मराठी भाषेतील आरत्या हे भक्तीरसप्रधान काव्य मंदिरातील एक स्वतंत्र असे देवघर आहे. या देवघरात परमेश्वराचे सुरम्य, सगुण स्वरूप आणि भक्त याशिवाय इतर काही दिसत नाही. देव आणि भक्त यांच्या मधील पूज्य पूजक संबंधाची साक्षात दर्शन घडविणारे आरसे म्हणजे आरत्या होय, असे ल.रा. पांगारकर यांनी म्हटले आहे.
श्रीसमर्थांच्या सर्व आरत्या या कसोटीत चपखलपणे बसतात. नारद भक्तीसूत्रात सांगितल्याप्रमाणे भक्ती ११ प्रकारे करता येते. हे सर्व प्रकार श्रीसमर्थांच्या निरनिराळ्या आरत्यांमध्ये आपणास आढळून येतात. तसेच नारद भक्तीसूत्रे सुध्दा त्यामध्ये दिसून येतात. श्रीसमर्थांच्या आरत्या ह्या भावनात्मकता, एकाग्रला वाढविणाऱ्या, अंतरंगास स्पर्श करणाऱ्या रचना आहेत. त्यांच्या स्फूट रचनेने त्या पाठांतरास सोयीच्या आहेत. त्यांमध्ये एक गेयता आहे. त्या म्हणताना टाळ, मृदुंग, झांजा यांची साथ घेतली तर; म्हणणारा भक्तीत लीन होतो, नादब्रह्मात तल्लीन होतो. आणि म्हणून आबालवृद्ध सर्वजण या आरत्या म्हणतात. याचे उदाहरण गणपतीची आरती आहे. “सुखकर्ता दुखहर्ता वार्ता निघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।” या आरतीचे वैशिष्ट्य असे आहे की, यात नारद भक्तीसूक्तात भक्तीचे जे अकरा प्रकार सांगितले आहेत त्यातील खूप यात लक्षात येतात.
या मागणी मध्ये खूप मोठे तत्वज्ञान दडले आहे. संकटी पावावे म्हणजे कोणते संकट ? तर काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, परिग्रह इ. जे शत्रु आहेत त्यांच्या पासून वाचव. अहंकार, बल, दर्प हे माझ्यापासून दूर ठेव. हट्टीपणा, दुराग्रहीपणा, क्रुरता, नीचपणा, द्वेष वाटणे, अधमपणा, दुराचारीपणा इ. अवगुणाची वस्ती माझ्यामध्ये होऊ देऊ नको. या संकटापासून मला वाचव. माझे अंतःकरण, मन, बुद्धी, इंद्रिये ही शुध्द सात्विक गुणांनी भरू दे. माझे अगदी निर्वाणतेने रक्षण कर. मला निर्भय बनव. ही निर्भयता कशी तर, छांदोग्य उपनिषदात सत्यकाम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सत्याची कास धरण्याची असावी. मी भगवंतात अनुरागीत होऊन माझ्या अंतःकरणात सम्यक बुद्धी नांदो. म्हणजे भगवंताप्रती माझ्या मनात फक्त प्रेमभाव निर्माण होवो. यालाच स्वामी विवेकानंद प्रेमयोग म्हणतात. माझ्या मनात भगवन्नामाचा जप सतत चालू दे. म्हणजे माझ्याकडून स्वाध्याय होऊ दे. अहिंसा, राग, क्रोध न धरणे, संसाराच्या कामनेचा त्याग मला करू दे. माझे अंत:करण शांत असू दे, मला कोणाची चहाडी, चुगली करायची सवय, इच्छा न होवो, माझ्यामध्ये भूतदया निर्माण होऊ दे. मला सांसारिक विषयात लालसा उत्पन्न न होवो. माझे अवयव, वाणी, प्राण, नेत्र, कर्ण आणि माझ्यातील सामर्थ्य, सर्व इंद्रिये तेजस्वी म्हणजे पुष्ट होवोत. माझ्यामध्ये दया, क्षमा, धृति म्हणजे अनुकुल प्रतिकूल परिस्थितीत धैर्यवान, अचल राहणे हे गुण विकसीत होवोत. माझ्यातील वैरभाव नष्ट होवो. असा मला गुणसंपन्न करुन तू माझे रक्षण कर.
