“आनंदाची दिपवाळी, घरी बोलवा वनमाळी,
घालीते मी रांगोळी, गोविंद गोविंद ।। ध्रु. ।।
सुंदर माझ्या घरात, आत्मा हा नांदतो,
चंद्र सूर्य दारात, गोविंद गोविंद ।। १ ।।
दळण दळीते मंदिरी, विष्णू यावे लवकरी,
चित्त माझे शुद्ध करी, गोविंद गोविंद ।। २ ।।“
दीपावली म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा, अज्ञानावर ज्ञानाचा विजय मिळवण्याचे जणू प्रतीकच. संतांच्या घरी नित्य दिवाळी असते. संतांची दिवाळी अंतरंगातली असते. संतांचे अंत:करण अत्यंत दयाळू, प्रेममय, आनंद, समाधान, तृप्ती, शांती याने काठोकाठ भरलेले असते.
श्रीरामदासस्वामी प्रभूरामचंद्रांना समर्थ म्हणतात. त्या प्रभूरामचंद्रांच्या घरी नित्य दिवाळीच असते. आपल्याला जर नित्य दिवाळी साजरी व्हावी असे वाटत असेल, तर प्रथम मनाची साफसफाई आवश्यक आहे. अंतरंगातला ‘मी’ पणा, अहंता, अज्ञान, नैराश्य याचा कचरा काढायला हवा. आपल्या मनाला भगवत् प्रेमात बुडवून ठेवायचं व मनाला अलिप्तपण शिकवायचं. संसाराची सर्व कर्तव्य अत्यंत चोखपणे करायची, पण त्यात गुंतायचे नाही. विवेक आणि वैराग्याच्या आधाराने ज्ञानज्योत तेवत ठेवायची.
‘दासविश्रामधाम‘ या ग्रंथातील पंचकन्यांच्या दिवाळीचा उल्लेख येथे नमूद करावासा वाटतो. अक्काबाई, आंतूबाई, वेण्णाबाई, बहिणाबाई, गिरीबाई यांच्या समवेत कशी दिवाळी साजरी झाली याचा उल्लेख येथे आहे. या पाचही कन्यांना समर्थांनी आत्मज्ञानी केले होते. दिवाळीमध्ये सकाळी चाफळला अक्कांनी समर्थांना ओवाळले, आंतूबाईंनी समर्थांना स्नान घातले, भोजनाला बहिणाबाईंकडे सीउर येथे गेले. बहिणाबाईंकडे जेवणात दोडक्याची भाजी होती. समर्थांना ती आवडली असे समजून त्यांनी ती पुन्हा पुन्हा वाढली आणि स्वतः नंतर जेवायला बसल्या, तेव्हा कळले की भाजी अगदी कडू आहे. त्या समर्थांना म्हणाल्या, आपण काहीच बोलला नाहीत. समर्थ म्हणाले, “नैवेद्य रामाने खाल्ला मग कसले कडूगोडपण!” असे समर्थांचे वैराग्य होते. नंतर विडा गिरीबाईंकडे घेतला व पुन्हा दुपारी समर्थ चाफळला आले. आंतूबाईंकडे जेव्हा समर्थ, प्रथम भिक्षेसाठी गेले होते; तेव्हा त्या म्हणाल्या “जा खापरा” समर्थांनी “ख” म्हणजे आकाश व “पर” म्हणजे पलीकडे असा गूढ अर्थ लावला. आंतूबाईंना पश्चात्ताप झाला व कायमच्या त्या समर्थांना शरण आल्या. असा समर्थांचा विवेक पदोपदी जाणवतो.
संतांच्या संगतीत नित्य दीपावली साजरी करण्यासाठी काही पायऱ्या लक्षात ठेवायला हव्यात. शरणागतता, सज्जन संगती, गाढ विश्वास–श्रद्धा, सद्गुरूंचा अनुग्रह, आज्ञापालन, सेवा व दान, धैर्य–धारिष्ट, सहनशक्ती, साधनेचे सातत्य अशा या आठ पायऱ्या आहेत. आता आपण त्यातील एकेक पायरी पाहूया.
१) शरणागतता – अहंता कमी होण्यासाठी शरणागत भाव निर्माण झाला पाहिजे, स्वतःकडे लहानपण घेता आला पाहिजे. कार्य हिमालयासारखे करावे पण कर्तेपण परमेश्वराकडे द्यावे. “सकळ करणे जगदीशाचे” असा समर्थांचा सतत भाव असे. “राम कर्ता” हा भाव जपला, की नित्य दिवाळी आहे.
२) सज्जनांची संगत – आत्मानुसंधान राखण्याची कला संतांजवळ सहज प्राप्त होते. कमी वेळात अध्यात्मिक प्रगती साधते म्हणून, “सदा सर्वदा संग दे सज्जनासी । जेणे नित्यानंद वाटे मनासी ।।“ संत–सज्जन, सद्गुरू यांच्या संगतीत खरे समाधान लाभते.
