत्नीप्रेमात मातृपितृऋण विसरतो. गुळाला मुंगळे तसे द्रव्यासाठी आप्तइष्ट चिकटतात. लोकेषणेत साधुसंत यांना मदाने बोलतो. आपल्या अवतीभोवती असलेल्या काही वृद्ध तर काही तरुणांचे मृत्यु पहावे लागतात. काहींच्या वाट्याला स्वतःच्या मुलांचे क्रियाकर्म करण्याचे दुर्दैव येते. यातच तारुण्य संपून वृद्धावस्था येते. 

देह विषयभोगात रमला तर पुढे अनेक रोग होतात. म्हातारपणी डोळे, कान, नाक, दात क्षीण होतात. इंद्रियांवर ताबा राहिला नाही की मुले कन्या, सून नातवंडे बोलू लागतात. घरातील सर्वांनाच कंटाळा येतो. शेजारीपाजारी बोलू लागतात. आयुष्य लोडाला टेकून ऐश्वर्यात घालवलेले, पण म्हातारपणाचा काळ कठिण जातो. सगळे आपल्या मृत्युची वाट पाहत आहेत, हे पाहून वाईट वाटते. पण दिवसही संपतासंपत नाहीत. अंतसमयी कोणी कोणाचे नाही हेच सत्य आहे. पण काळाच्या हातात मापदंड आहे. काटेकोर तराजू घेऊन तो मोजमाप करीत असतो म्हणून त्याला मापारी म्हटले आहे. 

 

काळ कसा आहे ? काळा, गोरा की सावळा, उंच की बुटका ? जीवास एकदम न सांगता घेऊन जातो म्हणून वेडा की; न सांगता आपले कार्य चोख बजावतो म्हणून शहाणा ? काळ नेमका कसा आहे हे कोणीही पाहिले नाही. पण तो त्याचे अस्तित्व दाखवतो म्हणून आहे हे निश्चित. हा काळ पक्षी नसला तरी त्याच्या गतीला आकाश सुद्धा कमी पडते. त्याच्या गतीला कोणीही बाधा आणू शकत नाही, आणि या काळापासून कोणीही कोणालाही वाचवू शकत नाही. या काळाचे सावज चराचरातील सगळे जीव आहेत. म्हणून समर्थ विनवणी करतात की काळाची गती ओळखा. आपण त्याचे सावज आहोत. तो पक्षासारखा कधीही येऊन झडप घालून माणूसरूपी त्याचे भक्ष घेऊन जातो. तेव्हा आताच सावध होऊन काळाची गती ओळखा. म्हणून समर्थ म्हणतात ‘रवीसुत ते दूत विक्राळ येती |’ रवीसुत म्हणजे सूर्यपुत्र यमराजा. यमराजाचे यमदूत आपल्याला सांगून येत नाहीत. त्यांच्याकडे आपल्या कर्माचा अगदी शंभर टक्के बरोबर हिशोब असतो. तिथे कोणालाही दयामाया, क्षमा, माफी नाही. ‘दशग्रीव लंकापुरी मस्त जाला |’ सोन्याची नगरी असलेला लंकापती  रावण यालाही मृत्यु आला. पण द्वेषाने का असेना अखंड रामाच्या स्मरणात दिवस गेल्याने मोक्ष मिळाला. आणि नित्य रामनामस्मरणात रमणारा बिभीषण चिरंजीवपद पावून लंकेचा राजा झाला. 

तपस्वी मनस्वी भले पार गेले | दुजी सृष्टिकर्ते असे थोर मेले |

चिरंजीव कल्पायु गेले किती रे |२२||

मृत्युसमयी काळ कोणाचेही रूप, संपत्ती, महती, तपाचरण या कशाचाही विचार न करता एका क्षणात घेऊन जातो. मग पुढे केलेल्या कर्माचे फळ भोगणे आले. पापकर्म केले तर यमयातना भोगाव्या, पुण्यकर्म केले तर स्वर्गलोक भोगावा. पण दोन्ही ठिकाणचे  भोग भोगून संपले की पुन्हा या भुलोकावर जन्माला येणे आहेच, मोक्ष नाही. जन्ममृत्यु चक्रातून सुटका नाही. प्रारब्ध संचित या प्रमाणे नवा जन्म.

