“न्यायसीमा उल्लंघू नये । उल्लंघिता होतो अपाय ।
न्याय नसता उपाय । होईल कैचा ।।१०।।”
आपण आपल्या आचारविचारांना नियमाचे बंधन घालून घ्यायला हवे. त्या चौकटीत राहून आचरण केल्यास संकटे कमीतकमी येतात. पण जर आपली मर्यादा ओलांडली तर त्यापाठोपाठ नक्कीच काहीतरी संकटे येणार. एक खोटे लपवण्यासाठी दहा खोटे बोलावे लागते, आणि त्या प्रत्येकासाठी पुढे अजून काहीतरी तडजोड करावी लागते. अर्थात एकात एक जुळलेल्या साखळीतील कड्यांसारखी संकटांची मालिका तयार होते. त्यामुळे आपल्या हातून कधीही न्यायाचे उल्लंघन शक्यतो होऊ देऊ नये. कारण त्याने आपले नुकसान होते, अपाय होतो, मग आपले हित साधणे कठीण होते. न्याय नसेल तर उपाय नसेल.
“उपाधीस कंटाळला । तो भाग्यापासूनी चेवला ।
समयी धीर सांडिला । तोही खोटा ।।११।।”
न्यायसीमेचे उल्लंघन करू नये असे आपण म्हणतो. पण ते आचरणात आणणे फार कठीण असते. जणू सत्वपरीक्षाच, राजा हरिश्चंद्रासारखी. पण तरीही जो या उपाधीला कंटाळेल, जो अशा पद्धतीने आचरण करताना थकेल, हरून जाईल, आपली हिंमत हरेल तर तो भाग्यापासून नक्कीच दुरावला असे म्हणावे लागेल. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे‘ असे आपण म्हणतो. कठीण समयी धीर सोडू नये. संकटाला धीराने सामोरे जायला हवे, पाठ फिरवू नये. कारण त्यानंतर मिळणाऱ्या यशाची गोडी अवीट असते. त्याहीपेक्षा असे म्हणता येईल, त्या यशाची नशा काही औरच. त्या आनंदाने गगन ठेंगणे वाटू लागते. “धीर धरी रे धीर, पोटी असती मोठी फळे गोमटी.” धीराने संकटाला सामोरे गेलो तर यश नक्कीच पदरी पडते.
“संकटी कंटाळो नये । करावे अत्यंत उपाये ।
तरी मग पाहता काये । उणे आहे ।।१२।।”
श्रीसमर्थ म्हणतात संकटाला न घाबरता, न कंटाळता सतत प्रयत्न करीत रहावे. वेगवेगळे मार्ग करून पहावे. त्यातील एखाद्या प्रयत्नाला नक्कीच यश मिळते. मग काय पहायचे ? प्रयत्नांची कमतरता नसेल तर मग काय उणे.
“बंध बांधावे नेटके । जेणे करिता चतुर तुके ।
तावे न होता फिके । समुदाय होती ।।१३।।”
संकटाला सामोरे जाताना ‘बंध बांधावे नेटके.‘ कोणतेही कार्य करताना त्याची आधी रूपरेषा तयार करावी, आखणी करावी. त्या कार्यातील आपल्याला सहज शक्य होणारे कोणते व कोणत्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील हे पाहून त्याप्रमाणे कामाची विभागणी करावी. आपली मजबूत पकड कोठे आहे, ते पाहून या कामातील नाजूक मर्मस्थान कोणते आहे, हे नीट लक्षात घ्यावे. मग कामाची विभागणी करून आखणी करून कामास सुरुवात करावी. आपल्याला नवीन असलेला भाग नीट अभ्यासून, सराव करून तयार करावा.यामुळे कामात एक प्रकारची सुसूत्रता येते. हेच श्रीसमर्थांचे “बंध बांधावे नेटके”होय. अशा प्रकारे काम केल्यास “चतुर तुके” अशा कामाने शहाणा माणूस खुश होईल व मानही तुकवेल. कार्यकर्त्याची क्षमता त्याच्या लक्षात येईल. पण असे बंध न बांधता काम केल्यास त्यात गोंधळ उडण्याची शक्यता जास्त असते. गोंधळ झाल्यास चुका होतात व त्यामुळे आपलेच नुकसान होते, हानी होते. कार्य सिद्धीस जात नाही, अपयश पदरी पडते, मनात निराशा उत्पन्न होते, कामावरची पकड ढिली होते, कामावर ताबा रहात नाही आणि मग सारा कारभार हातातून निसटण्याची शक्यता असते.
