वडाचं बीज लहान असता फोडून पाहिलं तर त्यात वृक्ष काही दिसत नाही. पण झाडाचं खोड, फांद्या, पाने, फळे असा प्रचंड विस्तार या बीजातून होतो. “फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे । १७-२-१४ ।।” ८-३-२० आणि २३ या दोन्ही ओव्यांमध्ये किंवा अनेक ठिकाणी मूळ माया तोचि मूळ पुरुष असे श्रीसमर्थ सांगतात. मूळ माया बीजासारखी आहे आणि तिच्यात संपूर्ण विश्वविस्तार आहे. श्रीसमर्थ इथे अद्वैतच सांगतात. आकाशात चंचल वायू निर्माण झाला त्यात शुद्ध जाणीव वास करते. तो जगत्ज्योतिचा मूळ झरा ! अर्थात वायू ही प्रकृती, जगतज्योति पुरुष होय.
“निर्गुणीं गुणविकारु । तोचि शड्गुणैश्वरु ।
अर्धनारीनटेश्वरु । तयास म्हणिजे ।।१७-२-८ ।।”
प्रकृती पुरुष हे मूळमायेचे नाव. तीच शिवशक्ती, अर्धनारीनटेश्वर, षड् गुणेश्वर. ही नावे मायेचे स्वरूप अधिक स्पष्ट करतात. इथेच द्वैताला सुरुवात होते. तिथेपर्यंत जायचे आहे व नंतर अद्वैत व्हायचे आहे. शिवशक्तीचे एकत्रित रूप म्हणजे शिवलिंग म्हणजेच शंकराची पिंड होय. मुळात भगवान शिव हे चिन्हरहित आहेत, अलिंग आहेत. वायूपासून त्रिगुण झाले, तमोगुणापासून झाली पंचभूते. मूळमायेत असणारी शक्ती अनंत, अपार आहे. त्यातच त्रिगुण साम्यवस्थेत आहेत. हे साम्य डळमळीत झाले की त्रिगुण प्रकटतात. हे त्रिगुण, जाणीव, पंचभूते, मायेच्या अनंत शक्ती होत्या कुठे ? तर सारे काही मूळमायेतच सामावलेले आहे.
गणितात एक संकल्पना आहे venn diagram. त्यात असलेले संच म्हणजे subsets आहेत. तसे परब्रह्म हा super set आणि त्रिगुण, मायेच्या साऱ्या शक्ती त्यातच कर्दम रूपाने असतात त्याला subset म्हणू या. अणूऊर्जेचे उदाहरण घ्या. जेव्हा अणूकेंद्र डळमळीत केले जाते तेव्हा अणू ऊर्जा मिळते आणि तिचे प्रचंड परिणाम पहावयास मिळतात. गुणसाम्य डळमळीत झाले की साऱ्या शक्ती व्यक्त होतात. आपण पाहतो ते सारे शक्तीचे परिणाम
“आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति ।
तेथून पुढें नाना वेक्ती । निर्माण जाल्या ।। १७-२-९ ।।”
आपण विजेचे परिणाम पहातो, प्रत्यक्ष वीज ऊर्जा पहात नाही. गुरुत्वाकर्षणाचे परिणाम पाहतो, पण गुरुत्वाकर्षण दिसत नाही. झाडावरील फळ खालीच पडते, कितीही उंच उडी मारली तरी आपण खालीच येतो. निर्माण झाल्यापासून ग्रहगोल विशिष्ट कक्षांमधून फिरतात, एकमेकावर आदळत नाहीत. हा गुरुत्वाकर्षण आणि inter planetary forces चा परिणाम. Inter molecular forces वस्तूला आकार देतात. या साऱ्या शक्ती, जगातील चैतन्य म्हणजेच प्रकृती-पुरुष. मग हे २ आहेत का? भेद निर्माण करतात का ? गुणमाया ते मुळमाया भेदच दाखवले जातात. शिवशक्तीमुळे संसारात स्त्रीपुरूष असा भेद दिसतो. जीवशास्त्रीय दृष्ट्या अवयवात, संप्रेरकात भेद आहे, ते रहाणारच.
“नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव ।
येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ।। १७-२-२० ।।”
नवरीला नवरा हवा असतो असा भेद तर दिसतोच. पिंडात दिसणाऱ्या या भेदावरून ब्रह्मांडाच्या बीजाची कल्पना करता येते. पण भगवंताने गाय, माता निर्माण केली त्यावेळी वात्सल्य त्यांच्या ठिकाणी अधिक दिले. “माता वाटून कृपाळू जाला” असे श्रीसमर्थ म्हणतातच. मग वात्सल्य, ममता फक्त स्त्रियातच असते का ? धैर्य, कणखरपणा, धाडस, निश्चयी वृत्ती फक्त पुरुषातच आहे का ? (पुरुषाचे गुण, स्त्रीगुण या साऱ्या मानवी कल्पना) तर तसं नाही. अनेक प्रेमळ, काळजी घेणारेही पुरुष आहेत. घरोघरी स्त्रियांनी स्वयंपाक केला तरी जागतिक कीर्तीचा शेफ म्हणून आज पुरुषाचे नाव पुढे येते. जिजामातेने ममतेने, वात्सल्याने शिवबाला वाढवले. पण राजकारण, न्यायनिवाडा करण्याचे कसबही शिकवले ना ! राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांचे उदाहरण घ्या. अगदी अलीकडची उदाहरणे घ्यायची तर मॅडम कामा, डिटेक्टिव रजनी पंडित, किरण बेदी आणि मीरा बोरवणकर इ. पहा.