नवा जीव मातेच्या उदरात नऊ महीने ‘अधोमुख विष्ठेमधे मायपोटी’ गर्भयातना भोगतो. श्रीसमर्थांनी या देहाला केतकीचे बन म्हटले आहे कारण जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा केतकीसारखा सोन्यासारखा शुद्ध स्वरुप असतो. नंतर मोठा होताना अहंकाराचे-षड्रिपुचे एकेक डाग लागत त्याचे स्वरुप बदलत जाते. 

सोsहं सोsहं म्हणणारा जीव कोsहं कोsहं म्हणत राहतो. जन्माला येताना एकटे येतो. मृत्युनंतर जाताना स्मशानापर्यंत सोबत येतात, पुढे एकटा प्रवास. जन्माला येताना कमजोर येतो. वृद्धापकाळी जाताना कमजोरच जातो. जन्माला येताना पैसा, सामान काहीही न घेता येतो. जातानाही पैसा, सामान, कुटुंब, जायदाद काहीही सोबत येत नाही. जन्माला आल्यावर पहिले स्नान दुसऱ्याच कोणी घातलेले असते. शेवटचे स्नान पण दुसरेच घालतात. आयुष्य हे असेच आहे. मग त्यात षड्रिपु, अहंकार, विषयवासना एषणा कशाला हव्या ? आपण या जगात काही ठराविक काळापूरते आलो म्हणून जीवन इतर फालतू कामात घालवणे पढतमूर्खपणा आहे. ‘कसी जन्मुनी माय त्वां वांझ केली’  वंशाला लाजिरवाणा असा भूमीला भार जणू धोंडा. धोंडा तरी काही कामाला येतो.

म्हणून समर्थ या राममंत्राचे श्लोकातून काय करु नये ते सांगताना म्हणतात – 

नको योग अष्टांग तो रोध प्राणा | नको कृच्छचांद्रयणी हट्ट जाणा ||

अपभ्रंश हा मार्ग की वोखटा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||१७||

तसेच ‘ नको तू कदापी करु तीर्थयात्रा | तनूदंडणी क्षीणता सर्व गात्रा |

करी ग्रस्त आयुष्य तू कोणसारे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||२०||

अलंकारमानी तनू सजवीतो | मना दर्पणी पाहुनी रंजवितो |

कळेना जळे सर्पणी रूप ते रे |

म्हणून हा मनुष्य देह सजवण्यापेक्षा आत्मा ‘राममंत्राने’ सजव. समारोपात समर्थ म्हणतात-

‘महाघोर हा थोर संसार मोठा | कळे संतसंगे समुळीच खोटा |

कळे भक्ति मुक्ती विरक्तीच गा रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||४६||

हे संत सद्गुरू पंचाक्षरी मांत्रिक आहेत. निःसंशय ते मिथ्या संसाराची भूतबाधा काढून टाकून, युक्तीने देहबुद्धीची राखरांगोळी करीत आत्मबुद्धी जागृत करीत, रामनामबीजमंत्राने पश्चातापदग्ध करुन, अनुतापाच्या चटक्याने जागे करीत, विवेकरूपी फोकाचे मार देत, धि:काराची धुरी देऊन साधकातील दोष काढून टाकतात. अंतराची तगमग वाढवून, जीवावर पुन्हापुन्हा येणाऱ्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या  संकटाची जाणीव करुन देत, मातृवत्सल भावाने त्यातून निश्चितपणे सोडवत मोक्ष प्राप्त करुन देतात. यासाठी हे माणसा ! सगळी  साधने सोडून देवून फक्त मनोमनी रामनाम मंत्राला वंदन करीत रामनामबीजमंत्र जप. या भवसागरातून सोडवणारा तोच एकमेव रामबाण उपाय आहे. 

कली साधने याविणे सर्व निंदी | हरे राम हा मंत्र जो त्यासि वंदी |

हरे राम हे माळिका साध का रे | हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ||४९||

प्रभूप्राप्ती कुलूपाची खरी मूळ किल्ली रामनाम हीच आहे. रामनामापुढे वेद, शास्त्रे, पुराणे ग्रंथाभ्यास सर्व त्यागून ‘राम’ हा एकच नाममंत्र जो अखंड जपतो, त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होतो.  

|| रामकृष्णहरी ||

Language