“पाहोनी समजोन कार्य करणे।तेणे कदापि न ये उणे।
कार्यकर्त्याच्या गुणें।कार्यभाग होतो।।५।।”
कोणतेही काम करण्याआधी ते नीट समजून घ्यावे. त्या कार्याचा हेतू उद्देश काय आहे, तो समजला पाहिजे. त्यानंतर ते कार्य करण्यासाठी साधने कोणती लागतील, याचा विचार करून चांगली साधने आणावीत किंवा जमा करावीत. त्यानंतर काम करण्यासाठी लागणारा कालावधी निश्चित करावा. कारण त्या ठरलेल्या वेळेत कार्य पूर्ण झाले नाही, तर त्या कामाचा नंतर काहीच उपयोग नाही. त्यानंतर कार्याची निश्चित अशी दिशा ठरवावी. कामाची नीट आखणी करावी. आधी कोणते काम व नंतर कोणते काम असा कामाचा क्रम लावावा. कामाचे निश्चित टप्पे आणि निश्चित दिशा ठरवून त्या पद्धतीने काम केल्यास त्या कामात सुसूत्रता येते. गडबड-गोंधळ, वेंधळेपणा कमीत कमी होतो. चुकाही कमी होतात. तसेच कामात उणेपणा येत नाही. कार्य यशस्वीरित्या पूर्णत्वास जाते. कार्यकर्त्याच्या अंगच्या गुणामुळे कार्य सुरळीत पार पडते. कारण हे कार्य त्याच्या गुणांवरच अवलंबून असते. गुणी कार्यकर्त्यामुळे कार्यभाग यशस्वीरित्या पूर्णत्वास जातो. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे आपण म्हणतो. समाजात अनेक प्रकारची, अनेक विचारांची माणसे असतात. प्रत्येकाचा आपला एक खास स्वभाव असतो. आचार विचारांची, वागण्याची पद्धत असते. एकाच आईची सर्व मुले सारखी असतातच असे नाही. आई-वडील एक असले तरी मुले अंगा-पिंडाने, रंग-रुपाने, स्वभावाने वेगवेगळी असतात. म्हणूनच, माणसा माणसात फरक लक्षात घेऊन, त्यांच्या अंगच्या कलागुणांचा, क्षमतेचा योग्य वापर करून घेतल्यास कार्य उत्कृष्टरित्या पार पडते, यशस्वी होते, यालाच श्रीसमर्थ कार्यभाग होतो असे म्हणत आहेत.
“कार्यकर्ता प्रयत्नी जाड।कांही येक असला हेकाड।
तरी समर्थपणे पोट वाड।केली पाहिजे।।६।।”
या ओवीतून श्रीसमर्थांनी काही कार्यकर्त्यांच्या काही खास/विशेष गुणांचा उल्लेख केला आहे. त्यासाठी त्याकाळी प्रचलित असलेले शब्द आपणाला इथे पहायला मिळतात. यात ‘जाड’ असा शब्द घेतला आहे. जाड म्हणजे श्रेष्ठ, कष्टाळू, मेहनती. एखादा कार्यकर्ता ‘प्रयत्नी जाड’ असतो. म्हणजे कामात हुशार, चलाख, तरतरीत, समयसूचक, श्रेष्ठ, कष्टाळू, मेहनती असा असतो. त्याला कामाची चांगली माहिती असते. काही माणसे ध्येय साधण्यासाठी अखंड सतत प्रयत्न करीत असतात. दीर्घोद्योगी असतात. अखंड प्रयत्नाने, मेहनतीने यश मिळवतात. त्यात सातत्यही राखतात. पण कधी अशातील एखादा स्वभावाने काहीसा ‘हेकाड’ असतो, हेकट असतो. हट्टी, दुराग्रही असतो. अहंकारी असतो. त्याला आपल्या श्रेष्ठत्वाचा अभिमान, गर्व असतो. श्रीसमर्थ म्हणतात, असे असले तरी त्याच्या कामाची पात्रता, त्याच्या कामाचे कौशल्य लक्षात घेऊन, त्याला अंजारून, गोंजारून, त्याच्या अहंकाराकडे लक्ष न देता, तिकडे दुर्लक्ष करून, त्याच्या कडून आपले काम नीट करून घ्यावे. त्याच्या कौशल्याचा वापर करून आपले कार्य पूर्ण करून घ्यावे. प्रसंगी इतरांचा त्याला विरोध असला, तरी त्याची ‘पाठवाड’ करावी. पाठवाड करणे म्हणजे त्याच्या पाठीशी रहाणे, त्याच्या बाजूला उभे राहून आपले कार्य साधून घेणे. त्याला सांभाळून घेऊन कार्य सिद्धीस नेणे. श्रीसमर्थ म्हणतात, असा हेकट माणूस असला तरी त्याच्या अंगी कार्य करण्याचे कौशल्य असल्यामुळे त्याची समर्थपणे ‘पाठवाढ’ केलीच पाहिजे. पाठराखण केलीच पाहिजे. त्याला अंजारून, गोंजारुन, गोड बोलून कार्य साधले पाहिजे. त्यामुळे आपले कार्य चांगले होते. यशस्वी होते. अन्यथा आपलेच काम नीट होत नाही. म्हणून असा हेकट माणूस असला तरी त्याच्या अंगच्या गुणांची कदर करून त्याच्या हट्टी स्वभावाकडे दुर्लक्ष करून, उलट तूच चांगला; असे म्हणून आपले काम छान करून घ्यावे. श्रीसमर्थांनी सांगितलेल्या या स्वभावाच्या माणसांचा अनुभव आपल्याला सुद्धा येऊ शकतो. तेव्हा आपणही श्रीसमर्थांच्या या मार्गदर्शनाचा उपयोग दैनंदिन जीवनात करून यशस्वी व्हावे.