आज शास्त्रज्ञ, विमानचालक, लोकोपायलट, कंडक्टर, पोस्टमन कोणत्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. उद्योग व्यवसायात उच्च शिखर गाठणाऱ्याही आहेतच. उदा. इंद्रा नूयी. आज राजकारणातही स्त्रिया मागे नाहीत. उदा. इंदिरा गांधी, सुषमा स्वराज. कुप्रसिद्ध डाकू फुलनदेवी होऊन गेली. कीर्तन, प्रवचन करणाऱ्या, मठपती महिला तर श्रीसमर्थांच्या काळापासून आहेतच. म्हणजेच भेद शरीरात असला तरी गुणात नाही. ईश्वराने सारी माणसे परस्परात गुंतून रहातील असे लोभाचे गुंडाळे केले आहेत. “वासना मुळींची अभेद । देहसमंधें जाला भेद । १७-२-२३ ।।”
या भेदात श्रीसमर्थांचे सांगणे असे की,
“पुरुषास स्त्रीचा विश्वास । स्त्रीस पुरुषाचा संतोष ।
परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ।। १७-२-२९ ।।”
असे आकर्षण असले तरी सूक्ष्म विवेकाने पहावे असा सावध इशाराच श्रीसमर्थ आपल्याला देत आहेत. पुराणात एक कथा आहे. आदियोगी, आदिगुरु भगवान शिव काही ज्ञान देत होते. सभोवताली ऋषी बसले होते. त्यातील भृगू (काही ठिकाणी भृंगी असे आहे) ऋषींना शिवाला प्रदक्षिणा घालाव्या असे वाटले. परवानगी मागितली. ती शिवशंकरांनी दिली. पार्वती माता भगवान शिवांच्या डाव्या बाजूला बसली होती. भृगुंना तिला प्रदक्षिणा नव्हती घालायची. त्यांनी सूक्ष्म होऊन दोघांच्या मधून मार्ग काढला. शंकरांच्या ते लक्षात आले, त्यांनी पार्वतीमातेला डाव्या मांडीवर घेतले. आता भृगुंनी शिवाच्या खाली असलेल्या पावलाला प्रदक्षिणा केली. तेव्हा भगवान शिवांनी पार्वतीमातेला पूर्ण आपल्यात सामावून अर्धनारीनटेश्वराचे दर्शन भृगुंना घडवले. शिवशक्तीचे अभेदत्वच दाखवले.
भगवंताच्या अवतारातही बघा, श्रीरामांबरोबर सीतामाई, श्रीकृष्ण रखुमाई सोबतच आहेत. शंकरांचा ११वा रुद्र ब्रह्मचारी मारुती, पण त्याच्या शेपटीत शक्ती (पार्वती) शिरली. तिने काय केले ते आपण सुंदरकांडात वाचले आहे. निसर्गातील पूर्ण फुलात स्त्रीकेसर, पुकेसर असतात. मग self कधी एका फुलात दोन्ही नसतात तेव्हा cross pollination ने प्रजा वाढते. सर्वच प्राणी, पक्षी, यातही नर मादी असतातच आणि तेच लैंगिक प्रजा वाढवतात. ब्रह्म निर्गुण, निराकार, निश्चल असले तरी प्रकृतीपुरुष तीच शिवशक्ती, सर्वत्र आहेच. तिच्यामुळे जगरहाटी चालू आहे. संसार/प्रपंचात स्त्री – पुरुष, पति-पत्नी परस्परपूरक गुणाचे; कार्याचे असायला हवेत. तरच संसार नेटका होईल.
जीव ब्रह्म यात अनेक पडदे (जन्म) आहेत. पण सामान्यांना आपल्यातील जीव कळत नाही, विश्वातील शिव कळत नाही. सूक्ष्माचा विचारही आकलन होत नाही. नुसते यंत्र निर्माण करून चालत नाही, त्याला चालवायला शक्तीही हवीच ना ! म्हणूनच भारताचे चंद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण भागात जिथे उतरले तो पॉईंट, शिवशक्ती म्हणूनच सर्वांनी मान्य केलाच ना !
।। जय जय रघुवीर समर्थ ।।