“धुरेने युद्धासी जाणे । ऐशी नव्हे ती राजकरणे ।
धुराच करोन सोडणे । कितेक लोक ।।१४।।”
‘धुरेने युद्धासी जाणे‘ या ओवीत श्रीसमर्थ युद्धाची रणनीती समजावून सांगत आहेत. युद्ध हे युद्धच असते. तिथे हार-जीत, यश-अपयश येणारच. प्रसंगी प्राणाचे बलिदान जाईल किंवा शत्रू धरून बंदिवान करेल. म्हणून राजाने, प्रमुख नेत्याने स्वत: रणभूमीवर लढायला जाणे योग्य नव्हे. याउलट राजाने “धुराच करोन सोडणे । कित्येक लोक” हे खरे राजकारण होय. युद्धासाठी लोकांना खास प्रशिक्षण देऊन तयार करावे. त्यांना युद्धनीती शिकवावी. वेळप्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करावी. युद्धनीतीचे धडे त्यांच्याकडून गिरवून घ्यावेत. प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याचे कसब त्यांच्या अंगी आलेले असावे. त्यामुळे त्याप्रसंगी राजनीती वापरून ते विजय खेचून आणतील. ती क्षमता त्यांच्यात निर्माण केली तर शत्रूला ते सहज भारी पडतील व निश्चित जिंकून येतील. युद्धात कधीकधी मरण येते. त्याचे ते वीरमरण होय. स्वातंत्रवीर सावरकर म्हणतात, “तुजसाठी मरण ते जनन । तुजविण जनन ते मरण” देश त्या वीराची नक्कीच आठवण ठेवेल. पण राजाचे युद्धात बलिदान होणे देशहितासाठी योग्य नव्हे, कारण त्यामुळे देश शत्रूच्या ताब्यात जाईल, म्हणून ‘लाखाचा पोशिंदा‘ वाचायला हवा. तो असेल तरच देश आहे. म्हणून श्रीसमर्थ राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा नियम इथे सांगत आहेत की, राजाने/धुराने/नेत्याने स्वत: लढायला जाऊ नये. तर अनेक शूरवीर, हुशार, चाणक्य नेते व सैनिक तयार करावेत. ज्यामुळे देश सुरक्षित राहून राज्यकारभारही सुरळीत चालू राहिल.
“उदंड मुंडे असावी । सर्वही येक न करावी ।
वेगळाली कामे घ्यावी । सावधपणे ।।१५।।”
एक सावधगिरीची सूचना श्रीसमर्थांनी दिली आहे. “उदंड मुंडे असावी । सर्वही एक न करावी” या तयार झालेल्या नेत्यांना एकत्र ठेवू नये. त्यांना एकत्र ठेवण्यातला धोका श्रीसमर्थ ओळखून आहेत. त्यांना वेगवेगळी कामे देऊन एकमेकांपासून थोडे लांब ठेवावे. कारण ‘मीच सर्वात शहाणा‘ असे मनात येऊन ते इतरांना कमी लेखतील. तूतू-मैंमैं होऊन त्यांच्यात भांडणे सुरू होतील. आपली जबाबदारी झटकून दुसरा ते काम करेल असे विचार मनी येत गेल्यास ते कामचुकार,आळशी बनतील. आळसाने निद्रेचा अंमल वाढेल. ते देशहितासाठी योग्य नव्हे. अशी वाट पहाण्याने कार्य तर होणार नाही पण शत्रू कधी घरात घुसला ते कळणारही नाही. असा नेता बनू नये म्हणून त्यांना लांबलांब ठेवणे योग्य होय. त्यांना वेगवेगळी कामे वाटून दिल्यास ती कामे आपले कसब वापरून पार पाडतील. सतत प्रयत्न करून अधिकाधिक यश मिळवण्यासाठी, कार्याच्या पूर्णत्वासाठी; अत्यंत जागरूकतेने, हुशारीने, योजनाबद्ध रीतीने कार्याची आखणी करून कामे करतील. ते देशहितासाठी महत्त्वाचे ठरते. या नेत्यांना वेगवेगळी कामे देताना जो ज्या विषयात तरबेज आहे त्यास तो विषय/काम द्यावे. श्रीसमर्थ इथे कामाच्या वाटणीतही योग्यायोग्यतेचा विचार करावयास सांगतात. तरच यशाची पूर्ण हमी अन्यथा परत अपयश येऊ शकते.
क्रमशः
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
खुप वेगळा विचार घेऊन लेख लिहिला आहे.समर्थ प्रत्येक बाबतीत किती दक्ष होते हे सुचित होते.
सुरेख विवेचन
छान मांडणी, विस्तृत विवरण 🙏
समर्थानी राजे शिवाजी यांना गुरुमंत्र दिल्यावर केलेला उपदेश राजधर्म किती विचारपूर्वक सांगितला होता हे या वर्णनातून माहिती झाले.
जय जय रघुवीर समर्थ