“अमर्याद फितवेखोर।यांचा करावा संव्हार।
शोधिला पाहिजे विचार।यथातथ्य।।७।।”
पण जर कार्यकर्ता फितवेखोर असेल, लबाड, बदमाश, खोटारडा असेल तर त्याचा संव्हार केलाच पाहिजे. असे कार्यकर्ते जवळ बाळगणे, जवळ असणे म्हणजे जणू अस्तनीतले निखारे होय. त्यांच्यामुळे प्रपंच, राज्य धुळीस मिळण्याची शक्यता असते. हे इतके स्वार्थी असतात की प्रसंगी मोठा गुन्हा करतानाही घाबरत नाहीत. सारासार विचार त्यांच्या मनात नसतो. जणू स्वार्थाचा पुतळा. यांच्यामुळे देशावर संकटे येण्याची शक्यता असते. त्यामुळे कार्यकर्ता शोधताना विचार करूनच योग्य कार्यकर्ता निवडला पाहिजे की ज्यामुळे नुकसान होणार नाही, अहित होणार नाही.
“मनुष्य राजी राखणे।हीच भाग्याची लक्षणे।
कठिणपणे दूरी धरणे।कांही येक।।८।।”
“मनुष्यास राजी राखणे भाग्याचे लक्षण” असे श्रीसमर्थ म्हणतात. लोक मिळवायचे म्हणजे तर त्यांचे मनोगत जाणून त्यांना राजी राखले पाहिजे. चांगली माणसे सांभाळता आली पाहिजेत. हा कुटुंब प्रमुखाचा एक चांगला गुण म्हणावा लागेल. श्रीसमर्थ या गुणाचा विशेषाने वापर करण्यास सांगत आहेत. चांगली माणसे सांभाळली म्हणजे एकापरी कार्याचा एक भाग त्यांच्या हाती सुपूर्त करून निवांत होता येते. प्रत्येक व्यक्ती म्हणजे भगवंताचे रूप. म्हणजेच, सर्वांच्या देहात देवाचे वास्तव्य असते. तेव्हा सर्वांची मर्जी राखणे, राजी राखणे म्हणजे एकापरी देवाची मर्जी राखणे, राजी राखणे होय. जसे चांगली माणसे सांभाळणे हे श्रेष्ठ लक्षण, तसेच वाईट; दुर्गुणी; लबाड; खोटारडी; फितवेखोर माणसे दूर सारता आली पाहिजेत. हा ही नेत्याचा श्रेष्ठ गुणच. मग दुर्गुणी माणसे आपल्या कितीही जवळची असली तरी त्यांना लांबच ठेवायला हवे. मोहाचा पडदा दूर सारायला हवा. प्रसंगी त्यांचा संबंध तोडून टाकायला हवा. संगत सोडायला हवी. नाहीतर कार्यात विघ्ने येतात/अडचणी निर्माण होतात, अशांतता वाढते. म्हणून श्रीसमर्थ राजी राखण्यावर विशेष भर देतात.
श्रीसमर्थ ‘राजी राखणे’ असे म्हणतात तेव्हा, समयी कामास येणाऱ्या माणसासाठी काही ‘तोशीस’ सोसावी लागते. आपणाला जो मदत करतो त्या उपकार करणाऱ्यास आपणही थोडी मदत करायला हवी. असा संकेत आपण पाळतो. पण तोशीस सोसणे म्हणजे वाट्टेल ती तडजोड स्वीकारणे नव्हे. योग्य तेच देणे. म्हणून यासाठीचे मोजमाप श्रीसमर्थ योग्य शब्दात मांडतात. ते म्हणतात,
“समयी मनुष्य कामा येते।याकारणे सोशिजेते।
न्यायचि नसता मग ते।सहजचि खोटे।।९।।”
मदत करतो, सहाय्य करतो; असे असले तरी त्याला सहन करण्याची एक मर्यादा असते. त्यामागे त्याची अरेरावी वाढत असेल तर ती चालवून घेणे योग्य नव्हे. त्याला झुकते माप देण्याची गरज नाही. मग तो कितीही कामाचा असला तरीही. न्यायनिवाडा करण्याचा एक निश्चित मापदंड असतो. थोड्या मदतीसाठी अती तडजोड करणे अयोग्य. नुकसान किती सोसायचे यालाही एक मर्यादा असते. त्यामुळे मर्जी राखताना नियमाचे उल्लंघन होणार नाही याकडे लक्ष असायला हवे.
क्रमशः
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुंदर लेख वाचायला मिळाला
छान लिहिले आहे. कार्यकर्ता म्हणून स्वतः घ्यायची काळजी आणि इतरांकडून तसे धडे गिरवून घेणे, हे समर्थांनी, आधी केले मग सांगितले या त्यांच्या विशेष आग्रहास समर्थन.