३) नि:संशय श्रद्धा – सद्गुरू निश्चित होईपर्यंत जरूर परीक्षा करावी, पण एकदा खरा सद्गुरू मिळाला की, कणभर सुद्धा संशय असता कामा नये. समर्थांनी प्रभूरामचंद्र ह्यांच्यावर गाढ विश्वास ठेवला. अंतरात सद्गुरूंना, त्यांच्या आज्ञेला अगदी घट्ट धरून ठेवावे व तसे आचरण करावे की नित्य दिवाळीच आहे.
४) सद्गुरूंचा अनुग्रह – संतांनी, सद्गुरूंनी आपल्याला ‘आपले‘ म्हणावे व अनुग्रह द्यावा यासारखे भाग्य नाही. पहिल्या तीन पायऱ्यामुळे सद्गुरूंचा अनुग्रह मिळतो. सद्गुरू विशिष्ट नाम, काही उपासना, काही साधन, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार देतात. तो सद्गुरूंचा बोध प्राणापलीकडे जपणं ही चौथी पायरी आहे. संत मूळ परब्रह्म शोधायची युक्ती देतात.
५) आज्ञापालन – आपण एकदा शिष्यत्व पत्करलं की स्वतःला रामाचा दास, रामाचा सेवक म्हणावं. सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून तो बोध निर्मळ मनाने पाळणे, आचरणात आणणे म्हणजे आज्ञापालन होय. आपल्या जीवनात सद्गुरूंचा प्रवेश हे परम वैभव आहे. जेव्हा सद्गुरू हीच आपली सुप्रीम व्हॅल्यू ठरते, तेव्हा सेवा मनापासून घडते, कारण आपण सद्गुरूंना प्राधान्य देतो.
६) सेवा व दातृत्व – आपली देह बुद्धी कमी झाल्याशिवाय मनापासून सेवा घडत नाही. भगवंताच्या दारात जे पडेल ते काम तत्काळ करायची तयारी हवी. आपला मान, सन्मान, पद, पदव्या, अधिकार परमेश्वरापुढे, सद्गुरूंच्या पुढे संपवता आले पाहिजे. सेवेबरोबर दानही हवे. निस्वार्थी भावनेने केलेले दान व सेवा, वृत्ती शांत समाधानी ठेवते. मन तृप्त होते व अर्थातच त्यामुळे नित्य दिपावली असते.
७) धैर्य–धारिष्ट, सहनशक्ती – जसजशी साधना वाढते तसतशी सद्गुरू परीक्षा घेतात. अपमान, अपशब्द सहज पचवता आले पाहिजेत. दुसऱ्यांना मोठ्या मनाने क्षमा करता आली पाहिजे. विसरून जाता आलं पाहिजे. सोडून देता आलं पाहिजे. आपले अंतःकरण क्षमा व प्रेमाने भरून गेले पाहिजे. मग द्वेष, राग, क्रोध काहीही विकार रहाणार नाहीत मग आनंदी आनंद.
८) साधनेचे सातत्य–तपश्चर्या – माणसांना जरा यश आले की, साधनेमध्ये ढिलाई होते, सातत्य रहात नाही. बाह्य विरोधापेक्षा अंतर्विरोध सांभाळावा लागतो. सातत्याने जप करत गेल्यास तो आत आत मुरतो. वैखरी, मध्यमा, पशन्ति व परा असा नामाचा प्रवास चालतो. परा वाणीत एकदा नाम स्थिरावले की ते सहज येते. नामस्मरण होते, करावे लागत नाही.
रामाच्या, कृष्णाच्या, आपल्या आराध्य दैवताच्या, डोळ्यात पहावे त्यांचं दाट कृपाळूपण पहावे, गोड स्मितहास्य पहावे. ते हास्य म्हणजे आनंद, तृप्ती, समाधान, पूर्ण ज्ञान याचे प्रतीक असते. साधना सतत करत रहावी. ह्या आठ पायऱ्यांनी गेलं की नित्य दिवाळीच आहे. कारण पूर्णज्ञान, पूर्ण आनंद, पूर्ण समाधान, पूर्ण शांती, पूर्ण तृप्ती सदगुरूंजवळच असते. “जेथे समाधानी वृत्ती, तेथे भगवंताची वस्ती.” सर्व आहे हे सद्गुरूंमुळे हा विवेक तर सर्वकाही फक्त सद्गुरूंसाठीच हे वैराग्य साधता आले पाहिजे की, नित्य दिवाळीच आहे.
“आली दिवाळी दिवाळी । लागू संतांच्या पायी ।।
आठ पायऱ्यांची शिडी । सदा स्मरणात ठेवावी ।।
बोध सद्गुरूंचा स्मरावा । उपदेश प्रेमे आचरावा ।।
तेणें आत्मज्ञान होईल । तृप्ती जीवनी येईल ।।
अवघा आनंदी आनंद । उघडू समाधानाची पेठ ।।
मग नित्य दिवाळी दिवाळी । सखा माझा वनमाळी ।।“
।। जय जय रघुवीर समर्थ ।।