नृसिंहाच्या आरतीत रामदासांनी प्रल्हादाची पूर्ण कथा सांगितली आहे. ही कथा सांगताना त्यांनी हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्रास दिला, त्याचा छळ केला हे सांगून देवाला, त्या ईश्वराला त्या बालकाचे हे दु:ख सहन झाले नाही, त्याला राहवले नाही, व त्याने नृसींह अवतार धारण करून प्रल्हादास वाचविले. येथे देव हा त्याच्या भक्तांचा कैवारी आहे हे रामदासांनी देव भक्तांचा कैवारी साचा’ असे शब्द वापरून म्हटले आहे. येथे रामदास स्वामी आपल्याला, आपण जर परमात्म्याची भक्ती केली, त्याच्यावर आपली पूर्ण श्रध्दा, निष्टा ठेवली तर तो आपले रक्षण करतो, हे सांगितले आहे. म्हणजे आपण त्याचे नामस्मरण भजन, कीर्तन, लीलांचे गुणगान, मनन, निदिध्यासन करून त्याचे स्मरण केले पाहिजे. आपण भक्त होण्यास स्वत:ला पात्र केले पहिले असे ते सुचवितात.
ज्ञानेश्वरांच्या आरतीत ते श्रीकृष्णांनी स्वत: ज्ञानेश्वरांच्या रुपात अवतार घेतला आहे असे म्हटले आहे. भगवद्गीता प्राकृतात आणून अज्ञानाचा अंध:कार दूर केला. अविद्या नष्ट केली. ब्रह्मज्ञानाने मत्सर दीप मालवले असे स्पष्ट केले आहे. आत्मारामाच्या आरतीत आत्मारामाचा महिमा विशद केला आहे. पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व उजागर केले आहे. तसेच आत्माराम हा खूप पूरातन, सनातन आहे हे सांगायला ते विसरले नाहीत.
सूर्याच्या आरतीमध्ये सूर्याचे गुणगान त्यांनी केले आहे. त्याचे तेज हे असंभाव्य आहे असे ते कटाक्षाने उद्धृत करतात. त्याच्या सूर्यमंडला बद्दल ते म्हणतात की, ते अतुलनीय आहे. सूर्याची उपासना ही अतुलनीय आहे कारण, सूर्यनमस्कार घातल्याने आपले शरीर सुदृढ होते. धष्ट पुष्ट बनते. तसेच सूर्याची उपासना केल्याने मन सुध्दा सक्षम बनते. या सर्व ज्ञानाचे विज्ञान त्यांनी अनुभवले होते. म्हणून ते म्हणतात, सूर्याची उपासना केल्याने मी सूर्याचा वंशजच झालो आहे. म्हणजे ते सूर्याप्रमाणे निष्काम कर्मयोगी झाले आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर आत्मनात्मनिवेक बुध्दीने ते देहबुध्दीतून आत्मबुध्दी पर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे. त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे.
नवरात्रीच्या अंबाबाईच्या आरतीत त्यांनी या स्त्रीशक्तीचे पूजन, ब्रह्मा, विष्णू, रूद्र करतात असे प्रतिपादित केले आहे. ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू पालन कर्ता, व रुद्र हा संहारक व नियामक होय. विष्णू या सृष्टीचे/ब्रह्मांडाचे पालन करतो, त्याची काळजी घेतो. तर रूद्र म्हणजे शिव जो कल्याणकारी आहे, ज्ञानमय आहे. ऋग्वेदामध्ये या रूद्र देवावर अनेक सूक्ते आहेत. असे हे सर्वश्रेष्ठ विश्वंभर सुध्दा या जगन्मातेला पूजतात, असा तिचा महिमा समर्थ आपल्याला सांगू इच्छितात. या आरतीमध्ये समर्थ रामदासांनी नऊ दिवस-रात्रींचे वर्णन खूपच काव्यमय गुंफले आहे. नवरात्रीतील पूजा-अर्चा, कथा त्यांनी थोडक्या शब्दांत पण आशयघन रचली आहे. षष्ठीला दिवट्या नाचवून, कवड्या अर्पण करतात. सप्तमीला पूजार्चन जाई, जुई, शेवंती इ. फुलांची आरास करतात. नवमीला पारणे; सप्तशती; होम, दशमीला म्हणजे दसऱ्याला सीमोल्लंघन असे अगदी रसभरीत वर्णन केले आहे.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।