संयम म्हणजे मनावर नियंत्रण, ताबा ! आपल्यासारख्या प्रापंचिक माणसांजवळ हवाच असा हा गुण !! पण तो अवघड असतो. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात, मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे. अगदी सकाळी उठल्यापासून अनेक गोष्टीत संयम आवश्यक असतो. खाणे-पिणे, खरेदी, मौजमजा, इ. अनेक !! या सगळ्यांमध्ये आपण सहज वहावत जातो आणि थांबण्यासाठी संयमाची कसोटी लागते आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं.
संयम जसा प्रपंचात हवा तसा परमार्थात पण आवश्यकच !! परमार्थाची पहिली पायरीच संयम आहे, असे म्हणता येईल. साईबाबांनी परमार्थ मार्गावर चालण्यासाठी दिलेला मंत्र आहे ‘श्रद्धा आणि सबुरी’. परमार्थ प्राप्तीसाठी साधन चतुष्टय (विवेक, वैराग्य, षटसंपत्ती, मुमुक्षत्व) संपन्न व्हावे लागते आणि त्याची सुरुवात संयमाने होते. तो असेल तरच पुढे प्रगती होते. साधकाने शम म्हणजे शरीर संयम आणि दम म्हणजे मनावर संयम मिळवला की त्याला या मार्गावर चालायला बळ मिळते. या दोन्ही गोष्टी अवघड असतात, मन भरकटते पण त्याला सारखे समजवावे लागते. त्यामुळे आत्मसंयम खूप महत्वाचा असतो आणि तो येण्यासाठी अनेक प्रलोभनांपासून प्रयत्नपूर्वक दूर रहावे लागते. तसेच कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न ठेवता आपले कर्म करत रहावे लागते. आपण जेव्हा एखाद्या वस्तूचा, विषयाचा त्याग करतो तेव्हा त्याचा विचार करणे सोडावे. “मी दिले, मी केले”, असे सतत करून आपण त्या वस्तूत, विषयात गुंतून रहातो. हे गुंतणे सोडवले पाहिजे. म्हणून समर्थ सांगतात, मना कल्पना ते नको विषयांची
हे विषय कोणते ? तर काम, क्रोध, मोह,मद, मत्सर, दंभ !! हे सहा विकार साधकाला पदोपदी त्रास देतात आणि देहबुद्धी पोसतात. परमार्थ मार्गावर चालणाऱ्या साधकाचे ध्येय असते.. ‘देहबुद्धी ते आत्मबुद्धी’ आणि म्हणून त्याला ध्येयापासून परावृत्त न होता विषयांवर संयमाने, विवेकाने मात करावी लागते. हे कसे शक्य होते ? भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे,
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु I
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।।गी.६-१७।।
ज्याचा, आहार विहारावर संयम असतो; जो शरीराचा वापर योग्य कर्म करण्यास करतो; ज्याची झोप व जाग संयमित/नियमित आहे; अशा माणसाला दुःख नाश करणारा योग प्राप्त होतो.
आपण सामान्य माणसे, एखादा पदार्थ खाताना चवीचा; आवडीचा विचार करतो. पण खरा साधक देहकार्य सुरू ठेवावे म्हणून अन्नग्रहण करतो. आपण झोपून देहाला विश्रांती देतो पण साधकाची मनःशांती हीच त्याची विश्रांती असते. (असे वाचले की प.पू. मामासाहेब देशपांडे यांच्या मातोश्री प.पू. पार्वतीदेवी देशपांडे यांनी सलग १२ वर्ष पाठ टेकली नव्हती.) समर्थ रामदास स्वामींचे चरित्र जर आपण पाहिले, तर वर दिलेला श्लोक, त्यांना पाळावा लागलेला संयम प्रत्येक घटनेत दिसतो. वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी घर सोडले म्हणजे आप्तेष्टांपासून दुरावा, मातृ प्रेमावर संयमाने मात !
पुरश्चरण काळात मिळालेली भिक्षा नदीच्या पाण्यात बुडवून मग ग्रहण करणे म्हणजे रसनेवर मात ! पहाटे ३ वाजता उठून दिनक्रम सुरू करणे म्हणजे निद्रा संयम ! रोज १२०० सूर्यनमस्कार घालणे, मासे चावत असले तरी नदीच्या पाण्यात उभे राहून जप करणे म्हणजे इंद्रिय संयम !! खरेच, म्हणून तर ते समर्थ होते. आपण कल्पनेत तरी यातील एकतरी गोष्ट करू शकू का ? असा प्रश्न पडतो आणि खजील व्हायला होते. अशा आपल्या सारख्या सामान्य माणसांमध्ये बदल व्हावा म्हणनू समर्थ सांगतात,
मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवीं धरावें।
मना बोलणें नीच सोशीत जावें।
स्वयें सर्वदा नम्र वाचें वदावें।
मना सर्व लोकांसि रे नीववावें।।
अप्रिय गोष्टी असल्या तरी मनावर ताबा ठेवून खंबीरपणे त्या सोसाव्या. कोणीही मनाविरुद्ध बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष करावे. सर्वांशी नम्रतेने बोलून जमवून घ्यावे. तर परमार्थ मार्गावर चालणाऱ्या साधकाला समर्थ श्रीरामाला प्रार्थना करायला सांगून मनावर संयम हाच उपाय सांगतात, त्यांच्या कृपेनेच हे शक्य होणार आहे. आणि म्हणून म्हणतात,
कृपा पाहिजे राघव कृपा पाहिजे।
मन उदासीन इंद्रिय दमन तरीच लाहिजे।।१।।
निंदक जनी समाधानी तरीच राहिजे।।२।।
दास निरंतर नीच उत्तर तरीच साहिजे।।३।।
श्रीरामाच्या कृपेने निंदकांनी केलेली निंदा सोसण्याचे बळ येते. इंद्रियांवर, मनावर संयम बाळगता येतो. त्यामुळे श्रीरामाची कृपा माझ्यावर असू दे. मला संयम पाळता येऊ दे अशी प्रार्थना श्रीरामाला आणि समर्थांना करते.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।